Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नाट्य संमेलन पुढे ढकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

९७वे अखिल भारतीय नाट्य संमेलन पुढे ढकलावे, अशी मागणी नियोजित नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांनी केल्याने नाट्यपरिषद आणि संमेलनाच्या संयोजकांपुढे पेच निर्माण झाला आहे. संयोजकांनी उस्मानाबादमध्ये संमेलनाची पूर्वतयारी सुरू केली आहे. परंतु, सावरकर यांच्या मागणीमुळे संयोजक पेचात पडले आहेत.

एप्रिल महिन्यात २१ ते २३ एप्रिल दरम्यान उस्मानाबाद येथे नाट्य संमेलन होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात होणारे संमेलन यंदा एप्रिलमध्ये होत आहे. संमेलन उस्मानाबादमध्ये होत असल्याने तापमानाचा वाढता फटका संमेलनाला बसू शकतो. या कारणाने सावरकर यांनी संमेलन पुढे ढकलून तापमान कमी झाल्यानंतर ते घ्यावे, अशी मागणी नाट्य परिषदेकडे केली. संमेलनाच्या तारखांवरून आधीच सावळागोंधळ सुरू असताना खुद्द संमेलनाध्यक्षांच्या मागणीमुळे संमेलनापुढचा पेच आणखी वाढला आहे. उस्मानाबादमधील नाट्य रसिक आणि नाट्य परिषदेच्या शाखेला पुन्हा संमेलन कधी उस्मानाबादमध्ये होईल, की नाही, याची शंका वाटते. त्यामुळेच, यजमान म्हणून कोणत्याही परिस्थितीत संमेलन यशस्वी करायचे असा निर्धार नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, अचानक सावरकर यांनी केलेल्या मागणीमुळे नाट्य संमेलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नाट्यसंमेलनाचे संयोजक व उस्मानाबाद नाट्य परिषदेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे म्हणाले, ‘नाट्य संमेलन उस्मानाबाद येथे पार पडणार असल्याने शहरातील नागरिकांमध्ये आणि नाट्य रसिकांमध्ये मोठा उत्साह आहे. संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे. तापमानाचा वाढता पारा लक्षात घेऊन संमेलनस्थळी सभामंडपात शेकडो फॅन आणि कूलरची व्यवस्था करण्यात येणार आहे. संमेलनासाठी येणाऱ्या रसिकांना उन्हाचे चटके बसू नयेत याचीही दक्षता घेण्यात येणार आहे. संयोजक म्हणून सर्व प्रकारे संमेलन यशस्वी करण्याचा उस्मानाबाद शाखेचा प्रयत्न आहे. लवकरच संमेलनाच्या जाहीरातीही माध्यमांमधून प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. परंतु, संमेलनाच्या अध्यक्षांनीच संमेलन पुढे ढकला, अशी मागणी केल्याने पेच तयार झाला आहे. लवकरात लवकर हा पेच सोडवणे गरजेचे आहे.

सावरकरांच्या या मागणीवर अद्याप नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे, संमेलन होणार की नाही होणार, सावरकरांची मनधरणी करण्यात परिषदेला यश मिळणार का, असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले आहेत. संमेलनावर पसरलेले उदासीनतेचे सावट झटकून ठोस भूमिका घेऊन नाट्यपरिषदेने यंदाचे संमेलन यशस्वी करायला हवे, अशी अपेक्षा नाट्यवर्तुळातून व्यक्त केली जात आहे. संमेलन पुढे ढकला, या नियोजित अध्यक्ष सावरकर यांच्या मागणीबाबत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंजिनीअरिंगचे विद्यार्थी ग्रामीण भागात येणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना शिक्षण झाल्यावर अथवा सुरू असताना ग्रामीण भागात लोकांच्या समस्या आणि विकासाची कामे करण्यासाठी काही कालावधीसाठी पाठवण्याबाबत केंद्र सरकार विचार करेल,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले.

मोदी यांनी ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुण्यासह इतर शहरामध्ये संवाद साधला. या वेळी केंद्रीय मवुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, शासकीय अंभियांत्रिकी कॉलेजचे (सीओईपी) संचालक डॉ. बी. बी. आहुजा, सीडॅकचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी उपस्थित होते. मोदी यांनी सीओइपीमध्ये प्रगती हलदार आणि संतोष कुमार दास या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यानी संवाद साधून आपल्या प्रकल्पाची माहिती दिली.

स्पर्धेतील विद्यार्थिनीने वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या धर्तीवर इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठवता येईल का, असे विचारले. त्या वेळी मोदी म्हणाले, ‘मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना महापालिका, नगरपालिका क्षेत्रात नागरिकांसाठी विविध विकासकामे व बांधकामे करण्यासाठी काही कालावधीसाठी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना संधी दिली. त्यासाठी त्यांना काही प्रमाणात स्टायपेंडदेखील दिले. या कामाचे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले. याचा मोठा फायदा त्या विद्यार्थ्यांना झाला. त्यामुळे इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना शिक्षण झाल्यावर अथवा सुरू असताना ग्रामीण भागात लोकांच्या समस्या आणि विकासकामे करण्यासाठी काही कालावधीसाठी पाठवता येण्याबाबत सरकार विचार करेल.’ या वेळी मोदीजींनी सांगितलेल्या सूचना आपण टिपून घेतल्या असून त्यावर मनुष्यबळ विकास मंत्रालय विचार करेल, अशी ग्वाही जावडेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेट्रोसाठी शिवसृष्टीकडे दुर्लक्ष नको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी नियोजित मेट्रो प्रकल्पाची उभारणी करताना कोथरूड भागातील शिवसृष्टीकडे दुर्लक्ष करू नये. कोथरुड येथील जागेत मेट्रोचे स्टेशन; तसेच शिवसृष्टी कशी करता येईल, याचे मॉडेल तयार करावे,’ अशी मागणी कोथरूड भागातील नगरसेवकांनी केली आहे. या भागात दोन्ही प्रकल्प कसे करता येतील, यासाठी ‘महामेट्रो’च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन नगरसेवकांनी मागणी केली.

कोथरूड येथे मेट्रो प्रकल्प तसेच शिवसृष्टीचा प्रकल्प उभारण्यास महापालिकेच्या मुख्य सभेत मंजुरी देण्यात आली आहे. या भागात आरक्षित असलेल्या १८ एकर जागेत मेट्रो स्टेशन आणि शिवसृष्टी करता येणे शक्य आहे. मेट्रो स्टेशन भूमिगत केल्यास दोन्ही प्रकल्प करता येतील, त्यामुळे याचा सकारात्मक विचार करावा, असे पत्र नगरसेवक दीपक मानकर, चंदू कदम, वैशाली मराठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महामेट्रोला पाठविले आहे.

