Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

स्रीशक्तीची एकजूट दाखविण्याची संधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विविध क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या महिलांना स्त्री शक्तीची एकजूट दाखविण्यासाठीची संधी लवकरच मिळणार आहे, तीही त्यांच्या लाडक्या बाइकसोबत... महाराष्ट्र टाइम्सतर्फे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी (५ मार्च) ‘ऑल विमेन बाइक रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून स्त्री शक्ती आणि एकजुटीचे अनोखे दर्शन पुणेकरांना होईल.

एस. पी कॉलेजमधून सकाळी ७.३० वाजता सुरू होणारी ही रॅली पुन्हा एस. पी. कॉलेजमध्येच समाप्त होईल. गेल्या पाच वर्षांपासून पुण्यातील युवती, कॉलेजकन्या, नोकरदार, गृहिणी आणि निवृत्त अशा सर्वच महिला ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या या ऑल विमेन बाइक रॅलीची वाट पाहात असतात. म्हणूनच दर वर्षी या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यंदाही बाइक रॅलीच्या नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. नावनोंदणी करायची राहिली असल्यास BIKERALLYPUN हा मेसेज ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस करून किंवा www.allwomenbikerally.com वर लॉग-इन करून नावनोंदणी करता येईल.

रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व महिला, युवतींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. तसेच, विविध स्पॉट गेम्समध्येही तुम्हाला आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध असेल. सर्वोत्तम वेषभूषा, सर्वोत्तम सजावट केलेली बाइक आणि सर्वाधिक सदस्य संख्या असलेला ग्रुप यासह असंख्य बक्षिसेही दिली जाणार आहेत. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे बाइकच असली पाहिजे, अशी अट नाही. सर्व प्रकारच्या मोपेड किंवा टू व्हिलर चालविणाऱ्या महिला या रॅलीत सहभागी होऊ शकतात. वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक राहील.

रॅलीसाठी शहर आणि परिसरातील विविध कॉलेजच्या विद्यार्थिनी, युवती आणि महिला संघटना, नोकरी, व्यवसायात कार्यरत महिलाही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाचशे अर्भकांचे कायमचे अंधत्व दूर

0
0

Mustafa.Attar@Timesgroup.com
-----------------------------
Tweet:@mustafaattarMT

पुणे : मुदतपूर्व ३४ आठवड्यांमध्ये जन्माला आलेल्या अथवा दोन किलोपेक्षा कमी वजन असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पाचशे नवजात अर्भकांना आलेले अंधत्व त्वरित निदान आणि उपचारामुळे दूर करण्यात डॉक्टरांना यश आले. मुदतपूर्व जन्माला आलेल्या बालकांना उपचार मिळाल्याने त्यांना ‘दृष्टी’ प्राप्त झाली.

‘नवजात अर्भकांमध्ये येणारे अंधत्व दूर करण्यासाठी ‘टू प्रिव्हेंट ब्लाइंडनेस फ्रॉम आरओपी अॅँड डायबेटिक रेटिनापॅथी’ ही मोहीम सुरू करण्यात आली. मोहिमेसाठी इंग्लंडच्या ‘क्विन एलिझाबेथ डायमंड ज्युबिली ट्रस्ट’ आणि ‘पब्लिक हेल्थ फाउंडेशन’बरोबर केंद्र सरकारने करार केला आहे. करारांतर्गत देशातील महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गोवा, उत्तर प्रदेश आदी दहा राज्यांमध्ये मोहीम राबविली जात आहे. त्यात महाराष्ट्रात रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी (आरओपी) या आजाराचे निदान व उपचारासंदर्भात गेल्यावर्षीच्या जुलैपासून मोहीम राबविली. पुणे शहर, जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवडमधील सहा हजार नवजात अर्भकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी योग्य निदान आणि तातडीने केलेल्या उपचारामुळे पाचशे नवजात बालकांना आलेले अंधत्व कायमचे दूर करण्यात यश आले आहे,’ अशी माहिती एच. व्ही. देसाई हॉस्पिटलच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी ‘मटा’ला दिली.

राज्यातील नेत्रतज्ज्ञांसह बालरोग तज्ज्ञांना निदान व उपचाराचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी एच. व्ही. देसाई हॉस्पिटलवर सोपविण्यात आली आहे. आतापर्यंत १५ नेत्ररोग तसेच बालरोग तज्ज्ञांना प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. कुलकर्णी, तसेच डॉ. नीलेश काकडे यांनी राज्यातील पाच जिल्ह्यांमधील अनेक नेत्रतज्ज्ञांसह बालरोग तज्ज्ञांना प्रशिक्षण दिले आहे.

‘पुणे शहर जिल्ह्यातील सहा हजार नवजात अर्भकांची अतिदक्षता विभागात रेटिनल कॅमेऱ्याच्या साहयाने त्यांच्या डोळ्याच्या पडद्याचे फोटो घेण्यात आले. एच. व्ही. देसाई हॉस्पिटलच्या टेक्निशियनने बालकांचे फोटो नेत्रतज्ज्ञांना स्मार्टफोनद्वारे पाठविले. त्यापैकी कोणत्या बालकाला ‘आरओपी’चा आजार झाला आहे त्याचे तातडीने निदान करण्यात आले. तसेच, त्यासंदर्भात बालकावर उपचारही करण्यात आले. अनेक बालकांना तपासणी न झाल्याने अंधत्व आले आहे. त्यांच्या डोळ्यावर सर्जरी करून त्यांना ‘दृष्टी’ देण्यात आली. दृष्टी देण्यासाठी डॉ. सलील गडकरी यांनी त्या बालकांवर सर्जरी केली,’ अशीही माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली.

‘आरओपी’ म्हणजे काय?

