Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वंचितांना शिकवण्यासाठी फेलोशिप अभ्यासक्रम

$
0
0

पुणे ः सामाजिक बांधिलकीची जाण असलेल्या उत्साही तरुणांसाठी टीच फॉर इंडिया संस्थेतर्फे दोन वर्षांचा फेलोशिप अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत वंचित मुलांना मदत करू इच्छिणाऱ्या नागरिकांना या मुलांच्या शाळेत पूर्ण वेळ शिक्षक म्हणून शिकविण्याची संधी मिळणार आहे.
टीच फॉर इंडिया संस्थेचे सध्या पुणे, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद आणि बेंगळुरूमधील तीनशेहून अधिक शाळांमध्ये काम सुरू आहे.
या वर्षीच्या फेलोंची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. निवड होणाऱ्या कार्यकर्त्यांना संस्थेतर्फे शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य आणि विचारसरणीचे प्रशिक्षण दिले जाते, अशी माहिती ‘टेक टीच फॉर ऑल’चे संचालक सिद्धार्थ अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
टीच फॉर इंडियाच्या फेलोशिपमध्ये सहभागी होण्यासाठी २१ मार्च अंतिम तारीख आहे. स्पर्धेची माहिती www.teachforindia.org/become-fellow या वेबसाइटवर
उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वक्फ बोर्डा’च्या मालमत्तेची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहर आणि जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या संस्थांचे आणि मालमत्तेचे दुसरे सखोल सर्वेक्षण करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. वक्फ जमिनींचे अवैध हस्तांतरण, अवैध वापर, अतिक्रमण याची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्यात येणार आहे. राज्यात पुणे व परभणी येथे हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने व्याप्ती राज्यभर वाढविण्यात येणार आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग उपस्थित होत्या. राज्य शासनाने १३ एप्रिल आणि सात डिसेंबर रोजी दिलेल्या शासन आदेशाअन्वये ही मोहिम राबविण्यात येत आहे. ३१ मे पूर्वी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने रजा राखीव उपजिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली अधिकाऱ्यांकडे जबाबदारी निश्चित केली आहे. वक्फ बोर्ड अधिनियम १९९५ च्या कलम ४ (६) अन्वये राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीमार्फत जमिनींचे (मिळकतींचे) नियंत्रण करण्यात येत आहे. या समितीने सन २०१२ साली वक्फ बोर्डाच्या सर्व जमिनींचे सर्वेक्षण केलेले आहे. मात्र, त्याबाबत कोणताही निष्कर्ष न निघाल्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून वक्फ बोर्डाकडे असलेली मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे किंवा कसे, तसेच संबंधित जमिनीचा वापर योग्य कारणासाठी होत आहे किंवा नाही. तसेच त्या जागेवर अतिक्रमण झाले आहे काय, याबाबत काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे. या शिवाय संबधित जागेचा सातबारा हा इतर कोणाच्या नावावर आहे काय, हे तपासून घेण्यात येणार आहे. संबधित जागेवर इतर कोणाची नावे असल्यास ती वगळून वक्फ बोर्डाचे नाव सातबाऱ्यावर लावण्यात येणार आहे.

जिल्ह्यात २८५ प्रार्थनास्थळे
पुणे जिल्ह्यात २८५ प्रार्थनास्थळे असून, एकूण ४३८ मिळकती आहेत. तर ९०३ हेक्टर १६ आर एकूण क्षेत्र आहे. त्यातही जुन्नर आणि इंदापूर तालुक्यात सर्वात अधिक हेक्टर म्हणजेच अनुक्रमे २१० हेक्टर १७ आर आणि १९८ हेक्टर २४ आर क्षेत्र आहे. पुणे शहरात केवळ तीन हेक्टर ७२ आर क्षेत्र आहे, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. मराठे ज्ञानाचा वर्षाव करणारे व्यक्तिमत्त्व

$
0
0

वामनराव अभ्यंकर यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘प्रज्ञाचक्षु पं. यशवंतराव मराठे गुरुजींनी पुस्तकाच्या बाहेरील ज्ञान आम्हाला दिले. ते स्वत: एक चालते-बोलते पुस्तक होते. ज्ञानाचे भांडार असूनही व्यवहारिक जीवनात अहंकाराचे विसर्जन करून ते वावरले. ज्ञानाचा सतत वर्षाव करणारे, असे पं. मराठेंचे व्यक्तिमत्त्व होते,’ अशी भावना ‘ज्ञानप्रबोधिनी’चे माजी प्राचार्य वामनराव अभ्यंकर यांनी बुधवारी व्यक्त केली.
प्रज्ञाचक्षु पं. यशवंतराव मराठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पटवर्धनबाग येथील धन्वंतरी सभागृहात आयोजित एका विशेष समारंभात ते बोलत होते. चिंचवड देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त विघ्नहरी देव या वेळी उपस्थित होते. आळंदी येथील आध्यात्मिक प्रतिष्ठानचे प्रमुख आचार्य अशोकशास्त्री कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते.
‘पं. यशवंतराव मराठे यांनी अनेक बारीकसारीक गोष्टी शिकवल्या. शिस्तीचा धडा त्यांच्याकडून मिळाला. जीवन जगत असताना, राष्ट्रासाठी कसे कार्यरत राहायचे, हे पं. मराठे यांनी आपल्या कार्यातून दाखवले,’ अशा आठवणी अभ्यंकर यांनी जागवल्या. ‘पौराहित्य डोळेबंद करून करायचे नसते, तर मंत्रांचे हृदय समजून घेत त्यांचा उच्चार केला पाहिजे,’ असे मत त्यांनी मांडले.
देव म्हणाले, ‘पं. यशवंतराव मराठे मी कोण आहे, हे कधीच सांगत नसत. स्वत:चा मोठेपणा त्यांनी कधीच सांगितला नाही. त्यांच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत.’ पं. वसंतराव गाडगीळ, गायक आनंद भाटे यांनी मनोगत व्यक्त केले. शुभदा वझे यांनी सूत्रसंचालन केले. अश्विनी भिडे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
------------
भारतीय संस्कृती सर्वात प्राचीन आहे. मनाला आनंद देते ती संस्कृती असते. वेद, शास्त्र, पुराण हे ग्रंथ चैतन्य देतात. मानवी जीवन गूढ असून धर्मामुळे ते सुसह्य होते. एक धर्म, एक राष्ट्र आवश्यक असते. मठावर बसलेले आचार्य नसतात. मधमाशा मध गोळा करतात ; पण खात नाहीत. हा ठेवा त्या दुसऱ्यांना देतात. अशाच प्रकारे सिद्धीने ज्ञान ग्रहण करून ते दुसऱ्यांना देणारे आचार्य असतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांनी भारतीय संस्कृती व धर्म टिकवला आहे.
- अशोकशास्त्री कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर झाले शिवमय

