Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जनकल्याण समितीला शाहू छत्रपती पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे देण्यात येणारा ‘प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीला बुधवारी जाहीर करण्यात आला. जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल समितीला जाहीर करण्यात आला. एक लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सोसायटीच्या परिषदेचे व नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विकास काकतकर यांनी ही माहिती दिली. नियामक मंडळाचे सदस्य राम निंबाळकर, प्रा. आनंद भिडे उपस्थित होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येत्या रविवारी (७ मे) सायंकाळी साडेपाच वाजता फर्ग्युसन कॉलेजच्या एन. एम. वाडिया अॅम्फी थिएटरमध्ये हा पुरस्कार वितरण समारंभ होईल. सोसायटीचे अध्यक्ष शाहू छत्रपती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या वेळी महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहतील. सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती यांच्या सन्मानार्थ २०१६पासून पुरस्कार देण्यात येत आहे. शिक्षण, विज्ञान किंवा पर्यावरण क्षेत्रात वीस वर्षांहून अधिक काळ समाजोपयोगी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो, असे काकतकर यांनी सांगितले.
जनकल्याण समिती १९७३पासून महाराष्ट्रात कार्यरत आहे. वनवासी विकास, ग्राम आरोग्यरक्षक, पूर्वांचल विकास, आपत्ती निवारण, आदर्श रुग्णसेवा, शिक्षण प्रकल्प आदी समितीचे मुख्य उपक्रम आहेत. गेल्या वर्षी समितीने दुष्काळ निवारण व जलसंधारणात राज्यात विशेष उल्लेखनीय कार्य केले होते. समितीची एकूण १ हजार ३९० सेवाकार्ये आहेत. तसेच, समितीतर्फे सात मोठे प्रकल्प सुरू आहेत. निवड समितीत काकतकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया, एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष भिकूजी उर्फ दादा इदाते, कार्यवाह प्रा. आनंद भिडे यांचा समावेश आहे. पहिला पुरस्कार नवी दिल्लीच्या एकल विद्यालय फाउंडेशनला प्रदान करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हद्दीलगतची गावे पालिकेत येणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्याबाबत सकारात्मक असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. गावांच्या समावेशाबाबतची राज्य सरकारची अंतिम भूमिका आज, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान स्पष्ट केली जाणार आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी बुधवारी चर्चा केली. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, बाबुराव पाचर्णे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हद्दीलगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत असल्याने सुनियोजित विकासासाठी पालिकेत समावेश करण्याचा आग्रह सर्व आमदारांनी पाटील यांच्याकडे धरला.
आमदारांसह सर्व अधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर पाटील यांच्यासह आमदारांनी गावांच्या समावेशाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. गावांच्या समावेशाबद्दल मुख्यमंत्री अनुकूल असल्याचा दावा आमदार टिळेकर आणि मुळीक यांनी केला. लवकरच त्याविषयी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे संकेतही त्यांनी दिले.
हद्दीलगतच्या ३४ गावांच्या समावेशाची प्रक्रिया पूर्ण करूनही अंतिम निर्णय घेण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याने हवेली नागरी कृती समितीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीवेळीच कोर्टाने चार मे पर्यंत गावांबाबतचा निर्णय घेण्याचे आदेश सरकारला दिले होते. आज, कोर्टासमोर पुन्हा सुनावणी होणार असून, गावांच्या समावेशावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळापासून ही गावे पालिका हद्दीत समाविष्ट करण्याबाबत हालचाली सुरू होत्या. ही प्रक्रिया कदाचित येत्या काही काळात पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
निवडणुकीचे काय होणार?
पालिका हद्दीत समाविष्ट होणाऱ्या गावांमध्ये नुकताच ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही निवडणूक रद्द करावी, अशी मागणी यापूर्वीच मुख्यमंत्री आणि निवडणूक आयुक्तांकडे करण्यात आली आहे. गावांच्या समावेशाबाबत सरकार ठाम असेल, तर या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी तातडीने त्याचा अंतिम निर्णय जाहीर करावा लागणार आहे.
सर्व गावे की अंशतः?
