Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मर्दानी खेळांनी मानवंदना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवजन्मस्थळाची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ शहाजी राजे शिवज्योत रथ... एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ५१ स्वराज्य रथ... महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना... ढोलताशांचा गजर अन् सनई चौघड्यांच्या सुरावटीने भारावलेल्या मंगलमय वातावरणात शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. पुणेकरांना या मिरवणुकीमुळे पुन्हा एकदा शिवकाल अनुभवायला मिळाला.

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित केलेल्या शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळा या भव्य मिरवणुकीचे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, करवीर संस्थानाचे युवराज शहाजीराजे संभाजीराजे छत्रपती, संग्राम चौगुले, अमित गायकवाड; तसेच समितीच्या महिला सदस्यांच्या हस्ते लाल महालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. शहाजी राजे आणि जिजाऊ रथावरील शिवज्योतीचे प्रज्वलन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. या वेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, अ‍ॅड. प्रताप परदेशी, परागमामा मते, प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते.

मिरवणुकीचे यंदा पाचवे वर्ष होते. मिरवणुकीमध्ये सरदार घराण्यातील वंशज आणि स्वराज्य घराण्यांचे रथ त्यांचा गौरवशाली इतिहास सांगून सहभागी झाले होते. पाटील यांच्या रणरागिणींच्या महाराणी ताराराणी शौर्य पथकाचे उद्घाटन करण्यात आले. शिवगर्जना ढोलताशा पथकाच्या वादनाने उपस्थित नागरिकांना मंत्रमुग्ध केले. शिवगर्जना पथकाने मतदान करा, उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवा, अशा फलकांद्वारे मतदान जनजागृती केली. शिवकालीन मर्दानी युद्धकलेची प्रात्यक्षिके कोल्हापूर आणि पुण्यातील नामांकित पथकांनी सादर केली. प्रभात बँड देखील मिरवणुकीत सहभागी झाला होता. तसेच, सरलष्कर हंबीरराव मोहिते, सरदार गोदाजी जगताप या पराक्रमी स्वराज्य सैनानींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

गिरीश गायकवाड, दीपक घुले, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, दत्ताभाऊ पासलकर आदींनी संयोजन केले. दरम्यान, एसएसपीएमएस शाळेच्या प्रांगणातील महाराजांच्या पुतळयावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. उपक्रमाचे यंदा सहावे वर्ष होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​‘मटा मैफल’साठी कथा, कविता पाठवलीत का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा मैफल’ या साहित्यिक उपक्रमामध्ये तुम्ही तुमची कथा, लघुत्तम कथा किंवा कविता पाठवली आहे का? नसेल, तर घाई करा; कारण आपले साहित्य पाठविण्यासाठीची मुदत उद्या (दि. २१) संपते आहे. या वर्षी कथा स्पर्धेत गूढकथा आणि प्रेमकथा असे दोन विभाग आहेत. त्याबरोबर लघुत्तम कथा आणि कविता स्पर्धाही आहे. ही मैफल २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान स. प. महाविद्यालयात सजणार आहे.

‘मटा मैफल’च्या यंदाच्या वर्षीही दिग्गज साहित्यिकांचे विचार जाणून घेण्याची, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळणार आहे. त्याशिवाय साहित्य विषयक परिसंवाद, कवीकट्टा, अभिवाचन, मान्यवरांच्या मुलाखती, कार्यशाळा असा भरगच्च कार्यक्रम असेल. त्याचा तपशील लवकरच प्रसिद्ध होईल.

कथा स्पर्धेसाठी ५०० ते २,००० अशी शब्दमर्यादा आहे. लघुत्तम कथेसाठी शब्दमर्यादेची कसोटी आहे. जास्तीत जास्त १५० शब्दांत कथा मांडायची आहे. मटा मैफलीमध्ये कवीकट्टाही रंगणार आहे. या कट्ट्यावर सहभागी होण्यासाठी आधी कविता पाठवायच्या आहेत. पाठविलेल्या कवितांपैकी निवड झालेल्या कविता कवीकट्ट्यावर सादर करण्याची संधी मिळेल.

या स्पर्धांचा बक्षीस समारंभ कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. मराठी साहित्याच्या क्षेत्रातील नव्या प्रवाहांची दखल घेऊन त्यावर चर्चा घडवण्यासाठी, नव्या दमाच्या साहित्यिकांशी संवाद साधण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘मटा मैफल’ हे व्यासपीठ दोन वर्षांपूर्वी सुरू केले आहे. या उपक्रमाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

येथे पाठवा साहित्य

कथा, लघुकथा आणि कविता पाठवण्याची मुदत २१ फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यासाठीचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स हाउस, दुसरा मजला, गोपाळकृष्ण गोखले पथ (एफसी रोड), शिवाजीनगर, पुणे. लिफाफ्यावर कथा/लघुत्तम कथा स्पर्धा वा कविता असा स्पष्ट उल्लेख करावा. ई-मेलद्वारेही लेखन स्वीकारण्यात येणार असून, त्यासाठीचा मजकूर वर्ड आणि पीडीएफ फाइल अशा दोन्ही स्वरूपांत पाठवावा. लेखकाने आपला पूर्ण पत्ता आणि फोन क्रमांक द्यायला हवा; तसेच छायाचित्रही जोडायला हवे. लेखन पाठवण्यासाठी ई-मेल आयडी : mataamaifalpune@gmail.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचार थंडावला; लोकशाहीच्या उत्सवाचे वेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा महासंग्राम रविवारी सायंकाळी थंडावला. शहरातील सर्व प्रभागांत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार सांगतेनिमित्त जोरदार रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. राजकीय पक्षांच्या सर्व उमेदवारांसह मतदारांनाही आता उद्या, मंगळवारी होणाऱ्या मतदानाचे वेध लागले आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर शहरातील ४१ प्रभागांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. यापूर्वी पालिकेत एकत्र काम केलेले अनेक नगरसेवक एकमेकांविरोधात उभे राहिले असून, काही ठिकाणी हे नगरसेवक एका प्रभागातून पुन्हा लढणार आहेत. प्रभागाची हद्द वाढल्याने सुरुवातीला पदयात्रांद्वारे घरोघरी संपर्क साधण्यावर भर देण्यात आला होता. स्वतःची परिचयपत्रके पोहोचवण्याप्रमाणे पक्षाची भूमिका मांडणारा जाहीरनामा मतदारांना वितरित केला गेला.

गेल्या आठवड्यापासून शहराच्या सर्व भागांत प्रचारसभांना जोर चढला. त्यासाठी सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी शहरात हजेरी लावली होती. शहराच्या आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या प्रभागांच्या हद्दीत नेत्यांच्या सभा झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अशा प्रमुख नेत्यांच्या सभांनी शहरात वातावरणनिर्मिती झाली. या नेत्यांप्रमाणेच केंद्रीय स्तरावरील मंत्र्यांच्या सभा-मेळावे, राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या सभा आणि रोड-शो घेण्यात आले. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अखेरच्या दोन दिवसांत संपूर्ण प्रभागात पोहोचण्यासाठी प्रभागातील सर्व उमेदवारांनी एकत्र येऊन रॅली काढण्यावर भर दिला. या रॅलीच्या माध्यमातून प्रभागात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. तसेच, आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले. प्रमुख उमेदवार रॅली आणि प्रचारात व्यग्र असल्याने मतदारांना स्लिपा वाटण्याच्या कामाची जबाबदारी कार्यकर्त्यांकडे देण्यात आली होती. त्यासाठी नवनव्या तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात आला.

................

चौकट

दावे-प्रतिदावे

निर्विवाद बहुमत : भाजप

‘पुण्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न केवळ भारतीय जनता पक्षच साकार करू शकतो, असा विश्वास मतदारांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आम्हांला निर्विवाद बहुमत मिळेल,’ असा दावा भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केला.

स्पष्ट बहुमत : राष्ट्रवादी

‘गेल्या दहा वर्षांमध्ये शहराच्या विकासात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. या विकासकामांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा पुणेकर स्पष्ट बहुमत देतील,’ असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा अॅड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केला.

जागा वाढणार : काँग्रेस

‘पुणे शहराच्या विकासात काँग्रेसचे योगदान सर्वांत मोठे आहे. या निवडणुकीत मतदारांचा काँग्रेसला अधिक पाठिंबा मिळेल. त्या जोरावर महापालिकेतील जागांमध्ये वाढ होईल,’ अशी अपेक्षा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केली.

पुणेकरांचा पाठिंबा : शिवसेना

‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने गेल्या २५ वर्षांत स्वतःचा विकास केला आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही भाजपने शहरासाठी काहीच केलेले नाही. त्यामुळे पुणेकर पूर्णतः शिवसेनेच्या पाठीमागे उभे राहतील,’ अशी खात्री शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी व्यक्त केली.

