Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विमानतळासाठी ‘डॉर्श’ सल्लागार

$
0
0

विमानतळासाठी ‘डॉर्श’ सल्लागार

पुरंदर ‌विमानतळासाठी नेमणूक; ‘डीपीआर’ही तयार करणार

म. टा. विशेष प्रतिनिधी
बर्लिन, बँकॉक आणि कुवेत या सारख्या ठिकाणच्या विमानतळांचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करणाऱ्या जर्मनच्या ‘डॉर्श’ या कंपनीला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे. याच कंपनीकडून विमानतळाचा ‘डीपीआर’ तयार केला जाणार असून, येत्या सहा महिन्यांत त्याचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त होणार आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर जिल्ह्यातील राजेवाडी, वाघापूर, एखदपूर या परिसरातील जागा निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी विमानतळ प्राधिकरणाकडून जागेची पाहणी करून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. त्यानंतर विमानतळ उभारणीच्या दिशेने वेगाने पावले टाकली जात आहेत. प्रशासनानेही या ठिकाणचा सर्व्हे केला आहे. आता प्रत्यक्षात हा प्रकल्प कसा असावा, यासाठी ‘डॉर्श’ कंपनीकडून ‘डीपीआर’ तयार करून घेतला जाणार आहे.
‘डॉर्श’ कंपनीला ‘डीपीआर’ तयार करण्यासाठी नऊ कोटी ४१ लाख रुपयांचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरला होणार असल्याचे जाहीर केले. त्याला पुरंदरमधील संबंधित भागातील ग्रामस्थांकडून विरोध केला जात आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान विमानतळ विषयक हालचाली थंडावल्या होत्या. मात्र, आता निवडणुका पार पडल्या असून अचारसंहिताही संपली आहे. त्यामुळे सरकारकडून तातडीने पावले उचलली जात आहेत.
दरम्यान, विमानतळाची घोषणा झाल्यापासून पुरंदरमधील ग्रामस्थांकडून विरोध करण्यात आला. प्रशासनाच्या विरोधात आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. पुरंदरची एक इंचही जमीन विमनतळासाठी देणार नसल्याचा नारा येथील नागरिकांना दिला. या वे‍ळेला खेड-चाकणमधील ग्रामस्थांनी व येथील राजकीय पुढाऱ्यांनी विमानतळ खेडलाच हवे, अशी मागणी करून, निर्णय बदलण्यासाठी दबाव टाकला होता. या पार्श्वभूमीवर विमानतळासाठी सल्लागाराची नियुक्ती करून पुरंदर विमानतळाचा मार्ग प्रशासनाने मोकळा केला आहे.
................
कऱ्हेसमोरच्या परिसरात धावपट्ट्या
या विमानतळावर सुमारे चार किमी लांबीच्या धावपट्ट्या तयार करण्यात येणार असून त्यामुळे आसपासच्या कोणत्याही गावांना धक्का लागणार नाही, याची खबरादारी घेण्यात येणार आहे. जेजुरी ते सासवड या दरम्यान कऱ्हा नदीच्या समोरच्या परिसरात या धावपट्ट्या तयार होणार आहेत, अशी माहिती ‘एसआरए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवेशद्वाराची तोडफोड

$
0
0

बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवेशद्वाराची तोडफोड

म. टा. प्रतिनिधी, पुणे
एका कार्यक्रमासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवेशद्वाराची तोडफोड करण्याचा प्रकार शुक्रवारी घडला. जमावाने दरवाजासह बालगंधर्व रंगमंदिराच्या नावाची तोडफोड केली. स्पर्धा परीक्षेमधून प्रशासकीय सेवेत दाखल होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनच हा प्रकार झाल्याने त्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
श्री बालाजी फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ सनदी अधिकारी भरत आंधळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या या संस्थेचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. हा कार्यक्रम विनामूल्य असल्याने या व्याख्यानासाठी ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रंगमंदिराची आसनक्षमता जवळपास एक हजाराची असताना दुप्पट विद्यार्थी दाखल झाल्याने येथील व्यवस्था कोलमडून गेली. विद्यार्थ्यांच्या जमावाने आत शिरण्यासाठी गोंधळ सुरू केल्याने शटर उचकटण्यात आले; तसेच तोडफोड करण्यात आली. बाल्कनीत गर्दी झाल्याने ती कोसळण्याची भीती निर्माण झाली होती.
आतमध्ये एवढी गर्दी झाल्यानंतर सुरक्षारक्षकाने विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावरच अडविले. त्यावेळी पाठीमागून अचानक आलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यामुळे प्रवेशद्वाराचे गज वाकले. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांची चेंगराचेंगरी झाली, त्यात काही तरुणी देखील होत्या. त्याही जखमी झाल्या आहेत. अखेर व्यवस्थापकांनी पोलिसांना बोलावून विद्यार्थ्यांना बाहेर काढले व कार्यक्रम रद्द केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यप्रयोग सादर करताना सागर चौघुलेचा मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

रंगभूमीवर नाट्यप्रयोग सादर करत असतानाच एका उमद्या कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला. टिळक स्मारक रंगमंदिर येथे रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. शाहू महाराजांच्या जीवनावर अधारित ‘अग्निदव्य’ हे नाटकात शाहू महाराजांची मुख्य भूमिका सादर करत असतानाच सागर शांताराम चौघुले (वय ३८) यांचा मृत्यू झाला. सागरच्या पश्चात आई, एक भाऊ, वहिनी, पत्नी आणि दिड वर्षांची मुलगी असा परिवार आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा तो सख्खा भाचा होता.


शुक्रवारी पुण्यातील टिळक स्मारक रंगमंदिरामध्ये राज्य नाट्य स्पर्धेची अंतीम फेरी सुरु होती. कोल्हापूरचा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला होता. हा संघ ४० कलाकारांसह ‘अग्निदिव्य’ हे शाहू महाराजांच्या जीवनावरील नाटक सादर करत होता. नाटकाच्या सुरवातीपासून शाहू महाराजांच्या मुख्य भुमिकेत असलेल्या सागर चौघुले यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. मात्र, नाटकाचा मध्यांतर होण्याआधीच नाटकातील आपले संवाद म्हणत असताना सागरला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो रंगमंचावर कोसळला. सहकलाकारांनी तातडीने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्याला पुना हॉस्पिटलला हलविण्यात आले. पुना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सागरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.