महापालिकेचा चालू वर्षाचा (२०१७-१८) अर्थसंकल्पीय आराखडा सादर करताना महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मेट्रोसाठी अत्यंत तुटपुंजी तरतूद केली आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी भरीव तरतूद असणे गरजेचे असल्याने ही तरतूद करावी, यासाठी मानकर यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांची भेट देऊन तरतूद करण्याची मागणी केली.

शहरातील रस्त्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्याबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व्हावी, यासाठी मेट्रो प्रकल्प महत्त्वाची कामगिरी बजाविणार आहे. शहराच्या विकासासाठी मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाला विरोध नाही. मात्र, हा प्रकल्प करताना कोथरूड भागातील शिवसृष्टीचा प्रकल्प देखील मार्गी लावण्याची गरज आहे. नियोजित शिवसृष्टीच्या जागेत भूमिगत मेट्रो स्टेशन उभारणे शक्य असल्याने याचे नियोजन करुन पुणेकरांसमोर सादरीकरण करावे, अशी मागणीही नगरसेवक मानकर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्तांच्या भाडेकराराच्या नूतनीकरणास मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लष्कराच्या नागरी भागासह पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील भाडेतत्त्वावर दिलेल्या जुन्या मालमत्तांच्या भाडेकरार नूतनीकरणास संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. परिणामी, भाडेकरार संपलेल्या किंवा संपण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भाडेकरार नूतनीकरणासाठी डिसेंबर २०१८पर्यंत संरक्षण मंत्रालयाने मुदतवाढ दिली आहे.

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत लष्करासह कँटोन्मेंटच्या अनेक मालमत्ता नागरिकांसाठी ९९ वर्षांच्या करारावर देण्यात आल्या आहेत. काही मालमत्तांचा भाडेकरार संपला आहे. तर, अनेकांचे भाडेकरार संपण्यास अवधी आहे. परंतु, करार संपलेल्या नागरिकांनी त्याचे नूतनीकरण केले नाही. करार संपलेल्या भाडेकरूंनी तातडीने कराराचे नूतनीकरण करावे, याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजीवकुमार यांनी संबंधित भाडेकरूंना सूचना दिल्या होत्या. परंतु, अधिकाऱ्यांच्या सूचनेला नागरिकांनी केराची टोपली दाखविली होती. त्यामुळे मालमत्ता कँटोन्मेंटच्या ताब्यात घेण्यात यावी या संदर्भात कारवाईचा बडगा उगारण्यात आला. परंतु, त्याला बोर्डाच्या सदस्यांनी विरोध केला होता. परिणामी, या संदर्भात नेमकी काय कारवाई करावी अथवा मुदतवाढ द्यावी, की देऊ नये यासाठी संरक्षण मंत्रालयाकडे पुणे कँटोन्मेंट बोर्डाने विचारणा केली होती.

कँटोन्मेंट कायद्यातील भाडेकरार नूतनीकरण व कँटोन्मेंट मालमत्ता कायद्यानुसार संरक्षण मंत्रालयाने मुदतवाढ देण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार भाडेकरार संपलेल्या किंवा फेब्रुवारी २०१८पर्यंत भाडेकरार संपणाऱ्या मालमत्तांच्या नूतनीकरणास डिसेंबर २०१८पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरंक्षण विभागाने काही अटी घातल्या आहेत.

अनेक भाडेकरारांपैकी काहींच्या कराराच्या मुदत संपल्या आहेत. तरीही, त्यांनी नूतनीकरण केलेले नाही. अशा मालमत्तांचा भाडेकरार असलेल्या भाडेकरूंना संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयाचा फायदा होणार आहे. संरक्षण विभागाने भाडेकराराच्या नूतनीकरणास मुदतवाढ दिली आहे.

डॉ. डी. एन. यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कँटोन्मेंट बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी साहित्याला परंपरा नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यासाठी निमित्त असल्याने धार्मिक ग्रंथांना परंपरा आहे. मराठी साहित्याला इतिहास आहे; पण परंपरा नाही,’ असे निरीक्षण ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी रविवारी नोंदविले. ‘मराठी साहित्याची परंपरा निर्माण होण्यासाठी वाचकांनी केव्हाही वाचणे हेच निमित्त केले पाहिजे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे कवी सलील वाघ यांना ‘साहिर लुधियानवी पुरस्कार’ मनोहर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. प्रा. प्र. ना.परांजपे, दा. गो. काळे, संतोष शिंत्रे, सुरेश टिळेकर उपस्थित होते. पर्वती चढण्याचा विश्वविक्रम करणारे ८७ वर्षीय रामचंद्र पानसे यांचा सत्कार नारायण फडके यांच्या हस्ते झाला.

‘साहित्याला इतिहास आहे; पण परंपरा नाही. साहित्याचा परामर्श घेणारी पुस्तके मराठी भाषेत खूप आहेत; पण ती पुस्तके म्हणजे परंपरा ठरत नाहीत,’ याकडे लक्ष वेधून मनोहर म्हणाले, ‘धार्मिक ग्रंथांना परंपरा आहे. काही ना काही निमित्ताने धार्मिक ग्रंथांचे वाचन केले जाते. या वाचनाची एक परंपरा निर्माण झाली आहे. साहित्य वाचायला अशा निमित्तांची गरज नसते; पण परंपरा निर्माण होण्यासाठी केव्हाही वाचणे हेच निमित्त केले पाहिजे.’

‘कथा, कादंबरी, कविता असे साहित्य प्रकार वाचण्याची कौशल्ये वेगवेगळी असतात. वाचनाच्या विविध कौशल्यांवर संशोधन झाले पाहिजे. कवितेत शील-अश्लील, सुरूप-कुरूप अशा शब्दांचा बाऊ करू नये,’ अशी अपेक्षा मनोहर यांनी व्यक्त केली. धनंजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कृपाशंकर शर्मा यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपाध्ये, केळस्कर यांना कासव मित्र पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सह्याद्री निसर्ग मित्र संस्थे’तर्फे देण्यात येणारा कासव मित्र पुरस्कार यंदा वेळास येथील मोहन उपाध्ये आणि आंजर्ला येथील अभिनय केळस्कर यांना जाहीर झाला आहे. येत्या ५ एप्रिलला आंजर्ला येथे होत असलेल्या एका कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेतर्फे गेल्या चौदा वर्षांपासून सागरी कासव संरक्षण मोहिमेत यशस्वी कार्य करणाऱ्या व्यक्तींना कासव मित्र पुरस्कार देण्यात येत आहे. यंदाचे पुरस्कारार्थीचे मोहन उपाध्ये हे काही वर्षांपूर्वी मुंबईतील नोकरी सोडून वेळासमध्ये परतले. तेथे सह्याद्रीचे कासवांचे काम पाहून त्यामध्ये सहभागी झाले. पुढे वेळासमधील ग्रामस्थांबरोबर विविध कल्पना अंमलात आणल्या. वेळासबरोबर आजूबाजूच्या गावात कासव संरक्षण यशस्वी केले. वेळासचा कासव महोत्सव आणि होम स्टे यासर्व कामातून त्यांचा पुढाकार होता.

