Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

काँग्रेस, सेनेचा स्वीकृत सदस्य निवडणार चिठ्ठीद्वारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी दहा जागा मिळाल्याने स्वीकृत सदस्य कोणत्या पक्षाचा घ्यायचा याचा निर्णय चिठ्ठी काढून करावा लागणार आहे. महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार पाच सदस्यांना सभागृहात स्वीकृत म्हणून घेता येते. प्रत्येक राजकीय पक्षाच्या संख्याबळानुसार ही सदस्य संख्या ठरते. महापालिकेत सर्वाधिक जागा मिळून सत्ताधारी ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला पाचपैकी तीन जागा मिळणार असून, विरोधी पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादीला एक जागा मिळणार आहे. एक जागा कोणत्या पक्षाला द्यायची याचा निर्णय चिठ्ठी काढून करावा लागणार आहे. सभागृहात पाचवा स्वीकृत सदस्य कोणाचा जाणार याचा निकाल चिठ्ठीवर होणार आहे.
शहरातील ४१ प्रभागातील १६२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल गेल्या महिन्यात झाला असून, ९८ जागा मिळून भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पालिका कायद्यात पाच सदस्य स्वीकृत घेण्याची तरतूद असल्याने या जागांवर आपल्याला संधी मिळावी, यासाठी भाजपच्या अनेक इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे. स्वीकृत सदस्यांबरोबरच स्थायी समिती, विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, क्रीडा समिती यावर सभासदांची निवड केली जाणार आहे. पालिकेतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळानुसार या समितीवर संधी दिली जाणार आहे. स्थायी समितीत १६ सदस्य असल्याने पालिकेत असलेल्या संख्याबळानुसार भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे चार, काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका सभासदाला संधी मिळणार आहे. इतर समित्यांची सदस्य संख्या १३ असल्याने भाजपचे आठ, राष्ट्रवादीचे तीन आणि काँग्रेस, शिवसेनेच्या प्रत्येकी एक सदस्याला संधी मिळणार आहे.
...
नियुक्ती होणार येत्या मंगळवारी
‘महापालिकेतील पक्षबळानुसार प्रत्येक समितीत राजकीय पक्षांचे किती सभासद असतील, याची यादी नगरसचिव कार्यालयाने पालिकेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांना पाठविली आहे. या समितीच्या सदस्यांची नियुक्ती येत्या मंगळवारी (२१ मार्चला) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार असल्याने गटनेत्यांनी सभासदांची नावे बंद पाकिटातून सभेच्या वेळेस महापौरांकडे सादर करावीत,’ असे नगरसचिव सुनील पारखी यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जमाफी नको; शेतमालाला हमीभाव द्या

$
0
0

बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, बारामती

‘राजकारण्यांनी कर्जमाफी नावावर नवीन राजकारण सुरू केले आहे. सर्व पक्षांचे राजकारण होते; मात्र आमचा नाहक जीव जातो. आम्हांला कर्जमाफी नको; तर शेतीला पाणी, कमी दरात वीज आणि शेती उत्पादनाला हमी भाव द्या,’ अशी मागणी बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी ‘मटा’शी बोलताना केली.

‘आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला किती प्रमाणात झाला हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. ज्या शेतकऱ्यांना खरोखरच कर्जमाफीची गरज होती त्यांना एक रुपयाचीही कर्जमाफी झाली नाही. तसेच, ज्या शेतकऱ्यांचे मोठे व्यवसाय आहेत, दारात जेसीबी मशिन, ट्रक, ट्रॅक्टर, आलिशान गाड्या आहेत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दुहेरी-तिहेरी फायदा झाला आहे,’ असे तालुक्यातील शेतकऱ्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफीऐवजी शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे, खते, औषधे, कमी दरात विजेचा पुरवठा करणे गरजेचे आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना मुळातच गहाण ठेवण्यासाठी तोकडी जमीन असल्याने बँका कर्ज देत नाही. कर्ज असल्यास सहकारी पतसंस्था, सोसायट्यांचे असते ते फक्त पंचवीस ते पन्नास हजार रुपये. मात्र, राज्य सरकारने अशा सर्वसामान्य शेतकऱ्यांना कमी दरात वीज; तर सर्व प्रकारच्या शेतमालाला हमी भाव दिल्यास सरकारपुढे पुन्हा कर्जमाफीचा प्रश्न निर्माण होणार नाही. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध शासकीय योजना शेतकरीभिमुख राबवल्या तर आम्हांला कर्जमाफी नको असल्याचे दिनकरराव शिंदे या ज्येष्ठ शेतकऱ्याने ‘मटा’च्या सर्वेक्षणात आपले मत स्पष्ट केले.

सरकारने तीन वर्षांपासून हमी भाव देण्याचे टाळल्याने आमची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याने आम्ही बँकेचे कर्ज भरू शकत नाही, त्यासाठी सरकारने कर्जमाफी करावी. पुढील काळात शेतमालाला हमी भाव द्यावा.

- दिनेश काळे, शेतकरी, जैनकवाडी

मी अल्पभूधारक शेतकरी असल्याने बँका कर्ज देत नाही. त्यामुळे खासगी अथवा पतसंस्थांचे कर्ज काढावे लागते. सरकारने जर कर्जमाफी केली तर अधिकारी आम्हांला कर्जमाफीत बसवत नाही. त्यामुळे कर्जमाफी नको फक्त हमीभाव द्या.

- भीमराव शिंदे, शेतकरी मोरगाव
...
सर्व पक्षांनी कर्जमाफीचे राजकारण थांबून शेतकऱ्याला कमी दरात वीज, शेती उत्पादनाला हमी भाव देण्यासाठी प्रयत्न करावा.
- संतोष येवले, शेतकरी, माळवाडी
...
एकाच शेतकऱ्याच्या नावाने एकाच बँकेच्या विविध शाखेत असणारे दोन-तीन कर्ज दाखवून बँक अधिकाऱ्यांच्या संगनमताने एकाच शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळाल्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती कर्जमाफीपासून वंचित राहिली आहे. ही पद्धत सरकारने बदलली पाहिजे. अन्यथा कर्जमाफी नकोच कमी दरात वीज, शेत मालाला हमीभाव द्या.
- राजेंद्र धुमाळ, शेतकरी, शिरवली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार महिन्यांपूर्वीची मगरचोरी पुन्हा चर्चेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील गंभीर आणि संशयास्पद कारभारांची मालिका ‘जैस थे’च आहे. चार महिन्यांपूर्वी संग्रहालयातून मगरीची चार पिल्ले चोरीला गेल्याची बाब समोर आली. त्यातील तीन पिल्लांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
२३ नोव्हेंबर २०१६ मध्ये आकुर्डी येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातून चार मगरीची पिल्ले चोरीला गेली होती. याबाबत पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली होती. दरम्यान, यापूर्वी येथील २० सापांचा मृत्यू झाल्याने विभागप्रमुख डॉ. सतीश गोरे यांच्यावर ठपका ठेवून खात्यांतर्गत चौकशीचे आदेश पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले होते. एकीकडे हे प्रकरण गाजत असतानाच चार महिन्यांपूर्वीचे प्रकरण पुन्हा उजेडात आणण्यात आले आहे. या संग्रहालयाच्या प्रभारी प्रमुखपदी दीपक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मगरीची पिल्ले चोरीला जाण्याबरोबरच तीन मगरींचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने म्हणणे आहे. तसा शवविच्छेदन अहवाल असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. विशेष म्हणजे याबाबत आयुक्तांना विचारणा केली असता, हा विषय आपल्यापर्यंत आला नसल्याचा त्यांचा दावा आहे. नागरिकांच्या पैशांची प्रशासनासह पदाधिकाऱ्यांकडून उधळपट्टी होत असतानाच, नागरिकांच्या पैशांतूनच उभारण्यात आलेल्या उद्यानाबाबत पालिका पुरेशी गंभीर नसल्याचे आढळून आले आहे.
सर्पमित्रांकडून येथील अनेक बाबी यापूर्वी उघड झाल्यानंतर प्रशासनाकडून पांघरूण घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, मगरीच्या पिल्लांचे चोरी प्रकरण पुन्हा उजेडात आणण्याला अधिकाऱ्यांमधील अंतर्गत कलह जबाबदार असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोत्यात घालून अपहरण

