Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘काश्मिरींनी प्रतिभा दाखवावी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘काश्मीरमध्ये प्रतिभा आहे; पण मुलींना पुढे जाऊ दिले जात नाही. मला लष्कराने मदत केली, म्हणून मी गाऊ शकते. काश्मीरमधील तरुण पिढीने हिंसा करण्यापेक्षा आपली प्रतिभा दाखवायला हवी. तरच काश्मीर व देश पुढे जाईल,’ असा विश्वास काश्मीरमधील युवा गायिका शमीमा अख्तरने व्यक्त केला. ‘ओळखपत्रावर तर ‘भारतीय’ असेच लिहिलेले असते, मग केवळ ‘आम्ही भारतीय नाही’, असे बोलून काय उपयोग होतो,’ असा सवालही तिने उपस्थित केला.

सरहद संस्थेतर्फे ‘काश्मीर महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात काश्मिरी गायक शफी सोपोरी व शमीमा अख्तर या दोघांचे गायन झाले. या वेळी शमीमा हिच्याशी ‘मटा’ने संवाद साधला.

‘काश्मीरमधील तरुणांनी विकासाचा रस्ता पकडला पाहिजे. काश्मीरमधील मुलांना दिशा देण्याची गरज आहे. मुलांना चांगली दिशा मिळाली तर काश्मीर पुढे जाईल. मात्र, मुलांना प्रोत्साहन मिळत नाही आणि मुलींना स्वातंत्र्य मिळत नाही,’ अशी खंत शमीमाने व्यक्त केली. ‘काश्मीरमधील शाळा वर्षभर बंद होत्या. शाळा बंदच असतील, तर मुलांनी शिकायचे कसे? विचित्र परिस्थितीने तेथील महिला त्रस्त आहेत. ८० टक्के लोकांना चांगले काम करून पुढे जायचे आहे; पण तसे घडत नाही,’ याकडे तिने लक्ष वेधले. शमीमाचा सहकलाकार मझहर सिद्दीकी यानेही याच गोष्टींवर प्रकाश टाकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नटसम्राटा’ने उलगडला ‘नट’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भाषेचा गोडवा असलेल्या आणि बहुतांशी वेळा मुक्तछंदातून स्वैर विहार करणाऱ्या कुसुमाग्रजांच्या कविता ऐकणे म्हणजे पुणेकरांसाठी पर्वणीच! आणि त्या कविता ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या आवाजात असतील तर हा एक दुग्धशर्करा योगच म्हणायचा. असाच योग सोमवारी जुळून आला आणि पुणेकरांनी डॉ. लागूंच्या बहारदार आवाजातील ‘नट’ ही कुसुमाग्रजांची कविता मनात साठवून ठेवली.

मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट अशी मुशाफिरी करणारे डॉ. श्रीराम लागूही या वेळी कुसुमाग्रजांच्या कवितेत रमले. त्यांच्या कातरणाऱ्या आवाजातल्या गोडव्याने कुसुमाग्रजांच्या कवितेला जिवंत केले. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अक्षरधारा बुक गॅलरी आणि पॉप्युलर प्रकाशनातर्फे कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे एकत्रीकरण असलेल्या ‘प्रवासी पक्षी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन व कुसुमाग्रजांच्या डॉ. लागू यांच्या आवाजातील कवितांच्या ‘कवितेच्या पलीकडे’ या सीडीचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गायक पं. सत्यशील देशपांडे, रामदास भटकळ, विजया लागू, रेणुका माडीवाले आदी उपस्थित होते.

कुसुमाग्रजांनी केलेली नट कविता वाचून डॉ. लागू यांनी स्वतःमधील नटाशी एक अनोखा संवाद साधला. या संवादाने सारे सभागृह भारावले होते. ‘कुसुमाग्रजांच्या कविता छंदमुक्त आहेत. त्यात कधी आत्मचिंतनपर स्वगत, नाट्यछटेचा रंग, कधी नाट्यात्मक संवाद तर कधी कथाकथन अनुभवायला मिळते. लिखित भाषेचा गोडवा आणि गावरान भाषेचा ठसकाही अनुभवतो. कुसुमाग्रजांच्या गद्याला आंतरिक लय असते आणि डॉ. लागू यांनी लयीचे भान ठेवत वाचन खुलवले आहे. त्यांच्या वाचनातून कवितेची मूळ व्यक्तिरेखा न बदलता ती श्रीमंत झाली आहे,’ अशा भावना पं. सत्यशील देशपांडे यांनी व्यक्त केल्या. डॉ. जब्बार पटेल यांनी डॉ. लागूंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘आमच्या काळी गुडलक कॅफे विद्यापीठ होते. आणि डॉ. लागू हे त्याचे कुलगुरू! त्यांच्याकडून असंख्य गोष्टी शिकायला मिळाल्या. कुसुमाग्रज अजब रसायन होते. त्यांच्या कवितेच्या चार ओळींमधून अवघे आयुष्य दिसते.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विद्यापीठात हवी शांतता’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या दोन महिन्यांत विविध विद्यार्थी संघटना सक्रिय झाल्या असून कोणतीही संघटना कोणत्याही विषयावरून उपोषण आणि आंदोलने करीत आहेत. त्यातच सध्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप ) व स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) यांच्यातील वादाने उग्र रूप धारण केले आहे. २१ मार्चपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार आहे. विद्यापीठातील या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष नाही, तर वादांमुळे प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहे. त्यामुळे विद्यापीठातील अशांत वातावरण शांत करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

पुणे विद्यापीठातील अनिकेत कँटिन परिसरात कधीही गेले तरी विद्यार्थ्यांची वर्दळ पहायला मिळते. कँटिनपासून हाकेच्या अंतरावर जयकर ग्रंथालय आहे.या ग्रंथालयात संपूर्ण विद्यापीठातील सर्वच विभांगामध्ये शिकणारे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी पहाटे पाचपासून जवळपास रात्री बारापर्यंत अभ्यास करीत असतात. मार्च व एप्रिल महिना हा पदव्युत्तर कोर्ससच्या अंतिम परीक्षांचा काळ असतो. त्यामुळे विद्यार्थी वर्षभर शिकलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी करतात. परंतु, सध्या विद्यापीठातील अनिकेत कँटिन परिसरात विविध संघटनांमार्फत होत असलेली उपोषणे व आंदोलने यामुळे जयकर ग्रंथालयात अभ्यास करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याचे या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

