Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘चित्रपटानंतर मुलांशी चर्चा करा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘नाटक आणि चित्रपट यात नेमका काय फरक आहे? चित्रपट म्हणजे केवळ दृश्यचित्र किंवा पडद्यावरील हालचाल नाही. चित्रटपटातली कुठली फ्रेम तुला आवडली, कुठला संवाद आवडला, कुठले पाश्वसंगीत आवडले, हे सर्व नसते तर काय झाले असते, असे प्रश्न मुलांसमोर ठेवा. पालकांनो चित्रपट पाहिल्यानंतर मुलांशी चर्चा करा...’, असे सांगून बालसाहित्यिकार राजीव तांबे यांनी शुक्रवारी पालकांसह मुलांना चित्रपट रसास्वादाचे धडे दिले. निमित्त होते, संवाद पुणे आणि कावरे आइस्क्रीम यांच्यातर्फे विजय टॉकीज येथे आयोजित बालचित्रपट महोत्सावाचे!

महोत्सवाचे उद्घाटन तांबे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संचालिका निकिता मोघे, कावरे आइस्क्रीमचे प्रमुख राजू कावरे, विजयचे व्यवस्थापक नारायण मोकाशी, कवी अरुण शेवते व ‘संवाद’चे सुनील महाजन उपस्थित होते. महोत्सवाचे २२ वे वर्ष असून, उद्घाटनानंतर बच्चे कंपनीने ‘बालशिवाजी’ या चित्रपटाचा आणि आइस्क्रीमचा आस्वाद घेतला.

‘नाटक आणि चित्रपट या दोन्ही कलांच्या निर्मितीमधील दिग्दर्शक, संगीतकार, अभिनेते या सगळ्यांच्या भूमिका काय असतात, याची जाणीव मुलांमध्ये निर्माण केली पाहिजे,’ याकडे लक्ष वेधून तांबे म्हणाले, ‘मुलांना चांगला पर्याय उपलब्ध नसल्याने ते नको ती कार्टून्स पाहतात. त्यांना अस्सल काय आहे, हे सांगण्यासाठी असे चित्रपट दाखवले पाहिजे. चित्रपटानंतर त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या पाहिजेत. चित्रपट महोत्सावांच्या माध्यमातून त्यांची चांगली अभिरुची विकसित झाली तर ते दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी हट्ट करतील. महिन्यातील किमान दोन रविवार ठरवून मुलांना चांगले चित्रपट दाखवले पाहिजे. मराठी चित्रपटांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील चांगले चित्रपट आपण त्यांना दाखविले पाहिजे.’ महोत्सवात आज, शनिवारी सकाळी १०.३० वाजता ‘चार्ली चॅपलिन’ हा इंग्रजी चित्रपट हिंदी सबटायटलसह तसेच रविवारी ‘श्यामची आई’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समाविष्ट गावांतील निवडणूक रद्द करा’

0
0

पुणे : पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट होणाऱ्या गावांमधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी हवेली तालुका नागरी कृती समितीने मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ही गावे पालिकेत समाविष्ट करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्याबाबत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल असल्याने तूर्तास या गावांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येऊ नये, असा आग्रह त्यांनी धरला आहे.
महापालिका हद्दीलगतच्या ३४ गावांचा पालिकेत समावेश करण्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे, त्यापैकी १९ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक घेण्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. गावांच्या समावेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, या गावांमध्ये निवडणूक झाल्यास सरकारचा वेळ आणि पैसा खर्च होणार असल्याचा दावा कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी केला. मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, अद्याप अंतिम कार्यक्रम निश्चित झाला नसल्याने तातडीने ही प्रक्रिया स्थगित ठेवण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कृती समितीच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना शुक्रवारी दिले. चव्हाण पाटील यांच्यासह समितीचे बाळासाहेब हगवणे, राजाभाऊ रायकर, पोपट खेडकर, संदीप तुपे, संतोष ताठे, सुभाष नाणेकर या वेळी उपस्थित होते.
महापालिका हद्दीलगतची ३४ गावे पालिकेत समाविष्ट करण्याची अधिसूचना सरकारने २०१४ मध्ये काढली होती. त्यावर हरकती-सूचना मागवत त्याचा सविस्तर अहवाल विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला सादर केला आहे. सरकारकडून त्यावर निर्णय घेतला जात नसल्याने कृती समितीसह स्थानिक ग्रामस्थांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने तीन महिन्यांत गावांच्या समावेशाबाबत निर्णय घेण्याच्या सूचना सरकारला केल्या होत्या. महापालिका निवडणुकांमुळे सरकारने तेव्हाही त्यावर कोणताच निर्णय घेतला नाही. आता पुढील आठवड्यात पुन्हा हायकोर्टात सुनावणी होणार असून, सरकारच्या भूमिकेकडे या सर्व गावांमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपीवर हरकतींसाठी आज अखेरचा दिवस

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात (डीपी) सरकारने केलेल्या बदलांवर हरकती-सूचना नोंदविण्याची मुदत आज, शनिवारी संपणार असून, त्याला मुदतवाढ मिळण्याची शक्यता धूसर आहे. डीपीच्या काही ठराविक भागांमध्ये बदल केला गेल्याने त्यावरील हरकतींसाठी दिलेली मुदत पुरेशी असल्याचा दावा नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.
राज्य सरकारने जानेवारीमध्ये शहराच्या प्रलंबित डीपीला मान्यता दिली. ही मान्यता देताना, त्रिसदस्यीय समितीने उठवलेली आरक्षणे सरकारने पुनर्स्थापित केली. त्यामुळे मूळ आराखड्यात १० टक्क्यांपेक्षा अधिक बदल झाल्याने पुन्हा हरकती-सूचना मागविण्यासाठी गेल्या महिन्यात नकाशे प्रसिद्ध करण्यात आले. हे नकाशे अस्पष्ट असून, त्यावरून नेमक्या कोणत्या आरक्षणांमध्ये बदल झाले हे समजत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. परंतु, डीपीच्या काही भागांमध्येच बदल झाल्याने एक महिन्याची मुदत पुरेशी असल्याचे निरीक्षण नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांनी नोंदवले.
डीपीवरील सर्व हरकती नगररचना विभागाकडे नोंदवल्या जात असून, साधारणतः अडीचशे हरकती दाखल झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीमा नदीत कार पडून चार दगावले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे भीमा नदीत कार पडून झालेल्या अपघातामध्ये चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश असून या घटनेमुळे मांडवगण व सादलगावात शोककळा पसरली आहे.
नंदा दीपक गायकवाड (रा. मांडवगण फराटा, ता.शिरूर), नवनाथ हरीभाऊ पवार, प्रतिभा नवनाथ पवार आणि आबा प्रल्हाद जठार (तिघे रा. गणपती माळ, सादलगाव ता. शिरूर) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडवगण फराटा येथे भीमा नदीवर कोल्हापूर बंधारा आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास स्विफ्ट कार क्रमांक एम एच १२ एल डी ६७२६ ही नानगाव येथून मांडवगण फराटा दिशेने या बंधाऱ्यावरून येत होती. त्या वेळी चालकाचे अचानक नियंत्रण सुटून कार भीमा नदीच्या पाण्यात पडली. नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर तत्काळ पोलिसांना फोन केला. तसेच, स्थानिक तरुणांनी क्रेनच्या साह्याने कार नदीच्या बाहेर काढली. त्या वेळी कारमधील चारही प्रवासी कारमध्येच मृतावस्थेत आढळून आले. कार पडल्याचे दिसले, तरी नदीवर पसरलेल्या जलपर्णीमुळे त्यातील प्रवाशांना वाचविण्यासाठी नागरिकांना काहीच करता आले नाही. क्रेनच्या मदतीने अखेर कार बाहेर काढण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा डेपोला मोठी आग

