Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गर्दीच्या मार्गांवर ‘तेजस्विनी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुणे महानगर परिवहन महामंडळाने महिलांसाठी गर्दीच्या मार्गावर ‘महिला विशेष बस’ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून पीएमपीच्या ताफ्यात महिला प्रवाशांसाठी ७० तेजस्विनी बस दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महिलादिनी महिलांसाठी विशेष सेवा देऊन तेजस्विनी बसची रंगीत तालीम घेतली जाणार आहे.

महिला प्रवाशांना गर्दीच्या मार्गांवर सुरक्षित व आरामदायी प्रवास उपलब्ध व्हावा, या उद्देशाने तेजस्विनी बसचे नियोजन करण्यात आले आहे. या बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर, त्यांचे नियोजन कसे करावे, यासाठी पीएमपीकडून बुधवारी (आठ मार्च) पुणे व पिंपरी चिंचवडच्या सहा मार्गांवर तेजस्विनी बसच्या धर्तीवर महिला विशेष बस सोडण्यात येणार आहे. सकाळी नोकरी, कॉलेज किंवा व्यावसायानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांसाठी सकाळी आणि सायंकाळी या बस सेवेत असतील.

मार्गांचा सर्व्हे करणार

पीएमपीच्या ताफ्यात येत्या काळात तेजस्विनी बस दाखल होणार आहेत. त्यामुळे या बसचे नियोजन करताना महिला प्रवाशांची गरज आणि मिळणारे उत्पन्न या आधारावर नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे बुधवारी महिला विशेष बस सोडण्यात येणाऱ्या सहा मर्गांवर सर्व्हे केला जाणार आहे. महिला प्रवाशांना कोणत्या वेळेला बसची गरज आहे, महिला प्रवाशांची संख्या किती आहे, त्यातून किती उत्पन्न मिळू शकेल, या गोष्टींची पाहणी केली जाणार आहे, अशी माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अविश्रांत परिश्रमांतून विश्रांतीने मिळवले यश

$
0
0

पुणे : ‘इच्छाशक्तीच्या जोरावर सगळी स्वप्नं पूर्ण करता येतात...’ सभारंभामध्ये सातत्याने ऐकायला मिळणारा हा कानमंत्र विश्रांती काटकर यांनी आचरणात आणला. संकटे आली; पण त्यांची तमा न बाळगता कष्ट, सचोटी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यशस्वी जीवनाचे स्वप्न पूर्ण केले. सर्वसामान्यांमध्ये राहणाऱ्या असामान्य विश्रांती या अनेक महिलांसाठी आदर्श ठरत आहेत. कोणे एके काळी छोट्या गावांमध्ये जाऊन सायकलवर बांगड्या विकणाऱ्या या कुटुंबाची आज बांगड्या आणि इमिटिशेन ज्वेलरीची दोन दुकाने आहेत.

विश्रांती काटकर या मूळच्या साताऱ्याच्या. लग्न झाल्यानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. त्या वेळी काटकर कुटुंबीयांचे धायरी फाट्यावर बांगड्यांचे छोटे दुकान होते. काही वर्षांतच रस्ता रुंदीकरणात दुकान पडले. घरची आर्थिक घडी बसविण्यासाठी गिरीश काटकर यांनी सिंहगड परिसरातील लहान गावांमध्ये सायकलवर फिरून बांगड्या विकायला सुरूवात केली. संकटावर मात करण्यासाठी पती-पत्नीने भाड्याने दुकान घेण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठी त्यांना गरज होती ती भांडवलाची.

लघु उद्योजकांना बँकेकडून कर्ज मिळणे, ही अवघड बाब होती. त्या काळात वस्त्यांमधील महिलांच्या सबलीकरणासाठी काम करणाऱ्या अन्नपूर्णा परिवाराची माहिती त्यांना मिळाली. संस्थेने २००८ मध्ये त्यांना सात हजार रुपयांचे कर्ज दिले. कर्ज फेडण्यासाठी आठ वर्षांची मुदत होती. पण चिकाटीने काम करणाऱ्या या जोडप्याने उल्लेखनीय काम करून अल्पावधीत कर्ज फेडले.

एवढेच नव्हे; तर व्यवसायवृद्धीसाठी नियोजन सुरू केले. याचा परिणाम म्हणजे आज विश्रांती काटकर यांची दोन दुकाने आहेत. त्यांना मिळणारा घरगुती ऑर्डरचा ओघ वाढतो आहे. सध्या एक दुकान विश्रांती काटकर चालवतात, तर दुसऱ्या दुकानाची जबाबदारी गिरीश काटकरांकडे आहे.

सुरुवातीच्या काळात आम्हाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. पण आम्ही हार मानली आहे. पती आणि सासूकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे नव्या निर्णयांना नेहमीच प्रोत्साहन मिळाले. त्यांच्या दोघांच्या सहकार्यामुळे कामाचा पसारा वाढविण्याचा आत्मविश्वास आला आहे. अन्नपूर्णा परिवाराने योग्य वेळी दिलेल्या आर्थिक बळामुळे प्रगतीची दिशा मिळाली, असे प्रांजळ मत विश्रांती यांनी व्यक्त केले.

विशेष म्हणजे आयुष्याचे विविध टप्पे पार करताना त्यांनी मुलीच्या शिक्षणाच्या बाबतीत अजिबात तडजोड केली नाही. सध्या त्यांची मुलगी सिम्बायोसिस कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीचे शिक्षण घेते आहे. पुढे तिला मेकअप आर्टिस्ट व्हायचे आहे. इतरांसाठी आदर्श ठरलेल्या विश्रांती यांचा नुकताच अन्नपूर्णा परिवाराच्या वार्षिक सभेत यशस्वी लघुउद्योजिका म्हणून जाहीर सत्कार करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल कॉलेजच्या वर्गामध्ये सीसीटीव्ही

$
0
0

‘एमसीआय’चे कॉलेजना आदेश

पुणेः सरकारी, खासगी मेडिकल कॉलेजमधून प्राध्यापक डॉक्टरांच्या पळवापळवीला लगाम लावण्याबरोबर आता वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवितात की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी थेट वर्गामध्ये ‘सीसीटीव्ही’ लावण्यात यावेत, असा आदेश मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) दिला आहे. कॉलेजमध्ये शिक्षक नसल्यास त्या मेडिकल कॉलेजची मान्यता रद्द करण्याची कारवाईदेखील होणार असल्याने कॉलेजच्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षकांची पुरेशी संख्या नसते. त्याशिवाय वैद्यकीय शाखांच्या विद्यार्थ्यांना अनेकदा शिक्षक शिकविण्यासाठी येत नाहीत. त्याऐवजी ते खासगी हॉस्पिटल अथवा क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या तक्रारींची गंभीर दखल ‘एमसीआय’ने घेऊन शिक्षकांच्या अनुपस्थितीवर देखील ‘वॉच’ ठेवला आहे.

सरकारी, खासगी मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक डॉक्टरांची पळवापळवी होत आहे. त्यावर ‘एमसीआय’ने कडक पावले उचलली आहेत. त्याशिवाय हॉस्पिटल तसेच मेडिकल कॉलेजच्या ‘क्लासरूम’मध्ये विद्यार्थ्यांना शिकविले जाते की नाही, त्यांचे अध्यापन किती वेळ असते, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना पेशंट तपासणी, निदान व उपचाराबाबत मार्गदर्शन करतात की नाही, यावर देखरेख ठेवण्यासासाठी क्लासरूम आणि हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, असे आदेश ‘एमसीआय’ने दिले आहेत. या संदर्भात कॉलेजच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे.

कागदोपत्री शिक्षक दाखवून तो प्रत्यक्षात अनुपस्थित असेल, तर संबंधित कॉलेजची मान्यता रद्द करण्याची कारवाई एमसीआय करणार आहे. तसेच एकाच शिक्षकांची उपस्थिती दोन ठिकाणी आढळल्यावरदेखील कारवाई होणार आहे.

- डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदासाठी आज अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदासाठी आज, बुधवारी अर्ज भरण्यात येणार असून, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराविरोधात राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडून उमेदवार दिला जाणार आहे. भाजपकडून मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अधिकृतरीत्या कोणाचेही नाव जाहीर करण्यात आले नसले, तरी मुक्ता टिळक यांच्याच नावाला पसंती मिळण्याची शक्यता आहे.

शहराच्या नव्या महापौरांची निवड १५ मार्चला होणार आहे. त्यासाठी बुधवारी (८ मार्च) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज दाखल केले जाणार आहेत. पुण्याचे महापौरपद यंदा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. भाजपकडून त्यासाठी चार-पाच महिलांची नावे पुढे येत आहेत. त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी पुण्याचे प्रभारी सुभाष देशमुख यांनी शहरातील खासदार-आमदार आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा कल जाणून घेतला. त्यामध्ये मुक्ता टिळक यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. तरीही मंगळवारी रात्रीपर्यंत भाजपने त्याबाबतचा निर्णय अंतिम केला नसल्याने महापौरपद नेमके कोणाकडे जाणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

भाजपप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसनेही महापौर निवडणूक लढविण्याचे ठरवले असून, कोण लढणार, याचा फैसला अद्याप गुलदस्तात ठेवला आहे. पक्षाच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी मंगळवारी प्रमुख इच्छुकांची भेट घेऊन गटनेता निवडण्याबाबत चर्चा केली. या बैठकीत महापौरपदासाठी कोण उमेदवार असेल, याचीही चर्चा झाली. नंदा लोणकर, रेखा टिंगरे आणि सुमन पठारे यापैकी एक नाव बुधवारी दुपारपर्यंत निश्चित केले जाईल, अशी शक्यता आहे. शिवसेनेकडून महापौरपदासाठी अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

उपमहापौरपदासाठी बुधवारीच अर्ज दाखल करायचे असून, भाजपशी युती करून लढलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडे (आरपीआय) हे पद जाण्याची शक्यता आहे. आरपीआयचे नगरसेवक नवनाथ कांबळे यांचा अर्ज बुधवारी दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमहापौरपदासाठी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असेल, अशी चिन्हे आहेत. त्याचा निर्णयही बुधवारी दुपारीच घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

महापौरपद किती वर्ष?

महापौरपदाची मुदत अडीच वर्षांची असली, तरी अधिक कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी सव्वा वर्षाने नवीन महापौर दिला. त्यामुळे चार नगरसेवकांना महापौर होण्याची संधी लाभली. भाजपतर्फे सव्वा-सव्वा वर्षासाठी महापौरपद देता येईल का, याची चाचपणी केली गेली असली, तरी अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. राज्यातील दहापैकी आठ महापालिकांमध्ये भाजपचा महापौर होणार असल्याने प्रदेश पातळीवरूनच त्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे संकेत मिळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सून मिशनचा दुसरा टप्पा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या मान्सूनच्या अचूक अनुमानासाठी असलेल्या नॅशनल मान्सून मिशनचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, मिशनच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. मान्सून मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात १२ किलोमीटरपर्यंतच्या प्रदेशासाठी स्थानिक पावसाचा अंदाज देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आजपर्यंत मान्सून मॉडेलमध्ये समाविष्ट नसणाऱ्या ढगांच्या रचनेचा अंतर्भावही त्यात करण्यात येणार आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटिओरॉलॉजीचे (आयआयटीएम) नवे संचालक म्हणून ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ प्रा. रविशंकर नंजुनदैया यांनी नुकताच पदभार स्वीकारला. या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना त्यांनी मान्सून मिशनच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव असणाऱ्या मान्सूनचा अंदाज अधिक अचूक व्हावा यासाठी मान्सून मिशनच्या अंतर्गत देश-विदेशातील संशोधन संस्थांच्या सहकार्याने हवामानाच्या सद्यस्थितीवर आधारीत डायनॅमिक मॉडेल तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यासाठी २०१२ ते २०१७ या कालावधीसाठी चारशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच अमेरिकेच्या क्लायमेट फोरकास्ट सिस्टीम (सीएफएस) या मॉडेलचा आधार घेऊन आयआयटीएमच्या शास्त्रज्ञांनी ‘सीएफएस-व्हर्जन २’ हे अद्ययावत मॉडेल तयार करून भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे (आयएमडी) सुपूर्द केले.

याबाबत प्रा. नंजुनदैया म्हणाले, ‘मान्सूनचे डायनॅमिक मॉडेल तयार करण्याचे मुख्य उद्दिष्ट पूर्ण झाले असले, तरी अधिक स्थानिक पातळीवरील पावसाचा अंदाज देण्यासाठी मान्सून मिशनचा कार्यकाळ वाढवण्याचे नीती आयोगाने तत्त्वतः मान्य केले आहे. सध्याच्या मान्सून मॉडेलमध्ये पन्नास चौरस किलोमीटर क्षेत्रापर्यंतचा विचार (रिझोल्यूशन) केला जातो. हे रिझोल्यूशन बारा चौरस किलोमीटरपर्यंत कमी करण्याची सूचना नीती आयोगाने केली आहे. त्यासाठी मान्सून मिशनचा दुसरा टप्पा तीन वर्षांसाठी मंजूर करण्यात आला असून, या कालावधीत स्थानिक पातळीवरील पावसाचा अंदाज देण्याच्या दृष्टीने मॉडेलमध्ये सुधारणा करण्यात येईल.’

मान्सूनच्या मॉडेलचे रिझोल्युशन ५० किलोमीटरचे असल्यामुळे त्यामध्ये मान्सूनच्या ढगांचा अंतर्भाव होत नाही. दोन-तीन किलोमीटरची व्याप्ती असणाऱ्या ढगांची पावसाच्या वितरणात मोठी भूमिका असते. ढगांची ही भूमिका मॉडेलमध्ये व्यक्त करणे हे आजच्या हवामानशास्त्रातील सर्वांत मोठे आव्हान आहे. मान्सून मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात ढगांचा अंतर्भाव करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी देशातील सुपरकम्प्युटरची क्षमता पाच पटींनी वाढवण्यात येणार आहे.

- प्रा. रविशंकर नंजुनदैया, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे मेट्रो मार्गांची अंतिम रचना उद्या

$
0
0

मेट्रो संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गिकांची अंतिम रचना (अलाइनमेंट) येत्या गुरुवारी (९ मार्च) होणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महा-मेट्रो) पहिल्या बैठकीत मान्य केली जाणार आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गिकेवरील एक भुयारी स्टेशन कमी होण्याची दाट शक्यता असून, शिवाजीनगर धान्य गोदामाच्या जागेवर तीन मेट्रो मार्गांचे ‘इंटर-चेंजिंग स्टेशन’ करण्यावरही शिक्कामोर्तब केले जाण्याचे संकेत मिळत आहेत.

केंद्र सरकारने पुण्याच्या मेट्रोला मान्यता देतानाच, महामेट्रोतर्फे त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची पुनर्रचना करून महामेट्रोची स्थापना करण्यात आली आहे. महामेट्रोचे अध्यक्ष आणि केंद्रीय नगरविकास विभागाचे मुख्य सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची पहिली बैठक येत्या गुरुवारी नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीमध्ये मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांच्या अलायनमेंट अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गिकेच्या रचनेतही अंशतः बदल केला जाण्याचे संकेत मिळत असून, शिवाजीनगर येथील भुयारी स्टेशननतर सविस्तर प्रकल्प आराखड्यात (डीपीआर) दर्शवण्यात आलेले ‘एएसआय’चे स्टेशन रद्द होण्याची शक्यता आहे. शिवाजीनगरनंतर ही मार्गिका थेट कोर्टासमोरील धान्य गोदामापाशी येईल आणि तिथून ती बुधवार पेठ-मंडई मार्गे स्वारगेटला नेण्यात येईल. याच ठिकाणी वनाज-रामवाडी आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) राबविण्यात येणाऱ्या शिवाजीनगर-हिंजवडी मार्गाचे स्टेशन असेल. त्यामुळे, नागरिकांना एकाच ठिकाणी तीन मेट्रो लाइनचा पर्याय उपलब्ध असेल.

