Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नादुरुस्त सर्व्हरमुळे प्रवेशपत्रांची समस्या

$
0
0

आज सेटची परीक्षा; विद्यार्थी झाले हवालदिल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून आज, रविवारी राज्य पात्रता परीक्षा (सेट) घेण्यात येणार आहे. मात्र, या परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशपत्र (हॉल तिकीट) सर्व्हर नादुरुस्त असल्याने डाउनलोड करता न आल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप करावा लागला. प्रवेशपत्राविना परीक्षेला जायचे कसे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. या गोंधळामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाकडून सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य सेट परीक्षेला महाराष्ट्र आणि गोव्यातून ८९, ७७२ विद्यार्थी बसणार आहेत. राज्यातील १५२ केंद्रावर आणि पुण्यातील २९ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. शुक्रवारपर्यंत परीक्षेसाठी निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड केली नसल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, रविवारी परीक्षा असल्याने शनिवारी setexam.unipune.ac.in या वेबसाइटवरून प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शर्थीने प्रयत्न केले. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हॉल तिकीट डाउनलोड करत असल्याने सर्व्हर डाउन झाला. शनिवारी दिवसभर हीच परिस्थिती कायम असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळविण्यात अपयश आले.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाशी आणि सेट विभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. दर वर्षी विद्यार्थ्यांना अशाच प्रकाराच्या समस्यांचा सामना कारावा लागतो. त्यामुळे विद्यापीठाने कारभार सुधारला पहिजे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, प्रवेशपत्र काढण्यासाठी सायबर कॅफेमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड करता आले नाही, अशांनी सेटची परीक्षा द्यायची तरी कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आजही प्रवेशपत्र मिळणार
विद्यापीठाच्या सेट विभागाने ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड करता आलेले नाही, अशांना setco@unipune.ac.in या ई-मेल आयडीवर आपला ‘लॉग इन आयडी’ आणि नोंदणी केलेला ‘ई-मेल आयडी’ टाकून ई-मेलद्वारे तक्रार नोंदविण्यास बजावले आहेत. दरम्यान, रविवारी सकाळी ७ वाजेपर्यत ई-मेलद्वारे हॉल तिकिटबाबत तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेल आयडीवर हॉल तिकीट पाठविण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आग लागल्याने दुकाने जळून खाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॅम्पातील बाबाजान चौकाजवळील दाट लोकवस्तीच्या परिसरात शनिवारी पहाटे आग लागून दोन दुकाने आणि घरे भस्मसात झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
बाबाजान चौकालगतचा भीमपुरा परिसर दाट लोकवस्तीचा आहे. चिंचोळ्या गल्लीत दाटीवाटीने घरे आहेत. शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास कपडे आणि बेकरीत आग लागली. आगीची झळ शेजारी असलेल्या दोन घरांना पोहचली. त्यापैकी एका घरात कोणीही राहत नव्हते. आग भडकल्यानंतर एका घरातील मंडळी बाहेर पडली. त्यांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. कँन्टोन्मेंट अग्निशमन दल आणि पालिकेच्या अग्निशमन दलाचे पाच बंब आणि तीन टँकर घटनास्थळी दाखल झाले. पुणे अग्निशमन दलाचे विभागीय अधिकारी दत्तात्रय नागलकर, कँटोन्मेंटचे केंद्र प्रमुख समीर शेख, विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. जुने बांधकाम असल्याने पोटमाळे तसेच अंतर्गत भाग लाकडी असल्याने आग भडकली, असे शेख यांनी सांगितले.

चालती कार आगीत जळून खाक
कॅम्पातील आंबेडकर पुतळ्याजवळ कारला शनिवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत कार जळून खाक झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शाहीद अमित खान यांची ही कार होती. ते कॅम्पातून जात असनाना वायरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यानंतर त्यांनी कार रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि अग्निशमन दलास फोन केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रेड सेपरेटरवरून मेट्रो

$
0
0

दापोडी ते निगडी मार्गासाठी निर्णय; साडेसहाशे झाडांना जीवदान

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्ग करण्याचे नियोजन केले होते. तथापि, याबाबत महापालिकेने काही त्रुटी निदर्शनास आणल्यानंतर आता हा निर्णय बदलण्यात आला असून, पुणे मेट्रो महामार्गावरुन निगडी-दापोडी रस्त्याच्या मध्यभागातून ग्रेडसेपरेटरवरून जाणार आहे. या निर्णयामुळे दापोडी ते निगडी मार्गावरील तब्बल ६५० झाडे वाचणार आहेत.
पिंपरी महापालिकेने पिंपरी ते दापोडी रस्ता विकसित करताना केलेल्या कामाच्या तांत्रिक बाबींचा विचार करून पुणे मेट्रोने मागणी केलेल्या आखणीत फेरबदल सुचविले आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्ग करण्याचे नियोजन केले होते. पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पिंपरी ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार पिंपरी ते दापोडी येथील हॅरिस पुलापर्यंत मेट्रोचा मार्ग फुटपाथच्या कडेने करण्याचे नियोजन होते. त्याचे सादरीकरणही करण्यात आले होते. फुटपाथच्या कडेने मेट्रोचे काम केले केल्यास फुटपाथमध्ये असणाऱ्या सेवावाहिन्या स्थलांतरित कराव्या लागणार होत्या. ही गोष्ट महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे मेट्रोचा मार्ग फुटपाथच्या कडेने करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने असहमती दर्शविली होती. फुटपाथच्या कडेने मेट्रो मार्ग केल्यास सध्या असलेल्या सर्व सेवावाहिन्या स्थलांतरित कराव्या लागतील. तसेच, सर्व्हिस रोडची रुंदी नऊ मीटरवरून ४.७५ मीटर होईल. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जागेचे भूसंपादनही अडचणीचे होऊ शकते. या सर्व गोष्टींमुळे मेट्रो प्रकल्पाला उशीर होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय या मार्गासाठी साडेसहाशे झाडे तोडण्यात येणार होती. या सर्व गोष्टी पालिका अधिकाऱ्यांनी मेट्रो अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
या गोष्टी टाळण्यासाठी निगडी ते दापोडी या रस्त्याच्या मध्यभागातून मेट्रो मार्गाची आखणी करण्याची सूचना महापालिकेनेकेली होती. त्यानुसार महापालिका मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे प्रत्यक्ष स्थळपाहणी केली.

असा आहे निगडी ते दापोडी मार्ग

० पिंपरी महापालिका हद्दीमधील अंतर : ७.१५ किमी

० दर साडेतीन मिनिटांनी मेट्रोची फेरी

० एका फेरीची प्रवासी संख्या : ९०० असणार आहे.

