Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नांदेड गावात वानराची दहशत

$
0
0

दहा दिवसांत २०-२५ नागरिकांना चावा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कधी घराच्या छतावर, कधी खिडकीत, तर कधी वेगवेगळ्या गाड्यांवर बसून नागरिकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या वानराने नांदेड गावात दहशत पसरवली आहे. गेल्या दहा दिवसांपासून मुक्कामास असलेल्या या वानराने आतापर्यंत वीस ते पंचवीस नागरिकांना चावा घेतला आहे. गंभीर जखमी झालेल्या नागरिकांवर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

नांदेड गावाच्या सभोवताली पेरूच्या बागा आणि मोठ्या प्रमाणात शेती असल्याने पंधरा वानरांची टोळी गेल्या महिनाभरापासून वास्तव्यास आली आहे. दिवसभर शेतात उपद्रव करणारी ही वानरे कधी कधी वस्तीतही येत आहेत. यातील एका उपद्रवी वानराने गेल्या दहा दिवसांपासून एकट्या फिरणाऱ्या माणसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिक घाबरले आहेत.

गावकऱ्यांच्या माहितीनुसार मुख्यतः रात्री त्याचा उपद्रव वाढत असून, ते दुचाकी गाड्यांवर धावून जाते. लोकांवर केलेले हल्ले विविध गल्ल्यांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये टिपले गेले आहेत. त्याने लहान मुलावर उडी मारून चावा घेतानाचा भयानक प्रसंगही सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. आतापर्यंत त्याने वीस ते पंचवीस नागरिकांवर हल्ला केला आहे. यातील काहींवर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वानराला तातडीने पकडण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.

दरम्यान, वन विभाग आणि राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या अनाथालयातील रेस्क्यू टीमने गेल्या आठ दिवसांत वानराला पकडण्याचा दोन वेळा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला आहे. वानर चपळ असल्याने भुलीचे इंजेक्शन देण्याचे प्रयत्न फसले. आता वनाधिकाऱ्यांनी वस्तीत पिंजरे लावले आहेत.

रेस्क्यू टीमचे प्रमुख नीलिमकुमार खैरे म्हणाले, ‘एनडीए परिसरामध्ये वानरांच्या टोळ्या वास्तव्यास असून, ही वानरे दर काही दिवसांनी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात. नांदेड गावाजवळ पेरूच्या बागा असल्याने वानरांची टोळी तिथे आली असणार. अनेक लोकांना वानराला खायला देण्याची सवय असते. त्यामुळे ही वानरे मनुष्य वस्तीत फिरत आहेत. टोळीतील एकच वानर उपद्रवी असून, बाकी वानरे माणसांपासून दूरच राहत आहेत. या वानरावर यापूर्वी कधी कोणी माणसाने काठीने हल्ला केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते प्रत्येक वेळी कोणताही माणूस दिसल्यावर स्वसंरक्षणासाठी हल्ला करत असावे.’

...

नागरिकांचे सहकार्य हवे

‘आठवडाभरात आम्ही दोन वेळा वानराला पकडण्याचा प्रयत्न केला; पण ते चपळ असल्याने त्याला भूल देणे शक्य झाले नाही. ‘रेस्क्यू ऑपरेशन’दरम्यान स्थानिक नागरिक गर्दी करून अडथळा निर्माण करत आहेत. काही वेळा लोक काठ्या घेऊन वानराच्या अंगावर धावून जात आहेत. या गोंधळामुळे वानराला पकडणे अवघड आहे. स्थानिक पोलिस आणि नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास वानराला ताब्यात घेणे शक्य होईल,’ असे नीलिमकुमार खैरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभ्यासक्रम बदला दर तीन वर्षांनी

$
0
0

‘यूजीसी’ने दिल्या विद्यापीठांना सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना ‘आयटी’चे शिक्षण मिळण्यासाठी, नावीन्यपूर्ण संशोधनाला पाठबळ देणाऱ्या आणि चालू घडामोडींवर आधारित अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येण्यासाठी दर तीन वर्षांनी अभ्यासक्रमामध्ये बदल किंवा सुधारणा करण्याच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांना केल्या आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळण्यासाठी ‘यूजीसी’ने विद्यापीठांना हे बदल सुचवले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी शिक्षण आणि सामाजिक विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीत अभ्यासक्रमाशी संबंधित असलेल्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांचा दर तीन वर्षांनी आढावा घेण्याचा आणि त्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. अभ्यासक्रमांमध्ये बदल करताना विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल, अशा प्रकारचे बदल अभ्यासक्रमात करण्याचे सुचवले आहे. तसेच, विद्यार्थ्यांमधील कौशल्यांना अधिक वाव मिळेल, असे अभ्यासक्रम आखायचे आहेत.

हा नवा अभ्यासक्रम आखताना विद्यार्थ्यांना अत्याधुनिक आणि जगात चालू असलेल्या घडामोडींवर आधारित शिक्षण मिळाले पाहिजे, असा आग्रह धरण्यात आला आहे. ‘विद्यापीठांच्या कुलगुरूंनी अभ्यासक्रम बदलण्याची किंवा त्यामध्ये बदलत्या काळानुसार बदल करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. तसेच, निर्णयाची अंमलबजावणी विद्यापीठांचे विभाग आणि कार्यक्षेत्रात येणाऱ्या कॉलेजांमध्ये करता येण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी,’ अशी माहिती ‘यूजीसी’चे सचिव डॉ. जसपाल संधू यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगाव संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. देखणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई आणि मराठी वाङ्मय मंडळ, अंमळनेर (जि. जळगाव) तसेच अप्पासाहेब केले सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २५, २६ फेब्रुवारीला होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड करण्यात आली आहे.
२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरुवात होईल. दुपारी तीन वाजता उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर मान्यवरांचे कविसंमेलन, प्रकट मुलाखत, परिसंवाद, कथाकथन, स्थानिक कवींचा कट्टा असे कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष उज्ज्वल केले आणि वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी ही माहिती दिली आहे. उद्घाटन सोहळ्याला साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे, मीनाक्षी पाटील, कवी प्रकाश होळकर उपस्थित राहणार आहेत.
खानदेश, जळगाव परिसरातील दोनशे लेखक, कवी, प्रकाशक तसेच रसिक संमेलनात सहभागी होतील. डॉ. देखणे यांची ४५ पुस्तके प्रसिद्ध असून, त्यांनी विविध संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे.