सागर हा मुळचा कोल्हापूरचा असून चित्रपट निर्माते शांताराम चौघूले यांचा मुलगा आहे. सागरचा कोल्हापूरमध्ये जाहिरात क्षेत्राशी निगडीत व्यावसाय आहे. मात्र, अभिनयाच्या आवडीमुळे महाविद्यालयीन वयापासूनच तो नाटकांमध्ये भाग घेत होता. राज्य नाट्य स्पर्धेपुर्वीच सहा महिन्यांपुर्वीच ‘अग्निदिव्य’ हे नाटक बसविले होते. या नाटकात त्याने केलेल्या शाहू महाराजांच्या भूमिकेसाठी त्याचे कौतुक होत होते. शुक्रवारीही पुण्यात नाटक सादर करताना त्याने उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळविली होती. सागरने नाटकाबरोबर काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. लवकरच त्याची भूमिका असलेला ‘सासू आली अडचण झाली’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुण कलाकाराचा नाट्यप्रयोगावेळी मृत्यू

$
0
0

तरुण कलाकाराचा नाट्यप्रयोगावेळी मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टिळक स्मारक रंगमदिरात नाट्यप्रयोग सादर करत असतानाच एका कलाकाराचा हृदयविकाराने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नाट्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे रंगमंचावर निधन झाले होते. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.

सागर शांताराम चौगुले (वय ३८) असे मृत्यू झालेल्या कलाकाराचे नाव आहे. सागर शाहूमहाराजांच्या जीवनावर आधारित ‘अग्नि‌दिव्य’ नाटकात शाहूमहाराजांची मुख्य भूमिका सादर करत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. सागर यांच्यामागे आई, एक भाऊ, वहिनी, पत्नी आणि दीड वर्षांची मुलगी असा परिवार आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचे ते सख्खे भाचे होते.

पुण्यातील टिळक स्मारक रंगमंदिरात राज्य नाट्य स्पर्धेची अं‌तिम फेरी सुरू होती. कोल्हापूरचा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. आज हा संघ ४० कलाकारांसह ‘अग्निदिव्य’ हे शाहूमहाराजांच्या जीवनावरील नाटक सादर करीत होता. नाटकाचा मध्यंतर होण्याआधीच नाटकातील आपले संवाद म्हणतानाच सागर यांना हृदयविकाराचा झटका आला. सागर रंगमंचावर कोसळले. सहकलाकारांनी त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घो‌षित केले.

सागर मूळचे कोल्हापूरचे असून, चित्रपट निर्माते शांताराम चौगुले यांचे ते पुत्र होत. सागर यांचा कोल्हापूरमध्ये जहिरात क्षेत्राशी निगडित व्यवसाय आहे. मात्र, अभिनयाच्या आवडीमुळे महाविद्यालयीन वयापासूनच ते नाटकांमध्ये भाग घेत होते. राज्य नाट्य स्पर्धेपूर्वीच सहा महिन्यांपूर्वीच ‘अग्निदिव्य’ हे नाटक बसविले होते. या नाटकातील शाहू महाराजांच्या भू‌मिकेस सर्वच स्तरांतून वाहवा मिळत होती. आजही पुण्यात नाटक सादर करताना त्याने सर्वच रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळविली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तेसाठी नाही, सत्यासाठी

$
0
0

सत्तेसाठी नाही, सत्यासाठी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेनेची एकच भूमिका असून, याबाबत घटनेच्या चौकटीत असलेल्या तरतुदी भाजपला मान्य आहेत, असे सांगून राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘राज्यात सत्तेसाठी किंवा पदासाठी नाही, तर सत्यासाठी आहोत,’ असे वक्तव्य शुक्रवारी केले.
जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारुप आराखडे अंतिम करण्यासाठी जिल्हानिहाय बैठकांचे आयोजन विधान भवन येथे करण्यात आले होते. त्या वेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती ​दिली. या वेळी खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट उप​स्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, ‘शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पारदर्शकतेच्या सूचना मं‌त्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आल्या आहेत. आमची लढाई ही महापौरपदाच्या खुर्चीसाठी कधीही नव्हती. फक्त पारदर्शकतेसाठी होती. मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची चर्चा होत राहील. आम्ही सरकारमध्ये सत्तेसाठी किंवा पदासाठी नाही, तर सत्यासाठी आहोत.’ ‘पारदर्शकेबाबत नागरिकांनी सूचना पाठवाव्यात. त्यांचा समावेश केला जाईल,’ असेही ते म्हणाले.
भाजप आणि शिवसेनेतील नातेसंबंधात निर्माण झालेल्या तणावाबाबत ते म्हणाले, ‘या संदर्भात मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीतून चांगला निर्णय होईल.’ ‘यंदा कृषी क्षेत्राबरोबरच रोजगार आणि कौशल्य विकासावर राज्य सरकार लक्ष केंद्रित करणार आहे. त्याअंतर्गत जिल्हा नियोजन समितीला निधी दिला जाईल. त्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
‘प्रत्येक जिल्ह्यातील भौगोलिक आणि नैसर्गिक उपलब्धतेनुसार रोजगारनिर्मितीवर भर देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात लघुउद्योग, मत्सव्यवसाय, पर्यटन वाढीस लागण्यासाठी प्रयत्न केले जातील,’ असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपक पायगुडे, पिटके यांच्यावर गुन्हा दाखल

$
0
0

दीपक पायगुडे, पिटके यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे ः अनियमित कर्ज मंजूर करून कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याच्या आरोपावरून लोकसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष दीपक पायगुडे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पिटके यांच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायगुडे यांनी हा सर्व पैसा ‘लोकसेवा प्रतिष्ठान’च्या खात्यात वळविल्याचे लेखा परीक्षणाच्या अहवालात आढळून आले आहे.
याबाबत चार्टर्ड अकाउंटंट कांताराम खंडूजी खिरड (वय ५४, रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसेवा सहकारी बँकेच्या कामकाजात अनिय‌मितता दिसून आली होती. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक किरण सोनवणे यांनी जून २०१४ मध्ये खिरड यांना बँकेचे लेखा परिक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २०१३-१४ या वर्षातील लेखापरिक्षण के. के. खिरड अँड कंपनी या फर्मने केले.
बँकेचे अध्यक्ष पायगुडे व पिटके यांनी सहकार आयुक्तांनी आखून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही; तसेच बँकेच्या संचालक मंडळाला विश्वासात न घेता मोठ्या प्रमाणात अनिय‌मित कर्ज प्रकरणे मंजूर केली. ही सर्व रक्कम पायगुडे यांनी स्थापन केलेल्या ‘लोकसेवा प्रतिष्ठान’च्या नावाने वर्ग करून घेतल्याचे आढळले. पिटके यांनी पदाचा गैरवापर करून वैयक्तिक हितसंबंध जपण्यासाठी कर्ज मंजूर केले. अनिय‌मित कर्ज मंजूर करण्यासाठी बँकेतील ४२ खात्यांचा वापर केला. ही गोष्ट रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) केलेल्या लेखा परीक्षणात आढळली. त्यानंतर ही खाती बंद करण्याचे आदेश बँकेला दिले होते. बँकेने ही खाती बंद करत नवीन १८ खाती उघडून अनियमित कर्ज वाटप केल्याचे लेखा परीक्षणात आढळले. या बँक खात्यांवरून तब्बल ३२ कोटी रुपयांची अफरातफर झाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरबीआयने १५ मे २०१४ पासून बँकेवर व्यवहार करण्यास बंदी घातली. त्यामुळे बँक बंद पडल्याने याचा खातेधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
खिरड यांनी १२ फेब्रुवारी २०१५ रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला बँकेचा लेखापरिक्षण अहवाल सादर केला. सरकारी अभियोक्ता कार्यालयाकडे तो पडताळणीसाठी पाठविण्यात आला. त्यामध्ये अफरातफर झाल्याचे स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भीम’द्वारे भरा ‌मिळकतकर