मुदतपूर्व ३४ आठवड्यांच्या पूर्वी जन्मलेल्या आणि त्यांचे वजन दोन किलोपेक्षा कमी आहेत. अशा नवजात अर्भकांना अनेकदा श्वास घेता येत नाही. अशा बालकांमध्ये ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी’ हा आजार होण्याचा धोका असतो. प्राणवायूची पातळी राखण्यासाठी बाहेरून ऑक्सिजन द्यावे लागते. त्यामुळे अशा बालकांचा जीव वाचतो. परंतु, नेत्रपटलातील शुद्ध रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यातून होणारा रक्तपुरवठा थांबून अशा रक्तवाहिन्यांचे रूपांतर व्रणामध्ये निर्माण होते. परिणामी दृष्टी गेल्याने कायमचे अंधत्व येण्याची शक्यता असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात ओळखपत्र अनिवार्य

0
0

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उचलली पावले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) कार्यकर्त्यांमध्ये सुरू असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना विद्यापीठात वावरताना ओळखपत्र बाळगणे अनिवार्य केले आहे. विद्यार्थ्यांनी ओ‍‍ळखपत्र बाळगावे यासाठी विभागप्रमुखांनी योग्य ती कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना विद्यापीठ प्रशासनाने केल्या आहेत.
अभाविप आणि एसएफआयच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांचा निषेध नोंदवण्यावरून आणि संघटनेचे पोस्टर लावण्याहून काही दिवसांपूर्वी विद्यापीठात मारामारी झाली. या घटनेमुळे विद्यापीठामधील शांततेचा भंग झाला असून, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि विद्यापीठाची शांतता अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने विद्यार्थ्यांना विद्यापीठ परिसरात फिरताना ओळखपत्र बाळगणे अनिवार्य केले आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी याविषयीचे पत्र काढून सर्व विद्याशाखांच्या विभागप्रमुखांना तसेच शैक्षणिक विभागांच्या प्रमुखांना सूचना केल्या आहेत. तसेच, विद्यापीठ परिसरात ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अतिशय काळोख असतो, अशा ठिकाणी पुरेशा प्रमाणात प्रकाशयोजना करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. नजीकच्या काळात परिसरात सीसीटीव्ही लावण्याचाही विचार करण्यात येत आहे, असे डॉ. कडू यांनी सांगितले.

अंतर्गत सुरक्षेचे तीन-तेरा
विद्यापीठात विद्यार्थी आणि पालकांव्यतिरिक्त अन्य बाहेरील व्यक्तींचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. अशा व्यक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था तोकडी पडत आहे. या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी विद्यापीठाकडे पुरेशा प्रमाणात सुरक्षारक्षकच नाहीत. दरम्यान, विद्यापीठ परिसरात राष्ट्रीय संशोधन आणि विकास संस्था देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन्यजीवांचे रहस्य लघुपटांतून उलगडणार

0
0

जागतिक वन्यदिनी ‘वाइल्ड इंडिया’चे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वन्यप्राण्यांना अंधारात दिसते कसे, चिमुकल्या मुंगीला खाद्यपदार्थांचा वास नेमका येतो कसा, जंगलावर हुकुमत गाजविणाऱ्या वाघाला रानकुत्र्यांची भीती का वाटते आदी कुतूहल शमविण्यासाठी आणि जंगलातील विविध रहस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी ‘नेचरवॉक’तर्फे ‘वाइल्ड इंडिया’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त ३ आणि ४ मार्च रोजी होणाऱ्या या महोत्सवात दिग्गज वन्यजीव दिग्दर्शकांचे लघुपट बघण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. वन्यजीवनाबद्दल जनजागृती करणे हा महोत्सवाचा उद्देश आहे. पुणे वन विभाग आणि महापालिका इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्राचाही आयोजनात सहभाग असणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ महोत्सवाचा मीडिया पार्टनर आहे.
लघुपट सादरीकरणादरम्यान प्रसिद्ध वन्यजीव दिग्दर्शक सुरेश एलमॉन, नरेश, राजेश बेदी, कृपाकर सेनानी, कल्याण वर्मा, नल्ला मथ्थू, संदेश कडूर, शेखर दत्तात्री अशा दिग्गजांचे वन्यजीवनावरील माहितीपट प्रदर्शित होणार आहेत. मुंग्यांपासून हत्तींपर्यंत विविध वन्यजीवविषयक माहितीपटांचा त्यात समावेश आहे. प्रत्यक्ष जंगलात काम करताना येणारे अनुभव, वन्यजीव आणि मनुष्य संघर्षाबद्दल ठाणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती ‘नेचरवॉक’चे प्रमुख अनुज खरे यांनी दिली.
महोत्सवातील सर्व लघुपट शनिवारी (४ मार्च ) संध्याकाळी ६.३० ते ९ या वेळेत आणि रविवारी (५ मार्च) सकाळी १० ते १.३० पर्यंत, दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत राजेंद्र नगरमधील इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रामध्ये दाखविण्यात येणार आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असल्याचेही खरे यांनी सांगितले.

महोत्सवाचे आकर्षण
प्रसिद्ध लघुपटांबरोबरच राजस्थानातील रणथंबोर येथील वाघांचे आयुष्य उलगडणाऱ्या नल्ला मुथ्थू यांचा ‘टायगर रिव्हेंज’, देशातील पहिले वन्यजीव छायाचित्रकार बेदी ब्रदर्स निर्मित ‘वाइल्ड डॉग्ज- व्हिसलिंग हंटर्स’ , ‘लडाख डेझर्ट ऑफ द स्काय’ तसेच ‘बिष्णोई द गार्डियन ऑफ– द विल्डरनेस’, ‘एंजल्स इन टायगर लँड’ हा पेरियार व्याघ्र प्रकल्पातील फुलपाखऱांवरील माहितीपट, तसेच मुंग्यांवरील सुरेश एलमॉन यांचा माहितीपट महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. कृपाकर सेनानी यांचा रानकुत्र्यांवर आधारित ‘द पॅक’, शेखर दत्तात्री यांच्या ‘व्हॉलेंटरी रिसेटलमेंट’ आणि ‘मान्सून इंडियाज गॉड ऑफ लाइफ’ या लघुपटांनी महोत्सवाचा समारोप होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिक ‘तलाठीग्रस्त’

0
0

बारामतीत तलाठ्यांच्या कामकाजाबाबत तहसीलदार अनभिज्ञ

म. टा. प्रतिनिधी, बारामती
ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन सरकार आणि जनता यांमधील दुवा म्हणून तलाठ्यांनी कर्तव्ये केले पाहिजे. मात्र, बारामती तहसीलदारांच्या कार्यक्षेत्रातील तलाठी शेतकरी आणि नागरिकांचे शोषणकर्ते बनल्याचे चित्र आहे.

