Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘पुरंदर’चे पॅकेज आज ठरणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भात आज, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. बैठकीत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पॅकेजबाबत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांकडून पॅकेजबाबत घोषणा झाली, तर विमानतळाच्या जागेच्या भूसंपादनाची कार्यवाही वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्याचा नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्ये होणार असल्याची घोषणा केली होती. विमानतळासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला असून, जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते. जमिनी ताब्यात घेताना, शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पॅकेजबाबत वेगवेगळ्या स्वरूपात अभ्यास केला जात होता. त्यातून अंतिम निर्णय काय होणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या (एमएडीसी) शनिवारी होणाऱ्या बैठकीत पुणे विमानतळाविषयी चर्चा होणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या आठवड्यामध्ये फडणवीस यांनी दिल्लीमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांची भेट घेतली. या बैठकीतही पुण्याच्या विमानतळाला चालना देण्याच्या दृष्टीने चर्चा झाली असून, आजच्या बैठकीत पॅकेजबद्दलचा अंतिम निर्णय जाहीर केला जाण्याची दाट चिन्हे आहेत.

विमानतळाचा सविस्तर आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम यापूर्वीच जर्मनच्या ‘डॉर्श’ कंपनीला देण्यात आले असून, सहा महिन्यांत त्याचा अहवाल सरकारला प्राप्त होईल. या कालावधीत विमानतळासाठी आवश्यक जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पॅकेजचा निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे. पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाला होणारा शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यामध्ये या पॅकेजचा महत्त्वाचा वाटा असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि शाळेमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा बसविण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे स्कूलबस चालकांनी ‘सीसीटीव्ही’ बसवावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परिवहन विभागाने शालेय विद्यार्थी वाहतूक धोरण आखले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीदरम्यान मुलामुलींचा लैंगिक छळ झाल्याच्या अनेक घटना राज्यात विविध ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षण विभागानेही विद्यार्थी सुरक्षिततेसाठी शाळा आणि स्कूलबसमध्ये ‘सीसीटीव्ही’ बसविण्याचा आदेश दिला आहे. बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कार्यदक्ष राहून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याबाबतची जबाबदारी शाळेतील परिवहन समितीवर व शाळेच्या मुख्याध्यापकांवर देण्यात यावी. विद्यार्थी, पालक किंवा इतरांकडून लैंगिक छळाबाबतची तोंडी, लेखी आणि निनावी तक्रार प्राप्त झाल्यास तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल करावी.

स्कूलबसमध्ये महिला वाहनचालक नेमावेत, मदतनीस म्हणून महिलेचीच नेमणूक करावी, बसचालक, मदतनिसांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करून प्रमाणपत्र घ्यावे, बसमध्ये आणि शाळेत तक्रारपेटी ठेवावी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतच्या तक्रारींचे मुख्याध्यापकांनी तत्काळ निवारण करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षी परिवहन विभागाने स्कूलबस तपासणीची मोहीम राबविली होती. त्या अंतर्गत दिलेल्या मुदतीत शहरातील थोड्याच स्कूलबस चालकांनी तपासणीत रस दाखविला. त्यामुळे तपासणीला दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकारिणीचा झाला मेळावा

$
0
0

पिंपरी-चिंचवडला भाजपच्या बैठकीत चर्चेऐवजी रंगली भाषणबाजी

Dattatray.Jadhav1@timesgroup.com
Tweet : @dattajadhavMT

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची पिंपरी-चिंचवडमध्ये बैठक नव्हे, मेळावा झाला, अशी तक्रार खुद्द कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांकडूनच होत आहे. खासदार, आमदार, नवनियुक्त महापौर आणि जिल्हा परिषदांच्या सदस्यांना बैठकीसाठी निमंत्रित केल्याने चर्चा-सल्लामसलत न होता केवळ भाषणबाजी झाली अशीही नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदा जिंकून राज्यात क्रमांक एकचा पक्ष झालेल्या भाजपच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास आणि उत्साह ओसंडून वाहत होता. या उत्साही वातावरणात भाजपने पक्षाच्या सर्व खासदार, आमदार, महापौर आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला निमंत्रित म्हणून बोलविले होते. यापूर्वी भाजपची कार्यकारिणी तीन दिवस चालत असे. पहिल्या दिवसी प्रदेश कार्यसमितीसह काही मोजक्या नेत्यांची बैठक होऊन कार्यकारिणीच्या बैठकीचा अजेंडा ठरविण्यात येत असे. त्यानुसार पुढील दोन दिवस संपूर्ण दिवसभर कार्यकारिणी बैठक व्हायची. या बैठकीत नाराजी, आरोप-प्रत्यारोपांसह सल्लामसलत होऊन ठोस कृती कार्यक्रम ठरविला जायचा. मात्र, पिंपरीत झालेल्या बैठकीत अशी कोणतीच चर्चा झाली नाही. नेत्यांनी भाषणे दिली, उपस्थितांनी ऐकली अन् टाळ्या वाजविल्या. त्यामुळे ही बैठक न होता एक मेळावाच ठरला, अशी नाराजी राज्य कार्यकारिणीतील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.

राणे, उदयनराजे यांच्या प्रवेशाची चर्चा

गेल्या काही काळात माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र, कोकणात आता राणेंची ताकद राहिली नाही. संपलेल्या नेतृत्वाला पुन्हा जिवंत करू नका. त्यांना पक्षात घेणार असाल, तर त्यांना थेट मुख्यमंत्री करा, अशी संतप्त प्रतिक्रिया कोकणातील एका भाजप नेत्याने व्यक्त केली. राणेंना पक्षात घेऊन आगोदरच नाराज असलेल्या शिवसेनेला अंगावर घेण्यात काहीच अर्थ नसल्याची प्रतिक्रिया एका नेत्याने व्यक्त केली. तसेच खासदार उदयनराजे यांच्या पक्षप्रवेशाबाबतही सध्या लोकसभेत संख्याबळाची अडचण नसल्याने उगाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा रोष पत्करण्याचे कारण नाही, असा सूर काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

‘विस्तारक’ पचनी पडेना

भाजपचे केंद्र, राज्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि राज्य कार्यकारिणीपासून तालुका कार्यकारिणीपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांनी विस्तारक म्हणून पंधरा दिवस, महिनाभर देशभरात कुठेही पक्ष विस्ताराचे काम करावे, अशी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची योजना आहे. मूळ भाजप किंवा संघ परिवारातील नेत्यांना या कामांची सवय आहे, मात्र, मोदी लाटेवर स्वार होऊन इतर पक्षांतून भाजपवासी झालेल्यांना ‘विस्तारक’ पचनी पडत नाही. अशा प्रकारचे काही काम करावे लागते याची माहितीच नसलेल्या नेत्यांची अडचण झाली आहे. शिवाय थेट अमित शहा यांच्या नियंत्रणाखाली काम करताना टाळाटाळ चालणार नाही, त्यामुळे नव्याने भाजपवासी झालेल्यांची अडचण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅप’ची प्रक्रिया जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आयोजिण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये (कॅप) विद्यार्थ्यांना यंदाही ‘फ्रीझ’, ‘फ्लोट’ आणि ‘स्लाइड’ हे पर्याय उपलब्ध असणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे कॉलेज मिळण्याचा पर्याय अखेरपर्यंत उपलब्ध राहावा, या उद्देशाने गेल्या वर्षीपासून ही नवी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.

राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) पदवी, पदविका आणि पदव्युत्तर तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा तपशील नुकताच जाहीर केला आहे. त्यामध्ये ‘कॅप’च्या फेऱ्या कशा असतील, याचा तपशीलवार उल्लेख आहे. विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीनुसार कॉलेजांचे क्रम भरता येतील आणि त्याचबरोबर फ्रीज, फ्लोट, स्लाइड हे पर्याय वापरून त्यातल्या त्यात सर्वोत्तम प्राधान्याचे कॉलेज मिळविण्याचा प्रयत्न करता येईल.

‘डीटीई’ने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ‘विद्यार्थ्यांना ‘कॅप’च्या फेरीत त्यांच्या पसंतीची जागा मिळाल्याने त्यांनी ती स्वीकारली आणि त्यांना पुढच्या फेरीत जायचे नसेल, तर ते ‘फ्रीज’ हा पर्याय स्वीकारू शकतात. ‘स्लाइड’ हा पर्याय वापरून विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजात प्रवेश मिळाला आहे, त्या कॉलेजातील त्यांच्या पसंतीच्या एखाद्या अभ्यासक्रमाची जागा नंतर उपलब्ध झाली, तर त्या जागेवर प्रवेश घेण्याची मुभा मिळू शकते. ‘फ्लोट’ हा पर्याय वापरून विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजात प्रवेश मिळाला आहे, त्या व्यतिरिक्त त्यांच्या पसंतीच्या अन्य कॉलेजात जागा उपलब्ध झाल्यास त्यावर प्रवेश घेण्याची मुभा मिळू शकते. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळेल, त्यांना ‘स्लाइड’ आणि ‘फ्लोट’ हे पर्याय घेण्याची मुभा राहणार नाही.’

‘कॅप’च्या यंदा तीनच फेऱ्या होणार असून, पहिल्या फेरीची अलॉटमेंट झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागांची यादी वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थ्यांना काही अटींच्या अधीन राहून या फेऱ्यांसाठी नव्याने ऑनलाइन अर्ज भरता येईल किंवा आधी भरलेल्या अर्जात दुरुस्ती करता येईल. या अटींनुसार, ‘या फेरीच्या आधी विद्यार्थ्यांना त्यांचा पर्याय ‘स्लाइड’ किंवा ‘फ्लोट’ऐवजी ‘फ्रीज’ करता येईल; त्याचप्रमाणे उलटही करता येईल. पहिल्या फेरीत जागा अलॉट झालेली नाही, असे किंवा जे पहिल्या फेरीत सहभागीच होऊ शकले नाहीत, असे किंवा ज्यांनी प्रवेश घेतला; पण नंतर रद्द केला, असे किंवा ज्यांनी पहिल्या फेरीत ‘फ्रीज’चा पर्याय निवडला; परंतु ज्यांना तो आता ‘फ्लोट’ किंवा ‘स्लाइड’ करायचा आहे, असे विद्यार्थी या फेऱ्यांत सहभागी होण्यास पात्र असतील. ज्या विद्यार्थ्यांनी ‘फ्लोट’ किंवा ‘स्लाइड’चा पर्याय निवडला आहे आणि जे नंतरच्या फेऱ्यांसाठीही अर्ज करणार आहेत, त्यांनी अलॉट झालेल्या जागेचा पर्याय या फेरीत भरू नये. तिसऱ्या फेरीत ‘स्लाइड’ आणि ‘फ्लोट’ हे पर्याय उपलब्ध राहणार नाहीत.’
प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती; तसेच पात्रतेचे निकष ‘डीटीई’च्या http://www.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टेक-ऑफ’साठी आकर्षक मोबदला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुरंदर येथील नियोजित विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी जमीनधारकांना मोबदल्याचे चार पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये संबंधितांना संपूर्ण मोबदला एकरकमी देणे, निर्वाह भत्त्यासह विकसित भूखंडाचा परतावा, जमिनीच्या बदल्यात पर्यायी जमीन आणि जमीन मालकाला विमानतळ विकास कंपनीमध्ये भागधारक करून घेणे, या पर्यायांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे चारही पर्याय मान्य केले असून, पुढील कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. मोबदल्याच्या या आकर्षक पर्यायांमुळे आता विमानतळाच्या भूसंपादनाचा महत्त्वाचा टप्पा मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदर विमानतळाविषयी मुंबईत बैठक पार पडली. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांसमोर विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेचे आणि परताव्याच्या चारही पर्यायांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच, त्यावर चर्चाही झाली.

यामध्ये अमरावती-आंध्र प्रदेश येथील विमानतळ विकासाच्या मॉडेलनुसार जमीनदारांना निर्वाह भत्त्यासह विकसित भूखंडाचा परतावा देणे, मगरपरट्टा सिटी-कोची विमानतळाच्या धर्तीवर विमानतळ विकास कंपनीमध्ये जमीन मालकाला भागधारक करून घेणे आणि संपूर्ण मोबदला एकरकमी अदा करणे, जमिनीच्या बदल्यात पर्यायी जमीन देणे हे पर्याय आता जमीनधारकांच्या समोर आहेत. या चारही पर्यायातून कोणताही पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य संबंधित जमीनधारकांना देण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे या पर्यायांच्या माध्यमातून पुरंदर येथील शेतकऱ्यांचा विरोध मावळेल, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त केली गेली.

लोहगाव येथील सध्याच्या विमानतळाची क्षमता आणि प्रवाशांची संख्या पाहता पुणे शहरासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. शहरातील विमान प्रवाशांच्या संख्येत २०१५-१६ या वर्षी आधीच्या वर्षाच्या तुलनेत २९.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शहराची गरज लक्षात घेऊन पुण्यात पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. पुरंदर येथील जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याने एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाने त्याला मान्यता दिली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

कोची मॉडेल

केरळ राज्यातील कोची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करण्यासाठी निवडलेल्या सर्व शेतजमिनीच्या मालकांनाच नियोजित विमानतळाच्या उभारणीसाठी स्थापन केलेल्या कंपनीमध्ये संयुक्त भागीदारी देण्यात आली. त्यांना आगामी ९९ वर्षे विमानतळाच्या उत्पन्नातील ठराविक वाटा देण्याच कबूल केले आहे. तसेच, जमिनीचा मूळ मोबदला देखील देण्यात आला आहे.

