Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हेडफोनमुळे वाढतोय बहिरेपणा

0
0

Mustafa.Attar @timesgroup.com
Tweet : @mustafaattarMT

पुणे

आयटी कंपन्यांतील नोकरदारांकडून कानाला ‘हेडफोन’ लावून सातत्याने केला जाणारा संवाद, कर्णकर्कश आवाजात म्युझिक ऐकण्याची वाढलेली सवय, वाहनांचा गोंगाट, बीआरटीपासून ते रस्ते, घरांसाठी होणारे खोदकाम, बांधकामांच्या आवाजामुळे तरुणांमध्ये काही वर्षांच्या तुलनेत दुपटीने बहिरेपणा वाढला आहे.

कानात रातकिड्यांचा आवाज येणे, कान दुखणे याशिवाय मानसिक संतुलन ढासळणे यासारखे आजार वाढले आहेत. एकूणच, बहिरेपणाचा आजार तरुण होत चालल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. जागतिक ध्वनिप्रदूषण दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कान, नाक, घसा तज्ज्ञांनी वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्याकडे लक्ष वेधताना आजाराची कारणमिमांसा केली.

‘दुचाकीवरून जाताना मोबाइलवर बोलणारे अनेक जण दिसतात. अपघात टाळण्यासाठी कानात ‘हेडफोन’ वापरण्याची फॅशन सध्या तरुणाईमध्ये वाढली आहे. ‘हेडफोन’चा वापर करून सातत्याने म्युझिक ऐकणे, बोलत राहणे यासारखे प्रकार वाढत आहेत. त्याशिवाय आयटी कंपन्यांमध्ये परदेशातील व्यक्तींशी संवाद साधताना ‘हेडफोन’चा वापर केला जातो. त्यामुळे ‘आयटीयन्स’, तरुणाईमध्ये बहिरेपणाचा आजार बळावला आहे. कानात रातकिड्याचा आवाज वाढणे, कान दुखणे यासारख्या तक्रारींमध्ये काही वर्षांत दुपट्टीने वाढ झाली आहे,’ अशी माहिती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. सचिन गांधी यांनी ‘मटा’ला दिली.

वाढत्या वाहनांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा फटका रस्त्यालगतच्या रहिवाशांसह विक्रेत्यांना बसत आहे. घराशेजारी इमारतीचे बांधकाम सुरू असल्यास सातत्याने येणाऱ्या आवाजामुळे प्रामुख्याने महिलांना त्रास होतो. सातत्याने कानात आवाज येण्याबरोबर कानात ‘ब्लॉकिंग’ सेन्शेशन बहिरेपणाच्या महिलांमध्ये तक्रारी वाढल्या आहेत. ३० ते ३५ वर्षातील महिलांना सर्वाधिक त्रास होत आहे. दहीहंडी, गणेशोत्सवामध्ये ढोल ताशे, फटाके, ध्वनिक्षेपकांवरून होणारे ध्वनिप्रदूषण हे प्रासंगिक वेळीच होते. परंतु, वाहनांपासून ते बांधकामापर्यंतच्या ध्वनिप्रदूषणाचा दैनंदिन त्रास सुरू झाला आहे, असे ते म्हणाले.

कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. विजय केतकर म्हणाले, ‘अधिक प्रमाणातील ध्वनिप्रदूषणाचा कानातील नसांवर परिणाम होतो. आवाजाचा परिणाम होऊन त्या नसा कमकुवत होतात. रस्त्यांवरील वाहनांसह विमानतळ, कारखान्यांमधील १०० डेसिबलपेक्षा मोठ्या आवाजाचा कानावर परिणाम होतो. ८० डेसिबलपर्यंतच्या आवाजाचा परिणाम होत नाही. त्यापुढे आवाज गेल्यास तो कानावर किती तास आदळतो यावर त्याचा फटका बसण्याची तीव्रता स्पष्ट होते. तरुणांमध्ये यामुळे बहिरेपणा वाढत चालला आहे. २० ते २५ वयातील युवकांमध्ये बहिरेपणा सुरू झाला आहे. हेडफोन, मोबाइलचा वापर हेच त्याचे कारण सांगता येईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


किर्लोस्कर घराण्यात संपत्तीचा वाद पेटला

0
0

पुणे

देशातील अत्यंत प्रतिष्ठीत उद्योग समूह असलेल्या किर्लोस्कर घराण्यातील संपत्तीचा वाद आता शिगेला पोहचला आहे. १० कोटींचा भूखंड हडपल्याच्या आरोपावरून सुमन किर्लोस्कर यांनी त्यांचा मुलगा उद्योगपती संजय किर्लोस्कर यांना कोर्टात खेचले आहे.

सुमन किर्लोस्कर या ८२ वर्षाच्या असून त्यांनी त्यांचा मुलगा ५९ वर्षीय संजय यांच्याविरोधात दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला आहे. सुमन या ज्या बंगल्यात राहतात त्या बंगल्याशी संबंधित भूखंडाशी निगडीत हा वाद आहे. पुण्याच्या मॉडल कॉलनीत लकाकी नदी किनारी हा लकाकी बंगला आहे. १९५७ मध्ये शंतनू किर्लोस्कर आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा बंगला खरेदी केला होता. त्यानंतर काही काळाने या प्रॉपर्टीचे विभाजन होत गेले आणि चंद्रकांत किर्लोस्कर यांच्या वाट्याला ६५ हजार ८१० स्क्वेअर भूखंड आला. याच भूखंडावर हा लकाकी बंगला आहे.

सुमन किर्लोस्कर यांच्या आरोपानुसार, संजय यांनी या बंगल्याच्या चार भिंतीमधील १० हजार १३७ स्क्वेअर फुटाच्या भूखंडावर कब्जा केला आहे. त्यासाठी त्यांनी बोगस अॅथोरिटी लेटर्स तयार केले आहेत. या भूखंडावर संजय यांचा काहीच अधिकार नाही. कौटूंबिक व्यवस्थेचा भाग म्हणून त्यांनी हा भूखंड त्यांच्या आईच्या हवाली करायला हवा होता, असे सुमन यांचे वकील पी. नारायणन यांनी सांगितले.