हद्दीलगतच्या सर्व ३४ गावांच्या समावेशाचा निर्णय झाल्यास पायाभूत सुविधा पुरविताना पालिकेवर ताण पडण्याची भीती वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने काही ठरावीक भागांतील गावांचा समावेश करणे अधिक सयुक्तिक राहील का, या दृष्टीने बुधवारी बैठकीत चर्चा झाली. अर्धवट स्वरूपात किंवा मोजकीच गावे घेतल्यास त्याचे विपरित परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे एकाचवेळी सर्व गावे घेण्याबाबत सहमती झाल्याचे कळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालसुधारगृहातील मुलांवर अत्याचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवाजीनगर येथील बालसुधारगृहात चौदा ते पंधरा वयोगटातील मुलांनी त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या मुलांवर सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी सापडलेली लहान मुले आणि किरकोळ गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांना पुनर्वसनासाठी बालसुधारगृहात ठेवण्यात येते. शिवाजीनगर येथील सुधारगृहात जवळपास पाचशेच्या आसपास मुले राहतात. येथील तीन मुले या प्रकाराला बळी पडली आहेत. या मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी सुधारगृह प्रशासनाची असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याची चर्चा आहे.
या सुधारगृहातील काही मुलांना येथे गटाने राहणाऱ्या मुलांनी कायमच लक्ष केल्याचे पीडित मुलांचे म्हणणे आहे. मुलांना मारहाण करण्यापासून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यापर्यंतच्या घटना येथे सातत्याने खुलेआम घडत होत्या. पीडित मुलांनी या प्रकारांची प्रत्येक वेळी येथील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी त्याकडे सपशेल काणाडोळा केला. तसेच, शिक्षकांकडून या प्रकाराला प्रोत्साहन दिले जात असल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या प्रकरणी झोन एकचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ म्हणाले, ‘या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. शिवाजीनगर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी आमदार विजय काळे यांनी शिवाजीनगर येथे सुधारगृहात भेट दिली. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली, मात्र त्यांनी उत्तर देण्यास टाळटाळ केली.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी सेवक पदाच्या फेरपरीक्षेची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कृषी आयुक्तालयामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवक पदभरती परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आम आदमी पार्टी (आप) आणि स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे. भारांकन पद्धत रद्द करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.
७३० कृषी सेवक पदासाठी झालेल्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये एका पदासाठी बारा लाख रूपये घेऊन कोट्यवधी रूपयांची अफरातफर झाल्याचा आरोप परीक्षार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणी कृषी विभागाच्या तक्रारीहून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि गजानन एंटरप्रायजेसच्या विरोधात बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकाराची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा रद्द केली. मात्र, त्यानंतर सरकारने या पदासाठी फेरपरीक्षा घेण्याऐवजी भारांकन पद्धतीचा वापर करण्यात आला. त्यामुळे लेखी परीक्षेला गैरहजर राहिलेले २४, १०५ विद्यार्थीही गुणवत्ता यादीत पात्र ठरले. तसेच, या पद्धतीमुळे जुन्या परीक्षा प्रक्रियेतून दहावी आणि पदवी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने ही पद्धत रद्द करावी आणि फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी बुधवारी अभाविप, मनविसे, ’आप’ने केली आहे.
कृषी आयुक्तालयाने कृषी सेवक पदभरती परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करावी. तसेच, भारांकन पद्धत रद्द करून फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी कृषी आयुक्तांना निवेदनाद्वारे केल्याचे अभाविपचे प्रदेश महामंत्री राम सातपुते यांनी सांगितले. राज्य सरकार फेरपरीक्षा घेण्याऐवजी भारांकन पद्धत वापरत आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे भारांकन पद्धत रद्द करून फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी आपतर्फे मुकुंद किर्दत यांनी केली. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि पारदर्शकतेसाठी कृषी सेवक पदासाठी फेरपरीक्षा घेण्याची मागणी मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव आणि स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतात मुस्लिम सुरक्षित

