Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बंडखोरी अखेर शमली

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या विरोधात उभारलेले बंड, उमेदवारी अर्ज घेण्याच्या अखेरच्या दिवशी, मंगळवारी अखेर शमले. एखादा अपवाद वगळता सर्वच बंडखोरांनी माघारीचा झेंडा फडकावला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही ठिकाणी आघाडी झाल्याने शहरातील लढती चौरंगी किंवा पंचरंगी स्वरूपाच्या असणार आहेत. पुढील रविवारपर्यंत (१९ फेब्रुवारी) प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. शहरातील १६२ जागांसाठी तब्बल ११०२ उमेदवार रिंगणात असतील.

मंगळवारी ७५१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वाधिक असली, तरी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात शड्डू ठोकलेल्या बहुतेक कार्यकर्त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी प्रभागात भारतीय जनता पक्षाच्या रेश्मा भोसले यांच्या विरोधात लढणाऱ्या पक्षाचे सतीश बहिरट, मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी प्रभागातून वासंती जाधव यांच्याविरोधात लढणाऱ्या ज्योत्स्ना कुलकर्णी आणि डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी प्रभागामध्ये ज्योत्स्ना एकबोटे यांच्याविरोधात लढणाऱ्या ज्योत्स्ना सरदेशपांडे या तिघांनीही माघार घेतली. भाजपप्रमाणेच कसबा पेठ-सोमवार पेठ प्रभागातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अस्लम बागवान यांनीही माघार घेतली. या प्रभागात नुकतेच काँग्रेसमध्ये आलेले रवींद्र धंगेकर पक्षाचे पुरस्कृत उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतीश म्हस्के, महादेव पठारे, काँग्रेसच्या लक्ष्मी घोडके या बंडखोरांनीही माघार घेतली.

नवी पेठ-पर्वती या प्रभागातून अनुसूचित जाती (महिला) ही जागा भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी (आरपीआय) सोडली होती. आरपीआयच्या सत्यभामा साठे यांनी अर्ज भरण्यापूर्वी भाजपच्या सरस्वती शेंडगे यांनी ‘एबी फॉर्म’सह अर्ज भरला होता. पक्षाने विनंती करूनही केवळ मतपत्रिकेवर ‘कमळ’ दिसणार नाही म्हणून शेंडगे यांनी अर्ज माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळे, या प्रभागात शेंडगे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकणार असल्या, तरी महायुतीच्या अधिकृत उमेदवार सत्यभामा साठे यांना पक्षाच्या चिन्हाशिवाय लढावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले.

उमेदवारांत धक्काबुक्की

निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यापासून घोले रोड क्षेत्रीय कार्यालय चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून रेश्मा भोसले यांच्या उमेदवारीवरून नाट्य घडल्यानंतर माघारीच्या अखेरच्या दिवशी कसबा पेठ-सोमवार पेठ प्रभागातील भाजपचे उमेदवार गणेश बीडकर आणि काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात बाचाबाची आणि किरकोळ स्वरूपाची धक्काबुक्की झाली. उमेदवारी मागे घेण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसान कार्यकर्त्यांमधील हाणामारीपर्यंत पोहोचले. अखेर, पोलिसांना हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाट्य कार्यशाळेचे मुलांसाठी आयोजन

0
0

पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांसाठी नाट्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी खास नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. एकलव्य कला अकादमीच्या वतीने आयोजित या नाट्य कार्यशाळेचे ‘मटा कल्चर क्लब कल्चरल पार्टनर’ असणार आहे.

शनिवारी (११ फेब्रुवारी) व रविवारी (१२ फेब्रुवारी) दुपारी १२ ते ३ या वेळात ही दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात येईल. ही कार्यशाळा पिंपळे-सौदागर येथील शिवार चौकात असणाऱ्या एकलव्य कला अकादमीच्या ऑफिस नंबर २०५,२०६ दुसरा मजला, रोझ आयकॉन अॅमेनिटी अपार्टमेंट येथे होईल.

नाट्यक्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी नाट्य प्रक्रियेची शास्त्रोक्त माहिती असणे गरजेचे असते. या गोष्टींची लहान वयात तोंडओळख झाल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. या विचाराने नाट्य प्रक्रिया म्हणजे काय, शारीरिक हालचाली, शब्दफेक आणि शब्दोच्चार यांची माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. लेखक दिग्दर्शक प्रभाकर पवार ही कार्यशाळा घेणार आहेत.

वय वर्ष ७ ते १३ या वयोगटाच्या मुलांकरिता ही कार्यशाळा खुली आहे.