विद्यापीठात सध्या राष्ट्रीय ते प्रादेशिक विविध संघटना कार्यरत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या संघटनांचे आपआपसातील असलेले वाद वाढले आहेत. संघटनांनी विद्यार्थी हितासाठी केलेले उपोषण अथवा आंदोलन यामुळे परिसरात सतत घोषणाबाजी व निषेध सुरू असतो. तसेच, याचे पडसाद विद्यापीठात सर्वत्र उमटतात. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासापासून दुरावत चालले आहेत. मात्र, याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. दररोज कुणीही व्यक्ती उठते आणि कोणत्याही प्रश्नासाठी उपोषण अथवा आंदोलन करते. त्यामुळे प्रशासकीय कारभार चालविणेच अवघड होऊन बसले आहे. विचारांची लढाई ही विचारांनीच लढली पाहिजे यात कुणाचेही दुमत नाही. मात्र, कुणाला मारहाण करणे व इतरांना त्रास देणे, यात सर्वांचेच नुकासान होणार आहे. हे संघटना चालविणाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. विद्यापीठ सर्व विद्यार्थ्यांचे असून कोणत्याही एका संघटनेचे नाही. त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या प्रत्येकाचा तेवढाच हक्क विद्यापीठावर आहे, हे प्रत्येकानेच लक्षात ठेवले पाहीजे. अशा एकंदरीत वातावरणात विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज चालावायचे कसे, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवीन विद्यापीठ कायदा लागु झाल्यानंतर विद्यापीठात विद्यार्थी निवडणुकांचे वारे वाहू लागणार आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थी संघटना सक्रिय होणार असून त्यांच्यातील हेवेदावे व वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.


‘कारवाई करा’

सध्या विद्यापीठात होत असलेल्या प्रकरणांवरून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने अशा संघटनांवर त्वरीत कारवाई करावी.

- नंदकुमार हांगे, विद्यार्थी


‘अभ्यासाकडे होते दुर्लक्ष’

विद्यापीठातीन हॉस्टेलमधून बाहेर पडले की आंदोलने, निदर्शने यांचेच आवाज ऐकायला मिळतात. त्यामुळे इच्छा नसतानाही याकडे लक्ष जाते. या सगळ्या प्रकरणामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे.

- प्रिया पांडे, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शमले विज्ञानाचे कुतूहल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आकाशगंगा कशी असते, टेलिस्कोपचा उपयोग काय, ग्रह व तारे कसे ओळखायचे, गुरुत्वाकर्षण लहरी काय असतात, हवामान कसे मोजतात, सुपरकम्प्युटर म्हणजे काय आणि तो काम कसा करतो, पृथ्वी कशी फिरते, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा उपयोग काय… अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मंगळवारी मिळाली. विज्ञानाबाबतचे कुतूहल शमल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. निमित्त होते राष्ट्रीय विज्ञान दिनाचे!

विज्ञान दिनानिमित्त शहरातील विविध प्रशिक्षण व विकास संस्था आणि शैक्षणिक संस्थांनी विविध प्रकारच्या वैज्ञानिक प्रदर्शनाचे व कार्यक्रमांचे आयोजन केले आले होते. या प्रदर्शनाला पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील शाळा-कॉलेजांमधील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. आयुका, प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डॅक), राष्ट्रीय विज्ञान कोशिका केंद्र (एनसीसीएस), हवामान विभागाचे कार्यालय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मॅनेजमेंट (आयआयटीएम) आदी संस्थांबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभाग तसेच कॉलेजांनी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

‘आयुका’मध्ये अॅस्ट्रोसॅट, कॉस्मिक म्यून डिटेक्टर, द स्काय डोम, रेडियो दुर्बिण, गॅमा रे बर्स्ट, सोलर फिजिक्समध्ये सुरू असणारे संशोधन, टेलिस्कोपटे विविध प्रकार, आदित्य-एल अशांवर सविस्तर माहिती देणारे भित्तीचित्र लावण्यात आले होते. तसेच, विविध अवकाशाची माहिती देणारे छोटेखानी प्रकल्प लावण्यात आले होते तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक प्रयोग कसे करावे, यासाठी व्याख्यानांचे कार्यक्रम होते. सी-डॅकमध्ये सुपरकम्प्युटर म्हणजे काय आणि तो काम कसा करतो, विविध प्रकारच्या भाषेचे टुल्स व सॉफ्टवेअर, सार्वजनिक क्षेत्रात सुपरकम्प्युटिंगचा वापर कसा करता येईल अशा विविध विषयांवर प्रतिकृतींद्वारे व भित्तीचित्रांद्वारे माहिती देण्यात आली होती. तसेच, परम युवा सुपरकम्प्युटर विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुले केले होते. हवामान विभागाच्या कार्यालयात तापमान कसे मोजण्यात येते, पाऊस आणि थंडी कशी मोजतात, भूकंपमापक यंत्र, एल-निनो म्हणजे काय आणि त्याचा परिणाम काय होतो, मॉन्सून अशा विविध विषयांची भित्तीचित्रांद्वारे माहिती देण्यात आली होती. तसेच, हवामानाशी संबंधित विषयांचे प्रयोगांद्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. विद्यापीठात फिजिक्स, केमेस्ट्री, झुऑलॉजी, बायोलॉजी, वातावरण व अवकाशशास्त्र, संगणकशास्त्र अशा विविध विभागांमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी त्यांचा फायदा घेतला.

विविध प्रकल्प सादर

मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे आयोजित दोन दिवसीय ‘यंग एक्सप्लोरर’ या आंतरशालेय विज्ञानप्रकल्प प्रदर्शनाला शेवटच्या दिवशी पुणेकरांनी गर्दी केली. स्मार्ट सिटी, स्टेप क्लायंबिग बास्केट, मल्टिपर्पज सेफ्टी फॅन असे विविध प्रकारचे प्रकल्प इथे मांडण्यात आले होते. आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. एल. एस. शशिधरा, इसरोचे माजी संचालक डॉ. प्रमोद काळे यांच्यासह इतर मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रदर्शनात ३० शाळांतून जवळपास ७० प्रकल्प होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन ‘एफएसआय’चा प्रस्ताव

0
0

पुणे कँटोन्मेंट बोर्डाची मागणी; उद्योग क्षेत्राला हवा पाऊण ‘एफएसआय’

