Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अडीच वर्षांच्या मुलीचा‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उन्हाचा चटका वाढला असला, तरी ‘स्वाइन फ्लू’चा संसर्ग कमी झालेला नाही. नगर जिल्ह्यातील अडीच वर्षांच्या एका मुलीचा पुण्याच्या खासगी हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी संसर्गाने मृत्यू झाला. आतापर्यंत पुण्यात दगावलेल्यांची संख्या ३३ पर्यंत पोहोचली आहे. एच१ एन१ या विषाणूच्या संसर्गाने त्या मुलीला न्यूमोनिया झाला. परिणामी तिचा श्वास व हृदय बंद पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे निरीक्षण आरोग्य खात्याने नोंदविले आहे.
शहरात महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या विविध दवाखान्यांमध्ये ‘स्वाइन फ्लू’च्या पेशंटना तपासण्याची सोय करण्यात आली आहे. त्या ठिकाणी दवाखान्यात लक्षणे दिसणाऱ्या पेशंटना तातडीने स्वाइन फ्लूचे ‘टॅमी फ्लू’ नावाचे औषध मोफत देण्याची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी लक्षणे दिसताच सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी व औषधोपचार सुरू करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पुण्यात आणखी १८ पेशंटची प्रकृती खालावली आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. नव्याने तिघांना लागण झाली आहे. आतापर्यंत शहरात १९९ जणांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले असून ३३ जणांचा बळी गेल्याची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेट्रो स्टेशनखालीच‘अंडरग्राउंड पार्किंग’?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात होणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या आजूबाजूला पार्किंगसाठी जागांचा शोध सुरू असला, तरी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध नसल्यास स्टेशनच्या खाली ‘भूमिगत वाहनतळ’ (अंडरग्राउंड पार्किंग) उभारण्याची चाचपणी ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’तर्फे (महामेट्रो) केली जात आहे. त्यामुळे शहरातील दाट वस्तीच्या आणि गजबजलेल्या भागांमध्ये नागरिकांना मेट्रोच्या स्टेशनपाशीच पार्किंग करता येणे शक्य होणार आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या विविध कामांचा आढावा घेताना, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी बुधवारी तसे संकेत दिले. येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू होईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र-राज्य सरकारच्या ताब्यात असलेल्या जागा मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यासाठी सर्व सरकारी विभाग आणि अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
विविध भागांतून मेट्रोपर्यंत येणाऱ्या प्रवाशांना बस, सायकल, टॅक्सी असे पर्याय उपलब्ध असतील. तरीही, काही नागरिकांना त्यांच्या गाडीनेच मेट्रो स्टेशनपर्यंत यायचे असल्यास त्यासाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. शहराच्या दोन्ही मार्गांवरील प्रस्तावित ३१ स्टेशन्सच्या आसपास पार्किंगसाठी सुयोग्य जागेचा शोध सुरू आहे. जागा ताब्यात मिळाल्यास स्टेशनच्या लगतच पार्किंगची सुविधा दिली जाणार असून, पुरेशी जागा नसल्यास स्टेशनच्या जागेत अंडरग्राउंड पार्किंग करणे शक्य आहे का, याचा अभ्यास केला जात आहे, असे दीक्षित यांनी नमूद केले.

मेट्रो अॅक्ट सक्षम
शहरातील मेट्रो मार्गांबाबत पर्यावरणवाद्यांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर (एनजीटी) नदीपात्रातील मार्गांबाबत सुनावणी सुरू आहे. आपल्या देशाने लोकशाही मान्य केली असल्याने एखाद्या प्रकल्पाविषयी तक्रारींचा सूर उमटणे स्वाभाविक आहे; पण त्याने मेट्रोच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी निःसंदिग्ध ग्वाही दीक्षित यांनी दिली. मेट्रो अॅक्ट अत्यंत सक्षम असल्याने मेट्रोच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही, असे त्यांनी सूचित केले.

भूमिगत मेट्रो सर्वांत कठीण
रेंजहिल्स (शिवाजीनगर) ते स्वारगेट या शहरातील पाच किमीच्या भूमिगत मेट्रो मार्गाचे काम सर्वांत कठीण आणि आव्हानात्मक असेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. चेन्नईमध्ये काही दिवसांपूर्वी भूमिगत मेट्रोचे काम सुरू असताना, अचानक रस्ता खचल्याने अपघात झाला होता. या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये अशा स्वरूपाची कोणतीही दुर्घटना होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेविकांच्या ‘अहों’मुळे अधिकारी त्रस्त

$
0
0

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांत स्त्री-पुरुष समानतेसाठी महिलांना आरक्षण मिळून दोन दशके लोटल्यानंतर आजही नगरसेविकांऐवजी त्यांचे पतीराजच अधिक सक्रिय असल्याचे चित्र आहे. पुणे महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचे पती आपणच ‘कारभारी’ असल्याच्या थाटात हस्तक्षेप करीत असल्याने पालिकेतील अधिकारी हैराण झाले आहेत.

महिलांना आरक्षण देण्यामागील समानतेच्या हेतूला हरताळ फासून बहुतेक नगरसेविकांचे पती आपण स्वतःच नगरसेवक असल्याच्या थाटात पालिकेत वावरत आहेत. पत्नी नगरसेवक असल्याचा फायदा उठवित काही मंडळी थेट अधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊन अरेरावी करीत असल्याची तक्रार केली जात आहे. काही नगरसेविकांच्या कुटुंबीयातील व्यक्तीच बैठक घेऊन जाब विचारत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. अशा वेळी काय करावे, असा प्रश्न पडत असल्याचे त्याने नमूद केले.

‌विविध पक्ष संघटनेच्या, तसेच राजकीय पक्षांच्या माध्यमातून राजकारणात गेली अनेक वर्षे सक्रिय असूनही प्रभागात महिलांचे आरक्षण पडल्याने निवडणूक लढविता आली नसल्याचा वचपा अशा स्वरूपात काढला जात असल्याचे मत काही नेत्यांनी व्यक्त केले. ‘प्रभागात कोणती कामे होणार, काही कामांना प्राधान्य द्या, असे वेगवेगळे सूचनावजा सल्ले दररोज अधिकाऱ्यांना मिळत असून, वेगवेगळ्या विभागांत नगरसेविकांच्या नावावर त्यांचे पतीच कार्यरत झाले आहेत. पालिकेच्या कामाची माहिती नसल्याने सुरुवातीचे काही दिवस त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती त्यांना माहिती करून देण्यासाठी येत असतील, असे अधिकाऱ्यांना वाटत होते. लवकरच हा प्रकार बंद होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, महिला सभासदांऐवजी त्यांचे पती सतत केबिनमध्ये येऊन जाब विचारत असल्याने कोणाकडे दाद मागायची,’ असा प्रश्न एका अधिकाऱ्याने विचारला.

