Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘कादंबरीसाठी हवी उपजत प्रतिभा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘कादंबरी लिहिणे सोपे नाही. कादंबरी लेखन करताना प्रचंड अभ्यासासह चिंतनाची जोड आवश्यक असते. मनन, चिंतन, चिकित्सा आणि लेखन हे कादंबरी लेखनाचे टप्पे आहेत. त्यासाठी लागणारी उपजत प्रतिभा लेखकाकडे असणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे यांनी केले.

जळगावच्या प्रॉलिफिक पब्लिकेशनतर्फे सुलभा राजीव लिखित ‘येसूबाई’ या कादंबरीचे प्रकाशन पत्रकार भवन झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, डॉ. अरुणचंद्र पाठक, डॉ. मनीषा बाठे, प्रकाशक राजीव कुलकर्णी, लेखिका सुलभा राजीव या वेळी उपस्थित होते. डॉ. शिवदे म्हणाले, ‘महाराणी येसूबाई यांच्या जीवनावरील कादंबरी लिहिणे सोपे नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यात पत्नी म्हणून एकरूप झालेल्या आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संयमीपणे उभे राहात समाजाला गौरव प्राप्त करून देणारे असे, महाराणी येसूबाईंचे व्यक्तिमत्त्व होते. मराठ्यांच्या इतिहासात अनेक शूर स्त्रिया होऊन गेल्या. परंतु, परकीयांच्या कैदेत असताना संयमाने सर्व परिस्थितीला ३० वर्षे तोंड देणाऱ्या त्या एकमेव आहेत.’

बलकवडे म्हणाले, ‘महाराणी येसूबाईंच्या जीवनात अनेक संकटे आली. परंतु, संकटांशी धीरोदात्तपणे सामना करून यशस्वीपणे त्या जीवन जगल्या आणि आपली कर्तव्ये पार पाडली. अत्यंत निराशाजनक परिस्थितीत त्यांनी जीवन व्यतीत केले. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि औरंगजेब यांचा कार्यकाळ येसूबाईंनी पाहिला होता. दिल्लीत सत्ता काबीज केल्यानंतर मराठ्यांनी येसूबाईंना स्वगृही सातारा येथे आणले. तोपर्यंतचा जीवनपट सर्वज्ञात आहे. परंतु, साताऱ्यात आल्यानंतर तेथील महापतीव्रतीचे जीवन आणि मृत्यूचा दिनांक आपल्याला माहीत नाही, हे दुर्देव आहे.’

‘ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजांचे बौद्धिकरूप झाकले गेले. त्याप्रमाणे येसूबाईंच्या रूपाने त्यांच्यामागे असलेल्या बळकट सावल्यादेखील झाकल्या गेल्या. सुलभा राजीव यांनी कादंबरीच्या माध्यमातून त्यांचे कार्य पुढे आणले आहे. संशोधन लोकांपर्यंत पोहोचत नाही. प्रत्यक्षात संशोधनाचा आत्मा सुंदर असतो. त्या आत्म्याला काया देण्याचे काम सुलभा राजीव यांच्या कादंबरीकाराने केले आहे,’ असे गौरवोद्वगार बाठे यांनी काढले. राजीव कुलकर्णी, श्रद्धा शुक्ल, योगेश शुक्ल, रसिका मुजुमदार यांनी अभिवाचन केले. सुनील कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अमेय बाकरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घुबडाला पत्रिकेत स्थान

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘निसर्ग साखळीतील महत्त्वाचा दुवा असलेल्या घुबडाला आत्तापर्यंत अंधश्रद्धेमुळे नकारात्मक नजरेतून बघितले गेले. शुभकार्यातील उल्लेख दूरच; एरवी देखील घुबडाचा फोटो बघण्यास नकार देणारा मोठा वर्ग असताना, या तथाकथित कथांना दूर लोटून हृषीकेश आणि सायली यांनी थेट स्वतः लग्न पत्रिकेवर घुबडाला स्थान दिले. या दुर्लक्षित पक्ष्याविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय लग्न समारंभातही चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला.

हृषीकेश दाणी आणि सायली पांडकर या दोघांची लग्नपत्रिका वन्यप्राणी प्रेमींच्या भावना सुखावणारी ठरली असली, तरी या दोघांच्या नातेवाइकांसाठी हा एक अजब धक्का होता. आपल्या पालकांना योग्य पद्धतीने समजून काढून त्यांनी लग्न पत्रिकेवर घुबडाला स्थान देण्यास यश मिळविले. एवढेच नव्हे, तर लग्नाच्या मुख्य सोहळ्यापूर्वी वधू-वरांच्या आग्रहास्तव प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी उपस्थित नातेवाइक आणि मित्रमैत्रिणींचे या पक्ष्याविषयी असलेले गैरसमजांबद्दल मार्गदर्शनही केले.

मूळातच हृषीकेश आणि सायली हे दोघेही पक्षी प्रेमी आहेत. कुतूहल म्हणून ते सध्या पक्षी जीवनाचा अभ्यासही करीत आहेत. हृषीकेश हा साउंड डिझायनर असून जंगल आणि वन्यजीवांचे आवाज रेकॉर्ड करण्यात त्याने स्पेशयालझेशन केले आहे. निसर्ग प्रेम या समान धाग्यातूनच त्यांचे बंध जुळले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या पत्रिकेतून आपण सगळ्यांना काहीतरी चांगला संदेश दिला पाहिजे, या उद्देशाने त्यांनी घुबडाची निवड केली.

दोघांच्याही पालकांना आमचे पक्षीप्रेम माहिती आहे, आमच्या चर्चेतूनही त्यांना सतत नवनवीन माहिती मिळत असते. तरीदेखील पत्रिकेवर घुबडाचा फोटो हा निर्णय त्यांना पटवून सांगणे आमच्यासाठी अवघड होते. त्यांच्या मनातील घुबडाबद्दलचे सर्व गैरमसज दूर केले. पण नातेवाइक, मित्र मंडळी आपल्याला काय म्हणतील, याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम होता. अखेर त्यांनी होकार दिला, असे सायलीने सांगितले.

घुबडाला निसर्गचक्रात महत्त्वाचे स्थान आहे. पण, कायम त्यांना अशुभ मानले गेले. याचा परिणाम म्हणजे सध्या या पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून जादूटोण्यासाठी त्याचा वापर केला जातो. या पक्ष्याला वाचविण्यासाठी व्यापक स्तरावर जनजागृती होण्याची गरज आहे. लग्नपत्रिकेच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीचा खारीचा वाटा उचलला. विशेष म्हणजे लग्नाच्या वेळी डॉ. पांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल्यामुळे आमच्या नातेवाइकांची मानसिकता बदलण्यास यश आले, अशी माहिती हृषीकेश याने दिली. ‘घुबडाला वाचविण्यासाठी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही मोठ्या प्रमाणात जनजागृतीची चळवळ उभी राहण्याची गरज आहे. घुबडाबद्दलच्या अंधश्रद्धा दूर करणे आवश्यक आहे,’ असे मत पांडे यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटायजेशनचे काम ठप्प

0
0

Chintamani.Patki@timesgroup.com

chintamanipMT

पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने (एनएफएआय) गाजावाजा करत सुरू केलेले रिळांची तपासणी, मूल्यांकन, डिजिटायजेशन व रिस्टोरेशनचे काम एका महिन्यानंतर ठप्प पडले आहे.