तत्त्वदर्शनाला भावदर्शनाची, कारुण्याला क्रांतीची आणि ज्ञानाला प्रेमाची जोड देऊन आपल्या लेखणीतून भारतीय संस्कृती समर्थपणे उभी करणाऱ्या आणि प्रेमाचा धर्म मानणाऱ्या साने गुरुजींच्या गावी हे संमेलन होत आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड हा मी माझा बहुमान समजतो.
- डॉ. रामचंद्र देखणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाध्यक्षाचे होते संमेलनातच अवमूल्यन

$
0
0

रंगनाथ पठारे यांची व्यवस्थेवर सडकून टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साहित्य संमेलनात साहित्य सोडून सगळ्या गोष्टी होतात. राजकीय व्यक्तींच्या बडेजावामुळे उद्घाटनाचा सोहळा भव्य होतो. मात्र, त्यात अध्यक्षाला अडगळीची जागा मिळते. संमेलनाच्या अध्यक्षाचे अवमूल्यन साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरच सर्वाधिक होते, अशी बोचरी टीका करून ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांनी साहित्य संमेलनाच्या एकूण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि डॉ. प्रकाश लोथे लिखित ‘धर्मधुरीण’ पुस्तकाचे प्रकाशन पठारे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे, डॉ. लोथे, ‘ग्रंथाली’चे दिनकर गांगल आणि मंदार जोगळेकर उपस्थित होते.
‘साहित्य संमेलनाचा सोहळा भव्य करण्यामध्ये अनेकांना जास्त रुची वाटते. राजकीय व्यक्ती येतात, भाषण ठोकतात म्हणून उद्घाटनाचा सोहळा भव्य होतो. त्यानंतर मात्र संमेलनाचा जीव निघून जातो. संमेलनात सर्वोच्च स्थानी असणाऱ्या अध्यक्षाला अडगळीची जागा दाखवली जाते. नेत्यांची भाषणे झाल्यानंतर अध्यक्षांचे भाषण ऐकायला कोणीही थांबत नाही, साहित्याच्या सर्वोच्च व्यासपीठावर अध्यक्षाची अशी अवहेलना होणे हास्यास्पद आहे,’ असे पठारे यांनी सांगितले. हल्ली मराठीचा साधा प्राध्यापकही संमेलनाध्यक्षपदाच्या शर्यतीत असतो, असे सांगून त्यांनी प्रवीण दवणे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. साहित्य संमेलनाला पोकळेपण आले आहे. साहित्य महामंडळाचे सध्याचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी काही प्रमाणात सकारात्मक प्रयत्न केले आहेत, असे सांगून पठारे यांनी त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
सुमित्रा भावे यांनी कादंबरीतील पात्रांचा वेध घेतला. त्या म्हणाल्या, ‘सहसा पुरुषांनी केलेल्या लेखनात स्त्रियांच्या व्यक्तिरेखा सहृदयतेने उमटत नाहीत. मात्र, सद्सदविवेकबुद्धीचे निसर्गदत्त देणगी लाभली असेल तर स्त्रियांच्या दुःखाने संवेदनशील पुरुषही गलबलतात. अशा वेळी निर्भयतेने स्वतःला आणि समाजाला तपासून पाहणारा नायक म्हणजे धर्मधुरीण असतो. नैतिकतेचा अर्थ शोधणारा धर्मधुरीण लेखनातून उमटतो. त्यातून आजची जाणीव समुद्ध आणि सहिष्णू होते.’
आगाशे म्हणाले, की ‘लेखक, दिगदर्शक आणि अभिनेते तिघेही वास्तवातून निघून अवास्तवात जातात. केवळ त्यांचे मार्ग वेगवेगळे असतात. लेखक लेखणीच्या रस्त्याने विचार मांडत असतो. लेखन आणि समीक्षा सोपी नसते. कौतुक किंवा टीका म्हणजे समीक्षा नव्हे. त्यासाठी सखोल अभ्यास असावा लागतो.’ अस्मिता पांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगतसिंगांना म्हणे १४ फेब्रुवारीला फाशी

$
0
0

सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांचा जावईशोध; गोंधळाअंती आदेश रद्द

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना १४ फेब्रुवारीला फाशी झाली, असा जावईशोध सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी लावला आहे. याच दिवशी म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन डे’ला विद्यार्थ्यांनी क्रांतिकारांच्या प्रतिमांचे, तसेच पालकांचे औक्षण करावे, सोबतच पालकांनी जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणासाठी आर्थिक मदत करावी असा तुघलकी आदेश सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी तानाजी घाडगे यांनी शाळांना दिले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. बराच गोंधळ झाल्यानंतर शिक्षण विभागाने शुक्रवारी हा आदेश रद्द केला.
सरकारी माहितीच्या आधारे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली, असा इतिहास असताना त्यांना १४ फेब्रुवारीला फाशी देण्यात आल्याचा शोध घाडगे यांनी लावला आहे. ‘या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना शाळेत बोलवावे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करून पालकांचे औक्षण करावे. अशाप्रकारच्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना देशभक्तीची आणि आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीव होईल,’ असे आदेशात म्हटले आहे.
‘जगभर १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गजाआड असणारा एक स्वयंघोषित संत आणि त्याचे शिष्य गेल्या काही वर्षांपासून हा दिवस माता पिता पूजन दिवस म्हणून साजरा करतात. अशा लोकांचा हा सांस्कृतिक दहशतवाद शाळांनी राबविण्याची काहीच आवश्यकता नाही. त्यामुळे दिलेला आदेश रद्द करून १४ फेब्रुवारीला शाळांमध्ये होणारे कार्यक्रम थांबवावेत,’ अशी मागणी शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक यांनी केली.