संजय यांनी मात्र त्यांच्या आईचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कौटूंबिक व्यवस्था नावाचा कोणताच प्रकार नाही. त्यामुळे सुमन किर्लोस्कर यांच्या दाव्यात काहीच तथ्य नाही. संजय यांच्या वडिलांनी सुमन यांच्या नावे सर्व संपत्ती केली नव्हती. लकाकी कंपाऊंडचा अर्थ केवळ बंगला होतो. संपूर्ण मालमत्ता होत नाही, असं संजय यांचे वकील किरण वागज यांनी सांगितलं.

ही बातमी इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'तीन रंगात देशाची विभागणी सुरू आहे का?'

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देशात निळ्या, हिरव्या आणि भगव्या रंगाच्या छत्राखाली लोकांची विभागणी सुरू आहे का, अशीच भीती सध्या वाटत आहे. या परिस्थितीतच देशात असहिष्णुता वाढत असून सत्ता काबीज करण्यासाठी धर्माचे राजकारण होत आहे. या परिस्थितीत भारत महासत्ता होणार नाही,' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी बुधवारी व्यक्त केले.

भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित समारंभात ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, वैद्यकीय तज्ञ डॉ. विनोद शहा, विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांना विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. काळे बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कुलसचिव जी. जयकुमार आदी उपस्थित होते.

काळे म्हणाले, ' देशाचे महासत्ता बनण्याचे स्वप्न केवळ भौतिक विकासावर अवलंबून नाही. भौतिक विकासाबरोबरच जेव्हा सांस्कृतिक विकास होईल तेव्हा देश खऱ्या अर्थाने महासत्ता होईल. जातीपाती व धर्माच्या राजकारणातून देश महासत्ता होणार नाही आणि झाला तरी ती महासत्ता मजबूतपणे प्रस्थापित झाली असे म्हणता येणार नाही.देशात असहिष्णुतेचे वातावरण वाढत असून सत्ता काबीज करण्यासाठी धर्माचे राजकारण करण्यात येत आहे, ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी मोथो लढाई उभारण्याची आवश्यकता आहे.

डॉ. शहा म्हणाले, ' समाजात समाजसेवी माणसांची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही कमी भरून काढण्यासाठी समाजसेवेची आवड जोपासणे अधिक महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मान झाले. मात्र, आज भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाने दिलेला पुरस्कार हा घराचा पुरस्कार असल्याने अधिक जवळचा वाटतो.' डॉ. पाटील म्हणाले, ' मी जेव्हा शिकलो तेव्हा प्रयोगशाळा २४ तास सुरू असायच्या आणि अशा परिस्थितीत शिक्षक देखील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असायचे. मात्र, अशी परिस्थिती सध्या कुठे दिसत नाही. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने खूप चांगली कामे करता आली, याचे समाधान आहे. मला मिळालेल्या पुरस्कारात माझे कुटुंबीय, शिक्षक आणि भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे विशेष योगदान आहे.

कुलगुरू डॉ. कदम, विश्वजित कदम यांनी विश्वविद्यालयाच्या विविध उपक्रम आणि उल्लेखनीय कामगिरींची माहिती सांगत मार्गदर्शन केले. कुलपती कदम यांनी पुरस्कारार्थ्यांचे अभिनंदन केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्कच्या (एनआयआरएफ) गुणवत्ता यादीत क्रमांक प्राप्त करणाऱ्या कॉलेजांचा सत्कार करण्यात आला. तसेच, आदर्श प्राध्यापक पुरस्कार, गुणवंत संशोधक पुरस्कार आणि गुणवंत शिक्षकेतर सेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जयकुमार यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांना एखाद्या गोष्टीवर ज्ञान द्यायचे असल्याचं त्याच गोष्टीवर शिक्षकांना दहापट ज्ञान असणे आवश्यक आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता शिक्षकांकडे पुरेशा प्रमाणात ज्ञान नसल्याचेच दिसून येते. अशा परिस्थितीत शिक्षकांना अधिक गुणवान होण्याची आणि ज्ञानार्जन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रा. मिरासदार यांनी सांगितले. पुरस्कार अनेक मिळाले. मात्र, विद्यापीठाने एका शिक्षकाचा जीवनसाधना पुरस्कार देऊन केलेला गौरव हा मला विशेष वाटतो. त्यामुळे विश्वविद्यालयाचे आभारी असल्याचे प्रा. मिरासदार यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रातून मिळणाऱ्या उत्पन्नावर देशातील ५० ते ५५ टक्के लोक अवलंबून आहेत. मात्र, हे उत्पन्न देशाच्या एकूण उत्पन्नापैकी केवळ १० टक्केच आहे. याहून शेतीची अवस्था बिकट असल्याचे आढळते. अशातच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्यात जोपर्यत कृषी क्षेत्राचा विकास होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत तोपर्यत महाराष्ट्राचा विकास झाल्याचे म्हणता येणार नाही, असे देशमुख यांनी सांगितले. कृषी क्षेत्राला पाणी आवश्यक असल्याने त्यासाठी राज्यात सिंचनक्षमता वाढविण्याची आणि इतर राज्यातून पाणी आणण्याचे प्रयत्न झाले पाहीजे, असे देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर पुन्हा निवडून येण्याची अपेक्षा सोडा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशातील इतर सर्व राजकीय पक्षांपेक्षा भारतीय जनता पक्षाची 'पार्टी विथ ए डिफरन्स' अशी ओळख आहे. ही ओळख कायम ठेवण्यासाठी स्वतःपेक्षा सामान्यातील सामान्य व्यक्तीच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करा. प्रस्थापितांना धक्का देण्याची मानसिकता सध्या जनतेमध्ये दिसून येत असून, त्यांची कामे केली नाहीत, तर पुढील वेळी निवडून येऊ, ही अपेक्षा ठेवू नका, अशा शब्दांमध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी पदाधिकारी-कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली.

