Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कुठे तणावपूर्ण शांतता; कुठे मतदारांची लगबग

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/धनकवडी

धनकवडी, सुखसागरनगर येथे मारहाणीच्या तुरळक घटना... आंबेगाव खुर्द येथे दुबार मतदारांच्या मतदानावरून उडालेला गोंधळ... राज्य राखीव पोलिस दलाच्या कंपनीसह पोलिसांचा प्रचंड ताफा... एकीकडे तणावपूर्ण शांतता तर दुसरीकडे नवरदेवाची मतदान करण्याची लगीनघाई... या पार्श्वूभूमीवर या परिसरात झालेले सरासरी ६०.१८ टक्के मतदान अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरले आहे.
हे चित्र होते धनकवडी, बालाजीनगर आणि कात्रज-आंबेगाव येथील तिन्ही प्रभागांचे... धनकवडी येथे तणावपूर्ण शांततेत मतदान पार पडले. या तणावाचा काहीसा परिणाम चैतन्यनगर येथील मतदानावर झाला असला तरी, तिन्ही प्रभागांमध्ये सर्वाधिक मतदान धनकवडीत झाले. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार भीमराव तापकीर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विशाल तांबे असा थेट सामना धनकवडीकरांनी मतदानादिवशी पाहिला. या सामन्यात शिवसेनेही ‘एंट्री’ मारल्याने गावकीच्या भावी काळातील राजकारणावर होणाऱ्या दूरगामी बदलांचे संकेत दिसले.
राजीव गांधीनगर-बालाजीनगर या प्रभागात तुलनेने अगदी शांततेत मतदान पार पडले. या प्रभागात आमदार योगेश टिळेकर यांचा जुन्या वॉर्डाचा भाग येतो. सुखसागरमध्ये मतदान संपण्याला काही मिनिटे बाकी असताना भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. ही घटना वगळता प्रभागात शांततेत मतदान पार पडले.
आंबेगाव दत्तनगर-कात्रज या प्रभागात आंबेगाव खुर्द येथील २८०० मतदारांवरून जोरदार गोंधळ झाला. जिल्हापरिषदेच्या मतदार याद्यांमध्ये असणारी नावे पालिकेच्या मतदार याद्यांमध्येही समाविष्ट होती. या मतदारांना कोठे मतदान करायचे, यावरून गोंधळ झाला होता. अखेर या मतदारांनी ग्रामीण भागातच मतदान करायचा निर्णय झाल्याने परिस्थिती निवळली.
भारती विद्यापीठ परिसरात मतदान संपण्याच्या वेळेस काहीसा गोंधळ झाला. पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. बालाजीनगर परिसरातील ८७ मतदान केंद्रावर नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला. तर धनकवडी-आंबेगाव पठार येथे ६९ मतदान केंद्रावर चैतन्यनगर, आनंदनगर, कुंदननगर, धनकवडी गावठान, भारती विद्यापीठ परिसर, हिल टॉप सोसायटी या परिसरातील केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. आंबेगाव-दत्तनगर कात्रज गावठान या प्रभागात ८७ मतदान केंद्रावर मतदान झाले.

बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान
धनकवडी येथील आर्दश मित्र मंडळाचे कार्यकर्ते अतुल प्रभाकर भोई यांचे गुरुवार पेठेत दुपारी १२.३० वाजता लग्न होते. बोहल्यावर चढण्यापूर्वी अतुल यांनी मतदानाचे पवित्र कार्य पार पाडले. भोई कुटुंबीयांनी लग्नाला जाण्यापूर्वी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

मतदार यादीत नाव नसल्याने मला सपत्नीक मतदान करता आले नाही. सकाळी साडेसात ते अकरा वाजेपर्यंत धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील ३८,३९,४० प्रभागातील सर्व केंद्रांवर जाऊन आलो, पण यादीत नाव सापडले नाही. शेजारच्या कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी होती. मी १९९७ पासून मतदान करत आहे, पण असा अनुभव कधीच आला नाही. विशेष म्हणजे मतदानाआधी वेबसाइटवर यादीत नाव होते. मतदानादिवशी नाव नसल्याने हक्क बजावता आला नाही.
प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष , महाराष्ट्र साहित्य परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकाच मतदाराचे तीन वेगळे फोटो

0
0

दोन विविध प्रभागातील नावांमुळे धांदल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकाच कुटुंबातील मतदारांची नावे विविध केंद्रासह दोन वेगवेगळ्या प्रभागांत आल्याचे प्रकार घडल्याने मंगळवारी मतदारांची धांदल उडाली. या शिवया यादीत दुबार नावे, एकाच व्यक्तीचे तीन वेगवेगळे फोटो यामुळे यादीत घोळ झाल्याचे निष्पन्न झाले. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातंर्गत किरकोळ तणावाचे प्रसंग वगळता शांततेत मतदान झाले. सायंकाळी साडेपाचपर्यंत सुमारे ५२ टक्के मतदान झाले.

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कोंढवा खुर्द - मिठानगर या प्रभाग क्रमांक २७ आणि प्रभाग क्रमांक ३७ चा अप्पर सुपर इंदिरानगर, कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी या प्रभाग क्रमांक ४१चाही समावेश आहे. आजवरच्या महापालिका ​निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३७ मधील अप्पर सुपर इंदिरानगरमध्ये मारहाणीचे प्रकार घडत असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे हा भाग संवेदनशील म्हणून ओळखला जातो. मात्र, यंदाची निवडणूक अपवाद ठरली. पैसे वाटपाच्या किरकोळ तक्रारी सोडल्या तर सर्वत्र शांतते मतदान झाले. याच वॉर्डातील व्हीआय़टी कॉलेज मतदान केंद्रावर सकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते केंद्रात उभे राहून मतदारांना आवाहन करीत होते. त्यावर शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब ओसवाल यांनी हरकत घेतली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांसह कार्यकर्त्यांना केंद्राच्या बाहेर जाण्याची सूचना केली. त्यावरून थोडा तणाव निर्माण झाला. प्रभाग क्रमांक २७ मध्ये ६०, प्रभाग क्रमांक ३७ मध्ये ४८ तर प्रभाग क्रमांक ४१ मध्ये ५७ मतदान केंद्रे होती.