ती चूक टायपिंगची
घाडगे यांच्या या अजब आदेशावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर शिक्षण विभागाने तो रद्द केल्याची माहिती शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी दिली. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांना फाशी दिल्याची आदेशातील तारीख चुकीच्या टायपिंगमुळे झाल्याची कबुली घाडगे यांनी दिली आहे. ‘आमच्या कार्यालयातील एक महिला कर्मचारी दरवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम आखतात. यंदाही असाच कार्यक्रम आखण्यात आला. मात्र, तो कार्यक्रम रोषामुळे रद्द केला आहे,’ असेही घाडगे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीलेश घायवळला सशर्त जामीन मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कुख्यात गुंड नीलेश घायवळला जामीन मंजूर झाला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्याने त्याला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत प्रवेश न करण्याच्या अटीवर जामीन देण्यात यावा अशी अट पुणे पोलिसांनी घातली होती. पुण्यातील मोका कोर्टाने ही अट मान्य करून जामीन अर्ज मंजूर केला आहे. मोका कोर्टाचे विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
नीलेश घायवळ आणि गजा मारणे या दोन टोळ्यांच्या युद्धातून अनेकांचे खून पडले आहेत. त्यामुळे गेल्या साडेसहा वर्षांपासून नीलेश तुरुंगात होता. पौड येथून पुण्याला परतताना २०१०मध्ये नीलेशच्या मोटारीवर मारणे टोळीच्या गुंडांनी हल्ला केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी घायवळ टोळीतील गुंड पप्पू कुडले याच्या मार्गावर होते. ९ मे २०१० रोजी पप्पू आणि त्याचा भाऊ सचिन दत्तवाडी परिसरातून जात असताना दत्तवाडी पोलिस चौकीजवळ त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यात सचिन कुडलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी घायवळ टोळीतील ३१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
सुप्रीम कोर्टाने त्याचा जामीन अर्ज नुकताच मंजूर केला. जामीन मंजूर करताना कोणत्या अटी घालण्यात याव्यात याचा निर्णय स्थानिक कोर्टात घेण्यात यावा. त्यासाठी सरकारी वकिलांनी अटी नमूद कराव्यात असेही सुप्रीम कोर्टाने आदेशात स्पष्ट केले होते. त्यानसार पुण्यातील मोका कोर्टात नीलेशचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. कोर्टाने ५० हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर अर्ज मंजूर केला. घायवळतर्फे अॅड. सुधीर शहा आणि अॅड. संतोष भागवत यांनी काम पाहिले.

घातलेल्या अटी
- नीलेश घायवळने निवडणूक काळात पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत प्रवेश कररु नये.
- खटल्यातील पुराव्यात हस्तक्षेप करू नये. खटल्याचा निकाल लागेपर्यंत आठवड्यातून तीन दिवस दत्तवाडी पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी.
-खटल्याच्या प्रत्येक तारखेला उपस्थित रहावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीनंतरही कोटींची ‘उड्डाणे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीवर विरोधी पक्षांकडून चहूबाजूंनी टीका होत असली, तरी निवडणुकीच्या प्रचारात नोटाबंदीचे पडसाद कुठेच दिसून येत नाहीत. यापूर्वीच्या निवडणुकांप्रमाणे सर्वच उमेदवार आणि पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यास सुरुवात झाली असून, आगामी आठवड्यात त्यात आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नोटाबंदीमुळे सर्वच नागरिकांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याची तक्रार वारंवार केली जात होती. अनेकांच्या हाती पैसाच शिल्लक नसल्याचे गाऱ्हाणे मांडण्यात येत होते. परंतु, निवडणुकांची चाहूल लागल्यापासून विरोधी पक्षांच्या उमेदवारांनाही नोटाबंदीचा विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. उमेदवारी निश्चित झाल्यापासूनच खर्चाचे आकडे वाढायला लागले आहेत. नोटाबंदीची मुदत संपून आता महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला असून, पुरेशा प्रमाणात नोटा उपलब्ध झाल्या असल्याने खर्चासाठी विशेष अडचणी येत नसल्याचे निरीक्षण उमेदवारांकडून नोंदवले जात आहे. काही कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकांसाठी सध्या सर्वच उमेदवारांचा ‘हाऊस टू हाऊस’ प्रचार सुरू आहे. त्याकरिता, माहिती देणाऱ्या पत्रकांपासून ते रिक्षा आणि एलईडीच्या प्रचार रथांपर्यंतच्या विविध साधनांचा वापर केला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारावर लक्ष केंद्रित केले असून, संबंधित प्रभागातील नागरिकांना उमेदवारांकडून एसएमएस पाठवले जात आहेत. निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवारासाठीची खर्च मर्यादा पाच लाखांवरून १० लाख रुपये केल्याने त्या मर्यादेत खर्च करण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचारासाठी ‘फ्लॅश मॉब’चा वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सहा ते आठ मॉडर्न तरुण-तरुणींचा एक ग्रुप एका आलिशान मॉलच्या परिसरात अचानकपणे एकत्र येतो... संगीताच्या तालावर ते थिरकू लागतात... त्यांच्याभोवती नागरिकांची गर्दी जमते... आणि नृत्य करत असतानाच हळूहळू ते एका राजकीय पक्षाचा जाहीरनामा आणि त्या प्रभागातील उमेदवारांची माहितीदेखील सांगू लागतात.., हा सर्व प्रकार म्हणजे दुसरे काहीही नसून, तरुणांमध्ये लोकप्रिय ठरलेला ‘फ्लॅश मॉब’च आहे. तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून परदेशातून भारतात दाखल झालेल्या ‘फ्लॅश मॉब’ या संकल्पनेचा महापालिका निवडणुकीच्या प्रचारात वापर करण्याचा ट्रेंड या वर्षी पाहायला मिळत आहे.

तरुणांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या प्रमुख उद्देशाने फ्लॅश मॉब ही संकल्पना समोर आली आहे. स्टेज डेअरिंग, आत्मविश्वास आणि एकत्र येण्याची भावना निर्माण होण्यासाठी ही संकल्पना पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुजली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून भारतातही त्याचा प्रसार वाढत आहे. पुण्यातही गेल्या काही वर्षांत ‘फ्लॅश मॉब’ झाले आहेत. त्यास तरुणाईसह सर्वांकडूनच पसंती मिळत आहे. पॉलिटिकल ब्रँडिंग कंपन्यांकडून आता त्याचा निवडणुकीच्या प्रचारात वापर करण्यात येत आहे.

‘फार पूर्वीपासून आपल्याकडे प्रचारासाठी पथनाट्याचा वापर केला जातो; मात्र सध्याच्या धावपळीच्या युगात

नागरिकांकडून त्यास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वेळप्रसंगी उमेदवारालाच पथनाट्याच्या ठिकाणी कार्यकर्ते उभे करण्याची वेळ येते; मात्र ‘फ्लॅश मॉब’ला मिळणारी पसंती विचारात घेतली, तर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान याचा अवलंब केल्यास नागरिक ते टाळून पुढे जाऊ शकणार नाहीत, अशी खात्री उमेदवारांना आहे,’ अशी माहिती ‘कॉमन मॅन प्रॉडक्शन’चे आनंद अलकुंटे यांनी दिली.