पिंपरी-चिंचवड येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, राज्याच्या प्रभारी सरोज पांडे, माजी मंत्री एकनाथ खडसे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

केंद्र आणि राज्य सरकारकडून नागरी हिताच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. केंद्राच्या आर्थिक नीतीचे परिणाम आता दिसून येत असून, सामाजिक परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. कोळसा, वीज अशा क्षेत्रांमध्ये झपाट्याने बदल होत असून, अनेक कठीण ठिकाणी रस्ता बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. या सर्व वातावरणात नागरिकांच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही संकल्प केला पाहिजे. ते ध्येय गाठण्यासाठी अस्वस्थ राहिले पाहिजे, तर नक्की ते काम पूर्णत्त्वास जाईल, असा ठाम विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

आमदार-खासदार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी काही ठराविक व्यक्तींच्या तिकीटासाठी आग्रह धरला, त्यांची तिकीटे कापली गेली तर पक्षाविरोधात बंड केले, तर अशा प्रस्थापितांना जनताच जागा दाखविते, हे आता सिद्ध होत आहे, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. तसेच, बाहेरच्या पक्षातून भाजपमध्ये घेतले जात असल्याने त्यावरून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना, त्यांचे दोष दूर करण्याचे काम जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांनी करायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वतःच्या विजयानंतर पत्नी, मुले यांच्यासाठी आग्रह धरू नका, असेही त्यांनी बजावले.

राज्यात जिल्हा परिषदांपासून ते महापालिका निवडणुकांपर्यंत सर्व ठिकाणी भाजपला घवघवीत यश मिळाले असले, तरी काम अजून संपलेले नाही. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्याची गरज आहे, असे मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.

भाजपच्या विविध शहर आणि जिल्ह्यातील महापौर-उपमहापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा यावेळी गडकरी आणि फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गडकरी म्हणाले...

राज्यातील ५० टक्के भागांत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत, तोवर शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत.

राज्याच्या कृषी क्षेत्राचा विकास दर २० टक्क्यांच्या पुढे गेला पाहिजे.

पक्षाच्या नेतृत्वावर, चिन्हावर नागरिकांचा सध्या अधिक विश्वास.

अहंकार-गर्वापेक्षा मन मोठे ठेवायला शिका.

विजयामुळे येणारी जबाबदारी ओळखा, अन्यथा जनता माफ करणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उपनगरीय मार्गावर पास ठरवा वैध’

0
0

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून मुंबईला अप-डाउन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांचा रेल्वेचा पास मुंबईतील उपनगरीय वाहतुकीसाठी वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी केली. तसेच, मुंबईच्या धर्तीवर उपनगरीय वाहतुकीच्या सर्व मार्गांसाठी एकच पासची योजना राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मुंबईमधील उपनगरीय वाहतुकीचा तोटा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. त्यामुळे हा तोटा कमी करण्याच्या उद्देशाने मुंबईतील मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हर्बर लाइनवरील सर्व प्रवाशांना सेंकड क्लासचा मासिक पास पाचशे रुपये आणि फर्स्ट क्लासचा मासिक पास पंधराशे रुपयांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. या पासद्वारे प्रवासी सीएसटी-खोपोली, चर्चगेट-विरार आणि पनवेल-अंधेरीपर्यंत कोठेही प्रवास करू शकणार आहेत. मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. या धर्तीवर पुण्यामध्येही हा निर्णय लागू करण्याची गरज आहे. पुणे-लोणावळा, पुणे-दौंड, पुणे-बारामती या मार्गावर स्थानिक वाहतूक चालते. तसेच, भिगवण ते लोणावळा या दरम्यान प्रवास करणारे नियमित प्रवासी देखील आहेत. या प्रवाशांना प्रत्येक वेळी वेगळे तिकीट काढावे लागते. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते, असे शहा यांनी म्हटले आहे.

‘पुण्यावरून मुंबईला दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांचा एक्स्प्रेस गाडीचा पास असतो. त्यामुळे या प्रवाशांना उपनगरीय वाहतुकीला हा पास वापरता येत नाही. मात्र, मुंबईमध्ये उपनगरीय वाहतुकीसाठी एक पास करताना, पुण्याच्या प्रवाशांचा पासही त्यासाठी गृहित धरला जावा,’ असे शहा यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरारी दरोडेखोर वर्षानंतर जेरबंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दरोड्याच्या गुन्ह्यात वर्षभरापासून फरारी असणाऱ्या गुंडाला भारती विद्यापीठ पोलिसांनी सोमवारी कात्रज परिसरात सापळा रचून अटक केली. तात्या ऊर्फ स्वप्नील वसंत झगडे (वय २९, रा. पांडुरंगनगर, आंबेगाव पठार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मंगेश जावळकर (रा. कात्रज) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार जून २०१६ मध्ये मित्रासोबत सातारा रस्त्यावरील हॉटेलच्या समोर उभे होते. तेथे त्यांना गुंड अमित शिर्के आणि सहा साथीदारांनी मारहाण केली.

दरम्यान, त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांची सोनसाखळी आरोपींनी पळवली. या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी शिर्केसह इतरांना अटक केली होती. मात्र, झगडे पसार झाला. पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. हवालदार प्रदीप गुरव यांना झगडेची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांच्या पथकाने त्याला सुखसागरनगरमधील मंदिराजवळ सापळा रचून अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी राज्यातील अकरा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची शिक्षण आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

डॉ. शर्मा शिक्षण आयुक्तपदावर नियुक्ती होणारे चौथे अधिकारी आहेत. दरम्यान, सध्याचे शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांच्या बदलीचे आदेश अजून जारी झालेले नाहीत. तत्कालीन शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची बदली झाल्यानंतर २४ जून २०१६ रोजी धीरज कुमार यांच्याकडे शिक्षण आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर वर्षभराच्या आतच त्यांच्या जागी डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने गेल्या आठवड्यात राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील ६० अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी ११ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लवकरच आणखी काही अधिकाऱ्यांच्याही बदल्या होतील, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

बुधवारी जाहीर झालेल्या बदल्यांमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ ए. के. डोंगरे यांची नांदेडच्या आयुक्तपदी निवड झाली आहे; तर नागपूरमधील मनरेगा आयुक्त ए. ए. महाजन आता अहमदनगरचे नवे आयुक्त म्हणून काम पाहतील. सोलापूरचे जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्याकडे पणन विभागाच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कृषी पणन महामंडळाचाही अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सांगली जिल्हा परिषदेचे सीईओ आर. बी. भोसले यांना सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपसचिव आणि प्रकल्प संचालक रूचेश जयवंशी यांची मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. लातूरच्या जिल्हाधिकारीपदी जी. श्रीकांत यांची, तर बीडच्या जिल्हाधिकारीपदी एम. देवेंदर सिंग यांची नियुक्ती झाली आहे. गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे (आयटीडीपी) प्रकल्प संचालक व सहायक उपजिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी निवड झाली आहे. सहायक उपजिल्हाधिकारी विपीन इटणकर यांची आयटीडीपी, गडचिरोली येथे प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. नाशिकचे महसूल उपायुक्त एस. जी. कोलते यांची नागपूरच्या मनरेगा आयुक्तपदी निवड झाली आहे.