शहराच्या पुढील १५ वर्षांचा विचार करून ‘इंटर-मॉडेल इंटीग्रेटेड प्लॅन’वरही संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मेट्रो, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी), रिक्षा-टॅक्सी आणि सायकल या सर्वांचा एकत्रित विचार करून संचालक मंडळातर्फे धोरण निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, शहरातील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांच्या ब्रँडिंगसाठी एकसमान व्यवस्था अंमलात आणण्याच्या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता आहे.

पीएमपीला मेट्रोचे बळ?

पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) टर्मिनल आणि डेपो विकसित करून घेण्यासाठी महा-मेट्रोतर्फे आर्थिक सहाय्य मिळू शकते, याबाबतही संचालक मंडळाच्या बैठकीत चाचपणी केली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. महामेट्रोने पीएमपीला हे टर्मिनल-डेपो विकसित करून दिल्यास, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे ६०-४० अशा स्वरूपात संबंधित निधी महा-मेट्रोला टप्प्याटप्प्याने देण्यात येईल, असा प्रस्ताव आहे.

सर्व शंकांचे निरसन

शहरातील मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील रेंजहिल्सपर्यंतच्या सुमारे १० किमीच्या कामासाठी देशातील अनेक मोठमोठ्या कंपन्या पुढे आल्या आहेत. या मार्गाची सविस्तर माहिती आणि त्या संदर्भात कंपन्यांकडून उपस्थित केल्या गेलेल्या सर्व शंकांचे निरसन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महा-मेट्रो) अधिकाऱ्यांनी मंगळवारी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका ते रेंजहिल्स या १०.७५ किमीच्या मार्गाचे टेंडर गेल्या महिनाअखेरीस प्रसिद्ध करण्यात आले. मार्च अखेरपर्यंत त्याची मुदत आहे. या टेंडरबाबत मंगळवारी महामेट्रोच्या कार्यालयात झालेल्या ‘प्री-बिड’ बैठकीत अनेक मोठ्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये अॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, टाटा प्रोजेक्ट्स, एनसीसी, सिमप्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर, जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स, वालेचा इंजिनीअर्स आणि आयटीपी सिमेंटेशन इंडिया या कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

टेंडरमधील विविध अटी-शर्तींबाबत आणि पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्सपर्यंतच्या मेट्रोच्या अलायनमेंटबद्दलच्या विविध शंका-प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आले. महामेट्रोचे संचालक (प्रोजेक्टस्) महेश कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध प्रश्नांचा खुलासा केला. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील १० किमीच्या मार्गाला मिळालेला प्रारंभिक प्रतिसाद उत्साहवर्धक असून, आगामी काळात देशातील आणखी कंपन्या यामध्ये सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त केला गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांच्या सुरक्षेसाठी ‘बडीकॉप’ सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योगातील अंतरा दास, रसिला राजू या तरुणींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर, रात्री-अपरात्री नोकरीवरून घरी जाणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून ‘बडीकॉप’ नावाची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे गरज भासल्यास महिलांना तातडीने पोलिसांची मदत मिळू शकणार आहे.

आयटी उद्योगातील महिलांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते, रात्री परत जाताना अनेकदा त्यांना असुरक्षितता भासते. अशा वेळी त्यांच्यामागे पोलिस खंबीरपणे आहेत, हे सांगण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे सुरक्षित वाटण्यासाठी बडीकॉप ही योजना सुरू केल्याचे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बुधवारी सांगितले. मित्र या शब्दासाठी इंग्रजीत बडी हा शब्द वापरण्यात येतो. बडीकॉप ही योजना सुरू करण्यामागे मित्रत्वाची भावना असल्याचे शुक्ला यांनी नमूद केले. या योजनेअंतर्गत, बडीकॉप म्हणून नेमणूक झालेले पोलिस मदतीसाठी तत्पर असतील. चाळीस महिलांमागे एक पोलिस (बडीकॉप) असे प्रमाण असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद, उपायुक्त दीपक साकोरे उपस्थित होते.

अशी आहे योजना

या योजनेत शहरातील सर्व पोलिस ठाण्यांतील महिला आणि पुरुष पोलिस शिपायांचा समावेश असेल. प्रत्येक पोलिस ठाण्यात बडीकॉपची यादी लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिला आणि बडीकॉप यांचा व्हाट्सअॅप ग्रुप बनविण्यात येणार आहे. त्याद्वारे संवाद साधता येईल. शिवाय कोणालाही मदत मागता येईल. आयटी उद्योगातील सुमारे एक हजार महिलांनी या योजनेत नोंदणी केली आहे. ‘इतर क्षेत्रांतील महिलाही बडीकॉपकडे मदत मागू शकतात. त्यासाठी त्यांनी पोलिस ठाण्यात नोंदणी करायला हवी,’ असे आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.

नवीन अॅप

महिलांना संकटाच्या वेळी तत्काळ मदत मिळण्यासाठी पुणे पोलिसांकडून लोकेशन शोधणारे ‘एसओएस अॅप’ तयार करण्यात आले आहे. एखाद्या ठिकाणी महिलेवर संकट आल्यास ती अॅपद्वारे मदत मागू शकते. अॅप उघडल्यास तिच्या लोकेशनवरुन अॅप जवळचे पोलिस ठाणे शोधेल. त्या भागातील पोलिस ठाण्याचा क्रमांक उपलब्ध होईल. तिने मोबाइलवरून केलेला फोन तातडीने पोलिस ठाण्यात जाईल. तिथे प्रतिसाद मिळाला नाही, तर ठाण्याचा पोलिस निरीक्षकाकडे फोन जाईल. तिथेही प्रतिसाद न मिळाल्यास सहाय्यक आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांपर्यंत फोन पोहोचेल, असे रश्मी शुक्ला यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबदल्यात मिळणाऱ्या जमिनी विकता येणार

$
0
0

विमानतळासाठी फक्त सात गावांतील जमिनी घेणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुरंदर येथील​ नियोजित विमानतळासाठी फक्त सात गावांमधील जमिनी ताब्यात घेतल्या जाणार आहेत. त्यातून गावठाणे वगळण्यात येणार असून, संबंधित जमिनींच्या मोबदल्यात मिळणाऱ्या विकसित पर्यायी जमिनी शेतकऱ्यांना विकता येणार आहेत.

‘आतापर्यंत कोणत्याही विकासकामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्यावर त्या बदल्यात मिळणाऱ्या पर्यायी जमिनी शेतकऱ्यांना विकता येत नव्हत्या. मात्र, अमरावती येथील विमानतळासाठी जागा घेतल्यावर त्या शेतकऱ्यांना जमिनी हस्तांतरीत करण्याचा पर्याय देण्यात आला. त्याच धर्तीवर पुरंदर येथील विमानतळासाठीही हा पर्याय दिला जाणार आहे. मात्र, शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून संबंधित शेतकऱ्याला बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळाला की नाही, हे तपासण्याच्या सूचना नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या उपनिबंधकांना दिल्या जाणार आहेत,’ असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले, ‘विमानतळासाठी या भागातील सात गावांच्याच जमिनी ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये पारगाव, एखतपूर, मुंजेवाडी, कुंभारवळण, उदाचीवाडी, वनपुरी आणि खानवडी यांचा समावेश आहे. मात्र, त्यातून गावठाणांना वगळण्यात आले आहे. या प्रत्येक गावातील किती क्षेत्र असणार आहे, याबाबतची माहिती घेण्यात येत आहे.’