प्रभाग क्रमांक २७ मध्ये सकाळपासून काही मतदान केंद्रावर नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. काही मतदारांनी दुसऱ्यांच्या नावावर मतदान केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. कोंढव्यामध्ये एकाच मतदाराचे तीनदा यादीत नाव असल्याचे आढळले. पण तीनही नावांपुढे फोटो वेगवेगळे असल्याने मतदारांसह पोलिंग एजंट, मतदान केंद्र प्रमुखांचा गोंधळ उडाला. यादीत बोगस नावेही असल्याचे संबंधित मतदाराने निदर्शनास आणून दिले.

प्रभाग क्रमांक ४१ कोंढवा बुद्रुक येवलेवाडी या भागातील अनेक मतदारांना स्लिपच मिळाली नाही. त्यामुळे मतदान केंद्रांचा शोध घेताना अवघड झाले होते. एकाच कुटुंबातील काहींची नावे प्रभाग क्रमांक ४१ मध्ये तर काहींची नावे प्रभाग क्रमांक ३८ मध्ये असल्याचे आढळले. उन्हाचा चटका चांगला जाणवत असला तरी, दुपारी एक वाजेपर्यंत नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. दुपारनंतर मात्र, या भागात शुकशुकाट पहायला मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ भर उन्हातही मतदारांच्या रांगा

0
0

काही भागांत तणाव; बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात बहुतांश भागात मतदानाविषयी निरुत्साह दिसून आलेला असतानाही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. भर उन्हातही मतदार घराबाहेर पडल्याने मतदान केंद्रासमोर रांगा लागल्याचे दिसून आले. सर्व वयोगटातील मतदारांनी उत्साहात मतदान केल्याचे दिसून आले. मतदान शांततेत पार पडले असले तरी, काही भागात मात्र तणावपूर्ण परिस्थिती होती.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १८,१९ आणि २० हे प्रभाग येतात. या तीन प्रभागातील १११ उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मतपेटीत बंद झाले. खडकमाळ आळी, गुरुवार पेठ, लोहियानगर, भवानी पेठ आणि ताडीवाला रस्ता या भागात सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी होती. तरुण-तरुणी, मध्यमवयीन ते ज्येष्ठांनी उत्साहात मतदान केले. दुपारी बाराला ऊन पडू लागले तरी, मतदारांचा उत्साह कमी झाला नव्हता. दुपारच्या टळटळत्या उन्हातही मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. चारनंतर पुन्हा सर्व केंद्रे गर्दीने गजबजून गेली होती. येथील बहुतांश परिसर झोपडपट्टीमय असल्याने दुपारी चार नंतर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. त्यामुळे केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी होती.
मेरी द व्हर्जिन इन इंडिया शाळेच्या गुरुवार पेठेतील एकाच कॅम्पसमध्ये १६ केंद्रे असल्याने नाव शोधताना मतदारांना कसरत करावी लागली. पोलिसांनाही गर्दी आवरताना नाकी नऊ आले होते. लोहियानगरचा भाग संवेदनशील असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त परिसरात ठेवण्यात आला होता. आसपासची दुकाने बंद करून वाहनांसाठी रस्ता बंद करण्यात आला. तिन्ही प्रभागात काही किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.

उमेदवार माहितीचे फलक नाहीत
मतदार यादीत नाव नसणे, ओळखपत्र असूनही मतदान करता न येणे, मशिनवरील किती बटने दाबायची आदी विविध समस्यांमुळे या भागातील अनेक मतदारांना मतदान करता आले नाही. चार मशिन असल्या तरी अ, ब, क, ड याप्रमाणे स्वतंत्र मशिन नव्हत्या. चारही गटातील नावे एकापाठोपाठ असल्याने मतदारांचा गोंधळ उडाला. त्यामुळे मतदान संथगतीने सुरू होते. किती बटने दाबायची हे न कळल्याने अनेकांची मते बाद झाली. उमेदवारांचे शिक्षण, मालमत्ता आणि गुन्हे याची माहिती देणारे फलक बहुतांश केंद्रांवर लावण्यात आले नव्हते. आम्हाला सूचना नाही अशी प्रतिक्रिया एका केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्याने दिली.

अठरा, एकोणीस आणि वीस या प्रभागांमध्ये ९० टक्के स्लिप वाटण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी यादीत नाव नसल्याचे प्रकार घडले, पण ओळखपत्र जुने असल्यामुळे किंवा वास्तव्याचे ठिकाण बदलले असण्याच्या शक्यतेने नावे वगळण्यात येऊ शकतात. सर्व २३५ केंद्रांवर नागरिकांनी उत्साहाने मतदान केले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
-संजय पाटील, निवडणूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५० महिलांच्या हातावर मतदानाची ‘मेहंदी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मतदानाचे कर्तव्य बजावल्याबद्दल महिलांच्या हातावर मेहेंदी काढून मृगनयनी मेहेंदी आर्टस् आणि साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे महिलांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या वेळी साडे तीनशे महिलांच्या हातावर मेहेंदी काढली.

लोकशाहीमध्ये पन्नास टक्के सहभागी असणाऱ्या महिला आणि तरुणींनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शहराच्या मध्य भागातील सरस्वती मंदिर प्रशाला, आदर्श विद्यालय, गोपाळ हायस्कूल आणि नूतन मराठी विद्यालय प्राथमिक आणि माध्यमिक शाळा या परिसरात मृगनयनी मेंदी आर्ट्‍‍सच्या धनश्री हेंद्रे आणि त्यांच्या सहकारी महिलांनी मतदारांच्या हातावर मेंदी काढली. साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा आणि कार्यकर्त्यांनी मतदान जनजागृती केली.

‘मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. प्रामुख्याने महिला वर्गाला प्रोत्साहन देऊन मतदानाची संख्या वाढवावी, तसेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या महिलांचा मतदानाचा क्षण कायमचा लक्षात राहावा, यासाठी मेंदी काढून त्यांचा सन्मान केला,’ असे शहा आणि हेंद्रे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातांचे पाय करून त्याने केले मतदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दोन पाय असूनही त्याला चालता येत नाही. त्यामुळे तो आपल्या दोन हातांचेच पाय करून चालतो. याच अवस्थेत मतदान केंद्रावर येऊन त्याने मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. ‘लोक कसे का वागेनात, आपण चांगले वागायचे. आपले कर्तव्य आपण पार पाडायचे...’ ही त्याची भावना अनेक सुशिक्षितांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरावी.