पक्ष बैठकीतही ‘मिस्टर’च पुढे

सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या बैठकांनाही महिला सभासदांऐवजी त्यांचे पती उपस्थित राहत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या महिन्यात नवनिर्वाचित सभासदांची बैठक पक्षाने बोलाविली होती. यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी शहरातील आमदार, खासदार यांच्याबरोबरच काही पदाधिकारी उपस्थित होते. यामध्येही काही महिला सभासदांच्या कुटुंबातील व्यक्तींनी हजेरी लावल्याने याबाबत संबंधितांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. तर, दुसरीकडे पालिकेतील पक्षाच्या बैठकीला नगरसेविकांऐवजी त्यांचे पती हजर राहिल्याने त्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पालिकेच्या गेल्या निवडणुकीनंतरही अनेक ‘मिस्टर’च कार्यरत झाल्याचे पाहायला मिळाले होते. माजी महापौरांच्या केबिनमध्ये, बैठकीला त्यांची उपस्थिती असायची.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताकारण म्हणजे ‘स्वार्थाचे व्यवस्थापन’

$
0
0

प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव

आज जी लोकशाही आपण अनुभवत आहोत, ती पंडित नेहरूकालीन संसदीय लोकशाही नसून ‘मार्केट डेमॉक्रसी’, अभिजन लोकशाही आहे का, असे वाटते. विल्फ्रेडो पैरेटो, ग्रेटानो मोस्का, रॉबर्ट मिशेल्स, अमेरिकन लेखक जेम्स बर्नहाम व सी. राइट मिल्स हे अभिजनवादी लोकशाही सिद्धांताचे प्रमुख आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर अनुभवातून त्यांनी हा सिद्धांत मांडला. नैतिकता, लोकांचे राज्य हे अशक्य आहे. सत्तेच्या स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी अभिजन कृती करीत असतात. लोकशाही निवडणुकीत उमेदवार एकमेकांवर मात करण्याच्या स्पर्धेतून कल्याणकारी योजनांच्या घोषणा करतात. आता अलिकडे तर नोटांचा पाऊस व दारूच्या नद्या वाहत आहेत. अशा निवडणुकांमध्ये सामान्य सज्जन माणूस निवडणूक लढवू शकतो का? चहा टपरीवाला केवळ बोलण्याचा भाग आहे. तो आज अभिजनातील सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून पंतप्रधान आहे, हेच वास्तव आहे.

राजकारण हा स्वार्थाचा खेळ असतो. लोकांच्या स्वार्थाचे व्यवस्थापन म्हणजे राजकारण. म्हणून राजकारणाला सत्ताकारण म्हणतात. कारण सत्तेच्या माध्यमातून हे स्वार्थाचे व्यवस्थापन करता येते. म्हणूनच सत्तेत नसताना राजकीय नेते जलबिन मछलीसारखे का तडफडतात, हे आपल्याला कळून येईल. आता राजकारण म्हणजे सत्ताकारण. सत्ताकारण म्हणजे लोकांच्या स्वार्थाचे व्यवस्थापन. यात जो नेता जास्तीत जास्त लोकांच्या स्वार्थाचे व्यवस्थापन करतो तो प्रभावी होतो, लोकनेता होतो. जो जास्त प्रभावी (उदा. उद्योगपती, नोकरशहा) लोकांच्या स्वार्थाचे व्यवस्थापन करतो, तो जास्त प्रभावी होतो. जसे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांचा ‘मोदींचा नवा अवतार योगी’ अशी चर्चा आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’ म्हणजे विरोधमुक्त सरकार हे लोकशाहीस ग्रहण आहे. पण, याची सुरुवात काँग्रेसच्या इंदिरा पर्वातच झाली आहे. आज महाराष्ट्र सरकारचा ३१ डिसेंबर २०१५पर्यंतची सर्व अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय पाहिला, की हे कायद्याचं राज्य आहे का, असा प्रश्न पडतो. नव्हे, हे स्वार्थी लोकांना खूश करून व्होट बँक साभाळण्याचा उद्योग आहे. ‘अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यास १९७६पासूनच सुरुवात’ ही बातमी ऐतिहासिकच म्हणायला हवी. प्रश्न एवढाच उरतो, की उच्च व सर्वोच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांचे काय? २००७मध्ये (१९७६ नंतर ३० वर्षांनी) हरित वसई संरक्षण समितीने मुंबई उच्च न्यायालयात ठाणे जिल्ह्यात अनधिकृत इमारतींविरुद्ध याचिका दाखल केली. त्या वेळचे मुख्य न्यायाधीश स्वतंत्रकुमार यांनी त्या याचिकेची व्याप्ती पूर्ण राज्यासाठी लावून सरकारला उत्तर देण्यासाठी सांगितले. त्या वेळच्या मुख्य सचिवांनी न्यायालयात लेखी माहिती दिली की, राज्यात एकंदर पाच लाख पन्नास हजार अनधिकृत इमारती आहेत. त्या सर्व पाडून टाकण्याचा विचार असल्याचेदेखील उच्च न्यायालयात सांगितले. थातूरमातूर कारवाई करू मुंब्रा येथील गरिबांच्या चाळी पाडल्या. मात्र, मुंबई व अन्य शहरांतील एकही बहुमजली इमारत पाडली नाही. अखेर अनधिकृत बहुमजली इमारतींना संरक्षण देणे हाच हेतू आहे. या देशातील राजकारण गरिबांच्या नावाने चालते. भले होते मात्र राजकीय नेते व बिल्डर लॉबीचे. माझा सवाल असा आहे, की जर सरकार न्यायालयांचे निर्णय मानत नसेल, तर न्यायाधीश गप्प का? अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांना राज्यातील न्यायालय जागेवर बसवते, तर मग आपली न्यायालये सरकारला धारेवर का धरीत नाहीत? जे याचिका दाखल करतात त्यांचा मोठा खर्च होतो त्याचे काय? शिवाय, न्यायालयांचा वेळ वाया जातो, ते निराळेच. ही अशी मोगलाई किती काळ चालणार? कायद्याच्या, व्यवस्थेच्या पायमल्लीची प्रक्रिया इंदिरा गांधी यांच्या काळात सुरू झाली असली, तरी विद्यमान सरकारही त्यास हातभारच लावत आहे. हे करीत असताना हे लक्षात असले पाहिजे, सत्ता टिकवण्यासाठी केलेली ४२वी घटनादुरुस्ती ही छोटी राज्यघटना होती. पण, सत्ताही टिकली नाही व जनता सरकारला ही रद्द करण्यासाठी ४४वी घटनादुरुस्ती करावी लागली, हा इतिहास आहे. सरकारला विरोध करण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला नाही म्हणून मूग गिळून गप्प बसायचे का? पक्षाला, धर्माला, जातीला नाही, तर व्यक्तीला भारतीय संविधान स्वातंत्र्य देते. लोकशाहीचा आधार जागृत जनताच आहे. जनता जागृत असल्यामुळेच अभिजन लोकशाहीत (मार्केट डेमॉक्रसीत) सर्वच उमेदवारांकडून जे जे भेटेल ते घेऊन आपल्या पसंतीच्याच उमेदवारास मतदान करते. पण, व्यक्तीच्या हृदयातील स्वातंत्र्यांची ज्योत विझली, तर मात्र लोकशाहीचे जतन कोणीही करू शकत नाही. राज्यातील बांधकामे वाचवण्यासाठी आणलेले विधेयक मंजूर होते, एका प्रदेशात मातेसमान असणारा गाय हा चतुष्पाद प्राणी दुसऱ्या प्रदेशात मारून खाण्याच्या लायकीचा होतो. मद्यविक्रीतून मिळणारा महसूल बुडू नये म्हणून महामार्गांना दर्जाहीन केले जाते. विसंगतींनी भरलेले असे अनेक निर्णय विचारी जनांना अस्वस्थ करणारे आहेत.