अभिनय केळस्कर यांनी २००६मध्ये आंजर्ले येथे सह्याद्रीच्या कासव संरक्षण मोहिमेत सहभाग घेतला. कामांमध्ये सातत्य दाखवून आजूबाजूच्या गावांतसुद्धा कासव संरक्षण यशस्वी केले. आंजर्ले येथे गेल्या वर्षापासून कासव महोत्सवास सुरुवात केली. या सर्व कामात ग्रामस्थ्यांना बरोबर घेतले. सागरी कासवांच्या संवर्धनामध्ये त्यांचे उल्लेखनीय काम सुरू आहे. दरम्यान, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थातर्फे सागरी कासव संवर्धनाचे हे काम गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर या कामातून एक हजारांहून अधिक अधिक घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. तसेच ४५ हजारांहून अधिक जास्त पिल्ले समुद्रात सोडण्यात यश आले आहे, अशी माहिती संस्थेचे समन्वयक योगीराज राठोड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी धोरणे चुकीची आहेत. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून व्यवस्थाच शेतकऱ्यांना बदनाम करीत आहेत. सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला.

युवक क्रांती दलाच्यावतीने आयोजित शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आसूड सभेत ते बोलत होते. या वेळी युक्रांदचे कुमार सप्तर्षी, जांबुवंत मनाहेर उपस्थित होते. कडू म्हणाले, ‘शहरात शेतकऱ्यांविषयी बोलावे आणि गावांत शहरांचा विकास सांगताना अवघड जाते. कारण ज्या ग्रामस्थांची धरणासाठी जमीन गेली त्यांना पाणी मिळत नाही. ही दुर्देवाची बाब आहे. मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, संसार, शेतीचे नुकसान, कर्ज यामुळे शेतकरी आत्महत्या करीत असून त्यात वाढ होत आहे. शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी शहरापासून ते गावापर्यंत लढाई सुरू केली पाहिजे. जातधर्माच्या नावाखाली लोक एकत्र येतात तेव्हा शेतकऱ्यांसाठी एकत्र येत नाही हे वाईट आहे.’

‘महागाई वाढल्यामुळे सातव्या वेतन आयोगानुसार नोकरदारांचे पगार १८ हजारांनी वाढणार आहेत. कर्जमाफी केली, तर शेतकरी आत्महत्या थांबतील का, असे मुख्यमंत्री विचारतात. वेतन आयोग वाढल्यावर भ्रष्टाचार थांबणार का,’ असा प्रश्न कडू यांनी सरकारला विचारला. ‘आघाडी सरकारच्या संघर्ष यात्रेचा समाचार घेताना स्वामीनाथन आयोग लागू केला असता, तर संघर्ष यात्रा काढावी लागली नसती,’ असा कडू यांनी टोला लगावला. दरम्यान, ‘वाढत्या महागाईत शेतमालास बाजारभाव देणार कोण? सरकारचे धोरण बदलल्याशिवाय सातबारा कोरा होणार नाही. या मागणीसाठी ११ एप्रिलपासून नागपूरातून शेतकरी आसूड यात्रा नागपूर ते वडनगर गुजरात काढणार आहे,’ असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मौजमजेसाठी ऑफिसबॉयने कार्यालयात केली चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कंपनीतील कामगारांचे पगार करण्यासाठी कार्यालयात ठेवलेली सहा लाख रुपयांची रोकड कंपनीत काम करणाऱ्या ऑफिस बॉयनेच लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. चतुःश्रुंगी पोलिसांनी गुन्ह्याचा चोवीस तासांत छडा लावून ऑफिस बॉयला अटक केली आहे. त्याने मौजमजा करण्यासाठी बनावट चावीच्या साह्याने रोकड चोरून नेल्याचा समोर आले आहे.

गोपाळ मच्छिंद्र धनगर (वय २६, सध्या रा. पाषाण. मूळ रा. मंगळूर, ता. चोपडा, जि. जळगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत विशाल रवींद्र बेहरे (वय २९) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेहरे हे पाषाण येथील चेतस कंट्रोल सिस्टिम्स प्रा. लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात अकाउंटंट आसिस्टंट म्हणून नोकरीला आहेत. तर, अटक केलेला आरोपी हा गेल्या सात वर्षांपासून या कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम करतो. १८ मार्च २०१७ रोजी कंपनीतील कामगारांचे पगार करण्यासाठी बेहरे यांनी आरोपी धनगर याला ‘बँक ऑफ इंडिया’चा चेक देऊन पाच लाख रुपयांची रोख रक्कम काढण्यासाठी पाठविले.

धनगर याने पैसे काढून आणले. बँकेतून आणलेले पाच लाख आणि आधीचे दोन लाख असे एकूण सात लाख रुपये मोजून बेहरे यांनी शिपाई प्रल्हाद साळुंखे याला दिले. त्यांनी ती रक्कम कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या कार्यालयातील ड्रॉवरमध्ये लॉक करून ठेवली. दुसऱ्या दिवशी या ठिकाणी पैसे नसल्याने बेहरे यांनी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदेश केंजळे यांच्या तपास पथकाने कंपनीत भेट देऊन चौकशीला सुरुवात केली. त्या वेळी संशयितरीत्या फिरत असलेल्या ऑफिस बॉय धनगर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

बनावट चावी बनवून घेतली

गेल्या सात वर्षांपासून गोपाळ धनगर हा कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम करतो. त्याला दारू पिण्याचे व्यसन असून मौज-मजा करण्यासाठी त्याने ही रोकड चोरल्याचे तपासात समोर आले. धनगरनेच बँकेतून पाच लाख रुपये काढून आणले होते. त्यामुळे सर्व रोख रक्कम ही साहेबांच्या केबिनमध्ये ठेवल्याची माहिती त्याला होती. त्याने या संधीचा फायदा घेऊन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयाची बनावट चावी तयार करून घेतली. त्यानंतर या चावीच्या साह्याने ड्रॉवरमधील सहा लाख रुपये चोरून नेल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तुमच्यात बाया किती?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘तमाशाची परंपरा नाहीशी होत चालली आहे. त्याला तमाशातील कलावंत नाही, तर समाज कारणीभूत आहे. रसिकांचे चोचले पुरवता पुरवता पारंपरिक सादरीकरण राहून जाते. बीभत्स गाणी बसवल्याशिवाय तिकिटे खपत नाहीत. ‘तुमच्यात बाया किती,’ या प्रश्नापुरतीच तमाशाची कला मर्यादित राहिली आहे,’ अशी खंत व्यक्त करून ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी रविवारी तमाशा कलावंतांची कैफियत मांडली.

