Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शास्ती करमाफीचा सरकारचा निर्णय

$
0
0

सहाशे चौरसफुटापर्यंतच्या अनधिकृत घरांना वगळले; सामान्यांना फायदा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिका हद्दीतील सहाशे चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामासाठी शास्तीकर (दंड) माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.
पालिका हद्दीत नियमित होऊ शकतील अशा अनधिकृत बांधकामांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाचे धोरण सरकारने जाहीर केले. एक एप्रिलपासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी सांगितले. पालिकेची मान्यता न घेता केलेल्या बेकायदा बांधकामांकडून मिळकतकराच्या दुप्पट आणि त्यापेक्षा अधिक दंड आकारण्याची तरतूद पालिका कायद्यात आहे. पालिकेकडून एफएसआय तसेच टीडीआर मिळेल या भरवशापोटी अनेक बांधकाम व्यावसायिक प्रकल्प उभारतात. त्यानंतर फ्लॅट नागरिकांना विकून टाकतात. मात्र, एफएसआय न मिळाल्याने पालिका संबंधित फ्लॅटधारकांकडून मिळकतकराच्या दुप्पट आणि तिप्पट दंड वसूल करते. त्यामुळे चूक नसतानही सर्वसामान्यांना दंडवसुलीचा फटका बसत असल्याचे समोर आले होते. हा दंड अन्यायकारक असल्याची तक्रार करून काही वर्षांपूर्वी स्थायी समि‌तीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, अप्पा रेणुसे आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी सर्वसाधारण सभेत तिप्पट शास्तीकर रद्द करावा, अशी मागणी केली होती. निवासी मिळकती, व्यावसायिक मिळकतींना वेगळे धोरण ठरविण्याचा ठरावही मान्य करण्यात आला होता.
अधिकाधिक मिळकतधारकांकडून हा कर वसूल व्हावा, यासाठी प्रशासनाने अभय योजना राबवून दरमहा वसूल करण्यात येणारा दोन टक्के व्याजाचा दंड रद्द केला होता. बेकायदा बांधकाम केलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कायद्यात सुधारण करून ६०० चौरस फुटापर्यंतच्या बेकायदा बांधकामांकडून घेतला जाणारा शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ६०१ ते १००० चौरस फुटाचे बेकायदा बांधकाम केल्यास त्यांच्या मिळकतकराच्या पन्नास टक्के रक्कम शास्तीकर म्हणून आकारण्यात येणार आहे. एक हजार चौरस फुटापेक्षा अधिक बेकायदा बांधकाम झाल्यास त्यांच्याकडून सध्याच्या नियमाप्रमाणे मिळकतकराच्या दुप्पट रक्कम शास्तीकर म्हणून आकारण्यात येणार आहे, असेही श्रीमती टिळक यांनी सांगितले.

‘पालिकेचे उत्पन्न वाढणार’
पालिकेच्या मिळकत कर विभागाकडून सध्या १८ हजार अनिधकृत मिळकतींकडून तिप्पट करआकारणी केली जाते. मात्र, आता एक एप्रिलपासून सुधारित कर आकारणी होईल. राज्य सरकारच्या निर्णयामुळे पालिकेचे उत्पन्न वाढण्यास निश्चितच मदत होईल, असे मिळकत कर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.


घराचा आकार (चौरसफुटांत) शास्तीकर

सहाशे माफ
६०१ ते १००० मिळकतकराच्या ५० टक्के
१०००पेक्षा अधिक मिळकतकराच्या दुप्पट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहतूक पोलिसांचा ‘पारदर्शक’ कारभार

$
0
0

शूटिंग केल्याबद्दल मारहाणीची आयुक्तांकडे तक्रार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाहतूक पोलिसांच्या कारवाईचे मोबाइलवर चित्रिकरण करणाऱ्या नागरिकाला चौकीत नेऊन मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांची कारवाई हा संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला असतानाच हा प्रकार पुढे आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रोड) ही घटना घडली.
या बाबत हेमंत मर्दा यांनी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार केली आहे. सिंहगड रस्त्यावरील वडगावपुलानजीक वाहतूक पोलिसांनी मर्दा यांना अडविले आणि सिग्नल तोडल्याबाबत दंड भरण्याची मागणी केली. आपण सिग्नल तोडला नसल्याचे मर्दा यांचे म्हणणे होते. मात्र, पोलिसांनी न ऐकल्यामुळे आपल्याला दंड भरणे भाग पडले, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. मात्र, या भागात वाहतूक पोलिस फक्त नागरिकांकडूनच दंडवसुली करीत होते. त्यांच्यासमोर अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत होते, काही जण चुकीच्या दिशेने वाहन दामटत होते, तर काहीजण झेब्रा क्रॉसिंगवर उभे होते. मात्र, त्यांच्यावर काहीच कारवाई होत नव्हती. त्यामुळे आपण वाहतूक नियंत्रण कक्षास फोन केला आणि या प्रकाराचे शूटिंग पाठविता येईल का, असे विचारले. तेथून होकार आल्यानंतर आपण शूटिंग सुरू केले. मात्र, हे पाहिल्यावर तेथून आपल्याला वाहतूक चौकीत नेण्यात आले आणि तेथे बेदम मारहाण करण्यात आली आणि सरकारी कामात अडथळा आणल्याची कारवाई करण्याची धमकी दिली, तसेच आपल्यावर दबाव आणून जबाबही लिहून घेण्यात आला, असेही मर्दा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

‘व्हॉट्सअॅप नंबर तयार करा’
मोबाइलवर शूटिंग केल्याबद्दल नागरिकांना मारहाण करणे कायद्यात बसत नाही. अशा घटनांमुळे पोलिसांविषयी रोष वाढू शकतो, त्यामुळे या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विवेक वेलणकर, विश्वास सहस्त्रबुद्धे, जुगल राठी आणि अझहर खान यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. तसेच पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी पुढाकार घेऊन नागरिकांना मोबाइल शूटिंग पाठविण्याचे आवाहन करावे आणि त्यासाठी एक व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादग्रस्त पोस्टचा छडा लागणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सोशल मीडियावरील समाजातील शांतता भंग करणाऱ्या पोस्टचा छडा आता लवकर लावता येणार असून याव यावरील माहितीचे भावनिक विश्लेषण अथवा परीक्षण करणे ‘सी-डॅक’च्या ‘ई-विदूर’ प्रणालीद्वारे शक्य होणार आहे,’ अशी माहिती ‘सी-डॅक’ कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी दिली.

प्रगत संगणक विकास केंद्राच्या (सी-डॅक) ३०व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या ‍वेळी ‘सी-डॅक पुणे’चे सहायक संचालक डॉ. राजेंद्र जोशी, डॉ. दिनेश कात्रे, संजय वांढेकर उपस्थित होते. ‘सी-डॅक’ने ‘ई-विदुर’सोबतच, ‘मोझॅक’ प्रणाली, ‘डिजिटालय’ सॉफ्टवेअर आणि ‘परमशावक’ डीएलजीपीयू सुपरकम्प्युटर तयार केला असल्याची माहिती डॉ. दरबारी यांनी दिली.

