Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

​ सणाच्या दिवशी आंदोलनाची वेळ

0
0

डॉ. आंबेडकर वसतिगृहात विद्यार्थ्यांचे हाल; पाण्याची बोंब

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वसतिगृहात गेल्या पाच दिवसांपासून पाण्याचा थेंब नाही... जेवणाला बसण्यासाठी साठी विद्यार्थ्यांना बसायला टेबल अन् खुर्च्याही नाहीत... त्यातच जेवणाची बिकट अवस्था आदी एक ना अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.
हडपसर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह भाड्याच्या इमारतीत आहे. येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या पाच दिवसांपासून वसतिगृहात पाणी नाही, टेबल, खुर्च्या नसणे आदी समस्यांसंदर्भात विद्यार्थ्यांनी संबंधितांशी पत्रव्यवहार केला. मात्र, कार्यालयाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. गेल्या पाच दिवसांपासून वसतिगृहातील पाणीपुरवठा बंद आहे, अशी र्कैफियत भूषण पाटील या विद्यार्थ्याने मांडली. दरम्यान, याबाबत इमारत मालकाशी संपर्क साधण्यात आला. ‘ऑगस्टमध्ये इमारतीचा करार संपला आहे. त्यामुळे विद्यार्थी अनधिकृतरित्या राहत आहेत. याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले जात नाही. प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी करार वाढवून घ्यावा किंवा लवकरात लवकर जागा रिकामी करावी. तसेच, थकित रक्कमही लवकरात लवकर द्यावी. तसे न झाल्यास इमारत खाली करण्यात येईल,’ असे उत्तर जागामालकातर्फे देण्यात आले.
विद्यार्थ्यांना मिळणारे भत्ते अद्याप त्यांना देण्यात आलेले नाहीत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पाच हजार रुपये, शैक्षणिक सहलीसाठी दोन हजार रुपये, गणवेश खरेदीसाठी दोन हजार रुपये आणि प्रकल्पासाठी एक हजार रुपये देण्यात येतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत. मार्च महिना संपत आला तरी अद्याप कोणतेही पैसे आलेले नाहीत. वसतिगृहातील मेसमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते, असे प्रशांत पाखरे याने सांगितले.
या विषयी बोलताना समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त लक्ष्मीकांत महाजन म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भत्त्यांबाबत सहायक आयुक्त कार्यालयाला तत्काळ उपाययोजना करण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सहायक आयुक्त कार्यालयातर्फे जिल्हा कोषागार विभागाकडे बिले देण्यात येतील. पुढील तीन दिवसात विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे देण्यात येतील.’

विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहाला प्रमुखच नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. विद्यार्थ्यांच्या मते सर्व समस्या निर्माण होण्यामागे वसतिगृह प्रमुख नसणे हे प्रमुख कारण आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेसाठी विविध ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून ते बंदच आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरा प्रकल्पांवर ४० कोटींचा खर्च

0
0

स्थानिकांच्या विरोधामुळे अनेक प्रकल्प बंद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेने कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्पांसाठी ४० कोटी रुपयांहून अधिक खर्च करून अडीच हजार मेट्रिक टनची क्षमता निर्माण केली असली, तरी त्यापैकी जेमतेम एक हजार टन कचऱ्यावरच प्रक्रिया होत आहे. कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी पालिकेने सुरू केलेले काही छोटे प्रकल्प नागरिकांच्या विरोधामुळे बंद करावे लागले आहेत. २५ बायोगॅस प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालत नसल्याचे समोर आले आहे.
शहर आणि परिसरात गेल्या सात-आठ वर्षांपासून कचऱ्याच्या समस्येने तीव्र रूप धारण केले आहे. उरळी-फुरसुंगी येथील कचरा डेपोत कचरा टाकण्यावरून उद्भवणाऱ्या वादांमुळे स्थानिक स्तरावर त्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प उभारण्यास पालिकेने सुरुवात केली. काही प्रकल्प महापालिकेने आपल्या निधीतून उभारले, तर काही प्रकल्प ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर उभारण्यात आले. हंजरच्या एक हजार टनाच्या प्रकल्पापासून इतर सर्व प्रकल्पांची क्षमता गृहित धरली, तर अडीच हजार मेट्रिक टन कचऱ्यावर सहज प्रक्रिया करता येऊ शकते. दुर्दैवाने, सर्वांत मोठा हंजर प्रकल्पच बंद पडला आहे. तर, तीनशे टनाच्या नोबेलच्या प्रकल्पाला आता नागरिकांचा विरोध सुरू झाला आहे. अजिंक्य आणि रोकेमचे प्रकल्प कमी क्षमतेने सुरू आहेत, तर दिशा प्रकल्प कोर्ट आदेशानुसार बंद ठेवावा लागला आहे.
शहराच्या विविध भागांत प्रत्येकी पाच टनाचे २५ प्रकल्प पालिकेने उभे केले आहेत. त्यापैकी, काही प्रकल्पांची मुदत संपली असून, त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्याशिवाय, तीन ते सहा टनांचे मेकॅनिकल कंपोस्ट, थर्मल कंपोस्टिंग आणि ५० टनाचा मिक्स वेस्ट प्रोसेसिंग असे प्रकल्पही पालिकेने सुरू केले आहेत. त्यापैकी, काही प्रकल्प नागरिकांच्या विरोधामुळे बंद करावे लागले असून, त्यासाठी पर्यायी जागांचा शोध घेण्यात येत आहे.

आठ प्रकल्प पूर्णतः बंद
शहरात पालिकेतर्फे स्व-खर्चातून आणि बीओटी तत्त्वावर कचऱ्यावर प्रक्रिया करणारे ५४ प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यापैकी, आठ प्रकल्प पूर्णतः बंद आहेत. काही ठिकाणी प्रकल्पांच्या क्षमतेएवढ्या कचऱ्यावर प्रक्रिया होऊ शकत नाही. तर, काही ठिकाणी सध्या टेंडर प्रक्रिया सुरू असल्याने काम बंद आहे. त्यामुळे, शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सोळाशे टन कचऱ्यापैकी जेमतेम एक हजार टन कचऱ्यावरच प्रक्रिया होऊ शकत असल्याची माहिती समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांनी घडवले संस्कृतीचे दर्शन

