Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ज्ञानेश्वरी आता जपानी भाषेत

$
0
0

संशोधक प्रा. इवावो शिमा यांचे काम त्यांची विद्यार्थिनी पूर्ण करणार

Aditya.Tanawade
@timesgroup.com

Tweet : @AdityaMT

पुणे : तंत्रज्ञानाने प्रगत असलेला आणि आयटी क्षेत्रात झपाट्याने प्रगती करणारा देश ही जपानची खरी ओळख. त्यामुळेच, भारतासह जगभरातील विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी जापानचा रस्ता धरतात. मात्र, जपानी लोकांना भारताच्या संस्कृती परंपरेबद्दल कमालीची उत्सुकता आहे. त्याच उत्सुकतेपोटी आता ज्ञानोबा माऊलींची संपूर्ण ज्ञानेश्वरी जपानीमध्ये भाषांतरीत होणार आहे. त्याचे काम सुरू केलेल्या प्रा. इवावो शिमा यांचे देहावसान झाल्याने त्यांच्या विद्यार्थिनी डॉ. चिहिरो कोईसा संपूर्ण ज्ञानेश्वरी जपानी भाषेत अनुवादित करणार आहेत.

भारतीय संस्कृतीच्या उत्सुकतेपोटी आणि वैदीक संस्कृतीच्या अभ्यासाच्या दृष्टीने प्रा. इवावो शिमा भारतात आले. संस्कृतीच्या अभ्यासासाठी वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणे त्यांना गरजेचे वाटले. त्यांनी वारकरी संप्रदाय आणि पंढरपू्राचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्या वेळी त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा अभ्यास सुरू केला. ज्ञानेश्वरीचे तत्त्वज्ञान जपानी लोकांनाही कळावे, या उद्देशाने त्यांनी ज्ञानेश्वरीचा अनुवाद सुरू केला. त्यासाठी इंग्रजीतील ज्ञानेश्वरीचा आधार घेतला. सहा अध्यायांचे भाषांतर पूर्ण झाल्यानंतर दुर्दैवाने शिमा यांचे निधन झाले. त्यांच्या या अपुऱ्या पाहिलेल्या कामाला पूर्ण करण्याचा ध्यास आता डॉ. कोईसा यांनी घेतला आहे. उर्वरीत सर्व ज्ञानेश्वरीच्या अध्यायांचा अनुवाद त्या पूर्ण करणार आहेत. डॉ. कोईसा यांनी पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातून ‘ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान’ या विषयावर पीएचडी प्राप्त केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्या ज्ञानेश्वरीच्या अनुवादाचे काम करीत आहेत.

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक वा. ल. मंजुळ म्हणाले, ‘भारतातून विद्यार्थी आणि उद्योजक जपानमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी जातात. मात्र, एकीकडे जपानी नागरिक तंत्रज्ञानाचा पुरस्कार करत असताना भारतीय संस्कृती, परंपरा, वेदशास्त्रांच्या अभ्यासामध्ये रुची ठेवतात. प्रा. इवावो शिमा हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. संस्कृतीचा अभ्यास करता करता शिमा यांनी ज्ञानेश्वरी जपानी भाषेत अनुवादीत करण्याचे काम सुरू केले आहे. वारकरी संप्रदाय, सामान्य नागरिकांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. यातून भारतीय संस्कृतीची दखल जागतिक स्तरावर घेतली जाते, हे स्पष्ट झाले आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास केवळ कीर्तनकार आणि प्रवचनकारांकडून होत नसून, जागतिक दर्जाच्या संशोधकांकडूनही होतो आहे, ही उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल.

संबंध विश्वाला तत्त्वज्ञान आणि मानवतेची मूल्ये देणाऱ्या ज्ञानेश्वरीचे पाठ आता जपानमध्येही गिरवले जातील. तेथील विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची मूल्ये कळतील, यापेक्षा आणखी अभिमानाची गोष्ट काय असावी, असा सूर संत साहित्याच्या अभ्यासकांकडून उमटला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्त्री म्हणजे आद‌िशक्ती जननी

$
0
0

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘स्त्री ही केवळ नवअर्भकांना जन्म देणारी स्त्री नाही, तर कुटुंबाचा भार सांभाळणारी आणि आव्हानांना तोंड देणारी एक आद‌िशक्ती जननी आहे,’ असे सांगून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसाटीच्या मॉर्डन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र. आणि लक्ष्मी सा यांना डॉ. बंग यांच्या हस्ते अनिता अवचट स्मृति संघर्ष पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. मुक्तांगण मित्रच्या उपसंचालक मुक्ता पुणतांबेकर, मुक्तांगण मित्रचे संचालक डॉ. अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात ‘आनंदयात्री’ या द्वैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले.

‘विचारांच्या स्पष्टतेतून उभे राहणारे काम नेहमी दुसऱ्यांना प्रेरणा देऊन जाते. विनोबा भावे यांनी म्हटल्यानुसार आयुष्य हे संकटांची मालिका असते. स्त्रीला मातृत्वाच्या योगाने जननीचे रूप प्राप्त झाले आहे. स्त्री ही केवळ नवअर्भकाला जन्म देण्यापुरती मर्यादीत नाही. आपल्या कार्यातून कुटुंब उभे करणारी ती जननी आहे. डॉ. अनिता अवचट यांच्या रूपाने मी त्यांच्यातील पत्नी, माता, समुपदेशक, एक कणखर व्यक्त‌िमत्त्व अशी अनेक रूपे पाहिली आहेत. स्वतःच्या कामाप्रती अनिता अवचट यांची कर्तव्यनिष्ठता आणि एकनिष्ठता कमालीची ऊर्जा देणारी होती,’ असे डॉ. बंग यांना सांगितले.

सुनीती सु. र. म्हणाल्या, ‘आम्ही काय काम करत आहोत याविषयी जाणून घेण्याची तयारी समाजाने दाखवावी. आम्ही विकासावर प्रश्नचिन्ह उभे करीत असल्याने कधी कधी आम्हीच खलनायकाच्या भूमिकेत आहोत की काय, असा गैरसमज पसरवला जातो. विकासाच्या नावाखाली ज्यांचे विस्थापन होणार आहे त्यांच्या पुनर्वसनाबाबत काय, हा प्रश्न कोणीतरी उपस्थित केला पाहिजे. महिलांप्रती असुरक्षितता वाढण्यामागे शहरांचा बकालपणादेखील कारणीभूत आहे.’

‘अॅसिड हल्ल्यातील बळी असा आमचा उल्लेख केला जाणे चुकीचे आहे. त्यावर सर्वांत आधी मी आक्षेप घेतला. मी केवळ पंधरा वर्षांची असताना माझ्यावर एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ला झाला, अशा परिस्थितीत आर्थिक विवंचना होती. कोणी नोकरी देत नव्हते. जेथे चेहरा दिसणार नाही, अशा कॉलसेंटरसारख्या ठिकाणी देखील नोकरी मिळत नव्हती,’ असे लक्ष्मी सा यांनी सांगितले.