$
0
0

विद्यापीठ कर्मचाऱ्याच्या मुलाचा दावा; रेल्वे स्टेशनवर झाली सुटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कर्मचारी वसाहतीमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या नऊ वर्षीय मुलाला पोत्यात घालून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर तो मुलगा पुणे रेल्वे स्टेशनच्या नवीन वॉशिंग सेंटरमध्ये आढळून आला. दरम्यान, नेमके काय घडले या विषयी आपल्याला काहीही आठवत नसल्याचे मुलाने सांगितले. गुरुवारी रात्री घडलेल्या या नाट्याबाबत उलटसुलट चर्चा आहे.
विद्यापीठात सेवक चाळीमध्ये राहणाऱ्या सूर्यकांत तुपकर यांचा मुलगा वरद गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास बेपत्ता झाला. त्यानंतर तो रात्री सव्वा अकराच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनमधील वॉशिंग सेंटरमध्ये रडताना आढ‍ळून आला. या घटनेमुळे विद्यापीठातील वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, वरद रात्री सुखरुप सापडल्याने तुपकर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली नाही.
वरद मोठ्या बहिणीची वाट पाहून रात्री आठच्या सुमारास घराबाहेर पडला. त्यानंतर बहीण घरी परतली. मात्र, वरद आलाच नाही. त्यामुळे तुपकर कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी शोध सुरू केला. त्याचे आईवडील पोलिसांकडे गेले. त्याचवेळी पुणे स्टेशनवर वॉशिंग सेंटरमध्ये साफसफाई करणाऱ्या इरफान काझी या सुपरवायझरने फोन करून वरद सापडल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वरदला ताब्यात घेतले आणि त्याच्या आई-वडिलांच्या हवाली केले. या प्रकरणी तक्रारीची नोंद नसल्याने अधिक माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला काळ्या रंगाच्या ओम्नीतून काही लोकांनी पोत्यात टाकून नेले. त्यानंतर आपण पोत्याबाहेर पडून लोकलच्या डब्यात आलो आणि तेथे असलेल्या लोकांना घटना सांगून आई-वडिलांना कॉल करायला लावला, असे वरदने सांगितल्याची माहिती त्याच्या आईने दिली. दरम्यान, विद्यापीठाच्या सीसीटीव्ही कॅमेरातून वरद खडकी गेटद्वारे बाहेर जात असताना दिसून आले आहे. त्यामुळे त्याचे विद्यापीठातून अपहरण झालेले नाही, असे सुरक्षा अधिकारी मा. सु. केदारी यांनी सांगितले.

गुरुवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास एक मुलगा रडत माझ्याकडे आला. मला विद्यापीठातून काही लोकांनी उचलले आणि काळ्या रंगाच्या ओम्नीत टाकले. शेवटी लोकलच्या महिला डब्यात मी पोत्यात होतो. तेथून कसाबसा सुटलो आणि येथे आालो, असे त्याने मला सांगितले. तसेच, आईवडिलांना कॉल लावून देण्याची विनंती केली.
इरफान काझी, सुपरवायझर, साफसफाई विभाग.

अपहरण झालेले नाही : पोलिस
वरदचे अपहरण झाल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार आलेली नाही. संबंधित मुलगा खोटे बोलत असल्याचे दिसून येत आहे. मुलाकडे चौकशी केल्यानंतर तो सतत वेगवेगळी उत्तरे देत आहे, अशी माहिती चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयाराम ढोमे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ जिल्हा बँकांना दिलासा

$
0
0

नोटाबंदीनंतरच्या जमा नोटा करन्सी चेस्टमध्ये भरण्यास परवानगी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील (डीसीसी) जमा नोटा स्वीकारण्यावरील निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या बँकांमधील नोटा संबंधित बँकांच्या करन्सी चेस्टमध्ये भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. येत्या मंगळवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने आठ नोंव्हेंबरला नोटा बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशातील ​जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर निर्बंध घालण्यात आले. त्यानुसार रद्द केलेल्या नोटा या बँकांद्वारे करन्सी चेस्टमध्ये स्वीकारण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे या बँकांमध्ये सुमारे चार महिन्यांपासून या नोटा पडून आहेत. या निर्णयाचा फटका सर्वसामान्य ग्राहक आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांना बसला आहे.
सुप्रीम कोर्टाने रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) या बँकांमधील खात्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ‘आरबीआय’ने राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेला (नाबार्ड) तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, ‘नाबार्ड’कडून त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येत नसल्याने पुढील कार्यवाही थांबली होती. या पार्श्वभूमीवर पवार यांनी जेटली यांची नवी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली; तसेच त्यांना निवेदनही दिले. त्याद्वारे त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. या बँकांचे व्यवहार ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज आणि अन्य आर्थिक सहाय्य मिळणे कठीण झाले असल्याची बाब स्पष्ट करण्यात आली.
‘जेटली आणि पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवरील निर्बंध उठवून त्यांच्याकडील रद्द केलल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा करन्सी चेस्टमध्ये स्वीकारण्याचे ठरले आहे. येत्या मंगळवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे,’ असे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार भोसले यांनी सांगितले. ‘नाबार्डकडून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खातेदारांचे केवायसी तपासण्यात आले आहे. त्यामध्ये ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम खात्यामध्ये भरणाऱ्यांची माहिती घेण्यात आली. ही माहिती घेऊन महिना उलटल्यानंतरही नाबार्डकडून प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. त्यामुळे या विषयावर पवार यांनी जेटली यांची भेट घेतली. त्यामध्ये निर्बंध उठविण्याचे ठरले आहे,’ असे भोसले यांनी स्पष्ट केले.

‘पीडीसीसी’कडे ५७४ कोटी रुपये
‘पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे (पीडीसीसी) रद्द केलेल्या जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटांमध्ये मिळून ५७४ कोटी रुपये आहेत. ‘पीडीसीसी’ च्या करन्सी चेस्ट म्हणून आयडीबीआय, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँका कार्यरत आहेत. त्यामध्ये आता आयसीआयसीआय बँकेचाही समावेश झाला आहे,’ असेही भोसले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॅक्सी पॉलिसीने वाढली स्पर्धा

$
0
0

कुलदीप जाधव


केंद्र सरकारने नुकतीच नवीन टॅक्सी पॉलिसी जाहीर केली आहे. या पॉलिसीमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘अॅग्रीगेटर’च्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे ही पॉलिसी म्हणजे, थेट खासगीकरण न करता शासकीय संस्था व खासगी कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण करणारी ठरेल.
दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी वाढल्याने काही महिन्यांपूर्वी वाहनांच्या ‘सम-विषम’ नोंदणी क्रमांकानुसार वाहतुकीची योजना राबविण्यात आली. जगभरातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील २० शहरांचा समावेश आहे. या प्रदूषणाला वाहनांची वाढती संख्या, विशेशतः कारची वाढती संख्या कारणीभूत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पाच दशकांत देशात निर्माण झालेल्या वाहनांच्या दुप्पट वाहने गेल्या सोळा वर्षांत वाढली आहे. यामुळे प्रदूषण आणि कोंडी वाढली आहे. दिल्लीला प्रदूषणाची पातळी वाढली होती. त्या तुलनेत अन्य शहरांत प्रदूषणाची एवढी भीषण परिस्थिती नसली, तरीही वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली आहे. त्यामुळे खासगी वाहनांना अटकाव घालून सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे, त्यासाठी नवनवीन साधने उपलब्ध करून देणे, या उद्देशाने टॅक्सी पॉलिसी निर्माण करण्यात आली आहे. ही टॅक्सी पॉलिसी करताना केंद्र सरकारने नेमलेल्या विविध राज्यांच्या परिवहन आयुक्तांच्या समितीच्या अहवालाला आधारभूत मानण्यात आले आहे. या पॉलिसीमध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या घटकांमध्ये स्पर्धा निर्माण करून प्रवाशांना अधिकाधिक सोयी उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवले आहे.

देशातील सध्याची परिस्थिती
‘टेरी’ संस्थेच्या (द एनर्जी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट) अहवालानुसार २०२५ मध्ये काही निवडक शहरांमध्ये एक हजार लोकसंख्येमागे ३०० कार असतील. त्याचे प्रमाण आता फक्त ३५ आहे. त्या वेळी वाहतुकीची समस्या खूप गंभीर बनलेली असेल. बेंगळुरू येथी ‘कॅप-जेमिनी’ने केलेल्या सर्व्हेमध्ये वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे वाहतुकीचा वेग सरासरी १५ किमी प्रतितास कमी झाला आहे.
देश इंधनासाठी पूर्णतः परदेशांवर अवलंबून आहे. भारतात केल्या जाणाऱ्या आयातीमध्ये इंधनाचा मोठा वाटा आहे. प्रत्येक क्षेत्रात वाढलेली स्पर्धा आणि त्यामुळे गतिमान बनलेले जीवन, यामुळे वाहने सर्वसामान्यांपासून उच्चभ्रूपर्यंत सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. त्यामुळे देशात ऑटोमोबाइल इंडस्ट्रीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. वाहनांची संख्या वाढल्याने इंधनाला असलेली मागणीही मोठी आहे. त्याबरोबरच बहुतांश शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या कोंडीमुळे संबंध देशात २२ हजार कोटी रुपयांचे इंधन वाया गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी करून, सार्वजनिक वाहनांचा अधिकाधिक वापर कसा केला जाईल, याकडे लक्ष देण्यात आले आहे.