‘निवडणूक प्रचारासाठी फ्लॅश मॉबला खूप चांगली मागणी आहे. हा प्रकार पहिल्यांदाच पुणे महापालिकेच्या निवडणूक प्रचारात वापरला जात आहे. कमीत कमी वेळेत नागरिकांचे लक्ष तुमच्याकडे वेधण्यासाठी प्रामुख्याने या प्रकाराचा वापर केला जात आहे. ‘फ्लॅश मॉब’साठी प्रभागाचे ‘थीम साँग’ व पक्षाचे गाणे तयार करावे लागते.

या प्रकारामुळे कमी वेळेत अधिकाधिक लोकांपर्यंत उमेदवाराचे नाव, चिन्ह, पक्ष, पक्षाचा व उमेदवाराचा अजेंडा याची माहिती पोहचवणे शक्य आहे,’ असेही अलकुंटे यांनी सांगितले.

..............

कलाकारांना संधी

‘फ्लॅश मॉब’साठी प्रभागाचे ‘थीम साँग’ तयार करण्यात येत आहे. त्यामुळे नवीन कलाकारांना संधी मिळत आहे. तसेच, ‘फ्लॅश मॉब’ सादर करण्यासाठी शहरातील विविध डान्स ग्रुपना समाविष्ट करून घेतले जात आहे. त्यामुळे या निमित्ताने तरुणांना चांगला रोजगारही उपलब्ध होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकशाही संरक्षणाची काँग्रेसजनांची शपथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्ष हा महापालिका निवडणुकीतील आपला नंबर एकचा शत्रू असल्याचा दावा करून काँग्रेसने भाजपविरुद्ध आंदोलनाचे हत्यार शुक्रवारी उपसले. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून लोकशाही मजबूत करण्याची शपथ घेतली.
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, आमदार शरद रणपिसे, शहराध्यक्ष रमेश बागवे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, रोहित टिळक, गोपाळ तिवारी, कमल व्यवहारे, आबा बागूल, चंदू कदम, दत्ता बहिरट आणि काँग्रेसचे अधिकृत तसेच पुरस्कृत उमेदवार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
भाजप राज्यघटनेची पायमल्ली करीत असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष बागवे यांनी शपथ घेताना केली. डॉ. कदम, बागवे, शिंदे, जोशी, बागूल आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

काँग्रेसचा एका गटाची अनुपस्थिती
काँग्रेसच्या एका गटाकडून तिकीट वापटानंतर नाराजीचा सूर लावण्यात येत आहे. ‘बिल्डरांना काँग्रेस पक्ष विकणाऱ्यांना आणि जातीपातीचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना हटवा, तिकीट विकणाऱ्यांना हटवा, काँग्रेसला वाचवा, कलमाडी लाओ काँग्रेस बचाओ, आदी आशयाचे फलक शहराच्या विविध भागात लावण्यात आले आहे. या घटनेचे पडसाद शपथ कार्यक्रमातही उमटले. काँग्रेसचा एक संपूर्ण गट सध्या प्रचारात सक्रिय नसल्याने त्याने कार्यक्रमाला अनुपस्थिती लावण्यातच धन्यता मानली.

काँग्रेसभवनात उमेदवारांची उज‍ळणी

शपथ कार्यक्रमापूर्वी काँग्रेसच्या उमेदवारांची काँग्रेसभवनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत उमेदवारांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ‘ईव्हीएम’ मशिनची आवश्यकता असल्याचे मत उमेदवारांनी मांडले. प्रचार करताना काही काँग्रेस कार्यकर्ते सक्रिय नसल्याची बाब काही उमेदवारांनी वरिष्ठांच्या कानावर घातली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ भाजपला गुंडांची गरज का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात भाजपला गुंडांची गरज का लागते? राष्ट्रीय स्वयंसेवक संघही भाजपच्या विरोधात आहे. त्यांनाही ही गुंडगिरी पसंत नाही. भाजपने सत्तेचा, गुंडांचा वापर करून काँग्रेसशी मस्ती करू नये. नाही तर शेवटचे दोन दिवस मी पुण्यात येऊन बसेन. मग बघतो कोण किती गुंडगिरी करतो,’ असा इशारा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी भाजपला दिला.
महापालिका निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ राणे यांच्या हस्ते वाढविण्यात आला. उपमहापौर मुकारी अलगुडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, अॅड. अभय छाजेड, अजित दरेकर, रो‌हित टिळक, रशीद शेख, अरविंद शिंदे, गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते.
राणे यांनी भाषणाची सुरुवातच पुण्यातील कायदा सुव्यस्थेच्या प्रश्नावर बोट ठेवत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश झालेल्या गुंडांची नावे आणि त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादी त्यांनी उपस्थितांना दाखवत भाजपमधील गुंडगिरीवर सडकून टीका केली. मर्डर, बलात्कार आदी गुन्हे असतील, तर भाजपवाले त्यांना उमेदवारी पदे देतात, असा टोलाही त्यांनी लगावला. या वेळी राणे यांनी खासदार संजय काकडे यांच्यावर जोरदार टीका केली.
राणे यांनी नोटाबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर टीका केली. युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील भांडण हे राजकारण असल्याचे ते म्हणाले. दोघेही इतके भांडत आहेत की एकमेकांच्या नरड्याला हात घालायचे बाकी आहेत. मात्र, त्यांच्यात हात उचलायचीही हिंमत नाही. ते केवळ तोंडानेच मर्डर करू शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘हे सरकार पारदर्शकतेचा दावा करते आहे. मी मुख्यमंत्री असताना यातील अनेक जण त्यावेळी मंत्री होते. ते किती धुतल्या तांदळासारखे आहेत, हे मला माहीत आहेत,’ असेही राणे म्हणाले. राज्यात गेल्या अडीच वर्षांत महागाई वाढते आहे. या सरकारने आश्वासने पाळलेले नाहीत. यांच्याकडे विकासाचे विषय नसल्याने ते भावनेवर बोलतात. आश्वासने पाळण्याची ताकद काँग्रेसमध्ये असून या सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये, शहराचा विकास करायचा असेल, तर काँग्रेसला मत द्या, असे आवाहनही या वेळी राणे यांनी केले.