$
0
0

सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम खान यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

’आपल्या देशात सतरा ते अठरा कोटी मुस्लिम नागरिक राहतात. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा भारतातील मुस्लिम सर्वाधिक सुरक्षित आहेत. मात्र, याची जाणीव त्यांना आहे का,’ असा सवाल उपस्थित करून सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम खान यांनी धर्माच्या आधारे ध्रुवीकरण करणाऱ्यांवर निशाणा साधला.
हमीद दलवाई इस्लामिक रीसर्च इन्स्टिट्यूटतर्फे एस.एम.जोशी सभागृहात आयोजित कार्यक्रमात खान यांना ‘हमीद दलवाई स्मृति पुरस्कार’ माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी पाकिस्तानातील संपादक आणि लेखक अजमल कमाल, इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा मेहरुन्निसा दलवाई, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बहाळकर आदी उपस्थित होते.
‘भारतात मुस्लिम सर्वाधिक सुरक्षित आहेत. त्यांना सर्व गोष्टी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. परंत, इतर देशांमध्ये तशी परिस्थिती नाही. तिथे त्यांना दहशतीखाली जीवन जगावे लागत आहे. मात्र, किती भारतीय मुस्लिमांना याची जाणीव आहे,’ असा प्रश्न खान यांनी उपस्थित केला. ‘हमीद दलवाई हे मुस्लिम धर्माच्या पुढचा विचार करत होते. त्यांच्या विचारांची समाजाला गरज आहे. पण त्यांचे विचार समजून घेण्याची मुस्लिमांची तयारी नाही,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
गोखले म्हणाले, ‘सर्व समाजांमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. त्याचे निराकरण करण्यासाठी धर्मचिकित्सा करणे आवश्यक आहे. चुकीच्या गोष्टींसंबंधी प्रगतिशील भूमिका घेण्याची गरज आहे. मुस्लिम सत्यशोधक समाजाने सर्व धर्मीयांसाठी कार्य करणे गरजेचे आहे.’ हमीद दलवाई जे काम करत होते, त्यामुळे ते समाजापासून दूर गेले. समाजही आपल्याला दूर लोटेल या भीतीमुळे दलवाई यांच्या नावाने पुरस्कार घेण्यास अनेक जण नकार देतात. पण खान यांनी पुरस्कार स्वीकारल्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, असे भाई वैद्य म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुस्लिमांनी घ्यावा दलवाईंचा आदर्श’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘हमीद दलवाई यांनी मुस्लिम समाजाच्या सुधारणेचा विडा उचलला होता. ते जे सांगू पाहत होते ते अजूनही बहुतांश समाजाला समजलेले नाही. धर्मचिकित्सा ही एका आयुष्यात संपणारी गोष्ट नाही. मात्र, दलवाई कधी थांबले नाहीत. त्यांच्या कार्याचा आदर्श मुस्लिम समाजाने घ्यायला हवा,’ अशी अपेक्षा पाकिस्तानातील संपादक आ​णि लेखक अजमल कमाल यांनी व्यक्त केली.
समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या ४० व्या स्मृती दिनानिमित्त बुधवारी ‘दलवाईंचे लेखन आणि कार्य’ या विषयावर चर्चासत्र ‘साधना साप्ताहिक’ आणि ‘हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट’तर्फे आयोजिण्यात आले होते. त्या वेळी कमाल यांनी आपले विचार मांडले. निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले, विनय हर्डीकर, समाजवादी नेते भाई वैद्य, साधनाचे संपादक विनोद शिरसाट आणि राजेंद्र बहाळकर आदी या वेळी उपस्थित होते.
हमीद दलवाई यांचे विचार तत्कालीन धर्माची चिकित्सा करणारे होते. आजही त्याच विचारांची समाजाला गरज आहे. अजूनही मुस्लिमांना दलवाई यांच्या चळवळीचा हेतू समजलेला नाही. तो समजला तर समाजाची प्रगती वेगाने होईल, असे कमाल यांनी सांगितले.
‘गोहत्याबंदीच्या मागणीला घटना परिषदेत विरोध झाला होता, हे लक्षात घ्यायला हवे. सावरकरांसारख्या विचारवंतांचे गोहत्येबाबतचे परखड विचार आज किती जणांना पचवता येतील, हाही प्रश्नच आहे; मात्र अचानक गोहत्याबंदीचा कायदा झाला आणि कायदेपंडित, पोलिसांच्याही आधी स्वयंघोषित गोरक्षकांनी उठसूठ कुणालाही पकडायला सुरुवात केली. दुर्दैवाने या बेधुंद गोरक्षकांवर पोलिसांची कारवाई मात्र मर्यादितच आहे. या घटना अत्यंत निंदनीय आहेत,’ अशी टीका हेमंत गोखले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रीन कॉरिडॉरमुळे मिळाले जीवनदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॅन्सरबरोबर यकृताच्या सिरॉसिसचा गेल्या तीन महिन्यांपासून त्रास असलेल्या एक्केचाळीस वर्षीय पेशंटला ७४ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीच्या यकृतामुळे जीवदान मिळाले. या अवयवदानामुळे पुन्हा एकदा औरंगाबाद ते पुणे असे हृद्य नाते निर्माण झाले आहे. ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून दोन्ही शहरांतील अंतर तीन तास २० मिनिटांत कापणे शक्य झाले. ‘औरंगाबाद येथील ७४ वर्षीय व्यक्ती ब्रेनडेड झाल्याची माहिती मिळाली. त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. दरम्यान, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये यकृतासाठी एक पेशंट वेटिंगवर होता. त्याला यकृताचा सिरॉसिस झाला होता. त्यामुळे पुणे पोलिसांसह ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने औरंगाबाद ते सह्याद्री हॉस्पिटलपर्यंत ग्रीन कॉरिडॉरची आखणी करण्यात आली,’ अशी माहिती प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.
‘शहरातील ४१ वर्षीय व्यक्तीला यकृताची गरज होती. त्याला औरंगाबाद येथील ब्रेनडेड पेशंटचे यकृत मिळाल्याने दुपारी तीननंतर प्रत्यारोपण कऱण्यात आले. प्रत्यारोपणामुळे पेशंटला जीवदान मिळाले,’ असे सह्याद्री हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. बिपीन विभुते यांनी सांगितले. डॉ. विभुते यांच्यासह डॉ. राहुल सक्सेना, भूलतज्ज्ञ डॉ. मनीष फाटक, डॉ. संदीप कुलकर्णी यांनी प्रत्यारोपण केले. प्रत्यारोपणासाठी हॉस्पिटलच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला पाध्ये, समन्वयक राहुले तांबे, अरुण अशोकन यांनी परिश्रम घेतले.
सह्याद्री हॉस्पिटलचे ऑपरेशन मॅनेजर डॉ. केतन आपटे म्हणाले, ‘औरंगाबाद ते पुणे दरम्यानचा प्रवास ५ ते ६ तासांचा असतो. परंतु झेडटीसीसीचे समन्वयक तसेच पोलिसांच्या सहकार्याने हे अंतर ग्रीन कॉरिडॉरद्वारे ३ तास २० मिनिटांत पूर्ण केले. आतापर्यंत सह्याद्री हॉस्पिटलमद्ये ४६ यकृतांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे.’'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोळ्यांच्या पॅकिंगने पेशंट हैराण

