Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सोशल युगातही तरुणपिढी एकटीच

$
0
0

आभासी संवाद वाढला; भावनिकतेचे प्रमाण घटल्याचे निरीक्षण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे तरुणाई जगभरातील मित्र-मैत्रिणींशी संवाद साधत आहे. सोशल नेटवर्किंगच्या मदतीने शाब्दिक देवाणघेवाण होत असली तरी, भावनिक नाते हरवत चालले आहे. त्यामुळे तरुणपिढी नैराश्याच्या खाईत लोटली जात असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
आज, गुरुवारी जागतिक आरोग्य दिन पाळण्यात येतो. त्यानिमित्ताने यंदा ‘चला, संवाद साधू या’ ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर मानसोपचार तज्ज्ञांशी संवाद साधला असता, त्यांनी सोशल मीडियाचा वापर वाढला असला तरी, ती वाटचाल नैराश्याकडे होत असल्याचे नमूद केले. भावनिक एकटेपणामुळे तरुणपिढीत नैराश्य वाढल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
‘सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे आभासी संवादाचे प्रमाण वाढले आहेत. आठवणींपासून ते सवयीपर्यंतच्या सर्वच गोष्टी येथे मांडल्या जातात. संवाद होणे ही मानवी मनाची प्राथमिक गरज असून, ती नेमकी पूर्ण करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे सोशल मीडियासारखी माध्यमे असली तरी अनेकांचे भावनिक नाते जुळत नसल्याने नैराश्य वाढत आहे,’असे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्वप्नील देशमुख यांनी नोंदविले.
नैराश्याची अवस्था मेंदूतील रासायनिक बदलांमुळे तयार होते. तरीही प्रेम, जिव्हाळा आणि सशक्त कुटुंब यावर नैराश्याचे प्रमाण कमी होऊ शकते. नैराश्यामुळे तरुण पिढीला भावनिकद़ृष्ट्या एकाकी, शारीरिक तसेच लैंगिकदृष्ट्या कजोर आणि असहाय असल्याचे वाटते. आपण सर्वांना नकोसे झालो आहोत, अशी भावना त्यांच्या मनात रूजायला सुरू होते, असेही डॉ. देशमुख यांनी नमूद केले.
‘सोशल माध्यमांमध्ये सातत्याने गुंतून राहिल्याने दैनंदिनी बिघडून जाते. जेवण, नोकरी, तसेच वेळेवर झोपणे यावरही विपरित परिणाम होतो. गृहिणींचे मुलांकडे दुर्लक्ष होते. अप्रत्यक्षरित्या जोडीदाराकडेही दुर्लक्ष होत असल्याने वादांना तोंड फुटते,’ याकडे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मंजिरी दीक्षित यांनी लक्ष वेधले. ‘सामान्यांच्या तुलनेत लठ्ठ व्यक्तींमध्ये मानसिक समस्या अधिक असतात. लठ्ठपणाचा मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे फिरणे, जीवनाचा आस्वाद घेणे किंवा व्यायाम करण्यावर मर्यादा येतात. लठ्ठपणामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सतर्कता बाळगणे आवश्यक आहे,’ असा सल्ला कोलंबिया आशिया हॉस्पिटलमधील मानसोपचार सल्लागार डॉ. सायंतनी मुखर्जी यांनी दिला.

सोशल मीडियाद्वारे हजारो व्यक्ती संवाद साधत असल्या तरी प्रत्यक्षात संवाद साधणारी व्यक्ती एकटीच असते. त्यातून एकलकोंडेपणा वाढत जाऊन त्याचे रुपांतर नैराश्यात होते. त्यामुळे सोशल मीडिया असूनही तरुण पिढी एकटीच आहे, असे म्हणायला हरकत नाही.
डॉ. मंजिरी दीक्षित, मानसोपचार तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिकलेला हशा अन् टाळ्यांची दाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अच्छे दिनांपासून पारदर्शकतेपर्यंत, सेल्फीच्या रोगापासून ते पुणेरी स्वभावापर्यंत अनेक विषयांवर चौफेर फटकेबाजी करून हास्यकवी अशोक नायगावकर यांनी बुधवारची सायंकाळ दणाणून सोडली. प्रत्येक वाक्यागणिक पिकलेला हशा आणि रसिकांची मिळालेली भरभरून दाद झेलून नायगावकरांनी मिश्कीलपणे पुणेकरांच्या मर्मावर बोट ठेवले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित माधवराव पटवर्धन सभागृहात रंगलेल्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी नायगावकरांशी संवाद साधला. ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, प्र.ना.परांजपे आदी या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच नायगावकर यांनी सभागृहाचा ताबा घेतला. ‘अफवांवर विश्वास ठेवू नका’ ही कविता सादर करून त्यांनी सध्या परवलीचे शब्द असलेल्या अच्छे दिन आणि पारदर्शकतेची खिल्ली उडवली. ‘शाकाहारी’ ही कविता सादर करून त्यांनी वांगी आणि भोपळ्याचे दुःख मांडले. भाजा, फळे, मसाले स्वयंपाकघरात कसे चिरडले जातात, याचे वर्णन कवितेतून मांडत नायगावकर यांनी रसिकांना पोटधरून हसण्यास भाग पाडले. एरवी गंभीर चेहऱ्याने वावरणारे रसिक नायगावकर यांच्या एकामागून एक टाकलेल्या गुगलीला दिलखुलास दाद देत होते. तब्बल दीड तास सभागृहात हास्याचे फवारे उडत होते. ‘निसर्गाचा घोटाळा’ ही कविता आणि भोपाळ दुर्घटनेवरील कविता सादर करून त्यांनी रसिकांना विचार करायला भाग पाडले.
‘सध्या स्वतःला कवी म्हणवून घेणारे लोक कविता वाचतच नाहीत. कवितेच्या क्षेत्रातील दिग्गजांची नावेही त्यांना माहीत नसतात. तरीही त्यांना कवितेची पुस्तके काढायची असतात. सांस्कृतिक क्षेत्रातील माणसांमुळेच महाराष्ट्र टिकून राहिला आहे. परंतु, हे आजच्या पिढीला कळत नाही. सध्याचे शहरातले वातावरण साहित्य आणि संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत गढूळ झाले आहे. प्रत्येकाला चंगळ करायची आहे. ग्रामीण भागात कलेची आसक्ती थोड्या प्रमाणात राहिली आहे. त्यामुळे, शहरी समाजाबद्दल मी आशा सोडून दिल्या आहेत,’ अशी खंत नायगावकर यांनी व्यक्त केली.
मुंबई आणि पुणे आता साहित्यकेंद्र राहिले नसून, ग्रामीण भाग साहित्याच्या केंद्रस्थानी येत आहे. ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. ग्रामीण भागातील लेखकांची, कवींची विलक्षण प्रतिभा रसिकांच्या समोर येत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजच्या सामन्यासाठी सातशे पोलिस तैनात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर गुरुवारी आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंट आणि मुंबई इंडियन्स यांच्यात टी-२०क्रिकेटचा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसदलाचे सातशे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
गहुंजेतील मैदानावर रात्री आठ वाजता हा सामना होणार आहे. सामन्यासाठी व्हीव्हीआयपी, व्हीआयपी, कलाकार, परदेशी नागरिक येणार आहेत. त्यामुळे कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. मैदानाची क्षमता ३६ हजार असून, दहा हजार चारचाकी आणि पाच हजार दुचाकी वाहने येण्याची शक्यता आहे. बंदोबस्तासाठी दोन अतिरिक्त पोलिस अधीक्षक, तीन पोलिस उपअधीक्षक, १९ पोलिस निरीक्षक, ६१ सहायक निरीक्षक- उपनिरीक्षक, चारशे पोलिस कर्मचारी, ५० महिला कर्मचारी, १५० वाहतूक शाखेचे कर्मचारी, बीडीडीएसची आठ पथके, क्युआरटी आणि आरसीपीचे प्रत्येकी एक पथक राहणार आहे.
सामना पाहण्यासाठी येणाऱ्यांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आहे. चारचाकी वाहन चालकांनी पुणे-मुंबई महामार्गावरील किवळे ब्रिजच्या अगोदर डाव्या बाजूने सर्व्हिस रोडने जावे. दुचाकी चालकांनी राष्ट्रीय महामार्ग चारवरून मामुर्डी जकातनाका शितळादेवी मार्गे गावातून मैदानाकडे जावे. नागरिकांनी सामना सुरू होण्यापूर्वी तीन तास अगोदर निघावे. व्हीव्हीआयपींना गेट क्रमांक दोन तर, नागरिकांना गेट क्रमांक दोन आणि तीनमधून प्रवेश दिला जाणार आहे. मैदानाकडे जाताना नागरिकांना साहित्य नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ नेण्यास आयोजकांनी बंदी घातली आहे.
खेळाडू, पंच, परदेशी नागरिक यांना त्रास होईल, असे वर्तन करू नये. संशयास्पद वस्तू आढळून आल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांना खाक्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाहतूक पोलिसांनी बुधवारी वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांच्या विरोधात विशेष मोहीम उघडली. या मोहिमेत वाहन चालवित असताना मोबाइलवर बोलणाऱ्या २६४ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी २४९ जणांचा वाहन परवाना जप्त करून रद्द करण्यासाठी आरटीओकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.
वाहतूक सुधारण्यासाठी पोलिसांकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. मोबाइलवर बोलताना वाहन चालविण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी शहारातील सर्व वाहतूक विभागांना वाहन चालवित असताना मोबाइलवर बोलणाऱ्यांच्या विरोधात कारवाईच्या सूचना दिल्या. अगोदर फोटो काढा आणि मगच कारवाई करण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले होते.
वाहतूक शाखेच्या २८ विभागांमध्ये ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये २६४ दुचाकीचालकांना गाडी चालू असताना मोबाइलवर बोलताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यापैकी २४९ वाहन चालकांचे परवाने जप्त करण्यात आले आहेत. हे परवाने आरटीओकडे रद्द करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. खडकीत २५ आणि विश्रांतवाडीत १७ जणांवर कारवाई करण्यात आली. डेक्कन, बंडगार्डन, पिंपरी, कोथरूडमध्ये प्रत्येकी १५ जणांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलांना कोटमुक्ती

