Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शहरात वाढले उकाड्याचे प्रमाण

$
0
0

पुण्यात नोंदवले ३८.३ अंश तापमान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरातील उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. राज्यभरही तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. पुण्यात शनिवारी ३८.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. लोहगाव येथे ३९.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवसांत पुण्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शहरात शनिवारी नोंदले गेलेले कमाल तापमान हंगामातील सर्वोच्च तापमान आहे. कमाल तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने पुणेकरांना दिवसभर उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागल्या. आतापर्यंत किमान तापमान कमी राहात होते. त्यामुळे किमान सायंकाळी किंवा रात्री उशिरानंतर पुणेकरांना किंचित दिलासा लाभत होता. मात्र, शनिवारी किमान तापमानही २०.३ अंशांवर पोहोचल्याने दिवसभराचा उकाडा रात्रीही कायम राहिल्याचेच चित्र होते. दरम्यान, लोहगाव येथे ३९.५ अंश सेल्सिअस कमाल तर २२.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.
दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा ते विदर्भापासून कर्नाटकाच्या काही भागापर्यंत हवेचे द्रोणीय क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे हवेतील आर्द्रता वाढून उकाडाही अधिक जाणवत आहे. शनिवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद कोकणातील भीरा येथे (४३ अंश सेल्सिअस) झाली. जळगाव येथे ४०.४, कोल्हापूर येथे ३८.२, महाबळेश्वर येथे ३४.३, मालेगाव येथे ४१.८, सोलापूर येथे ४०.८, रत्नागिरी येथे ३२, भीरा येथे ४३, उस्मानाबाद येथे ३८.९, परभणी येथे ३९.९, अकोला व नागपूर येथे प्रत्येकी ४२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

रात्री रंगतायत गप्पांचे फड
शहरात उकाड्याची तीव्रता चांगलीच जाणवत आहे. वाहनचालक सिग्नलला थांबताना सावलीचा आडोसा शोधत आहेत. भरदुपारी रहदारीही लक्षणीयरित्या कमी झाली आहे. टोप्या, छत्र्यांचा वापर वाढला असून, रसवंतीगृह, आइस्क्रीम पार्लर, स्विमिंग पूलमधील गर्दीत वाढ झाली आहे. रात्री उशिरा गावातील वाड्यांबाहेर तसेच उपनगरांमध्येही गप्पांचे फड रंगत असल्याचेही चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ चाळीस वर्षांचे स्वप्न रूळावर

$
0
0

रेल्वेमंत्र्यांनी दाखवला पुणे-दौंड लोकलला हिरवा झेंडा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर गेल्या चाळीस वर्षांपासून प्रतीक्षेत असणारी डेमू अर्थात डिझेल मल्टिपल युनिट लोकल पुणे-दौंड मार्गावर धावली आणि अनेकांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात आले. मोठ्या उत्साहात, वाजतगाजत या गाडीला पुण्यातून निरोप देण्यात आला. ही गाडी बारामतीपर्यंत धावली.
प्रभू यांनी शनिवारी दुपारी एक वाजून ४५ मिनिटांनी कोल्हापूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘डेमू’ला हिरवा झेंडा दाखविला. पहिल्याच फेरीसाठी डेमू गर्दीने फुलली होती. डेमूच्या लोकार्पणासह पुणे-मिरज-लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, पुणे-दौंड मार्गाचे विद्युतीकरण, पुणे रेल्वे स्टेशनवरील १६० ‘केडब्ल्यूपी सोलर पीवी मॉडेल’चे लोकार्पण, निःशुल्क वाय-फाय सेवा, वेस्ट वॉटर रिसायकलिंग प्रकल्पाचे उद्घाटनही या वेळी करण्यात आले. कोल्हापूर येथे मुख्य कार्यक्रम पार पडत असताना, पुणे स्टेशनवर महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे, अमर साबळे, रेल्वेच्या पुणे विभागाचे मिलिंद देऊस्कर, गुरुराज सोनी, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा, दौंड-पुणे प्रवासी संघाचे विकास देशपांडे, पर्सिस्टंट टेक्नॉलॉजीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आरती दंडवते आदी उपस्थित होते. डेमूचे मोटरमन मनोज तिवारी यांचा सत्कार करण्यात आला.
पुणेकरांना सोयीस्कर आणि सुलभ रेल्वे प्रवासाची संधी मिळावी या साठी पालिकेच्यावतीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. दौंड मार्गावर डेमू सुरू झाल्याने हजारो प्रवाशांची परवड थांबेल, असे शिरोळे म्हणाले.

सुळे यांचा डेमूने प्रवास
पुणे-दौंड-बारामती डेमूचे उद्घाटन झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रवासाचा आनंद घेतला.सुळे यांनी या गाडीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे मोठ्या उत्साहाने त्यांनी महिला कार्यकर्त्यांसह बारामतीपर्यंत प्रवास केला. गाडीमध्ये बायो-टॉयलेट, डिजिटल बोर्ड या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रवासी संघटनांच्या मागण्या
पुणे-दौंड-पुणे मार्गावर दर तासाने डेमू सोडण्यात यावी. या मार्गावरील अनेक लहान स्थानकांचा विकास करून तेथेही डेमू थांबविण्यात यावी. तसेच, पुणे-लोणावळा लोकलला दौंड-पुणे डेमू जोडा​वी, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली. नोकरदार आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही ‘डेमू’ दौंड-पुणे चालविली जावी आणि पहिली गाडी पहाटे पाच वाजता दौंड स्टेशनवरून सोडावी, अशी मागणी मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य विकास देशपांडे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेमूच्या लोकार्पणात राजकीय हमरीतुमरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-दौंड डेमू सेवा शुभारंभाच्या कार्यक्रमावर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे पाणी फेरले गेले. व्यासपीठावर भाजपचे कार्यकर्ते पक्षाचे उपरणे घालून बसले होते. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘डेमू’वर पक्षाची स्टिकररूपी मोहोर उमटवली. या परस्परपूरक कृतीमुळे ‘डेमू’च्या उदघाटनापूर्वीच उपस्थित प्रवाशांना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची भांडणे पाहण्याचा ‘योग’ आला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या परस्परविरोधी घोषणांनी कार्यक्रमाच्या माहौलात आणखीच ‘रंगत’ आली.
पुणे-दौंड ‘डेमू’चे उदघाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते कोल्हापूरहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. पुणे स्टेशनवरही त्याचवेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्टेशनवर खासदार सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, अमर साबळे आणि महापौर मुक्ता टिळक यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी फौज होती.
व्यासपीठावर भाजपचे काही कार्यकर्ते पक्षाचे उपरणे घालून बसले होते. ते पाहून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘हा राजकीय कार्यक्रम नाही, तुम्ही पक्षाची पट्टी घालू नका,’ असे सांगितले. त्यावर ‘तुम्ही डेमूवर तुमच्या नेत्यांचे पोस्टर का लावले,’ असा सवाल भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचारला. त्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली.