$
0
0

शिवजयंतीप्रीत्यर्थ मिरवणुका, देखावे, साहसी खेळांचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे ढोलताशाच्या गजरात केले जाणारे पूजन, महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारे पोवाडे, आकर्षक देखावे, पारंपरिक पेहरावातील शिवप्रेमींमुळे बुधवारी जल्लोषपूर्ण वातावरणात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भवानी पेठेतील भवानी माता मंदिरापासून पालखीद्वारे मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील अनेक शिवप्रेमी संस्था, संघटनांचे रथ मिरवणुकीत सहभागी झाले होते.
मिरवणुकीत लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी प्रात्यक्षिकांबरोबरच अनेक साहसी खेळांची प्रात्यक्षिके सादर करून कलाकारांनी शिवप्रेमींची दाद मिळविली. प्रसिद्ध रंगावलीकार संजय मोडक यांनी चित्तवेधक आणि विविध रंगांची उधळण करून रेखाटलेली रंगावली डोळ्यांचे पारणे फेडत होती. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर नगरसेविका मनीषा लडकत आणि अर्चना पाटील यांनी महाराजांची आरती केली. या वेळी दादा पासलकर, नंदू एकबोटे, मच्छिंद्र कांबळे, बाबा चव्हाण आणि संदीप लडकत उपस्थित होते. दिलीप घोलप यांनी मान्यवरांचा सत्कार केला. महेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
मिरवणुकांबरोबरच अनेक भागात पथनाट्य, पोवाडे, शिवकालीन मर्दानी खेळ, ढोल, लेझीम वादन सादर करून शिवजयंती साजरी करण्यात आली. जय महाराष्ट्र तरुण मंडळाने पालखी विठोबा चौकात महाराजांच्या पुतळ्यास नगरसेविका सुलोचना कोंढरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, चेतन जाधव, आदेश पंडित, किरण थोरवे आदी उपस्थित होते.
युवावर्ग प्रतिष्ठानतर्फे कसबा पेठ, लाल महाल चौकात आलेल्या विविध मिरवणुकांदरम्यान अध्यक्ष चेतन मोरे यांच्या हस्ते पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटांचे वाटप कण्यात आले. या वेळी श्रीनिवास मोरे, सूर्यकांत नळे, राजेंद्र घोलप आदी उपस्थित होते. अखिल नानापेठ शिवबा ग्रुपतर्फे विविध कार्यक्रम आयोजिण्यात आले होते. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी सिंहगड ते नाना पेठ या मार्गावर ज्योत रॅली काढली. शिववंदना, बाल मेळावा, लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा घेण्यात आली. प्रभाग क्रमांक १७ मधील नगरसेवक वनराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, विशाल धनवडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर चिटणीस चेतन मोरे यांचा यांचा ग्रुपतर्फे सत्कार करण्यात आला. महेश इगवे, शरद जगदाळे, महेश बुरा, सिद्धार्थ पिल्ले आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
रेणुका महिला बचत गटाच्या वतीने पूना क्लबमधील कर्मचारी वसाहतीमध्ये अध्यक्षा छाया जाधव यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण कऱण्यात आला. या वेळी सीमा भोसले, सीमा मोरे, गीता मोरे आदी उपस्थित होत्या. कॅम्पमधील छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने गौसिया खान यांच्या हस्ते मिरवणूक अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. आघाडीचे संस्थापक अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील (निवृत्त), रुकसार खान, गुलनार खान आदी उपस्थित होते. सरदार विंचूरकर वाडा यांच्या वतीने शिवाजी मंदिर येथे रवींद्र पठारे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंडळाचे कार्यकर्ते नंदकुमार जाधव, राजेंद्र शितोळे, गजानन घैसास आदी मान्यवर उपस्थित होते...


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक मातेने घ्यावा जिजाऊंचा आदर्श

$
0
0

साध्वी सरस्वतीदेवी यांचे उद् गार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे. स्वराज्याच्या रक्षणासाठी सौरभ फराटे यांच्यासारख्या वीरांची आज गरज आहे. त्यामुळे जेव्हा या देशाला गरज असेल तेव्हा प्रत्येकाने समर्पित होण्याची तयारी ठेवावी. देशाच्या रक्षणासाठी प्रत्येक आईला जिजाऊचा अवतार घ्यावा लागेल. शिवरांयांच्या रूपातील योद्धे जोपर्यंत जन्म घेतील, तोपर्यंत या देशाला कोणीही संपवू शकणार नाही,’ असे उद् गार साध्वी सरस्वतीदेवी यांनी व्यक्त केले.
शिवजयंतीनिमित्त गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळतर्फे बुधवारी मिरवणुकीचे आयोजन करण्यात होते. या वेळी लान्सनायक सौरभ फराटे यांना मरणोत्तर प्रभात पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी साध्वी बोलत होत्या. फराटे यांचे वडील नंदकुमार फराटे आणि आई मंगल फराटे यांनी पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवीद्र्र वंजारवाडकर, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उत्सव प्रमुख सचिन भोसले, कुणाल जगताप, गोविंद मोरे, मंगेश शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.
‘देशातील महिलांवर अत्याचार, लव्ह जिहाद, हुंडाबळी असे गैरप्रकार होताना दिसतात. अशा वेळी प्रत्येक भावाने बहिणीला तिच्या सामर्थ्याची जाणीव करून द्यायला हवी. महिलांना अस्तित्वासाठी लढण्याची शक्ती द्यायला हवी. आमच्या अस्मितेकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले, तर आम्हाला श्रीरामांचे धनुष्य उचलून दहशतवाद संपवावा लागेल,’ असेही त्या म्हणाल्या.
यंदा मिरवणुकीमध्ये सौरभ फराटे यांना मानवंदना देण्यासाठी रथ तयार करण्यात आला होता. महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर दादा पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेला चाकणचा संग्रामदुर्ग हा जिवंत देखावा मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरला. कसबा पेठेतील त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठान मर्दानी आखाड्यातर्फे लाठी-काठी, दांडपट्टा, तलवार आदी साहसी क्रीडाप्रकार सादर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉटसअॅपमुळे तणाव ‘व्हायरल’

$
0
0

मुले पळविणाऱ्या टोळीविषयीच्या मेसेजचा सुळसुळाट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘तुमची मुले असुरक्षित असून, शहराच्या विविध भागात मुलांना चोरणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. कृपया मुलांवर लक्ष ठेवा...’ अशा आशयाच्या मेसेजची ‘व्हॉटस् अॅप ग्रुप’वर लाट आली आहे. मुलांच्या अपहरणाशी निगडीत घटनांच्या व्हायरल होणाऱ्या मेसेजमुळे पालकांकडून चिंतेपोटी सत्यता न पडताळता ‘फॉरवर्ड’ करण्यामुळे शहरात भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण पसरले आहे.

शाळेतील घडामोडी, तसेच माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी सुरू झालेले ‘व्हॉटस् अॅप ग्रुप’ पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. ‘जोग शाळेच्या बाहेर गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांचा बंदोबस्त असून, मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीला त्यांनी ताब्यात घेतले आहे,’ या आशयाचा मेसेज बुधवारी शहरातील बहुतांश पालकांच्या व्हॉटस् अॅप ग्रुपवर व्हायरल झाला. सातत्याने व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजनी पाल्यांच्या सुरक्षिततेविषयी पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. भरीस भर म्हणून मेसेजमधील माहितीची सत्यता न तपासता ते ‘फॉरवर्ड’ करण्याचे ‘उद्योग’ केले जातात.