महत्त्वाच्या बदल्यांकडे लक्ष

राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एकाच वेळी ६० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर आणखी अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित होत्या. त्यापैकी फक्त ११ अधिकाऱ्यांच्याच बदल्या बुधवारी करण्यात आल्या. सध्या राज्यात महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, किंवा पूर्ण होत आला आहे. त्यामुळे या बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश कधी निघतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन वर्षांमध्ये १५ टक्क्यांपेक्षा जास्त शुल्कवाढ नको

0
0






म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘शिक्षण शुल्क नियंत्रण कायद्यात दोन वर्षांत १५ टक्क्यांपेक्षा जास्त शुल्क वाढ करता येणार नसल्याचा नियम आहे. हा नियम न पाळता शुल्क वाढ केल्यास संबंधितांवर सरकार कायदेशीर कारवाई करेल,’ असे शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. सरकारने कलचाचणी उपक्रमाच्या अॅप आणि पोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची दोनदिवसीय बैठक पिंपरी-चिंचवडमध्ये होत आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री फडवणीस आणि तावडे हे पिंपरी-चिंचवडमध्ये आले असता, बुधवारी (२६ एप्रिल) या अॅपचे उद्घाटन करण्यात आले. सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कलचाचणी उपक्रमांतर्गत इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कलअहवाल डाउनलोड करण्यासाठी www.mahacareermitra.in या पोर्टल व mahacareermitra app चे उद्घाटन बुधवारी झाले. हे पोर्टल, अॅप व हेल्पलाइन महाराष्ट्र सरका आणि श्यामची आई फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कार्यान्वित करण्यात आले आहे. या वेळी राज्य मंडलाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे, श्यामची आई फाउंडेशनचे अध्यक्ष भारत देसडला, संचालिका शीतल बापट हे या वेळी उपस्थित होते.
तावडे पुढे म्हणाले, ‘काही जण शिक्षण शुल्कामध्ये वाढ न करता इतर पद्धतीने शुल्क आकारतात. यामध्ये गणवेश, बस, इतर अॅक्टिव्हिटीज यामधून शुल्क आकरतात. परंतु शिक्षण शुल्क नियंत्रण कायद्यानुसार कोणतेही शुल्क १५ टक्क्यांच्या पुढे वाढ करता येत नाही. जर अशा पद्धतीने कोणी शुल्क आकारत असेल तर त्यांच्यावर कारवाई करून कडक शासन देण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
शिक्षण शुल्क वाढीच्या संदर्भात तक्रारी आल्या असून त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. तो सरकारकडे पाठवण्यात आला आहे. त्याबाबत हिअरिंग घेऊन त्यात तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल. सरकारकडून कलमापन चाचणी घेण्यात आली. मुलांचा कल कोठे आहे, हे या कलमापन चाचणीतून समजते. किती मुले कोणत्या शाखेत प्रवेश घेणार आहेत, याचा अंदाज येतो. या कलचाचणीमध्ये पिंपरी-चिंचवडमधील गुरुकुलच्या सात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्यांनी आयटीआयमध्ये प्रवेश घेतला असल्याचे या वेळी तावडे यांनी नमुद केले.
सरकारने सुरू केलेली कलचाचणी हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून, शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत योग्य ती निवड जोपासणारा सेतू आहे. हा उपक्रम विद्यार्थी व पालकांना करिअर निवडीसाठी मार्गदर्शक ठरला असल्याचेही त्यांनी सांगितले. २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या कलचाचणीमध्ये राज्यातून सोळा लाख ६७ हजार ४४५ विद्यार्थ्यांची कल चाचणी घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही त्यांचा कल असलेल्या क्षेत्राबाबत उपलब्ध संधी समजून घेता यावी यासाठी हे पोर्टल आणि हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला यामुळे त्याच्या करिअरची निवड करण्याची समान संधी यामुळे उपलब्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ पीएपीचा बनावट पास; दोघांच्या विरोधात गुन्हा

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पीएमपीचा शंभर रुपयांमध्ये बनावट पास तयार करून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी हे मूळ पासची झेरॉक्स काढून त्यामध्ये बदल कारून बनावट पास तयार करत असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत तिकीट तपासणीस बबन पंढरीनाथ काकडे (वय ५०, रा. काटेनगर, आळंदी रोड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार तेजस थोरात (रा. परिहार चौक, औध) व संदीप परदेशी (रा. मरकळ, आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडे हे पीएमपीमध्ये तिकीट तपासणीस म्हणून आहेत. ते सहकारी अप्पासाहेब कोकणे, गजानन देशमुख यांच्या सोबत पीएमपी बसचे पास तपासात असतात. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास स्वारगेट ते हडपसर बसमधील पास तपासत असताना त्यांना हडपसर गाडीतळ येथे दोन मुकबधीर मुलांकडे असलेल्या पासबाबत संशय आला. त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी चौकशी केली असता त्यांनी आरोपींनी शंभर रुपये घेऊन पास काढून दिल्याचे सांगितले. पीएमपीच्या स्वारगेट मुख्यालयात येऊन पासची तपासणी केली असता ते दुसऱ्याच नावाने दिले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगताप-लांडगे राजकीय शीतयुद्ध