अयोध्याप्रश्नी देशाचे सरन्यायाधीश म्हणतात मी मध्यस्थी करतो. पण, न्यायालयाच्या बाहेर. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना वार्ताहरांच्या वेशसंहितेची चिंता, कोलकाता उच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचा आदेश खुंटीवर टांगतो आणि अटक करावयास आलेल्या पोलिसांना परत पाठवतो. महामार्गापासून ५०० मीटरपर्यंत मद्यविक्री नको, असे सर्वोच्च न्यायालय सांगते आणि राज्य सरकारे महामार्गाचा ‘महा’ दर्जा काढून न्यायालयाच्या आदेशाला वाकुल्या दाखवतात. भाजपला उत्तर प्रदेशात ‘गोमांस विक्री’ अब्रह्मण्यम वाटते. पण, ईशान्य भारतातील मणिपूर, नागालँड, मेघालय आदी राज्यांतील गोमाता मात्र भक्षणपात्र ठरते. ज्याचा अर्थ विषयांशी काहीही संबंध नाही, असे मुद्दे वित्त विधेयक म्हणून सरकार मांडते आणि मंजूर करवून घेते. महाराष्ट्रातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय घेते. हे असे अनेक दाखले देता येतील. ही आपली आजची देशाची स्थिती. हे दाखले आहेत विविध राज्यांचे, केंद्राच्या विविध खात्यांचे आणि न्यायालयांचेदेखील. हे सर्व प्रसंग, त्यातील व्यक्ती वा संदर्भ वेगवेगळे असले, तरी या सगळ्यांतून निघणारा अर्थ एकच आहे आणि तो विचार, इंद्रिये शाबूत असणाऱ्यांना अस्वस्थ करणारा आहे. कारण स्वतंत्र भारताविषयी आपल्या काही अपेक्षा असतात. बहुतेक साऱ्या अपेक्षा पाश्चात्यांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व स्पर्धात्मक जीवन पाहून निर्माण झालेल्या असतात. आपणही त्यांच्यासारखेच बनावे, असे आपल्याला वाटत असते. विशेषतः ब्रिटिशांनी भारत ताब्यात घेतल्यापासून असे वाटण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता तर ती फार वाढली आहे. सातासमुद्रापलीकडून पाच हजार मैलांवरून दोन-चार हजार गोरे लोक येतात काय, चाळीस कोटी लोकांवर दीड-दोनशे वर्षे राज्य करतात काय हे सारेच स्तंभित करणारे होतेच; पण त्यांची राज्यकारभाराची पद्धत, त्यांची ती लोकशाही, ती शिस्त, त्यांच्यातील सामाजिक समता, राष्ट्रीय भावना, ज्ञानाविषयीची आवड, आर्थिक विकासाची ओढ इत्यादी सारेच मोहून टाकत होते. आजची परिस्थिती पाहून विचारी मनाला प्रचंड वेदना होतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे सौजन्य आज कुणाकडेच नाही. बहुमत आहे म्हणजे कुणी प्रश्नच विचारावयाचे नाहीत, अशी सरकारी मानसिकता असल्याने प्रस्थापित व्यवस्थेत प्रश्न विचारणे हेच देशद्रोहाचे ठरते. तरीही, ते विचारणे आमचे कर्तव्य आहे. कारण प्रश्न या वा त्या पक्षाच्या सरकारचा नाही. तो या देशातील लोकशाहीचा आहे.

(लेखक उदगीर येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागप्रमुख आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेज निवडणूक नियमावलीला वेग

$
0
0

पंधरा मे पूर्वी प्रसिद्ध करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार राज्यातील विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये निवडणूक होणार आहे. त्यासाठी नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सविस्तर नियमावली १५ मेपूर्वी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे कॉलेज सुरू झाल्यानंतर निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे.
राज्याच्या उच्चशिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी ही माहिती दिली. विद्यापीठ कायद्यानुसार आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये निवडणूक होणार आहे. ही निवडणूक तसेच कायद्यातील विविध धोरणांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली. या समितीमध्ये १४ सदस्य आहेत. त्यामध्ये विद्यापीठाचे माजी कुलगुरू, कुलसचिव, प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ, उच्च शिक्षण विभागाचे संचालक आदी मान्यवरांचा समावेश आहे. समितीच्या आतापर्यंत ४ ते ५ बैठका झाल्या आहेत.
बैठकीमध्ये कायद्यातील धोरणांच्या पूर्ततेसाठी नियमावली आणि प्रमाण संहिता तयार करण्यात आली आहे. निवडणुकीत भांडणे आणि हाणामारी न होता त्या शांततेत कशा पार पडतील यावर बैठकांमध्ये भर देण्यात आला. निवडणुकीचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची भावना दृढ करणे हा आहे. विद्यापीठ अथवा कॉलेजांमध्ये साधारणत: ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश सुरू असतात. त्यानंतरच निवडणूक पार पडेल, असे डॉ. माने यांनी सांगितले.

खर्च घटविण्यावर भर देणार
निवडणुकीत मतदान मोबालद्वारे की पारंपरिक पद्धतीने शिक्के मारून घ्यावे, याविषयी चर्चा सुरू आहे. उमेदवारांनी प्रचार कसा करावा, किती खर्च करावा यावरही खल सुरू आहे. खर्च घटविण्याची काळजीही नियमावलीत घेण्यात येणार आहे. निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आश्वासन डॉ. माने यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धर्मादाय’चे ‘डिजिटायझेशन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील विविध धर्मादाय संस्थांच्या विश्वस्तांना घरबसल्या सर्व कागदपत्रांसह विविध प्रकारची माहिती ‘ऑनलाइन’ उपलब्ध व्हावी; तसेच आयुक्तालयाचे कामकाज सुलभ व्हावे यासाठी संपूर्ण आयुक्तालयाचे ‘डिजिटायझेशन’ करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील आठही विभागातील कार्यालयांतून सुमारे पंधरा कोटी पानांचे स्कॅनिंग केले जाणार आहे.

राज्यातील हजारो विश्वस्त संस्था, धर्मादाय आयुक्तालयाच्या कामात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. तसेच धर्मादाय संस्थेचा कारभार देखील गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. देशात धर्मादाय संस्थाचे सर्वाधिक जाळे महाराष्ट्रात आहेत. या संस्था सरकारबरोबर समाजातील दुर्बल घटकांचे राहणीमान उंचावण्याबरोबरच त्यांना शैक्षणिक, सामाजिक तसेच आरोग्य विषयक सेवा देत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आणखी दर्जेदार ऑनलाइन सेवा पुरविल्यास कार्याला गती येईल.

‘राज्यातील विविध धर्मादाय संस्थांची यापूर्वी माहिती कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. अनेक संस्थांनी त्यांचे विश्वस्त बदलाचे अर्ज पूर्ण केले आहेत. परंतु, पूर्वीच्या रेकॉर्डवरील हस्ताक्षर वाचता येत नाही. त्यामुळे सरकारी विभागात कागदाचा वापर न करण्याचे तसेच त्यांच्याकडील सर्व नोंदी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्याचे सरकारी धोरण धर्मादाय आयुक्तलायांमध्येही अवलंबिण्यात येत आहे. विश्वस्त संस्थाकडील कागदपत्रांचे डिजिटायझेशन केल्यामुळे व्यवस्थेत पारदर्शकता येऊन कामकाज सुलभ होईल. यासाठी राज्यातील विविध धर्मादाय कार्यालयातील १५ कोटी पानांचे स्कॅनिंग केले जाणार आहे,’ अशी माहिती राज्याचे धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे यांनी दिली.