मेट्रो स्टेशन :

० पिंपरी ० संत तुकारामनगर, ० भोसरी (नाशिक फाटा), ० कासारवाडी (फोर्ब्ज मार्शल समोर) ० फुगेवाडी (जकात नाक्यासमोर), ० दापोडी (अरुण टॉकीज)

...
झाडांना जीवदान
मेट्रो स्टेशनसाठी पाच ते सात मीटर रुंद व १४० मीटर लांब क्षेत्राच्या भूसंपादनाची आवश्यकता होती. त्यामुळे प्रकल्पाला उशीर होणार होता. विशेष म्हणजे यासाठी ६५० झाडे काढावी लागणार होती. काही दिवसांपूर्वी विद्यापीठ ते ब्रेमेन चौक दरम्यान झाड काढण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करून आंदोलन केले होते. याचा विचार करून एक्स्प्रेस लेन व बीआरटीएस लेनच्या मधील दोन मीटर रुंद दुभाजकामधून मेट्रो मार्गाची आखणी करण्यात आली आहे. तसेच महामेट्रो कॉर्पोरेशनने महापालिकेची मागणी तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे मान्य केले आहे. पुणे मेट्रो मार्गाची आखणी पिंपरी-दापोडीच्या रस्त्याच्या मध्यभागातून निश्चित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरे महात्मा गांधी केव्हाच गेले...

$
0
0

अंबरीश मिश्र यांची टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘महात्मा गांधी हे संघर्षमयी तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर तत्कालीन राज्यकर्त्यांनी गांधींना पितृत्वाचे स्थान देऊन त्यांच्यातील संघर्ष शक्ती काढून घेतली. नेहरूंनीही कधी गांधींचे ऐकले नाही. त्यामुळे, खरे गांधी केव्हाच गेले. ते काँग्रेसकडेही नव्हते आणि मोदींकडेही नाहीत,’ असे सांगून ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अंबरीश मिश्र यांनी तत्कालीन भारत सरकार, काँग्रेस पक्ष आणि मोदी यांच्यावर ताशेरे ओढले. महात्मा गांधींनी दिलेल्या विचारांची आजही देशाला गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
‘शब्द फाउंडेशन’तर्फे एस. एम. जोशी सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी मिश्र यांच्याशी संवाद साधला. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, केतन गाडगीळ, आदी या वेळी उपस्थित होते. शास्त्रीय संगीत, गझल, लेखन, राजकारण, मंत्रालयातील पत्रकारिता अशा विषयांवर चौफेर फटकेबाजी करून मिश्र यांनी पुणेकरांची रविवारची सकाळ संस्मरणीय केली. रसिकांशी मनमोकळ्या गप्पा मारून काही क्षणात मिश्र यांनी सभागृहाचा ताबा घेतला. अनेक विषयांचे सखोल ज्ञान असलेले भांडार रसिकांसाठी उघडे करावे, तसे मिश्र विविध विषयांमध्ये लीलया मुशाफिरी करत होते. मधूनच एखादा शेर ऐकवून ते रसिकांची वाहवा मिळवत होते. मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी अशा चारही भाषांवर पकड असणाऱ्या मिश्र यांचे अनुभव सभागृहातील प्रत्येक जण आपल्या मनात साठवत होता.
सुधीर गाडगीळ यांनी राज्य सरकारपासून हिंदी चित्रपटांपर्यंत अनेक विषयांवर मिश्र यांना बोलते केले.
मिश्र म्हणाले, ‘मंत्रालय आणि राजकीय पक्षांची कार्यालये आता चित्रपटाचा सेट वाटतो. आधी असे नव्हते. मंत्री, आमदार नम्र स्वभावाचे होते. आता नगरसेवकही तसे पाहायला मिळत नाहीत. गेल्या अनेक वर्षांमध्ये मंत्रालयात अनेक बदल होते गेले. काँग्रेस असताना गटातटाचे राजकारण चालायचे. त्यामुळे, लोकशाही अधिक सबळ होत होती. भाजपलाही जर दीर्घ काळ राज्य करायचे असेल, तर अतंर्गत गट तयार होणे गरजेचे आहे.’ वसंतदादा पाटील, शरद पवार मुख्यमंत्री असताना घडलेल्या अनेक प्रसंगाचे दाखले मिश्र यांनी दिले. वसंतदादा पाटील आणि शरद पवार हे अत्यंत नम्र मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री असूनही सामान्य माणसांमध्ये वावरण्याची कला त्यांच्याकडे होती. गेल्या काही वर्षांपासून मुख्यमंत्री आणि इतरांमध्ये बरेच अंतर निर्माण झाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सध्याच्या चित्रपट संगीताविषयीही मिश्र यांनी खंत व्यक्त केली. ‘चित्रपट संगीतामध्ये मेलडी नाही, तोपर्यंत ते संगीत श्रवणीय होत नाही. सध्याच्या चित्रपट संगीतात मेलडी कुठेही दिसत नाही. त्यामुळे, जुनेच संगीत अजूनही अजरामर आहे,’ असे त्यांनी सांगितले. शेवटी स्वरचित कविता सादर करीत त्यांनी मुलाखतीचा समारोप केला.
...
मी मराठीत विचार करतो
अंबरीश मिश्र यांची हिंदी, इंग्रजी, मराठी आणि उर्दू अशा चारही भाषांवर पकड आहे. तो धागा पकडून तुम्ही कोणत्या भाषेत विचार करता, असा प्रश्न गाडगीळ यांनी विचारला. मी उत्तरेकडचा असलो, मूळ हिंदी भाषिक असलो तरी मराठीतच विचार करतो असे मिश्र यांनी ठामपणे सांगितले. माझ्या आईने मराठी भाषा माझ्या पदरात घातली आहे.

..
सरकारला फक्त शिवस्मारकात रस..
गाडगीळ यांनी राज्य सरकार सध्या पुस्तकांचे गाव उभारत आहे, त्याबद्दल काय वाटते, अशी विचारणा केली असता मिश्र यांनी ‘आधी ते उभे तर राहू देत,’ अशी खोचक टिप्पणी केली. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला. ‘सध्याच्या सरकारला फक्त शिवस्मारकातच रस आहे. तो मलाही आहे. पण, माझा त्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही,’ असे सांगून मिश्र यांनी सरकारवर निशाणा साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणाचे गांभीर्य नाही

$
0
0

डॉ. माधव गाडगीळ यांची राज्य सरकारवर टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘सरकार बदलेले मात्र अपेक्षेप्रमाणे चांगली कामे होत नाहीत. ज्या संस्था पर्यावरण क्षेत्रात चांगली कामे करतात त्यांची जाणीवपूर्वक सरकारकडून आर्थिक मदत थांबविली जाते. पर्यावरण क्षेत्राचे संवर्धन करण्याच्यादृष्टीने सरकारची वाटचाल वाईट सुरू आहे,’ अशी टीका ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी सरकारच्या कारभारावर रविवारी केली.

मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त ‘भारत-२०२२च्या ध्येयपूर्तीसाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचे योगदान’ या विषयावर परिसंवाद झाला. या वेळी डॉ. गाडगीळ बोलत होते. ‘आयसर’चे शास्त्रज्ञ डॉ. सतीश ओगले, राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राचे (एनसीसीएस) संचालक डॉ. शेखर मांडे, केपीआयटी कमिन्सचे अध्यक्ष रवी पंडित परिसंवादात सहभागी झाले. परिसंवादाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.

डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी योग्य होत नाही. पर्यावरण संवर्धनाबाबत सरकार गंभीर नाही. त्यासाठी पुरेसा निधी नाही. सरकार बदलल्यानंतर परिस्थिती बदलेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सरकार बदलल्यानंतर देखील परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या प्रचंड प्रदूषण करत आहेत. अशातच पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची आर्थिक मदत थांबविली जाते. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असेल, तर नव्या कल्पना लढवाव्या लागतील. लोकांना त्याचे महत्त्व सांगावे लागेल. त्यासाठी नागरी चळवळ उभारण्याची गरज आहे. लोकांमध्ये जनजागृती केल्यास पर्यावरणाचे संवर्धन योग्य पद्धतीने होईल.’

डॉ. ओगले म्हणाले, ‘अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन होणे गरजेचे आहे. सौरऊर्जा, पवनऊर्जा यासारख्या नैसर्गिक स्रोतांचा वापर सामान्यांना करता यावा, यासाठी स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी संशोधन सुरू आहे. यामध्ये सुरुवातीला गुंतवणूक थोडी जास्त असली, तरी भविष्यात हाच ऊर्जेचा पर्याय असणार आहे. हे सध्या करण्यासाठी उद्योग आणि शिक्षणसंस्था यांच्यातील संवाद व समन्वय वाढणे गरजेचे आहे. अपारंपरिक स्त्रोतांमध्ये ऊर्जा निर्मिती, ऊर्जा साठवण्यासाठी साधने आणि ऊर्जेचे संवर्धन या तीन गोष्टींवर संशोधन करणे गरजेचे आहे.’

डॉ. मांडे म्हणाले, ‘जैवतंत्रज्ञान आपली दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. आज देशात कुपोषणाची समस्या भेडसावत आहे. ती सोडविण्यासाठी संशोधन आवश्यक असून शेती, आरोग्य, कुपोषणमुक्ती यावर काम व्हावे. क्षयरोगावर उपायकारक औषध शोधणे सुरू आहे. जैवतंत्रज्ञान हे नवीन आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. आपल्या दररोजच्या जीवनाचा जैवतंत्रज्ञानाचा थेट संबंध आहे. त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात संशोधन व्हावे.’

पंडित म्हणाले, ‘स्वच्छ, सुरक्षित आणि आरामदायी वाहतूक देण्यासाठी ‘आयटी’ क्षेत्र काम करू शकते. या क्षेत्रात समस्या केंद्रित संशोधन करण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. आयटी सर्व क्षेत्रांना पूरक असून, त्याच्या साहाय्याने सर्वच क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधने होत आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी पकडले दोन टन गोमांस

$
0
0

पुणे : कोंढवा येथे विक्रीसाठी परंडा येथून दोन टन गोमांस घेऊन येणारा टेम्पो कोरेगाव पार्क परिसरात पकडण्यात आला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात टेम्पोचालक, टेम्पोचा क्लीनर, गोवंश कापणारा व गोमांस विकत घेणारा अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकचालक कलीमा अब्दुल कादर पालकर (वय ४२, रा. लोहियानगर, गंजपेठ), क्लीनर हाजी हारून शेख (वय ३०, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) या दोघांसह गायी कापणारा, विकत घेणारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे सदस्य शिवशंकर स्वामी (वय २३, रा. रिव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोचालक पालकर व क्लीनर हाजी शेख हे दोघे त्यांच्या टेम्पोमधून गोमांस घेऊन कोंढवा येथे विक्रीसाठी घेऊन येणार आहेत, अशी माहिती शिवशंकर स्वामी यांना मिळाली. त्यामुळे रविवार सकाळी सहापासून त्यांनी इतर काही साथीदारांसह चंदननगर येथे खराडी बायपासवर सापळा रचला. त्यांना हा टेम्पो दिसताच त्यांनी त्वरीत पोलिसांना माहिती देऊन टेम्पोचा पाठलाग सुरू केला. हा टेम्पो कोरेगाव पार्क येथे जर्मन बेकरीच्या जवळ पकडण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रो प्रकल्पाच्या निविदांना मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाच्या जागतिक निविदांना मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या देश-परदेशातील कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला, तरी तो आणखी वाढावा, या हेतूने आता या मेट्रो प्रकल्पाची मुदत १०मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.

शहरातील दोन मेट्रो मार्गांची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे होणार आहे. तर, शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गाचा विकास पीएमआरडीएमार्फत सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) तत्त्वावर केला जाणार आहे. त्यासाठी, गेल्या महिन्यात जागतिक निविदा काढण्यात आल्या होत्या. एक एप्रिलला या प्रकल्पामध्ये रस दाखविणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठकही पीएमआरडीएच्या कार्यालयात झाली होती.

या मेट्रो प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या जागतिक निविदेची मुदत आज, सोमवारी संपणार होती. परंतु, जागतिक स्तरावरील आणखी मोठ्या कंपन्यांकडून त्याला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याने त्याला तीन आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकल्प पीपीपी तत्त्वावर साकारला जाणार असल्याने विविध कंपन्यांना त्यामध्ये रस असून, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार, आता १० मे पर्यंत या मेट्रो प्रकल्पासाठी निविदा सादर करता येणार आहेत.

शिवाजीनगर ते हिंजवडी हा २३ किमीचा प्रकल्प संपूर्णतः उन्नत (एलिव्हेटेड) स्वरूपात असेल. या मार्गावर २३ स्टेशन असतील, तर संपूर्ण प्रकल्पाचा खर्च साधारणतः सात हजार कोटी रुपयांच्या दरम्यान असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरू निवडीमध्ये हस्तक्षेप नाही

$
0
0

डॉ. अनिल काकोडकर यांचे स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कुलगुरू निवडताना राजकीय हस्तक्षेप होणार नाही आणि होऊ देणार नाही,’ असे स्पष्ट मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि कुलगुरू शोध समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी रविवारी व्यक्त केले. त्यामुळे कुलगुरू निवडीबाबत सुरू असणाऱ्या विविध चर्चा थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्रातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर डॉ. काकोडकर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे हे येत्या १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे राज्यपाल आणि कुलपती यांनी नव्या कुलगुरूंची निवड करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. त्याच्या अध्यक्षपदी डॉ. काकोडकर आहेत. तसेच, समितीचे सदस्य म्हणून सिडकोचे उपाध्यक्ष भूषण गगराणी आणि मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. उदयकुमार यरागट्टी काम पाहत आहे.