‘मी चेहरा झाकायचे सोडून मोकळ्या चेहऱ्याने समाजात वावरण्याचा निर्णय घेतला. अॅसिडवर बॅन लागावा, या दृष्टीने न्यायालयीन लढाईला सुरुवात केली. नातेवाइकांनी देखील सोबत सोडली. शेवटी आग्र्यामध्ये अॅसिड हल्ल्याला सामोर जावे लागणाऱ्या समदुःखींना एकत्र आणून कॅफेटेर‌ियाचा व्यवसाय सुरू केला. आता उदयपूरसह तीन ठिकाणी हा व्यवसाय सुरू असून या भगिनी आता घरच्यांना सन्मानाने पैसे मिळवून देत आहेत,’ असे लक्ष्मी सा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुरुष वर्गाला मैत्रिणीच नाहीत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘मैत्रीचे नाते हे नेहमीच समानतेचे असते. या नात्यात स्त्री-पुरुष अथवा गरीब-श्रीमंत असा कुठलाच भेद नसतो. त्यांना एकमेकांच्या हक्कांची जाणीव असते. मात्र, असे असतानाच आपल्या समाजातील मोठ्या प्रमाणात पुरुष वर्गाला मैत्रिणीच नाहीत आणि ही भयानक बाब आहे,’ असे मत अभिनेता सुव्रत जोशी याने शनिवारी व्यक्त केले.

तथापि ट्रस्टने आयोजित केलेल्या ‘आय सोच-चला लैंगिकतेवर बोलूया’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या ‘लेट्स सोच-एक नया नजरिया’ या कार्यक्रमात सुव्रत बोलत होता. या कार्यक्रमांचे आयोजन मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये करण्यात आले. अभिनेत्री सखी गोखले, लवमॅटर्स वेबसाइटच्या गुंजन शर्मा, बिंदुमाधव खिरे, मुकुंद किर्दत, शकुंतला भालेराव, प्रा. वैशाली नाईक या वेळी उपस्थित होते.

सुव्रत म्हणाला, ‘स्त्री-पुरुष समानता वेगवेगळ्या पातळ्यांवर विविध पद्धतीने हाताळाव्या लागतात. याबद्दल विस्ताराने सांगायचे झाल्यास आमच्या शाळेमध्ये मुलांच्या व मुलींच्या वर्गखोल्यांच्या मध्ये जाळी होती. त्यामुळे मुला-मुलींना संवाद साधायला परवानगी नव्हती. मात्र, मुलींशी माझी मैत्री झाल्यानंतर मला स्त्रियांबाबत अधिक आदर वाटू लागला. मैत्री झाल्यावर ‘जेंडर’ ही बाब फार छोटी होऊन जाते. मैत्रीमध्ये तर स्त्री-पुरुष नात्यातील गूढपणा काढून टाकायला हवा. आपल्या समाजात तरुणांसाठी सामाजिक आणि मानसिक मोकळीक दिली जात नाही. मुलींचा स्पर्श हा नेहमी लैंगिकच असतो, हा समज अगदी चुकीचा आहे. स्पर्शाचा अर्थ तरुणांनी समजून घ्यायला हवा.’

खिरे यांनी लैंगिकतेबद्दलच्या गैरसमजुती आणि अंधश्रद्धा यावर माहिती दिली. किर्दत यांनी पुरुषी मानसिकता, मर्दानगी, पुरुषप्रधानता आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना यावर मत मांडले. शर्मा, भालेराव आणि प्रा. नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. गौरी सुनंदा यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रॅक’मुळे विद्यार्थ्यांना फटका

$
0
0

परीक्षेत अभ्यासक्रमाला अनुरूप प्रश्न नसल्याने बहुतांश विद्यार्थी अनुतीर्ण

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग शाखेच्या निकालात मेकॅनिकल शाखेत अंतिम वर्षाला असणारे बहुतांश विद्यार्थी ‘रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग’ (रॅक) विषयात एक आणि दोन गुणांच्या फरकाने अनुत्तीर्ण झाले आहे. परीक्षेत अभ्यासक्रमाला अनुसरून प्रश्न न आल्याने इतर विषयात उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांना केवळ ‘रॅक’मध्ये अनुत्तीर्ण व्हावे लागले आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बहुतांश इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनुत्तीर्ण निकालामुळे विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेंट’ला अडथळे निर्माण झाले आहे.

विद्यापीठाने काही दिवसांपूर्वी इंजिनीअरिंगच्या सर्व शाखांची परीक्षा घेतली. त्याचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला. मेकॅनिकल शाखेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना सातव्या सत्रात ‘रॅक’ नावाचा विषय आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये बहुतांश विद्यार्थी ‘रॅक’ विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत. या विषयाच्या पेपरमध्ये अभ्याक्रमाला अनुरूप प्रश्न आले नाहीत, तसेच अभ्यासक्रमातील एका भागावर प्रश्नच विचारण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रश्न सोडविता आले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना परीक्षेत अनुत्तीर्ण व्हावे लागले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

विशेष म्हणजे या विषयात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी सत्रातील इतर विषयात उत्तीर्ण झाले आहेत. तसेच, गेल्या वर्षापर्यंत हेच अनुत्तीर्ण विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. काही विद्यार्थ्यांना तर ७२ टक्क्यांपर्यत गुण मिळाले असून केवळ एक आणि दोन गुण कमी मिळाल्याने ‘रॅक’ विषयात ते अनुत्तीर्ण झाले आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थी हे अंतिम वर्षाला असल्याने त्यांना कॉलेजमध्ये ‘प्लेसमेन्ट’साठी येणाऱ्या ‘कॅम्पस’मध्ये सहभागी होता येत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

सध्याच्या परिस्थितीत शहरातील १८०पेक्षा विद्यार्थी केवळ या विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत. संबंधित प्रकाराची माहिती त्यावर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांना दिली असून त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचा विद्यार्थी राजेंद्र कंदगुळे याने सांगितले.

विद्यापीठाच्या समितीत चर्चा

मेकॅनिकल शाखेच्या सातव्या सत्रात असणाऱ्या ‘रॅक’ विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडे आली आहे. येत्या काही दिवसांत ‘डीन’ समितीच्या होणाऱ्या बैठकीत विद्यार्थी अनुत्तीर्ण का झाले, यावर चर्चा करण्यात येईल. हा प्रश्न काही कॉलेजातील विद्यार्थ्यांचा आहे अथवा सर्व कॉलेजातील विद्यार्थ्यांचा आहे, हे पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे विद्यापीठाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालोकअदालतीकडे पक्षकारांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कोर्टात प्रलंबित असलेल्या आणि दाखलपूर्व केसेस सामोपचाराने आणि सामंजस्याने निकाली काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय महालोकअदालतीच्या उपक्रमाकडे शनिवारी बहुतांश पक्षकारांनी पाठ फिरविली. कोर्टात केस दाखल होण्यापूर्वीच कोर्टाची पायरी न चढता पक्षकारांना निकाल मिळावा म्हणून ४७ हजार ५१४ केसेस निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. पुण्यात यातील केवळ ४१३ केसेस निकाली काढण्यात यश आले.

कोर्टात प्रलंबित असलेल्या केसेसची आकडेवारी कमी व्हावी, तसेच कोर्टात दाखल होण्यापूर्वीच केसेसचा निपटारा व्हावा म्हणून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. महालोकअदालतीमध्ये केसेस निकाली काढण्यासाठी ठेवताना दोन्ही पक्षकारांना यासंदर्भात नोटीस पाठविली जाते. ज्या पक्षकारांची आपली केस तडजोडीने निकाली काढण्याची इच्छा आहे, त्यांच्या केसेस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यामार्फत लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यासाठी पाठविण्यात येतात.