$
0
0

तीन महिने काळ्या कोटाविना कामकाजाची मुभा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे वापरणे शक्यतो टाळले जाते. कोर्टात पक्षकारांची बाजू मांडणारे वकील मात्र याला अपवाद ठरतात. आपल्या पेशाची ओळख सांभाळण्यासाठी त्यांना दिवसभर काळ्या कोटातच वावरावे लागते. या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात काळ्या कोटाचा त्रास होऊ नये यासाठी वकिलांना १५ मार्च ते १५ जूनपर्यंत काळा कोट न वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे वकिलांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
उन्हाच्या तीव्र झळा, वाढते तापमान यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. कोर्टात पक्षकारांची बाजू मांडणाऱ्या वकिलांचा काळा कोट हा ड्रेसकोड ठरविण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळा असो की पावसाळा त्यांना तो पाळावाच लागतो. न्यायाधीशांपुढे बाजू मांडण्यासाठी येणाऱ्या वकिलांनी ड्रेसकोड पाळला आहे अथवा नाही याची दखल घेतली जाते. प्रसंगी न्यायाधीशांकडून वकिलांना ड्रेसकोड न पाळल्याबद्दल सुनावलेही जाते. त्यामुळे कोर्टापुढे हजर होताना प्रत्येक वकील ड्रेसकोडबाबत पुरेसा दक्ष असतो.
उन्हाळ्यात काळ्या कोटामुळे युक्तिवाद करताना वकिलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना तीन महिने कोट न वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. दर वर्षी १५ मार्च ते १५ जून या कालावधीत वकिलांना काळा कोट न वापरण्याची मुभा देण्यात येते. राज्यातील ज्या भागात तापमान सर्वाधिक असते तेथील वकिलांना या निर्णयाचा फायदा होता. मात्र, तुलनेने कमी तापमान असलेल्या भागातील वकील काळा कोट वापरण्यास प्राधान्य देतात, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. हेमंत झंजाड यांनी दिली.
‘कोर्टाकडून काळा कोट न वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचा फायदा वकिलांना नक्की होतो. काळा कोट वापरायचा किंवा नाही हे प्रत्येकाच्या आवडीनुसारही ठरते. महिला वकिलांनाही या सवलतीचा फायदा होतो. मात्र, कोटाची सवय झाल्यामुळे तसेच कोर्टात हजर होताना अंगावर काळा कोट हवाच या नियमामुळे बहुतांश ज्युनिअर वकील भर उन्हाळ्यातही कोट घालणे पसंत करतात,’ असे अॅड. ज्योती जाधव यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील वकिलांना दिलासा
काही कोर्टांमध्ये पंखे, कुलर उपलब्ध नसतात. बहुतांश सुनावणीच्यावेळी हॉलमध्ये गर्दी झाल्यामुळे वकील, पक्षकार आणि न्यायाधीशही घामेघूम होतात. तालुका कोर्टांमध्ये भारनियमनामुळे विजेचा पत्ता नसतो. अशा ठिकाणी कार्यरत मंडळींना या निर्णयाचा फायदाच होतो. बऱ्याच वकिलांना काळा कोट घालणे सवयीचे झाल्यामुळे अगदी उन्हाळ्यातही कोट घातला जातो, अशी माहिती अॅड. रोहित माळी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षित संवादासाठी ‘वर्कअॅप चॅट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पोलिस अधिकाऱ्यांमध्ये तत्काळ सुरक्षित संवाद व्हावा म्हणून पुणे पोलिसांनी ‘व्हॉट्स अॅप’सारखेच ‘वर्कअॅप चॅट’ नावाचे नवीन अॅप घेतले आहे. त्यामुळे पोलिस खात्याची गोपनीय माहिती सुरक्षित राहून एकाच वेळी सर्वांना संदेश पाठविता येणार आहे.