डॉ. दरबारी म्हणाले, ‘समाजामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी समाजकंटक, दहशतवादी, गुन्हेगार मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करतात. त्यांच्यावर नियंत्रण ठे‍वणे सहज शक्य होत नाही. मात्र, यापुढे या घटकांना एखाद्या विषयाबाबत चुकीची आणि द्वेषाची माहिती सोशल मीडियावर पसरविणे महागात पडेल. ‘ई-विदुर’ प्रणालीद्वारे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि संशयास्पद हालचाली करणाऱ्या घटकांचा छडा लावता येणार आहे. तसेच, या घटकांची कार्यप्रणाली, उद्दिष्ट, पत्ता आदींची माहिती या प्रणालीद्वारे होईल. दरम्यान, सायबर हल्ले नेमके कोणत्या ठिकाणांहून होतात आणि ते करणारे लोक कोण, याचाही छडा लावता येईल. या प्रणालीद्वारे सोशल मीडियावरील ‘डेटा’चे परीक्षण करता येणे शक्य आहे. एखाद्याने एखाद्या विषयावर लिखाण अथवा कमेंट केले, तर त्यावर इतरांच्या होणाऱ्या प्रतिक्रियांचे नकारात्मक, सकारात्मक आणि भावनात्मक विश्लेषण करणे, शक्य होणार आहे. या प्रणालीचा वापर केंद्र व राज्य सरकारच्या सुरक्षा यंत्रणा आणि सरकारी विभागांना उपयोगी पडणार आहे. त्यामुळे प्रणाली वापरण्याबाबत विविध विभागांशी बोलणी सुरू आहेत.’


डिजिटालय सॉफ्टवेअरची निर्मिती

डॉ. कात्रे म्हणाले, ‘सी-डॅकच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजिटल प्रीझर्व्हेशन’ने ‘डिजिटालय’ नावाचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. हे सॉफ्टवेअर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड व्यवस्थापन, डिजिटल प्रीझर्व्हेशन आणि ट्रस्टेड डिजिटल रिपॉझिटरी स्थापन करण्यासाठी उपसोगी पडेल. सॉफ्टवेअरच्या साह्याने इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, ऑडिओ-व्हिडिओ, स्लाइड, ई-मेल, महत्त्वाचे दस्तावेज दीर्घ काळ जतन करणे शक्य होईल. हे सॉफ्टवेअर सरकारी विभागातील अधिकारी, कर्मचारी, रेकॉर्ड ऑफिसर, अभिलेखापाल वापरू शकतात.’

मोझॅक प्रणाली विकसित

डॉ. जोशी म्हणाले, ‘सी-डॅकच्या जैव माहिती तंत्रज्ञान गटाने ‘मोझॅक’ नावाची प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये क्लाउड कम्प्युटिंगच्या साह्याने औषध तयार करतानाच्या असंख्य संकल्पनांच्या संरचना हातळता येणार आहे. तसेच, एखादे औषध तयार करताना मोठ्या प्रमाणात संशोधन करावे लागते. संशोधनाला कालावधी अधिक लागत असल्याने मोठ्या प्रमाणात इतर औषधे कुचकामी ठरतात. या प्रणालीचा वापर केल्यावर ‘ड्रग रीपरपजिंग’ तंत्रज्ञानाद्वारे हे टाळता येईल. तसेच, या औषधांचा इतर आजारांवर वापर करता येईल.

आज होणार कार्यक्रम

‘ई-विदुर’, ‘मोझॅक’ प्रणाली, ‘डिजिटालय’ सॉफ्टवेअर आणि ‘परमशावक’ डीएलजीपीयू सुपरकम्प्युटरच्या अनावरणाचा कार्यक्रम आज, मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ज्येष्ठ खगोलशास्त्र डॉ. जयंत नारळीकर यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता ‘आयुका’च्या सभागृहात होणार आहे. या वेळी प्रा. सरोज कांत मिश्रा उपस्थित राहतील, असे डॉ. दरबारी यांनी सांगितले.


डॉ. दत्ता महासंचालकपदावर

प्रगत संगणन विकास केंद्राच्या (सी-डॅक) महासंचालकपदाचा अतिरिक्त कारभार डॉ. देवाशिष दत्ता यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. माजी महासंचालक प्रा. रजत मूना यांची रायपूरच्या आयआयटीच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त होते. डॉ. दत्ता हे सध्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन मंत्रालयामध्ये शास्त्रज्ञ ‘जी’ म्हणून कार्यरत आहे, अशी माहिती सी-डॅक पुणेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदू नववर्षासाठी बाजारपेठा सजल्या

$
0
0

गाठी, गुढीचे साहित्य, नवी उत्पादने खरेदीसाठी उसळली गर्दी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडव्यानिमित्त शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. गाठी, गुढीचे साहित्य, नवी काठी यासह पाडव्यासाठी नवी उत्पादने खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये चांगलीच गर्दी असळली होती.
हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आज (मंगळवारी) साजरा होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्याला हिंदू नववर्षाची सुरुवात होते. त्यानुसार गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोमवारी बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. उपनगरातील छोट्या मोठ्या बाजारपेठा, मंडयाबरोबरच लक्ष्मी रस्ता, मंडई, तुळशीबागेत मोठी गर्दी दिसून आली. नव्या वर्षाची सुरुवात पंचांगाचे पूजन करून, वाचन करून केली जाते. त्यासाठी पंचांगखरेदीसाठीही गर्दी होत होती.
महिला वर्गाकडून पुजेसाठी, हारासाठी फुले, नवीन वर्षाचे पंचांग, गाठ्या, गुढीचे पूजा साहित्य खरेदी केले जात होते. आंबा बाजारात दाखल झाल्याने पाडव्यानिमित्त आंब्याची खरेदी केली जात होती. पाडव्याचा मुहूर्त साधून नवी वस्तू घरी आणण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दालनांमध्येही लगबग दिसून आली. पाडव्यापूर्वीच बुकिंग केलेल्या नागरिकांना पाडव्याच्या दिवशी त्यांच्या पसंतीचे वाहन ताब्यात मिळावे, यासाठी वाहन वितरकांची धांदल उडाली होती. गुढीपाडव्याचा खास मान असलेल्या साखरेच्या गाठी किमान दहा रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. अनेक ठिकाणी रेडिमेड गुढ्यांनाही पसंती मिळत आहे. टेबलवर, कारमध्ये ठेवता येण्यासारख्या छोट्या गुढीसह मोठ्या रेडिमेड गुढ्याही उपलब्ध आहेत. पाडव्यानिमित्त घरोघरी गोडधोड बेत करण्यासाठी चक्का, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी या प्रकारांना बाजारात मागणी होती.
‘मूर्ती बेकर्स’ने खास पाडव्यानिमित्त विविध प्रकारच्या चॉकलेटचा वापर करून चॉकलेटच्या गुढ्या तयार केल्या आहेत. तीन वेगवेगळ्या प्रकारांमधील चॉकलेट गुढीची सजावट खाण्याच्या रंगांनी करण्यात आली आहे. चॉकलेट वितळण्यास सुरूवात झाल्यानंतर ते खाताही येत असल्याने हा नवा पर्याय लहान मुलांच्या पसंतीस पडत आहे, असे विक्रम मूर्ती म्हणाले.

सकाळी ८.२७ नंतर गुढी उभारा
सकाळी आठ वाजून २७ मिनिटांपर्यंत अमावस्या असून, महाराष्ट्रातील नागरिकांनी सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी किंवा त्यानंतर गुढी उभारावी, असे आवाहन दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी कॉलेजांची फी २० टक्क्यांनी होणार कमी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील खासगी कॉलेजांमधील मेडिकल, इंजिनीअरिंग, एमबीए, आर्किटेक्चर अशा अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष वार्षिक शैक्षणिक शुल्काची रक्कम ही सरासरी २० टक्क्यांनी कमी होणार आहे. राज्याच्या शुल्क नियामक प्राधिकरणाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यातील सुमारे तीन हजार कॉलेजांमध्ये सुरु असणाऱ्या सुमारे सहा हजार अभ्यासक्रमांचे शुल्क हे सरासरीने २० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर काही कॉलेजांचे शुल्क हे २० ते ६० टक्क्यांपर्यंत करण्यात आले आहे. येत्या २०१७ - १८ शैक्षणिक वर्षात हा निर्णय लागू होणार असल्याने विद्यार्थ्यांसोबत पालकांदेखील दिलासा मिळणार आहे.