तसेच पुणे आणि पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये दाखल असलेल्या केसेस तडजोडयोग्य असतील तर त्या महालोकअदालतीकडे निकाली काढण्यासाठी पाठविण्यात येतात. देशातील विविध कोर्टांमध्ये प्रलंबित केसेसची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा ताण न्याययंत्रणेवर येतो आहे. कोर्टातील तडजोडयोग्य केसेस सामोपचाराने निकाली काढण्यात याव्यात म्हणून देशभरातील सर्व कोर्टांमध्ये एकाच दिवशी राष्ट्रीय महालोकअदालतीचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी शनिवारी महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ५३ पॅनेलची नियुक्त करण्यात आली होती. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ७२ हजार ४२५ केस निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आलेल्या होत्या. यात २४,९११ प्रलंबित आणि दाखलपूर्व ४७,५१४ केसेसचा समावेश होता. मात्र पक्षकारांकडून या उपक्रमाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. केवळ सात हजार ८४८ केसेस निकाली काढण्यात यश आले. दाखलपूर्व केसेसपैकी केवळ ३,३७३ केसेस निकाली काढण्यात आल्या आहेत. महालोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात आलेल्या केसेसमध्ये निकाल लागल्यानंतर पक्षकारांना अपील करता येत नाही. कोर्टावर येणारा ताण कमी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाकडे पक्षकार पाठ फिरवू लागले आहेत.

महालोकअदालतीत निकाली खटले
(दाखलपूर्व)

पुणे : ४१३
बारामती : ३४
इंदापूर : ९
दौंड : ४१२
शिरूर : १५९०
सासवड : १९
भोर : ७५
वडगाव : ५००
खेड : १
जुन्नर : ८५
घोडेगाव : २३५
एकूण : ३,३७३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

$
0
0

पुणे : कम्प्युटर इंजिनीअर असलेल्या पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंहगड रोड परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पती व त्याच्या आईला अटक केली आहे.

वृषाली आकाश शिंदे (वय २९, रा. मानाजीनगर, नऱ्हे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती आकाश सुनील शिंदे आणि त्याची आई मंगल शिंदे (वय ५१) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वृषालीचा भाऊ राहुल काळे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा कम्प्युटर इंजिनीअर असून तो बाणेर येथील कंपनीत नोकरी करतो. तर, वृषाली मूळची नाशिक जिल्ह्यातील असून आकाशसोबत विवाहनंतर ती पुण्यात राहत होती. ती गृहीणी होती. जुलै २०१६मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी आरोपी आकाश व त्याच्या कुटुंबीयांनी तिच्याकडे गाडी व फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे येण्याची मागणी केली. तसेच, तिला सतत टोचून बोलून मानसिक, शारिरीक छळ केला. या त्रासाला कंटाळून १० फेब्रुवारी रोजी दुपारी तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सहायक निरीक्षक मधुकर साळुंखे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिरीश बापट यांना आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्षात उमेदवारीवरून सुरू असलेली खदखद अजूनही संपली नसल्याचे रविवारी नवी पेठ-पर्वती या प्रभागात पाहायला मिळाले. या प्रभागातील एक जागा मित्रपक्षाला सोडली असल्याने पक्षाच्या चारही उमेदवारांनी एकत्र प्रचार करायचा नाही, असा फतवा पालकमंत्र्यांनी काढला. तर, पक्षाने कोणताही आदेश दिला, तरी चारही ठिकाणी कमळच फुलवणार असा ठाम निर्धार स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातील नवी पेठ-पर्वती (प्रभाग क्र २९) या ठिकाणी ‘अनुसूचित जाती महिला’ ही जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) सत्यभामा साठे यांना सोडण्याचे ठरवण्यात आले होते. परंतु, तत्पूर्वी पक्षाने सरस्वती शेंडगे यांना ‘एबी फॉर्म’ दिला होता. साठे यांनी उशिराने अर्ज दाखल केल्याने शेंडगे यांनाच ‘कमळ’ चिन्ह मिळाले. त्यानंतर, प्रभागातील पक्षाचे सर्व उमेदवार एकत्रित प्रचार करत आहेत. रविवारी पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. या वेळी, सरस्वती शेंडगे यांना पाहिल्याने बापट नाराज झाले. त्यांनी तेथेच कार्यकर्त्यांनी कानउघाडणी करत, शेंडगे यांना बरोबर घेऊन प्रचार करू नका, असे सुनावले. भाजप-आरपीआय महायुतीच्या अधिकृत उमेदवार सत्यभामा साठे असल्याने तुम्ही त्यांना सोबत घेऊन तीन ठिकाणी कमळ, तर एका जागेसाठी करवत, असे आवाहन करायला हवे, असा फतवाच त्यांनी काढला. चौघांची एकत्र पत्रके छापली असतील, तर त्याची विल्हेवाट लावा, असेही त्यांनी बजावले. कमळ चिन्हाऐवजी इतरांचा प्रचार करण्याचा आदेश पक्षाने दिला आहे का, अशी विचारणा या वेळी कार्यकर्त्यांनी बापट यांना केली. त्यावर, ‘तुम्हाला काय करायचे ते करा; पण साठेंनाच चालवा,’ असे सांगत बापट यांनी काढता पाय घेतला.

बापट यांच्या भूमिकेमुळे पक्षाचे अधिकृत चिन्ह असूनही दुसऱ्याच उमेदवाराचा प्रचार कसा करायचा, असा संभ्रम कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला. अखेर, माजी खासदार प्रदीप रावत यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील सर्व उमेदवार, कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रभागातील ज्येष्ठ स्वयंसेवक यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रभागातून सर्व ‘कमळा’च्या जागा निवडून आणायच्या यावर सर्वांचे एकमत झाले. ‘करवती’ने ‘कमळ’ कापणार नाही, हीच भूमिका यापुढे कायम ठेवण्याचे निश्चित केले गेले.

कार्यकर्ते भूमिकेवर ठाम

नवी पेठ-पर्वती या प्रभागामध्ये भाजपला अनुकूल असे वातवारण आहे. पक्षाला मानणारा मोठा वर्ग या प्रभागामध्ये आहे. आता इतर पक्षासाठी एक जागा सोडली, तरी भविष्यात तेथे अडचणी निर्माण होऊ शकतात, याकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचेही लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे, या ठिकाणी पक्षाच्याच उमेदवाराचा प्रचार होईल; अन्य कोणाचा नाही, असा पवित्रा सर्व कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओवैसी यांच्या सभेला परवानगी नाकारली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या कासेवाडी येथे होणाऱ्या प्रचार सभेस खडक पोलिनांनी परवानगी नाकाराली आहे. कायदा-सुव्यवस्था प्रश्न होऊ नये, म्हणून परवानगी नाकारल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ येथे उमेदवार जुबेर बाबु शेख यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (१४ फेब्रुवारी) सायंकाळी सातच्या सुमारास कासेवाडी येथे असुद्दीन ओवैसी यांची सभा आयोजित केली आहे. त्यासाठी त्यांनी एक खिडकी योजनेतून अर्ज केला होता. मात्र, ओवैसी यांच्या सभेसाठी ज्या ठिकाणी मागणी केली आहे, ती सर्व ठिकाणे मिश्र वस्तीची असून संवेदनशील आहेत. निवडणुकीचा काळ असल्यामुळे या परिसरात सर्व पक्षांच्या प्रचार रॅली आहेत. ओवैसी यांच्याकडून भाषणांमध्ये प्रक्षोभक आणि जातीवादी विधाने केली गेल्यास कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रचारसभेला परवानगी नाकारल्याचे खडक पोलिसांनी आयोजकांना सांगितले आहे.