सुळेंनी काढले पक्षाचे स्टीकर
या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी दारू पिऊन गोंधळ घातल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे प्रकरण अजूनच चिघळले. त्यानंतर व्यासपीठावरच एकमेकांवर हात उचलण्याचा प्रकार घडला. त्यानंतर मद्यप्राशन केलेल्याला रेल्वे पोलिसांनी बाजूला केले. सुळे, शिरोळे यांनी मध्यस्ती करून कार्यकर्त्यांना शांत केले. त्यानंतर श्रीमती सुळे यांनी डेमूवर लावलेले आपल्या पक्षाचे स्टीकर काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘ससून’ची सेवा सुरळीत

$
0
0

पाच दिवसांच्या संपानंतर निवासी डॉक्टर हजर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर शनिवारी मध्यरात्री अनेक डॉक्टर हजर झाले. त्यामुळे ससून हॉस्पिटलची वैद्यकीय सेवा सकाळपर्यंत पूर्वपदावर आली. शनिवारी दिवसभरात बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) फारशी गर्दी नव्हती. मात्र, डॉक्टर हजर झाल्याने आंतररुग्ण विभागातील पेशंटना दिलासा मिळाला.
निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ससूनसह राज्यातील सरकारी मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी संप पुकारला होता. मुंबई हायकोर्टासह राज्य सरकारने संप मागे घेण्याचे आवाहन केले. परंतु, या दोन्ही यंत्रणेला निवासी डॉक्टरांनी दाद दिली नाही. अखेर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी संप मागे घेत असल्याचे शुक्रवारी रात्री जाहीर केले.
गेल्या पाच दिवसांपासून ससूनमध्ये निवासी डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्याचा फटका ओपीडीला येणाऱ्या पेशंटना बसला. शनिवारी सकाळपासूनच वैद्यकीय सेवा सुरळीत झाली. परंतु, शनिवारी सुट्टीचा दिवस असल्याने पेशंटची फारशी गर्दी दिसली नाही. दररोज दोन हजारांहून अधिक पेशंट ओपीडीत उपचारासाठी येतात. परंतु, संपामुळे ही संख्या निम्म्यावर आली. शनिवारी नेहमीपेक्षा पेशंटची संख्या कमीच होती. आंतररुग्ण विभागातही उपचार घेणाऱ्या पेशंटची संख्या घटल्याचे दिसून आले.
सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या रोगनिदान सुविधांसाठी निवासी डॉक्टरांच्या उपस्थितीमुळे गर्भवतींसह मेंदूसह डोक्याच्या आजाराच्या पेशंटना दिलासा मिळाला. तातडीच्या वैद्यकीय सेवा संपकाळातही सुरू होत्या. मात्र, शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने पेशंटची गर्दी कमी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. आरोग्य विभागाकडून आलेल्या २२ डॉक्टरांना पुन्हा खात्याच्या सेवेत पाठविण्यात आले. संप मिटल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पेशंटची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
‘शुक्रवारी रात्री बारा वाजता निवासी डॉक्टर सेवेवर परतले. ज्या निवासी डॉक्टरांची कॅज्युलिटी, आयसीयू आदी विभागांमध्ये रात्रपाळी होती; ते रात्रीच सेवेत हजर झाले. उर्वरित डॉक्टरांवर विविध विभागांच्या ओपीडीची जबाबदारी सोपविण्यात आली; ते शनिवारी सकाळी रूजू झाले,’ असे निवासी डॉक्टरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान यंत्राविरोधात सर्वपक्षीयांचा ‘एल्गार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्षाने मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) फेरफार करून महापालिकेच्या निवडणुका जिंकल्याचा आरोप करून इव्हीएम विरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढा उभारण्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केले. मतदान यंत्रातील घोळ हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याचा आरोपही करण्यात आला.
पालिका निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदान यंत्रांमध्ये गोंधळ असल्याचा आरोप करून निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय प्र‌तिनिधींनी शनिवारी शनिवारवाडा ते विधानभवनादरम्यान मोर्चा काढला. भाजप वगळता इतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. ‘माझे मत कोणी चोरले’, ‘ईव्हीएम हटवा; लोकशाही वाचवा’, ‘जितेंगे’, ‘लढेंगे’ अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी हाती घेतले होते.
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे तहसीन पूनावाला, माजी महापौर चंचला कोद्रे, रमेश बागवे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, अभय छाजेड, दत्ता बहिरट, विकास दांगट, रुपाली पाटील आणि रुपाली चाकणकर यांचा मोर्चात प्रमुख सहभाग होता. पालिका निवडणुकीतील निकालाच्या आकडेवारीवरून यंत्रामध्ये गोंधळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक जिंकण्यासाठीच भाजपने चुकीचे उद्योग केले असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. मतदान यंत्रांबाबतचा लढा केवळ आंदोलनापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृती करायला भाग पाडण्याइतपत मोठा झाला पाहिजे. त्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकाराम मुंडे भेटणार नऊ महिन्यांनी...

$
0
0

पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद नऊ महिन्यांनी का होईना भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या अण्णासाहेब मिसाळ यांनी पदभार स्वीकारलाच नाही. या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरच त्यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब होईल.

नऊ महिन्यांपूर्वी सरकारने पीएमपीचे अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांची नाशिकच्या महापालिका आयुक्तपदी बदली केली. तेव्हापासून पीएमपीच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार पुणे पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे देण्यात आला आहे. कृष्णा यांच्या बदलीनंतर ऑगस्टमध्ये धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची पीएमपीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. मात्र, त्यांनी पदभार स्वीकारलाच नाही. कुमार यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी असल्याने पीएमपीकडे पाहण्यात त्यांना वेळ मिळाला नाही. पालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारीत लागू झाल्याने त्यानंतर पीएमपीला पूर्णवेळ अध्यक्षपद मिळेल, असे स्पष्ट झाले. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने पीएमपीला पूर्णवेळ कार्यक्षम अधिकारी द्यावा, अशी आग्रही मागणीही करण्यात आली.

नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी घेण्यापूर्वी तुकाराम मुंढे सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. कार्यक्षम आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडणारा अधिकारी अशी मुंढे यांची ओळख आहे. पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणून जाण्यापूर्वी डॉ. श्रीकर परदेशी यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष म्हणून चांगल्या कामाचा वस्तुपाठ घालून दिला होता. त्यामुळे पीएमपीची प्रथमच नफ्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली होती. त्यांच्यानंतर अध्यक्षपदी रूजू झालेल्या कृष्णा यांनीही पीएमपीमध्ये चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि नवी मुंबई पालिकेचे आयुक्त म्हणून मुंढे यांनी चांगले काम केले आहे. स्वच्छ अधिकारी अशी ओळख असलेले मुंढे पीएमपीचा कारभार सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

शिरोळेंची शिफारस मान्य

राज्य सरकारने शुक्रवारी तुकाराम मुंढे यांची शुक्रवारी बदली केली. त्यानंतर खासदार अनिल शिरोळे यांनी मुंढे यांची पीएमपीच्या अध्यक्षपदी नियुक्ती व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकला. पीएमपीचा कारभार स्वच्छ तसेच गतिमान होण्यासाठी चांगल्या अधिकाऱ्याची आवश्यक असल्याचे शिरोळे यांनी म्हटले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘अॅप्रेंटिस’चाही पेपर फुटला?

$
0
0

शनिवारीच व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याची शक्यता

पुणे : लष्कर भरतीचा पेपर फुटल्याची घटना ताजी असतानाच तशाच प्रकारची आणखी एक घटना पुण्यात घडली आहे. इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ‘ट्रेड अॅप्रेंटिस’ भरती परीक्षेचा पेपर परीक्षेच्या एक दिवस आधीच शनिवारी फुटून व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे आज, रविवारी देशभरात होणारी परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
या पेपरफुटीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्किल इंडिया मिशन’ला धक्का बसला आहे. पेपरफुटीमागे देश पातळीवरील टोळी कार्यरत असण्याची दाट शक्यता आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डच्या ऑर्डनन्स फॅक्टरी रिक्रूमेंट सेंटरमार्फत देशातील विविध ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आयटीआयचा डिप्लोमा केलेल्या तसेच दहावी उत्तीर्णांना रोजगारासोबत उत्तम प्रशिक्षणासाठी संधी मिळावी म्हणून ‘ट्रेड अॅप्रेंटिस’भरतीसाठी परीक्षा घेण्यात येते. यंदा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ५५ व्या ‘ट्रेड अॅप्रेंटिस’ बॅचसाठी ही परीक्षा पुण्यासह भुवनेश्वर, चेन्नई, कोइमतूर, दिल्ली, हैदराबाद, जबलपूर, कोलकाता, कानपूर, मुंबई, नागपूर आणि त्रिची आदी केंद्रांवर घेण्यात येणार आहे. दोन्ही गटातील परीक्षा १५० प्रश्नांची असून, सकाळी १० आणि दुपारी २ वाजता या सत्रात ती होणार आहे.
ट्रेड अॅप्रेंटिस भरती परीक्षा आयटीआय डिप्लोमा आणि दहावी उत्तीर्ण (नॉन आयटीआय) अशा दोन गटात गटात घेण्यात येते. यंदा एकूण ७,०३८ पदे ट्रेड अॅप्रेंटिससाठी राखीव आहेत. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी भरती असून, स्किल इंडिया मिशनला पाठबळ देण्यासाठी तिचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच या भरतीच्या नॉन आयटीआय गटाचा पेपर फुटल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या जाहिरातीत ३, ७३६ पदे ही आयटीआय डिप्लोमासाठी तर, ३३०२ पदे नॉन आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांसाठी असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या परीक्षेद्वारे भरती होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना देशातील विविध ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये त्यांच्या ‘ट्रेड’नुसार तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच, सरकारी नियमानुसार वेतनही दिले जाते. त्यामुळे ट्रेड अॅप्रेंटिसला महत्त्वाचे स्थान आहे.
नॉन आयटीआय गटातील पेपर शनिवारीच व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याची दाट शक्यता आहे. परीक्षेच्या आदल्यादिवशीच पेपर फुटल्याने सर्व प्रश्नांची उत्तरे माहिती करून घेऊन आज, रविवारी केवळ बरोबर उत्तरावर खुणा करण्याचे कामच शिल्लक राहणार आहे.

आयटीआय गटाचाही पेपर फुटला?
‘नॉन आयटीआय’ गटातील पेपर फुटून व्हॉट्सअॅपवर व्हायरल होऊ शकतो तर, ‘आयटीआय’ गटातील पेपरदेखील फुटल्याची शक्यता आहे. कारण आयटीआय गटात ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ‘ट्रेड अ्रॅप्रेंटिस’ भरतीसाठी प्रशिक्षणार्थींमध्ये मोठी चुरस असते. त्या तुलनेत ‘नॉन आयटीआय’ गटात चुरस कमी असते, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हळदी-कुंकू’ करा; शाळाप्रवेश वाढवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘गुढी पाडवा, शाळेत प्रवेश वाढवा’ या टॅगलाइनवर ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी आणि पालक-शिक्षक यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी शाळेत ‘हळदी-कुंकू’सारखे कार्यक्रम घेण्याच्या अफलातून सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी व शिक्षकांना दिल्या आहेत. त्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणात शाळांची वाटचाल वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित कार्यक्रमांऐवजी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम घेण्याकडे जात आहे का, असाच प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी २०१७-१८ या येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळा प्रवेशोत्सव उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे प्रवेश करणे, त्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत प्रोत्साहीत करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, असे कार्यक्रम राबवायचे आहेत. तसेच, राज्य सरकारच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणातील घटकांची अंमलबजावणी पूर्ण करण्यासाठी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे.

गुढीपाडवा २८ मार्चला आहे. त्यामुळे हा उपक्रम गटशिक्षणाधिकारी व शिक्षकांनी २७ ते ३१ मार्च दरम्यान राबवायचा आहे. ‘गुढी पाडवा, शाळेत प्रवेश वाढवा’ अशी भन्नाट ‘टॅग लाइन’च या उपक्रमाला दिली आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षकांनी शाळेत हळदी-कुंकूसारखे विविध कार्यक्रम घेण्यात यावेत, शाळेचे वातावरण प्रफुल्लित व स्वच्छ ठेवावे, शाळांचे सुशोभीकरण करावे अशा सूचना पत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात हळदी-कुंकवासारखे कार्यक्रम घेतले जात आहेत. दरम्यान, विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी असे कार्यक्रम शिक्षकांनी का घ्यावेत, अशा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

शिक्षकांची डोकेदुखी वाढणार

शाळांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी शिक्षकांनी बचत गट, युवक व क्रीडा मंडळे, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक व माजी विद्यार्थी संघाला सोबत घेऊन विद्यार्थ्यांच्या घरी भेटी द्यायच्या आहेत. शिक्षकांना या भेटी २७ ते ३१ मार्च दरम्यान द्यायच्या आहेत. या भेटीत पालकांना शिक्षणाची माहिती देण्याऐवजी मोफत गण‍वेश, पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार आदी सरकारी योजनांची पालकांना माहिती देऊन पाल्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी आकर्षित करायचे आहे. त्यामुळे शिक्षकांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे.

जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. शाळांमध्ये महिला पालक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे शिक्षिका आणि महिला पालकांमध्ये चांगले संबंध निर्माण होण्यासाठी तसेच स्वागत म्हणून ‘हळदी-कुंकू’सारखे कार्यक्रम घेण्याच्या सूचना दिल्या आहेत- मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद (प्राथमिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फ्लॅट फोडून सोळा लाखांचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
औंध, पाषाण येथे बंद फ्लॅट फोडून १५ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटना घडल्या. यामध्ये इंदिरा ग्रुपचे संचालकीय मंडळातील चेतन वाकलकर यांच्या औंध येथील फ्लॅटमधून चोरट्यांनी पावणे तेरा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला; तर पाषण येथे ‘सीए’च्या फ्लॅटमधून तीन लाख रुपये चोरले आहेत. याप्रकरणी चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन वाकलकर (वय ४६, रा. कॉनीफ्रर अपार्टमेन्ट, गायकवाडनगर, औंध) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे इमारतीमधील सीसीटीव्हीत कैद झाले असले, तरी त्यांचा चेहरा दिसत नाही.

वाकलकर कुटुंबीयांसह शुक्रवारी सायंकाळी भूगाव येथील त्यांच्या फार्म हाउसवर गेले होते. वाकलर राहत असलेल्या इमारतीत दोन सुरक्षारक्षक आहेत. रात्री सुरक्षारक्षक झोपल्यानंतर चोरटे इमारतीत गेले. चौथ्या मजल्यावरील फ्लॅटचा दरवाजा उचकटून आत शिरले. कपाटातील सोन्याचे दागिने व इतर ऐवज असा १२ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक दयानंद ढोमे यांनी सांगितले.

दुसऱ्या घटनेत प्रीतेश आचलिया (वय २९, रा. कपिला आसमंत सोसायटी, शिवशक्ती चौक, पाषाण) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून जगत ठाकूर (रा. सुस रस्ता, पाषाण, मूळ रा. नेपाळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. आचलिया हे सीए आहेत. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या जुन्या नोकराच्या शिफारशीने जगत ठाकूरला घरकाम करण्यासाठी नेमले होते. शुक्रवारी रात्री पावणे आठ ते सव्वा आठ या कालावधीत आचलिया कुटुंबीय बाहेर गेले होते. त्या वेळी जगतने साथीदारांच्या मदतीने स्वयंपाक घराचे ग्रील तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील सोन्या, चांदिचे दागिने, रोकड, परदेशी चलन, पार्किंगमधील स्कूटर असा तीन लाख १० हजारांचा ऐवज लंपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकरी ते ग्राहक’ विक्रीसाठी मदत करू

$
0
0

महापौर मुक्ता टिळक यांचे आश्वासन

पुणे : ‘शेतकऱ्यांच्या शेतलमाचाली थेट ग्राहकांना विक्री करण्याच्या पणन मंडळाच्या उपक्रमासाठी महापालिकेच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल,’ असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.

कृषी पणन मंडळ, आपुलकी सामाजिक संस्था आणि ट्रान्सकूल अॅग्रो मॉल यांच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिरात संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, सरव्यवस्थापक मिलिंद आकरे, संस्थेचे अभिजित फाळके, ट्रान्सकूलचे पवन गुरव, तसेच अमरावती व नागपूर जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.

घाऊक बाजारपेठेतील भाव आणि किरकोळ विक्रीच्या भावात मोठी तफावत असते. ग्राहकांना किरकोळ खरेदी करताना जादा रक्कम द्यावी लागते. प्रत्यक्षात ती रक्कम शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असते. परंतु, तसे होत नाही. त्यामुळे मध्यस्थांची संख्या कमी करण्यासाठी ग्राहकांना स्वच्छ आणि दर्जेदार योग्य वजन करून शेतमाल मिळावा यासाठी ग्राहक ते शेतकरी हा उपक्रम राबविण्यात येतो. हा महोत्सव ३० मार्चपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे.

सध्या घाऊक बाजारात संत्र्यांना प्रतिक्विंटल ७०० ते १३०० रुपये दर आहे. तर एका किलोसाठी ७ ते १३ रुपये दर मिळाला आहे. शेतकऱ्यांना हे दर परवडणारे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना विक्रीसारख्या उपक्रमात सहभागी होऊन आर्थिकदृष्ट्या फायदा मिळविण्याचा प्रयत्न करावा. ग्राहकांनी ही या उपक्रमात शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. पुणे महापालिकेच्यावतीने अशा उपक्रमांना सहकार्य दिले जाईल, असे महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-सातारा मार्गावर रास्ता रोको

$
0
0

भोर : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, आमदार संग्राम थोपटे आणि इतर आमदारांचे निलंबन रद्द करावे या मागणीसाठी काँग्रेसतर्फे पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर (चेलाडी) येथे रविवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भोर, वेल्ह, मुळशी तालुका काँग्रेस, तसेच किसान सेलचे नेते आणि कार्यकर्ते सकाळी दहा वाजता नसरापूर (चेलाडी) येथे बैलगाडीतून आले. तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, नाना राऊत, कृष्णा शिनगारे, गटनेते विठ्ठल आवाळे, दिलीप बाठे, सोपान म्हस्के, रोहन बाठे, गीतांजली शेटे, तृप्ती किरवे, आशा रेणुसे, पोपट नलावडे, विठ्ठल वरखडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे’, ‘शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे’, ‘आमदारांचे निलंबन मागे घेतलेच पाहिजे’, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भरते, तहसीलदार वर्षी शिंगण-पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सरकारकडे मागण्यांचे निवेदन पाठवू, असे तहसीलदारांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रश्न ‘सेम टु सेम’