संवादासाठी पोलिस दलामध्ये सध्या व्हॉट्स अॅपचा वापर केला जातो. गोपनीय माहितीदेखील बऱ्याच वेळेला पाठविली जाते; पण व्हॉट्स अॅपवर संवाद साधताना ही माहिती सुरक्षित राहील याची खात्री नाही. कारण त्याचे सर्व्हर परदेशात आहेत. त्यामुळे काही गोष्टींची माहिती मिळविण्यासाठी वेळ जातो. या पार्श्वभूमीवर पोलिसांमधील संवाद सुरक्षित व अधिक चांगला व्हावा म्हणून पुणे पोलिसांनी सोल्युशन प्रा. लि. एंटरप्रायजेस टेक्नॉलॉजी कंपनीने तयार केलेले वर्कअॅप चॅट घेतले आहे. या अॅपचे सर्व्हर भारतात असल्यामुळे सर्व माहिती तत्काळ मिळू शकते; तसेच एकाच वेळी पोलिस आयुक्त दहा हजार पोलिसांना ही संदेश पाठवू शकतात. सध्या हे अॅप वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसाठी असेल. देशातील महत्त्वाच्या तपास यंत्रणा व अनेक कंपन्या या अॅपचा वापर करत आहेत. पोलिस अधिकारी व कर्मचारी हे वैयक्तीरीत्या किंवा ग्रुपपमध्ये सुरक्षितपणे चॅट करू शकतील. या अॅपमध्ये पुणे पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाणे व कार्यालयाचे क्रमांक राहतील, अशी माहिती सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘या अॅपप्रमाणेच नागरिकांसाठीदेखील नवीन अॅप विकसीत करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांसोबत काम सुरू आहे,’ असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक शिस्तीसाठी ‘ई-चलन’

$
0
0

‘सीसीटीव्ही’त नियमभंग हेरून मोबाइलवर दंडाचा मेसेज, फोटो पाठवणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील चौकांमध्ये वाहतूक पोलिस गैरहजर असल्याचे हेरून बिनधास्तपणे नियमभंग करण्यात धन्यता मानणाऱ्या वाहनचालकांना यापुढे जोरदार झटका बसणार आहे. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाईसाठी ‘सीसीटीव्ही’वर आधारित ‘ई-चलना’चा अवलंब केला जाणार आहे.
वाहनचालकाने नियमभंग केल्यानंतर त्याची कृती‘सीसीटीव्ही’मध्ये कैद होणार आहे. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच वाहनचालकाच्या मोबाइलवर दंडाचा मेसेज आणि त्याने नियमभंग केल्याचा फोटो पाठविला जात आहे. त्याचबरोबर संबंधिताला दंडाची रक्कम भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुधवारपासून योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील चौकांमध्ये एकूण १२३६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यापैकी २१७ ‘पीटीझेड’ कॅमेरे आहेत. या कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहनचालकाने झेब्रा क्रॉसिंग, नो-पार्किंग, ट्रीपलसीट, फॅन्सी नंबरप्लेट, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे आदी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांचा फोटो टिपला जाईल. या सर्व प्रकारावर देखरेख ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालयात स्वतंत्र कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे. वाहनचालकाने केलेल्या नियमभंगाची फोटोसह माहिती सॉफ्टवेअरद्वारे संकलित करण्यात येणार आहे. वाहनधारकाला मिळणाऱ्या मेसेजमध्ये दंडाची रक्कम भरण्याकरीता लिंक पाठवली जाते. त्या ‘लिंक’वर संबंधिताने गाडीचा क्रमांक आणि चलन क्रमांक टाकल्यावर त्याला आपल्या कृत्याची माहिती आणि फोटो दिसतील.
‘दोषी वाहनचालकांनी सात दिवसांमध्ये दंडाची रक्कम भरणे अपेक्षित आहे. वाहतूक पोलिसांनी आरटीओ आणि मोबाइल कंपन्यांकडून डेटा मिळविला आहे,’अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

नियमभंगाची माहिती येथे मिळेल
वाहनचालक punetrafficop.net या लिंकवर आपल्या गैरकृत्याची माहिती घेऊ शकतात. तसेच, दंडाची रक्कमही ऑनलाइन पद्धतीने जमा करू शकतात. या शिवाय चौकात उभारणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याकडील मशिनवर कार्ड स्वाइप करूनही दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दंडाचा भरणा रोख स्वरूपात करायचा असल्यास नजीकच्या वाहतूक विभागात किंवा व्होडाफोन स्टोअरमध्ये सोय करण्यात आली आहे, असेही डॉ. मुंढे यांनी नमूद केले. स्पार्कन आयटी सोल्युशन्स कंपनीने या योजनेसाठी वाहतूक पोलिसांना मदत केली आहे. ही योजना सहा महिने प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाणार आहे.

२०० ई-चलन मशिन
नियमभंग करणारे वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी रस्त्यांवर २०० ‘ई-चलन मशिन’उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या मशिनद्वारा वाहनचालकाने यापूर्वी किती वेळा नियमभंग केला आहे, याचीही माहिती उपलब्ध होणार आहे. या मशिनद्वारे थेट केलेल्या कारवाईअंतर्गत दंडाची पावती थेट वाहनचालकाच्या मोबाइलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कारवाईला व्हॉट्सअॅपची जोड
नजीकच्या काळात सामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. वाहनचालकाने नियमभंग केल्याचे स्पष्ट फोटो किंवा व्हिडिओ वाहतूक पोलिसांच्या ‘व्हॉट्सअॅप’ क्रमांकावर मागविले जातील. ते पुरावा मानून संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