केंद्रीय सचिवांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले काम पुढे सरकू शकलेले नाही. मंत्रालयाला खूश करण्यासाठीच; तसेच केवळ छायाचित्रापुरते काम सुरू केले का, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. चेन्नईच्या प्रसाद लॅबला दिलेले काम सुरू झालेले नसताना इटलीच्या एका लॅबला काम देण्याची करामत संग्रहालयाने केली आहे.

संग्रहालयामध्ये १८ ते १९ हजार चित्रपटांच्या एकूण १ लाख ३२ हजार रिळांचे जतन करण्यात आले आहे. रिळांची दुरुस्ती करून त्यांचे आयुष्य वाढविण्याचा प्रयत्न संग्रहालयाकडून करण्यात येणार आहे. सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचे सचिव अजय मित्तल यांच्या हस्ते २८ जानेवारी रोजी कोथरूड येथील संग्रहालयात या कामाचे उद्घाटन झाले होते. उद्घाटनाला एक महिना उलटून गेल्यानिमित्त ‘मटा’ने केलेल्या पाहणीत काम ठप्प असल्याचे दिसून आले.

मुख्य संग्रहालय प्रभात रस्त्यावर असून कोथरूड येथे दुसरे संग्रहालय आहे. या ठिकाणी केवळ तीनच कर्मचारी आहेत. हनुमान टेकडी परिसरात आडबाजूला असलेल्या या संग्रहालयात सहसा कोणी फिरकताना दिसत नाही. सचिवांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी प्रसाद लॅबचे कर्मचारी बोलाविण्यात आले होते; पण त्यानंतर एकही कर्मचारी संस्थेकडे फिरकलेला नाही. याबाबत संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

छायाचित्रांचे काम सुरू

संग्रहालयाकडे असणाऱ्या इतर वस्तूंच्या डिजिटायझेशनचे काम सुरू आहे. संग्रहालयाकडे चित्रपटांशी संबंधित दीड लाख छायाचित्रे, २७ हजार पोस्टर्स आणि १७ हजार गाण्यांची पुस्तके असा ठेवा उपलब्ध आहे. हा ठेवा डिजिटाइज करण्याचे काम सध्या सुरू असून, लवकरच तो टप्प्याटप्प्याने वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. जी. ए. सोल्युशन या कंपनीला हे काम देण्यात आले असून २० कर्मचारी सहा महिन्यांत हे काम पूर्ण करणार आहेत.

इटलीतील लॅबकडे काम

‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’ या केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत या सर्व कामाला २०२१ पर्यंत ६०० कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. प्रसाद लॅबकडे दिलेले रिळांचे काम ठप्प असताना संस्थेने थेट इटलीतील ल इमॅजिन रेट्रोवाटा या लॅबशी करार केला आहे. ल इमॅजिन लॅबने हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे तसेच सत्यजित रे यांच्या पथेर पांचाली, अपराजितो व अपूर संसार या चित्रपटांच्या फिल्मचे डिजिटायझेशन केले आहे. फिल्म हेरिटेज मिशनचे कार्यकारी अधिकारी संतोष अजमेरा यांच्या नेतृत्वाखाली पाच लोकांच्या चमूने या लॅबला नुकतीच भेट देऊन करार केला आहे. ‘इटली येथील लॅबचे कर्मचारी १५ मार्चनंतर संस्थेत येऊन काम करणार आहेत. पुढील सहा महिने हे काम चालेल,’ असे अजमेरा यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बार’मुळे नागरिक त्रस्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, औंध

बाणेर रस्ता येथे रामनदीजवळ एकाच इमारतीमध्ये पाच बार सुरू झाले आहेत. या बारमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी पोलिस, पालिका आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, उपेक्षाच त्यांच्या पदरी पडली आहे. आमदार मेधा कुलकर्णी यांनी ही समस्या सोडवण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे.

पाच बार तयार झाल्यामुळे या परिसरातील रहिवाशांना रस्त्यावरील अवैध पार्किंग, मोठ्या आवाजात लावली जाणारी गाणी, तरुणांचे अश्लील चाळे यांचा त्रास रोजचा सहन करावा लागतो. या परिसरातील सर्व सोसायट्यांतील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पोलिस, पालिका तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. अखेर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेऊन लोकप्रतिनिधींकडे यावर कारवाईची मागणी केली. यानंतर आमदार मेधा कुलकर्णी यांनी सर्व बार; तसेच परिसराची पाहणी करून नागरिकांच्या समस्या लवकरच सोडवण्यात येतील, असे आश्वासन दिले.

बाणेर परिसरात ‘आयटी पार्क’मुळे उच्चभ्रू वस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बाणेर रस्ता हा हॉटेलिंगसह विविध व्यवसायांसाठी महत्त्वाचा समजला जातो. बाणेर रस्त्यावर अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय त्यामुळे निर्माण झाले आहेत. ‘महाबळेश्वर हॉटेल’समोरील एकाच इमारतीमध्ये पाच पब व बार व रेस्टॉरंट सुरू झाले आहेत. यामुळे एकेकाळी शांत वस्तीचा समजला जाणारा परिसर सतत होणारे वाद-विवाद व वाहतूक कोंडीमुळे अस्वस्थ झाला आहे. बँक ऑफ बडोदा ते रामनदीवरील पुलावर सिग्नलपर्यंत वाहने रस्त्यावरच लावण्यात येतात. तसेच, सोसायटीतील अंतर्गत रस्त्यावर वाहने लावण्यात येत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो.

