Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

संशयिताच्या कुटुंबाची चौकशी

0
0

पिंपरी : शस्त्रसाठ्यासह बिहारमध्ये अटक करण्यात आलेल्या युवकाच्या कुदळवाडी-चिखली येथील घरातून राज्य दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी (२४ मार्च) लॅपटॉप जप्त केला. तसेच संशयिताच्या वडिलांसह मोठ्या भावालादेखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. देशातील विघातक घटनांच्या तपासात वारंवार पिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडीचे कनेक्शन उघड होत असल्याने तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. या दोघांचा दहशतवादी किंवा नक्षलवाद्यांच्या सर्व मॉड्यूलच्या संभाव्य कनेक्शनच्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.
महंमद रशीद हुसेन (रा. मुंगेर, बिहार) व त्याचा मामा मोहंमद शकिल अहमद या दोघांना बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील मुफस्सिल पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या सुजावलपूर गावातून अटक करण्यात आली आहे. या ठिकाणी अधीक्षक आशिष भारती आणि पथकाने छापा मारला तेव्हा आठ बॉम्ब, १७ डिटोनेटर, २५० ग्रॅम वजनाची एक याप्रमाणे ५ जिलेटीनच्या कांड्या, बॉम्ब बनविण्यासाठीच्या बॅटरी आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या दोघांव्यतिरिक्त अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या वेळी स्थानिक गावकऱ्यांनी पोलिसांना कारवाईस मज्जाव केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांपैकी एकाचे स्थानिक राजकीय पक्षांशी संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे. बिहारचे दहशतवाद विरोधी पथकदेखील याबाबत चौकशी करत असून, ते महाराष्ट्रातील तपास यंत्रणांशी संपर्कात आहेत.
महंमद हा गेल्या अनेक वर्षांपासून कुदळवाडी परिसरात कुटुंबीयांसह राहत होता. महंमद रशीद हा पूर्वी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मजुरी आणि ऑटोपार्टमध्ये नोकरी करत होता. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी सन २०१४ ला तो गावाला निघून गेला होता. त्यानंतर त्याला शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आली. त्याचे वडील आणि अन्य चार भाऊ कुदळवाडी येथे भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहतात. वडील सध्या शहरातील एका बड्या वाहन उद्योग कंपनीत ठेकेदाराकडे कंत्राटी पद्धतीने काम करीत असून, त्यांना कंपनीतूनच शुक्रवारी चौकशीसाठी एटीएसने ताब्यात घेतले.
देशातील अनेक दहशतवादी कारवायांसंदर्भात तपास यंत्रणांनी कुदळवाडी भागात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चौकशी केली आहे. वारंवार या भागावर संशयाची सुई रोखली जात असल्याने यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. महंमद रशीद हुसेन कुदळवाडीत राहत असताना शहरात कोणाच्या संपर्कात होता, त्याच्याकडे राहण्यासाठी गावाकडून कोणी आले होते का, त्याला ज्या प्रकरणात बिहारमध्ये अटक करण्यात आली, त्याच्याशी कुटुंबातील अन्य कोणी सहभागी आहे का, याची चाचपणी सध्या राज्यातील तपास यंत्रणा करीत आहेत.

भाडेकरू नोंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी कासारवाडी येथे राहत असल्याचे दिल्ली पोलिसांनी उघड केले होते. संशयित दहशतवादी हे खोली भाडेतत्त्वावर घेऊन राहत असल्याचे तसेच त्यांनी भाडेकरूनोंद केली नसल्याचे तेव्हा तपासात उघड झाले होत. महंमद रशीद हुसेन याच्या कुटुंबीयांची कोणतीच नोंद घरमालकाने पोलिसांकडे केलेली नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस एखादी गंभीर घटना घडली, की याबाबत चर्चा होऊन कालांतराने ती विरून जाते. पुणे शहरात यापूर्वी बॉम्बस्फोटाच्या घटना घडूनही याबाबत नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.

बॉम्ब आणि अन्य शस्त्रसाठा सापडल्याने या प्रकरणाचा तपास बिहार राज्य दहशतवादविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. पूर्वी महंमद रशीद महाराष्ट्रातील पुणे, कुदळवाडी परिसरात राहत असल्याने बिहार एटीएस महाराष्ट्र एटीएसच्या संपर्कात असून, बिहार-कुदळवाडी कनेक्शनचा तपास करण्यात येत आहे.
- सुशील खोपडे, विशेष पोलिस महानिरीक्षक, बाघलपूर, बिहार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्थायी’साठी मोहोळ, टिंगरे यांच्यात चुरस

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाने मुरलीधर मोहोळ यांना; तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने रेखा टिंगरे यांना उमेदवारी दिली आहे. स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी १० सदस्य भाजपचे असल्याने मोहोळ यांची निवड निश्चित मानली जात आहे. या पदासाठी भाजपकडून ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे आणि मोहोळ यांच्यात जोरदार चुरस होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून शुक्रवारी सकाळी मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर त्यांनी नगरसचिव कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला स्पष्ट बहुमत देत १६२ पैकी तब्बल ९८ जागांवर विजयी केले आहे. सभागृह नेते, महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर पक्षाच्या वतीने स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी कोणाला संधी दिली जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठी उत्सुकता होती. पक्षाने सभागृह नेतेपद पर्वती, महापौरपद कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना दिल्याने स्थायी समितीचा मान नक्की कोणत्या मतदार संघाला दिला जाणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या संभाळण्याची जबाबदारी कोथरूड मतदारसंघाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेत भाजपने सत्ता मिळविल्यानंतर सत्ताधारी पक्ष म्हणून पहिला स्थायी समिती अध्यक्ष म्हणून वर्णी लागावी, यासाठी अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावली होती.
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी पहिल्या दिवसापासून राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे आणि भाजपचे शहर सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यात चुरस होती. कांबळे यांची पाचवी टर्म असल्याने त्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, कोथरूड विधानसभा मतदारसंघातील एकाही नगरसेवकाला पालिकेत महत्त्वाचे पद देण्यात न आल्याने मोहोळ यांच्या नावावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. मोहोळ यांनी एकूण चार अर्ज दाखल केले असून त्यांच्या अर्जावर कांबळे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. ही निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी पालिकेत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेखा टिंगरे यांना संधी देण्यात आली असून, त्यांनी आपला अर्ज दाखल केला. आघाडीचे पाच सभासद असून, एक सभासद हा शिवसेनेचा असणार आहे.