तहसीलदार कार्यालयात एका वर्षात फक्त २,८०० दस्त आले असून त्यापैकी ७०० दस्तांची नोंदणी बाकी आहे. बाकीच्या दस्तांचे काही माहित नसल्याचे तहसील प्रशासनाने ‘मटा’ला सांगितले. मात्र, बारामती सह दुय्यम निबंधक कार्यालयात ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०१६, तर जानेवारी २०१७ अशा चार महिन्यांत २,२०१ दस्त झाले. या सर्व दस्तांची नोदणी ऑनलाइन होत असल्याने तहसीलदार कार्यालयास दस्त न मिळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे बारामती सह दुय्यम निबंधक कार्यालय प्रशासनाने सांगितले. तर दस्तांची मूळ आकडेवारी नायब तहसीलदार, तहसीलदार व अन्य कोणाकडेच उपलब्ध नसल्याचे तहसील प्रशासनाने सांगितले आहे.

‘शेतकऱ्यांच्या दस्ताची नोंद ग्राह्य धरणे, न धरणे हे संबधित तलाठ्यांच्या निष्काळजीपणामुळे वेळेत होत नाही. तहसीलदार केव्हाच कारवाई करत नाहीत, तर वरिष्ठ बघ्याची भूमिका चोख बजावतात. त्यामुळे तलाठी, मंडल अधिकारी मनमानी कारभाराने नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना त्रास देतात,’ असे तहसीलदार कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १५४नुसार नोंद करणाऱ्याने किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलेले संपादन याचे नोंदवहीत विवरण घेणे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावातील शिधापत्रकांची सूची तयार करून ती गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे. अशा प्रकारची लोकाभिमुख कामे तलाठ्यांनी करणे अपेक्षित आहे. मात्र, तलाठी स्वतःच्या कार्यालयात कधीच भेटत नाहीत. भेटले तर, ‘तहसीलदार साहेबांची मिटिंग आहे, उद्या या,’ असे उत्तरे दिले जात असल्याचे दिसते. ७/१२ उताऱ्यावर जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते. ही सर्व माहिती प्रत्येक शेतकऱ्याला गरजेची असते.

‘ऑनलाइन’च्या नावाखाली पत्ते

बारामतीच्या तहसीलदार कार्यालयात ऑनलाइन नोंदणी करण्याच्या नावाखाली येथील कर्मचारी ऑनलाइन पत्त्यांचा डाव खेळण्यात मग्न असल्याचे पाहायला मिळते. कोणी आले, तर त्यांनाबाहेरचा रस्ता दाखवला जातो. तसेच सर्व्हर डाउन असल्याने ऑनलाइन कामकाज होत नसल्याचे कारण दिले जाते. शेतकऱ्यांनी विनवणी करूनही त्यांची कामे होत नसल्याचे चित्र आहे.
...
प्रशासकीय कार्यालयात तलाठी, मंडल अधिकारी यांच्याकडून होणारी लोकांची पिळवणूक थांबली पाहिजे. तहसीलदारांनी कार्यक्षम काम केले, तरच जनतेला न्याय मिळेल.
- दिनकरराव मोटे, नागरिक, बारामती
...
वारसा हक्काच्या नोंदी होत नाहीत. अनेक वेळा कार्यालयात जाऊन आलो, तरी तलाठी तेथे भेटत नाहीत. त्यामुळे पाच महिने झाले तरी, वारसा हक्काची नोंद झालेली नाही.
- संतोष भरते, खंडोबानगर, बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅब’साठी नको वेगळा परवाना

0
0

Kuldeep.Jadhav @timesgroup.com
Tweet : @kuldeepjadhavMT

पुणे : ‘ऑल इंडिया टुरिस्ट परमिट’ (एआयटीपी) असलेल्या वाहनांना शहरांतर्गत प्रवासी सुविधा देण्यासाठी सिटी टॅक्सी परमिट घेणे बंधनकारक करू नये. कॅब सेवेमुळे प्रवाशांची सोय होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची अनावश्यक बंधने घालू नयेत, अशी सूचना ‘नीती आयोगा’ने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला केली आहे.

शहरातील प्रवासी वाहतुकीच्या सुविधा वाढविण्यासाठी आणि चांगल्या दर्जाची साधने उपलब्ध करण्याच्या उद्देशाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने काही राज्यांच्या परिवहन आयुक्तांची समिती स्थापन केली होती. समितीने नवीन टॅक्सी धोरण तयार करून अहवाल मंत्रालयाला सादर केला. मंत्रालयाकडून त्यास हिरवा कंदीलही दाखविण्यात आला. हे धोरण राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठविण्यात आले आहे. भविष्यात टॅक्सी परवाना देताना, धोरणाचा आधार घ्यावा, असेही सूचित केले आहे. त्याबरोबरच नीती आयोगाने समितीच्या शिफारशींवर टिप्पणी केली असून, पर्याय सुचविले आहेत.

कॅब कंपन्यांकडून शहरांतर्गत अवैध प्रवासी सेवा दिल्या जात असल्यामुळे देशभरात रिक्षा आणि टॅक्सी संघटनांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. त्या धर्तीवर रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ‘एआयटीपी’धारक वाहनांना शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करण्यासाठी टॅक्सी परवाना घेणे बंधनकारक करण्याची शिफारस केली होती. तसेच, कॅब चालकांना मोटार वाहन कायद्याच्या कलम ९३ अंतर्गत परवाना घेणेही बंधनकारक केले होते. मात्र, नीती आयोग या दोन्ही गोष्टींशी असहमत आहे. कॅब चालकांवर अनावश्यक बंधने घालायला त्यांनी विरोध दर्शविला आहे. तसेच, कॅब कंपन्यांकडून ‘अॅपबेस्ड’ सेवा दिली जाते. त्या आयटी अॅक्टअंतर्गत येतात. त्यामुळे त्यांना स्वतंत्र आणखी एक परवाना घेणे गरजेचे नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. या समितीने कॅबला कमीत कमी भाडे निश्चित करण्याची शिफारस केली होती. सध्या कॅब चालकांच्या स्पर्धेमुळे ग्राहकांना विशेष योजना देऊन खूपच स्वस्तात सेवा दिली जात आहे. त्यामुळे नीती आयोगाने ही शिफारस अमान्य केली आहे.