‘शेतकऱ्यांना जमिनींच्या मोबदल्यात पर्यायी जमीन देणे, वार्षिक भाडेपट्टा निश्चित करणे, शेतकऱ्यांना सध्या मिळणाऱ्या संबंधित शेतीच्या उत्पन्नाएवढे उत्पन्न देऊन पर्यायी विकसित जमीन देणे आदी विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी दोन पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवले जाणार आहेत,’ असेही राव यांनी स्पष्ट केले.

‘विमानतळासाठी कोअर एरिया आणि फ्रीज एरिया या प्रकारची जमीन आवश्यक असते. नियो​जित ठिकाणी सुमारे पाचशे हेक्टर जमीन ही सरकारी आणि अन्य जमीन शेतकऱ्यांची घ्यावी लागणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेऊ,’ असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संपूर्ण शहरात उद्या पाणी बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्वतीसह वडगाव, लष्कर, एसएनडीटी, नवीन होळकर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध पंपिंग स्टेशनमध्ये स्थापत्य/विद्युतविषयक अत्यावश्यक कामे करायची असल्याने येत्या गुरुवारी (९ मार्च) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (१० मार्च) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग

पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती गाव, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, सहकारनगर, सातारा रोड परिसर, बिबवेवाडी परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणे, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मीठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र. (४२, ४६) कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, पर्वती व पद्मावती
टँकर भरणा केंद्र.

वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ.

चतुःशृंगी/एसएनडीटी/वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःशृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरुगणेश नगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलर नगर, अतुल नगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड परिसर.

लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी.

नवीन होळकर जलकेंद्र : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी परिसर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदाची उत्सुकता शिगेला

$
0
0

अंतिम क्षणीच नाव होणार जाहीर; आमदार जगताप यांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या क्षणीच नाव जाहीर होईल, असे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी बुधवारी स्पष्ट केले.
शहराच्या महापौरपदासाठी १४ मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत गुरुवार दुपारी तीन ते पाच आहे. पालिकेत १२८ पैकी ७७ जागा मिळवून भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यामुळे महापौरपदी विराजमान होऊन इतिहास घडविण्यासाठी पक्षाकडील इच्छुकांच्या जोरदार हालचाली चालू आहेत. उमेदवार निवडीचे अधिकार पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे यांच्या कोअर कमिटीला आहेत. त्यांच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अंतिम निर्णय घेणार आहेत.
भाजपचा पहिला महापौर कोण असणार, याबाबत राजकीय वर्तुळाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोचली आहे. पालिकेच्या सभागृहातील संख्याबळ लक्षात घेता महापौर निवडणूक न लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्याच्या बिनविरोध निवडीची औपचारिकता फक्त शिल्लक राहणार आहे.
भाजपकडून निष्ठावंताला संधी मिळणार कि दोन्ही आमदारांपैकी एकाच्या खास समर्थकाला संधी मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडप्रक्रियेविषयी श्रेष्ठींकडून धोरण ठरविले जात आहे. त्यामुळे महापौरपद अडीच वर्षांचे कि सव्वा वर्षांचे याबाबतही विचारविनिमय चालू आहे. स्थायी समिती सदस्य, स्वीकृत सदस्य याबाबतही इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी माजी महापौर योगेश बहल यांची निवड झाल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांचे चुकीचे निर्णय हाणून पाडू, असा इशारा दिला आहे. सभागृहात ठोकशाही चालू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विरोधी पक्षाचे वार खंबीरपणे झेलणारा महापौर पक्षाला हवा आहे. त्या अनुषंगाने भाजपकडून उमेदवार निवडताना विशेष खबरदारी घेतली जात आहे.
.....
नावाबाबत एकमत नाही
महापौरपद चिंचवड कि भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकाला द्यायचे, याबाबत भारतीय जनता पक्षामध्ये एकमत होऊ शकले नाही. अंतिम शर्यतीत नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, संतोष लोंढे, नितीन काळजे, राहुल जाधव यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी एक किंवा अन्य कोणी याबाबत मात्र निर्णय झालेला नाही. गुरुवारी (नऊ मार्च) दुपारी तीन ते पाच वेळेत उमेदवारी अर्ज सादर करावयाचा आहे, त्यामुळे अंतिम क्षणीच नाव जाहीर होईल, असे भाजपचे गटनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
.....
राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी योगेश बहल यांची निवड
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी योगेश बहल यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेच्या निवडणुकीत १२८ पैकी ३६ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळाले आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. या माध्यमातून भाजपच्या एकहाती कारभारावर अंकुश ठेवण्याची संधी पक्षाकडे आहे.
पक्षाच्या गटनेतेपदासाठी बहल यांच्यासह नाना काटे, मंगला कदम, दत्ता साने, अजित गव्हाणे, राजू मिसाळ, उषा वाघेरे इच्छुक होते. परंतु, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहल यांच्या नावाला पसंती दिली. त्यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून बहल जबाबदारी सांभाळणार आहेत. ते पालिकेत सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तारूढ पक्षनेते आदी महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत. यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २० (संत तुकारामनगर-कासारवाडी) प्रभागातून ते निवडून आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा कारवाईला सामोरे जा

$
0
0

सामान्यांची कामे मार्गी न लावल्यास बारामती उपविभागीय अधिकाऱ्यांचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, बारामती
प्रशासकीय भवनातील सर्व सरकारी कार्यालयांना उपविभागीय अधिकारी यांनी अचानक भेट दिली. या वेळी त्यांनी प्रत्येक कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेऊन कार्यालय व परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. सर्वसामन्याचे कामे मार्गी लावून लोकाभिमुख प्रशासन गतिमान करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा देऊन उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
‘अधिकाऱ्यांची भेट अवघड’ या अशा आशयाची बातमी ‘मटा’ने नुकतीच प्रसिद्ध केली होती. बारामतीच्या प्रशासकीय भवनातील अधिकारी नेहमी उशिरा येत असे. संबधित बातमीची दखल वरिष्ठांनी घेतल्याने सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बारामतीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी प्रशासकीय भवनात असणाऱ्या नगर रचना कार्यालय, विशेष लेखा परीक्षण कार्यालय, तहसील कार्यालयाची रेकॉर्ड रूम, उपविभागीय कृषी कार्यालय, कृषी मंडल कार्यालय, वजन मापे कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, उप निबंधक (सहकारी संस्था), लघूपाट बंधारा स्थानिक स्तर कार्यालय, सहायक दुय्यम निबंधक कार्यालय, तहसील कार्यालयांना अचानक भेटी दिल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.
या सर्व कार्यालयात उपस्थित असणाऱ्या नागरिकांच्या समस्याही निकम यांनी जाणून घेतल्या. कार्यालयात अधिकारी जागेवर नसणे, अर्ज-विनंत्या करूनही कामे मार्गी लागत नसणे, कामाबाबत योग्य शब्दांमध्ये माहिती न मिळणे, संबंधित अधिकारी कामकाजाच्या वेळेत जागेवर उपलब्ध नसणे आदी तक्रारी उपस्थित नागरिकांनी निकम यांच्या कानावर घातल्या. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर निकम यांनी नागरिकांना संबंधित कार्यालयांमधील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर निकम यांनी प्रत्येक कार्यालयातील अधिकाऱ्यांना लोकाभिमुख प्रशासन गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले.
या वेळी निकम म्हणाले, ‘सरकारकडून लोकहितासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकडे कोणत्याही विभागाच्या प्रशासनाकडून दुर्लक्ष होता कामा नये. नागरिकांच्या विविध समस्या तसेच विशिष्ट भागातील अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाच्या विविध विभागाकडून जलदगतीने कामे होणे अपेक्षित आहे. सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करणेही अपेक्षित आहे. या सर्व बाबींची तातडीने पूर्तता झाली पाहिजे.’
--------------
अधिकाऱ्यांनी वेळेवर आले पाहिजे. प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे. जे अधिकारी आणि कर्मचारी प्रशासन कार्यक्षम आणि गतीमान होण्यासाठी साथ देणार नाहीत, अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांवर खात्यांतर्गत कारवाई करण्यात येईल.
- हेमंत निकम, उपविभागीय अधिकारी, बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामात प्राधान्य आणि खणानारळाने ओटी