‘ई-चलना’चा दंड न भरल्यास होणारी कार्यवाही

- सात दिवसांत दंड न भरल्यास आरटीओला संबंधित वाहनचालकाची माहिती दिली जाणार. त्यामुळे आरटीओशी संबंधित कामे होणार नाहीत.
- पोलिस कर्मचाऱ्यांच्या ‘ई-चलन मशिन’वर नियमभंगाची माहिती साठवली जाणार आहे. त्यामुळे एखादा वाहनचालक नियमभंग करताना आढळल्यानंतर त्याचे रेकॉर्ड तपासले जाणार.
- वाहनचालकाने अनेकदा नियमभंग केल्यास, पोलिस कर्मचारी त्याच्या घरी पाठविले जातील, तसेच त्याच्याविरोधात कोर्टात दावा दाखल केला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा पाणीकपात टळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहराला पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या खडकवासला धरणात सुमारे ३६.४४ टक्के, तर ​पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सुमारे ४५.४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, हा पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांवर या उन्हाळ्यात पाणीकपातीची वेळ येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
जलसंपदा विभागाने राज्यातील धरणसाठ्याचा आढावा घेतला आहे. त्यानुसार पुणे आणि ​पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी पाण्यावरून रणकंदन झाले होते. या पार्श्वभूमीवर या वेळी पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी पाच एप्रिलपर्यंत खडकवासला धरणात ६.५५ टीएमसी (२२.४५ टक्के) पाणी होते. या वर्षी आतापर्यंत १०.६२ टीएमसी (३६.४४ टक्के) पाणीसाठा आहे. वरसगाव धरणात २.१४ टीएमसी, तर पानशेत धरणात ६.७१ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणेकरांना गेल्या वर्षीप्रमाणे यंदा पाणीकपातीला सामोरे जावे लागणार नसल्याचे दिसून येत आहे.
या बाबत जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले म्हणाले, ‘राज्य सरकारने दिलेल्या सूचनांनुसार १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये असणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार खडकवासला धरणात सध्या सुमारे ३६.४४ टक्के आणि पवना धरणात सुमारे ४५.४५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरेसा आहे.’
‘टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने यंदा या धरणातील सुमारे दीड टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. धरणाच्या दुरुस्तीचे काम होण्यास सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे या धरणात पाणीसाठा करता येणार नाही,’ असेही कपोले म्हणाले.
पाच एप्रिलचा अनुभव
गेल्यावर्षी पाच एप्रिल हा दिवस पुणेकरांसाठी पाण्यावरून वाद निर्माण करणारा ठरला होता. धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने शेतीसाठी पाणी सोडण्यात येऊ नये, अशी पुणेकरांची मागणी होती. मात्र, तरीही दौंड आणि इंदापूरसाठी खडकवासला धरणातून पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यावरुन वादंग निर्माण झाला होता. मात्र, यावर्षीचा पाच ​एप्रिल हा सुखद ठरला आहे.
धरण आणि उपयुक्त पाणीसाठा (टक्के)
खडकवासला ३६.४४, पवना ४५.४५, मुळशी २९.१५, टेमघर ०.००, वरसगाव १६.६७, पानशेत ६३.०२, भामा आसखेड ४४.९९, चासकमान ३६.७३, नीरा देवधर २२.७९, भाटघर २२.९०, वीर ६९.२३, उजनी १५.८७, गुंजवणी ३८.४०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहिस्तेखानावरील हल्ला सर्जिकल स्ट्राइकच

$
0
0

पुणे प्रतिनिधी ,

छत्रपती शिवाजी महाराजांनी लालमहालामध्ये काही हजार मावळ्यांच्या साथीने लाखभर सेना सोबत असलेल्या शाहिस्तेखानाला सळो की पळो केले. आज शत्रूशी लढताना हीच शिवरायांची रणनिती वापरली जात आहे. लालमहालात झालेले हे युद्ध म्हणजे जगाच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राईक होता. शिवरायांच्या स्वप्नातील हिंदुस्थान घडविण्यासाठी त्यांचे विचार आणि चरित्र आजचे तरुण देशाच्या कानाकोप-यात पोहोचवितील, असा विश्वास इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केला.

समस्त हिंदू आघाडी आणि लालमहाल उत्सव समितीतर्फे चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी ३५४ व्या शिवतेज दिनानिमित्त शिवतेज पुरस्कार आणि हिंदुत्त्व शौर्य पुरस्कार बलकवडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विद्याधर नारगोलकर, समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलींद एकबोटे, अनिल गानू, राजेंद्र शिंदे, नगरसेवक विशाल धनवडे, सुलोचना कोंढरे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची फजिती केली आणि लालमहालावर पुन्हा भगवा ध्वज फडकाविला, या घटनेचा आनंदोत्सव शिवतेज दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने तुषार उर्फ रविराज भांबरे यांना शिवतेज पुरस्कार आणि कोंढव्यातील गोरक्षक स्वप्नील धांडेकर यांना हिंदूत्त्व शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले. सागर शुक्ला, नितीन पारखी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
बलकवडे म्हणाले, शिवरायांविषयी अनेकांच्या मनात श्रद्धा आहे. परंतु त्याला अभ्यासाची आणि वक्तृत्वाची जोड देत छत्रपतींच्या इतिहासाच्या जागर तरुणांनी जगभर करायला हवा. शिवरायांनी स्वत:चे त्यागमय जीवन जनतेसमोर ठेवत जगाला आदर्शवादाकडे नेले. समाजाला भयमुक्त करून राष्ट्रभक्ती आणि धर्मशक्ती जागृत केली. त्यामुळे शिवरायांची शिकवण डोळ्यासमोर ठेवत प्रत्येकाने प्रामाणिकपणे आचरण करायला हवे.