खासगी कार पूलिंगला प्रोत्साहन

गेल्या काही वर्षात कार पूलिंगची संकल्पना वाढीस लागली आहे. रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही संकल्पना ‘अॅपबेस्ड’ स्वरूपात राबवून ‘कार शेअरिंग’ करण्यास कायदेशीर मान्यता द्यावी, त्यासंबंधी नियमावली तयार करावी, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. यशवंत माने यांची बदली का ?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांची अचानकपणे बदली करण्यामागील गौडबंगाल आहे? याचा खुलासा होणे गरजेचे आहे,’ अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.
यासंदर्भात साठे यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. डॉ. माने यांचा कार्यकाल अद्याप पूर्ण झालेला नाही. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व प्रशासकीय जबाबदारी माने यांच्यावर होती. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रशासनावर आणि निवडणूक यंत्रणेवर दबाव आणल्याची शक्यता आहे. वॉर्डस्तरीय निवडणुकीऐवजी चार सदस्यीय पद्धतीने निवडणुकीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर प्रभाग रचना करतानाही पक्षाने हस्तक्षेप केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
मतदान प्रक्रियेत इव्हीएममध्ये (इलेक्ट्राॅनिक वोटिंग मशिन) हस्तक्षेप झाल्याचा आरोप सर्व पक्षांनी आणि नागरिकांनी केला आहे. तसेच, या प्रकरणी कोर्टात धाव घेण्याचा इशारा दिला आहे. निवडणूक निकालानंतर उपस्थित झालेल्या शंकांचे निरसन झाल्याशिवाय डॉ. माने यांची बदली झालीच कशी, असा प्रश्न सचिन साठे यांनी उपस्थित केला आहे. त्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेतील घोटाळा भाजपा सरकारला उघडकीस येऊ द्यायचा नाही का? हा घोटाळा दुरुस्त करण्यास माने यांनी भाजप सरकारला नकार दिला आहे का? त्यांची बदली त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामामुळे झाली की सजा म्हणून झाली? याबाबतचे खुलासा होणे गरजेचे आहे, अशी मागणी साठे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या बहाण्याने फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नोकरीच्या बहाण्याने सिंहगड रोडवरील ३६ वर्षांच्या तरुणाला तीन लाख २९ हजार रुपयांना फसवण्यात आल्याची घटना गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत घडली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात ‘आयटी अॅक्ट’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगड रोड येथे राहणारे अद्वैत देशपांडे (वय ३६) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. देशपांडे यांना titanenergyu.k या ई-मेलआयडीवरून मेल आला होता. त्यांना uk visa kumanpriyanka@englandmail.com या ई-मेलवरूनही नोकरी संदर्भांत मेल आला होता. या ई-मेल धारकाने देशपांडे यांना नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांच्याकडून तीन लाख २९ हजार रुपये बँक अकाउंटवर जमा करण्यास सांगून त्यांची फसवणूक केली.

‘ऑनलाइन’ पैसे लाटले

‘मी ‘आरबीआय’ बँकेतून अमित मिश्रा बोलत आहे. तुमचे डेबिट कार्ड अपडेट करायचे आहे,’ अशा आशयाच्या आलेल्या एका फोनमुळे बाणेर येथील ६५ वर्षांच्या व्यक्तीच्या अकाउंटमधून ऑनलाइन सेवेद्वारे परस्पर ९४ हजार ९६० रुपये काढण्यात आले. या प्रकरणी विनोद मोहन (वय ६५, रा. बाणेर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन सोमवारी दुपारी आपल्या कारमधून जात असताना त्यांना एका अज्ञात मोबाइलवरून फोन आला होता. त्या व्यक्तीने आपले नाव अमित मिश्रा सांगितले होते. तसेच आपण ‘आरबीआय’मधून बोलत असल्याचा दावा केला होता. मिश्रा याने मोहन यांना त्यांचे डेबिट कार्ड अपडेट करायचे असल्याने त्यांच्या बँक अकाउंटची आणि कार्डची गोपनीय माहिती बोलण्यातून मिळवली. त्यांच्या मोबाइलवर आलेला ‘ओटीपी’ नंबर मागितला आणि त्याद्वारे ९४ हजार ९६० रुपये काढून घेतल्याचे नमूद केले आहे.

पावणे दोन लाखांची फसवणूक

इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्याचा बहाणा तसेच इतर वेगवेगळ्या कंपनीच्या पॉलिसी काढून देत असल्याचे सांगत हडपसर येथील अथश्री अपार्टंमेंटमध्ये राहणाऱ्या ६० वर्षांच्या महिलेची पावणे दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार गेल्या आठवड्यात घडला आहे. या प्रकरणी रंजना धिंग्रा (वय ६०, रा. हडपसर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अजय बक्षी, एक महिला, सुरज कुमार, संकेत आणि सुजित कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी धिंग्रा यांना त्यांची इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांना वेगवेगळ्या कंपनीच्या नवीन पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती घेण्यात आली. त्याद्वारे ४२ हजार रुपये काढण्यात आले. त्यांच्याकडून ९९ हजार ९९९ रुपये तसेच ३५ हजार रुपयांचे दोन चेक घेऊन फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आठ लाखांचा गुटखा जप्त