नोकरी सुरक्षित ठेवायची आहे का?
निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस भाजपच्या सांगण्यावरून काँग्रेसच्या उमेदवारांना त्रास देत असल्याची तक्रार व्यासपीठावरून करण्यात आली. राणे यांनी पोलिस, महसूल अधिकाऱ्यांचा समाचार घेत निरपेक्षपणे काम करण्याचा सल्ला दिला. नोकरी सुरक्षित ठेवायची असेल, तर पक्षपातीपणा करू नका. आमचेही सरकार येणार असल्याचा सल्ला देत २०१४ पूर्वीची ताकद अजूनही काँग्रेसमध्ये असल्याचे ते म्हणाले. हे सरकार अळवावरचे पाणी आहे, ते जाणार असल्याने काँग्रेसशी मस्ती करू नका, असा दमही त्यांनी प्रशासनाला दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसृष्टीसाठी पर्यायी जागा शोधू:भाजपचा ‘यू टर्न’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूडच्या कचरा डेपोची जागा मेट्रो प्रकल्पाच्या डेपोसाठी आवश्यक असताना आता निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भारतीय जनता पक्षानेही तेथे शिवसृष्टी उभारण्याची ‘ग्वाही’ मतदारांना दिली आहे. ‘शिवसृष्टीसाठी पर्यायी जागा शोधू,’ असे जाहीर करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी ‘यू टर्न’ घेतला असून, ‘शिवसृष्टीचा प्रकल्प पूर्ण करू,’ असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे एका बाजूला मेट्रोच्या विविध सर्वेक्षणांचे काम सुरू असताना डेपोच्या जागेवरून पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

वनाझ ते रामवाडी या मार्गावरील मेट्रोचा डेपो कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागेवर असेल, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. याच जागेवर भव्य शिवसृष्टी उभारण्याचे पालिकेचे नियोजन आहे. हे दोन्ही प्रकल्प एका ठिकाणी होऊ शकणार नाहीत, असा स्पष्ट निर्वाळा मेट्रोचा अहवाल करणाऱ्या दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) यापूर्वीच दिला आहे. तरीही भाजपने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात कोथरूडच्या जागेवरच शिवसृष्टीचा प्रकल्प पूर्ण केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे या जागेवर नक्की मेट्रोचा डेपो होणार की शिवसृष्टी, याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

मेट्रो आणि शिवसृष्टी एका जागेवर होणार नाही, असा स्पष्ट अभिप्राय ‘डीएमआरसी’ने दिला असताना पुन्हा त्याच जागेवर शिवसृष्टीचा आग्रह कशासाठी, अशी विचारणा केली असता, पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘मेट्रोच्या डेपोसाठी कोथरूडची जागा आवश्यक असली, तरी शिवसृष्टीसारखा प्रकल्प शहराच्या वैभवात भर घालणारा आहे. त्यामुळे कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभारून मेट्रोसाठी भुयारी डेपो तयार करता येईल का, यासाठी तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल.’

काही महिन्यांपूर्वी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी ‘शिवसृष्टी झालीच पाहिजे,’ अशी भूमिका घेतली होती. ‘शिवसृष्टीसाठी कचरा डेपोच्या शेजारील वनखात्याची जमीन उपलब्ध करून दिली जाईल,’ असे आश्वासन त्या वेळी देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी शिवसृष्टीवरून वाद उद्भवू नये म्हणून वनाझ-रामवाडी मार्गासाठी कल्याणीनगर येथे डेपोसाठी नवीन जागा शोधण्यात आली होती.

..................

निवडणुकांनंतरच स्पष्टता

माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी शिवसृष्टीसाठी सुरुवातीपासून पाठपुरावा केला आहे. तसेच, या भागांतील सर्व स्थानिक नगरसेवकांचाही शिवसृष्टी व्हावी, असा आग्रह आहे. यापैकी कोणीही मेट्रोला विरोध केला नसला, तरी दोन्ही प्रकल्पांना जागा दिली जावी, अशी भूमिका घेण्यात येत आहे. त्यामुळे आता या जागेवर नेमका कोणता प्रकल्प होणार, हे निवडणुकांनंतरच स्पष्ट होऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे: मावळमध्ये २५०जणांना प्रसादातून विषबाधा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील मावळ भागातील पाचाणे गावातील २५०हून अधिक लोकांना प्रसादातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. पायाबा महाराजांच्या उत्सवामध्ये प्रसाद म्हणून देण्यात आलेल्या पेढ्यातून ही विषबाधा झाल्याचं समजतं.

पाचणे गावात शुक्रवारी पायबा महाराजांच्या उत्सवानिमित्त उरुस भरला होता. यावेळी प्रसाद म्हणून गावकऱ्यांना पेढ्याचे वाटप करण्यात आले. हे पेढे खाल्ल्यानंतर रात्रीच्या सुमारास अनेकांना उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला. काहींना चक्कर येऊ लागली. खाण्यातूनच हे होत असल्याचा संशय आल्यानंतर गावकऱ्यांना तात्काळ उपचारासाठी औंध रुग्णालय, बढे रुग्णालय, पायोनियर रुग्णालय, पवना रुग्णालय आणि लहान-मोठ्या दवाखान्यांमध्ये दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे.

तळेगाव पोलिसांनी या प्रकरणी देवळाबाहेरील एका पेढेवाल्याच्या दुकानातील माल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेला पेढ्यांचा साठा अन्न आणि औषध प्रशासनाकडं (एफडीए) तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. एफडीएचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्तिकर विभागाचे डॉक्टरांवर ‘ऑपरेशन’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यासह राज्यातील प्रतिष्ठित डॉक्टरांच्या क्लिनिक, तसेच घरांवर छापे टाकून प्राप्तिकर विभागाने शनिवारी ‘ऑपरेशन’ सुरू केले आहे. या कारवाईत पुण्यातील नऊ डॉक्टरांवर कारवाई असून त्यात काही दाम्पत्यांचा समावेश आहे.

डॉक्टरांकडून उत्पन्न दडविल्याच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागातर्फे सांगण्यात येत आहे. राज्यात अशा स्वरूपाची डॉक्टरांवरील ही पहिलीच कारवाई असल्याने मोठ्या प्रमाणात वैद्यकविश्वात खळबळ उडाली. या कारवाईमुळे डॉक्टर करीत असलेल्या ‘कट प्रॅक्टिस’ला अधिकच पुष्टी मिळाल्याने आता पुढचा नंबर कोणाचा अशीच डॉक्टरांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. पुणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर येथे एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली. प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे छापे टाकले.