या वेळी शिवरायांची पालखी मिरवणूक कसबा पेठेतून लालमहाल येथे काढण्यात आली. महिला शाहिरांनी यावेळी पोवाडयाचा कार्यक्रम सादर केला. पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद मोरे यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुहेरी दंडापासून चालकांची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रिक्षा, टॅक्सी, मालवाहतूक व प्रवासी वाहने आदी वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) मि‍ळविण्यात विलंब झाल्यावर त्यासाठी भराव्या लागणाऱ्या दुहेरी दंडापासून आता चालकांची सुटका होणार आहे. येत्या काळात केवळ केंद्रीय परिवहन खात्याने ठरविलेल्या निकषानुसार चालक, वाहतूकदारांकडून दिवसाला ५० रुपये दंड घेण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. योग्यता प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच वाहनांचे पासिंग होत असल्याने चालक व मालवाहतूकदारांना दिलासा मिळाला आहे.
याप्रकरणी विकास तांबे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. पूर्वी वाढीव मुदत संपल्यानंतर योग्यता प्रमाणपत्र मिळवून वाहनाचे पासिंग न करणाऱ्या चालकांना परिवहन विभागाकडून १५ दिवसाला २०० रुपये दंड आकारण्यात येत होता. त्यानंतर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या सुधारणानंतर पासिंगला विलंब झाल्यास दिवसाला ५० रुपये आणि किमान ७०० रुपये दंड करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) दोन्हीही दंड आकारण्यात येत होते. त्यामुळे वाहनचालकांना दुहेरी दंड भरावा लागत होता. या बाबत तांबे यांनी याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने आता केवळ प्रतिदिन दंडाची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.
दरम्यान, या दुहेरी दंडाविरोधी रिक्षा पंचायतसह राज्य रिक्षा संघटना कृती समिती, माल व प्रवासी वाहतुकदार संघटनांनी प्रखर विरोध केला होता; तसेच ३१ जानेवारी रोजी राज्यव्यापी चक्का बंद आंदोलनही केले होते. त्यावर सरकारने एकच दंड घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे रिक्षा पंचायत व राज्य कृती समिती अंशतः स्वागत करत आहे. आता परिवहन विभागाने केंद्र सरकारचा दररोजचा ५० रुपये दंड कमी करावा; तसेच केंद्र व राज्य सरकार अशा दोन्ही सरकारांचा दंड भरलेल्या वाहनचालकांना राज्याच्या दंडाची रक्कम परत द्यावी, अशी मागणी पंचायतचे निमंत्रक नितीन पवार यांनी केली. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी आरटीओ कार्यालयात करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी सांगितले.
‘लर्निंग’साठी सारथी ४
आरटीओमध्ये सारथी ४.० या संगणकीय प्रणालीचा वापर येत्या सोमवारी १० एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना लर्निंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया करता येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज सादर करायचा आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांनी अर्ज क्रमांकाची नोंद करून ठेवायची आहे. त्यानंतर त्यांना लायसन्स काढण्यासाठी कागदपत्रे (जन्मत्तारखेचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आदी) त्याच वेबसाइटवर स्कॅन करून अपलोड करावीत. सदर कागदपत्रे जेपीजी, पीडीएफ या फॉरमॅटमध्ये असावीत व प्रत्येक कागदपत्र हे ‘१ एमबी’पेक्षा कमी असायला पाहिजे. नागरिकांना मिळालेल्या अॅप्लिकेशन क्रमांकाच्या आधारे याच वेबसाइटवरून लायसन्ससाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यायची आहे. वेबसाइटवर याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोचा सहाशे मीटरने विस्तार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेच्या रचनेमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे त्याची लांबी सहाशे मीटरने वाढणार आहे. मेट्रोच्या याच मार्गिकेवरील एक भुयारी स्टेशन रद्द झाल्याने प्रकल्पाच्या एकूण खर्चावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प आराखड्यानुसार (डीपीआर) पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गिकेच्या रचनेमध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) संचालक मंडळाने त्याला मान्यता दिली आहे. त्यानुसार शिवाजीनगर येथील भुयारी स्थानकानंतरचे पुरातत्त्व विभागाचे (एएसआय) स्टेशन रद्द करण्यात आले आहे. त्याऐवजी मेट्रो शिवाजीनगर नंतर धान्य गोदामाकडे जाणार आहे. या ठिकाणी शहरातील तिन्ही मेट्रो मार्गांचे ‘इंटरचेंज स्टेशन’ आकाराला येणार आहे. या ठिकाणी वनाज ते रामवाडी यांसह ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’तर्फे (पीएमआरडीए) राबविण्यात येणाऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोचेही स्टेशन असेल. त्यामुळे या तिन्ही मेट्रो मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शिवाजीनगर धान्य गोदामाच्या ठिकाणी होणाऱ्या स्टेशनमध्ये दुसऱ्या मेट्रोचा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट ही मेट्रो त्यानंतर पुन्हा बुधवार पेठ, मंडई या जुन्या मार्गाद्वारे स्वारगेटपर्यंत जाईल. मेट्रोची ही सर्व स्टेशन भुयारीच असतील. या नियोजित बदलांमुळे मेट्रोच्या भुयारी मार्गाची लांबी सहाशे मीटरने वाढण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मेट्रोचा एकूण मार्ग आता १६.२ किमीच्या ऐवजी १६.८ किमी असेल.
मेट्रोचे ‘एएसआय’चे स्टेशन रद्द झाल्याने महामेट्रोच्या खर्चात सुमारे अडीचशे कोटी रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भुयारी मेट्रोच्या मार्गात सहाशे मीटरने वाढ होत असली, तरी त्याचा वाढीव खर्चाचा कोणताही बोजा महामेट्रोला सहन करावा लागणार नाही.
भुयारी मार्गाचे सर्वेक्षण
शहरातील एकूण ३१ किमीच्या मेट्रो मार्गापैकी ‘एलिव्हेटेड’ मेट्रो मार्गांचे ‘जिओ-टेक्निकल’ सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. हे सर्वेक्षण पूर्ण होताच शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या पाच किमीच्या मेट्रो मार्गाचे जिओ-टेक्निकल सर्वेक्षण ‘महामेट्रो’तर्फे सुरू करण्यात येणार आहे. मेट्रोचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी जमिनीचा पोत समजावा याकरिता हे जिओ-टेक्निकल सर्वेक्षण केले जाते. एलिव्हेटेड मेट्रो मार्गाच्या सर्वेक्षणादरम्यान सरासरी तीन ते सहा मीटर खोलीवर कठीण खडक आढळून आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आफ्रिका, ऑस्ट्रेलिया खंडातील भाषांचे होणार संशोधन