$
0
0

भूमी अभिलेख कार्यालयात अनोख्या पद्धतीने महिला दिन
म. टा. प्रतिनिधी, बारामती
महिला दिनाच्या दिवशी कोणताही औपचारिक कार्यक्रम न ठेवता कामासाठी कार्यालयात आलेल्या महिलांचे काम प्राधान्याने करून त्यांना खण आणि नारळाची भेट देण्यात आली. हा अभिनव उपक्रम बारामती येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आला. या उपक्रमामुळे महिला भारावून गेल्या.
भूमी अभिलेख कार्यालयाचे उपाधिक्षक अमरसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. महिला दिनानिमित्त केवळ औपचारिक कार्यक्रम न घेता, या दिवशी कामानिमित्त कार्यालयात आलेल्या प्रत्येक महिलेचे काम प्राधान्याने करून देण्यात आले. कोणतीही पूर्वप्रसिद्धी न करता घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महिलांना सुखद धक्का मिळाला.
कामानिमित्त सकाळच्या सत्रात आलेल्या सारिका खांडजकर (रा. पुणे) यांना निरावागज (ता. बारामती) येथील त्यांच्या मालकीच्या गटाच्या मोजणीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. सुनीता पुरुषोत्तम दीक्षित यांना त्यांच्या पिंपळी, ता. बारामती येथील गट नं. ७ मधील स्कीम उतारा, गट नकाशा यांच्या अभिलेख नकला देण्यात आल्या. स्मिता दत्तात्रय बोराडे, यांच्या बारामती येथील सर्व्हे नंबर ६९च्या मोजणीचा अर्ज स्वीकारून त्यांना पोहोच देण्यात आली. नीलम ईश्वर यादव यांचा जळोची येथील क प्रत मोजणी नकाशा त्यांना तातडीने देण्यात आला. कामानिमित्त आलेल्या महिलांचा सत्कार तहसिलदार हनुमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रशासकीय भवनात कार्यरत असणाऱ्या इतर कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचाही या निमित्त तहसिलदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी भूमी अभिलेख कार्यालयाचे उपाधिक्षक अमरसिंह पाटील, भूमी अभिलेख कार्यालयाच्या अर्चना कोकणे, सोमनाथ कुंभार, आशिष कुमावत उपस्थित होते.
----------------
भूमी अभिलेख कार्यालयाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमामुळे महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, आणि प्रशासन अधिक गतीमान होईल.
- हनुमंत पाटील, तहसीलदार बारामती
-------------
महिला सर्व्हेअर उपलब्ध
वर्षातील प्रत्येक दिवशी भूमी अभिलेख कार्यालयात येणाऱ्या महिलांचे काम प्राधान्याने करून देण्यात येईल, अशी माहिती भूमी अभिलेख खात्याच्या वतीने देण्यात आली. त्याच बरोबर जर अर्जदार महिला खातेदार असेल तर त्यांना कार्यालयाच्या वतीने महिला सर्व्हेअरच मोजणीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे महिला खातेदारांना आपल्या कामाबद्दल योग्य माहिती मिळेल आणि त्यांच्या कामाचा योग्य समन्वय साधला जाईल अशी प्रतिक्रिया उपाधिक्षक भूमी अभिलेख अमरसिंह पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या शाळेत उन्हाळ्यात स्वेटरवाटप

$
0
0

शिक्षण मंडळावर विद्यार्थी, पालक नाराज
म. टा. प्रतिनिधी, हडपसर
महापालिकेच्या शिक्षण मंडळाने हिवाळा संपल्यावर उन्हाळ्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना स्वेटर वाटण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उन्हाळी स्वेटर बघा अशा शब्दांत विद्यार्थी आणि पालकांनी आपली नाराजी व्यक्त केली.
थंडीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना महापालिकेतर्फे स्वेटर दिले जातात. मात्र, या योजनेचा फायदा विद्यार्थ्यांना न होता ठेकेदारांना होताना दिसत आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर स्वेटर वाटप करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
हडपसर व येरवडा, वानवडीमधील महापालिकेच्या शाळेत अद्याप काही विद्यार्थ्यांना गणवेशही मिळालेला नाही. त्यातच अख्खा उन्हाळा संपून गेल्यानंतर स्वेटर देण्यात आले आहेत. गाडीतळ येथील आयएसओ शाळा क्र. १०० मध्येही मागील आठवड्यात विद्यार्थ्यांना स्वेटर देण्यात आले आहे. वानवडीतील शाळा क्र. ६२ बी मध्ये तीन दिवसांपूर्वी स्वेटर विद्यार्थ्यांना देण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात माळवाडीची शाळा क्र. ८३, काळेपडळ येथील शाळा क्र. १७१ व १२ बी, शाळा क्र. ५८ (मुलींची) या सर्व ठिकाणी स्वेटरचे वाटप करण्यात आले आहे.
स्वेटरबद्दल मुलांना विचारले असता, मुलांनी हसत हसत हे पाहा उन्हाळी स्वेटर असे म्हणत दप्तरातील स्वेटर दाखवले. वास्तविक विद्यार्थ्यांना हिवाळ्याच्या सुरुवातीला स्वेटर देणे अपेक्षित आहे. त्याबाबतचा उल्लेख टेंडरमध्येही करण्यात आलेला आहे. मात्र, याबाबतच्या नियमांचे पालन केले जात नाही. निविदा घेणारी एजन्सी स्वतःच्या सोयीनुसार काम करत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या सर्व शाळांची पटसंख्या एक लाख आहे. त्यापैकी ६० हजार विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्याचे टेंडर महापालिकेने काढले होते. त्यापैकी किती विद्यार्थ्यांना स्वेटर मिळाले आहेत, असा प्रश्न पालकांनी विचारला आहे. महापालिका शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी शुभांगी चव्हाण म्हणाल्या, ‘संपूर्ण शहारात महापालिकेच्या शाळेत स्वेटर वाटप झाले आहे.’
..
एखाद्या शाळेत स्वेटर उशिरा वाटले गेले असण्याची शक्यता आहे. एकूण एक लाख विद्यार्थ्यांपैकी साठ हजार विद्यार्थ्यांना स्वेटर देण्यात आले आहेत. बालवाडी ,पहिली ,तिसरी ,पाचवी ,सातवी अश्या इयत्याला एक आड दर दोन वर्षाने वाटप केले जाते. एखाद्या एजन्सीने उशिरा स्वेटर दिले असतील, तर त्यांच्यावर कारवाई करून त्या एजन्सीला काळ्या यादीत टाकले जाईल.