प्रभाग १८ गुरुवार पेठेतील सेंट एडवर्ड बॉइज प्रायमरी स्कूल या केंद्रावर मंगळवारी सकाळी रांग लागली होती. तोच तो दोन हातांच्या सहाय्याने आला. उपस्थित नागरिकांनी त्याला मोकळी वाट करून दिली. त्याच्या आधी त्याच्या आईने मतदान केले. त्याची वेळ आली तशी उपस्थित कर्मचारी त्याला उचलण्यासाठी धावले. एका खुर्चीचा आधार घेत तो बसला व त्याने आपला हक्क बजावला. खुर्चीवरून उतरताना तो होलपटला; पण त्याला वाईट वाटलेले दिसत नव्हते. मतदानाचा अधिकार बजावल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. घोरपडी पेठेत राहणारा हा तरुण म्हणजे किशोर तुकाराम मोरे!

३३ वर्षांचा किशोर घोरपडी पेठेत आपल्या आई-वडिलांसह राहतो. नीट चालता येत नसल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली; पण ती यशस्वी न झाल्याने त्याला अपंगत्व आले. गेली १६ वर्षे तो हातांच्या सहाय्यानेच पुढे सरकत असतो. असे चालण्याची त्याची गती मात्र, अनेकांना मागे टाकते.

‘मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. लोक कसे का वागेनात, आपण चांगले वागायचे व कर्तव्य पार पाडायचे. माझे हे चौथे मतदान आहे. कोणीही मदत करत नाही. सर्व जण गोड बोलणारे असतात. एकमेकांची उणीदुणी काढतात. गोरगरिबांना तर कोणीच वाली नाही. मतदानादिवशीच ओळख दाखवली जाते; पण तरी मतदानाचा अधिकार आपण बजावलाच पाहिजे...' किशोरचे हे बोल अंतर्मुख करणारे होते. तो बोलत होता तेव्हा शेजारून जाणारेही थबकत होते. ‘माझ्या दुचाकीला आ‌णखी दोन चाके लावून ती चारचाकी केली आहे. त्यामुळे मला सर्वत्र फिरता येते. यामुळेच मी केळी विकण्याचा व्यवसाय करू शकतो,' असे सांगून तो पुढे गेला. गाडीवर कौशल्याने बसून त्याने आईसह आपली वाट पकडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृत पंडिताचे शंभरीतही मतदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ संस्कृत पंडित डॉ. म. अ. मेहेंदळे यांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. महाभारत, ऋग्वेद, निरुक्त; तसेच पारशी धर्मग्रंथ ‘झेंद अवेस्ता’चे अभ्यासक असलेल्या डॉ. मेहेंदळे यांनी गेल्या मंगळवारीच शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे, हे विशेष!

डॉ. मेहेंदळे सध्या पौड रस्त्यावरील प्रशांत सोसायटी येथे वास्तव्यास आहेत. पूर्वी ते प्रभात रस्त्यावर राहात असल्याने त्यांचे मतदान, प्रभाग १३ प्रभात रस्ता या भागात आहे. त्यांचे चिरंजीव (निवृत्त) कर्नल प्रदीप मेहेंदळे हे डॉ. मेहेंदळे यांना अभिनव शाळा या मतदान केंद्रात घेऊन गेले. डॉ. मेहेंदळे यांनी उत्साहाने मतदान केले आणि छायाचित्रही काढून घेतले. ‘या वयातही मी मतदान केले, तुम्हीही करा,’ असा संदेश त्यांनी दिला.

डॉ. मेहेंदळे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच एक शस्त्रक्रिया झाली होती. व्हीलचेअरच्या साहाय्याने ते फिरतात. ‘मतदान करायचे आहे, असे त्यांनी काही दिवसांपूर्वी आवर्जून सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी मतदान केले. मतदान करतानाची सर्व प्रक्रिया त्यांनी स्वतःच पार पाडली,' असे कर्नल प्रदीप मेहेंदळे यांनी 'मटा'ला सांगितले. दरम्यान, डॉ. मेहेंदळे यांना भांडारकर प्राच्यविद्या संस्थेकडून उद्या
संध्याकाळी पाच वाजता एका कार्यक्रमात संस्थेचे सदस्यत्व बहाल करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काचेला तडा गेला, सात तास विमान रखडले

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

विमानाच्या काचेला तडा गेल्यानं पुणे विमानतळावर स्पाईस जेटचं विमान सात तासापासून रखडले आहे. त्याचा ४० उद्योगपतींसह सर्वच प्रवाशांना फटका बसला आहे.

आज सकाळी ७.२० वाजता विमानतळावरून विमान निघणार होतं, पण ८ वाजता बोर्डिंग सुरु केलं. २० मिनिटांनी प्रवाशांना पुन्हा खाली उतरवलं आणि १०.३० वाजता विमान निघेल असं प्रवाशांना सांगण्यात आलं. पुन्हा १२.३० वाजता आणि आता३.३० वाजता विमान उड्डाण घेणार असल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. दर दोन तासांनी विमान उड्डाण घेणार असल्याची घोषणा केली जात असल्याने सात तासापासून विमानतळावर तिष्ठत बसलेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

विमानाच्या पुढच्या काचेला तडा गेला आहे, ती बदलल्यावरच विमान सोडण्यात येईल, अशी माहिती देण्यात येत आहे. पण आधी काच तडकलेली असताना तसंच घेऊन जाणार होता का?, असा सवाल प्रवाशी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील निकालाची उत्सुकता