ही कार्यशाळा सशुल्क आहे.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सदस्यांसाठी कार्यशाळेच्या शुल्कात सवलत देण्यात येणार आहे.

या कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी संपर्क : ९९७५४०४०२६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भराव खचून मजुराचा मृत्यू

0
0

लोणावळा : लोणावळ्याजवळील अॅम्बी व्हॅली येथे एका हॉटेलच्या नव्या बांधकामाचा भराव खचून भरावाच्या ढिगाऱ्याखाली एका मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

जयवंतसिंग केशवसिंग राजपूत (२३) असे बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या मजुरांमध्ये प्रेमसिंग भवरसिंग राजपूत (२१), रूपसिंग भवरसिंग राजपूत (२७), जितेंद्रसिंग विजयसिंग राजपूत (२२), भोमसिंग भगवानसिंग राजपूत (२५, सर्व रा. बंगला क्रमांक-४४, अॅम्बी व्हॅली) यांचा समावेश आहे. या अपघातात मिळलेल्या माहितीनुसार अॅम्बी व्हॅलीमध्ये एका हॉटेलचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी बांधकाम करताना बांधकामाचा भराव अचानक खचला. हा भराव खचल्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर भरावाचे दगड आणि माती कोसळले. यात जयवंतसिंगचा जागीच मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षेसाठी स्वतः सक्षम व्हा : शुक्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यास, त्याची त्वरित व्यवस्थापनाला कल्पना द्या. मात्र, प्रत्येक वेळी एखादी अनुचित घटना केवळ कंपनीच्या आवारातच घडेल, असे नाही. त्याकरिता मनामध्ये महिला-पुरुष असा कोणताही न्युनगंड न बाळगता स्वत: सक्षम व्हा. अन्य राज्यांच्या तुलनेत पुणे-मुंबईतील कायदा सुव्यवस्था कैकपटीने चांगली आहे. या ठिकाणी तुम्ही कामासाठी येत असल्याने तुम्हाला निर्भय व सुरक्षित वातावरण निर्माण तयार करणे, हे पोलिस प्रशासनाचे कर्तव्य आहे,’ असा विश्वास पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी हिंजवडी आयटी पार्क फेज २मध्ये आयटी इंजिनीअर्सना दिला.

‘वॉक विथ पोलिस कमिशनर’ या उपक्रमादरम्यान त्या बोलत होत्या. आयटी अभियंता रसिला ओपीच्या खुनानंतर पुणे पोलिस आणि हिंजवडी आयटी असोसिएशनच्या वतीने ‘वॉक विथ पोलिस कमिशनर’ या उपक्रमाचे मंगळवारी (७ फेब्रुवारी) आयोजन करण्यात आले होते.

‘वॉक विथ पोलिस कमिशनर’ या उपक्रमाला हिंजवडी आयटी पार्कमधील अभियंत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी इन्फोसिस कंपनी ते विप्रो कंपनी या दरम्यान पायी फिरून आयटी अभियंत्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पुणे पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी १०९१ ही हेल्प लाइन सुरू करण्यात आली आहे. तसेच ‘बडी कॉप’ आणि ‘एसओएस’ या योजना राबवण्यात आलेल्या आहेत. यामुळे आयटीयन्स आणि महिलांना तत्काळ पोलिस मदत मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती शुक्ला यांनी दिली.

या वॉक दरम्यान अनेकांनी आयुक्त शुक्ला यांच्याकडे समस्या मांडल्या. शुक्ला यांनी त्यांच्याशी समस्यांबाबत चर्चा केली. यानंतर विप्रो कंपनीत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद, अप्पर पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे, परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त वैशाली जाधव-माने, वरिष्ठ निरीक्षक अरुण वायकर आदी उपस्थित होते.

आयटी कंपनीत योग्य सुरक्षाव्यवस्था नसते, कंपनीतून बाहेर आल्यानंतर पांढऱ्या कपड्यातील स्थानिक नागरिक तरुण-तरुणींना त्रास देत असतात, कामाचा वेळा वेगवेगळ्या असतात. त्या वेळी कंपनीकडून पाहिजे तशी सुरक्षा व्यवस्था पुरवली जात नाही, नेमलेल्या सुरक्षा रक्षकाच्या चारित्र्याची तपासणी झालेली नसते, कंपनी व्यवस्थापनास अडचणी, समस्या विचारल्यानंतर प्रशासन वेगवेगळी उत्तरे देते अशा प्रकारच्या अनेक अडचणी आयटी इंजिनीअर्सनी मांडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना उमेदवाराच्या मुलावर राजकीय वैमनस्यातून हल्ला