शहरातील बहुतांश शाळांच्या पालकांचे व्हॉटस् अॅप ग्रुप आहेत. शाळेतील घडामोडींबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासावर तेथे चर्चा झडत असतात. सहा महिन्यांपूर्वी कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीमध्ये मुलांना पकडणारी बाई फिरत असून, पालकांनी दक्षता बाळगावी अशा आशयाचा मेसेज व्हायरल झाला होता. दोन महिन्यांपूर्वी उंटावर मुलांना फिरायला नेण्याच्या बहाण्याने काही लोक मुलांना पळवून नेत असल्याचेही मेसेज आले होते. कोथरूडमधील मुले पळविल्याच्या घटनेची रसभरीत वर्णनेही ग्रुपवर धिंगाणा घालत होती. घरामध्ये येऊन वैद्यकीय चाचणीच्या बहाण्याने मुलांना पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे, या मेसेजनेही दहशत निर्माण केली होती.
काही दिवसांपूर्वी देहूरोडला रेल्वे पोलिसांनी मुलांना पकडणाऱ्या काही महिलांना ताब्यात घेतल्याच्या मेसेजने पालकांची झोप उडवली. या तथाकथित महिलांचे फोटोही व्हायरल झाले होते. एकापाठोपाठ येणाऱ्या या मेसेजमुळे पालक गोंधळून गेले आहेत.

‘अफवांवर विश्वास ठेऊ नका’

सध्या मयूर कॉलनी परिसरातील बहुतांश शाळांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. धुळवड आणि रंगपंचमीमुळे इतर मुले शाळा परिसरात गोंधळ घालतात. त्यामुळे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिसरातील शाळांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मयूर कॉलनीत मुलांना पकडणाऱ्या टोळीची अफवा आहे. पालकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये. सत्यता पडताळल्याशिवाय अशा प्रकारचे मेसेज फॉरवॉर्ड करू नयेत, असे आवाहन कोथरूड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी केले आहे.

व्हॉटसअॅपवरून मेसेज पाठविण्यापूर्वी पालकांनी किंवा सर्वच यूजरनी गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक आहे. कोणत्याही ग्रुपवरून आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवून तो फॉरवर्ड करू नका. या अफवांमुळे विनाकारण तणाव निर्माण होऊ शकतो. मुलांच्या अपहरणासंदर्भात कोणताही मेसेज आल्यास तत्काळ सायबर सेलकडे तक्रार नोंदवा.
दीपक साकोरे, पोलिस उपायुक्त, सायबर सेल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागासवर्गीयांसाठी ‘स्वाधार योजना’

$
0
0

खासगी ठिकाणी वसतिगृहाची सुविधा देणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरकारी वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातर्फे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’सुरू केली आहे. योजनेंतर्गत सरकारी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना खासगी ठिकाणी भोजन, निवास आणि अन्य शैक्षणिक सुविधांसाठी वार्षिक ४३ ते ६० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण विद्यार्थ्यांना किमान ६० टक्के आणि दिव्यांगांना ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. या विद्यार्थ्यांच्या शहरात निवासाच्या सोयीचे प्रमुख ठिकाण म्हणजे सरकारी वसतिगृह. मात्र, त्या गरजेप्रमाणे वसतिगृहांची उपलब्धता नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना समोरे जावे लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाधार योजना’ सुरू करण्यात आली आहे. योजनेंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक भोजन भत्ता ३२ हजार रुपये, निवास भत्त्यापोटी २० हजार रुपये आणि निर्वाह भत्ता म्हणून आठ हजार रुपये अशी एकूण ६० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. इतर महसुली विभागीय शहरात व उर्वरित ‘क’ वर्ग महापालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि निर्वाह भत्ता म्हणून ५१ हजार रुपये आणि उर्वरित ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांना ४३ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. दरम्यान, वैद्यकीय आणि इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना दर वर्षी पाच हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी दोन हजार रुपये अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे.

योजना एका दृष्टिक्षेपात

- विद्यार्थ्यांकडे अनुसूचित जातीचा दाखला असावा.
- विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थ्याने राज्य सरकारी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद, फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र तंत्रशिक्षण परिषद, किंवा तत्सम सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये किंवा मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
- योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के आरक्षण.
- योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना एकूण शैक्षणिक कालावधीत जास्तीत जास्त सात वर्षांपर्यंत मिळेल

अधिक माहितीसाठी :
https://mahaeschol.maharashtra.gov.in
https://sjsa.maharashtra.gov.in
https://www.maharashtra.gov.in

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या मुक्ता टिळक यांची बुधवारी अपेक्षेप्रमाणे निवड झाली. त्यांनी पुण्याच्या ५६व्या, तर नवव्या महिला महापौर म्हणून कार्यभार स्वीकारला. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या नंदा लोणकर यांचा पराभव करून भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान त्यांनी पटकावला. तसेच, उपमहापौरपदी नवनाथ कांबळे यांची निवड झाली. त्यांनी काँग्रेसच्या लता राजगुरू यांचा पराभव केला.

भारतीय जनता पक्षाला महापालिकेत निर्विवाद सत्ता मिळाल्याने प्रथमच महापौरपद मिळाले. त्याकरिता, पक्षाने चौथ्यांदा पालिकेवर निवडून आलेल्या मुक्ता टिळक यांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या आठवड्यात त्यांनी अर्जही भरला होता. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवारी अर्ज भरला होता. बुधवारी सकाळी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यावर शिवसेनेच्या संगीता ठोसर यांनी अर्ज मागे घेतला. तर, शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यानंतर, टिळक आणि राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर यांच्यात झालेल्या निवडणुकीत टिळक यांना ९८, तर लोणकर यांना ५२ मते मिळाली. भाजपच्या सर्व नगरसेवकांनी पुढे येऊन मुक्ता टिळक यांना महापौरपदाच्या खुर्चीत बसवले. या वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ‘पुण्याची ताकद, गिरीश बापट’, अशा घोषणा देण्यात आल्या.

महापौरपदी मुक्ता टिळक यांची निवड झाल्यानंतर उपमहापौर पदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये भाजपकडून नवनाथ कांबळे यांनी, तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून लता राजगुरू यांनी अर्ज भरला होता. शिवसेनेच्या विशाल धनवडे यांनी अर्ज मागे घेतला. महापौरपदाप्रमाणेच या निवडणुकीतही भाजपकडे मोठे संख्याबळ असल्याने कांबळे यांचा सहज विजय झाला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कांबळे यांनी तिसऱ्यांदा पालिकेत प्रवेश केला आहे.

महापौर टिळक आणि उपमहापौर कांबळे या दोघांनाही पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, भीमराव तापकीर या सर्वांनीच सदिच्छा दिल्या.


प्रवेशद्वारापासून पायघड्या

महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आल्याने मुख्य प्रवेशद्वारापासूनच रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. ‘माझं पुणं, स्मार्ट पुणं’ या भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक बाबी दर्शवणारे फलक जागोजागी लावण्यात आले होते. महापौरांच्या दालनाकडे येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत गंध लावून आणि गुलाबाच्या पाकळ्या उधळून केले जात होते. सभागृहात भाजपच्या प्रत्येक सदस्याने केशरी आणि हिरव्या रंगाचा फेटा परिधान केला होता, तर फेट्यावर भाजपचे ‘कमळ’ चिन्ह लावण्यात आले होते. आजवर नेहमीच विरोधी बाकांवर बसणारे भाजपचे सर्व नगरसेवक सत्ताधारी बाकांवर बसले होते, तर यापूर्वी पालिकेचा ‘कारभार’ हाताळणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विरोधी बाकांवर बसावे लागले. या दोन्ही पक्षांचे सर्व नगरसेवकही गळ्यात उपरणे टाकून आले होते, तर शिवसेनेच्या सर्व सदस्यांनीही फेटे बांधले होते.


‘६७ वर्षांपासून भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचे हे फळ आहे. सर्वांना एकत्र घेऊन आधुनिक शहर अशी पुण्याची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न राहील.’