0
0

पुणे : उरुळी देवाची-फुरसुंगी येथील महापालिकेच्या कचरा डेपोला शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मोठी आग लागली. रात्री उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
शहर आणि परिसरात सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महापालिकेच्या विविध प्रकल्पांतून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असली, तरी सुका कचरा आणि विविध प्रकल्पातील ‘रिजेक्ट’ उरुळी-फुरसुंगी येथेच टाकण्यात येते. शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास डेपोच्या एका बाजूला मोठी आग लागल्याचे लक्षात आले. पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाला तातडीने त्याची माहिती मिळताच, सुमारे चार ते पाच गाड्या आणि वीसहून अधिक कर्मचारी अल्पावधीत कचरा डेपोच्या ठिकाणी दाखल झाले. पहाटेपासून ही आग धुमसत असून, ती आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुका कचऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत आहेत. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी धडपड सुरू होती.
महापालिकेने कचरा डेपोच्या जागेवर कॅपिंग सुरू केल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी मोठ्या स्वरूपाची आग लागल्याचे सांगितले जात आहे. तरीही, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हमी कालावधीनंतरच कामे?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चांगला रस्ता खोदून त्याच्यावर डांबरीकरण करणे, नवीन फूटपाथ तोडणे, डिव्हायडर बदलणे, अधिक आकर्षक डिझाइनसाठी इलेक्ट्रिक पोल बदलण्यात येत असल्याच्या घटना शहरात नेहमीच घडतात. पालिकेच्या पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी गुणवत्ता हमी कालावधी संपत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी नव्याने काम करू नये, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली आहे.
कुठलीही कामे करण्यापूर्वी त्या कामांच्या गुणवत्ता हमी कालावधीची चौकशी केल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घ्यावा. यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे, राष्ट्रवादीच्या प्रिया गदादे, दिलीप बराटे आणि शिवसेनेचे प्रमोद भानगिरे यांनी हा प्रस्ताव स्थायीपुढे ठेवला आहे.
गत अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली विकास कामे जी गुणवत्ता हमी कालावधीत असूनही खराब झालेली आहेत, अशी कामे संबंधित ठेकेदारांकडून दुरुस्त करून घ्यावीत आणि येत्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पाद्वारे करण्यात येणारी विकास कामांचा यापूर्वीचा गुणवत्ता हमी कालावधी संपला नाही, याची दक्षता विभागाने खात्री करावी, असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
ठेकेदारांकडून विकासकामे करताना गुणवत्ता हमी कालावधी निश्चित करण्यात येतो. खड्डे नसलेला रस्ता असो की फूटपाथ, मान​नीयांना वाटते म्हणून नव्याने डांबरीकरण करण्यात येत असल्याचे चित्र वारंवार पाहावयास मिळते. अनेकदा तर गुणवत्ता हमी कालावधी संपला नसतानाही विकास कामे करण्यात येतात. या प्रकारांमुळे पालिकेच्या पैशांचा अपव्यय होतो; तसेच ज्या ठिकाणी विकासकामांची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी पुरेसा निधी मिळत नाही. उपनगरांमध्ये विकास कामांसाठी निधीची आवश्यकता आहे.
पालिकेच्या विविध विभागांमार्फत मोठ्या प्रमाणात कामे होत असतात. विकासकामे करताना ठेकेदारांकडून गुणवत्ता हमी कालावधीच्या निर्णयानुसार सुरक्षा अनामत रकमाही घेण्यात येतात तसेच हा कालावधी संपत नाही तोपर्यंत त्या रकमा रोखून ठेवण्यात येतात. यापुढे विकासकाम करताना त्या ठिकाणी यापूर्वी करण्यात आलेल्या विकास कामाचा गुणवत्ता हमी कालावधी संपला असल्याची खात्री करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.