$
0
0

‘भीम’द्वारे भरा ‌मिळकतकर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशातील अधिकाधिक नागरिकांनी कॅशलेस व्यवहाराकडे वळावे यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तयार केलेल्या ‘भीम’ या मोबाइल अॅपच्या माध्यमातून आता महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्सदेखील भरता येणार आहे. अशाप्रकारे मोबाइल अॅपच्या माध्यमातून सेवा देणारी पुणे महापालिका देशातील पहिली पालिका ठरणार आहे. भीम या अॅपच्या माध्यमातून प्रॉपर्टी टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बक्षीस योजनेचा लाभही ‌घेता येईल.
तीन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर देशभरातील अधिकाधिक नागरिकांनी कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य द्यावे, यासाठी केंद्र सरकारने ‘भीम’ या नावाने मोबाइल अॅप विक‌सित केले आहे. या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयांची बक्षीसे जाहीर केली आहेत. या अॅपच्या माध्यमातून देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रॉपर्टी टॅक्स, वेगवेगळे सेवा शुल्क कर, तसेच दंडाची रक्कम भरण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत पालिका प्रशासनाकडून प्रॉपर्टी टॅक्स भरण्याची सुविधा पुणेकरांना उपलब्ध करून देण्यात आल्याचे मिळकत कर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी सांगितले.
महापालिकेच्या सुमारे साडेसात लाख मिळकतधारकांपैकी सुमारे सव्वा दोन लाख मिळकतधारकांनी तब्बल १९६ कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स यंदा ऑनलाइन भरला आहे. एकूण कर वसुलीत सुमारे २० टक्के कर ऑनलाइन स्वरुपात वसूल झाल्याचे मापारी यांनी सांगितले. पालिकेने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने पुणेकरांना अॅपच्या माध्यमातून एका क्लिकवर पालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स भरता येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील तरुणाचा असाही ‘रुरल कनेक्ट’

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे
आपल्या गावासाठी काही तरी करण्याची इच्छा प्रत्येकामध्येच असते; पण फार कमी जणांना ते जमते. पुण्यातील एका तरुणाने मात्र आपल्या औराद शहाजनी या गावामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी डिजिटल रूरल कनेक्ट स्थापन करण्याची संकल्पना मांडली आणि सरकारवर अवलंबून न राहता गावातील लोकांच्या मदतीने ही संकल्पना प्रत्यक्षात राबविली. शाळकरी मुलांपासून गावातील ज्येष्ठांपर्यंत सर्व जण त्याचा लाभ घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस इकॉनॉमीसाठी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर या संकल्पनेला चालना मिळाली. मात्र, हे फक्त कॅशलेस व्यवहारांपर्यंत मर्यादित न राहता, या निमित्ताने इंटरनेटचा वापर सगळ्यांना व्हावा, यासाठी अशी संकल्पना मांडण्यात आली. पुण्यामध्ये कार्यरत असलेले आणि मूळचे औराद शहाजनीचे असलेल्या प्रशांत गिरबाने यांनी मांडलेल्या या संकल्पनेला गावातील मंडळींनी पाठिंबा दिला. मात्र, हे सगळे आपण आपल्या निधीतून उभे करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यातूनच जागा, कम्प्युटर, वाय-फाय या मूलभूत सुविधा उपलब्ध
करून देण्यात आल्या. त्यातून नेटकॅफे अर्थात डिजिटल रूरल कनेक्ट
तयार झाला.
‘अशा प्रकारचा उपक्रम प्रत्येक गावात करणे शक्य असून सरकारवर अवलंबून न राहता गावकऱ्यांनी ठरविल्यास स्वप्रयत्नांतून, तसेच काही कंपन्यांच्या सीएसआरमधून या केंद्रांची उभारणी आणि संचलन सहज शक्य आहे,’ असे गिरबाने यांनी सांगितले. औरादमधील केंद्राचा प्रारंभ पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. डॉ. शंखद मल्लिकार्जुन यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. चंद्रकांत गस्तगार यांनी आभार मानले.