‘परममित्र प्रकाशन’तर्फे साने गुरूजी स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे लिखित ‘तमाशा-एक रांगडी गंमत’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा पार पडला. रघुवीर खेडकर व ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. परममित्र प्रकाशनाचे माधव जोशी, संदेश भंडारे आदी या वेळी उपस्थित होते.

खेडकर यांच्या प्रत्येक शब्दागणिक तमाशा कलावंतांची सध्याची भीषण परिस्थिती उलगडत होती. त्यांच्या तोंडून कथन होणारी कलावंतांची अवस्था सभागृहातील प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी होती. ‘सध्या वगनाट्य पाहायलाच कुणी तयार नाही. चित्रपटातील बीभत्स गाण्यांनाच मागणी आहे. एवढे करूनही कार्यक्रमाच्या ठिकाणी पदोपदी अपमान, अन्याय सहन करावा लागतो. अन्याय सहन करू नये, असे म्हणतात. पण, आम्हाला पर्याय नसतो. दररोज जीव मुठीत धरून जगावे लागते, अशी आमची परिस्थिती आहे. तमाशा ही कला टिकवणे ही समाजाची जबाबदारी आहे. लोकाश्रयाबरोबर या कलेला आता राजाश्रयाची गरज आहे, अन्यथा तमाशा ही कला फक्त पुस्तकातच वाचायला मिळेल,’ असे खेडकर यांनी सांगितले.

‘सरकारने शास्त्रीय कलेच्या संस्था उभ्या केल्या. त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. परंतु, लोककलेबाबतीत कायम दुर्लक्ष केले. संगीत अकादमी, साहित्य अकादमी, नाट्य अकादमी सुरू झाल्या; पण लोककला अकादमी उभी का उभी राहिली नाही,’ असा प्रश्न डॉ. गणेश देवी यांनी उपस्थित केला. ‘मुंबई, दिल्लीमध्ये लोककलेचा एखादा कार्यक्रम करून तिथे चार मर्जीतल्या लोकांना नाचवणे म्हणजे लोककला नव्हे,’ अशी सणसणीत टीकाही त्यांनी सरकारला उद्देशून केली. संदेश भंडारे यांनी पुस्तक लिहिताना आलेले अनुभव, तमाशा कलावंतांबरोबरच्या आठवणींना या वेळी उजाळा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगली गाणी, नाट्य आणि गप्पांची मैफल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘अताशा असे हे मला काय होते’, ‘माझे जगणे होते गाणे’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांसह डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘ये जवळी घे जवळी प्रियसख्या भगवंता’ आणि ‘ऐसे काही व्हावे... मन शांत निजावे’ यांसारखी काही नव्याने परिचित होत चाललेली गाणी सादर करून ‘माझे जगणे होते गाणे’ ही मैफल रंगवली. निमित्त होते, एलान एंटरटेन्मेंट आणि ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’च्या वतीने आयोजित संगीतकार व गायक सलील यांच्या सांगीतिक मैफलीचे.

कधी प्रियकर, तर कधी वडील म्हणून, कधी मन बनून, तर कधी मित्राच्या नात्याने सलील यांनी कविता, गाणी, गप्पा, नाट्य सादरीकरण आणि त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधील काही प्रकरणे आणि उताऱ्यांचे अभिवाचन करत मैफल रंगतदार केली. कवितेचे गाणे होतानाची प्रक्रियाही त्यांनी या कार्यक्रमातून उलगडली. वेळेअभावी त्यांनी अगदी काही निवडक कवितांचाच समावेश मैफलीत केला.

‘शहाण्या माणसांची फॅक्टरी’ आणि ‘लपवलेल्या काचा’मधील निवडक लेखांचे अभिवाचनही या वेळी करण्यात आले. गावातले लोक वर्ल्ड कपचा आनंद घेतात, तेव्हाच्या त्यांच्या गप्पा आणि ‘अॅरेंज मॅरेज’साठी एकमेकांना कॉफी शॉपमध्ये भेटणाऱ्या दोघांविषयीच्या लेखांना विशेष दाद मिळाली. मैफलीचे दुसरे सत्र हे पूर्णपणे फर्माईशींवरच रंगले. उपस्थित रसिकांनी अत्यंत नेमक्या, अर्थपूर्ण आणि सुंदर गीतांची फर्माईश करत आणि ती सलील यांना आग्रहाने पूर्ण करायला लावत मैफलीत जान आणली. कवी आणि गझलकार अनिल कांबळे यांच्या ‘तुला जर द्यायचे आहे, जुने ते प्रहर दे माझे... उन्हाने चिंब झालेले, फुलांचे शहर दे माझे’ या गझलेने मैफलीच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात झाली.

मंगेशकर कुटुंबीयांशी असलेल्या निकटच्या सहवासाविषयी सांगताना सलील यांनी पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले कवी ग्रेस यांचे ‘भय इथले संपत नाही’ हे गाणे सादर केले. मंगेशकर भगिनींपैकी एक असलेल्या संगीतकार मीना खडीकर यांचेही गाणे सादर करून त्यांनी रसिकांची दाद मिळवली. ‘तुझे नि माझे नाते काय’सारख्या गीतासह सलील यांनी ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे’ आणि ‘परी हूं मैं’ ही गाणीही सादर केली. त्यांना आदित्य मोडक यांनी तबल्याची, राजेंद्र दूरकर यांनी साइड ऱ्हिदम्सची आणि रितेश ओहोळ यांनी गिटारची साथ केली. कार्यक्रमाचे निवेदन निखिल हिरुळकरने केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनड्युटी डुलकीमुळे कर्मचाऱ्यांचे निलंबन

$
0
0

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कोथरूड व पुणे स्टेशन डेपोमध्ये गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रात्रपाळीला असलेले नऊ कर्मचारी ऑनड्यूटी झोपल्याचे आढळले. त्यानंतर पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्यांचे निलंबन करण्याचा आदेश दिला. मुंढे यांनी स्वत: सर्व १३ डेपोंमध्ये रात्री तपासणी केली.

कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मुंढे यांची आदर्श आचारसंहिता घालून दिली आहे. या आचारसंहितेचे पालन होत आहे किंवा नाही याकडे ते काटेकोरपणे लक्ष देत आहेत. कामाची वेळ बदलल्यानंतर उशिरा येणाऱ्या ११७ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर कामावर येऊन झोपा काढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडगा उगारला आहे. निलंबन करण्यात आलेलेल्या नऊ जणांपैकी दोन चालक असून सात कर्मचारी हे वर्कशॉपमधील आहेत. यामध्ये कोथरूडचे चार व पुणे स्टेशन डेपोचे पाच कर्मचारी आहेत. या कर्माचाऱ्यांची रात्रपाळीची वेळ रात्री १० ते सकाळी सहा अशी होती. कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे नसतानाही तिला मिळाले ‘हृदय’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रस्ता अपघातात ‘ब्रेन डेड’ झालेल्या नाशिकच्या एका व्यक्तीचे हृदय मिळाल्याने तेरा वर्षांच्या जळगावच्या ‘तिला’ जगण्याची रविवारी पुन्हा संधी मिळाली. घरची आर्थिक बेताची असलेल्या ‘तिच्यावर’ उपचारांसाठी पैसे नसतानाही यशस्वीरीत्या हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. तर, आणखी एका व्यक्तीला यकृत मिळाल्याने त्यांनाही जीवदान मिळाले.

‘नाशिक येथील रस्त्यात अपघात झाल्याने उपचारांसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये अपघातग्रस्ताला दाखल करण्यात आले होते. ती व्यक्ती मूळची संगमनेरची. ते ‘ब्रेनडेड’ झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले. त्यावर त्या व्यक्तीच्या पत्नीने त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि पुढील गरजू पेशंटचा शोध सुरू झाला. त्या वेळी रुबी हॉस्पिटलमध्ये तेरा वर्षांची मुलगी हृदयाच्या प्रतीक्षेत होती. विमानाने हृदय लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. तेथून अवघ्या सात मिनिटांत रुबी हॉस्पिटलमध्ये ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे हृदय नेण्यात आले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नाशिकहून ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे केईएम हॉस्पिटलमध्ये यकृत अडीच तासांत आणण्यात आले,’ अशी माहिती पुणे प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या (झेडटीसीसी) समन्वयक आरती गोखले यांनी दिली.

‘तेरा वर्षांची ही मुलगी मूळची जळगावची. गेल्या वर्षीच तिच्या वडिलांचे निधन झाले. तिची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. तिला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. तिला ‘कार्डिओमायोपॅथी’ नावाचा हृदयाचा आजार झालेला आहे. तिच्यावर उपचारासाठी तिच्या आईसह ती अनेक हॉस्पिटलमध्ये चौकशी करून आली. परंतु, सर्वत्र निराशा आली. अखेर रुबी हॉस्पिटलमध्ये ती मुलगी उपचारांसाठी आली. दोन महिन्यांपासून ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रकृती सुधारली होती. त्यानंतर हृदयप्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिकवरून मिळालेले हृदय रुबी हॉस्पिटलला आल्यानंतर १० वाजून २२ मिनिटांनी तिच्यावर प्रत्यारोपणासाठी सुरुवात करण्यात आली. दुपारी एक वाजता ऑपरेशन यशस्वी झाले,’ अशी माहिती हॉस्पिटलच्या प्रत्यारोपण समन्वयक सुरेखा जोशी यांनी दिली. डॉ. दुराईराज यांच्यासह डॉ. विकास साहू यांनी हे प्रत्यारोपण यशस्वी केले.

केईएम हॉस्पिटलच्या प्रत्यारोपण समन्वयक उल्का वाखारे म्हणाल्या, ‘नाशिकवरून ‘ग्रीन कॉरिडॉर’ने दुपारी साडेबारा वाजता यकृत आले. ४७ वर्षांच्या एका पेशंटला दोन वर्षांपासून ‘लिव्हर सिरॉसिस’चा आजार होता. यकृत मिळविण्यासाठी सहा महिन्यांपासून प्रतीक्षा होती. यकृततज्ज्ञ डॉ. सुरेश भालेराव, डॉ. शशांक शोत्रय, डॉ. बिपीन विभुते, डॉ. भरत कळंबे, डॉ. सचिन वझे यांनी हे प्रत्यारोपण यशस्वी केले.’

तिच्यासाठी लढले सारे...

तेरा वर्षांच्या मुलीच्या हृदय प्रत्यारोपणासाठी तिच्या आईकडे काहीच नव्हते. त्या मुलीला स्वतःला काय आजार झाला आहे, किती दिवसांपासून तो आजार आहे, इथपासून तिला आता काय उपचार देणार आहेत इथपर्यंतची माहिती आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रश्नाला आईने उत्तर देण्याऐवजी ती स्वतःच थेट धाडसीपणाने उत्तर देत होती. या मुलीचे हॉस्पिटलला कौतुक वाटल्याने तिच्यासाठी सर्वांनीच प्रयत्न सुरू केले. डॉ. मनोज दुराईराज यांनी तिच्यासाठी निधी उभारता येऊ शकेल का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर हॉस्पिटलच्या प्रत्यारोपण समन्वयक सुरेखा जोशी यांनी विविध संस्थांकडून मदतनिधीसाठी प्रयत्न सुरू केले. आतापर्यंत १८ लाख ५० हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. त्याशिवाय डॉ. मनोज दुराईराज यांनी नाशिकला जाऊन त्या व्यक्तीचे हृदय काढण्याचे तसेच प्रत्यारोपणाचे ऑपरेशन केले. त्यामुळे तिला पुन्हा जीवदान मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ वाहून गेलेले माळीण गाव पुन्हा राहिले उभे...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर

‘माळीणची दुर्दैवी दुर्घटना झाल्यानंतर सरकार, प्रशासन व समाजातील वेगवेगळ्या घटकांनी तत्परतेने दाखविलेल्या एकजुटीच्या प्रयत्नांमुळेच एक ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून माळीणचे पुनर्वसन करणे शक्य झाले,’ अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. माळीण बाधितांचे पुनर्वसन करून सरकारने त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही ज्या वेळी हाक द्याल, त्या वेळी तुमच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी सरकार केव्हाही तयार आहे, असा शब्दही या वेळी मुख्यमंत्र्यांनी माळीण ग्रामस्थांना दिला.