स्थानिक रहिवाशांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीनुसार इमारतीच्या प्लॅनमध्येही बदल करण्यात आल्याचे अढळून आल्याचे रहिवाशी सांगतात. इमारतीच्या टेरेसवरही एक बार उघडण्यात आला आहे. एजंट जॉक्स, द बिग चिल्स, आईरिश व्हिलेज, टेडी बॉय हे बार सध्या सुरू असून अंतर्गत फेरबदलामुळे इमारतीच्या सुरक्षेबाबतही अनेक समस्या निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.या परिसरातील बार तातडीने बंद करावे तसेच बारसाठी देण्यात येणारी परवानगी कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवण्यात येऊ नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘बार मालकांना मद्य विक्रीसाठी परवानगी दिली असली, तरी कोणत्याही अवैध प्रकारांना तसेच बांधकामांना परवानगी दिलेली नाही. नागरिकांना या बारचा त्रास होत असेल, तर हे बार तात्काळ बंद करण्यासाठी कायदेशीर मार्गाने आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करणे आवश्यक आहे. या वेळी नवनिर्वाचित नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, गणेश कळमकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिळक, भिमाले नवे कारभारी?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्षाच्या महापौर आणि गटनेतेपदासाठी तीव्र स्पर्धा असली, तरी या दोन्ही पदांसाठी अनुक्रमे मुक्ता टिळक आणि श्रीनाथ भिमाले यांच्या नावांवर बहुतेकांनी सहमती दर्शवल्याचे समजते. येत्या बुधवारी (८ मार्च) महापौरपदासाठी अर्ज भरायचा असल्याने आज, सोमवारी गटनेत्यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेचे प्रभारी आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये आणि त्यानंतरही देशमुख यांनी सर्व लोकप्रतिनिधींची मते जाणून घेतली. त्याचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले, तरी महापौर म्हणून टिळक आणि गटनेता म्हणून श्रीनाथ भिमाले यांच्या नावाला पसंती मिळण्याची दाट चिन्हे आहेत. बहुतेक लोकप्रतिनिधींनी या दोन्ही नावांना पाठिंबा दर्शवला असल्याचे समजते. येत्या बुधवारी (८ मार्च) महापौरपदाचा अर्ज भरण्यापूर्वी विभागीय आयुक्तांकडे जाऊन नोंदणी करणे आवश्यक असल्याने आज, सोमवारी पक्षाकडून गटनेत्याचे नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेमध्ये भाजपचे तब्बल ९८ नगरसेवक निवडून आले आहेत. पुण्याचे महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. त्याकरिता, भाजपमधून बरीच नावे पुढे येत असली, तरी सभागृहातील अनुभवाचा विचार करता टिळक यांचे पारडे सर्वांत जड असल्याची चर्चा आहे. तसेच, नव्या सभागृहात भाजपचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे, गटनेतेपदासाठी अनुभवी नगरसेवकांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. त्यात, भिमाले यांना संधी दिली जाईल, अशी चिन्हे दिसून येत आहेत.

देशमुख यांनी घेतलेल्या बैठकीला खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ, विजय काळे, भीमराव तापकीर, जगदीश मुळीक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


उपमहापौरपद ‘आरपीआय’ला?

भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) यांनी महापालिकेची निवडणूक एकत्र लढवली होती. आरपीआयचे पाच नगरसेवक निवडून आले असून, लोकसभेपासून भाजपसोबत राहणाऱ्या आरपीआयला पालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. महापौरपद महिलांसाठी राखीव असल्याने उपमहापौरपद आरपीआयला देण्याचे भाजपने ठरवले आहे. त्यातही, नवनाथ कांबळे यांची वर्णी लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’च्या मुलाखती

0
0

पुणे ः पुणे महानगरपालिकेत विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजाविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी संधी मिळावी, यासाठी अंदाजे १३ इच्छुकांनी रविवारी मुलाखती दिल्या. पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत मुलाखती झाल्या. राष्ट्रवादीचा गटनेता हा पालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहणार आहे. या पदावर कोणची निवड करायची याचे सर्व अधिकार अजित पवार यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

गेली दहा वर्षे महापालिकेत सत्ताधारी म्हणून काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपयश आले आहे. या निवडणुकीत पक्षाला केवळ ३९ जागा मिळाल्याने पालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राष्ट्रवादी ठरला आहे. भाजपला सर्वाधिक ९७ जागा मिळाल्याने महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष ही पदे भाजपला मिळणार असून विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. या पदावर आपली वर्णी लागावी, यासाठी अनेक इच्छुकांची जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पालिका निवडणुकीत मोठा पराभव झाल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेले होते. रविवारी पुन्हा पुण्यात आलेल्या पवार यांनी पालिकेत विजयी झालेल्या नगरसेवकांची बैठक घेत त्यांच्याशी चर्चा केली. रविवारी सकाळी बारामती होस्टेल येथे ही बैठक झाली. पक्षाच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार बापू पठारे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला हजर होते.

या बैठकीत महापालिकेत यापुढील काळात पक्षाचा अजेंडा काय असला पाहिजे आदी विषयांवर विचारमंथन झाले. पालिकेत पक्षाचा गटनेता म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी इच्छा १३ नगरसेवकांनी व्यक्त केली. यामध्ये विद्यमान महापौर प्रशांत जगताप, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, अश्विनी कदम, चेतन तुपे, दीपक मानकर यांच्यासह नंदा लोणकर, रेखा टिंगरे यांनी मुलाखती दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिग्दर्शकांनो, अभ्यासोनी प्रकटा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘तन्मयतेने चित्रपट काढण्याची परंपरा बुडाली आहे. चांगली कलाकृती साकार करण्यासाठी कलाकारांनी केवळ पुस्तकी अभ्यास न करता चिंतन, मनन केले पाहिजे. ज्यांच्याकडे कल्पकता, प्रतिभा नाही अशांनी या भानगडीत पडू नये. पगारी दिग्दर्शक हे काम करू शकत नाही,’ असे खडे बोल सुनावून ‘अभ्यासोनी प्रकटावे, नाहीतर झाकोनी असावे, प्रकटोनी नासावे, हे बरे नव्हे,’ अशा शब्दांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रविवारी दिग्दर्शकांचे कान टोचले.

प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘प्रभाकर पेंढारकर-एक परिसस्पर्श’ या लघुपटाच्या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन बाबासाहेबांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात झाले. त्या वेळी त्यांनी हल्लीच्या दिग्दर्शकांची चांगलीच हजेरी घेतली. ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा देव तसेच हा लघुपट बनविणाऱ्या यशस्विनी गोडसे, डॉ. मोहन गोडसे व अरुण गोंगाडे या वेळी उपस्थित होते.

‘पेंढारकर लवकर व रांग मोडून गेले. प्रतिभावान लेखक-दिग्दर्शकाचे दर्शन त्यांच्यातून आपल्याला घडले. भालचंद्र पेंढारकरांचा संस्कार त्यांच्यावर झाला. पेंढारकरांच्या डायऱ्या हे स्वतंत्र वाङ्मय आहे. ते प्रतिभावंताचे लेणे होते,’असे बाबासाहेब म्हणाले. ‘पेंढारकर हे मराठी साहित्यातील नक्षत्रांचे दर्शन होते. परिसाचा स्पर्श झाल्यानंतर माणूस भाग्यवान ठरतो. तसेच काहीसे त्यांच्यामुळे अनेकांच्या बाबतीत झाले आहे,’ अशी भावना डॉ. देव यांनी व्यक्त केली. गोडसे म्हणाल्या, ‘हा खटाटोप करू नको, असे कोणीच सांगितले नाही. या कामासाठी वडिलांनी पाच हजार रुपये दिले आणि काम सुरू झाले. पुढे मदतीचा ओघ वाढतच गेला.’ उत्तरार्धात लघुपट दाखविण्यात आला. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

३७ मिनिटे बोलणार नाही...