मुक्ता टिळक, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांना आता गारांचा तडाखा

$
0
0

मराठवाडा, नगर, सोलापूरला तडाखा

टीम मटा

मराठवाडा, सोलापूर, नगरसह राज्याच्या काही भागांना बुधवारी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. या तडाख्यात बीड जिल्ह्यामध्ये वीज पडून पाच जणांचा, तर लातूर जिल्ह्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. गारांसह पडलेल्या या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, फळबागांनाही फटका बसला आहे.

लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, निलंगा या तीन तालुक्यांना सकाळपासून गाराच्या पावसाने झोडपले. पहाटे आणि सकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस होता. दुपारी बारानंतर सर्वत्र गारांसह पावसाने झोडपून काढले. लातूर शहरातही सरी बरसल्या. दुपारनंतर पावसाची रिमझिम सुरूच होती. या अवकाळी पावसाने लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद, कळंब तालुक्यांमध्ये गारा पडल्या. उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा, कळंब तालुक्यातील सरमकुंडी, पारगावा परिसरामध्ये या पावसामुळे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यामध्येही पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

या पावसाचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्याला बसला. बीड जिल्ह्यामध्ये वीज पडल्यामुळे परळी तालुक्यात दोन, केज तालुक्यामध्ये दोन आणि आष्टी तालुक्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. त्याचबरोबर सात जण जखमीही झाले आहेत. बीडमध्ये रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडले, तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. आंबा उत्पादकांना आजच्या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा प्रचंड फटका बसला.

सोलापुरात पाऊस

सोलापूर : शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांत बुधवारी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची झोप उडविली. ढगाळ हवामानामुळे सकाळपासून चिंतेत असलेल्या व वाढत्या उन्हाचा चटका सहन करणाऱ्या पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटसह अन्य तालुक्यांना सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपले. विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे, मंद्रुप, तैरामैल, अक्कलकोट तालुक्यातील हालहळ्ळी, चिंचोळी, कुंभारी यासह मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर तालुक्यांतही पावसाने तडाखा दिला. या परिसरात पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

नुकसानीचे पंचनामे

लातूर, परभणी, नांदेड, बीड तसेच सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दिले.

दक्षतेचा इशारा

नांदेड : मराठवाड्यासह विदर्भात येत्या ४८ तासांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर, दक्षता घेण्याचे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहे. भारतीय हवामान खात्याच्या या इशारात येत्या ४८ तासात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

नगरमध्येही हजेरी

जामखेड तालुक्यातील दिघोळ, माळवाडी, नान्नज, वाघा आदी भागांत बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपासून उष्णता वाढली होती. अचानक ढगाळ वातावरण तयार होवून दुपारनंतर तालुक्यातील नान्नज, दिघोळ, माळेवाडी, वाघा आदी गावांत पावसाने हजेरी लावली. काढलेले ज्वारीचे पीक पावसापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीचा ‘फॅमिली बिझनेस’

$
0
0

आई-वडिलांना अटक, तर अल्पवयीन मुलगा ताब्यात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आई-वडील आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलाकडूनच घरफोडीचे गुन्हे करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. चोरी केलेल्या ऐवजाची विल्हेवाट लावण्यात आई महत्त्वाची भूमिका बजावत होती. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या आई-वडिलांचा गुन्ह्यांतील सहभाग उघड झाला. घरफोडीचा ‘फॅमिली बिझनेस’ करणारे हे कुटुंब पोलिसांनी गजाआड करताना त्यांच्याकडून चोरीचा १५ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश उर्फ नानाभाऊ शंकर लंके (४०, रा. विश्रांतवाडी ) आणि त्याची पत्नी दीपाली यांना अटक करण्यात आली. त्यांच्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. लंके आपल्या मुलाकडून घरफोडीचे गुन्हे करून घेत होता. एका घरफोडीच्या गुन्ह्यात मिळालेल्या ‘सीसीटीव्ही’ फुटेजच्या आधारे या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली.

गुन्हे शाखेच्या युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र तोडकर आणि सहायक निरीक्षक नितीन भोयर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या आरोपींनी घरफोडीचे १६ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. लंके याने २०१२ मध्ये एका महिलेला त्याची मुख्यमंत्र्याशी ओळख असल्याचे सांगून चार लाखांना फसवले आहे.

मुलाकडून करवले गुन्हे

आरोपींनी पोलिस कोठडीत गुन्ह्यांची कबुली दिली. लंके हा आपल्या मुलाकडून घरफोडीचे गुन्हे करून घेत होता. त्याने विश्रांतवाडी, खडकी परिसरात गुन्हे केले आहेत. लंकेची पत्नी दीपाली ही चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्यास मदत करत असे. घरफोडीतील चोरीचे दागिने वितळवणारा आणि नवीन दागिने तयार करणारा सराफ प्रवीण देवराज पारेख (५३, रा. खडकी बाजार, पुणे) यालाही अटक करण्यात आली आहे. तयार करण्यात आलेले नवीन दागिने हे फायनान्स कंपनीत गहाण ठेवून त्यावर कर्ज घेण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

लंकेकडून पोलिसांना धमकी

लंके सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दहा तर त्याच्या मुलावर सहा गुन्हे दाखल आहेत. पोलिस त्याच्या घरात तपासणीसाठी गेले असता तो त्यांना मायनॉरिटीज सुरक्षा महासंघाच्या नावाने धमकावत असे. पोलिसांनी कोर्टाकडून आदेश मिळवून त्याच्या घराची तपासणी केली. कोर्टाने त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुक मैत्रीमुळे झाली फसवणूक

$
0
0

आयटी इंजिनीअरला ११ लाखांचा गंडा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फेसबुकवरून झालेल्या ओळखीचा फटका पुण्यातील एका कंपनीतील आयटी इंजिनीअरला बसला आहे. फेसबुकवरून मैत्री झालेल्या तरुणीने संबंधित इंजिनीअरला तिला कस्टमने पकडले आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यातून सोडविण्यासाठी विविध खात्यांवर सुमारे ११ लाख रुपये भरायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कपिल शेवते (३७, रा. मांजरी, हवेली) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून सॅँड्रा रॉबिन्सन व इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवते हे एका येरवडा परिसरातील एका नामांकित आयटी कंपनीत आयटी इंजिनीअर म्हणून नोकरी करतात. त्यांची फेसबुकवरून लंडन येथील सँड्रा नावाच्या तरुणीशी ओळख झाली. त्यांच्यात चॅटिंग सुरू झाले आणि ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. शेवते यांनी तिला त्यांचा मोबाइल क्रमांक दिला. त्यानंतर सँड्राने शेवते यांच्याकडे भारतात स्थायिक व्हायचे असून, त्यासाठी मदत करण्याची विनंती केली.

डिसेंबर २०१६ मध्ये शेवते यांना एक फोन आला. त्या व्यक्तीने कस्टम विभागातून बोलत असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने शेवते यांना ‘त्यांची मैत्रीण सँड्रा दिल्लीत आली असून, तिचे यलो कार्ड हरवले आहे. तिच्याकडे दोन अॅपल मोबाईल, दोन लॅपटॉप, हिऱ्याचे दागिने, ४७ हजार पौंड असा ऐवज मिळाला आहे. सॅँड्राला ताब्यात घेतले असून सुटका करायची असल्यास दंड भरावा लागेल,’ असे सांगितले. शेवते यांनी तिला बोलल्याशिवाय पैसे भरणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना सँड्राचा फोन आला. तिने कस्टमच्या अधिकाऱ्यांनी पकडल्याचे सांगितले आणि मदत करण्याची विनंती केली.