माळीण पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत माळीणबाधितांसाठी बांधण्यात आलेल्या घरांच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन ग्रामस्थांना घरांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘माळीणची दुर्घटना खूपच भीषण होती. डोंगरकडा कोसळ्यामुळे संपूर्ण गावच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. या दुर्घटनेत आपल्या कुटुंबीयांना गमावून बसलेल्या इतर नातलगांच्या पाठीमागे सर्वांनी उभे राहण्याची गरज होती. जोपर्यंत त्यांचे योग्य असे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत सरकार व समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले. या बाधितांच्या पुनर्वसनात विद्यमान व पूर्वीच्या राज्य सरकारचेही योगदान राहीलेले आहे. माळीणचे एक स्मार्ट ग्राम म्हणून पुनर्वसन करण्यासाठी वेळप्रसंगी सरकारने नियम व अधिनियमांमध्ये बदल केलेले आहेत. सरकारसोबत विविध संस्थांनी बहुमोल असे कार्य केले आहे. त्यांचा या आदर्श पुनर्वसनात मोठा वाटा आहे. वेळप्रसंगी सरकारची यंत्रणा कमी पडली असती; परंतु समाजातील अनेक हातांनी केलेल्या सहकार्यामुळे माळीणचे पुनर्वसन लवकर करणे शक्य झाले.’‘कोणताही माणूस आपले पिढ्यानपिढ्या राहत असलेले घर कायमचे सोडून दुसरीकडे राहायला जाण्यास तयार होत नाही. कारण त्या घराशी त्याच्या आठवणी, सुख, दुःख जोडलेले असते. तो दुसरीकडे राहू शकत नाही. त्याच गोष्टी विचारात घेऊन हेवा वाटेल अशा सुविधा देऊन माळीण बाधितांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी विशेषत्वाने नमूद केले.

माळीणवासीयांच्या स्वप्नपूर्तीचा सोहळा

अडीच-तीन वर्षांपूर्वी नैसर्गिक आपत्तीत अक्षरश: वाहून गेलेले माळीण गाव आज सरकारच्या मदतीने पुन्हा दिमाखाने उभे राहिले आहे. माळीण पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत माळीणबाधितांसाठी बांधण्यात आलेल्या घरांचा लोकार्पण सोहळा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला, तेव्हा सरकारच्या आश्वासनपूर्तीसह गाव पुन्हा उभे राहिल्याचे समाधान माळीणवासीयांच्या चेहऱ्यावर झळकत होते.

आमडे या गावाच्या हद्दीतील जागेत माळीण ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. यासाठी आठ एकर जमीन विकत घेण्यात आली होती. या पुनर्वसन गावठाणाचा आराखडा पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाने बनवून दिला आहे. रविवारच्या लोकार्पण समारंभाला सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आदिवासी मंत्री विष्णू सावरा, राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार शिवाजी आढळराव, आमदार दिलीपराव वळसे, आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरव राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, माळीण व आजूबाजूच्या गावांचे ग्रामस्थ, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पडकई कामांसाठी निधी देणार

आंबेगाव व जुन्नर तालुक्यांतील सहा वाड्या-वस्त्या व गावे माळीणसारख्याच धोकादायक स्थितीत आहेत. या सर्वांचे मॅपिंग करण्यात आलेले आहे. या गावांमध्ये आपत्ती येऊ नये म्हणून एक कृती आराखडा तयार करण्यात आलेला असून यासाठी तीन कोटी रुपयांचा खर्च उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी राव यांचे विशेष कौतुक

माळीणचे पुनर्वसन करताना जिल्हाधिकारी सौरव राव यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेले आहे. त्यामुळे या पुनर्वसनाचे सर्वाधिक श्रेय त्यांनाच जाते, अशी जाहीर प्रशंसा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केली. माळीण, असाणे व परिसरातील काही गावे व वाड्यावस्त्यांची पिण्याची व शेतीच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून असाणे गावच्या तलावासाठी सुमारे पंधरा कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहीती मुख्यमंत्र्यानी या वेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप आमदाराच्या मुलीवर हल्ला, बोटं तुटली!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पिंपरी

यवतमाळ जिल्ह्यातील वणीचे भाजप आमदार संजीवशेट्टी बोदकुरवार यांची मुलगी अश्विनी हिच्यावर पिंपरीत प्राणघातक हल्ला करण्यात आला असून त्यात तिची बोटं कापली गेली आहेत. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी राजेश बक्षीला ताब्यात घेतलं आहे.

अश्विनी बोदकुरवार आणि राजेश बक्षी हे पुण्यातील बालाजी इन्स्टिट्युट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंटमध्ये एकाच वर्गात शिकत असल्याचं कळतं. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज सकाळी अश्विनी हॉस्टेलमधून बाहेर पडत असताना, राजेशनं गेटजवळच धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. त्यातून ती बचावली, पण या हल्ल्यात तिची हाताची बोटं कापली गेली. सुदैवानं, ती शरीरापासून वेगळी झालेली नाहीत. वाकड येथील लाइफ पॉइंट हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. अश्विनीची प्रकृती स्थिर असल्याचं संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितलं.

या घटनेनंतर लगेचच पोलिसांनी राजेश बक्षीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. त्यातून हल्ल्यामागचं कारण स्पष्ट होऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र दिनी मराठी अभिजात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार १ मे हा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधण्याची दाट शक्यता आहे. न्यायालयीन अडथळे दूर झाल्याने मराठी भाषेचा चार वर्षांपासून भिजत पडलेला प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. याबाबत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव कंवरजित सिंग यांनी पत्र पाठवले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार मराठीला अभिजात दर्जा देण्याबाबतची कृतिशील कार्यवाही सुरू झाल्याचे त्यात स्पष्टपणे म्हटले आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा, यासाठी पंतप्रधान मोदी यांना एक लाख पत्रे पाठवण्याचा उपक्रम शाहूपुरी शाखेतर्फे सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर झालेल्या भेटीत हा प्रश्न उपस्थित केला होता. खासदार श्रीरंग बारणे यांनीही लोकसभेत या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या प्रश्नाची दखल घेतली होती. गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या या सर्व घडामोडीनंतर अभिजात भाषेचा विषय चांगलाच ऐरणीवर आला आहे.

