Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘रेडीरेकनर’ची दरवाढ नको

$
0
0

सर्वसामान्यांसाठी सर्वपक्षीय आमदारांनी केली मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने रेडीरेकनरचे दर महापालिका क्षेत्रात सहा, तर तर जिल्ह्यात ११ टक्के वाढीचा प्रस्ताव दिला असून, या प्रस्तावाला सर्वपक्षीय आमदारांनी गुरुवारी विरोध केला. दरवाढ केल्यास नागरिकांना घरे घेता येणार नसल्याने कोणत्याही परिस्थितीत रेडीरेकनर दरामध्ये वाढ न करता या प्रस्तावाचा फेरविचार करावा, अशी मागणी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह जिल्हा आणि शहरातील सर्वपक्षीय आमदारांनी केली.
नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने ‘रेडीरेकनर’च्या दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावित दरवाढीबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, बाबुराव पाचर्णे, दत्तात्रय भरणे, जगदीश मुळीक, विजय काळे, मेधा कुलकर्णी, लक्ष्मण जगताप, जिल्हाधिकारी सौरभ राव, सहाय्यक संचालक नगर रचना विजय शेंडे, अनिल पारखे आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, ‘सामान्य माणसाला हक्काचे घर मिळावे, ही सरकारची इच्छा आहे. सदनिकांच्या वाढत्या किमती आणि वाढणारा ‘रेडीरेकनर’चा दर यामुळे घरखरेदी करणे अवघड होत आहे. याचा विचार करून नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने फेरप्रस्ताव सादर करावा.’
‘सदनिकांच्या दरांमध्ये खूप वाढ झालेली आहे. आणखी दर वाढविल्यास सामान्य माणसाला घर घेता येणार नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पुन्हा सर्वेक्षण करून ‘रेडीरेकनर’मधील वाढ टाळावी’ अशा सूचना मिसाळ यांनी केल्या.
पाचर्णे म्हणाले, ‘पुणे जिल्हा सर्वांत वेगाने विकसित होणारा आहे. या क्षेत्रात नागरी वस्ती क्षेत्र जास्त आहे. औद्योगिकदृष्ट्याही जिल्हा प्रगतीशील आहे. शिरूर आणि हवेली या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी व औद्योगिक वसाहती आहेत. हवेली तालुक्याचा बहुतांश परिसर शहरी भागात येतो. शिरूरमध्ये तीन मोठ्या औद्योगिक वसाहती असल्यामुळे या ठिकाणी घरांची मागणी आहे. त्यामुळे ‘रेडीरेकनर’मध्ये वाढ करण्यात येऊ नये.’
‘ग्रामीण परिसरात कोणत्याही परिस्थितीत ‘रेडीरेकनर’मध्ये दरवाढ करण्यात येऊ नये,’ असे सांगून आमदार भरणे म्हणाले, ‘नोटबंदीच्या निर्णयामुळे जमीन खरेदीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. यामुळे रेडीरेकनरमध्ये दरवाढ करण्यात येऊ नये. ग्रामीण भागासाठी २२ टक्के रेडीरेकनर दरवाढीचा फेरविचार करावा.’
‘स्थावर मिळकतीच्या दस्तऐवज हस्तांतरसाठी आवश्यक असणारे मुद्रांक शुल्क ठरविण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या वार्षिक मूल्यदराच्या निश्चितीची प्रक्रिया ही अधिक पारदर्शक असावी.’ असे खासदार शिरोळे म्हणाले.
बैठकीचे सविस्तर विषयपत्र बैठकपूर्व उपलब्ध करून न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करून शिरोळे म्हणाले, ‘मुद्रांक शुल्क ठरविण्यासाठी कोणत्या यंत्रणेमार्फत माहिती गोळा केली जाते; तसेच ही माहिती सर्वंकष आणि सद्य:स्थितीला धरून आहे, याची खातरजमा करणे आवश्यक आहे.’
............
चौकट
‘रेडीरेकनर’चे प्रस्तावित दर
महापालिका क्षेत्र - सहा टक्के
जिल्हा - ११ टक्के
नगरपालिका क्षेत्र - नऊ टक्के
ग्रामीण भाग - २२ टक्के
०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळासिद्धी उपक्रमाला अत्यल्प प्रतिसाद

$
0
0

बहुसंख्य शाळांनी फिरवली नोंदणीकडे पाठ
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य सरकारने राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व शाळांना शाळासिद्धी मानांकनासाठी नोंदणी करणे बंधनकारक केले असताना देखील एकूण शाळांच्या निम्म्यापेक्षा अधिक शाळांनी मानांकन नोंदणीकडे पाठ फिरवली आहे. मया प्रक्रियेतून शाळेच्या गुणवत्ता दर्जाची खरी माहिती समोर येईल, या धास्तीपोटी शाळा सिद्धी नोंदणीकडे शाळांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे या शाळांची नोंदणी कधी होणार आणि नोंदणी न करणाऱ्या शाळांवर कोणती कारवाई केली जाईल, असा प्रश्न शिक्षण वर्तुळात विचारला जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांबरोबर इतरही शाळांच्या गुणवत्तेत भर पडावी यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न शाळासिद्धी उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या माध्यमातून अनेक शाळांचे शैक्षणिक गुणवत्तेचे वास्तव समोर येणार आहे. मात्र, हे वास्तव समोर येऊ नये, यासाठी राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त शाळांनी या नोंदणीकडे दुर्लक्ष केले आहे. शाळा मानांकन नोंदणीसाठी अंतिम तारीख २८ फेब्रुवारी होती. या निर्धारित वेळेत राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील एक लाख नऊ हजार ३४७ शाळांपैकी केवळ ५० हजार ७७६ शाळांनीच दिलेल्या कालावधीत नोंदणी पूर्ण केली. वेबसाइटवरच्या या आकडेवारीहून निम्म्यापेक्षा जास्त शाळांनी मानांकनासाठी नोंदणी केली नसल्याचे स्पष्ट झाले.

शाळासिद्धी उपक्रमासंदर्भात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व शाळा या १०० टक्के शाळासिद्धी मानांकनासाठी नोंदणी करतील, असे सांगितले होते. मात्र, या शाळांनी अधिकाऱ्यांच्या सूचनेला हरताळ फासला आहे. राज्यातील साधारण १८ ते २० हजार शाळा काही ठराविक गोष्टींची पूर्तता करणे बाकी असल्यामुळे नोंदणीच्या प्रक्रियेत अडकल्या आहेत. उर्वरित सर्व शाळांकडून येत्या १५ मार्चपर्यंत कोणत्याही परिस्थितीत नोंदणी पूर्ण करून घेण्यात येईल. त्यासाठी जिल्हास्तर व तालुका स्तरावर एका झोनल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

......................