पुण्यातील ११ प्रतिष्ठित डॉक्टरांवर छापे टाकण्यात आले. पुण्यात एक प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व त्यांची पत्नी, एक अस्थिरोगतज्ज्ञ, एक वंध्यत्व निवारणतज्ज्ञ, एक बालरोगतज्ज्ञ, एक प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर व त्यांची पत्नी, दोन हृदयरोगतज्ज्ञ आणि एका दाम्पत्यासह रेडिओलॉजिस्टचा समावेश आहे. शहरातील काही क्लिनिक व हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी मोठी रक्कम आकारण्यात येते. त्यासाठी रोखीने पैसे घेतले जात असले, तरी त्यासाठी पावती दिली जात नसल्याच्या तक्रारी प्राप्तिकर विभागाकडे आल्या होत्या. डॉक्टरांकडून चोरी छुपे होत असलेल्या कट प्रॅक्टिसबद्दलही अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. याच संशयावरून त्यांच्या घरावर व क्लिनिकवर छापे टाकल्याचे प्राप्तिकर विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारे डॉक्टरांवर छापे पडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार यादीत गोंधळात गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये झालेल्या चुका दुरुस्त केल्याचा दावा पालिकेकडून केला जात असला, तरी आता मतदान केंद्रनिहाय त्याची विभागणी सुरू झाल्यानंतर त्रुटी राहिल्याचे समोर आले आहे. मतदार यादीतील अनेक मतदारांचे अनुक्रमांक बदलले गेल्याची धक्कादायक माहिती असून, केंद्रांवरील व्यवस्थेतही बदल केल्याचा फटका मतदारांना बसण्याची भीती आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार महापालिकेने प्रा-रूप मतदार यादी गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती. प्रभागातील हद्दीवरचे मतदार वेगळ्याच प्रभागात गेल्याचे यावेळी स्पष्ट झाले होते. अशा मतदारांची संख्या मोठी होती. त्यावरील, हरकतींची सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास पालिकेला दोन दिवस उशीर झाला. तरीही, अंतिम यादी निर्दोष नसल्याचे पुढे येत असून, त्यातील चुकांचा फटका २१ फेब्रुवारीला मतदारांना बसण्याची चिन्हे आहेत.
मतदार यादी निश्चित झाल्यानंतर पालिकेने मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. एका मतदान केंद्रांवर सातशे ते आठशे मतदार असावे, या आयोगाच्या सूचनांनुसार केंद्रांची रचना केली गेली आहे. त्यामुळे, यंदा शहरात ३ हजार ४३२ मतदान केंद्रे असतील. या मतदान केंद्रांनुसार आता मतदारांची विभागणी करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, त्यातून अनेक त्रुटी निदर्शनास येत असल्याने मतदानाच्या दिवशी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. मतदार यादीतील अनुक्रमांक आणि मतदान केंद्रावरील मतदार क्रमांक यामध्ये तफावत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे, नेमके मतदान केंद्र कोणते, याचा शोध घेण्यातच नागरिकांचा बराच वेळ जाण्याची भीती आहे. त्याशिवाय, एकाच प्रभागाच्या दोन अंतिम मतदार याद्या असल्याचेही पुढे आले असून, त्यातील मतदार संख्या वेगवेगळी आहे. त्यामुळे, मतदारसंख्येत नेमकी वाढ झाली कशी, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

मतदारांची धावपळ होणार?
मतदाराच्या अनुक्रमांकानुसार मतदान केंद्र निश्चित केली जायची. येत्या पालिका निवडणुकांसाठी मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या निश्चित केली गेली असून, एका ठिकाणी दोन केंद्रे असली, तर दुसऱ्या मतदान केंद्रावर पुन्हा एकपासून सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे, आपले मतदान नेमके कोणत्या ठिकाणी आहे, याची शोधाशोध मतदारांना करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मुख्यमंत्र्यांचा उद्या ‘चौकार’

$
0
0

भाजप उमेदवारांसाठी चार सभांचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार असून, उद्या सोमवारी (१३ फेब्रुवारी) शहराच्या वेगवेगळ्या भागांत त्यांच्या चार सभा होणार आहेत. केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर पुढील आठवड्यात शहरात येणार असून, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर १८, १९ फेब्रुवारीला सभा घेऊन प्रचाराचा समारोप करणार आहेत.
‘पुणे महापालिकेत भाजपला निर्भेळ यश मिळावे, यासाठी फडणवीस यांनी सुरुवातीपासून लक्ष घातले आहे. त्यांच्या उपस्थितीत इतर पक्षांतील अनेक नगरसेवकांचा प्रवेशही झाला. शहराशी संबंधित अनेक समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी त्वरेने निर्णय घेतले. भाजपला मतदान करण्याची साद घालण्यासाठी आता मुख्यमंत्रीच भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. शहरातील शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती आणि हडपसर या चार विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्‍यांच्या सभा होणार आहेत,’ अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी शनिवारी दिली. सभेसाठी आवश्यक बहुतेक परवानग्या मिळाल्या असून, उर्वरित मान्यता रविवारी प्राप्त होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाणेरमधील माऊली मंगल कार्यालयाजवळ सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्र्‍यांची पहिली सभा होणार आहे. त्यानंतर, डहाणूकर हौसिंग सोसायटी मैदानात सायंकाळी ६.१५ला दुसरी सभा होणार आहे. सातारा रोडवरील वाळवेकर लॉन्समध्ये सायंकाळी ७ वाजता तिसरी, तर हडपसरमधील शिवसाम्राज्य चौकात सायंकाळी ७.४५ वा अखेरची सभा होणार आहे.
मुख्यमंत्र्‍यांनंतर नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांची १६ फेब्रुवारीला, तर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची १७ फेब्रुवारीला सभा घेण्यात येणार आहे. या सभांचे ठिकाण आणि वेळ एक-दोन दिवसांत निश्चित होईल, असे गोगावले यांनी सांगितले. शहरातील प्रचाराच्या समारोपासाठी प्रकाश जावडेकर १८ व १९ फेब्रुवारी अशा दोन्ही दिवशी विविध भागांत सभा घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मतदान केंद्रांबाबत आक्षेप
पालकमंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने शनिवारी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन मतदान केंद्रांबाबतचे काही आक्षेप नोंदवले. अनेक प्रभागांत दुबार मतदारांची संख्या जास्त असून, लोकसभा-विधानसभेप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी सोसायटी, टाउनशिपमध्ये मतदान केंद्र सुरू केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, पूर्वीप्रमाणे एक हजार मतदारांसाठी एक मतदान केंद्र असावे, असा आग्रह त्यांनी धरला. या शिष्टमंडळात आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक यांचा समावेश होता.