कार्यक्रम सुरू होताच, एका उत्साही प्रेक्षकाने कार्यक्रम ३७ मिनिटे उशीरा सुरू झाला, त्याचा आधी खुलासा करा, अशी खास पुणेरी टिप्पणी केली. या टिप्पणीने सारे सभागृहच आवाक झाले. पुढे अर्धा-पाऊण तासानंतर बाबासाहेबांनी या टिप्पणीवर एक खास टिप्पणी करून ९५ वर्षांतही हजरजबाबीपणा काय असतो, हे दाखविले. भाषणाच्या सुरुवातीलाच मी थोडा बोलणार आहे. ३७ मिनिटे काही बोलणार नाही. वेळेच्या बाबतीत मी कडक आहे, पण होते असे कधी कधी..अशा शब्दांत बाबासाहेबांनी कोपरखळी मारताच सभागृहात हशा पिकला आणि तो तरुणही ओशाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात पहिले ‘हार्ट ट्रान्सप्लांट’ यशस्वी

0
0

पुणे ः सोलापूरच्या एका १५ वर्षाच्या मुलाचे हृदय ४९ वर्षांच्या महिलेला ट्रान्सप्लांट करण्याची कामगिरी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे करण्यात आली. पुण्यातील हे पहिले हार्ट ट्रान्सप्लांट ठरले असून यापुढे मुंबई, औरंगाबादनंतर पुण्यात हार्ट ट्रान्सप्लांट करणे शक्य होणार आहे. आता अवयवदात्याचे हृदय पुण्याबाहेर पाठविण्याची वेळ येथील हॉस्पिटलवर येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘सोलापूर येथील राहणारा १५ वर्षांचा एक मुलगा फुटबॉल खेळताना बेशुद्ध झाला होता. तेथील खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान तो ‘ब्रेनडेड’ असल्याचे निदान झाले. मुलाच्या पालकांना त्याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर पालकांनी तातडीने मुलाचे अवयवदान करण्यास मान्यता दिली. परंतु, ते खासगी हॉस्पिटल अवयव काढण्यास मान्यता नसल्याने अश्विनी रुरल मेडिकल कॉलेजमध्ये त्या मुलाला हलविण्यात आले. तेथे त्याचे हृदय काढण्यात आले,’ असे प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी स्पष्ट केले.

‘मूळची सांगोला येथील असलेली ही महिला गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात वास्तव्य करीत आहे. तिला तीन वर्षांपासून ‘कार्डिओमायोपॅथी’ नावाचा आजार झाला होता. त्यासाठी तिला हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता होती. दोन महिन्यांपासून ती हृदयाच्या प्रतीक्षेत होती. पुण्यातच महिलेवर उपचार सुरू होते. अखेर रविवारी त्यांना हृदय मिळाल्याने जीवदान मिळाले आहे. त्याशिवाय मुलाचे एक यकृत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील पेशंटना रात्री उशीरा देण्यात आले. हडपसरच्या नोबल हॉस्पिटलला आणि सोलापूरच्या अश्विनी मेडिकल कॉलेजला प्रत्येकी एक मूत्रपिंड देण्यात आल्याने त्या पेशंटना जीवदान मिळाले,’ असे सूत्रांनी सांगितले.

‘मुलाचे हृदय काढण्यासाठी पुण्यातून रुबी हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज दुराईराज तसेच भूलतज्ज्ञ डॉ. कौस्तुभ चव्हाण यांचे पथक पाठविण्यात आले होते. त्या पथकाने हृदय काढून पाच वाजता विमानाने मुलाचे हृदय घेऊन लोहगाव विमानतळावर सहा वाजून २४ मिनिटांनी पोहोचले. तेथून वाहतूक पोलिसांच्या मदतीने केलेल्या ग्रीन कॉरिडॉरद्वारे रुबी हॉस्पिटलमध्ये अवघ्या सहा मिनिटांत हृदय पोहोचले. सुमारे साडेतीन तासानंतर महिलेवर हार्ट ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन पूर्ण झाले,’ असे रुबी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजीव पठारे यांनी सांगितले. डॉ. जगदीश हिरमेठ, डॉ. मनोज दुराईराज, डॉ. चंद्रशेखर मखले डॉ. आशिष खनिजो, भूलतज्ज्ञ डॉ. विकास साहू यांनी हे ऑपरेशन यशस्वी केले. या मोहिमेसाठी प्रत्यारोपण समन्वयक सुरेखा जोशी, अभिजित शिवणकर यांनी परिश्रम घेतले.


तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हार्ट ट्रान्सप्लांट

पुण्यात विविध अवयवांचे प्रत्यारोपण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु, हार्ट ट्रान्सप्लांट करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक अवयवदात्यांचे हृदय मुंबईला पाठविले जात होते. अनेकदा पुण्याने मुंबईला हृदय दिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पुण्यातील रुबी हॉस्पिटलने हार्ट ट्रान्सप्लांटची सुविधा कार्यान्वित केली. त्या सुविधेला आरोग्य खात्याकडून गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात मान्यता मिळाली. त्यानंतर ट्रान्सप्लांटची सुविधा उपलब्ध असली तरी हार्ट ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत हॉस्पिटल होते, अशी माहिती डॉ. संजीव पठारे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हापूसची आवक वाढली

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पोषक हवामान, चांगले उत्पादन, आकाराबरोबर आंब्याची प्रत चांगली असल्याने कोकणचा राजा अर्थात रत्नागिरी हापूस आंब्याला मागणी वाढली आहे. मार्केट यार्डात रविवारी हापूस आंब्याच्या पाचशे पेट्यांची आवक झाली.

‘मार्केट यार्डातील फळ बाजारात रत्नागिरी हापूस बरोबर कर्नाटक आंब्याची देखील आवक सुरू झाली आहे. रत्नागिरी हापूसच्या कच्च्या आंब्याच्या ४ ते ७ डझनाला २००० ते ३५०० रुपये दर आहे. तर तयार हापूस आंब्याच्या पेटीला तीन ते साडेचार हजार रुपये दर आहे. कर्नाटक हापूसच्या कच्च्या आंब्याच्या दोन डझनच्या पेटीला ७०० ते ९०० रुपये भाव मिळाला आहे. लालबागच्या प्रतिकिलोस ६० ते ८० रुपये, पायरी ४० ते ६० रुपये, बदाम ४० ते ५५ रुपये दर मिळाला आहे,’ अशी माहिती आंब्याचे व्यापारी करण जाधव यांनी दिली.

रत्नागिरीसह कोकणात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे आंब्याचा मोहोर चांगला होता. राज्यात सर्वत्र उन्हाचा चटका बसत आहे. वाढत्या उष्णतेचा आंबे तयार होण्यासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. हापूसचा दर्जा, आकार चांगला आहे. यंदा हापूस आंब्यावर कोणत्याही प्रकारचे डाग नाहीत. त्यामुळे कोकणच्या राजाला भाव येण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस किंवा वादळाचा फटका न बसल्यास रत्नागिरी हापूसची मोठी आवक होऊ शकते. कर्नाटक, केरळमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे आंब्याचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे आवकही घटण्याची शक्यता आहे, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकडी, पावटा, मिरची, वांगी महाग

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आवक असली तरी मागणी अधिक वाढल्याने हिरवी मिरची, काकडी, पावटा, मटार, घेवड्यासह वांग्याचे दर महागले आहेत. शेवग्याचे दर उतरले असून पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत.
गुलटेकडी मार्केट यार्डात राज्यासह परराज्यातून मोठी आवक होत आहे. मार्केट यार्डात रविवारी १७० ते १८० ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यातून आलेल्या फळभाज्यांमध्ये राजस्थानातून गाजराची ८ ते १० ट्रक, जयपूरमधून मटारची १० ते १२ ट्रक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून शेवग्याची १० ते १२ टेम्पो आवक झाली आहे. गुजरात आणि कर्नाटकातून कोबीची पाच ते सहा टेम्पो, गुजराज व मध्य प्रदेशातून हिरव्या मिरचीची १० ते १२ टेम्पोची तसेच कर्नाटकातून तोतापुरी कैरीची ८ ते १० टेम्पो आवक झाली आहे.