सार्वजनिक वाहतुकीतील उपाययोजना
सध्या देशभरात अनेक खासगी कंपन्यांकडून कॅबद्वारे प्रवासी सेवा दिली जाते. मात्र, या कंपन्यांकडे शहराअंतर्गत प्रवासी वाहतुकीचा अधिकृत परवाना नाही. त्यामुळे कॅब सेवा अवैध असून, त्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. मात्र, या कॅब वाहनांना शहराअंतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी परवाना बंधनकारक करण्याची शिफारस केली आहे. तसेच, कॅबचालकांना मोटार वाहन कायद्याच्या कलम ९३ अंतर्गत परवाना घेणेही बंधनकारक केले आहे. याद्वारे कॅबचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. मात्र, नीती आयोगाने कॅबचालकांवर ही बंधने घालायला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे येत्या काळात कॅबला आणखी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतुकीची सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि खासगी वाहनांच्या वापराला अटकाव करण्यासाठी शहरी भागात ‘अॅग्रीगेटर’द्वारे संचालित केलेल्या जाणाऱ्या ‘अॅप बेस्ड बस’सेवेचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो, असे नीती आयोगाने सुचविले आहे. त्यामुळे सध्या मोठ्या शहरांमध्ये प्रवासी सेवा देणाऱ्या बेस्ट, बीएमटीसी, पीएमपी अशा शासकीय संस्थांना समांतर एक व्यवस्था निर्माण होऊ शकते. त्याबरोबरच ई-रिक्षा, टू-व्हीलर टॅक्सी आदी पर्यायांना चालना देण्याचा निर्णयदेखील घेतला गेला आहे.

रिक्षा, टॅक्सीचालकांचा विरोध
देशामध्ये २६ नोव्हेंबर १९९७ पासून नव्याने टॅक्सी परमीट देण्यात आलेले नाही. त्यानंतरच्या काळात रद्द करण्यात आलेल्या परमीटच्या बदल्यात ‘लकी ड्रा’ पद्धतीने काही वेळा परमीट देण्यात आले आहेत. त्यामुळे एकीकडे टॅक्सी व्यवसायावर अंकुश ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे अॅग्रीगेटरच्या माध्यमातून कॅबला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा डाव आहे, अशी टीका वाहतूकदार संघटनांकडून केली जात आहे. तिच परिस्थिती रिक्षाचीही आहे. रिक्षा चालकांकडून सामाजिक सेवेची अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र, त्यांना सामाजिक सेवकांचा दर्जा का दिला जात नाही, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जातो. त्यातच ‘कॅब’मुळे त्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे रिक्षा चालकांची खासगी कॅबशी स्पर्धा तुल्यबळ नाही.

प्रवासी संघटनांकडून स्वागत
ओला, उबेर यासारख्या खासगी अॅग्रीगेटर कंपन्यांकडून संचालित ‘कॅब’ सेवेला प्रवाशांकडून पसंती मि‍ळत आहे. रिक्षा चालकांच्या विरोधात ज्याप्रमाणे तक्रारी प्राप्त होतात, त्याप्रमाणे कॅब चालकांच्याबाबतही त्या केल्या जातात. परंतु, ‘कॅब’ हा प्रकार नागरिकांच्या पसंतीत पडत असल्याचे दिसून येते. आता ‘कॅब’च्या धर्तीवर ‘अॅप बेस्ड’ बस सेवेला प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी देखील पसंती दर्शविली आहे. सध्या पुण्यासारख्या शहरात प्रवासी सेवा देणाऱ्या पीएमपीची अवस्था बिकट आहे. पीएमपीचे सक्षमीकरण हा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून केवळ चर्चिला जात आहे. पण, त्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. या परिस्थितीत प्रवाशांना अधिक चांगली व किफायतशीर सेवा मिळणार असेल, तर त्याचे स्वागत केले जाईल. हाच मुद्दा पुण्यातील प्रवासी संघटनांनी मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नागपूर-पुणे’ मेट्रो सुपरफास्ट