0
0

पाडव्यानिमित्त शहरभरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असणारा गुढीपाडवा पुणेकरांनी मंगळवारी उत्साहात साजरा केला. पुणेकरांनी सकाळी गुढीची मनोभावे पूजा करून दुपारी गोडधोड पदार्थांवर ताव मारून सायंकाळी खरेदीचा आनंद लुटला. शहरातील विविध संस्था-संघटनांनीही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून मराठमोळ्या संस्कृतींचे दर्शन घडविले.
गुढीपाडव्यानिमित्त सकाळी घराघरांमध्ये गुढी उभारण्यात आल्या. नैवेद्यासाठी मिठाईच्या दुकानांमध्ये सकाळपासूनच श्रीखंड, बासुंदी, अंगूर रसमलई, जिलेबी, गुलाबजाम खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ होती. आंब्याचे आकर्षण असले, तरी किमती अद्याप आवाक्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे इतर पदार्थांचीच निवड करण्यात आली. दुपारी कडक उन असल्याने रस्त्यावरची गर्दी ओसरली आणि संध्याकाळी सहानंतर लोकांची पावले बाजारपेठांकडे वळली. सणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या शोरूमध्येही मोफत भेटवस्तू, लकी ड्रॉ, सवलत आदी योजनांचा भडीमार करण्यात आला.
हिंदू नववर्ष स्वागत समिती कसबा विभागातर्फे कसबा गणपती मंदिर ते शनिवारवाडा दरम्यान मिरवणूक काढण्यात आली. या वेळी शनिवारवाड्याच्या प्रांगणात स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते ग्रामगुढी उभारण्यात आली. सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, रिपब्लिकन पार्टीचे महेंद्र कांबळे, हनुमंत साठे, कसबा भाग संघचालक किशोर शशितल, आणि सहसंघचालक सुहास पवार आदी या वेळी उपस्थित होते. ‘ ग्रामगुढी म्हणजे परिवर्तनाची गुढी आहे. आम्ही सर्व नगरसेवक मिळून पुण्यामध्ये परिवर्तन घडवून आणणार आहोत. हे परिवर्तन पुणे शहराच्या विकासाचे, संस्कृतीचे आणि संस्कृती जोपासणारे असेल. हे शहर अत्याधुनिक आणि देशाचा चेहरा-मोहरा बदलणारे ठरेल,’असा विश्वास महापौर मुक्ता टिळक यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि चंदेल परिवारातर्फे प्रभूकृपा बालक मंदिरात पारंपरिक पाटीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सुलेखनकार शैलेश जोशी यांनी चिमुकल्यांच्या हाताला धरून वळणदार अक्षराचा श्रीगणेशा केला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी पटवर्धन, उन्नती पाटील, सरिता पुसाळकर, ललिता गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप महाले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन खरेदीला दुप्पट पसंती

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदाच्या वाहन खरेदीला पुणेकरांनी पसंती दिली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदी दुपटीने वाढली आहे. गेल्या चार दिवसांत शहरामध्ये सर्व प्रकारच्या चार हजार ३९१ वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) झाली आहे. एकूण वाहनविक्रीत कारखरेदीचे प्रमाण अधिक आहे.
शहरामध्ये २५ ते २८ मार्च दरम्यान तीन हजार २३३ दुचाकी, एक हजार ३६ कार, दोन अ‍ॅम्ब्युलन्स, पाच बस, २५ मालवाहू वाहने, ६९ कॅब, आठ मालवाहू तीनचाकी आणि १३ रिक्षांची नव्याने नोंदणी झाली.
वाहनांच्या करापोटी आरटीओला नऊ कोटी ४५ लाख, ६४ हजार ८१५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या दरम्यान पाच हजार नवीन वाहनांची नोंदणी झाली होती. यंदाच्या वाहन विक्रीचा विचार करता, गेल्या वर्षी आठ दिवसात एक हजार ४८५ कारची विक्री झाली होती. तर, यंदा चारच दिवसात एक हजार ३६ कारची विक्री झाली. रिक्षा चालक आणि कॅब चालकांमधील वाढत्या स्पर्धेचाही वाहन खरेदीवर परिणाम झाल्याचे दिसून येते. गेल्या चार दिवसात १३ रिक्षा आणि ६९ कॅबची नोंद झाली आहे.
मंगळवारी गुढी पाडव्याच्या दिवशीही आरटीओचे कामकाज सुरू होते. पाडव्याचा मुहूर्त साधून ५७० दुचाकी, एक मोपेड, ३१ कार, दोन मालवाहू वाहने आणि एका नीनचाकी वाहनाची नोंदणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दस्तनोंदणीतून ६९ कोटींची बेगमी

0
0

राज्यभरात नोंदवले सहा हजार दस्तावेज

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुढीपाडव्याचा मुहूर्तावर मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी करण्याचे काम उपनिबंधक कार्यालयांमध्ये मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दिवसभरात राज्यात विविध प्रकारच्या सहा हजारांहून अधिक दस्तांची नोंदणी होऊन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या तिजोरीत सुमारे ६९ कोटी नऊ लाख रुपयांचा महसूल जमा झाला. नोटाबंदीचा परिणाम दस्तनोंदणीवर झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूल घटला आहे.
गुढीपाडव्याला मालमत्तेची नोंदणी शुभ मानली जाते. त्यामुळे मंगळवारी दिवसभर दस्तनोंदणी करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात गर्दी झाली होती. नेहमी सायंकाळी सहा वाजता कार्यालये बंद होतात. मात्र, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दस्त नोंदविण्याचे काम सुरू होते. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागांतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २८ उपनिबंधक कार्यालये आहेत. त्यापैकी हवेलीमधील दोन उपनिबंधक कार्यालये रात्री नऊपर्यंत सुरू असतात. अन्य कार्यालये सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असतात. या कार्यालयांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा प्रमाण कमीच असल्याचे दिसून आले.
राज्यात दिवसभरात ६,०४२ दस्त नोंदविण्यात आले. त्यातून विभागाकडे सुमारे ६९ कोटी नऊ लाख रुपयांचा महसूल जमा झाला. चालू महिन्यात आतापर्यंत एक लाख ९२ हजार ३९ दस्त नोंदविले गेले आहेत. त्यातून सुमारे एक हजार ६१७ कोटी ८५ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. या बाबत नोंदणी उपमहानिरीक्षक चिंतामण भुरकुंडे म्हणाले, की ‘गुढीपाडव्याला सार्वजनिक सुटी असली, तरी २८ उपनिबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. हवेलीमधील दोन उपनिबंधक कार्यालये ही दुपारी सुरू होऊन रात्री नऊ वाजता बंद होतात. ही कार्यालये वगळता अन्य कार्यालयांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत व्यवहार होत असतात. गुढीपाडव्याला दस्तनोंदणीसाठी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी झाली होती.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरेदीसाठी साधली गुढीपाडव्याची पर्वणी