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे ​जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सुमारे ७० टक्के मतदारांनी मतदान केल्याने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढलेले सुमारे चार टक्के मतदान कोणाच्या पदरात पडले, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या ​​जिल्ह्यात भाजप शिरकाव करणार का, हे निकालाने स्पष्ट होणार असल्याने जिल्ह्यातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या ७५ गट आणि पंचायत समितीच्या १५० गणांसाठी मंगळवारी मतदान झाले. जिल्ह्यात २७ लाख ९२ हजार २४५ मतदार असून, त्यापैकी १९ लाख ५० हजार १५२ मतदारांनी मतदान केले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ६९.८७ झाली आहे. हे प्रमाण गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ४.२७ टक्क्यांनी जास्त झाले आहे. गेल्या निवडणुकीत ६५.६० टक्के मतदान झाले होते.
मतमोजणी सकाळी दहानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये होणार आहे. त्यासाठी १३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, भाजपने नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या माध्यमातून या बाले​​किल्ल्यात शिरकाव केला आहे; तसेच मतदानाचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी मुळशी आणि दौंड हे दोन तालुके वगळता अन्य सर्व तालुक्यांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढले आहे.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यामध्येही सुमारे पाच टक्के मतदान वाढले आहे. गेल्या निवडणुकीत ६६.३४ टक्के मतदान झाले होते. यंदा ७१.४३ टक्के मतदान झाले आहे.
शिरूर तालुक्यातील मतदारांनी भरघोस मतदान केले आहे. सुमारे ७५.६४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत सुमारे नऊ टक्के मतदान वाढले आहे. त्यामुळे शिरुरमधील निकालाकडे लक्ष असणार आहे. वेल्ह्यातही मतदान ७५.३० टक्के झाले आहे. मात्र, गेल्या निवडणुकीतही या भागात सुमारे ७३ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे फारसा फरक पडलेला नाही. अन्य तालुक्यांमध्येही मतदान वाढले आहे. हे वाढलेले मतदान कोणाला मिळाले, हे निकालानंतर स्पष्ट होईल.
...............
तालुकानिहाय मतमोजणीची ठिकाणे

जुन्नर : लेण्याद्री भक्त भवन सभागृह क्रमांक दोन, गोळेगाव.

आंबेगाव : अदिवासी विकास विभागाचे इंग्रजी माध्यमाची शाळा, घोडेगांव.

शिरूर : कुकडी हॉल, कुकडी वसाहत, शिरूर.

खेड : हुतात्मा शिवराम हरी क्रीडा संकुल, राजगुरूनगर.

मावळ : महसूल भवन, वडगाव मावळ.

मुळशी : राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, मुळशी.

पुरंदर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दिवे, पुरंदर.

दौंड : शासकीय धान्य गोदाम, दौंड.

वेल्हे : पंचायत समिती, जुने सभागृह, वेल्हे.

भोर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोर.

बारामती : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोडाउन, बारामती.

इंदापूर : सरकारी धान्य गोदाम, कालठण रोड, इंदापूर.

हवेली : शिवाजीनगर धान्य गोदाम क्रमांक बी - ७, शिवाजीनगर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पान टपऱ्यांचे सर्वेक्षण

0
0

विनापरवाना दुकानांसाठी पुणे कँटोन्मेंट बोर्डाचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या विनापरवाना पान टपऱ्यांकडून देखभाल दुरुस्तीचा खर्च वसूल करण्यात बोर्डाच्या प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे सर्व पान टपऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय बोर्डाच्या प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात बोर्डाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर देखभाल दुरुस्तीचा खर्च किती घ्यायचा, याचा
निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
बोर्डाच्या हद्दीत १९८५ सालापासून पान टपऱ्यांना विक्री करण्यासाठी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. ही जागा भाडेतत्त्वावर अर्थात देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आली आहे. अकरा महिन्यांच्या करारावर ही जागा देण्यात आली होती. त्यानंतर त्या जागेची मुदतवाढ करणे अपेक्षित होते. परंतु, पान विक्रेत्यांकडून त्या जागा वापरासंदर्भात बोर्डाकडून कोणतीही मुदतवाढ करून घेण्यात आली नाही. तशा परिस्थितीत काही टपरीधारकांनी स्वतः त्या जागेवर विक्री न करता इतरांना त्या जागा वापरण्यास दिल्या आहेत. त्या बदल्यात त्यांच्यांकडून भली मोठी रक्कमही वसूल केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत २०१५ मध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली होती.
बोर्डाच्या हद्दीत १९८५ साली पान टपरीचा व्यवसाय करण्यासाठी विक्रेत्यांना परवानगी दिली होती. ही मुदत ठराविक मर्यादेपुरती होती. परंतु, अनेक पान टपऱ्यांनी त्या मुदतीनंतर पुन्हा परवाना नूतनीकरण केले नाही. तसेच बोर्डाने त्यांच्याकडून देखभाल दुरुस्तीचा खर्च किती वसूल करायचा हे निश्चित केले नाही. त्यामुळे त्या खर्चाची फेररचना करावी आणि नेमक्या पान टपऱ्या किती आहेत, यासाठी सर्व्हे करण्यात येणार आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
‘सध्या प्रत्येक ठिकाणच्या पान टपरीधारकाला एकच शुल्क आकारले जाते. परंतु, कँटोन्मेंटच्या हद्दीतील लष्कर भागात काही पान टपऱ्या या मॉलमध्ये अथवा मॉलच्या परिसरात आहेत. त्याशिवाय एखाद्या पान टपरीमुळे वाहतुकीला अडथळा होत नाही ना, याची खातरजमा आम्ही करून घेणार आहोत. तसेच शाळा परिसरात काही पान टपऱ्या आहेत का, याचीही माहिती सर्व्हेतून घेतली जाणार आहे,’ असे पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिका नॅचरल आइसक्रीम