$
0
0

दहा पेक्षा अधिक गोळ्यांमुळे औषध हाताळणे अवघड

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रक्तदाबासह मधुमेहासारख्या व्याधींवरील जीवनावश्यक औषधांचे पूर्वीचे दहा गोळ्यांचे पॅकिंग आता ३० ते ४० गोळ्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. गोळ्यांच्या पॅकिंगचा आकार बदलल्याने औषधे हाताळणे पेशंटना अवघड झाले आहे. दुसरीकडे ‘स्ट्रीप’मधून गोळ्या कापून देताना केमिस्टांना नाकी नऊ येत आहेत.
काही महिन्यांपर्यंत एकच घटकद्रव्ये असलेल्या विविध औषध कंपन्यांकडून १० गोळ्यांचे स्ट्रीप बाजारात येत असत. त्यात बदल करून कंपन्यांनी १५ गोळ्यांची स्ट्रीप तयार केली आहे. त्यापाठोपाठ ३०, ४० आणि ६० पर्यंत गोळ्यांचे पॅकिंग तयार करण्यात आले आहे. जादा गोळ्यांमुळे स्ट्रीपचा आकार वाढला आहे. त्यामुळे एका महिन्याच्या गोळ्या घेताना पेशंटना ते हाताळणे अवघड झाले आहे. पेशंटच्या मागणीनुसार औषध विक्रेत्यांकडून गोळ्या कापून दिल्या जातात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून औषध कंपन्यांकडून जादा गोळ्यांचे पॅकिंग केल्याने ते पेशंटसह औषध विक्रेत्यांसाठी डोकेदुखीचे बनले आहे.
अनेकदा औषधांचे स्ट्रीप दुमडल्यास त्यातून औषध बाहेर पडण्याचा धोका असतो. पेशंटच्या गरजेनुसार औषधे कापून दिली तर, उर्वरीत औषधांच्या मागे कंपनीचे नाव, उत्पादनाची तारीख किंवा औषधांचे नाव नसते. त्याबाबत पेशंट तक्रार करतात. गोळ्यांच्या स्ट्रीपचा आकार वाढविण्यास कंपन्यांना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) परवानगी दिली आहे का? कोणत्या औषधांच्या स्ट्रीपचा आकार वाढविण्यास परवानगी आहे यासारखे विविध प्रश्न विक्रेते उपस्थित करीत आहेत.
या संदर्भात केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव विजय चंगेडिया यांच्याशी संपर्क साधला असता, जादा गोळ्यांच्या स्ट्रीपचे पॅकिंग बाजारात विक्रीसाठी येत असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. ‘काही औषध कंपन्यांकडून १० किंवा १५ पेक्षा ३० ते ४५ गोळ्यापर्यंत पॅकिंग करण्यात येत आहे. त्या गोळ्या विक्रेत्यांना दुकानात ठेवणे अडचणीचे ठरत आहे. पेशंटना औषधे कापून देताना विक्रेत्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत आहेत. त्यामुळे कंपन्यांनी पूर्वीप्रमाणे १० ते १५ गोळ्यांचे पॅकिंग करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पॅकिंगसंदर्भात समिती नियुक्त
‘औषध कंपन्यांकडून ४० ते ६० गोळ्यापर्यंतचे पॅकिंग बाजारात आले आहे. कंपन्यांवर या प्रकरणी नियंत्रण आणणे अपेक्षित आहे. काही मोजक्याच औषधांचे पॅकिंग शेड्यूल पी १ नुसार जादा गोळ्यांच्या प्रमाणात करता येऊ शकते. परंतु, सरसकट पॅकिंग वाढविण्याबाबत केंद्र सरकारच्या औषध महासंचालनालयाने केंद्रीय स्तरावर समिती नियुक्त केली आहे. त्या समितीकडून यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. त्याचा अभ्यास करण्यात येत आहे,’ अशी माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी ‘मटा’ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सह्याद्री हॉस्पिटलला बजावली नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हॉस्पिटलबाहेरून औषधे आणल्याने बिलात ‘ड्रग अॅडमिन चार्जेस’च्या नावाखाली पेशंटकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्याच्या प्रकाराची पालिकेच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली असून, कारणे दाखवा नोटीस सह्याद्री हॉस्पिटलला जारी केली आहे.
बाहेरून औषधे खरेदी न करण्याची सक्ती कोणत्याही हॉस्पिटलला करता येणार नसल्याचे यापूर्वीच आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. गेल्या वर्षी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये असाच प्रकार घडला होता. त्यावेळी हॉस्पिटल प्रशासनाने पालिकेच्या आरोग्य विभागाला पेशंटला बाहेरून औषधे आणून देण्यास आमची हरकत नसल्याचे लेखी पत्र दिले होते. परंतु, एक ते दीड वर्षानंतर पुन्हा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त रक्कम वसूल करण्याचा प्रकार घडल्याचे मटाने उघडकीस आणले. बाहेरून औषध आणणाऱ्या व्यक्तींकडून ड्रग अॅडमिन चार्जेसच्या नावाखाली रक्कम वसूल करण्याचे आदेश हॉस्पिटल प्रशासनाने बिलिंग विभागाला दिले. या संदर्भात हॉस्पिटलकडून या वृत्ताचा इन्कार कऱण्यात आला आहे.
हॉस्पिटलकडून झालेला प्रकार प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली. पालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. सोमनाथ परदेशी म्हणाले,‘सह्याद्री हॉस्पिटलकडून ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस लावण्यात येत आहेत. हा प्रकार गंभीर असून, बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टचा भंग करणारा आहे. या संदर्भात लेखी खुलासा त्वरीत आरोग्य विभागाकडे द्यावा. अन्यथा बॉम्बे होम अॅक्टनुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. अशा स्वरुपाची नोटीस हॉस्पिटलला दिली आहे.’
दरम्यान, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये झालेल्या या प्रकाराची अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) औषध निरीक्षक दिवसभर चौकशी करीत होते. यासंदर्भात एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांवर कचरा कमीच