राज्यात खासगी कॉलेजांची संख्या ही सुमारे तीन हजार आहे. या कॉलेजांमध्ये वैद्यकीय, इंजिनीअरिंग (डिग्री व डिप्लोमा), एमसीए, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजनेंट, लॉ, व्यवस्थापन अशा प्रकारचे सुमारे सहा हजार अभ्यासक्रम सुरु आहेत. यामध्ये प्रामुख्याने व्यावयासिक अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे वार्षिक शुल्क हे भरमसाठ असते. त्यामुळे हे शुल्क भरताना पालकांच्या नाकीनऊ येतात. अशातच प्रथम वर्षानंतर या शुल्कात एकूण शुल्काच्या पाच ते सात टक्क्यांनी वाढ होत असते. त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड भरावा लागतो. या सर्वांवर उपाय म्हणून राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी खासगी कॉलेजांमधील व्यावसायिक व इतर अभ्यासक्रमांचे शुल्क ठरविण्यासाठी शिक्षण शुल्क समिती स्थापन करण्यात आली. गेल्या वर्षी या समितीत बदल करुन शुल्क नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

त्यामुळे आता खासगी कॉलेजांमधील व्यावयासिक व इतर अभ्यासक्रमांचे शुल्क ठरविण्याचे अधिकार हे शुल्क नियामक प्राधिकरणाला आहेत. या प्राधिकरणाच्या सदस्यांची बैठक मुंबईत नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यातील सुमारे तीन हजार कॉलेजांमध्ये सुरु असणाऱ्या सुमारे सहा हजार अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे शुल्क हे गेल्या वर्षीच्या शुल्काच्या तुलनेत सरासरीने २० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एखाद्या इंजिनीअरिंग कॉलेजचे शुल्क गेल्या वर्षी प्रथम वर्षासाठी १ लाख रुपये होते. ते येत्या शैक्षणिक वर्षापासून ८० हजार रुपये होईल. यापूर्वी शैक्षणिक शुल्कात केवळ वाढ व्हायची आणि शुल्कची रक्कम कधीच कमी होत नसे. दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी येत्या २०१७ - १८ या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे, असे प्राधिकरणाच्या सदस्याने सांगितले.

शुल्क नियामक प्राधिकरणाने काही खासगी कॉलेजांमध्ये असलेल्या अभ्यासक्रमांचे शुल्क हे येत्या शेक्षणिक वर्षासाठी २० ते ६० टक्क्यांपर्यत कमी केले आहे. यात प्रामुख्याने इंजिनीअरिंग, एमबीए व व्यवस्थापन असे अभ्यासक्रम आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे. कॉलेजांमधील पायाभूत सुविधा, देखभाल दुरुस्ती खर्च, प्राध्यापकांची व विद्यार्थ्यांची संख्या, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा आदींचा सविस्तर अभ्यास करुन प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्षाचे सूरमयी स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मन तृप्त करणारी सुरांची पेशकश, नाजूक हरकती आणि तानांनी रसिकांचा घेतलेला ठाव अशा सुरेल वातावरणात भावगीतापासून अभंगांपर्यंतचा सुरेल प्रवास नववर्षाच्या आगमनासह चालून आला. मनाला प्रसन्न करणारे, शांत हळूवार आणि अवीट गोडवा देणारे स्वरगंधर्व पं. आनंद भाटे यांचे स्वर अंगावर झेलत पुणेकर रसिकांनी नववर्षाचे सूरमयी स्वागत केले.
निमित्त होते, ‘मटा कल्चर क्लब’तर्फे गुढी पाडव्यानिमित्त आयोजित ‘स्वर अमृताचे’ या कार्यक्रमाचे. कार्यक्रमात पं. आनंद भाटे यांनी नाट्यसंगीत, भावगीत, अभंग अशा गायनाच्या विविध अंगांचे सादरीकरण करीत रसिकांना पाडव्याची सुरेल भेट दिली. त्यांचे हळूवार स्वर, मिश्कील हरकती आणि बहरदार तानांना ‘वाह! क्या बात है’…, ‘अप्रतिम’.. ‘अद्‍भुत’... अशी दाद देत रसिकांनीही स्वरगंधर्वाच्या संगीत सफरीची सैर केली. महाराष्ट्राच्या संगीत परंपरेतील शिरोमणी पं. भीमसेन जोशी आणि बालगंधर्व यांचा जीवनप्रवास भाटे यांनी या वेळी गाण्यांतून उलगडला. बालगंधर्व आणि पंडितजींना गायलेल्या अजरामर रचना भाटे यांनी सादर करत शास्त्रीय संगीत आणि नाट्य संगीताचा सुवर्णकाळ रसिकांसमोर उभा केला.
रामकली रागाच्या सादरीकरणाने त्यांनी गायनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना बागेश्री रागाच्या अंगाने जाणारी बंदिश सादर केली. ‘सखी मंद झाल्या तारका’ या राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि पं. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या भावगीताच्या पहिल्या रेकॉर्डिंगची आठवण सांगत त्यांनी ते सादर केले. या भावगीताला भाटे यांच्या नम्र सादरीकरणाची किनार होती. त्यानंतर त्यांनी राम गुणगान हे भजन, माझे माहेर पंढरी हा अभंग सादर करत भक्तिरस आळवला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी बालगंधर्व यांच्या संगीत साधनेवर प्रकाश टाकला. ‘नमन नटवरा’ ही नांदी सादर करत त्यांनी गंधर्वयुगाच्या प्रवासाची नांदी केली. बालगंधर्वांनी सादर केलेली अनेक नाट्यपदे त्यांनी सादर केली. त्यातील ‘जोहार माय बाप जोहार’ या संत कान्होपात्रा या नाटकातील पदाने तर रसिकांवर मोहिनी घातली. भाटे यांच्या बहरदार लयकारीने या नाट्यपदामध्ये रंग भरले. ‘प्रभू आजी गमला मनी तोषला’ हे भैरवीतील पद सादर करत त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
भाटे यांना राहुल गोळे यांनी हार्मोनिअमवर, भरत काळे यांनी तबल्यावर सुरेल साथसंगत केली. माउली टाकळकर यांचे टाळवादन रसिकांची विशेष दाद मिळवून गेले. बालगंधर्व आणि पं. भीमसेन जोशी यांचा सांगीतिक प्रवास उलगडणारी संहिता प्रवीण जोशी यांना लिहिली होती. त्या शब्दांना राजेश दामले यांनी त्यांच्या निवेदनाने उत्तम न्याय दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पद्मावती’सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘पद्मावती’ या चित्रपटाच्या माध्यमातून संजय लीला भन्साळी हे महाराणी पद्मिनी यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत आहेत. इतिहासाची तोडफोड करून महाराणी पद्मिनी यांची प्रतिमा मलिन करणारा हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही,’ असा स्पष्ट इशारा राजपूत करणी सेनेने दिला. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येईल, अशी माहिती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकेंद्रसिंह कालवीजी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासातील महापुरुषांची प्रतिमा मलिन करण्याचे काम अनेक दिग्दर्शक करत आहेत. माल-मसाल्याच्या नावाखाली त्यांची चाललेली मनमानी खपवून घेतली जाणार नाही. आपल्या पूर्वजांनी त्यांच्या प्राणाची आहुती देऊन आपल्या भारतमातेचे रक्षण केले आहे. अशा महापुरुषांची चित्रपटांमधून होणारी बदनामी ही दुर्दैवी गोष्ट आहे. महाराणी पद्मिनी यांनी सोळा हजार महिलांसमवेत लढ्यामध्ये प्राण त्यागले होते. मात्र, भन्साली हे त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून फक्त त्यांची प्रेमकथा दाखवित आहेत, हे कितपत योग्य आहे. त्यामुळे महाराणी पद्मिनी हा चित्रपट संपूर्ण देशामध्ये प्रदर्शित होऊ नये, म्हणून संघटनेतर्फे सर्व स्तरांवर प्रयत्न करण्यात येतील, असे कालवीजी यांनी सांगितले. महिपालसिंह मकरूणा, प्रमोद राणा, सुहास पासलकर आदी उपस्थित होते.