0
0

पिंपरी : राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने पिंपरीतील शिवसेनेचे उमेदवार दत्तात्रय वाघेरे यांच्या मुलावार चाकूने वार केले आहेत. मंगळवारी (७ फेब्रुवारी) सायंकाळी सातच्या सुमारास पिंपरीगावात घडली. वैभव दत्तात्रय वाघेरे (२५, रा. पिंपरीगाव) असे वार झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचा सरचिटणीस महादेव बिराजदार (४०, रा. पिंपरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव हा शिवसेनेचे उमेदवार दत्तात्रय वाघेरे यांचा मुलगा आहे. वाघेरे पिंपरीगावातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. महादेव बिराजदार हा राष्ट्रवादीचा सरचिटणीस आहे. वैभव आणि महादेव यांची २०१२ मध्ये भांडणे झाली होती. हाच राग मनात धरून मंगळवारी महादेव यांने वैभव याच्यावर कोयत्याने वार केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. वैभव याला उपचारासाठी चिंचवड येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रचारादरम्यान हा प्रकार घडला असल्याची चर्चा पिंपरीगावात सुरू झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर व पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बिराजदार याला ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिरिजा कुदळे यांची शहराध्यक्षपदी निवड

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड काँग्रेसच्या महिला विभागाच्या शहराध्यक्षपदी गिरिजा कुदळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे काँग्रेस पक्षाच्या महिला विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. चारुलता टोकस यांनी दिले आहे.

काँग्रेसच्या महिला विभागाच्या शहराध्यक्षा ज्योती भारती यांनी राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळविली आहे. त्यामुळे हि जागा रिक्त होती. त्या जागेवर माजी नगरसेविका कुदळे यांची निवड करण्याची शिफारस स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्या माध्यमातून महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारात सुलभता येईल, असा दावा केला जात होता. त्या आवाहनाला प्रतिसाद देत टोकस यांनी कुदळे यांच्या निवडीचे पत्र दिले आहे.

या निमित्ताने चिंचवड चापेकर चौकातील कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये कुदळे यांचे स्वागत करण्यात आले. शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर कविचंद भाट, श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी, सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे उपस्थित होते. बैठकीत महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराच्या रणनीतीविषयी चर्चादेखील झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या १२८ जागांसाठी ७५८ उमेदवार रिंगणात

0
0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत १२८ जागांसाठी ७५८ उमेदवार रिंगणात असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. माघारीनंतर अनेक प्रभागांमध्ये थेट तर, काही ठिकाणी तिरंगी लढती दिसून येणार आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीच्या १२८ जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने दोन हजार ३८८ उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी प्रत्यक्षात एक हजार २३९ जणांनी अर्ज दाखल केले. छाननीमध्ये १४३ अर्ज बाद ठरले. त्यानंतर उमेदवारी अर्ज माघारीच्या मुदतीत ४८० जणांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ७५८ उमेदवार उरले आहेत. या सर्व उमेदवारांना बुधवारी (आठ फेब्रुवारी) सकाळी अकरापासून चिन्हवाटप केले जाणार आहे. तसेच याचवेळी मतदान केंद्रनिहाय मतदार यादीही प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या रणधुमाळीला कमालीचा वेग येणार आहे.

विभागनिहाय माघार घेतलेल्या उमेदवारांची कंसातील संख्या पुढीलप्रमाणे : १ - (४९), २ (२४), ३ (३२), ४ (५३), ५ (४१), ६ (४४), ७ (५६), ८ (३३), ९ (२५), १० (४३), ११ (२१)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपने उघडले विजयाचे खाते

0
0

एकमेव अर्ज राहिल्याने भोसरीतून रवी लांडगे यांची बिनविरोध निवड

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी भोसरीतील प्रभाग क्रमांक सहामधील क (सर्वसाधारण) गटातून भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या माध्यमातून भाजपने शहरात खाते उघडले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससमोर भाजपने कडवे आव्हान निर्माण केले आहे. त्याची प्रचिती उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी आणि लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याच्या पहिल्याच दिवशी आली. प्रभाग सहामधील सर्वसाधारण गटातून (क) रवी लांडगे यांच्यासह तिघांनी अर्ज भरले होते. येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उमेदवार न मिळण्याची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे भाजपचे पारडे जड मानले जात होते. परंतु, या प्रभागातून भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर योगेश लांडगे यांनी रवी लांडगे यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरला होता. तसेच, माजी नगरसेविका सुलोचना बढे यांनीही उमेदवारी अर्ज भरल्यामुळे बिनविरोध निवडीची शक्यता धुसर बनली होती.