येत्या बुधवारी अध्यपदाची निवडणूक
स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या बुधवारी २९ मार्चला होणार आहे. पालिकेच्या श्री छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहात ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांनी राज्याचे अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेअकरा वाजता ही निवडणूक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपीच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती ?

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
भ्रष्टाचारावर हातोडा चालविणारे आणि कडक शिस्तीचे म्हणून गणले जाणारे तुकाराम मुंढे यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. मुंढे हे सध्या नवी मुंबई महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जागी शुक्रवारी राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक एन. रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पीएमपी माजी अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांची नऊ महिन्यांपूर्वी नाशिकच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली. तेव्हापासून पीएमपीच्या अध्यक्षपदाचा प्रभारी कारभार पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी पुण्यात येण्यास नापसंती व्यक्त केली. त्यामुळे अद्याप पीएमपीला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळालेला नाही. दरम्यान, मुंढे यांच्या बदलीसाठी नवी मुंबईतील अनेक प्रस्थापितांनी गेल्या काही महिन्यात प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेरीस शुक्रवारी यश मिळाले. मुंढे हे सध्या पदमुक्त असून, त्यांच्याकडे पीएमपीचे अध्यक्षपद सोपविले जाण्याची दाट शक्यता आहे.
मुंढे हे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तेथून त्यांची बदली नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी मुंढे यांची कारकीर्द चांगली गाजली. मुंढे हे भ्रष्टाचाराला विरोध आणि पारदर्शक प्रशासनासाठी आग्रही अधिकारी म्हणून ओळखले जातात. श्रीकर परदेशी पीएमपीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी काहीच महिन्यांत पीएमपीच्या कारभारात आमूलाग्र बदल केला होता. त्यांच्यानंतरचे अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांनीही नावीन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती. मुंढे देखील याच स्वच्छ परंपरेतील अधिकारी असून पुण्यात त्यांचे स्वागत केले जाईल, अशी प्रतिक्रिया पुण्यातील प्रवासी संघटनांनी व्यक्त केली.
पुणे महानगर परिवहन महामंडळाचा अध्यक्ष म्हणून पूर्ण वेळ सनदी अधिकाऱ्याची नेमणूक करावी, यासाठी महाराष्ट्र कामगार मंचाने मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्यातर्फ अॅड. रामचंद्र कच्छवे यांनी याचिका दाखल केली आहे. पुढील आठवड्यामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे. या याचिकेमध्ये मोहिते यांनी पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कुणाल कुमार, राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य सचिव यांना प्रतिवादी केले आहे. पीएमपीच्या अध्यक्षपदी पूर्ण वेळ सक्षम व सनदी अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी विनंती यामध्ये केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्कर दहशतवादी विचार संपवत नाही

0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी त्याचे मूळ शोधले पाहिजे. काश्मीरमधील लोकांच्या स्वायत्तता, रोजगार, सरकार या तीन मागण्या असून त्या पूर्ण होणे गरजेचे आहे. काश्मिरी लोक आपलेच बांधव आहेत,’ अशी भावना प्रत्येकाच्या मनात असायला हवी. दहशतवाद नष्ट करण्यासाठी त्या भागातील लोकांचा विश्वास आपण संपादन करायला हवा,’ असे मत मेजर जनरल (निवृत्त) संजय भिडे यांनी व्यक्त केले. ‘सैन्यदल दहशतवाद्यांना संपवू शकते; पण दहशतवादी विचारसरणी संपवू शकत नाहीत,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विश्वलीला ट्रस्टतर्फे एरंडवण्यातील सेवासदन दिलासा कार्यशाळेच्या सभागृहात आयोजित ‘भारतीय लष्कर, कार्यपद्धती व काश्मीर समस्या’ या व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी नगरसेवक धीरज घाटे, दीक्षा कदम, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, संस्थेचे विश्वस्त देवव्रत बापट उपस्थित होते. संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवानांच्या कुटुंबीयांसाठी काम करणाऱ्या सावली संस्थेला उपस्थितांनी मदत दिली.
‘दहशतवादी विचारसरणी संपेल, त्या वेळी खऱ्या अर्थाने काश्मीर प्रश्न सुटेल,’ असे सांगून भिडे म्हणाले, ‘काश्मीर हा भारताचाच एक भाग आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. काश्मीरची अस्मिता समजून घेण्यासाठी प्रथम काश्मीरचा इतिहास समजून घ्यायला हवा. भारतातील अंतर्गत विषयांमध्ये पाकिस्तानाची दखल थांबविली पाहिजे.’ अमोद जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिन बर्वे यांनी प्रास्ताविक केले. रंजना बर्वे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ माळीण राहिले दिमाखात उभे

0
0

आमडे गावात पुनर्वसन प्रकल्प; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच लोकार्पण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुसळधार पावसामुळे २०१४मध्ये दरड कोसळून बेचिराख झालेले माळीण गाव पुन्हा नव्या दिमाखात उभे राहिले आहे. या गावाचा आमडे येथे आठ एकर जागेत उभारण्यात येणारा पुनर्वसन प्रकल्प पूर्ण झाला आहे. प्रकल्पात भूकंपरोधक घरे उभारण्यात आली आहेत. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच पुनर्वसन प्रकल्प ठरला आहे.
माळीण गाव २३ जुलै २०१४ रोजी झालेल्या मुसळधार पावसात दरडीखाली सापडले. त्यानंतर सरकार, सामाजिक संस्था आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने गावाचे पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन प्रकल्पातील घरे भूकंपरोधक असतील, याकडे लक्ष देण्यात आले आहे. त्यासाठी अॅल्युफॉम सेंट्रिंगचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर काँक्रिट आणि स्टीलही वापरण्यात आले आहे.
जमिनीखाली सुमारे दीड ते दोन मीटर खोल खड्डे खोदून मातीची तपासणी करण्यात आली. मातीमध्ये घरांचे वजन पेलण्याची क्षमता आहे का, याचीही तज्ज्ञांकडून तपासणी केली गेली. त्यानंतर घरांचे डिझाइन आणि पाया तयार करण्यात आला. या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने उतरत्या छपरांची घरे बांधण्यात आली आहे. ही घरे ६७ कुटुंबासाठी उभारण्यात आली असून, प्रत्येक घर सुमारे दीड हजार चौरस फुटाचे आहे. एका घरासाठी सुमारे आठ लाख रुपये खर्च आला आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्चण्यात आले आहेत. प्रत्येक घरासाठी​ सरकारकडून सुमारे दोन लाख रुपये, तर उर्वरित सहा लाख रुपये सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून गोळा करण्यात आले.
माळीण पुनर्वसन प्रकल्पाचे सल्लागार योगेश राठी म्हणाले, की ‘आमडे येथे पुनर्वसन प्रकल्प उभारण्यात आला आहे. खासगी कंपनीच्या मदतीने नियोजन करण्यात आले. ही सर्व घरे भूकंपरोधक असून, त्यासाठी अत्याधुनिक साहित्य वापरण्यात आले आहे. अकरा महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.’
‘घरांबरोबर रस्ते, संरक्षक भिंत, पाणी, वीज, शाळा, अंगणवाडी, बसस्थानक, समाजमंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, गुरांसाठी गोठे आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. या कामांची गुणवत्ता तपासणी करण्यात आली आहे,’ असेही राठी यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पाचे उदघाटन होईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
* आमडे गावात आठ एकर जागेत प्रकल्प.
* या जागेतील १५ झाडांची पुनर्लागवड, तर ५०० नवीन झाडे लावण्यात आली आहेत.
* दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची स्मृती कायमस्वरुपी रहावी, यासाठी स्मृतीवन उभारण्यात आले आहे.
* एप्रिलमध्ये पहिल्या आठवड्यात होणार प्रकल्पाचे लोकार्पण.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणवेशातून संतोष भेटतात