असा आहे उपक्रम
गावातील शाळकरी व कॉलेजमधील मुलांना हा नेटकॅफे उपलब्ध करून देण्यात येतो. प्रत्येकाला एक तासाचे कुपन देऊन वापर करण्याची परवानगी मिळते. आपल्या अभ्यासासाठी लागणारी माहिती मुले नेटवरून गोळा करतात. त्याचबरोबर गावातील नागरिकांना माहिती गोळा करण्यासाठी मदतही करतात. शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज तसेच नवीन तंत्रज्ञानाची माहितीही त्यातून मिळते. बाहेरच्या गावांतील एखाद्या तज्ज्ञांबरोबर संवादाचा कार्यक्रमही आयोजित केला जातो. प्रसंगी प्रोजेक्टर लावून तो सर्वांना दाखविण्याचे नियोजन आहे. शिक्षण, वैद्यकीय सेवा, करिअर यासारख्या विषयांवरील तज्ज्ञांची व्याख्याने या सुविधेमार्फत गावकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंधजन मंडळाचे निरंजन पंड्या यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे अंधजन मंडळाचे अध्यक्ष आणि स्वतःला आलेल्या अंधत्वावर मात करीत इतर अंधाच्या आयुष्याला ‘दृष्टी’ देणारे निरंजन पंड्या यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
पोटाच्या कॅन्सरच्या आजाराने पंड्या आजारी होते. त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यातच शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालविली. अंत्यसंस्कारावेळी एच. व्ही. देसाई हॉस्पिटलचे चेअरमन नितीन देसाई, सचिव राजेश शहा, हरिभाई शहा, वैद्यकीय संचालक कर्नल माधव देशपांडे यांच्यासह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
निरंजन पंड्या यांचा जन्म ४ ऑगस्ट १९४५ साली पुण्यात झाला. दहावीमध्ये क्रिकेट खेळताना डोळ्याला क्रिकेटचा चेंडू लागला. त्यात पंड्या यांना दृष्टी गमवावी लागली. पुढे उच्चशिक्षण घेण्यासाठी ते जर्मनीला गेले. स्वतःच्या वाट्याला आलेल्या अंधत्वावर मात करीत अंधांसाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अंधांच्या हितासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू होती. अंधांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य खर्च केले. अंधांकरिता पुणे अंधजन मंडळाची सुमारे ४० वर्षांपूर्वी स्थापना केली. धायरी आणि हडपसर येथे अंधांसाठी आश्रम काढले. डोळ्यांचे स्वतंत्र मोठे एच. व्ही. देसाई हॉस्पिटल उभारले. काही वर्षांपूर्वी नंदूरबार येथे कांता लक्ष्मी शहा हॉस्पिटल उभारले. टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड, अंध महिला वृद्धाश्रम या संस्थांची त्यांनी उभारणी केली. पंड्या यांच्यासाठी येत्या गुरुवारी कसबा पेठेतील आर. सी. एम. गुजराती शाळेमध्ये प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोमार्गासाठी ‘पीपीपी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे काम एका बाजूला प्रगतिपथावर असतानाच, शिवाजीनगर ते हिंजवडी या तिसऱ्या मार्गिकेचे काम ‘सार्वजनिक-खासगी सहभागा’तून (पीपीपी) करण्याचे निश्चित झाले आहे. या मेट्रोच्या विकसनासाठी खासगी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागवले आहेत.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन शहरांतील मेट्रोच्या दोन मार्गांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षअखेरीस झाले. त्यानंतर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे (महा-मेट्रो) मेट्रोसाठी पूरक सर्वेक्षणे सुरू झाली असून, नुकतेच पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या दहा किमीच्या मार्गाचे टेंडर काढण्यात आले आहे. ‘पीएमआरडीए’ने शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून घेतला होता. त्याला मान्यता देताना राज्य सरकारने हा प्रकल्प ‘पीपीपी’ तत्त्वावर राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार या २३ किमीच्या प्रकल्पासाठी खासगी भागीदारांची मदत घेण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने प्रस्ताव
मागवले आहेत.
शिवाजीनगर ते हिंजवडी या संपूर्ण मार्गासाठी साधारणतः साडेसात हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी काही वाटा केंद्र आणि राज्य सरकारसह पीएमआरडीएकडून उचलला जाणार आहे. तर, उर्वरित निधी आंतरराष्ट्रीय बाजारातून उभा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांनी शिवाजीनगर ते हिंजवडी प्रकल्पात गुंतवणूक करण्यास पुढे यावे, यासाठी हा प्रस्ताव मागविण्यात आला आहे. मुंबई मेट्रोपोलिटन रीजनल डेव्हलपमेंट अॅथोरिटीने (एमएमआरडीए) मुंबईतील पहिला मेट्रो प्रकल्प ‘पीपीपी’ तत्त्वावरच राबवला होता. त्याच धर्तीवर शिवाजीनगर-हिंजवडी प्रकल्प राबविण्याचा सरकारचा विचार आहे.
हिंजवडी आयटी पार्क येथे मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या नोकरदारांसाठी हा मेट्रो प्रकल्प सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे. तसेच, शहरातील दोन मेट्रो मार्ग आणि हा मार्ग यांचे ‘इंटरचेंज स्टेशन’ शिवाजीनगर येथील धान्य गोदामावरील जागेत करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका मेट्रोतून दुसऱ्या मेट्रोचा वापर करणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रोबोकॉन’ स्पर्धेमध्ये सीओईपी विजेते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ‘रोबोकॉन २०१७’ या स्पर्धेत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) संघाने शनिवारी विजेतेपद पटकाविले आहे. त्यामुळे जपान येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोबोकॉन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व सीओईपीचा संघ करणार आहे. या विजयामुळे सीओईपीने इंजिनीअरिंगच्या शिक्षणात देशात आपला दबदबा कायम ठेवला आहे.
माईर्स एमआयटी अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आणि प्रसारभारती यांच्यातर्फे बालेवाडी येथे राष्ट्रीय पातळीवरील ‘रोबोकॉन - २०१७’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारतातून नामवंत इंजिनीअरिंग कॉलेजचे ११२ संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात सीओईपी आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) लढत झाली. या लढतीत सीओईपीच्या संघाने चांगली कामगिरी करत एमआयटीच्या संघाचा पराभव केला. त्यामुळे स्पर्धेचे विजतेपद सीओईपीच्या संघाला, तर एमआयटीचा संघ उपविजेता ठरला. सीओईपीला सुवर्णपदक, पुरस्कार आणि एख लाख रुपये रोख असे पारितोषिक देण्यात आले. एमआयटीच्या संघाला रौप्य पदक, पुरस्कार आणि पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
कानपूर येथील आयआयटीचे माजी संचालक डॉ. संजय धांडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. शिवानी शर्मा, मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक शिवाजी फुलसुंदर, सीओईपीचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ कराड, डॉ. योगेश भालेराव आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांंना पारितोषिके देण्यात आली. ‘फास्टेस्ट जॉब कम्प्लीटिंग रोबो’ सीओईपीला, तर ‘बेस्ट इस्थेटिक रोबो’ पुरस्कार एमआयटीला
करण्यता आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अज्ञातवासात गेलेले अजित पवार परतले...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापौरपदासाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अवघ्या तीन दिवसांवर आली असल्याने पक्षाचे गटनेते निवडण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये वेग आला आहे. पुढील दोन दिवसात सर्वाधिक जागा जिंकून पालिकेत सत्ताधारी ठरलेल्या भारतीय जनता पक्षाबरोबरच दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळविणारा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता निवडला जाणार आहे. राष्ट्रवादीचा गटनेता पालिकेत विरोधी पक्षनेता ठरणार असून भाजपचा गटनेता सभागृह नेता म्हणून काम पाहणार असल्याने या दोन्ही पदांवर वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