‘इतिहास अभ्यासकांची अनुमती घ्यावी’
एखाद्या दिग्दर्शकाला इतिहासाशी निगडीत चित्रपटाची निर्मिती करायची असल्यास चित्रपटावर ‘प्री- सेन्सॉरशिप’ असावी. चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी इतिहासाचे अभ्यासक, पत्रकारांना तो चित्रपट दाखविण्यात यावा. जर त्यांची अनुमती असेल; तरच तो चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा, अशी मागणी ही कालवीजी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगला ‘चित्र पदार्पण पुरस्कार’ सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जीवन मराठे यांनी सादर केलेले गणेशस्तवन, संगीतकार-गायक केदार भागवतने गायलेले ‘तो नाही मी’ हे गाणे आणि पदार्पणातच मिळालेल्या पुरस्काराने भारावलेले आणि प्रोत्साहित झालेले कलाकार... अशा वातावरणात सातवा ‘चित्र पदार्पण पुरस्कार २०१६’ पार पडला. ‘फॅमिली कट्टा’ आणि ‘भोभो’ या दोन सिनेमांना विभागून सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पुरस्कार या वेळी मिळाले.
मराठी चित्रपट परिवार, आदित्य प्रॉडक्शन्स यांच्या वतीने आयोजित हा पुरस्कार सोहळा सोमवारी एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात रंगला. पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष योगेश बारस्कर यांच्या प्रास्ताविकानंतर थेट सोहळ्यास सुरुवात झाली. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे विशेष प्रतिनिधी अभिजित थिटे यांना आणि मंदार चोळकरला अनुक्रमे ‘रंग अबोली’ आणि ‘तुझ्याविना’ या अल्बमचे नॉन - फिल्मी गीतकार म्हणून पुरस्कार मिळाला. याच विभागातील सर्वोत्कृष्ट गायकासाठी वैभव लोंढेला (भिजलेली तू), गायिका अन्वेषाला (तुझ्याविना) आणि संगीतकार म्हणून प्रसाद फाटक यांना गौरवण्यात आले. ‘भिजलेली तू’ हा सर्वोत्कृष्ट नॉन फिल्मी अल्बम ठरला.
‘रंगा पतंगा’ आणि ‘भोभो’ या सिनेमांसाठी अनुक्रमे प्रसाद नामजोशी आणि भारत गायकवाड सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. सागर देशमुख आणि अक्षय टंकसाळे या दोघांनाही ‘वाय झेड’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे, तर गौरी नलावडे (फ्रेंड्स) आणि समिधा गुरू (कापूसकोंड्याची गोष्ट) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे विभागून पारितोषिक मिळाले. भारत गायकवाड यांना कथेचा, प्रसाद नामजोशी यांना पटकथेचा, ‘कौल मनाचा’ या सिनेमासाठी श्वेता पेंडसे हिला संवादाचा पुरस्कार मिळाला, तर ‘फोटोकॉपी’ सिनेमासाठी गीतकार आणि संगीतकार विभागातील दोन्ही पुरस्कार डॉ. नेहा राजपालने पटकावले.
कार्यकारी निर्माता म्हणून ५० सिनेमे पूर्ण केल्याबद्दल आणि ‘कापूसकोंड्याची गोष्ट’ या सिनेमासाठीदेखील प्रवीण वानखेडे यांना सर्वोत्कृष्ट कार्यकारी निर्मात्याचा पुरस्कार देण्यात आला. प्रसिद्धी व्यवस्थापनासाठी ‘फॅमिली कट्टा’ला, तर सर्वोत्कृष्ट पब्लिसिटी डिझाइनचा पुरस्कार ‘फोटोकॉपी’साठी नीलेश कुंजीरला मिळाला.
गीतकार वैभव जोशी, नाटककार श्रीनिवास भणगे, अभिनेता विजय पटवर्धन, आदित्य दाढे, लक्ष्मीकांत देशमुख, निर्माता मिलिंद लेले, अभिनेत्री पूजा पवार, निर्माता अविनाश मोहिते, लेखक आबा गायकवाड, अभिनेता प्रशांत तपस्वी, अभिनेता श्रीकांत यादव, कार्यकारी निर्माता संजय ठुबे, ज्येष्ठ पत्रकार सुभाषचंद्र जाधव व श्रीकांत कुलकर्णी, अभिनेता सदानंद चांदेकर यांसारख्या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सोहळ्याचे निवेदन कीर्ती रामदासी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉलेजांचे शुल्क यंदा होणार कमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील खासगी कॉलेजांमधील मेडिकल, इंजिनीअरिंग, एमबीए, आर्किटेक्चर अशा अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष वार्षिक शैक्षणिक शुल्काची रक्कम ही सरासरी २० टक्क्यांनी कमी होणार आहे. राज्याच्या शुल्क नियामक प्राधिकरणाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यातील सुमारे तीन हजार कॉलेजांमध्ये सुरू असणाऱ्या सुमारे सहा हजार अभ्यासक्रमांचे शुल्क हे सरासरीने २० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढेच नव्हे; तर काही कॉलेजांचे शुल्क हे २० ते ६० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. येत्या २०१७-१८ शैक्षणिक वर्षात हा निर्णय लागू होणार असल्याने विद्यार्थ्यांसोबत पालकांनादेखील दिलासा मिळणार आहे.
राज्यात खासगी कॉलेजांची संख्या ही सुमारे तीन हजार आहेत. या कॉलेजांमध्ये वैद्यकीय, इंजिनीअरिंग (डिग्री व डिप्लोमा), एमसीए, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजनेंट, लॉ, व्यवस्थापन अशा प्रकारचे सुमारे सहा हजार अभ्यासक्रम सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने व्यावयासिक अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे वार्षिक शुल्क हे भरमसाठ असते. त्यामुळे हे शुल्क भरताना पालकांच्या नाकीनऊ येतात. अशातच प्रथम वर्षानंतर या शुल्कात एकूण शुल्काच्या पाच ते सात टक्क्यांनी वाढ होत असते. त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड भरावा लागतो. या सर्वांवर उपाय म्हणून राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी खासगी कॉलेजांमधील व्यावसायिक व इतर अभ्यासक्रमांचे शुल्क ठरविण्यासाठी शिक्षण शुल्क समिती स्थापन करण्यात आली. गेल्या वर्षी या समितीत बदल करून शुल्क नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
त्यामुळे आता खासगी कॉलेजांमधील व्यावयासिक व इतर अभ्यासक्रमांचे शुल्क ठरविण्याचे अधिकार हे शुल्क नियामक प्राधिकरणाला आहेत. या प्राधिकरणाच्या सदस्यांची बैठक मुंबईत नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यातील सुमारे तीन हजार कॉलेजांमध्ये सुरू असणाऱ्या सुमारे सहा हजार अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे शुल्क हे गेल्या वर्षीच्या शुल्काच्या तुलनेत सरासरीने २० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एखाद्या इंजिनीअरिंग कॉलेजचे शुल्क गेल्या वर्षी प्रथम वर्षासाठी १ लाख रुपये होते. ते येत्या शैक्षणिक वर्षापासून ८० हजार रुपये होईल. यापूर्वी शैक्षणिक शुल्कात केवळ वाढ व्हायची आणि शुल्काची रक्कम कधीच कमी होत नसे. दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी येत्या २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे, असे प्राधिकरणाच्या सदस्याने सांगितले.