अनेकदा चुकीच्या प्रकारे विकासकामे केली जातात. एखादा रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून त्याचे डांबरीकरण करण्यात येते आणि वर्षभरातच या रस्त्यावर काँक्रिटीकरणाचा घाट घातला जातो. एकप्रकारे पालिकेच्या पैशांची ही उधळपट्टी आहे. गुणवत्ता हमी कालावधीतील कामे खराब झाली असतील तर पालिका त्यावर डागडुजीचा खर्च करते. खरे तर ही डागडुजी संबंधित ठेकेदाराने करणे अपेक्षित आहे. हे सर्व रोखण्यासाठी हा प्रस्ताव दिला आहे.
- अविनाश बागवे,
स्थायी समिती सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकतींची सवलत रद्द?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या हद्दीतील निवासी मिळकतींना करपात्र रकमेवर दिली जाणारी ४० टक्क्यांची सवलत मागे घेण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनीसादर केला असून, देखभाल-दुरुस्तीसाठीच्या सवलतीमध्येही कपात करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी या सवलती कमी करण्याचा दावा केला जात असला, तरी त्यामुळे हजारो पुणेकरांवर बोजा वाढणार आहे.महापालिकेच्या हद्दीत साडेआठ लाख मिळकती असून, या करपात्र रकमेवर संबंधित मिळकतींचा कर निश्चित केला जातो. मूळ घरमालक स्वतः राहण्यासाठी या जागेचा वापर करत असल्यास त्यालाकरपात्र रकमेवर ४० टक्के सवलत दिली जाते. स्वाभाविकच, मिळकतकरधारकाची कर आकारणी कमी होते. हीच मिळकत भाड्याने दिली गेली असेल, तर शंभर टक्के कर आकारणी केली जाते. परंतु, आता ही सवलतच मागे घेण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी विधी समितीसमोर सादर केला आहे. केंद्र सरकारच्या नियंत्रक व लेखापरीक्षक (कॅग) अहवालात त्याबाबत आक्षेप घेण्यात आल्याने ही सवलत मागे घेण्यात येत असल्याचादावा प्रस्तावात करण्यात आला आहे. ही सवलत रद्द केली गेल्यास करपात्र रकमेमध्ये वाढ होणार असून, त्यानुसार मिळकतकरातून महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नातही मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.करपात्र रकमेवरील सवलत काढून घेण्यासह देखभाल-दुरुस्तीसाठी सध्या महापालिकेमार्फत दिली जाणारी १५ टक्क्यांची सलवत कमी करून १० टक्के करावी, अशी शिफारस या प्रस्तावात करण्यात आली आहे. देखभाल-दुरुस्तीसाठी पालिकेकडून १५ टक्के सवलत दिली जात असल्याचे महसुलाची हानी होत असल्याचा ठपका कॅगने ठेवल्याचा खुलासा आयुक्तांनी केला आहे.नव्याने करआकारणी करताना ४० टक्के सवलतीची अट कायमस्वरूपी रद्द करणे आवश्यक असून, महापालिका कायद्यानुसार केवळ १० टक्के सवलत देऊनच करपात्र रक्कम निश्चित करणे गरजेचे असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले असून, त्यानुसार हा प्रस्ताव महापालिकेच्या विधी समितीसमोर सादर करण्यात आला आहे. विधी समितीच्या मान्यतेनंतर स्थायी समितीमार्फत तो सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उकाड्यात रंगले चौघांचे गप्पाष्टक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नटसम्राट चित्रपटात काम करण्याआधी नाटक पाहिले होते का, जोधा अकबरमध्ये बिरबल का नाही, दोन स्पेशल नाटकामध्ये अभिनेत्याबरोबर निर्माता होऊन पैसे खर्च करण्याचे धाडस कसे दाखविले, इंजिनीअर असताना पूर्णवेळ गायन क्षेत्र कसे काय निवडले...असे एकाहून एक प्रश्न चार स्पेशल लोकांची दांडी उडवत होते. वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने घाम पुसत प्रश्नांचा मारा ते झेलत होते आणि आपल्या नर्मविनोदी शैलीने आनंदही पेरत होते. असह्य उकाड्यात वाऱ्याची झुळूक यावी तसा हा क्षण होता.
हे चार स्पेशल म्हणजे, प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेत्री मेधा मांजरेकर, अभिनेते जितेंद्र जोशी आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे...या चौघांची दांडी उडविण्याचे काम करीत होते... प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ. राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे आयोजित आठव्या राजा परांजपे महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात भरत नाट्य मंदिरात उकाड्यात रंगलेली मैफल रसिकांना शीतल अनुभव देऊन गेली. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते चारही कलाकारांना ‘राजा परांजपे सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे, अजय राणे या वेळी उपस्थित होते.
‘नटसम्राट चित्रपटात काम करण्याआधी माझ्या मामांचे (डॉ.श्रीराम लागू) नटसम्राट नाटक पाहिले होते; पण लहान असल्याने आठवत नव्हते,’ अशी प्रांजळ कबुली मांजरेकर यांनी दिली. ‘अकबराबरोबर बिरबलही होता; पण चित्रपट चार तासांचा झाल्याने बिरबलाचा भाग कापून टाकला,’ असे पडद्यामागील गुपित गोवारीकरांनी उघड केले. ‘नाटकात प्रयोग केले असतील तर निर्माते तयार होत नाही, म्हणून धाडस करून मीच पैसे खर्च केले. नाटक गाजले तर पैसे आपलेच आहेत, हा स्पेशल विचार होता,’ असे जितेंद्रने सांगितले. ‘माझी गायकी हा अभिषेकी बुवांचा आशीर्वाद असल्याने, हेच क्षेत्र निवडले,’ असे काळे यांनी सांगितले.
‘चित्रपट चालले नाही तरी ते भव्यदिव्य करायचे हे धाडस येते कुठून,’ या गाडगीळांच्या गुगलीवर गोवारीकरांनी ‘लगान’च्या भुवनप्रमाणे घणाघाती फलंदाजी केली. ‘खूनपट असेल तर तो चित्रपट दीड तासात संपला पाहिजे. त्याउलट चित्रपटातून ऐतिहासिक नाट्याची कलाकृती वेळेचे भान ठेऊन साकार होत नाही. प्रत्येक कलाकृती यशस्वी ठरेलच असेही नाही,’ असे गोवारीकर म्हणाले. श्रुती अत्रे यांनी सूत्रसंचालन केले.

एक धागा सुखाचा या गाण्यामधील सूत कापतानाची राजा परांजपे यांची प्रतिमा लहानपणीच कोरली गेली होती. त्यांचे चित्रपट आशयसंपन्न, सामाजिक विषयांवर आणि नैतिकता सांगणारे होते. तरीही ते व्यावसायिक दृष्ट्या कसे यशस्वी झाले, हे कोडे अद्याप उलगडलेले नाही.
आशुतोष गोवारीकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अश्लील मेसेज पाठविणारा अटकेत

0
0

व्हॉट्सअॅप हॅक करून पैसेही लांबवले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फेसबुकवर मुलीच्या नावाने बनावट अकाउंट उघडून तरुणींचे फेसबुक आणि व्हॉट्सअॅप हॅक करून अश्‍लील मेसेज पाठविणाऱ्या तरुणाला सायबर सेलने राजस्थानातून अटक के आहे. त्याने पुण्यातील दहा तरुणींचे व्हॉट्सअॅप आणि फेसबुक अकाउंट हॅक केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीने तरुणींच्या नावाने मदत मागून काही जणांना पेटीएमच्या माध्यमातून दोन लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

दिप्तेश प्रकाशजी सालेचा (वय २३, रा. पाचपदरा, जि. बारमेर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कोंढवा परिसरातील तरुणीला तिच्या फेसबुकवरील मैत्रिणीने चॅटिंग करताना मोबाइल क्रमांक मागितला. त्यानंतर तिला व्हॉट्सअॅपवर मेसेजमधून दोन लिंक पाठवण्यात आल्या. त्या उघडल्या असता तिचे फेसबुक, व्हॉट्सअॅप अकाउंटचे हॅक झाले. तिने मैत्रिणीला या विषयी विचारणा केली असता तिचेही अकाउंट हॅक झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दिली.