महापालिकेच्या सभागृहाचा कालावधी १५ मार्चपर्यंत असल्याने १५ तारखेला महापौरपदासाठी निवडणूक होणार असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज ८ मार्चला भरण्याची मुदत असल्याने यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात पक्षाच्या सभासदांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. ही नोंदणी करताना पक्षाचा गटनेता निवडला जातो. शिवसेनेचे यापूर्वीच गटनेता म्हणून संजय भोसले यांचे नाव जाहीर केले आहे. काँग्रेसचे नऊ सदस्य विजयी झाले असून रविंद्र धंगेकर हे अपक्ष म्हणून विजयी झालेले उमेदवार काँग्रेस पुरस्कृत आहेत. मनसेचे दोन तर एमआयएमचा एक सभासद निवडून आला आहे. काँग्रेसकडून चंदू कदम, अविनाश बागवे यांची नावे गटनेतेपदासाठी चर्चेत आहेत.

पालिकेत सर्वाधिक म्हणजे ९७ जागा मिळून सत्ताधारी पक्ष ठरलेल्या भाजपचा गटनेता हा पालिकेत सभागृह नेता होणार आहे. त्यामुळे हे पद मिळावे यासाठी अनेक दिग्गजांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. या पदावर वर्णी लागावी यासाठी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे, मुरली मोहोळ, श्रीनाथ भिमाले यांच्यासह इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या मंडळींनी देखील कंबर कसली आहे. गेली दहा वर्षे महापालिकेत सत्ताधारी म्हणून काम पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत काम करावे लागणार असल्याने बहुमताच्या जोरावर चुकीचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षनेता हा सक्षम आणि अभ्यासू असण्याची गरज आहे.

हे पद आपल्याला मिळावे, यासाठी राष्ट्रवादीच्या सभासदांनीही जोरदार प्रयत्न सुरु केले असून यामध्ये विशाल तांबे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, चेतन तुपे, दीपक मानकर यांची नावे चर्चेत आहेत.

अजित पवार परतले...

महापालिकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर गेल्या बारा दिवसापासून अज्ञातवासात गेलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सोमवारी शहरात परत येत आहेत. पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासह अजित पवार रविवारी (५ मार्च) पालिकेत विजयी झालेल्या पक्षाच्या नगरसेवकांशी संवाद साधणार आहे. बारामती होस्टेल येथे या नगरसेवकांची बैठक बोलाविण्यात आली असून यामध्ये पालिकेच्या सभागृहात पक्षाचे नेतृत्व कोण करणार या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम करताना पक्षाची रणनिती काय असली पाहिजे, यावर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाचा उन्हाळा कडक

$
0
0

दुपारी बाहेर पडणे, श्रमाची कामे टाळा; आपत्ती व्यवस्थापन विभागाचा सल्ला
म. टा. प्रतिनिधी, पुणे
उन्हाळ्याच्या काळात दुपारी १२ ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे आणि शारीरिक श्रमाची कामे करणे टाळा...असा सल्ला दिला आहे, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने. यंदाचा उन्हाळा हा उष्णतेच्या लाटेचा असणार असल्याने शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याच्या शक्यतेमुळे ही खबरदारी घेण्याच्या सूचना या विभागाने दिल्या आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून होणारे परिणाम टाळण्यासाठी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी याबाबत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना परिपत्रक काढून उपाययोजना करण्याचे सुचविले आहे.
उन्हाळ्याच्या काळात काय करावे आणि काय करू नये, याबाबतचे मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दुपारी १२ ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे करणे टाळावे; तसेच या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.
गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी उन्हाळ्याची सुरवात लवकर झाली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, याबाबत उपाययोजना करण्याचे या परिपत्रकात सुचविण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा नियंत्रण कक्ष, महापालिका नियंत्रण कक्ष, विभागीय स्तरावरील कक्ष, स्थानिक संस्था आणि आरोग्य विभाग यांनी एकत्रित येऊन याबाबत काम करावे. या विभागांबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्था यांनाही या कामात सहभागी करून घेण्याचे परिपत्रकात म्हटले आहे.
उन्हाळ्याच्या काळात काय करावे, याबरोबरच काय करू नये, हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये गडद, घट्ट आणि जाड कपडे घालण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी, लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांमध्ये ठेवू नये, असेही सांगण्यात आले आहे.
.............
उन्हाळ्यात काय करावे?
* दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
* बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी बूट आणि चपलांचा वापर करावा.
* प्रवास करताना पाण्याची बाटली जरूर सोबत घ्यावी.
* उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
* पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा.
* ओल्या कपड्यांनी डोके, मान आणि चेहरा झाका.
* शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएम, घरी बनविलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक यांचा वापर करावा.
* थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.
* रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणासाठी शेड उभाराव्यात.
* जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.
...................................
‘राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पाठविलेले परिपत्रक मिळाले आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या परिसरात उपाययोजना करण्यात येणार आहेत. संबंधित सरकारी विभागांना उपाययोजना करण्याबाबत सूचना आणि नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम केले जाणार आहे.
- राजेंद्र मुठे, निवासी उप​जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षाव्यवस्थेची ऐशीतैशी