अमरावती मॉडेल

या मॉडेलमध्ये जमीन मालकांना काही जमिनीच्या मोबदल्यात आर्थिक स्वरूपात मोबलदला देण्यात आला. उर्वरित जमिनीच्या मोबदल्यात विकसित जमीन दिली गेली. तसेच, विमानतळाची संपूर्ण उभारणी होऊन त्यांना पूर्ण क्षमतेने उत्पन्न सुरू होईपर्यंत शेतीच्या उत्पन्नानुसार निर्वाह भत्ता देण्याची तरतूद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांच्या विरोधात आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘ब्राह्मण समाजाच्या मुलांना आरक्षणामुळेच परदेशात जावे लागते’ असे विधान केल्याने महापौर मुक्ता टिळक यांचा निषेध करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले. केसरीवाडा या महापौर टिळक यांच्या निवासस्थासमोर आंदोलन करून त्यांनी केलेल्या जातीयवादी विधानाचा कडक शब्दांत निषेध करण्यात आला. चुकीचे वक्तव्य करणाऱ्या महापौरांचा भारतीय जनता पक्षाने राजीनामा घ्यावा, टिळक यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी या वेळी करण्या‌त आली.
नाशिक येथे चित्पावन ब्राह्मण समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महापौर टिळक यांनी आरक्षणामुळे ब्राह्मण समाजातील मुलांना परदेशात जावे लागत असल्याचे वक्तव्य केले होते. महापौरांच्या या वक्तव्याचे जोरदार पडसाद शनिवारी उमटले. विविध संस्था संघटनांनी महापौरांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी केसरीवाडा येथे आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापौरांचा निषेध करून आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, सुभाष जगताप, राकेश कामठे, प्रिया गदादे, सचिन पासलकर, शैलेश बडदे, श्वेता होनराव, नामदेव पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
‘भाजपची आरक्षणाबद्दल नेहमीच दुटप्पी भू‌मिका राहिलेली आहे. त्यामध्ये महापौर टिळक यांनी हे विधान करून आपला जातीयवादी चेहरा पुणेकरांसमोर आणला आहे. महिला आरक्षणामुळेच टिळक महापौरपदावर आहेत. त्यामुळे त्या आपल्या पदाचा त्याग करणार का?’ असा प्रश्न विरोधी पक्षनेते तुपे यांनी उपस्थित केला. भाजपने या प्रकरणी महापौरांचा राजीनामा घ्यावा आणि महापौरांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. महापौर टिळक यांच्या वक्तव्यातून मनुवादी मानसिकता दिसून येत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जयदेव गायकवाड यांनी केली आहे. चुकीचे वक्तव्य करून टिळक यांनी शहराच्या महापौरपदाची शान घालविली असल्याची टीका त्यांनी केली.

‘विधानाचा विपर्यास’
‘आरक्षण आणि ब्राह्मण हे शब्द मी भाषणात उच्चारलेले नाहीत. त्यामुळे माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याची सारवासारव महापौर टिळक यांनी शनिवारी केली. ब्राह्मण मुलांनी परदेशातून परतून आपल्याकडे नोकरी आणि व्यवसायासाठी पोषक वातावरण तयार करावे. तशी क्षमता त्यांच्याकडे आहे, अशी भूमिका मांडली होती,’ असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापौर टिळक यांनी आरक्षणाबाबत केलेले विधान मागे घ्यावे, अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली. पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे आणि महापालिकेतील गटनेते डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारजे परिसरात सोसायटीत शिरून सात वाहनांची तोडफोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वारजे येथील श्रीराम हौसिंग सोसायटीतील सुरक्षारक्षकाला मारहाण करून पार्किंगमधील सात वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. वारजे परिसरात सततच्या या प्रकारामुळे नागरिक वैतागले असून गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
याबाबत शिवानंद करवीकोप (वय ४१, रा. वारजे) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारज्यात शांत आणि उच्चभ्रू परिसरातील सोसायटी असलेल्या श्रीराम हैसिंग सोसायटीमध्ये गुरुवारी दुचाकीवरून सात ते आठ जण आले. त्यांनी जमाव जमवून सुरक्षारक्षकाला शिवीगाळ व मारहाण केली. काठ्या, दगड, हॉकी स्टीकच्या साह्याने पार्किंगमधील वाहनांची तोडफोड केली. यामध्ये सहा चार चाकी आणि एक दुचाकीचा समावेश आहे. तोडफोड केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. तोडफोडीच्या आवाजामुळे सोसायटीत भीतीचे वातावरण पसरले. याबाबत वारजे पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. सोसायटी आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम सुरू असून, नेमक्या कोणत्या कारणावरून आरोपींनी ही तोडफोड केली, याबाबत पोलिसांना माहिती मिळू शकली नाही. वारजे येथे वाहन तोडफोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. पोलिसांना गुंडांचा बंदोबस्त करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक एस. एस. नदाफ हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांची मनमानी संपवू

$
0
0

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आश्वासन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देशातील सीबीएसई शाळांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय कायदा करत आहे. या शाळांची शुल्कवाढ, शालेय साहित्य घेण्यासाठी जबरदस्ती अशा विविध गोष्टींवर सुरू असणारी मनमानी संपवली जाईल,’ असे आश्वासन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी दिले.
मंत्रालय, राज्याच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे शिक्षणात नावीन्यपूर्ण संशोधन आणि प्रात्यक्षिकांचा वापर या विषयावर शिक्षक, अधिकारी, कर्मचारी अशांची दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप, सहसचिव अजय तिर्के, राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार आदी उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, ‘सीबीएसई शाळांच्या विरोधात शुल्कवाढीबाबत पालकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. शाळा कायद्याबाहेर शुल्कवाढ, शालेय साहित्य घेण्यासाठी जबरदस्ती अशा विविध गोष्टीं पुढे येत आहेत. एकूणच ही परिस्थिती असतानाच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना या शाळांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांना शालेय प्रशासनाच्या विरोधात कारवाई करता येत नाही. अशा परिस्थितीत या शाळांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय कायदा करत आहे. या कायद्याचा मसुदा बऱ्यापैकी तयार झाला असून तो अंतिम झाला की, प्रकाशित करण्यात येणार आहे.’ सरकार सीबीएसई शाळांच्या विरोधात नाही. त्या चांगली कामे करतात. या शाळांनी अधिक चांगले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी असेल. मात्र, या शाळांकडून मनमानी कारभार करण्यात येत असेल तर त्यांची मुजोरी संपवली जाईल, असे जावडेकर यांनी सांगितले.
पश्चिम विभागासाठी असणाऱ्या या कार्यशाळेत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, दीव व दमण तसेच दादरा, नगर हवेली या राज्य व केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधी उपस्थित आहेत. कार्यशाळेत नावीन्यपूर्ण शैक्षणिक संशोधन आणि प्रयोगांवर चर्चा करण्यात येईल. तत्पूर्वी, जावडेकर यांनी राज्यातर्फे उभारण्यात आलेल्या शैक्षणिक प्रदर्शनाची पाहणी केली. नंदकुमार यांनी प्रास्ताविक केले; तर तिर्के यांनी आभार मानले.