0
0

शहिद महाडिक यांच्या पत्नीची भावना; पुतळा सुपूर्द

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘लहानपणापासूनच संतोष यांना देशसेवेचे वेड होते, तर मला लहान मुलांमध्ये रमण्याचा छंद होता. संतोष यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी लष्करात दाखल झाले. पूर्वी लष्कराच्या गणवेशाला कवटाळत होतो. मात्र, आता लष्करी गणवेश घातल्यामुळे संतोष माझ्यासोबत असल्यासारखे वाटते. त्यांनी पाहिलेली स्वप्ने मुलांना द्यायची आहेत,’ या शब्दांत शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी आपल्या भावनांना शुक्रवारी मोकळी वाट करून दिली.
पुण्यातील कलाकार आणि जनतेच्या वतीने शहीद संतोष महाडिक यांचा अर्धपुतळा पुण्याचे सहपोलिस आयुक्त सुनील रामानंद यांच्या हस्ते स्वाती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्या वेळी स्वाती महाडिक बोलत होत्या. या प्रसंगी जयवंत घोरपडे, तुषार घोरपडे, विनायक बोगम, शिल्पकार अभिजित धोंडफळे उपस्थित होते. शहीद महाडिक यांचा पुतळा सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी बसविण्यात येणार आहे.
महाडिक म्हणाल्या, की ‘संतोष याना लहानपणापासूनच लष्करात जाण्याची आवड होती. संतोष शहीद झाले आणि माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. संतोष यांच्यासोबत पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लष्कराचा गणवेश अंगात घातला. त्यामुळे संतोष माझ्यासोबतच आहेत असे वाटते. सध्या मी लष्करात कॅडेट म्हणून कार्यरत असून, सप्टेंबरमध्ये लेफ्टनंटपदी बढती होईल. संतोष यांच्यासह पाहिलेली स्वप्न पूर्ण करीत त्यांनी पाहिलेले आयुष्य मुलांना द्यायचे मी ठरवले आहे. मुलांनी काय करावे याचे बंधन त्यांच्यावर असणार नाही. मात्र, त्यांनी लष्करात यायचे ठरवले तर, मला आनंदच होईल.’
‘देशात सीमेवर आणि अंतर्गत भागात युद्ध लढले जाते. सीमेवर युद्ध लढताना तेथील परिस्थिती कठीण असते. मी अंतर्गत युद्ध जवळून पाहिले आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांच्या नातेवाइकांना अनेक सवलती मिळाल्या. पण, गडचिरोलीसारख्या ठिकाणी नक्षलवाद्यांशी दोन हात करताना शहीद झालेल्यांच्या नातेवाइकांना अजून काहीच मिळाले नाही. १९८१ पासून १९१ पोलिस नक्षलग्रस्त भागात शहीद झाले आहेत,’ असे रामानंद यांनी नमूद केले.
समाजाला आपले काही तरी दिले पाहिजे, हे संतोष सतत सांगत होता. संतोषच्या जाण्यानंतर त्याची पत्नी स्वाती लष्करात दाखल झाली आहे. कुटुंबातील कोणीतरी व्यक्ती देशसेवेसाठी काम करत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, अशा भावना संतोष यांचे मोठे बंधू जयंत महाडिक यांनी व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसाठी सरसावले विद्यापीठ

0
0

कमी पाण्यावरील पिकांचे संशोधन सुरू; केंद्रानेही दिली मदत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुष्काळात कमी पाण्यावर तग धरू शकणाऱ्या पिकांसाठीचे अनोखे संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात येत आहे. बळीराजाला मदत करण्यासाठी वनस्पतीशास्त्र विभाग आणि जीवरसायनशास्त्र विभाग सरसावले आहेत.
उन्हाळा आला की, राज्यासह देशात दुष्काळाची परि​स्थिती निर्माण होते. केंद्रासह राज्य सरकारही दुष्काळाचे निवारण करण्यासाठी विविध उपाययोजना राबवते. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीसाठी आता विद्यापीठानेही एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वनस्पतीशास्त्र आणि जीवरसायनशास्त्र विभागाने एकत्र येऊन संशोधनाचा ध्यास घेतला आहे. हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही संशोधनांसाठी दहा कोटींची रक्कम देऊ केली आहे. विद्यापीठातील इनोव्हेशन सेंटरतर्फे केंद्राकडून मिळालेल्या निधीपैकी एक कोटीचा निधी दुष्काळनिवारण प्रयोगासाठी देण्यात येणार आहे.
‘या प्रकल्पासाठी तीव्र दुष्काळ असणाऱ्या भागातील मातीचे नमुने मागविण्यात आले आहेत. त्यामध्ये नाशिक, उस्मानाबाद, जळगाव, राजस्थान, गुजरातमधील कच्छ आणि सोलापूर येथील नमुन्यांचा समावेश आहे. मातीच्या नमुन्यांमध्ये सध्या भुईमुगाची लागवड केली आहे. प्रयोगशाळेत अजैविक ताण सहन करू शकणारे म्हणजेच कमी पाण्यावर टिकू शकणारे सूक्ष्म जीवाणू तयार केले आहेत. त्यांचा समावेश नमुन्याच्या मातीमध्ये केला आहे. त्यासाठी मायकोरायझम या जीवाणूची मदत झाली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील क्षारयुक्त, पडीक जमीन ओलिताखाली येण्यास मदत होईल. ग्रामीण भागात बऱ्याचदा दहा ते पंधरा वर्ष सातत्याने एकाच पिकाची लागवड केली जाते. परिणामी जमिनी नापीक होतात. आमच्या प्रयोगामुळे नापीक जमिनी सुपीक होण्यास मदत होईल,’ असा विश्वास जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मोहन कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पासाठी प्रा. महेश बोर्डे, जयश्री खाडिलकर, पीचएडीची विद्यार्थीनी प्रेरणा पवार, अजिंक्य तेरकर आणि स्वप्नील महाजन कार्यरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ चरस विक्रेत्यांचे रॅकेट उध्वस्त