$
0
0

पुणे विद्यापीठात केवळ ६० सुरक्षारक्षक तैनात
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियामध्ये झालेल्या मारामारी प्रकरणामुळे विद्यापीठाची सुरक्षाव्यवस्था ऐरणीवर आली आहे. विद्यापीठाला सुरक्षेसाठी २५० सुरक्षारक्षकांची गरज असताना केवळ ६० ते ७० सुरक्षारक्षक सुरक्षेचे काम पाहत आहेत. सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या गार्डबोर्ड व मेस्को या संस्थांच्या अडचणींमुळे सुरक्षारक्षकदेखील मिळत नाहीत. त्यामुळे सध्या विद्यापीठातील सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र आहे.
काही दिवसांपूर्वी विद्यापीठात एका विद्यार्थिनीची छेड काढण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच अभाविप आणि एसएफआयमध्ये मारामारी झाली. या कारणांमुळे विद्यापीठाच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यापीठात अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सुरक्षेचे काम पाहण्यासाठी २५० सुरक्षारक्षकांची गरज विद्यापीठात असताना, केवळ ६० ते ७० सुरक्षारक्षक काम करत आहेत. विद्यापीठाच्या परिसरात घनदाट झाडी आहे. विविध कामानिमित्त तेथे जाणाऱ्यांचा राबता फार मोठ्या प्रमाणावर असतो. सुरक्षारक्षकांभावी त्यांच्यावर कुणाचेही लक्ष असलेले दिसत नाही. त्यामुळे जर कोणाता अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्यात येत आहे. परंतु सुरक्षारक्षकांच्या भरतीसंदर्भातअद्याप तोडगा निघाला नाही; कारण गार्डबोर्ड व मेस्को या दोनच संघटनांकडून सुरक्षारक्षक भरण्याची विद्यापीठ प्रशासनाला परवानगी आहे. ‘गार्डबोर्ड या संस्थेवर काही कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे या संस्थेकडून सुरक्षारक्षक घेण्यात आले नाहीत. मेस्को या संघटनेकडून कर्मचाऱ्यांचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे लवकरच कामगार राज्यमंत्र्यांची भेट घेणार असून, जर त्यांच्याकडून नवीन एजन्सीमार्फत परवानगी मिळाली, तर नवीन एजन्सीमार्फत सुरक्षारक्षकांची भरती करण्यात येणार आहे,’ असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी सांगितले.
....
प्रशासकीय अधिकारी द्विधा मनस्थितीत
विद्यापीठ प्रशासनाला सरकारी नियमांनुसार नवीन सुरक्षारक्षक सापडत नसल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती असताना कंत्राटदारामार्फत नेमण्यात आलेल्या आणि कालांतराने कंत्राट संपल्याने काही दिवसांपूर्वी सेवेतून कमी करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांना पुव्हा सेवेत घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. संबंधित सुरक्षारक्षकांकडून तशी मागणी रेटून धरण्यात येत आहे. मात्र, हे सुरक्षारक्षक सरकारने ठरवून दिलेल्या शारीरिक आणि शैक्षणिक पात्रतेत बसत नसल्याने त्यांना घेण्यात भरपूर अडचणी आहेत. त्यामुळे त्यांना घेता येणार नाही, असे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या प्रकारामुळे विद्यापीठ प्रशासन द्विधा मनस्थितीत सापडले आहे.
....
विद्यापीठास सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या प्रमाणात सुरक्षारक्षक आमच्याकडे सध्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे आम्हाला सुरक्षारक्षकांचा पुरवठा करता येत नाही.
- प्रदीप शिवनेकर, मेस्को सुरक्षा प्रमुख, पुणे विभाग
...
विद्यापीठाला सुरक्षारक्षक पुरवण्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही. त्यांनी मागणी केल्यास त्यांना सुरक्षारक्षकांचा पुरवठा करण्यास आम्ही तयार आहोत. प्रशासकीय तरतूद नसल्यामुळे सुरक्षारक्षक नेमण्यास सध्या परवानगी देत नाही.
- सुरेश साळुंखे, सचिव, पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ गार्डबोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळींच्या किंमती उतरणार

$
0
0

साठ्यावरील मर्यादा वाढवल्याचा परिणाम; अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील तुरीच्या वाढत्या उत्पादनामुळे व्यापाऱ्यांसाठीच्या डाळींची साठा मर्यादा वाढविण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्या निर्णयामुळे राज्यातील डाळींच्या किंमती आणखी खाली येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्यातील तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे बाजारात आवक वाढली आहे. परिणामी राज्य सरकारने तुरीसह सर्व डाळींच्या घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांसाठीच्या साठवणूक मर्यादेत तीन पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. डाळींची साठा मर्यादा ही ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहे.
‘राज्य सरकारने डाळींची साठा मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही या निर्णयामुळे व्यापारी वर्ग डाळी सुरुवातीला खरेदी करतील. पण त्याची विक्री तातडीने करणे शक्य होणार नाही. खरेदी केलेल्या डाळीची सहा महिने वर्षभर साठवणूक केली जाईल. तसेच साठा मर्यादा वाढविल्याने त्यानुसार खरेदी केलेल्या डाळीची विक्री लगेच होणे शक्य नाही. त्यामुळेच डाळींचे वाढलेले उत्पादन आणि साठा मर्यादा वाढ झाल्याने डाळींच्या किंमती थोड्याशा घसरतील. त्यानंतर डाळींचे दर स्थिर राहतील,’ असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.
याबाबत गिरीश बापट म्हणाले, ‘गेल्या वर्षीच्या हंगामात तूर उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला होता. राज्य सरकारने तूर उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले होते. परिणामी, बाजारात लातूर, मराठवाडा, विदर्भातून मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले आहे. परिणामी बाजारात तुरीचा आवक होत आहे. परंतु, घाऊक तसेच किरकोळ विक्रेत्यांकडे डाळ साठ्याची मर्यादा होती. त्यामुळे व्यापाऱ्यांवर मर्यादा येत होत्या. त्या करिता राज्य सरकारने डाळ साठ्याची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. परिणामी बाजारात तुरीचे दर स्थिर राहतील. तसेच शेतकऱ्यांच्या तूर डाळीची खरेदी वाढू शकेल.’
महानगरपालिका क्षेत्रात घाऊक व्यापाऱ्यांना डाळीचा साठा मर्यादा तीन हजार ५०० क्विंटल होती. आता ती दहा हजार ५०० क्विंटल करण्यात आली. किरकोळ व्यापाऱ्यांसाठी असलेली मर्यादा २०० वरून ६०० क्विंटल केली आहे. अ वर्ग नगरपालिका क्षेत्रात घाऊक व्यापाऱ्यांसाठी अडीच हजार क्विंटलवरून साडेसात हजार क्विंटल एवढी साठा मर्यादा वाढविली आहे. किरकोळ व्यापाऱ्यांना असलेली १५० क्विंटलची मर्यादा ४५० क्विंटल केली आहे. इतर ठिकाणी घाऊक व्यापाऱ्यांकरिता असलेली दीड हजार क्विंटलला मर्यादा साडेचार हजार क्विंटल केली आहे. किरकोळसाठी १५० वरून ४५० क्विंटलइतकी साठा मर्यादा वाढविण्यात आली आहे. डाळींची साठा मर्यादेची सुधारणा ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहे.
...
डाळींच्या साठा मर्यादेत वाढ करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. साठा मर्यादेत सुधारणा करण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाने सर्व जिल्हाधिकारी, पुरवठा विभागाला दिली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी त्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- गिरीश बापट, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणे-पिंपरी पालिकेतही उपलोकपालाची नियुक्ती करा