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे कँटोन्मेंट बोर्डातील नागरी भागाला सध्याच्या एक चटई निर्देशांक क्षेत्रात वाढ करून तो दोन ‘एफएसआय’ देण्यात यावा, असा प्रस्ताव पुणे कँटोन्मेंट बोर्डाकडून केंद्रीय संरक्षण मंत्रालयाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय शिक्षणसंस्था, हॉस्पिटलला असलेल्या अर्ध्या ‘एफएसआय’मध्ये वाढ करून तो एक, तर उद्योग क्षेत्रासाठी ०.७५ ‘एफएसआय’ देण्याच्या प्रस्तावाला बोर्डाच्या विशेष बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावामुळे बोर्डाच्या रहिवाशांचा कित्येक वर्षांपासून प्रलंबित जादा ‘एफएसआय’च्या मागणीचा प्रस्ताव मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या रहिवाशांकडून होणाऱ्या बांधकामासाठी नव्या बांधकाम नियमावलीचे (बायलॉज) प्रारूप तयार केले आहे. त्याचा प्रस्ताव केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी बोर्डाच्या सर्वसाधारण सभेची प्रलंबित जादा ‘एफएसआय’च्या प्रस्तावाला मान्यता घेण्यासाठी विशेष बैठक घेण्यात आली. त्या वेळी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ए. के. त्यागी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव, बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, नगरसेवक अतुल गायकवाड, डॉ. किरण मंत्री, विनोद मथुरावाला, अशोक पवार, प्रियंका गिरी, विवेक यादव, रूपाली बीडकर आदी उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या नागरिकांना बांधकामासाठीचा जादा ‘एफएसआय’ देण्याची नगरसेवकांसह रहिवाशांकडून मागणी होत होती. त्या मागणीच्या आधारे बोर्डाच्या विशेष बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला. नागरी भागासाठी सध्या एक ‘एफएसआय’ आहे. त्यावरून तो दोन करण्यात यावा. त्याशिवाय मुंढवा येथील उद्योग क्षेत्रासाठी ०.५० एवढा एफएसआय सद्यस्थितीला आहे. तो ०.७५पर्यंत वाढवावा. तसेच शिक्षणसंस्था, हॉस्पिटलला एक, तसेच सर्व्हे नं. ७२ ते ७६ या फातिमानगर-वानवडी या भागासाठी एक वरून दोन ‘एफएसआय’ करावा, असा प्रस्ताव बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांनी मांडला. प्रस्तावात सदस्यांनी सुधारणा सुचविली. नागरी भागाला दोन ऐवजी अडीच ‘एफएसआय’ द्यावा, तसेच मुंढव्यातील उद्योग क्षेत्राला ०.७५ ऐवजी एक ‘एफएसआय’, नागरी भागात असलेल्या शिक्षणसंस्था, हॉस्पिटलना एकवरून दोन ‘एफएसआय’ देण्याची मागणी नगरसेवक अतुल गायकवाड, अशोक पवार यांनी केली. त्यावर नागरी भागासाठी दोन ‘एफएसआय’चा प्रस्ताव पाठविणे सोयीस्कर राहील, असे ब्रिगेडियर ए. के. त्यागी यांनी स्पष्ट केले.

दफनभूमीसाठी एक एकर जागा

संरक्षण विभागाच्या मालकीची वानवडी येथील शिंदे छत्रीजवळील एक एकर जागा दाऊदी बोहरी समाजाच्या दफनभूमीसाठी देण्यास पुणे कँटोन्मेंट बोर्डाने मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात बोर्डांकडून संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. त्या मागणीला पर्रीकर यांनी नुकताच हिरवा कंदील दाखविला.

लष्कराच्या पुणे विभागाच्या मालमत्ता विभागातर्फे दाऊदी बोहरी समाजासाठी जागा मिळावी यासाठी १६ फेब्रुवारीला सरंक्षण मंत्रालयाकडे मागणी करण्यात आली होती. त्याबाबत पत्र व्यवहारही करण्यात आला होता. यापूर्वीही अनेकदा पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु, मध्यंतरी महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पर्रीकर पुण्यात आले होते. त्या वेळी दाऊदी बोहरी समाजाने त्यांच्याकडे दफनभूमीसाठी जागा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने जागा देण्याचा निर्णय घेतला. बोहरी समाजाला जागा देण्याबाबत मालमत्ता विभागातर्फे बोर्डाला आदेश देण्यात आले होते. बोर्डाच्या विशेष बैठकीत त्याची माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपामुळे बँकिंग ठप्प

0
0

आंदोलनामुळे शहरातील बँकांचे कामकाज विस्कळित

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कर्मचारी अधिकारी एकजुटीचा विजय असो, लढेंगे... जितेंगे, जागतिकीकरणाचा निषेध असो, खासगीकरणाचा निषेध असो, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत... अशा घोषणा देत बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारी निदर्शने केली. बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरातील बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होऊन कामकाज विस्कळित झाले होते.

युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉइज युनियच्या वतीने देशभर हा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. राष्ट्रीयीकृत बँकांपैकी बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्यालय पुण्यात असल्याने बँकेच्या लोकमंगल या मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फिडरेशनचे मिलिंद कर्वे, ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे चंद्रेश पटेल, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स ऑर्गनायझेशनचे राजीव ताम्हाणे, बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे विश्वास जाधव आणि नॅशनल कॉन्फिडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइजचे अजय सूर्यवंशी आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय मजदूर संघ प्रणित नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स व नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स या संघटना या संपात सहभागी झाल्या नव्हत्या.

संपात सहभागी झालेल्या संघटनांचे प्राबल्य असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आदी बँकांचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले होते. या बँकांच्या शाखा बंद राहिल्या. तर संपात सहभागी झालेल्या संघटनांचे प्राबल्य असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र, विजया बँक यासारख्या बँकांच्या काही शाखांचे कामकाज नियमित सुरू होते. बँकांच्या शाखांपैकी ज्या शाखांचे व्यवस्थापक व रोखपाल संपात सहभागी नव्हते, त्या शाखांचे कामकाज नियमित सुरू राहिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘सरकारने स्टेट बँकांच्या सहयोगी बँकांच्या विलिनीकरणाला अंतिम मंजुरी दिली आहे. सरकारचे धोरण बँकिंग क्षेत्राला आणि कर्मचाऱ्यांना उद्‍ध्वस्त करणारे आहे. थकित कर्जाच्या डोंगराकडे दुर्लक्ष करून सरकार बँकांच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचा प्रयत्न करत आहे. तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठीच व त्याला विरोध करण्यासाठीच हा संप करण्यात आला,' असे मिलिंद कर्वे यांनी सांगितले.

संपकऱ्यांच्या मागण्या

- नोटाबंदीच्या काळातील ज्यादा कामाचा मोबदला मिळावा.
- नोटाबंदीच्या काळात बँकांच्या झालेल्या खर्चाची भरपाई.
- ग्रॅच्युइटी कायदा व निवृत्तीवेतनात बदल.
- अनुकंपा धोरण, रिक्त जागांचा भरणा.
- वेतनकरार चर्चेची सुरुवात.
- बँकिंग सुधारणांना विरोध.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता दुचाकी टॅक्सींनाही परवाना

0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com
Tweet: @KuldeepjadhavMT

पुणे : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रवासी वाहतुकीच्या अधिकाधिक व सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी दुचाकी वाहनांना ‘दुचाकी टॅक्सी’ परवाना देण्याचा निर्णय विविध राज्यांच्या परिवहन आयुक्तांच्या समितीने घेतला आहे. याद्वारे सध्या खासगी वापरात असलेली दुचाकी वाहनेच प्रवासी सेवेत रुपांतरित करण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही केली आहे.