- शुभांगी चव्हाण, शिक्षणाधिकारी, शिक्षण मंडळ, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विखे हे भाजपचे हस्तक : अशोक विखे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) हस्तक आहेत,’ असा थेट आरोप त्यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे-पाटील यांनी बुधवारी पुण्यात केला. ‘राधाकृष्ण विखे हे बोलके पोपट असून, त्यांच्या ट्रस्टला इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या झाकीर नाईक यांनी दोन कोटी रुपयांची देणगी दिली आहे,’ असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी २३ फेब्रुवारी रोजी ‘प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे’च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर या दोन्ही भावांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटलांच्या निधनानंतर अवघ्या नऊ आठवड्यांतच राज्याला विखे-पाटील कुटुंबातील भाऊबंदकीचा वाद पाहावयास मिळाला आहे.
अशोक विखे यांनी राधाकृष्ण विखेंवर चौफेर टीका करताना झाकीर नाईक यांच्या ट्रस्टकडून दोन कोटी रुपयांची देणगी घेतल्याचा आरोप केला आहे. ‘सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) या देणगीची माहिती घेतली आहे. इतर अनेक संस्था असताना राधाकृष्ण विखे यांच्या संस्थेलाच देणगी का देण्यात आली आणि अशा व्यक्तीकडून देणगी घेणे नैतिकदृष्ट्या होते का,’ असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
‘दिवंगत नेते विठ्ठलराव विखे पाटील व बाळासाहेब विखे पाटील यांनी अनेक शैक्षणिक संस्था सुरू केल्या. गोरगरीबांच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे हा त्यातील प्रमुख उद्देश होता. परंतु राधाकृष्ण विखे हे संस्थांचा वापर हा राजकारणासाठी करत आहेत,’ असा आरोपही अशोक विखे यांनी केला.
‘बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनाला केवळ नऊ आठवडे झाले आहेत. त्यांच्या पश्चात या संस्था ताब्यात घेण्याची घाई राधाकृष्ण विखेंना का झाली आहे? प्रवरा ग्रामीण एज्युकेशन ट्रस्टची बैठक घेऊन माझ्या अनुपस्थितीत ही संस्था ताब्यात घेण्यात आली. गेली अडीच वर्षे या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. धर्मादाय आयुक्तांकडून स्वतः अध्यक्ष झाल्याचा चेंज रिपोर्टही मंजूर करून घेण्यात आला आहे. या विरुद्ध राधाकृष्ण विखे यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असून, तशी याचिकाही धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात दाखल करणार आहे,’ असे विखे म्हणाले.
‘बाळासाहेब विखे पाटील यांचा राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी यांना राजकारणात आणण्यास विरोध होता. राधाकृष्ण विखे यांनी मनमानी करत त्यांना राजकारणात आणले. बाळासाहेब विखे पाटील शेवटच्या सहा महिन्यांत राधाकृष्ण विखेंशी बोलत देखील नव्हते,’ असा आरोप अशोक विखे यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातही उपलोकायुक्तांची नेमणूक?

$
0
0

पालकमंत्र्यांचे सूचक वक्तव्य
म. टा. प्रतिनिधी, पुणे
उपलोकायुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार हे राज्य सरकारला असून गरज पडल्यास पुणे शहरातही राज्य सरकार उपलोकायुक्तांची नेमणूक करू शकते, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी केले.
मुंबई महापालिकेच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र उपलोकायुक्त तसेच निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुणे महापालिकेचा कारभारदेखील पारदर्शी व्हावा, यासाठी उपलोकायुक्त नेमावा, अशी मागणी शहरातील काही स्वयंसेवी संस्थांनी राज्य सरकारकडे केली आहे. गेल्या आठवड्यात शहराचे भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनीही शहरासाठी उपलोकायुक्त नेमावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. याचे पत्र शिरोळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविले आहे. महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी भाजपने उमेदवारी दिलेल्या मुक्ता टिळक, नवनाथ कांबळे यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरण्यात आला. यानंतर बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौर, उपमहापौरपदाच्या उमेदवारांची माहिती देऊन पुढील काळात पालिकेत सत्ताधारी पक्ष म्हणून काम करताना कोणत्या विकासकामांना प्राधान्य दिले जाणार आहे, याची मा‌हिती दिली.
शहरासाठी उपलोकायुक्त नेमणार का, असा प्रश्न पालकमंत्री बापट यांना विचारला असता, ते म्हणाले, ‘संपूर्ण राज्यासाठी लोकायुक्त असतात. ते वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन तेथील कारभाराची पाहणी करत असतात. चार दिवसांपूर्वी लोकायुक्त पुण्यातही होते. शहरातील गैरकारभाराची तक्रार थेट त्यांच्याकडे सर्वसामान्यांना करता यावी, यासाठी लोकायुक्त काम करतात. उपलोकायुक्त नेमण्याचे अधिकार हे राज्य सरकारला असल्याने कोणत्याही शहरात राज्य सरकार नेमणूक करू शकते. गरज पडल्यास पुणे शहरातही उपलोकायुक्त राज्य सरकार नेमू शकते.’
खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, पक्षाचे नवनियुक्त गटनेते श्रीनाथ भिमाले या वेळी उपस्थित होते.
महापालिकेत एकहाती सत्ता देऊन पुणेकरांनी जो विश्वास दाखविला आहे. तो सार्थ ठरविण्यासाठी पक्षाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जाणार आहे. निवडणुकीपूर्वी पक्षाने दिलेल्या ‘वचननाम्याची’ अंमलबजावणी करण्यासाठी शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या पातळीवर समांतर यंत्रणा काम करणार आहे. नगरसेवकांनी नागरिकांना कधी भेटायचे, कोणती कामे करण्यास प्राधान्य द्यायचे याचा मसुदाही तयार केला जाणार असल्याचे बापट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी चेतन तुपे यांची नियुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी चेतन तुपे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. पालिकेत ३९ जागा मिळवित राष्ट्रवादी काँग्रेस दोन क्रमांकाचा पक्ष ठरल्याने राष्ट्रवादीचा गटनेता हा पालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. बहुमताच्या जोरावर चुकीच्या पद्धतीने मान्य करण्यात येणाऱ्या प्रस्तावांना विरोध करून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यास सत्ताधाऱ्यांना भाग पाडण्याचे आव्हान तुपे यांच्यासमोर असणार आहे.
महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ९७ नगरसेवक विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे ३७ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदाची संधी कोणाला दिली जाणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील विजयी उमेदवारांची बैठक बोलावून विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा केली होती. या पदासाठी १३ नगरसेवकांनी इच्छा व्यक्त केली होती. यामध्ये माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यासह माजी स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, अश्विनी कदम, रेखा टिंगरे यांची नावे जोरदार चर्चेत होती. या पदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने बुधवारी सकाळी गटनेते म्हणून तुपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गटनेतेपदाचे नाव निश्चित करण्याचे सर्व अधिक अजित पवार यांना देण्यात आले होते. त्यांनी तुपे यांचे नाव अंतिम केल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
चेतन तुपे यांचे नाव गेल्या वर्षी महापौरपदासाठी चर्चेत होते. मात्र, पक्षाने प्रशांत जगताप यांना संधी दिली होती. तुपे यांच्याकडे यापूर्वी पालिकेचे शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. आपल्या अध्यक्षपदाच्या कारर्किदीत त्यांनी शहराचा विकास आराखडा (डीपी) तयार केला होता. पालिका निवडणुकीत नागरिकांनी गेली दहा वर्षे पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला नाकारून भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका सभागृहात ठामपणे मांडण्याबरोबरच सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामांना विरोध करून शहराच्या हिताचे निर्णय घेण्याचे मोठे आव्हान तुपे यांच्यासमोर असणार आहे.