प्रातिनिधिक जिल्ह्यांची माहिती

.......

जिल्हा - एकूण शाळा - नोंदणी झालेल्या शाळा
पुणे : ७२४९ - ३६७५
नागपूर : ४०८४ - १७५८
अमरावती : २८८२ - १७७१
अहमदनगर : ५३५१ - २६७३
अकोला : १८३१ - ९९३
औरंगाबाद : ४१७४ - १०६१
मुंबई : १ : २५१९ - ६७७
मुंबई : २ : १६९५ - ३८१
रायगड : ३८६२ - ४४६
सोलापूर : ४८४२ - १५९७
ठाणे : ४८०६ - २७४२
कोल्हापूर : ३६९२ - १६०४
नाशिक : ५५९९ - ३०७६
नांदेड : ३७३८ - १७६०
रत्नागिरी : ३३५२ - १५५६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमान बदलामुळे विषाणूजन्य आजारांचा संसर्ग

$
0
0

सर्दी, खोकला, श्वसनाच्या विकार, पोटाच्या आजारांचा प्रादुर्भाव
म. टा. प्रतिनिधी, पुणे
दिवसा प्रचंड उकाडा आणि रात्री थंडी अशा संमिश्र आणि सतत बदलत्या वातावरणाचा फटका पुणेकरांना बसू लागला आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजारांचा संसर्ग वाढत असून सर्दी, खोकला, श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, डोकेदुखीच्या आजारांमध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविली आहेत.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या चटक्याची तीव्रता वाढली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असे वातावरण होते. त्या वातावरणात विषाणूंचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आल्याचे वैद्यक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
‘वातावरणात सध्या बदल जाणवत आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून हा बदल सुरू झाला आहे. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याचा हा काळ आहे. त्या दरम्यान विषाणूंच्या वाढीस पोषक वातावरण असते. यामुळेच सध्या श्वसनाचे विकार, पोटाचे विकार बळावत आहेत. गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या पेशंटची संख्या वाढत आहे. श्वसनाच्या विकारात सर्दी, खोकला, टॉन्सिल्स, सायनस, त्याशिवाय जुलाब, उलट्यांचे आजार वाढले आहेत. उन्हाळ्यात तापमानातील फरकामुळे सर्दी होत असून, विषाणूजन्य आजारांच्या संसर्गात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे,’ अशी माहिती ज्येष्ठ फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे यांनी ‘मटा’ला दिली.
‘मागील आठवड्यांपासून संसर्जन्य आजार वाढत आहेत. सर्दी मोठ्या प्रमाणात आहे. डोक्याच्या उजव्या अथवा डाव्या भागात डोकेदुखी होते. तसेच दोन्हीपैकी एका डोळ्यातून प्रचंड पाणी येते. सर्दीने सुरुवात होऊन त्याचे रूपांतर सायनसमध्ये होत आहे. दिवसभर ऊन आणि रात्री बारानंतर सकाळी आठवाजेपर्यंत थंडी असते. त्यामुळे हा परिणाम जाणवत आहे. रात्रीचा खोकला देखील अनेकांना येत असतो. त्याशिवाय लहान मुलांमध्ये बालदम्याची लक्षणे दिसू लागली आहेत. तसेच डोळे येण्याची लक्षणे दिसत आहेत,’ असे निरीक्षण फिजिशियन डॉ. संताजी कदम यांनी नोंदविले
...
तापमानातील बदलामुळे खोकल्यासह श्वसनाचे विकार वाढले आहेत. तसेच न्यूमोनिया, ब्राँकायटिस, जुलाब, उलट्यांचे आजार वाढले आहे. सर्व प्रकारचे विषाणू अधिक अॅक्टिव्ह झाल्याचे दिसते. तापासाठी अथवा जुलाबासाठी काही अँटिबायोटिक्स द्यावी लागत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने लहान मुलांनी उपचार घ्यावेत.
- डॉ. शिशिर मोडक, बालरोग तज्ज्ञ
..
काय काळजी घ्याल
..
पाणी उकळून प्यावे.
बाहेरचे खाणे टाळावे.
रस्त्यावरील उघडे खाऊ नये.
उन्हात फिरू नये.
गरज वाटल्यास बाहेर पडताना डोळ्यांना गॉगल लावावा.
डोक्यावर टोपी घालावी.
उन्हातून थेट घरात आल्यास लगेच थंड पाणी पिऊ नये.
गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
फळांचा आहारात समावेश करावा.
पालेभाज्या खाण्यावर भर द्यावा.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ विस्ताराला प्राधिकरणाची मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जागा देण्यास केंद्र सरकार अनुकूल असतानाच आता विमातळावरील पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी विमानतळ प्राधिकरणाने मंजूरी दिली आहे. विमानतळावर पायाभूत सुविधांचा विस्तार करणे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने विमानतळाचा विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे विमानतळाची कार्यक्षमता वाढणार आहे.
विमानतळ प्राधिकरणातर्फे नऊ विमानतळांवर विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये लोहगाव विमानतळाचाही समावेश आहे. लोहगाव विमानतळाची निवड केल्याने विकासकामे होणार आहेत, अशी माहिती लोहगाव विमानतळ विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांनी दिली.
विमानाची सद्यस्थती दर्शविणारे ३० नवीन डिस्प्ले, नवीन उत्तम प्रकाश व्यवस्था, नवीन प्रसाधनगृहे आदी विकासकामे पूर्ण झाली आहेत. बारा नवीन चेक इन काउंटरची निर्मिती, दोन सुरक्षा तपासणी केंद्रांचे एकत्रीकरण आदी कामांना सुरुवात करण्यात आली आहे. तसेच , नवीन टर्मिनल आणि प्रसाधनगृहांची देखरेख आदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन नवीन फूड आणि बेव्हरेज प्लाझाची निर्मिती करण्यात येईल. दिशा प्रकल्पांतर्गत लोहगाव विमानतळावरील सर्व विकासकामे मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.