डॉ. काकोडकर म्हणाले, ‘विद्यापीठाला उत्तम कुलगुरू द्यायचा आहे. त्यामुळे ज्या व्यक्तिंचे कुलगुरू पदासाठी अर्ज आले आहेत, अशांची योग्य तपासणी केली जात आहे. त्यामुळे प्रक्रियेला वेळ लागत आहे. प्रक्रिया सुरू असल्याने याबाबत अधिक माहिती देता येणार नाही. कुलगुरूपद मिळण्याबाबत माझी अद्याप कोणीही भेट घेतलेली नाही. विद्यापीठाचा कुलगुरू निवडताना राजकीय किंवा कोणत्याच प्रकारचा हस्तक्षेप होणार नाही आणि तो होऊ देणार नाही. प्रक्रिया लवकर पार पाडून विद्यापीठासाठी योग्य कुलगुरूची निवड करण्यात येईल. ही निवड १५ मे पूर्वी देखील होऊ शकते.’ दरम्यान, कुलगुरूपदासाठी आतापर्यंत सुमारे ५० ते ६० जणांनी अर्ज केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आईने मुलाला दिले मेणबत्तीने चटके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुलगा ऐकत नाही म्हणून उच्चशिक्षित असलेल्या सख्ख्या आईने आपल्या चार वर्षांच्या मुलाला मेणबत्ती व सुरी गरम करून चटके दिल्याचा प्रकार महंमदवाडी येथे घडला. नातू आजीकडे आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुलाची आजी डॉ. अर्चना रमाकांत सामंत (वय ६८, रा. पाषाण रोड) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून मुलाची आई (वय ३०, रा. महंमदवाडी) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या पाषाण रोडवर परिसरात राहण्यास आहेत. तर, त्यांचा मुलगा, आरोपी सून व चार वर्षांचा नातू महंमदवाडी परिसरात राहतात. मुलाच्या वडिलांचे एमबीएचे शिक्षण झाले असून ते खासगी कंपनीत नोकरी करतात. तर, आईही उच्चशिक्षित असून ती एका खासगी कंपनी नोकरी करत होती. पण, ती सध्या ती घरीच असते. त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. मुलगा ऐकत नसल्यामुळे तिने मुलास मेणबत्तीने दोन्ही पायाच्या पंजावर चटके दिले. तसेच, सुरी गरम करून डाव्या हाताच्या कोपरावर आणि पायाच्या नडगीवर चटके दिले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात कूपनलिकांचे सर्वेक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्याच्या कृषी विभागाने जिल्ह्यासाठी टंचाई आराखडा तयार केला असून, त्यासाठी जिल्ह्यातील कूपनलिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ४१८ कूपनलिका प्रस्तावित करण्यात आल्या असून, ३५१ कूपनलिका या वेगवेगळ्या कारणांमुळे अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे.

टंचाई आराखड्यानुसार जिल्ह्यातील कूपनलिकांचा ऑक्टोबर २०१६ ते जून २०१७ या कालावधीसाठी आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार ३४ गावे आणि ३८४ वस्त्यांमध्ये ४१८ कूपनलिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी सुमारे दोन कोटी नऊ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

कूपनलिकांच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात अवघ्या ६७ कूपनलिका या योग्य असल्याचे आढळून आले आहे. अन्य कूपनलिकांपैकी १४५ या भूजलदृष्ट्या अयोग्य आहेत. पुरेसे पाणी नसलेल्या १२१ आहेत. पाणी पिण्यासाठी योग्य नसलेल्या १९ कूपनलिका आहेत. ५८ कूपनलिकांच्या ठिकाणी लोकवस्ती नाही किंवा लोकसंख्या कमी असल्याचे​ आढळल्याचे कृषी विभागाच्या आराखड्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

भूजलदृष्ट्या अयोग्य असलेल्या १४५ कूपनलिकांमध्ये सर्वाधिक २९ या खेड तालुक्यामध्ये आहेत. त्यानंतर दौंडमध्ये १८, आंबेगाव १६, पुरंदरमध्ये १५, जुन्नरमध्ये १३, शिरुर आणि इंदापूरमध्ये प्रत्येकी दहा, मुळशीत नऊ, मावळमध्ये आठ, बारामती आणि भोरमध्ये प्रत्येकी​ पाच आणि वेल्ह्यामध्ये एक आहे.

पुरेसे पाणी नसलेल्या १२१ कूपनलिकांमध्ये सर्वाधिक १८ या बारामतीत आहेत. त्यानंतर आंबेगाव १७, खेड १६, दौंड १४, जुन्नर १२, पुरंदर आठ, मुळशी, इंदापूर आणि ​शिरुर प्रत्येकी सात आहेत. हवेलीत मात्र सर्व कूपनलिकांना पाणी असल्याचे आढळून आल्याचे अहवालात नमूद केले आहे. पाणी पिण्यास अयोग्य असलेल्या १९ कूपनलिका असून, सर्वाधिक शिरुरमध्ये आठ आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्यातून खुलले कमळाचे सौंदर्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कमळ ही केवळ फुलांची प्रजाती नव्हे, तर भावभावनांचा समुच्चय साधणारी निसर्गाची एक अद्भुत देणगी आहे. या विविधरंगी, विविधढंगी फुलाची शब्द-सूर आणि नृत्याच्या मिलाफातून उलगडण्यात आलेली अनोखी गाथा म्हणजे ‘पद्मिनी’ हा कार्यक्रम. बालशिक्षण सभागृहात रविवारी रंगलेल्या या कार्यक्रमाद्वारे एक वेगळी सांगीतिक सफर प्रेक्षकांना घडलीच; शिवाय या फुलाच्या असण्याचे महत्त्वही अधोरेखित झाले.

सृजनाचे स्रोत असलेल्या या देखण्या फुलाच्या प्रेमात पडलेल्या डॉ. प्रकाश जोगळेकर यांच्या संशोधनातून साकार झालेल्या ‘पद्मिनी’ या पुस्तकांवर आधारित हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाची संहिता डॉ. वंदना बोकील यांनी लिहिली होती. याच संहितेचे बोकील यांच्याबरोबर अक्षय वाटवेने रसपूर्ण वाचन केले.

एकीकडे जोगळेकरांनी कमळाच्या टिपलेल्या नजाकतींचा (छायाचित्रांचा) स्लाइड शो, तर दुसरीकडे प्रख्यात नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर यांच्या नृत्यातून फुलणारे कमळाचे भाव, त्याचे निराळे पैलू उलगडत गेले. कमळाचा पुराण, वेद, कालिदासीय साहित्य, संस्कृत श्लोक या साहित्यात असलेला प्रभाव तपशीलवार सांगून त्याच्या अधिकाधिक प्रेमात पडायला भाग पाडणाऱ्या संहितावाचनाने प्रेक्षक हरखून गेले होते.