गोवा राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘दुचाकी टॅक्सी’ची (बाइक ऑन रेंट) सुविधा सध्या उपलब्ध आहे. या सेवेचा तेथे मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला जातो. त्यातुलनेत अन्य राज्यांमध्ये किंवा शहरांमध्ये येणाऱ्या पर्यटकांना प्रवासासाठी टॅक्सी किंवा कॅब वाहने भाडे तत्त्वावर घ्यावी लागतात. प्रवासी संख्या एक किंवा दोन असेल, तरीही कारचा वापर केला जातो. दोन प्रवाशांच्या तुलनेत कारने रस्त्याचा अधिक भाग व्यापला जातो. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होणे, कोंडी टाळणे यासाठी दुचाकी फायदेशीर ठरू शकते. हा प्रयोग संबंध देशात राबविण्याची गरज त्या समितीने व्यक्त केली आहे.

‘बाइक टॅक्सी’मुळे खासगी वाहनांचा वापरही कमी होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रदूषण व वाहतुकीच्या समस्येवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रकाराला प्रोत्साहन द्यावे, असे समितीने सांगितले आहे. खासगी दुचाकींना टॅक्सी परवाना प्राप्त करण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करावी, त्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.

रोजगाराचे साधन

पुणे शहर हे दुचाकीचे शहर म्हणून ओळखले जाते. येथे एखाद्या व्यक्तीने किंवा काही व्यक्तींनी एकत्र येऊन ‘बाइक टॅक्सी’ ही संकल्पना राबविल्यास त्यांना चांगला रोजगारही उपलब्ध होऊ शकतो. तसेच, रस्त्यावरील अन्य खासगी वाहनांची संख्या कमी होण्यास किंवा गर्दीच्या भागामध्ये जाण्यासाठी कारचा वापर न करता, ‘बाइक टॅक्सी’चा पर्याय अवलंबला जाऊ शकतो.

ई-रिक्षाला प्राधान्य द्यावे !

ई-रिक्षाला अद्यापही काही राज्यांमध्ये अधिकृतपणे प्रवासी वाहतूक करण्यास मूभा देण्यात आलेली नाही. ई-रिक्षा कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक आहे. तसेच, वाहनाची रचना चहुबाजूंनी खुली असल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित प्रवासाचे साधन आहे. त्यामुळे परिवहन विभागाने ई-रिक्षासाठी आवश्यक नियमावली करून प्रवासी वाहतुकीला परवानगी द्यावी, असे त्या समितीने सूचविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरू निवडीसाठी समितीची स्थापना

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ येत्या १५ मे रोजी संपत आहे. त्यामुळे राज्यपाल कार्यालयाने नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष तसेच अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती मंगळवारी स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये जयपूर येथील मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. उदयकुमार यारगट्टी तसेच सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे इतर दोन सदस्य असतील. दरम्यान, डॉ. काकोडकर, प्रा. यारगट्टी आणि गगराणी यांनी राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांची राजभवन येथे मंगळवारी भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली. कायद्याप्रमाणे कुलगुरू निवड समितीमध्ये एक सदस्य हा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अथवा असतात. मात्र, या वेळेस प्रथमच न्यायाधीश यांच्या व्यतिरिक्त जेष्ठ शास्त्रत्र डॉ. काकोडकर यांची निवड केली आहे. दरम्यान, डॉ. गाडे यांचा कार्यकाळ १५ मे रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी ही निवड समिती तयार केली आहे. मंगळवारी प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यामुळे कुलगुरु निवडीचा निर्णय घेण्यासाठी कालावधी लागणार आहे.

अशी होईल प्रक्रिया

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवे कुलगुरू कोण असतील, यावर आता शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. विद्यापीठाचे नवे कुलगुरू निवडण्यासाठी येत्या काही दिवसांत देशभरात जाहिरात प्रकाशित करण्यात येणार आहे. या जाहिरातींमधून कुलगुरू पदासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तींचे अर्ज मागवण्यात येणार आहे. त्यासाठी ठराविक कालावधी देण्यात येणार आहे. अर्जाद्वारे आलेल्या व्यक्तींच्या अर्जाची छाननी करून पात्र असणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिंपरी पालिकेला एलबीटीचे एक हजार १५४ कोटींचे उत्पन्न

0
0




म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

चालू आर्थिक वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानिक संस्था कर (एलबीटी) उत्पन्नाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीअखेर एलबीटीच्या माध्यमातून पालिकेकडे एक हजार १५४ कोटी रुपये जमा झाले आहेत.

पालिकेच्या एलबीटी विभागाचे अधिकारी डॉ. यशवंत माने म्हणाले, ‘राज्य सरकारने महापालिकेला एक हजार ३०० कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट दिले आहे. याशिवाय पालिकेच्या बजेटमध्ये एक हजार ३५० कोटी रुपये जमा अपेक्षित धरण्यात आली आहे. त्यानुसार पालिकेला फेब्रुवारीअखेर एक हजार १५४ कोटी ९६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. याशिवाय राज्य सरकारकडून मिळणारे सहायक अनुदान, स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न विचारात घेता मार्चअखेर पालिकेचे उद्दीष्ट पूर्ण होण्यास मदत होणार आहे.’
ते म्हणाले, ‘वास्तविक राज्य सरकारने एक ऑगस्ट २०१५ पासून एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या व्यापारी, उद्योग यांच्याकडून एलबीटी वसुली कायम राहील, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार या शहरात ६८१ व्यापारी आणि उद्योजकांची आर्थिक उलाढाल ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पालिकेला सरासरी १२० कोटी रुपयांचे उत्पन्न एलबीटीच्या माध्यमातून मिळते. याशिवाय दारू उत्पादक कंपन्यांनाही एलबीटी लागू असल्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात सुमारे १४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.’
राज्य सरकारकडून सहाय्यक अनुदान स्वरूपात अनुदान मिळत असते. त्यानुसार या पालिकेला अनुदानाच्या माध्यमातून दरमहा ६१ कोटी ९४ लाख रुपयांचे अनुदान मिळते. त्याप्रमाणे महापालिकेला डिसेंबरपर्यंत एकूण ५५७ कोटी ४६ लाख रुपयांचे अनुदान मिळाले असून, जानेवारी आणि फेब्रुवारी २०१७ या महिन्यांचे अनुदान मिळणे अपेक्षित आहे. तसेच स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून पालिकेला नोव्हेंबर २०१६ अखेर ७८ कोटी ४१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. डिसेंबर २०१६ आणि जानेवारी, फेब्रुवारी २०१७ या महिन्यांची स्टॅम्प ड्युटीची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झालेली नाही. अनुदान आणि स्टॅम्प ड्युटीची रक्कम मिळाल्यास पालिका एलबीटी उत्पन्नाचे उद्दीष्ट पूर्ण करेल, असा विश्वास डॉ. माने यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय करसंकलन विभागाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्याचा दावा करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साक्षात्काराविना कविता घडत नाही’

0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘कवीला कोणतीही कविता होण्यासाठी आधी त्याचा अनुभव पाहिजे. त्यानंतर त्याची अनुभूती व्हायला हवी. आणि त्यानंतर त्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार झाला पाहिजे तेव्हाच कविता जन्म घेते,’ असे वक्तव्य ९० व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी केले.
८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील कविकट्टा या कार्यक्रमातून निवडलेल्या ८९ कवितांचा ‘एकोणनव्वद’ या कविता संग्रहाचा लोकार्पण सोहळा डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात पार पडला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात काळे बोलत होते.
या कवितासंग्रहाच्या लोकार्पण सोहळ्यात ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परीषदेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, राजन लाखे, सुनिताराजे पवार, सचिन ईटकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात सोहळ्यात ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच ‘एकोणनव्वद’ या कवितासंग्रहाचे लोकार्पण श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले.

