Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अंमली पदार्थविक्री करणारे अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बावधन येथील सूर्यदत्त कॉलेजसमोर एमडी या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ८५ ग्रॅम अंमली पदार्थ आणि चारचाकी असा चार लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नितीन सुभाष सूर्यवंशी (वय ३४, रा. पिंपळे सौदागर, पिंपरी) आणि गौरांग मनहरभाई शहा (वय ३४, रा. शांतीकुंज सोसायटी, बडोदा, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बावधन येथील सूर्यदत्त कॉलेजसमोर दोन व्यक्ती एमडी देण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक अजय वाघमारे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी, स्वाती थोरात यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी सापळा रचला. स्विफ्टमधून एमडी देण्यासाठी आल्यानंतर या दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ८५ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्राउन शुगर विक्रेता अटकेत
पाटील इस्टेट येथे ब्राउन शुगरची विक्री करण्यास आलेल्या व्यक्तीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी सायंकाळी अटक केली. त्याच्याकडून अकरा ग्रॅम ब्राउन शुगर जप्त करण्यात आली आहे. नीरज अर्जुन टेकाळे (वय २४, रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी या पथकासह गस्त घालत असताना संशयावरून त्यांनी आरोपीला हटकले. त्यावेळी तो पळून जाऊ लागला. पथकाने पाठलग करून त्याला पकडले. त्यावेळी त्याच्याकडे ब्रान्न शुगरच्या पुड्या आढळून आल्या. त्याने ही ब्राउन शुगर अलीशेर लालमहंमद सौदागर आणि अशोक भांबुरे यांच्याकडून घेतल्याचे कबूल केले. या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृक्षगणनेत नोंदवली साडेसहा लाख झाडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या वृक्षगणनेमध्ये साडेसहा लाख वृक्षांची नोंद झाली आहे. मागील नऊ ते दहा महिन्यांमध्ये हे काम पूर्ण झाले असून, पुढील सव्वा ते दीड वर्षांत संपूर्ण शहराची वृक्षगणना पूर्ण करण्यात येणार आहे.
शहरातील वृक्षगणना करण्याचे पालिकेला बंधनकारक असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. शहरात कोणत्या प्रकारची झाडे आहेत, ती झाडे किती कार्बन शोषून घेतात, त्यांचे नेमके आयुष्य किती, झाडाचे वय किती आदी सर्व माहिती एका क्लिकवर मिळावी, यासाठी वृक्षगणना करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला. आतापर्यंत वृक्षगणनेसाठी नऊ कोटी रुपये खर्चण्यात आले आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे शहरात नव्याने लावलेल्या वृक्षांच्या माहितीची सातत्याने भर पडणार आहे. यापूर्वी पालिकेने २०१३मध्ये वृक्षगणना केली होती. त्यावेळी शहरात ३८ लाख ५० हजार झाडे असल्याचे समोर आले होते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू करण्यात आलेल्या वृक्षगणनेमुळे शहरातील कोणत्याही वृक्षासंबधी एकूण २० ते २२ प्रकारची माहिती पालिकेकडे जमा होणार आहे.
या गणनेमध्ये प्रत्येक वृक्षाचे त्या परिसराच्या नकाशावर अक्षांश-रेखांशांसह स्थान दिसेल, पर्यावरण संरक्षणात त्याची उपयुक्तता किती टक्के, तो फुलतो कधी, त्याला फळे कधी येतात ही देखील माहिती उपलब्ध होणार आहे. सर्वसाधारण १० सेंटीमीटर व्यासाचे खोड असलेले, ३ मीटर उंची असलेले, पालिका हद्दीतील सरकारी, खासगी, सार्वजनिक अशा कोणत्याही जागेवरील प्रत्येक झाडाची नोंद होणार आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले. येत्या वर्षभरात काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमबाह्य दंडातून सुटका?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘वाहतूक पोलिसांवरील कामाचा ताण हलका करण्याच्या उद्देशाने वाहनचालकांकडून गाडीच्या कागदपत्रांची मागणी करू नये,’ असा आदेश मुंबई वाहतूक विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर, वाहनाची कागदपत्रे आणि ‘पीयूसी’चा तगादा लावून जागेवरच केल्या जाणाऱ्या नियमबाह्य दंड आकारणीच्या छळवणुकीतून पुणेकरांची सुटका होणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मुंबईचे सहपोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी वाहतूक पोलिसांवरील अनावश्यक ताण कमी करण्यासाठी कागदपत्रे न तपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये वाहनांची कागदपत्रे, विविध कर भरल्याचे पावत्या तपासण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पुणे शहरात नाकाबंदीवेळी साधारणपणे वाहतूक पोलिस चालकाकडे सुरुवातीला ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी करतात. वाहन चालकाने ड्रायव्हिंग लायसन्स सादर केल्यानंतर, वाहनाची कागदपत्रे व ‘पीयूसी’ मागितले जाते. अनेकदा वाहन चालकांकडे ड्रायव्हिंग लायसन्स व ‘पीयूसी’ असते, मात्र कागदपत्रे उपलब्ध नसतात. त्यामुळे त्यांना दंड द्यावा लागतो. वाहतूक पोलिसांकडून काही वेळेला नाकाबंदीव्यतिरिक्त सिग्नलला थांबलेल्या वाहन चालकांकडे या कागदपत्रांची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास येते. यामध्ये वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा बहुतांश वेळ वाया जातो. त्यादरम्यान, त्यांचे वाहतूक नियमनाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे शहरातही वाहन चालकांकडे वाहनाच्या कागदपत्रांची मागणी करू नये, अशी चर्चा सुरू झाली आहे.