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
आइसक्रीम हा आबालवृध्दांना भुरळ पाडणारा पदार्थ. कधीही आणि कोणत्याही वेळी आइसक्रीम खाण्याला कोणाचीच कधी ना नसते. पण बाहेर मिळणारे आईसक्रीम आरोग्याला चांगले असतेच असे नाही. यासाठीच तर नॅचरल आइसक्रीम ही संकल्पना रुजली आहे. आइसक्रीमचा ‘हेल्दी’ आणि नैसर्गिक असा प्रकार शिकण्याची संधी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबने उपलब्ध केली आहे.
खायला चविष्ट, नैसर्गिक फळांनी बनलेले आणि कोणत्याही प्रकारचे प्रीझर्वेटिव्ह आणि स्टॅबिलायझर न वापरलेले असे नॅचरल आइसक्रीम बनवण्याची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळात ही कार्यशाळा घेण्यात येईल. नीलम ढमाळ-शिंदे या ही कार्यशाळा घेतील. निगडीच्या इन्स्पिरिया मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावर एकलव्य हॉलमध्ये ही कार्यशाळा होणार आहे.
सदर कार्यशाळेत कोणत्याही मशिनविना तयार करता येईल, असे नॅचरल आईस्क्रीम शिकवले जाईल. यात टेंडर कोकोनट, बटरस्कॉच, मोका, संत्रा-मंत्रा, टूटी-फ्रूटी, फालूदा, कुकीज आणि मिंट, चॉकलेट ब्राउनी असे आइसक्रीमचे विविध प्रकार शिकवले जाणार आहेत. सध्या उन्हाची झळ बसत असताना थंडगार असे आइसक्रीम खायला प्रत्येकालाच आवडेल, याच विचाराने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सगळेच आरोग्यपूर्ण खाण्याचा ट्रेंड सध्या रुजत असल्याने आइसक्रीम हा पदार्थ त्यात मागे कसा राहिल? नॅचरल आइसक्रीममुळे लहान मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येते. बनवायला सोपे आणि खायला रुचकर असे नॅचरल आइसक्रीम सगळ्यांचीच पसंती ठरतेय.
सर्वांसाठी ही कार्यशाळा खुली असून कल्चर क्लबच्या सदस्यांना यासाठी विशेष सवलत मिळणार आहे. आपले नाव नोंदवण्यासाठी ९९७५४०४०२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारभाऱ्यांबाबत उत्सुकता शिगेला

0
0

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच काँग्रेसेतर सत्ता येणार की राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेची हॅटट्रीक पूर्ण करणार? याविषयीची उत्सुकता अवघ्या काही तासांनी संपुष्टात येणार आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत सहा निवडणुका झाल्या. त्यामध्ये एकत्रित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. एकदाही विरोधकांना सत्ता मिळालेली नाही. यंदाच्या निवडणुकीमध्ये ही संधी मिळेल, अशी विरोधकांना अपेक्षा आहे. तर, सत्तेची हॅटट्रीक करणारच, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. राजकीय कोलांटउड्या आणि पार्लमेंट ते पालिका या भाजपच्या ध्येयामुळे चुरस निर्माण झाली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९८६ मध्ये झाली. एकसदस्यीय पद्धतीने ६० नगरसेवक निवडून आले. त्यामध्ये काँग्रेस (आय) २४, काँग्रेस (एस) १०, भारतीय जनता पक्ष ५, जनता दल ३, शिवसेना १ आणि अपक्ष ७ असे पक्षीय बलाबल होते. महापौरपदासाठी ज्ञानेश्वर लांडगे आणि सोपान भोईर यांच्यात लढत झाली. त्यामध्ये दोघांनाही समान मते मिळाली. त्यानंतर दुसऱ्यांदा निवडणूक झाली. त्यामध्ये लांडगे यांनी विजय मिळवून पहिले महापौर होण्याचा मान मिळविला. उपमहापौरपदी अपक्ष नगरसेवक हनुमंत भोसले विराजमान झाले.
दुसरी सार्वत्रिक निवडणूक १९९२ मध्ये झाली. नगरसेवकांची संख्या ७८ होती. त्यामध्ये काँग्रेस ३३ आणि अपक्ष ३२ नगरसेवक निवडून आले. भाजप ४, समाजवादी काँग्रेस २, शिवसेना ४, जनता दल, बहुजन समाज पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष प्रत्येकी एक असे बलाबल होते. या निवडणुकीत काँग्रेसचे आझमभाई पानसरे चिंचवड स्टेशन प्रभागातून बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे त्यांना महापौरपदाची संधी मिळाली. तिसरी निवडणूक १९९७ मध्ये ७९ जागांसाठी झाली. त्यामध्ये काँग्रेस (आय) ४६, अपक्ष १४, शिवसेना ९, भाजप ८, पिंपरी-चिंचवड आघाडी २ असे पक्षीय बलाबल होते. त्यावेळी पहिल्या महिला महापौर होण्याचा मान अनिता फरांदे यांना मिळाला. महिला म्हणून सर्वसाधारण जागेतून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फरांदे यांना संधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.
चौथी २००२ ची निवडणूक तीन सदस्यीय प्रभागपद्धतीनुसार झाली. ३५ प्रभागांतून १०५ नगरसेवक निवडून आले. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रथमच स्वतंत्ररित्या निवडणूक लढविली आणि क्रमांक एकचा पक्ष ठरला. या पक्षाचे ३६ नगरसेवक निवडून आले. त्याखालोखाल काँग्रेस ३३, शिवसेना ११, भाजप १३ आणि अपक्ष १२ असे पक्षीय बलाबल होते. दोन्ही काँग्रेसने अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली. महापौरपदी प्रकाश रेवाळे यांना संधी मिळाली. पाचवी निवडणूक २००७ मध्ये प्रभागपद्धतीने झाली. १०५ नगरसेवक निवडून आले. यामध्ये सर्वाधिक जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेस ६०, काँग्रेस १९, अपक्ष ११, भाजप ९, शिवसेना ५ आणि आरपीआय एक असे पक्षीय बलाबल होते. इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या महापौरपदी डॉ. वैशाली घोडेकर यांना संधी मिळाली. सहावी २०१२ ची निवडणूक द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार झाली. त्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली. या पक्षाचे तब्बल ८३ नगरसेवक निवडून आले. त्याखालोखाल काँग्रेस १४, शिवसेना १४, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ४, भाजप ३, अपक्ष ९ आणि रिपब्लिकन पक्ष १ असे पक्षीय बलाबल राहिले. त्यानंतर मोहिनी लांडे यांना महापौरपदाचा मान मिळाला.