अभ्यासानंतर निर्णय
शुल्क नियामक प्राधिकरणाने काही खासगी कॉलेजांमध्ये असलेल्या अभ्यासक्रमांचे शुल्क हे येत्या शैक्षणिक वर्षासाठी २० ते ६० टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. यात प्रामुख्याने इंजिनीअरिंग, एमबीए व व्यवस्थापन असे अभ्यासक्रम आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. कॉलेजांमधील पायाभूत सुविधा, देखभाल दुरुस्ती खर्च, प्राध्यापकांची व विद्यार्थ्यांची संख्या, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा आदींचा सविस्तर अभ्यास करून प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमलाकर तपस्वी यांचे हृदयविकाराने निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ज्येष्ठ भजनगायक आणि संगीतकार कमलाकर तपस्वी (७६) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन विवाहित कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
शिष्य परिवारामध्ये तपस्वी ‘काका’ या नावाने ते परिचित होते. शनिवारी (दि. २५) भजनाच्या कार्यक्रमात गायन सुरू असतानाच तपस्वी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने शिष्य परिवारावर शोककळा पसरली आहे.
‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय’ या गजराने हजारो लोकांना अध्यात्माची गोडी लावणारे व्यक्तिमत्व म्हणून तपस्वी काका परिचित होते. लहान वयापासून कीर्तनाचा छंद असलेल्या तपस्वी यांनी समर्थ संगीत विद्यालयाच्या हरिभाऊ गावे यांच्याकडे शास्त्रीय आणि सुगम संगीताचे शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठात संगीताचे शिक्षण घेत असताना ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते. संगीत साधनेमध्ये खंड पडू नये, म्हणून सरकारी नोकरी सोडून ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये रुजू झाले. १९९९ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. स्वामी समर्थांवर गीतलेखन करणाऱ्या तपस्वी यांनी स्वामी गीते स्वरबद्ध केली आहेत. पार्श्वगायक आणि संगीतकार म्हणून सन्मान लाभलेल्या तपस्वी यांनी भजन गायनाचे साडेचार हजारांहून अधिक कार्यक्रम केले आहेत. तपस्वी काकांनी ७०० हून अधिक गीतांचे लेखन केले; तसेच श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, श्री चिले महाराज, श्री शंकर महाराज, श्री साई बाबा आणि श्री गणेशगिरी महाराज अशा सहा विभूतींच्या लीलामृत पोथ्यांचे लेखनही त्यांनी केले आहे.
तपस्वी काका स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते. अध्यात्माचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते अध्यात्मावर निरूपण करीत होते. त्यांना गुरु महात्म्य पुरस्कार, मंगलभवन सेवा मंडळाचा सन्मानचिन्ह मानकरी पुरस्कार, नवोदय मानव विकास सेवा संस्थेचा भक्तिगंधर्व पुरस्कार, प्रज्ञाचक्षु पुरस्कार, संगीत रत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभागातील विकासकामांत सत्ताधाऱ्यांचाच ‘अडथळा’?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेचा कारभार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या हातात येऊन अद्याप १५ दिवस पूर्ण झाले नसूनही यापूर्वीच्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. तसेच, काही प्रभागांमध्ये भाजपसह इतर पक्षातील नगरसेवक निवडून आले आहेत; पण त्यांचे मत विचारात न घेता भाजपच्या नगरसेवकांकडून मनमानी होत असल्याची टीका सुरू झाली आहे. त्यामुळे, प्रभागांमध्ये आत्तापासूनच वादाची ठिणगी पडली असून, कदाचित पुढील काळात त्यात आणखी वाढ होत जाणार, असे दिसते.

नवनिर्वाचित नगरसेवकांमधून १५ मार्चला भाजपच्या महापौर म्हणून मुक्ता टिळक यांची निवड झाली. तेव्हापासून खऱ्या अर्थाने पालिकेतील सत्ता भाजपच्या हाती आली. त्यानंतर, महापालिकेत तीन-चार सर्वसाधारण सभा झाल्या; तसेच भाजपच्या नगरसेवकांनी स्थानिक स्तरावरही कामाला सुरुवात केली आहे. अर्थात, स्थायी समिती अध्यक्षांची निवड आणि त्यांनी अर्थसंकल्प सादर केल्याशिवाय लोकप्रतिनिधींना प्रभागातील विकासकामांना सुरुवात करता येणार नाही. नव्या विकासकामांना सुरुवात करता येणार नसली, तरी पूर्वीच्या विकासकामांना ‘खो’ घालण्याचा प्रकार भाजपच्या नगरसेवकांनी आत्तापासूनच सुरू केला आहे. गेल्या १०-१२ दिवसांमध्ये असे काही प्रकार समोर आले असून, त्यावरून जुन्या आणि नव्या सत्ताधाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

नरवीर तानाजी मालुसरे रोडवरील (सिंहगड रोड) एका प्रभागात प्रशासनाने जलतरण तलाव चालवण्यासाठी टेंडर काढले होते. त्यानुसार, ठेकेदारही निश्चित करण्यात आला होता. त्याला सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक असल्याने संबंधित प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. परंतु, सिंहगड रोडवरील एका प्रभागातील माजी उपमहापौर आणि नुकत्याच भाजपमध्ये दाखल झालेल्या एका ‘माननीयां’नी त्याला आक्षेप घेतला. हा प्रस्ताव एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने त्याला मान्यता दिल्यास उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला होऊ शकेल, असेही प्रशासनाने पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपूर्ण प्रक्रियेची माहिती घ्यायची असून, मी अजून नवीन आहे, असा दावा करत संबंधित लोकप्रतिनिधींनी हट्ट कायम ठेवला. त्यामुळे, नाईलाजास्तव हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला. खरेतर, अशा वेळी भाजपच्या सभागृहनेत्यांनी ठाम भूमिका घेऊन प्रशासनाला साथ देणे अपेक्षित असताना, त्यांनीही याबाबत लोकप्रतिनिधींच्या भूमिकेलाच पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सिंहगड रोडवरील प्रभागापाठोपाठ स्मार्ट सिटीमध्ये निवड झालेल्या बाणेर प्रभागामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. या प्रभागामध्ये महापालिकेने ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) निकषांवर कचरा प्रक्रिया प्रकल्प विकसित केला आहे. नोबेल एक्सेंज कंपनीतर्फे हा प्रकल्प चालविला जातो. या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करून पुढील उत्पादनासाठी कंपनीच्या तळेगाव येथील प्रकल्पावर पाठविण्यात येतो. तेथे, क्रॉम्प्रेस बायोगॅस (सीबीजी) निर्माण केला जातो. या बायोगॅसवर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस चालविण्याचा प्रयोग करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकल्प सुरू असताना, अचानक नव्या लोकप्रतिनिधींना संबंधित प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत असल्याचा साक्षात्कार झाला आहे. तसेच, त्यातून निर्माण होणारा वायू आरोग्यासाठी घातक असल्याचा शोधही लावण्यात आला असून, नुकतीच कोथरूडच्या आमदारांसह भाजपच्या सर्व नगरसेवकांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या जागेला भेट दिली. पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनाही त्या वेळी बोलावण्यात आले होते. यावेळी, हा प्रकल्प तातडीने रद्द केला जावा, अशी मागणी लावून धरण्यात आली. हा प्रकल्प बंद झाल्यास सुमारे दीडशे टन ओल्या कचऱ्याचे करायचे काय, असा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच, त्यापासून निर्माण होणाऱ्या सीबीजीतून पीएमपी बस चालविण्यासारखा अनोखा प्रयोग होणार असेल, तर प्रकल्प बंद होण्याने त्याला खीळ बसणार नाही का? तसेच, या प्रभागात भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक आहे. मग, नागरिकांच्या हितासाठी हा प्रकल्प बंद करण्याची मागणी करणाऱ्या भाजपच्या लोकप्रतिनिधींना राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला बरोबर घ्यावे असे का वाटले नाही? आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी भेट दिल्याच्या दुसऱ्या दिवशी पालिकेतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी हा प्रकल्प बंद करण्यास तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्पाची जागा कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठीच आरक्षित असल्याचा दावा केला जात असून, हा प्रकल्प बंद झाल्यास शहरात कचऱ्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये, महापौर मुक्ता टिळक यांनी समंजस भूमिका घेतली असून, चर्चेने प्रश्न मिटवण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