$
0
0

सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचे वक्तव्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उरुळी देवाची तसेच फुरसुंगीच्या ग्रामस्थांचे कचरा बंद आंदोलन एकोणीस दिवसांपासून सुरू आहे. तरी देखील शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा साठला नसल्याचे पालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी बुधवारी स्पष्ट केले. तयार होणारा कचरा शहरातच जिरविण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पुढील काही दिवसांत नवीन बायोगॅस प्रकल्प सुरू होतील, असेही भिमाले म्हणाले.
उरुळी, फुरसुंगी ग्रामस्थांनी विरोध केल्याने १८ दिवसांपासून अनेक भागातील कचरा उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे कचऱ्याचे कंटेनर भरून वाहत आहेत. काही भागात तर रस्त्यावरच कचरा पेटवून देण्याचे प्रकार घडले आहेत. भरीस भर म्हणून महापौर मुक्ता टिळक आणि पालकमंत्री गिरीश बापट परदेश दौऱ्यावर गेल्याने समस्येवर तोडगा कसा काढायचा असा प्रश्न पालिकेला पडला आहे. कचरा प्रश्न अधिक गंभीर होऊ नये यासाठी बंद पडलेले कचरा प्रकल्प तातडीने सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे भिमाले यांनी सांगितले.
ग्रामस्थांचे आंदोलन सुरू असले तरी, शहरातील कचरा उचलण्यात येत आहे. ग्रामस्थांचे आंदोलन सुरू असले तरी रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साठल्याची स्थिती नाही, असे भिमाले म्हणाले. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नऱ्हे येथे २५ टनाचा बायोगॅस प्रकल्प उभारला जात आहे. ​भिमाले यांनी बुधवारी सकाळी या प्रकल्पाची पाहणी केली. दोन दिवसात बंद पडलेले प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केले जातील. पिंपरी सांडस येथील जागा कचराडेपोसाठी मिळावी, म्हणून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाला पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले.

भिमाले झाले चिडीचूप
कचरा प्रश्न सुटावा, असे काही राजकीय पक्षांना वाटत नसल्याने त्यांनी राजकारण सुरू केल्याची टीका भिमाले यांनी केली. पंधरा दिवसांपासून पालकमंत्री गिरीश बापट यांनी‌ यामध्ये हस्तक्षेप का नाही केला, याबाबत विचारले असता भिमाले यांनी उत्तर देणे टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधी पक्षांकडून मोर्चे, आंदोलने सुरू

$
0
0

मनसेने महापौरांच्या घरासमोर ओतला कचरा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कचरा प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन काँग्रेसने बु्धवारी दुपारी महापालिकेवर मोर्चा काढला. शहरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असताना पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मु्क्ता टिळक परदेश दौऱ्यावर असल्याबाबत त्यांच्यावर टीकाही करण्यात आली.
महाराष्ट्र ​नवनिर्माण सेनेने महापौर टिळक यांच्या घरासमोर कचरा ओतून आंदोलन केले. पुण्याचा कचरा प्रश्न सोडवण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लक्ष घालावे, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसने केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर, रवींद्र धंगेकर, अविनाश बागवे, उपाध्यक्ष सदानंद शेट्टी, मुकारी अलगुडे, मनीष आनंद, शेखर कपोते, नीता रजपूत, राजुशेठ डांगी, मनोज कांबळे, नरेंद्र व्यवहारे, सोनाली मारणे, विकास लांडगे, रमेश अय्यर आदी पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. काँग्रेस भवन ते महापालिका भवनादरम्यान मोर्चा काढण्यात आला. या वेळी कचरा प्रश्नावर भाषणे करण्यात आली. तसेच जोरदार घोषणाबाजी करून भाजपविरुद्ध निदर्शने करण्यात आली.
मनसेचे गटनेते वसंत मोरे, साईनाथ बाबर, माजी नगरसेविका रुपाली पाटील, किशोर शिंदे, बाळा शेडगे, जयराज लांडगे, गणेश सातपुते, रणजित शिरोळे, मंगेश रासकर, प्रशांत कनोजिया, आशिष साबळे, सुधीर धावडे आदींनी महापौरांच्या घरासमोर कचरा ओतला. बापट आणि टिळक यांच्या परदेश दौऱ्यावर टीका करण्यात आली.

‘ठाकरेंनीही घातले लक्ष’
शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे यांनी मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कचरा प्रश्नाची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुरेसे प्रयत्नशील नसल्याने गेले दोन आठवडे तोडगा निघाला नसल्याची माहिती ठाकरे यांना देण्यात आली. ठाकरे यांनी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना बोलावून कचरा प्रश्नावर तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची सूचना केल्याचे भोसले म्हणाले.

अधिकाऱ्यांवर कारवाई करा : आमदार काळे
शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारे तसेत इतर प्रकल्प सहा महिन्यांपासून बंद आहेत. ते सुरू करण्यासाठी प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या, उपाययोजना केल्या नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकल्प आठ दिवसांत सुरू करावेत, अशी सूचना आमदार विजय काळे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना केली आहे.

प्रदूषण मंडळाची परवानगी का नाही?
कचऱ्याचा साठा करून ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची दर वर्षी परवानगी घेणे आवश्यक आहे. गेल्या वर्षाची परवानगी १६ ​डिसेंबरपर्यंतच होती. यंदाची परवानगी अद्याप घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाला कचरा प्रश्नावर हरीत लवादापुढे दाद मागता येत नाही. परिणामी ग्रामस्थांचे आंदोलन कायदेशीर मार्गाने थोपावता येत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिलीप बराटे यांनी केली. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

कचरा प्रश्नावर पुण्यात रक्तपात घडत असून, एकाचा खूनही झाला आहे. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक जरी परदेश दौऱ्यावर गेले असले शहरात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार अनिल शिरोळे तसेच आठ आमदार आहेत. शिवाय सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. या सर्वांनी पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच हा प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घालावे.
चेतन तुपे, विरोधी पक्षनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्फोटक पार्सलचा तपास एटीएसकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये पार्सलमधून स्फोटके पाठविल्याचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) सुरू करण्यात आला आहे. कामगार संघटना कृती समितीने एटीएस प्रमुखांकडे या घटनेचा तपास देण्याची मागणी करण्यात आली होती. नारायण पेठेतील उमाशंकर कॉम्प्लेक्स येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शहर कार्यालय आहे. २६ एप्रिल रोजी दुपारी कार्यालयात पक्षाचे नेते अजित अभ्यंकर यांच्या नावाने पार्सल आले होते. त्यामध्ये स्फोटके असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई कामगार संघटनांच्या बैठकीत या घटनेचा निशेष व्यक्त करण्यात आला. स्फोटके पाठविण्याचा हा प्रकार दहशतवादी कृत्याचाच एक भाग आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास एटीएसने करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र संघटना कृती समितीने सहनिमंत्रक विश्वास उटगी यांच्या नेतृत्वाखाली एटीएसचे प्रमुख अतुल कुलकर्णी यांची भेट घेतली. एटीएसने हा गुन्हा गंभीरपणे घेतला असून, समांतर तपास सुरू केल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीवापरावर निर्बंध