0
0

सोने, गृह, वाहन, फर्निचर खरेदीला आले उधाण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याला पुणेकरांनी खरेदीची पर्वणी साधली. पाडव्यानिमित्त शहरातील बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली. गृह, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर अशा सर्वच बाजारपेठांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. सराफांबरोबरच कपड्यांच्या दालनांमध्येही मोठी गर्दी दिसून आली.
सकाळी गुढी उभारून तिचे पूजन केल्यानंतर बहुतांश पुणेकरांनी खरेदी करण्यास पसंती दिली, तर काहींनी दुपारी पंचपक्वान्नांवर ताव मारल्यानंतर सायंकाळी खरेदी करण्यास पसंती दिली. इलेक्ट्रिकल वस्तू आणि वाहनांची खरेदी केलेले ग्राहक सकाळी बाहेर पडले होते. सराफा दालनांमध्ये दिवसभर गर्दी पाहायला मिळाली.
गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये फ्रीज, वॉशिंग मशिन, एलईडी टीव्ही खरेदी करण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसत होते. विविध कंपन्या आणि दालनांनीही पाडव्यानिमित्त आकर्षक सूट, डाउनपेमेंट आणि ईएमआयची सुविधा उपलब्ध करून दिली होती. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबना पसंती मिळाली. काही ठिकाणी एसी आणि मायक्रोवेव्हला ग्राहकांनी पसंती दिली. पाडव्याच्या मुहूर्तावर आधीच बुकिंग झालेल्या सर्व प्रकारच्या वाहनांचीही दणक्यात विक्री झाली. ग्राहकांच्या गर्दीने वितरकांची दालने भरून गेली होती. फर्निचरची दालने, लक्ष्मी रस्त्यासह उपनगरांमधील कपड्यांची दालने आणि शहरातील मॉलमध्येही खरेदीचा उत्साह दिसून आला.
नोटाबंदीनंतरच्या पहिल्याच मोठ्या सणाला सराफा बाजारही उजळून निघाला. गेल्या वर्षी दुष्काळ आणि उत्पादन शुल्काविरोधातील आंदोलनामुळे पाडव्याला सराफांनी बंद पाळला होता. यंदाच्या पाडव्याला २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमसाठी २९ हजार ३०० रुपये तर, साडेतेवीस कॅरेटसाठी प्रति दहाला ग्रॅम २८ हजार ९००रुपये होता. चांदीचा दर ४३ हजार २०० रुपये प्रतिकिलो होता. गेल्या काही दिवसांत उपलब्ध झालेल्या मुबलक चलनामुळे ग्राहकांना सोनेखरेदी करणे सोयीचे झाले. त्याचा परिणाम ग्राहकांच्या गर्दीच्या रूपाने दिसून आला, असे पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे न्सचे सीईओ आणि कमॉडिटी तज्ज्ञ अमित मोडक यांनी सांगितले. सोनेखरेदीसाठी ग्राहकांमध्ये मोठा उत्साह होता. सर्व प्रकारचे दागिने, रत्नांबरोबरच वेढणी आणि चोख सोन्यालाही मागणी होती, असे रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका यांनी सांगितले.

‘डिजिटल पेमेंटवर भर’
यंदा ग्राहकांनी डिजिटल पेमेंटवर मोठ्या प्रमाणात भर दिला. सोने खरेदीसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत ग्राहकांनी क्रेडिट आणि डेबिट कार्डाचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचे निरीक्षण पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे विक्रीप्रमुख सतीश कुबेर यांनी नोंदवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी सेविका १ एप्रिलपासून संपावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी एक एप्रिलपासून राज्यव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन एप्रिलच्या पल्स पोलिओ मोहिमेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय, अंगणवाडी सेविका मदतनीस संघटनेच्या राज्य कृती समितीने घेतला आहे.
संपामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमधील तीन हजार अंगणवाड्या बंद राहणार आहेत. बंदच्या पहिल्या दिवशी (ता.१) सूसन हॉस्पिटल जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून कौन्सिल हॉलवर मोर्चा काढण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. मात्र, राज्याच्या अर्थसंकल्पात समितीने दिलेल्या अहवालाचा विचारच करण्यात आलेला नाही.त्यामुळे अर्थसंकल्प मंजूर करताना अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या मानधनवाढीचा निर्णय व्हावा, या मागणीसह विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नितीन पवार यांनी दिली.

अंगणवाडी सेविकांच्या मागण्या
१. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी आणि अन्य लाभ देण्यात यावेत.
२. मिनी अंगणवाडीला पूर्ण अंगणवाडीचा दर्जा आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे.
३. अंगणवाडीच्या कामासाठी लागणारे सर्व रजिस्टर, अहवाल व अन्य सर्व साहित्य सरकारने पुरवावे. जे साहित्य हाताने उचलून नेण्यासारखे नाही, असे सर्व साहित्य अंगणवाडीत नेण्यासाठी लागणारा खर्च सरकारने द्यावा.
४. सर्व कर्मचाऱ्यांना दर दिवाळीला नियमितपणे सेविकांच्या एका मानधनाइतका बोनस देण्यात यावा.
५. राज्य कामगार विमा योजना व भविष्य निर्वाह निधीची योजना तयार करून अंगणवाडी क्षेत्राला लागू करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप नगरसेवकांमध्ये जुंपली

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्डातील रहिवाशांसह बोर्डाच्या विकासासाठी सभागृहात प्रशासनाशी भांडणारे भाजपचे नगरसेवक मात्र बुधवारी ‘आमने-सामने’ आले. घोरपडीतील एका बांधकामाच्या मुद्द्यावरून भाजपच्या दोन विद्यमान सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. त्यावरून हा वाद विकोपाला गेल्यानंतर अन्य सदस्यांसह बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ए. के. त्यागी यांनी संबंधित बांधकामाच्या पाहणीचे आदेश देऊन वाद सोडविला.

बोर्डाच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त असलेल्या अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्याला हात घालण्यात आला. त्यामुळे पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीला अनधिकृत बांधकामांनी घातलेला मुद्दा ऐरणीवर आल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे कँटोन्मेंट बोर्डाची बुधवारी सर्वसाधारण सभा होती. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर त्यागी यांच्या उपस्थितीत ही सभा झाली. त्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव, उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, नगरसेवक अशोक पवार, अतुल गायकवाड, विनोद मथुरावाला, विवेक यादव, किरण मंत्री, प्रियंका श्रीगिरी, रूपाली बिडकर उपस्थित होते.

बोर्डाच्या विषयपत्रिकेनुसार कामकाज सुरू असताना घोरपडीच्या वॉर्डातील एका बांधकामाचा विषय चर्चेला आला. संबंधित घरमालकास त्याचे घर बांधण्यास बोर्डाने परवानगी द्यावी, असे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर घोरपडीतील हे बांधकाम अनधिकृत आहे. त्याला मान्यता देता येणार नाही. तो विषय बाजूला ठेवण्यात यावा असे सांगत भाजपचे नगरसेवक विवेक यादव यांनी त्या प्रस्तावास मान्यता देण्यास विरोध केला. त्यावर ‘घराच्या बांधकामासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता संबंधिताने केली आहे. त्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. तसेच अन्य सदस्यांनी माझ्या वॉर्डात हस्तक्षेप करू नये,’ अशा शब्दांत घोरपडीच्या नगरसेविका डॉ. किरण मंत्री यांनी उत्तर दिले.

डॉ. मंत्री आणि यादव यांच्यात यावरून शाब्दिक चकमक सुरू झाली. त्यात भाजपचे नगरसेवक आणि बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी अनेक विषय तुमचे मान्य केले आहे. हा विषय बाजूला ठेऊ. नंतर यावर चर्चा करण्यात येईल, असे गिरमकर यांनी डॉ. मंत्री यांना सांगितले. त्यानंतर संतापलेल्या डॉ. मंत्री यांनी उपाध्यक्ष आपण सभागृहाच्या महत्वाच्या खुर्चीत बसला आहात. आपण एखाद्या कामाला विरोध करून त्या खुर्चीचा अपमान करीत आहात. तसेच कँटोन्मेंट कायद्याचा भंग करीत आहात, अशा शब्दांत डॉ. मंत्री यांनी सुनावले. त्यानंतर गिरमकर यांनी त्या विषयातून अंग काढून घेतले.

अनधिकृत बांधकामाला परवानगी देता कामा नये. हा विषय प्रलंबित ठेवण्यात यावा, अशी मागणी यादव यांनी लावून धरली. त्यावर बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर त्यागी यांनी हस्तक्षेप केला. अभियंता सुखदेव पाटील यांच्याकडे या बांधकामाबाबत विचारणा केली. त्यावर पाटील यांनी या बांधकामाचे आम्ही पाहणी केली असून ते अनधिकृत नाही, असे सांगितले. दरम्यान, घोरपडीतील बांधकामाबाबत हरकत घेणार असल्याचे पत्र बोर्डाच्या प्रशासनाकडे देणार असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.