शेवते यांनी होकार दिल्यानंतर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या बँकेच्या खात्यावर काही रक्कम भरली. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकवरून फोन आल्यानंतर दुसरे कारण सांगितले. तीन वेळा फोन करून त्यांच्याकडून अकरा लाख ४३ हजार रुपये विविध खात्यावर मागवून घेतले. त्यानंतर शेवते यांनी सँड्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, संपर्क झाला नाही. त्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अंजूम बागवान हे अधिक तपास करत आहेत.

पोलिसांकडून सावधानतेचा इशारा

सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर विविध कारणे सांगून फसवणूक केल्याच्या अनेक घटना पुण्यात घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून ओळख झालेल्या व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. फेसबुकवर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करू नका. व्यक्तीची प्रत्यक्षात भेट झाल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नका. ऑनलाइन ओळख झालेल्या व्यक्तींच्या भूलथापा व आमिषाला बळू पडू नका, असे आवाहन सायबर सेलच्या पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेपाळी मुलीवर १००जणांचा बलात्कार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन नेपाळी मुलीवर शंभरहून अधिक लोकांनी बलात्कार करून तिला वेश्याव्यवसायात ढकलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गुन्ह्यात दोन पोलिसांनीच आरोपींना मदत केल्याचेही उघड झाले असून सध्या ही मुलगी गायब आहे. या सेक्स रॅकेटची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून पीडित मुलीला शोधून काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि रेवती देरे यांच्या खंडपीठापुढं बुधवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. दिल्लीतील वकील अॅड. अनुजा कपूर यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याने आणि बलात्कार करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, या बलात्कार प्रकरणात सहभागी असलेल्या दोन पोलिसांनाही कोर्टात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण?

ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने या मुलीला पुण्यात आणून वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते. पीडित मुलीनं पुण्यातून पळ काढून दिल्ली गाठली. तिथं जाऊन पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. पुणे पोलिसांनी या प्रकरणी ११३ लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. त्यात काही पोलिसांचाही समावेश आहे. संबंधित मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेचा हैदराबाद, अहमदाबाद आणि भोपाळमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटशी संबंध आहे.

मॉडेलही अत्याचाराची बळी

दिल्लीतील एका मॉडेलवरील बलात्कार आणि तिच्या मानसिक छळवणुकीशीही हे प्रकरण संबंधित आहे. दिल्लीच्या एका मॉडेलला तिच्या मित्राने चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखविले होते. ही मॉडेल पुण्यात आली तेव्हा तिच्या मित्राने त्याच्या बॉसबरोबर सेक्स करण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केली. ही महिला पीडीत मुलीसोबतच दिल्लीला पळून आली होती. तिचाही शोध घेण्याचे आदेश न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुडित महसूल वसुलीला सुरुवात

$
0
0

सनबर्न भरविणाऱ्या कंपनीविरोधात कारवाई; सरकारची विधानसभेत माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
केसनंद येथे ‘सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल’ भरवणाऱ्या कंपनीने लाखो रुपयांचा महसूल बुडवला असून, तो वसूल करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारने विधानसभेत दिली. कंपनीने अनधिकृत गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी ६० लाख ५२ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे, तसेच बेकायदा वृक्षतोड केली म्हणून तीन गुन्हे दाखल करत चार वाहने जप्त केल्याचे या वेळी सांगण्यात आले.
आमदार भीमराव तापकीर यांनी या प्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रकरणी राज्य सरकारने दिलेल्या उत्तरात संबंधित कंपनीविरुद्ध दंड वसूल करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तरादरम्यान सांगितले.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केसनंद येथे सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या कंपनीने सरकारचा महसूल बुडवला आहे का? या प्रकरणी आमदार तापकीर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत सरकारकडे माहिती ​मागवली होती. महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनधिकृत गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी ६० लाख ५२ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. हा कार्यक्रम केसनंद येथील १७ हेक्टरवर झाला होता. त्यावर दोन हजार ५०० चौरस फूट बांधकाम करण्यात आले होते.
‘ फेस्टिव्हलच्या एकत्रित क्षेत्रांकरिता नोंदविण्यात आलेला ‘लिव्ह अँड लायसेन्स’ हा दस्त महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील अनुच्छेद ३६च्या (भाडेपट्टा) तरतुदीखाली येतो. त्यानुसार ४२ लाख ७९ हजार रुपये मुद्रांक शुल्क आणि नोंदणी अधिनियमानुसार २९ हजार रुपये शुल्क कमी भरल्याचे उघडकीस आले असून, या रकमेची वसुली करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे,’ असे तापकीर म्हणाले.
...
वन विभागाकडून गुन्हे दाखल
या कार्यक्रमासाठी तेथील २५ ते ३० वृक्षांची बेकायदा तोड करण्यात आल्याने वन विभागामार्फत तीन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, तसेच चार वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहितीही सरकारतर्फे देण्यात आली.
लष्कर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे, न्यू इंडिया इन्शुरन्सचे विभागीय व्यवस्थापक विजय खिर्डीकर, हेमंत कटापूरकर, बिना भाटिया, पूजा खरात, माणिक भंडारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कँटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर आणि माधुरी गिरमकर यांनी केले.
कार्यक्रमासाठी आतिष कुऱ्हाडे, सौरभ परदेशी, दीपक कुऱ्हाडे, सुनील बाथम, गणेश तिप्पापूरकर, आनंद पाटोळे, प्रशांत भंडार, संदीप रेड्डी, नितीन अडसूळ आदींनी परिश्रम घेतले. प्रास्तविक गणेश भोज यांनी, तर सूत्रसंचालन विकास भांबुरे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधीअभावी रेंगाळले प्रकल्प