दरम्यान, असुद्दीन ओवैसी यांच्या राज्यात सभा होत आहेत. यापूर्वी झाल्या आहेत. पण, कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. ओवैसी यांच्या सभेला परवानगी मिळू नये, यासाठी राजकीय पक्षांच्या दबावाला पोलिस बळी पडले आहेत, असा आरोप एमआयएमचे शहराध्यक्ष जुबेर शेख यांनी केला आहे. ओवैसी यांची पुण्यात सभा घेणार असून त्यासाठी सोमवारी पोलिस आयुक्तांना भेटणार असल्याचे सांगितले. तसचे, गरज पडल्यास कोर्टात जाण्याची तयारी ठेवल्याचे शेख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चॉकलेटचे पैसे मागितले; दुकानदाराला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चॉकलेटचे पैसे मागितल्याच्या रागातून आठ जणांच्या टोळक्याने दुकानदाराला मारहाण केल्याची घटना येरवडा येथील महाराष्ट्र हाउसिंग सोसायटीत गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत दिनेश जोशी (३८) यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणी कुणाल जाधव (१८, रा. महाराष्ट्र हाउसिंग सोसायटी, येरवडा), अनिल नक्का (२५, रा. महात्मा फुलेनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी यांचे महाराष्ट्र हाउसिंग सोसायटीमध्ये कैलास स्वीट नावाचे दुकान आहे. त्यांची व कुणाल आणि अनिलची ओळख आहे. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हे दोघे जोशी यांच्या दुकानात गेले. त्यांनी ५० रुपयांची चॉकलेट्स घेतली. त्याचे पैसे मागितल्यानंतर या दोघांनी शिवीगाळ करून ‘तुला बघून घेतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर या दोघांनी त्यांच्या मित्रांना बोलावून दुकानात घुसून जोशी व त्यांचा भाचा शिवनारायण आणि कामगाराला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या प्रकरणी उपनिरीक्षक जी. एस. कुताळ तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या स्टँडमध्ये स्थलांतरास अखेर रिक्षाचालक तयार

$
0
0

पुणे स्टेशन रिक्षा स्टँडचा प्रश्न सुटला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षासाठी केलेल्या नवीन स्टँडमध्ये स्थलांतरित होण्यासाठी रिक्षाचालक अखेर तयार झाले. रिक्षा पंचायतीने आंदोलन करून केलेल्या विविध मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी जुना रिक्षा स्टँड नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आला.

पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारात आत येणाऱ्या वाहनांसाठी दत्त मंदिराजवळून एक लेन तयार केली जाणार आहे. त्यामुळे येथील रिक्षा स्टँड तिकीट आरक्षण केंद्राच्या डाव्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत हलवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार तेथे रिक्षा स्टँडचे कामही पूर्ण झाले होते; मात्र नवीन स्टँड जुन्या स्टँडपेक्षा कमी जागेत आहे. रिक्षांना आत येण्यासाठी रस्ता नाही. रिक्षांच्या रांगांची रुंदी कमी आहे. या सर्व कारणांमुळे रिक्षाचालक नवीन रिक्षा स्टँडमध्ये स्थलांतरित होण्यासाठी विरोध करत होते. त्यांनी आंदोलनही सुरू केले होते.

रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांनी रिक्षाचालकांशी चर्चा केली. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी नवीन स्टँडची पाहणी केली. रिक्षाचालकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, रिक्षाचालकांच्या मागण्या मान्य करण्यात येतील, असे आश्वासन दादाभॉय यांनी दिले. त्यानंतर रिक्षाचालकांनी धरणे आंदोलन मागे घेतले.

..........

अनोखे उद्घाटन

रिक्षामध्ये डॉ. बाबा आढाव, स्टेशनचे मुख्य व्यवस्थापक ए. के. पाठक व नितीन पवार प्रवाशांच्या जागेवर बसले होते. या रिक्षाने जुन्या रिक्षा स्टँडमधून नवीन रिक्षा स्टँडमध्ये प्रवेश केला. प्रवेश करताना या रिक्षानेच नवीन स्टँडची फित तोडली. अशा वेगळ्या प्रकारे हे स्टँडचे उद्घाटन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीई प्रवेशाच्या प्रक्रियेत गोंधळ

$
0
0

अर्ज भरण्यात पालकांना अनेक अडचणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; मात्र मदत केंद्रांमध्ये अर्ज भरून न घेणे, जुना हेल्पलाइन क्रमांक, मदत केंद्रांवर इंटरनेटची सुविधा नसणे आणि शहरात विभागवार नकाशा नसल्यामुळे पालकांना पाल्यांच्या प्रवेशासाठी अर्ज भरताना समस्या भेडसावत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

‘आरटीई’अंतर्गत अर्ज भरण्यासाठी पुणे जिल्हा व शहर, पिंपरी-चिंचवड अशा सर्व ठिकाणी शिक्षण विभागाने मार्गदर्शन केंद्रे जाहीर केली. त्यांची सविस्तर माहिती वेबसाइटवर दिली आहे. त्याचबरोबर अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्रांची आणि इतर माहितीही वेबसाइटवर दिली आहे; मात्र पालक मदत केंद्रांवर गेल्यावर त्यांना जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला आदींची आवश्यकता असल्याचे सांगून परत पाठवले जात आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी मदत केंद्रांमध्ये मदतनीस नसल्यामुळे वंचित घटकांतील पालकांना अर्ज करता येत नाही. प्रवेशासाठी अर्जात पत्ता भरताना गुगल मॅपद्वारे अंतर मोजण्याचा प्रयत्न केला जातो. त्या वेळी पत्त्यानुसार घर मॅपवर दाखवले जात नाही. त्यामुळे अर्ज पुढे भरताच येत नाही. त्याचबरोबर शिक्षण विभागाने पुणे विभागाच्या सहा विभागांचा नकाशा वेबसाइटवर दिलेला नाही. त्यामुळे कोथरूड भागातील पालकांना आपण औंध विभागात येतो हे समजत नसल्याने अर्ज सादर करताना अडचणी येत आहेत.

विद्यापीठाजवळील एका शाळेमध्ये इंटरनेटची सोय नसल्यामुळे शाळेने पालकांना अर्ज भरून घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तशातच पालकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यास दिलेला हेल्पलाइन क्रमांक जुना असल्याने त्याचा काही फायदाच होत नाही. ‘आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी शिक्षण विभागाने नियोजन केलेले नाही. महापालिकेकडून प्रवेशाबाबत पालकांना माहिती देण्यासाठी बॅनर लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वंचित घटकातील पालकांना प्रवेश सुरू झाल्याबद्दल काहीही कल्पना नाही. मदत केंद्रांमध्ये इंटरनेटची सोय नसल्याने पालकांना अर्ज करण्यास सायबर कॅफेमध्ये पाठवले जाते, असे पालकांनी सांगितले.