स्वाती दैठणकर यांची ‘का आपला ठाव न संडिता आलिंगी जे चंद्रो प्रकटता’ ही रचना, तर त्यांची कन्या नुपूरने वसंत ऋतूत कमळामुळे येणारी बहार दाखवतानाची ‘अविरल कमल विकास सकळाली मदश्च’ ही सादर केलेली रचना मनाचा ठाव घेणारी होती. दैठणकर यांच्या शिष्यांनी ‘शशिनाच निशा निश्चयच शशी’, ‘किसलय करयी रतालाम करकमलयी कामना’, ‘शरदी कुसुम वायवो वांती’, ‘अनिल तरल’ या रचनांतून कमळाचे अंतर्बाह्य रूप दाखवत विलक्षण अनुभूती दिली. या संस्कृत श्लोकांना डॉ. धनंजय दैठणकर यांनी संगीतबद्ध केले होते, तर या गीतांना स्वरसाज चढवला होता प्रांजली बर्वे आणि सचिन इंगळे यांनी. ‘तुझिये निढळीं कोटी चंद्रप्रकाशे’, ‘कमोदिनी काम जाणे’ आणि ‘कोमलच्या स्कंधीं’ या भक्तिपर रचनांनी कार्यक्रमाचा उत्कर्षबिंदू गाठला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिलवानाचा झाला लेखक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खरं तर रांगड्या मातीतली कुस्ती आणि लेखन हे न जुळणारं समीकरण. पण गडकोट किल्ल्यांच्या मोहिमेत एका पहिलवानाला तीन दिवसांचा उपास घडला आणि त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. गडकोटांच्या भुयारांमध्ये, गुप्त मार्गांमध्ये या रांगड्या पठ्ठ्याला बहिर्जी नाईक सापडले आणि ‘बाजिंद’ या कादंबरीचा जन्म झाला. हा रांगडा गडी म्हणजे पै. गणेश मानगुडे. त्यांनी ‘बाजिंद’ कादंबरीद्वारे आपला लेखन प्रवास सुरू केला आहे.

‘मेहता पब्लिशिंग हाउस’तर्फे या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले असून ‘गप्पा बाजिंदकारांशी’ या कार्यक्रमात वाचकांनी मानगुडे यांच्याशी संवाद साधला. सोशल मीडियाद्वारे मानगुडे यांनी ‘बाजिंद’चा प्रवास सुरू केला. आता ही कादंबरी पुस्तकरूपाने वाचकांच्या भेटीला आली आहे. पाखरांची बोली टिपणारा नायक अशी ख्याती असलेल्या बहिर्जी नाईक यांच्या विलक्षण आयुष्याचा मागोवा या कादंबरीत मानगुडे यांनी घेतला आहे. या कादंबरीने इतिहासातल्या एका उपेक्षित व्यक्तिमत्वाला प्रकाशात आणले आहे, अशी मानगुडे यांची भावना आहे.

‘सांगली जिल्ह्यात किर्लोस्करवाडीत तांबड्या मातीतल्या कुस्तीचा आनंद घेत होतो. पण, बहिर्जी नाईकांप्रमाणे गुप्तहेरी करण्याची सुप्त इच्छा होती. शिवाय, गडकोटांच्या आवडीने सारखी भ्रमंती करत होतो. त्या वेळी नाईकांविषयी अधिक माहिती होत गेली. एका मोहिमेत तीन दिवस उपाशी राहिलो. मोहिमेतील सर्व जण रस्ता भटकून एका धनगरवाड्यात पोहोचलो. तिथेच ‘बाजिंद’ची बिजं रुजली आणि मी पहिलवानाचा लेखक झालो,’ अशी भावना मानुगडे यांनी व्यक्त केली. ‘कुस्तीचा प्रचार करीत असताना नोकरीही करावी लागत होती. ‘बाजिंद’ कादंबरी सोशल मीडियावर प्रसारित व्हायला लागल्यावर वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येऊ लागल्या.’ अहोरात्र जागून कादंबरी पूर्ण केल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात मृदुला देव यांनी पुस्तकाचे अभिवाचन केले. तर, अंजली भावे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपीला पर्याय द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाला जकात नाक्याच्या जागा त्वरित मिळाव्यात, अनधिकृत जाहिरातींमुळे होणारे पीएमपीचे नुकसान व विद्रुपीकरण थांबवावे, ज्येष्ठ महिलांकरिता स्वतंत्र बसण्याची राखीव जागा असावी, बीआरटी गार्डला कारवाईचे अधिकार असावे आणि पीएमपी सक्षम सेवा देत नसल्यास दुसरी पर्यायी व्यवस्था सरकारने पुणेकरांना द्यावी, अशा अनेक सूचना आणि तक्रारींचा पाऊस पीएमपी प्रवासी मंचाच्या मेळाव्यात शनिवारी पडला.

पीएमपी प्रवासी मंचातर्फे नवी पेठेतील इंद्रधनुष्य सभागृह येथे आयोजित मासिक प्रवासी मेळाव्यामध्ये पीएमपीकडे सर्वाधिक सूचना व तक्रारी नोंदविणाऱ्या सजग सक्रिय बस प्रवाशांचा विशेष सन्मान महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, विवेक वेलणकर, सतिश चितळे, संजय शितोळे आदी उपस्थित होते. मंचातर्फे सर्वाधिक तक्रारी नोंदविणाऱ्या प्रवाशांना प्रोत्साहनपर मासिक, साप्ताहिक, दैनिक पास देण्यात आले. यामध्ये एका महिन्यात २५पेक्षा जास्त तक्रारी देणाऱ्यांना एक दिवसाचा पास, ७५पेक्षा जास्त तक्रारींकरीता एक आठवड्याचा पास आणि १५०पेक्षा जास्त तक्रारी करणाऱ्यांना मासिक पास देण्यात आला. सु. बा. फडके, यतिश देवाडिगा, जयदीप साठे, शेखर कुलकर्णी, अशोक बराटे, सादिक शेख, आशा शिंदे यांना हे पास देण्यात आले.