लोहगाव विमानतळ प्रवासी संख्या
मागील तीन वर्षांमध्ये सातत्याने लोहगाव विमानतळावरील प्रवाशांची संख्या वाढत आहे. तीन वर्षांत प्रवासी संख्या २७ टक्क्यांनी वाढली आहे.
वर्ष प्रवासीसंख्या
२०१४-१५ ४१, ९०, ५०९
२०१५-१६ ५४,१७,१६७
फेब्रुवारी १७ ६६,९९,३३८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणांकडून मिळते प्रेरणा : डॉ. माशेलकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘देशात प्रचंड गुणवत्ता दडलेली आहे. ती फक्त आयआयटी, एनआयटीमध्ये नसून, ग्रामीण भागातही आहे. तरुणांना परदेशी शिकण्याची इच्छा असली, तरी मायदेशी परतून रोजगारनिर्मिती करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांची ऊर्जा, इच्छाशक्ती पाहून मलाही प्रेरणा मिळत आहे,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.
नटराजन एज्युकेशन सोसायटीच्या ‘एनईएस इनोव्हेशन अॅवॉर्ड’चे वितरण डॉ. माशेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. बीएमसी सॉफ्टवेअर्सचे सीईओ तरुण शर्मा, लाइफ स्कूलचे सीईओ नरेंद्र गोयदानी, एनईएसचे संस्थापक डॉ. गणेश नटराजन, ग्लोबल टॅलेंट ट्रॅकच्या सीईओ डॉ. उमा गणेश आदी या वेळी उपस्थित होते.
‘सध्याचे भारतीय युवक अमेरिकेत शिक्षण घेऊन देशात परत येत आहेत. येथे आल्यानंतर तेथील बड्या कंपन्यांसारखी कंपनी येथे स्थापन करण्याचे ध्येय बाळगत आहेत. त्याचे कौतुक केले पाहिजे,’ असे मत डॉ. माशेलकर यांनी सांगितले.एखादी समस्या निर्माण झाल्यानंतर त्यावर उपाय शोधण्यापेक्षा त्यावर उपाय योजण्याची गरज आहे. पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्यापेक्षा देशाच्या गरजा ओळखून त्यानुसार उपाय शोधणे महत्त्वाचे आहे,’ असे शर्मा म्हणाले.
स्पर्धेत सिंहगड स्कूल ऑफ इंजिनीअरिंगच्या (आंबेगाव) विद्यार्थ्यांच्या ‘साइन टू स्पीच’ या प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. गुरुग्रामच्या द्रोणाचार्य कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या ‘इलेक्ट्रिसिटी सेव्हर’ प्रकल्पाला द्वितीय तर, नाशिकच्या कर्मवीर बाबूराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या ‘फिजिओमेट’ प्रकल्पाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

‘तेही होणार बोलके’
सिंहगड स्कूल ऑफ इंजिनीअरिंगच्या (आंबेगाव) विद्यार्थ्यांनी ‘साइन टू स्पीच’ प्रकल्पाद्वारे मूकबधिरांच्या हातवाऱ्यांमधून ध्वनीत होणारा अर्थ अॅपवर दिसेल आणि ते ऐकताही येईल, अशी यंत्रणा विकसित केली आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांनी मशिन लर्निंग अल्गोरिदमसह अन्य गोष्टींचा वापर केला आहे. तसेच त्यांनी खास ग्लोव्ह्ज विकसित केले आहेत. ग्लोव्ह्ज हातात घालून मूक बधीर व्यक्तींनी केलेले हातवारे थेट ऐकू येतील आणि टाइपही होतील. प्रतीक शहा, आशुतोष वढवेकर, शुभम जाधव आणि पराग होशिंग यांनी या प्रकल्पाची निर्मिती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ निवडणूक रद्द करण्याची विनंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) कार्यकर्त्यांमध्ये सुरू असणारी धूसफूस विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांचे संकेत आहेत. त्यामुळे कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये होणाऱ्या विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका रद्द कराव्यात, अशी मागणी पत्राद्वारे विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
नवीन विद्यापीठ कायदा राज्यातील विद्यापीठांमध्ये नुकताच लागू झाला. त्यानुसार विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची प्रक्रिया लवकरच विद्यापीठ प्रशासनाला हाती घ्यावी लागणार आहे. विद्यापीठात काही दिवसांपूर्वी अभाविप आणि एसएफआयच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकारामुळे विद्यापीठातील शांतता भंग झाली तसेच विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. या सर्वांचा विचार करुन काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला निवडणुका न घेण्याची विनंती केली आहे.
‘आमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून विनंतीचा विचार करण्यात यावा. आमच्या सूचना राज्य शिक्षण विभागाकडे पाठवा,’ अशी विनंती करण्यात आली आहे. एकीकडे विद्यार्थी परिषदांच्या निवडणुकांना विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा आहे. अशी परिस्थिती असतानाच काही विद्यार्थ्यांनी आपल्यासोबतच इतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ न देण्यासाठी विद्यार्थी परिषदांच्या निवडणुकांना विरोध केला आहे.

‘विनंती संबंधितांपर्यंत पोहोचवू’
विद्यापीठातील हाणामारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांनी विद्यार्थी परिषदांच्या निवडणुकीला विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे. विरोध करणाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, विरोध करणारे विद्यार्थी सामान्य आहेत. या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास त्यांची विनंती शिक्षण विभागापर्यंत पोहोचवली जाईल, अशी माहिती विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालक प्रशिक्षणासाठी ’मेरू’ कंपनीचा पुढाकार