विकासासाठी पर्याय : मनसे

‘राज्यात आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या भांडणाला मतदार कंटाळले आहेत. नागरिकांना विकास हवा आहे. चांगला पर्याय म्हणून पुणेकर मनसेकडे पाहत आहेत. मनसेने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांच्या जोरावर आमच्या जागांमध्ये आणखी वाढ होईल,’ अशी भूमिका मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेदहा कोटी रुपयांचा घोटाळा

$
0
0

तत्कालीन अध्याक्षांसह संचालक मंडळावर ठपका

Sujit.Tambade@timesgroup.com

Tweet : @sujittambadeMT

पुणे : राज्यात पुणे आणि मुंबई येथे कार्यक्षेत्र असलेल्या शिवशक्ती को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील संचालक मंडळाने पतसंस्थेच्या मुख्यालयातील रोख रकमेचा अपहार करून, तसेच संचालक आणि त्यांच्या नातेवाइकांना कर्जपुरवठा करून सुमारे दहा कोटी ६३ लाख ६१ हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष संजय कलाटे, प्रभारी महाव्यवस्थापक बाळकृष्ण पोळ आणि कार्यकारी संचालक नौशाद पीरजादे यांच्यासह संचालक मंडळाने हा घोटाळा केल्याचा ठपका सहकार खात्याने केलेल्या लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे.

कलाटे, पोळ आणि पीरजादे यांच्यासह उपाध्यक्ष राजेंद्र नेटके, संचालक आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, संचालिका सुभांगी वानखेडे, संचालक रोहिदास मुरकुटे, संचालक आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक दत्तात्रय साने, दिलीप कलाटे आणि मच्छिंद्र जांभुळकर यांनी या आर्थिक घोटाळ्यात साह्य केल्याचाही ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून व्याजासह रक्कम वसूल करण्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. एस. के. पाटील यांनी हे विशेष लेखापरीक्षण करून सहकार खात्याकडे १३ फेब्रुवारीला अहवाल सादर केला आहे.

या पतसंस्थेचे मुख्यालय बाणेर गाव येथे असून, लेखपरीक्षण सुरू असताना २४ नोव्हेंबर २०१६ रोजी कॅशबुकची तपासणी करण्यात आली. त्यावरून बँकेत सुमारे सहा कोटी ६४ लाख २० हजार रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. ही रक्कम महाव्यवस्थापक पोळ यांच्या ताब्यात होती; मात्र प्रत्यक्षात फक्त २४ हजार २९५ रुपये शिल्लक होते. उर्वरित सहा कोटी ६३ लाख ९६ हजार रुपयांचा अपहार केल्याचे तपासणीत आढळून आल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पतसंस्थेला रोख रकमेची गरज नसताना आणि कोणतेही कारण नसताना बँकांतील ओडी कर्जखात्यांतून सुमारे तीन कोटी ४५ लाख ८० हजार रुपयांचा अपहार केल्याचेही निदर्शनास आले आहे. संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष संजय कलाटे आणि कार्यकारी संचालक नौशाद पीरजादे यांनी सहीचे अधिकार बदलून ते स्वतः‍कडे घेतले. त्यानंतर संयुक्त सहीने सहा बँकांतील ओडी कर्जखात्यांतून रक्कमा काढण्यात आल्या आहेत. सहा बँकांमधून १३ वेळा ओडी कर्जखात्यांतून रक्कम काढून आणताना चेकच्या मागील बाजूला पीरजादे, पोळ आणि लिपिक शेखर कसाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत; मात्र काही ठिकाणी बलराज खन्ना या पतसंस्थेशी संबंधित नसलेल्या व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या आहेत. या रकमा कलाटे, पीरजादे आणि पोळ यांनी संगनमताने काढून अपहार केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.

पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात कार्यालयीन कामकाजासाठी जमा झालेल्या सुमारे एक कोटी ८० लाख ६० हजार रुपयांचाही अपहार करण्यात आला आहे. या रकमा मुख्य कार्यालयाने कॅशबुकला जमा केल्या नाहीत. या अपहारास कलाटे, पीरजादे आणि पोळ यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

बाणेर येथील मुख्यालयासह या पतसंस्थेच्या पुणे आणि मुंबईत सात शाखा आहेत. गेल्या तीन वर्षांत केलेल्या लेखापरीक्षणामध्ये या पतसंस्थेला क आणि ब दर्जा मिळाला आहे. २०१५-१६ या वर्षीच्या लेखापरीक्षणात ड दर्जा मिळाला आहे. या पतसंस्थेचे ९५८२ सभासद आहेत.

...................

‘राजकीय सूडबुद्धीने चौकशी’

‘राजकीय सूडबुद्धीने लेखापरीक्षण करून आमच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. केवळ २०१५-१६ या वर्षीचे लेखापरीक्षण करण्याऐवजी २०१०पासून लेखापरीक्षण करा. पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी माझ्या स्वाक्षऱ्या घेऊन हा घोटाळा केला आहे,’ असा दावा पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष संजय कलाटे यांनी केला आहे.

.................

‘दोषींवर कारवाई होईल’

‘या पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या कलम ८८अंतर्गत कारवाई केली जाईल. संबंधितांकडून वसुली करण्यात येईल,’ असे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान करा, पेट्रोल मोफत मिळवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरातील संस्था संघटनांनी मतदान करणाऱ्यांना विविध योजना जाहीर केल्या आहेत. मतदानाचा हक्क बजाविणाऱ्या नागरिकांना ‘इको क्लीन कार्स’च्या वतीने त्यांची गाडी ‘मोफत वॉश’ करून दिली जाणार आहे. तसेच, पेट्रोल डिलर असोसिएशन आणि ‘क्रेडाई पुणे’च्या वतीने मोफत पेट्रोल दिले जाणार आहे.

निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या वतीने जनजागृती मोहीम राबविली जात आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने विविध संघटना, स्वंयसेवी संस्था, शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, महिला संघटना, कर्मचारी संघटना, औद्योगिक आस्थापना यांच्याशी संपर्क साधून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे, यासाठी पुणे शहरातील पेट्रोल पंप डीलर असोसिएशन व क्रेडाई संस्थेच्या वतीने मोफत पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी (२१ फेब्रुवारीला) शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर सर्वांत प्रथम मतदानासाठी आलेल्या शंभर पुरुष आणि शंभर मतदारांना केंद्राच्या बाहेर आल्यानंतर ‘स्क्रॅच कार्ड’ (कुपन्स) दिले जाणार आहे. या कुपन्समधील प्रत्येकी पाच कार्डावर मोफत एक लिटर पेट्रोल दिले जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर अशा पद्धतीने दहा मतदारांना मोफत पेट्रोल दिले जाणार आहे. शहरातील ३४३१ केंद्रांवर ही सुविधा दिली जाणार आहे. मतदानाच्या दिवशी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत महापालिका हद्दीतील पेट्रोल विक्री होत असलेल्या कोणत्याही केंद्रावर जाऊन मतदारांना हे एक लिटर मोफत पेट्रोल भरता येणार आहे. पेट्रोल डीलर असोसिएशनचे समीर लडकत आणि सागर रूकारी यांनी ही माहिती दिली.

कोथरूड, गांधी भवन येथील ‘इको क्लीन कार्स’च्या वतीने देखील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. मतदान करणाऱ्या नागरिकांनी मतदान केल्याची निशाणी दाखविल्यानंतर त्यांची कार मोफत धुऊन दिली जाणार आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत ही सेवा दिली जाणार असल्याचे ‘इको कार्स’चे श्रीराम टेकाळे यांनी सांगितले. अधिकाधिक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी हा उपक्रम सलग चौथ्यांदा राबविला जात आहे. यापूर्वी महापालिकेच्या २०१२च्या निवडणुकीत, त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतही हा उपक्रम राबविण्यात आला होता. मतदानाच्या दिवशी नागरिकांनी सुट्टी घेऊन बाहेर जाण्यापेक्षा आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करुन लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, या मुख्य उद्देश या उपक्रमाचा असल्याचे टेकाळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानाला जाताना हे न्या...

$
0
0

मटाऑनलाइन वृत्त। पुणे

मतदान करण्यासाठी केंद्रावर गेलेल्या नागरिकांना आपली ओळख पटवून देणारे एक कागदपत्र मतदानासाठी बरोबर घेऊन जावे लागणार आहे. केंद्रावर गेल्यानंतर मतदार यादीतील क्रमांक सांगितल्यानंतर केंद्रातील संबधित अधिकारी त्या नाग‌िरकाचे नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करतील. त्यानंतर त्या नागरिकाला मतदार यादीतील व्यक्ती आपणच असल्याची खात्री पटवून देण्यासाठी एक कागदपत्र अधिकाऱ्यांना दाखवावे लागणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने यासाठी १७ कागदपत्रांना मान्यता दिली असून, त्यापैकी एक कागदपत्र प्रत्येकाला बरोबर घेऊन जावे लागणार आहे. राज्य आयोगाने जाहीर केलेल्या कागदपत्रातील जो पुरावा सादर केला आहे, त्यामध्ये काही शंका आल्यास केंद्राध्यक्ष त्याची शहानिशा करून खात्री पटल्यानंतरच मतदान करून देतील.
मतदानाला जाताना हे न्या...