गुटखा विक्री करण्यास मनाई असतानाही खुलेआम गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर सध्या जोरात कारवाई सुरू आहे. पुणे शहरातील मंगळवार पेठेतील एका दुकानातून ७ लाख ९२ हजार ५० रुपयांचा गुटखा व पानमसाला सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केली. मंगळवार पेठेतील सदानंदनगर येथील राधेशाम शोभाराम शर्मा यांच्या दुकानावर एफडीएने पथकाने छापा टाकला होता. त्या दुकानात गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. त्या कारवाईत ७ लाख ९२ हजार ५० रुपयांची सुगंधी तंबाखू, पानमसाला आढळून आला. हा साठा एफडीएने जप्त केला. ‘एफडीए’चे सहायक आयुक्त संजय शिंदे यांना याबाबत माहिती मिळाली होती. एफडीएचे अन्न निरीक्षक जे. बी. सोनावणे, प्रशांत गुंजाळ यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिंपरीत दुचाकी पेटविल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
गृहसंकुलात लावलेल्या तीन दुचाकी अज्ञांनी पेटवून दिल्या. पिंपरी, गांधीनगरमधील जय गणेश वरदहस्त येथे बुधवारी (१ मार्च) पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी बाबा कांबळे (रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-नेहरूनगर रस्त्यावरील पोलिसांच्या विशेष शाखेचे आणि पिंपरी वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. त्याच्या समोर जय गणेश वरदहस्त सोसायटी आहे. या रस्त्यालगत सोसायटीच्या आवारात गांधीनगर परिसरातील अनेक रहिवासी आपली दुचाकी वाहने लावतात.
बुधवारी पहाटे अज्ञात व्यक्तीने या ठिकाणच्या तीन दुचाकींना आग लावली. या घटनेत दोन दुचाकी पूर्ण जळूण खाक झाल्या आहेत. बाजूच्या दुचाकीचा काही भागही जळाला आहे. या तीनही दुचाकींजवळ असलेल्या अन्य दुचाकींनी पेट न घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाचा मृत्यू; तीन जण अटकेत

0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड

सुपे येथून चौफुलाकडे टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या अंगास हात लागल्याचा ठपका ठेवून संबधित महिलेच्या मुलासमवेत एका तरुणाचा वाद झाला. यानंतर महिलेच्या मुलाने आपल्या मित्रांना बोलावून तरुणाला बेदम मारहाण केल्याने योगेश आप्पाराव शेट्टी (वय ४५ वर्षे रा. काळखैरेवाडी, सुपे ता. बारामती) या तरुणाचा मारहाणीत रोजी मृत्यू झाला होता. यानंतर या तरुणाचा मृतदेह दौंड तालुक्यातील चौफुला येथे खडकवासलाच्या मुळा-मुठा कालव्यात टाकून मारहाण करणारे तरुण फरारी झाला होते. यवत पोलिसांनी दोन दिवसांत तपास करून फरारी असणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक केली. नितीन दत्तात्रय दोरगे (वय, २७ वर्षे ), विशाल विठ्ठल दोरगे (वय २१ वर्षे रा. यवत, दोरगेवाडी), चेतन शिवाजी दोरगे (वय २३ वर्षे रा यवत, यशवंतनगर, ता. दौंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना न्यायालया समोर हजर केले असता आठ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

गुन्ह्यादरम्यान गाडीच्या नंबर प्लेटवर असलेल्या अॅपल ब्रँडच्या चिन्हावरून पोलिस नाईक निकम व रासकर यांनी माहिती काढीत आरोपीपर्यंत पोहचण्यात यश मिळविले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विलास नाळे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत स्वाइन फ्लूचा दुसरा बळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
स्वाइन फ्लूने पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या तीन दिवसांत स्वाइन फ्लूने दुसरा बळी घेतला आहे. चिंचवड येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये बुधवारी (१ मार्च) स्वाइन फ्लूने एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
संबंधित २८ फेब्रुवारीला एका ५५ वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता. शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पिंपळे गुरव येथील ५० वर्षीय महिलेवर चिंचवड येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. स्वाइन फ्लूची लस महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून स्वाइन फ्लू रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
‘वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून स्वाइन फ्लूच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवावेत. पाणी जास्त प्यावे. सर्दी झाल्यासारखे वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन,’ महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी महापौर निवडणूक १४ मार्चला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी १४ मार्चला निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्षाचा शहरातील पहिला महापौर होण्यासाठी इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. त्या अनुषंगाने पक्षश्रेष्ठींकडे ‘फिल्डिंग’ लावली जात आहे.

महापालिकेत एकहाती सत्ता मिळविल्यानंतर सर्व प्रमुख पदे भाजपकडे जाणार आहेत. त्यापैकी प्रतिष्ठेच्या महापौरपदासाठी या पक्षातील इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. यंदाचे अडीच वर्षांचे महापौरपद इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहे. त्यामुळे या प्रवर्गातील प्रमुख नगरसेवकांच्या हालचालींना वेग आला आहे. सर्वसाधारण गटातून निवडून आलेल्या परंतु, ओबीसी असलेल्या व्यक्तीलाही महापौरपदाची संधी असल्यामुळे पदांच्या शर्यतीतील सहभागींची संख्या वाढली आहे. त्यातूनच मूळ ओबीसी आणि कुणबी यांच्यातील अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. वास्तविक, घटनेनुसार कुणबीचाही ओबीसी प्रवर्गात समावेश असल्यामुळे मूळ आणि तत्सम अन्य प्रकारच्या वादाला काहीही अर्थ नाही, असा दावा केला जात आहे.

महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद निवडताना भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातून यंदाचे महापौरपद चिंचवड विधानसभा मतदारसंघाला द्यायचे कि भोसरी विधानसभा मतदारसंघाला द्यायचे, यावरून समझोत्याच्या गुप्त बैठका होत आहेत. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे यांच्या सहकार्याने जगताप आणि लांडगे हेच महापौर आणि स्थायी समितीचे उमेदवार ठरवतील, ही बाब स्पष्ट आहे.

भाजपचा शहरातील पहिल्या महापौरपदावर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील व्यक्ती असेल, याबाबत जगताप गटाकडून आग्रह धरला जात आहे. त्यामुळे लांडगे गटाला स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अर्थात, प्रमुख जागावाटपाचा अंतर्गत समझोता आणि मसुदा अंतिम झालेला नाही. त्यामुळे ऐनवेळी बदल घडण्याची भीतीही दोन्ही गटांतील समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. त्याअनुषंगाने पक्षश्रेष्ठींकडून ‘फिल्डिंग’चा प्रयत्न होत आहे.

ढाके की काटे?