एकाच मोबाइल क्रमांकावरून शहरातील आणखी १५ मुलींचेही अकाउंट हॅक झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे कोंढवा पोलिस ठाण्याबरोबरच इतर ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेलकडून सुरू होता. तपासादरम्यान हॅक करणाऱ्या क्रमांकाची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार, विजयमाला पवार, उपनिरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या पथकाने राजस्थानमधून आरोपीला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पुण्यातील दहा मुलींची अकाउंट हॅक केल्याचे आढळून आले. तसेच, त्यांच्या नावाने मदत मागून पेटीएमद्वारे दोन लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे.

...

कशी केली फसवणूक?

जानेवारीत आरोपीने नीलम जैन नावाने फेसबुक अकाउंट उघडले. या अकाउंटवरून त्याने तरुणींना फेसबुकवर विनंती पाठवली होती. त्यानंतर त्यांच्याशी चॅटिंग करून त्यांचा व्हॉट्सअॅप क्रमांक मागवून घेतला. व्हॉटसअॅप डाउनलोड करताना आवश्यक व्हेरिफिकेशन कोड फेसबुकद्वारे मागवून घेण्यात येई. त्यानंतर व्हॉट्सअपचा पासवर्ड बदलून त्यांचे अकाउंट वापरण्यात येत असे. त्या व्यक्तीच्या फ्रेंडलिस्टमधील व्यक्तींशी चॅटिंग करून आपल्यला पैशांची गरज असल्याचे भासवून पेटीएमद्वारे ते पाठविण्यास सांगत असे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा कँटीनमध्ये पौष्टिक आहार?

0
0

स्थूलतेच्या पार्श्वभूमीवर सरकार नियमावली आणणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशातील लहान मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. २०२५ पर्यंत सात कोटी लहान मुले स्थूल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुलांना पोषक आहार मिळावा यासाठी शाळांच्या कँटीनमध्ये कोणते खाद्य पदार्थ असावेत या बाबत राज्य सरकार आणि ओबेसिटी अँड मेटाबोलिक सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाकडून अभ्यास करण्यात येत आहे. राज्य सरकारतर्फे लवकरच या संदर्भातील नियमावली जारी करण्यात येणार आहे.
राज्य सरकार आणि ओबेसिटी अँड मेटाबोलिक सर्जरी सोसायटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे स्थूलतेविरोधात जागृती करण्यासाठी जुलै २०१६मध्ये कृतिदलाची स्थापना करण्यात आली. दलाने पहिल्या टप्प्यात ‘लठ्ठपणाशी लढा’ ही मोहीम हाती घेतली. लहान मुलांमधील स्थूलतेचे वाढते प्रमाण गंभीर आहे, या विषयी त्यांनी जागृती करण्यास सुरुवात केली आहे. ‘लहान मुलांना शालेय वयापासून लठ्ठपणा आणि दुष्परिणाम यांची माहिती व्हावी, यासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाच्या समावेशासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर शाळकरी मुलांच्या आहारामध्ये जंक फूडचे वाढते प्रमाण पाहता, शाळांच्या कँटिनमधील खाद्यपदार्थांवर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे,’ अशी माहिती संस्थेच्या सचिव डॉ. जयश्री तोडकर यांनी ‘मटा’ला दिली.
राज्य सरकार आणि संस्थेतर्फे ‘लठ्ठपणाशी लढा’ ही मोहीम राबविण्यात आली होती. त्या अंतर्गत आठ हजार सरकारी कर्मचाऱ्यांचा ‘बॉडी मास इंडेक्स’ (बीएमआय) तपासला होता. त्यापैकी ६५ कर्मचाऱ्यांचा ‘बीएमआय’ अपेक्षेपेक्षा जास्त होता, असेही डॉ. जयश्री तोडकर यांनी
नमूद केले.

खासगी शाळांमध्ये विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये कँटीनची सुविधा उपलब्ध आहे. तेथे उपलब्ध असणारे बहुतांश पदार्थ जंक फूड किंवा तत्सम प्रकारात मोडणारे असतात. ही परिस्थिती भयावह आहे. लहान मुलांच्या आहारात येऊ नयेत, असे पदार्थच तेथे मिळतात. मुलांमध्ये स्थूलता वाढण्यासाठी हेच पदार्थ कारणीभूत आहेत.
डॉ. जयश्री तोडकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चटका वाढता वाढे

0
0

शहरातील पारा पोहोचला ४०.६ अंशांवर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरात शुक्रवारी उन्हाचा चटका आणखी वाढला असून, पारा ४०.६ अंशांपर्यंत पोहोचला आहे. लोहगावमध्ये कमाल तापमान ४१.७ अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण झाले आहेत. उन्हाची तीव्रता आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचे संकेत पुणे वेधशाळेने दिले आहेत.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी असले, तरी गेल्या आठवड्यापासून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून कमाल तापमान ४० अंशांच्या पुढेच नोंदवले जात असून, शुक्रवारही त्याला अपवाद ठरला नाही. सकाळी साडेनऊ-दहापासूनच उन्हाची तीव्रता वाढत असून, दुपारच्या उन्हात बाहेर फिरणाऱ्यांना तप्त झळांचा सामना करावा लागत आहे. सायंकाळी पाचपर्यंत उन्हाची काहिली कायम राहत असली तरी थंड हवेच्या झुळुकेमुळे काहीसा दिलासा मिळत आहे. शहरातील शुक्रवारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक होते. राज्याच्या बहुतेक भागांमध्ये किमान तापमानातही लक्षणीय वाढ झाली असल्याने रात्रीही असह्य उकाडा जाणवत आहे. पुण्यात तुलनेने किमान तापमान १८ अंशांच्या दरम्यान असून, शुक्रवारी हे राज्यातील नीचांकी तापमान ठरले.
घामाघूम करणाऱ्या उन्हाची तीव्रता पुढील दोन दिवस कायमच राहणार असल्याचे संकेत पुणे वेधशाळेने दिले असून, पारा ४० अंशांच्या पुढेच राहण्याची चिन्हे आहेत.