बोर्डात २५ टक्के अनधिकृत बांधकामे?

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील एकूण घरांच्या तुलनेत सुमारे २५ टक्के बांधकामे अनधिकृत असल्याचे बोर्डाच्या काही जाणकार सदस्यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात बोर्डाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याची ठिणगी बोर्डाच्या बैठकीत बुधवारी पडली. काही वर्षापासून नगरसेवक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने बोर्डाच्या हद्दीत अनधिकृत बांधकामे सुरू झाली आहेत. त्याची संख्या देखील वाढत असल्याचे जाणकार सांगतात. अनधिकृत बांधकामांना मान्यता देताना अधिकाऱ्यासंह नगरसेवकांमध्ये चांगलेच ‘अर्थपूर्ण’ मैत्रीचे संबंध प्रस्थापित होत असल्याची चर्चा कँटोन्मेंट बोर्डात सुरू आहे. या मैत्रीपूर्ण संबंधामुळे बोर्डातील अनेक नगरसेवक एकमेकांच्या वॉर्डातील बांधकामाच्या कामात नजर ठेवू लागले आहे. त्यामुळे मैत्रीच्या संबंधाला धक्का लागत असल्याने वाद नगरसेवकांमध्ये रंगू लागले आहेत.त्याची प्रचिती बोर्डाच्या बैठकीत आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महागडे उपचारच रोषाला कारणीभूत

0
0

पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल तुमच्या भावना काय आहेत?

- जगात कौतुक झाले; पण घरातील व्यक्तींनी कौतुक करणे अपेक्षित आहे. जगाने सन्मान देणे आणि घरातील व्यक्तींनी सत्कार करणे यात फरक आहे. ज्या मातीत मी जन्माला आलो, शिक्षण घेतले, मोठा झालो तेथे सत्कार होणार आहे. कर्मभूमी असलेल्या पुण्याने मला सर्वकाही दिले. त्याच पुण्यात पेशंटची सेवा करीत आलो आहे. त्या सेवेचे फळ म्हणून मला पुण्यभूषण फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्यभूषण म्हणजे पुण्याचे भूषण व्हावे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. पुणे हे शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आयटी क्षेत्राचे हब आहे. पुण्याचे नागरिक चोखंदळ आहेत. ते कोणालाही सहज पुरस्कार देत नाहीत.

पुरस्कार मिळाल्यानंतर मागे वळून पाहताना काय वाटते?

- हो नक्कीच. पुण्यात १९३६ साली माझा नारायण पेठेत जन्म झाला. रमणबागेच्या न्यू इंग्लिश शाळेत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेतले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये उच्चशिक्षण झाले तर बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये माझे वैद्यकीय शिक्षण झाले. लहानपणापासून आई-वडिलांकडून सामाजिक बांधिलकीचे बाळकडू मिळाले. मी सर्वसाधारण मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांच्या घरातला. पुण्यात व्यापार करण्याऐवजी वैद्यकीय क्षेत्रात काही तरी करावे असे वाटले. पुण्याच्या संस्कृतीमुळे प्रगती करू शकलो. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने माझी ही निवड केली, हे माझे भाग्यच! व्यवसायाच्या सुरुवातीला मी ग्रामीण भागात जाऊन पोलिओ झालेल्या मुलांवर उपचार करीत होतो. त्यानंतर दहा बेडपासून ते दोनशे बेडपर्यंत मोठे हॉस्पिटल उभारले. ज्येष्ठांच्या सांध्याचे आजार वाढू लागले. त्यामुळे सांध्यासह खुब्याचे भारतीय बनावटीचे प्रत्यारोपण संशोधनातून विकसित केले. त्यावर पेटंट मिळविले. त्याशिवाय अस्थिरोगातील एमएसचा अभ्यासक्रम, फिजिओथेरपी कॉलेज, हॉस्पिटल मॅनेजमेंटचे कॉलेज सुरू केले. प्रामाणिकपणे काम करीत राहिल्यास त्याचे फळ नक्की मिळते, असा माझा अनुभव आहे.

प्रॅक्टिस सुरू केली त्या वेळची आणि आताच्या परिस्थितीत बदल झाला आहे ?

- प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळची आणि आताच्या परिस्थितीत निश्चितच बदल झाला आहे. पेशंटच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. रोगांचे प्रकार वाढले आहेत. संशोधनही वाढले. उपचार यंत्रणा वाढली आहे. उपचारही महागडे झाले आहेत. अपघाताने होणाऱ्या दुखापती इतक्या वाढल्या की त्यात पेशंटचे प्राण जात आहेत. उपचारानंतरही प्राण वाचविणे अशक्य झाले आहे. अपघातांचे प्रकारही बदलले आहेत. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. समाजात अपघातांमध्ये होणाऱ्या वेदना, जखमींबाबत फारशी जाणीव नसते. अपघातात किंवा उपचारातही पेशंट मृत्युमुखी होऊ शकतो हे सत्य नातेवाइक स्वीकारत नाहीत. त्या वेळी डॉक्टरांच्या चुकांमुळे मृत्यू झाल्याचा नातेवाइक गैरसमज करून बसतात. त्यातून कायदा हातात घेऊन नातेवाइक सैरभैर होत आहेत.

सध्या उपचार महागडे होत आहेत का?

- वैद्यकीय क्षेत्रात कॉर्पोरेट हॉस्पिटलचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे चकाचक हॉस्पिटल, सोयी सुविधांमुळे उपचार महागडे झाले आहेत. वैद्यकीय सेवेसारख्या क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे वैद्यक क्षेत्रातील व्यावसायिकांपुढे आव्हाने वाढली आहेत. त्यातून उपचार महागडे झाले आहेत. पेशंट नाराज होत असून महागड्या उपचारांमुळे पेशंटसह समाजाच्या रोषाचे कारण ठरत आहे. कॉर्पोरेटसारख्या मोठ्या हॉस्पिटलने मध्यमवर्गीयांसाठी परवडणाऱ्या दरात उपचार देणारी छोटी हॉस्पिटल उभी करावीत. त्यात ‘हायफाय’ सुविधा नसली तरी चालेल; पण उपचार चांगले मिळाले पाहिजेत. त्यावर हाच एक पर्याय आहे.

पुणेकरांच्या आरोग्यसेवेसाठी काय करणार आहात?

- पुणेकरांमध्ये वाहतुकीसंदर्भात जनजागृती करणे, त्याबाबत शिस्त निर्माण करण्याची गरज आहे. सध्या व्यायामाचा अभाव असल्याने हृदयविकारासह लठ्ठपणाचे इतर आजार वाढत आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये फिटनेस, फिजिओथेरपीचा वापर करून आरोग्य कसे चांगले राहील याबाबत व्याख्यान तसेच उपक्रम राबविण्याचा आता विचार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात क्षयरुग्णांच्या संख्येत घट

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशभर क्षयरोगाच्या (टीबी) पेशंटची संख्या वाढत असली तरीही गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत शहरात क्षयरुग्णांची संख्या घटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दोन वर्षांत १९३ पेशंटची घट झाली आहे. मात्र, असे असले तरीही खासगी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या पेशंटमुळे ही संख्या घटली आहे का, याबाबत संभ्रम आहे. गेल्या महिन्यात टीबीचे १० पेशंट नव्याने आढळल्याची नोंद पालिकेच्या आरोग्य विभागात करण्यात आली आहे.