वाहतूक शाखेकडे १६५० पोलिस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या त्यापैकी सुमारे अकराशे कर्मचारी कार्यरत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वाहनांची संख्या ४४ लाखापेक्षा अधिक आहे. त्यात ३३ लाख दुचाकी, साडेसात लाख कार आणि साडेतीन लाख बस, ट्रॅक्टर व अन्य वाहनांचा समावेश आहे. पोलिस कर्मचारी व वाहनांची संख्या याचे गुणोत्तर पाहिल्या, चार हजार वाहनांमागे एक पोलिस कर्मचारी उपलब्ध आहे. वाहतूक कोंडीची भीषण परिस्थिती पाहता, वाहतूक नियमन चांगल्या प्रकारे होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

नियमाबद्दल अनभिज्ञ

वाहनचालकाकडे वाहनाची कागदपत्रे उपलब्ध नसल्यास १४ दिवसांच्या मुदतीत आणि ‘पीयूसी’ नसल्यास सात दिवसांच्या मुदतीत ते ते कागदपत्रे वाहतूक पोलिसांना सादर करू शकतात. यासाठी वाहनचालकांना जागेवर दंड देण्याची आवश्यकता नसते. मात्र, नागरिकांना या नियमाची फारशी माहिती नसल्याने ते दंडाला बळी पडतात. दरम्यान, केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११६ (२) प्रमाणे पोलिस उपनिरीक्षक पदावरील अधिकारीच वाहन चालकाकडे ‘पीयूसी’ मागणी करू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रॅक’, ‘सॉम’बाबत कारवाईचे आश्वासन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘इंजिनीअरिंगच्या ‘रॅक’ आणि ‘सॉम’ विषयाच्या परीक्षेमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आले असल्यास त्याची शहानिशा करून येत्या ४८ तासांत कारवाई करण्यात येईल. तसेच, याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे आणि शैक्षणिक मंडळाशी चर्चा करून नियमानुसार योग्य निर्णय घेतला जाईल,’ असे आश्वासन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी दिले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या ‘डिपेक्स’ समारंभाच्या समारोपप्रसंगी तावडे बोलत होते. ‘मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांना सातव्या सत्रात ‘रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग’ (रॅक) नावाचा, तर कम्प्युटर शाखेच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट सिस्टीम डिझाइन अँड अॅप्लिकेशन (सॉम) असा विषय आहे. निकालामध्ये बहुतांश विद्यार्थी ‘रॅक’ विषयात अनुत्तीर्ण झाले असून, इतर विषयांत ते उत्तीर्ण झाले आहे. या विषयाच्या पेपरमध्ये अभ्याक्रमाला अनुरूप प्रश्न आले नाहीत, तसेच अभ्यासक्रमातील एका भागावर प्रश्नच विचारण्यात आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रश्न सोडविता आले नाहीत. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना काही गुणांनी परीक्षेत अनुत्तीर्ण व्हावे लागले,’ असा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्यावर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला. मात्र, अद्याप त्याचा अंतिम निकाल लागलेला नाही.

‘कॉलेज बंद नाहीत’

पॉलिटेक्निकचा अभ्यास इंजिनीअरिंगच्या डिग्री अभ्यासक्रमाच्या तुलनेत अधिक प्रॅक्टिकलवर व कौशल्य विकासावर भर देणारा आहे. म्हणूनच हा अभ्यासक्रम डिग्री अभ्यासक्रमापेक्षा तुलनेने अधिक उपयुक्त आहे. पॉलिटेक्न‌िक कॉलेज बंद होणार नाहीत.

- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्गप्रेमींनी उधळली सिंहगडावर दारूपार्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोहगड, राजमाची किल्ल्यावर उघडकीस आलेल्या दारूपार्ट्यांच्या घटना ताज्या असतानाच शनिवारी रात्री सिंहगडावर रंगलेली पार्टी दुर्गप्रेमींनी उधळली. विनापरवाना मद्यपान करणाऱ्या उच्चभ्रू लोकांना ‘रंगेहाथ’ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, थोडेसे मद्यपान केले तर बिघडते कुठे, असे उत्तर देऊन पोलिसांनी पर्यटकांना शिक्षेशिवाय सोडून दिले.

पुरातत्त्व विभाग तसेच वन विभागाच्या नियमानुसार कोणत्याही किल्ल्यावर मद्यपान, मांसाहार आणि धूम्रपानास बंदी आहे. पण वीकेंड पार्ट्यांचे लोण आता गडांपर्यंत येऊन ठेपल्याने पुणे परिसरातील गडकिल्ल्यांवर सध्या दारूपार्ट्यांनी उच्छाद मांडला आहे. दोन महिन्यांपूर्वी लोहगड-विसापूर किल्ल्यावर पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय तंबू ठोकून मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. दुर्गप्रेमींनी तेथील पर्यटकांना मद्यपान करताना पकडले होते. गेल्या महिन्यात राजमाची किल्ल्यावरील दारू आणि मटण पार्टीचा डाव दुर्गप्रेमींनी उधळून लावला. आता सिंहगडावर हा प्रकार घडल्याने ऐतिहासिक वारसा असलेल्या गडांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सिंहगडावर रविवारी सकाळी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेसाठी शिवाधीन दुर्ग संवर्धन ग्रुपचे कार्यकर्ते शनिवारी रात्रीस मुक्कामासाठी गेले होते. रात्री बाराच्या दरम्यान त्यांना खासगी विश्रामगृहाबाहेर गोंधळ ऐकू आला. घटनास्थळी गेल्यावर दुर्गप्रेमींना तिथे दारूपार्टी सुरू असल्याचे दिसले. या सर्व प्रकाराचे त्यांनी मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग केले. पार्टी थांबवून त्यांनी संबंधितांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली नाही. आशुतोष देशमुख, अरविंद बोराडे, महेश रेणुसे आणि नंदकुमार मते यांनी दारूपार्टी उधळली आणि संबंधितांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

या प्रकाराबाबत देशमुख म्हणाले की,‘ कोंढाणेश्वर मंदिराजवळील गेस्ट हाउसमध्ये शनिवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. पार्टी करणारे लोक खासगी बँकेचे कर्मचारी होते. त्यामध्ये दोन महिलाही होत्या. ही दारूपार्टी सुरू असतानाचे संपूर्ण रेकॉर्डिंग आम्ही केले आहे. जेव्हा आम्ही त्यांच्याकडील सर्व बाटल्या जप्त केल्या आणि पोलिसांना कळविणार असल्याचे सांगितले, तेव्हा त्यांनी आमच्यावर पैसे देऊन प्रकरण मिटविण्यासाठी दबाव आणला. काही वेळातच पोलिस दाखल झाले. पोलिस त्यांना घेऊन अभिरूची पोलिस स्टेशनमध्ये गेले. आमचे दोन कार्यकर्तेही त्यांच्याबरोबर होते. मात्र, तिथे पोहोचल्यावर पोलिसांनी दुर्गप्रेमींनाच सल्ला देण्यास सुरुवात केली. थोडे मद्यपान केले तर बिघडते कुठे, असे सांगून थोड्यावेळात कोणत्याही कारवाईशिवाय त्या लोकांना सोडून देण्यात आले.’

बंदी कागदावरच...