सत्ता हातात आल्यानंतर अवघ्या १५ दिवसांमध्ये भाजपच्या लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या भागांत विकासकामांमध्ये खोडा घालण्याचा प्रकार सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांनी यासाठी त्यांना नक्कीच निवडून दिलेले नाही. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी काही प्रकल्प राबवले असतील, तर ते बंद पाडण्यामध्ये नागरिकांचे हित आहे का, याचा विचार भाजपच्या नगरसेवकांनी करायला हवा. अन्यथा, एकहाती सत्ता कशाला दिली, अशी धारणा नागरिकांमध्ये निर्माण होण्याची भीती आहे.


प्रभागनिहाय जाहीरनाम्यासाठी नियोजन आणि पाठपुरावा करा

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने प्रथमच सर्व प्रभागांसाठी स्वतंत्र जाहीरनामा तयार केला होता. स्थानिक स्तरावरील परिस्थिती, तेथील समस्या, अनेक वर्षे प्रलंबित राहिलेले प्रश्न याचा आढावा घेऊन, नागरिकांच्या सूचना स्वीकारून हा जाहीरनामा तयार करण्यात आला होता. निवडणुकीत यशस्वी झाल्यानंतर प्रभाग स्तरावरील समस्या दूर करण्याकरिता या जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीसाठी नियोजन आणि त्यानुसार कार्यवाही करा, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे, यापूर्वीच्या पालिकेतील सदस्यांनी केलेल्या किंवा प्रशासनाने उभारलेल्या प्रकल्पांमध्ये त्रुटी-कमतरता दाखवण्यापेक्षा स्थानिक स्तरावर नागरिकांना निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी कार्यक्रम ठरवा, अशी मागणी आता नागरिकांकडून होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टाटा मोटर्स’मध्ये वेतनवाढ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

टाटा मोटर्स व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉइज युनियन यांच्यामध्ये त्रैवार्षिक वेतनवाढ करार मंगळवारी (२८ मार्च) करण्यात आला. जवळपास गेल्या १९ महिन्यांपासून हा करार प्रलंबित होता. कामगारांनी मध्यंतरी आंदोलन केले होते. सुमारे पाच हजार ३०० कामगारांचा याचा फायदा होणार आहे. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नुकतीच पिंपरी प्रकल्पाला भेट दिली. त्यांच्या समवेत नवनिर्वाचित अध्यक्ष एन. चंद्रशेखरनदेखील उपस्थित होते. त्यांनी कामगारांशी थेट संवाद साधून लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

टाटा मोटर्सच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य असलेले, क्वालिटी विभागाचे कार्यकारी संचालक सतीश बोरवणकर यांच्या पुढाकारातून हा करार झाल्याचे युनियचे अध्यक्ष अध्यक्ष समीर धुमाळ यांनी सांगितले. सौहार्दपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्याचे या वेळी बैठकीला उपस्थित असणाऱ्यांनी सांगितले. एक सप्टेंबर २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१८ या कालावधीकरिता ८६०० रुपये प्रत्यक्ष वाढही तीन वर्षांच्या टप्प्याटप्प्याने (७२ टक्के, १५ टक्के व १३ टक्के अशी) विभागून तसेच ८७०० रुपये अप्रत्यक्ष म्हणजे एकूण रुपये १७ हजार ३०० रुपये एवढ्या रकमेचा करार झाला आहे.

या पगारवाढीव्यतिरिक्त कंपनीने कंपनीच्या सेवेत असताना एखादा कामगार मृत पावल्यास त्याच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीबाबत, २५ वर्षसेवा काल पूर्ण झाल्यावर देण्यात येणारे घड्याळ आता कामगाराच्या पती अथवा पत्नीसही देण्यात येईल. या वाढीबरोबरच कामगारांना देण्यात येणाऱ्या इतरही सेवा सवलतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. ब्लॉक क्लोजरच्या दिवसांमध्येही ६ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तसेच, कार्यप्रणालीच्या मोजमापनाशी संलग्न पगारवाढ यास कामगारांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला.

बोरवणकर यांनी कामगार व युनियनसोबत कंपनीचे संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले असल्याचेही नमूद केले. सर्वांनी केलेल्या सहकार्याचे त्यांनी कौतुक केले. कामगारांनी जवळजवळ १९ महिने शांततेच्या मार्गावर राहिल्याबद्दल कौतुक केले व युनियनने सुद्धा इतक्या चांगल्या मार्गाचा अवलंब करून कामगारांना जास्तीत जास्त फायदा करून दिल्याचा उल्लेख केला. टाटा संस्कृती आपण सर्वांनीच अशाच प्रकारे जपली पाहिजे, याबाबत त्यांनी उल्लेख केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईच्या उपस्थितीत ‘त्या’ मुलीवर अंत्यविधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

महिलादिनी तिसरी मुलगी झाली आणि तिचा मृत्यू झाल्यावर चिमुरडीचा मृतदेह शवागारात सोडून माता निघून गेल्याचा काहीसा प्रकार नुकताच वायसीएम हॉस्पिटलमध्ये उघड झाला होता. परंतु, त्या चिमुरडीची आई मंगळ‍वारी पिंपरी पोलिसांकडे आल्यावर खरा प्रकार समोर आला. नवजात मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आजीचे निधन झाल्याने चिमुरडीचा पिता प्रथम आईच्या अंत्यसंस्काराला चल, असे म्हणून सातारा येथे घेऊन गेल्याने चिमुरडीचा मृतदेह शवागारात ठेवावा लागल्याचे स्पष्टीकरण पिंपरी पोलिसांना तिच्या आईने दिले. या मुलीवर सायंकाळी चिंचवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिर्चना अश्फाक काळे यांना वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना तिसऱ्यांदा मुलगी झाली. परंतु, २२ मार्चला तिचा मृत्यू झाला. तिसरी मुलगी झाल्याने अश्फाक काळे हे नाराज होते. त्यांनी अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या मुलीला ताब्यात द्या, म्हणून हॉस्पिटल प्रशासनाशी वाददेखील घातला होता. आठव्या महिन्यात जन्म झाल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्यावर मिर्चना यांनी तिचा मृतदेह शवागारात ठेवला होता. हॉस्पिटल प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न करूनही नंतर त्या मृतदेह घेऊन जाण्यासाठी आल्या नाहीत.