0
0

पाच जणांना अटक; साडेतीन किलो पदार्थ जप्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विमाननगर परिसरातील मॉलसमोर चरसची विक्री करणाऱ्या पाच जणांना दरोडा प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून १३, ८०,००० रुपये किमतीचे साडेतीन किलो चरस जप्त करण्यात आले. अटक केलेल्यांमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) माजी जवानाचा समावेश आहे.
समाधान दत्तू गोरे (वय २५, रा. महीम, ता. सांगोला, जि. सोलापूर), आसाराम गणपत गोपाळघरे (वय २८, रा. नागोबाची वाडी, ता. जामखेड, जि. नगर), वैजनाथ रामा सांगळे (वय २९, रा. आनंदवाडी, जि. नगर), भास्कर दत्तू गोपाळघरे (वय २७, रा. नागोबाची वाडी), फिरोज इक्बाल पंजाबी (वय ३७ रा. जामखेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यातील आसाराम हा माजी जवान आहे. भ्रष्टाराचाराचे आरोप झाल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. गोरे हा तस्कर असून, त्यानेच हे चरस विशाखापट्टणम येथून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.
विमाननगर परिसरातील मॉलसमोर काही जण कारमधून येऊन चरसची विक्री करणार असल्याची माहिती गुन्हे शाखेतील शैलेश जगताप यांना मिळाली. त्यानुसार दरोडा प्रतिबंधक पथकाचे निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या पथकाने गुरुवारी रात्री पावणे आकरा वाजता सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील कारची झडती घेतली असता त्यामध्ये तेरा लाख ८० हजार रुपये किमतीचे ३.४५० किलोचे चरस आढळून आले. त्यांच्याविरुध्द विमानतळ पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून जप्त केलेले चरस आंध्र प्रदेशातून आणल्याचे समोर आले आहे. आरोपी चरसची विक्री करण्यासाठी पुण्यात आले होते. त्यातील फिरोज पंजाबी ड्रायव्हर असून, जप्त करण्यात आलेली कार ही त्याच्या मालकीची आहे. आरोपी चरसची विक्री कोणाला करणार होते, याचा पोलिस सखोल तपास करीत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चरसची प्रति किलो १० लाख रूपये दराने विक्री होते.

माजी जवानाच्या सहभागाने खळबळ
आरोपी आसाराम गोपाळघरे आसाममध्ये सीआयएसएफमध्ये तैनात होता. सीआयएसएफकडे विमानतळ परिसराच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असते. गोपाळघरे विरुध्द आर्म अॅक्ट आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. २०१४ मध्ये त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आले. आरोपी आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालवित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आणखी तपास सुरू असल्याचे उपायुक्त पी.आर. पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरावेचकांसाठी ‘रेड डॉट कॅम्पेन’

0
0

महापालिका आणि ‘स्वच्छ’चा संयुक्त उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सॅनिटरी नॅपकीन आणि डायपर हाताळल्याने कचरा वेचकांना आरोग्याचा धोका निर्माण होण्याची भीती वाढत असल्याने आता महापालिकेने ‘स्वच्छ’ संस्थेच्या सहकार्याने ‘रेड डॉट कॅम्पेन’ शहरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी, शहरात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असून, स्वतंत्ररित्या गोळा होणाऱ्या या कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य होणार असल्याचा दावा केला जात आहे.
शहरात एकूण गोळा होणाऱ्या कचऱ्यामध्ये सुमारे तीन टक्के प्रमाण सॅनिटरी नॅपकीन आणि डायपरचे आहे. कागदामध्ये न गुंडाळता टाकलेला हा कचरा आरोग्य सेवकांसाठी हानिकारक ठरत असल्याने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ही मोहीम राबवले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी दिली. घरगुती सॅनिटरी कचरा एका कागदामध्ये गुंडाळून त्यावर लाल बिंदू (रेड डॉट) काढण्याचे आवाहन पालिका आणि स्वच्छ संस्थेने केले आहे. यामुळे, असे चिन्ह असलेला कचरा न उघडता तो वर्गीकृत करणे सोपे होईल, असा दावा स्वच्छ संस्थेने केला. घरोघरी गोळा केल्या जाणाऱ्या कचऱ्याप्रमाणेच कंटेनरमध्ये कचरा टाकतानाही नागरिकांना ‘रेड डॉट’चा वापर करावा, यासाठी जनजागृती केली जाणार आहे.

प्लास्टिकच्या बाटल्यांवर प्रक्रिया
शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोळा होणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्याची यंत्रणाही महापालिकेने उभारली आहे. आर्ट लाइव्ह फाउंडेशनच्या मदतीने सध्या शहरात प्लास्टिक बाटल्यांच्या संकलनासाठी ४० केंद्रे (पेट किऑस्क) उभारण्यात आली आहेत. त्याद्वारे, गोळा होणाऱ्या बाटल्यांवर प्रक्रिया करून त्याचा भुगा करण्यात येत आहे. एका दिवसात सरासरी पाच हजार बाटल्यांवर प्रक्रिया केली जात आहे. शहरातील हॉटेलर्स असोसिएशनसोबत आता सहकार्य करण्यात येत असून, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये गोळा होणाऱ्या बाटल्यांवर आता थेट या प्रकल्पात येणार आहेत, असा दावा कुमार यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिमेंट ट्रक पेटवणारे पाच जण गजांआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खडकवासल्याचे माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटीलबुवा मते यांचे सिमेंट वाहतूक करणारे चार ट्रक पेटवल्याप्रकरणी पाच जणांना हवेली पोलिसांनी अटक केली. मते यांचे ट्रक पेटवल्याची घटना गेल्या आठवड्यात बुधवारी मध्यरात्री घडली होती. ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झालेल्या संशयितांच्या छबीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
या आगीत मते यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग लावण्याचा प्रकार ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाला होता. त्याआधारे कुणाल कैलास मते (वय २५), सागर भरत मते (वय २३), दत्तात्रय दिलीप मते (वय २०), प्रतीक भाऊसाहेब मते (वय २०), सूरज रोहिदास ढमढेरे (वय २५, रा. खडकवासला) यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती हवेली पोलिसांनी दिली.
मते यांची सिमेंट विक्रीची एजन्सी असून, सिमेंटची ने-आण करण्यासाठी ट्रकचा वापर करण्यात येत होता. शिवजयंती असल्याने मते यांनी नेहमीच्या जागेवर ट्रक पार्क न करता घराशेजारील जागेत उभे केले होते. ट्रक पेटवण्याची घटना ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाली होती. मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन ते तीन जण ट्रकच्याभोवती घुटमळत असून, केबिनमध्ये घुसून त्यांनी आग लावली आणि तेथून पळ काढला. पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’च्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला होता.
दरम्यान, तक्रादार मते यांनी पोलिस अधीक्षक सवेझ हक यांना अर्ज केला असून या घटनेतील मुख्य सूत्रधारांना अटक केली नसल्याची तक्रार केली आहे. मते यांनी आरोप केलेली व्यक्ती ही राजकीय असून, तिच्यावर यापूर्वी हवेली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी मते यांनी अधीक्षकांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस्ता बांधायला गेला; अपघातात मृत्यू झाला