प्रमुख शहरांतील कमाल तापमान

शहर तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
वर्धा ४५
चंद्रपूर ४४.८
अकोला ४४.५
नागपूर ४४.४
जळगाव ४३.८
परभणी ४३.५
सोलापूर ४२.३
औरंगाबाद ४१.६
नाशिक ४१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गज’गोष्टी आज अनुभवण्याची संधी

0
0

कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जगभरात हत्ती या अवाढव्य प्राण्याविषयी आकर्षण वाटणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हत्तीचे रक्षण करणारे, त्याला जपणारे आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांचेही प्रमाण मोठे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हत्तीविषयी, त्याच्या वागणुकीविषयीही माहिती असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने आणि ‘बीएमसीसी’च्या सहकार्याने आज, शनिवारी कॉलेज आवारातील टाटा हॉल येथे सकाळी ११ वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वन्यजीव छायाचित्रकार आणि अभ्यासक आनंद शिंदे हत्तींशी अनोख्या शैलीत संवाद साधण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आणि आज ते ‘गज’गोष्टी सर्वसामान्यांशी शेअर करणार आहेत. शिंदे यांनी केरळमधील हत्तींच्या वर्तणुकीचा चार वर्षे अभ्यास केला आहे. त्यांचा ध्यास पाहून केरळच्या वनविभागाने त्यांना तेथे काम करण्याची आणि अनुभव सादरीकरणाची परवानगी दिली.
पत्रकारितेतील नोकरीला रामराम ठोकून शिंदे यांनी हत्तींचे जग समजून घेण्याचा ध्यास मनाशी बाळगला आणि त्या दिशेने काम आरंभले. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी त्यांनी हत्तींसोबत कसे वागावे, बोलावे आणि अस्वस्थ किंवा उन्मत्त हत्तींना कशाप्रकारे सावरावे या साठी प्रकल्पांच्या माध्यमातून माहुतांना प्रशिक्ष‌ित करण्यासाठी ‘ट्रंक कॉल : ​द वाइल्ड लाइफ फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. हत्तीवरील प्रेमापोटी त्यांनी कोडनाड, मुत्तंगा, कोन्नी, कोट्टुर आदी ‘एलिफंट सेंटर’ अर्थात, हत्ती छावण्या पालथ्या घातल्या.
आज होणारा कार्यक्रम सर्व वाचकांसाठी विनामूल्य खुला असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर येथे बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारवाड्यातील माहिती फलक चुकीचे

0
0

Prasad.Pawar@timesgroup.com
Tweet : @PrasadPawarMT

पुणे : ऐतिहासिक वास्तूत लावलेला चुकीचा मजकूर बदलावा, यासाठी गेली आठ वर्षे महापालिकेशी झगडूनही इतिहास अभ्यासकाला कोणतीही दाद न देऊन पुणे महानगरपालिकेने ‘पारदर्शी कारभार’ म्हणजे काय असतो, याची झलक दाखवून दिली आहे. शहराच्या ऐतिहासिक ठेव्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारी वास्तू म्हणून पाहिल्या जाणाऱ्या शनिवारवाड्यातल्या फलकांवरची चुकीची माहिती बदलण्याची तसदी पालिकेने घेतलेली नाही.

शनिवारवाड्यात पर्यटकांच्या माहितीसाठी लावलेल्या अनेक फलकांपैकी काही फलकांवर चुकीचा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. काही फलकांची अवस्था दयनीय आहे, तर काही फलक मूळ जागेवरून गायब झाले आहेत. या सगळ्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नाशिक येथील इतिहास अभ्यासक ना. मा. क्षीरसागर यांनी केली आहे. त्यासाठी गेली आठ वर्षे ते पाठपुरावा करीत आहेत. मात्र, पालिकेने त्यांना कसलीच दाद दिलेली नाही.

शनिवारवाडा ही वास्तू केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून संरक्षित स्मारकांच्या यादीत आहे. विविध ठिकाणहून पुण्याला भेट देणारे पर्यटक तसेच अभ्यासक शनिवारवाड्याला भेट देतात. या ठिकाणी त्यांना इतिहासाचे योग्य संदर्भ कळणे आवश्यक आहे. त्याबद्दल बोलताना क्षीरसागर म्हणाले, ‘पेशव्यांची वंशावळ तसेच इतर संदर्भांबाबत इथल्या फलकांवर चुकीचा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांची दिशाभूल होत आहे. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या मातोश्री गोदूबाई होत्या. त्याऐवजी त्यांचा उल्लेख पत्नी असा करण्यात आला आहे. इंग्रजी मजकुरात गोदूबाई या बाळाजी विश्वनाथ यांच्या भावाची पत्नी असाही उल्लेख आहे. वास्तविक बाळाजी विश्वनाथ यांच्या पत्नीचे नाव राधाबाई असे आहे. त्यामुळे फलकांवरील मजकुरात बदल होणे गरेजेचे आहे. नानासाहेब पेशव्यांचे दासीपुत्र कुशाबा हैबतसिंग हे मस्तानीचे नातू असाही उल्लेख त्यात आहे. राघोबादादा पेशवे यांचे दत्तकपुत्र अमृतराव यांच्याविषयीचा मजकूरही चुकीचाच आहे.’ महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी वारंवार निवेदन आणि पत्रांद्वारे संपर्क साधूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही क्षीरसागर यांनी नमूद केले.
‘पालिकेने ऐतिहासिक गोष्टी वारसास्थळांमध्ये प्रदर्शित करताना सक्षम इतिहासतज्ज्ञांकडून त्याची खातरजमा करणे आवश्यक आहे. ही चूक तातडीने दुरुस्त करायला हवी,’ असे ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले.

अधीक्षक अभियंत्यांकडे प्रकरण

शनिवारवाड्यातल्या या प्रकाराबाबत ना. मा. क्षीरसागर यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याशी संपर्क साधला आहे. हा प्रकार पुरातत्व खात्याचे अधीक्षक अभियंता यांना कळविला असून त्वरित ही दुरुस्ती करण्याचे आदेश दिल्याचे महापौरांकडून त्यांना सांगण्यात आले आहे. शनिवारवाड्यात योग्य इतिहास लावला जावा आणि त्यासाठी इतिहास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, अशी अपेक्षा अभ्यासक ना. मा. क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांच्या वर्गीकरणास विरोध