या पूर्वी देखील आम्ही केलेल्या स्वच्छता मोहिमांदरम्यान गडावर मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. याचा अर्थ गडावर खासगी गेस्ट हाउसमध्ये नियमित मद्यपान होते. कागदावर मद्यपान आणि मांसाहारास बंदी असली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यास वन विभाग आणि पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होते आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

सिंहगड हे संरक्षित स्मारक आहे. गडावर मद्यपान आणि मांसाहारास बंदी आहे. पर्यटकांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गैरप्रकार टाळले पाहिजेत. या संदर्भात खासगी जागा मालकांशी आम्ही संवाद साधणार आहोत. गरज पडल्यास गैरप्रकार करणाऱ्यांवर पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करण्यात येईल.

विलास वाहणे, सहायक संचालक पुरातत्त्व विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची ‘हाता’ला साथ

$
0
0

टीम मटा, पुणे

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आज, मंगळवारी (२१ मार्च) अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी होणार आहेत. भारतीय जनता पक्षाचा उधळलेला वारू रोखण्यासाठी या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी ‘हात’मिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मराठवाड्यातील तीन, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रात दोन ठिकाणी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही नवी युती साकारण्याची शक्यता आहे.

भाजपला रोखण्यासाठी जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्यानुसार, काही ठिकाणी शिवसेनेने यापूर्वीच काँग्रेस अथवा राष्ट्रवादी किंवा या दोन्ही पक्षांच्या आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.

पुणे, नगरमध्ये आघाडी

पुणे : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण बहुमत असल्यामुळे त्यांचाच अध्यक्ष होईल. नगर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असून, त्यांना पूर्ण बहुमत आहे.

मराठवाड्यात ‘सोयीने मैत्री’

औरंगाबाद : मराठवाड्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसची सोयीनुसार मैत्रीची साथ आहे. जालन्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना ‘चकवा’ देण्यासाठी शिवसेना-काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, तर लातूरमध्ये भाजप स्वबळावर सत्तेत आहे. नांदेडमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार आहे. हिंगोलीतही भाजपला दूर ठेवण्यासाठी अन्य पक्ष एकत्र आले आहेत. उस्मानाबादमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना एकत्र आले आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट माजी आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या बाजूने जाण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्षपद हुकू शकते. तेथे भाजप-शिवसेना आणि शिवसंग्राम संघटना एकत्र आहेत.

नाशिकमध्ये माकप किंगमेकर

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेत शिवसेना काँग्रेसला साथ देणार आहे. या दोघांकडे मिळून ३४ सदस्य आहेत तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे ३५ सदस्य आहेत. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिसट पक्षाचे चार सदस्य ज्याला पाठिंबा देतील, त्या आघाडीचा अध्यक्ष होईल. जळगावात भाजपला काँग्रेसचा एक सदस्य मदत करणार आहे.

कोल्हापूर, सोलापुरात हाताला साथ

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजप आणि ताराराणी आघाडी, जनसुराज्य यांची आघाडी आहे. येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनाही भाजपच्या विरोधात आहे. सांगली जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना बहुमत नाही. येथे शिवसेनेने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण बहुमत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसला पूर्ण बहुमत आहे.


फिफ्टी-फिफ्टीवर सुटणार

नागपूर : विदर्भातील सहा जिल्हा परिषदांपैकी चंद्रपूर आणि वर्ध्यात एकहाती सत्ता मिळविल्याने भाजपचाच अध्यक्ष होणार आहे. बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली या चार जिल्हा परिषदा ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि सेना एकमेकांविरोधात निवडणूक लढविणार असून, हा सत्तासामना ‘फिफ्टी-फिफ्टी’वर सुटणार आहे. बुलडाणा आणि गडचिरोलीत भाजप तर अमरावती आणि यवतमाळात शिवसेना सत्तेतील भागीदार होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाड्यांना इमारतींची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

ग्रामीण भागात शिक्षणाचा श्रीगणेशा जिथून सुरू होतो त्या अंगणवाड्यांना बारामती तालुक्यात अनेक ठिकाणी स्वत:ची इमारत नाही. अनेक गावांत ग्रामपातळीवरील समाज मंदिर, खासगी इमारत, मंदिराच्या वऱ्हांड्यासारख्या जागेत अंगणवाड्यांचे वर्ग भरवले जातात. मालकीच्या इमारतीला मंजुरी मिळूनही अनेक महिने लोटले व त्यासाठीचा निधी उपलब्ध असूनही काम अद्याप सुरू झालेले नाही. अंगणवाड्यांच्या इमारतीच्या बांधकामाबाबत जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग अनभिज्ञ असल्याचे नुकतेच समोर आले आहे.

अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी अंदाजे ८ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध असूनही संबधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ४४ इमारतींची कामे सुरूच झालेली नाहीत. उर्वरित ९६ अंगणवाड्यांना इतरत्र कामकाज चालवावे लागणार असल्याचे अंगणवाडी प्रशासनाने ‘मटा’ला सांगितले. बारामतीत एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत ‘प्रकल्प एक’मध्ये एकूण २५२ अंगणवाड्या असून त्यापैकी फक्त १६९ अंगणवाड्यांना मालकीच्या इमारती आहेत. ८३ अंगणवाड्या उघड्यावर अथवा ग्रामपातळीवर इतरत्र व्यवस्था करण्यात आली आहे. १७ इमारतींना मंजुरी मिळूनही अद्याप एकही काम सुरू झाले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रकल्प दोनमध्ये १६४ अंगणवाड्या असून त्यापैकी केवळ १०७ अंगणवाड्यांना मालकीच्या इमारती आहेत. ५७ अंगणवाड्यांपैकी फक्त २७ अंगणवाड्यांना मंजुरी व निधी उपलब्ध असूनही १४ अंगणवाड्यांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. १३ अंगणवाड्यांचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. उर्वरित ३० अंगणवाड्यांना इमारतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मंदिराच्या वऱ्हांड्यात चार तास बसू द्या

तांदुळवाडी (दादापाटील नगर) या ठिकाणी धार्मिक अंधश्रद्धेपोटी येथील मुलांना मंदिराच्या वऱ्हांड्यात शिक्षण घेण्यास येथील श्रीमंत व आडदांड नागरिक विरोध करीत असल्याने गरिबांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी पडझड झालेल्या इमारतींचा आश्रय घेवा लागत आहे. मात्र, भीतीपोटी १२ वर्षांपासून याविरोधात एकही व्यक्ती तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे स्थानिक नागरिकांनी ‘मटा’ला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. आमच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी फक्त चार तास मंदिराच्या वऱ्हांड्यात जागा द्या, अशी मागणी पालकांनी केली आहे. यासंदर्भात माहिती घेऊन सांगेन, अशी प्रतिक्रिया बांधकाम विभागाचे उपअभियंता कांदाकुरे यांनी सांगितले.