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com
पुणे ः ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांनी ‘पीपल्स लिंग्विस्टिक अँड कल्चर मॅप ऑफ अफ्रिकन’ या प्रकल्पांतर्गत ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या खंडांतील बोलीभाषांच्या अभ्यासाचे काम त्यांनी सुरू केले आहे. या संदर्भातील संशोधन ते २०२५पर्यंत पूर्ण करणार आहेत.
‘आफ्रिका खंडात १४०० आणि ऑस्ट्रेलिया खंडात १६०० भाषा आहेत. दोन्ही खंडांतील भाषांचे सर्वेक्षण, संशोधन करण्याचा प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. २०२५ पर्यंत तो पूर्ण होईल,’ असे डॉ. देवी यांनी ‘मटा’ला सांगितले. ‘प्रकल्पाच्या माध्यमातून भाषांचे सर्वेक्षण होणार असून, त्यानंतर संवर्धनाच्या दृष्टीने काम करता येईल. येथील काही भाषांना लिपी नाही. मात्र, तरीही या भागात बोली भाषेतून शिक्षण देण्याचे काम अत्यंत निष्ठेने केले जाते,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी नुकतीच केनियाला भेट दिली आहे.
‘केनियात ४२ बोलीभाषा आहेत. तेथील नागरिकांचे मातृभाषा व इंग्रजी या दोहोंवर प्रभुत्व आहे. विक्रीसाठी शेतमाल आणला जातो, तेव्हा लोक इंग्रजीत संवाद साधतात. मातृभाषा व इंग्रजी यांचा अत्यंत परिणामकारक वापर येथील नागरिकांकडून केला जातो. ज्याचा आपल्याकडे अभाव जाणवतो,’ यावर डॉ. देवी यांनी बोट ठेवले.
आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन खंडात मिळून जगातील ९० टक्के भाषा आहेत. आफ्रिका खंडात १४००, तर ऑस्ट्रेलिया खंडात १६०० भाषा आहेत. या सर्व भाषांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. आफ्रिका खंडातील भाषेचे काम केनियातील एजर्टन या विद्यापीठाबरोबर करण्यात येत आहे. हे विद्यापीठ पृथ्वीच्या मधोमध आहे. २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होईल, असे डॉ. देवी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफटीआयआय’मध्ये सांस्कृतिक महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कृष्णधवल चित्रपटांच्या काळात आपल्या छायाचित्रणाने चित्रपटांची कलात्मकता व परिणामकता वाढणारे ख्यातनाम छायाचित्र दिग्दर्शक (सिनेमॅटोग्राफर) व्ही. के. मूर्ती यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त त्यांना कलात्मक पद्धतीने अभिवादन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेने (एफटीआयआय) यानिमित्त चित्रपट महोत्सव, छायाचित्र प्रदर्शन व सादरीकरण असे विविध भरगच्च कार्यक्रम ७ ते ९ एप्रिल या काळात आयोजित केले आहेत.
चित्रपट महोत्सवाचे; तसेच छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ख्यातनाम दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या उपस्थितीत आज, शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता होणार आहे. त्यानंतर प्रख्यात अभिनेते टॉम अल्टर ‘प्यासा’मधील गाण्यावर सादरीकरण करणार आहेत. निहलानी यांच्यासह दिग्दर्शक ए. के. बीर, जहांगीर चौधरी, इश्वर बिद्री, टॉम अल्टर, जी. एस. भास्कर, जयंत कायकिणी, ए. एस. कानल, महेश अॅनी, प्रकाश मगदूम हे ‘मूर्ती यांचे भारतीय चित्रपटातील योगदान’ या विषयावर बोलणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता गुरू दत्त यांचा प्यासा हा चित्रपट दाखविला जाणार आहे.
८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता फिल्म डिव्हिजनची ‘लाइट, शॅडो अँड मी’ हा मूर्ती यांच्यावरील माहितीपट दाखविण्यात येणार आहे. निहलानी या वेळी संवाद साधतील. एफटीआयआयचे विद्यार्थी मूर्ती यांच्यावर शोधनिबंध सादर करणार आहेत. ‘छायाचित्रकारांचे भारतीय चित्रपटातील योगदान व आजच्या डिजिटल चित्रपटाच्या काळातील संदर्भ’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ५.३० ‘कागज के फूल’ हा चित्रपट दाखविण्यात येईल.
निहलानी ९ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत; तसेच श्याम बेनेगल दूरदर्शनवरील गाजलेली मालिका ‘भारत एक खोजमधील मूर्ती यांचे योगदान’ या विषयावर ते बोलणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता ‘साहेब बिवी और गुलाम’ हा चित्रपट दाखविण्यात येईल. हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.
मूर्ती यांची कारकीर्द
ख्यातनाम छायाचित्र दिग्दर्शक (सिनेमॅटोग्राफर) व्ही. के. मूर्ती यांनी ख्यातनाम दिग्दर्शक गुरू दत्त यांच्या ‘आर-पार,’ ‘प्यासा’ या कृष्णधवल अभिजात चित्रपटांबरोबर ‘शिकार,’ ‘लव्ह इन टोकियो,’ ‘जुगनू,’ ‘साहेब बिवी और गुलाम,’ ख्यातनाम दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचा ‘तमस’ अशा चित्रपटांना; तसेच ख्यातनाम दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या ‘भारत एक खोज’ या मालिकेला आपल्या छायाचित्रणाने वेगळा आयाम दिला आहे. मूर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचार करणारे सहा पोलिस निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
जुगार अड्ड्यावर छापा टाकून जप्त केलेली रक्कम पोलिस ठाण्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याप्रकरणी आणि आरोपींकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यातील सहा पोलिसांना बुधावार (५ एप्रिल) पुणे पोलिस आयुक्तांनी निलंबित केले. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस नाईक आणि पोलिस शिपायाचा समावेश आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये डुडुळगाव येथे हा गुन्हा घडला होता. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी हे आदेश दिले आहेत.
सहायक निरीक्षक संतोष काटे, नाईक सोमनाथ बोऱ्हाडे, नामदेव वडेकर, विपुल होले, शिवराज कलांडीकर, शिपाई परमेश्वर सोनके अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.
निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांनी ८ ऑक्टोबर २०१६ मध्ये डुडुळगाव येथे जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला होता. जुगार खेळणाऱ्या लोकांना अटक करून पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते; परंतु त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली नाही. कारवाई दरम्यान ८९ हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती.
ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी पोलिसांनी वापरली; तसेच या पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींना कारवाई करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारली. कर्तव्य पार पाडत असताना केलेल्या भ्रष्टाचारासाठी व नैतिक फायद्यासाठी गैरवर्तन केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पुणे पोलिस आयुक्त शुक्ला यांनी संबंधित पोलिसांवर ही कारवाई केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोरणे चुकल्यानेच राष्ट्रीय समस्या

$
0
0

ज्येष्ठ संरक्षण तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास सोहनी यांची खंत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘देशाच्या स्वातंत्र्यानंतर परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण धोरणांविषयी घेतलेल्या चुकीच्या धोरणांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत राजीनामा दिला. तीच धोरणे आजही सुरूच असल्याने चीन, पाकिस्तानसारख्या गंभीर समस्या उभ्या राहिल्या आहेत,’ अशी खंत ज्येष्ठ संरक्षण तज्ञ व माजी राजदूत डॉ. श्रीनिवास सोहनी यांनी व्यक्त केली.
डॉ. विजय खरे लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणाऱ्या सहा पुस्तकांचे प्रकाशन गुरुवारी एस. एम. जोशी सभागृहात झाले. त्या वेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दलित साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रावसाहेब कसबे, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुधीर गव्हाणे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि परशुराम वाडेकर आदी या वेळी उपस्थित होते.
‘डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना तयार केली; कारण ते उत्तम प्रशासक होते. केवळ न्याय व्यवस्थेसंदर्भात त्यांचा अभ्यास नव्हता, तर परराष्ट्र धोरण, अंतर्गत सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेतील धोरणांचे ते गाढे अभ्यासक होते. १९५१मध्ये तत्कालीन सरकारच्या चुकीच्या धोरणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात जी शिवनीति अवलंबली होती. तशीच नीति राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात वापरायला हवी हा त्यांचा आग्रह होता,’ असे सोहनी यांनी सांगितले. दुर्देवाने नेपाळ, तिबेट, कोकोस आयलंड, ग्वादरचा प्रदेश हे भारताच्या अधिपत्याखाली येऊ पाहणारे प्रदेश तत्कालीन सरकारने नाकारले. त्यामुळेच, आज चीन आणि पाकिस्तान भारताच्या सुरक्षेमध्ये बाधा निर्माण करत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
डॉ. गाडे म्हणाले, ‘डॉ. आंबेडकरांना विकसित भारत हवा होता. देशात सामाजिक आणि अर्थिक समता असावी, असा त्यांचा आग्रह होता. देशाच्या विकासामध्ये प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हावे, अशी त्यांची धारणा होती. साहित्याच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांचे अनेक पैलू समोर आले आहेत. मात्र, त्यांचे काही महत्वाचे पैलू जनतेसमोर येण्याची गरज आहे, त्यावर अद्याप लिखाण झालेले नाही.’
‘ज्या ज्ञानशाखेत डॉ. आंबेडकरांनी पाऊल टाकले तेथे त्यांनी त्यांच्या पाऊलखुणा सोडल्या. त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी तरूण अभ्यासक निर्माण होणे आवश्यक आहे. आंबेडकरांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या अभ्यासकांनी आपल्या खांद्यावर घ्यायला हवी,’ अशी अपेक्षा डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली. डॉ. श्रीपाल सबनीस, सुधीर गव्हाणे यांनीही आपले विचार मांडले. स्नेहा गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