साहित्य परिषद; तसेच शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. त्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून योग्य त्या कार्यवाहीसाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडे पत्र पाठवण्यात आले होते. कुलकर्णी यांना पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेतल्याचे पत्र आले होते. त्यानंतर आता थेट सांस्कृतिक खात्याच्या सचिवांचे पत्र प्राप्त झाल्याने अभिजात दर्जा मिळण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिफारस मंत्रालयाच्या विचाराधीन होती. मात्र, या विषयावर मद्रास उच्च न्यायालयात आर. गांधी यांनी हरकत घेणारा अर्ज दाखल केला होता. तज्ज्ञांच्या अहवालात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट करून अर्ज फेटाळण्यात आल्याने न्यायालयीन अडथळे दूर झाले आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची आता सर्वांना प्रतीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुक्या जीवांसाठी ते भरतात तळे

$
0
0

धर्मेंद्र कोरे, जुन्नर

जिल्ह्यात आता ठिकठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. माणसांनाच प्यायला पाणी नाही, तर जनावरांना कुठून… अशीही अवस्था काही ठिकाणी आहे. मात्र, जनावरांचे हाल होऊ नयेत यासाठी बल्लाळवाडीचे वामन कुटुंबीय पुढे सरसावले आणि त्यांनी नऊ किलोमीटर अंतरावरून आणलेले लिफ्टचे पाणी थेट खाणतळ्यात सोडले … तेही फक्त मुक्या प्राण्यांसाठी.

बल्लाळवाडी (ता. जुन्नर) येथे मेंढपाळांचे कळप आहेत. मात्र पाणीसाठे आटल्याने त्यांना पिण्यासाठी पाणी कोठून आणायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. दरम्यान बल्लाळवाडीत एक दगडखाणीतले तळे आहे. तेथे बऱ्याचदा पाणी पिण्यासाठी वाडीवस्तीवरची जनावरे तसेच मेंढपाळांच्या मेंढ्या येत असतात. मात्र, उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात येथे येणाऱ्या मुक्या जीवांसाठी पाणी उरलेले नाही. हे पाहून प्रगतिशील शेतकरी शिवाजी वामन आणि त्यांची मुले विष्णू आणि पंकज वामन यांनी थेट

पाइपलाइनने पाणी खाणतळ्यात सोडून ते मुक्या जीवांसाठी उपलब्ध केले आहे. तीन ते चार तास मोटार चालवून हे तळे पाण्याने भरले जाते. पुन्हा काही दिवसांनी त्यातील पाणी कमी झाल्यावर पुन्हा त्यात पाणी सोडून मुक्या जीवांच्या तृष्णा ते भागवत आहेत. मार्च महिन्यापासून आतापर्यंत तीन वेळा त्यांनी तळ्यात पाणी सोडून, येथे पाणी पिण्यासाठी नियमित येणाऱ्या भटक्या तसेच पाळीव जनावरांसाठी ते उपलब्ध केले आहे. उन्हाळ्यातदेखील जोपर्यंत आवश्यकता आहे, तोपर्यंत पाणी पुरविणार असल्याचे वामन कुटुंबीयांनी सांगितले. आज पाण्याची समस्या जागोजागी पाहायला मिळत असताना दूरवरून पाइपलाइनने आणलेले पाणी मुक्या जनावरांसाठी देण्याचे दातृत्व अनन्यसाधारण असेच ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'महाराष्ट्रातही अँटी रोमियो स्क्वॉड हवं'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

भाजप आमदाराच्या मुलीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अँटी रोमियो स्क्वॉड असायला हवं. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी सांगितलं.

यवतमाळ जिल्ह्यातील वणीचे भाजप आमदार संजीवशेट्टी बोदकुरवार यांची मुलगी अश्विनी हिच्यावर पिंपरीत प्राणघातक हल्ला करण्यात आला असून त्यात तिची बोटं कापली गेली आहेत. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी राजेश बक्षीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचं वृत्त कळल्यानंतर राहटकर यांनी आज सदर मुलीची भेट घेऊन चौकशी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यात अँटी रोमियो स्क्वॉडची गरज विशद केली. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

एप्रिल अखेरपर्यंत महिलांसाठी हेल्पलाईन

राज्य महिला आयोगाचे अॅप, संकेतस्थळ असून या सुविधा मर्यादित असल्याने एप्रिल अखेर पर्यंत महिलांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी राज्य महिला आयोगाची स्वतंत्र हेल्पलाइन आणि टोल फ्री नंबर प्रसिद्ध करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब करा

महिलांनी कायद्याची माहिती करून घेतली पाहिजे. त्याच बरोबर समाज आणि पालकांनीही बदलत्या कल्चरला टाळून एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब करावा आणि पाल्यांवर लक्ष ठेवायला हवं असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापटही उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अव्वल स्थानासाठी कंपन्यांचे ‘लॉबिंग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) आघाडीचा क्रमांक मिळविण्यासाठी काही खासगी कंपन्यांनी चक्क सरकारी आणि खासगी विद्यापीठांच्या कुलगुरूंना ‘ई-मेल’ पाठविले होते. एवढेच नव्हे तर रँकिंगची सर्व प्रक्रिया आम्हाला माहिती असून, वरचा क्रमांक मिळवून देण्याची खात्रीही या कंपन्यांनी दिली होती.

या शिवाय कंपन्यांनी आकर्षक पॅकेजही दिली होती, अशी माहिती खास सूत्रांनी दिली. त्यामुळे ‘एनआयआरएफ’मध्ये क्रमांक मिळविलेल्या काही नवख्या आणि खासगी विद्यापीठांच्या तसेच कॉलेजांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विभागाने यंदा ‘एनआयआरएफ’मध्ये सहभागी होण्याचे कॉलेज, शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना अनिवार्य केले होते. गेल्या वर्षी ही सक्ती नव्हती. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन दक्षिण भारतातील काही खासगी कंपन्यांनी कॉलेज, शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांच्या प्रमुखांना वरचा क्रमांक मिळवून देण्यासाठी संपर्क केला होता. या शिवाय मोबाइलवर संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला होता.