$
0
0

‘ट्रेड अॅप्रेंटिस’ भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ‘ट्रेड अॅप्रेंटिस’ भरती परीक्षेचा ‘नॉन आयटीआय’ गटातील शनिवारी व्हॉट्स अपवर व्हायरल झालेल्या पेपरमधील काही प्रश्न रविवारी झालेल्या पेपरमध्ये ‘सेम टू सेम’ होते, असे परीक्षार्थ्यांनी सांगितले. परीक्षा ही दोन सत्रात तसेच प्रश्नपत्रिका ही तीन सेटमध्ये असल्याने प्रत्येक प्रश्नपत्रिकेत व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न होते. त्यामुळे ‘ट्रेड अॅप्रेंटिस’ भरती परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा रविवारी शहरातील परीक्षा केद्रांवर होती. दरम्यान, या प्रकारावर ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाचे ऑर्डनन्स फॅक्टरी रिक्रूटमेंट सेंटर काय कारवाई करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ऑर्डनन्स फॅक्टरी रिक्रुटमेंट सेंटरमार्फत देशातील विविध ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आयटीआयचा डिप्लोमा केलेल्या तसेच दहावी उत्तीर्ण उमेदवारांना रोजगारासोबत उत्तम प्रशिक्षणासाठी संधी मिळावी म्हणून ‘ट्रेड अॅप्रेंटिस’भरतीसाठी परीक्षा घेण्यात येते. यंदा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ५५व्या ‘ट्रेड अॅप्रेंटिस’ बॅचसाठीची परीक्षा पुण्यासह भुवनेश्वर, चेन्नई, कोइमतूर, दिल्ली, हैदराबाद, जबलपूर, कोलकाता, कानपूर, मुंबई, नागपूर आणि त्रिची आदी केंद्रांवर घेण्यात आली. दोन्ही गटांतील परीक्षा सकाळी १० ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते सायंकाळी पाच अशा दोन सत्रात पार पडली. मात्र, नॉन आयटीआय गटाचा पेपर परीक्षेच्या एक दिवस आधी फुटून व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला. या व्हायरल झालेल्या पेपरमधील काही प्रश्न रविवारी झालेल्या पेपरमध्ये जसेच्या तसे होते, असे परीक्षार्थी उमेदवारांनी सांगितले. तसेच, परीक्षा दोन्ही सत्रात एकूण सहा सेटमध्ये असल्याने प्रत्येक सेटमध्ये हे प्रश्न मागेपुढे अशा पद्धतीने आले आहेत, अशी माहितीही परीक्षार्थी उमेदवारांनी दिली.
यंदा दोन्ही गटांतील एकूण ७,०३८ पदे ट्रेड अॅप्रेंटिससाठी राखीव आहेत. त्यामुळे या परीक्षेसाठी राज्यातील विविध शहरांमधून शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी आले होते. हीच परिस्थिती देशातील इतर केंद्रांवर होती. मात्र, पेपर फुटल्याने या परीक्षार्थी उमेदवारांच्या आशेवर पाणी फिरले असल्याचे चित्र परीक्षा केंद्रांवर पाहायला मिळाले. ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रशिक्षणासोबत रोजगाराची संधी मिळत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून या परीक्षेचा अभ्यास मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी करत होते. मात्र, परीक्षेपूर्वी पेपरच फुटून व्हायरल झाल्याने आमचे कष्ट वाया गेले आणि नोकरीची संधीही गेली अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
......
उमेदवार करणार तक्रार
ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ‘ट्रेड अॅप्रेंटिस’ भरती परीक्षा होण्यापूर्वीच पेपर फुटून व्हॉट्स अपवर व्हायरल होणारा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे या प्रकारावर अभय पवार, प्रवीण गायकवाड, सुमीत पवार, रोहित पवार, स्वप्नील जगताप, रोहित विस्पुते, संदिप कुमावत आदी परीक्षार्थी उमेदवारांनी ऑर्डनन्स फॅक्टरी रिक्रूमेंट सेंटरकडे तक्रार करू, अशी माहिती दिली. तसेच, याबाबत इतर विद्यार्थी संघटना व परीक्षार्थी उमेदवारांना माहिती देऊ, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंडाच्या वसुलीत ८७ लाखांची घट

$
0
0

Tweet: @ShrikrishnakMT
पुणे : नोटाबंदीचा परिणाम पुणे वाहतूक पोलिसांकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडावर देखील झाला आहे. नागरिकांकडे दंड भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे काही काळ वाहतूक पोलिसांनी कारवाई कमी केली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत मागील तीन महिन्यात पुणे वाहतूक पोलिसांकडून वसूल करण्यात येणारा दंड ८७ लाखांनी कमी झाला आहे.
देशात आठ नोव्हेंबर रोजी हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे दंड म्हणून पोलिसांनी हजार आणि पाचशे रुपयांचा नोटा स्वीकारल्या नाहीत. नवीन नोटा काढण्यावर निर्बंध असल्यामुळे नागरिकांकडे दंड भरण्यासाठी पैसे नव्हते. दंड भरण्यावरून वादावादी झाली. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी काही महिने दंडात्मक कारवाई कमी केली होती. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात पुणे पोलिसांकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडाची रक्कमही कमी झाली आहे.
गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान वाहतूक पोलिसांनी पाच कोटी १७ लाख ९१ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल केला होता. मात्र, या वर्षी २५ मार्चपर्यंत चार कोटी ३० लाख ४६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जवळजवळ ८७ लाख ७४ हजार रुपयांनी दंड वसुलीत घट झाली आहे. नोटांबंदीमुळे नागरिकांकडे दंड भरण्यासाठी पैसे नसायचे आणि परिणामी रस्त्यांवर वाहतूक पोलिस आणि नागरिक यांच्यात वारंवार वादावादीचे प्रसंग येत होते. त्यामुळे नोटाबंदीच्या सुरुवातीच्या काळात आणि नंतरही काही दिवस बेशिस्त चालकांवर कारवाई मंदावली होती. त्यामुळे दंडवसुलीत चांगलीच घट झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, चलनाबाबतचे व्यवहार नियमित झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी पुन्हा जोरदार कारवाईला सुरुवात केल्याचे शहरात दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अघोषित संपत्ती उघड होईल?