सर्व विश्वस्तांची माहिती वेबसाइटवर दिलेल्या अर्जात संबंधित विश्वस्तांनी देखील भरायची आहे. त्यातून सर्व धर्मादाय आयुक्तालयाचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. विविध संस्थांनी त्यांच्या विश्वस्तासह अन्य माहिती धर्मादाय आयुक्तायलयाच्या वेबसाईटवर भरायची आहे. त्यानंतर कार्यालयाकडून ती माहिती तपासली जाईल. नंतर ती अपलोड करण्यात येईल. अपलोड झालेली माहितीमध्ये दुरुस्ती करणे शक्य आहे. देशात ३३ लाख धर्मादाय संस्था असून त्यापैकी आठ लाख संस्था या महाराष्ट्रात आहेत, असेही धर्मादाय आयुक्त सावळे यांनी स्पष्ट केले.


‘कागदपत्रे उपलब्‍ध’

सर्व संस्थांची कागदपत्रे ‘डिजिटायझेशन’च्या निमित्ताने ‘ऑनलाइन’ होणार आहेत. परिणामी कोणत्याही संस्थेच्या विश्वस्तांना इतर संस्थेची माहिती अथवा कागदपत्रे सहज पाहता येणार आहेत. विश्वस्त संस्थांची नोंदणी, परिपत्रक ०.१ चे उतारे, बदल अर्ज, इतर सुविधा आता विश्वस्तांसह नागरिकांना घरबसल्या ‘ऑनलाइन’ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विश्वस्तांचा वेळ, पैसाही वाचणार आहे. धर्मादाय आयुक्तालयाच्या कारभारात पारदर्शकता येईल.

- शिवाजीराव कचरे, धर्मादाय सहआयुक्त, पुणे विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सापाच्या पिल्लांना जीवदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

वाघोली येथील उबाळे नगर परिसरात राहणाऱ्या रोहित पोतदार यांच्या खोलीत आढळलेल्या सापाच्या गवत्या जातीच्या चौदा पिल्लांना ‘वाइल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशन’च्या सर्पमित्रांनी पकडून पुन्हा जंगलात सोडले.

पोतदार यांच्या घराच्या पाडाव खोलीत सापाची चार पिल्ले दिसून आल्यानंतर त्यांनी तातडीने वाइल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशन या प्राणीमित्र संघटनेच्या मदत क्रमांकावर संपर्क साधला. माहिती मिळताच सर्परक्षक रवी लोहिरे, साईदास कुसाळ, रोहित ढवळे यांनी वाघोलीकडे धाव घेतली. पोतदार यांच्या घरातून चार गवत्या जातीची पिल्ले पकडण्यात आली. परिसरात शोध घेतल्यावर तब्बल चौदा पिल्ले पकडण्यात आली.

‘गवत्या हा बिनविषारी साप असून, सापाच्या नराची लांबी साठ सेंटिमीटर, तर मादीची नव्वद सेंटिमीटर असते. पाठ गवतासारखी हिरव्या रंगाची असून तिच्यावर काळे किंवा विखुरलेले पांढरट ठिपके असतात. पाठीवरील प्रत्येक खवल्याच्या मध्यावर कणा असल्यामुळे ती खरखरीत असते. खालचा रंग पांढरा असून दोन्ही बाजूंवर पिवळ्या रेषा असतात. दोन्ही डोळ्यांच्या मागून एक काळी रेषा निघालेली असते. शेपूट लहान असून तो गवतात आणि झुडपात राहतो,’ अशी माहिती लोहिरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुजारी खून प्रकरणी सुनावणी अंतिम टप्प्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी खून खटल्यातील बचाव पक्षाचा अंतिम युक्तीवाद गुरुवारी पूर्ण झाला. या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात असून लवकरच निकालाची सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या कोर्टात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

हा खटला पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यावर अधारित आहे. असा पुरावा अशक्त असतो, त्याचा फायदा आरोपींना द्यावा, असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे अॅड. बी. ए. आलूर यांनी कोर्टात केला. बचाव पक्षातर्फे अॅड. आलूर, अॅड. रणजीत ढोमसे, अॅड. अंकुशराजे जाधव काम पाहत आहेत. बचाव पक्षातर्फे या खटल्यात सुरू असलेला युक्तीवाद गुरुवारी पूर्ण झाला.

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर या खटल्याचे कामकाज पाहत आहेत. अॅड. निंबाळकर यांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर बचाव पक्षातर्फे युक्तीवाद सुरू करण्यात आला होता. बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला असल्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नयना पुजारी हिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिचा खून करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी गेली सात वर्षे कोर्टात सुरू आहे. दरम्यानच्या काळात या खटल्यातील मुख्य आरोपी योगेश राऊत पळून गेल्यामुळे खटल्याची सुनावणी लांबली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राऊतला पकडून गजांआड केले होते.

अॅड. आलूर यांनी कोर्टात युक्तीवाद करताना, पुजारी खटल्यात कोणताही थेट पुरावा नाही. हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे. परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे खून कोणी केला, याची केवळ आपण कल्पना करू शकतो. परिस्थितीजन्य पुराव्याला भारतीय पुरावा कायद्यानुसार फारसे महत्त्व नाही. तो अशक्त पुरावा आहे. त्यामुळे पुराव्याबाबत संशय निर्माण झाला आहे. त्याचा फायदा आरोपींना द्यावा. याबरोबरच अनेक साक्षीदारांच्या साक्षीमध्ये विसंगती आहेत. या प्रकरणात माफीचा साक्षीदार आहे. तरीही सरकारी पक्षाला आरोपींनी खून केल्याचे सिद्ध करता आलेले नाही. बलात्कार केल्याचे माफीचा साक्षीदार असलेल्या राजेश चौधरी याने त्याच्या जबाबात कबुल केले आहे. मात्र, खुनाबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे चौधरी याने सांगितले आहे. यावरून नयना यांचा खून कोणी केला, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. खून कोणी केला हे सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेले नाही, असे अॅड. आलूर यांनी युक्तीवाद करताना कोर्टात नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेकायदा सावकारावर कारवाई

$
0
0

वीस कोटी रुपये व्याजान दिले; सहकार विभागाचा छापा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कात्रज येथील लेकटाउन गृहसंकुलातील एका फ्लॅटवर छापा टाकून बेकायदा सावकारी करणाऱ्या वडील आणि मुलाविरुद्ध कारवाई केली. या दोघांनी पुण्यासह कोल्हापूर आणि सांगली परिसरातील लोकांना सुमारे २० कोटी रुपये व्याजावर देऊन त्याबदल्यात लोकांकडून दागिने, सह्या असलेले कोरे चेक घेणे; तसेच फ्लॅट आणि जमिनी नावावर करून घेतल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ या कायद्याअंतर्गत उपनिबंधक कार्यालयाला मिळालेल्या अधिकारानुसार झालेली ही पुण्यातील पहिलीच कारवाई आहे.

विजय शिवपाद एरंडोल (वय ७२) आणि त्यांचा मुलगा नरेंद्र (वय ३०, रा. फ्लॅट क्रमांक ५०१, डी-३, लेकटाउन, कात्रज) असे कारवाई केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी उपनिबंधक प्रतिक पोखरकर, सहायक निबंधक बाळासाहेब तावरे आदी उपस्थित होते.

लावंड म्हणाले, ‘एरंडोल हे बेकायदा सावकारीचा व्यवसाय करत असल्याची तक्रार कार्यालयाकडे देण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार एरंडोल यांच्याविषयी माहिती काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यामध्ये ३९ व्यक्तींच्या देणेघेणे बाबतचा तपशील असलेल्या डायऱ्या, विविध व्यक्तींच्या सह्या असलेले ७१ कोरे चेक, रकमेचा उल्लेख असलेले विविध व्यक्तींचे २९ चेक, ४३ वेगवेगळे करारनामे आदी बाबी जप्त करण्यात आल्या आहेत.