४४ इमारतींना मंजुरीप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात आला व तो संबधित विभागाला वर्ग करण्यात आला. २०१७-१८ च्या मंजुरीत सेस म्हणून प्रत्येक इमारतीला एक लाख रुपये वाढीव निधी देण्यात आला आहे.

दत्तात्रय मुंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, आयसीडीएस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅशलेस व्यवहारांना विक्रेत्यांचाच खोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

केंद्र सरकारने नोटाबंदीनंतर कॅशलेस आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन दिले. मात्र, बारामतीत अनेक विक्रेते कार्डद्वारे पेमेंट स्वीकारण्यास टाळाटाळ करीत आहेत.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर चार महिन्यांनीही बारामती परिसरात कॅशलेस व्यवहार विक्रेते करीत नसल्याचे आढळून आले आहे. बारामतीत अनेक मोठ्या दुकांनासह सुपर मार्केटमध्ये डेबिट कार्डाद्वारे विशिष्ट रक्कमच स्वीकारण्यात येत आहे. भिगवण रस्त्यावरील एका सुपर मार्केटमध्ये तीनशे रुपयांच्या आत खरेदी केल्यास ग्राहकांना कार्डचे चार्जेस भरण्यास सांगण्यात येत आहे. अनेक दुकांनानी कार्डद्वारे व्यवहार टाळण्यासाठी स्वाइप मशिनच ठेवलेले नाही.

दुकानांबरोबरच पेट्रोल पंपांवरही हाच अनुभव ग्राहकांना येत आहे. शहरातील काही पेट्रोल पंपांवर स्वाइप मशिन असूनही ग्राहकांना ते बिघडल्याचे सांगून कॅशेलस व्यवहारास टाळाटाळ केली जात आहे. तर, सहकारी संस्थांच्या पेट्रोल पंपांवरही विशिष्ट रकमेचे पेट्रोल टाकले, तरच कार्डद्वारे पैसे स्वीकारले जातील, असे सांगितले जात आहे. शहरातील अनेक हॉटेलमध्येही कार्ड पेमेंट स्वीकारले जात नाही. विविध आजारांवरील उपचारांसाठी बारामती तालुक्यासह आसपासच्या तालुक्यांतून शहरातील रुग्णालयात रुग्ण येतात. मात्र, अनेक खासगी रुग्णालयांत कॅशलेस व्यवहारासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून आले.

इंदापूर रोडवरील एका पंपावर १०० रुपयांचे पेट्रोल टाकले, तरच कार्ड चालेल, असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे नाईलाजास्तव मला ५०ऐवजी शंभर रुपयांचे पेट्रोल टाकावे लागले.

- ज्ञानेश्वर पाटील, ग्राहक

नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांना चालना मिळेल, अशी आशा होती. खिशात रोख रक्कम बाळगायची गरज उरणार नाही असे वाटले. मात्र, मी ज्या-ज्या दुकानात गेलो तेथे कार्डने पैसे स्वीकारण्यास नकार देण्यात आला.

योगेश कुलकर्णी, ग्राहक

कॅशलेस व्यवहारांना विक्रेत्यांनी सहकार्य केले पाहिजे. त्यासाठी तातडीने व्यापारी महासंघाची मीटिंग घेतली घेऊन योग्य ते आदेश देण्यात येतील.

हेमंत निकम (उपविभागीय अधिकारी बारामती.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रभारी अधिष्ठात्यांची कुलगुरूंकडून निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक नुकतेच लागू करण्यात आले. यानुसार आता विद्यापीठात कायमस्वरूपी अधिष्ठाता नियुक्त करणे बंधनकारक आहे. परंतु, या प्रक्रियेला पुढील काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. याचा विचार करून मंगळवारी कुलुगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी यासाठी प्रभारी अधिष्ठात्यांची निवड केली आहे.

राज्यात एक मार्चपासून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा लागू करण्यात आला आहे. यासंदर्भातील अनुषंगिक प्रक्रियाही विद्यापीठात सुरू झाली आहे. यानुसार काही पदांच्या नावात बदल झाला आहे, तर काही ठिकाणी सर्व प्रशासकीय रचनाच बदलण्यात आली आहे. या कायद्यानुसार विद्यापीठातील अनेक विभाग आता चार विभागांच्या अंतर्गत घेण्यात आले आहेत. यासाठी चार अधिष्ठात्यांची नियुक्ती लवकरच करण्यात येणार आहे. परंतु, दरम्यानच्या काळात या विभागांचा कार्यभार पाहण्यासाठी कुलगुरूंनी प्रभारी अधिष्ठातांची नियुक्ती केली आहे. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा डॉ. व्ही. बी. गायकवाड, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा डॉ. प्रफुल्ल पवार, मानवविज्ञान विद्याशाखा डॉ. विजय खरे व आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा डॉ. दीपक माने यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ब्लॅकलिस्ट’ कंपनीच्या बस पुण्यात धावणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इतर शहरांमध्ये ‘ब्लॅकलिस्ट’ केलेल्या ‘अशोक ले-लँड’ कंपनीकडून पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) बस खरेदी करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप मंगळवारी काँग्रेसने केला. बस खरेदीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी पालिका आयुक्तांचा आग्रह असून, सदोष यंत्रणेसाठी दोषी धरण्यात आलेल्या कंपनीच्या बस पुण्यात धावणार का, अशी विचारणा करण्यात येत आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी एक हजार ५५० बसची खरेदी करण्याची प्रक्रिया सध्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामध्ये, एका ठराविक कंपनीकडून बस खरेदी करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची टीका काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली. सोलापूर महानगरपालिकेच्या बस खरेदीमध्ये संबंधित कंपनीच्या ‘चासी’ला क्रॅक गेल्याचे आरटीओच्या तपासणीत आढळून आले होते. त्यामुळे, संबंधित ठिकाणी या कंपनीला ‘ब्लॅकलिस्ट’ करण्यात आले असून, आता याच कंपनीकडून बस खरेदी करण्याचा आग्रह धरला जात आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

याच कंपनीकडून बस खरेदी करायची असेल, तर सोलापूरप्रमाणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून त्याची पूर्वतपासणी करून त्याचा अहवाल सादर केला जावा, अशी मागणी शिंदे यांनी पालिका आयुक्त कुमार यांच्याकडे केली आहे. तसेच, चासी खराब असलेल्या बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या, तर भविष्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती असून, या नुकसानीला आपल्याला जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी आयुक्तांना दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीसहून अधिक जण पहिल्यांदाच समित्यांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांसह पालिका निवडणुकांपूर्वी पक्षात दाखल झालेल्या बहुतेकांची योग्य दखल घेऊन, त्यांची विविध समित्यांवरील सदस्यपदी मंगळवारी निवड करण्यात आली. भाजपकडून प्रथमच निवडून आलेल्या सुमारे ७० नगरसेवकांपैकी तीसहून अधिक लोकप्रतिनिधींना विषय समित्यांवर काम करण्याची संधी मिळणार आहे.

महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या खास सभेमध्ये स्थायी समितीसह विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि क्रीडा या सर्व समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. स्थायी समितीच्या १६, तर इतर विषय समित्यांच्या १३ सदस्यांमध्ये एकहाती सत्तेमुळे भाजपचे वर्चस्व आहे.

स्थायी समितीवर अपेक्षेनुसार पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांना प्राधान्याने स्थान देण्यात आले आहे. त्यामध्ये, मुरलीधर मोहोळ, सुनील कांबळे, अनिल टिंगरे, नीलिमा खाडे, राजा बराटे, मंजूषा नागपुरे, कविता वैरागे यांचा समावेश आहे. त्याशिवाय, पहिल्यांदाच निवडून आलेले योगेश समेळ, मारुती तुपे आणि हरिदास चरवड यांनाही स्थायी समितीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप बराटे, आनंद अलकुंटे, रेखा टिंगरे आणि प्रिया गदादे यांची निवड झाली. शिवसेनेकडून प्रमोद भानगिरे आणि काँग्रेसकडून अविनाश बागवे यांची निवड झाली.

इतर विषय समित्या आणि सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे :

शहर सुधारणा समिती : महेश लडकत, धीरज घाटे, महेश वाबळे, उज्ज्वला जंगले, किरण दगडे-पाटील, माधुरी सहस्रबुद्धे, स्मिता वस्ते, शीतल सावंत (सर्व भाजप), सचिन दोडके, प्रदीप गायकवाड, सुमन पठारे (राष्ट्रवादी काँग्रेस), लता राजगुरू (काँग्रेस), बाळा ओसवाल (शिवसेना)

विधी समिती : सुनीता गलांडे, मनीषा लडकत, साईदिशा माने, गायत्री खडके-सूर्यवंशी, राजश्री नवले, मनीषा कदम, जयंत भावे, राजेंद्र शिळीमकर (सर्व भाजप), भैय्यासाहेब जाधव, हाजी गफूर पठाण, दीपाली धुमाळ (राष्ट्रवादी काँग्रेस), चंदू कदम (काँग्रेस), अविनाश साळवे (शिवसेना)

महिला व बालकल्याण समिती : राणी भोसले, मंजुश्री खर्डेकर, सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, मुक्ता जगताप, ज्योती गोसावी, वृषाली कामठे, अर्चना मुसळे (सर्व भाजप), अश्विनी कदम, सायली वांजळे, लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), चाँदबी नदाफ (काँग्रेस) संगीता ठोसर (शिवसेना)

क्रीडा समिती : सम्राट थोरात, आनंद रिठे, श्वेता खोसे-गलांडे, ज्योत्स्ना एकबोटे, संजय घुले, वृषाली चौधरी, धनराज घोगरे, अमोल बालवडकर (सर्व भाजप), बाळा धनकवडे, युवराज बेलदरे, हेमलता मगर (राष्ट्रवादी काँग्रेस), रफीक शेख (काँग्रेस) विशाल धनवडे (शिवसेना)


भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांनाही संधी

निवडणुकीपूर्वी विविध पक्षांमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या आणि ‘कमळ’ चिन्हावर निवडून आलेल्यांनाही पहिल्याच वर्षी स्थायी समितीमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे. महापालिकेतील कामाचा पूर्वानुभव आणि त्यांच्या प्रभागामध्ये भाजपला मिळवून दिलेले यश, याचा विचार करून स्थायी समिती सदस्यपदी अनिल टिंगरे आणि राजाभाऊ बराटे यांची वर्णी लागली आहे. तर, शीतल सावंत (शहर सुधारणा), सुनीता गलांडे (विधी) आणि आनंद रिठे (क्रीडा) या इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सदस्यांनाही विविध समित्यांवर संधी मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपीवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या विकास आराखड्याला (डीपी) मान्यता देताना राज्य सरकारने केलेल्या बदलांचे सादरीकरण सर्वसाधारण सभेत झाले पाहिजे, या मागणीवरून मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. आरोप-प्रत्यारोप आणि घोषणाबाजीचे हे नाट्य महापौरांसमोरच सुमारे अर्धा तास सुरू होते. सभागृहातील सर्वच सदस्य एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने काही वेळ गोंधळाची परिस्थितीच निर्माण झाली होती.

विविध विषय समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या करण्यासाठी मंगळवारी महापालिकेच्या खास सभेला सुरुवात होताच, सर्वपक्षीय विरोधकांनी डीपीवरून आंदोलन सुरू केले. ‘डीपीचे सादरीकरण झालेच पाहिजे’, ‘डीपीतील बदल नेमके कोणाच्या हिताचे’ असे फलक घेत राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले आणि मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्यासह सर्वच सदस्य महापौरांसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले होते. त्यांच्या घोषणाबाजीला सत्ताधारी बाकांवरून प्रतिसाद दिला जात होता. ‘तुमच्यामुळेच एवढी वर्षे डीपी रखडला. त्यात झालेल्या चुका आम्हीच दुरुस्त केल्या’, असा दावा भाजपच्या सदस्यांनी केला.