$
0
0

सेवाकरापोटी ३२७ कोटींची केंद्राकडे थकबाकी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
जकातीसह विविध कारणास्तव सेवाकराच्या माध्यमातून जमा झालेली ३२७ कोटी रुपयांची रक्कम केंद्र सरकारकडे थकीत आहे. ही थकीत रक्कम केंद्राने अद्याप पुणे कँटोन्मेंट बोर्डाला दिली नसल्याने त्यामुळे विविध विकासकामांना खीळ बसण्याची भीती आहे. त्याकरिता बोर्डाने केंद्रीय सरंक्षण खात्याला पत्रव्यवहार करून पैशांची मागणी केली आहे.
या संदर्भात पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या प्रशासनाने सरंक्षण मंत्रालयाला दोनदा पत्र पाठवून पैसे देण्यासंदर्भात आठवण करून दिली आहे. परंतु, केंद्राकडून अद्याप प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.
पुणे कँटोन्मेंटचे गेल्या वर्षीचा एकूण अर्थसंकल्प हा ३८७ कोटी रुपयांचा होता. त्यात सर्वाधिक रक्कम ही कराच्या रूपाने बोर्डाला मिळत आहे. सेवाकराच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न हेच बोर्डाच्या उत्पन्नाचा खरा स्रोत आहे. लष्कराच्या जमिनीवर होत असलेल्या विविध कामांसाठी सेवाकराच्या माध्यमातून बोर्डाला उत्पन्न मिळते. परंतु, ती रक्कम थेट सरंक्षण खात्याकडे जमा होते. गेल्या वर्षी बोर्डाला २७ कोटी रुपयांचे उत्पन्न कराच्या रूपाने मिळाले होते. परंतु, या वर्षी बोर्डाचे प्रशासन आणि बोर्डाच्या सदस्यांना मात्र उत्पन्न मिळाले नसल्याचे आढळून आले आहे. बोर्डाला सेवा कराच्या माध्यमातून थकीत रक्कम मिळाली नसल्याने बोर्डाच्या विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता आहे.
पुणे कँटोन्मेंट बोर्डाने सध्या विविध १५ प्रकल्पांना मंजुरी मिळविली आहे. त्यापैकी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल, महिला कर्मचाऱ्यांसाठी वसतिगृह, १०० टन क्षमतेचे घन कचरा प्रकल्प तसेच घोरपडी फातिमानगर, वानवडी या भागातील सांडपाण्याची व्यवस्था यासारखे प्रकल्प सध्या सुरू करण्यात आले आहेत. त्याशिवाय आजमितीला बोर्डाच्या हद्दीतील नागरी भागात गटार, कॅस्टिलिनो रस्त्यावरील स्काय वॉक, बहुमजली पार्किंग, १०० केव्ही क्षमतेची सोलर यंत्रणा, २० एमएलडी क्षमतेचे बोटी रस्त्यावर मलनिःस्सारण प्रकल्प, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी वसतिगृह, क्रीडांगण, सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलचे आधुनिकीकरण, वीर सावरकर शाळेची इमारत बांधणी, अग्निशमन दलाच्या विभागामागे स्टोअरसाठी स्वतंत्र इमारत यांसारख्या पंधरा प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी काही प्रकल्पांच्या कामांना सुरुवात झाली आहे. परंतु, निधी अभावी या प्रकल्पांना गती मिळणे अशक्य होत असल्याचे चित्र आहे. याकरिता केंद्राकडे सेवाकरापोटीची थकीत रक्कम मागणीसाठी बोर्डाकडून पत्र व्यवहार केला जात आहे.
‘पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या विविध पंधरा प्रकल्पांना केंद्राने मंजुरी दिली आहे. या सर्व प्रकल्पांचा अंदाजित खर्च हा चारशे कोटी रुपयांच्या घरात आहे. बोर्डाकडे उत्पन्नच नसेल तर या कामांना गती कशी मिळेल ? हॉस्पिटलचे आधुनिकीकरण, रवींद्रनाथ टागोर शाळा, सांडपाणी प्रकल्प, महिला वसतिगृह इमारत बांधकाम यासारखी विकास कामे ही केंद्राच्या निधीवर अवलंबून आहे. निधीच सरकारने दिला नाही तर ही कामे कशी होणार,’ असा सवाल बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर यांनी उपस्थित केला आहे.
केंद्राकडून केवळ आतापर्यंत सात कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. बोर्डाच्या हद्दीत विविध कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्याकडून मोठ्या स्वरूपात सेवाकराच्या माध्यमातून कर जमा होतो. ही रक्कम थेट केंद्राकडे जमा होते. त्यांच्याकडून रक्कम बोर्डाला प्राप्त होते. परंतु, हा निधी वितरीत न झाल्याने कामे करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे केंद्राने निधी तातडीने द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. वाय. यादव म्हणाले, ‘केंद्र सरकारने आमच्या विविध प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. परंतु, पैशांशिवाय कोणताही प्रकल्प कार्यान्वित करू शकत नाही. सेवाकराशिवाय बोर्डाकडे दुसरा कोणताही महसुली उत्पन्न जमा करण्याशिवाय मार्ग नाही. त्याकरिता केंद्राकडे पैसे मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.’
...
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या गेल्या तीन वर्षांत एकाही प्रकल्पाला केंद्राकडून मान्यता दिली गेली नव्हती. सध्या विविध स्वरूपाच्या १५ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. सेवाकराच्या माध्यमातून मिळणारी रक्कम हीच बोर्डाच्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. ही रक्कम केंद्राकडून मिळते. हा निधी मिळाल्याशिवाय अन्य कोणतीही कामे पुढे करता येत नाहीत. निधीशिवाय दुसरा कोणताही पर्यायी मार्ग सध्या नाही. त्यामुळे बोर्डाच्या सदस्यांकडून निधी वितरीत करण्याची मागणी रास्त आहे.

- ए. के. त्यागी, ब्रिगेडियर, अध्यक्ष, पुणे कँटोन्मेंट बोर्ड
...
महिलांना दोन लाखांचा अपघाती विमा
जागतिक महिला दिनानिमित्ताने हिंद तरुण मंडळ आणि पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या वॉर्ड़ क्रमांक तीनच्या वतीने वॉर्डातील महिलांसाठी दोन लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविण्यात आला.
बाबाजान चौकातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. ओला व सुका कचरा या विषयी जनजागृती करणारे पथनाट्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी कर्तृत्ववान महिलांसह पुणे महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला. नगरसेविका लता धायरकर, मनीषा लडकत, अर्चना पाटील, कालिंदा पुंडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. गणेश शिंदे यांचे ‘महिला सबलीकरण’ या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले होते.
0000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार वर्षांची आराध्या ‘हृदया’च्या प्रतीक्षेत !

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
नवी मुंबईच्या आराध्या मुळे या चार वर्षांच्या चिमुकलीला वर्षभरापूर्वी डायलेटेड कार्डिओमायोपॅथी हा हृदयाचा आजार झाला आहे. त्यासाठी आराध्याला हृदय प्रत्यारोपणाची गरज आहे. मात्र, २५ वर्षे वयाच्या आतील आणि सुमारे ४० किलोग्रॅम वजन असलेली ब्रेन डेड व्यक्तीच तिला हृदयाचे दान करू शकते. मात्र, आराध्यासाठी हृदय दान करणारी व्यक्ती मिळत नसल्याने आणि प्रत्यारोपणाचा एकूण खर्च हा सुमारे ५० लाख रुपये असल्याने मुळे कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
कळंबोली येथील योगेश व प्रतिभा मुळे या दाम्पत्याची आराध्या ही चिमुकली सध्या मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तिच्या हृदयाची कार्यक्षमता केवळ १० ते १५ टक्केच आहे. केवळ हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी मुंबईतील विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीकडे (झेडटीसीसी) हृदयासाठी नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, केवळ २५ वर्षांच्या आतील आणि ४० किलोग्राम वजनाच्या आतीलच ब्रेनडेड व्यक्तीच्या हृदयाचे तिच्या शरीरात प्रत्यारोपण होऊ शकते. हृदय दान करणारी व्यक्ती मिळत नसल्याने आणि प्रत्यारोपणाचा खर्च भरपूर असल्याने आराध्याच्या आई-वडिलांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. गृहिणी असलेल्या तिच्या आईची तब्येत आराध्याच्या काळजीपोटी खालावली आहे; तसेच खर्चाची रक्कम जमा करण्यासाठी वडीलांनी खासगी नोकरी सोडली आहे.
दरम्यान, आराध्याला हृदय मिळण्यासाठी आणि प्रत्यारोपणाच्या खर्चाची रक्कम जमा होण्यासाठी ‘सेव्ह आराध्या अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानातून अवयव दानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी १९ मार्च रोजी दुपारी चार वाजता जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर ते गुडलक चौक आणि पुन्हा बालगंधर्व रंगमंदिर येथे रॅली विसर्जित होणार आहे, असे आराध्याचे मामा सतीश जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. संबंधित वयोगटातील ब्रेनडेड रुग्ण झाल्यास रुग्णालयांनी किंवा नातेवाइकांनी झेडटीसीसी अथवा मुंबईतील फोर्टीस रुग्णालयाला संपर्क करून आराध्याला नवीन जीवन देण्यास मदत करावी. तसेच, आर्थिक स्वरूपातदेखील मदत करावी. अधिक माहितीसाठी ९६६५३६२४३० या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे घाटी मराठी संघटनेचे अक्षय ननावरे यांनी सांगितले.