काळे म्हणाले, ‘उत्तम कविता घडण्यासाठी कवीचे मन झपाटले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत कवीने समाधानी राहता कामा नये. कोणत्याही कवितासंग्रहात कविता छापली जाणे म्हणजे यश नाही. कवीचे यश हे समाधानात असले पाहिजे,’ असे त्यांनी सांगितले. कवितासंग्रह होणे ही नक्कीच ऐतिहासिक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
पाटील म्हणाले की, पिंपरीत मागील वर्षी यशस्वीरित्या झालेल्या साहित्य संमेलनाचे कारण उत्तम नियोजन होते. शहरातील आणि महाविद्यालयातील सगळ्यांनी या संमेलनासाठी खूप कष्ट घेतले. जेव्हा साहित्य संमेलन पिंपरीत होणार हे जाहीर झाले तेव्हा अनेक कवी माझ्याकडे कविता घेऊन आले. त्यांच्यासाठी कविकट्टा हा कार्यक्रम राजन लाखे यांनी उत्तमरित्या केला. यात अनेक कविता सादर झाल्या. यातील ८९ कविता निवडून एकोणनव्वद हा कवितासंग्रह करण्याचे ठरवले. या कविंना प्रोत्साहन देण्यासाठी हा कवितासंग्रह प्रकाशित केल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीपाल सबनीस म्हणाले की, पिंपरी येथे झालेले ८९ वे साहित्य संमेलन हे ऐतिहासिक होते. कवीकट्ट्यामध्ये सादर झालेल्या कवितांचा संग्रह होणे हेदेखील ऐतिहासिकच आहे. ज्या गोष्टी इतिहास घडवतात त्यांचा पॅटर्न होतो. त्याचप्रमाणे पी.डी. पाटील आणि सचिन ईटकर यांची जोडीदेखील साहित्य संमेलनासाठी एक पॅटर्न आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी आणि आभार सचिन ईटकर यांनी केले.

कवींना प्रत्येकी दहा हजार रुपये
८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी एकोणनव्वद या कवितासंग्रहात कविता प्रकाशित झालेल्या सर्व ८९ कवींना प्रत्येकी दहा हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली. कवींना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे त्यासाठी कवींना प्रोत्साहनपर ही रक्कम देऊ करत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणूक निकालामध्ये झालेल्या सत्ता बदलानंतर विद्यमान सभागृह आणि स्थायी समितीच्या अधिकारांवर राज्य सरकारने गदा आणली आहे. पालिकेत सध्या अस्तित्वात असलेल्या समितीला कोणतेही धोरणात्मक तसेच आर्थिक बाबींचे निर्णय घेता येणार नाहीत, असे आदेश नगरविकास खात्याने मंगळवारी काढले आहेत. महापालिका आयुक्तांनी यानुसार कार्यवाही करावी, असे या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन नवीन सदस्य निवडून आले आहेत. मात्र, विद्यमान सभागृहाची आणि सदस्यांची मुदत १५ मार्चला संपुष्टात येत आहे. त्यानंतरच या नवीन सदस्यांना अधिकार मिळणार आहेत. त्यामुळे १५ मार्चपर्यंत सध्या अस्तित्वात असलेली स्थायी समिती आणि त्याचे सदस्य यांचे अधिकार कायम आहेत. मात्र, या अधिकारांना कात्री लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नगरविकास विभागाने याचे आदेश काढले असून, त्याची कार्यवाही करण्याच्या सूचना संबधित महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.
नगरविकास विभागाने काढलेल्या आदेशानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या महापालिकांची मुदत नव्याने निवडून आलेल्या महापालिकेच्या पहिल्या सभेपर्यंत कायम राहणार आहे. मात्र, या दरम्यान च्या कालावधीत सध्या अस्तित्वात असलेल्या स्थायी समितीला साप्ताहिक बैठका घेता येतील. परंतु, निवडणूक झाल्याने कोणताही धोरणात्मक निर्णय तसेच आर्थिक बाबींशी संबधित निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे ही बाब सभासदांच्या निदर्शनास आणून देत महापालिका आयुक्तांनी कार्यवाही करावी असे आदेश नगरविकास खात्याचे सहसचिव ज.ना.पाटील यांनी काढले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पराभूत उमेदवारांकडून ‘ईव्हीएम’ची अंत्ययात्रा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (इव्हीएम) केलेल्या घोटाळ्यामुळेच भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाल्याचा आरोप करून पराभूत उमेदवारांनी मंगळवारी ‘ईव्हीएम’ची अंत्ययात्रा काढली. ‘पारदर्शक’ कारभाराचा दावा करणाऱ्या भाजप सरकारविरोधात सर्वपक्षीय उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
गेल्या आठवड्यात गुरुवारी पालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात, पालिकेतील १६२ जागांपैकी तब्बल ९८ जागा मिळाल्याने भाजपला प्रथमच पुण्याची एकहाती सत्ता मिळाली. परंतु, ईव्हीएममध्ये झालेल्या घोटाळ्यामुळेच भाजपला यश मिळाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी एकत्र येऊन त्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला होता. लोकशाही बुडविण्यासाठी ईव्हीएमची मदत घेण्यात आल्याने मंगळवारी सर्वपक्षीय उमेदवारांनी मशिनची अंत्ययात्रा काढली. जंगली महाराज रोडवरील झाशीच्या राणी चौकापासून ते वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत ही अंत्ययात्रा काढण्यात आली. संपूर्ण अंत्ययात्रेदरम्यान जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली. ‘मतांची चोरी हीच का तुमची पारदर्शकता?’, ‘ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटला’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप वगळता इतर पक्षांकडून लढणारे उमेदवार मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटली तपासणार उत्तरपत्रिका