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महामार्ग शहरी रस्ते असल्याबाबतचे कायदेशीर वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, महामार्गांच्या या वर्गीकरणास शहर आणि जिल्ह्यातील खासदारांनी विरोध दर्शविला आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर नाशिक फाटा ते खेड या रस्त्याच्या सहा पदरीकरणासाठी पंधराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. या महामार्गाचे शहरी रस्त्यात वर्गीकरण केल्यास सहापदरीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. तसेच, महामार्गावरील दारुबंदीच्या निर्णयाला हरताळ फासून नागरिकांच्या जीवाशी खेळ होईल, असे खासदारांचे म्हणणे आहे.
सुप्रीम कोर्टाने एक एप्रिलपासून राज्य व राष्ट्रीय महामार्गावर ५०० मीटरपर्यंत दारुविक्रीस बंदी घातली आहे. या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून जाणारे राष्ट्रीय महामार्ग व जुन्या राज्य मार्गांवरील दारूची दुकाने, बार पूर्णपणे बंद आहेत. शहरी भागातील रस्त्यांसाठी हा नियम लागू करू नये, यासाठी संबंधित रस्त्यांचे ‘महामार्गा’वरून ‘शहरी रस्ते’ असे वर्गीकरण करण्याचा मार्ग काढण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत पुणे-नाशिक महामार्ग वर्गीकरणाचा विषय पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडला जाण्याची शक्यता आहे. पुणे-नाशिक महामार्गावर नाशिकफाटा ते मोशी हा १८ किलोमीटरचा रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आहे. या महामार्गाचे वर्गीकरण झाल्यास महामार्ग प्राधिकरणाकडून १५०० कोटींचा निधी उपलब्ध होणार नाही. परिणामी, रस्ता सहापदरी होणार नाही. त्यामुळे या महामार्गाच्या वर्गीकरणास विरोध करणार आहे, असे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) सभेत खासदारांनी एकमुखाने शनिवारी सांगितले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अनिल शिरोळे व अमर साबळे, आमदार सुरेश गोरे, जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते.
औद्योगिक वसाहतींमुळे मोशी, चाकण, खेड या भागांत महामार्गावरही मोठी कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण गरजेचे आहे. रुंदीकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु, दारूविक्री सुरू व्हावी, यासाठी रस्त्याचे काम अडता कामा नये. त्यामुळे वर्गीकरणास विरोध करणार आहे, असे खासदार आढळराव यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाने आणि केंद्र सरकारने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महामार्गावरील दारुविक्री बंद केली आहे. त्यांच्या निर्णयाचा आदर ठेवून वर्गीकरणास विरोध करणार आहे, असे साबळे यांनीही स्पष्ट केले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) पहिली बैठक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार शरद सोनवणे, सुरेश गोरे, संजय भेगडे, भीमराव तापकीर, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे या वेळी उपस्थित होते.

पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिकफाटा ते खेड पर्यंतचा टप्पा सहापदरी करण्याबाबतचा प्रकल्प अहवाल तयार आहे. सहापदरीकरणासाठी आवश्यक जागेच्या ६० टक्के जागा ताब्यात घेण्यात आली आहे. लवकरच आणखी २० टक्के जागा ताब्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामास त्वरित सुरुवात होणार आहे, अशी माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. दरम्यान, पुणे-नाशिक महामार्गावर खेडपासून नाशिकपर्यंतच्या टप्प्याचे चौपदीकरण झाले आहे. मात्र, खेड, आळेफाटा, सिन्नर या महकत्त्वाच्या शहरातून महामार्गावर बायपास (बाह्यमार्ग)काढून देण्याचे काम प्रलंबित आहे. बायपाससाठी भूसंपादन करणे गरजेचे आहे. मात्र, यासाठी निधी उपलब्ध नसल्याने भूसंपादन रखडले आहे, असेही त्यांनी सांगितले.