यंदा ३२ प्रभागातून १२८ नगरसेवक निवडून येणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे भाजपला सत्तेचा दरवाजा उघडणार कि राष्ट्रवादी काँग्रेस हॅटट्रिक करणार, ही बाब काही तासांता स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांनी स्वतः गाड्या चालवाव्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
परदेशात पोलिस अधिकारी स्वतः गाड्या चालवितात. हा ‘ट्रेंड’ आपल्याकडे आणून प्रत्येक अधिकाऱ्याने स्वतः गाडी चालवावी, अशी अपेक्षा राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी व्यक्त केली. चालकांकडून गाड्या व्यवस्थित हाताळल्या जात नसल्यामुळे त्या लवकर खराब होतात. या गाड्या अत्याधुनिक असून त्या व्यवस्थित हाताळा, अशी सूचना त्यांनी चालकांना केली.
पोलिस मध्यवर्ती मोटार परिवहन विभाग येथे महिंद्रा अॅण्ड महिंद्रा टीयूव्ही ३०० या अत्याधुनिक शंभर गाड्या पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्या उपस्थित महाराष्ट्र पोलिस दलाकडे हस्तांतरित करण्यात आल्या. या वेळी माथूर बोलत होते. याप्रसंगी पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय कुमार, वायरलेस विभागाचे प्रमुख रितेश कुमार, पुण्याचे सहपोलिस आयुक्त सुनील रामानंद, विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेशकुमार मेखला, संजीव कुमार सिंघल, अर्चना त्यागी आणि मोटार परिवहन विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील उपस्थित होते.
माथूर म्हणाले, ‘दळणवळणाच्या सुविधा निर्माण करून पोलिस दल अत्याधुनिक करण्यावर भर देण्यात येत आहे. मनुष्यबळ कमी असल्यामुळे तंत्रज्ञानाचा जास्तीत वापर करा, अशा सूचना शासनाकडून मिळाल्या आहेत. त्यानुसार पोलिस दलात अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांच्या मागणीनुसार महिंद्रा कंपनीने कमीत-कमी वेळात अत्याधुनिक अशा शंभर गाड्या पोलिस दलास तयार करून दिल्या.’
पूर्वी पोलिस महानिरीक्षक होईपर्यंत त्यांच्या गाड्यांमध्ये एअर कंडीशनची सुविधा नव्हती. पण, आता विचार बदलत आहेत. पोलिस दलावर कोणती बंधने राहिलेली नाहीत. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना सुद्धा अत्याधुनिक अशा गाड्या मिळत आहेत. एक-दोन वर्षांत आणखी काही गाड्या दाखल होतील. यामुळे पेट्रोलिंगसाठी अत्याधुनिक गाड्या मिळतील. गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचण्याची वेळ आणखी कमी होईल. शहरात सध्या आठ मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहोचत आहेत. तर, जिल्ह्यात २० मिनिटांत दाखल होतात. या गाड्यामुळे त्यामध्ये नक्कीच फरक पडेल, असे त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, की मोटार परिवहन विभागान या वर्षभरात ९५० वाहने खरेदी केली आहेत. पहिल्यांदाच
अत्याधुनिक अशा शंभर गाड्या दाखल होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राज्य नाट्य’चा वाजला बिगुल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे आयोजित ५६व्या राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला बुधवारी सुरुवात झाली. राज्यभरातील २२ केंद्रांवरील प्रथम क्रमांक पटकावलेली २२ नाटके अंतिम फेरीत दोन अंकी नाटके सादर करणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी सांस्कृतिक कार्य संचलनालयाचे सहायक संचालक भारत लांघी, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचे सल्लागार मिलिंद लेले, स्पर्धेचे परीक्षक श्यामराव जोशी, विश्वास मेहेंदळे, सुधा देशपांडे, सुरेश गायधने, हेमंत एदलाबादकर आदी या वेळी उपस्थित होते. नाट्य भारती या इंदूरच्या संस्थेतर्फे प्रस्तुत आणि श्रीराम जोग लिखित व दिग्दर्शित ‘काही तरी करा रे’ या नाटकाने स्पर्धेचा शुभारंभ झाला.
२२ ते ४ मार्च दरम्यान ही स्पर्धा भरत नाट्य मंदीर आणि टिळक स्मारक मंदीर येथे रंगणार असून मुंबई, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, चंद्रपूर, सोलापूर, पुणे, इंदूर, गोवा, नागपूर, अशा २२ केंद्रांवरून आलेल्या २२ नाटकांमधून प्रथम तीन नाटकांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील
नाटकांसाठी लागणाऱ्या प्रवेशिका अत्यंत अल्पदरात भरत नाट्य मंदिर आणि टिळक स्मारक मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यमान नगरसेवक आमनेसामने