सर्व विरोधकांचे आंदोलन सुरू असताना, पालिका आयुक्त कुणाल कुमार सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे, डीपीच्या त्रिसदस्यीय समितीमध्ये असलेल्या कुमार यांनीच त्याची माहिती द्यावी, अशीही मागणी लावून धरण्यात आली. महापौर मुक्ता टिळक यांनी विरोधी सदस्यांना जागेवर बसण्याचे आवाहन केले; परंतु तरीही घोषणाबाजी सुरू होती. विरोधकांना उत्तर देण्यासाठी भाजपचे सर्व सदस्यही महापौरांसमोर आले. त्यामुळे, अभूतपूर्व गोंधळाची स्थिती निर्माण झाली. विरोधकांनी भाजप सरकारविरोधात, तर भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात घोषणा दिल्या. ‘गली-गली मे शोर है, काँग्रेस-राष्ट्रवादी चोर है’ या सत्ताधाऱ्यांच्या घोषणेला, तत्परतेने ‘गली-गली मे शोर हे, भाजप सरकार चोर है’चे प्रत्युत्तर दिले गेले. याच दरम्यान अखेर आयुक्त कुमार यांचे सभागृहात आगमन झाले. त्यानंतर, पुन्हा महापौरांनी सर्वांना जागेवर बसण्याचे आवाहन केल्यानंतर अखेर हा गोंधळ आटोक्यात आला. आयुक्तांनी डीपीवर खुलासा केला, तरीही त्याने विरोधी पक्षांचे समाधान झाले नाही. परंतु, आयुक्तांच्या खुलाशानंतर कोणालाही बोलता येणार नाही, असे स्पष्ट करून महापौरांनी तातडीने पुढचा विषय घेण्याचे आदेश दिल्याने अखेर या वादावर पडदा पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणांच्या धाडसामुळे वाचले दोघांचे प्राण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हडपसर

कॅनॉलमध्ये पाय घसरून पडलेल्या आठ वर्षांच्या बहिणीला वाचण्यासाठी सहा वर्षांच्या भावाने कॅनॉलमध्ये उडी मारली. मात्र, दोघेही पाण्यात बुडत असल्याचे पाहून जवळील लहान मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर तेथील तरुणांनी या बहीण-भावांना कॅनॉलमधून सुखरूप बाहेर काढले.

मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोंधळेनगर मारुती मंदिराच्या मागील कॅनॉलमध्ये घडली. आदित्य नरेश सिंग (वय ६), विनीता नरेश सिंग (वय ८) अशी कॅनॉलमध्ये पडलेल्या बहीण-भावांची नावे आहेत. आदित्य व विनीत हे दोघे घराजवळील कॅनॉलजवळील मारुती मंदिराशेजारी खेळत होते. खेळता खेळता ते कॅनॉलजडवळ गेले. विनीताचा पाय घसरून ती कॅनॉलमध्ये पडली. ती पडल्यानंतर तिच्या लहान भावानेही बहिणीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, दोघांनाही पाण्यातून बाहेर येता आले नाही. दोघेही पाण्यात बुडत असल्याचे पाहून जवळील इतर लहान मुलांनी आरडाओरडा सुरू केला.

मुलांचा आरडाओरडा ऐकून आकाश जाधव, योगेश सावंत, प्रवीण सुतार व अक्षय सूर्यवंशी या तरुणांनी कॅनॉलजवळ धाव घेतली. आकाश जाधव व योगेश सावंत या तरुणांनी तात्काळ कॅनॉलमध्ये उडी मारली आणि बहीण-भावांना बाहेर काढले. दोघांच्या पोटातील पाणी बाहेर काढले. एका रिक्षावाल्याच्या मदतीने या दोघांना साने गुरुजी हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमधील कर्मचारी व डॉक्टरांनी या दोघांवर उपचार सुरू केले आहेत. बहीण-भावांचे प्राण वाचवणाऱ्या तरुणांचे मुलांच्या आई वडिलांनी आभार मानले. याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस भरतीमध्ये ‘बायोमेट्रिक’चा वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहर पोलिस दलातील २३९ पोलिस शिपायांच्या जागांसाठी बुधवारपासून शिवाजीनगर पोलिस मुख्यालय येथे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गेल्या पोलिस भरतीमध्ये डमी विद्यार्थ्यांचे रॅकेट आढळून आल्यानंतर पोलिस भरतीसाठी पहिल्यांदाच ‘बायोमेट्रिक’ पद्धतीचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक चाचणीच्या वेळी उमेदवाराचे ‘बायोमेट्रिक थंब’ घेतले जाईल. या भरतीसाठी साधारण ३५ हजार अर्ज आले आहेत.

राज्यात सर्व पोलिस आस्थापनाच्या ठिकाणी ऑनलाइन पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी २० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करायचे होते. पुणे शहर पोलिस दलातील २३९ जागांसाठी ३५ हजार अर्ज आले आहेत. २२ मार्चपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियामध्ये चाळीस हजारांपेक्षा जास्त अर्ज आले होते. या भरती प्रक्रियेत डमी विद्यार्थी परीक्षेला बसविण्यात आल्याचे प्रकार समोर आले होते. या प्रकरणी पुण्यात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करत आहे.

पुणे पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत डमी विद्यार्थ्यांचा प्रकार टाळण्यासाठी पहिल्यांदाच बायोमेट्रिक पद्धतीचा वापर केला जाणार आहे. भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची छाती व उंची मोजणीच्या वेळी उमेदवारांचे बायोमेट्रिक थंब घेतले जाईल. त्यानंतर इतर शारीरिक चाचणीच्या वेळी आणि बालेवाडी येथे होणाऱ्या १६०० मीटर धावण्याच्या चाचणीच्या वेळी बायोमेट्रिक थंब घेण्यात येणार आहे. तसेच, लेखी परीक्षेच्या वेळी ही माहिती ठेवून त्या ठिकाणी बायोमेट्रिक थंब घेतले जाईल. त्यामुळे डमी विद्यार्थी परिक्षेला आला, तरी तात्काळ पकडला जाणार आहे. भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पोलिसांकडून बायोमेट्रिक पद्धत राबविण्यात येत असल्याचे सहायक पोलिस आयुक्त गणपत माडगुळकर यांनी सांगितले.

पुणे ग्रामीणमध्ये १६ हजार अर्ज

पुणे ग्रामीणमध्ये बुधवारपासून पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीमध्ये पोलिस शिपायाच्या ८० जागांसाठी तब्बल १६ हजार २४१ अर्ज आले आहेत. पुणे ग्रामीण मुख्यालयाच्या मैदानावर बुधवारी सकाळी पाच वाजल्यापासून भरती प्रक्रिया राबिवण्यात येईल. पहिल्या दिवशी एक हजार उमेदवार व दुसऱ्या दिवशीपासून १५०० उमेदवार शारिरिक व मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटिसांनंतरही डॉक्टरांचा संप सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई हायकोर्टासह वैद्यकीय शिक्षण खात्याच्या आदेशानंतर ससून हॉस्पिटल प्रशासनाने सामूहिक रजेवर गेलेल्या २५० डॉक्टरांना नोटिसा जारी करून कारवाईचा बडगा उगारला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत निवासी डॉक्टर टप्प्याटप्प्याने कामावर हजर होऊ लागले. परंतु, रात्री उशिरा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांनी घेतला.