0
0




म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या पिंपरी-चिंचवडमधील बैठकीच्या निमित्ताने शहरातील दोन आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यामधील राजकीय शीतयुद्ध दिसून आले. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागावी, यासाठी दोन्ही आमदारांकडून जोरदार प्रयत्न चालू आहेत.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारत भाजपने एकहाती सत्ता मिळविली. पराभवानंतर पवार यांनी या शहराकडे ढुंकूनही पाहिले नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. तर, भाजपने राज्य कार्यकारिणी बैठकीचे यजमानपद देऊन विजयाची गुढी उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या पक्षाचे कार्यकर्ते भलतेच खुशीत आहेत. यजमानपदाच्या निमित्ताने जगताप आणि लांडगे यांच्यातील राजकीय शीतयुद्धाची मात्र दबक्या आवाजात चर्चा आहे. पक्षाच्या बैठकीच्या निमित्ताने करण्यात आलेल्या फ्लेक्सबाजीवरून पक्षांतर्गत गटबाजीला खतपाणी मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
महापालिकेची एकहाती सत्ता मिळाल्यानंतर दोघांपैकी एकाला मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यामुळे भविष्यात राजकीय शीतयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंत्रिपदाच्या शर्यतीत वर्णी लागण्यासाठी जगताप आणि लांडगे यांनी जोरदार मोर्चेबांधणी चालविल्याची बाब महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पहावयास मिळाली. या माध्यमातून समर्थकांना पदे देण्याबरोबरच शह-काटशहाचे राजकारण खेळण्यात आले. त्यामुळेच भोसरी विधानसभा मतदारसंघातील तीन नगरसेवकांना महापौर, सत्तारूढ पक्षनेता, स्थायी समिती अध्यक्ष अशी तीन महत्त्वाची पदे मिळाली. भोसरी विधानसभा मतदारसंघ तसेच आळंदी नगरपालिकेमध्ये यश मिळाल्यानंतर आमदार लांडगे यांनी शिवनेरीवर जाऊन समर्थकांना एकात्मतेची शपथ दिली. या कार्यक्रमाला जगताप समर्थक जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिले होते. तेव्हापासूनच गटबाजीची बीजे पेरण्यास सुरवात झाली आहे. भविष्यातही त्या अनुषंगाने सातत्याने प्रयत्न होत राहतील, असे जाणकारांचे मत आहे.

वर्चस्वासाठी प्रयत्न
आमदार लक्ष्मण जगताप संयम, अनुभवाच्या जोरावर आणि आमदार महेश लांडगे धडाकेबाज वृत्तीच्या माध्यमातून महापालिकेच्या रणांगणावर आता वर्चस्वाची लढाई खेळू लागले आहेत. जगताप यांना मानणारा नगरसेवकांचा मोठा गट सध्या पालिकेत आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट आणि राज्यातील अन्य मंत्र्यांसोबत जवळीक साधून लांडगे अस्तित्त्व निर्माण करू लागले आहेत. दोन्हींच्या समर्थकांकडून सोशल मीडियामार्फत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या शाब्दिक हल्ले होत आहेत. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने लावलेल्या काही ठिकाणच्या फ्लेक्समध्ये आमदार लांडगे यांनी शहराध्यक्ष जगताप यांना डावलले आहे. तर, जगताप समर्थकांनी काही ठिकाणी लांडगे आणि महापौर नितीन काळजे यांना डावलले आहे. ही दुफळी अनेकांच्या सहज लक्षात येते. दोघांकडून वर्चस्वासाठी प्रयत्न होत असल्याचे जाणवते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीमाशंकर येथील मोक्षकुंडात सांडपाणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरूनगर
श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मोक्षकुंडात सांडपाणी व मैलापाणी मिसळत आहे. त्यामुळे कुंडातील पाणी अत्यंत अस्वच्छ झाले असून परिसरात दुर्गंधी सुटली आहे. कुंडात साठलेले पाणी तातडीने काढून स्वच्छ पाणी सोडावे, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

भीमाशंकर मंदिरालगत डाव्या बाजूला असलेल्या घरातून देखील दुर्गंधीयुक्त सांडपाणी पाझरत असून ते दर्शन बारीमध्ये साचत आहे. त्यामुळे दर्शन बारीतून भाविकांना चालणे त्रासदायक ठरत आहे. वेळेवर स्वच्छता केली जात नसल्याने मंदिर परिसराला गलिच्छ स्वरूप प्राप्त झाले आहे. हा सर्व प्रकार माहिती असूनही स्थानिक विश्वस्त मंडळी डोळेझाक करत आहेत. त्याबद्दल भाविकांनी नाराजी व्यक्त केली. भीमाशंकर येथे सांडपाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. ग्रामपंचायत किंवा देवस्थान समितीने या महत्त्वाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यासाठी भीमा नदी हाच एकमेव पर्याय आहे. सांडपाण्यासोबत मैलापाणी देखील नदीतच सोडले जाते. परिणामी भीमा नदीला गटाराचे स्वरूप आले आहे.

भीमाशंकर मंदिराच्या पाठीमागे मोक्षकुंड आहे. या मोक्षकुंडाला भाविक पवित्र मानतात. मात्र, या मोक्षकुंडात वरच्या बाजूला असलेल्या घरातील, तसेच दुकाने आणि हॉटेलांतील सांडपाणी व मैलापाणी मोठ्या प्रमाणात पाझरून जमा होते. सध्या या कुंडातील पाणी अत्यंत काळेकुट्ट आणि घाण झाले आहे. पाण्यात कीडे तयार होऊन दुर्गंधी सुटली आहे. कुंडातील सांडपाण्याचा प्रवाह थांबवण्याची गरज असून तातडीने स्वच्छता करण्याची गरज आहे.

भीमा नदीपात्रात कचरा

स्थानिक दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिक भीमा नदीचा वापर कचराकुंडी म्हणून करत आहेत. त्यामुळे मंदिर परिसरातील भीमेचे पात्र अतिशय अस्वच्छ झाले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हॉटेल व्यावसायिक शिळे, खराब झालेले अन्न देखील नदी पात्रात टाकतात. उगमस्थानी भीमा नदीचे पात्र अरूंद आहे. त्यात कचरा टाकल्यामुळे भीमा नदीचा श्वास कोंडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोपोडी चौकातील सिग्नल बंद करणार