$
0
0

- सुनीत भावे

खूप वर्षांपासूनचं एखादं स्वप्न असतं. ते पूर्ण व्हावं, अशी मनोमन इच्छाही असते. त्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे आपण पाहिलेलं स्वप्न आकार घेतंय, असं लक्षात येतं. ‘अरे, असंच तर आपल्यालाही करायचंय’ असा विचार मनात येत असताना परस्परविरोधी भावनाही उचंबळून येतात. म्हणजे, आपण पाहिलेलं स्वप्न वेगळ्याच ठिकाणी आधी पूर्ण होतंय, याची खंतही वाटते अन् दुसरीकडं आपलंही स्वप्न असंच आकाराला येईल, असा विश्वासही वाटतो. कोणतं आणि कशाचं स्वप्न असा प्रश्न आता तुम्हाला नक्कीचं पडला असेल ना? नमनाला घडाभर तेल घालायचं कारण सर्व पुणेकरांची सध्या नेमकी हीच अवस्था आहे.
देशातील आठवं महानगर म्हणून नावारूपाला आलेल्या पुण्यात मेट्रो प्रकल्प निर्माण करण्याचं स्वप्न १० वर्षांपूर्वी पहिल्यांदा दाखवलं गेलं. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये गेल्या तीन-चार वर्षांत मेट्रोच्या घडामोडी इतक्या वेगानं घडल्या, की आणखी साधारणतः शंभर दिवसांमध्ये तेथे मेट्रोची प्रत्यक्ष चाचणी (ट्रायल) सुरू होईल अन् कदाचित वर्षअखेर पाच ते सहा किमीचा पहिला मार्ग नागरिकांसाठी खुला होईल. तर, ३८ किमीचा संपूर्ण मार्ग २०१८-१९ मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.
नागपूर आणि पुणे मेट्रोमध्ये काही मूलभूत फरक आहेत. सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रमुख फरक म्हणजे, नागपूर मेट्रोचा संपूर्ण प्रकल्प ‘एलिव्हेटेड’ स्वरूपाचा आहे. भुयारी मेट्रोच्या तुलनेत एलिव्हेटेड मेट्रोचा खर्च नेहमीच कमी असतो. स्वाभाविकच, पुणे मेट्रोचा ३१ किमीचा खर्च साडेअकरा हजार कोटी रुपये असताना, नागपूर मेट्रोचा ३८ किमीचा खर्च साधारणतः साडेआठ हजार कोटी रुपये आहे. फक्त लोकसंख्याच नाही, तर वाहनांची संख्या लक्षात घेता, पुण्याच्या तुलनेत नागपूरमधील वाहनसंख्या अजूनतरी मर्यादित आहे. तसेच, मेट्रोसाठी निवडण्यात आलेला नागपूरमधील काही भाग अजूनही ‘ग्रीनफिल्ड’ (विकसित होणे बाकी आहे) स्वरूपाचा असल्याने तेथे वेगाने कामे करणे शक्य झाले आहे. नागपूरमध्ये मेट्रोसाठी आवश्यक असलेली बहुतांश जमीन सरकारच्या ताब्यात असल्याने (यामध्ये मिहान प्रकल्पाचा मोठा वाटा आहे. नागपूर मेट्रोच्या एका डेपोची जागा मिहान प्रकल्पामध्येच आहे.) त्याचे हस्तांतरण मेट्रोसाठी सहज होऊ शकले. पुणे मेट्रोत पुणे-पिंपरी-चिंचवड या दोन्ही जुळ्या शहरांचा समावेश असून, ‘एलिव्हेटेड’ आणि ‘भुयारी’ असे दोन्ही मार्ग अत्यंत गजबजलेल्या भागांतून जात आहेत. पुण्याच्या प्रकल्पासाठीही केंद्र-राज्य सरकारच्या ताब्यातील जागा ताब्यात घेण्यात फारशी अडचण येणार नसली, तरी उर्वरित जागेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) आतापासूनच प्रयत्न करावे लागणार आहेत.
नागपूरमध्ये मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन (ऑगस्ट २०१४) झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी ‘नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ ही स्वतंत्र कंपनी स्थापन होण्यास सुमारे सहा महिन्यांचा (फेब्रुवारी २०१५) कालावधी लागला. त्यानंतर, सध्या पुण्यात सुरू असलेल्या ‘जिओ-टेक्निकल’ सर्वेक्षणाला सुरुवात झाली होती. सल्लागार नेमून विविध डिझाईन आणि टेंडर प्रक्रियेला सुरुवात झाली. मे २०१५ मध्ये नागपूर मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी या दोघांचेही नागपूर मेट्रो प्रकल्पावर लक्ष असल्याने केएफडब्ल्यू या जर्मन कंपनीकडून मेट्रो प्रकल्पाला कर्जपुरवठा मंजूर केला गेला. या दरम्यान, विविध जागा ताब्यात घेण्याचे काम नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने सुरू ठेवले होते. त्यामुळे मेट्रोच्या प्रत्यक्ष मार्गिंकापासून ते स्टेशनपर्यंत विविध कामे गतीने सुरू झाली. नागपूर मेट्रोचा सुमारे पाच किमीचा मार्ग आणि दोन स्टेशन जमिनीलगत (अॅट ग्रेड) असतील. त्यापैकी मेट्रो मार्गांचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, जुलै-ऑगस्टच्या दरम्यान मेट्रोची प्रायोगिक स्वरूपातील पहिली चाचणी घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. किंबहुना, मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या (एमडी) दालनातच पहिल्या टप्प्यातील मेट्रो चाचणीच्या ‘डेडलाइन’ची उलटगणती करणारा फलकच लावण्यात आला आहे. संबंधित कामे वेळेवर सुरू आहे का, काही अडचणी आहेत का, कशा स्वरूपात त्यातून मार्ग काढता येईल, या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘डिजिटल’ यंत्रणेचा उपयोग करून घेतला जात आहे. या व्यतिरिक्त पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवडीपासून ते सौर ऊर्जेच्या वापरापर्यंत अनेक नवनव्या संकल्पना राबवल्या जात आहेत.
पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम नागपूर मेट्रोकडून करण्याचे संकेत सर्वप्रथम देण्यात आल्यावरही मोठा गहजब झाला होता. पुणे मेट्रोला मान्यता देतानाच, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची पुनर्रचना करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. त्यानुसार ‘महामेट्रो’ची स्थापना झाली असून, नागपूरसह पुण्याच्या मेट्रोची अंमलबजावणी त्यांच्यामार्फत केली जाणार आहे. पुण्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करून कामाची सुरुवात करायचे ठरले असते, तर किमान सहा महिन्यांचा कालावधी या प्रक्रियेमध्येच गेला असता. याबाबत नागपूरशी तुलना करायची झाल्यास मेट्रोचे भूमिपूजन ते कंपनी स्थापना हा कालावधी सहा महिन्यांचा आहे. पुणे मेट्रोचे भूमिपजून डिसेंबर २०१६ मध्ये झाले असल्याने कंपनी स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होण्यातच जून-जुलैपर्यंत वेळ गेला असता. त्यानंतर जिओ-टेक्निकल आणि इतर सर्व कामांना सुरुवात झाली असती. ‘महामेट्रो’कडे हे काम सोपवण्यात आल्याने भूमिपूजनासोबतच जिओ-टेक्निकल सर्वेक्षण आणि इतर कामे सुरू झाली. गेल्या महिनाअखेरीस मेट्रोच्या कामाचे पहिले टेंडरही काढण्यात आले असून, एप्रिलमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी दाट शक्यता आहे. नागपूरमध्ये सुरुवातीला केलेल्या कामाचा आणि अनुभवाचा सर्व फायदा पुण्यात उपयोगी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वेळेत बचत होणार आहे; त्याशिवाय काही प्रमाणात खर्चही वाचणार आहे. नागपूर आणि पुण्याच्या भूगर्भीय स्थितीमध्ये फरक आहे. म्हणजे पुण्याच्या भूगर्भात कठीण खडक कमी खोलीवर आढळून आल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून समोर आले आहे. नागपूरमध्ये १२-१४ मीटर खोलीवर आढळणारा कठीण दगड पुण्यात सरासरी ६ ते ८ मीटरवरच आहे. त्यामुळे खोदाईचे काम आणि त्यानंतर खांब (पिलर) उभारण्याचे कामही तुलनेने लवकर होऊ शकेल, अशी शक्यता आहे. जिओ-टेक्निकल सर्वेक्षणाचे जवळपास ७५ टक्के कामही पूर्ण झाले असून, केवळ साडेपाच किमीच्या भुयारी मार्गाचे काम बाकी आहे. मेट्रोसाठी आवश्यक जागा ताब्यात घेण्यासाठी महामेट्रोने खासगी आणि सरकारी संस्थांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्सच्या १० किमीच्या मार्गाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, निर्धारित वेळेत सर्व गोष्टी पूर्ण झाल्या, तर हा मार्ग सर्वप्रथम कार्यान्वित होऊ शकणार आहे. फडणवीस आणि गडकरी या दोघांनी नागपूर मेट्रोचे काम सुरू झाल्यावर त्यात कोणताही अडथळा येणार नाही, याकडे जातीने लक्ष दिले. त्याच धर्तीवर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे यांनीही मेट्रोचे कामकाज गतीने होण्यासाठी पाठपुरावा करायला हवा.
पुण्यात रस्ते लहान आहेत, वाहनांची संख्या खूप आहे, मेट्रोचे काम करताना वाहतुकीचा अजून गोंधळ होईल, यासारख्या अनेक शंका आत्तापासून घेण्यात येत आहेत. मात्र, इंजिनीअरिंग कॉलेज (सीओईपी), जेधे चौक (स्वारगेट) किंवा कर्वेनगर येथील उड्डाणपुलांची कामे पाच-पाच वर्षे सुरू असल्याने पर्यायी मार्गांचा शोध घेण्याची कला पुणेकरांना अवगत आहे. तसेच, उड्डाणपुलाच्या कामात आणि मेट्रोच्या कामात बराच फरक आहे. मेट्रोचे पिलर उभे राहिल्यानंतर वरचे गर्डरचे काम करताना खालून वाहतूक सुरू राहू शकते. (शेजारच्या फोटोंवरून त्याची कल्पना येईल.) त्यामुळे, ‘कर्वे रोडवर कसे काम करणार?’, शहराच्या मध्यवस्तीतून मेट्रोचे काम कसे होणार, यासारखे प्रश्न आता बाजूला ठेवायला हवेत. याच वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी हा प्रकल्प आकाराला येत असून, आज थोडा त्रास सहन करावा लागला, तर भविष्यात आपल्यासह पुढच्या पिढीला त्याचा फायदाच होणार आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे.
पुण्यासाठी हा प्रकल्प अत्यावशक असून, यापूर्वी वाया गेलेला वेळ काही अंशी भरून काढण्यासाठी महामेट्रोतर्फे प्रयत्न सुरू असून, त्याला पुणेकरांकडून मिळणारा प्रारंभिक प्रतिसाद तरी निश्चितच सकारात्मक आहे. पुणे मेट्रोने फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना जोडून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोशल मीडियावर मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीचे ‘अपडेट्स’ सातत्याने दिले जात असून, अत्यंत अल्पावधीत फेसबुक पेज लाइक करणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात पोहोचली आहे. यापुढील टप्प्यातही पुणे मेट्रोचे काम याच गतीने सुरू राहावे आणि २०२१ च्या डेडलाइनपूर्वीच दोन्ही मेट्रो मार्ग कार्यान्वित व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, या दरम्यानच्या कालावधीत मेट्रोच्या विस्ताराच्या दिशेनेही प्रयत्न व्हावे, अशी आशाही आहे.

एकाच शहरात स्वतंत्र व्यवस्था का?