दरम्यान, याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी या चिमुरडीवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शविली होती. तसेच, याबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना लांडगे यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. दुसरीकडे मिर्चना या भावासह पिंपरी पोलिस ठाण्यात मंगळवारी दाखल झाल्या. अजून थोडा उशिर झाला असता, तर चिमुरडीला शेवटचे पाहतादेखील आले नसते, हे त्यांना समजल्याने त्यांचा बांध फुटला. सासूचे निधन झाल्याने पती सातारा येथे घेऊन गेला होता. पण, चिमुरडीचा मृतदेह शवागारात असल्याने सासूचे दिवसकार्य होण्यापूर्वीच पिंपरीत आल्याचे मिर्चना यांनी सांगितले. त्यानंतर लांडगे यांचे कार्यकर्ते, सहायक पोलिस निरीक्षक गजानन कडाळे आणि मिर्चना व त्यांचा भाऊ यांनी चिमुरडीवर अंत्यसंस्कार केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पती-पत्नी, मुलीचा खेड तालुक्यात खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरूनगर

खेड तालुक्यातील कुरकुंडी येथील एकाच कुटुंबातील पतीपत्नी आणि त्यांच्या मुलीचा निर्घृणपणे खून करून त्यांचे मृतदेह पाण्याच्या चरामध्ये गाडून टाकल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. कुरकुंडी गावाच्या हद्दीतील राळेवस्तीजवळ ही घटना घडली.
शनिवारी रात्री या तिघांचे घराच्या पडवीमध्ये खून करण्यात आले. रोहिदास बाळू गोगावले (वय ४५), मंदा रोहिदास गोगावले ( वय ४०) आणि अंकिता (वय १२) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. रोहिदास यांच्या पहिल्या बायकोचा मोठा मुलगा दीपक गोगावले ( वय २१) याने साथीदार आकाश भोकसेच्या मदतीने ख़ून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. कौटुंबिक वादातून खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. खुनानंतर तिघांचे मृतदेह घरापासून अंदाजे शंभर फूट अंतरावरील पाण्याच्या चरामध्ये एकावर एक अशा पद्धतीने रचून शेणखत टाकून गाडण्यात आले होते.
पुणे ग्रामीण पोलिस विभागाचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक़, अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे यांनी घटनास्थ़ळी भेट देऊन माहिती घेतली. चाकण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, उपनिरीक्षक महेश मुंडे आदींनी पंचनामा केला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाचाबाचीतून विद्यार्थ्याचा खून

$
0
0

सिंहगड कॉलेजच्या कॅम्पसबाहेरील प्रकार; दोघे अटकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंहगड कॉलेज कॅम्पसच्या बाहेरील हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करताना झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान एकमेकांना बांबूने मारहाण करण्यात झाले. या मारहाणीत वीस वर्षाचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान सोमवारी रात्री मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे.
गौरव रामचंद्र जाधव (वय २०, रा. घुरसाळे, खटाव, सातारा) असे मृत्यू पावलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आकाश अनिलकुमार डोके (रा. हिंगणे) आणि आशिष बिभिषण पवार (रा. नांदेड सिटी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. गौरवच्या अभिजित प्रभाकर शिंदे (वय २२) आणि मनोज सुभाष चोरडिया (वय २४) या मित्रांनाही मारहाण करण्यात आली होती. भारती विद्यापीठ पोलिसांनी सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. मात्र, गौरव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी दिली.
मारहाणीनंतर दोघेही संशयित गायब झाले होते. भारती विद्यापीठ पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. फौजदार समाधान कदम यांना मिळालेल्या माहितीनुसार दोघा संशयितांना आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आले. दोघांनीही मारहाण केल्याची कबुली दिल्याचे गायकवाड म्हणाले.
संशयित आरोपी, गौरव आणि त्याचे मित्र सिंहगड कॉलेजमध्ये ‘बीबीए’चे शिक्षण घेत आहेत. हे सर्व जण रविवारी रात्री कॅम्पसबाहेरील चहाच्या टपरीजवळ गोळा झाले होते. या वेळी त्यांच्यात आपापल्या गावांवरून चर्चा सुरू होती. संशयित तरुण मराठवाड्यातील आहेत. चर्चेदरम्यान त्यांच्यात मूळ गावांवरून वाद झाले. वाद झाल्याने ते आल्यापावली निघून गेले. मात्र, संशयित कॉलेजच्या गेटजवळ दबा धरून बसले होते. गौरव आणि त्याचे मित्र तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांना बांबूने मारहाण केली. त्यात गौरवच्या डोक्यात मार ब्सल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचारादरम्यान गौरवचा सोमवारी रात्री मृत्यू झाला, अशी माहिती सहायक निरीक्षक व्ही. एस. म्हामुणकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वतंत्र अध्यक्ष हे मृगजळच

$
0
0

तुकाराम मुंढे सूत्रे स्वीकारण्यास अनुत्सुक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पीएमपीच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली खरी...मात्र, त्यांनी अद्याप सूत्रे न स्वीकारल्याने पीएमपीला स्वतंत्र आयएएस अधिकारी लाभणे, हे स्वप्नच राहणार की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
पीएमपी कंपनीच्या स्थापनेनंतरही तोट्यापासून अद्याप मुक्ती मिळालेली नाही आणि प्रवासी सेवेतही सुधारणा झालेली नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी पीएमपीला सक्षम आणि पूर्णवेळ अध्यक्षाची नितांत गरज आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत पीएमपीचे गाडे अध्यक्षाच्या नियुक्तीवरूनच अडले असून, आता तरी पीएमपीला पुढे घेऊन जाऊ शकणारा अधिकारी मिळणार का, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
‘पीएमपी’च्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची पीएमपीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारने चार दिवसांपूर्वी काढला. मात्र, मुंढे पदभार केव्हा स्वीकारणार, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच, पीएमपीचे अध्यक्षपद दिल्याने मुंढे नाराज असल्याची चर्चा असून, ते पदभार स्वीकारणार का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.
दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून पीएमपीच्या अध्यक्षपदाबाबत सरकारकडून गांभीर्याने विचार करण्यात आला नसल्याचे दिसून येते. प्रशासनामध्ये एक अधिकारी एका पदावर साधारणपणे तीन वर्षे कार्यकाल पूर्ण करतो. मात्र. गेल्या तीन वर्षात पीएमपीचे सहा अध्यक्ष बदलले आहेत. अभिषेक कृष्णा यांनी जून २०१५ मध्ये पीएमपीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्यापूर्वी आर. एन. जोशी, डॉ. श्रीकर परदेशी, ओमप्रकाश बकोरिया, राजीव जाधव यांच्याकडे काही काळासाठी अतिरिक्त कार्यभार होता. तर, कृष्णा यांच्या अनुपस्थितीत मध्यंतरीच्या काळात पीएमपीचा कारभार पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडेही होता. कृष्णा यांची जुलै २०१६ मध्ये नाशिकच्या जिल्हाधिकारी बदली करण्यात आली. तेव्हापासून पुन्हा कुणाल कुमार पीएमपीचा अतिरिक्त कारभार पाहत आहेत.
यामध्ये डॉ. परदेशी व कृष्णा यांनी पीएमपी सक्षमीकरणासाठी आणि प्रशासनामध्ये पारदर्शकता आणून कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश देखील मिळत होते. मात्र, काही सकारात्मक गोष्टी घडत असतानाच, सरकारने त्या दोन्ही अधिकाऱ्यांना अन्य ठिकाणची जबाबदारी सोपविली. त्यामुळे पीएमपीमध्ये निर्माण झालेले बदलाचे वारे पुन्हा थंडावले. आता मुंढे यांच्या रूपाने पुन्हा चांगला अधिकारी मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी फटाके उडवून आनंदोत्सवही साजरा केला. मात्र, मुंढेंबाबतही अनिश्चितता असल्याने पुन्हा निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

..........