$
0
0

‘खडकवासला’तील साठा घटला; अकरा मे ला बैठकीचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खडकवासला धरणामध्ये सुमारे ७.७० टीएमसी पाणी शिल्लक असल्याने उन्हाळ्यामध्ये शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून ११ मे रोजी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत शहाराच्या पाणीपुरवठ्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी इमारतींचे बांधकाम, जलतरण तलाव आणि गाड्या धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरण्यावर निर्बंध लावले आहेत.
पिंपरी-चिंचवड पालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला असताना, जिल्हाधिकारी राव यांनी ‘पुणेकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून स्वयंशिस्तीचा अवलंब करावा,’ असे आवाहन केले आहे. ‘पालकमंत्री बापट परदेश दौऱ्यावर असून, ते दहा मे रोजी येणार आहेत. त्यानंतर ११ मे रोजी पुण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीला दोन्ही पालिकांचे आयुक्त आणि लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. त्यामध्ये पाणी वितरणाबाबत निर्णय घेतला जाईल,’ असे राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले उपस्थित होते.
पुणेकरांच्या पाणीवापराबाबत राव म्हणाले, ‘पुण्याला दररोज १३५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी उन्हाळ्यात शहराला दररोज ११२५ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात आला. धरणातून दररोज पाणी उपसा करण्यात पुणे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. पाणी वितरणामध्ये शहरी आणि ग्रामीण भाग असा भेदभाव करता येणार नाही. पाण्यावर सर्वांचा समान हक्क आहे. दहा एप्रिलला कालवा समितीची बैठक झाली होती. त्या वेळी खडकवासला धरणामध्ये सुमारे १०.२६ टीएमसी पाणीसाठा होता. मात्र, सध्या ७.७० टीएमसी पाणी शिल्लक आहे. गेल्या तीन आठवड्यामध्ये सुमारे अडीच टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणीपुरवठा करण्याबाबत बैठक घेतली जाणार आहे.’
‘जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उन्हाळी आवर्तनाला सुरवात करण्यात आली आहे. कॅनॉलच्या नजीक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामीण भागासाठी ३.५१ टीएमसी पाणीसाठा राखीव आहे. मात्र, यंदा उन्हाळा कडक असल्याने पाण्याचे बाषीभवन होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागासाठी ४.२५ टीएमसीची गरज आहे,’ असेही राव म्हणाले.

टँकरची मागणी वाढली
‘जिल्ह्यात सध्या ३० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यापैकी आंबेगावमध्ये पाच, बारामतीत आठ, पुरंदर, खेड, भोरमध्ये प्रत्येकी दोन आणि जुन्नरमध्ये एक टँकर वापरण्यात येत आहे. पुरंदर, बारामती आणि खेड येथे आणखी ३० टँकरची मागणी करण्यात आली आहे. पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी​ सहा मे रोजी बैठक घेणार आहे,’ असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पाणीकपातीचा प्रस्ताव नाही
‘पुण्याच्या पाणीकपातीबाबत कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. सध्या १५ जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल, यादृष्टीने पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पावसाळा लांबणीवर पडला, तरी धरणांमध्ये पिण्याचे पाणी शिल्लक राहील, याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे,’ असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पिंपरी ​सांडसला नवा कचरा डेपो‘