नागपूर मेट्रोने सुरू केलेल्या कामाचा फायदा पुण्याला व्हावा, या हेतूने राज्य सरकारने मुंबई वगळता राज्यातील सर्व शहरांतील मेट्रो प्रकल्पांसाठी एकच ‘महामेट्रो’ ही कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुण्यातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट यासह वनाज ते रामवाडी या मार्गाची अंमलबजावणी ‘महामेट्रो’तर्फे केली जाणार आहे. या दोन्ही मेट्रो प्रकल्पांना गती मिळाली असतानाच, शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोचे काम पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. या मेट्रोचे काम सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) करण्यात येणार असल्याने त्याची अंमलबजावणी ‘महामेट्रो’कडून करण्यात येणार नसल्याचे नुकतेच स्पष्ट झाले. त्यामुळे एकाच शहरात दोन स्वतंत्र यंत्रणांकडून मेट्रोच्या वेगवेगळ्या मार्गांची अंमलबजावणी होणार असेल, तर महामेट्रो स्थापन करण्याच्या मूळ उद्देशालाच सरकारकडूनच हरताळ फासला जात आहे का, अशी चर्चा सुरू आहे. ‘महामेट्रो’त केंद्र-राज्य सरकारचा सहभाग असल्याने त्याच्या तिकीट दरांवर नियंत्रण राखता येऊ शकते; पण ‘पीपीपी’ तत्त्वावर उभारलेल्या मेट्रोचे तिकीट दर सर्वसामान्यांना परवडणारे असू शकतात का? मुंबई मेट्रोचा याबद्दलचा अनुभव तरी नकारात्मक असल्याने या मेट्रोचे कामही ‘महामेट्रो’कडेच दिले जावे, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तिजोरी’साठी इच्छुकांची फिल्डिंग

$
0
0

२९ मार्चला होणार ‘स्थायी’च्या अध्यक्षांची निवड

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक पार पडल्याने पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात असलेल्या स्थायी समितीवर आपली वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षाला दोन वर्षांचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळणार असल्याने हे पद आपल्यालाच मिळावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत.
महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात यंदा प्रथमच भाजपची सत्ता आली आहे. १६२ पैकी ९८ जागा जिंकून पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक असले तरी, बहुतांश नगरसेवक नवखे असल्याने महत्त्वाच्या पदांवर जुन्या सभासदांना संधी देण्यात येणार आहे. महापौरपदासाठी मुक्ता टिळक, सभागृहनेतेपदासाठी श्रीनाथ भिमाले यांचीनिवड करण्यात आली. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्षपद उर्वरित विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मिळावे, यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. समितीमध्ये सभासद म्हणून वर्णी लागावी या साठी इच्छुकांनी पक्षाच्या वरिष्ठांना भेटण्याचा सपाटा लावला आहे. भाजपचे वर्चस्व असल्याने स्थायी समितीच्या १६ जागांपैकी किमान १० जागांवर भाजपच्या नगरसेवकांनी संधी मिळणार आहे. त्याचबरोबर शहर सुधारणा समिती, विधी समिती, क्रीडा समिती, महिला व बालकल्या‍ण समितीवर भाजपचे वर्चस्व राहणार आहे. पालिकेची आर्थिक सूत्रे स्थायी समितीकडे असल्याने अध्यक्ष म्हणून संधी मिळावी, यासाठी अनेक वरिष्ठ नगरसेवक प्रयत्नशील आहेत. भाजपबरोबरच विरोधी पक्ष राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसच्या नगरसेवकांनीही समितीवर संधी मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न आरंभले आहेत.
येत्या मंगळवारी (२१ मार्चला) होणाऱ्‍या सर्वसाधारण सभेत समितीवर सभासदांची नियुक्ती होईल. या निवडीनंतर २९ मार्चला समितीच्या अध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता आहे.

मोहोळ, कांबळे, रासने चर्चेत
वडगावशेरी, शिवाजीनगर, हडपसर, कोथरूड, खडकवासला, कँन्टोंन्मेंट विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांना स्थायी समितीवर प्रतिनिधित्व देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. या मतदारसंघांतील प्रभागांमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या वरिष्ठ सभासदाची स्थायीच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. कोथरुडला स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळेल, अशी चर्चा आहे. स्थायी अध्यक्षपदासाठी मुरलीधर मोहोळ, सुनील कांबळे, हेमंत रासने यांची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ वैद्यकविश्वाची एकजूट

$
0
0

डॉक्टरवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धुळ्यातील निवासी डॉक्टर रोहन म्हामुणकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील डॉक्टरांच्या ४० संघटनांनी वैद्यकीय सुरक्षा मंचाच्या नेतृत्वाखाली शनिवारी मोर्चा काढला. वैद्यकविश्वात प्रथमच मोठ्या प्रमाणात मोर्चा काढल्याने वैद्यकीय संघटनांची एकजूट दिसून आली. मोर्चात तीन हजारांहून अधिक डॉक्टरांनी सहभाग नोंदविला.
डॉक्टरावर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याचा वेळोवेळी निषेध व्यक्त कऱण्यात आला. परंतु, धुळ्यातील घटनेने वैद्यकीय विश्वात खळबळ उडाली. त्यामुळे सर्वच पद्धतीच्या डॉक्टरांनी एकत्र येऊन घटनेचा निषेध नोंदविला. राज्य सरकार या घटनेची कधी आणि कशी गंभीर दखल घेणार हादेखील औत्सुक्याचा मुद्दा आहे. पुण्यात शनिवारी काढलेल्या मोर्चाचे लोण आता राज्यभर पसरणार असून, त्याची सरकारला दखल घेणे भाग पडणार आहे.
वैद्यकीय सुरक्षा मंचाच्या नेतृत्त्वाखाली सकाळी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. त्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी, डॉ. संजय पाटील, ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, डॉ. अस्मिता घुले, डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. संजय वाघ, डॉ. मुकुंद पेनुरकर, डॉ. चारुचंद्र जोशी, डॉ. नितीन भगली, डॉ. स्वप्नील कर्णिक, डॉ. कपिल झिरपे, नॅशनल मेडिकोज असोसिएशनचे डॉ. चंद्रकांत परुळेकर, डॉ. सुनील जगताप आदींचा समावेश होता. डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी संबंधितांना जेरबंद करावे, डॉक्टरांना सुरक्षा मिळावी यासारख्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मोर्चामध्ये आयएमए, पुणे डॉक्टर्स असोसिएशन, राष्ट्रवादी काँग्रेस मेडिकल सेल, कॉँग्रेस डॉक्टर सेल, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, फिजिशिअन्स ऑफ पुणे असोसिएशन, शिवाजीनगर डॉक्टर्स असोसिएशन, पश्चिम विभाग पुणे डॉक्टर्स असोसिएशन, पुणे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटना, आयुष डॉक्टर फेडरेशन, ईस्ट पुणे कन्सलटंट असोसिएशन, नर्सिंग होम आणि क्लिनिक ओनर्स पुणे असोसिएशन, नॅशनल मेडिकोस असोसिएशन, इंडियन रेडिओलॉजी अॅन्ड इमेजिंग असोसिएशन, पुणे ऑर्थोपेडिक सोसायटी, पुणे सोसायटी ऑफ ऍनेस्थेटिस्ट, पुणे ऑप्थोमॉलॉजी सोसायटी, कान नाक घसा तज्ज्ञ असोसिएशन, मेडिकल कन्सलटंट असोसिएशन, चेस्ट केअर असोसिएशन आदी संघटना मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

बंदमुळे पेशंटची गैरसोय
डॉक्टरांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी दिवसभर खासगी दवाखाने, क्लिनिकनी बंद पाळला. आरोग्य सेवा बंद असल्याने शहरातील विविध ठिकाणच्या पेशंटची गैरसोय झाली. अनेकांना उपचारांसाठी क्लिनिकच्या शोधात फिरावे लागले. अनेकांना तर खासगी हॉस्पिटलची पायरी चढावी लागली. एकाचवेळी शहरातील सर्व खासगी आरोग्य सेवा बंद असल्याने सरकारी दवाखान्यांमध्ये गर्दी पहायला मिळाली. सामान्य गरीब पेशंटना सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले. खासगी दवाखाने, क्लिनिक बंद असली तरी बड्या हॉस्पिटलची आरोग्यसेवा मात्र सुरुच होती. त्यामुळे अनेकांनी सर्दी, ताप, खोकल्यासह पोटदुखीच्या आजारासाठी तेथील डॉक्टरांकडे जाणे पसंत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा

$
0
0

‘नीट’साठीच्या परीक्षा केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकार ‘नीट’च्या परीक्षेसाठी विभागनिहाय परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या निर्णयाला हिरवा कंदील दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बाबत सोमवारी अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
देशात वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) आहे. राज्यात ‘नीट’च्या परीक्षेसाठी मर्यादित परीक्षा केंद्रांची घोषणा करण्यात आली होती. यामुळे परीक्षा केंद्र गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना खटाटोप करावा लागला होता. मात्र, आता परीक्षा केंद्र वाढवल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे. राज्यातून यंदा जवळपास पावणे तीन लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक नागपूर आणि औरंगाबाद ही सहा केंद्रे मंजूर करण्यात आली होती. नीटच्या परीक्षेसाठी विभागनिहाय केंद्रांमध्ये वाढ करण्यात येणार असून, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने सोमवारी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावेडकर यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांना दिली.
दरम्यान, नीटसाठी विभागातच परीक्षा केंद्र उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांना दूरचा प्रवास करावा लागणार नाही. नीटची परीक्षा अकरावी आणि बारावीच्या संयुक्त अभ्यासक्रमावर आधारित १८०९ प्रश्नांची होणार आहे. या बाबत बोलताना राज्याचे आरोग्य शिक्षण विभागाचे संचालक प्रविण शिनगारे म्हणाले की, नीटच्या परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची कोणतीही माहिती अजून विभागाला प्राप्त झालेली नाही.