सार्वजनिक वाहतुकीसारख्या नागरी सुविधा प्रभावीपणे राबविणे हे राज्यकर्त्यांचे आणि प्रशासनाचे कर्तव्य आहे. गेली अनेक वर्षे आपण पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयी बोलत आहोत. मात्र, आता यापूर्वी काय झाले, यापेक्षा पुढे काम करण्यावर आम्ही भर देणार आहोत. मुंबईपेक्षा पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्यांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. याला राज्यकर्ते जबाबदार असून यापुढे राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती आणि प्रवाशांचे बळ एकत्रित येऊन पीएमपीला सक्षम करेल, असे आश्वासन मोहोळ यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधर्वच्या विद्यार्थ्यांना गुण मिळणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहावीच्या निकालात कलेसाठी अतिरिक्त गुण देण्याचे सरकारने ठरविले असले, तरी त्यासाठी निवडलेल्या कलाविषयक संस्थांमध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे नाव राहून गेले आहे. मंडळाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. संस्थांच्या नोंदणींची प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी मंडळाचे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यांनी संगीतप्रचार प्रसार कार्यासाठी गांधर्व महाविद्यालय मंडळ स्थापन केले. राज्यभरात संगीत शिकणारे विद्यार्थी मंडळाची परीक्षा देतात. दहावीच्या परीक्षेच्या निकालात यंदाच्या वर्षापासून शास्त्रीय संगीत, चित्रकला व लोककला या कलेसाठी अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत. त्यानुसार २५ जानेवारीपर्यंत संस्थांना नाव नोंदविण्याची मुदत दिली होती. १० वर्षांपेक्षा अधिक काळ नोंदणी असलेल्या व गेल्या तीन वर्षातील आर्थिक व्यवहार पूर्ण असलेल्या संस्थांनाच यामध्ये स्थान देण्यात येणार होते. निवडलेल्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र बोर्डाकडे जमा झाल्यानंतरच वाढीव गुण देण्यात येणार आहेत.

सरकारच्या अध्यादेशात शास्त्रीय गायन, वाद्य, नृत्य अशा शास्त्रीय संगीतातील १९, तर लोककला प्रकारातील २९ संस्थांची नावे देण्यात आली आहेत. यामध्ये वाशीच्या मंडळाचे नाव नसल्याचे लक्षात आल्यानंतर संस्थेच्या पातळीवर तसेच सरकारच्या पातळीवर चांगलाच गोंधळ उडाला. त्यानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या पुणे विभागाकडे अर्ज केल्यानंतर तो पुढे पाठविण्यात आला आहे. तसेच, मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर भांडारे, सचिव पांडुरंग मुखडे, आचार्य डॉ. विकास कशाळकर यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या शिष्टमंडळाने नुकतीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात एक निवेदन सादर केले. हा प्रस्ताव मान्य केल्याने मंडळाच्या विद्यार्थ्यांना गुण मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गायन, वादन करणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना २ टक्के गुण दिले जायचे. त्यासाठी संस्थेची पूर्वीपासून नोंदणी आहे. नवीन नियमात हीच नोंदणी ग्राह्य धरली जाईल, म्हणून आम्ही पुन्हा नोंदणी केली नाही; पण यादीत नाव नसल्याचे समोर आल्यानंतर अर्ज केला असून शिक्षणमंत्र्यांनाही निवेदन दिले आहे. आमची मागणी मान्य झाली आहे.

- प्रभाकर भांडारे,

अध्यक्ष, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ

अतिरिक्त गुणांसाठी राज्यभरातील संस्थांची नोंदणी करण्याचे काम पुणे विभागाकडे होते. प्राप्त अर्जांमध्ये मंडळाचे नाव नसल्याने अध्यादेशात ते प्रसिद्ध झाले नाही. संस्थेचा अर्ज प्राप्त झाला असून तो मंजूर करण्यात आला आहे. इतर संस्थांप्रमाणे या मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जातील.

-अमिता तळेकर,

सहायक संचालिका, सांस्कृतिक संचालनालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधनातून ‘प्रॉडक्ट’ नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आपल्या देशात विविध विषयांवर संशोधन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, या संशोधनाचे रूपांतर प्रत्यक्ष प्रकल्पात अथवा उत्पादनामध्ये होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असून देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ही गंभीर बाब आहे,’ असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर आपल्या देशात संकल्पनेचा ‘इनोव्हेशन टू प्रॉडक्ट’ प्रवास होण्यासाठी पोषक वातावरण आणि नागरिकांचा ‘माइंडसेट’ नाही, असेही काकोडकर यांनी सांगितले.

‘भारतीय विद्या भवन’च्या मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रात रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त उभारण्यात येणाऱ्या ‘इनोव्हेशन हब’चे भूमिपूजन काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. भवनचे प्रमुख डॉ. पी.आर. दुभाषी, भारतीय अंतराळ संशोधन केंद्राच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे माजी संचालक डॉ. प्रमोद काळे, उद्योगपती अरुण फिरोदिया, केंद्राचे संचालक अनंत भिडे उपस्थित होते.

डॉ. काकोडकर म्हणाले, ‘केंद्र सरकारतर्फे देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. हा खर्च जगातील कित्येक देशांच्या तुलनेत अधिक आहे. मात्र, त्या प्रमाणात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. या क्षेत्रासोबतच इतर क्षेत्रांतही संशोधन मोठ्या प्रमाणावर होते. परंतु, संशोधनाचे रूपांतर प्रत्यक्ष उत्पादनामध्ये होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ही देशाच्या अर्थव्यवस्थेच्यादृष्टीने गंभीर बाब आहे. देशात इनोव्हेशन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असली, तरी त्यातून नागरिकांना उपयोगी पडणारे एखादेच उत्पादन निर्माण होते. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडविणारे अधिकाधिक प्रकल्प किंवा उत्पादन तयार झाले पाहिजे. त्यासाठी भरपूर जणांनी प्रयत्न करायला हवेत.’

फिरोदिया म्हणाले, ‘आपल्या देशात विविध क्षेत्रांत नावीन्यपूर्ण संशोधन मोठ्या प्रमाणात होतात. मात्र, प्रत्यक्षात त्या संकल्पनेतून नागरी समस्यांचे उपाय शोधता येईल का, किंवा समाजातील नागरिकांना त्यांचा फायदा होईल का, हेदेखील पाहणे गरजेचे आहे. देशात प्रत्येक क्षेत्रात मोठ्या समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी संशोधन होण्याची आवश्यकता आहे. या समस्यांवर संशोधन झाल्यास नागरिकांना फायदा होऊन देशाच्या उभारणीला हातभार लागेल.’ दरम्यान, देशाचा विकास हा केवळ ‘आयटी’ आणि ‘ऑटोमोबाइल’ उद्योगामुळे देशाचा विकास होतो, असे म्हणता येणार नाही. देशाच्या विकासात सर्वच क्षेत्राचा हातभार लागतो, असेही फिरोदिया यांनी सांगितले.

डॉ. काळे म्हणाले, ‘देशाच्या उभारणीत विविध प्रकारच्या प्रयोगशाळा महत्त्वाच्या भूमिका बजावतात. मात्र, केवळ एका ठिकाणी ही प्रयोगशाळा उभारून हे शक्य होणार नाही. त्यासाठी येत्या काळात देशभरात ५०० प्रयोगशाळा उभाराव्या लागतील आणि दर वर्षी या प्रयोगशाळांमधून १० लाख विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण प्रयोग आणि संशोधन करून शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत शाळा आणि कॉलेजांमध्ये प्रयोगशाळांची संख्या कमी होत आहे. ही गंभीर समस्या असून त्यावर मात करण्याची आवश्यकता आहे. असे झाल्यास प्रयोगशाळा देशाच्या विकासाचे साधन होईल.’ दुभाषी यांनी मार्गदर्शन केले. भिडे यांनी प्रास्ताविकातून ‘इनोव्हेशन हब’ची माहिती सांगितली.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आणि संशोधनाची वृत्ती रुजवण्यासाठी उद्यानांप्रमाणेच परिसरात लहान वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारण्याची आवश्यकता आहे. अशा प्रयोगशाळा उभारल्यास तेथे विद्यार्थी आनंदाने हसत-खेळत शिक्षण घेतील.

- डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ससूनच्या धर्तीवर राज्यात प्रकल्प राबवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ससून हॉस्पिटलमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारलेला नवजात अर्भक अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील इतर सरकारी मेडिकल कॉलेजांमध्ये असे प्रकल्प राबविण्याची सूचना सर्व अधिष्ठातांना देण्यात येतील, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी सांगितले.

फिनोलेक्‍स प्रायव्हेट लिमिटेडशी संलग्न मुकुल माधव फाउंडेशन, श्रीमंत गणपती हलवाई गणपती ट्रस्ट, कमिन्स इंडिया, सिसका एलईडी, सुझलॉन एनर्जी, या कंपन्यांनी दिलेल्या देणगीतून ससून हॉस्पिटलमध्ये ‘एनआयसीयू’ उभारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण महाजन यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, मुकूल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक रितू छाब्रिया, फिनोलेक्स उद्योगाचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया, बी. जे. मेकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे या वेळी उपस्थित होते. या प्रकल्पासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला.

‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी (सीएसआर) अंतर्गत आरोग्य क्षेत्रासाठी निधी द्यावा, त्यातून सामान्य पेशंटना सरकारी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुविधा मिळू शकतात. तसेच, समाजातील दानशूर व्यक्तींनी आरोग्य सेवेला मदत करण्यासाठी प्राधान्य द्यावे,’ असे आवाहन महाजन यांनी कले. ‘‘ससून पॅटर्न’ राज्यभरात सर्वत्र वापरला पाहिजे. येथे गरीब पेशंटला केंद्रबिंदू मानून डॉक्टर सेवा देतात,’ असे बापट म्हणाले. ‘ससून हॉस्पिटल कार्यपद्धतीवर टीका करताना सकारात्मक बाबी समोर आणण्याचा अभ्यागत मंडळाच्या माध्यमातून नेहमीच उद्देश राहिला आहे,’ असे शिरोळे यांनी सांगितले. ‘मध्यमवर्गीयांसाठी सेवा सक्षम करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. येथे येणाऱ्या पेशंटला चांगल्या सेवा देणे हा उद्देश आहे,’ असे डॉ. चंदनवाले म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सूर्यवंशी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपी अधिकारीही रात्रसेवेला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) मालकीच्या किमान ८५० बस येत्या ३० एप्रिलपर्यंत दररोज प्रवाशांच्या सेवेसाठी मार्गावर आणण्याचे उद्दिष्ट पीएमपी प्रशासनाने ठेवले आहे. त्यामुळे डेपोमधील कर्मचाऱ्यांना रात्रपाळीचे आदेश दिल्यानंतर अधिकाऱ्यांनीही रात्री डेपोंमध्ये हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.

महाव्यवस्थापक, वाहतूक व्यवस्थापक, मुख्य अभियंता, कामगार अभियंता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभाग व्यवस्थापक यांनी आठवड्यातून एकदा आणि डेपो मॅनेजर व यांत्रिकी अभियत्याने किमान दोन वेळा डेपोंना रात्री ११ ते १ या दरम्यान भेट देऊन कामाचा आढावा घ्यावा, अशी सूचना त्यांना देण्यात आली आहे.

पीएमपीच्या मालकीच्या व कंत्राटी बस अशा एकूण सरासरी १५०० बस दररोज संचलनात असतात. यामध्ये कंत्राटी बसचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने १६ ते ३० एप्रिल दरम्यान विशेष मोहीम हाती घेतली आहे. या काळात पीएमपीच्या मालकीच्या किमान ८५० बस मार्गावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नव्याने केलेल्या रात्रपाळीच्या कामाचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना पीएमपीच्या अध्यक्षांना सादर करावा लागणार आहे. तसेच सर्व डेपो मॅनेजर, डेपो इंजिनीअर यानी डेपोत रात्रपाळी आठ ते चार किंवा १० ते ६ या वेळेत करावी आणि बसेसची देखभाल दुरुस्ती करून जास्तीत जास्त गाड्या मार्गस्थ कराव्यात, असा आदेश दिला आहे.

बसवर बोर्ड नसेल, तर कारवाई

बसला दोन्ही बाजूस मार्गांचे बोर्ड, लाइट नसतील, बोर्ड खराब असेल आणि बोर्डवर मार्ग लिहिलेला नसल्यास संबंधित बसच्या ड्रायव्हर व कंडक्टरवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे. तसेच, संबंधित गाडीच्या डेपो मॅनेजर व यांत्रिकी अभियंत्यालाही यासाठी जबाबबदार धरले जाणार आहे. त्यामुळे आता ड्रायव्हर, कंडक्टरला बस मार्गांच्या बोर्डसाठी आग्रही असावे लागणार आहे.

पीएमपीला डिझेल पुरवठा करताना त्यामध्ये मागणीपेक्षा कमी डिझेल देणाऱ्या ‘रिलायन्स’ कंपनीकडून डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. ‘रिलायन्स’ बरोबर झालेला करार रद्द करण्याची नोटीस स्पीड पोस्ट आणि ई-मेलने कंपनीच्या मुंबईतील कार्यालयास पाठवण्यात आली आहे. रिलायन्सकडून वर्षभरात तब्बल १०० कोटींचे डिझेल खरेदी केले जाते. मात्र, गेल्या आठवड्यात पुरवठा करणाऱ्या डिझेल टँकर मध्ये तब्बल ७८० लीटर डिझेल कमी आल्याची बाब उघडकीस आली. या प्रकाराची दखल घेत पीएमपीएल प्रशासनाने १४ मे पर्यंतच कंपनीकडून डिझेल खरेदी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे, अशी माहिती पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईस्टर संडेनिमित्त प्रार्थना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ख्रिश्चन बांधवांचा पवित्र सप्ताह आणि चाळीस दिवसांच्या उपवासाची सांगता ईस्टर संडेच्या प्रार्थनेने रविवारी झाली. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान दिवसानिमित्त कॅथलिक आणि प्रोटेस्टंट अशा दोन्ही संप्रदायांच्या चर्चमध्ये धर्मगुरूंच्या उपस्थितीत ख्रिश्चन बांधवांनी विशेष प्रार्थना केली.