0
0



म. टा. प्रतिनिधी खडकी
बोपोडी चौकात होणारी नेहमीची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूकशाखेने नवीन योजनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये बोपोडी चौकातील सिग्नल बंद करण्यात येणार असून, चौकात संपूर्ण बॅरिकेड टाकण्यात येणार आहे.
खडकीवरून आंबेडकर रस्त्याने येणाऱ्या वाहनांना पिंपरीकडे वळण्यास बंदी घालण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, मंजुरी मिळताच त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल असे, सहायक पोलिस आयुक्त रशीद तडवी यांनी सांगितले.
पुणे-मुंबई महामार्गावरील बोपोडी चौकात वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागत आहेत. वाहनांच्या रांगा पिंपरीच्या दिशेने दापोडी सीएमई गेटपर्यंत तर, पुण्याच्या दिशेने खडकी रेल्वे स्थानकापर्यंत गाड्यांच्या रांगा लागत आहेत. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहतूकशाखेचे पोलिस सतत प्रयत्न करत असून, काहीना काही पर्याय करत असतात.
सध्या प्रायोगिक तत्वावर बोपोडी चौकातील सिग्नल बंद करण्यात येणार असून, पुणे- मुंबई वाहतूक विनासिग्नल सुरू ठेवली जाणार आहे. यासाठी चौकात बॅरिकेड टाकण्यात येणार आहे. तसेच खडकीच्या आंबेडकर रस्त्यावरून बोपोडी चौकात येणारी वाहतुकीस पिंपरीकडे वळण्यास बंदी घालण्यात येणार असून, ती वाहतूक बोपोडी चौकातून पुण्याच्या दिशेने वळवण्यात येणार आहे. ज्या वाहनांना मुंबईकडे जायचे आहे, त्यांना बोपोडीच्या जुन्या जकातनाक्या समोरून यू-टर्न घेऊन पिंपरी आणि मुंबईला जावे लागेल. त्यासाठी जुन्या जकातनाक्यासमोर वाहनांना वळण्यासाठी आयलंँड तयार करण्यात येणार आहे. तसेच बोपोडी गावातून पुणे-मुंबई रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात येणार आहे. या वाहनांनी भाऊ पाटील रस्त्यावरून सब-वे ने पुणे-मुंबई रस्त्यावर यावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रकल्पांना प्रमाणपत्रच नाही

0
0

प्रदूषण नियंत्रण महामंडळाला वेळ मिळेना

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उरुळी, फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी कचरा डेपोत कचरा टाकण्याचा विरोध कायम ठेवल्याने गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही. आंदोलन सुरू असल्याने शहरातील कचरा समस्या गंभीर होत असताना पालिकेचे ४६ कचरा प्रक्रिया प्रकल्प, तसेच दोन कॅपिंगचे प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) देण्यास महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाला मात्र वेळ नसल्याचे समोर आले आहे.

या प्रकल्पांना मान्यता मिळावी, यासाठी पालिकेतील अधिकारी प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयात गेले चार महिन्यांपासून हेलपाटे मारत असून त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यास १४०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे पालिकेला शक्य होणार आहे. पण मंजुरी मिळत नसल्याने सध्या सुरू असलेल्या आंदोलकांना आश्वासन देणेही प्रशासनाला जमत नाही. शहरातील कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी पालिकेकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या दीड वर्षापासून शहरातील वेगवेगळ्या भागात ४८ प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. ६ ऑक्टोबर २०१६ ते ५ नोव्हेंबर २०१६ या कालावधीमध्ये ४८ प्रकल्पांचे ऑथरायझेशन (प्रकल्प सुरू करण्यासाठी मान्यता) मागण्यासाठीचे प्रस्ताव महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविले आहेत. मात्र, चार महिने उलटूनही त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. शहरातील कचराप्रश्न बिकट होत असल्याने तातडीने यावर निर्णय घ्यावा, असे पत्र प्रशासनाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठविले आहे.

गेल्या बारा दिवसांपासून शहरातील कचरा उरुळी देवाची येथील डेपोमध्ये टाकण्यास ग्रामस्थांनी बंदी घातल्याने कचरा कोंडी निर्माण झाली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडे तुर्तास कोणताही उपाय नाही. मात्र, एमपीसीबीकडून तातडीने या प्रकल्पांना ऑथरायझेशन देण्याबाबत निर्णय झाल्यास महापालिकेचे काही प्रकल्प सुरू होऊन काही प्रमाणात कचऱ्याचा भार हलका करणे प्रशासनास शक्य होणार आहे. त्यामुळे हे ऑथरायझेशन तातडीने मान्य होण्यासाठी महापालिका स्तरावर धावपळ सुरू आहे. प्रकल्पांना मान्यता मिळाल्यास ग्रामस्थांच्या निर्दशनास ही बाब आणून कचरा प्रश्नी तोडगाही निघण्याची शक्यता आहे.

आंदोलकांचे जागरण गोंधळ

कचराडेपोमुळे ग्रामस्थांना कसा त्रास होत आहे, हे शहरातील नागरिकांना समजावे तसेच पालिका प्रशासनाला याची जाणीव व्हावी, यासाठी बुधवारी दिवसभर आंदोलकांनी जागरण गोंधळ घातला. कचरा प्रक्रिया व कचऱ्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर गाण्याद्वारे वाघ्या मुरळींनी सादरीकरण केले. या वेळी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसमोर जागरण गोंधळाचा भंडारा उडवण्यात येत होता. दरम्यान, ग्रामस्थांनी सुरू केलेले आंदोलन मागे घ्यावे, यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी पुन्हा तिसऱ्यांदा ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, घनकचरा विभागप्रमुख सुरेश जगताप, नगरसेवक मारुती तुपे, संजय घुले, रंजना टिळेकर या वेळी उपस्थित होते. ग्रामस्थ भगवान भाडळे, तात्या भाडळे, अमोल हरपळे, रणजित रासकर, बाळासाहेब हरपळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसिला राजू खूनप्रकरणी आरोपपत्र दाखल

0
0

पुणे : ‘इन्फोसिस’ कंपनीतील आयटी इंजिनीअर रसिला राजू ओपी हिच्या खून प्रकरणी सुरक्षारक्षकावर बुधवारी कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. रोखून पाहतो याचा जाब विचारून वरिष्ठांकडे ई-मेलद्वारे तक्रार करते, असे म्हटल्याने रसिलाचा सुरक्षारक्षकाने केबलने गळा आवळून खून केला होता.