..................

पालकांना समजेल आणि सहज वापर करता येईल, अशी वेबसाइट तयार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मदत केंद्रावर तत्पर सेवा देणारा मदतनीस, अधिकारी नेमला पहिजे. तरच पालकांना अर्ज करता येतील. पालकांना प्रवेश प्रक्रिया समजली नाही तर ५० टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
- मुकुंद किर्दत, समन्वयक, आप पालक युनियन

..............

पालकांना येणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी पालिकेला मदत केंद्रामध्ये कर्मचारी नेमण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. सोमवारपासून प्रक्रिया सुरळीत होईल.
- मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणी मागणाऱ्यांना अटक

$
0
0

बांधकाम व्यावसायिकाकडे २५ लाखांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मार्केटयार्ड परिसरातील बांधकाम व्यावसायिकाला त्याच्याकडे काम करणाऱ्या सख्ख्या भावांनी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास परवानाधारक पिस्तुलातून गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे.

नवनाथ बाजीराव मोहिते आणि किसन जगन्नाथ चव्हाण (दोघेही. रा. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचा साथीदार रघुनाथ मोहिते याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी कल्पेश ओसवाल (वय ३४, रा. मार्केटयार्ड) यांनी बिबवेववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओसवाल हे बांधकाम व्यावसायिक आहेत. आरोपी मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. नवनाथ आणि रघुनाथ हे दोघे सख्खे भाऊ आहेत, तर किसन चव्हाण हा त्यांच्या ओळखीचा आहे. नवनाथ व रघुनाथ हे ओसवाल यांच्याकडे गेल्या दहा वर्षांपासून नोकरीस आहेत. त्यामुळे ओसवाल यांचा या दोघांवर विश्वास होता. त्यामुळे काही वेळा ते त्यांच्याकडे महत्त्वाची कागदपत्रे, पैसे ठेवण्यासाठी देत होते. चार वर्षापासून हा प्रकार सुरू होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी दोघा भावांकडे ओसवाल यांनी वडिलोपार्जित आणि नवीन असे जवळपास ७९ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, तसेच महत्वाची कागदपत्रे विश्वासाने दिली होती. ओसवाल यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे ठेवलेले सोने परत मागितले. मात्र, दोघा भावांनी ते परत देण्यास टाळाटाळ केली. किसन चव्हाण याच्याकडे पिस्तूल असून त्याचा रितसर परवाना आहे. या दोघांनी किसन चव्हाण याच्या मदतीने ओसवाल यांना धमकावण्यास सुरुवात केली. तसेच, कागदपत्रे व सोने परत देतो. त्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. ओसवाल यांनी ती देण्यास नकार दिला. त्या वेळी आरोपींनी पिस्तुलातून गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली.

ओसवाल यांनी तत्काळ गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे येऊन घटनेची माहिती दिली. त्यानुसार, खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक लक्ष्मण बोराटे व सहायक निरीक्षक गवळी यांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार नवनाथ मोहिते व किसन चव्हाण या दोघांना अहमदनगर येथून सापळा रचून अटक केली. त्यांचा साथीदार रघुनाथ मोहिते हा फरार आहे. त्यांच्याकडे ठेवलेले सोने व इतर कागदपत्राबाबत पोलिस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोकणच्या राजा’आधी केरळी आंब्यांची सरशी

$
0
0

पुणे मार्केट यार्डात ११०० पेट्या दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘कोकणच्या राजा’च्या आगमनाला काही महिन्यांची प्रतीक्षा असताना केरळमधून हापूस, लालबाग, बदाम या जातींचे आंबे रविवारी पुण्याच्या बाजारात दाखल झाले. आंब्यांच्या सुमारे ११०० पेट्या पुण्यात आल्या आहेत. केरळने पुण्याची बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे यावरून दिसत आहे.

रत्नागिरी, देवगड येथील हापूस आंब्यांचा हंगाम एप्रिलमध्ये सुरू होतो. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चपासून ग्राहकांसह व्यापाऱ्यांना आंब्याच्या आगमनाचे वेध लागतात. बदलते हवामान, वाढत्या किमती आणि पावसामुळे आंब्याचे होणारे नुकसान याचा ‘कोकणच्या राजा’वर गेल्या काही वर्षांत चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता कर्नाटक हापूसचा पर्याय पुढे येत आहे. त्यातच कधी नव्हे ते केरळ येथील आंबा उत्पादकांनीही ‘कोकणच्या राजा’ची जागा घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत, असे दिसते आहे.

‘केरळमधील आंबा जानेवारीच्या शेवटी बाजारात येण्यास सुरुवात होते. याची चव रत्नागिरीच्या हापूस आंब्यासारखीच आहे. केरळमध्ये जानेवारी महिन्यापासूनच आंब्याचा हंगाम सुरू होतो. तेथे यंदा चांगले उत्पादन झाले आहे. पाऊस कमी असल्याने हंगाम दर वर्षीपेक्षा २० ते २५ दिवस आधी सुरू झाला आहे. केरळच्या आंब्याला सध्या स्थानिक भागातून मागणी आहे. हापूस, पायरी, तोतापुरी, लालबाग आणि बदाम या जातीच्या आंब्यांना सध्या मागणी आहे,’ अशी माहिती मार्केट यार्डातील फळांचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.

उरसळ यांच्याकडे केरळमधील आंब्यांच्या ११०० पेट्यांची आवक झाली आहे. तेथील सय्यद इब्राहिम या शेतकऱ्याकडून आंबा बाजारात पाठवण्यात आला आहे. चवीला गोड असल्याने त्याला ग्राहकांची पसंती मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दर वर्षी केरळहून पुण्यात थोड्या प्रमाणात आवक व्हायची; पण यंदा अन्य राज्यांप्रमाणे पुण्याच्या बाजारपेठेकडेही केरळमधील आंबा उत्पादकांनी लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई, अहमदाबाद, इंदूर, उत्तर प्रदेश या भागातील बाजारपेठांमध्येही केरळी आंबा विक्रीसाठी पाठवण्यात आला आहे. या केरळी आंब्यांचा हंगाम एप्रिल महिन्यापर्यंत सुरू राहील. त्यानंतर रत्नागिरीतील आणि त्या पाठोपाठ कर्नाटकचा आंबा विक्रीसाठी बाजारात दाखल होतो, असेही उरसळ यांनी स्पष्ट केले.

केरळी आंब्यांचे दर (रुपये प्रति किलो)

लालबाग : ५० ते ७०

हापूस : १५० ते २००

तोतापुरी : ३५ ते ४५

बदाम : ५० ते ८०

पायरी : ८० ते १००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचा २१ कलमी वचननामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आधी २४ पाणीपुरवठा आणि नंतरच मीटर आणि तोही महापालिकेच्याच खर्चाने,’ अशी भूमिका मांडून ‘महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ‘पीएमपी’चा मोफत प्रवास, वाय-फाय झोन, ‘पीएमपी’च्या बसमध्ये वाढ, ​इंग्रजी स्पीकिंग कोर्स, वर्किंग वूमन होस्टेल्स, फिरते दवाखाने, शिवणे ते खराडी हा नदीकाठचा रस्ता,’ असा ‘२१ कलमी वचननामा’ काँग्रेसने रविवारी जाहीर केला.