नंदकुमारांना कानपिचक्या अन् तावडेंची दांडी
इंग्रज भारत सोडून गेले. मात्र, इंग्रजी भाषेचा गवगवा जेवढा इंग्रजांनी नाही केला तेवढा आपण करत आहोत. प्रत्येकाला वाटत आपण इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यावे आणि बोलावे. आपल्या देशात ही परिस्थिती असतानाच इतर देश हे त्यांच्या भाषेला महत्त्व देत त्यातून शिक्षण घेतात आणि बोलतात. मात्र, इथे नंदकुमार साहेबांनी इंग्रजीत भाषण केले. मी तसं करणार नाही. मी आपल्या भाषेत म्हणजेच हिंदीतून भाषण करणार आहे,’ असे जावडेकर म्हणाले. दरम्यान, राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. मात्र, ते आले नाहीत. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमालाही त्यांनी दांडी मारली. यापूर्वी देखील असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे तावडे यांना पुण्यातील कार्यक्रमांना यावेसे वाटत नाही का, अशीच चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चारित्र्याच्या संशयावरून पत्नी, मुलावर चाकूने हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चारित्र्याच्या संशयावरून पतीने झोपलेली पत्नी व मुलावर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढवा परिसरात शनिवारी पहाटे घडला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
कविता सुरेश चराटे (वय ३५, रा. मुंढवा) व त्यांच्या मुलगा विकास (वय १७) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी पती सुरेश काशिनाथ चराटे (४४, रा. मुंढवा) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश चराटे व त्यांची पत्नी कविता, मुलगा विकास आणि लहान मुलगी असे मुंढवा परिसरातील पिंपळेवस्ती परिसरात भाड्याच्या खोलीत राहण्यास आहेत. सुरेश चराटे याला दारुचे व्यसन असून तो काहीही काम करत नाही. त्यामुळे त्यांच्यात वाद होतात. कविता धुणी-भांड्याची कामे करून चरितार्थ चालवितात.
पती सुरेश चराटे पत्नी कविता यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच, दारु पिऊन त्यांना जबर मारहाण करत असे. शुक्रवारी रात्री सुरेश दारू पिऊन आला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. तो मारहाण करत असल्याने कविता भीतीपोटी मुलगा व मुलीला घेऊन घरातून बाहेर पडल्या. घराशेजारी असणाऱ्या एका मोकळ्या खोलीत त्या जाऊन झोपल्या. पहाटे सहा वाजता चराटे हातात चाकू घेऊन त्या खोलीत गेला. त्या वेळी कविता, त्यांचा मुलगा विकास आणि मुलगी झोपलेले होते. सुरेशने त्यांच्या हातावर चाकूने वार केले. त्यांनी घाबरून आरडाओरडा केला. त्या वेळी शेजारी झोपलेला मुलगा विकास जागा झाला. वडील आईच्या पोटावर चाकूने वार करत असल्याचे पाहून त्याने वडीलांना अडविले. पण, चराटे यांनी विकासच्या गळ्यावर व हातावर वार केले. मोठा गोंधळ सुरू झाल्यानंतर त्यांची मुलगीही जागी झाली. येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मुंढवा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच चराटे याला ताब्यात घेतले. तसेच, कविता व मुलगा विकास यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. दोघेही गंभीर जखमी झाले असून मुंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचवी, आठवीमध्ये अनुत्तीर्ण करता येणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘शिक्षणहक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना नववीपर्यंत अनुत्तीर्ण करता येत नाही. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे आता शाळांना इयत्ता पाचवी आणि आठवीत होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येईल. तसेच, काही दिवसांनी होणाऱ्या फेरपरीक्षेतदेखील अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार राज्यांना देण्यात येतील,’ अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी दिली.
कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर जावडेकर पत्रकारांशी बोलत होते. जावडेकर म्हणाले, ‘शिक्षणहक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना नववीपर्यंत अनुत्तीर्ण करता येत नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांची वाटचाल कोणत्याच प्रकारची प्रगती न होता नववीपर्यंत सुरू असते. नववीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येते. त्यामुळे या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या वाढते. एकप्रकारे हा शैक्षणिक धोका आहे. यातून मार्ग काढण्यासाठी काही महिन्यांपूर्वी देशातील पंचवीस राज्यांतील शिक्षण मंत्री आणि सचिवांची बैठक झाली. या बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी इयत्ता पाचवी आणि आठवीत शैक्षणिक ज्ञान नसणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन टप्प्यांमध्ये अनुत्तीर्ण करण्याबाबत मागणी केली. त्यानुसार पहिला टप्पा हा पाचवी तर दुसरा टप्पा हा आठवी असा ठरविण्यात आला आहे. त्यानुसार आता शालेय प्रशासनाला विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी आणि आठवीत होणाऱ्या परीक्षेत अनुत्तीर्ण करता येईल. या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची काही दिवसांत फेरपरीक्षा घेण्यात येईल. फेरपरीक्षेतदेखील विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यावा, याची जबाबदारी संबंधित राज्यांना देण्यात येणार आहे. याबाबतच्या कायद्याचा मसुदा तयार केला असून संसदेत तो मंजूर करण्यात येईल.’

सरकारी शाळांवर देणार भर
देशात सरकारी शाळांची परिस्थिती इंग्रजी खासगी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत चांगली नाही. सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षी ४ टक्क्यांनी घटत आहे; तर खासगी माध्यमांच्या शाळेत ही संख्या ८ टक्क्यांनी वाढत आहे. मात्र, ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. यामध्ये प्रमुख भूमिका शिक्षकांना बजावायची आहे. त्यासाठी शिक्षकांनी नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि प्रयोग राबविण्याची आवश्यकता असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. दरम्यान, देशातील शिक्षकांचा दर्जा चांगला करण्याच्या हेतूने ‘बीएड’ आणि ‘डीएड’ कॉलेजांवर विशेष लक्ष ठेवण्यात येईल. तसेच, या कॉलेजांकडून सर्व शैक्षणिक वर्षांतील माहिती मागविण्यात आली आहे. यात दोषी आढळणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करण्यात येईल, असे जावडेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाइट...कॅमेरा...अॅक्‍शनने घटली गुन्हेगारी

$
0
0

पुणे : गरिबी, शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी आणि त्यातून गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता! पुण्यातील जनता वसाहतीमध्ये दोन वर्षांपूर्वी हेच चित्र होते; पण याच काळात ‘सैराट’ या मराठी सिनेमाचे शूटिंग झाल्याने या वसाहतीचा चित्रपट उद्योगाशी संपर्क आला आणि आता तर या वसाहतीमधील तब्बल चारशे मुलांना याच चित्रपटसृष्टीने रोजगार दिला आहे. तरुणांमध्ये हा नवा ट्रेंड सुरू झाल्याने या परिसरातील गुन्हेगारीत मोठी घट झाली आहे.

पर्वती पायथ्याला असलेला जनता वसाहत परिसर गुन्हेगारीच्या प्रकारांनी हैराण झाला होता. अनेकदा होणारे गोंधळ, हाणामाऱ्या रोखण्यासाठी येथे पोलिसांनाही सतत गस्त घालावी लागत असे. दोन वर्षांपूर्वी जनता वसाहत व वाघजाई परिसरात ‘सैराट’ चित्रपटाचे शूटिंग झाले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील शूटिंग झालेली ठिकाणे पाहण्यासाठी नागरिकांची दररोज गर्दी होऊ लागली. वाघजाई ते तळजाई टेकडी रस्त्यावरून ठिकाण पाहण्यासाठी नागरिक येऊ लागले. हळुहळू या परिसरात मराठी चित्रपट, शॉर्ट फिल्मचेही शूटिंग सुरू झाले. आठवड्यात एका तरी चित्रपटाचे या ठिकाणी शूटिंग येथे होते. सध्याही दोन मराठी चित्रपटाचे शूटिंग येथे सुरू आहे.