$
0
0

‘आयटीआय’मध्ये राबविणार अल्प मुदतीचा अभ्यासक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना दुचाकींची शास्त्रशुद्ध सर्व्हिसिंग करता यावी, त्यांच्यातून व्यावसायिक चालक तयार होण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनने (आयटीआय) पुढाकार घेतला आहे. यामाहा आणि मेरू कंपन्यांच्या सहकार्यातून दुचाकी सर्व्हिसिंग आणि चालक प्रशिक्षणाचा अल्प मुदतीचा अभ्यासक्रम संस्थेत सुरू होत आहे. या उपक्रमातून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना माफक शुल्कात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना दुचाकी सर्व्हिसिंगचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे यासाठी यामाहा कंपनीने सहा दुचाक्या देण्यात आल्या आहेत. या शिवाय सर्व्हिसिंग कीट, कॉम्प्रेसर आदीही सुविधा देण्यात आल्या आहेत. तंत्रनिकेतनमध्ये छोटेखानी कक्ष उभारण्यात आला असून, त्या साठी ३५ ते ४० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या वर्षभराच्या अभ्यासक्रमासाठी २२ जणांना प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. ए. व्ही. जोशी यांनी दिली.
मेरू कंपनीतर्फे शास्त्रशुद्ध व्यावसायिक चालक अभ्यासक्रमासाठी सिम्युलेटर आणि कार देण्यात येणार आहे. सिम्युलेटरसाठी कक्षाची निर्मिती करण्यात येईल. या अभ्यासक्रमात शास्त्रशुद्ध पद्धतीने चारचाकीचे प्रशिक्षण, प्रवाशांशी बोलायची पद्धत, महिला प्रवाशांशी संवाद साधण्याची कला शिकविण्यात येणार आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांना केंद्र सरकारच्या ‘नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग’ (एनसीव्हिटी) आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाची (डिव्हीईटी) मान्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि बेरोजगारांना नोकरी मिळण्यासाठी मदत होईल, असा विश्वास डॉ. जोशी यांनी व्यक्त केला.
औरंगाबादच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये दुचाकी सर्व्हिसिंगचा कोर्स सुरू असून, त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळ‍त आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी मेकॅनिकल विभागाशी संपर्क साधावा तसेच www.gppune.ac.in या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘आरटीओमुळे उशीर’
चालक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. उभाराव्या लागणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूलसाठी आरटीओची परवानगी लागते. त्यासाठी आरटीओकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे शासकीय तंत्रनिकेतनतर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ हजार प्रकरणे निकाली

$
0
0

धर्मादाय आयुक्तांच्या ‘चेंज रिपोर्ट’ मोहिमेला यश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे विभागातील संस्था, संघटना अथवा देवस्थानांच्या विश्वस्त अर्ज बदलाच्या (चेंज रिपोर्ट) मोहिमेंतर्गत मागील दोन महिन्यांत ८,३६१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्या मुळे संस्थांच्या दिलासा मिळाला आहे.
धर्मादाय आयुक्तालयात विविध देवस्थान, शिक्षण संस्था, संघटनांची विश्वस्त बदलाची प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित होती. या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्त शशिकांत साळवे यांनी ‘झीरो पेंडन्सी’चा निर्धार केला होता. त्याला जानेवारीत चांगला प्रतिसाद मिळाला. त्या वेळी विश्वस्तांनी चेंज रिपोर्ट निकाली काढण्यासाठी मुदत मागितली होती. त्यामुळे फेब्रुवारी महिना ठरविण्यात आला.
‘विभागातील विविध शिक्षणसंस्था, सामाजिक, धार्मिक संघटना कार्यरत आहेत. त्यांमधील बरीच प्रकरणे प्रलंबित होती. दोन महिन्यांत धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात प्रकरणे निकाली काढण्याची मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम पुणे, नगर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या ठिकाणी राबविण्यात आली. त्यामुळे निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या ८,३६१वर पोहोचली आहे. त्यामध्ये पुणे जिल्हा अव्वल आहे,’ अशी माहिती पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त शिवाजीराव कचरे यांनी दिली.
मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात चेंज रिपोर्ट उशिरा सादर करणाऱ्या संस्थांकडून दंड वसूलण्यात आले. नंतर दंडवसुली थांबविण्यात आली. त्यामुळे विश्वस्त संस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. परिणामी विश्वस्त बदलाच्या अर्जासोबत संस्थांची हिशेबपत्रके जमा करण्याचे प्रमाण वाढले. तसेच, नव्याने विश्वस्त बदलाचे अर्ज सादर कऱण्याचे प्रमाणही वाढले. यातून अनेक संस्थांचे रेकॉर्ड अद्ययावत होण्यास मदत झाली आहे. आता मोहीम संपल्यानंतर सुमारे दीड हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत, असेही कचरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘घाशीराम’चा प्रयोग बंगालीत

$
0
0

कोलकात्यातील संचाचा पुण्यात कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सत्तरच्या दशकात मराठी प्रायोगिक रंगभूमीला सुगीचे दिवस देणाऱ्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाची बंगाली रंगभूमीलाही भुरळ पडली आहे. पुणेकरांना मराठीसह बंगाली भाषेतही हे नाटक अनुभवण्याची संधी मिळणार आहे. सोमवार, ६ मार्चला बालगंधर्व रंगमंदिरात एकापाठोपाठ एक घाशीराम कोतवालचे मराठी आणि बंगाली भाषेतील प्रयोग सादर होणार आहेत.

कोलकाता येथील ‘चेतना ग्रुप’ या बंगाली रंगभूमीवर काम करणाऱ्या संस्थेतर्फे घाशीराम कोतवाल नाटकाचा बंगाली भाषेतील प्रयोग सादर होणार आहे. तसेच पुण्यातील नलिनोत्तम पांडव या संस्थेतर्फे मराठी भाषेतील प्रयोग सादर केला जाणार असल्याची माहिती निर्माते मेघराजराजे भोसले व वैभव जोशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे या वेळी उपस्थित होते. दोन्ही नाटकांमध्ये पन्नासहून अधिक कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

‘घाशीरामचे जगभरात अनेक प्रयोग सादर झाले. हिंदी, इंग्रजी या भाषांमध्येही या नाटकाचे प्रयोग करण्यात आले. मात्र, काही दिवसांपूर्वी बंगाली रंगभूमीला या नाटकाची भुरळ पडली. चेतना ग्रुपच्या कलाकारांनी मुंबईत नाटक सादर केले. ज्या पुण्यात घाशीरामचा उदय झाला तिथे मराठी आणि बंगाली दोन्ही भाषांमधील प्रयोग सादर व्हावेत, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. मराठीमध्ये सादर होणाऱ्या नाटकामध्ये ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर नाना फडणवीसांच्या भूमिकेत असणार आहेत. तर प्रकाश धोत्रे घाशीरामची भूमिका साकारणार आहेत. बंगाली नाटकामध्ये तेथील रंगभूमीवरील गाजलेले कलाकार प्रयोग सादर करतील,’ असे भोसले यांनी सांगितले.

‘बंगाली रसिकांना आकर्षित करण्यासाठी नाटकामध्ये बंगालमधील काही लोककलांचा वापर करण्यात आला आहे. संगीताचा बाजही बंगालीच्या अंगाने जाणारा आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. दोन्ही प्रयोगांसाठी देणगी प्रवेशिका असणार असून बालगंधर्व येथे त्या उपलब्ध करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा लाखांची नुकसानभरपाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात गुन्ह्यात बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांसाठी नुकसानभरपाई म्हणून १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाकडून महाराष्ट्र राज्य विधी व सेवा प्राधिकरणाला हा ‌निधी ‌दिला जाणार आहे.

खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांत बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना; तसेच ज्यांच्यावर गंभीर हल्ला झाला आहे, त्यांच्या उपचारासाठी या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून नुकसानभरपाई देण्यात येते. या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या निधीसंदर्भात राज्य सरकारकडून नुकताच अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात बळी पडलेल्या व्यक्तीसाठी नुकसानभरपाई म्हणून २०१६-१७ या वर्षात मंजूर करण्यात आलेल्या ६० लाख रुपये निधीतून ८० टक्के, म्हणजेच ४८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. या योजनेसाठी उर्वरित २० टक्के म्हणजेच १२ लाख रुपये निधी महाराष्ट्र राज्य विधी व सेवा प्राधिकरण मुंबई यांना वितरित करण्यात आला आहे. बळी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांठी हा खर्च करण्यात यावा, असे या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई राज्य विधी प्राधिकरणाकडून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा प्राधिकरण यांना कायदेविषयक योजना राबविण्यासंदर्भात निर्देश देण्यात येतात; तसेच नवीन योजना, कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात.

खून झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांपर्यंतची मदत या योजनेअंतर्गत देण्यात येते. मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अवलंबून असलेली त्याची पत्नी, आई, वडील, अविवाहित मुलगी, अल्पवयीन मुले नुकसानभरपाईसाठी अर्ज करू शकतात. संबंधित अर्जदारांनी घटना घडल्यापासून सहा महिन्यांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नातेवाइक या मदतीसाठी अर्ज करू शकतात. खुनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराचा तपास लागला नाही, तरी खटला सुरू असला किंवा आरोपी निर्दोष सुटले तरी या योजनेअंतर्गत पी‌डित व्यक्ती मदत मागू शकतात. अपघातातील व्यक्तीचा मृत्यू झाला नसेल किंवा त्याच्या आर्थिक कुवतीपेक्षा जास्त खर्च आला असेल तर ती व्यक्ती नुकसानभरपाईसाठी अर्ज करू शकते.

संबंधित घटना किंवा अपघात महाराष्ट्रात झालेला असेल, तरच ही योजना लागू होऊ शकते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे या योजनेअंतर्गत करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आला, तर संबंधित अर्जदार राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज करू शकतो. या योजनेअंतर्गत बनावट अर्ज केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधिताकडून पंधरा टक्के व्याज दराने नुकसानभरपाई वसूल केली जाऊ शकते.

सहा महिन्यांत अर्ज हवा

घटना घडल्यानंतर सहा महिन्याच्या आत विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागतो. यासाठी वकिलाची गरज नाही. संबंधित साध्या कागदावर अर्ज करू शकतात. त्यासाठी एफआयआरची प्रत आणि ओळखपत्र जोडावे लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फर्ग्युसनमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मेसमधील जेवणाचा दर्जा सुधारावा, गेस्ट विद्यार्थ्यांसाठी जेवणाचे दर कमी करावेत, कॉलेजात विविध ठिकाणी वाय-फाय सुविधा उपलब्ध करावी यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) फर्ग्युसन कॉलेजात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. येत्या सोमवारपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘अभाविप’तर्फे या मागण्यांसाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांना या मागण्यांचे निवेदन वारंवार देण्यात आले होते. मात्र, अद्याप काहीच झालेले नाही. त्यामुळे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जेवणाचा दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांसाठी जेवणाचे दर कमी करावे, कॉलेजमध्ये वाय-फाय सुविधा सुरू करावी, अशा प्रमुख मागण्या आहेत. कॉलेजातील स्वच्छतागृहे सायंकाळी पाचनंतर बंद करण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होतात. त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करावी, अशी मागणीही करण्यात आली.

उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक विद्यार्थी वसतिगृहात राहतात. या काळात विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे शुल्क आकारले जाते. त्यामुळे हे शुल्क आकारणे बंद करावे. वसतिगृहातील विद्याथ्यांना सुरक्षितता मिळावी आणि विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क पार्किंगची सोय करावी, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. पदवी अभ्यासक्रमातील अद्वैत पत्की, मयुरेश जगताप, अमन कांबळे, शुधांत पाटील, अक्षय मांडगे, सौरभ गर्ग, विजय भोसले आदी विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ससूनच्या धर्तीवर ‘औंध उरो’चा विकास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

औंध-बाणेर, बालेवाडीसह आसपासच्या सर्व परिसरातील नागरिकांसाठी ससूनच्या धर्तीवर औंध उरो रुग्णालयाचा विकास करण्याचा प्रयत्न असून, विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन शिवाजीनगरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार विजय काळे यांनी शुक्रवारी दिले. तसेच, महिलांसाठी सक्षम आरोग्य सुविधा आणि झोपडपट्टी पुनर्विकासाला गती देण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधणार असल्याचा दावा त्यांनी केला.

औंध उरो रुग्णालय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येत असले, तरी या ठिकाणी आसपासच्या नागरिकांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या, असा आग्रह धरण्यात येणार आहे. डायलिसिससह इतर काही आवश्यक सुविधा येथे सध्या देण्यात येत आहेत. ससूनप्रमाणे हे रुग्णालय अद्ययावत सुविधांनी सुसज्ज झाल्यास स्थानिक परिसरातील नागरिकांना सक्षम पर्याय मिळेल, असे काळे यांनी नमूद केले.

शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या असून, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडून (एसआरए) अतिशय संथगतीने काम सुरू आहे. हा वेग कायम राहिल्यास झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर मिळण्यास आणखी कालावधी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प केला असून, त्यादृष्टीने केंद्राच्या सहकार्याने झोपडपट्टी पुनर्विकास करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी अधिवेशनात करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी सरकारकडून अनेक सुविधा दिल्या जातात. महापालिकेच्या हद्दीत महिलांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम महापालिकेकडे असले, तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे, त्याची चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकणासाठी जादा गाड्या

$
0
0

पुणे : होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) पुणे व पिंपरी चिंचवडमधून आठ ते १२ मार्च या कालावधीत ३० विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याहून १६ आणि पिंपरी चिंचवडहून १४ गाड्या प्रवाशांच्या सेवेत असतील. त्या चिपळूण, माणगाव, गुहागर, खेड आणि पोलादपूर या ठिकाणी गाड्या सोडल्या जाणार आहेत.