आंदोलनाचा इशारा
नीट परीक्षेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बसतात. सध्या या परीक्षेसाठी केवळ सहा परीक्षा केंद्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. इतक्या कमी केंद्रांमुळे दुरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर एक दिवस आधी यावे लागते. तिथला राहण्याचा खर्च सामान्य विद्यार्थ्यांना परवडणारा नाही. हे सर्व टाळण्यासाठी प्रशासनाने परीक्षा केंद्रांच्या संख्येत वाढ करावी. असे न केल्यास पुढील सात दिवसात जावडेकर यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या अंदोलन करणार आहोत, असा इशारा नॅशनल स्टुडन्ट युनियन ऑफ इंडियाचे (एनएसयुआय) प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीचे धाडस मी केले : शरद पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मी केंद्रात कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे धाडस केले. त्यानंतर कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढून उत्पादनातही वाढ झाली. शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढून व्यवसायवृद्धीही झाली,’ असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी सांगितले.
पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीयल अँड अॅग्रीकल्चरतर्फे त्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. चेंबरचे माजी अध्यक्ष रवी पंडित, प्रताप पवार, महासंचालक अनंत सरदेशमुख या वेळी उपस्थित होते. ‘आमच्या काळात ७० हजार कोटी रुपयांची पीककर्जे माफ करण्यात आले. त्यामुळे कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढली आणि परिणामी उत्पादन वाढले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची क्रयशक्तीही वाढली आणि त्याचा परिणाम व्यवसायवृद्धीवर झाला,’ असा दावाही पवार यांनी केला. नोटाबंदी केल्यानंतर सरकारी बँकांमध्ये पैसे जमा करण्याचे निर्देश केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँकेने दिले होते. मात्र, त्यावेळी जिल्हा आणि सहकारी बँकांमध्ये जमा असलेल्या पैशांबाबत निर्णय झाला नाही. पुणे जिल्हा सहकारी बँकेमध्ये सुमारे ५८० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत. ३० मार्चनंतर या नोटांना काहीच किंमत उरणार नाही. या नोटा रिझर्व्ह बँकेकडून बदलून न मिळाल्याने बँकाचे व्यवहार थांबले आहेत. त्याचा विप​रित परिणाम बँकेच्या आरोग्यावर झाला आहे. देशातील सहकारी बँकांमध्ये सुमारे आठ हजार कोटी रुपये पडून असल्याचेही पवार यांनी सांगितले.

‘विमानतळ पुरंदरलाच होणार’
पुंरदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या घोषणेपासून होत आहे. त्यातच पुन्हा हा विमानतळ चाकण-खेडला हलविण्याची मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुरंदर येथील प्रस्तावित प्रश्नाबाबत कोणी काहीही चर्चा केली तरी विमानतळ होणारच, असे वक्तव्य पवार यांनी केले.

‘जिल्हा बँकांची परिस्थिती अवघड’

नोटाबंदीच्या काळात जिल्हा आणि सहकारी बँकांमध्ये जमा झालेल्या नोटांबाबत केंद्राने अद्याप निर्णय घेतला नाही. त्यामुळे सहकारी बँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा बँकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम झाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे खात्यात जमा झाले आहेत. मात्र, ते काढणे त्यांना शक्य नाही.अशा परिस्थितीत देश आर्थिक संकटाकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून आले आहे. ही परिस्थिती वेळीच आटोक्यात आणली पाहिजे. म्हणूनच आपण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतल्याचेही पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरळित कामकाजाची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची

$
0
0

शरद पवारांनी काढला भाजपला चिमटा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘संसदेत आग्रही भूमिका मांडणे हे विरोधी पक्षाचे काम असते. आपला मुद्दा मांडण्यासाठी ते संघर्ष करतात. मात्र, संसदीय कामकाज सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाचीच असते, ’ असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामती शाळेचे माजी विद्यार्थी असणाऱ्या पवारांना पद्मविभूषण जाहीर झाल्याबद्दल आणि साबळे यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी पवार बोलत होते. सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धे, सदस्य मिहीर प्रभूदेसाई, सचिव डॉ. संतोष देशपांडे उपस्थित होते. साबळे यांनी खासदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी शाळेला जाहीर केला.
संसदेत होणारा गोंधळ थांबवण्यासाठी सत्ताधारी पक्षांच्या खासदारांना पुढे यावे लागते, असे साबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यावर पवार म्हणाले, की, ‘संसदेत किंवा विधिमंडळात विरोधी पक्षातील सदस्य आपली भूमिका मांडतात. विविध प्रश्न मांडण्यासाठी ते संघर्ष करतात. मात्र, संसदेतील किंवा विधिमंडळातील कामकाज सुरळितपणे पार पाडण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. सत्ताधाऱ्यांनी देशहित, समाजहितासाठी उपयोगी पडतील, असे निर्णय घ्यायचे असतात. सत्ताधारी सदस्य देशाचे नेतृत्व करत असतात. त्यामुळे सत्ताधारींनी संसदेत काम करताता अधिक काळजी घेतली पाहिजे. पन्नास वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सभागृहामध्ये आपण कधीही बेशिस्त वर्तन केले नाही. तसेच, सभागृहातील नेहमीची जागाही सोडली नाही.’
पवारांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग आहे. त्यांनी देशासाठी मोठे काम केले आहे. पवार कुटुंबातील तीन व्यक्तिंना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ही तिन्ही व्यक्तिमत्त्वे सोसायटीच्या शाळेतूनच पुढे आली आहेत. त्यामुळे संस्थेला त्यांचा अभिमान वाटतो, असे गोखले यांनी सांगितले.

पवारांचा आठवणींना उजाळा
ख्यमंत्री हे जसे जमेचे पद असते, तसेच ते आव्हानात्मकही असते. मी मुख्यमंत्री असताना लातूरला झालेला भूकंप असो किंवा मुंबईत झालेला बॉम्बस्फोट असो, अशा अनेक आव्हानांना सामोरा गेलो. संरक्षणमंत्री असताना लष्करात महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतला. तसेच, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना संरक्षण खात्यामध्ये महत्त्वाच्या पदावरील नियुक्तीसाठी मी आग्रही होतो. भविष्यात ते राष्ट्रपती झाले. निवडणुकांमध्ये विजय-पराजय होतच असतात. अटलबिहारी वाजपेयी यांचाही पराभव झाला होता; पण बारामतीकरांनी मला सलग ५० वर्षे साथ दिली. त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो, असे पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हजारांसाठी युवकाचा ठेचून खून

$
0
0

ठ तासात गुन्हा उघडकीला; दोन नराधम अटेकत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चारच दिवसांपूर्वी शहरात चुलत भावाकडे आलेल्या १९ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी सहकारनगर परिसरात उघडकीस आला. पोलिसांनी आठ तासांत गुन्हा उघडकीस आणून या प्रकरणी दोघांना गजाआड केले. गंगाधामजवळ किरकोळ अपघात झाल्यानंतर दोन हजार रुपये न दिल्यामुळे आरोपींनी तरुणाला गाडीवर जबरदस्तीने बसवून नेऊन खून केल्याची कबुली दिली आहे.
रामअवतार बनवारीलाल जठाव (वय १९, रा. मोरीपुरा, मध्यप्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सुमीत सुधीर काळे (वय २१, रा. रविवार पेठ), अक्षय उर्फ भिमा बापू दिवटे (वय २२, रा. शिवदर्शन, पर्वती) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जठाव मूळचा मध्य प्रदेशातील आहे. त्याचा चुलत भाऊ पुण्यात असतो. त्याला भेटण्यासाठी जठाव चार दिवसांपूर्वी पुण्यात आला होता. शनिवारी सायंकाळी आरोपी अक्षय दिवटे आ​णि सुमीत काळे मद्यधुंद अवस्थेत गंगाधाम परिसरातून दुचाकीने जात होते. त्यावेळी जठाव तेथूनच दुचाकीवर जात होता. तेव्हा त्यांच्यात किरकोळ अपघात झाला. अपघातानंतर आरोपींनी दुचाकीचे झाले असून, खर्चापोटी दोन हजार रुपये देण्याची मागणी केली. जठावने सुमीतला पैसे नसल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपींनी त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून तळजाई वसाहत येथील शिवाजी मराठा हौसिंग सोसायटीच्या मोकळ्या जागेत नेले. तेथून त्यांच्या चुलत भावाला फोन करून दोन हजार रुपये मागितले. घाबरलेल्या जठावने फोन करून अपघात झाल्याचे आणि दोन हजार रुपये मागत असल्याचे सांगितले.
जठावच्या नातेवाइकांनी दोन हजार रुपये देतो,असेही त्यांना सांगितले. मात्र, मद्यधुंद अवस्थेतील दिवटे आणि काळे यांनी जठावचा दगडांनी ठेचून खून केला आणि ते घटनास्थळावरुन पसार झाले. शनिवारी सकाळी नागरिकांना एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आली. त्यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक निकम, सहायक निरीक्षक निरीक्षक चेतन मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना दगडाने ठेचून चेहरा विद्रूप केलेला मृतदेह आढळून आला.