शिक्षण आणि रोजगाराच्या अभावामुळे येथील काही तरुण गुन्हेगारीकडे वळू लागले होते. या शूटिंगच्या विविध कामांसाठी या स्थानिक मुलांनाच बोलावणे येऊ लागले. स्पॉटबॉय,लाइटबॉय, इलेक्ट्र‌िशियन, कॅमेरामनला मदत अशी छोटी-मोठी कामे तरुणांना मिळू लागली. तर, काही जणांना थेट चित्रपटात भूमिकांची संधी मिळू लागली. येथील मयूर पाटोळे हा मुलगा एका हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. इतरही काही जण छोट्या-मोठ्या भूमिका करीत आहेत.

रोजगाराचे साधन मिळाल्यामुळे अनेकांनी सर्व बेकायदा कामे सोडून दिली आहेत. याबाबत दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले, ‘सैराट चित्रपटानंतर जनता वसाहतीमध्ये आठवड्यातून एकदा तरी शूटिंग असते. रोजगाराचे साधन मिळाल्याने येथील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे. २०१६ मध्ये पहिल्या तीन महिन्यात १०१ गुन्हे दाखल होते. या वर्षी पहिल्या तीन महिन्यांत हा आकडा ५९ पर्यंत खाली आला आहे. तसेच, गोंधळ-मारामाऱ्यांचे प्रकारही कमी झाले आहेत.’

‘गुन्हेगारी काहीशी कमी’

सैराट चित्रपटानंतर जनता वसाहतीमधील तीनशे ते चारशे मुले अॅक्टरपासून ते स्पॉटबॉय म्हणून काम करीत आहेत. बेरोजगारीमुळे जनता वसाहतीमध्ये गुन्हेगारी काहीशी कमी झाली आहे. येथील तरुणांमध्ये एक आत्मविश्वास आला आहे. काही जण चित्रपटात मुख्य भूमिका करीत आहेत, तर काही जणांनी स्वतः शॉर्टफिल्म बनविल्या आहेत.

- अर्पित इंगळे, असोसिएट डायरेक्टर, जनता वसाहत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तकातून गंधर्वयुगाचे दर्शन

$
0
0

बालगंधर्वांवरील ‘असा हा राजहंस’ पुस्तक ३६ वर्षांनी होणार प्रसिद्ध

पुणे : पारशी रंगभूमीवरील एका नाटकाच्या प्रयोगाला बालगंधर्वांसह किर्लोस्कर नाटक कंपनीतील कलाकार गेले होते. त्यांनी गोहरबाई (या बालगंधर्वांच्या पत्नी नव्हेत) नावाच्या एका कलावंताला पाहिले. त्यांचे रूप आणि अभिनय पाहून बालगंधर्व भारावले. गोहरबाईंसारखे काम आपल्याला कसे जमणार, या विचाराने त्यांच्या मनात घर केले; मग गडकरी मास्तरांच्या तालमीत बालगंधर्वांचे स्त्री पात्र बहरले आणि त्यातूनच महाराष्ट्राने गंधर्व युग अनुभवले.

बालगंधर्वांच्या आयुष्यातील अशा प्रकारचे अनेक रंजक किस्से आता वाचकांच्या समोर येणार आहेत. बालगंधर्वांचे धाकटे बंधू व्यंकटेश श्रीपाद राजहंस यांनी लिहिलेले ‘असा एक राजहंस’ हे पुस्तक ३६ वर्षांनंतर प्रकाशित होणार आहे. अनुबंध प्रकाशनातर्फे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. बालगंधर्वांचे धाकटे बंधू व्यंकटेश श्रीपाद राजहंस (बापूसाहेब) यांनी १९८०मध्ये त्यांच्या आठवणी लिहायला सुरुवात केली. एका वर्षात त्यांनी त्याचे लिखाण पूर्ण केले. परंतु, १९८४मध्ये बापूसाहेबांचे निधन झाले. सुमती दसनूरकर यांनी बापूसाहेबांच्या लिहिलेल्या वह्या आत्मीयतेने जपून ठेवल्या होत्या. त्यानंतर माधवी वैद्य यांनी संपादनाचे काम हाती घेतले आणि ‘असा हा राजहंस’ पुस्तक आकारास आले.

यातून बालगंधर्वांच्या वैयक्तिक आयुष्य आणि संगीत कारकिर्दीचा ‘आँखो देखा हाल’ वाचकांसमोर येणार आहे. बालगंधर्व यांच्या मुंज, लग्नातील प्रसंग, अनेक संगीत गुरूंनी दिलेली तालीम, किर्लोस्कर नाटक कंपनी आणि त्यानंतर गंधर्व नाटक कंपनीतील दिवस, असा सगळा प्रवास बापूसाहेबांनी मांडलेला आहे. बापूसाहेबांनी वीस वर्ष गंधर्व नाटक कंपनीचे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. नारायणरावांना खर्चासाठी दिलेले पैसे, कंपनीने भरलेला इन्कमटॅक्स, कपड्यांच्या धुलाईची बिले असेही बारकावे पुस्तकात आहेत.

बालगंधर्वांच्या सहवासात आलेल्या गुरू भास्करबुवा बखले यांच्यापासून ते विष्णूदास भावे, गोविंद बल्लाळ देव, विनायकबुवा पटवर्धन, काकासाहेब खाडीलकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिंतोबा गुरव, राम गणेश गडकरी, मास्टर कृष्णराव, नानासाहेब जोगळेकर अशा व्यक्तींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, सांगलीचे पटवर्धन यांच्या दरबारातील गाण्यांच्या मैफलीचे इत्थंभूत वर्णन बापूसाहेबांनी पुस्तकात केले आहे.
..........
बापूसाहेब यांनी लिहिलेला हा खजिना आम्हाला वाचकांपर्यंत पोहोचवता येत आहे, याचा सर्वांत जास्त आनंद आहे. बालगंधर्वाविषयीच्या अनेक नव्या गोष्टी या पुस्तकातून कळणार आहेत.
- अनिल कुलकर्णी, प्रकाशक
..........
माझे वडील बालगंधर्वांना ऑर्गनची साथसंगत करत असत. त्यामुळे, मी लहान असताना पुण्याच्या अकरा मारुती मंदिरात बालगंधर्वांच्या अनेक मैफली ऐकल्या आहेत. त्यामुळे, या पुस्तकाचे संपादन करणे माझ्या जिव्हाळ्याचा विषय होता. हे पुस्तक म्हणजे बालगंधर्व या युगाचा बापूसाहेबांनी मांडलेला रोचक इतिहास आहे. अत्यंत ममत्वाच्या भावनेने त्यांनी लिखाण केले आहे. हे पुस्तक गंधर्वयुगाच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
- माधवी वैद्य, संपादक, ‘असा हा राजहंस’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांच्या भेटीला दोनशे देशांच्या नोटा

$
0
0

देवदत्त अनगळ यांच्याकडील संग्रहाचे प्रदर्शन

पुणे : जगभरातील दोनशेहून अधिक देशांमधील दुर्मीळ नोटा पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र नाणकशास्त्र परिषदेच्या वतीने चतुःशृंगी मंदिराच्या आवारातील सांस्कृतिक सभागृहात हे प्रदर्शज आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने पुणेकरांना दोनशे देशांच्या इतिहासात डोकावता येणार आहे.