काँग्रेस भवनात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी, आबा बागुल, अॅड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, नरेंद्र व्यवहारे आदींच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले.

‘शहराला २४ तास पाणीपुरवठा महापालिकेच्या खर्चाने करण्यात येईल. शहरात ९८ टक्के ठिकाणी पाण्याच्या लाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या नव्या १०३ टाक्यांची कामे मंजूर केली आहेत. त्यातील ८२ टक्के कामे झाली असून, राहिलेली कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. अशा प्रकारे पुणेकरांना २४ तास पाणीपुरवठा करू,’ असे बागवे आणि छाजेड यांनी सांगितले.

‘काँग्रेसची महापालिकेत वर्षानुवर्षे सत्ता होती. शहराच्या झालेल्या विकासात काँग्रेसचे योगदान मोठे आहे. पुणे शहर हे देशातील उत्तम शहर बनवण्याचा आमचा मानस आहे. या २१ कलमी योजनांमुळे हे शहर ​विकसित होईल. परंतु शहरातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा, ही काँग्रेसची कायमचीच भूमिका आहे,’ असे पाटील म्हणाले.

मेट्रोला काँग्रेसने सुरुवात केल्याचे सांगून, मेट्रोच्या कामाला गती देणार असल्याचे काँग्रेसने आपल्या वचननाम्यात म्हटले आहे. शिवणे ते खराडी हा नदीकाठचा रस्ता पूर्ण करून वाहतुकीचा ताण कमी केला जाणार, गर्दीच्या चौकांमध्ये फ्लायओव्हर, वर्षभरात १०० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया, ‘ओपन स्पेस’मध्ये महिला बचत गटांसाठी बाजार उपलब्ध करणार, डे-केअर सेंटर उभारणार, अशा विविध योजना प्रत्यक्षात आणण्याचे वचन काँग्रेसने आपल्या वचननाम्यात दिले आहे.

.............

२१ कलमी कार्यक्रम

- कचऱ्यापासून वीज, खते, विटा तयार करणार.

- ग्रे वॉटर सिस्टीम प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात उभारणार.

- सायकल स्टेशन, मार्ग यांची संख्या वाढवणार.

- एचसीएमटीआर ३४ किलोमीटरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करणार.

- महापालिकांच्या जागांवर बहुमजली पार्किंग उभारणार.

- प्रत्येक प्रभागात प्राथमिक आरोग्य केंद्र.

- ‘एसआरए’अंतर्गत ५०० चौरस फुटांचे घर.

- मुळा-मुठेच्या काठांचा पारंपारिक पद्धतीने जीर्णोद्धार.

- पालिकेत नवीन सांस्कृतिक विभाग.

- संपूर्ण शहरात सीसीटीव्ही.

- अग्निशामक दलाच्या गाड्या वाढवणार.

- जुन्या तालमींचे पुनरुज्जीवन करणार.
..........................

‘जाहीर’नाम्याचा ‘वचन’नामा

काँग्रेस भवनातील हॉलमध्ये जाहीरनाम्याच्या प्रकाशनासाठी लाल महालाचा फ्लेक्स, तसेच शिवरायांच्या स्मारकाचा देखावा तयार करण्यात आला होता. जाहीरनामा प्रकाशित करण्यापूर्वी तुताऱ्यांचा निनाद झाला. भाजपने सिंहगडावर शपथ घेऊन प्रचाराला सुरुवात केली, तर शिवसेना वर्षानुवर्षे वचननामा प्रकाशित करते. या पार्श्वभूमीवर पाटील यांना छेडले असता, त्यांनी ही काँग्रेसची थीम असल्याचे सांगितले. काँग्रेस विरोधकांचे अनुकरण कधीच करत नसल्याचे ते म्हणाले. ‘​काँग्रेसही विकासकामांबाबत वचनबद्ध आहे, हे दर्शवण्यासाठी या जाहीरनाम्याला वचननामा म्हटले आहे,’ असे डॉ. कदम म्हणाले.

..........

एकत्रित प्रचार लवकरच

‘शहराच्या काही प्रभागांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. या भागांमध्ये दोन्ही पक्षांचा एकत्रित प्रचार लवकरच सुरू करण्यात येईल, त्याचे वेळापत्रक जाहीर करू,’ असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ईव्हीएम’ प्रात्यक्षिकाला अद्याप मुहूर्त नाही

$
0
0

म. टा. प्रति‌निधी, पुणे

पालिका निवडणुकीला सामोरे जाताना मतदारांमध्ये अधिकाधिक जागृती करण्याची महापालिका प्रशासनाची घोषणा हवेतच विरली आहे. निवडणुकीला अवघे नऊ दिवस शिल्लक राहिलेले असताना मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीन’चे (ईव्हीएम) कोणतेही प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवण्यास प्रशासनाने सुरुवात केलेली नाही. इतकेच नव्हे, तर मतदारांना नक्की किती मते देणे बंधनकारक आहे, याची कोणतीही माहिती प्रशासनाकडून दिली जात नसल्याने मतदानाच्या दिवशी नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होणार आहे.

निवडणुकीत अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे. निवडणुकीचा कारभार पारदर्शक व्हावा, यासाठी नागरिकांमध्ये जाऊन मतदानाविषयीची माहिती देण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिले आहेत. गेल्या महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त कुमार यांनी निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनांची माहिती दिली होती. यंदाची निवडणूक चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने होणार असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये ‘ईव्हीएम’बद्दल माहिती देण्याबरोबरच मतदान कसे करावे, याची प्रात्यक्षिके महापालिकेच्या प्रशासनाकडून दाखवली जाणार असल्या‌चे आयुक्त कुमार यांनी जाहीर केले होते.

मतदान केंद्रात मतदानासाठी गेलेल्या नागरिकांचा गोंधळ उडू नये, यासाठी पालिकेच्या वतीने योग्य ती खबरदारी, काळजी घेतली जाणार असून, यासाठी पथके तयार करून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. एका मशीनवर किती उमेदवारांची नावे असतील, प्रत्येक केंद्रात किती मशीन असतील, याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती पालिका प्रशासन वेळोवेळी देणार असल्याच्या घोषणा प्रशासनाकडून वारंवार करण्यात आल्या होत्या; मात्र निवडणुकीला अवघे नऊ दिवस उरलेले असतानाही प्रशासनाने ‘ईव्हीएम’चे कोणतेही प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवले नसल्याचे समोर आले आहे.

.........