वैशाली होणार सहभागी
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून हृदयशस्त्रक्रियेसाठी मदत मिळवणारी वैशाली यादवही या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. चिमुकल्या आराध्याला हृदय मिळण्यासाठी वैशाली हातामध्ये ‘सेव्ह आराध्या’ हे पोस्टर घेऊन जनजागृती करणार आहे, असे प्रतापसिंह यादव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अभिजात’साठी पवारांचे मोदींना साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राज्य सरकार काही प्रयत्न करत नाही आणि केंद्र सरकार मान्यता देत नाही, असे चित्र असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घातले आहे. पवार आणि मोदी यांच्यात परवा झालेल्या बैठकीत हा मुद्दा चर्चिला गेला आहे. ‘पवारांचे बोट पकडून राजकारणात आलो,’ असे म्हणणारे पंतप्रधान आता काय निर्णय घेतात, याकडे राजकीय व साहित्य क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

अभिजात भाषेच्या दर्जासाठी पंतप्रधान कार्यालयावर पत्रांचा पाऊस पाडण्यात येत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा येथील शाहूपुरी शाखेने ही शक्कल लढविल्याने पंतप्रधान कार्यालयाची धावपळ उडत आहे. आत्तापर्यंत सत्तर हजार पत्रे कार्यालयाला पाठविण्यात आली आहेत. शाखेतर्फे यापुढे तीस हजार; तर महाराष्ट्रातून एकूण पाच लाख पत्रे पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात येणार आहेत. या मोहिमेचा संदर्भ घेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत पत्र दिले आहे. तसेच, परवा झालेल्या बैठकीतही या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.

याबाबत शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले, ‘आमच्या पत्रांचा संदर्भ देत शरद पवार यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली आहे. पवार यांनी पंतप्रधानांना दिलेले पत्र आम्हाला मिळाले आहे. आम्ही शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यापैकी केवळ शरद पवार व चंद्रकांत पाटील यांनी ही बाजू उलचून धरली आहे. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलणी केली आहे. बाकी नेत्यांकडून दखल घेतली गेलेली नाही.’

‘पुढील कार्यवाहीसाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडे’

२७ फेब्रुवारी या मराठी राजभाषा दिनापासून पत्रांच्या मोहिमेला सुरुवात करत २५ हजार पत्रे पाठवली. आजपर्यंत ही संख्या सत्तर हजार झाली आहे. शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनीही पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविले होते. कार्यालयाने त्या पत्राची दखल घेत कुलकर्णी यांना उत्तर दिले आहे. ‘तुमचे पत्र पुढील कार्यवाहीसाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठवित आहोत,’ असे उत्तर कुलकर्णी यांना पाठविलेल्या पत्रात देण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाचे पत्र आले असून सूचना देऊन सांस्कृतिक मंत्रालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहे, असे त्यात म्हटले आहे. मात्र, पत्रांची दखल घेतली नाही तर आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे, अशी टिप्पणी कुलकर्णी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वादोन महिन्यांत ३५० दुचाकी चोरीला

$
0
0

Rohit.Athavale
@timesgroup.com

Tweet : @AthavaleRohitMT

पिंपरी : दुचाकींचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून दिवसागणिक आठ ते दहा दुचाकींची चोरी होऊ लागली आहे. गेल्या सव्वा दोन महिन्यांत ३५० दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या असून, त्यातील अवघ्या ३० ते ४० दुचाकी जप्त करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. गेल्या चार वर्षांमधील वाहन चोरीचे प्रमाणात चौपटीने वाढत असून, या वाहन चोरीतून मिळणाऱ्या पैशांचा गुन्हेगारांकडून इतरत्र वापर तर होत नाही ना, याचा शोध तपास यंत्रणांनी घेण्याची गरज निर्माण होऊ लागली आहे.

शहरातील लाखो रुपयांचे दागिने आणि कार चोरीनंतर आता चालू वर्षात २०१७मध्ये जानेवारी ते १४ मार्च या कालावधीत सुमारे ३५० दुचाकी चोरीला गेल्या आहेत. दुचाकी चोरीची आकडेवारी पाहता मागील महिन्यात पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सर्व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर सलग आठ दिवस वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमधील तपास पथकाकडून वाहन चोरांची धरपकड करण्यात आली होती. परंतु, निवडणुकीच्या काळात तपास पथके थंडावली असून त्यांना पुन्हा आयुक्तांच्या सूचनेची गरज भासू लागल्याची चर्चा आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील तुलनात्मक आकडेवारी पाहता पिंपरी-चिंचवमधील नऊ पोलिस ठाणी आणि परिमंडळ चारमधील आठ पोलिस ठाण्यांच्या अखत्यारित परिसरातून सर्वाधिक दुचाकींची चोरी झाल्याचे दिसून येते. मध्यवर्ती पुणे आणि दक्षिण पुण्याच्या तुलनेत उत्तर विभागात वाहन चोरीचे प्रमाण अधिक आहे. तर शहराच्या मध्यवर्ती भागासह सहकारनगर, कात्रज, हडपसर, वानवडी, मुंढवा, कोंढवा, सांगवी परिसरातील वाहन चोरी अधिक आहे.

एखादी दुचाकी हरविल्यास किंवा चोरीला गेल्यानंतर नागरिक पोलिसांकडे धाव घेतात. परंतु पोलिस ठाण्यात गेल्यावर लगेचच तक्रार दाखल करून घेतली जात नाही. गुन्हा दाखल असेल आणि दुचाकी सापडल्यानंतर ती मालकाला परत मिळविण्यासाठी अनेक कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागले. त्यामुळे लगेचच तक्रार कागदावर घेण्याऐवजी आम्ही जवळपास शोध घेण्याचा सल्ला देतो, असे काही अधिकारी सांगतात.

सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड मधील वाहनांची संख्या पन्नास लाखांच्या आसपास पोहचली आहे. त्यामुळे एकच कंपनी, एकाच रंगाच्या दुचाकी रस्त्यावर असतात. त्यामुळे एखादी दुचाकी चोरीचीच असेल असे सांगणे देखील कठीण जात आहे.२०१३ ते २०१६ या कालावधीत काही हजारांमध्ये दुचाकींची चोरी झाल्याचे समोर आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीआरटी अखेर दुचाकींसाठी

$
0
0

भाजपच्या सूचनेनंतर प्रशासनाचा निर्णय; बससेवा सुरू होईपर्यंत अंमलबाजवणी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
बहुप्रतिक्षित दापोडी ते निगडी ‘बीआरटीएस’ मार्गावर बससेवा सुरू होईपर्यंत हा मार्ग दुचाकी वाहनचालकांसाठी खुला करण्याची नामुष्की अखेर पिंपरी-चिंचवड महापालिकेवर ओढवली आहे. येत्या सोमवारपासून (२० मार्च) मार्ग दुचाकीधारकांसाठी खुला होईल, अशी माहिती सह शहरअभियंता राजन पाटील यांनी दिली.

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुर्ननिर्माण (जेएनएनयूआरएम) अंतर्गत पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बीआरटीएस’चे जाळे तयार करण्यात येत आहे. २०१६-१७च्या पालिकेच्या बजेटमध्ये विशेष योजनेअंतर्गत २८७ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. दापोडी-निगडी बारा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर जानेवारी २०१४पासून सुसज्ज ‘बीआरटी’ बस सुरू करण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी लोखंडी रेलिंग उभे करून स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक आणि अन्य कारणास्तव अद्यापपर्यंत बससेवा सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे वाहनचालकांना मोठी अडचण निर्माण होत होती.