आज स्वच्छ भारत मोहीम
भारतीय जनता पक्षातर्फे आज, रविवारी शहरातील सर्व ४१ प्रभागांमध्ये ‘स्वच्छ भारत’ मोहीम राबविण्यात येणार आहे. पक्षाचे सर्व उमेदवार, कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी होणार असून, प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी, पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘फेसबुक लाइव्ह’ची उमेदवारांनाही भुरळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

छोटी प्रचारफेरी असो की बड्या नेत्यांची सभा, राष्ट्रीय नेते असोत किंवा साधे विभागप्रमुख सध्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून प्रचार करण्याचा ट्रेंड चांगलाच जोरात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष त्यामध्ये आघाडीवर असला, तरी आता हा ट्रेंड सर्वच पक्ष आणि आता अपक्षांपर्यंतही येऊन पोहोचला आहे. या लाइव्ह प्रचाराला मोठ्या प्रमाणावर लाइक आणि शेअर्स मिळत आहेत.
यंदाच्या निवडणूक प्रचारात एकूणच सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. यंदाची निवडणूक चारसदस्यीय प्रभागपद्धतीने होत आहे. त्यामुळे प्रभागाचा आकारही जणू मिनी विधानसभेसारखा आहे. त्यामुळेच सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून फेसबुक लाइव्हसह सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे.
फेसबुक वर पोस्ट करणे किंवा फेसबुक लाइव्हसारखे इव्हेंट करण्यात सुरुवातीला भारतीय जनता पक्ष आघाडीवर होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय, हे पाहून इतर पक्षांनीही त्यांचे अनुकरण करायला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांबरोबरच भाजपच्या काही नेत्यांनीही फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनीही फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी त्यांचे चिरंजीव अमित यांनीही फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून प्रचारावर भर दिला होता.
सोशल मीडियापासून दूर असलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही हे माध्यम आजमावून पाहिले. त्यांच्याच पक्षाचे जयंत पाटीलही काही दिवसांपूर्वी फेसबुकवर लाइव्ह होते. राष्ट्रवादीच्या मधल्या फळीतील काही नेत्यांनीही हे तंत्र वापरून पाहिले. शिवसेनेची मुलुखमैदान तोफ असलेल्या उद्धव ठाकरे यांनी अजून स्वतः फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधलेला नाही. मात्र, शिवसेनेतर्फे त्यांच्या काही सभा फेसबुकवर लाइव्ह दाखविण्यात येत आहेत.
कॉँग्रेसतर्फे नुकतीच पुण्यात झालेली नारायण राणे यांची सभा लाइव्ह दाखविण्यात आली. कॉँग्रेसचे राज्यस्तरीय नेते अधूनमधून फेसबुकवर पोस्ट करत असतात. परंतु, कॉँग्रेसचे बडे नेते अजून फेसबुक लाइव्हवर दिसलेले नाहीत. स्थानिक पातळीवर काही नगरसेवकांनीही याच तंत्राचा वापर करून पाहिला आहे. काही अपक्षही या माध्यमाचा वापर करून घेताना दिसत आहेत. कमी खर्चात, कमी वेळात मोठा जनसंपर्क साधता येत असल्याने या माध्यमाला पसंती मिळते आहे.

काहींची सोशल अडचण
अनेकांना या तंत्राचा नीट वापर करणे जमत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे फेसबुकवर येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देणे त्यांना शक्य होत नाही. आपला संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यात मात्र, ते यशस्वी होताना दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभागनिहाय यादी पालिकेकडून जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार केंद्रांची यादी महापालिकेने जाहीर केली असून, प्रत्येक मतदान केंद्रावर अंदाजे ६७५ ते ८२५ मतदारांची नावे असणार आहेत. यंदा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होत असल्याने यापूर्वी प्रत्येक केंद्रावर असणारी साडेअकराशे ते बाराशे मतदारांची संख्या घटली आहे. मतदारांची संख्या घटल्यामुळे मतदान केंद्रे वाढली​ आहेत. निवडणुकीसाठी यंदा ३,४३२ मतदान केंद्रे असणार आहेत.
पालिकेसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होत आहे. नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजाविता यावा, यासाठी किमान अंतरावर मतदान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी योग्य यासाठी नियोजन करून प्रभागनिहाय मतदारकेंद्रांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यासाठी प्रभागाची लोकसंख्या आणि मतदारांची संख्या लक्षात घेण्यात आली आहे. निववडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. तेथे आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
बाणेर, बालेवाडी, पाषाण या प्रभाग क्रमांक ९ मध्ये सर्वाधिक म्हणजेच १२० मतदान केंद्रे आहेत. अप्पर सुपर इंदिरानगरमध्ये (प्रभाग क्रमांक ३७) सर्वांत कमी म्हणजे ४८ मतदान केंद्रे आहेत. केंद्रातील प्रत्येक खोलीमध्ये ८२५ मतदारांचे मतदान असेल. यंदा मतदारांना प्रत्येकी चार मते द्यावी लागणार असल्याने अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक खोलीत ८२५ मतदारांची संख्या ठेवण्यात आली आहे.

अंध, अपंगांसाठी विशेष सोय
पालिका शिक्षणमंडळाच्या शाळा, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, प्रभागातील शाळा, कॉलेज, भाजीमंडई, यांच्यासह पालिकेच्या मालकीच्या इमारतींमध्ये मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. मतदान केंद्रांवर आलेल्या अंध, अपंग, ज्येष्ठ नागरिक, तसेच आजारी महिलांना त्रास होऊ नये, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभागनिहाय मतदान केंद्रांची यादी पालिकेच्या http://www.punecorporation.org या वेबसाइटवर टाकण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीचशे भाविकांना पेढ्यातून विषबाधा

$
0
0

मावळातील पाचणे गावाच्या यात्रेमधील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