$
0
0

Tweet : @prasadpanseMT
पुणे : नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी लागू असलेल्या इन्कम टॅक्स डिक्लरेशन स्कीममधून प्राप्तिकर विभागाच्या पुणे विभागाला पाच हजार कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता समोर आणण्यात यश आले होते. आता नोटाबंदीनंतर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत २५० कोटी रुपयांची मालमत्ता समोर आली आहे. या योजनेचाही आता अंतिम आठवडा सुरू असल्याने या आठ दिवसात मोठ्या प्रमाणावर अघोषित मालमत्ता समोर येण्याची शक्यता आहे.
नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयापूर्वी सरकारने करबुडव्यांसाठी शेवटची संधी दिली होती. त्यासाठी इन्कम टॅक्स डिक्लरेशन स्कीम हा पर्याय खुला होता. या पर्यायानुसार अघोषित संपत्ती जाहीर केल्यास त्याची चौकशी होणार नाही. व त्यावर विशिष्ट रक्कम दंड व कर म्हणून भरून सुटका करून घेण्याची संधी होती. ही योजना चार महिन्यांसाठी लागू होती. मात्र, पहिल्या तीन महिन्यात या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यानंतर मात्र, सरकारने विविध माध्यमातून दबाव आणत ही योजना राबविण्यास सुरुवात केली. प्राप्तिकर विभागातर्फेही काही छापे टाकण्यात आल्या. त्यानंतर मात्र, पुणे विभागातून या योजनेअंतर्गत तब्बल पाच हजार कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता समोर आली.
देशभरातून मात्र, या योजनेला मिळालेला प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता. सरकारलाही महसुली उत्पन्नातील तूट दूर करणे आवश्यक बनले होते. त्यातूनच सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर करत हुकमी पत्ता खेळला. नोटाबंदीनंतर तातडीने सर्व यंत्रणा सतर्क केल्या होत्या. प्राप्तिकर विभागालाही २४ तास सतर्क ठेवण्यात आले होते. याच काळात अनेक खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहार आढळून आले. काही लॉकरमध्ये प्रचंड मोठी रक्कम आढळून आली. तसेच ठिकठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये बाद म्हणजेच अवैध नोटांचा तसेच काही ठिकाणी वैध चलनातलीही रक्कम जप्त करण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, नोटाबंदीनंतरच्या काळात पुणे विभागातील (नागपूर व मुंबई विभाग वगळता महाराष्ट्र राज्यात) तब्बल २२ हजार व्यक्तींनी संशयास्पद व्यवहार केले आहेत. त्यांची यादीच दिल्लीहून पुण्याला पाठविण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
दुसरीकडे नोटाबंदीनंतर सरकारने करबुडव्या व्यक्तींना आणखी एका योजनेद्वारे अघोषित उत्पन्न जाहीर करण्याची संधी दिली. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत ही संधी देण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागही काही ठिकाणी तपासणीसाठी सर्व्हे करत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २५० कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न उघड करण्यात प्राप्तिकर विभागाला यश आले आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वास नांगरे पाटील यांचे व्याख्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे व्याख्यान होत आहे. ‘टाइम्स फाउंडेशन’ आयोजित हा कार्यक्रम ३० मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज ऑडिटोरियम, झील एज्युकेशन सोसायटी, नऱ्हे कॅम्पस येथे सकाळी १० वाजता होणार आहे. झील एज्युकेशन सोसायटीच्या साह्याने हा कार्यक्रम होणार असून, टीकम शेखावत नांगरे-पाटील यांच्याशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी विनामूल्य खुला असला, तरी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी संपर्क : प्रा. अनिल काटे : ९९२३२५२४४७.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थकबाकीचा महसुलावर परिणाम

$
0
0

Tweet : @AthavaleRohitMT
पिंपरी : स्थानिक संस्थाकर (एलबीटी) मिळकतकर, बांधकाम परवाना तसेच आकाशचिन्ह या प्रमुख तीन आर्थिक स्रोतातून मिळणाऱ्या उत्पन्नावर शहराचा गाडा महापालिका हाकत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात अपेक्षित उत्पन्न मिळाले असून, थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे देखील यंदा शक्य झालेले नाही. जीएसटी लागू झाल्यास एलबीटी बंद होणार असून, मिळकतकर आणि पाणीपट्टी या दोन घटकांवरच सर्व कारभार चालवावा लागणार आहे. सध्या मंदीचे सावट येत्या काळात दूर होणार असल्याचे विकास प्रकल्पांच्या कामावरून दिसते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उत्पन्न प्रामुख्याने एलबीटी व्दारे मिळत आहे. यंदा एलबीटीची एक हजार ३५० कोटी रुपये बजेटची रक्कम असून, एक हजार ३०० कोटी रुपये आत्तापर्यंत महापालिकेला मिळाले आहेत. तर यापैकी अनुदानाद्वारे मिळाऱ्या ७५० कोटी रुपयांमधून शिल्लक असलेले ५० कोटी रुपये देखील येत्या काही दिवसात मिळतील. त्यामुळे एलबीटीचे उद्दिष्ट सहज साध्य होईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
या व्यतिरिक्त केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदान यंदा अमृत योजनेची भर पडली आहे. पाणी पुरवठा योजनेसाठी २५ कोटी रुपयांचा निधी या योजनेद्वारे महापालिकेला प्राप्त झाला आहे. मिळकतकर आणि पाणीपट्टीची थकबाकी हा प्रशासनासमोरचा प्रश्न यंदा देखील आ वासूनच उभा राहिला. अभय योजनेद्वारे बऱ्यापैकी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. नोटाबंदीच्या काळात मिळकतकर भरण्यासाठी बंद होणाऱ्या नोटा स्वीकारण्याचे धोरण सरकारने जाहीर केल्याने उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यास त्याचा फायदा झाला होता.
मिळकतकरातून यंदा ३७१.९२ कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले असून, मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा ३९ टक्क्यांनी कमी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा वाढावा अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. निवडणुकीच्या काळात दोन ते अडीच महिने प्रशासनाला निवडणुकांची कामे असल्याने कर जमा करून घेण्यात अडथळे आल्याचेही बोलले जाते. पाणीपट्टीची थकबाकी ही वाढतच गेली असल्याने हा तोटा सहन करावा लागत आहे. मिळकतकर न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे जाहीर झाले. त्यानंतर थकबाकीदारांना नोटीसा बजाविण्यात आल्याने काही महसूल जमा झाला आहे.
..............
शास्तीकर माफीबाबत गैरसमज
शास्तीकर सरसकट माफ झाल्याचा समज झाल्याने अनेकांनी ही रक्कम वजा करून यंदा बहुतांश जणांनी कर जमा केला आहे. शास्तीकराबाबत निर्णय घेताना ६०० चौरस फुटाला माफ झाला. तर त्या पुढील चौरस फुटांच्या घरांसाठी वेगळे धोरण निश्चित केले. मात्र, नागरिकांनी शास्तीकर सरसकट माफ झाल्याचा समज करून घेतल्याने त्याचा परिणाम महसूलावर झाल्याचे दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवजात मुलीचा मृतदेह माता-पित्याकडून शवागारात

$
0
0

पिंपरी : ‘तिसऱ्यांदा मुलगीच झाली आणि तिचा प्रसूतीदरम्यान मृत्यूही झाला. तिचा मृतेदह घरी नेऊन तरी काय करायचे,’ असा निर्दयी सवाल करून नवजात अर्भकाचे माता-पिता मृतदेह वायसीएम हॉस्पिटलच्या शवागरात सोडून निघून गेले आहेत. तिच्यावर अंत्यविधी कुणी आणि कसे करायचे, या विवंचनेत सध्या हॉस्पिटल प्रशासन आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील महिला सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये काम करते. संबंधित महिलेला तिच्या पतीने आठ मार्चला महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या दाम्पत्याला तिसऱ्यांना मुलगी झाली. परंतु, तिला श्वास घेण्यास अडचण येत असल्याने लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुलगी झाल्याने तिचा पिता नाराज होता. तो हॉस्पिटलमध्ये फिरकत नव्हता. चिमुरडीच्या आईवर अन्य वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, १४ दिवसानंतर २२ मार्चला नवजात चिमुरडीचा मृत्यू झाला. तेव्हा तिची आई आणि अन्य एक वृद्ध महिला चिमुरडीचा मृतदेह घेऊन गेले. परंतु, रात्र अधिक झाल्याचे सांगून अर्भकाचा मृतदेह वायसीएम हॉस्पिटलच्या शवागारात ठेवला. या वेळी खोटा पत्ता तेथे देण्यात आला. दुसऱ्या दिवशी प्रशासनाने संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधला. परंतु, नवजान चिमुरडीचा मृतदेह घेऊन जाण्यास तिच्या कुटुंबीयांनी नकार दर्शविला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून काय कारवाई करता येते, हे तपासले जात आहे.

बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्त्रीभ्रूण हत्या, गर्भलिंग निदान अशा प्रकारांबाबत अनेक धक्कादायक बाबी राज्यात उघड होत असताना या हृदयद्रावक घटनेमुळे वायसीएम प्रशासन देखील हादरून गेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’चे ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण

$
0
0

Tweet : @kuldeepjadhavMT
पुणे : वाहन नोंदणी, विविध प्रकारचे कर आणि वाहना चॉइस क्रमांक याद्वारे परिवहन विभागाला मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त होत असतो. यंदा नोटबंदीच्या निर्णयानंतर दुचाकी वाहने व जुन्या कारचे खरेदी-विक्रीचे व्यवहार काही प्रमाणात ठप्प झाले होते. मात्र, त्यानंतरही पुणे प्रादेशिक परिवहन विभागाचे आर्थिक वर्ष २०१६-१७ साठीचे महसूल प्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यंदा पुणे विभागाला एक हजार ४५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ९५ टक्के महसूल गोळा झाला असून, येत्या पाच दिवसांमध्ये उर्वरित उद्दिष्टही पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.
परिवहन विभागाच्या पुणे प्रादेशिक विभागात पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, अकलूज व सोलापूर येथील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा समावेश होतो. वाहनांची नोंदणी, चालक परवाना, दंड, आकर्षक वाहन क्रमांक, विविध कर अशा विविध मार्गांनी आरटीओ महसूल मिळत असतो. दर वर्षी कार्यालयाला मिळणाऱ्या महसुलात सातत्याने वाढ होत आली आहे. २०१३-१४ या वर्षात पुणे विभागातील सर्व कार्यालयांकडे एकूण ९६१ कोटी २२ लाख रुपयांचा महसूल जमा झाला होता. २०१४-१५ या वर्षी त्यात सुमारे ८० कोटी रुपयांची वाढ होऊन एकूण महसूल एक हजार ४१ कोटी आठ लाख रुपये एवढा जमा झाला होता. २०१५-१६ या वर्षात बाराशे कोटींच्या जवळपास महसूल प्राप्त झाला होता. यंदा एक हजार ४५० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. त्यापैकी एक हजार ३०० ते एक हजार ३५० कोटी रुपये महसूल प्राप्त झाल्याची माहिती ‘आरटीओ’च्या अधिकाऱ्यांनी दिली. येत्या आठवडाभरात गुढी पाडव्यानिमित्त नवीन वाहनांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर होईल. त्यामुळे उर्वरित महसूल ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली.
,,
‘आकर्षक नंबर’मुळे महसूल उद्दिष्ट साध्य
दुचाकी खरेदी किंवा जुन्या वाहनांच्या खरेदीमध्ये रोख स्वरूपात पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे नोटाबंदीनंतर नोव्हेंबरमध्ये नवीन दुचाकीच्या संख्येत घट झाली होती. तसेच, जुन्या वाहन खरेदी-विक्रीच्या नोंदणीचे प्रमाण घटले होते. मात्र, गेल्या सहा महिन्यात विविध प्रकारच्या परिवहन शुल्कात वाढ करण्यात आली आहे. आकर्षक नंबरसाठी यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर मागणी होती. त्यामुळे नोटाबंदीनंतर आरटीओचे व्यवहार मंदावले असले तरी महसूल प्राप्तीच्या उद्दिष्टापर्यंत आरटीओने मजल मारली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षाची शिस्त मोडणाऱ्यांचे निलंबन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता खेचून आणली. परंतु, निवडणुकीत पक्ष आणि अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्या २० ते २२ पदाधिकाऱ्यांवर आता पक्षाच्या शिस्तपालन समितीद्वारे तयार केलेल्या अहवालानंतर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. लवकरच पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागण्यात येणार असून, त्यानंतर ही कारवाई केली जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून सत्ता काढून घेण्यासाठी मुख्यमंमत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश कार्यकारिणीने अनेक व्यूहरचना आखल्या होत्या. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मदतीला अपक्ष आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची तगडी फौज मुख्यमंत्र्यांनी उभी केली. जुन्या पदाधिकाऱ्यांना ‘एम पॉवर’सह सगळ्याच फॅक्टरमध्ये मोठा धीर या नेत्यांमुळे मिळाला होता. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमीच गाजणारा ‘गाववाला आणि बाहेरचा’ वाद रंगविण्याऱ्यांपैकी काहींनी भाजपमध्ये ‘जुना-नवीन’ वाद निर्माण केला.

निवडणुकीच्या काळात उमेदवारी कोणाला मिळणार यावरून चर्चा रंगत होत्या. याच दरम्यान, प्रभागात इच्छुकांपैकी कोणाच्या पारड्यात अधिक जनमत पडले, याचा सर्व्हे करून त्यानंतरच उमेदवारी देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले. त्यामुळे अनेकांनी बंडखोरीची भाषा सुरू केली. तर, उमेदवारी जाहीर होताच, नाराज प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तिकीट न मिळालेल्या इच्छुकांनी पक्षविरोधी काम सुरू केले होते. पक्ष कार्यालयाबाहेर येऊन पक्ष आणि प्रमुखांविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारून काही कार्यकर्त्यांना देखील हाताशी धरले होते.

बंडखोरी नवीन नाही. मात्र, शिस्तप्रिय ओळख असलेल्या भाजपमध्ये ही बाब खपून घेतली जाणार नव्हती. पक्षविरोधी काम करणाऱ्यांची माहिती स्थानिक नेत्यांनी प्रदेश कार्यकारिणीला दिली होती. परंतु या ठराविक २०-२२ पदाधिकाऱ्यांकडे लक्ष केंद्रीत करण्याऐवजी सत्ता खेचून आणण्यासाठी वेळ खर्ची करा अशा सूचना प्रदेश पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नेत्यांना त्या वेळी दिल्या होत्या.

मतदारांनी भाजपला कौल दिल्यानंतर सध्या याच पक्षविरोधी काम करणाऱ्यांनी आम्ही कसे पक्षाबरोबर आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. विशेष म्हणजे काही जणांनी पद मिळविण्यासाठी स्थानिक नेत्यांना भेटून, चूक झाली असेदेखील सांगितले जात आहे.

मात्र, पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमुळे बऱ्याच ठिकाणी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांबाबत शिस्तपालन समितीने एक अहवाल तयार करून तो प्रमुख नेत्यांकडे दिला. त्यानंतर आता या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजाविण्यात येणार असन, खुलासा मिळाल्यावर पक्षातून निलंबित करण्यात येणार आहे.