>निवडणूक आयोगाचे मतदान ओळखपत्र
>पासपोर्ट,आधारकार्ड,पॅनकार्ड,वाहन चालविण्याचा परवाना
>केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेली फोटो असलेली ओळखपत्रे
>राष्ट्रीय बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील खातेदाराचे फोटो असलेले पासबुक
>स्वातंत्र्यसैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र
>निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याने अनुसूचित जाती/ जमाती/ इतर मागासवर्ग/ विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ विशेष मागासवर्ग यांना फोटोसह दिलेले प्रमाणपत्र
>निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या आधीच्या तारखेपर्यंत सक्षम प्राधिकाऱ्याने फोटोसह ‌दिलेला अपंगत्वाचा दाखला
>मालमत्ता नोंदीबाबतची कागदपत्रे; तसेच नोंद निखात (फोटोसहीत)
>निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत फोटोसहीत देण्यात आलेला शस्त्रास्त्र परवाना
>निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच्या तारखेपर्यंत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली फोटो असलेले ओळखपत्र
>निवृत्त कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले पासबुक
निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विधवा अवलंबित व्यक्ती यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र,वयस्कर निवृत्ती वेतनधारक किंवा त्यांच्या विधवा यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र
>केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहीत कार्ड ,रेशनकार्ड (कुटुंबातील सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असेल; तसेच जर रेशनकार्ड एकाच व्यक्तीचे नाव असेल त्याने स्वत:च्या वास्तव्याचा अन्य पुरावा जसे वीजवापराचे देयक, दूरध्वनी वापराचे देयक, प्रॉपर्टी कार्ड, किंवा घरपट्टी भरल्याची पावती बरोबर आणणे बंधनकारक राहील)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शब्द मैफल रंगते तेव्हा...

$
0
0

किशोरी आमोणकर आणि विजया मेहतांच्या गप्पांमध्ये रसिक दंग
म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्वरांच्या मैफलीमध्ये शब्द हे स्वरांच्या मागून येतात. या मैफलीत खरे राज्य असते ते स्वरांचे. रसिक या स्वरांमध्ये न्हाऊन निघत असतात, तोच शब्दांची एक मैफल त्यांच्या पुढ्यात रंगू लागते. एक असते गानसरस्वती तर दुसरी नाट्यसरस्वती. अमूर्त स्वरतालात नकळत बांधली गेलेली ही शब्द मैफल रंगते आणि त्या दोघी तपस्वींचे एकमेकींविषयी, कलेविषयीचे निरूपण रसिकांना समृद्ध करून जाते. त्या दोघी म्हणजे स्वरांची सरस्वती किशोरी आमोणकर आणि रंगभूमीवरील सरस्वती विजया मेहता. त्यांच्या शब्दमैफलीत रसिक न्हाऊन निघाले.
नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे आयोजित गानसरस्वती महोत्सवात रविवारच्या रम्य सायंकाळी रसिक गिरीजादेवींच्या ठुमरी गायनाची आतुरतेने वाट वाहत होते. त्याच वेळी किशोरीताई आणि विजयाबाईंची एक शब्द मैफल त्यांच्या पुढ्यात सुरू झाली. रसिकांसाठी हा सुखद धक्काच होता. पुढील वीस मिनिटे रसिकांना अस्तित्वाचा विसर पाडणारी होती. दोघींचे सुह्रदय मनोगत व कलेविषयीचे निरूपण ऐकताना रसिकांची ब्रह्मानंदी टाळी लागली.
‘आम्हा दोघींचे कलाक्षेत्र भिन्न आहे, पण कळत-नकळत संस्कार सारखे होतात. किशोरी माझी केवळ मैत्रीण नाही तर ती स्नेही आहे. कारण स्नेहामध्ये आदर असतो. आमची जी मैत्री झाली तो सगळा मंतरलेला काळ होता. आम्ही म्हणजे स्वातंत्र्यानंतरची पहिली पिढी आहोत. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून कतृत्व दाखवणे ही निकड होती. सर्व क्षेत्रात नावीन्याचे वारे वाहत होते. नाट्यसृष्टीत सगळे ठोस, चिरस्थायी असते. पण ‘आम्ही अमूर्त कला सादर करतो,’ हे किशोरीचे शब्द ऐकून मी स्तब्ध झाले. त्यानंतर माझ्या नाटकामध्ये मी भावना आणि सत्यशोधन या भावना आणल्या. किशोरीने असे खूप काही मला दिले आहे,’ विजयाबाई भरभरून सांगत होत्या.
‘संगीत आणि नाट्य प्रायोगिक कला आहेत. रंगमंचावर असलेल्या पोकळीत ही कला निर्माण होते आणि श्रोत्यांच्या सानिध्यातून ती प्रसवते. कितीही रियाज, तालीम केली तरी रंगमंचावरील क्षणच महत्त्वाचा असतो. टाळीसाठी म्हणून काही करता येत नाही,’ असेही त्यांनी सांगितले.
किशोरी आमोणकर म्हणाल्या, ‘नाट्यक्षेत्रामधील सरस्वती म्हणून मी विजयाकडे बघते. आमची मैत्री खूप छान आहे. त्यात दंभ, हट्ट नाही. प्रेम पण नाही. आहे ती केवळ माया आहे. तिने माझ्याबद्दल बोलावे, हा माझा सर्वांत मोठा सन्मान आहे.’ ‘नटाने जीवनाची अनुभूती सांगायची असते. आम्ही कलाकार एकाच ठिकाणी जाणारे माणसे आहोत. फक्त रस्ते वेगळे असतात. साधना करून विश्वरूप मिळावे म्हणून कलेची साधना व्हायला हवी,’ अशा शब्दांत त्यांनी कलेचे तत्त्वज्ञान सांगितले. संपूर्ण महोत्सवाचे निवेदन आनंद देशमुख यांनी केले.
-----------------------
विजयाबाईंनी माझ्याबद्दल बोलावे यासारखा मोठा सन्मान नाही. नाट्यक्षेत्रातील सरस्वती म्हणून मी विजयाबाईंकडे पाहते.
- किशोरी आमोणकर, ज्येष्ठ गायिका
...
‘आम्ही अमूर्त कला सादर करतो,’ हे किशोरीचे शब्द ऐकून मी स्तब्ध झाले. त्यानंतर माझ्या नाटकामध्ये मी भावना आणि सत्यशोधन या भावना आणल्या. किशोरीने असे खूप काही मला दिले आहे.
- विजया मेहता, ज्येष्ठ रंगकर्मी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर आयातीची गरज नाही

$
0
0

साखरेचा ४५ लाख टन अतिरिक्त साठा उपलब्ध
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देशात साखरेचे उत्पादन आणि गेल्यावर्षीच्या शिल्लकी साखरेचा गरजेपेक्षा सुमारे ४५ लाख टन साठा अतिरिक्त असल्याने साखरेच्या आयातीची गरज नाही. केंद्र सरकारने आयातीचा निर्णय घेतल्यास साखर उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे.’ असे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी सांगितले.
साखरेचे किरकोळ दर कमी न झाल्यास साखर धोरणामध्ये बदल करण्याचे सुतोवाच केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे; तसेच व्यापाऱ्यांकडून साखर आयातीची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागवडे यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. या वेळी संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर उपस्थित होते.
नागवडे म्हणाले, ‘देशात १४६ ते १४७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात ४०.२६ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. राज्यातील २७, आणि उत्तरप्रदेशातील १०० साखर कारखान्यांमध्ये अद्याप गाळप सुरू आहे. त्यामुळे आणखी सुमारे ७० लाख टन साखरेचे उत्पादन होऊ शकेल. गेल्या वर्षीचा सुमारे ७० लाख टन साखरेचा साठा शिल्लकी आहे. देशाची वार्षिक गरज सुमारे २४० ते २४५ लाख टन आहे. त्यामुळे सुमारे ४५ ते ४७ लाख टन अतिरिक्त साठा होण्याची शक्यता आहे.’
‘किरकोळ बाजारात साखरेचा दर ४२ रुपये किलो आहे. हा दर कमी झाल्यास साखरेचे धोरण ठरवावे लागणार असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. आयातीचा निर्णय घेतल्यास साखर उद्योगापुढे अडचण निर्माण होईल.’ असेही नागवडे म्हणाले. ‘यंदा उसाचे गाळप कमी झाल्यामुळे इथेनॉलच्या उत्पादनात घट होणार होईल.’ असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परतफेड फक्त कागदोपत्री