जागतिक क्षयरोग दिन नुकताच झाला. त्या पार्श्वभूमीवर शहरातील क्षयरुग्णांच्या स्थितीचा आढावा घेतला असता पेशंटचे प्रमाण घटल्याचे समोर आले आहे. ‘दाट लोकवस्ती असलेल्या झोपडपट्टी, स्वच्छतेचा अभाव असलेल्या ठिकाणी क्षयरोगाचे पेशंट आढळतात. त्याशिवाय उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये टीबीचे पेशंट महापालिकेच्या आरोग्य विभागाला आढळून आले आहेत. गेल्या दोन वर्षांत टीबीच्या पेशंटच्या संख्येत घसरण झाली आहे. २०१४ मध्ये पुण्यात ३ हजार ७१८ एवढे पेशंट आढळले. तर २०१५ मध्ये त्या पेशंटमध्ये ६० पेशंटची भर पडली. त्याशिवाय २०१६ मध्ये ३ हजार ५८५ पेशंट आढळले. त्यावरून गेल्या दोन वर्षांत टीबीच्या पेशंटची संख्या १९३ ने घटली आहे,’ अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या टीबी विभागाचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी दिली.

सध्या पुण्यासह राज्यात आढळणाऱ्या पेशंटवर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपचार सुरू आहेत. लागण झालेल्या पेशंटवर सध्या उपचार सुरू असून, अर्धवट उपचार सोडल्यामुळे त्या संबंधित पेशंटना पुन्हा आजाराचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात शहरात ५५५ पेशंट आढळले आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये टीबीच्या पेशंटना एचआयव्हीचा संसर्ग होण्याचे प्रमाणही कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. २०१४ साली एचआयव्हीच्या संसर्गाचे प्रमाण १३ टक्क्यांवरून २०१६ मध्ये ११ टक्क्यांवर आले आहे. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये लागण झालेले टीबीचे पेशंट सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास जात नाहीत.

टीबीची लागण झाल्याचे निदान होताच त्या पेशंट विषाणू प्रतिबंधक औषधे (एआरटी) सुरू केली जातात. परंतु, बहुतांश वेळा हे पेशंट औषधे घेणे बंद करतात. परिणामी अर्धवट औषधे घेतल्याने पुन्हा संसर्ग होतो. त्या वेळी संसर्गाला औषधे प्रतिसाद देत नाही तेव्हा तयार होणाऱ्या आजाराला एमडीआर असे म्हटले जाते. त्या वेळी ‘एआरटी’ऐवजी एमडीआर प्रतिबंधक औषधे देण्यात येतात. एमडीआर टीबी झालेल्या पेशंटने ही औषधे घेणे बंद केल्यास पुन्हा एक्सडीआर टीबी हा दुसऱ्या प्रकारचा टीबी होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैनिक काव्यसंमेलनात आळवला देशभक्तीचा सूर

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘धर्माच्या वणव्यात कुणी खून पाडले होते, सीमेवर बर्फात कुणी जिवंत गोठले होते,’ अंगावर शहारा आणणाऱ्या, मनाला चटका लावून जाणाऱ्या कवितेच्या या ओळी कानावर पडल्या आणि संबंध सभागृह स्तब्ध झाले. सीयाचीन सारख्या दुर्गम आणि बर्फाळ प्रदेशात रोज मरणाशी दोन हात करणाऱ्या भारतीय सैनिकांचा देशाभिमान मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात घुमला आणि रसिकही देशभक्तीने भारावून गेले.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था यांच्यातर्फे आयोजित सैनिकांवरील कवितांच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक कवींनी सैनिकांविषयीच्या कविता सादर करत देशभक्तीचा सूर आळवला. काहींनी सीयाचीनमधील प्रतिकूल प्रदेशात सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या मनस्थितीचा वेध घेतला. काहींनी सैनिकांच्या जीवावर जगणाऱ्या समाजातील धर्मांधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जवानांना भाऊ मानून त्यांच्या सुरक्षेची प्रार्थना कवितेतून केली तर काहींनी सैनिकांवरून होणाऱ्या राजकारणावर ताशेरे ओढले. सभागृहात एकामागून एक सादर होणाऱ्या प्रत्येक कवितेत सैनिकांबद्दलचा आदर व्यक्त होत होता. सीयाचीन येथे सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व केलेले कर्नल शरद पाटील, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आडकर, लोकमंगल ग्रुपचे शिरीष चिटणीस, निवृत्त लेफ्टनंट कर्नल शशिकांत पित्रे, प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती चांदेकर आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात कर्नल शरद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शशिकांत पित्रे यांनी ‘ए मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तिपर गाणे म्हटले. तसेच, ‘ते कालही शहीद झाले, ते आजही शहीद होतात’ ‘नेत्यांनी तेव्हाही खाल्ले लोणी, नेते आजही लोणी खातात’ ‘चर्चेचे दळण पुन्हा आम्ही दळणार नाही,’ ‘भ्याड हल्ले तुमचे सहन करणार नाही’ या कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
भारताच्या आणि पाकिस्तानाच्या जवानाचा मैत्रिपूर्ण संवाद टिकम शेखावत यांनी कवितेतून मांडला. दोन्ही बाजूचे सैनिक एकमेकांना मदतीचा हात पुढे करतात आणि दुसऱ्याच दिवशी युद्धाची घोषणा होते. सैनिक धर्म पाळत दोघेही एकमेकांना ठार मारतात. या वेळी सैनिकांच्या अंतर्मन उलगडणाऱ्या या विलक्षण कवितेने रसिक प्रेक्षक क्षणभर अंतर्मुख झाले.
धनंजय तडवलकर, शिवप्रिया सुर्वे, अजय जोशी, अनिल दीक्षित, डॉ. अमित त्रिभुवन, स्वप्नील पोरे, प्रतिभा मगर, बंडा जोशी, मिलिंद जोशी, संगीता झुंजुरके, भालचंद्र कोळपकर, तनुजा चव्हाण आणि मृणाल घाटे यांनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले; तर शिरीष चिटणीस यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडकरींचा पुतळा लवकरात लवकर बसवावा