पीएमपीची अवस्था बिकट

यापूर्वी धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची पीएमपीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अखेरपर्यंत पदभार स्वीकारला नाही. आता पीएमपीचे अध्यक्षपद दिल्यानंतरही मुंढे पदाची सूत्रे स्वीकारणार की नाही, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारणा केली. तेव्हा ‘ असे प्रश्न मला विचारणे योग्य नाही,’ असे उत्तर त्यांनी दिले.खुद्द राज्याच्या प्रमुखांनीच हा पवित्रा घेतल्यामुळे पीएमपीचे काय होणार, हा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैशाखवणव्याने पुणेकर हैराण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अगदी सकाळपासूनच जाणवणारा उकाडा... पुढे सरकणाऱ्या घड्याळाच्या काट्याबरोबर बसणारे उन्हाचे चटके....भरदुपारी अंगभर ओघळणाऱ्या घामाच्या धारा... रस्त्यावर बाहेर पडल्यास अंगाची लाही लाही करणारे गरम हवेचे झोत... मार्चअखेरीस पुणेकरांना जणू एप्रिल आणि मे महिन्यातील कडक उन्हाळा सध्या अनुभवायला मिळत आहे. दरम्यान, मंगळवारी पुण्यातील पाऱ्याने ४०.१ अंश सेल्सिअस हा हंगामातील नवा उच्चांक नोंदवला.
पुण्यात आणि एकूणच देशात एप्रिल आणि मे या दोन महिन्यात कडक उन्हाळा असतो. या काळात अधूनमधून पारा ४० अंशांच्या वर पोहोचतो. त्यावेळी पुणेकरांना उकाडा अक्षरशः असह्य होतो. मात्र, याची चाहूल मार्चच्या अखेरीस लागली आहे. गेले एक ते दीड आठवडा शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत होती. मात्र, पारा पस्तीशीत असेपर्यंत हा उकाडा सहन करण्यासारखा होता. आता मात्र, पारा चाळिशीपार गेल्याने यंदाचा उकाडा पुणेकरांसाठी तापदायक ठरण्याचीच चिन्हे आहेत.
यंदा मार्चमध्येच पारा ४० अंशांच्या वर पोहोचल्याने पुणेकरांच्या अंगाची जणू लाही लाही होत आहे. अगदी पहाटेची वेळ सोडली पूर्ण दिवस-रात्र कमालीचा उकाडा जाणवत आहे. सकाळी सकाळी सुरू होणारा घरातला-कार्यालयातील एसी आणि पंखे अगदी २४ तास पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे चित्र आहे. काही क्षणांसाठीही पंखे किंवा एसी बंद झाले तरी बैचैन व्हावे, अशी पुणेकरांची अवस्था झाली आहे.
अनेक पुणेकरांनी अकरा ते चार या वेळेत घर किंवा कार्यालयाबाहेर पडावे लागणार नाही, असेच नियोजन करून घेतले आहे. त्यामुळे सर्वाधिक कडक ऊन असलेल्या या काळात रस्त्यावरील रहदारी मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे दिसत आहे. अगदी गरज असलीच तर बाहेर पडणारे पुणेकर हेल्मेट, टोपी, छत्री, सनकोटसह बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, ऊन्हाने काहिली झालेल्या पुणेकरांची क्षुधाशांती करण्यासाठी रसवंतीगृह, आइस्क्रीम पार्लर, शहाळे, सरबत, नीराविक्रेते सज्ज झाले आहेत. त्यांच्याकडेही मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालू अर्थसंकल्पाला दोन महिने मुदतवाढ द्या

$
0
0

विरोधी पक्षांची महापौर, आयुक्तांकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थानिक स्तरावरील अनेक कामे अर्धवट असल्याने २०१६-१७ च्या अर्थसंकल्पाला दोन महिन्यांची मुदतवाढ यावी, अशी मागणी प्रमुख विरोधी पक्षांनी महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अजून मान्य व्हायचा असल्याने चालू कामांना मुदतवाढ देण्याचा आग्रह धरण्यात येत आहे.
गेल्या वर्षी कुमार यांनी कार्यादेश दिलेल्या (वर्क ऑर्डर) कामांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. यंदा, पालिका निवडणुकीमुळे जानेवारीतच आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे, सुमारे सव्वा ते दीड महिन्यांच्या काळात कोणतीही नवी कामे मार्गी लागू शकली नाहीत. तसेच, अर्धवट अवस्थेत असलेल्या कामांनाही निधी उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे, पालिकेच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पाला दोन महिने मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी महापौरांकडे केली आहे.
महापालिकेतील अनेक जुन्या नगरसेवकांनी त्यांच्या सहयादीतून सुचविलेली काही कामे अखेरच्या टप्प्यावर आहेत. ही कामे पूर्ण झाली नाहीत, तर त्याचा नागरिकांनाच त्रास होण्याची भीती आहे. गेल्या वर्षी भाजपच्या सदस्यांनी अर्थसंकल्पाला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यामुळे, आता त्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन सर्व चालू कामांना आणखी वेळ वाढवून द्यावा, असे निवेदन तुपे यांनी महापौर आणि आयुक्तांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटी कंपनीत लागली आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औंध

बाणेर येथील कपिल क्लासिक्स इमारतीतील आयटी कंपनीला आग लागल्याने सुमारे ५० लाखांचे साहित्य जळून खाक झाले. आगीची झळ इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील ऑफिसनाही बसली.
मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास पाच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग अटोक्यात आणली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाणेर येथील कपिल क्लासिक्स इमारतीमध्ये विविध बँका, आयटी कंपन्यांची कार्यालये आहेत. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दुपारी बाराच्या दरम्यान एका आयटी कंपनीमध्ये आग लागली. आग वाढत गेल्याने धूर आणि आगीचा लोट चौथ्या मजल्यापर्यंत गेला. परिणामी चौथ्या मजल्यावरील व्हॅल्यूनोट्स कंपनीचे ऑफिसही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
दोन्ही कंपन्यांचे पन्नासहून अधिक कम्प्युटर, फर्निचर तसेच महत्त्वाची कागदपत्रे आगीत जळाली. या घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आल्यानंतर औंध, पाषाण परिसरातील जवान जालिंदर मुंजाळ, बंदेराव पाटील, अंकुश पालवे, बाळासाहेब कारंडे आणि बाळराज जंगम यांनी आग आटोक्यात आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्थायी’ अध्यक्षांची आज निवड होणार

$
0
0

मोहोळ यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी आज, बुधवारी निवडणूक होणार असून, भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या निवडीवर अंतिम मोहोर उमटणे बाकी आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड होताच, गुरुवारी पालिका आयुक्त कुणाल कुमार २०१७-१८ चा अर्थसंकल्पीय आराखडा समितीला सादर करतील.
गेल्या आठवड्यात स्थायी समितीवरील सर्वपक्षीय सदस्यांची निवड करण्यात आली. पालिकेत एकहाती सत्ता असल्याने समितीच्या १६ सदस्यांपैकी १० सदस्य भाजपचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, तर शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका सदस्याला समितीमध्ये स्थान मिळाले आहे. स्थायी समितीवरील सदस्यांची निवड होताच, पालिका प्रशासनाने समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केला होता. गेल्या शुक्रवारी अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात आले. त्यावेळी, भाजपतर्फे मुरलीधर मोहोळ यांनी अर्ज भरला, तर राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडून नगरसेविका रेखा टिंगरे यांनी अर्ज भरला.
महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी साडे अकरा वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे १० सदस्य असल्याने मोहोळ यांची निवड निश्चित आहे. मोहोळ यांची निवड झाल्यावर लगेच गुरुवारी पालिका आयुक्त २०१७-१८ या वर्षासाठीचा अर्थसंकल्पीय आराखडा स्थायी समितीला सादर करणार आहेत. हा आराखडा सादर झाल्यानंतर स्थायी समितीला पुढील काही दिवसांत महापालिकेचे पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर करावा लागेल.

शिवसेना काय करणार?
केंद्रात आणि राज्यात सत्तेत असूनही महापालिका निवडणुकीच्या आधीपासूनच भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले गेलेत. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी शिवसेनेने आधी उमेदवार जाहीर केला होता. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी त्यांनी माघार घेऊन तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा एकच सदस्य असल्याने ते भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार की, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीसोबत जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images