$
0
0

शिवशक्ती क्रेडिट सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनीच केला अपहार
sujit.tambade@timesgroup.com
पुणे : शिवशक्ती को. ऑप. क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेच्या तत्कालीन अध्यक्ष आणि संचालकांनी स्वतःच्या नावावर; तसेच वडील, पती, पत्नी, भाऊ, मुले यांच्या नावावर नियमबाह्य पद्धतीने कोट्यावधी रुपयांचे कर्ज खिरापतीप्रमाणे वाटल्याने पतसंस्था आर्थिक अडचणीत सापडली आहे. या संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांनी कर्जाची परतफेड म्हणून रकमा भरल्याचे कागदोपत्री भासविले आहे; पण त्या रकमा पतसंस्थेत नसल्याने त्याचा अपहार झाला असल्याचे लेखापरीक्षण अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
शिवशक्ती पतसंस्थेचा घोटाळा ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध केल्यानंतर या बँकेच्या पुण्यातील शाखांमध्ये खातेदारांची गर्दी झाली. त्यावेळी प्रत्येकाच्या प्रश्नाचे आणि शंकांचे समाधान करताना पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले. या पतसंस्थेवर सध्या नवीन संचालक मंडळ आले आहे. यापूर्वीच्या संचालक मंडळांनी केलेले प्रताप सहकार विभागाने केलेल्या विशेष लेखापरीक्षणामुळे चव्हाट्यावर आले आहेत. संचालक मंडळावरील अध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन त्याची परतफेड केली नाही; तसेच संचालक मंडळाने आपापल्या नातेवाईकांच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज घेऊन रक्कम परत दिलेली नाही. संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर सुमारे दोन कोटी ८८ लाख ९० हजार रुपयांची थकबाकी असल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.
संस्थेने संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांना एकूण कर्जाच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त कर्ज देता कामा नये, असा नियम आहे. मात्र, या मर्यादेचे संबंधित संचालकांनी उल्लंघन केले आहे. येणे थकबाकीचे शेकडा प्रमाण हे ९०.६१ टक्के असल्याचेही लेखापरीक्षणात म्हटले आहे.
पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष संजय कलाटे यांनी स्वतःच्या नावावर २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. याशिवाय कलाटे यांनी त्यांचे दोन भाऊ मोहन कलाटे आणि मयूर कलाटे यांच्यानावावर प्रत्येकी २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. याशिवाय वडील माजी नगरसेवक पांडुरंग कलाटे आणि पत्नी राजश्री यांच्या नावावरही प्रत्येकी २५ लाख रुपये घेतले आहेत. अशाप्रकारे कलाटे यांनीच सव्वा कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
कलाटे यांनी स्वतःच्या नावावर घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड म्हणून सुमारे ३९ लाख ९४ हजार रुपये रोखीने बँकेच्या वाकड शाखेमध्ये भरले. त्यामुळे हे कर्ज खाते निरंक झाल्याची नोंद करण्यात आली. प्रत्यक्षात त्यामध्येही घोटाळा करण्यात आला. ही रक्कम जमा करणाऱ्या व्यक्तीची किंवा खातेदाराची सही भरणा करण्याच्या पावतीवर नाही. त्यामुळे कोणी रक्कम भरली, हे स्पष्ट झालेले नाही. ही रक्कम वाकड शाखेचे व्यवस्थापक निवृत्ती महाजन यांनी पतसंस्थेच्या मुख्यालयाचे तत्कालीन प्रभारी महाव्यवस्थापक बाळकृष्ण पोळ यांच्याकडे दिली. मुख्यालयाच्या कॅशबुकला ही रक्कम जमा दाखविली गेली आहे; पण या रकमेचा अपहार झाल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.
पतसंस्थेचे तत्कालीन कार्यकारी संचालक नौशाद पिरजादे यांनी स्वतःच्या आणि पत्नी ईशाद पिरजादे यांच्या नावावर प्रत्येकी २५ लाख रुपये याप्रमाणे ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यापैकी स्वतःच्या नावावरील कर्जाची परतफेड केल्याचे कलाटे यांच्याप्रमाणेच भासविण्यात आले आहे. पिरजादे यांनी सांगवी शाखेत सुमारे ४१ लाख ६० हजार रुपये भरले. ती रक्कम मुख्यालयाकडे गेल्यावर तिचा अपहार झाला आहे. पिरजादे आणि पोळ यांनी या रकमेचा अपहार केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित शाखेचे रोखपाल आणि लिपिक; तसेच मुख्यालयातील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे.
पतसंस्थेचे संचालक राजेंद्र नेटके यांनी मुलगा विनय यांच्या नावे साडेसहा लाख रुपये, सुभांगी वानखेडे यांनी स्वतःच्या नावे १५ लाख रुपये आणि पती सावळाराम यांच्या नावावर २५ लाख रुपये घेतले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर आणि पतसंस्थेचे संचालक शरद बोऱ्हाटे यांनी भाऊ बापू आणि विठ्ठल यांच्या नावावर प्रत्येकी दोन लाख रुपये कर्ज घेतले आहे. या संचालकांनी परतफेड केलेली नसल्याचे अहवालावरून उघडकीस आले आहे.
......................
सभासदांच्या ठेवी सुरक्षित
‘सभासदांच्या आणि खातेदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत. आर्थिक घोटाळा करणाऱ्या तत्कालीन संचालकांविरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्यांच्याकडून थकबाकी वसूल करण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. त्यामुळे सभासदांनी घाबरून जाऊ नये.’ असे आवाहन पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष विजय कलाटे, उपाध्यक्ष नारायण जरे आणि संचालक एकनाथ जावीर यांनी केले आहे.
..............
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी पोळ​ निलांबित
या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेले तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बाळकृष्ण पोळ यांना निलंबित करण्यात आले आहे. घोटाळ्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यमान संचालक मंडळाची तातडीची बैठक झाली. या बैठकीला अध्यक्ष विजय कलाटे, उपाध्यक्ष नारायण जरे, संचालक एकनाथ जावीर यांच्यासह संतोष बारणे, सुमीत तरस, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश वाकडकर आदी उपस्थित होते. या बैठकीत पोळ यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-सातारा मार्गावर लोकल?

$
0
0

‘डेमू’ची चाचणी यशस्वी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे आणि सातारा या दोन शहरांना रेल्वेच्या लोकल सेवेने जोडण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पावले उचलली आहेत. दोन दिवसांपूर्वी पुणे ते सातारा या मार्गावर ‘डेमू’ची (डिझेल मल्टिपल युनिट) यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
रेल्वे बोर्डाकडून पुणे विभागासाठी दोन ‘डेमू’ दाखल झाल्या आहेत. तसेच, आणखी ‘डेमू’ दाखल होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने यापूर्वी पुणे-दौंड मार्गावर दोन वेळा यशस्वी चाचणी घेतली आहे. त्यानंतर आता सातारा मार्गावरही यशस्वी चाचणी झाली. त्यामुळे या मार्गावरही लोकल (उपनगरीय सेवा) सेवा सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पुणे स्टेशनवरून ‘डेमू’ सकाळी आठ वाजून ५० मिनिटांनी साताऱ्यासाठी रवाना झाली. ती १२ वाजून ५५ मिनिटांनी सातारा स्टेशनला पोहोचली. तेथून पुन्हा एक वाजून ५१ मिनिटांनी पुण्यासाठी रवाना होऊन सव्वासहा वाजता पुणे स्टेशनला दाखल झाली.
पुणे-सातारा मार्गावर वाठार, आदरकी, नीरा, लोणंद, वाल्हे, जेजुरी, सासवड रोड आदी मुख्य स्टेशन आहेत. साताऱ्यासह या अन्य ठिकाणांवरून विविध कारणांनी पुण्यात येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. मात्र, सध्या त्यांच्याकडून रस्ते वाहतुकीचा अवलंब केला जातो. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीचा स्वस्त व सुलभ पर्याय म्हणून लोकल सेवेला पसंती मिळू शकते. माधवराव शिंदे रेल्वे मंत्री असताना ऐंशीच्या दशकात त्यांनी पुणे विभागात भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी पुणे-दौंड, पुणे-सातारा, पुणे-मनमाड मार्गावर शटल सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पहिल्यांदाच या मार्गावर उपनगरीय सेवेसाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.
सध्या कोल्हापूरवरून सुटणाऱ्या आणि पुणेमार्गे पुढे जाणाऱ्या सह्याद्री एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्यांद्वारे प्रवासी दिली जाते. मात्र, या गाड्या सातारा स्टेशनवरून सुटल्यानंतर थेट पुणे स्टेशनला थांबतात. त्यामुळे वाठार, आदरकी, निरा, लोणंद, वाल्हे, जेजुरी, सासवड या ठिकाणच्या प्रवाशांना रेल्वे सेवेचा लाभ घेता येत नाही.
..............
पॅसेंजर गैरसोयीची
सध्या सातारा-पुणे ही एक पॅसेंजर कार्यान्वित आहे. ती पहाटे सव्वाचार वाजता साताऱ्याहून सुटते. ती सकाळी आठ वाजून ४० मिनिटांनी पुणे स्टेशनला दाखल होते. तिच गाडी पुणे स्टेशनवरून सायंकाळी पाच वाजून १० मिनिटांनी सूटते, ती रात्री साडेदहा वाजता साताऱ्याला पोहोचते. मात्र, या गाडीच्या साताऱ्यावरून येण्याची वेळ प्रवाशांसाठी सोयीस्कर नाही. त्यामुळे ही पॅसेंजर प्रवाशांच्या दृष्टीने फायद्याची ठरत नाही, अशी माहिती रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुफ्फुस, पाठीच्या दुखण्यांनी पुणेकर बेजार

$
0
0

शहरीकरण, वाढती लोकसंख्या, सामाजिक विषमतेचा परिणाम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशभरातील पुण्या, मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये वाढते शहरीकरण, लोकसंख्या, सामाजिक आर्थिक विषमता, तसेच पायाभूत सुविधांच्या अभावामुळे हृदयासह श्वसनाच्या आजार, रक्तदाब या आजारांचे प्रमाण वाढू लागले आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे पुण्यातील फुफ्फुसांच्या आजारात ६२ टक्क्यांनी वाढ झाली. रस्त्यांवरील खड्डे आणि सातत्याने वाहन चालविण्यामुळे पाठीच्या दुखण्यांनी डोके वर काढल्याची माहिती पुढे आली आहे.