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकीत विविध पक्षांकडून उमेदवारी मिळवून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या शंभर विद्यमान उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी जाहीर होणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर ठरणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या शंभर विद्यमान नगरसेवकांपैकी २९ नगरसेवक एकमेकांच्या विरोधात लढत असून, यापैकी १५ विद्यमान आपोआपच घरी बसणार आहेत. पालिकेच्या सभागृहात पुन्हा जाण्यासाठी या सर्वांनी जोरदार ताकद लावून निवडणूक लढविली असून, गुरुवारी याचा निकाल जाहीर झाल्यानंतर किती विद्यमान पुन्हा पालिकेत‌ जाणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
महापालिकेच्या ‌निवडणुकीला सामोरे जाताना सर्वच पक्षातील विद्यमान नगरसेवकांनी पुन्हा तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते, तर काहींनी तिकीट मिळत नसल्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढविली आहे. राज्य सरकारने चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचे जाहीर केल्याने काही विद्यमानांचे पत्ते आपोआपच कट झाले, तर काही उमेदवारांचे तिकीट पक्षाने कापल्याने नाराज होऊन अनेकांनी बंडखोरी करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. महापालिकेत विद्यमान असलेल्या १५२ नगरसेवकांपैकी या निवडणुकीत सुमारे १०० उमेदवारांना विविध पक्षांनी पुन्हा निवडणुकीची संधी दिली आहे, तर प्रभागातील आरक्षणामुळे अनेक पक्षांनी विद्यमान नगरसेवकांच्या पत्नी, पती, मुलगा, दीर, सून, यांना तिकीटे दिली आहेत.
महापालिकेच्या ४१ प्रभागांपैकी १३ प्रभागांमध्ये पालिकेत विद्यमान असलेले नगरसेवक एकमेकांच्या विरोधात लढणार असून, एका प्रभागात तीन विद्यमानांमध्ये तिरंगी लढत होणार असल्याने २९ विद्यमान नगरसेवकांमध्ये लढत होणार आहे. डेक्कन जिमखाना, मॉडेल कॉलनी या प्रभाग क्रमांक १४ मध्ये स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब बोडके राष्ट्रवादी काँग्रेसकडून, विद्यमान उपमहापौर मुकारी अलगुडे काँग्रेस, शिवसेनेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राजू पवार यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. याच प्रभागातून शिवसेनेच्या नीता मंजाळकर आणि भाजपच्या नी‌लिमा खाडे यांच्यात लढत होणार असल्याने पाच विद्यमान नगरसेवक या प्रभागातून लढत आहेत. प्रभाग क्रमांक दोन फुलेनगर, नागपूर चाळमधून गेली पाच वर्षे राष्ट्रवादीला महापालिकेत पा‌ठिंबा देणारे आरपीआयचे डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि राष्ट्रवादीचे सुनील गोगले यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग ७ मध्ये सर्वसाधारण जागेवर काँग्रेसचे दत्ता बहिरट आणि अपक्ष उमेदवार रेश्मा भोसले, प्रभाग ८ मध्ये काँग्रेसचे कैलास गायकवाड विरुद्ध भाजपचे प्रकाश ढोरे, प्रभाग ९ मध्ये सर्वसाधारण जागेवरून राष्ट्रवादीचे बाबूराव चांदेरे व शिवसेनेचे सनी निम्हण यांच्यात लढत होणार आहे.
बावधन, कोथरूड डेपो या प्रभाग क्रमांक १० मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रभागातून सभागृह नेते बंडू केमसे राष्ट्रवादीकडून आणि मनसेचे किशोर शिंदे एकमेकांसमोर आहेत. प्रभाग क्र. १६ मध्ये ओबीसी प्रवर्गातून भाजपचे गणेश बीडकर आणि अपक्ष रवींद्र धंगेकर, प्रभाग २३ मध्ये ओबीसी महिला प्रवर्गातून राष्ट्रवादीच्या वैशाली बनकर आणि शिवसेनेच्या विजया कापरे, प्रभाग २६ मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून नंदा लोणकर आणि काँग्रेसच्या विजया वाडकर, प्रभाग २९ मध्ये ओबीसी प्रवर्गातून राष्ट्रवादीचे विनायक हनमघर आणि शिवसेनेचे अशोक हरणावळ, प्रभाग ३५ मधून सर्वसाधारण जागेवरून राष्ट्रवादीचे सुभाष जगताप व शिवसेनेचे शिवलाल भोसले; तसेच प्रभाग ४० मध्ये भाजपचे अभि‌जित कदम व मनसेचे वसंत मोरे यांच्यात सरळ लढत होणार आहे. या लढतीमुळे १५ विद्यमान आपोआपच घरी बसणार आहेत. हे विद्यमान कोण असतील, यावर गुरुवारी निकालानंतर शिक्कामोर्तब होणार आहे.
राष्ट्रवादीचे २२, तर काँग्रेसचे १२
गेली दहा वर्षे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वसाधारण २२ विद्यमान नगरसेवकांना पक्षाकडून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने १२, भाजपने १५, शिवसेनेने ८, तर मनसेने १५ विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाशिवरात्रीनिमित्त जादा एसटी गाड्या