भारताप्रमाणेच परदेशी संशोधकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची भुरळ पडली आहे. आंबेडकरांचे विचार देशापलीकडे पोहोचलेले आहेत. अनेक देशांमध्ये त्याचे अनुकरण केले जाते. मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, अब्राहम लिंकन अशा जागतिक किर्तीच्या नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडून प्रेरणा घेतली, ही अभिमानास्पद बाब आहे.

डॉ. शां. ब. मुजुमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मूल्यमापन चाचणीला शाळांकडूनच ‘खो’

$
0
0

काहीही अर्थ नसल्याचे कारण केले पुढे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्व बोर्डांना संलग्न असणाऱ्या राज्यातील शाळांच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची मूल्यमापन चाचणी घेण्याच्या सूचना सरकारने दिलेल्या असतानाही पुण्यातील काही सीबीएसई, आयसीएसई बोर्डांच्या शाळांत मूल्यमापन चाचणी झाली नसल्याचे कळते.
मूल्यमापन चाचणी अतिशय सोपी असल्याने ती घेण्यात काहीही अर्थ नसल्याचे कारण देऊन शालेय प्रशासनाने चाचणी घेण्याचे टाळले. त्यामुळे मुंबईत चाचणीपूर्वीच इयत्ता आठवीच्या मूल्यमापन चाचणीचे पेपर सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाल्याची घटना ताजी असताना या घटनेची भर पडली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (विद्या प्राधिकरण) पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शाळास्तरावर गणित आणि भाषा विषयाची संकलित मूल्यमापन चाचणी ६ आणि ७ एप्रिलला होत आहे. राज्यातील एसएससीसह आयसीएसई, सीबीएसई, आयबी, आयजीसीएसई, आयजी आदी सर्व बोर्डांच्या खासगी, अनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये चाचणी घेणे अपेक्षित आहे. विभागाने भाषा विषयाची लेखी चाचणी गुरुवारी (६ एप्रिल) घेतली. गणिताची लेखी चाचणी आज, शुक्रवारी होणार आहे.
शहरात गुरुवारी एसएससी बोर्डाच्या अनुदानित, विनाअनुदानित मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये भाषा विषयाची लेखी चाचणी पार पडली. मात्र, यावेळी काही शाळांमध्ये ही मूल्यमापन चाचणी झाली नाही. संबंधित शाळा प्रशासनाने चाचणी घेण्याबाबत कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नाही. त्यामुळे या शाळांच्या प्रशासनाने शिक्षण विभागाच्या आदेशालाच ‘खो’ दिला आहे. सीबीएसी, आयसीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम इतर बोर्डांच्या तुलनेत अवघड आहे. त्यामुळे अशी मूल्यमापन चाचणी घेऊन विद्यार्थ्यांचा फायदा होईलच, असे म्हणता येईल नाही. त्यामुळे या चाचणीला अर्थ नाही, असे कारण देऊन मूल्यमापन चाचणी टाळली आहे. दरम्यान, आता या शाळांवर शिक्षण विभाग काय कारवाई करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर चुकविणाऱ्यांवर प्राप्तिकर खात्याचे छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत संपल्यानंतर प्राप्तिकर विभागाने करचुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाईचे अस्त्र उपसले आहे. करचुकवेगिरी केल्याच्या संशयावरून शहरातील प्रसिद्ध बेसन मिलशी संबंधितांवर राज्यात १९ ठिकाणी छापे घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर अहमदाबाद येथील पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपनीशी संबंधित देशभरातील ३० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
करचुकवेगिरी केलेल्या व्यक्तींसाठी गेल्या वर्षी उत्पन्न प्रकटीकरण योजना जाहीर केली होती. त्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर काळा पैसा असलेल्या व्यक्तींना अखरेची संधी म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण योजना जाहीर करण्यात आली. योजनेची मुदत ३१ मार्च रोजी संपुष्टात आली. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
पुण्यातील एका बेसन आणि डाळ मिलने करचुकवेगिरी केल्याची खात्रीशीर माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. या मिलची सर्व कार्यालये आणि वितरक अशा १९ ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून तपासणी करण्यात येत आहे. येथून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. त्याचबरोबर अहमदाबाद येथे मुख्यालय असलेल्या कंपनीवर छाप्यांचे सत्र सुरूच आहे. या कंपनीशी संबंधित देशभरातील ३० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून तपासणी करण्यात येत आहे. मुंबई आणि कोलकाता येथील ऑपरेटर्सच्या माध्यमातून बोगस कंत्राट दाखवून तसेच बोगस खर्च दाखवून या कंपनीने १०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार केल्याचा संशय प्राप्तिकर विभागाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील १६०० दुकानांना कुलूप

$
0
0

बेकायदा मद्यविक्री रोखण्यासाठी पथके तैनात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सुप्रीम कोर्टाने महामार्गांलगत ५०० मीटरच्या आत असलेले बिअर बार आणि मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचा आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे हजारभर बार आणि सहाशे मद्यविक्रीच्या दुकांनांना टाळे लागले आहे. येथे बेकायदा विक्री होऊ नये यासाठी उत्पादन शुल्क विभागाने १२ पथके तैनात केली आहेत. पोलिस खात्याच्या मदतीने पथकांकडून रात्रंदिवस पहारा ठेवण्यात आला आहे.
सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील मद्यविक्रीच्या दुकानांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महामार्गापासून ५०० मीटर परिसरातील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आली आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे म्हणाले, की ‘जिल्ह्यात सुमारे अडीच हजार मद्यविक्रीची दुकाने आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील एक हजार ६०० दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी १२ पथके तयार केली आहे; तसेच पोलिसांचे सहकार्य घेण्यात येत आहे.’
‘महामार्गांलगत ५०० मीटर आणि २० हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये २२० मीटरचे बंधन घालण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही रस्ते दोन्ही पालिकांच्या हद्दीत आहेत. मात्र, कागदोपत्री ते महामार्गांवर आहेत. त्यामुळे तेथील सुमारे ४५० दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामध्ये सातारा रोड, स्वारगेट-सोलापूर रोड, पौडरोड, शिवाजीनगर, कात्रजगाव, निगडी ते दापोडी आदींचा समावेश आहे. संबंधित रस्ते पालिकेच्या हद्दीत असल्याची अधिसूचना काढण्यात आल्यावर या रस्त्यांवरील दुकाने पुन्हा सुरू होऊ शकतात,’असेही वर्दे यांनी स्पष्ट केले.
कोणती दुकाने महामार्गांपासून ५०० मीटरच्या आत येतात, याची मोजणी राज्य उत्पादन शुल्क विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भूमी अभिलेख विभाग यांनी एकत्रपणे केली आहे, असेही वर्दे म्हणाले.