पोटांचे विकार, मूत्रविकार यासारख्या आजारांनी देखील नागरीक त्रस्त असल्याने त्यांच्या डॉक्टरांकडे फेऱ्या वाढू लागल्याचे निरीक्षण एका अहवालात नोंदविण्यात आले आहे. ‘प्रॅक्टो’ या हेल्थकेअर संस्थेतर्फे वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यात पेशंटना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसंदर्भात निरीक्षणे नोंदविली आहेत. देशभरातील पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद अशा ३५ शहरांतील दोनशेहून अधिक डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली. त्यांच्याकडे येणाऱ्या विविध प्रकारच्या पेशंटच्या तक्रारी, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रमाण आदींचा अभ्यासात विचार करण्यात आला. त्यावरून निष्कर्ष काढले आहेत.

‘शहरातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण, सामाजिक - आर्थिक विकासाचा वाढता वेग यासारख्या गोष्टींमुळे ताणतणाव वाढला आहे. हृदय रक्तवाहिन्यांचे रोग, श्वसनविषयक काळा दमा, अस्थमा, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्याशिवाय आहाराच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, धुम्रपान, तणाव यासारख्या कारणांमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या वाहनांमुळे हवेचे प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे पुण्यात फुफ्फुसाच्या आजाराच्या तक्रारी घेऊन जाणाऱ्या पेशंटची संख्या ६५ टक्क्यांनी वाढली आहे. देशातील विविध शहरांमध्ये ६२ टक्के पेशंटची संख्या वाढली आहे. त्यात फुफ्फुसांचे आजार सर्वाधिक वाढणाऱ्या शहरांमध्ये दिल्ली (५० टक्के), मुंबई (६४ टक्के), बंगळुरू (८० टक्के) येथील पेशंटच्या डॉक्टरांना भेटी वाढल्या आहेत.

कामाचे जादा तास, बसण्याच्या चुकीच्या सवयी, बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, व्यावसायिक ताणतणावामुळे पाठीच्या दुखणे वाढत आहे. मानेत चमका येणे, कार्पल टनेल सिंड्रोम्स, डोळ्यांवर ताण येणे, पाठीत वेदना, ताणामुळे डोके दुखणे, सांध्यातील वेदना, फायब्रोमायाल्जिया अशा लक्षणांमुळे पेशंटला डॉक्टरांकडे जावे लागत आहे. पाठीच्या कण्याच्या वेदनेसाठी डॉक्टरांकडे जाणाऱ्यांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली. त्याशिवाय सर्वाधिक १८ ते २४ वयातील युवक डॉक्टरांकडे जात आहेत. पुण्यात पाठीच्या कण्याच्या दुखण्यासंदर्भात डॉक्टरांकडे जाणाऱ्यांची संख्या ५९ टक्क्यांनी वाढली आहे, असे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञांनी नोंदविले.

देशातील ६२ टक्के मृत्यू हृदयाच्या संबंधित विकारांनी या आजारामुळे होतात. गेल्या दशकभरात हृदय रक्तवाहिन्याच्या रोगांचे प्रमाण १६ टक्क्यांनी वाढले आहे. अनारोग्यकारी जीवनशैली, उच्च तणाव पातळ्या, खाण्याच्या चुकीच्या सवयी, सूर्यप्रकाशात न जाणे यामुळे चयापचय विकृती निर्माण झाल्या आहेत. देशात मधुमेहाचे सहा कोटी पेशंट असून, त्याच्या दुप्पट उच्च रक्तदाबाच्या पेशंटची संख्या आहे. पोटाचा संसर्ग, अपचन, ओटीपोटात वेदना यामुळे अनेक पेशंटच्या तक्रारी वाढल्या आहेत. मसालेदार जेवण, औषधे, तंबाखू, मद्य, तीव्र तणाव यामुळे क्रॉनिक गॅस्ट्रायसिसचे प्रमाण वाढले आहे. जीवनसत्वे, मिनरल्स, फायबर्स, अॅँटिऑक्सिडंट्सने युक्त चौरस आहार घेणे, अधिक चरबी व मीठयुक्त पदार्थ टाळणे, धुम्रपान सोडल्यास पोटाचे आजार टाळता येतात.

लोकांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य देण्यासाठी माहितीसाठा जमा करण्यात आला आहे. देशातील शहरांसाठी हा सर्वाधिक व्यापक आरोग्य सुरक्षा अहवाल आहे. देशापुढे उभ्या राहिलेल्या रोगसमस्यांचा कल ठळकपणे मांडण्यासाठी आम्ही हा अहवाल दर वर्षी प्रसिद्ध करतो. त्यातील निरीक्षणांमुळे रोगांचा आकृतिबंध समजण्यासाठी तसेच आजारांशी मुकाबला करण्यासाठी फायदा होईल.

शशांक एन. डी. मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रॅक्टो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मॅजिक फिगर’कडे लक्ष

$
0
0

Suneet.Bhave@timesgroup.com

@suneetMT

पुणे : केंद्र आणि राज्यात सत्ता प्राप्त केल्यानंतर महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली आहे. तरी, बाहेरच्या पक्षांतून घेतलेले उमेदवार, तिकीट वाटपात झालेला गोंधळ, निष्ठावान कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय आणि संपूर्ण प्रचारादरम्यान नेतृत्वावरून पडलेले गट-तट अशा अंतर्गत आव्हानांवर मात करून सत्तेची ‘मॅजिक फिगर’ गाठण्यात भाजप यशस्वी होतो का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणुकींसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपने नियोजन केले होते. त्या दृष्टीने, शहराच्या विकासाच्या वाटचालीत महत्त्वाचे ठरणारे अनेक निर्णय गेल्या पाच-सहा महिन्यांत घेण्यात आले. पुणे मेट्रोच्या प्रकल्पाच्या अनेक वर्षे रखडलेल्या भूमिपूजनासह शहरासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा करण्यात आली. तसेच, शहराच्या जुन्या हद्दीच्या प्रलंबित विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेपूर्वी मान्यता दिली. युतीची चर्चा सुरू असली, तरी स्वबळावर लढण्याच्या तयारीने पक्ष कमकुवत असणाऱ्या भागांमध्ये इतर पक्षांतील उमेदवारांना प्रवेश देण्यात आला.

शहरातील सर्व प्रभागांतून भाजपकडे इच्छुकांची खूप मोठी संख्या होती. त्यातून, प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली. स्थानिक स्तरावर एकमत होत नसल्याने अखेर मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांना त्यात हस्तक्षेप करावा लागला. त्यावरून, पक्षात नाराजी पसरली. अनेकांनी बंडखोरीचे निशाण उभारले. परंतु, पक्षांतर्गत बंडाळी रोखून धरण्यात नेतृत्वाला यश आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या सोमवारी एका दिवसांत चार सभा घेतल्याने सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. त्यांच्यासह, केंद्रीय स्तरावरील अनेक नेतेमंडळींच्या जाहीर सभा आणि शहराच्या विकासाकरिता भाजपने घेतलेला पुढाकार, यावर पक्षाने प्रचारात भर दिला. शहराच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच भाजपने प्रभागनिहाय जाहीरनामा प्रसिद्ध करून स्थानिक स्तरावर विकासाला कशी चालना देता येईल, हे स्पष्ट केले.

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा गर्दीअभावी रद्द करावी लागल्याने भाजपवर चहूबाजूंनी टीका झाली. या सभेचे निरोप व्यवस्थित पोहोचवण्यात आले नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तर, निवडणुकीच्या आदल्या दिवशी उमेदवारीसाठी घेतलेले पैसे परत करा, म्हणून पक्षातील नाराजांनी पुन्हा पक्ष कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला होता. त्यामुळे, एकहाती सत्ता मिळविण्यासाठी सर्व तऱ्हेने प्रयत्न करणाऱ्या भाजपसमोर सातत्याने अनेक अडथळे उभे राहात गेले. यातून, सर्व कार्यकर्त्यांना एकत्र बांधून सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पालकमंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना करावे लागले.