मनसेच्या गटनेतेपदी वसंत मोरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटनेतेपदी वसंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिका निवडणुकीत मनसेचे अवघे दोनच उमेदवार विजयी झाले आहेत. गेल्या टर्मला पालिकेत मनसेची संख्या २९ होती, त्यामध्ये घट होऊन ही संख्या दोन एवढीच झाली आहे. यापूर्वी मोरे यांनी गटनेते म्हणून काम केल्याने पुन्हा त्यांना संधी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुकलेली संधी ४९ वर्षांनी भाजपकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिका स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचा पहिलाच महापौर होत आहे. ४९ वर्षांपासून हुकत आलेली महापौरपदाची संधी मुक्ता टिळक यांच्या रूपाने पक्षाला मिळाली आहे. यापूर्वी शहराचा प्रथम नागरिक बनण्याची आलेली भाजपची संधी अखेरच्या क्षणी तीन वेळा हुकली आहे.
पुणे शहरात गेली अनेक दशके काँग्रेसचे वर्चस्व राहिले. साहजिकच महापालिकेतही स्थापनेपासूनच सतत याच पक्षाचा वरचष्मा राहिला. त्यामुळे अपवाद वगळता शहराचे महापौरपद काँग्रेसच्याच ताब्यात राहिले होते. काही वेळा हे पद अन्य पक्षांकडे गेले असले, तरी त्यामध्ये पूर्वीचा जनसंघ आणि त्यानंतरही भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत संधी मिळू शकली नाही. महापालिकेत भाजपचे संख्याबळ पुरेसे नसल्यामुळे अनेकदा पक्षाचे नगरसेवक उपचार म्हणून महापौरपदासाठी अर्ज भरत होते. सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचेही प्रयत्न यापूर्वी झाले. संख्येत मोठी तफावत असल्याने त्यांना यश आले नाही. १९६८ मध्ये काँग्रेसच्या विरोधात जनसंघ, नागरी संघटना आणि प्रजा समाजवादी पक्ष असे विरोधक एकत्र आले. जनसंघाच्या अप्पासाहेब भागवत यांना विरोधकांतर्फे महापौरपदासाठी उमेदवारी देण्यात आली. विरोधकांच्या एकीमुळे ही निवडणूक प्रचंड उत्कंठावर्धक ठरली. चुरशीच्या लढतीमध्ये भागवत यांना ३६ मते मिळाली, तर काँग्रेसचे भाऊ कडू हे ३७ मते मिळवून एका मताने विजयी झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेली ही संधी हुकली.
त्यानंतर माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन पुणे विकास आघाडीची स्थापना केली आणि भाजप-शिवसेनेशी युती केली. त्या वेळी भाजपला स्थायी समिती, तर शिवसेनेकडे उपमहापौरपद आले. या तिघांच्या युतीमध्ये भाजपला महापौरपद देण्याचे निश्चित झाले आणि तत्कालीन नेते (सध्याचे आमदार) विजय काळे यांनी महापौरपदासाठी अर्ज भरला. काँग्रेसकडून अनिल भोसले आणि विकास आघाडीकडून दत्तात्रेय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस आणि आघाडीच्या वादात भाजपला महापौरपदाची संधी या निवडणुकीत चालून आली होती. त्यासाठी पडद्याआडून काही हालचालीही झाल्या होत्या. मात्र, तेव्हा आघाडी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये काही चर्चा झाली आणि प्रत्यक्ष मतदानास केवळ दोन मिनिटे बाकी असताना काळे यांना अर्ज मागे घेण्याचा आदेश आला. तेव्हा भाजपची महापौरपदाची हाताशी आलेली दुसरी संधी हुकली.
१० वर्षांपूर्वीही होती संधी
त्यानंतर २००७ च्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्याकडेच महापौरपदाची संधी चालून आली होती. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मोठी स्पर्धा झाली आणि याच निवडणुकीत पुणे पॅटर्न उदयास आला. तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी आणि मंत्री अजित पवार यांच्यातून विस्तव जात नव्हता. त्या वेळी राष्ट्रवादीसोबत जावे, असा भाजपमधील एका गटाचा आग्रह होता. महापौरपदाच्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली. तेव्हा पवार यांचा पराभव करण्यासाठी टिळक यांना महापौरपदासाठी पाठिंबा देण्याची तयारी कलमाडी यांच्या गोटातून दाखविण्यात आली होती. ‘या प्रस्तावाला होकार दिला असता, तर तेव्हाच भाजपचा पहिला महापौर बनला असता,’ असे भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते सांगतात. या खेळीमुळे भाजपपुढेही पेच पडला आणि राष्ट्रवादीपुढे टांगती तलवार निर्माण झाली होती. अखेरच्या क्षणी वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. टिळक यांना अर्ज माघारी घेण्याचा आणि पक्षाच्या सदस्यांनी प्रत्यक्ष मतदानात सहभागी न होण्याचा आदेश देण्यात आला, तेव्हा भाजपची तिसरी संधी हुकली.
यंदा मात्र महापालिकेत भाजपचे दणदणीत बहुमत आले असून टिळक यांची महापौरपदासाठी निवड झाली आहे. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी हुकलेली संधी टिळक यांना पुन्हा मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबा पिकवण्याबाबत कारवाईचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘रायपनिंग चेंबरमध्ये इथिलीन गॅस किंवा इथिलीन स्प्रेचा वापर करून पिकविलेल्या आंब्याचीच बाजारात विक्री करावी. कॅल्शियम कार्बाईडचा (कार्पेट) वापर करून पिकविलेल्या आंब्याच्या विक्रीवर कारवाई केली जाईल’, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिला आहे. तर, दुसरीकडे इथिलीनचा वापर करूनदेखील आंबा खाण्यायोग्य नसल्याचे एफडीएच्या तपासणीत समोर येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे इथिलीनचा वापर करू मात्र, कोणत्या कंपनीचे इथिलीन वापरावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.
आंब्याच्या हंगामात ग्राहकांना चांगला आंबा खाण्यासाठी मिळावा यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, अन्न व औषध प्रशासन, केळी आणि आंब्याच्या व्यापाऱ्यांची बैठक बुधवारी पार पडली. बैठकीस एफडीएचे सहायक आयुक्त अर्जुन भुजबळ, अन्न सुरक्षा अधिकारी योगेश ढाणे, अजित मैत्रे, बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, उपसभापती भूषण तुपे, सचिव पी. एल. खंडागळे, आंब्याचे व्यापारी रोहन उरसळ, युवराज काची, नाथ खैरे, केळी व्यापारी फिरोज साचे आदी उपस्थित होते.
पुरेशा प्रमाणात रायपनिंग चेंबर उपलब्ध नसल्याने बाजारात आलेला सर्व आंबा पिकविणे शक्य नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना इथिलीनचा स्प्रेचा वापर करावा लागतो. काही वेळा शेतकऱ्यांनी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून बाजारात आंबा पाठविल्याने व्यापाऱ्यांनाही फटका बसतो. तर, इथिलीन वापरूनही काही वेळा तपासणीमध्ये आंबा खाण्यायोग्य नसल्याचा अहवाल येतो. त्यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचे नुकसान होते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. या वेळी केळी व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील खासगी रायपनिंग चेंबर आंब्यासाठी देण्याचे मान्य केले आहे.
रायपनिंगची चेंबरची व्यवस्था करणार
केळी बाजारातील बाजार समितीची रायपनिंग चेंबर आहेत. तर, काही व्यापाऱ्यांची खासगी चेंबरही आहेत. या सर्व चेंबरची क्षमता पाहून आंबा पिकविण्यासाठी व्यवस्था करू. रायपनिंग चेंबरची आणखी गरज लागल्यास वखार महामंडळाच्या गोदामात व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन सभापती दिलीप खैरे यांनी दिले.

बाजारात चायनीज इथिलीन
आंबा पिकविण्यासाठी काही बाजारात चायनीज इथिलीनच्या पुड्यांचाही वापर केला जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. विविध कंपन्यांचे इथिलिन उपलब्ध आहे, त्यामुळे नक्की कोणत्या कंपनीचे इथिलीन वापरावे अशी विचारणाही व्यापाऱ्यांनी केली. आंबा पिकविण्यास इथिलीनला मान्यता असली तरी चायनीज इथिलीनसह अन्य इथिलीन स्प्रेचीही तपासणी करू, असे एफडीए अधिकाऱ्यांनी सांगितले.