गहुंजे मैदानात मद्यविक्री सुरूच
‘गहुंजे येथील क्रिकेटचे मैदान महामार्गापासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर आहे. गहुंजे गाव २० हजार लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्येचे असल्याने गावासाठी महामार्गापासून ५०० मीटरऐवजी २२० मीटर अंतराचे बंधन आहे. हे अंतर मोजताना एअर डिस्टन्स न मोजता एखाद्या व्यक्तीला चालत जाऊन मद्य किती अंतरावर मिळते, या पद्धतीने अंतर मोजण्यात आले आहे. गहुंजेतील क्रिकेटचे स्टे​डियम महामार्गापासून सुमारे अडीच किलोमीटरवर असल्याने तेथे मद्यविक्री करता येणार आहे,’ असे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोरणात्मक निर्णय लवकरच खुले होणार

$
0
0

पारदर्शक कारभारासाठी स्थायी समितीचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेच्या कारभारात पारदर्शकता यावी तसेच लोकप्रतिनिधी कोणती कामगिरी पार पाडतात याची माहिती मिळावी, यासाठी विविध धोरणात्मक निर्णय, टेंडर प्रक्रिया तसेच विविध समित्यांच्या बैठकींचे इतिवृत्त जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून, पालिकेच्या प्रकाश कर्दळे ग्रंथालयात ही माहिती पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. पालिकेचा कारभार हाकताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. या निर्णयांची सविस्तर माहिती जनतेला मिळावी, कामात पारदर्शकता यावी यासाठी सर्व कामकाजाच्या नोंदी, धोरणात्मक निर्णय, पन्नास लाख रुपयांवरील टेंडर, स्थायी समिती, मुख्य सभेच्या कामकाजाचे इतिवृत्त, प्रशासनाचे निर्णय, आयुक्तांची परिपत्रके, सरकारी अध्यादेश यांची माहिती उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव तत्कालीन नगरसेवक बाळासाहेब बोडके, नगरसेविका सुमन पठारे यांनी ठेवला होता. या प्रस्तावाला गुरुवारी मान्यता देण्यात आली.
पालिकेच्या कामकाजाची संपूर्ण माहिती प्रत्येकाला मिळालीच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यासाठी हा प्रस्ताव मान्य करण्यात आल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. स्थायी समिती, मुख्य सभांबरोबरच महत्वाच्या बैठकांची माहिती आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या कारभारात पारदर्शकता यावी, यासाठी बैठकांना माध्यमांच्या प्रतिनिधींना बसू देण्याचा निर्णयही घेतल्याचे मोहोळ म्हणाले.

पेन्शनचा प्रस्ताव प्रशासनाकडे
माजी नगरसेवकांना दरमहा हजार रुपयांचे पेन्शन देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात‌ आला आहे. काही माजी नगरसेवकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना पेन्शन देण्याचा मांडण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी बँकांच्या ‘एटीएम’वर ताण

$
0
0

खासगी एटीएम बंद पडल्याचा होतोय परिणाम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील बहुसंख्य एटीएम अद्यापही कोरडीच आहेत. खासगी बँकांची एटीएम मोठ्या प्रमाणावर बंद असून, सरकारी बँकांचीही मोजकीच एटीएम पूर्णवेळ कार्यरत आहेत. खासगी बँकांची एटीएम बंद असल्याचा फटका सरकारी बँकांच्या एटीएमला बसत आहे. मात्र, हे चित्र बदलण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
शहरातील बहुतांश एटीएम बंद राहिल्याने ग्राहकांना पैशांसाठी वणवण करावी लागत आहे. त्याची परिणिती काही बँकांच्या शाखांमध्ये रांगा लागण्यात झाली. बँकांमधील गर्दी वाढली होती. दुसरीकडे सुरू असलेल्या सरकारी बँकांच्या एटीएमबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशभरातील एटीएमचे अर्थकारण बिघडले आहे. बहुतांश एटीएम बंद आहेत, तर अनेक एटीएममध्ये कार्ड टाकल्यानंतर रोकड उपलब्ध नसल्याचा संदेश येत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.
गेल्या काही दिवसांतील बँकांच्या सुट्ट्यांमुळे हा परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, अजूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. सध्या सर्वच बँकांनी एटीएममध्ये रोकड भरण्याचे काम आउटसोर्सिंगकडून बाह्य एजन्सीकडे सोपवले आहे. या एजन्सींना बँकेच्या करन्सी चेस्टकडून किंवा रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्टकडून रोकड पुरविण्यात येते. त्यांना पुरेशी रोकड उपलब्ध होत नसल्याने तसेच एजन्सीकडील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे सर्व एटीएममध्ये पैसे टाकणे शक्य होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘रिझर्व्ह बँकेकडून पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध होत आहे. बँक ऑफ महाराष्ट्रची ८५ टक्क्यांहून अधिक एटीएम सुरू आहेत. मात्र, खासगी बँकांची एटीएम बंद असल्याने त्याचा फटका सरकारी बँकांवर येत आहे. सरकारी बँकांच्या एटीएमवरील गर्दी वाढली आहे. त्यामुळे त्यातील रोकडही लवकर संपुष्टात येत आहे,’ असे बँक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक राजकिरण भोईर यांनी सांगितले.
मोफत एटीएम व्यवहारांवरील मर्यादा कमी करून बँकांच्या शाखेत येऊन होणाऱ्या व्यवहारांवर बंधने आणण्यात आली आहेत. बँकांच्या शाखेत येऊन मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार केल्यास त्यावर शुल्क लागणार असल्याने खातेदार पुन्हा एटीएमकडे वळले आहेत. त्यामुळे एटीएमधील रोकड लवकर संपत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

नव्या नोटांची कमतरता
सर्व एटीएमचे कॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. त्यामुळे या एटीएमध्ये जुन्या नोटा चालत नाहीत. या नोटा मशिनमध्ये अडकण्याचा संभव असतो. रिझर्व्ह बँकेकडून होणाऱ्या रोकड पुरवठ्यात कमतरता नाही. मात्र, या मशिनमध्ये चालणाऱ्या अशा नव्या किंवा करकरीत नोटांचा काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. ही अडचण प्रामुख्याने खासगी बँकांना जाणवत असल्याने त्यांची एटीएम बंद असण्याची शक्यता आहे, असे ‘मॅफकॅब’चे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images