मावळ तालुक्यातील पाचणे गावात ग्रामदैवत पायाबा महाराज यांच्या यात्रेसाठी आलेल्या २०० ते २५० भाविकांना पेढ्यांच्या प्रसादातून विषबाधा झाली. ही घटना शुक्रवारी रात्री दहानंतर घडली. या प्रकरणी एका पेढेविक्रेत्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या दुकानातील पेढ्यांची तपासणी केली जात आहे. बाधित ग्रामस्थांवर परिसरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी दुकानदार विठ्ठल शिंदे (माळी), रा. चांदखेड, मावळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मावळ तालुक्यातील पाचणे गावात ग्रामदैवत श्री पायाबा महाराजांच्या वार्षिक यात्रेचा (उरुस) पहिला व मुख्य दिवस होता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुकानदार शिंदे यांनी या गावच्या यात्रेला आपले पेढे, रेवड्या आणि इतर पदार्थांचे दुकान मांडले होते. या वेळी यात्रेनिमित्त गावात आलेल्या भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी शिंदे यांच्या दुकानातील पेढे खरेदी करून ते प्रसाद म्हणून वाटले होते. पेढे खाणाऱ्यांना घरी गेल्यानंतर उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. बाधितांना उपचारासाठी तात्काळ परिसरातील हिंजवडी, नेरे, मारुंजी, बेबडओहळ, डांगे चौक, सोमाटणे फाटा, तळेगाव, चांदखेड येथील खासगी रुग्णालयात तसेच औंध जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या घटनेत सुमारे २०० ते २५० ग्रामस्थ व भाविकांना पेढ्यातून विषबाधेचा त्रास झाला आहे.
‘विषबाधा झालेल्या सर्वांवर परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी दुकानदारास व त्याच्याकडील पेढे ताब्यात घेतले असून, पेढ्यांची तपासणी करण्यासाठी अन्न निरीक्षक विभागाच्या पथकाला प्राचारण केले करण्यात आले आहे. पेढ्यांमधील कोणत्या घटकातून विषबाधा झाली, हे तपासणीनंतर स्पष्ट होईल, त्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल,’ असे तळेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ लिस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी सांगितले आहे.
याबाबत पाचण्याचे सरपंच मनोज येवले म्हणाले, ‘यात्रेत घडलेली घटना दुर्दैवी असली, तरी महाराजांच्या कृपेने मोठा अनर्थ टळला आहे. लोकांना जुलाब व उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात रवाना केले. उपचारानंतर अनेकांना घरी सोडण्यात आले असून, काहींवर अजून उपचार सुरू असले, तरी त्यांची प्रकृती सुधारली आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-नाशिक महामार्गावर आजपासून टोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) तयार करण्यात येत असलेल्या खेड-नाशिक महामार्गाचे संपू्र्ण काम पू्र्ण होण्याआधीच ‘टोल आकारणी’ची गाडी धावणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या मान्यतेनुसार ‘एनएचएआय’ने खेड ते सिन्नर या मार्गावर चाळकवाडी (ता. जुन्नर) आणि हिरगाव पावसा (ता. संगमनेर) या ठिकाणी दोन टोलनाके आज, रविवारपासून सुरू करण्यात येणार आहे.

‘एनएचएआय’कडून पुणे-नाशिक मार्गावर खेड ते सिन्नर या दरम्यान महामार्गाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. ‘एनएचएआय’च्या म्हणण्यानुसार खेड ते सिन्नर या २३० किलोमीटर मार्गावर दोन टप्प्यांत एकूण १०४ किमी अंतर रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्याचा दावा आहे. या अंतरासाठी दोन ठिकाणी टोल आकारणी केली जाणार आहे. तसेच, याच मार्गावर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या मोशी टोल नाक्यावर यापूर्वीपासूनच टोल आकारणी केली जात आहे. त्यामुळे, या पुढे नागरिकांना एकूण तीन ठिकाणी टोल द्यावा लागणार आहे.

सिन्नर ते आळेफाटा या दरम्यान बहुतांश रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. आळेफाट्यापासून नारायण गाव, मंचर आणि खेड या ठिकाणी एक सलग कामेही सुरू झालेली नाहीत. अवसरी घाटात रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तेथे घाटातील वाहतूक नवीन रस्त्याने वळविण्यात आली आहे. खेडच्या घाटातील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. खेड घाटमाथा ओलांडल्यानंतर तेथून पुढे नारायणगावपर्यंत रस्त्याचे काम केवळ नावालाच आहे. अनेक ठिकाणी भूसंपादनामुळे अद्यापही रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे रस्त्याचे काम अपूर्ण असूनही टोल आकारणीस सुरुवात कशी केली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



पुणे-नाशिक मार्गावरील टोल नाके

मोशी (पीडब्ल्यूडी), चाळकवाडी (एनएचएआय), हिवरगाव पावसा (एनएचएआय)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात ओवेसी यांची प्रचारसभा नाकारली

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पुणे

एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांना पुण्यातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या काही भागांमध्ये प्रचार सभा घेण्यासाठी खडक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. एमआयएम पक्षाचे उमेदवार जुबेर बाबू शेख यांच्या प्रचारासाठी १४ फेब्रुवारीला प्रभाग क्रमांक १९ मध्ये ओवेसी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती

ओवेसी यांच्या सभेला परवानगी नाकारताना पोलिसांनी म्हटले आहे, की असदुद्दीन ओवेसी यांच्या ज्या ठिकाणांवर प्रचारसभेला परवानगी मागितली गेली ती सर्व ठिकाणे मिश्र वस्तीतील असून ती अतिसंवेदनशील आहेत. शिवाय ही ठिकाणे सभेसाठी अनुकूल नाहीत. निवडणुकीचा काळ असल्याने या परिसरांमध्ये सर्व पक्षांच्या प्रचारसभा, रॅली सुरू आहेत. एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची भाषणे प्रक्षोभक आणि जातीवाचक असून त्यांच्या जीवाला धोका आहेत. यांमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने या सभेस परवानगी देता येणार नाही असे स्पष्टीकरण देत पोलिसांनी ओवेसींच्या सभेला परवानगी नाकारली आहे.

ज्या ठिकाणांवर ओवेसी यांच्या प्रचारसभांसाठी परवानगी मागण्यात आली, त्यांमध्ये बाफना पेट्रोल पंप, काशेवाडी, राजीव गांधी एसआरए सोसायटी, सेव्हन लव्ह्ज चौक के नेहरु रोड या ठिकाणांचा समावेश आहे.

आपल्या प्रचारसभेला परवानगी नाकारण्यात आल्याने ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. टि्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना ओवेसी म्हणाले की, गेल्याच वर्षी पुण्यात आपली सभा झाली. ती शांततेत पार पडली. मुंबईत झालेल्या दोन सभाही शांततेतच पार पडल्या. मी कोणत्या नियमांचे उल्लंघन केल्यास माझ्यावर कारवाई करण्यात यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images