0
0

म. टा. प्रतिनिधी, जुन्नर

अवघ्या तीन आठवड्यांवर आलेल्या लग्नाची स्वप्ने रंगविणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. स्वतःच्याच लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी जात असताना टेम्पोची धडक बसून नवरदेवासह चुलत भावाचाही अपघातात मृत्यू झाला. पुणे- नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे एका वळणावर शुक्रवारी हा अपघात झाला.
बाबूराव जयसिंग अडसरे (वय २४) आणि महेंद्र भिमाजी अडसरे (वय २५, रा. नारायणगाव) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूरावचे लग्न तीन आठवड्यांवर आले होते. लग्नाची खरेदी करण्यासाठी बाबूराव आणि चुलत भाऊ महेंद्र नारायणगावातून आळेफाट्याकडे निघाले होते. त्याचवेळी टेम्पो आळेफाट्याहून नारायणगावकडे येत होता.
नारायणगावनजीकच्या बिझी प्लाझासमोर टेम्पोची दुचाकीवरुन चाललेल्या अडसरे बंधूंना जोरात धडक बसली. अपघातानंतर टेम्पो उलटला आणि धडकून अडसरे बंधूंचा जागीच मृत्यू झाला. टेम्पोचालक गणेश धनगर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. हलगर्जीपणे वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी धनगर याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
बाबूरावचे १७ एप्रिल रोजी लग्न होते. त्यासाठी बस्ता बांधण्यासाठी आळेफाटा येथून ते मोटारीने जाणार होते. मात्र, त्यांना मृत्यूने गाठले. या घटनेने अडसरे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ दररोज ३३ हजारांचा तोटा

0
0

एसटी महामंडळावर ‘टोल दरवाढी’ची कुऱ्हाड कोसळणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एक एप्रिलपासून पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे-वरील टोलवाढीमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) प्रतिदिन ३३ हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. पुणे-मुंबई मार्गावर एसटीच्या दररोज ३९२ फेऱ्या होतात. प्रत्येक फेरीला पूर्वीच्या तुलनेत आता ८५ रुपये जादा द्यावे लागणार आहेत. त्यामुळे एसटीच्या तिजोरीला वार्षिक एक कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
राज्य सरकारच्या नियमानुसार दर तीन वर्षांनी एक्स्प्रेस वे-वर टोलच्या रकमेत वाढ केली जाते. त्यानुसार यंदा टोलरकमेत १८ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनांना टोलचा भूर्दड बसणार आहे. याचा फटका गेल्या कित्येक वर्षांपासून तोट्यात चालणाऱ्या एसटी महामंडळाला बसणार आहे. सध्या महामंडळाला एक्स्प्रेस वे-वर प्रत्येक बससाठी ४६५ रुपये टोल द्यावा लागतो. त्यानुसार एसटीला दरमहा ५४,६८, ४०० रुपये खर्च करावे लागतात. येत्या एक एप्रिलपासून ५५० रुपये टोल द्यावा लागणार असल्याने दरमहा ६४, ६८,००० रुपये मोजावे लागणार आहेत.
स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन येथून दररोज पुणे-मुंबई मार्गावर १९६ बसद्वारे प्रवासी सेवा दिली जाते. या बसच्या एकूण ३९२ फेऱ्या होतात. सध्या एका बसला मुंबईला जाताना ४६५ तसेच, मुंबईहून परत येताना ४६५ रुपये असा ९३० रुपये टोल द्यावा लागतो. टोलमध्ये वाढ होणार असल्याने मुंबईला जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी पुण्याला येण्यासाठी प्रत्येकी ५५० रुपये टोल (एकूण ११०० रुपये) भरावा लागणार आहे.
रोज पुणे-मुंबई ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने या मार्गावरील बसच्या फेऱ्यांची संख्या अधिक आहे. एसटीला जास्त उत्पन्न मिळवून देणारा मार्ग म्हणून पुणे-मुंबई मार्ग ओळखला जातो. या मार्गावर साधारण गाड्यांबरोबरच सेमी लक्झरी आणि शिवनेरी या आरामदायी आणि वातानूकुलित गाड्या मोठ्या प्रमाणावर चालविल्या जातात

महामंडळाच्या तोट्यात वाढ शक्य
राज्य मार्ग परिवहन महामंडळाला गेल्या काही वर्षात खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. ‘ऑफ सिझन’मध्ये खासगी वाहतूकदारांकडून एसटीच्या तुलनेत कमी दराने सेवा दिली जाते. मात्र, एसटीचे दर स्थिर असतात. त्यामुळे प्रवाशांकडून खासगी बसला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर एसटीला संपूर्ण टोलमुक्त करून एसटीच्या उत्पन्न वाढीत राज्य सरकारने हातभार लावावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, या मागणीचा विचार न करता, केवळ टोलवाढ लादली जात आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या संचित तोट्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासक्रम जुना; प्रश्नपत्रिका नवी