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह राज्यातील सरकारी मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेले होते. दुसऱ्या दिवशी ते रजेवरच होते. दरम्यान, हायकोर्टात जनहित याचेकिवर सुनावणी झाली. त्यामध्ये हायकोर्टाने निवासी डॉक्टरांची कानउघडणी केली. त्यावेळी ‘भीती वाटत असेल, तर नोकरी सोडा’ असा सज्जड दमच हायकोर्टाने भरला. त्याशिवाय ‘डॉक्टरांना कामावर हजर करून घ्या,’ असे आदेश वैद्यकीय शिक्षण खात्याला दिले. आदेशानंतर वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजना संबंधित निवासी डॉक्टरांना रात्री आठपर्यंत कामावर हजर राहण्याचे लेखी आदेश जारी केले. त्या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्वच निवासी डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली. दुपारनंतर ‘कामावर पुन्हा यायचे, की नाही की संप सुरूच ठेवायचा’ याबाबत विचारविनिमय सुरू झाला.

दरम्यान, वैद्यकीय शिक्षण खात्याचे आदेश मिळताच बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये त्यासंदर्भात पावले उचलण्यात आली. कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी निवासी डॉक्टरांसमोर हायकोर्टासह वैद्यकीय शिक्षण खात्याने दिलेल्या आदेशाचा पुनरुच्चार केला. त्या वेळी कामावर हजर होण्याचे आवाहन करून त्यांना नोटिसा जारी करण्यात येणार असल्याचा इशाराही दिला. त्यानंतर निवासी डॉक्टरांच्या काही प्रतिनिधींशी डॉ. चंदनवाले यांनी सायंकाळी सात वाजता बैठक घेऊन त्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले. तसेच, सर्व डॉक्टरांना नोटिसाही दिल्या. त्यानंतर निवासी डॉक्टर रात्री उशिरापर्यंत एकेक करून कामावर हजर होऊ लागले.

दोन दिवस पुकारलेल्या संप वजा सामूहिक रजेमुळे ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवा कोलमडली. अनेक पेशंटना उपचाराचा फॉलोअप घेण्यात अडचणी आल्या. अनेक पेशंटना उपचार मिळण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांची वाट पहावी लागली. तर, निवासी डॉक्टर कामावर नसल्याने अनेक वरिष्ठ डॉक्टरांना आंतररुग्ण तसेच बाह्यरुग्णमधील पेशंट तपासण्यासाठी पळापळ करावी लागल्याचे ससूनमधील काही डॉक्टरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्योगपतीच्या कारमधून रोकड पळविली

$
0
0

पुणे : उद्योगपतीच्या कारचे लॉक उघडून चोरांनी पाच लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर घडली. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंधरा मिनिटांमध्ये रोकडची बॅग मगरपट्टा येथे आढळून आली.

याबाबत राकेश जैन (वय ४२, रा. बिबवेवाडी-कोंढवा रस्ता) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री येथे राकेश जैन यांची केमिकल कंपनी आहे. सोमवारी दुपारी त्यांनी बँकेतून पाच लाख रुपये काढले. ती बॅग कारमध्ये ठेवली. काही वेळाने दोघे जण दुचाकीवरून आले. त्यांनी कारचे चाक पंक्चर झाल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी बिबवेवाडी-कोंढवा रस्यावरील इशा एमरल्ड सोसायटीच्या पुढे असलेल्या पंक्चरच्या दुकानावर कार नेली. तेथे पंक्चर काढण्यासाठी कार लावलेली असताना कारचे लॉक चोरांनी उघडून रोकडसह बॅग लंपास केली. जैन यांनी याची पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी त्वरित तपास सुरू केला. काही वेळाने जैन यांना त्यांची बॅग मगरपट्टा येथे पडल्याची माहिती एकाने फोन करून दिली. त्या वेळी पोलिस त्या ठिकाणी गेले असता बॅगमधील रोकड चोरीला गेली होती. जैन यांची महत्त्वाची कागदपत्रे त्यांना मिळाली.

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता त्यांना त्यामध्ये स्पष्ट काहीही दिसले नाही. या प्रकरणी उपनिरीक्षक ए. डी. पडळकर हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वर्ल्डवाइड’चे संचालक, इतरांकडून कोट्यवधी जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी पुण्यातील ‘वर्ल्डवाइड ऑइलफिल्ड्स मशिन कंपनी’चे संचालक आणि अन्य व्यक्तींकडून १४.६९ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. नोटाबंदीच्या काळात प्रीव्हेन्शन ऑफ मनी लॉँडरिंग अॅक्टनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. यापैकी १० कोटी रुपयांची रक्कम ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या पर्वती शाखेतील लॉकरमधून जप्त करण्यात आली होती.

केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्ल्डवाइड ऑइलफिल्ड मशिन कंपनीचे संचालक सुधीर पुराणिक, सीएफओ मंगेश अन्नछत्रे आणि ईशान्य मोटर्सचे सत्येन गठाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण विभागाच्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित कंपनीने नोटाबंदीच्या काळात विविध व्यक्तींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नव्या किंवा वैध चलनातील नोटा मिळवल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला होता.

त्यानंतर ईडीतर्फे सीबीआयच्या तक्रारीनुसार पीएमएलए २००२ अंतर्गत वर्ल्डवाइड ऑइलफिल्ड मशिन्स कंपनीची चौकशी सुरू करण्यात आली. पुराणिक आणि अन्नछत्रे यांनी गठाणी व त्यांच्या साथीदारांच्या मदतीने बाद नोटा वैध चलनात बदलून घेतल्या. त्यासाठी संबंधितांना मोठी रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती.

दरम्यान, यापैकी दहा कोटींची रक्कम वर्ल्डवाइड ऑइलफिल्ड कंपनीच्या नावावर ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या पर्वती शाखेत असलेल्या लॉकरमध्ये ठेवण्यात आली होती. ही रक्कम प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात जप्त करण्यात आली होती. आता ईडीने मात्र, या व्यक्तींकडून एकूण १४.६९ कोटी रुपयांची रक्कम जप्त केल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकत करवसुलीची मोहीम तीव्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मार्च अखेर जवळ आल्याने मिळकतकराची अधिकाधिक थकबाकी ‌वसूल करून पालिकेच्या तिजोरीत पैसे जमा करण्यासाठी पालिकेच्या मिळकत कर विभागाने थकबाकी वसुलीची मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळकतकर विभागाने मंगळवारी शहरातील ‌विविध भागांत कारवाई करून ६२ फ्लॅट, ११ दुकाने यांच्यासह शैक्षणिक संस्था, ज्यूस बार यांना सील ठोकले. कोट्यवधी रुपयांची मिळकतकराची थकबाकी वसूल केली. पुढील आठ दिवस ही कारवाई अधिक कडक करण्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत.