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
ज्येष्ठ साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी उद्यानात पुन्हा एकदा सन्मानाने बसवला जावा, यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने महापौर मुक्ता टिळक यांना पत्र दिले आहे. लवकरात लवकर कलाकारांची बैठक बोलावून पुतळ्यासंदर्भातील निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी नाट्यपरिषेदेने या पत्राद्वारे केली आहे.
संभाजी उद्यानातून गडकरी यांचा पुतळा हटवल्यानंतर कलाकारांमधून या घटनेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. नाट्य परिषदेतर्फे संभाजी उद्यानात पुन्हा पुतळा बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून कलाकारांच्या कार्यक्रमास संभाजी उद्यानात मज्जाव केला. त्याचवेळी पुतळा बसवण्यासंदर्भात पुणे महापालिकेत ठराव करण्यात आला होता.
पुणे महापालिका निवडणुकीत विजय मिळवून भारतीय जनता पक्षाने महापालिकेत सत्ता स्थापन केल्याने, पुतळ्यासंदर्भात महापौर मुक्ता टिळक यांना पत्र देऊन त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी कलाकारांनी केली आहे. संभाजी उद्यानातून पुतळा हटवल्यानंतर पुण्या-मुंबईतील कलाकारांनी एकत्र येऊन गडकरींचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पुतळा तयारही केला. परंतु, कायद्याने महापालिकेव्यतिरीक्त कोणत्याही संस्थेला पुतळा बसवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे, कालाकारांनी तयार केलेला पुतळा महापालिकेने स्वीकारावा आणि तो संभाजी उद्यानात बसवण्यात यावा, असेही या पत्रात म्हटले आहे.
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्यावर पुणे महानगरपालिकेशी समन्वय साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या संदर्भात महाजन म्हणाले, ‘महापालिकेमध्ये निवडणुकांपूर्वी पुतळा बसवण्यासंदर्भातील ठरावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. भाजपनेही पुतळ्या संदर्भात आश्वासन दिले होते. पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तेव्हा आता लवकरात लवकर या संदर्भात बैठका घेऊन गडकरी पुतळा बसवण्याच्या संदर्भात पालिकेने कलाकारांशी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवड्यात नळाला दुर्गंधीयुक्त पाणी

0
0



म. टा. प्रतिनिधी,येरवडा
येरवड्यातील कामराजनगर परिसरात दोन दिवसांपासून नळाला येणाऱ्या पाण्यात ड्रेनेज वाहिनीतील घाण, दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने तातडीने परिसरातील पाइपलाइन बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
कामराज नगर, लमाण वस्ती भागातील नागरिकांना मंगळवारपासून नळाला दुर्गंधीयुक्त काळे पाणी येऊ लागले आहे. पिण्याच्या नळाला घाण पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागले. बुधवारी सकाळी नळाला पुन्हा घाण दुर्गंधीचे पाणी आल्याने काही स्थानिक नागरिकांनी बंडगार्डन पाणीपुरवठा केंद्रावर धाव घेऊन तक्रार केली.
स्थानिक नागरिक सुरेश राठोड यांनी सांगितले की, दोन दिवसांपासून कामराजनगर भागाला मैलापाणी मिश्रित घाणपाणी नळाला येत आहे. पिण्याचे घाण पाणी असल्याने नागरिकांना पाण्यासाठी दूर अंतरावर जाऊन पाणी भरून आणले. दूषित पाणी नळाला येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने पावले उचलून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.



गेल्या दोन दिवसांपासून कामराजनगर भागाला दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येण्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने दुरुस्तीचे काम चालू करण्यात आले आहे. पाइपलाइनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याची शक्यता आहे.
- विवेक डुब्बेवार, कनिष्ठ अभियंता,
बंडगार्डन पाणीपुरवठा विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-दौंड ‘डेमू’ची अडथळ्यांची शर्यत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे-दौंड मार्गावर सुरू झालेल्या ‘डेमू’ सेवेला पाचव्या दिवशी अडचणींचा सामना करावा लागला. डेमूमध्ये इंधन भरण्यासाठी डिझेल स्टेशनवर निश्चित वेळ नसल्याने अनेक गाड्यांना बुधवारी उशीर झाला. त्यामुळे पुणे स्टेशनहून सकाळी साडेदहा वाजता सुटणाऱ्या गाडीपासून रात्री पावणेसात वाजता सुटणाऱ्या गाडीपर्यंच सर्व डेमू उशिराने सुटल्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.

पुणे स्टेशनवरून दौंडसाठी सकाळी साडेदहा वाजता डेमू सुटते. मात्र, गाडी सोडण्यापूर्वी त्यामध्ये डिझेल भरणे आवश्यक होते. त्यासाठी गाडी किमान ४५ मिनिटे प्लॅटफॉर्मवर येणे अपेक्षित होते. ती गाडी सकाळी पावणे अकरा वाजता पुणे रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. त्यानंतर डिझेल भरून गाडी सुटण्यासाठी साडेदहा ऐवजी तब्बल एक वाजून १० मिनिटांनी पुणे स्टेशनवरून सुटली. ती डेमू दौंडला दुपारी सव्वा दोन वाजता पोहोचली. ती गाडी पुण्याला दुपारी पावणेचार वाजता परत आली. वास्तविक, सकाळी साडेदहा वाजता दौंडला जाणारी गाडी परत पुण्याला आल्यानंतर दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी दौंडसाठी सुटणार होती. त्यामुळे अडीच वाजता सुटणारी डेमू चार वाजतानंतर सुटली. ती दौंड रेल्वे स्टेशनवर सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटानी पोहचली. त्यामुळे संपूर्ण दिवसभर ‘डेमू’चा हा खेळ सुरू होता.

प्रवाशांची धावपळ

सायंकाळी पावणेसात वाजता सुटणारी पुणे-दौंड-बारामती ही डेमू रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास सुटली. गाड्यांच्या या बदलांबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांची धावपळ झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना फी परतावा

0
0

शैक्षणिक शुल्क कमी केल्याने मिळणार लाभ

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्याच्या शुल्क नियामक प्राधिकरणाने येत्या शैक्षणिक वर्षासाठी इंजिनीअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर अशा व्यावसायिक व इतर अभ्यासक्रमांसाठी राज्यातील खासगी कॉलेजांमधील शैक्षणिक शुल्क सरासरी २० टक्क्यांनी कमी केले आहे. त्याचबरोबर चालू शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक शुल्क हे ३० टक्क्यांनी शुल्क कमी केले आहे. त्यामुळे या खासगी कॉलेजांच्या प्रशासनाला विद्यार्थ्यांना शुल्क परत करणे भाग पडणार आहे. या निर्णयाने विद्यार्थ्यांच्या खिशात मोठ्या प्रमाणात परतावा जमा होऊन विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र, त्यासाठी कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांना परतावे द्यायला सुरुवात करणे गरजेचे आहे.

राज्याच्या शुल्क नियामक प्राधिकरणाने नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील सुमारे तीन हजार कॉलेजांमधील सहा हजार व्यावसायिक आणि इतर अभ्यासक्रमांचे २०१६-२०१७ आणि २०१७-१८ या दोन शैक्षणिक वर्षांसाठी शुल्क निर्धारित केले आहे. या अभ्यासक्रमांमध्ये वैद्यकीय, इंजिनीअरिंग (डिग्री व डिप्लोमा), एमसीए, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजनेंट, लॉ, व्यवस्थापन अशा प्रकारचे व्यावसायिक व इतर अभ्यासक्रम आहेत. या निर्णयात २०१६-२०१७ या चालू शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमांचे शुल्क हे तब्बल सरासरी ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष सुरू होताना पूर्ण शुल्क भरले आहेत त्यांना या फरकाच्या शुल्काचा परतावा कॉलेज प्रशासनाला द्यावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून दरवर्षी वाढत्या दराने शुल्क आकारणाऱ्या खासगी कॉलेजच्या प्रशासनाला चाप मिळणार आहे.