‘हे दोघे मूळचे सांगलीतील आहेत. या दोघांनी पुणे, कोल्हापूर आणि सांगली परिसरातील नागरिकांना व्याजावर पैसे दिले आहेत. पैसे परत न करणाऱ्या व्यक्तींना दमदाटी करून मालमत्ता नावावर करून घेण्याचे प्रकार दोघांनी केले आहेत. प्राथमिक चौकशी त्यांनी सुमारे २० कोटी रुपये व्याजावर दिल्याचे निदर्शनास आले आहे.’

‘दोघांचे चार बँकांमध्ये लॉकर असल्याचे आढळून आले आहे. त्यांची बँक खाती सीलबंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ नुसार सहकार खात्याला बेकायदा सावकारांवर कारवाई करण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्यानुसार ही पुण्यातील पहिलीच कारवाई आहे. जिल्ह्यात एक हजार ३०० परवानाधारक सावकार आहेत. या दोघांनी परवाना घेतलेला नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस आणि सहकार खात्याकडून संयुक्तपणे करण्यात येत आहे,’ असे लावंड म्हणाले.

‘व्याजावर पैसे दिलेल्या व्यक्तींना कोर्टात दावे दाखल करण्यास खात्यातर्फे सूचित करण्यात आले आहे. अन्य कोणत्याही व्यक्तींची दोघांनी फसवणूक केली असल्यास किंवा त्यांच्याकडून दमदाटीने मालमत्ता नावावर करून घेतली असल्यास सहकार खात्याकडे संपर्क साधावा,’ असे आवाहन लावंडे यांनी केले. उपनिबंधक पोखरकर यांच्या नेतृत्त्वाखाली डी. एस. सोनवणे, बी. एल. साबळे, ए. टी. जाधव, एस. पी. मोरे, एस. ए. साळसकर, बी. एस. घुगे यांनी ही कारवाई केली.

डॉक्टर ते सावकार!

एरंडोल कुटुंब मूळचे सांगली येथील आहे. विजय एरंडोल हे डॉक्टर असून, मेडिकल ऑफिसर म्हणून ते निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांनी सावकारीचा व्यवसाय सुरू केला. लोकांना आपली माहिती सहजपणे मिळू नये, यासाठी हे कुटुंब सतत राहण्याचे ठिकाण बदलत असतात. स्वतःच्या मालकीचे घर न घेता भाडेतत्त्वावर फ्लॅट घेऊन राहण्याची त्यांची पद्धत आहे. सध्याचे घरदेखील यांनी भाड्याने घेतलेले आहे. एरंडोल हे स्वतः डॉक्टर असल्याचे सांगत असले, तरी त्याबाबतची कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याचे ​पोखरकर यांनी स्पष्ट केले.

कारवाई अन् मॅच

सहकार विभागाच्या पथकाने छापा टाकल्यावर त्यांच्याकडून घरातील कागदपत्रे ताब्यात घेण्याची कारवाई सुरू होती. त्या वेळी विजय एरंडोल हे शांतपणे खुर्चीत बसून आयपीएलची मॅच बघत बसले होते. ही कारवाई सात एप्रिलला सकाळी साडेनऊ वाजता सुरू करण्यात आल्यावर रात्री दहापर्यंत तपास करण्यात येत होता. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना माहिती देण्याऐवजी मॅच बघून एरंडोल हे कारवाईचा आनंदच घेत होते, असे अधिकाऱ्यांनी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षांच्या नाटकाची ‘नांदी’

$
0
0

Chintamani.Patki @timesgroup.com
Tweet : @chintamanipMT

पुणे : उस्मानाबाद येथे होणाऱ्या नाट्य संमेलनात संमेलनाध्यक्षांचे केवळ भाषणच नाही, तर त्यांचा नाट्याविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेच अध्यक्षपदाची झूल उतरवून जयंत सावरकर आपला नाट्याविष्कार घडविणार आहेत. संमेलनातच अध्यक्षांचे नाटक सादर होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

‘९७ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन २१ ते २३ एप्रिल या कालावधीत उस्मानाबाद येथे होणार आहे. संमेलन आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने तयारीला वेग आला आहे. २१ तारखेला सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी उस्मानाबादचे पालकमंत्री आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर व आयोजक विशाल शिंगाडे यांनी दिली.

मुख्य रंगमंच असलेल्या तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे उद्घाटनानंतर ‘तुझे आहे तुजपाशी’ या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग होणार आहे. सावरकर यांनी उंचीवर नेऊन ठेवलेली ‘आचार्य’ ही भूमिका सावरकर पुन्हा जिवंत करणार आहेत. संमेलनाध्यक्ष असण्याचा कसलाही अभिनिवेश न बाळगता सावरकर यानिमित्ताने आपली कला सादर करणार असून त्यांच्या रंगभूमीशी असलेल्या निष्ठेचे दर्शन हा कलाकारांसाठी एक वस्तुपाठ ठरणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने १६ तारखेपासून नाट्य महोत्सव होणार आहे.


संमेलनाची तयारी सुरू

संमेलनाच्या आयोजनाची तयारी जोरात सुरू असून, शहरातील चौकांच्या सुशोभीकरणाचे काम सुरू झाले आहे. रंगमंचाच्या उभारणीला वेग आला असून, पारंपरिक पद्धतीचा रंगमंच तयार करण्यात येत आहे. संमेलनाला रंगभूमीवरील कलाकार उपस्थित राहणार आहेत. कलावंत प्रतिनिधी आणि पाहुण्यांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य रंगमंच असलेल्या तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे ६८ हजार चौरसफूटांचा मांडव टाकण्यात येत आहे. याशिवाय रामकृष्ण परमहंस विद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे विविध कार्यक्रम होणार आहेत.


‘प्रयोगाबद्दल आनंदी’

वर्षानुवर्षे सहायक अभिनेता म्हणून काम करत आहे. सहायक अभिनेत्याला तसे वलय नसते. चांगला नट एवढेच म्हटले जाते; पण मला खूप प्रेम मिळाले आहे. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षापेक्षा नटाला दुसरा सर्वोच्च मान कोणता? मी गेली ४५ वर्षे संमेलनाला जात आहे. अनेक अभिनेते संमेलनाध्यक्ष झाले; पण त्यांचा प्रयोग झालेला नाही. अध्यक्षाचे नाटक सादर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकाच्या पुलंनी घेतलेल्या तालमी मी पाहिल्या आहेत. नाटकाचे चढउतार पाहिले आहेत. श्यामच्या भूमिकेनंतर आचार्यची भूमिका साकारत आहे. नाटकाचे अखेरचे प्रयोग सुरू असून संमेलनात प्रयोग होणार असल्याने मी आनंदी आहे.

- जयंत सावरकर, नियोजित नाट्य संमेलनाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक बालवडकर यांना जामीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वाहतूक पोलिसांबरोबर हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांची १५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. भंडारवार यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर (रा. बालेवाडी) यांना प्रकरणात बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्यातर्फे कोर्टात जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यांच्या अर्जाला सरकारी वकील एस. सी. शिंदे यांनी विरोध केला होता. गुरुवारी कोर्टाने बालवडकर यांचा जामीन अर्ज मंजूर केला. त्यांची १५ हजार रुपयांच्या जामीनावर सुटका करण्याचा आदेश दिला. त्यांनी दर महिन्याच्या एक तारखेला पोलिसांकडे हजेरी द्यावी. साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये. पोलिसांना तपासात सहकार्य करावे, असे कोर्टाने दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कलेच्या क्षेत्रात ऊर्जा वापरा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘तरुण वयात नाटक करायचे राहून गेले. त्यामुळे चुकल्या चुकल्यासारखे वाटते,’ अशी भावना व्यक्त करतानाच ‘आपली ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरा, ती कलेच्या क्षेत्रात गुंतवा. कलेच्या दिशेकडे तुमची ऊर्जा वळवली, तर भविष्यात रेव्ह पार्टीवर कधीही छापा मारावा लागणार नाही,’ अशा शब्दांत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी युवकांशी संवाद साधला.