असा झाला खुनाचा उलघडा
सहकारनगर पोलिसांना सकाळी मृतदेह रामअवतार जठावचा असल्याचे माहीत नव्हते. त्यामुळे सर्व पोलिस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली. त्या वेळी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात जठाव भावाने तक्रार दाखल केली होती. मार्केट यार्ड पोलिस त्याला घेऊन घटनास्थळी आले. त्याने जठावचा मृतदेह ओळखला. त्यावेळी त्याने मध्यरात्री भावाचा फोन आल्याचे सांगितले. दोन तरुणांनी दोन हजार रुपयांची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी आरोपींची माहिती काढली आणि त्यांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी काँग्रेसमध्ये दुफळीची चिन्हे

$
0
0

शहराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी पदा​धिकाऱ्यांची एकजूट

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत दारुण पराभवाची नामुष्की ओढवलेला शहर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. शहराध्यक्ष सचिन साठे यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे साठे यांचा राजीनामा मंजूर करावा, अशी मागणी पक्षाच्या ४६ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन केली आहे. साठे यांनी दिलेला शहराध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारण्यात यावा आणि पक्षाची फेरबांधणी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवडणुकीत काँग्रेसचा अक्षरशः दारुण पराभव झाला. पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत पक्षाचे १४ नगरसेवक होते. यंदाच्या निवडणुकीपूर्वी शहराध्यक्ष साठे यांनी १४ चे २८ नगरसेवक करण्याची भीष्मप्रतिज्ञा केली होती. परंतु, त्यांच्यासकट काँग्रेसच्या सर्व ५९ उमेदवारांचा निवडणुकीत दारूण पराभव झाला. याशिवाय बहुतांश उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. पराभवाची जबाबदारी स्वीकारून साठे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. परंतु, हा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी फेटाळल्याचा दावा करण्यात आला आहे.
राजीनाम्याच्या मुद्द्यावरून आता काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आला आहे. पक्षातील काही ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची भेट घेऊन साठे यांचा राजीनामा खरोखरच फेटाळण्यात आला आहे का, याची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. तसेच, साठे यांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी मागणी केली. साठे यांचा राजीनामा फेटाळल्याचे वृत्त खरे आहे का, अशीही प्रदेशाध्यक्षांना विचारणा केली. त्यावर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी साठे यांचा राजीनामा फेटाळला नसल्याचे म्हटले आहे, असे या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी साठे यांच्या अपयशाबाबतचे निवेदनही चव्हाण यांना दिले.

‘पराभवाला साठेच जबाबदार’
महापालिकेच्या १२८ जागांसाठी काँग्रेसचे २५० जण इच्छुक असताना केवळ ७० उमेदवार जाहीर करण्यात आले आणि वेळेत तिकीट वाटप न झाल्याने ५९ उमेदवार रिंगणात उरले. त्या सर्वांचा निवडणुकीत पराभव झाला. त्याला सर्वस्वी साठे जबाबदार आहेत. साठे यांनी शहराध्यक्षपदाच्या अडीच वर्षांच्या काळात पक्षाची संपूर्ण कार्यकारिणीही निवडली नाही. पक्ष तळागाळापर्यंत पोचू शकला नाही. निवडणुकीत साठे स्वतः उमेदवार होते. त्यामुळे ते अन्य उमेदवाराच्या प्रचाराला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे शहरात काँग्रेसची नव्याने बांधणी करण्यासाठी साठे यांचा राजीनामा मंजूर करावा आणि नवीन शहराध्यक्ष निवडण्यात यावा, असे निवेदनात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयडियाच्या कल्पनांना दाद

$
0
0

डिपेक्स २०१७ला पहिल्याच दिवशी विद्यार्थी, नागरिकांचा प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

नवनवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन कल्पनांना प्रत्यक्षात उतरविणारे विद्यार्थी...त्यांच्या हटके संकल्पना, ज्ञानाची आदानप्रदान करण्यासाठी सुरू असणारी चढाओढ, जिज्ञासू नागरिक असे उत्साहमय वातावरण पिंपरीच्या एच. ए. मैदानावर पाहायला मिळाले. औचित्य होते डिपेक्स प्रदर्शनाचे...
विविध प्रकल्पांनी युक्त असलेल्या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह नागरिकांचा पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद लाभला. हे प्रदर्शन सोमवारपर्यंत खुले असणार आहे. शेतकऱ्यांचे कष्ट कमी करणारी यंत्रे, नदीपुलावरील दुर्घटना टाळणारे स्मार्ट ग्रीन ब्रीज मॉडेल, लहान मुलांचु सुरक्षितता जपणारी चाइल्ड ट्रॅकिंग यंत्रणा, पर्यावरणपूरक सोलर बाइक, अपघात नियंत्रण
करणारे हायटेक हेल्मेट, अंधांसाठी मोबाइलवर ब्रेल कीपॅड, मोठी रेसिंगकार, सिंचनासाठीच्या भन्नाट कल्पना, नदीअपघातात मदतीला धावणारी रेस्क्यु बोट...आदी अनेक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांची मांदियाळी हे ‘डिपेक्स’चे आकर्षण ठरली आहे. ‘डिपेक्स’मध्ये २७० प्रकल्प पाहण्यास मिळणार आहेत. त्या शिवाय या प्रकल्पांची मोट बांधणाऱ्या रँचोंशीही संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन यांच्या तर्फे आयोजित ‘डिपेक्स २०१७’ या प्रदर्शनाला शुक्रवारी प्रारंभ झाला. प्रदर्शनात २१ जिल्ह्यांतील शंभर अभियांत्रिकी महाविद्यालयातील दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आपल्या लहानग्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांसाठी सहाय्यभूत करणारा प्रकल्प मुंबईच्या सरस्वती कॉलेजच्या स्मिता धोंडेने साकारला आहे. पालकांच्या डोळ्यांसमोरून मुले तसूभरही हटणार नाहीत, अशी यंत्रणा त्यामध्ये बसविण्यात आली आहे. रेल्वेगाडी आणि फलाटातील अंतरामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ‘सेफ्टी प्लेट’ ची कल्पना मुलांनी शोधली आहे. स्वयंचलित सेफ्टी प्लेट नावाचा हा प्रकल्प केतन कांबळे या विद्यार्थ्याने तयार केला आहे. रस्त्यावर एखादी व्यक्ती अचानक समोर आली आणि चालकाचे लक्ष्य नसले तरी ‘अल्ट्रासॉनिक सेन्सर’मुळे थांबणारी मोटार विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. विवेक गोंदील आणि त्याच्या मित्रांनी हा प्रकल्प मांडला आहे.
चारचाकी गाडीसाठी एसी आणि फ्रीजचा हटके प्रकल्प भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मांडला आहे. गाडी चालवताना अनेकदा साइड स्टँड काढणे विसरले जाते. त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ‘पीसीसीओई’च्या विक्रम चौधरीने ‘सेफ्टी टू साइड स्टँड’ हा प्रकल्प सादर केला आहे. या प्रकल्पाचे त्याने पेटंटही मिळवले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच डिपेक्स प्रदर्शन होत आहे. या शहराला औद्योगिक वारसा लाभल्याने येथील विद्यार्थी आणि उद्योग या दोघांनाही या प्रदर्शनाचा फायदा होईल. विद्यार्थ्यांची कल्पकता पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावावी.
राम सातपुते, प्रदेशमंत्री, अभाविप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रग्बीच्या मैदानातून रणभूमीकडे कूच