नोटांचे हे प्रदर्शन २ मेपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. चतुःश्रृंगी मंदिराचे माजी विश्वस्त असलेल्या देवदत्त अनगळ यांच्या संग्रहातील नोटा पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये ब्रिटिश काळातील व्हाइसरॉयच्या सह्या असणाऱ्या नोटा, इस्रायलमधील प्रसिद्ध शास्त्रज्ञ आइनस्टाइनचे छायाचित्र असणाऱ्या नोटा, दुसऱ्या महायुद्धात स्टॅम्प लावून अधिकृत केलेल्या नोटा, प्राण्यांचे फोटो असलेल्या नोटा प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. याशिवाय पाकिस्तान, भूतान, बांग्लादेश, थायलंड, म्यानमार, चीन, कंबोडिया, श्रीलंका, मलेशिया, नेपाळ या भारताजवळच्या देशांपासून ते रशिया, अमेरिका, युरोप, अफ्रिकेतील अनेक देश, ऑस्ट्रेलिया इराण, इराक, जर्मनी, जपान, इजिप्त, इंग्लंड, फ्रान्स अशा पाश्चिमात्य देशांच्या नोटा या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहेत. लोकसंख्येने लहान असलेल्या झिंबाब्वे, लिबीया, आयर्लंड, मादागास्कर, माल्टा, ओमान, पेरू, पोलंड, रवांडा, घाना, सोमालिया अशा सुमारे दोनशेहून अधिक देशांच्या चलनी नोटा या प्रदर्शनामध्ये पाहता येतील.

नोटांचे संग्राहक देवदत्त अनगळ यांनी लहानपणापासून नोटा जमवण्याचा छंद जोपासला आहे. ७० वर्षीय अनगळ यांनी जमा केलेल्या नोटांवर संशोधनही केले आहे. देशात चलनाच्या अभ्यासासाठी ते प्रसिद्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदापूर: ४ डॉक्टर उजनी बॅकवॉटरमध्ये बुडाले

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। इंदापूर

इंदापूर तालुक्यातील अजोती गावाजवळ भीमा नदीच्या उजनी बॅक वॉटरमध्ये नौका विहारासाठी गेलेले चार डॉक्टर बुडाल्याची घटना घडली आहे. सुट्टीनिमित्त गावी फिरायला आलेल दहा डॉक्टर उजनी बॅक वॉटरमध्ये बोटीतून प्रवास करत होते. ही बोट बुडाल्यानंतर दहा डॉक्टरांपैकी सहा डॉक्टर कसेबसे पाहून पाण्याबाहेर आले. चौघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून उरलेल्या तिघांचा शोध सुरू आहे.

मृत पावलेल्या डॉक्टरांची नावे:

डॉ. सुभाष मांजरेकर (अकलूज), डॉ.महेश लवटे (नातेपुते), डॉ. अण्णासाहेब शिंदे, डॉ. उराडे (नातपुते) हे चार डॉक्टर पाण्यात बुडाले आहेत. बुडालेल्यांपैकी डॉ. उराडे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

बचावलेले सहा डॉक्टर:

बुडालेल्या दहा डॉक्टरांपैकी डॉ. प्रवीण श्रीरंग पाटील (माळशिरस), डॉ. दत्तात्रय भगवान सर्चे (माळशिरस), डॉ. अतुल विनोदकुमार दोशी (अकलूज), डॉ. श्रीकांत नंदकुमार देवडेकर (अकलूज), डॉ. समीर अशोक दोशी (अकलूज), डॉ. दिलीप तुळशीराम वाघमोडे (माळशिरस) या सहा डॉक्टर पोहत पोहत पाण्यातून बाहेर पडले आणि त्यांचा जीव वाचला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी सेवक भरती परीक्षेत घोटाळा

$
0
0

एका पदासाठी १२ लाख रुपयांची बोली; कृषी विभागाच्या तक्रारीनंतर पुण्यात गुन्हा दाखल

Tweet : @HarshDudhe_MT

पुणे : राज्यात कृषी सेवक पदासाठी झालेल्या परीक्षेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची शक्यता आहे. एका कृषी सेवक पदासाठी १२ लाख रुपयांची बोली लागल्याचे समजते. मात्र, सरकारने फेरपरीक्षा न घेता पर्याय म्हणून ‘भारांकन पद्धत’ आणली आहे. या पद्धतीमुळे लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण उमेदवार देखील पात्र ठरले आहेत. सरकार परीक्षेतील आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करण्याऐवजी प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्यांनाच डावलण्याचे काम करत आहे का, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला आहे.

कृषी आयुक्तालयाने राज्यात ७३० कृषी सेवक पदे भरण्यासाठी १५ डिसेंबर २०१५ रोजी जाहिरात दिली होती. आयुक्तालयाने या परीक्षेची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला दिली. परीक्षा परिषदेने राज्यात ही परीक्षा घेण्याची जबाबदारी गजानन एंटरप्रायजेस या खासगी कंपनीला दिली. जाहिरातीनुसार ६ ऑगस्टला परीक्षा झाली. परीक्षा देण्यासाठी राज्यातून सुमारे ६५ हजार ४६२ उमेदवारांनी नोंदणी केली. यापैकी ४१ हजार ३५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पुढच्याच महिन्यात ६ सप्टेंबरला परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये काही मोजक्या विद्यार्थ्यांना २०० गुणांपैकी १८० गुण मिळाले. परीक्षा देणाऱ्या इतर सर्व विद्यार्थ्यांना १५० गुणांच्या खाली गुण मिळाले. त्यामुळे या परीक्षेत गैरप्रकार झाल्याची चर्चा झाली.

एका विद्यार्थ्याने कृषी सेवक पदासाठी निवड व्हावी म्हणून ठाणे आणि औरंगाबाद अशा दोन परीक्षा केंद्रांहून परीक्षा देण्याचे प्रताप केला. यासाठी एका केंद्रावर संबंधित विद्यार्थी, तर दुसऱ्या केंद्रावर डमी विद्यार्थी बसवला होता. त्यानंतर परीक्षेच्या निकालात दोन्ही ठिकाणी या विद्यार्थ्याला एकसारखे गुण मिळाल्याचे कृषी विभागाला निदर्शनास आले. त्यामुळेच कृषी विभागाने राज्य परीक्षा परिषद आणि गजानन एंटरप्रायजेसच्या विरोधात बंड गार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही संस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कृषी सेवक पदासाठी लेखी परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांना काही लोकांनी कॉल केले आणि पदावर नियुक्ती पाहिजे असल्यास सुमारे बारा लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यातील सुमारे ११० ते ११५ परीक्षार्थींनी संबंधित लोकांना बारा लाख रुपये दिल्याची माहिती आहे. ज्या परीक्षार्थींनी बारा लाख रुपये दिले त्यांना परीक्षेतील उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परीक्षा पार पडल्यानंतर काही दिवसांनी प्रकाशित झालेल्या उत्तरतालिकेच्या आधारे कोऱ्या उत्तरपत्रिका भरण्यात आल्या. त्यामुळे पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना २०० गुणांपैकी १८० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित परीक्षेचा निकाल रद्द करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार निकाल रद्द झाला. मात्र, कृषी सेवक पदासाठी दहावी आणि पदविका अथवा पदवी अभ्यासक्रमाचे प्रत्येकी १०० गुणांपैकी एकत्रित गुण धरण्याचा म्हणजेच (भारांकन पद्धत) निर्णय झाला. या निर्णयामुळे जुन्या परीक्षा पद्धतीने उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना नव्या परीक्षा पद्धतीने उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींच्या तुलनेत कमी गुण आहेत. त्यामुळे प्रामाणिक परीक्षार्थींचे नुकसान होणार आहे.