या ई-मेल आणि मेसेजमध्ये ‘एनआयआरएफ’च्या यादीमध्ये वरचा क्रमांक मिळविण्यासाठीची आवश्यक ती माहिती देण्याचे आणि त्याआधारे संपूर्ण प्रक्रियेमध्ये मदत करण्याचे आमिष कुलगुरूंना दाखवण्यात आले होते. या प्रक्रियेत विद्यापीठाला आघाडीचा क्रमांक कसा प्राप्त करता येईल याबाबत आम्ही माहिती देऊ, असे सांगण्यात आले होते. त्यासाठी विविध आकर्षक पॅकेजचीही माहिती देण्यात आली होती, असेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ‘एनआयआरएफ’मध्ये पहिल्या शंभरात स्थान मिळविलेल्या नवख्या आणि खासगी विद्यापीठांच्या तसेच कॉलेजांच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. या सर्व प्रकाराच्या विरोधात केंद्रीय मनुष्यबळ खाते काय कारवाई करेल, याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पब, बारविरोधात मानवी साखळी

$
0
0

औंध ः बाणेर रस्त्यावरील डेरेनो हाइट्स या एकाच इमारतीमधील पाच बार व पबच्या विरोधात नागरिकांनी सलग दुसऱ्या शनिवारी मानवी साखळी करून बार बंद करण्याची मागणी केली. प्रशासनाचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. बारला विरोध करण्यासाठी लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी हॉटेल महाबळेश्वर चौकात मानवी साखळी करून ‘नो बार अॅट माय द्वार’ चे फलक झळकवले.
डेरेनो हाइट्स या इमारतीला पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने बाणेरच्या मुख्य रस्त्यावरच वाहने लावली जातात. रस्त्यावर दारू पिणाऱ्या व सिगारेट ओढणाऱ्यांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बारला परवानगी नाकारण्यात यावी, यासाठी परिसरातील सोसायट्यांनी जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क आयुक्त, पालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. वारंवार तक्रारी करूनही सकारात्मक भूमिका शासनाने घेतलेली नाही.
अवैध पार्किंग, रात्री दोन वाजेपर्यंत येणारे गाण्यांचे आवाज, ड्रग्ज विक्री, शिवीगाळ, अश्लील चाळे यांचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. ही इमारतदेखील पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून रामनदी पात्रालगत उभारण्यात आल्याचे नागरिक सांगतात. या समस्येची पाहणी आमदार मेधा कुलकर्णी, स्थानिक लोकप्रतिनिधी अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर यांनी केली होती.
आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी मानवी साखळीद्वारे नागरिकांचे प्रबोधन
करून या इमारती मधील बारला विरोध करण्यात येणार असल्याचे या वेळी नागरिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसर्गरम्य वातावरणात इकोफ्रेंडली लग्नघटिका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर
लाखो रुपये उधळून लग्नात पैशाचा अपव्यय करण्याची संस्कृती एकीकडे फोफावत असताना, लग्नात होणाऱ्या अनावश्यक खर्चात बचत करून पर्यावरणाची काळजी घेऊन आणि अन्नधान्याची नासाडी टाळून इको फ्रेंडली लग्न करून देण्याची व्यवस्था गोळेगाव (ता. जुन्नर) येथील शशिकांत जाधव यांनी उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी लग्न करणाऱ्या उपवर तसेच वऱ्हाडी मंडळींना बेंजो, डीजे वाजवायला, फटाके वाजवायला, तसेच वधुवरांवर अक्षता टाकून तांदळाचा अपव्यय करण्यास बंदी आहे. या अटींवर लग्नासाठी व्यवस्था केली जाते.
या परिसरात झाडी आणि हॉल अशी नैसर्गिक आणि बांबूच्या बेटाची सुविधा असलेल्या ठिकाणी
उपवर वधूवरांना लग्नाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते. मात्र, वऱ्हाडीदेखील मोजकेच म्हणजेच दोनशेपेक्षा जास्त नसावेत. लग्नसोहळ्यात अक्षता न टाकता झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव वधुवरांवर केला जातो. डीजे किंवा बॅन्जो वाजविण्यास तसेच फटाके उडविण्यास येथे बंदी आहे. जाधव यांच्या बांबू बेट परिसरात दोनशेपेक्षा जास्त विविध प्रकारच्या पक्षांचे वास्तव्य आहे. पक्ष्यांना आवाजाचा कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी घेऊनच या सर्व लग्नव्यवस्थेची मांडणी केली आहे.
लग्न लावल्यावर वधु-वरांच्या विवाह नोंदणीची व्यवस्थादेखील डिंगोरे या येथून जवळच असलेल्या सर्वमंगलमांगल्ये सामाजिक संस्थेच्या वतीने सुनील समुद्र यांच्याकडून उपलब्ध केली जाते. लग्नाचे पौराहित्य तसेच विवाह नोंदीच्या दाखल्याचीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध केली आहे. लग्न
झाल्यानंतर अक्षतांच्या रूपात टाकलेल्या झेंडूच्या पाकळ्या गोळा करून त्या सेंद्रीय खत बनविण्यासाठी वापरल्या जातात; तर डीजेसारख्या वाद्यांना बंदी करून पारंपरिक वाद्ये वाजविण्याचीच मुभा असल्याने ध्वनिप्रदूषण देखील टाळले जाते. या लग्नासाठी दोनशे वऱ्हाडींच्या जेवणाचे २० हजार, तर भाडे म्हणून केवळ १ हजार रुपये, तर पौराहित्याच्या साहित्य, साखरपुड्याचे साहित्यासह
लग्ननोंदीच्या दाखल्यापर्यंतचा एकूण खर्च म्हणून साडेतीन हजार रुपये आकारले जातात. एकंदरीत खर्च लक्षात घेता पंचवीस हजारांपेक्षाही कमी खर्चात हे इको फ्रेंडली लग्न होते. त्यातून पैसा, बचत तर होतेच. परंतु पर्यावरण संतुलन राखण्याचा संस्कारदेखील रुजवला जात आहे. आतापर्यंत शशिकांत जाधव यांच्या या बांबू बेट बनात आठ लग्ने पार पडली आहेत आणि त्याच्या या इकोफ्रेंडली लग्नाच्या उपक्रमात सुशिक्षित उपवरही सहभागी होऊन लग्नबंधनात अडकत आहेत. ही समाजासाठी समाधानाची बाब नक्कीच आहे.

निराधारांना आधार
शशिकांत जाधव यांना शेतीउद्योगात मोठे नुकसान झाले. त्यात कर्जापायी त्यांना शेतीही विकावी लागली होती. परंतु, शेती म्हणजे काळीआई... तिच्यापासून दूर जायचे नाही, या निश्चयानेच त्यांनी शेतीलाच पूरक रोजगार शोधला. शेताच्या एका तुकड्यावर कृषी पर्यटन सुरू केले, त्यातून अनेकांना रोजगार दिला. पत्नी कविता हिने ग्रामीण परंपरेतल्या जेवणाच्या रेसिपी तयार करून भीमथडी जत्रेतून तसेच अन्य मॉलमध्ये रेसिपीची चव अनेक खवय्यांपर्यंत पोहोचवून संसार पुन्हा जोमाने उभा केला. आता मिळणाऱ्या उत्पन्नातून निराधार ज्येष्ठांना मोफत डबे देणे, वृद्धाश्रम, अनाथाश्रमांना मदतीचा हात देणे ही कामेदेखील ते करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images