दररोज रात्री नऊ वाजून ११ मिनिटांनी चिपळूणसाठी (सातारामार्गे) आणि गुहागरसाठी (चिपळूणमार्गे) गाड्या सोडण्यात येणार आहे. तर, १० आणि ११ मार्चला सकाळी सहा वाजून ११ मिनिटांनी आणि १२ मार्चला सकाळी सहा वाजून ४१ मिनिटांनी खेडसाठी (भोरमार्गे ) गाडी आहे. तसेच, १० ते १२ मार्चदरम्यान दररोज सकाळी आठ वाजून ४१ मिनिटांनी माणगावसाठी (दापोलीमार्गे) गाडी सोडण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवडहून नऊ ते १२ मार्चला दररोज रात्री नऊ वाजून ४६ मिनिटांनी चिपळूणसाठी (सातारामार्गे), १० ते १२ मार्चला दररोज सकाळी साडेअकरा वाजता चिपळूणसाठी (सातारामार्गे), आठ ते १२ मार्च या कालावधीत दररोज रात्री १० वाजून १६ मिनिटांनी खेडसाठी, ११ व १२ मार्चला दररोज सकाळी सात वाजून १६ मिनिटांनी पोलादपूरसाठी गाडी सोडण्यात येणार आहे. या सर्व गाड्यांचे तिकीट आरक्षण ऑनलाइन उपलब्ध आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवड्यात कैद्यांसाठी दुमजली बराक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने टिळक यार्डात पहिली दुमजली बंदी बराक इमारत लवकरच खुली होणार आहे. या इमारतीचे काम महिनाअखेर पूर्ण होणार असून पुढील महिन्यापासून कारागृह प्रशासन नव्याने उभारलेली ही इमारतीत कैद्यांना वास्तव्यासाठी खुली करण्याची शक्यता आहे. आगामी काळात आणखी तीन दुमजली इमारतीही उभारण्यात येणार आहेत.

मागील काही वर्षांपासून गुन्ह्यांचे प्रमाण आणि शिक्षा होण्याचे प्रमाण वाढल्याने येरवडा कारागृहात कैद्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कारागृहाची कैदी साठवून घेण्याची क्षमता सव्वा दोन हजार असताना प्रत्यक्षात साडे चार हजारहून अधिक कैदी राहतात. त्यामुळे सकाळच्या नैसर्गिक विधीपासून रात्री झोपण्याच्या सुविधांवर ताण पडत आहे.

कैद्यांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाहता राज्य सरकारनेने कारागृहात दोनशे कैद्यांसाठी नवीन बंदी बराक बांधण्यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून टिळक यार्डात प्रत्येकी पन्नास कैद्यांची क्षमता असलेल्या चार दुमजली बराकी उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या इमारतीचे काम पूर्ण होण्याचा मार्गावर आहे. सव्वादोन गुंठे जागेवर एक इमारत उभारली जाणार असून यात तळ मजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर प्रत्येकी २५ असे ५० कैदी राहू शकतील. यामध्ये आठ शौचालये आणि सहा अंघोळीच्या खोल्या असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पहिल्या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर आगामी काळात उर्वरित इमारती उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे कैद्यांना कारागृहात चांगल्या सुविधा मिळतील. नवीन इमारती उभारताना ऐतिहासिक टिळक यार्डतील लोकमान्य टिळक खोलीला कुठलाही धक्का न लावता काम केले जाणार आहे. नवीन चार दुमजली इमारतींची उभारणी झाल्यावर या परिसरासाठी स्वतंत्र कारागृह अधिकारी देखरेख ठेऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर तलाठ्यावर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पिंपरी-वाघिरे येथे घेतलेल्या घराची सातबारावर नोंद होऊन त्याचा उतारा देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. तलाठी वैशाली मोरे यांनी ही लाचेची रक्कम खासगी व्यक्ती परमेश्वर सिदराम बनसोडे यांच्याकडे जमा करण्यास सांगितले होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोरे आणि बनसोडे यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. तक्रारदार यांनी नवीन घर घेतले असून त्या घराची नोंद सातबारावर करण्यासाठी त्यांनी मोरे यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जानुसार सात बाराची नोंद करणे आणि त्याचा उतारा देण्यासाठी मोरे यांनी सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही रक्कम मोरे यांनी बनसोडे यांच्याकडे देण्यास सांगितले होती. दरम्यान, लाच दिल्याशिवाय आपल्याला सातबारा मिळणार नाही, याची खात्री पटल्यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी केल्यावर सापळ्याचे आयोजन केले. मोरे यांनी तक्रारदाराला त्यांच्या कार्यालयातच लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले होते. बनसोडे यांनी लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर पोलिसांनी पहिल्यांदा बनसोडे यांना, तसेच त्यानंतर लगेचच मोरे यांना ताब्यात घेतले.

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी टोल फ्री क्रमांक १०६४ आणि दूरध्वनी क्रमांक (०२०) २६१२२१३४, २६१३२८०२ या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन सरदेशपांडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेंगळे पूल होळीपर्यंत सुरू करावा

$
0
0

आमदार विजय काळे यांची प्रशासनाला सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे
डेंगळे पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने आसपासच्या परिसरातील वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून होळीपर्यंत (१२ मार्च) पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी सूचना आमदार विजय काळे यांनी पथ विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला यांना केली.

डेंगळे पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने तातडीने त्याची दुरुस्ती सुरू हाती घेण्याचे पालिकेने निश्चित केले होते. त्यानुसार पाच फेब्रुवारीपासून पूल दुरुस्तीच्या बांधकामास सुरुवात झाली. फेब्रुवारीअखेरपर्यंत ते काम पूर्ण होऊ शकले नाही. या पुलाचा वापर करता येत नसल्याने पर्यायी रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी पुढील काही दिवस तशीच कायम राहणार असल्याचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर आमदार काळे यांनी तातडीने पुलाच्या कामाची पाहणी केली. या वेळी काळे यांच्यासह नगरसेविका नीलिमा खाडे व सिद्धार्थ शिरोळे, पथ विभागाचे प्रमुख बोनाला, अधीक्षक अभियंता विजय शिंदे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दुरुस्तीच्या कामादरम्यान पुलाचे १४ बेअरिंग बदलण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच, पुलाच्या ‘स्ट्रक्टर’ला तडे गेल्यामुळे सर्व पिलरला ‘जॅकेट’ स्वरूपात ‘आरसीसी’ बांधकाम करून, मजबूत करण्यात आले आहे. पुलाच्या मूळ बांधकामात ‘एक्सपान्शन जॉइंट्स’च्या येथे काही अंतर सोडणे गरजेचे होते. ती जागा सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘एक्सपान्शन जॉइंट्स’ नव्याने करण्यात आले आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