फेरपरीक्षेची मागणी

नव्या भारांकन पद्धतीमुळे लेखी परीक्षेला गैरहजर राहिलेले राज्यातील २४ हजार १०५ विद्यार्थी देखील पात्र ठरले आहेत. त्यामुळे सरकारने भारांकन पद्धत त्वरित रद्द करून परीक्षेतील आर्थिक गैरप्रकारांची चौकशी करण्याची आणि पदासाठी फेरपरीक्षा घेण्याची मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे.

पुरावे देण्याचे आवाहन

कृषी सेवक पदासाठी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. संबंधित प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे परीक्षार्थींनी कृषी आयुक्तालयकडे पुरावे द्यावे, असे कृषी आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
क्रिकेट खेळताना घरावर गेलेला चेंडू काढताना विजेचा धक्का लागून अकरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. खडकीतील मरिआई माता परिसरातील लुंबिनी कुंज बुद्ध विहारच्या बाजूला शनिवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. प्रितेश गणेश कांबळे असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीतील मरिआई माता परिसरात असणाऱ्या लुंबिनी कुंज बुद्ध विहारच्या बाजूला रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास मुले क्रिकेट खेळत होती. त्या वेळी परिसरातील चंद्रकांत कांबळे यांच्या घरावर चेंडू गेला होता. प्रितेश चेंडू काढण्यासाठी वर गेला होता. त्या वेळी तेथे असलेल्या लोखंडी खांबाला हात लागून त्याला विजेचा धक्का बसला. यानंतर त्याच्या भावाने झाडू मारून त्याला बाजूला काढले आणि तातडीने खडकी कँटोन्मेंट हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टॉपवर न थांबल्यास बसचालकावर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाच्या बस प्रवाशांनी हात दाखविल्यानंतरही स्टॉपवर न थांबवणे आता बसचालकांना महागात पडणार आहे. स्टॉपवर बस उभी न करण्याससह कामात हलगर्जी करणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांवर पीएमपी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तर, एका कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पीएमपीच्या बस स्टॉपवर थांबत नाहीत, बसला फलक नसतात, कर्मचारी प्रवाशांशी उद्धट वर्तन करतात याबाबत नागरिकांच्या मोठ्या संख्येने तक्रारी आहेत. प्रवाशांनी सप्टेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत ६,९२० तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामुळे सातत्याने पीएमपी प्रशासनाकडे विचारणा केली जात होती. याबाबत पीएमपी प्रशासनाने शनिवारी आठ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. सहा कंडक्टर आणि दोन बसचालकांनी कामामध्ये हलगर्जीपणा केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. एका कर्मचाऱ्याला नो ड्युटी आणि एका कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे. बस स्टॉपवर बस न थांबविणे. बसला मार्गदर्शक फलक नसणे, तिकीट विक्री रकमेमध्ये कमतरता असणे, नियोजित वेळेपेक्षा अगोदर बस घेऊन जाणे आदी ठपका त्यांच्यावर ठेवलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लर्निंग आउटकम’साठी चाचणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देशातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासून ‘लर्निंग आउटकम’ ठरविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर चाचणी घेणार आहे. ही चाचणी इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या काही विद्यार्थ्यांना द्यावी लागेल,’ अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे शालेय विभागाचे सचिव अनिल स्वरूप यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. या ‘लर्निंग आऊटकम’वर अंमलबजावणी पुढच्या शैक्षणिक वर्षांपासून करण्यात येईल, असे स्वरूप यांनी सांगितले.

मंत्रालय, राज्याच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे शिक्षणात नावीन्यपूर्ण संशोधन आणि प्रात्यक्षिकांचा वापर या विषयावर शिक्षक, अधिकारी, कर्मचारी अशांची दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या समारोपाच्या वेळी स्वरूप बोलत होते. राज्याच्या शालेय विभागाचे सचिव नंदकुमार या वेळी उपस्थित होते.

स्वरूप म्हणाले, ‘देशात शिक्षणहक्क कायदा आल्यानंतर ‘लर्निंग आउटकम’ (अध्ययन निष्कर्ष) ठरविण्यासाठी दोनदा प्रयत्न करण्यात आले. मात्र, ते प्रयत्न यशस्वी ठरले नाही. त्यामुळे आता मंत्रालयाने या प्रयत्नांना अंतिम स्वरूप देण्याबाबत सुरुवात केली आहे. यानुसार शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी ‘लर्निंग आउटकम’ ठरविण्यात येणार आहे. हे ‘लर्निंग आउटकम’ ठरविण्यासाठी प्रत्येक राज्यातील एकूण विद्यार्थी संख्येच्या तीन टक्के विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होईल. त्यानंतर डिसेंबर महिन्यापर्यत हे ‘लर्निंग आउटकम’ तयार करण्यात येईल. त्यावर चर्चा करून त्यांची अंमलबजावणी पुढच्या शैक्षणिक वर्षांपासून करता येईल. शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी याचा फायदा होणार आहे.’

‘शुल्कवाढीची तक्रार द्या’

‘केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय ‘सीबीएसई’ शाळांच्या कारभारावर आणि शुल्कवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करत आहे. त्याबाबत आताच माहिती सांगता येणार नाही. मात्र, राज्यातील ज्या शाळांना सीबीएसई बोर्डाची मान्यता आहे. अशा शाळांना दरवर्षी १० टक्क्यांपेक्षा शुल्कवाढ करता येत नाही. यापेक्षा अधिक शुल्कवाढ करायची असल्यास शाळेतील पालक संघटनेची मान्यता घ्यावी लागते. मात्र, या शाळा बेकायदा शुल्कवाढ करत असल्यास मंत्रालयाला त्या शाळेला नोटीस पाठवून ‘सीबीएसई’ बोर्डाची मान्यता काढता येते. त्यामुळे पालक आणि पालक संघटनांनी www.mhrd.gov.in या वेबसाइटवर किंवा ०११-२३३८२५८७ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रारी कराव्यात. यापूर्वी ज्या शाळांनी नियमबाह्य पद्धतीने शुल्कवाढ केली आहे. त्यांच्या विरोधात पालकांनी तक्रार केल्यावर मंत्रालयाने संबंधित शाळांना नोटीसा पाठवल्या. तेव्हा शाळांनी शुल्कवाढ मागे घेतली,’ असे स्वरूप यांनी सांगितले.