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उरुळी देवाची आणि फुरसुंगी कचरा डेपोचा प्रश्न पेटला असतानाच, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पिंपरी ​सांडस येथील १९ हेक्टर जागा पुण्याच्या कचरा डेपोसाठी निश्चित केल्याचे बुधवारी जाहीर केले. जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
फुरसुंगी कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यावरून सध्या ग्रामस्थांचा विरोध सुरू आहे. त्यावरून वाद सुरू असताना पिंपरी सांडस येथील जागा कचरा डेपोसाठी निश्चित झाली आहे. याबाबत राव म्हणाले, ‘पिंपरी सांडस येथे वन विभागाची सुमारे १९ हेक्टर जागा आहे. ती जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या जागेत कोणत्याही प्रकारचे पाण्याचे स्त्रोत नाहीत; तसेच लोकवस्तीही नाही. या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया केल्यावर तयार होणारे खत शेतीसाठी दिले जाणार आहे.’
शहरात दररोज सुमारे एक हजार ४०० टन कचरा निर्माण होतो. त्यावर उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोत प्रक्रिया केली जाते. गेल्या आठवड्यात कचरा डेपोला आग लागली. कचरा डेपोमुळे या परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुक्रवार पेठेत वाडा आगीत खाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शुक्रवार पेठेतील भुतकर हौदाजवळील साठ वर्षे जुन्या वाड्याला बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत तीन मजली वाडा जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या १४ गाड्यांनी दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, कूलिंगचे काम सुरू असताना आगीची झळ बसून शेजारच्या वाड्याची भिंत कोसळून चार जवान जखमी झाले; तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
प्रवीण द्वारकादास बन्सल (वय ४२, रा. येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाचे नाव आहे. महेश तुकाराम गारगोटे (वय ४२), नीलेश विठ्ठल कर्णे (वय ३३), सचिन बाबू जोंजाळे (वय ३६) आणि जितेंद्र रमेश सपाटे (३०) अशी जखमी झालेल्या अग्निशमन जवानांची नावे आहेत.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठेतील तंबाखू आळीत हरिहर देवस्थान ट्रस्टच्या मालकीचा हा वाडा आहे. हा वाडा पन्नास ते साठ वर्षे जुना आहे. तो लाकूड व मातीमध्ये बांधण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून या ठिकाणी कोणीच राहत नव्हते. या वाड्यात सुरेंद्र बन्सल यांचे अग्रवाल अँन्ड सन्स हे स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य पुरवण्याचे दुकान आहे. दुकानात फिनेल, खराटे, झाडू आदी वस्तू होत्या.
आग विझल्यानंतर दुर्घटना
शुक्रवार पेठेतील तंबाखू आळीमध्ये जुन्या वाड्याला लागलेल्या आगीची भीषण होती. त्यामुळे शेजारच्या दोन्ही वाड्यांना झळ बसली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले. आग एवढी भीषण होती, की दोन्ही बाजूंच्या वाड्यांना तिची जळ बसली होती. जवान वाड्यात शिरून कूलिंगचे काम करीत होते. आग लागल्याचे समजताच दुकानाचे मालक राजू बन्सल यांचे नातेवाइक प्रवीण बन्सल यांनी घटनास्थळी धाव घेतली. बन्सल वाड्यात शिरून दुकानातील जळालेले साहित्य पाहत होते. त्या वेळी शेजारील वाड्याची मातीची भिंत त्याच्यासह चार जवानांच्या अंगावर कोसळली. ढिगाऱ्याखाली जवान व बन्सल सापडले. राडारोडा बाजूला काढून सर्वांना बाहेर काढून तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, बन्सल यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला, तर जवानांची प्रकृती ठीक असून दोघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आगीमुळे दुसऱ्या बाजूच्या वाड्याची भिंतही पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती पाडण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आणखी एकाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

बारामती तालुक्यातील दंडवाडी ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या खोपवाडी येथील सुखदेव चंद्रकांत चांदगुडे (वय ३७) या शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. शिर्सूफळमध्ये साठ वर्षांच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत, तोपर्यंत ही दुसरी घटना घडली आहे.

नामदेव चांदगुडे यांनी पोलिसांत यासंदर्भात माहिती दिली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सुखदेव यांच्या वडिलांच्या नावे खोपवाडीत शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर सोसायटीकडून काही कर्ज उचलले होते. ते थकित आहे. सुखदेव यांनी ट्रक घेऊन त्याद्वारे व्यवसाय सुरू ठेवला होता. ट्रकचेही कर्ज त्यांच्या डोक्यावर होते. त्यातून त्यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुखदेव यांच्यामागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. शेतकरी सुखदेव यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सुपे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयात धाव घेऊन कुटुंबीयांचे सात्वन केले. उत्तरीय तपासणीनंतर सुखदेव यांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडगाव निंबाळकर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

बारा मार्चला तरडोलीतील आत्माराम ज्ञानदेव शेळके (वय ४५) व ३ मे रोजी शिर्सूफळ येथील काशिनाथ सिधू हिवरकर यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्यानंतर दंडवाडीतील सुखदेव चांदगुडे या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.

हिवरकर कुटुंबीयांना मदत

बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील काशिनाथ सिधू हिवरकर यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रवादी काँग्रेसने एक लाख रुपयांची तातडीची मदत दिली. खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवरकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तातडीची मदत म्हणून रोख एक लाख रुपये दिले. बारामती तहसीलदार हनुमंत पाटील, कृषी अधिकारी संतोष बरकडे यांनी घटनास्थळी पाहणी करून हिवरकर कुटुंबीयांचे सात्वन केले. घटनेचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वाराला कारची धडक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

दुचाकीस्वाराला भरधाव कारची धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघातात दुचाकीस्वार बाजूला उडून पडला, तर कार रस्त्यापलीकडे वीस मीटर फरफटत गेली. दुचाकीस्वारावरावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. विशाल मेघा मार्टसमोर हा अपघात झाला. याबाबत वानवडी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात घडला.

सैफ निजाम आत्तार (वय २४ रा. मोमिनपुरा, कोंढवा) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत कारचालक आदित्य राजेश सूततट्टी (वय २२ रा. मलबार गार्डन, मगरपट्टा, हडपसर) यांच्यावर भरगाव वेगात वाहन चालवणे व व्यक्ती जखमी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे तीनच्या वाजण्याच्या सुमारास सैफ हा विमाननगरवरून दुचाकीवरून नाइट शिफ्ट करून घरी जात होता. शिवरकर रोडवर विशाल मेघा मॉल सॅन्मित्र बँकेसमोर समोर ते आले असता समोरून भरगाव वेगात असणाऱ्या कारची रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीस्वाराला धडक बसली. या वेळी कारच्या धडकेने सैफ उडून बाजूला पडला. कार रस्त्यापलीकडे वीस मीटर अंतर दुभाजक तोडून दुचाकी पादचारी मार्गावर गेली. अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने पोलिसांनी व नागरिकांनी जखमीस जवळील सखागी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबत पुढील तपास वानवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छेडछाड झाली, तर तक्रार करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

‘कंपनीत काम करताना, टॅक्सीत प्रवास करताना किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून छेडछाड होत असल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने तात्काळ पोलिसांत तक्रार केली पाहिजे. त्यामुळे भविष्यात होणारे गैरप्रकार आणि अनुचित घटना टळण्यास निश्चित मदत होईल. महिलांना तात्काळ सुरक्षा देण्यासाठी पुणे पोलिसांनी बडीकॉप अॅप तयार केले असून महिला त्यावरूनही तक्रार करू शकतात,’ अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना दिली.