अनुकूल घटक

केंद्र-राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनांना दिलेली गती

प्रभागनिहाय जाहीरनाम्याद्वारे विकासाच्या सुस्पष्ट चित्राची मांडणी

प्रभाग पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीचा मिळणारा फायदा

प्रतिकूल घटक

तिकीट वाटपामुळे उद्भवलेली नाराजी

बाहेरच्या पक्षांतून, गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना दिलेला पक्ष प्रवेश

विविध गटा-तटांमुळे विस्कळित स्वरूपाचा प्रचार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेला यशाची अपेक्षा

$
0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com

kuldeepjadhavMT

पुणे : भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेवर केला जाणारा अन्याय, शिवसेनेला संपविण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जात असल्याची शिवसैनिकांची भावना आणि महापालिका निवडणुकीसाठी भाजपसोबतची तोडलेली युती, या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारल्याचे पाहायला मिळाले.

भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी असतानाही शिवसेनेकडून संपूर्ण प्रचारात भाजपला ‘टार्गेट’ करण्यात आले. तसेच, गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मिळालेले अत्यल्प यश आणि विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेला असतानाही, महापालिका निवडणूक प्रचारात शिवसेना ताकदीने उतरली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर पुण्यातील झोपी गेलेले शिवसैनिकांनी जागे झाले. त्यांनी दंड थोपटून निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली. शहरातील अन्य सर्वच पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक उमेदवार दिल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. यासाठी त्यांनी आयत्या वेळेला अन्य पक्षातील बंडखोरांना सामावून घेतले. परकियांना पक्षात सामावून घेताना शिवसेनेला निष्ठावान शिवसैनिकांच्या रोषाचाही सामना करावा लागला. या नाराजी नाट्यात पक्षातील माजी आमदार व एका विद्यमान नगरसेवकाने थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याची जोरदार तयारी केली होती. परंतु, मातोश्रीवरून त्यांच्याशी सुसंवाद झाल्यानंतर ते थंडावल्याची माहिती आहे.

शहर शिवसेनेने या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळविण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न केले. भारतीय जनता पक्षाला ‘गाजर’ पार्टीची उपाधी देणाऱ्या शिवसेनेच्या वचननाम्यातही नागरिकांना अनेक गोष्टींची आश्वासने देण्यात आली. शिवसेनेचा वचननामा म्हणजे ‘मोफतनामा’ असल्याची उपरोधिक टीका करण्यात आली. यामध्ये त्यांनी सामान्य नागरिकांना पीएमपी प्रवासापासून ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषधोपचार देण्यापर्यंत विविध गोष्टी मोफत देणार असल्याचे सांगितले. तसेच, युती तुटल्यानंतर शिवसेनेच्या दृष्टिने क्रमांक एकचा शत्रू असलेल्या भाजपवर सर्व बाजूंनी हल्ला चढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. भाजपच्या विरोधात ‘ती सध्या काय करते’ ही पुस्तिका व अन्य प्रचार साहित्य सर्वच उमेदवारांना उपलब्ध करून दिले. एवढेच नाही तर, उमेदवारांनी या प्रचार साहित्याकडे पाठ फिरवल्यानंतर शहर पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांना ते प्रचार साहित्य घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली.

यंदा प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला. तसेच, प्रभागांचा विस्तार जास्त होता. त्यामुळे कमी कालावधीत संपूर्ण प्रभाग पिंजून काढणे उमेदवारांना सहज शक्य नव्हते. पक्षाकडून ठाकरे यांची एक जाहीर सभा झाली. तर, अन्य विजय शिवतारे, डॉ. अमोल कोल्हे, नितीन बानगुडे पाटील यांच्या काही सभा झाल्या. हे वगळता बाकी ठिकाणी सर्व भिस्त उमेदवारांवरच होती. अनेक ठिकाणी नवखे उमेदवार असल्याने त्यांना घरोघरी पोहोचणे शक्य झाले नाही.

शिवसैनिक यंदा ताकदीने उतरले, त्यांच्यामध्ये चैतन्य संचारले होते. हे खरे असले, तरी संपूर्ण शहरात ती ताकद दिसली नाही, हे देखील खरे आहे. त्यामुळे एकटे लढणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, काँग्रेसच्या विरोधात नेमके किती यश मिळेल, हे निकालानंतरच समजेल.

अनुकूल घटक

शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण

उद्धव ठाकरेंच्या सभांचा झंझावात

पहिल्यांदाच स्व-बळावर निवडणूक

प्रतिकूल घटक

निष्ठावंतामध्ये नाराजी

युती तुटल्याने होणारी मतविभागणी

उमेदवारांना पुरेशी ‘रसद’ नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसला ऊर्जितावस्था

$
0
0

Prashant.Aher@timesgrup.com

Tweet : @PrashantAherMT

पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने खचलेल्या काँग्रेसला महापालिका निवडणुकीने ऊर्जितावस्था आणल्याचे दिसले. काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करून ‘आघाडीचा धर्म’ पाळला. या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले, तर आगामी निवडणुकांमध्ये पुण्यातील राजकारणाचे चित्र बदलेल.

काँग्रेसने महापालिका निवडणुकीत स्वबळाची हाक दिल्यानंतर इच्छुकांनी काँग्रेस भवनमध्ये गर्दी केली. काँग्रेसच्या इच्छुकांनी फॉर्म भरल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी आघाडीचा निर्णय झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शक्य तिथे आघाडी आणि इतर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेऊन निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडला. ऐनवेळी ‘एबी फॉर्म’ देणे, काँग्रेसमधील फूट टा‍ळण्यासाठी उमेदवारी जाहीर न करणे, उमेदवारांना अर्ज भरण्याचे प्रशिक्षण न देणे यासर्व गोंधळामुळे काँग्रेसच्या नऊ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. हा सर्वांत मोठा फटका काँग्रेसला बसला. या ठिकाणी काँग्रेसने पुरस्कृत उमेदवार उभे करून वेळ मारून नेली.

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करताना काँग्रेसची फरफट झाली का, असा प्रश्न प्रचारादरम्यान उपस्थित झाला असला, तरीही काँग्रेसची एक ‘व्होट बँक’ असल्याचे चित्र प्रचारात दिसले. गेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे २९ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला. या वेळी जोरदार फटकेबाजी करत राणे यांनी काँग्रेसमध्ये चैतन्य आणले.

काँग्रेसनेही आपला बालेकिल्ला असलेले आणि जेथे नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी अधिक जोर देऊन प्रचार केला. नोटाबंदीच्या निर्णयाची आणि भाजप सरकारच्या अपयशावर बोट ठेवून जोरदार टीका केली. एकीकडे प्रचार शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे काँग्रेसमधील नाराज गट पोस्टर्स लावून आपली नाराजी उघड करीत होता. काँग्रेसमधील तिकीट वाटपावर प्रश्न उपस्थित करत होता. काँग्रेसमधील माजी आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील काही माजी आमदारांवर थेट आरोप करण्यात येत होता. त्याशिवाय शहरातील नेतृत्वांच्या कार्यपद्धतीवर, क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.

काँग्रेसची मरगळ झटकून कार्यकर्त्याला ‘चार्ज’ करण्याचा प्रयत्न या निवडणुकीत झाला. मात्र, काँग्रेस नेते, उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांना रसद पुरवण्यात तुलनेने कमी पडल्याचे चित्र प्रचारात दिसले. नोटांबदीचा दृश्य परिणाम काँग्रेसच्या प्रचारात दिसला. काँग्रेसचे दिल्लीस्थित नेते उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये अडकल्याने त्यांनी पुण्याकडे पाठ फिरवली. मात्र, त्याचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांनी सभा घेऊन भाजपवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसकडून सोशल मीडियासारख्या आधुनिक प्रचार माध्यमांचा तुलनेने प्रभावी वापर केला नाही. प्रचार काळात विरोधकांवर तुटून पडत प्रचार करणारा, गर्दी खेचणारा कॅम्पेनरची उणीव मात्र भासली. असे असले तरी काँग्रेसची सर्वसमावेश अशी एक व्होट बँक मात्र काँग्रेस उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असलेली दिसली.

अनुकूल

- सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष.

- राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीचा फायदा.

- परंपरांगत मतदार काँग्रेस सोबत.

प्रतिकूल

- नेत्यांकडून एकत्रित प्रचार नाही.

- कार्यकर्त्यांना रसद पुरवण्यात अपयशी.

- स्टार कॅम्पेनरचा झंझावत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीमध्ये उत्साह

$
0
0

Chaitanya.Machale@timesgroup.com

Tweet : chaitanyaMT

पुणे : अडीच ते पावणेतीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेमुळे ‘सुपडा साफ’ झाल्यामुळे महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी सुरू केली होती. मतांचे विभाजन होऊ नये यासाठी समविचारी पक्ष म्हणून काही प्रभागात राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी मोठा पाठपुरावा केला.