वास्तविक, या कामासाठी ४० दिवसांचा अवधी अपेक्षित होता. त्यानुसार वाहतूक पोलिसांकडे वाहतूक बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, वाहतूक पोलिसांनी पाच फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीसाठीच परवानगी दिली. प्रत्यक्षात कामासाठी अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे आणखी १५ दिवस परवानगी वाढवून मिळावी, यासाठी अर्ज केला असल्याचे या वेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांजेतील कंपनीवर दरोडा

$
0
0

तलवारीच्या धाकाने २३ लाखांचा ऐवज पळविला

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कंपनीतील सुरक्षारक्षकांना तलवारीचा धाक दाखवून दहा ते बारा दरोडेखोरांनी २३ लाख २४ हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटला. भोर तालुक्यातील रांजे गावच्या हद्दीतील यशो इलेक्ट्रीकल कंपनीत शुक्रवारी पहाटे हा दरोड्याचा प्रकार घडला. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजे गावाच्या हद्दीतील यशो इलेक्ट्रक कंपनी आहे. या कंपनीच्या पाठीमागील डोंगराच्या बाजूने शुक्रवारी पहाटे दहा ते बारा चोरटे कंपनती शिकले. त्यांनी सुरक्षारक्षक रघुनाथ माळी यांना मारहाण केली. या वेळी चोरट्यांनी माळी यांना कंपनीच्या आवारातील चार कामगार राहत असलेल्या शेडचा दरवाजा वाजवायला सांगितले. शेडमधील कामगारांनी दरवाजा उघडताच चोरट्यांनी त्यांना लाकडी दांडक्यानी मारहाण करत तलवारीचा धाक दाखवून चादरीने कामगारांचे हातपाय बाधून खोलीत कोंडून ठेवले.

चोरट्यांपैकी तिघे जण तलवारी घेऊन कामगाराजवळ थांबले, तर इतरांनी कंपनीचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. साडेचार टनाचे तांब्याचे धातूचे वायर एका चारचाकी वाहनामध्ये भरून नेले. दरम्यान चोरट्यांनी कामगाराचे पैसे, मोबाइल व कंपनीतील सीसीटीव्ही, त्याचे डीव्हीआर बॉक्स नेले आहेत. कामगारांनी स्वत:ची सुटका करून घेत कंपनीचे व्यवस्थापक प्रशांत केंगे यांना कळविले.

सुरक्षारक्षक रघुनाथ गोपाळ माळी (वय ६०) यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भरते, निरीक्षक नारायण सारंगकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकारची घटना गंभीर असून रेकॉर्डवरील आरोपी व संशयित आरोपींकडे तपास सुरू आहे, अशी माहिती चिखले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्दीवर ‘आरटीओ’ची उपाययोजना

$
0
0

कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याचा ‘आरटीओ’चा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नव्याने कार्यान्वित केलेल्या ‘वाहन ४.०’ या प्रणालीतील त्रुटींमुळे विविध कामांना होणारा विलंब आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या नागरिकांच्या रांगा टाळण्यासाठी ‘आरटीओ’ने कर्मचारी संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कामाचे स्वरूप आणि त्यासाठी लागणारा वेळ पाहून कर्मचाऱ्यांचे नियोजन केले जाणार आहे. दरम्यान, कामाचा ताण कमी होईपर्यंत आरटीओचे कामकाज सकाळी आठ वाजतापासून सुरू होणार आहे.

आरटीओमध्ये गुरुवारी इंटरनेट आणि ‘वाहन ४.०’ प्रणालीतील बिघाडामुळे तब्बल तीन तास कामाकाज ठप्प झाले होते. या प्रकारामुळे शेकडो नागरिकांनी आरटीओत गर्दी केली होती. तसेच, या घटनेची तक्रार नागरिकांनी थेट परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे केली होती. त्यामुळे आरटीओने वेळेचे नियोजन करून शुक्रवारी प्रत्येक खिडकीवर जादा कर्मचारी उपलब्ध करून दिला. त्यामुळे कामकाज सुरळीत व कमी वेळेत पूर्ण झाले, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली.

आरटीओमध्ये वाहन हस्तांतरणापासून विविध प्रकारचे कर भरण्यापर्यंतच्या कामांसाठी एक खिडकी पद्धती कार्यरत आहे. नवीन प्रणालीमुळे प्रत्येक खिडकीवर पूर्वीच्या तुलनेत एका व्यक्तीचे काम पूर्ण होण्यास अधिक वेळ लागत असल्याची नागरिकांची ओरड आहे. या खिडक्यांवर एखाद्या कामासाठी किती वेळ लागतो. त्याचा अभ्यास करून प्रत्येक खिडकीवर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच, शुक्रवारी सकाळी आठ वाजताच आरटीओतील कामकाज सुरू करण्यात आले होते.

आरटीओच्या आळंदी रस्त्यावरील कार्यालयात रिक्षांच्या फिटनेस टेस्टसाठी क्षमतेच्या दुप्पट रिक्षा रोज येतात. त्यामुळे यंत्रणेवर अधिक भार पडत आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी या कार्यालयातही अतिरिक्त अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे, असे आजरी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारदर्शकतेचा संकल्प शिवनेरीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि आळंदी नगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी किल्ले शिवनेरीवर जाऊन पारदर्शक कारभाराचा संकल्प सोडला. तसेच पक्षनिष्ठेतेची शपथ घेतली. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
पालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उल्लेखनीय यश मिळवित सत्ता हस्तगत केली. भोसरी विधानसभा मतदारसंघातील ४४ पैकी ३२ जागांवर यश संपादन केले. तसेच, आळंदी नगरपालिकेतही भाजपला सत्ता मिळविण्यात यश आले. त्यामध्ये आमदार लांडगे यांचा मोलाचा वाटा आहे, अशी त्यांच्या समर्थकांची भावना आहे. त्या अनुषंगाने या दोन्ही ठिकाणच्या नगरसेवकांना घेऊन आमदार लांडगे यांनी किल्ले शिवनेरीवर कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित राहणार होते. परंतु, काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजीची चर्चा रंगू लागली आहे.
लांडगे यांनी आयोजित केलेल्या शपथविधीच्या सोहळ्यास दोन्ही ठिकाणचे ४१ नगरसेवक उपस्थित होते. तत्पूर्वी, शिवाई मातेच्या मंदिरात सकाळी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ज्येष्ठ कार्यकर्ते विजय फुगे यांनी दोन्ही ठिकाणच्या नगरसेवकांना एकनिष्ठता आणि प्रामाणिक कारभाराची शपथ दिली. शहरातील सर्वसामान्य नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांनी सदोदीत प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा या वेळी करण्यात आली.
आमदार लांडगे यांनी ‘भोसरी व्हिजन-२०२०’ महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या काही महिन्यांपूर्वी झाले. या व्हिजनच्या अनुषंगाने तसेच केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या मदतीने विविध विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे.
या कार्यक्रमानंतर आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत लांडगे यांनी दत्तक घेतलेल्या कुसूर गावातील विविध विकासकामांची पाहणी करण्यात आली.