अनधिकृत शाळांवर कारवाई

‘राज्याच्या शालेय विभागाकडे नोंदणी नसणाऱ्या शाळांची माहिती आली आहे. त्यामुळे या शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. या शाळांमध्ये काही हजार विद्यार्थी शिकत, तर शेकडो शिक्षक कार्यरत आहे. शालेय विभागाद्वारे या शाळांवर लवकरच कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल,’ असे नंदकुमार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट ‘आरसी’साठी रीडरच नाही

$
0
0

परिवहन विभागात कार्डची सत्यता पडताळण्याचा प्रश्न

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात आता नवीन किंवा जुन्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र कागदाऐवजी स्मार्ट कार्ड स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, स्मार्ट कार्डमध्ये समाविष्ट केलेली माहिती पडताळण्यासाठी आवश्यक असलेले ‘स्मार्ट कार्ड रीडर’ राज्याच्या परिवहन विभागाकेड आणि वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे कार्ड स्मार्ट झाले, पण ‘ रीडर’चे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आता स्मार्ट कार्ड स्वरूपात देण्यात येणार आहे. राज्याच्या परिवहन विभागाने पुन्हा एकदा ‘रोझ मार्टा’ या कंपनीकडे दोन वर्षांसाठी ‘स्मार्ट आरसी’चे कंत्राट दिले आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णयही नुकताच काढण्यात आला आहे. या महिन्यामध्ये त्या कंपनीचे कामकाज सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. आरटीओकडून ‘पेपर आरसी’साठी शुल्क आकारले जात नव्हते. मात्र, आता वाहन धारकांना ‘आरसी’च्या ‘स्मार्ट कार्ड’साठी अर्जदाराला ५४ रुपये ७२ पैसे शुल्क द्यावे लागणार आहे. हे सर्व असले तरीही, राज्याच्या परिवहन विभागाकडे किंवा वाहतूक पोलिस विभागाकडे ‘आरसी’चे ‘स्मार्ट कार्ड रीडर’ उपलब्ध नाही. त्यामुळे ‘स्मार्ट कार्ड’च्या सतत्येची पडताळणी होणार कशी हा प्रश्न उपस्थित होतो.

‘रोझ मार्टा’ कंपनीकडून राज्यातील आरटीओत नोंदणी होणाऱ्या वाहनांचे ‘आरसी’ स्मार्ट कार्ड स्वरूपात दिले जात होते. मात्र, परिवहन विभागाने या कंपनीशी केलेला करार संपुष्टात आल्यानंतर डिसेंबर २०१४पासून वाहन धारकांना ‘पेपर आरसी’ देण्यात येत होती. त्यापूर्वी राज्यात अनेक वाहनांना स्मार्ट कार्ड स्वरूपात ‘आरसी’ देण्यात आले आहे. या कार्डात एका ‘इलेक्ट्रिक चिप’चा समावेश असतो. त्यामध्ये संबंधित कार्डधारकाची ओळख पटवून देणारी माहिती किंवा कागदपत्रे यांचा तपशील असतो. यापूर्वी जेव्हा स्मार्ट कार्ड स्वरूपात ‘आरसी’ दिले जात होते, तेव्हा देखील ‘कार्ड रीडर’ उपलब्ध नव्हते, अशी माहिती आरटीओतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, आता नव्याने पुन्हा स्मार्ट कार्ड सुरू करताना कार्ड रीडरची तरतूद करण्यात आलेली नाही.

फसवणुकीची शक्यता

देशभरात वाहन चोरीच्या घटना मोठ्या संख्येने घडतात. या वाहनांचा कधी गुन्ह्यांमध्ये वापर केला जातो, तर कधी फसवणूक करून विक्री केली जाते. यामध्ये बनावट आरसी कार्ड बनविले जाऊ शकते. पुण्यातही एकाच नंबरच्या एकापेक्षा अधिक गाड्या रस्त्यावर धावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ योगायोगाने आरटीओच्या पथकाला या दोन्ही गाड्या एकाच ठिकाणी आढळून आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे ‘स्मार्ट कार्ड रिडर’ उपलब्ध असल्यास आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांना तपासणी अधिक प्रभावीपणे करता येऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौशल्य शिक्षण आत्मसात करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘केवळ पदवीधर होऊन बेरोजगार होण्यापेक्षा कौशल्य शिक्षण अभ्यासक्रम आत्मसात करा. पास-नापास अथवा गुणांकडे लक्ष न देता, कौशल्य प्रशिक्षण घेतल्यास भविष्यात स्वत:च्या पायावर निर्भरपणे उभे राहता येईल. यातून सर्वांना रोजगाराची संधी मिळेल,' असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी व्यक्त केले.
नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि हिरामण बनकर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या कौशल्य सेतू अभियान विकास केंद्राचे उद्‌घाटन तावडे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. आमदार योगेश टिळेकर, नॅशनल युवा सोसायटीचे संचालक राजेश पांडे, नगरसेविका राणी भोसले, मनिषा कदम, वीरसेन जगताप, दुगड ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद दुगड, संचालिका मोनल दुगड, माधुरी ठिपसे आणि मुख्याध्यापक हरिश्चंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, ‘सध्याच्या शिक्षणपद्धतीत परीक्षेला महत्त्व दिले जाते. मुलांना कितपत समजले याची परीक्षा न होता पाठांतर किती झाले, यावरच ही परीक्षा होत असते. मुळात प्रत्येक मुलांमध्ये कौशल्य असते. तेच कौशल्य ओळखण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरला आहे. त्यामुळे कौशल्य शिक्षणावर भर दिला जात आहे. पदवी होऊन बेरोजगार होण्याऐवजी एखादा कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण करणे योग्य ठरणार आहे. सध्या कौशल्य अभ्यासक्रम मोठ्या संख्येने सुरू आहेत. त्यातून प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी बनू शकता. केवळ पास होता आले नाही, हा गुन्हा नाही. त्यातूनही तुम्ही कौशल्य शिक्षणातून भविष्याची वाटचाल करू शकता.’
टिळेकर यांनी बनकर विद्यालयाच्या विकासकामांसाठी दहा लाखांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले. राजेश पांडे, मोनल दुगड आदींची भाषणे झाली. या वेळी ज्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या केंद्रातून प्रवेश घेतला आहे, त्यांना प्रशिक्षणाचे साहित्य देण्यात आले.
‘मित्र’ मोबाइल अॅपचे उद्घाटन
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, राज्याच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे शिक्षणात नावीन्यपूर्ण संशोधन आणि प्रात्यक्षिकांचा वापर या विषयावर शिक्षक, अधिकारी, कर्मचारी अशांची दोन दिवसीय कार्यशाळा बालेवाडीला सुरू आहे. या कार्यशाळेला तावडे यांनी भेट देऊन शिक्षण क्षेत्रासाठी उपयोगी ठरणाऱ्या ‘मित्र’ मोबाइल अॅपचे उद्घाटन केले. राज्या-राज्यांमधील शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाण-घेवाण व्हावी व त्याच्या मदतीने विद्यार्थ्यांचा विकास साधावा, असे तावडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images