0
0

‘एसएनडीटी’च्या विद्यार्थीनींचे वर्ष वाया जाण्याची भीती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) दूरशिक्षण (डिस्टन्स) विभागाच्या परीक्षेत विद्यार्थीनींना नियमित (रेग्युलर) अभ्यासक्रमावर आधारित पेपर आल्याची घटना ताजी असतानाच त्यात भर घालणारी आणखी एक घटना शुक्रवारी घडली. विद्यापीठाने तृतीय वर्षाच्या काही विद्यार्थीनींना जुन्याच अभ्यासक्रमावर आधारित ‘स्टडी मटेरीयल’ दिल्याने त्यांना नवीन अभ्यासक्रमावर आधारीत सेमिस्टर परीक्षेत पेपर सोडवता आला नाही. त्यामुळे त्यांना शंभर गुणांच्या पेपरमध्ये जेमतेम वीस गुणांचाच पेपर सोडवावा लागला. या पार्श्वभूमीवर विद्यार्थीनींनी शैक्षणिक वर्ष वाया न जाऊ देण्याची मागणी केली आहे.
एसएनडीटी विद्यापीठाची सेमिस्टर परीक्षा सुरू आहे. ही सेमिस्टर परीक्षा नियमित आणि दूरशिक्षण एज्युकेशन अशा दोन्ही विभागांची आहे. विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रावर बुधवारी सकाळी अकरा वाजता दूरशिक्षण विभागात तृतीय वर्ष बीएच्या मराठी विषयाचा पेपर होता. या पेपरला एकूण १५ विद्यार्थीनी होत्या. त्यापैकी सात विद्यार्थीनींना मराठी विषयाचा पेपरच सोडविता आला नाही. याबाबत अधिक शहानिशा केल्यानंतर त्यांना विद्यापीठाने मराठी विषयाचे जुने ‘स्टडी मटेरियल’ दिले, तर अन्य विद्यार्थीनींना नवे ‘स्टडी मटेरियल’ दिल्याचे समोर आले.
या विद्यार्थीनींना संपूर्ण पेपर हा अभ्यासक्रमाबाहेरील वाटला. तसेच, शंभर गुणांच्या पेपरमध्ये जमतेम वीस गुणांचाच पेपर त्यांना सोडवता आला. या संपूर्ण प्रकाराची तक्रार रंजना सोनवणे, सायली निंबाळकर, रीया करसोडे, स्वाती जोगळेकर, प्रियंका महानवर आदी विद्यार्थीनींनी दूरशिक्षण विभाग, परीक्षा विभाग आणि विद्यापीठाच्या कुलगुरुंना केली आहे. तसेच, आम्हाला मिळालेल्या स्टडी मटेरियलनुसार वर्षभर आम्ही अभ्यास केला असून, ऐनवेळी पेपर दुसऱ्या स्टडी मटेरियलवर आल्याने त्यात आमची काहीही चूक नाही. त्यामुळे विद्यापीठाने आमचे शैक्षणिक वर्ष वाया न जाऊ देण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बुधवारी तृतीय वर्ष बीएच्या इंग्रजी विषयाचा पेपर होता. हा पेपर दूरशिक्षणच्या अभ्यासक्रमावर आधारित येणे अपेक्षित होते. मात्र, तो नियमितच्या अभ्यासक्रमावर आला. त्यामुळे विद्यार्थिनींना सुरुवातीला पेपर अभ्यासक्रमाबाहेरील आल्याचे वाटले. मात्र, त्यानंतर विभागाकडून पेपर हा नियमित अभ्यासक्रमावर आधारित असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ऐनवेळी दूरशिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमावरील प्रश्न विद्यार्थीनींना देण्यात आले. या प्रकारामुळे पेपर नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशीराने सुरू झाला. मंगळवारीही इंग्रजीच्या पेपरमध्ये विद्यार्थीनींनी उत्तरपत्रिकांवर चुकीची माहिती भरल्याने त्यांना नव्या उत्तरपत्रिका देण्यात आल्या. यात सुमारे अर्धा तास उशीर झाला.

‘जबाबदारी परीक्षा विभागाची नाही’
तृतीय वर्ष बीए अभ्यासक्रमाचा एकच पेपर पुणे परीक्षा केंद्रावरील विद्यार्थीनींना देण्यात आला. त्यामुळे परीक्षा विभागाची यात काही चूक नाही. विद्यार्थीनींना स्टडी मटेरियल देण्यात घोळ झाला असेल तर, ती जबाबदारी परीक्षा विभागाची नाही, असे एसएनडीटीच्या मुंबईतील परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, विद्यापीठाच्या परीक्षेत होणाऱ्या गोंधळच्या या कारभाराबाबत विद्यार्थीनींमध्ये प्रचंड नाराजी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नीट’साठी आता देशात तेवीस केंद्रे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’साठी देशात २३ नवीन परीक्षा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सातारा, कोल्हापूर, अमरावती आणि अहमदनगर या चार जिल्ह्यांमध्येही अतिरिक्त केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) द्यावी लागते. राज्यात ‘नीट’च्या परीक्षेसाठी मर्यादित परीक्षा केंद्रांची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे परीक्षा केंद्र गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना खटाटोप करावा लागला होता. मात्र, आता परीक्षा केंद्रांची संख्या वाढविल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. राज्यात ‘नीट’साठी मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि नाशिक या सहा ठिकाणीच केंद्रे देण्यात आली होती. त्यात नव्याने केंद्रांना मंजुरी मिळाल्याने एकूण केंद्रांची संख्या दहावर पोहोचली आहे. यापूर्वी नीट परीक्षा ८० शहरांमध्ये घेतली जात होती. मात्र, ही केंद्रे अपुरी पडत होती. निर्णयात जाहीर झालेल्या २३ नव्या केंद्रामुळे २०१७ ची ‘नीट’ १०३ शहरांमध्ये होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दरम्यान, परीक्षा केंद्रांच्या वाढीसाठी ‘नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया’चे (एनएसयूआय) प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दैनंदिन शाखा ५७ हजारांवर