0
0

अचूकतेसाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सेमिस्टर परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीत अचूकता येण्यासाठी आणि कमी कालावधीत अधिक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ‘डिजिटल इव्हॅल्युएशन’ प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांपासून इंजिनिअरिंग शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमई/एमटेक) परीक्षेतील उत्तरपत्रिकांची तपासणी या प्रणालीद्वारे होणार आहे.
परीक्षा विभागाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी ही माहिती दिली. आतापर्यंत उत्तरपत्रिकांची तपासणी पारंपरिक पद्धतीने करण्यात येत होती. मात्र, ‘डिजिटल इव्हॅल्युएशन’ या प्रणालीद्वारे आधी उत्तरपत्रिकांची तपासणी स्कॅनिंगद्वारे करण्यात येणार आहे. परीक्षा विभागच्या प्रशासनाकडून उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यपकांकडे लॉग इन आयडी आणि पासवर्ड देण्यात येणार आहे.
प्राध्यापकाने लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकला की, त्याला डिजिटल स्क्रीनवर उत्तरपत्रिका दिसतील. त्यानंतर माउस आणि की बोर्डच्या मदतीने पेपर तपासता येणार आहे. तसेच, प्रत्येक प्रश्नाला चूक किंवा बरोबरच्या आधारे गुण देखील देता येणार आहेत. तसेच, गुण लिहिणेही शक्य होणार आहे. या पद्धतीत प्रत्येक प्रश्नाला किती गुण दिले, याची एकूण बेरीजही करता येणार आहे. त्यामुळे कमी कालावधीत अधिक उत्तरपत्रिका तपासता येणार आहे. त्यानंतर या उत्तरपत्रिकांची सॉफ्ट कॉपी विभागामध्ये ठेवण्यात येईल. या प्रणालीमुळे कमी वेळात अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी शक्य होईल, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

डिजिटल इव्हॅल्युएशन या प्रणालीचा वापर सध्या कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या इंजिनिअरिंग शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी करण्यात येईल. त्यानंतर विविध पदवी अभ्यासक्रमांमध्ये याचा वापर करण्यात येईल.
- डॉ. अशोक चव्हाण, परीक्षा नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोप करणाऱ्यांनी सिद्ध करून दाखवावेत

0
0

पालिका आयुक्तांचे संबंधितांना आव्हान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आरोप करायला मिनिटही लागत नाही, ज्यांनी आपल्यावर आरोप केले आहेत, त्यांनी ते सिद्ध करुन दाखवावेत,’ या शब्दात महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी टीकेला उत्तर दिले. महापालिका आयुक्त भारतीय जनता पक्षासाठीच काम करत असल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांकडून केला जात होता. महापौर प्रशांत जगताप यांनीही पालिका प्रशासन भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप केला होता. या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत निवडणुकीच्या काळात पारदर्शी कारभार केल्याचे आयुक्तांनी सांगितले.
पालिका निवडणुकीच्या निकालातील आकडेवारीमधील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्तांनी आपल्यावरील टीकेला उत्तर दिले. निवडणुकीच्या निकालानंतर महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासन भाजपसाठीच काम करत असल्याची टीका केली होती. कुमार यांचे नाव न घेता रेश्मा भोसले प्रकरण तसेच निवडणूक प्रक्रियेत पहिल्या दिवसापासून होत असलेल्या गोंधळाला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप जगताप यांनी केला होता. निवडणुकीच्या काळात प्रशासनाने आपली जबाबदारी अत्यंत चोख बजाविली असून, राजकीय पक्षांकडून होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा आयुक्तांनी केल.
आरोप करणे सोपे असते, ते सिद्ध करुन दाखवा, असे आव्हानच त्यांनी या वेळी दिले. निवडणुकीत प्रशासनाने किती मेहनत घेतली, याबाबत कोणीही विचारणा करत नाही. मात्र पराभव होताच प्रशासनावर आरोप होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘मशिनबाबतचे आक्षेप चुकीचे’
मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ‘ईव्हीएम’ मशिनमध्ये फेरफार झाल्याचे आरोप चुकीचे आहेत. मशिनवर मतदानपत्रिका लावणे, मतदानापूर्वी मशिनचे प्रात्यक्षिक दाखविणारे मॉक पोलिंग, मतदान पूर्ण झाल्यानंतर मशिनला सील ठोकणे, मतमोजणीच्या दिवशी सीलबंद मशिन बाहेर काढणे या प्रत्येक प्रक्रियेवेळी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतमोजणीच्या फेऱ्यांच्यावेळी उमेदवारांना मशिनमधील घोळ दिसला नाही. निकाल लागल्यानंतर मात्र ईव्हीएममध्ये घोळ असल्याची टीका केली जाते. मशिनमध्ये फेरफार झाल्याचे आरोप चुकीचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ईव्हीएममध्ये तसेच निकालाबाबत घोळ असल्याची एकही लेखी तक्रार आली नसल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकाच्या मुलांनी दिली मारण्याची धमकी

0
0

विरोधकाचा प्रचार केल्याच्या रागातून प्रकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केल्याच्या रागातून शिवाजीनगर कोर्टासमोर अडवून चाकूने जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या दोन मुलांसह पाच जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत किरण मुरकुटे (वय २७, रा. बाणेर गाव) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरुन समीर बाबूराव चांदेरे, किरण बाबूराव चांदेरे, गणेश बाजीराव इंगवले, मारुती दत्तोबा चांदेरे, निखिल नंदकुमार धनकुडे (सर्व रा. वीरभद्र नगर, बाणेर गाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊमधून बाणेर-बालेवाडी-पाषाण भागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबूराव चांदेरे निवडणूक लढवत होते. त्या दरम्यान किरण मुरकुटे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला. मुरकुटे यांनी आपला प्रचार करावा, असा दबाव चांदेरे यांनी टाकला होता. मात्र, मुरकुटे यांनी त्यास नकार दिला.
मुरकुटे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीवरून लष्कर भागात निघाले होते. त्यावेळी शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक दोन ते तीनच्यामध्ये चांदेरे यांच्या मुलांनी चारचाकी आडवी लावून मुरकुटे यांना अडविले. आमच्या विरोधात शिवसेनेच्या उमेदवाराचे काम का केलेस का असा जाब विचारून समीर चांदेरे याने चाकू काढून जिवे मारण्याची धमकी दिली. मुरकुटे यांनी त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. त्यावेळी चांदेरे आणि त्यांच्या मुलांनी आपल्याला ठार मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर पाच जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आचारसंहिता भंगाचे पुण्यात सर्वाधिक गुन्हे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांकडून उमेदवारांविरूद्ध ४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पुण्यातील सर्वाधिक उमेदवार आहेत. पोलिसांकडून संबंधित उमेदवाराविरोधात कोर्टात दोषारोपपत्र पाठवण्यात येईल. मात्र, या गुन्ह्यांचे पुढे काय होणार हा प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात १२ जानेवारीपासून आचारसंहिता लागू झाली. मतमोजणीच्या दिवशी आचारसंहिता मागे घेण्यात आली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या काळात प्रचारफेरीत तीनपेक्षा जास्त वाहनांचा वापर, मोठ्या आवाजात ध्वनिवर्धकाचा वापर, मतदारांना प्रलोभन दाखवणे, त्यांना पैशांचे वाटप करणे आदी ४९ आचारसंहिताभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले. पुण्यातील ३८ तर, पिंपरी चिंचवडमधील ११ उमेदवारांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आचारसंहिताभंगाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात येते. मात्र, अशा प्रकारचे गुन्हे काढून घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे. आचारसंहिता भंग, गणेशोत्सवात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले किंवा गुन्हे काढून घेण्यासंदर्भात सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात येते. अधिसूचना गृह खात्याकडे पाठवण्यात येते. त्यानंतर हे गुन्हे आणि गणेशोत्सवात दाखल झालेले खटले मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते. अशा प्रकारचे गुन्हे गंभीर स्वरूपाचे नसतात. त्यामुळे या गुन्ह्यांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस सिलिंडर संपण्याआधी वाजणार गजर