महापालिकेचा थकित मिळकतकर भरावा, यासाठी पालिका प्रशासनाने अनेक योजना राबविल्या. मात्र, त्यानंतरही शहरातील अनेक मिळकतदारांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. वारंवार योजना राबवूनदेखील याकडे दुर्लक्ष करून थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींना नोटीस पाठविण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. पालिकेच्या बजेटमध्ये ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मिळकतींचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने घेतला आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मिळकतींना सील ठोकण्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे. यासाठी पालिकेच्या मिळकत विभागाने पथकेही तयार केली आहेत. सोमवारी दिवसभरात कोंढवा भागातील शालिमार हिल या ११ इमारतींमधील १०८ फ्लॅटपैकी ६२ फ्लॅट, स्वीमिंग टँक, क्लब, सोसायटी ऑफिस यांच्याकडे तब्बल २ कोटी १३ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी न भरल्याने पालिकेतील अधिकाऱ्यांनी या सर्वांना सील लावले. गाडीतळ, हडपसर येथील पीएमपीएमएलने भाडेतत्वावर दिलेल्या गाळ्यांमधील दुकानदारांनी मिळकतकर भरण्यास असमर्थता दाखविल्याने त्यांनाही पालिकेने सील ठोकले. तसेच, मांजरी फाटा येथील फॉर्च्युन इस्टेट येथील सहा दुकाने सील करण्यात आली.

थकबाकी असलेल्या काही मिळकतदारांनी तातडीने पैसे भरण्याची तयारी दाखविल्याने त्यांच्याकडून थकबाकीची कोट्यवधी रुपयांची रक्कम पालिकेच्या पथकांनी विविध भागांतून वसूल केली. अधिकाधिक थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका आयुक्तांनी मिळकतकर विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन थकबाकी वसूल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या शहरातील मिळकतींची यादी प्रशासनाने तयार केली असून संबंधितांना नोटीस दिली जात आहे. यापुढील काळातही ही मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयास्पद व्यवहारांवर लक्ष

$
0
0

Prasad.Panse @timesgroup.com
Tweet : @prasadpanseMT

पुणे : नोटाबंदीनंतरच्या काळात पुणे विभागातील तब्बल २२ हजार व्यक्तींनी संशयास्पद व्यवहार केले आहेत. त्यांची यादीच दिल्लीहून पुण्याला पाठविण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर सहकारी पतसंस्थांवरील सर्वेक्षणामधून मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी ठेवी आढळत आहेत. दरम्यान, आतापर्यंत पुणे विभागातून २५० कोटी रुपयांची अघोषित संपत्ती शोधण्यात प्राप्तिकर विभागाला यश आले आहे.

प्राप्तिकर विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘मटा’ला ही माहिती दिली. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर सर्वांच्याच बँक व्यवहारांवर प्राप्तिकर विभागाने नजर ठेवली होती. नोटाबंदीच्या काळात झालेल्या सर्व व्यवहारांचे तपशील प्राप्तिकर विभागाने बँकांकडून मिळवले आहेत. तसेच अन्य काही माध्यमातूनही ही माहिती संकलित करण्यात आली आहे. त्याचे विश्लेषण बेंगळुरू येथील ‘डेटा अॅनॅलिसिस सेंटर’ आणि दिल्लीतील मुख्यालयात सुरू आहे. हा माहितीसाठा प्रचंड मोठा असल्याने त्याच्या विश्लेषणासाठी मोठा कालावधी लागणार आहे. विश्लेषणानंतर संशयास्पद व्यवहार आढळणाऱ्या व्यक्ती किंवा खात्यांची माहिती दिल्ली कार्यालयाकडून संबंधित कार्यालयांना पाठविण्यात येत आहे.

‘नोटाबंदीच्या काळात पुणे विभागातून संशयास्पद व्यवहार झालेल्या खात्यांची यादी दिल्लीहून पुणे कार्यालयाला पाठविण्यात आली आहे. पुणे विभागात नागपूर व मुंबई विभाग सोडून राज्यातले सर्व अन्य जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये तब्बल २२ हजार व्यक्तींचा समावेश आहे,’ असे सूत्रांनी सांगितले.

पतसंस्थांवरही करडी नजर

राज्यभरातील सहकारी पतसंस्थाही प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. पुणे विभागातील १५ हून अधिक पतसंस्थांवर सर्व्हे करण्यात आले आहेत. यामध्ये पुण्यातील काही मल्टिस्टेट, नागरी व बिगरशेती पतसंस्थांचा समावेश आहे. एका मल्टिस्टेट पतसंस्थेच्या संचालकांकडे आठ कोटी रुपयांच्या ठेवी बेहिशेबी असल्याचे आढळले आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनेते याकूब सईद ८३ व्या वर्षी ‘डॉक्टर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘नटरंग,’ ‘मुन्नाभाई एमबीबीएस,’ तसेच नुकताच प्रदर्शित झालेला ‘जॉली एलएलबी २,’ अशा विविध चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते याकूब सईद आता डॉ. याकूब सईद झाले आहेत. सईद यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली आहे. ‘उर्दू साहित्याचे भारतीय चित्रपटातील योगदान’ या विषयात पीएचडी करून त्यांनी महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकला आहे. त्यांचा शोधनिबंध लवकरच मराठीत पुस्तक रूपातही येत आहे.

मुंबई दूरदर्शनचे माजी संचालक, आकाशवाणीच्या विविध विभागांचे माजी प्रमुख असलेले सईद कसलेले अभिनेते म्हणूनही परिचित आहेत. १९९२ मध्ये ते कोलकाता दूरदर्शनचे संचालक म्हणून निवृत्त झाले. तेव्हापासून विविध चित्रपटांतून छोट्या, पण महत्त्वाच्या आणि आशयपूर्ण भूमिका त्यांनी केल्या आहेत.

सईद यांची बबन प्रभू यांच्यासह दूरदर्शनवर सादर झालेली ‘हास परिहास’ ही विनोदी मालिका गाजली होती. त्यांचे ‘मुंगीची सावली’ हे आत्मचरित्रात्मक आठवणींचे पुस्तक; तसेच ‘हास परिहास’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. ‘उर्दू साहित्याचे चित्रपटातील योगदान मराठीतून रसिकांसमोर यावे यासाठी शोधनिबंध पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध करण्याचे काम लोकवाङ्मयगृहातर्फे केले जात आहे. हिंदीमध्ये ते प्रसिद्ध होणार आहे,’ असे सईद यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images