0
0

वर्षभरात सव्वालाख तरुण संघशिक्षा वर्गात दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाबद्दल तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता दिसून येत असून, गेल्या वर्षभरात सव्वालाख तरुणांनी संघशिक्षा वर्गात प्रशिक्षण घेतले आहे. देशभरातील तरुणांच्या वाढत्या सहभागामुळे संघाच्या शाखांमध्येही लक्षणीय वाढ झाली असून, दैनंदिन शाखांची संख्या ५७ हजारांच्या पुढे गेली आहे.
ष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या नुकत्याच कोईमतूर येथे झालेल्या बैठकीत संघाच्या वर्षभराचा कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यातून, तरुणांचा ओढा संघाकडे वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे, असा दावा पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह विनायक थोरात आणि संघाच्या पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे या वेळी उपस्थित होते.
संघातील तरुणांच्या वाढत्या संख्येमुळे शाखां वाढल्या आहेत. ५७ हजार दैनंदिन शाखांसह, १४, ८९६ साप्ताहिक आणि ८, २२६ मासिक अशा मिळून सुमारे ८० हजार शाखा सध्या कार्यरत आहेत. स्वयंसेवक आणि शाखांच्या वाढत्या संख्येमुळे देशभरात शिक्षण, आरोग्य, सामाजिक आणि स्वयंरोजगार अशा विविध स्वरूपात एक लाख ७० हजार सेवाकार्ये हाती घेण्यात आल्याचे जाधव यांनी नमूद केले. पश्चिम महाराष्ट्रात सुमारे पंचवीसशे कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘संघाच्या वेबसाइटला दररोज पाच हजार हिट्स मिळत असून, या सर्वांशी संपर्क साधून त्यांना स्वयंसेवक म्हणून जोडून घेण्याचे कामही सुरू आहे’, असे थोरात यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये जिहादींकडून वारंवार होत असलेला हिंसाचार, राज्य सरकारतर्फे राष्ट्रविरोधी शक्तींना दिले जाणारे उत्तेजन आणि हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येबद्दल गंभीर चिंता व्यक्त करणारा प्रस्ताव या प्रतिनिधी सभेत मंजूर करण्यात आला.
नागरिकांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेण्यासाठी पुणे महानगरातर्फे शहरात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नुकताच समर्थ भारत उपक्रम राबविण्यात आला. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला असून, काम करण्याची तयारी दाखविणाऱ्या नागरिकांना विविध संस्थांशी जोडण्यात आले आहे, असे करपे यांनी सांगितले.

संघाच्या गणवेशाबाबत काही काळ अनेकांना आक्षेप होता. त्यात झालेल्या बदलांमुळे कदाचित तरुणांचा कल अधिक वाढला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
नाना जाधव, संघचालक, पश्चिम महाराष्ट्र प्रांत

पुण्यातही शाखांचा विस्तार
अलीकडच्या काळात पुणे शहराचा वेगाने विस्तार झाला आहे. त्यामुळे, शहराच्या सर्व भागांमध्ये संघाच्या शाखा सुरू होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे निरीक्षण पुणे महानगरचे कार्यवाह महेश करपे यांनी नोंदवले. तसेच, दैनंदिन स्वरूपात शाखेसाठी वेळ मिळत नसल्याने अनेकांची ‘साप्ताहिक शाखे’ला पसंती मिळत आहे. यामध्ये, आयटी क्षेत्रातील तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, गेल्या वर्षीच्या ३८ साप्ताहिक शाखांचे प्रमाण आता १२८ पर्यंत वाढल्याचे करपे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीएमपीच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

भ्रष्टाचारावर हातोडा चालविणारे आणि कडक शिस्तीचे म्हणून गणले जाणारे तुकाराम मुंढे यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंढे हे नवी मुंबई महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जागी शुक्रवारीच राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक एन. रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पीएमपी माजी अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांची नऊ महिन्यांपूर्वी नाशिकच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली. तेव्हापासून पीएमपीच्या अध्यक्षपदाचा प्रभारी कारभार पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी पुण्यात येण्यास नापसंती व्यक्त केली. त्यामुळे अद्याप पीएमपीला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळालेला नाही. दरम्यान, मुंढे यांच्या बदलीसाठी नवी मुंबईतील अनेक प्रस्थापितांनी गेल्या काही महिन्यात प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेरीस शुक्रवारी यश मिळाले.

मुंढे हे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तेथून त्यांची बदली नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी मुंढे यांची कारकीर्द चांगलीच गाजली. मुंढे हे भ्रष्टाचाराला विरोध आणि पारदर्शक प्रशासनासाठी आग्रही अधिकारी म्हणून ओळखले जातात. श्रीकर परदेशी पीएमपीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी काहीच महिन्यांत पीएमपीच्या कारभारात आमूलाग्र बदल केला होता. त्यांच्यानंतरचे अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांनीही नावीन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती. मुंढे देखील याच स्वच्छ परंपरेतील अधिकारी असून पुण्यात त्यांचे स्वागत केले जाईल, अशी प्रतिक्रिया पुण्यातील प्रवासी संघटनांनी व्यक्त केली.

पुणे महानगर परिवहन महामंडळाचा अध्यक्ष म्हणून पूर्ण वेळ सनदी अधिकाऱ्याची नेमणूक करावी, यासाठी महाराष्ट्र कामगार मंचाने मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्यातर्फ अॅड. रामचंद्र कच्छवे यांनी याचिका दाखल केली आहे. पुढील आठवड्यामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे. या याचिकेमध्ये मोहिते यांनी पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कुणाल कुमार, राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य सचिव यांना प्रतिवादी केले आहे. पीएमपीच्या अध्यक्षपदी पूर्ण वेळ सक्षम व सनदी अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी विनंती यामध्ये केली आहे. ही विनंती एकप्रकारे मुंढे यांच्या नियुक्तीने पूर्ण झाली असून ही याचिकाच त्यामुळे निकाली निघाल्यात जमा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती आणि श्री क्षेत्र तुळापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३२८ व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (सोमवारी) सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तुळापूर येथे विविध कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, आमदार बाबूराव पाचर्णे, आमदार दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती तुळापूर गावचे सरपंच गणेश पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपसरपंच अमोल शिवले व हवेली तालुका भाजपचे उपाध्यक्ष अनिल शिवले आदी या वेळी उपस्थित होते.
श्री संगमेश्वराचा अभिषेक व श्री छत्रपती शंभुराजांच्या पूजेने सकाळी ८ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होईल. सकाळी ९.०० वाजता साखळदंडाचे पूजन होईल. त्यानंतर ह. भ. प. रोहिदास महाराज हांडे, शिवव्याख्याते गजानन वाव्हळ, शंभूव्याख्यात्या ह. भ. प. गितांजलीताई झेंडे यांची व्याख्याने होतील. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभूमहाराजांना साथ देणाऱ्या मावळ्यांच्या वंशजांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यानंतर खोपोली येथील शिवशाहीर वैभव घरत यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम होईल. श्री क्षेत्र पुरंदर ते श्री क्षेत्र तुळापूर या मार्गाने आलेल्या छत्रपती श्री संभाजी महाराज पालखीचे स्वागत करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा बांधकामांना अखेर संरक्षण नाहीच