पालिकेत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या जाहीर सभा, विविध भागांत काढलेल्या ‘रोड शो’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, यामुळे मरगळलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाला. गेली दहा वर्षे महापालिकेत सत्ताधारी म्हणून काम करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कामांवर विरोधी पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना; तसेच मनसेने एकही चकार शब्द न काढता या पक्षातील नेते एकमेकांची उणीधुणी काढत राहिल्याने या निवडणुकीत पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आपले वर्चस्व ठेवता येणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याची जोरदार तयारी राष्ट्रवादीने गेल्या चार महिन्यांपासून सुरू केली होती. याचाच एक भाग म्हणून पालिका निवडणुकीसाठीचा पक्षाचा जाहीरनामा सर्व पक्षांच्या अगोदर डिसेंबर महिन्यामध्येच राष्ट्रवादीने प्रसिद्ध केला. पालिकेत सत्ताधारी म्हणून काम करताना आजपर्यंत कोणती कामे प्राधान्याने केली आणि यापुढील काळात कोणती कामे करणार, याची माहिती देऊन राष्ट्रवादीने आपला जाहीरनामा नागरिकांपर्यंत पोहचविला. मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच प्रयत्न करून काही प्रभागात आघाडी केलीच. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारात उडी घेऊन घेतलेल्या जाहीर सभा, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शहरातील विविध भागांत काढलेल्या रोड शो ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद; तसेच खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी काढलेल्या पदयात्रांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. प्रचाराच्या काळात शहरात मुक्कामी असलेल्या शरद पवार यांनी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधीबरोबर बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकले. तर, अल्पसंख्याक समाजातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करून त्यांच्याशी संवादही साधला.

निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजपमध्ये काडीमोड झाल्याने या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरात आलेले नेते एकमेकांवर टीका करण्यात गुंग होते. गेले दहा वर्षे पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामावर कुणीही टीका न केल्याने याचा फायदा उठवून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपल्या प्रभागात जोरदार प्रचार सुरू ठेवला. ज्या प्रभागात पक्षाच्या उमेदवारांचे चांगले पॅनेल आहे, अशा प्रभागात ‘रोड शो’च्या माध्यमातून जोरदार प्रचार करण्यावर नेत्यांनी भर दिल्याने प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. याचा फायदा या निवडणुकीत होऊन पुन्हा पालिकेवर पक्षाचा झेंडा फडकणार का, याकडे लक्ष लागले आहे.

अनुकूल

स्थानिक प्रबळ उमेदवार

काँग्रेसबरोबर काही जागांवर झालेली आघाडी

भाजप, सेनेसह सर्वच पक्षाने राष्ट्रवादीच्या कामांवर न केलेली टीका

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून शहरातील पदाधिकाऱ्याने प्रचारात घेतलेला सहभाग

प्रतिकूल

सत्तेमुळे प्रस्थापित विरोधी भावनेची (अँटी इंकम्बन्सी) शक्यता

आघाडीमुळे संधी गमावलेल्यांची नाराजी

काही नेत्यांचे भाजपमध्ये पक्षांतर

गटबाजी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘राज’सभेनंतर इंजिन रूळावर

$
0
0

Prasad.Panse@timesgroup.com

@prasadpanseMT

पुणे : पक्षाची दिवसेंदिवस खालावत जाणारी कामगिरी, अनेक नगरसेवकांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी आणि मोदी लाटेच्या तडाख्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदा काहीशी मरगळच आली होती. उमेदवार यादी जाहीर होण्यास उशीर झाला, अनेक ठिकाणी उमेदवारही मिळाले नाहीत. त्यात पक्षाध्यक्षांचा दौरा दोन वेळा पुढे ढकलला गेला. त्यामुळे काहीशा बॅकफूटवर गेलेल्या मनसेच्या रेल्वे इंजिनाला राज ठाकरे यांच्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनने पुन्हा रूळावर आणले आहे. त्यामुळे पक्षाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून यंदा पुन्हा मूळ दिशेने धावणाऱ्या इंजिनाला काही डबे जोडले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील महापालिका निवडणुकीत तब्बल २९ नगरसेवक निवडून आणून मनसेने भल्याभल्यांचे अंदाज चुकवले होते. त्यानंतर मात्र, मोदी लाट आणि अन्य कारणांमुळे पक्षाची कामगिरी उतरणीला लागली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही पक्षाचा दारूण पराभव झाला. त्यामुळे अनेक दिग्गजांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. पुण्यातही अनेक नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजप, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसची वाट धरली. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फारसा प्रभाव असणार नाही, अशीच चर्चा सुरुवातीपासून होती.

उमेदवार यादी जाहीर होत नसल्याने कार्यकर्ते एकत्रित प्रभागात फिरून घरोघरी प्रचार करत होते. अखेर शेवटच्या क्षणापर्यंत यादी गुलदस्त्यात ठेवूनही केवळ १२४ उमेदवारांनाच तिकीट देणे पक्षाला शक्य झाले. मनसेचे बहुसंख्य शिलेदार केवळ राजसाहेबांच्या करिष्म्यावरच अवलंबून होते. राज ठाकरेही शहरात सुमारे आठ सभा घेणार होते. परंतु, काही अपरिहार्य कारणांमुळे राज यांचा पुणे दौराच पुढे ढकलला गेला. दोन्ही रोड शोही रद्द झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांना स्वबळावरच प्रचार करावा लागत होता. त्यामुळे पुण्यात राज यांची एकच सभा झाली.

अखेर राज ठाकरे यांनी १६ फेब्रुवारी रोजी पुण्यात सभा घेतली. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या आधारे झालेली ही सभा पुण्यातच नव्हे, तर राज्यभर चर्चेचा विषय ठरला. यामध्ये पक्षाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेतल्या विकासकामांची झलक राज यांनी दाखवली. दोन सत्ताधारी पक्षांच्या एकमेकांवर चिखलफेक करणाऱ्या आणि त्याचाच आधार घेऊन टीकेची संधी न सोडणाऱ्या विरोधकांच्या सभांना कंटाळलेल्या जनतेलाही ही सभा वेगळी वाटली, भावली. त्यामुळेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना बूस्टर डोस मिळाला असून पक्षाची कामगिरी नक्कीच उंचावेल, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे.

‘राज ठाकरे यांच्या सभेनंतर वातावरण बदलले असून सर्वत्र मनसेची चर्चा आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी अशा सभेची आवश्यकता होती. मतदारांवरही या सभेचा व मनसेच्या कामाचा प्रभाव असून तो मतदानातून दिसून येईल,’ असे पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिंहगड’च्या इमारती बँकेकडून लिलावात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
थकीत कर्जाच्या हप्त्यांची रक्कम गेल्या काही महिन्यांपासून न भरल्याने सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या शाळा-कॉलेजच्या इमारती सेंट्रल बँक ऑफ इंडियाने लिलावात काढल्या आहे. या लिलावासाठी बँकेने तब्बल ५८ कोटी ४ लाख रुपये किमान रक्कम ठेवली आहे. याबाबतची जाहिरात वृत्तपत्रात नुकतीच प्रकाशित झाली आहे. इमारती लिलावात काढल्याने विद्यार्थ्यांच्या ‍भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी ग्वाही शिक्षण विभागाने दिली आहे.
सिंहगड एज्युकेशन सोसायटीने विविध कामांसाठी शैक्षणिक संकुलातील इमारती गहाण ठेवून सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतले. यासाठी संस्थेने कोंढवा शैक्षणिक संकुलातील सिंहगड सिटी स्कूल, मुलांच्या वसतिगृहाची इमारत आणि तेथे असणारे बांधकाम, इंजिनीअरिंग कॉलेजची व मुलांच्या वसतिगृहाची इमारत, मोकळी जागा, शाळेची इमारत तसेच कोंढवा-सासवड रस्त्यावरील शैक्षणिक संकुलातील कॉमर्स कॉलेजची इमारत, सीबार आणि मोकळी जागा गहाण ठेवली आहे.
संस्थेच्या वतीने अध्यक्ष मारुती नवले आणि सचिव डॉ. सुनंदा नवले यांनी विविध कामांसाठी हे कर्ज २०११-१२ मध्ये घेतले. मात्र, मार्च २०१६ पासून आतापर्यत कर्जाचे कोणत्याच प्रकारचे हप्ते संस्थेने भरलेले नाही. याबाबतच्या सूचनादेखील संस्थेला वेळोवेळी देण्यात आल्या. मात्र, संस्थेने कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्याने कर्जासाठी गहाण ठेवलेल्या शाळा-कॉलेजच्या इमारती लिलावात काढण्याचा निर्णय घेतला. थकीत कर्ज आणि व्याजाची एकूण रक्कम ही ५८ कोटी ४ लाख ३० हजार २३५ रुपये झाली आहे. लिलावासाठी इच्छुकांना २७ फेब्रुवारीपर्यत बँकेच्या कॉर्पोरेट शाखेकडे संबंधित रक्कमेच्या निविदा सादर करायच्या आहेत, असे शाखेचे वरिष्ठ अधिकारी आर. एस. प्रेम यांनी सांगितले.
बँकेने शाळा-कॉलेजच्या इमारती लिलावात काढल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. सिंहगड सिटी स्कूलच्या इमारतीला लिलाव होणार आहे. असे झाल्यास विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास आणि नुकसान होऊ देणार नाही. त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यात येईल, असे राज्याच्या प्राथमिक विभागाचे संचालक गोविंद नांदेडे यांनी सांगितले. इंजिनीअरिंग आणि कॉमर्स कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांची योग्य व्यवस्था करण्यात येईल. याबाबत अधिक माहिती घेण्यात येत आहे, असे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी सांगितले.