0
0

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या आठवड्यात २४ तारखेला महाशिवरात्र आहे. भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यांच्यासाठी प्रवासाची चांगली सोय उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड, राजगुरू नगर, तळेगाव, नारायण गाव, शिरूर, बारामती, इंदापूर, सासवड, दौंड आणि भोर या अगारातून प्रवाशांच्या गर्दीनुसार जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागीय नियंत्रक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एक्स्प्रेस-वेचा टोल बंद करा’

0
0

पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर टोल आकारणीचे उद्दिष्ट नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झालेले आहे. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेली या मार्गावरील टोल वसुली तातडीने बंद करा, अशी मागणी सजग नागरी मंचाने केली आहे. तसेच, या मागणीबाबतची दुसरी कायदेशीर नोटीस राज्य सरकार व राज्य रस्ते विकास महामंडळाला पाठविली आहे. टोल वसुली बंद न झाल्यास कोर्टात धाव घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने येत्या १५ दिवसांत टोल वसुली बंद करावी अन्यथा मुख्यमंत्री, राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) मंत्री व व्यवस्थापकीय संचालक यांच्याविरोधात गुन्हा तक्रार दाखल करण्याचा इशारा सजग नागरी मंचाने ३१ जानेवारीला दिला होता. त्यावेळी कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही सांगितले होते. मात्र, त्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित संस्था व व्यक्तींना नोटीस पाठविण्याची कार्यवाही त्यांच्याकडून केली जात आहे.
एक्स्प्रेस वेवर ऑगस्ट २०१९ पर्यंत दोन हजार ८६९ कोटी रुपये टोलद्वारे वसूल करण्याचे उद्दिष्ट होते. ऑक्टोबर २०१६ अखेर २८६७ कोटी रुपये वसूल झाले होते. नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीच्या निर्णयानंतर टोल आकारणी बंद ठेवल्यामुळे संपूर्ण महिन्यात केवळ १३ कोटी जमा झाले. त्या वेळी टोल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होऊनही टोल वसुली सुरूच ठेवल्याने डिसेंबर महिन्यात ४३ कोटी रुपये अतिरिक्त जमा झाले. अद्यापही टोल वसुली सुरूच आहे. याबाबत मुख्यमंत्री, ‘एमएसआरडीसी’चे मंत्री एकनाथ शिंदे व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना टोल आकारणी बंद करण्याबाबत नोटीस पाठविली आहे, अशी माहिती विवेक वेलणकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटीच्या दिवशीही भरता येणार वीजबिल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
थकीत वीजबिलांची वसुली करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात ‘महावितरण’कडून मोहीम सुरू असून, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे २४ ते २६ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार आहेत.
थकीत वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे चालू वीजबिलांचा किंवा थकबाकीचा भरणा करता यावा, यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा या पाच जिल्ह्यांच्या शहरी आणि ग्रामीण भागातील ‘महावितरण’ची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र २४ ते २६ फेब्रुवारीला सुरू राहणार असल्याचे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले.
थकबाकीदारांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केंद्रे; तसेच घरबसल्या ऑनलाइन पेमेंटसाठी ‘महावितरण’ची www.mahadiscom.in ही वेबसाइट आणि मोबाइल अॅपचा पर्याय उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जिल्हा परिषद आणि महापालिकेची मतमोजणी आज शहरातील विविध ठिकाणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शिवाजीनगर धान्य गोडाउन आणि वानवडी येथील शिवरकर रोडवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. उमेदवार, कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
धान्य गोडाउन, शिवाजीनगर
- शिवाजी पुतळा चौक ते कामगार पुतळा चौक दरम्यान न्या. रानडे मार्गावर सर्व वाहनांना प्रवेश बंद.
- अण्णाभाऊ साठे चौक (डेंगळे पूल) ते धान्य गोडाउन शिवाजीनगर (कोर्ट गेट क्रमांक ४) या दरम्यान वाहनांना प्रवेश बंद.
- कामगार पुतळा चौक ते धान्य गोडाउन, शिवाजीनगर येथे वाहनांना प्रवेश बंद.
पार्किंग कोठे करा
जिल्ह्यातून येणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी ‘सीओईपी’ इंजिनीअरिंग कॉलेजचे मैदान; तसेच शिवाजी मिलिटरी हायस्कूलचे मैदान, कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर वाहने पार्क करण्यात यावीत.
वानवडी येथील सांस्कृतिक भवन, शिवरकर रोड
- जगताप चौक ते महाराष्ट्र बँक चौक दरम्यान शिवरकर रोडवर सर्व वाहनांना प्रवेश बंद.
- हडपसर व भैराबानाला येथून जाणाऱ्या जड वाहनांना फातिमानगर चौकातून जाण्यास मनाई.
- फातिमानगर येथून येणाऱ्या वाहनांनी बँक ऑफ महाराष्ट्र चौकातून उजवीकडे वळावे.
- केदारी पंप चौकाकडून येणाऱ्या वाहनचालकांनी जगताप चौकातून उजवीकडे वळावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा वाजता मतमोजणीला सुरुवात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (२३ फेब्रुवारीला) होत असून, सकाळी दहा वाजल्यापासून शहरातील १४ मतदार केंद्रांवर मतमोजणी केली जाणार आहे. या मतमोजणीनंतर महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याचा निर्णय होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार यंदा सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्रांवर आवश्यक त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक केंद्रावरील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आवश्यकतेनुसार पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
महापालिकेच्या ४१ प्रभागातील १६२ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. या निवडणुकीत १०९० उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत. ३४३१ मतदान केंद्रांवर झालेल्या या मतदानाच्या मतमोजणीसाठी प्रत्येक क्षे‌त्रीय कार्यालय प्रभागनिहाय मतमोजणी केंद्र उभारण्यात आले असून, १४ ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. यामध्ये कोरेगाव पार्क येथील अन्न महामंडळ गोदाम, बालेवाडी
स्टे‌डियम, पुरंदर बहुउद्देशीय केंद्र, गणेश कला क्रीडा केंद्र, बाबूराव सणस ग्राउंड आदी ठिकाणांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक - मतमोजणीचे ठिकाण
८ आणि ९ - पुरंदर बहुउद्देशीय केंद्र, सकाळनगर
७, १४, १६ - बालेवाडी स्टे‌डियम
१०, ११, १२ - एमआयटी शाळा, कोथरूड
१३, ३१, ३२ - पं. दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर, पौड फाटा
१, २, ६ - अन्न महामंडळ गोदाम, कोरेगाव पार्क
३, ४, ५ - भिकू राजाराम पठारे प्राथमिक शाळा, खराडी
१८, १९, २० - अबुल कलाम आझाद हॉल, बंडगार्डन
१५, १७, २९ - डीईएस इंग्लिश मीडियम स्कूल, टिळक रस्ता
३०, ३३, ३४ - एस. पी. कॉलेज, टिळक रस्ता
२८, ३५, ३६ - गणेश कला क्रीडा मंच
२७, ३७, ४१ - बाबूराव सणस ग्राउंड
३८, ३९, ४० - धनकवडी महापालिका सहायक आयुक्त कार्यालय, कात्रज
२१, २२, २३ - साधना विद्यालय, हडपसर
२४, २५, २६ - सावित्रीबाई शिवरकर बहुउद्देशीय हॉल, वानवडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदोबस्तासाठी साडेतीन हजार पोलिस

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगपालिकेची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. पुण्यात १४, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ११ ठिकाणी मतमोजणी होणार आहे. एका ठिकाणी जिल्हा परिषदेची मतमोजणी होणार आहे. यासाठी पुणे पोलिसांकडून साडेतीन हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणीनंतर गडबड होऊ नये म्हणून संवेदनशील प्रभागात बंदोबस्त केला आहे. विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली.
पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण २५ ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी गडबड होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे; तसेच चार पोलिस उपायुक्त, आठ सहायक आयुक्त, ५२ पोलिस निरीक्षक, १०४ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, १४०० पोलिस कर्मचारी, दोन एसआरपीएफच्या कंपन्या, शिघ्र कृती दलाची चार पथके असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांचा वेगळा बंदोबस्त राहील. एका मतदान केंद्राच्या ठिकाणी साधारणतः शंभर पोलिस तैनात करण्यात येतील. मतमोजणीसाठी एकूण साडेतीन हजारांचा बंदोबस्त राहील. मतमोजणीनंतर गडबड होण्याची शक्यता असलेले बाणेर बालेवाडी, लोहियानगर-कासेवाडी, पिंपरी परिसरातील काही ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
मतदानाच्या दिवशी १५ गुन्हे दाखल
मतदानाच्या दिवशी दखलपात्र तीन व अदखलपात्र १२, असे एकूण पंधरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंजवडी, पिंपरी परिसरात हे गुन्हे दाखल आहेत; तसेच मतदानाच्या वेळी शहरात किरकोळ घटना घडल्यामुळे बारा अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून या वर्षी आतापर्यंत अचारसंहिता भंगाचे ११९ गुन्हे दाखल झाले आहेत, असे पाठक यांनी सांगितले.
विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांवर बंदी
महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर उमेदवारांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला पोलिसांनी बंदी घातली आहे. याबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश सहपोलिस आयुक्त सुनील रामानंद यांनी काढले आहेत. मतमोजणी केंद्रात उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, त्यांच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना आतमध्ये प्रवेश असणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images