भाबेन भराली सैकिया (वय २६, रा. हिंजवडी, मूळ रा. आसाम) याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. २९ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ही घटना घडली होती. रसिला ही इन्फोसिस कंपनीत आयटी इंजिनीअर म्हणून कार्यरत होती, तर भाबेन सैकिया हा कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. रसिलाने त्याला तिच्याकडे रोखून पाहण्याबाबत जाब विचारला. त्याबद्दल वरिष्ठांकडे तक्रारीचा ई-मेल पाठविते असे म्हटले. त्यामुळे चिडून आणि तक्रार केल्यास नोकरी जाईल या भीतीने त्याने रसिला यांना मारहाण केली. हाताने आणि कॉम्प्युटरच्या लॅन केबलने गळा आवळून तिचा खऊन केल्याचे आरोपपत्रात म्हटले

आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तपास करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. बारूलकर यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले आहे. बचाव पक्षातर्फे अॅड. बी. ए. अलूर काम पाहात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमानाची वाटचाल चाळिशीच्या दिशेने

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेले काही दिवस पुणेकरांना हलक्या गारव्याचा अनुभव दिल्यानंतर शहरातील तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. बुधवारी शहरात ३८.१ अंश सेल्सिअस कमाल आणि २०.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसात तापमानात आणखी अल्प वाढ होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
सुमारे आठवडाभर चाळिशीत मुक्काम केल्यानंतर गेले चार पाच दिवस पुण्यातील पारा पस्तीस अंशांपर्यंत खाली उतरला होता. त्यामुळे कडक उन्हाचे चटके सहन करणाऱ्या पुणेकरांना काहीसा दिलासा लाभला होता. परंतु, आता पुन्हा तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र,वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जम्मू आणि काश्मिरसह उत्तर आणि मध्य भारतात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भ वगळता राज्यात हवामान कोरडे राहील, त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात देशभरातील तापमानात फारशी वाढ होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बुधवारी लोहगाव येथे ३९.५ अंश सेल्सिअस कमाल तर २० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. राज्यातील सर्वाधिक तापमान विदर्भातील ब्रह्मपुरी येथे (४३.५ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. कोल्हापूर येथे ३७.५, महाबळेश्वर येथे ३२.६, मालेगाव येथे ४०.८, नाशिक येथे ३६.६, सांगली येथे ३९, सोलापूर येथे ४०.६, मुंबई येथे ३३.२, औरंगाबाद येथे ३९.८, परभणी येथे ४०.६, अकोला येथे ४१.४ तर नागपूर येथे ४२.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वच्छतागृहात महिलेचे छायाचित्रण

0
0

खराडी आयटी पार्कच्या कंपनीतील प्रकार; आरोपी अटकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खराडी आयटी पार्क येथील एका कंपनीत स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेचे साफसफाई करणारा कर्मचारी मोबाइलवर फोटो काढत असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला. संबंधित महिलेने ‘बडीकॉप’वर तक्रार करताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली. खराडी येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर टॉवरमधील पाचव्या मजल्यावर घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली. ‘बडीकॉप’च्या माध्यमातून करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे.
चंदननगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी २६ वर्षीय महिलेने तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी राजकमल राजबहादूर यादव (वय २४, सध्या रा. थिटे वस्ती, खराडी) याला अटक केली. खराडी येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर टॉवरमधील ट्रायन्ट ग्लोबल सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीत संबंधित महिला कार्यरत आहे. कंपनीतील कामगारांच्या पगारवाढीचे काम सुरू असल्यामुळे तक्रारदार या रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबल्या होत्या. पाचव्या मजल्यावर महिलांसाठी स्वच्छतागृह आहे. रात्री पावणेदहा वाजता तक्रारदार स्वच्छतागृहात गेल्या असता, शेजारी असलेल्या मोकळ्या जागेतून कोणीतरी फोटो काढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ बाहेर येऊन संबंधिताला बाहेर येण्यास सांगितले. त्या वेळी आरोपी यादव बाहेर आला.महिलेच्या हाताला हिसका मारून तो पळून गेला.
त्यानंतर महिलेने सुरक्षारक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांना आवाज दिला. पळून जाणाऱ्या यादवला सुरक्षारक्षकांनी पकडले. कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ बडीकॉप ग्रुपमध्ये मदतीची मागणी केली. चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पात्रुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बडीकॉप’चे सहायक निरीक्षक राजेंद्र गिरी आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली. यादव हा दोन वर्षांपासून टॉवरमध्ये हाउसकिपिंगचे काम करत होता. त्याने अगोदरही असे प्रकार केले असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्भकांच्या अंधत्वाचे निदान शक्य

0
0

पुण्यासह पाच जिल्ह्यांत प्रायोगिक ‘आरओपी’ प्रकल्पाची सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुदतपूर्व ३४ आठवड्यांमध्ये जन्माला आलेल्या अथवा दोन किलोपेक्षा कमी वजन असलेल्या नवजात अर्भकांच्या ’रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी’ (आरओपी) या अंधत्वाचे निदान करण्यासाठी पुण्यासह पाच जिल्ह्यात प्रायोगिक प्रकल्प राबविण्यास बुधवारी औंधच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये सुरुवात झाली. त्यामुळे पुण्यासह नाशिक, ठाणे, उस्मानाबाद आणि नागपूर जिल्ह्यांतील बालकांना दृष्टी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवजात अर्भकांमधील अंधत्व दूर करण्यासाठी ‘टू प्रीव्हेंट ब्लाइंडनेस फ्रॉम आरओपी अॅँड डायबेटिक रेटिनापॅथी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. इंग्लंडच्या ‘क्विन एलिझाबेथ डायमंड ज्युबिली ट्रस्ट’ आणि ‘पब्लिक हेल्थ फाउंडेशन’ यांच्याशी केंद्र सरकारने करार केला आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते बुधवारी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी पाच जिल्ह्यांतील प्रकल्पाचे उदघाटन केले. या वेळी जिल्हा हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील, आरोग्य विभागाच्या पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. एच. एच. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. के. शेळके, देसाई हॉस्पिटलचे अध्यक्ष नितीन देसाई, मुख्य वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. मदन देशपांडे आणि वैद्यकीय संचालक डॉ. सुचेता कुलकर्णी उपस्थित होते.
‘राज्यातील हा प्रकल्प यशस्वी होईल. त्यामुळे नवजात बालकांमधील अंधत्व दूर होऊ शकते,’ असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला. एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्यावतीने या मोहिमेत बालकांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार आहे. केईएम हॉस्पिटलच्यावतीने जिल्हा हॉस्पिटमधील डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉडी स्कॅनिंगला पुणेकरांची पसंती