सातारी आल्याची १५०० ते १६०० पोती, टोमॅटोची साडेपाच ते सहा हजार पेटी, हिरव्या मिरचीची चार ते पाच टेम्पोची आवक झाली. फ्लॉवरची १४ ते १५ टेम्पो, कोबीची १५ ते १६ टेम्पो तसेच सिमला मिरचीची १० ते १२ टेम्पोची आवक झाली. गाजराची चार ते पाच टेम्पो, शेवग्याची चार ते पाच टेम्पोची आवक झाली. मटारची केवळ एकच टेम्पो आवक झाली. पावट्याची पाच ते सहा टेम्पो, तांबडा भोपळ्याची ८ ते १० टेम्पोची आवक झाली.

कांद्याची दीडशे ट्रक आवक झाली. कांद्याची आवक वाढू लागली आहे. तळेगाव, आग्रा, इंदौर येथून बटाट्याची ६० ट्रकची आवक झाली आहे. मध्य प्रदेश, गुजरात येथून लसणाची चार ते साडेचार हजार गोणींची आवक झाली आहे. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची पावणेदोन लाख तर मेथीची दीड लाख गड्डींची आवक झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समर्पणाची भावना हवी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘समर्पणातून समाजामध्ये सेवाकार्याचा विस्तार होतो. वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजामध्ये समर्पणाची भावना जागृत व्हायला हवी. नागरिकांमध्ये समर्पणाची वृत्ती जागृत केली तर समर्थ भारताचे रूप जगाला दिसेल,’ असा विश्वास ‘इस्कॉन’चे स्वामी गोविंद प्रभू यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित ‘समर्थ अभियानाला’ रविवारी स. प. महाविद्यालय येथे सुरुवात झाली. स्वामी गोविंद प्रभू यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी त्यांनी भारतीय संस्कृतीमधील समर्पणाचे महत्त्व विषद केले. रा. स्व. संघाच्या पुणे महानगराचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर, महानगर कार्यवाह महेश करपे या वेळी उपस्थित होते. पुण्यामध्ये विविध सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना जोडून त्यांच्यामार्फत या कामामध्ये वाढ व्हावी, यासाठी संघाच्या पुणे महानगरातर्फे समर्थ भारत अभियान सुरू करण्यात आले आहे. त्या अंतर्गत शहरातील ८१ स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या शिवाय संघाने शहरभर १० हजारांहून अधिक नागरिकांशी संपर्क करून या अभियानात सहभागी होण्यासाठी त्यांना आवाहन करण्यात आले होते.

‘समर्पण वृत्तीचा इतिहासाशी संबंध आहे. महाभारत, रामायण या महाकाव्यांमध्ये समर्पणाचे दाखले अनेक प्रसंगांमध्ये मिळतात. आजच्याही युगात समर्पणाला अत्यंत महत्त्व आहे. समाजात समर्पणाची भावना वाढली तर वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याचा उपयोग केला जाईल आणि देश अधिक सक्षम आणि समर्थ होण्यास मदत होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनीही समर्पणाच्या बळावर सुराज्य आणले,’ असे गोविंद प्रभू यांनी सांगितले.

कार्यक्रमाला अंदाजे अडीच हजार नागरिकांची उपस्थिती होती, अशी माहिती रा. स्व. संघाच्या पुणे महानगराचे प्रसिद्धी प्रमुख मिलिंद कांबळे यांनी दिली. ‘ज्या ८१ सामाजिक संस्था ‘समर्थ भारत’ अभियानात सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यामार्फत नागरिकांची विभागणी करण्यात आली असून प्रत्येक नागरिकाने त्यांच्या रुचीप्रमाणे आणि उपलब्ध असलेल्या वेळेत समाजसेवी संस्थांमार्फत सेवाकार्यात सहभागी होणे आवश्यक आहे. या प्रक्रियेला सुरुवात झाली असून वैद्यकीय, सांस्कृतिक, सामाजिक, अर्थिक अशा विविध विभागांमध्ये नागरिकांना काम विभागून देण्यात आले आहे,’ असे कांबळे यांनी सांगितले. विज्ञानभारतीचे अखिल भारतीय सचिव जयंत सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करमणूक कर विभागाची ‘कमाई’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्ह्यातील करमणूक कर विभागाची तिजोरी भरण्यात दंगल चित्रपट, भारत-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय आणि भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेटच्या सामन्यांनी चांगलाच हातभार लावला आहे. त्यामुळे आतापर्यंत करमणूक कराच्या माध्यमातून या विभागाला सुमारे १३६ कोटी ६२ लाख रुपयांची कमाई झाली आहे.

पुणे शहरात दहा मल्टिप्लेक्स आणि ४८ थिटएर आहेत. या थिटएरमधे प्रदर्शित होणाऱ्या विविध चित्रपटांच्या माध्यमातून दर महिन्याला सुमारे तीन ते चार कोटी रुपये कर वसूल होतो. जिल्ह्यात सुमारे पाच लाख केबल ग्राहक आहेत. त्यानुसार शहरातील केबल चालकांकडून प्रती कनेक्शनसाठी ४५ रुपये, नगरपालिका हद्दीतील केबलचालकांकडून प्रती ग्राहक ३० रुपये आणि ग्रामीण भागात प्रती कनेक्शनसाठी १५ रुपये करमणूक कर वसूल करण्यात येतो. केबल चालकांकडून दर महिन्याला सुमारे दोन कोटी रुपये करमणूक कर जमा होतो.

जिल्ह्यातील डिश टीव्हींची संख्या वाढत आहे. सध्या जिल्ह्यामध्ये सुमारे १३ लाख डिश टीव्हीधारक आहे. या डिश टीव्हीधारकांकडून दहा महिन्यांमध्ये सुमारे ५० कोटी रुपये करमणूक कर वसूल झाला आहे. गेल्या दहा महिन्यांत चित्रपटांच्या माध्यमातून सुमारे ४० कोटी रुपये, केबलद्वारे सुमारे २५ कोटी रुपये, व्हिडिओ खेळगृहांतून सुमारे तीन कोटी ५० लाख रुपये, अश्व शर्यतींतून सुमारे चार कोटी करमणूक कर वसूल झाला आहे.