वाहनचालकांची गैरसोय लक्षात घेऊन ‘बीआरटी’ बससेवा सुरू होईपर्यंत हा मार्ग दुचाकीचालकांसाठी खुला करण्याची सूचना भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांना केली होती. त्याची दखल घेत हा ‘बीआरटी’ मार्ग येत्या सोमवारपासून (२० मार्च) दुचाकी वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेअंतर्गत दापोडी ते निगडी, सांगवी ते किवळे, नाशिक फाटा ते वाकड, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता आणि देहू-आळंदी या पाच मार्गांवर बीआरटी बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी सांगवी ते किवळे आणि नाशिकफाटा ते वाकड रस्त्यावर या प्रकारची बससेवा सुरू करण्यात आली आहे. याशिवाय चिंचवड येथील केएसबी चौकातील उड्डाणपुलही डिसेंबर २०१६ अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

दापोडी ते निगडी रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘बीआरटीएस’ बससेवा विनाअडथळा सुरू करणे प्रशासनासाठी अडचणीचे ठरत आहे. त्या अनुषंगाने नाशिकफाटा येथील उड्डाणपुलावरून ‘बीआरटीएस’ थांब्याकडे ये-जा करण्यासाठी सध्या पूल बांधण्याचे काम चालू आहे. तसेच महापलिका मुख्यालयासमोरील रस्त्याचे रुंदीकरण, पादचारी मार्गाच्या विकसनाचे काम चालू आहे. या दोन्ही कामांमुळे दापोडी ते निगडी बीआरटीएस मार्ग खुला होण्यास विलंब होत आहे. तरीदेखील मार्गाच्याबाजूने लोखंडी रेलिंग उभारून हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अकारण अडचण निर्माण होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. त्यानंतरच्या प्रशासनासमवेतच्या पहिल्याच बैठकीत आमदार जगताप यांनी नागरिकांच्या अडचणींचा मुद्दा प्रकर्षाने उपस्थित केला आणि प्रशासनाला धारेवर धरले. त्याची दखल घेत प्रशासनाने ‘बीआरटी’ सेवा सुरू होईपर्यंत हा मार्ग किमान दुचाकी वाहनचालकांसाठी खुला करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस शिपायावर कुऱ्हाडीने वार

$
0
0

पाळीव कुत्र्याला दुचाकीचा धक्का लागल्याने वाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाळीव कुत्र्याला दुचाकीचा धक्का लागल्याच्या रागातून पोलिस शिपायासह त्याच्या नातेवाईक तरुणावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना बालाजीनगर येथे बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघा तरुणांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस शिपाई ऋषिकेश कोळपे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी जीवन बोरगे आणि अप्पा उर्फ प्रतीक बोरगे (रा. जिजामाता चौक, बालाजीनगर) यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. कोळपे आणि त्यांचा नातेवाईक असलेला अभिषेक सणस हे दुचाकीवरून जात होते. सणस याचा कुत्र्याला धक्का लागल्याच्या रागातून बोरगे आणि सणस यांच्यात वाद झाले. बोरगे यांनी सणस याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, तसेच दुचाकीची तोडफोड केली. कोळपे हे सणसच्या मदतीसाठी धावले, या वेळी संशयित आरोपी जीवन याने त्याच्या शर्टमध्ये लपवून ठेवलेली कुऱ्हाड काढली आणि तिने कोळपे यांच्या पाठीत वार केला. कोळपे यांनी ते पोलिस असल्याचे सांगितल्यावरही आरोपींनी त्यांना धमकावले. ‘तू पोलिस असो की किंवा कोणी, ज्याला घेऊन यायचे त्याला घेऊन ये,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांसाठी आता रोबो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जगात मानवाच्या कित्येक कामांमध्ये रोबोचा वापर फार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा वेळी रोबोमार्फत ज्येष्ठांना मदत झाली, तर उत्तम गोष्ट होईल. हाच विचार इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी करून संशोधन केले आहे. एमआयटी इंजिनीअरिंग कॉलेजच्या संगणक विभागाच्या विद्यार्थ्यांनी ज्येष्ठांची काळजी घेणारा रोबो तयार करून त्याची यशस्वी चाचणी केली आहे. आयबीएमच्या ‘वॉटसन’ या कॉग्निटिव्ह प्रणालीमुळे रोबोला मानवाच्या सूचनांप्रमाणे हालचाल करता येत आहे.

मानवासारख्या दिसणाऱ्या आणि त्याच्यासारखे व्यवहार करणाऱ्या या रोबोला ‘चिंटू’ नाव देण्यात आले आहे. एमआयटीच्या टेकफेस्टमध्ये तो गुरुवारी सादर करण्यात आला. हा रोबो ज्येष्ठ नागरिकांना त्यांची औषधे -पाणी वेळेवर देणे, पुस्तक व पेपर वाचून दाखविणे, ज्येष्ठ नागरिकांना उठवणे, विविध गोष्टींची आठवण करून देणे अशा त्यांच्या दैनंदिन आवश्यक कामांमध्ये मदत करणार आहे. ही मदत करण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या मनस्थितीला अनुसरून व्यवहार करणे, नृत्याच्या माध्यमातून त्यांचे मनोरंजनसुद्धा करील. या रोबोलो विकसित करण्यासाठी एकूण दहा लाख रुपयांचा खर्च आला आहे. रोबोला अधिक विकसित करण्यासाठी आयबीएम कंपनीकडून १० लाख रूपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

रोबोचे प्रोग्राम हे आयबीएम वॉटसन टूल या प्रणालीवर आधारित आहेत. या प्रणालीमध्ये मानवाच्या बोलण्यावर रोबोमधील प्रोग्रॅम तयार केले आहेत. या प्रणालीत एनएलपी, एपीआय यांसारख्या विविध टूलचा वापर करून मानवाच्या सूचनांना किंवा बोलण्याला ‘मशिन लर्निंग’ प्रक्रियेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच, रोबोला देण्यात येणाऱ्या सूचना अथवा आदेश हे वॉटसन टूलमार्फत इंटरनेटच्या माध्यमातून रोबोमार्फत शोधले जातात आणि त्यानंतर तो सूचनांचे पालन करतो. या रोबोला संवेदनशील बनविण्यासाठी आयबीएम कंपनी मदत करीत आहे. रोबो तयार करण्यासाठी लागणारे सर्व इलेक्ट्रॉनिक आणि इतर सुटे भाग हे अॅल्डरबेरन या फेंच कंपनीने तयार केले आहे. चिंटू रोबो तयार करण्यात संकेत गुप्ता चेल्लू, कृष्णमोहन मनमोहन, रिशव दासगुप्ता, अस्तित्व शहा हे विद्यार्थी तर अतुल गोरे, क्रांती आठल्ये, महेश पारडकर, पुरुषोत्तम नारायण असे आयबीएमचे कर्मचारी यांची प्रमुख भूमिका आहे एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर व संगणक विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. वृषाली कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

चिंटू रोबो अद्याप प्राथमिक पातळीवर काम करत आहे. यावर अजून मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्यात येईल. त्याचा ‘रिस्पॉन्स’ वेळ कमी कसा होईल आणि मानवाच्या सूचनांचे पालन अधिक कसा करेल, यावर पुढील काळात संशोधन करण्यात येईल. - डॉ. वृषाली कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images