0
0

विमानतळावरील सुरक्षेसाठी आवश्यक तपासणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विमानतळावरील सुरक्षेसाठी प्रस्तावित असलेल्या ‘बॉडी स्कॅनिंग’ला पुणेकर प्रवाशांनी पाठिंबा दर्शविला आहे. देशभरात झालेल्या सर्व्हेमध्ये या प्रक्रियेस पुणेकरांची सर्वाधिक पसंती मिळाली असून, लखनौ आणि भुवनेश्वर विमानतळ अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे. त्यामुळे येत्या काळात पुणे विमानतळावर प्रवाशांना ‘बॉडी स्कॅनिंग’ला सामोरे जावे लागणार आहे.
ब्युरो ऑफ सिव्हील एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएसी) या संस्थेने देशभरातील विमानतळांवर सुरक्षेसाठी ‘बॉडी स्कॅनिंग’ सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव नागरी हवाई मंत्रालयाला सादर केला होता. त्यानुसार गेल्या वर्षी दिल्ली विमानतळावर प्रायोगिक तत्त्वावर सुरक्षा तपासणी प्रक्रियेमध्ये ‘बॉडी स्कॅनिंग’ करण्यास प्रारंभ झाला. मात्र, अनेक प्रवाशांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे देशभरात याची अंमलबजावणी होण्यापूर्वी ‘बीसीएसी’ने प्रवाशांची मते विचारात घेण्याचा निर्णय घेऊन सर्व्हे सुरू केला. या सर्व्हेमधून दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद ही विमानतळे वगळण्यात आली होती. पुणे विमानतळावर नुकत्याच झालेल्या सर्व्हेमध्ये तिनशे प्रवाशांची मते नोंदविण्यात आली. त्यामध्ये ७५ टक्के प्रवाशांनी ‘बॉडी स्कॅनिंग’ला पाठिंबा दर्शविला.
तपासणीमध्ये मानवी चुका होण्याची शक्यता असते. परिणामी, धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सामनासहीत प्रवाशांचेही संपूर्ण स्कॅनिंग करून चूक होण्यास जागाच शिल्लक ठेवली जाणार नाही, हा या मागील उद्देश आहे. दिल्ली येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू केल्यानंतर, स्कॅनिंगमध्ये व्यक्तीचे चित्र निगेटिव्ह स्वरूपात व विचित्र पद्धतीने दिसत असल्याने नागरिकांनी आणि विशेषतः महिला प्रवाशांनी यास विरोध केला होता. आरोग्यावरही याचा परिणाम होण्याची भीती काहींनी व्यक्त केली होती. मात्र, पुण्यामध्ये प्रवाशांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएफच्या पेन्शनमध्ये सरसकट वाढ नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
खासगी कंपन्या, महामंडळे आणि सहकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशनतर्फे (ईपीएफओ) देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये सरसकट वाढ होणार नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेशातील एका प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार कर्मचारी निवृत्तीच्यावेळी लागू असलेल्या ‘सिलिंग’पेक्षा जास्त वेतन असलेले आणि संपूर्ण वेतनावर मालकांनी त्यांचे योगदान प्रॉव्हिडंट फंडमध्ये (पीएफ) दिले असलेल्या कर्मचाऱ्यांनाच या आदेशाचा फायदा होणार आहे. मात्र, असे कर्मचारी नगण्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्मचाऱ्याचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता याच्या १२ टक्के रक्कम ही ‘पीएफ’ म्हणून जमा होते. संबंधित कर्मचारी काम करत असलेल्या कंपनीकडून तेवढ्याच रकमेचे योगदान दिले जाते. कंपन्यांच्या योगदानापैकी ८.३३ टक्के रक्कम ही पेन्शन फंडात जमा केली जाते.
‘ईपीएफओ’च्या पेन्शन योजनेमध्ये ‘सिलिंग’ ही संकल्पना आहे. सर्व कर्मचाऱ्यांना सिलिंगवर पेन्शन दिली जाते. पेन्शन ​योजना लागू झाली, तेव्हा पाच हजार रुपये सि​लिंग होते. जून २००० मध्ये ६५०० रुपये सि​लिंग झाले. २०१४ मध्ये १५ हजार रुपये सिलिंग करण्यात आले आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार ‘सिलिंग’पेक्षा जास्त वेतन असलेले आणि संपूर्ण वेतनावर मालकांनी त्यांचे योगदान ‘पीएफ’मध्ये दिले असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. मात्र, या आदेशाचा लाभ मिळणाऱ्यांची संख्या पुण्यात नगण्य असल्याचे ‘ईपीएफओ’च्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सिलिंगपेक्षा कमी वेतन असलेले आणि मालकांचे योगदान हे सिलिंगच्या रकमेएवढ्या वेतनावर दिले जात असल्यास संबंधितांना लाभ मिळू शकणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-रिक्षाचा आराखडा आज निश्चित होणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकार व राज्य सरकारने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ई-रिक्षांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिस एकत्रितपणे ई-रिक्षाच्या प्रवासी सेवेचा आराखडा निश्चित करणार आहेत. त्याची पहिली बैठक आज, गुरुवारी होणार आहे.
राज्य सरकारने सप्टेंबर २०१६ मध्ये राज्यात ई-रिक्षांना परवानगी देण्याचा आदेश काढला. ई-रिक्षांसाठी नियमावली जाहीर केली. त्याच वेळेला केंद्र सरकारने ई-रिक्षांना कोणत्याही परवान्याची गरज नसल्याचे जाहीर केले. मात्र, राज्याच्या नियमावलीनुसार सायकल रिक्षा कार्यान्वित असलेल्या शहरांमध्येच ई-रिक्षांना परवानगी दिली जाईल, असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे राज्यात ई-रिक्षा सुरू होऊ शकल्या नव्हत्या. अखेरीस केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे सर्वच शहरांत ई-रिक्षा आता सुरू होणार आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, वाहतूक पोलिस उपायुक्त व अन्य अधिकारी यांची गुरुवारी आरटीओमध्ये पहिली बैठक होणार आहे.
शहरामध्ये ई-रिक्षा कोणत्या मार्गावर सुरू करायच्या, या रिक्षांचे स्टॅण्ड कोठे असतील, चार्जिंग स्टेशन कोठे असावेत, तिकीटदर काय असावा, एका मार्गावर किती रिक्षांना व्यवसायास परवानगी द्यावी, आदी गोष्टी यामध्ये निश्चित केल्या जाणार आहेत. ई-रिक्षा मुख्य शहराऐवजी उपनगरांमध्ये सुरू करण्याचे सरकारचे आदेश आहेत. त्यानुसार ई-रिक्षांचे मार्ग निश्चित करण्यावर या बैठकीत भर दिला जाणार आहे, असे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images