इंद्रायणी नदीचेही प्रदूषण
पिंपरी-चिंचवडमधील अनेक कंपन्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट इंद्रायणी नदीत सोडतात. महापालिकेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही कार्यक्षम नसल्याने नदीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. यामुळे नदीच्या काठावरील सर्व गावे, शहरांचे पाणी प्रकल्पही प्रदूषित झाले आहेत. त्यामुळे इंद्रायणी नदीचा ‘नमामि चंद्रभागा’ योजनेत समावेश करावा, अशी मागणी आमगार सुरेश गोरे यांनी या वेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धिमान, आक्रमक; पण हळवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
हत्तींचे जग वेगळे असते. महाकाय दिसणाऱ्या या प्राण्याचे हृदय मात्र खूप संवेदनशील. त्यांना माणसाच्या भावना कळतात आणि हत्तींबरोबर मैत्री झाल्यावर ते आपल्याशी संवाद साधतात. एकदा हत्तीशी मैत्री झाल्यावर तो कधीच तुम्हाला सोडून जात नाही. हत्तीला आज माणसाची गरज आहे. बुद्धिमान, आक्रमक आणि तितक्याच हळव्या असलेल्या या प्राण्याच्या संवर्धनासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन वन्यजीव छायाचित्रकार आनंद शिंदे यांनी केले.
निमित्त होते, ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने आणि ‘बीएमसीसी’च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘मटा संवाद’ कार्यक्रमाचे. हत्तींशी अनोख्या शैलीत संवाद साधणाऱ्या आनंद शिंदे यांनी शेअर केलेल्या ‘गज’गोष्टींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
करिअर म्हणून शिंदे यांनी पत्रकारिता निवडली; पण त्यांची केरळला झालेली बदली आयुष्याला कलाटणी देऊन गेली. शिंदे यांना फोटोग्राफी आणि निसर्ग भटकंतीची आवड होती. तिथे नकळत ते वन्यजीव छायाचित्रणाकडे ओढले गेले. या कामादरम्यान त्यांचा हत्तींशी जवळून संबंध आला. या काळात हत्तींच्या सहवासात आलेले अनुभव शिंदे यांनी या वेळी सचित्र व्याख्यानाद्वारे उलगडले.
हत्तींबरोबर मोकळ्या वेळेत चालणे, कळपाच्या पाठीमागे फिरणे, त्यांची संवादाची पद्धत, त्यांच्या देहबोलीचा मी अभ्यास करीत गेलो. यातूनच हत्तींचा राग, वर्तन कळू लागले आणि माझे कुतूहल वाढत गेले. आईपासून दुरावलेले, कळपापासून चुकलेले तर काही अपघातामुळे जखमी झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या हत्तींना हाताळण्याचा अनुभव घेतला. सहवासात आलेल्या प्रत्येक हत्तीमध्ये मला वेगळेपणा जाणवला, प्रत्येकाने माझ्यावर मनापासून प्रेम केले आणि लळाही लावला, असे सांगून शिंदे यांनी गंगा, कृष्णा, राजा, राणा अशा वेगवेगळ्या हत्तींच्या आठवणी जागवल्या.
ओघवत्या आणि सहज सोप्या शब्दांत विषय मांडण्याच्या शैलीमुळे शिंदे यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले होते. हत्तींना कशा पद्धतीने हाताळावे, याचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या ‘ट्रंक कॉल : ​द वाइल्ड लाइफ फाउंडेशन’ या संस्थेची माहितीही त्यांनी या वेळी सांगितली.
हत्तींशी संवाद साधल्यानंतर निसर्गाची अद्‍भुत किमया अनुभवता येते. एकदा त्याच्याशी मैत्री झाल्यावर तो कधीही तुम्हाला सोडून जात नाही. संकटात कधीही तुम्हाला एकटे टाकत नाही. निसर्ग आणि माणसाचे नाते किती अतूट आहे हे हत्तींचे भावविश्व अनुभवल्यानंतर समजते. हत्तींशी संवाद साधण्यासाठी भाषा नव्हे; तर भावनांची गरज आहे. आपल्या देहबोलीतून त्यांना भावना कळतात. आज हत्तीला माणसाची गरज आहे. निसर्गातला तो महत्त्वाचा घटक असून अनेक लहान-मोठे वन्यजीव त्याच्यावर अवलंबून आहेत. हत्ती निसर्गातून नाहीसा झाला; तर निसर्गचक्र कोलमडेल. आपणच त्याला वाचविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठा आरक्षणासाठी १० मे रोजी मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभरात १० ते ३० मे दरम्यान बैठका आणि जाहीर सभा घेऊन मोर्चा काढला जाणार आहे. १० मे रोजी पुण्यात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून ‘अर्धनग्न’ मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती आयोजक प्राध्यापक संभाजी पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
सकल मराठा समाजाच्या वतीने हा मोर्चा काढला जाणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. शासनाने मराठा समाजाची दखल न घेतल्याने तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी राज्यभर आरक्षण सभा आणि मुंबईमध्ये महामोर्चा काढला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत आझाद मैदान ते मंत्रालय असा मोर्चा ३० मे रोजी काढला जाणार आहे. या मोर्चात सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनावर दबाब टाकावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
हिंगोली, यवतमाळ, नांदेड, परभणी जिल्ह्यामध्ये २ ते ९ मे दरम्यान तर ११ ते ३० मे या काळात जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर येथे जाहीर सभा आणि बैठका होणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष विधानसभा अधिवेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी निर्णय न घेतल्यास बेमुदत उपोषणदेखील करण्याचा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालवडकर प्रकरणात निरीक्षकाचा हस्तक्षेप?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकरां यांनी वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्याच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. कारवाई करणारे पोलिस निरीक्षक शंकर डोमसे यांनी कारवाई दरम्यान वाहतूक विभागाच्या एका पोलिस निरीक्षकाने आपल्याला फोन करून गाडी सोडण्यासाठी दबाव आणल्याची तक्रार वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रवीण मुंढे यांच्याकडे केली आहे. डोमसे यांची तक्रार आली असून चौकशी सुरू असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
जंगली महाराज रस्त्यावर शिवाजीनगर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर डोमसे वाहतूक नियमन करत असताना बालवडकर यांची गाडी ‘नो पार्किंग’मध्ये उभी असल्याने कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर बालवडकर यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकार राजकीय वर्तुळासह शहरात गाजले होते. बालवडकर यांच्या गाडीवर कारवाई केल्यानंतर निरीक्षक डोमसे यांना अवघ्या दहाच मिनिटांमध्ये संबंधित निरीक्षकाचा फोन आला. ती गाडी माझ्या मित्राची असून, ती सोडून द्यावी, असे डोमसे यांना सांगण्यात आले. या सर्व प्रकाराबाबत डोमसे यांनी उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यामध्ये घडलेला प्रकार व निरीक्षकाकडून कारवाईत होणारा हस्तक्षेप याची माहिती दिली आहे. तसेच, त्या निरीक्षकावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी डोमसे यांनी केली आहे. संबंधित निरीक्षकाने बालवडकर यांच्या जामीनासाठी स्वतः कोर्टात हजर राहून धावपळ केल्याचेही डोमसे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
नगरसेवकासमोरच पोलिस निरीक्षकाची टेस्ट
अमोल बालवडकर यांनी डोमसे हे दारु प्यायले असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त प्रीती टिपरे यांनी डोमसे यांना शिवाजीनगर वाहतूक शाखेत बोलावून घेतले. तेथे त्यांची बालवडकर व पोलिस कर्मचाऱ्यांसमोर गणवेशात ब्रेथ अॅनालायझर चाचणी घेण्यात आली. बालवडकर यांच्या चालकाने संशय व्यक्त केल्यानंतर थेट पोलिस निरीक्षकाची ब्रेथ अॅनालयझर चाचणी घेण्यात आली. या प्रकारामुळे खूपच मनस्ताप झाला आहे. नगरसेवकाच्या गाडीवर कारवाई केल्यामुळे नाहक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलिसांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे, अशी चर्चा पोलिस दलात सुरू आहे.
दोषी आढळलो तर राजीनामा
मी कोणाशी हुज्जत घातलेली नाही. पोलिसांकडे ऑडीओ रेकॉर्ड असतील, तर त्यांनी खुले करावे. शिवाजीनगर व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला आहे. चौकशीत दोषी आढळलो, तर नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपीमधील बदलांविषयी २४०० हरकती, सूचना