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
राज्यभरातील शहरी भागांतील सर्व बेकायदा बांधकामांना संरक्षण देऊन ती नियमित करण्यासाठी राज्य सरकारने नव्याने तयार केलेले धोरण हायकोर्टाने पुन्हा फेटाळल्यामुळे पिंपरी-चिंचवडला सर्वाधिक फटका बसणार आहे. कारवाईची टांगती तलवार डोक्यावर कायम असल्याने भविष्यातील चिंतेने अनेकांना ग्रासले आहे.
जी बांधकामे मुळातच विकास नियंत्रण नियमावलीचे नियम धाब्यावर बसवून करण्यात आलेली आहेत. त्यांना सरसकट नियमित केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक रचना कायद्यांतर्गत (एमआरटीपी) शहरांचे करण्यात आलेले नियोजनच कोलमडून पडेल. सार्वजनिक प्राधिकरणांच्या जमिनींवर अतिक्रमण करून बांधलेल्या बेकायदा बांधकामांना नियमित केले, तर ते राज्यघटनेतील समानतेच्या हक्कांचे उल्लंघन करणारे ठरेल, असे निरीक्षण नोंदवून हायकोर्टाने बेकायदा बांधकामांच्या गंभीर प्रश्नावर सरकारला दुसऱ्यांदा दणका दिला आहे.
अनधिकृत आणि बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा कळीचा मुद्दा पिंपरी-चिंचवडमध्ये ऐरणीवर आहे. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या जाहिरनाम्यात या मुद्द्याला महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रचारकाळात ठोस आश्वासन दिले होते. त्यामुळे आशा पल्लवीत झालेल्या शहरवासीयांनीही भाजपला भरघोस मते दिली. परंतु, सुधारित धोरणही कोर्टाने फेटाळल्यामुळे आश्वासन हवेतच विरले की काय? अशी भावना निर्माण झाली आहे.
नागरिकांनी परवानगी न घेता बांधलेली अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी भाजप सरकार पहिल्यापासूनच प्रयत्न करीत आहे. त्याचे धोरणही तयार आहे. त्यात कोर्टाने सुचविलेल्या सुधारणा दुरुस्त करून ते पुन्हा कोर्टात सादर करण्यात आले आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाच्या आधीन राहून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत सोडविण्यात येईल, असे जाहिरनाम्यात नमूद केले होते. परंतु, कोर्टाच्या निर्णयामुळे आता कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिका प्रशासनानेही अनधिकृत कारवाईसाठी कठोर पावले उचलल्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीआय प्रकरणी ऐंशी लाख हस्तगत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यूपीआय अॅपद्वारे बँक ऑफ महाराष्ट्रची सहा कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींकडून ८० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. त्याला कोर्टाने ३१ मार्चंपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
स्वप्नील दिलीप विश्‍वासराव (रा. तेजेवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. तर आनंद मदनलाल लाहोटी (३३, सध्या रा. हडपसर. मूळ रा. औरंगाबाद), किरण आण्णासाहेब गावडे (२९, रा. औरंगाबाद), गणेश मारुती ढोमसे (३७,रा. तेजेवाडी, ता. जुन्नर) यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आरोपींच्या इतर आठ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी बँकेचे डेप्युटी झोनल मॅनेजर निरंजन पुरोहित यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रने रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार खातेदारांना पैसे मागविता तसेच पाठविता येण्यासाठी यूपीआय अॅप सुरू केले होते. खातेदारांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या अॅपद्वारे बँकेच्या सुमारे ५० खातेदारांनी त्यांच्या खात्यात रक्कम नसताना बँकेतून एकूण सहा कोटी १४ लाखांची रक्कम आरटीजीएसद्वारे दुसऱ्या बँकेच्या खात्यात वळविली. त्यानंतर ही रक्कम काढून घेतल्याचे बँकेला निदर्शनाला आले. या प्रकरणी स्वप्नील विश्‍वासराव याला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत आरोपींच्या ताब्यातून ८० लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. तसेच, आरोपींकडील १६ मोबाइल व १४ सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना मरू देणार का?

0
0

ज्येष्ठ लेखिका पुष्पा भावे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आम्ही रूग्णांना मरू देणार नाही, असे ओरडून सांगणारे मुख्यमंत्री कर्जाने हवालदिल झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मरू देणार का,’ असा संतप्त सवाल उपस्थित करून ज्येष्ठ लेखिका प्रा. पुष्पा भावे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. जागतिकीकरण झाले तरी दिवसेंदिवस समाज संकुचित होत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे आयोजित सामाजिक कृतज्ञता पुररस्कार वितरण समारंभात श्रीमती भावे बोलत होत्या. या वेळी सहकार आणि समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते गजानन खातू यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया आणि उषा ढवण यांना डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, सामाजिक कृतज्ञता निधीचे कार्यवाह सुभाष वारे आदी या वेळी उपस्थित होते.
‘मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीने किंचाळणे संस्कृतीच्या दृष्टीने बरे नाही. डॉक्टरांचा संप सुरू असताना रुग्णांना मरू देणार नाही, असे मुख्यमंत्री सांगतात. मात्र, तोच न्याय शेतकऱ्यांबाबतीत का नाही, कर्जापायी त्यांनी मरावे का,’ असा प्रश्न उपस्थित करून भा‍‍वे यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली. ‘नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांसारखी माणसे राजकारणात असल्याने गळून पडलेल्या माणुसकीच्या भिंती पुन्हा उभ्या झाल्या का असा प्रश्न सतावत आहे. जागतिक स्तरावर आपण वैश्विक होण्याऐवजी संकुचित होत चाललो आहोत. संकुचितपणाची भिंत घटनेच्या आधारे आपल्याला तोडायची आहे,’ याकडेही भावे यांनी लक्ष वेधले.
‘शेतकरी हवालदिल झालेला असताना मुख्यमंत्र्यांना साधी कर्जमाफीची ठोस भूमिका घेता येत नाही. कर्जमुक्ती आणि कर्जमाफी असा शब्दछल करून आवेशाने चर्चेचे बांध फोडले जातात. मात्र, वास्तवात शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी सरकारला काही घेणे देणे नाही,’ या शब्दांत डॉ. आढाव यांनी टीका केली. सरकारला यशाची मस्ती चढली असून, ते सुस्तावलेल्या अवस्थेत आहे. विधिमंडळात फक्त कर्जमाफीवर चर्चा सुरू असून कोणीही हमीभावावर बोलत नाही, हा सर्वांत मोठा धोका आहे. संसदीय लोकशाहीची उलथापालथ सुरू आहे. निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना मिळालेले यश मोठे असले तरी आमच्यासारखी सामान्य माणसे तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत, असे डॉ. आढाव यांनी सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images