महापालिकेच्या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गातून १८ महिला सदस्यांसह ३५ सदस्य निवडून आले आहेत. याशिवाय सर्वसाधारण गटातूनही काही सदस्य निवडून आले आहेत. त्यापैकी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नामदेव ढाके आणि शत्रुघ्न काटे यांची नावे शर्यतीत आहेत. त्यात अंतिम क्षणापर्यंत वाढ होण्याचीही शक्यता आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भूमिकेला सर्वाधिक महत्त्व असल्यामुळे ते काय निर्णय घेतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

नगरसेवकांचा शिवनेरीवर शपथविधी

महापालिकेत भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक आणि आळंदी नगरपरिषदेतील भाजपच्या नगरसेवकांचा शपथविधी शुक्रवारी (तीन मार्च) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत शिवनेरी गडावर आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. शिवनेरीवरील शिवाई मातेच्या मंदिरात सकाळी सात वाजता सर्व नगरसेवक अभिषेक करतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पालकमंत्री बापट सर्व नगरसेवकांना एकनिष्ठतेची शपथ देतील. त्यानंतर लांडगे यांनी दत्तक घेतलेल्या कुसूर गावातील विकास कामांची माहिती आणि प्रकल्पांना भेट देणे हे कार्यक्रम होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नवप्रकाश’योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
थकीत विजेच्या ​बिलांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या सार्वजनिक नळयोजनांचे ग्राहक वगळून अन्य सर्व वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या ‘नवप्रकाश’ योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदारांना या योजनेअंतर्गत सवलत मिळू शकणार आहे.
मुदतवाढीनुसार आता ३० एप्रिलपर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास शंभर टक्के व्याज व विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे. यापूर्वी ही मुदत ३१ जानेवारी २०१६ पर्यंत होती; तसेच एक मे ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत मूळ थकबाकीसह व्याजाची २५ टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ७५ टक्के व्याज व शंभर टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे.
या योजनेमध्ये ३१ मार्च २०१६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषिपंपधारक, घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक; तसेच सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळता इतर वर्गवारीतील वीजग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. लोकअदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातील थकबाकीदारांना सहभागी होता येणार आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा (डिक्री) मंजूर होऊन १२ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असल्यास अशा ग्राहकांनाही या योजनेत सहभागी होता येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटवर ऑनलाइन सोय असून, संबंधित ग्राहकांच्या थकीत देयकांची व किती रक्कम भरायची, याबाबत माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेत सहभाग घेऊन थकबाकीमुक्त झालेल्या वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार नवीन वीजजोडणी देण्यात येत आहे. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येत आहे.
महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर ग्राहकांच्या थकीत देयकांची व किती रक्कम भरायची याची माहिती उपलब्ध आहे. ही रक्कम ऑनलाइनसह चेकद्वारेही भरता येणार आहे. याशिवाय महावितरणच्या शाखा ते मंडल कार्यालयांत नवप्रकाश योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना थकबाकीच्या रकमेचा तपशील उपलब्ध करून देण्यात येत आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार वीजग्राहकांनी नवप्रकाश योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केर‍ळमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केरळमध्ये मार्क्सवादी कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना व भाजपच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले करीत आहेत. तेथील सरकारचा त्यांना पाठिंबा असल्याने पोलिसही त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे केरळमधील सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व परिवारातील संघटनांतर्फे करण्यात आली.
केरळमधील हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांवरील हल्ल्याच्या विरोधात प्रबोधन मंचातर्फे धिक्कार सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सभेला प्रारंभ झाला. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, योगेश मुळीक, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, भारतीय मजदूर संघाचे उदय पटवर्धन, स्वरूपवर्धिनीचे सागर शिंदे, छावा संघटनेचे धनंजय जाधव, अभाविपच्या बागेश्री मंथाळकर, भारत भारती संघटनेचे केरळचे कार्यकर्ते रमेश कळंबोली आदी या वेळी उपस्थित होते. प्रणव पवार यांनी प्रास्तविक व सूत्रसंचालन केले. सभेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
‘केरळमध्ये कम्युनिस्ट कार्यकर्त्यांकडून संघ-भाजपच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. विचारांना विचारांनेच प्रत्युत्तर देता येते. तलवार, बंदुकीने विचार कधीच दाबता येत नाही. कम्युनिस्ट पक्षानेही विचार जरूर मांडावेत. मात्र, हिंसाचार करू नये,’ असे बापट म्हणाले.
‘हिंसाचाराच्या घटनांवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे लक्ष आहे. मानवाधिकार आयोगानेही तेथील अहवाल मागविला आहे. यासंदर्भात राष्ट्रपतींची भेटही घेण्यात येणार आहे,’ असे शिरोळे म्हणाले.
‘सकाळी विवाह झालेल्या निष्पाप संघ कार्यकर्त्याची रात्री हत्या केली जात आहे. पोलिस त्याची तक्रार घेत नसून, उलट तक्रारदारास मारहाण केली जात आहे. याला आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ शकतो. मात्र, सध्या लोकशाही मार्गानेच आम्ही विरोध करत आहोत,’ असे पटवर्धन यांनी सांगितले.
‘कन्नूर जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत १८ संघ कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. मार्क्सवादी कार्यकर्ते संघाच्या स्वयंसेवकांवर पेट्रोल बॉम्ब फेकतात; मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही,’ असे रमेश कळंबोली यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तब्बल ६४१ उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतलेल्या तब्बल ६४१ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सर्वाधिक म्हणजे ८६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून, त्या खालोखाल शिवसेनेच्या ६९ उमेदवारांचे डिपॉझिट या निवडणुकीत जप्त झाले आहे.
महापालिकेच्या ४१ प्रभागातील १६२ जागांसाठी गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या जागांसाठी प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष तसेच छोट्या मोठ्या पक्षांचे सुमारे एक हजार ९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामधील ६४१ उमेदवारांवर डिपॉझिट जप्तीची वेळ आली. या निवडणुकीत ३०२ अपक्ष उमेदवार उतरले होते. त्यापैकी २९१ जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे १७, भारिप बहुजन महासंघ १६, अखिल भारतीय सम्राट सेनेचे पाच, अखिल भारतीय सेना दोन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन, पीपल्स रिपब्लिकन पार्टी‍, संभाजी ब्रिगेड, भारतीय शेतकरी कामगार या पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडणूक लढवित होता. या पक्षांच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेनेच्या गटनेतेपदी संजय भोसले यांची निवड