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात (डीपी) करण्यात आलेल्या बदलांवर तब्बल २४०० हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. हरकती नोंदविण्याच्या शनिवारी असलेल्या अखेरच्या दिवशी १४०० हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या. नागरिकांकडून आलेल्या सूचना एकत्र करून त्यानुसार हरकत नोंदविणाऱ्यांना नोटीस देऊन त्यावर सुनावणी घेतली जाणार आहे.
शहराच्या प्रलंबित डीपीला चार महिन्यांपूर्वी जानेवारी महिन्यात राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ही मान्यता देताना त्रिसदस्यीय समितीने उठवलेली आरक्षणे सरकारने पुनर्स्थापित केली. त्यामुळे मूळ आराखड्यात १० टक्क्यांपेक्षा अधिक बदल झाल्याने पुन्हा हरकती-सूचना मागविण्यासाठी गेल्या महिन्यात नकाशे प्रसिद्ध करण्यात आले. हे नकाशे अस्पष्ट असून, त्यावरून नेमक्या कोणत्या आरक्षणांमध्ये बदल झाले हे समजत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. परंतु, डीपीच्या काही भागांमध्येच बदल झाल्याने एक महिन्याची मुदत पुरेशी असल्याचे निरीक्षण नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांनी नोंदवले.
राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या डीपीवरील हरकती आणि सूचना नगररचना विभागाकडे नोंदविल्या जात होत्या. गेले महिनाभरात २४०० नागरिकांनी यावर हरकती नोंदविल्या, तर हरकती नोंदविण्याचा अखेरचा दिवस असलेल्या शनिवारी १४०० सूचना नोंदविण्यात आल्याचे नगररचना विभागाचे सहसंचालक अविनाश पाटील यांनी सांगितले. आजपर्यंत आलेल्या सर्व हरकती एकत्र करून त्याची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर त्यावर सुनावणी घेतली जाणार आहे. सर्वसाधारण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुदतवाढ नाही
शहराच्या विकासावर विकास आराखडा (डीपी) परिणाम करत असतो. आता मान्य झालेल्या डीपीनुसारच पुढील अनेक वर्षे काम चालणार असल्याने हा डीपी योग्य पद्धतीने मान्य झाला पाहिजे. पारदर्शी पद्धतीने डीपीचे कामकाज व्हावे, यासाठी नागरिकांना त्यावर हरकती सूचना नोंदविण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी काही संस्थांनी राज्य सरकारकडे केली होती. मात्र यावर कोणताही निर्णय शासनाकडून अद्यापही आलेला नाही. डीपीला मुदतवाढ मिळत नसल्याचे लक्षात येताच शनिवारी संपूर्ण दिवसभर नगररचना कार्यालयात हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी पुणेकर नागरिकांनी गर्दी केली होती. खासदार वंदना चव्हाण यांच्यासह अनेकांनी यात आपली हरकत नोंदविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपी डेपोत शिफ्टनुसार कामे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सर्व डेपोंमध्ये यापुढे सकाळ, दुपार व रात्री शिफ्टनुसार कामे चालणार आहेत. यामध्ये सर्वाधिक कर्मचारी रात्रीच्या शिफ्टला नेमले जाणार असून, वाहन दुरुस्तीची सर्व कामे रात्री पूर्ण करून सकाळच्या वेळेत बस प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
शहरात पीएमपीचे १३ डेपो आहेत. या १३ डेपोंमध्ये यापूर्वीही रात्रीच्या शिफ्टमध्ये काम चालत होते. मात्र, मुख्य कामे दिवसाच केली जात होती. तर, रात्रीच्या वेळेला किरको‍ळ कामे होत होती. यामुळे प्रत्यक्ष प्रवासी सेवेच्या वेळेत बस उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे रात्रीच्या वेळेला काम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी सहा ते दुपारी दोन, दुपारी दोन ते रात्री साडेदहा आणि रात्री साडेदहा ते सकाळी सहा या वेळेत डेपोंतील कामकाज चालणार आहे. नवीन आदेशानुसार सकाळ व दुपारच्या शिफ्टमध्ये प्रत्येकी २० टक्के कर्मचारी नेमण्यात येतील, तर ६० टक्के कर्मचारी रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतील.
सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत बस सर्व्हिसिंगची कामे आणि ‘रनिंग मेन्टेनन्स’ची कामे केली जातील. अन्य देखभाल दुरुस्तीची कामे रात्रीच्या शिफ्टमध्ये केली जातील. एका कर्मचाऱ्याला १५ दिवसांसाठी एक शिफ्ट असणार आहे. तसेच, कर्मचाऱ्यांना सकाळ, दुपार व रात्री या तिन्ही शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. रात्र पाळीत कामकाजावर देखरेखीसाठी दोन सुपरवायझर नेमण्यात येणार आहेत. येत्या रविवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

डिझेल पुरवठ्याचा गोंधळ समजणार
पीएमपीला डिझेल पुरविणाऱ्या कंपनीच्या टँकरमध्ये गेल्या आठवड्यात ७८६ लिटर डिझेल कमी आढळले होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये पीएमपीच्या आठ डेपोंमध्ये कंपनीने केलेल्या डिझेल पुरवठ्यासंबंधीचे अहवाल डेपो प्रमुखांनी पीएमपी प्रशासनाला पाठविले आहेत. या अहवालांची तपासणी करून पुरवठ्यातील गोंधळ समोर येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली. अनेकांनी यात आपली हरकत नोंदविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला विक्री आता बारा वाजेपर्यंतच

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मार्केटयार्डातील फळभाज्या विभागातील पहाटेपासून दुपारपर्यंत सुरू असणाऱ्या विक्रीला आता मर्यादा घालण्यात येणार असून दुपारी बारा वाजेपर्यंतच विक्री करण्याचा निर्णय आडते असोसिएशनने घेतला आहे. या संदर्भात बाजार समितीला दोन दिवसांत कळविले जाणार आहे.
या संदर्भात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनीदेखील काही दिवसांपूर्वी भूमिका मांडली होती. आदल्या दिवशी सायंकाळपासून येणाऱ्या फळभाज्यांची रात्री ७ ते ११ या वेळेत विक्री झाली; तर त्याचा फायदा विक्रेत्यांसह शेतकऱ्यांना होईल. परिणामी वाहतूक कोंडी कमी होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
‘मार्केट यार्डातील फळभाज्या विभागातील ३५२ व्यापाऱ्यांनी स्वाक्षरीचे पत्र दिले होते. त्याद्वारे फळभाजी विक्रीची वेळ सकाळी दहा ते अकरापर्यंत करावी, अशी मागणी केली होती. त्यावर चर्चा झाली. त्यानुसार दुपारी बारा वाजेपर्यंत मार्केट यार्डात फळभाजीची विक्री केली जाईल, असा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. पूर्वी दुपारी दोन वाजेपर्यंत भाज्यांची विक्री होत होती. त्यामुळे भाज्यांचे भाव कमी मिळत होते. परिणामी, ग्राहकदेखील त्यांना हवे त्या वेळेला येत असल्याने व्यापाऱ्यांना ताटकळत राहावे लागत होते. यामुळे विक्रीची वेळमर्यादा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत बाजार समिती प्रशासनाला कळविण्यात येणार असून त्यानंतर अंमलबजावणी केली जाईल,’ अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले यांनी दिली.
बाजार समितीमध्ये मार्केटयार्ड आडते असोसिएशन ही आडतदारांची संघटना आहे. तीन वर्षांनी संघटनेची निवडणूक होते. यासाठी एकूण १९ जागा असून १८ संचालक आणि १ अध्यक्ष पदासाठी जागा आहेत. यामध्ये फळभाज्या विभागासाठी ८, फळविभाग ४, कांदा-बटाटा विभाग ४, केळी बाजारासाठी १ आणि पान बाजारासाठी १ जागा आहे. अध्यक्ष कार्यकारिणीची मुदत १७ मार्चला संपल्यामुळे निवडणुकीची रूपरेषा ठरविण्यासाठी वार्षिक सभा घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष शिवलाल भोसले, माजी अध्यक्ष विलास भुजबळ, सुहास ढमढेरे, राजेंद्र कोरपे, सतीश उरसळ हे सर्व इच्छुक आहेत. यापैकी कोणीही अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार न घेतल्यामुळे निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणूक अधिकाऱ्याद्वारे लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, लिंबू विक्रेत्यांची होणारी अरेरावी, स्वच्छतागृहांची दुरवस्था, चोरीचे वाढते प्रमाण, पिण्याच्या पाण्याचा अभाव, बंद सीसीटीव्ही कॅमेरे, गाळ्यांचा मिळकत कर, किरकोळ व्यापाऱ्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी या विषयावर चर्चा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images