$
0
0

बोथाटेची सैन्यदलात लेफ्टनंदपदी निवड

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर रग्बी खेळणारी अन्नपूर्णा दत्तात्रय बोथाटे आता सेनादलात लेफ्टनंट होणार आहे. नुकताच तिने ‘एसएसबी’च्या परीक्षेत देशातून तिसरा येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. मूळच्या पुणेकर असणाऱ्या अन्नपूर्णाने सेनादलात जाऊन देशसेवा करावी, ही तिच्या वडिलांची इच्छा होती.
गुरुवार पेठेत राहणाऱ्या अन्नपूर्णाने (वय २५) राष्ट्रीय छात्र सेनेमार्फत (एनसीसी) सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डमध्ये (एसएसबी) मुलाखतीद्वारे यशस्वी होण्याचा बहुमान मिळवला. या परीक्षेला हजारो विद्यार्थिनी बसतात. परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने अन्नपूर्णाचे प्रशिक्षण आता चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये होईल. त्यानंतर सेनादलात लेफ्टनंट म्हणून रूजू होईल. अन्नपूर्णाने ‘अॅपेक्स करियर्स’मध्ये परीक्षेचे प्रशिक्षण घेतले असून, लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राम्हणकर (निवृत्त) यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे. अन्नपूर्णाचे वडील टाटा मोटर्समध्ये कार्यालय सहायक होते. जानेवारी २०१५ मध्ये त्यांचे निधन झाले. आई भारती राज्य परिवहन महामंडळातून निवृत्त झाली आहे. बालपणापासूनच अन्नपूर्णाला सैन्यदलात जाण्याची इच्छा होती. त्यामुळे तिने शाळा आणि कॉलेजमध्ये एनसीसीमध्ये आवर्जून प्रवेश घेतला. तिचे शालेय शिक्षण सेंट मिराजमधून आणि महाविद्यालयीन शिक्षण सिम्बायोसिस कॉलेजमधून पूर्ण केले. फिटनेसची आवड असल्याने ती वयाच्या सतराव्या वर्षापासून फिटनेस कन्सल्टंटही म्हणून कार्यरत आहे. २०१० ते २०१६ दरम्यान तिने रग्बीच्या महिला संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने एशियन गेम्स, मलेशियन ओपन, एशियन चॅम्पियनशीप आदी स्पर्धांत चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळांमधून मिळणारी तुटपुंजी रक्कम आणि सेनादलात जाण्याची तीव्र इच्छा यामुळे ती टेक महिंद्रमध्ये मनुष्यबळ विकास अधिकारी म्हणून कार्यरत होती.

बक्षिसाची रक्कम अजूनही नाहीच
अन्नपूर्णा २०१५ मध्ये केरळमध्ये झालेल्या राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राकडून खे‍ळली. या स्पर्धेत राज्याच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. या उपविजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला राज्य सरकारने पाच लाख रुपये देण्याचे जाहीर केले. मात्र, दोन वर्षांनंतरही ही रक्कम खेळाडूंना मिळालेली नाही. याबाबत गेल्या वर्षी अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष देण्याची विनंती केली होती. तेव्हा फडणवीस यांनी व्याजासह रक्कम देऊ असे आश्वासन दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे मेट्रोसाठी १३० कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ९५० कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतर राज्य सरकारनेही १३० कोटी रुपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात केली आहे. शनिवारी सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई, नागपूरसह पुणे मेट्रोसाठी ७१० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी १३० कोटी रुपये पुणे मेट्रोसाठी उपलब्ध होणार आहेत. डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे भूमिपूजन झाल्यानंतर मेट्रोच्या कामाला गती आली आहे. विविध सर्वेक्षणांच्या माध्यमातून मेट्रोचे कामही सुरू झाले आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) मेट्रोची अंमलबजावणी केली जाणार असून, हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान आहे. शहरातील ३१ किलोमीटरच्या दोन मार्गांसाठी तब्बल ११ हजार ४२० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी ५० टक्के रक्कम केंद्र-राज्य सरकार आणि महापालिका उभारणार आहे.

स्मार्ट सिटीसाठी २०० कोटी

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी झालेल्या पुणे, सोलापूर, नाशिक, नागपूर, ठाणे, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली या शहरांसाठी १६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा मिळून ही तरतूद करण्यात आली असून पुणे शहराला स्मार्ट सिटीसाठी २०० कोटी रुपये मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसृष्टीसमोरच डबके

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

शिवनेरी विकास प्रकल्पातून तब्बल ५० लाख रुपये खर्च करून उभारलेल्या जुन्नरमधील शिवसृष्टीच्या प्रवेशद्वाराबाहेर शेवाळाने रापलेल्या पाण्याचे डबके साचले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला जलवाहिनीतून होणाऱ्या गळतीमुळे जमा होणारे पाणी साचून रस्त्याची दुर्दशा झाली आहे.त्यात खड्डे पडून पाणी साचल्याने शेवाळे तयार झाले आहे. दुर्गंधीही सुटली आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सोयीस्कर डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे बालशिवाजी आणि जिजाऊंच्या शिल्पदर्शन आणि शिवसृष्टी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यकारभार करण्याचे मनसुबे राज्यात रचले जात असताना शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये मात्र वेगळाच प्रकार पहायला मिळत आहे. शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी हजारो शिवभक्त येत असतात. त्यासाठी दगडी वेस बांधून हेरिटेज रूपात पर्यटकांचे स्वागत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.मात्र, या वेशीपासून परदेशपुरा भागात लावण्यात आलेल्या दुभाजकाची दुर्दशा झाली असून त्याचे कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. शिवनेरी रस्त्यावर वडापाव-सामोसे यांच्या टपऱ्यांची दुकाने आता थाटली आहेत. एसटी स्थानकाबाहेर या झोपडीवजा टपऱ्या उभ्या राहिल्या आहेत. मात्र, अनधिकृतपणे हा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत सुरू असताना संबंधित अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जप्तीच्या धास्तीने १४ कोटी वसूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

बारामती नगरपालिका प्रशासनाने मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठी जप्ती सुरु केल्याचा परिणाम म्हणून आतापर्यंत १४ कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. जप्तीची कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे प्रशासनाने ‘मटा’ला सांगितले.

सरकारने शंभर टक्के वसुली करण्याचे आदेश नगरपालिकांना दिले आहेत. मालमत्ता विभागाचे यंदा २१ कोटी १२ लाख रुपयांचे लक्ष्य आहे. त्यातील १३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.

तेरा जणांवर कारवाई होणार

१) दि. कॉन्फरन्स ऑफ ख्राइस्ट २) काळे प्राइड ( मारुतराव श. काळे, नितीन मां.काळे) ३) विलास रा. मोरे (लॉज) ४) मिशन वाचनालय एच. आर. कॉन्टन्सी ५) सचिव व्ही. पी. (टाटा इंडिकॉम टॉवर) ६) बनेमिया महंमद शेख ७) श्रीकांत मोहन जाधव ८) मिलिंद अ.पोतेकर व दोशी (एअरसेल टॉवर) ९) रोहिणी सुधाकर पोटे १०) शोभा विजयराव गव्हाळे ११) गीताबाई गणपत बोराटे १२) गोविंद विष्णू चिंचकर १३) शामराव दिनकरराव काकडे.

या सर्व मिळकत धारकांनी मालमत्ताकराचा भरणा वेळेत न केल्याने दोन दिवसांत जप्ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वसुली प्रशासनाने ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोदवडीचा पुल दुरुस्तीसाठी बंद

$
0
0

भोर : वेल्हे तालुक्यातील कोदवडी येथील गुंजवणी नदीवरील जुना लोखंडी पुल बुधवारपासून (१५ मार्च) दुरुस्तीसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम किमान तीन महिने चालेल, त्यामुळे नागरिकांनी या काळात आंबवणे किंवा साखर

येथील पुलाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केले आहे.

हा पूल जुना झाला असून, वाहतुकीस धोकादायक झालेला आहे. पुलाचे लोखंडी बार गंजलेले असून, अनेक ठिकाणी तुटलेले आहेत. तसेच, स्लॅब तुटलेले आहेत. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झालेला असल्यामुळे नवीन पूल बांधावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. नवीन पुलासाठी मोठ्या निधीची गरज होती. त्यामुळे पुलाची दुरवस्था लक्षात घेऊन तातडीने त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे. हे काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत चालेल असा अंदाज आहे. या काळात पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन उपअभियंता बाळासाहेब शेळके यांनी केले आहे.

कर वसुलीसाठी मोहीम

थकित व चालू वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी नगरपरिषदेने धडक मोहीम हाती घेतली आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांच्यासोबत दोन नळतोडणी पथकेही देण्यात आली आहेत. कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची नळ कनेक्शन तोडणे, शहरात मुख्य चौकातून फलकावर नावे लिहिणे अशी कार्यवाही करण्यात येणार आहे.

नगरपरिषदेची थकीत घरपट्टी एक कोटी, ६१ लाख; तर चालू वर्षाची एक कोटी १७ लाख, पाणीपट्टी ८१ लाख येणे बाकी आहे. त्यापैकी एक कोटी ९६ लाख रुपये थकित आहेत. ३१ मार्चपूर्वी घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी संजय केदार यांनी केले आहे. कर न भरणाऱ्या मिळकत धारकांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष तृप्ती किरवे, उपनगराध्यक्ष गजानान दानवले यांनीही शहराच्या मूलभूत सेवासुविधांसाठी कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images