बँकेने थकीत कर्जाची रक्कम चुकीची दिली आहे. त्यामुळे बँकेला त्या रक्कमेची माहिती नव्याने देण्याची मागणी केली आहे. याबाबत कोर्टात केस सुरू असून त्याचा निकाल २७ फेब्रुवारीला लागणार आहे. इमारतींचा लिलाव होणार नाही आणि झाल्यास विद्यार्थ्यांची काळजी संस्था घेईल. त्यांना दुसऱ्या इमारतीत दाखल करून घेऊ.
- प्रा. मारुती नवले, अध्यक्ष, सिंहगड एज्युकेशन सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीस दिवसांपासून भाजी विक्रेता बेपत्ता

$
0
0

कात्रज : मित्रासोबत दापोलीला फिरायला गेलेले नंदकुमार किसन टाकळकर (वय ५३, रा. आंबेगाव पठार, सर्व्हे नं. १६) हे वीस दिवसांपासून बेपत्ता आहेत.
मार्केट यार्ड येथे भाजी विक्री करणारे नंदकुमार टाकळकर १ फेब्रुवारी रोजी मालकाला हिशोब देऊन संध्याकाळी सात वाजता घरी येत होते. आंबेगाव पठार येथे आल्यानंतर त्यांचे मित्र विनोद जाधव हे त्यांना भेटले. ते राहत असलेल्या सर्व्हे क्रमांक सोळा येथील घरी दोघेही आले. चहा घेऊन दोघे घराबाहेर पडत असताना त्यांचा दुसरा मित्र दुचाकीवरून आला. मला मटका लागला आहे, दापोलीला मजा करायला जावूया, असे तो म्हणाला. ते दोघेही घरापासून निघून गेले आणि तेव्हापासून टाकळकर बेपत्ता आहेत. त्यांचा मुलगा कुंदन नंदकुमार टाकळकर यांनी आंबेगाव पठार पोलिस चौकीत त्या अनोळखी मित्राविरुद्ध फिर्याद दिली आहे. विनोद जाधव यांनी सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी अनोळखी इसमाचे रेखाचित्र तयार केले आहे. ज्याच्याबरोबर टाकळकर गेले तोही मार्केटयार्ड परिसरात काम करत होता. या प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलिस निरीक्षक शेखर शिंदे यांनी मार्केट यार्ड परिसरातील अनेकांची चौकशी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन प्रचारापुढे प्रशासन झाले हतबल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
प्रचाराची मुदत संपल्यानंतर सोशल मीडियावर प्रचार करण्यावरही बंदी आहे. तसे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. मात्र, यामधील मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्टता नसल्याने नेमकी काय कारवाई करावी, हा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला असून, हा प्रचार थांबविण्यात आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन हतबल झाले असल्याचे दिसत आहे.
पिंपरी-चिंचवडसह १० महापालिकांच्या निवडणुकांसाठी आज मंगळवारी (२१ फेब्रुवारी) मतदान होत आहे. त्यासाठी प्रचारास १९ फेब्रुवारी सायंकाळी पाचपर्यंतच मुदत होती. तसे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराची सांगता झाली. परंतु, फेसबुक, ट्विटर, टेलिफोनिक कॉल, मेसेज, व्हॉट्स अॅप यावरून सुरू असलेला प्रचार कसा थांबवायचा याबाबत अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम आहे.
काही जणांबाबत तक्रारी आल्यावर पोलिसांकडून अथवा निवडणूक अधिकाऱ्यांकडून याबाबत उमेदवारांना नोटिसाही देण्यात आल्या आहेत. मात्र, हे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. ऑनलाइन किंवा टेक्नोसॅव्ही प्रचारावर कारवाई काय करावी, हा प्रश्न आहे. आतापर्यंतच्या पारंपरिक पद्धतीच्या प्रचारावर नियंत्रण कसे मिळवावे याबाबत स्पष्ट योजना असल्याने पारंपारिक पद्धतीतील फ्लेक्स, बॅनर उतरवणे, प्रचारपत्रके आढळल्यास जप्त करणे, अशा प्रकारे प्रचार थांबवता येत होता.
मात्र, उमेदवारांकडून अथवा त्यांच्या समर्थकांकडून फेसबुक अकाउंटवर टाकल्या जाणाऱ्या पोस्ट, ट्विटर संदेश, त्यांच्या संपर्कात असणाऱ्यांना पाठविले जाणारे व्हॉट्स अॅप संदेश, एसएमएस, फोनवरून करण्यात येत असलेल्या प्रचारावर कशा प्रकारे नियंत्रण मिळवावे, यासाठी कोणताही प्रभावी उपाय प्रशासनाकडे नसल्याने अधिकारी हतबल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दोन बायका आणि फजिती ऐका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘दोन बायका आणि फजिती ऐका’, अशी परिस्थिती स्वारगेट येथील एका व्यावसायिकावर ओढावली आहे. पहिल्या पत्नीने पतीचा विरह सहन होत नसल्याने त्याला परत घरी आणण्यासाठी मोलकरणींच्या सांगण्यावरून एका भोंदूबाईची मदत घेतली, पण त्या भोंदूबाईने त्या व्यावसायिकाच्या पत्नीकडील ३८ लाख रुपयांचे सोने चोरी करून विश्वासघात केला.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने भोंदूबाई आणि चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनाराला हिसका दाखल्यावर सगळा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी ३४ लाख ६२ हजार रुपयांचे दागिने जप्त करून तिघांना गजाआड केले.
अंबिका भगतसिंग मिझाड (वय ३९, रा. बिबवेवाडी), राधिका चक्रधर सोनार (वय ३४, रा. बिबवेवाडी) अशी अटक मोलकरणींची नावे आहेत. तर रेशम्मुन्निसा रफिक सय्यद (वय ४३, रा. सॅलिसबरी पार्क) या भोंदूबाईसह चोरीचे दागिने विकत घेणारा नरेशकुमार किसाराम चौधरी (वय ४०, रा. बिबवेवाडी) यालाही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.
स्वारगेट परिसरातील ४५ वर्षांच्या व्यावसायिकाची दोन लग्ने झाली आहेत. ही दोन्हीही लग्ने पंधरा वर्षांपूर्वी झाली आहेत. दोन्हीही पत्नी स्वतंत्र राहतात आणि दोघींनाही मुले आहेत. तो पहिल्या पत्नीकडे फारसा राहण्यास जात नाही. त्यामुळे पहिल्या पत्नीच्या मनात त्याबाबत शल्य होते. याबाबत ती आपल्या मोलकरणींशी बोलत होती. या मोलकरणींनी तिला भोंदूबाईची माहिती दिली. भोंदूबाईने व्यावसायिकाच्या पत्नीची सर्व माहिती घेतल्यानंतर तिला फसवण्याचा कट रचला आणि त्यासाठी मोलकरणींशी सूत जुळवले.
व्यावसायिकाच्या पत्नीचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या रचल्या. भोंदूबाईने मोलकरणींच्या मदतीने व्यावसायिकाच्या घरात लिंबू लपवून ठेवण्यास सुरूवात केली. तुझ्या नवऱ्यावर करणी करण्यात आली असून घरात लिंबू ठेवण्यात आल्याचे तिला सांगण्यात आले. त्यानंतर भोंदूबाई घरातील लिंबू शोधून देत असे, अशा घटनांतून तिचा विश्वास संपादन करण्यात आला. व्यावसायिकाच्या पत्नीने भोंदूबाईला आपल्या बँकेतील लॉकरमध्ये सोन्याचे दागिने असल्याची माहिती दिली होती. हे दागिने हडप करण्यासाठी भोंदूबाईने कट रचला. घरात विशिष्ट ठिकाणी सोने ठेवणे गरजे असल्याचे सांगितले. लॉकरमध्ये असलेले ३८ लाख रुपयांचे दागिने घरात आणण्यात आले. हे दागिने भोंदूबाईने मोलकरणींच्या मदतीने चोरले. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम मोरे यांच्या पथकाने कारवाई केली. पोलिसांना मोलकरणींवर संशय होता. या तपासात पोलिसांनी चौधरीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी झाल्यानंतर त्याने चोरीचे दागिने खरेदी केल्याची कबुली दिली. हे दागिने त्याने वितळून सोन्याच्या लगड केल्या होत्या. त्या सर्व जप्त करण्यात आल्या आहेत. यातील एक मोलकरीण १३ व दुसरी ५ वर्षांपासून व्यावसायिकाच्या घरात धुणीभांड्याची कामे करतात, असे भोसले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images