सामाजिक-आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमीतर्फे आयोजित ४४ व्या फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात नांगरे-पाटील बोलत होते. तरुणांच्या गर्दीने आणि उत्साही जल्लोषाने तुडुंब भरलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सोहळा रंगला. या वेळी पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, उद्योजक अरुण फिरोदिया, जयश्री फिरोदिया, बांधकाम व्यावसायिक श्रीकांत आणि शशांक परांजपे सूर्यकांत कुलकर्णी उपस्थित होते.

‘फिरोदिया करंडक स्पर्धेची संकल्पना वेगळी आहे. सर्व विद्या आणि कलांचा संगम येथे पाहायला मिळतो. संगीत, नाट्य , नृत्य, गायन अशा विविध कलाप्रकारांच्या छटा यात पाहायला मिळतात. तरुणांनी ज्या पद्धतीने सादरीकरण केले, त्यामुळे मी भारावून गेलो आहे. चाळीस मिनिटांत एवढे काही डोळ्यांपुढून गेले, की काय सांगू. आपले हे सारे करायचे राहूनच गेले, याची काहीशी चुटपूटसुद्धा मनाला लागली. १४ विद्या आणि ६४ कलांच्या आविष्काराला मी सलाम करतो, ’ असे नांगरे-पाटील म्हणाले.


निकाल : वैयक्तिक पारितोषिके

लेखक

प्रथम : निहार भावे (व्हीआयटी)
द्वितीय : गौरव बर्वे (स. प. महाविद्यालय)
तृतीय : ओंकार ठोंबरे (एमआयटी)

दिग्दर्शक

प्रथम : यश रुईकर (स. प. महाविद्यालय)
द्वितीय : निहार भावे (व्हीआयटी)
तृतीय : शुभम मुळे (पीआयसीटी)

अभिनय पुरुष

प्रथम : गौरव बर्वे (स. प. महाविद्यालय)
द्वितीय : अनुजसिंग राजपूत (एमआयटी), सेजल जगताप (पीआयसीटी)
तृतीय : पुष्कर शिंदे (एआयएसएसएमएस), मकरंद केंद्रे (एमआयटीसीओई)
उत्तेजनार्थ : मयुरेश बच्छाव (एसएओई), संकेत पारखे (फर्ग्युसन महाविद्यालय), ऋषिकेश पाठक (एमएमसीओई)

अभिनय स्त्री गट

प्रथम : साक्षी दिघे (व्हीआयआयटी)
द्वितीय : ऐश्वर्या गायकवाड (पीआयसीटी)
तृतीय : जान्हवी मुतालिक (एमआयटीसीओई)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडल अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

$
0
0

राजगुरूनगर : चाळीस हजार रुपयांची लाच घेताना चाकणचे मंडल अधिकारी राजाभाऊ सुंदरराव मोराळे याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास मंडल कार्यालयातच करण्यात आली.

खरेदी केलेल्या जमिनीमध्ये घेतलेल्या हरकतीचा निर्णय एकतर्फी देण्यासाठी मंडल अधिकारी मोराळे यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. संबंधित शेतकऱ्याने चाकण येथे जमीन खरेदी केली हेती. या जमिनीच्या नोंदीमध्ये हरकत घेण्यात आली होती. या हरकतींची सुनावणी मंडल अधिकारी मोराळे यांच्याकडे चालू होती. सुनावणीमध्ये तक्रारदाराच्या बाजूने एकतर्फी निर्णय देण्यासाठी मोराळे याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. तडजोड करून चाळीस हजार रुपये देण्याचे ठरले. ठरलेली रक्कम त्याच्या कार्यालयाच्या दरवाजातच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोराळे यास रंगेहाथ पकडले. मोराळे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून त्याच्यावर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अनघा देशपांडे, पोलिस निरीक्षक जालिंदर तांदळे, दीपक टिळेकर, प्रभा गायकवाड, चंद्रकांत करुणाकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजेय झणकरांच्या आठवणींना उजाळा

$
0
0

पुणे : जाहिरात, चित्रपट निर्माता, कथा-पटकथा संवादलेखक, जाहिरातपटाची निर्मिती अशा जीवनाच्या सर्वच क्षेत्रात ‘अजेय’ ठरलेल्या अजेय झणकर यांच्या आठवणींचा जागर करण्यात आला. चळवळीतील कार्यकर्ता, लेखनामागचा माणूस प्रवाह आणि समाजभान जाणून घेणारा संवेदनशील माणूस…माणसावर आणि जगण्यावर प्रेम करणारा अशा झणकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. त्याच्यांतील एक तरी गुण अंगी बाणवण्याचा संकल्प करून त्यांना आदरांजली अर्पण केली.

अजेय झणकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी झालेल्या सभेत ‘मार्केट मिशनरीज’मधील सहकारी जगदीश पाटणकर, विजय ठोंबरे, प्रवीण महाजन, डॉ. भूषण पटवर्धन, लता भिसे, ‘मेड इन चायना’चा निर्माता संतोष कोल्हे, प्रसाद मिरासदार यांनी मनोगत व्यक्त केले. झणकर यांची कन्या सानिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘अजेय झणकर यांच्या कलाकृती पडद्यावर पाहताना त्यांच्या अफाट कामाची प्रचिती सर्वांना आली. सामाजिक जाणीवा असलेला अजेय ठाऊक होता. मात्र, नंतरच्या काळात त्याची घोडदौड मी दुरून पाहत होतो,’ असे प्रवीण महाजन यांनी सांगितले. ‘वारणाची उत्पादने घरोघरी पोहोचविण्याचे श्रेय अजेयकडेच जाते,’ असे भूषण पटवर्धन यांनी सांगितले. ‘पुसू’ संघटनेचा कार्यकर्ता म्हणून चळवळीतील अजेयच्या योगदानावर लता भिसे यांनी प्रकाश टाकला. ‘सरकारनामाच्या घडणीचा व्हिडीओपट करण्याची संधी अजेयने दिली होती. त्याची सामाजिक जाणीव, राजकीय आणि साहित्यिक ज्ञान ठाऊक असल्याने मी ‘मेड इन चायना’ चित्रपटाच्या संवादलेखनाची कामगिरी सोपविली होती. त्या वेळी चित्रपटाचे शीर्षक मराठीच ठेव हा त्याचा सल्ला मानला असता तर कदाचित त्याला अधिक यश लाभले असते,’ अशी आठवण संतोष कोल्हे यांनी सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत ‘आयपीएल’वर बेटिंग; तिघांना अटक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेणार्‍या अड्ड्यावर पिंपरी पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. पिंपरी येथील शगुन चौकातील कॉटन किंग दुकानावर तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या बेटिंगच्या अड्ड्यावर रात्री साडे अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राम गोविंद बजाज (वय ४६), अनिल दीपकलाल दर्डा (३९) आणि गोविंद प्रभुदास ललवानी (४०, रा. पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हवालदार शाकीर जिनेडी यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.
वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलमध्ये सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइज हैदराबाद या सामन्यावर पिंपरी येथील शगुन चौकात बेटिंग सुरू असल्याची माहिती फौजदार हरिश माने यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने बेटिंगच्या सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकून तिघांना अटक केली. याठिकाणी बेटिंगसाठी लागणारे एलसीडी टीव्ही, दोन लॅपटॉप, १८ मोबाइल संच, गिऱ्हाइकाने लावलेली बेटिंगचे सांकेतिक भाषेत लिहलेल्या वह्या आणि ४,३०० रुपये असा एकूण एक लाख २१ हजार ९९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फौजदार विठ्ठल बढे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवशक्ती संगमानंतर ‘ग्रामसंगम’