0
0

म. टा. प्रतिनीधी, पिंपरी

गॅस सिलिंडर अचानक संपला तर गृहिणींची मोठी तारांबळ उडते; पण ही गैरसोय होऊ नये म्हणून इंजिनीअरिंगच्या काही विद्यार्थ्यांनी एक प्रॉजेक्ट तयार केले आहे. ऑटोमॅटिक सेन्सर आणि बझर अलार्म सिस्टीम तयार करून ही गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या शहरातील विद्यार्थी अमित पडवळकर, यामिनी तुपे, चेतन गुरव, श्रद्धा अकोलकर, आकाश जाधव, सायली मोहिते यांनी ‘ऑटोमॅटिक सेन्सर आणि बझर अलार्म सिस्टीम’ यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्रणेमुळे आपल्या घरातील गॅस सिलिंडर संपण्याआधी बझर वाजतो आणि होणारी गैरसोय टाळली जाते.

प्रत्येकाला आपल्या घरातील गॅस सिलिंडर संपल्यानंतर होणारी अडचणीला नेहमीच सामोरे जावे लागते. ही समस्या लक्षात घेता या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी हे प्रोजेक्ट तयार करण्याचे ठरवले. त्यानुसार या प्रोजेक्टची निर्मिती करण्यात आली.

सध्याच्या काळात गॅस सिलिंडरचे वजन किती आहे हे पाहण्यासाठी विविध यंत्रे उपलब्ध आहेत. पण त्या यंत्रांमध्ये गजरची सोय नाही. सदर बनवलेल्या यंत्रामध्ये गॅसची उपलब्धता योग्यरितीने समजते तसेच गजरची देखील सोय असल्यामुळे हे वापरण्यास सोयीचे आहे. या यंत्राचा वापर प्रत्यक्षरित्या करण्यात आला असून, हा प्रयोग यशस्वी झाला असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्हॉट्स अॅप’ नंबर हॅक करून पैसे उकळले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘व्हॉट्स अॅप’वर अनोखळी व्यक्तीकडून आलेली लिंक अजिबात उघडू नका आणि ती कोणाला परत पाठवू नका. कारण, त्या लिंकवरवरून ‘व्हॉट्स अॅप’ क्रमांक हॅक करीत ‘काँटॅक्ट लिस्ट’मधील व्यक्तीचे नाव सांगून तुमच्याकडून पैसे उकळले जाऊ शकतात. पुण्यात अशाच पद्धतीने एका तरुणीच्या नावाने ‘पेटीएम’ अकाउंटवर पैसे मागून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीला ‘व्हॉट्स अॅप’वर २२ फेब्रुवारी रोजी अनोळखी व्यक्तीकडून मेसेज आला. त्या मेसेजमध्ये असलेली लिंक परत त्याच क्रमांकावर पाठविण्यात यावी, असे त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले होते. तरुणीने ती लिंक परत त्या क्रमांकावर पाठविली. त्यानंतर अज्ञात हॅकरने तिचा ‘व्हॉट्स अॅप’ क्रमांक हॅक केला. तिच्या मोबाइलमधील काँटॅक्ट लिस्ट चोरली. त्या लिस्टमधील तीन व्यक्तीशी ‘व्हॉट्स अॅप’वरून संपर्क साधला. चॅटिंग करणारी व्यक्ती ही तरुणी असल्याचे भासविले. त्या तीन व्यक्तींकडे पैशाची गरज असल्याचे सांगत पेटीमच्या अकाउंटवर पैशाची मागणी केली. दोन व्यक्तींनी प्रत्येकी पाच व एकाने चार हजार रुपये सांगितलेल्या ‘पेटीमएम’ अकाउंटवर पाठविले. मात्र, त्यानंतर तरुणीशी संपर्क साधला, असता तिने अशा प्रकारचे पैसे मागितले नसल्याचे समोर आले. याप्रकरणी तिने सायबर सेलकडे तक्रार केली. हॅकरकडून फसवणुकीचा नवीन प्रकार समोर आल्यामुळे नागरिकांनी सावध राहावे. या फसवणुकीच्या प्रकारात जवळच्या मित्र-मैत्रिणीच्या क्रमांकावरून त्यांच्या नावाने मेसेज पाठविला जातो. पेटीएमवर पैसे मागविण्यात येतात. त्यामुळे पैसे मागितल्याबाबत मित्र-मैत्रिणींकडून खात्री करूनच पैसे पाठवावेत, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

ही काळजी घ्या...

- ‘व्हॉट्स अॅप’ अॅप्ल‌िकेशनला सुरक्षेच्या कारणास्तव पासवर्ड टाका.
- अनोखळी व्यक्तीकडून आलेला मेसेज उघडू नका आणि त्यांना रिप्लाय करू नका.
- आलेली लिंक उघडू नका आणि ती कोणाला पुढे पाठवू नका.
- अनोळखी व्यक्ती सतत मेसेज करत असेल तर त्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक ब्लॉक करा.
- स्वतः च्या मोबाइलचा आयएमआयई क्रमांक कोणालाही सांगू नका.
- असुरक्षित वायफायवर व्हॉट्स अॅप वापरू नका.
- ‘व्हॉट्स अॅप’वरून चॅटिंग करताना काळजी घ्या.
- ‘व्हॉट्स अॅप’वर फोटो टाकला असेल तर त्याबाबत सतर्कता बाळगा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगार उमेदवारांना फटका

0
0

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com

Tweet : @ShrikrishnakMT

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ४१ उमेदवारांपैकी बहुतांश जणांस मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले आहे. मात्र, गुन्हे दाखल असलेल्या भाजपच्या उमेदवारांना मतदारांनी स्वीकारल्याचे आढळून आले आहे. गुन्हे दाखल असलेले भाजपचे सहापैकी पाच उमेदवार; तर राष्ट्रवादीचे ही तीन उमेदवार निवडून आले आहेत.