१५४ कोटींचे उद्द‌िष्ट

करमणूक कर विभागाच्या अधिकारी सुषमा चौधरी-पाटील म्हणाल्या, ‘शहरात यंदा सनबर्न, दंगल चित्रपट, भारत-इंग्लड एकदिवसीय क्रिकेट सामना आणि भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट सामना यामुळे करमणूक करामध्ये वाढ झाली आहे. राज्य सरकारने यावर्षी करमणूक कर विभागाला १५४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. आतापर्यंत १३६ कोटी ६२ लाख रुपये वसूल झाले आहे. या महिन्यामध्ये करमणूक कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅपॉन-इंडियन ओशन अनुभवा लाइव्ह

0
0

पुणे टाइम्स टीम

‘दम लगा के हैशा’मधील ‘मोह मोह के धागे’, ‘सुलतान’मधलं ‘बुलैया’, अशा गाण्यांनी पॅपॉन या गायकानं तरुणांच्या मनावर अक्षरशः गारूड केलं आहे. आपल्या आवाजाच्या जादूनं त्यानं फक्त देशभरातील तरुणांनाच नाही, तर बॉलिवूडमधील स्टार सेलिब्रेटी आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांनाही भुरळ घातली आहे. त्याच्या आवाजाची हीच जादू अनुभवण्याची ‘लाइव्ह’ संधी येत्या १० मार्च रोजी पुणेकरांना मिळणार आहे. लिबर्टी स्क्वेअर, फोनिक्स मार्केट सिटी, पुणे इथं संध्याकाळी ६.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाची तिकीटं bookmyshow.com या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

‘पीपली लाइव्ह’मध्ये ‘देस मेरा रंगरेज है बाबू’ असं म्हणत आशियाई संगीत क्षेत्राचं लक्ष आपल्याकडे ओढून घेणारा बँड म्हणजे ‘इंडियश ओशन’. या सिनेमासाठी त्यांना आशियातील सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला होता. ‘ब्लॅक फ्रायडे’ सिनेमातील ‘बंदे’ गाण्यानंही हा बँड २००४ साली चर्चेत आला होता. सामाजिक आणि राजकीय विषयांपैकी काही न पटलेल्या किंवा खटकलेल्या गोष्टींवर भाष्य करणारे या बँडमधील सदस्य आहेत. त्यातील विशेष प्रसिद्ध आहेत, ते सुश्मीत सेन, राहुल राम आणि अमित किलम हे गायक-संगीतकार. ११ मार्चला याच बँडचा लाइव्ह परफॉर्मन्स पुणेकरांना पाहाता येणार आहे.

या दोन्ही परफॉर्मन्सेसच्या निमित्तानं ‘महाराष्ट्र टाइम्स’ नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त कलाकारांना पुणेकरांसमोर घेऊन आलं आहे. प्रसिद्ध गायक पॅपॉन आणि ‘इंडियन ओशन बँड’च्या कलाकारांचे परफॉर्मन्स लाइव्ह अनुभवण्यासाठी ‘मटा कल्चर क्लब’च्या सभासदांना सवलत मिळणार आहे. दोन्ही कार्यक्रमांच्या तिकिटांवर ती २५ टक्के असेल. या दोन्ही कार्यक्रमांची तिकीटं bookmyshow.com या वेबसाइटवर उपलब्ध असून, दोन्ही कार्यक्रम फिनिक्स मार्केट सिटी इथं संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहेत.

सभासदांसाठी सवलत

‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’च्या सभासदांना या दोन्ही कार्यक्रमांची तिकीटं २५ टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत. ही तिकीटं आजपासून (दि. ६) महाराष्ट्र टाइम्स ऑफिस, टाइम्स हाउस, नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथ (फर्ग्युसन कॉलेज रोड) इथं सकाळी ११ ते संध्याकाळी सहा या वेळेत मिळतील.

‘महाराष्ट्र टाइम्स’ कल्चर क्लब सभासदत्वाचं नूतनीकरण करण्यासाठी किंवा नव्याने सभासद होण्यासाठी ९६५७०३२६०९ या क्रमांकावर किंवा www.mtcultureclub.com या वेबसाईटवर लॉगइन करा.

फेसबुक लिंक ः https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक ः https://twitter.com/MTCultureClub

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात भंगार सामानाच्या गोदामाला मोठी आग

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

येथील चिखली, कुदळवाडीत भंगार सामानाच्या गोदामाला काल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाचे १५ बंब रात्रीपासून आग विझवत असूनही अद्याप ती विझलेली नाही. कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही, मात्र अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाल्याचे समजते आहे.

गोदामातील सुमारे २० ते २५ दुकाने या आगीत जळून खाक झाली आहेत. सुरुवातीला फायरब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आगीचे स्वरूप पाहून गाड्यांची संख्या वाढविण्यात आली. आगीच्या ज्वाळा दूर अंतरावरूनही दिसत होत्या. मध्यरात्रीपासून आतापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी ८० टँकर पाण्याचा वापर झाला आहे. आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचे लोटच्या लोट हवेत पसरत असल्याने वातावरणही प्रदूषित झाले आहे.

आग सकाळपर्यंत आटोक्यात आली असली तरी पूर्णपणे विझलेली नाही. गोदामात भंगार मालाचा मोठा साठा असल्याने ही आग विझवायला किमान दुपारपर्यंतचा वेळ लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत. पुण्यातले दोन मोठे फायर इंजिनही घटनास्थळी पोहोचलेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुदळवाडीत पुन्हा भीषण आग