$
0
0

पिंपरी- शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी उठविलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर संघाने दक्ष भूमिका घेत शिवशक्ती संगमाकडून ग्रामसंगमाकडे वाटचाल सुरू केली आहे. वर्षभरापूर्वी हिंजवडीनजीक मारुंजीच्या संघस्थानावर भरलेल्या शिवशक्ती संगमानंतर त्याच ठिकाणी संघाने रविवारी ग्रामसंगमाची मुहूर्तमेढ रोवली. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे दोन महिन्यांपूर्वी ग्रामसंगमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर हिंजवडीच्या मारुंजी येथे रविवारी (९ एप्रिल) एक दिवसीय ग्रामसंगमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी कर्ज माफीचा मुद्दापुढे करत काही दिवसांपासून रान पेटवले आहे; तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार कोंडीत सापडले होते. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या प्रकरणात आता उडी घेतली आहे. आपल्या संघशिस्तीला अनुसरून बौद्धिकवर्ग घेत सरकारचा भार हलका करण्याचा प्रयत्न संघाकडून सुरू झाला आहे. संघाकडून ग्रामविकासावर अनेक उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबविले जातात. ग्रामसंगम हा त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जाते.
पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील काही मोजक्या स्वयंसेवकांना एकत्र करत ग्रामसंगम या ग्रामविकासावर आधारीत एक दिवसीय शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होत. संघाचे प्रांत कार्यवाह विनायक थोरात, विभाग कार्यवाह मिलिंद देशपांडे, प्रांत प्रचारक अतुल लिमये, प्रांताचे ग्रामविकास प्रमुख प्रसाद देशपांडे, जिल्हा ग्रामविकास प्रमुख मधुकर भोसले आदींसह प्रमुख उपस्थित होते. कामास सुरुवात केली आहे, येत्या काळात नियोजन पक्के करण्यात आल्याचे मिलिंद देशपांडे यांनी सांगितले.
या वर्गाबाबत भाजपचे जिल्ह्यातील अनेक दिग्गज पदाधिकारी अनभिज्ञ होते. मारुंजीच्या संघस्थानाजवळच असलेल्या एका शेतात झालेल्या या वर्गास पश्चिम महाराष्ट्रातील जबाबदारी असलेल्या प्रमुख स्वयंसेवकांसह पुणे जिल्ह्यातील २९ गावांमधून संघाशी थेट संबंध नसलेले परंतु काम करण्यास इच्छुक असणारे सुमारे २०० युवकांची विशेष हजेरी होती. या वेळी ग्रामविकास संकल्पनेवर आधारित प्रस्ताविक झाल्यावर प्रगतीशील गावांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. तसेच, आगामी कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. प्रसाद देशपांडे यांनी प्रास्ताविक करून संकल्पना मांडली.
पूर्वी आपली खेडी पूर्णत: स्वावलंबी होती; मात्र काळाच्या ओघात ही व्यवस्था कोलमंडली. यातून बाहेर येण्यासाठी काही ठरावीक गावांनी पुढाकार घेत आदर्शग्रामची संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ शासन, नेतेमंडळी आणि सरकारी योजनांवर अवलंबून न राहता स्वयंस्फूर्तीने कार्यरत राहण्याचा संदेश या वेळी एका वक्त्याकडून देण्यात आला. तसेच हा संदेश प्रत्येक स्वयंसेवकामार्फत गावागावापर्यंत पोहचवत राहा असे आवाहन देखील करण्यात आले.
आघाडी सरकारच्या काळात सिंचनाची कामे कमी झाल्यामुळे शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली; तसेच कर्जमाफी हा रामबाण उपाय नसून शेतीक्षेत्रात गुंतवणुकीशिवाय पर्याय नसल्याचे मुख्यमंत्र्यांकडून ठासून सांगितले जात आहे. मात्र, पक्षसंघटना म्हणून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात भाजप कमी पडत असल्याचे सध्याचे चित्र असल्याचे बोलले जात आहे. त्यातच विरोधकांची संघर्ष यात्रा चर्चेत राहिल्यामुळे देवेंद्र सरकारवर निर्माण झालेला दबाव कमी करण्याचा प्रयत्न ग्रामसंगमाच्या माध्यमातून होत आहे. हिंजवडीमध्ये ज्या पद्धतीने आयटी पार्कचा विकास झाला, तसा विकास ग्रामसंगमातून भविष्यात शेतकऱ्यांचा होणार का खरा प्रश्न आहे.


ग्रामसंगमाद्वारे लोकांच्या सहभागातून लोकांसाठी शाश्वत विकास करण्याचे ध्येय्य आहे. पुढील तीन वर्षांचे नियोजन करण्यात आले आहे. शेतीसह ग्रामविकासात सामाजिक शिक्षण, स्वाथ्य, स्वावलंबन, समरसता, सुरक्षितता आदी मुद्यांवर काम करणार आहोत. ग्रासमिती स्थापन केली असून, त्यातील कोणाचा कल कोणत्या आयाममध्ये काम करण्याकडे आहे हे प्रथम वर्षात पाहणार आहोत. त्यानंतर पुढील नियोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४० गावे यासाठी निश्चित करण्यात आली असून, २९ गावांमधून स्वयंसेवक आणि समितीत काम करण्यास इच्छुकांनी ग्रामसंगमाला हजेरी लावली.
- मधुकर भोसले,
जिल्हाप्रमुख, ग्रामविकास