एफडीए तपासणी मोहिम
आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यास बंदी आहे. रायपनिंग चेंबरमध्ये इथिलीन गॅसचा किंवा इथिलीन स्प्रेचा वापर करून आंबा पिकविता येऊ शकेल. मात्र, इथिलीनचा वापर प्रमाणात करणे गरजेचे आहे. अन्यथा असे आंबे खाण्यायोग्य नसतात. त्यामुळे एफडीएकडून हंगामात तपासणी मोहिम राबविण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टीलच्या भांड्यांवरून संसार मोडतो तेव्हा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पोटगी मिळत नसल्याने ती त्रस्त आहे. दुसरीला लग्नाला एक वर्ष होताच नवऱ्याने सोडून दिले आहे, कारण काय तर लग्नात पितळी भांड्याऐवजी स्टीलची भांडी मिळाली. तीन मुले असणारी आणखी एक अशीच. दुसऱ्या महिलेबरोबर पतीने विवाह केल्याने ती सैरभैर झाली आहे. या तिघींना तलाक नकोय, तर हवा आहे, न्याय आणि सन्मान. जागतिक महिला दिनी त्यांच्या डोळ्यात अश्रूच तरळत होते. महिला दिन आणि या दिवसाचा आनंद त्यांच्या गावीही नव्हता.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मुस्लिम महिलांची परिस्थिती बुधवारी पत्रकार परिषदेत समोर आली. महिला दिनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या साह्याने या महिलांनी आपल्या व्यथा मांडत दुःखाला वाट करून दिली. या तिन्ही महिलांची प्रकरणे न्यायप्रविष्ट असून त्यांना न्यायाची अपेक्षा आहे. आपल्या समस्या व्यक्त करताना या तिघींनी बंधने झुगारून देत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली.

एक होती कुंरकुंभ येथील महिला. ती पोटगी मिळत नसल्याने त्रस्त आहे. महिना साडेसात हजार रुपये पोटगी मंजूर होऊनही गेली चार वर्षे ती पोटगी मिळण्याच्याच प्रतीक्षेत आहे. दुसरी तरुणी वीस वर्षांची आहे. एका वर्षातच तिचा संसार मोडला आहे. लग्नात पितळी भांड्यांऐवजी स्टीलची भांडी का दिली, म्हणून नवऱ्याने तिला सोडले आहे. तिचा गर्भपातही केला आहे. आई-वडील नसल्याने ती आता आपल्या आजीकडे राहते. तिसरी याच घरातली आहे. तिला तीन मुले आहेत. नवऱ्याने दुसरे लग्न केल्याने ती सैरभैर झाली आहे. नवरा तिला तलाक मागतोय; पण तिने आपला निश्चय मोडलेला नाही. ती खचलेली नाही. तिला तलाक नकोय. या तिन्ही महिलांना पत्रकारांशी बोलताना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रश्नपत्रिका देणार चार संचात

$
0
0

Harsh.Dudh@timesgroup.com

पेपरफुटीला आळा घालण्यासाठी बोर्डाचा उपाय

पुणे : दहावी-बारावीच्या परीक्षेतील पेपरफुटीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अखेर ठोस उपाययोजना आखण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च २०१८मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये चार संचात असणाऱ्या प्रश्नपत्रिका वापरण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच, एक किंवा दोन पानाच्या प्रश्नपत्रिकांची परीक्षा केंद्रांवरच छपाई करण्याचा मंडळ विचार करत आहे.

राज्यात मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला २८ फेब्रुवारी, तर दहावीच्या परीक्षेला ७ मार्चला सुरुवात झाली. बारावीच्या पहिल्या पेपरपासून प्रश्नपत्रिका व्हायरल झाली. प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका अशाच प्रकारे व्हॉट्सअॅपवरून व्हायरल होत आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी सामूहिक कॉपी प्रकरणे आढळून आली. असे गैरप्रकार रोखण्यासाठी भारतीय शिक्षण मंडळाचे पश्चिम महाराष्ट्र कार्यवाह धनंजय कुलकर्णी, अध्यक्ष महेश दाबक, नारायण पाटील यांनी काही सूचना शिक्षण मंत्री विनोद तावडे, मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांना केल्या होत्या. पेपरफुटी प्रकरणी तावडे यांनी देखील मंडळाला खडसावल्याची चर्चा आहे. या सूचनांना बुधवारी झालेल्या बैठकीत म्हमाणे यांनी तात्विकत मान्यता दिल्याचे, कुलकर्णी यांनी सांगितले.

सध्या दहावीत इंग्रजी व गणित, तर बारावीला इंग्रजीच्या पेपरला प्रश्नपत्रिकांचे चार संच देण्यात येतात. त्यापैकी एक प्रश्नपत्रिका विद्यार्थ्याला सोडवावी लागते. फेब्रुवारी-मार्च २०१८मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना सर्वच विषयांसाठी चार प्रश्नपत्रिकांचे संच देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच, परीक्षा केंद्रांवर एक किंवा दोन पानांच्या असणाऱ्या प्रश्नपत्रिका इंटरनेटच्या माध्यमातून पाठविण्यात याव्यात आणि तेथे त्याची छपाई करण्यात यावी, याबाबतही मंडळ विचार करणार आहे. प्रश्नपत्रिकेतील मानवी हस्तक्षेप दूर करण्यासाठी प्रत्येक विषयाची ‘क्वेश्चन बँक' तयार करून कम्प्युटर प्रणालीमार्फत प्रश्नपत्रिकेचे संच तयार करण्याबाबत मंडळ सकारात्मक आहे. दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका या संबंधित शाळा-कॉलेजांमध्येच तपासण्यात याव्यात आणि उत्तरपत्रिका तपासणारे परीक्षक व नियामक हे एकाच क्षेत्रातील असावेत; तसेच, परीक्षक, नियामक आणि मुख्य नियामक यांनी केलेले उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन त्यांनी संगणक प्रणालीद्वारे मंडळाकडे पाठवावे. तसेच, ते मूल्यांकन योग्य असल्याचे शाळा अथवा कॉलेजच्या प्राचार्यांनी ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्राद्वारे मंडळाकडे कळण्याची गरज आहे, अशा अनेक गोष्टींवर बैठकीत चर्चा झाली असून मंडळाने त्यांना तत्वतः मान्यता दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल जॅमर, सीसीटीव्हीची चर्चा

दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका मोबाइलहून व्हायरल होऊ न देण्यासाठी परीक्षा केंद्रांवर मोबाइल जॅमर आणि आवश्यक त्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येण्यावर बैठकीत चर्चा झाली. तसेच, परीक्षा केंद्राला निवडणुकीत मतदान केंद्राला असणारी सुरक्षा पुरविण्यात यावी आणि अनावश्यक कोणत्याही व्यक्तीला केंद्रात आत सोडण्यात येऊ नये, या विषयावर देखील चर्चा झाली आहे. दरम्यान, पर्यावरणाच्या रक्षणासाठी विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेले पर्यावरणाबाबतचे प्रकल्प कागदाऐवजी संगणकीय प्रणालीद्वारे करू देण्याबाबत चर्चा झाली, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
..

दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाकडे आलेल्या विविध सूचनांवर योग्य प्रस्ताव तयार करून त्यावर विचार करण्यात येईल. प्रश्नपत्रिका चार संचात उपलब्ध करणे अथवा कमी पानाच्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन परीक्षा केंद्रांवर पाठविणे अशा विविध उपाययोजनांचा फेब्रुवारी-मार्च २०१८मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत वापर करण्याबाबत विचार करू. यावर्षी तरी या उपाययोजनांचा वापर शक्य नाही.
- गंगाधर म्हमाणे,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images