$
0
0

-शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
-भाजपशासित पालिकांमध्येही पारदर्शकता हवी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुंबई महापालिकेप्रमाणेच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या महापालिकांमध्येही स्वतंत्र उपलोकायुक्त आणि माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. पारदर्शक कारभार फक्त मुंबईपुरता नको, तर सगळीकडेच हवा, अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली आहे.
गेल्या काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून भाजप आणि शिवसेनेत संघर्ष सुरू झाला. विशेषतः मुंबई महापालिकेत महापौरपद मिळविण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत महापौरपदासह कोणत्याही समितीचे अध्यक्षपद भाजपला नको, अशी भूमिका घेतली. त्याचवेळी त्या महापालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र उपलोकायुक्त आणि माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्याची घोषणा केली. भाजपच्या या खेळीला शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मुंबईप्रमाणेच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या महापालिकांमध्येही उपलोकायुक्त आणि माजी अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. पारदर्शक कारभारासाठी आम्ही लढत असल्याचे यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पारदर्शक कारभार झाला पाहिजे.पारदर्शक कारभारासाठी शिवसेनाही आग्रही आहे, असे कोल्हे यांनी सांगितले. पारदर्शक कारभार एक्टा मुंबईपुरता नको, तर तो सर्वत्र असला पाहिजे, या भूमिकेतून ही मागणी केल्याचे त्यांनी सांगितले असून पारदर्शक कारभारासाठी फडणवीस आग्रही असल्याने ते आमची मागणी मान्य करतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
......
शिरोळेंनीही केली मागणी

मुंबई महानगर पालिकेत पारदर्शकता आणण्यासाठी तीन सदस्यीय समितीची नियुक्ती तसेच एक उपलोकायुक्त नेमण्याचा निर्णय घेतल्याबद्दल खासदार अनिल शिरोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचे अभिनंदन केले आहे. मुंबईच्या धर्तीवर पुणे महानगरपालिकेतही अशी एक समिती व उपलोकायुक्ताची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली.
---------
स्वयंसेवी संस्थांकडूनही स्वागत
मुंबई महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व्हावा, यासाठी उपलोकायुक्त व माजी सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमण्याची घोषणा स्वागतार्ह आहे. त्याच प्रकारचा पारदर्शक कारभार अन्य महापालिकांमध्ये व्हावा, यासाठी सर्व अ दर्जाच्या पालिकांमध्ये अशीच समिती नियुक्त करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्त्रबुद्धे आणि पीएमपी प्रवासी मंचाचे जुगल राठी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतंत्र आयुक्तालय मिळणार का?

$
0
0

विधिमंडळ अधिवेशनात शहरातील प्रलंबित प्रश्नांवर पुन्हा चर्चा
Rohit.Athavale@timesgroup.Com
Tweet - @AthavaleRohitMT
पिंपरी : भारतीय जनता पक्षाने विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी नागरिकांना अनेक आश्वासने दिली. त्यामध्ये अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, स्वतंत्र पोलिस आयुक्तालय यासारखे विषय गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या सोमवार (६ मार्च) अर्थसंकल्पीय (विधीमंडळ) अधिवेशनात तरी हे प्रश्न मार्गी लावून भाजप आश्वासनांनी पूर्तता करते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या विरोधी पक्षांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रचार करताना ‘भाजपचे आश्वासनांचे गाजर' असा उपरोधिक प्रचार केला होता. आता अधिवेशनात वरील प्रश्न मार्गी लावत भाजप आश्वासन पूर्ती करते की ते पुन्हा गाजरच ठरते हे येत्या काळात स्पष्ट होईल.
नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत ‘न भूतो न भविष्यंती’ असे यश भाजपला मिळाले आहे. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, सहयोगी आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन आदींनी केलेल्या सांघिक प्रयत्नांमुळे भाजपला एकहाती सत्ता मिळाल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी नुकतेच सांगितले. परंतु, सत्ता दिसू लागताच महापालिकेच्या राजकारणात आता शहरात दोन सत्ताकेंद्र निर्माण होऊ लागली आहेत. मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला सारत भाजपला उमेदवार न पाहता निवडून दिले आहेत, त्यामुळे किमान मतदारांसाठी आणि शहरासाठी तरी, या होऊ घातलेल्या नव्या सत्ताकेंद्रांनी नेत्यांनी दिलेली आश्वासन सत्यात उतरविण्यासाठी काम करावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
पिंपरी-चिंचवडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नांवरून गेल्या अडीच-तीन वर्षात अनेकांनी राजकारण केले. ‘ना-राजीनामा’ ते ‘पक्षांतर’ अशा अनेक राजकीय घडामोडी मध्यंतरीच्या काळात घडल्या आहेत. कधी कोर्टाचा आदेश तर कधी आचारसंहिता अशी कारण देत आत्तापर्यंत विधानसभा आणि महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेली आश्वासनांना बगल दिली आहे.
ऐन निवडणुकीत शास्तीकराचा प्रश्न जवळपास मार्गी लागल्याचे सांगितले गेले. सरकारी वेबसाइटवर उपलब्ध नसलेला जीआर मुख्यमंत्र्य देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत काढून दाखविला होता. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न मार्गी लागला आहे, असे गेल्या अनेक दिवसांपासून भासविले गेले आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी आणि नागरिकीकरण पाहता स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची गरज आदी मुद्दे आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशामुळे पुन्हा चर्चिले जात आहेत.
...
प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा
महापालिकेत एकहाती सत्ता द्या, अनधिकृत बांधकामासह शास्तीकर आणि स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावतो असे आश्वासन मुख्यमंत्री फडवणीस यांनी दिले होते. त्याच बरोबर केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या सैन्य दलाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यांबाबत देखील असे आश्वासन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर हे शहरात येऊन देऊन गेले आहेत. त्यामुळे केंद्राचे नाही तर किमान राज्य सरकारच्या अखत्यारित असलेले आणि ज्यावरून अनेक निवडणुकांमध्ये सत्तेची ओढाताण केली गेली ते प्रश्न तरी येत्या अधिवेशनात मार्गी लागावेत अशी सामान्यांची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप सहयोगी आमदार बैलगाड्यावरून जाणार विधानभवनात