0
0

सुमारे ५० भंगार गोदामे जळून खाक
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
चिखली कुदळवाडी येथे रविवारी (५ मार्च) मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत भंगारमालाची सुमारे ४०-५० भंगाराची दुकान आणि गोदाम जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या १५ ते २० बंबांनी तब्बल चार फेऱ्या करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. सहा तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशामन दलाच्या जवानांना यश आले. परंतु, आग पूर्ण विझण्यास अजून किमान एक दिवस लागेल, असा अंदाज अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कुदळवाडी येथील विसावा चौकातील भंगारमालाच्या एका दुकानाला रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागली. प्लास्टिक व अन्य ज्वलनशील वस्तू असल्याने आग भडकली. त्यामुळे आजूबाजूच्या गोदामांनीही पेट घेतला. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना धुराचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व अग्निशामक बंबासह पुणे, खडकी, देहूरोड, चाकण येथील बंब घटनास्थळी बोलाविण्यात आले होते. शहरातील खासगी कंपन्यांच्या अग्निशामक बंबांना देखील पाचारण करण्यात आले. सुमारे १५ ते २० बंबांनी सुमारे ७० ते ८० टँकरच्या साह्याने आग आटोक्यात आणली. सोमवारीही ही आग धुमसत होती. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने या ठिकाणी बंब पोहोचण्यास अडथळा होत होता.
...
अनधिकृत गोदामांना नोटिसा
कुदळवाडीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे आहेत. दोन महिन्यापूर्वीच या गोदामांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. प्रदूषण मंडळाचे ना हरकत प्रमाणापत्र, दुकानाचे बांधकाम अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र असल्यावर महापालिका उद्योग व्यवसायासाठी परवानगी दिली जाते. अनधिकृत गोडाउनवर कारवाई करण्याचा अधिकार बांधकाम विभागाचा आहे. त्यामुळे कारवाई बाबत महापालिका एकमेकांकडे बोट दाखवू लागले आहे.
....
कारवाई केव्हा करणार?
विसावा चौकातीलच लाकडाच्या वखारीला फेब्रुवारी २०१६ मध्ये भीषण आग लागली होती. त्यामध्ये ७० ते ८० दुकाने जळून खाक झाली होती. या अग्नितांडावानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यानंतर तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी भंगार दुकानांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. सर्वेक्षणात एक हजार ५०० जणांकडे परवानगी नसल्याचे उघड झाले होते. त्यानंतर महापालिकेसह पोलिस प्रशासनाने पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्यामुळे येथील कारभारावर कोणाचेच लक्ष नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरसेवक जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘भूलथापांना बळी न पडता पिंपरी-चिंचवडमधील जनतेने भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवून सत्ता सोपविली आहे. या विश्वासाला तडा जाऊ न देता विकासकामांच्या माध्यमातून नगरसेवक जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील,’ असे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी दिले आहे.
चऱ्होली येथील वाघेश्वर महाराज चौकात पक्षाचा विजयी मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. खासदार अमर साबळे यांच्या हस्ते भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. पक्षाचे आळंदीतील नगरसेवकही या वेळी उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले, ‘पाच वर्षे मिळालेल्या सत्तेचा योग्य वापर करून विरोधकांना कुठेही टीका करण्याची संधी देऊ नका. आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी जोमाने कामाला लागा. नागरिकांनी तुम्हाला विविध उपमा दिल्या आहेत त्या कामाद्वारे सत्यात उतरवा. काम करणाऱ्या नगरसेवकांना माझी कायम साथ राहील. महापालिकेचा कारभार करताना विचार कसे असायला पाहिजे, शहराचा विकास कशा पद्धतीने करायचा याबाबत बैठका चालू आहेत. त्या अनुषंगाने एकजूट कायम ठेवावी.’
ते म्हणाले, ‘चऱ्होलीमध्ये नगरसेवक ‘रीपिट’ होत नाही. मात्र, नागरिकांनी विश्वास दाखवून पॅनेलला निवडून दिले आहे. आता भूलथापांना बळी न पडता जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखवावा.’ नवनिर्वाचित नगरसेवक नितीन काळजे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रभाग तीनमधील नागरिकांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायोमेट्रिकने करा श्रीगणेशा

0
0

नगरसेवकांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरीची सूचना
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्ताधारी बनलेल्या भारतीय जनता पक्षाने नगरसेवकांची सभागृहातील हजेरी ‘बायोमेट्रिक’ पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने बायोमेट्रिक यंत्रणा तातडीने बसवावी,’ अशी सूचना पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांना सोमवारी केली. ‘महापालिकेच्या सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे तैलचित्र लावण्याची कार्यवाही तातडीने करावी,’ असेही जगताप यांनी म्हटले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत एक हाती सत्ता मिळविल्यानंतर भारतीय जनता पक्षाने कारभाराचा श्रीगणेशा करण्यापूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. आमदार जगताप यांच्यासह नवनिर्वाचित गटनेते एकनाथ पवार, माजी महापौर आझमभाई पानसरे या वेळी उपस्थित होते.
बैठकीत शहराच्या विकासासोबतच प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात पारदर्शक कारभाराचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची सुरुवात नगरसेवकांच्या हजेरीपासून करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. सभागृहात न येताच फक्त सह्या करणाऱ्या नगरसेवकांना चाप लावण्याच्या दृष्टीने प्रत्येक सर्वसाधारण सभेला येणाऱ्या नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. कोणते नगरसेवक सभेला किती वाजता आले? किती वाजता सभागृहाबाहेर गेले? याची नोंद बायोमेट्रिक यंत्रणेद्वारे घेतली जावी, अशी सूचना जगताप यांनी आयुक्त वाघमारे यांना केली. त्या अनुषंगाने यंत्रणा तातडीने उभारण्याची कार्यवाही व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या सभागृहात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याचा ठराव यापूर्वीच झाला आहे. परंतु, पक्षीय राजकारणमुळे तैलचित्र लावण्यास विलंब झाला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्राबरोबरच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे तैलचित्र लावण्यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आली.
महापालिकेने निगडी ते दापोडी रस्त्यावर ‘बीआरटीएस’ बससेवा सुरू करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी लोखंडी कठडे टाकून मार्ग तयार केला आहे. परंतु, तो अद्यापही खुला नाही. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. ही सेवा सुरू होईपर्यंत सदरचा मार्ग दुचाकीसाठी खुला करण्याची सूचना या वेळी करण्यात आली.
‘शहरातील नागरिकांसाठी ‘सारथी’ जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. परंतु, त्याला अवकळा आल्याचे चित्र आहे. सारथीच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी येण्याचे प्रमाण सद्यःस्थितीत कमी झाले आहे. त्यामुळे ‘सारथी’चे सक्षमीकरण करून त्याचा नागरिकांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल,’ यासाठी तातडीने काम सुरू करण्यासही आमदार जगताप यांनी सांगितले.
विकास आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांचे स्वतंत्र विभाग तयार करावे, एकाच वॉर्डात शंभर कोटींची तरतूद करून होणाऱ्या अनावश्यक कामांना चाप लावण्यासाठी हीच रक्कम विविध शंभर भागांतील कामांसाठी खर्च करण्याचे नियोजन करावे, शहराच्या सर्वंकष विकासाचा विचार व्हावा, महिला, लहान मुले, विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची पुनर्मांडणी करून कल्याणकारी योजना राबवाव्यात, या योजनांचा निधी त्याच घटकांवर शंभर टक्के खर्च करावा, वर्षानुवर्षे एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची सूची तयार करून त्यांच्या तातडीने बदल्या कराव्यात, अग्निशमन दलासाठी गाड्या खरेदीबाबत राबविलेल्या निविदेचे पुनर्विलोकन करावे आणि कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवावे, आदी सूचना या वेळी करण्यात आल्या.
.....
बैठकीतील महत्त्वाच्या सूचना
- सदस्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने.
- शिवसेनाप्रमुख, सावरकरांचे तैलचित्र लावा.
- निगडी-दापोडी रस्त्यावरील लोखंडी कठडे हटवा.
- बदल्यांसाठी अधिकाऱ्यांची सूची तयार करा.
- कल्याणकारी योजनांचा फेरप्रस्ताव तयार करा.
- मॉडेल वॉर्डाची शंभर कोटींची तरतूद रद्द करा.
- सारथी उपक्रमाचे सक्षमीकरण करा.
०००
पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्ताधारी बनलेल्या भारतीय जनता पक्षाने नगरसेवकांची सभागृहातील हजेरी ‘बायोमेट्रिक’ पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने बायोमेट्रिक यंत्रणा तातडीने बसवावी, अशी सूचना केली आहे.
- लक्ष्मण जगताप, आमदार आणि भाजप शहराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकनाथ पवार यांची गटनेतेपदी निवड