चार मते देणे बंधनकारक

चार सदस्यांचा प्रभाग झाल्याने प्रत्येक नागरिकाला चार मते द्यावी लागणार आहेत. परिणामी मतदान केंद्रामध्ये नागरिकांना अधिक वेळ द्यावा लागणार आहे. चार सदस्यांच्या प्रभागामुळे मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्या तुलनेत मशीनची संख्या कमी असल्याने एका मशीनवर दोन गटांतील उमेदवारांची यादी टाकण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे; मात्र याची कोणतीही माहिती नागरिकांना अद्यापही दिली गेलेली नाही. तसेच प्रत्येक मतदाराने चार मते दिल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही, याचे साधे प्रात्यक्षिकदेखील प्रशासनाकडून मतदारांना दाखवण्यात आलेले नाही. पालिकेच्या या मनमानी कारभारामुळे मतदानाच्या दिवशी मोठा गोंधळ उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘तरुणाईची वळली मूठ, बंद करू जनतेची लूट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकीकडे पैसे वाटून मत विकत घेण्याचा, विविध वस्तू वाटून, सहली काढून मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न केला जात असतानाच दुसरीकडे तीन तरुण उमेदवार गोरगरिबांकडून थोड-थोडी वर्गणी मागून निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांसाठी कार्यकर्तेही दिवसभर आपले शिक्षण, व्यवसाय सांभाळून हटके पद्धतीने प्रचार करत आहेत.

मॉडेल कॉलनी-डेक्कन जिमखाना या प्रभाग क्रमांक १४मधील ‘अ’ गटातून योगेश सूर्यवंशी, ‘बॅटरी टॉर्च’ या चिन्हावर, ‘क’ गटातून मंगल निकम ‘पाटी’ या चिन्हावर आणि ‘ड’ गटातून श्रीकृष्ण कुलकर्णी ‘नगारा’ या चिन्हावर अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत. धनदांडग्यांचे राजकारण, गुंडशाही, भ्रष्टाचार आणि घराणेशाही मोडीत काढण्यासाठी लोकायत आणि सोशालिस्ट पार्टीकडून पुरस्कृत करण्यात आलेले हे कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सरकारी शाळांची दुरवस्था सुधारणार, उत्तम सार्वजनिक दवाखाने उभारणार, वस्तीतील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती सुधारणार अशा कळीच्या मुद्द्यांवरची आश्वासने मतदारांना देऊन, ‘तरुणाईची वळली मूठ, बंद करू जनतेची लूट’ अशा घोषणा देत नुकतीच प्रचारफेरीही काढण्यात आली. हाताने रंगवलेले आश्वासनांचे आकर्षक फलक, सर्वसामान्यांची परिस्थिती मांडणारी चळवळीची गाणी म्हणत ही रॅली काढण्यात आली. विविध महाविद्यालयांमधील तरुण-तरुणी, नोकरदार वर्ग, वस्तीतील महिलांनीही या रॅलीत सक्रिय सहभाग घेतला.

या प्रचारादरम्यानच वस्तीमधील नागरिकांना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. हे नागरिकही अगदी दोन पाच रुपयांपासून शक्य तितकी मदत या उमेदवारांसाठी करत आहेत. आतापर्यंत तीन हजार रुपयांच्या आसपास निधी जमा झाला आहे. त्याचबरोबर ‘लोकायत’चे कार्यकर्तेही स्वतः वर्गणी काढून प्रचार करत आहेत.

..........

पैसे वाटून मत विकत घेण्यापेक्षा पर्यायी राजकारण शक्य आहे, असे चित्र आम्ही उभे करत आहोत.
- अलका जोशी, महामंत्री, लोकायत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंच्या सभेचे वेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा रोड शो रद्द झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आता ठाकरे यांच्या सभेचे वेध लागले आहेत. ठाकरे यांची सभा १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सभेचे स्थान निश्चित नसले, तरी सभा यशस्वी करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. सध्या अन्य कोणतेही नेते अथवा स्टार प्रचारकांचा कार्यक्रम निश्चित झालेला नाही.

पक्षाच्या उमेदवारांनी यादी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांच्या ‘रोड शो’द्वारे पक्षाच्या प्रचाराचा औपचारिक नारळ दहा फेब्रुवारी रोजी फोडण्यात येणार होता. तसेच पक्षाचा जाहीरनामाही प्रकाशित होणार होता; मात्र काही कारणांमुळे राज ठाकरे यांचा पुणे दौराच रद्द झाला. त्यामुळे आता ठाकरे फक्त सभेसाठीच पुण्यात येणार आहेत. पक्षाचे स्टार प्रचारक, तसेच सिनेअभिनेत्यांचेही दौरे येत्या दोन-तीन दिवसांत निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे पक्षाचे उमेदवार स्वतःचा प्रभाग पिंजून काढण्यावर भर देत आहेत.

प्रभाग मोठा असल्याने उमेदवार एकत्रित पदयात्रा काढून मतदारांसमोर जात आहेत. दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कार्यअहवाल, नाशिकमध्ये पक्षाने केलेल्या सुधारणांचा अहवाल मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. स्पीकर बसवलेल्या रिक्षांच्या माध्यमातून पक्षाची प्रचारगीते वाजवून मतदारांना आवाहन केले जात आहे.

पक्षप्रमुख राज ठाकरे यांची सभा १६ तारखेला होईल. त्यासाठीची तयारी सध्या सुरू आहे. सभेचे नियोजन करण्यासाठी सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे. सभेपर्यंत प्रभाग स्तरावर प्रचार सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच काही छोट्या कोपरा सभाही घेण्याबाबत चाचपणी सुरू आहे, असे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहेब, तुम्ही परत या...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘निवडणुकीत कार्यकर्त्यांकडे कोणी लक्ष दिले नाही, इतकेच नव्हे, तर अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीही कोणी फोन केला नाही. त्यामुळे पक्षात आम्ही पोरके झालो आहोत. त्यामुळे साहेब, तुम्ही परत या,’ अशी साद नाराज काँग्रेसजनांनी माजी खासदार सुरेश कलमाडी यांना घातली. आघाडीमुळे संधी गमावलेल्या आणि पक्षाने उमेदवारी नाकारलेल्या काही नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांनी रविवारी कलमाडी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अखेरच्या क्षणी आघाडी झाल्यामुळे निवडणूक लढवण्याची अनेक काँग्रेसजनांची संधी हुकली आहे. तसेच पक्षांतर्गत स्पर्धेमध्येही उमेदवारी नाकारली गेल्याने अनेक जण नाराज झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही भागांत ‘कलमाडी परत या,’ अशा आशयाचे फलकही झळकले होते. रविवारी काही जणांनी शहरातील पूर्वीचे कारभारी कलमाडी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. अयाझ काझी, संगीता तिवारी, सुधीर काळे, सदानंद शेट्टी, बेबी युसूफ सय्यद, नामदेवराव घाटगे, राजू साठे, द. स. पोळेकर आदी या वेळी उपस्थित होते.

‘काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केल्यामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे; मात्र कार्यकर्त्यांकडे कोणी लक्षही दिले नाही. काही जणांनी उमेदवारी अर्ज भरले, तर ते माघारी घ्या, अशी विनंती करणारे साधे फोनही कोणी केले नाहीत. पक्षात कार्यकर्ते पोरके झाले आहेत,’ असे काही जणांनी कलमाडी यांना सांगितले. ‘तुम्ही असतात, तर ही वेळ आली नसती. त्यामुळे तुम्ही पुन्हा सक्रिय व्हा,’ अशी विनंती काही जणांनी केली, तेव्हा कलमाडी यांनी फक्त स्मितहास्य केले.