कारवाईत स्वीकृतच्या इच्छुकांचा समावेश

स्वीकृत नगरसदस्य म्हणून पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती येत्या काळात होणार आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्यांची यादी तयार झाली आहे. शिस्तपालन समितीच्या अहवालानुसार सध्या स्वीकृत सदस्य पदासाठी इच्छुक असणाऱ्यांपैकी काही जणांची नावेदेखील पक्षविरोधी काम करणाऱ्यांच्या यादीत आहेत. त्यामुळे या ‘स्वीकृत’ तर लांबच; पण अशांवर निलंबनाची कारवाई देखील होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुद्रांक शुल्क विभागाची तिजोरी जेमतेम भरली

$
0
0

पुणे : केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचा सर्वाधिक फटका कोणत्या विभागाला बसला असेल, तर तो राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला. कारण नोटाबंदी आणि ऑनलाइन व्यवहारांना प्राधान्य यामुळे मालमत्ता खरेदीसाठी घेतल्या जाणाऱ्या आणि जमिनींमध्ये गुंतविण्यात येणाऱ्या काळ्या पैशाला लगाम लागला आहे. त्यामुळे राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा महसूल मिळविणाऱ्या या विभागाची नोटाबंदीनंतर उत्पन्नाबाबतीत नाकाबंदी झाली आहे.

राज्याच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल जमा करणारा विक्री कर हा विभाग आहे. त्यानंतर नोंदणी आणि मुद्रांक विभागामार्फत दुसऱ्या क्रमांकाचा महसूल गोळा होतो. नोटाबंदीच्या निर्णयाने या विभागाची तिजोरी यंदा जेमतेम भरली आहे. नोटाबंदीनंतर खरेदी-विक्रीचे झालेले अत्यल्प प्रमाण आणि रेडिरेकनरचे वाढते दर याचा परिणाम या विभागावर पडला आहे.

हा विभाग लोकांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींशी निगडीत आहे. स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री, मुद्रांक शुल्क भरणा, विवाह नोंदणी, भाडेकरार, मृत्यूपत्र नोंदणी, कुलमुखत्यारपत्र नोंदणी अशा विविध प्रकारच्या दस्त नोंदणी या विभागात होत असतात. या विभागाला दस्त नोंदणीद्वारे दररोज सुमारे ४२ कोटी रुपये महसूल मिळतो. मात्र, नोटाबंदीनंतर हे प्रमाण कमी झाले आहे. २०१५-१६ मध्ये २३ लाख आठ हजार ८०९ विविध प्रकारचे दस्त नोंदविले गेले होते. त्यातून या विभागाला २१ हजार ७६७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. या वर्षी दस्त नोंदणी आणि महसूल यांचे प्रमाण कमी झाले आहे. २६ मार्च २०१७ पर्यंत २० लाख २१ हजार ३२९ दस्त नोंदविले गेले असून, त्याद्वारे सुमारे १५ हजार ४१६ कोटी रुपये महसूल जमा झाला आहे.

रेडिरेकनरचे नवीन दर यापूर्वी एक जानेवारीपासून लागू होत असत. आता एक ​एप्रिलपासून नवीन दर लागू करण्याची पद्धती सुरू झाली आहे. हे दर वाढतच असतात. त्यामुळे उर्वरित पाच दिवसांत महसुलात वाढ होईल. मात्र, ते प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच असण्याची शक्यता आहे. ‘रेडीरेकनर’चे नवीन दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात महापालिका क्षेत्रासाठी सहा टक्के, जिल्ह्यासाठी ११ टक्के, नगरपालिका क्षेत्रासाठी नऊ टक्के आणि ग्रामीण भागासाठी २२ टक्के वाढ प्रस्तावित आहे.

आगामी वर्षासाठी रेडिरेकनरचे दर वाढवू नयेत, अशी भूमिका लोकप्रतिनिधी आणि बांधकाम व्यावसायिकांनी घेतली आहे.

देशामध्ये नोंदणी कायद्याची १९०८ पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये दस्त नोंदणीचे काम न्यायाधीशांकडे देण्यात आले होते. त्यानंतर या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली व त्यातूनच नोंदणी विभाग स्थापन करण्यात आला. तेव्हापासून या विभागाने सतत बदल केला आहे. या विभागामार्फत मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुलीला १८१५ या वर्षापासून मुंबईत प्रारंभ करण्यात आला. १८२७ मध्ये मुद्रांक विक्री आणि मुद्रांक शुल्क वसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणा आणि कार्यालये सुरू झाली. १९८८ मध्ये नोंदणी विभाग आणि मुद्रांक विभाग हे दोन विभाग एकत्र करून या विभागाच्या कामकाजाला प्रारंभ झाला. मुद्रांक शुल्क दराचे सुसूत्रीकरण झाल्याने; तसेच बाजार मूल्य संकल्पनेसाठी वार्षिक मूल्य दर तक्त्यांची अंमलबजावणी या विभागाने सुरवात केल्यानंतर हा विभाग राज्यातील अन्य विभागांच्या तुलनेत महसूल गोळा करण्यात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महसुलात वाढ होण्यास या विभागाने केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान कारणीभूत ठरले आहे. २००२ मध्ये दस्त नोंदणीसाठी ‘सरिता’ या कम्पयुटराइज्ड प्रणालीचा वापर करण्यास सुरवात झाली. २०१२ पासून ‘आय-सरिता’ ही मध्यवर्ती पध्दती वापरण्यात येऊ लागली. त्यानंतर ई-पेमेंट आणि ई-सर्च हे उपक्रम सुरू झाले.

महसुलात वाढ करण्यासाठी आणि लोकांना रांगेत उभे राहता येऊ नये, यासाठी २०१४ पासून या विभागाने मोठ्या गृहप्रकल्पातील फ्लॅटचे करारनामे आणि लिव्ह अॅण्ड लायसन्स (भाडे करार) यांची दस्त नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात न येता ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ई-रजिस्ट्रेशन प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे लोकांना सुविधा आणि उत्पन्नात वाढ झालेली दिसते. मात्र, या वर्षी नोटाबंदीने उत्पन्नाच्या बाबतीत नाकाबंदी केली आहे.

..........

वर्ष दस्त संख्या महसूल (कोटींमध्ये)

२०१० - ११ २३१८६१८ १३४११

२०११ - १२ २३१४२१८ १४८००

२०१२ - १३ २२९७५४५ १७५४८

२०१३ - १४ २३३०३७३ १८६६६

२०१४ - १५ २२९७९२९ १९९५९

२०१५ - १६ २३०८८०९ २१७६७

२०१६ - १७ २०२१३२९ १५४१६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images