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ पवार यांची सोमवारी निवड करण्यात आली. पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पवार यांची निवड जाहीर केली.
महापालिकेत १२८ पैकी ७७ जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. महापालिकेत महापौरांपाठोपाठ स्थायी समिती अध्यक्ष, सत्तारूढ पक्षनेते ही महत्त्वाची पदे मानली जातात. त्या अनुषंगाने महापौरपदासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकाला संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे स्थायी समिती आणि सत्तारूढ पक्षनेता ही पदे भोसरी किंवा पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकाकडे जाईल, अशी चर्चा होती. त्यामुळे गटनेतेपदासाठी पवार आणि सीमा सावळे यांच्यात चुरस होती. त्यापैकी पवार यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले.
पवार प्रभाग क्रमांक ११ (कृष्णानगर-कोयनानगर-अजंठानगर) येथून प्रथमच निवडून आले आहेत. २००७ मध्ये ते भाजपचे स्वीकृत सदस्य होते. तसेच पक्षाचे शहराध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. याशिवाय त्यांनी २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. निष्ठावंत पक्ष कार्यकर्ता आणि पक्ष संघटनेतील कामकाजाचा अनुभव म्हणून त्यांच्या खांद्यावर गटनेतेपदाची धुरा सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सूचनेनुसार पवार यांची नेमणूक केल्याचे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.
....
निवडीनंतर एकनाथ पवार म्हणाले, ‘पक्षाने प्रामाणिकपणाचे फळ म्हणून गटनेतेपदी निवड केली आहे. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे महापालिकेत सत्ता परिवर्तन घडविण्यात भाजपला यश आले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार यापुढे शहरातील नागरिकांची सेवा करण्याचा प्रयत्न राहील. नागरिकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शहराला देशातील प्रथम क्रमांकाची स्मार्ट सिटी बनविण्यासाठी पदाचा उपयोग करणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा बांधकामाला संरक्षण?

0
0

खेड तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली; ग्रामस्थ नाराज
म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर
भामा-आसखेड धरण क्षेत्रात व्यावसायिकाने केलेले बेकायदा बांधकाम तोडून टाकण्याचा आदेश खेडच्या तहसीलदारांनी दिला होता. त्यांच्या आदेशाला खेड प्रांताधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवून स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रांतअधिकारी बेकायदा बांधकामाला पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या ठिकाणी फार्महाउसच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात ‘हाय प्रोफाइल’ अनैतिक व्यवसाय व डान्स बार चालू होता. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व व्यावसायिकांचा येथे कायम वावर होता. या ठिकाणी चालणाऱ्या गैरप्रकारांबाबत स्थानिकांमध्ये असंतोष होता. गेल्या वर्षी चाकण पोलिसांनी संबंधित फार्महाउसवर छापा टाकून चार बारबालांसह दहा जणांना अटक केली होती. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी बेकायदा प्रवृत्तींना रोखण्याऐवजी अनधिकृत बांधकामे न पाडण्याचा आदेश देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
संबंधित फार्महाउस शशी विजयपाल शर्मा यांच्या मालकीचे आहे. या ठिकाणी मालकीच्या जागेत आणि धरणक्षेत्रात विनापरवाना बांधकाम करण्यात आलेले आहे. दरम्यान पोलिस कारवाईनंतर मंडल अधिकारी पाइट यांनी सदर जागेचा पंचनामा करून अहवाल तहसीलदार यांच्याकडे सुपूर्त केला होता. तहसीलदारांनी संबंधितांकडे बिनशेती आदेशाची प्रत, मंजूर बांधकाम आराखड्याची प्रत, मोजणी नकाशाची प्रत, धरण क्षेत्रात केलेल्या बांधकामाबाबत पाटबंधारे विभागाचे आदेश, बोटिंग व्यवसायासाठी पाटबंधारे विभाग, पोलिस विभाग व जिल्हाधिकारी, पुणे यांनी दिलेल्या परवानगीच्या प्रती सादर करण्याचा आदेश दिला होता. परंतु संबंधित फार्महाउसच्या मालकाने सदर मिळकतीमध्ये केलेल्या बांधकामाबाबत, खासगी बोट वापराबाबत तसेच धरणक्षेत्रामध्ये केलेल्या बांधकामाबाबत कोणतेही पुरावे तहसीलदारांकडे सादर केले नव्हते. मुळातच महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात सदरचे बांधकाम हे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४१ मधील तरतुदींचा भंग करणारे आहे. तसेच संबंधित हे बांधकाम शेतघर नसून, पर्यटकांसाठी केलेले व्यावसायिक बांधकाम असल्याचे तपासात सिद्ध झाले.
धरण क्षेत्रात व्यावसायिक कारणांसाठी वापरात असलेल्या खासगी बोटीला पोलिस, पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी नव्हती. त्यामुळे सदर अनधिकृत बांधकामाला तहसीलदार यांनी सत्तेचाळीस हजार रुपये दंड आकारून संबंधित बांधकाम १५ दिवसांच्या आत पाडण्याचा आदेश दिला होता. दरम्यान, शर्मा यांनी तहसीलदारांच्या विरोधात खेडच्या प्रांताधिकाऱ्यांकडे अपिल दाखल केले आणि स्थगिती देण्याची मागणी केली.
प्रांताधिकारी सुनिल गाढे यांनी ‘तहसीलदारांच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास अपिलार्थी यांचे कधीही न भरून येणारे नुकसान होण्याची शक्यता आहे. या उलट स्थगिती दिल्यास अपिलार्थी यांचे कोणतेही नुकसान होण्याची शक्यता नाही.’ असे नमूद करून तहसीलदारांच्या बांधकाम पाडण्याच्या आदेशाला स्थगिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप गटनेतेपदी भिमाले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी श्रीनाथ भिमाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पुण्याचे प्रभारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार भिमाले यांची निवड करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सोमवारी केली.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ९७ जागा मिळाल्या असल्याने पालिकेत सत्ताधारी म्हणून भाजपचे वर्चस्व राहणार आहे. भाजपचा गटनेता हा पालिकेत सभागृह नेता म्हणून जबाबदारी संभाळणार आहे. पालिकेत एवढ्या मोठ्या संख्येने पक्षाचे उमेदवार निवडून आल्याने गटनेता म्हणून कोणाला संधी मिळणार याची निवडणुकीच्या निकालापासून उत्सुकता लागली होती. गटनेतेपदासाठी भिमाले यांच्याबरोबरच सुनील कांबळे, मुरलीधर मोहोळ, हेमंत रासने यांची नावे जोरदार चर्चेत होती. या पदावर कोणला संधी द्यावी, यासाठी पक्षाच्या वतीने अनेक नगरसेवकांची मतेदेखील जाणून घेण्यात आली होती. प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेल्या सहकारमंत्री देशमुख यांनी रविवारी शहरातील पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली होती. त्यामध्ये भिमाले यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. सोमवारी अधिकृतपणे गटनेते म्हणून भिमाले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
पक्षाच्या गटाची नोंदणी विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यासाठी गटनेत्यांची नियुक्ती करणे गरजेचे असते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याकडून भिमाले यांची या पदावर नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ही नियुक्ती करण्यात‌ आल्याचे शहराध्यक्ष गोगावले यांनी सांगितले. भिमाले यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्रही सोमवारी देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images