काही वर्षांपूर्वी शहर काँग्रेसमध्ये कलमाडी यांचे वर्चस्व होते. त्यांना मानणारा मोठा गट काँग्रेसमध्ये होता; मात्र राष्ट्रकुल घोटाळ्यात ते अडकले आणि त्यानंतर पक्षातूनही त्यांना काढण्यात आले. त्यानंतर गेल्या काही काळात ते राजकारणातून आणि काँग्रेसमधूनही बाजूला झाले आहेत; मात्र त्यांना मानणारा काही वर्ग अजूनही पक्षात आहे. त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलमाडी यांना साद घातल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे; मात्र अशा काळात कलमाडी कितपत सक्रिय होतील, याबाबत शंका व्यक्त करण्यात आल्या आहेत.

.............

सुरेश कलमाडी अनेक वर्षे पुण्याचे खासदार होते, मंत्रीही होते. अशा नेत्याशी पक्षातील अनेकांचे जवळचे संबंध असणे स्वाभाविक आहे. त्यातूनच काही जणांनी त्यांची भेट घेणे, यात काही आश्चर्य नाही; मात्र काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही आणि गटबाजीही नाही.
- रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारांची यादी अजून अंतिम नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची निश्चिती झाली असली, तरी अद्यापही संबंधित केंद्रावरील मतदारांची यादी अंतिम करण्याचे काम पूर्ण झाले नाही. सर्वच उमेदवारांकडून केंद्रनिहाय मतदारांच्या यादीसाठी वारंवार आग्रह धरला जात असून, अद्यापही त्यात दुरुस्त्या सुरू असल्याने एक-दोन दिवसांत मिळतील, असे पालिकेतर्फे सांगितले जात आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या पालिकेने निश्चित केली आहे. या मतदान केंद्रांवर कोणत्या भागातील मतदार असतील, त्यांची सविस्तर यादीही गेल्या बुधवारी (८ फेब्रुवारी) अंतिम केली जाणे अपेक्षित होते. त्यानुसार उमेदवारांना मतदारांपर्यंत ‘व्होटर स्लिपा’ पोहोचवता येतात. मतदानासाठी आता जेमतेम आठ दिवस राहिले असूनही अद्याप केंद्रनिहाय मतदारांची यादीच अंतिम होत नसल्याने उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधील धाकधूकही वाढत चालली आहे. त्याबाबत पालिकेकडे सातत्याने विचारणा केली जात असली, तरी अंतिम याद्या नेमक्या केव्हा मिळणार, याबद्दल अजूनही स्पष्टता नाही.

बहुतेक मतदारांनी ऑनलाइन स्वरूपात विधानसभेच्या यादीनुसार आपला मतदार क्रमांक शोधला असण्याची शक्यता आहे. परंतु यादीतील अनुक्रमांक आणि महापालिकेसाठी मतदान केंद्र आणि अनुक्रमांक यामध्ये तफावत असण्याची शक्यता असल्याने मतदारांपर्यंत नेमकी माहिती पोहोचवायची कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. निवडणूक आयोगाच्या किंवा पालिकेच्याही वेबसाइटवरून मतदारांना पालिका निवडणुकीसाठीचे मतदान केंद्र अद्याप शोधता येत नाही. त्यामुळे ही यादी लवकर अंतिम झाली नाही, तर मतदारांसमोरील संभ्रम आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

केंद्रनिहाय मतदारयादी अंतिम झाली, की बहुतेक सर्व पक्षांचे उमेदवार आपापल्या भागांतील हक्काच्या मतदारांपर्यंत ‘व्होटर स्लिपा’ पोहोचवण्याचे काम करतात. परंतु अद्याप केंद्रनिहाय याद्या अंतिम नसल्याने ‘व्होटर स्लिपा’ वेळेत पोहोचणार का, अशी विचारणा केली जात आहे.

................

मतदानावर परिणाम होण्याची भीती

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग आणि महापालिका यांच्यातर्फे पथनाट्ये, जनजागृती मोहीम घेण्यात येत आहे; मात्र मुळातच मतदारांना अचूक आणि नेमकेपणाने माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे मतदार यादी अंतिम करण्याचे काम निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीनंतरही सुरू होते. आता केंद्रनिहाय मतदारयादी आठ फेब्रुवारीलाच जाहीर होण्याचे सांगितले जात असताना, अजूनही ती उमेदवारांच्या हातात पडलेली नाही. या सगळ्याचा थेट परिणाम मतदानावर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवारही घालणार पुणेकरांना साद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुणेकरांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार प्रचारात उतरणार आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीतील एकाच दिवशी सहा ते सात सभा घेण्याचा पायंडा बाजूला ठेवत यंदा एका दिवसात एक किंवा दोन मतदारसंघांतच सभा घेण्याचे नियोजन पवार यांनी केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून पालिकेत सत्ताधारी म्हणून जबाबदारी संभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची पाठराखण करताना पालिका निवडणुकीला समोरे जाताना शरद पवार पुणेकरांसमोर कोणते मुद्दे मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वीच्या ‌निवडणुकांवेळी निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्यास एक ते दोन दिवस शिल्लक असताना शरद पवार यांच्या जाहीर सभा झालेल्या आहेत. पालिका निवडणुकांसाठी एकाच दिवसात वेगवेगळ्या मतदारसंघांत सभा घेऊन दिवसभरात सहा ते सात सभा घेणे ही पवारांची खासियत आहे. २००७च्या निवडणुकीत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पवार यांनी शहरातील विविध विधानसभा मतदारसंघांत सभा घेऊन ‘कारभारी बदला, भाकरी फिरवा’ असे आवाहन करून खासदार सुरेश कलमाडी यांना शह दिला होता. २०१२मध्येही पवार यांनी शेवटच्या टप्प्यात सभा घेतल्या होत्या.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेचा जोरदार फटका बसून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांचा धुव्वा उडाला होता. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसू नये, यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रचारात उतरावे, अशी विनंती इच्छुक उमेदवारांबरोबरच पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून पवार यांना केली जात होती. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील प्रचारात उतरणार असून त्यांच्या सभा होणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फोडण्यात‌ आला. राज्यातील इतर महापालिकांमध्येही निवडणुका असल्याने त्यांचे दौरे सुरू आहेत. शहरातील कार्यकर्त्यांकडून केली जाणारी मागणी लक्षात घेऊन पवार यांनी जाहीर सभेला वेळ दिली आहे. गेल्या काही निवडणुकांप्रमाणे यंदा आठ दिवस अगोदरच प्रचार सभांना सुरुवात केली जाणार आहे. पालिका निवडणुकीला सामोरे जाताना पवार नक्की काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

तारखा नक्की, ठिकाणे ठरणार

शरद पवार यांची पहिली सभा वडगाव शेरी मतदारसंघात १४ फेब्रुवारीला होणार आहे. १५ फेब्रुवारीला हडपसर मतदारसंघात, तसेच त्यानंतर १८ फेब्रुवारीला खडकवासला, पर्वती, कसबा विधानसभा मतदारसंघात पवार यांच्या जाहीर सभा होणार आहेत. या सभा नक्की कोठे घ्यायच्या याची ठिकाणे अद्याप निश्चित झालेली नाहीत. सोमवारपर्यंत हे निश्चित होईल, असे पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images