राज्यातील खासगी कॉलेजांचे चालू आणि येत्या शैक्षणिक वर्षाचे शुल्क हे कॉलेजच्या २०१४ - १५ सालच्या बॅलन्स शिटच्या आधारे ठरविण्यात आले आहे. या शिटमध्ये बहुतेक कॉलेजांच्या प्रशासनाने शुल्क वाढीचाच प्रस्ताव ठेवला होता. मात्र, शुल्क नियामक प्राधिकरणाने शुल्कात वाढ करण्याऐवजी कमी केले आहे. त्यामुळे कॉलेज प्रशासनाला विद्यार्थ्यांना एकूण शल्कातून कमी होणाऱ्या शुल्काचा परतावा करावा लागणार आहे. एखाद्या कॉलेजच्या प्रशासनाने चालू वर्षाचे शुल्क हे एक लाख रुपये ठरविले असेल आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी संपूर्ण शुल्क भरले आहे. अशा वेळी प्रशासनाने विद्यार्थ्यांना ३० टक्क्यांनुसार तब्बल ३० हजार रुपये परत द्यायचे आहेत. प्राधिकरणाच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांच्या खिशात परताव्याचे पैसे येणार आहे. मात्र, त्यासाठी कॉलेजच्या प्रशासनाने देखील निर्णयाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे प्राधिकरणाच्या सदस्याने सांगितले.

शुल्काची माहिती वेबसाइटवर

शुल्क नियामक प्राधिकरणाने राज्यातील खासगी कॉलेजांचे चालू आणि येणाऱ्या शैक्षणिक वर्षाचे शुल्क ठरविले आहे. चालू शैक्षणिक वर्षाचे शुल्क विद्यार्थी आणि पालकांना www.sspnsamiti.gov.in या वेबसाइटवर पाहता येईल. तसेच, शुल्क परताव्याबाबत कॉलेजची तक्रार करायची असल्यास शुल्क नियामक प्राधिकरण, शासकीय तंत्रनिकेत इमारत, वांद्रे (इस्ट), मुंबई या पत्त्यावर अथवा ०२२-२६४७६०३४/३७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती सदस्याने सांगितली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वन्यजीवांना हक्काचा पाणवठा

0
0

निसर्गस्नेही जलकुंडाला दिले मुंग्यांनी जीवदान

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वन्यप्राणी संवर्धनाच्या उद्देशाने विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी ‘निसर्ग वेध’ संस्थेच्या व्यासपीठाखाली तीन महिन्यांपूर्वी एकत्र आली. तळागाळात काम करणाऱ्या या ग्रुपचे ‘मुंगी गट’ असे नामकरण करण्यात आले. विशेष म्हणजे या उत्साही मुंगी गटाने श्रमदान करून नाणेगावात नुकतेच निसर्गस्नेही जलकुंड साकारले आहे. उन्हाळ्याची चाहुल लागल्याने लहान मोठ्या पक्ष्यांबरोबरच आता भेकर आणि इतर प्राण्यांसाठी हे कुंड वरदान ठरते आहे.

सुट्ट्यांच्या काळात निसर्ग भटकंतीसाठी जाणारे अनेक असतात. पण आपल्या दैनंदिन जीवनशैलीतून आवर्जून वेळ काढून निसर्गासाठी काही तरी काम केले पाहिजे, असा विचार असलेला मोठा वर्ग शहरात वास्तव्यास आहे. पर्यावरण, वन्यजीव संवर्धनासाठी नेमके काय करावे, हे त्यांना कळत नाही. अशा पिढीला योग्य दिशा देण्यासाठी आम्ही मुंगी प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत सदस्यांच्या सहभागातून निसर्गस्नेही प्रकल्प राबविणार आहोत, अशी माहिती निसर्गवेध संस्थेचे प्रमुख किरण पुरंदरे यांनी दिली.

‘पहिल्या टप्प्यात आम्ही मावळ भागातील नाणेगाव येथे निसर्गस्नेही जलकुंड आम्ही साकारले आहे. अश्विन विजय परांजपे यांच्या गोरस संस्थेच्या परिसरात हे कुंड असून सर्व वयोगटातील मंडळींनी त्यासाठी मेहेनत घेतली आहे. या पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी आम्ही कॅमेराही बसवला असून त्यात लहान मोठ्या पक्ष्यांबरोबरच आता दोन भेकराची पिल्लेही नियमित येताना दिसत आहेत. काहीच दिवसांपूर्वी विनायक चित्रे, योगेश पुंडे, ऋषिकेश जोशी आणि मला भेकराचे फोटो मिळाले आहेत,’ असे ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पुरंदरे यांनी सांगितले.

‘आम्ही महिन्यातून काही ठराविक दिवसांनी श्रमदानासाठी नाणेगावात जात असतो. सध्या बांधलेले जलकुंड हे प्रतिकात्मक आहे. पुढील टप्प्यात शेवग्याच्या बियांचे वाटप, पावसाळी बंधारे बांधणे, वृक्षारोपण यांसह जलकुडांची संख्या वाढविण्यासाठीही आम्ही नियोजन करणार आहोत. काही ठिकाणी जलकुडांची गरज नसून झऱ्यांचे पुनरूज्जीवन होणे आवश्यक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कामांमध्ये मुंगीगटातील उत्साही कार्यकर्त्यांना सहभागी करून घेणार आहोत. यासाठी आमच्या नियमित बैठका सुरू आहेत,’ असे किरण पुरंदरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सैनिकाला मारहाण करून लुटले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
माजी सैनिकाला मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना नेहरूनगर-गवळीमाथा रस्त्यावर मंगळवारी (२८ मार्च) घडली. पिंपरी आणि एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनेनंतर १२ तासांत चारही आरोपींना अटक केली. घटनेच्या वेळेस माजी सैनिकाने दोघांना पकडून ठेवल्याने त्याच्या चारही आरोपींनी माजी सैनिकाच्या डोक्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने वार केले.

भरत रामनाथ पाटली (वय ५६, रा. यशवंतनगर, पिंपरी) असे जखमी झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. तर याप्रकरणी रोहन ऊर्फ जिज्या राणुजी शिंदे (वय १९, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर), गणेश उत्तम सोनावणे (२०, रा. गवळीमाथा भोसरी), अक्षय धुरधुरे अशी अटक करण्यात आलेल्यांची असून, त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. रोहन आणि गणेश या दोघांवर यापूर्वी अन्य पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. नेहरूनगर-गवळीमाथा रस्त्यावर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत पाटील हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. गुढी पाडव्यानिमित्त ते कल्याण येथील घरी गेले होते. तेथून ते मंगळवारी पिंपरीत परतले. पिंपरी रेल्वे स्थानकापासून रिक्षाने पाटील हे नेहरूनगर गेले. त्या वेळेस आरोपी हे देखील प्रवासी म्हणून पाटील यांच्यासह रिक्षेत बसले होते. नेहरूनगर येथे उतरल्यानंतर चारही आरोपींनी पाटील यांचा पाठलाग सुरू केला. काही अंतर पुढे गेल्यावर चौघांनी धारदार शस्त्राच्या धाकाने पाटील यांना धमकावत त्यांचा मोबाइल आणि पैसे काढून घेतले. तेव्हा पाटील यांनी आरोपींना प्रतिकार करीत दोघांना पकडून ठेवले.