पुणे महापालिकेच्या नगरसेवकपदासाठी उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सादर केले होते. त्या वेळी त्यांनी संपत्ती, गुन्हे, शिक्षण याची माहिती दिली होती. निवडणूक आयोगाने उमेदवारांची ही माहिती दैनिकातून प्रसिद्ध केली. त्या वेळी सर्वच राजकीय पक्षांकडून गुन्हे दाखल असलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे आढळून आले. उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राची पाहणी केल्यानंतर पुण्यात ४१ उमेदवारांवर फसवणूक, खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, विनयभंग, जबरी चोरी, दरोडा अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले होते. आयोगाने मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवारांवरील गुन्हे व इतर माहितीचा फलक लावला होता. मतदानाच्या दिवशी नागरिक उमेदवारांची ही सर्व माहिती पाहत होते. तसेच, गुन्हा दाखल असले त्याची चर्चा करताना देखील काही मतदान केंद्रावर आढळून आले. त्यामुळे या फलकाचा गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना थोडा का होईना फटका बसल्याचे दिसून आले आहे.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी उभे असलेल्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांवर गुन्हे दाखल होते. भाजपच्या सहा, राष्ट्रवादीच्या पाच, काँग्रेस पाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहा, अपक्ष चार, बहुजन समाजवादी पार्टी २, एमआयएम १, बहुजन रिपब्लिकन पार्टी एक व इतर तीन विविध पक्षांच्या ४१ उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्याचे दिसून प्रतिज्ञापत्रातून आढळून आले होते. गुन्ह्यांचा विचार केल्यास फसवणुकीचे आरोप असलेले सर्वाधिक १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. खुनाचा प्रयत्न ४, खून एक, विनयभंग एक, सदोष मनुष्यवध दोन, खंडणी सहा, जबरी चोरी एक, आत्महत्येस प्रवृत्त करणे एक, मारामारीचे सात, दरोड्याचे तीन आणि अपहरणाचा एक असे गुन्हे उमेदवारांवर दाखल आहेत. मात्र, भाजप वगळता इतर राजकीय पक्षाच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले.

फलकामुळे गुन्हेगार उमेदवार समजले

पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र असलेल्या बॅनरचा फायदा मतदारांना आपला उमेदवार गुन्हेगार पार्श्वभूमीचा आहे का, हे तपासण्यासाठी झाल्याचे गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. या प्रतिज्ञापत्राच्या बॅनरमुळे मतदारांना उमेदरवाराच्या शिक्षण, संपत्ती, गुन्हे आदींची माहिती मिळावी. त्यापैकी पुणेकर मतदारांनी आपल्या प्रभागात निवडणुकीच्या रिंगणात असणारे उमेदवार हे गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत का, हे तपासण्यासाठी केला आहे. हे फलक निवडणुकीच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी सार्वजनिक स्थळी आणि मतदान केंद्राच्या आत लावले पा‌हिजेत, अशा सूचना मतदारांनी केल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये हे फलक इतरत्र लावल्याने मतदारांना दिसलेच नाही. त्यामुळे ते खूप कमी मतदारांनी पाहिले, असे गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या प्रा. मानसी फडके यांनी सांगितले.

प्रतिबंधात्मक कारवाईमुळे निवडणूक शांततेत

महापालिकेची निवडणूक समोर ठेवून पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. अनेक सराईत गुंडाना तडीपार केले. तसेच, एमपीडीए व मोक्काची मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. तसेच, निवडणुकीच्या काळात दोन गुन्हे दाखल असेलल्यांना बोलवून तंबी देण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई झाल्यामुळे निवडणुकीच्या काळात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे इतर वेळीदेखील प्रतिबंधात्मक कारवाईवर पोलिसांकडून लक्ष देण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाभोलकर प्रकरणात गोळ्या बदलल्या?

0
0

सीबीआयचा तपास सुरू

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या मृतदेहात मिळालेल्या गोळ्या आणि मुंब्रा पोलिसांनी अटक केलेल्या नागोरी टोळीकडील पिस्तूल यांचा मेळ जुळल्याचा ‘बॅलिस्टिक एक्सपर्ट’चा अहवाल दाभोलकर हत्येच्या तपासातील कळीचा मुद्दा ठरला आहे. पिस्तूल आणि गोळ्या तंतोतत जुळल्याच कशा आणि जुळल्या असल्यास त्या गोळ्या कोणी बदलल्या का, याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) ​विभागाकडून सुरू आहे.

‘बॅलिस्टिक एक्स्पर्ट’च्या अहवालामुळे ‘सीबीआय’च्या तपासात अडचणी उभ्या राहिल्या आहेत. ‘सीबीआय’ने ते पिस्तूल आणि दाभोलकर यांच्या मृतदेहात मिळालेल्या गोळ्या यांची पुन्हा तपासणी गांधीनगर येथील प्रयोगशाळेतून केली आहे. या प्रयोगशाळेचा गोपनीय अहवाल हायकोर्टाला सादर करण्यात आला असून, तो अद्याप जाहीर झालेला नाही.

दाभोलकर यांच्या हत्येच्याच वेळी मुंब्रा येथे नागोरी आणि त्याच्या साथीदारांना अटक झाली होती. यावेळी त्यांच्याकडून काही पिस्तूल जप्त करण्यात आले होते. त्यातील एक पिस्तूल आणि दाभोलकरांच्या शरीरात मिळालेल्या मॅच झाल्याचा ‘बॅलिस्टिक एक्स्पर्ट’ अहवाल दहशतवाद विरोधी पथकाकडे पाठवण्यात आला होता.

दरम्यान, ‘बॅलिस्टिक एक्स्पर्ट’च्या अहवालामुळे पुणे पोलिसांनी २०१३ मध्ये मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांना अटक केली होती. मात्र, त्यांच्या तपासात काहीही निष्पन्न न झाल्याने त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र तयार केले नाही.

नागोरीकडील पिस्तूल आणि दाभोलकरांच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या कशा जुळल्या, या गोळ्या आणि पिस्तूल तपासणीसाठी पाठवताना त्यातील गोळ्या बदलल्या गेल्या की काय, अशा अनेक शंकावर ‘सीबीआय’चा तपास सुरू आहे.

याबाबतचे वृत्त ‘मटा’ने २ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्तामध्ये ‘बॅलिस्टिक एक्सपर्ट’च्या अहवालाची माहिती देण्यात आली होती.

१७ मार्चला पुढील सुनावणी

‘बॅलिस्टिक एक्स्पर्ट’चा अहवाल तंतोतंत आल्याबाबत तपास सुरू असून, १७ मार्चला हायकोर्टात दाभोलकर हत्येच्या तपासाबाबत होणाऱ्या सुनावणी दरम्यान याबाबत ‘सीबीआय’कडून खुलासा होईल, अशी अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images