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले असून, गटनेतेपदासाठी संजय भोसले यांची निवड करण्यात आल्याचे पत्र पक्षातर्फे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात आले आहे. दोन-तीन टर्मचे अनुभवी नगरसेवक आणि प्रथमच पालिकेत प्रवेश करणारे नवीन चेहरे, यांचे नेतृत्व करण्याची संधी येरवडा भागातून तिसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करणाऱ्या भोसले यांना मिळाली आहे.
मावळत्या सभागृहात शिवसेनेचे गटनेतेपद अशोक हरणावळ यांच्याकडे होते. या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. तर, शिवसेनेची सदस्य संख्येतही घट झाली होती. गेल्या बुधवारी शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी मुंबईत जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर, शिवसेनेच्या गटनेतेपदी संजय भोसले यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.
येरवडा (प्रभाग क्र ६) मधून भोसले यांच्यासह शिवसेनेचे अविनाश साळवे आणि श्वेता चव्हाण असे आणखी दोन नगरसेवक विजयी झाले आहेत. चार सदस्यीय प्रभागामध्ये या एकाच प्रभागातून शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. तर, महंमदवाडी-कौसरबाग (प्रभाग क्र २६) या भागातून प्रमोद भानगिरे आणि प्राची आल्हाट हे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. यांच्यासह पृथ्वीराज सुतार (प्रभाग क्र १२), बाळासाहेब ओसवाल (प्रभाग क्र ३७) आणि संगीता ठोसर (प्रभाग क्र ४१) या नगरसेवकांना सभागृहाचा अनुभव आहे. तर, पल्लवी जावळे (प्रभाग क्र १६) आणि विशाल धनवडे (प्रभाग क्र १७) हे प्रथमच महापालिकेत पाऊल टाकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांची निवड होणार १५ मार्चला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सदस्यांमधून पुण्याच्या नव्या महापौरांची निवड १५ मार्चला करण्यात येणार आहे. महापौर निवडणुकीसाठीचा सविस्तर कार्यक्रम आज, शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये विद्यमान सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला सारून भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता प्राप्त केली आहे. या दोन्ही शहरांमध्ये प्रथमच भाजपचा महापौर होणार असल्याने त्याबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे. दोन्ही महापालिकांच्या महापौर निवडीसाठी गुरुवारी तारखा निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार पुण्याच्या महापौरांची निवड बुधवारी १५ मार्चला होणार आहे. पुण्याच्या महापौरांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १५ मार्चला सकाळी महापौर निवडीची सर्व प्रक्रिया होणार आहे.
दरम्यान, महापौरांच्या निवडीची तारीख निश्चित झाल्याने आता महापौर कोण होणार, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. पुण्याचे महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने यंदा कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता आहे. सर्वसाधारण गटातून निवडून आलेल्या महिलांमध्ये चार-पाच नावे आघाडीवर आहेत.
०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छोटा राजन टोळीतील गुंडाला अटक

0
0

कार्बाइनसह मोठा शस्त्रसाठा जप्त
म. टा. प्रतिनिधी, पुणे
गँगस्टर छोटा राजन टोळीतील गुंड स्वप्नील उर्फ स्वप्न्या सुनील कुलकर्णी (वय २७, रा. बालाजीनगर) याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातून एका कार्बाईनसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. हा शस्त्रसाठा त्याला उत्तर प्रदेश येथून एका बड्या हस्तीचा खून करण्यासाठी पाठवण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
कुलकर्णी विरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो रेकार्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, जबरी चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत. पुण्यात त्याच्याविरुद्ध २००७ पासून गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त डॉ. शहाजी पवार यांनी दिली. कुलकर्णी याला २०१५ मध्ये दोन साथीदारांसह अटक करण्यात आली होती. त्या वेळीही तो एका व्यक्तीचा खून करणार होता, असे पोलिसांनी सांगितले होते.
कुलकर्णी हा धनकवडी येथील बालाजीनगरमध्ये येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी संजय भापकर यांना मिळाली होती. त्याच्याकडे मोठा शस्त्रसाठा असल्याची पोलिसांना कुणकुण होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक निकम, अप्पासाहेब वाघमोळे यांच्या पथकाने बालाजीनगर येथे कुलकर्णीला ताब्यात घेतले.
कुलकर्णीकडून एक कार्बाइन, तीन पिस्तूल आणि २१ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हा शस्त्रसाठा त्याला उत्तर प्रदेश येथील एका साथीदाराने दहा दिवसांपूर्वी नाशिक येथे दिल्याची कबुली त्याने दिली होती. ‘एका व्यक्तीच्या खुनासाठी त्याचा वापर करण्यात येणार होता. मात्र, खून कोणाचा करण्यात येणार होता, याची कुठलीही माहिती त्याला देण्यात आली नव्हती. ज्या दिवशी खून करण्याचे निश्चित होईल, त्या वेळी नाव सांगण्यात येणार होते,’ असे डहाणे म्हणाले. कुलकर्णी सराईत गुन्हेगार असून, त्याने २०१२मध्ये शिवाजीनगर कोर्टात गोळीबार केला होता. या तपास पथकात सहायक निरीक्षक चेतन मोरे, कर्मचारी विजय मोरे, चंद्रकांत फडतरे यांचा सहभाग होता.
..
असा बनला राजन टोळीचा हस्तक
कुलकर्णीचे वडिल गुजरातमध्ये रेल्वे खात्यात नोकरीस होते. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. कुलकर्णी कुटुंबीय सुरुवातीला विरार (पश्चिम) येथे राहण्यात होते. तेव्हा त्यांच्या शेजारी राजन टोळीतील रोहीत वर्मा राहत होता. कुलकर्णी याची वर्माशी ओळख झाली. त्याशिवाय नाशिक जेलमध्ये राजन टोळीतील आणखी एक हस्तक होता. या हस्तकाशीही कुलकर्णी याचे निकटचे संबंध होते. तो २०१५ मध्ये पुण्यातून गायब झाल्यानंतर मुंबईत वास्तव्याला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गजेंद्र चौहान यांचा कार्यकाळ पूर्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ज्यांच्या नियुक्तीवरून विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले होते, त्या गजेंद्र चौहान यांचा कार्यकाळ शनिवारी संपत आहे. त्यामुळे चौहान संस्थेचे अध्यक्ष नसतील. चौहान यांनी विद्यार्थ्यांचा प्रचंड विरोध डावलून आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे.

राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदासाठी चौहान यांना केंद्र सरकारने अद्याप मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे त्यांची जागा कोण घेणार किंवा त्यांची मुदत वाढणार का, याकडे संस्थेच्या सर्व घटकांचे लक्ष लागले आहे. फिल्म इन्स्टिट्यूटच्या सोसायटीचे तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून केंद्र सरकारने चौहान यांची तीन वर्षांसाठी निवड केली होती. विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे चौहान यांना संस्थेत पाऊल टाकणेही अवघड झाले होते. विद्यार्थ्यांच्या विरोधाला न जुमानता गजेंद्र चौहान यांनी सूत्र स्वीकारली होती.

‘चौहान हिंदुत्ववादाचा अजेंडा राबवतील, तसेच त्यांची जागतिक चित्रपट व कलेविषयीची जाण तोकडी आहे,’ अशी टीका करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवडीला आक्षेप घेतला होता; पण पुढे आंदोलन शांत झाले. दरम्यान मुदत वाढविण्याचे कोणतेही संकेत केंद्र सरकारकडून चौहान यांना मिळालेले नाहीत. चौहान यांनीही याबाबत ‘मटा’शी बोलताना दुजोरा दिला.

''नियुक्ती तीन वर्षे असली तरी प्रत्यक्षात एक वर्षे दोन महिने मला काम करता आले. विरोधानंतर माझ्या कामगिरीवर सरकार खूश आहे. शनिवारपासून मी संस्थेच्या कोणत्याही पदावर नसेन. संस्थेत शिस्त आणली तसेच अद्ययावत अभ्यासक्रम, श्रेयांक व सेमिस्टर पद्धत, क्लासरूम थिएटर व अँक्टिंग स्टुडिओ बांधणीच्या कामाला सुरुवात, नागरिकांसाठी ‘ओपन डे’, पदव्युत्तर पदवीच्या समकक्ष पदवीला मान्यता, प्रतिकृती उभारून क्रांतिकारकांना अभिवादन, फॅकल्टीसाठी मुलाखतीचा कार्यक्रम, कमी कालावधीचे अभ्यासक्रम, जलद प्रवेश प्रक्रिया, असे निर्णय व उपक्रम या काळात झाले.'' - गजेंद्र चौहान, अध्यक्ष, फिल्म इन्स्टिट्यूट

संस्थेत एकदाच एंट्री

गजेंद्र चौहान यांनी आपल्या कार्यकाळात संस्थेत येण्याचे टाळलेच. ९ जून २०१५ रोजी नियुक्ती झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे ते संस्थेत ७ जानेवारी २०१६ रोजी पहिल्यांदा आले. या दिवशी त्यांनी सूत्र हाती घेतली व नियामक मंडळाची बैठक पार पडली. या दिवसानंतर चौहान संस्थेत फिरकलेले नाहीत. त्यानंतरच्या नियामक मंडळाच्या तीनही बैठका मुंबईत झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’चेही कारभारी बदलणार

0
0

संचालक मंडळावर भाजपचा वरचष्मा, शिवसेनेकडे जाणार संचालकपद
Suneet.bhave@timesgroup.com
Tweet: @suneetMT
पुणेः पुणे महापालिकेत झालेल्या सत्तांतराचे परिणाम ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’च्या (पीएससीडीसी) संचालक मंडळावरही पडणार असून, या कंपनीच्या कारभाऱ्यांमध्येही बदल होणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळावर भाजपचा वरचष्मा राहणार असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे असलेले संचालकपद शिवसेनेकडे जाणार आहे.
स्मार्ट सिटीची अंमलबजावणी महापालिकेच्या हद्दीत केली जाणार असल्याने त्यामध्ये पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना स्थान दिले जावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार, महापालिकेतील सहा पदाधिकाऱ्यांना कंपनीच्या संचालक मंडळात स्थान देण्यात आले आहे. आत्तापर्यंत, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा वरचष्मा होता. सहापैकी चार संचालक या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी होते. तर, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येकी एक संचालक यामध्ये होता. आता, संचालक मंडळावरील पदाधिकाऱ्यांच्या रचनेमध्ये बदल होणार असून, त्यात भाजपकडे तीन, तर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांच्याकडे प्रत्येकी एक संचालकपद येणार आहे.
महापौर प्रशांत जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृहनेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांच्यासह भाजपचे अशोक येनपुरे आणि मनसेचे रवींद्र धंगेकर हे सध्या स्मार्ट सिटीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. नवीन सभागृहात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेता, ही तिन्ही पदे भाजपकडे जाणार असल्याने या पदांवर नियुक्त केल्या जाणाऱ्या नगरसेवकांना स्मार्ट सिटीसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. तर, विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याने त्यांनाही संचालक मंडळात स्थान मिळणार आहे. त्याशिवाय, पालिकेतील संख्याबळानुसार शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्याही प्रत्येकी एका नगरसेवकाला संचालक म्हणून काम करता येणार आहे. मनसेची सदस्य संख्या एकदम कमी झाल्याने त्यांचे संचालकपद यावेळी शिवसेनेला मिळणार आहे. गेल्या वेळी गटनेते म्हणून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर नगरसेवकांना स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर काम करण्याची संधी भाजप आणि मनसेने दिली होती. त्यामुळे, आता शिवसेना आणि काँग्रेसकडून कोणाची शिफारस त्यासाठी केली जाणार, याबाबत उत्सुकता आहे.
................
भाजपला अनुकूल स्थिती
स्मार्ट सिटीसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यासच सुरुवातीला भाजप वगळता इतर सर्व पक्षांचा विरोध होता. त्यानंतर, संचालक मंडळामध्ये राजकीय प्रतिनिधीत्त्व मिळावे, यावरूनही वाद झाले होते. त्यामुळे, संचालक मंडळाच्या यापूर्वीच्या बैठकांमध्येही त्याचे पडसाद उमटले होते. आता, पालिकेतही भाजपची एकहाती सत्ता असल्याने स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळातही अनुकूल निर्णय घेता येतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून कागदावर राहिलेल्या अनेक प्रकल्पांना अधिक गती मिळेल, अशी चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images