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी चौघे अटकेत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
व्यापाऱ्यांकडून उधारीवर घरगुती वापराच्या वस्तू घेऊन त्या कमी किमतीत विकल्यावर पैसे न देता एक कोटी रुपयांची दोन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी पैशांची मागणी केल्यावर ‘आत्महत्या करून चिठ्ठीमध्ये तुझे नवा लिहून तुला अडकवू,’ अशी धमकी दिल्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे.
रितेश उर्फ चुवडमल जेसवानी (वय २७, रा. पिंपरी कॅम्प), चुवडमल देवनदास जेसवानी (५७, रा. पिंपरी कॅम्प), विशाल चुवडमल जेसवानी (२५, रा. पिंपरी कॅम्प), हरेश देवनदास जेसवानी (६२, रा. काळेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सचिन सुरेंद्र मागू (३२, रा. सिंधू पार्क सोसायटी, रहाटणी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन मागू यांच्यासह त्यांच्या चार मित्रांची देखील अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मागू यांचा वेगवेगळ्या कंपन्यांच्या घरगुती वापराच्या वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. सप्टेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीमध्ये आरोपींनी मागू यांच्या दुकानातून उधारीवर घेतला. मागू यांच्या साई चौक, शगून चौक, पिंपरी आणि चिंचवड लिंक रोड येथील दुकानांसह मित्रांच्या दुकानातून आरोपींनी माल घेतला होता. मोठ्या प्रमाणात माल असल्याचे उधारीवर किंवा उद्या पैसे आणून देतो असे सांगत आरोपी वस्तू घेऊन जात होते. कालांतराने यासाठी अकाउंटमध्ये पैसे नसताना देखील चेक देऊन फसवणूक केली. तसेच पैशांची मागणी केली असता, आमच्याकडे पैसे नाहीत. सारखे पैसे मागितल्यास ‘आत्महत्या करून चिठ्ठीमध्ये तूझे नवा लिहून तुला अडकवू’, अशी धमकी दिली. या प्रकरणी फौजदार विठ्ठल बढे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्वदीतल्या तरुणांचे विनोदी षटकार...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रसिकांनी खचाखच भरलेल्या सभागृहात नव्वदीतल्या दोन तरुणांनी चौफेर फटकेबाजी करत विनोदांचा फड रंगवला... त्यांच्या चौफेर फटकेबाजीने सभागृह दणाणून गेले आणि विनोदाचे फवारे अंगावर झेलत रसिकांनी हे अविस्मरणीय क्षण मनात साठवून घेतले. गुरुवारची संध्याकाळ या अविस्मरणीय क्षणांची साक्ष देणारी ठरली. एकीकडे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि दुसरीकडे ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी सभागृहाचा ताबा घेऊन विनोदाचे एकामागून एक षटकार मारत रसिकांना निखळ विनोदाची मेजवानी दिली.
ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार आज ९१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त गुरुवारी टिळक स्मारक मंदिरात आयोजित कार्यक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. संस्कृत भाषेतील मानपत्र, पंढरपूरच्या विठोबाची पगडी आणि तुळशीची माळ देऊन मिरासदार यांचा सन्मान करण्यात आला. महापौर मुक्ता टिळक, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अभिनेते रवींद्र मंकणी, मिरासदार यांच्या कन्या सुनेत्रा मंकणी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी आदी या वेळी उपस्थित होते. नव्वदी पार केलेल्या या दोन तरुण दिग्गजांनी आपल्या विलक्षण प्रतिभेने रसिकांना अक्षरशः डोक्यावर घेतले. तरुणपणीची मैत्री, त्या वेळच्या आठवणी आणि असंख्य किस्से रंगवत दोघांनी रसिकांना विनोदाची सैर घडवली.
बाबासाहेबांनी मिरासदार यांच्या हजरजबाबीपणाचे अनेक किस्से रंगवत सभागृहात हशा पिकवला. ‘दादासाहेबांचा (द. मा. मिरासदार) हजरजबाबीपणा विलक्षण होता. त्यांच्या विनोदांनी कधी कुणाला जखमा केल्या नाहीत. महाराष्ट्र त्यांच्या विनोदामुळे कायम हसला. अनेक दुःखाच्या प्रसंगात दादासाहेब माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या स्वभावातला खेळकरपणा त्यांच्यातील विनोदबुद्धीचे मूळ कारण आहे. दादासाहेब, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांच्यामुळे महाराष्ट्राने कथाकथन अनुभवले,’ असे पुरंदरे यांनी सांगितले. मिरासदारांसोबतच्या अनेक विनोदी किश्श्यांना रंगवत पुरंदरे यांनी सभागृह दणाणून सोडले. माझ्या १११ व्या वाढदिवसाला दादासाहेबांनी यावे, अशी इच्छाही पुरंदरे यांनी व्यक्त केली. जगण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळेच ही मंडळी आजही रसिकांवर राज्य करत आहेत, याचा प्रत्यय या वेळी आला.
त्यानंतर दादासाहेब शांत राहिले असते तर नवलच. त्यांनीही आपल्या खणखणीत आवाजात विनोदाचे षटकार मारायला सुरुवात केली. राजकारणात विनोदाला खूप मोठे स्थान आहे, असे सांगत त्यांनी इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि तारकेश्वरी सिंह यांचे संसदेतले किस्से रंगवले. ‘माणसाच्या आयुष्यात प्रचंड दुःख येते. सुखाचे क्षण खूप कमी असतात. पण विनोद हा माणसाला घटकाभर का होईना; दुःख विसरायला लावतो. अर्ध्या तासाच्या व्याख्यानापेक्षा एका ओळीच्या विनोदामध्ये विलक्षण ताकद असते,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रकाश जावडेकर, मुक्ता टिळक यांनीही या वेळी आपले विचार मांडले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.

तावडेंची दांडी
द. मा. मिरासदार यांच्या सन्मानासाठी आयोजित केलेल्या या सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार होते. परंतु, मुंबईत मुख्यमंत्र्यांनी शिवस्मारकाविषयी तातडीची बैठक बोलावल्याचे कारण देऊन त्यांनी कार्यक्रमाला दांडी मारली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना विधी (लॉ) अभ्याक्रमाला प्रवेश देता येत नाही, असा नियम बार कौन्सिल ऑफ इंडियाने नियमावलीत अधोरेखित केला आहे. असे असताना देखील शहरातील काही प्रमुख कॉलेजांनी विद्यापीठातून पदवी घेतलेल्या मुलांना २०१६ -१७ शैक्षणिक वर्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे कॉलेजांच्या या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. परिणामी अशा मुलांचे विधीच्या अभ्यासक्रमाला घेतलेले प्रवेश रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुक्त विद्यापीठातून अनेक विद्यार्थी पदवी प्राप्त करून विविध विद्यापीठांमध्ये विविध विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतात. मात्र, बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार मुक्त विद्यापीठातून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येत नाही, असे राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी सांगितले. तरीही काही विधी कॉलजांनी मुक्त विद्यापीठातून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना विधीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिले आहेत.
विद्यार्थिनी रेणुका चलवाणी म्हणाल्या, ‘गेल्या वर्षी विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी सामाईक परीक्षा दिली. अर्ज करताना मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली असल्याची नोंद केली होती. तेव्हा कोणत्याही प्रकारची हरकत घेण्यात आली नाही. परीक्षेच्या माध्यमातून मला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. कॉलजामध्ये तीस हजार शैक्षणिक शुल्क भरल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर कॉलेज प्रशासनाला जाग आली व तुमचा प्रवेश कोणत्याही क्षणी रद्द करू, असे सांगण्यात आले आहे. तसेच लेखी निवेदन सुद्धा माझ्याकडून घेण्यात आले आहे. मुक्त विद्यापीठाच्या पदवीच्या आधरे विधीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले इतर विद्यार्थीदेखील आहेत. त्यामुळे आम्ही भयभीत झालो आहोत.’ दरम्यान, विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दहावी, बारावी आणि पदवीची तीन वर्षे रेग्युलर कॉलेज केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याचा बार कौन्सिलचा निर्णय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळेगावात भरदिवसा प्राणघातक हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी लोणावळा
तळेगाव दाभाडे येथे एका तरुणावर पाच अज्ञात हल्लेखोरांनी कोयता व तलवारीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा प्रकार गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास तळेगाव रेल्वे स्टेशन रोडवर यशवंतनगर येथे घडला. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
गणेश सीताराम गायकवाड (वय २२, रा. सिद्धार्थनगर, तळेगाव दाभाडे) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गणेश याचे वडील सिताराम बाबू गायकवाड (वय ५०, रा. सिद्धार्थनगर, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा आरोपी गोपी उर्फ केदार (पूर्ण नाव माहीत नाही) याच्या वहिनीला त्रास देत होता. या कारणावरून हा हल्ला करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले असून, तळेगाव पोलिस त्यांचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगावचे सहायक पोलिस निरीक्षक विकास दिंधुरे हे करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images