तेवढ्यात आरोपींच्या साथिदारांनी पाटील यांच्या डोक्यावर आणि हातावर वार केले. तसेच मारहाण केली. नेहरूनगर-गवळीमाथा रस्त्यावर महापालिकेचे कचरा गाड्यांचे गोदाम आहे. तेथे सुरक्षारक्षक असतात हे माहित असल्याने पाटील यांनी दोघा आरोपींना पकडून ठेवत ओढत तिथपर्यंत नेले. परंतु आरोपींच्या हातात शस्त्र बघून महापालिकेचे सुरक्षारक्षक तेथून पसार झाले. याच दरम्यान, तेथून दोन युवक कारमधून जात होते. गंभीर जखमी अवस्थेतील पाटील यांना युवकांनी कारमधून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेची माहिती मिळताच रात्रगस्तीवरील वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी पाटील यांची भेट घेऊन आरोपींचा तपास सुरू केला. भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप शिंदे, पिंपरीचे फौजदार हरिष माने, ईश्वर जगदाळे यांनी घटनेनंतर बारा तासांत चारही आरोपींना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदांच्या वाटपावरून भाजमध्ये नाराजीनामा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
मतदारांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता दिल्यानंतर आता पदवाटपाच्या मुद्यावरून या पक्षामध्येही नाराजीनामा सत्राला प्रारंभ झाला आहे. पक्षाचे नगरसेवक विजय शिंदे यांनी विधी समिती सदस्यपदाचा राजीनामा सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे बुधवारी सादर केला.

या वर्षी कोणतेच पद नको असल्याने स्वखुशीने राजीनामा देत असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. तर, स्थायी समितीत स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या शिंदे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. शिंदे प्रभाग क्रमांक १९मधून भाजपच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांची विधी समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड झाली होती. मात्र, प्रभाग मोठा असून प्रभागात काम करायचे आहे. तसेच प्रभागातील अन्य दोन नगरसेवकांना समित्यांवर संधी मिळाली आहे. त्यामुळे या वर्षी मला कोणतेही पद नकोच होते. तरीही पक्षाने संधी दिली. त्यामुळे मी स्वखुशीने विधी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला, असे शिंदे यांनी म्हटले आहे. राजीनाम्यामुळे अन्य सदस्याला संधी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात पवार म्हणाले, ‘शिंदे यांना प्रभागात काम करायचे असल्यामुळे त्यांनी स्वखुशीने राजीनामा दिला आहे. त्याबाबत आता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’मुळे दोन जणांचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, बुधवारी महिलेसह एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. चालू वर्षात पिंपरी-चिंचवड शहरातील स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दिघीतील ४० वर्षीय महिलेचा आणि खेड येथील ४३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

दिघीतील ४० वर्षीय महिलेला १९ मार्चला चिंचवड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. २३ मार्चला त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले, तर खेड येथील ४३ वर्षीय पुरुषाला २० मार्चला भोसरी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. २६ मार्चला त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. दोघांचा बुधवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवडमधील चालू वर्षातील स्वाइन फ्लूने ९ जणांचा बळी गेला आहे. तर स्वाइन फ्ल्यू बाधीतांची संख्या ५९ वर पोहोचली असून, ९ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या धडकेत चौघे जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नामदार गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्त्यावर वर्दळीच्या वेळी महिला कारचालकाचे आपल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने ती कार ‘स्टारबक्स कॉफी शॉप’समोर गाड्या उचलणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या टेम्पोवर पाठीमागून जाऊन आदळली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. या कारच्या धडकेत चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर कारचालक महिलाही जखमी झाली आहे.
नो-पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकी उचलणाऱ्या टेम्पोंकडून ‘स्टारबक्स’समोर कारवाई सुरू होती. काही दुचाकीस्वार वाहतूक पोलिस कर्मचारी संध्या काळे यांच्याशी बोलत होते. काळे या पावती पुस्तक आणण्यास वळल्या असताना गुडलक चौकाकडून आलेली कार टेम्पोला पाठीमागून जोरात आदळली. काळे सुदैवाने या अपघातातून बचावल्या. दंड भरण्यासाठी उभ्या असलेल्या दुचाकीस्वार या अपघातात जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
या अपघातात चौघे जखमी झाले असून त्यांच्या पायांना मार लागला आहे. कारचालक महिला तंद्रीत असल्याने तिचा कारवरील ताबा सुटल्याची माहिती डेक्कन पोलिसांनी दिली. कारचालक महिलाही जखमी झाली असून तिच्यावरही उपचार सुरू आहेत. कारने वाहतूक पोलिसांच्या टेम्पोवर आदळण्यापूर्वी किरण गजानन चावरे (वय २३) आणि प्रवीण नारायण कांबळे (वय २०, रा. नऱ्हे) यांना उडवले होते. हे दोघेही दंडाची पावती घेण्यासाठी टेम्पोजवळ उभे होते. कारजवळ उभे असलेले निखिल भोसले (वय ३०, रा. मंगळवार पेठ) आणि अनिल नलावडे (वय ३९, रा. मंगळवार पेठ) यांना उडवल्यानंतर कार थांबली होती, असे काळे म्हणाल्या.
अपघाताचा आवाज होताच प्रत्यक्षदर्शीनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, जखमींना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यास फारसे कोणीही पुढे आले नाही. अपघातग्रस्त चारही जण रस्त्यावर पडून होते. चैतन्य अभंग या कॉलेजच्या विद्यार्थ्यासह त्याच्या मित्रांनी रस्त्यावरील रिक्षा थांबवल्या आणि जखमींना जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. या चौघांच्याही पायांना फ्रॅक्चर झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
‘मी टेम्पोच्या पाठीमागे उभा होता. ​माझा सहकारी निखिल आणि अनिल हेसुद्धा तिथेच होते. गुडलक चौकाकडून एक कार वेगात येत असल्याचे पाहत होतो. रस्त्यावरही फारशी गर्दी नव्हती. काही सेंकदातच ती कार टेम्पोजवळ आली. कारचा वेग इतका होता की धडक दिलेल्या दुचाकी काही अंतर फरफटत गेल्या होत्या. मी रस्त्यावर फेकलो गेलो तर माझे दोन्ही सहकारी जखमी झाले,’ अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नाजिम पटेल याने दिली. नाजिम हा त्या टेम्पोवर गाड्या उचलण्याची कामे करतो.

लहान बाळ बचावले
गजानन चावरे, त्यांची पत्नी किरण आणि त्यांचा एक वर्षांचा चिमुकला हे डांगे चौकात राहतात. चावरे यांनी दुचाकी घेतली असून त्या दुचाकीच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी ते फर्ग्युसन रस्त्यावरील एका कार्यालयात आले होते. त्यांची दुचाकी नो-पार्किंगमध्ये लावण्यात आली होती. ती वाहतूक पोलिसांनी उचलली होती. वाहतूक पोलिसांचा टेम्पो जवळच दिसल्याने ते दंड भरून दुचाकी घेण्यासाठी धावले होते. सोबत पत्नी किरण आणि मुलगाही होता. त्यांची पत्नी दंडाचे पैसे देत होत्या तर मुलगा त्यांच्याजवळ होता. भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांच्या पत्नीला उडवले तर, ते आणि त्यांचा मुलगा बचावल्याचे चावरे म्हणाले.

कारचालकावर गुन्हा
महिला कारचालक निकिता निखिल बोरा (वय २८, रा. शिरोळे रस्ता) यांच्यावर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला पोलिस कर्मचारी काळे यांनी तक्रार दाखल केली आहे. बोरा यांना चक्कर आल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांची तब्येत ठीक नव्हती; तर त्यांनी कार चालवायला नको होती, अशी प्रतिक्रिया जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचवणारे अभंग यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images