खराडी येथील ‘इयॉन आयटी पार्क’मध्ये काम करणाऱ्या महिलांना सुरक्षेबाबत माहिती देण्यासाठी चंदननगर पोलिसांनी बडीकॉप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी आयुक्त शुक्ला यांनी महिलांशी संवाद साधला. या वेळी उत्तर विभागाचे अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे, सायबर सेलचे उपायुक्त दीपक साकोरे, चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर, बडीकॉपचे प्रमुख पंकज घोडे आदी उपस्थित होते.

आयुक्त शुक्ला म्हणाल्या, ‘पुणे शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प पोलिस मनुष्यबळ असल्याने पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण असतो. तरीही, पुणे पोलिस महिलांच्या सुरक्षेबाबत संवेदनशील आहेत. त्यामुळे बडीकॉप अॅपच्या माध्यमातून महिलांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाते. महिलांनीदेखील तक्रार देण्यासाठी पुढे आले पाहिजे.’

या वेळी आयुक्तांनी महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास आणि स्पष्ट शब्दांत उत्तरे दिली. इयॉन आयटी, झेंसार आणि प्राइड आयकॉन कंपनीतील सुमारे अडीच हजार महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर आयटीतील कर्मचाऱ्यांशी रश्मी शुक्ला यांनी फोटो काढले, तर काहींनी सेल्फी काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

लाल दिवा लागलेला असतानाही सिग्नल मोडणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांवर पुणे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. येरवडा आणि विश्रांतवाडी वाहतूक विभागाने गेल्या पंचवीस दिवसांत वाहतूक नियम मोडणाऱ्या सुमारे पावणे पाचशे वाहनचालकांचा वाहन परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठविला असून लवकरच त्यांचे परवाने निलंबित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुणे शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच वाहनचालकांकडून सर्रास वाहतुकीचे नियम मोडले जातात. वाहतूक पोलिसांकडून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून किरकोळ स्वरूपाचा दंड होत असल्याने वाहनचालकांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. या गोष्टींना आळा घालण्यासाठी आता सिग्नल तोडणाऱ्या आणि मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांचा वाहन परवाना निलंबित करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.

येरवडा आणि वाहतूक पोलिसांनी ५ ते ३० एप्रिल या पंचवीस दिवसांच्या काळात सिग्नल तोडणाऱ्या आणि वाहन चालविताना मोबाइलवर बोलून वाहतूक नियम मोडणाऱ्या ४७४ वाहनचालकांचे परवाने तीन ते सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यासाठी आरटीओकडे पाठविले आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने कारवाई होत असल्याने वाहनचालकांना नियम मोडल्याचे पुरावे दिले जातात. त्यामुळे पोलिस आणि वाहनचालकांमधील वाद विवाद कमी होऊ लागलेत.

येत्या काही दिवसांत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे वाहन परवाने ठराविक महिन्यांसाठी निलंबित होतील. त्यामुळे वाहन चालकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याची शिस्त लागेल, अशी अपेक्षा विश्रांतवाडी वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक संतोष पैलकर यांनी व्यक्त केली.

पोलिसांकडून झालेली कारवाई

नियमभंग विश्रांतवाडी येरवडा

सिग्नल तोडणे १२९ ११७

वाहन चालविताना

मोबाइलवर बोलणे १९२ ३६

एकूण ३२१ १५३

(५ ते ३० एप्रिल दरम्यानची आकडेवारी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवड्यात रात्रभर वीजपुरवठा खंडित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

खराडी उपकेंद्रातील २२ केव्हीच्या तीन आणि ११ केव्हीची एक अशा चार केबल एकाच वेळी शॉर्ट झाल्याने येरवडा, विमाननगर, नगर रोड आणि धानोरी परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. बुधवारी मध्यरात्री दोन वाजता शॉर्टसर्किट झाल्याने लाखो नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

नगर रोडवरील खराडी उपकेंद्रामधून संपूर्ण नगर रोड, येरवडा आणि विश्रांतवाडी विभागाला वीजपुरवठा होतो. बुधवारी मध्यरात्री अचानक उपकेंद्रामधील २२ केव्हीच्या तीन आणि ११ केव्हीची एक अशा चार केबल लागोपाठ शॉर्ट झाल्याने नगर रोड, विमाननगर, येरवडा आणि धानोरी परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे महावितरणकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

येरवडा आणि विमाननगर भागाचा पहाटे साडेपाचच्या सुमारास, तर धानोरी परिसराचा गुरुवारी सकाळी दहा वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. ऐन उन्हाळ्यात रात्रभर वीज खंडित झाल्याने हजारो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे शेकडो नागरिकांनी मध्यरात्री महावितरणच्या कॉल सेंटरवर संपर्क साधून विजेची माहिती घेतली, तर काहींनी तक्रार दाखल केली.

वीज गेल्याने पाण्यासाठी त्रास

बुधवारी रात्री दोन वाजता गेलेली वीज सकाळपर्यंत न आल्याने धानोरी भागातील अनेक सोसायट्यांना इमारतीच्या टाक्यांमध्ये पाणी चढविता आले नाही. त्यामुळे नोकरदारांना गुरुवारी सकाळी पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images