राष्ट्रनिष्ठेची शपथ...
शपथ घेतो, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचरातील ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ उभारण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडच्या परिपूर्ण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहील. भाजपच्या विचारांचा सदैव आदर करून ‘अगोदर राष्ट्र, मग पक्ष आणि शेवटी पद’ प्राधान्यक्रमाने राजकीय वाटचाल चालू राहील. राजकीय अमिषाला बळी पडून पदाची शिस्त, शिष्टाचार यांचा भंग करणार नाही. शपथ घेतो राष्ट्रनिष्ठेची, विश्वसार्हतेची, शहराच्या सर्वसमावेशक विकासाची. समाज जीवनात वावरताना पक्ष आणि नेत्यांच्या विचारांचा अवमान होईल, असे वर्तन करणार नाही. प्रभागात विकासकामे करताना दुजाभाव करणार नाही. राष्ट्र हाच देव आणि विकास हाच ध्यास आहे.



विधानसभा निवडणूक मी भोसरीच्या परिपूर्ण विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन लढवली. त्यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक, समर्थकांनी मला खंबीर साथ दिली. नागरिकांनीही माझ्या कार्यावर विश्वास ठेवला. मला निवडून दिले. त्याच विश्वासाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक महापालिकेत निवडून दिले आहेत. आता आम्ही भाजपचे निष्ठावंत शिलेदार म्हणून पारदर्शी आणि प्रामाणिक कारभाराची शपथ घेतली आहे.
- महेश लांडगे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिजात मराठी पत्र मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आता पत्रव्यवहाराचे हत्यार उपसण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य महामंडळाच्या पुढाकाराने राज्यभरातून पाच लाख पत्र पंतप्रधानांना पाठवण्यात येणार आहेत. मराठीला त्वरीत अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे.
सातारा येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात साहित्य महामंडळाने पत्रव्यवहाराची मोहीम सुरू केली. साताऱ्यातून २५ हजार पत्रे पंतप्रधान कार्यालयाच्या नावाने पाठवण्यात आली आहेत. पुढील १५ दिवसांमध्ये एक लाखाहून अधिक पत्रे पाठवण्याचा महामंडळाचा प्रयत्न राहणार आहे. राज्यातील सर्व साहित्य परिषदांच्या शाखांद्वारे पाच लाख पत्रे पाठवून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मराठी माणसांनी पंतप्रधानांना पत्रे पाठवावीत, असे आवाहन साहित्य परिषदेमार्फत करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. अभिजात दर्जाच्या अभ्यासासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने राज्य सरकारला तीन वर्षांपूर्वी सादर केलेल्या अहवालात मराठी भाषा अभिजात असल्याचे अनेक दाखले देण्यात आले होते. ज्या चार निकषांच्या आधारे भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो त्याचे सबळ पुरावे समितीमार्फत देण्यात आले. केंद्र सरकारने साहित्य अकादमीकडे हा अहवाल तपासणीसाठी देखील पाठवलेला होता. ५ फेब्रुवारी २०१५ रोजी साहित्य अकादमीच्या भाषा समितीने सर्वानुमते मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी लेखी शिफारस केली. केंद्र सरकारच्या विविध विभागांनी या अहवालाची छाननी करून अनुकूल अभिप्राय दिला. मात्र, अद्यापही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही.
राज्य सरकारने केंद्राकडे अहवाल पाठवल्यानंतर संसदेतील मराठी खासदार तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केंद्रावर दबाव आणणे गरजेचे होते. संसदेतही मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल फारशा चर्चा झाल्या नाहीत. शिवसेनेच्या काही खासदारांनी चर्चा घडवून आणल्या; परंतु त्यांनाही या कामात फारसे यश आलेले नाही. त्यामुळेच, मराठीचा अभिजात दर्जा हा लाल फितीतल्या अहवालातच गुंडाळून राहिला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषेदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी सांगितले, ‘मराठीच्या अभिजात दर्जा संदर्भात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे. त्यामुळे, मसापच्या १४ जिल्ह्यांमधील ७२ शाखांमार्फत पत्रव्यवहाराची मोहीम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेव्यतिरिक्त इतर साहित्य संस्थांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बृहन्महाराष्ट्रातील काही संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. पत्रांच्या माध्यमातून केंद्र सरकारवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे.’
साहित्य परिषद आणि साहित्य महामंडळाने सुरू केलेल्या पत्रांच्या मोहिमेमुळे अभिजात दर्जाच्या विषयाला पुन्हा एकदा जीवंतपणा आला आहे. मराठीच्या अभिजात दर्जासाठी राज्यातील नागरिकांच्या दबावाबरोबरच राजकीय इच्छाशक्ती देखील प्रबळ असणे गरजेचे आहे.



मराठीच्या अभिजात दर्जासंदर्भात विस्तृत अहवाल तीन वर्षांपूर्वीच सादर केला आहे. त्यानंतर केंद्र सरकारवर दबाव आणण्याची राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील खासदारांची होती; परंतु राजकीयदृष्ट्या तसे प्रयत्न केले गेले नाहीत. साहित्य महामंडळाने सुरू केलेली ही पत्रव्यवहारांची मोहीम समाधानकारक आहे. पत्रांबरोबरच केंद्रसरकारच्या ई-मेल आयडीवर अभिजात दर्जाची मागणी करणारे हजारो मेल पडायला हवेत. सरकारवर सर्वबाजूंनी दबाव टाकण्याची गरज आहे.
- रंगनाथ पठारे, ज्येष्ठ साहित्यिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images