$
0
0

आंदोलनात बैलगाडा चालक-मालक सहभागी
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी राज्यातील बैलगाडा मालक आणि भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळ अधिवेशनात बैलगाडातून आंदोलन करणार आहेत. सोमवारपासून (६ मार्च) विधिमंडळ अधिवेशन सुरू होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडविल्यानंतर आमदार लांडगे आणि भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचा पक्षात दबदबा वाढला असल्याचे बोलले जाते. भाजपचे सहयोगी आमदार असून देखील लांडगे या आंदोलनातून पक्षाला घरचा आहेर देणार असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे या अधिवेशनात बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यात येईल, असे संकेत मिळत आहेत.
‘गेल्या अनेक वर्षापासून राज्य सरकार व केंद्र सरकारकडे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी आमदार लांडगे आणि अन्य नेते पाठपुरावा करीत आहेत. तमिळनाडूमधील जलीकट्टू स्पर्धेला विधानसभेत कायदा संमत करून परवानगी देण्यात आली. तेथील लोकभावनेचा आदर करून तमिळनाडू सरकारने कायद्यात बदल केला. त्यामुळे तमिळनाडूच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी,’ अशी मागणी आमदार लांडगे यांनी लावून धरली होती.
त्यामुळेच सोमवारी सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील बैलगाडा मालक बैलगाडातून विधानभवनावर धडक देणार आहेत. याबाबत बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘तमिळनाडू येथील जलीकट्टूला ज्याप्रमाणे परवानगी देण्यात आली, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी कायदा संमत करावा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.’ ‘शर्यतबंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक आहेत. त्यामुळे या अधिवेशनातच बैलगाडा शर्यत सुरू करण्याचा विधेयक मंजूर करावे. यासाठी आम्ही राज्यातील गाडामालक बैलगाडातून विधानभवनावर धडक देणार आहोत,’ असेही त्यांनी सांगितले.
-------------------
बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. अधिवेशनादरम्यान बैलगाडा शर्यतींना परवानगी देणारे विधेयक मंजूर करावे यासाठी राज्यातील गाडामालकांसह बैलगाडीतून विधानसभेत जाणार आहोत.
- महेश लांडगे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्राचा विद्यापीठात सात दिवसांचा कोर्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात केंद्रीय मनुष्यबळ खात्याने सुरू केलेल्या ‘ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अॅकेडमिक नेटवर्क्स’ (गॅन) उपक्रमांतर्गत इतिहास विभागात लोकशाही आणि ऐतिहासिक लेखन सात दिवसांचा अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना जगभरातील संस्कृती, भाषा, आचार-विचार समजून घेण्यासाठी अशा अभ्यासक्रमाची विभागात सुरुवात होत असल्याची माहिती विभागप्रमुख श्रद्धा कुंभोजकर यांनी नुकतीच दिली.

मंत्रालयाच्या वतीने देशातील विविध विद्यापीठांत कमी कालावधीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. लोकशाही आणि ऐतिहासिक लेखन या इतिहास विभागांतर्गत अभ्यासक्रमाची ५ जून रोजी सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी देशभरातील विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. या सात दिवसांच्या काळात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेदरलँडच्या ग्रोनींनजन विद्यापीठाचे प्राध्यापक अनतुंन दे बेट्‌स मार्गदर्शन करतील. यासाठी पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी ‘गॅन’च्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांना यासाठी पाचशे रुपये शुल्क आकारण्यात आलेले आहे. इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना एक हजार रुपये तर, इतर कोणालाही प्रवेशासाठी दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. यासाठी प्रत्येकाची गॅनच्या वेबसाइटवर नोंदणी असणे गरजेचे आहे.

आतापर्यंत या उपक्रमातंर्गत ८०१ विविध अभ्यासक्रम चालवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच, विविध ६१७ नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. विद्यापीठात सदर अभ्यासक्रमाची सुरुवात ५ जून रोजी होणार असून यासाठी विद्यार्थ्यांना ७ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या सात दिवसांच्या अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेणार असून त्यानंतरच त्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या वेबसाइटवर संपर्क साधावा, असे कुंभोजकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकत्रित प्रयत्नांतूनच मार्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महाराष्ट्राच्या विविध भागांत गेल्या काही वर्षांत वाढत असलेला मनुष्य आणि वन्यप्राणी संघर्ष सोडविण्यासाठी यापुढे वन विभागाला लोकसहभागाची गरज लागणार आहे. प्रत्यक्षात वन्यप्राण्यांच्या सहवासात राहणारे लोक, स्वयंसेवी संस्था, अभ्यासक आणि वन विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच या समस्येवर मार्ग निघेल,’ असे मत ठाणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी रविवारी व्यक्त केले.

जागतिक वन्यजीव दिनानिमित्त जनजागृतीच्या उद्देशाने ‘नेचर वॉक’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘वाइल्ड इंडिया’ हा महोत्सवामध्ये ते बोलत होते. लिमये यांनी मनुष्य आणि वन्यप्राणी संघर्ष या विषयावर मार्गदर्शन केले. नेचरवॉक संस्थेचे नेचरवॉकचे विश्वस्त चंद्रसेन शिरोळे, अनुज खरे, उद्योजक संजय देशपांडे या वेळी उपस्थित होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ हा या महोत्सवाचा माध्यम प्रायोजक होता.

वन्यप्राणी आणि मनुष्यातील लढाई सुरू कशी झाली, इथपासून ते आगामी काळात यावर मार्ग कसा काढायचा याचे सविस्तर विवेचन लिमये यांनी केले. शहरी भाग म्हणून बोरीवली नॅशनल पार्क, तर ग्रामीण भाग म्हणून जुन्नरमधील बिबट्याच्या समस्येचा तौलनिक आढावा त्यांनी घेतला. ‘ग्रामीण भागातील लोकांना निसर्गाशी जुळवून घेण्याची सवय असल्याने त्यांना वन विभागाने मार्गदर्शन केल्यास त्याची अंमलबजावणी पटकन होते. मात्र, शहरी लोकांची जीवनशैली भिन्न असल्याने त्यांना हा विषय समजून घेण्यास वेळ लागतो,’ असे सांगून त्यांनी वन विभागाने राबवविलेल्या ‘मुंबईकर्स फॉर संजय गांधी नॅशनल पार्क’ या उपक्रमाची माहिती दिली. आगामी काळात वन्यप्राणी संघर्ष रोखण्यासाठी लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या कृती आराखड्याबद्दल लिमये यांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान, महोत्सवात दिवसभर हिमालयातील वन्यजीवन, रणथंबोरमधील वाघिणींच्या जीवनाचा प्रवास, भद्रा व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन, भारतीय जंगलातील रानकुत्री, पेरियार व्याघ्र प्रकल्पातील फुलपाखरांचे वैविध्य, राजस्थानातील बिष्णोई समाज, भारतीय जंगलातील वर्षाऋतुवर आधारित विविध प्रसिद्ध लघुपट सादर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images