‘ईस्टर संडे’ची सुरुवात पहाटे काढलेल्या पुनरुत्थान दिंड्यांनी झाली. पहाटे चार वाजता दिंड्या सुरू झाल्या आणि सकाळी सहाच्या सुमारास सांगता झाली. संगीत महाविधीनंतर धर्मगुरूंनी भाकरी आणि द्राक्षाच्या रसाचे वाटप केले. त्यासाठी भक्तांनी चर्चमध्ये गर्दी केली होती. दोन्ही संप्रदायांमध्ये हा विधी परंपरेनुसार माध्यान्हापूर्वी पार पडला.

शहरातील ‘चर्च ऑफ द होली नेम’ (कॅथड्रल), सीएनआय, ब्रदर देशपांडे चर्च, ईमॅन्युअल चर्च, होली एंजल्स चर्च, सेंट मेरी चर्च, सेंट मॅथ्यूज चर्च, सेंट पॉल चर्च, ऑल्ड डॅम मेथडीस मराठी चर्च, ख्राइस्ट चर्च, सेंट झेवियर्स चर्च, सिक्रेट हार्ट अशा विविध चर्चमध्ये धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात हा धार्मिक कार्यक्रम पार पडला.

बिशप शरद गायकवाड यांनी सकाळी खडकीतील सेंट मेरी चर्च खडकी, दुपारी गंजपेठेतील ईमॅन्युअल चर्च आणि संध्याकाळी ब्रदर देशपांडे चर्च, कसबा पेठ या ठिकाणी सहभाग घेतला. रेव्हरंड अनिल इनामदार, सुधीर गायकवाड, अजित फरांदे, सुधीर पारकर आदी धर्मगुरूंनी धार्मिक विधीमध्ये सहभाग घेतला.

गुडफ्रायडेपासून चाळीस दिवसांपूर्वी येणाऱ्या राखेच्या बुधवारपासून उपवासाची सुरुवात होते. काही जण सलग चाळीस दिवस, तर काही जण बुधवार आणि शुक्रवार उपवास करतात. या कालावधीत मांसाहार पूर्ण वर्ज्य असतो. या दिवसाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात बाप्तिस्मा आणि दृढीकरण विधी करण्यात येतो, असे ‘चर्च ऑफ होली नेम’चे सहसचिव सुधीर चांदेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची नवी रणनीती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेत बहुमत असूनही विरोधकांकडून केले जाणारे हल्ले परतवण्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष कमकुवत ठरत असल्याचे गेल्या महिन्याभरात वारंवार समोर आले आहे. त्यामुळे, आता विरोधकांच्या आरोपांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांची फळी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या दृष्टीने, प्राथमिक चाचपणी केली जात असून, इतर पक्षांतून प्रवेश देण्यात आलेल्या नगरसेवकांनाही ‘कार्यरत’ होण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल ९८ नगरसेवकांसह भाजपला एकहाती सत्ता मिळाली. त्यानंतर आत्तापर्यंत झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये विरोधकांच्या हल्ल्यापुढे सत्ताधारी भाजप निष्प्रभ झाल्याचे चित्र दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या पालिकेतील आंदोलनाला शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ मिळत आहे. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, मनसेचे गटनेते वसंत मोरे, माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे अशा विरोधकांच्या फौजेपुढे भाजपकडे वक्तृत्वशैली असणाऱ्या नगरसेवकांचा अभाव दिसून येत आहे. विरोधकांकडून होणारा हल्ला परतवून लावण्याची जबाबदारी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह दोन-तीन नगरसेवकांवरच असल्याचे दिसून येत आहे. यामुळे, सत्ताधारी असूनही भाजप ‘बॅकफूट’वर गेल्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने ती बदलण्याकरिता पक्षाने रणनीती आखली आहे.

महापौर बंगल्यावर पक्षाच्या वरिष्ठ नगरसेवकांची बैठक शनिवारी झाली. या बैठकीमध्ये विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे समजते. पालिकेतील दोन-तीन टर्मचा अनुभव असलेल्या पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांनी विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विरोधी पक्षांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या मुद्द्यांवर तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्यात यावे, त्यांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी केंद्र-राज्यातील सरकारकडून सुरू असलेल्या कामांचे दाखले द्यावे, असे सल्ले देण्यात आले आहेत. ज्येष्ठ-अनुभवी नगरसेवकांनी त्यामध्ये पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्याशिवाय, इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलेल्या नगरसेवकांनाही ‘कार्यरत’ होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा व्हावा, यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत.


स्वीकृत सदस्य निवडीसाठी हालचाली

येत्या आठवड्यात स्वीकृत सदस्य निवडीसाठी पक्षाकडून तीन सदस्यांची नावे द्यावी लागणार आहेत. त्या दृष्टीने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची रविवारी बैठक झाली. पालकमंत्री, शहराध्यक्ष यांच्यासह शहरातील दोन खासदारांमध्ये या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली आहे. स्वीकृत सदस्य म्हणून पक्षातील ज्येष्ठ सदस्यांना संधी दिली जाणार, की नवीन चेहऱ्यांना पसंती मिळणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे. दोन ज्येष्ठ सदस्य आणि एका नव्या चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांच्या मालकीचा चेंडू सरकारच्या कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्ग आणि तीन राज्य महामार्गांची देखभाल-दुरुस्ती पुणे महापालिकेतर्फे करण्यात येत असल्याचे स्पष्ट करून, त्या संदर्भातील पुढील कार्यवाही सरकारने करावी, अशी विनंती करून, रस्त्यांच्या मालकीचा चेंडू सरकारच्या कोर्टात टोलावण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार एक एप्रिलपासून राष्ट्रीय-राज्य महामार्गांपासून पाचशे मीटर अंतरावर दारू विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. शहराच्या हद्दीतून दोन राष्ट्रीय महामार्ग आणि तीन राज्य महामार्ग जातात. या महामार्गांच्या परिसरात तब्बल सोळाशे दारूची दुकाने असून, त्यातील साडेचारशे दुकाने शहराच्या मध्यवर्ती भागांतून जाणाऱ्या महामार्गांलगत येतात. त्यामुळे, या रस्त्यांची मालकी नेमकी कोणाची, यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गांची दुरुस्ती पालिकेमार्फत केली जात असल्याने त्याची मालकी कोणाची, असे पत्र उत्पादन शुल्क विभागाने पालिकेला पाठवले होते. तर, सार्वजनिक बांधकाम विभागाने हे रस्ते महापालिकेला हस्तांतरित केल्याची भूमिका मांडली होती. तसेच, नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे विचारणा केली होती.

पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नगरविकास विभागाला पत्र पाठवून, या महामार्गांची देखभाल-दुरुस्तीची कामे पालिकेकडे केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या रस्त्यांच्या मालकीबाबत त्यामध्ये कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. सरकारने याबाबत पुढील कार्यवाही करावी, असे सूचित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images