परंतु, आमदार महेश लांडगे यांचे समर्थक असलेल्या योगेश लांडगे यांची समजूत काढण्यात आली. गावकी-भावकीचे राजकारण नको, असे आवाहन करण्यात आले. त्यानंतर योगेश लांडगे यांनी उमेदवारी अर्ज माघारीचा निर्णय घेतला. त्यापूर्वीच बढे यांनीही अर्ज मागे घेतला. त्यामुळे रवी लांडगे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा २३ फेब्रुवारीला केली जाईल. या बिनविरोध निवडीची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझमभाई पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वास्तविक, भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने २००२ च्या महापालिकेच्या निवडणुकीत भोसरी परिसरात उल्लेखनीय यश मिळविले होते. त्यानंतर त्यांच्या कार्याचा आलेख वाढतच होता. त्यांनी विधानपरिषदेची निवडणूकही लढविली होती. त्यात पराभव झाल्यानंतरही भाजपने शहराध्यक्षपद देऊन त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला होता. परंतु, दुर्दैवाने त्यांची २००६ मध्ये हत्या झाली. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत आणि २००७च्या निवडणुकीत अंकुश लांडगे यांच्या पत्नी आशा लांडगे यांना मतदारांनी निवडून दिले होते.

बिनविरोध निवडीच्या पंक्तीत

महापालिकेच्या १९९२ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर चिंचवड स्टेशन भागातून आझमभाई पानसरे यांची बिनविरोध निवड झाली होती. १९९७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पिंपरी गांधीनगर भागातून उषा गजभार बिनविरोध निवडून आल्या. २००७मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आकुर्डीतून जावेद शेख यांची बिनविरोध निवड झाली होती. तर, २०१२च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रामदास बोकड आणि शकुंतला धराडे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्या पंक्तीमध्ये भोसरीतून प्रथमच रवी लांडगे यांचा समावेश झाला आहे.

रवी लांडगे यांची पार्श्वभूमी

भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे रवी लांडगे पुतणे होत. त्यांचे वडील बाबासाहेब लांडगे यांनीदेखील महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद भूषविले आहे. अंकुश लांडगे यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी आशा लांडगे निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०१२च्या महापालिकेच्या निवडणुकीत रवी लांडगे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला. परंतु, २०१४मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत रवी लांडगे यांच्या पत्नी श्रद्धा लांडे-लांडगे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीपूर्वी रवी लांडगे यांच्याकडे युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखालील ‘भाजयुमो’च्या माध्यमातून भाजपने शहरातून विजयाचे खाते उघडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एफटीआयआय’मध्ये मिळणार मास्टर्स डिग्री

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत. यापुढे संस्थेतील अभ्यासक्रमांशी असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) संलग्न असणार आहे. एफटीआयआयच्या पदव्युत्तर पदविकेला (डिप्लोमा) एआययूचे मूल्यांकन प्राप्त झाल्याने ती पदव्युत्तर पदवी म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. यामुळे विद्यार्थी जगात कुठेही एम.फील, पी.एचडीचे शिक्षण घेऊ शकतील.

‘एफटीआयआय’मधील विद्यार्थ्यांना तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर पदविका (डिप्लोमा) ही पदवी मिळते. या पदवीस उच्च शिक्षणाचा दर्जा नसल्याने एमफील, पीएचडी करण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठातून एमएची पदवी घ्यावी लागत होती. एआययूच्या संलग्नतेमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे दरवाजे थेट खुले असतील. उच्च शिक्षणाची दालने खुली व्हावेत यासाठी दोन किंवा तीन वर्षांच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाला पदव्युत्तर पदवीच्या समकक्ष दर्जा देण्यात यावा, यासाठी एफटीआयआय प्रशासनाचे २०११ पासून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना सहा वर्षानंतर गजेंद्र चौहान यांच्या काळात यश आले आहे. संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी ही माहिती 'मटा'ला दिली.

‘एआययू’च्या समितीने डिसेंबर महिन्यात ‘एफटीआयआय’ला भेट दिली. शैक्षणिक दर्जाबद्दल समितीने अहवाल सादर केल्यानंतर जानेवारीमध्ये नवी दिल्लीत नियामक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ‘एफटीआयआय’च्या अभ्यासक्रमांना पदव्युत्तर पदवीचा दर्जा देण्यासंबंधीची चर्चा झाली. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही किमान एका शाखेची पदवी विद्यार्थ्यांकडे असणे गरजेचे आहे, अशी सूचना समितीतर्फे करण्यात आली होती. यानंतर मान्यतेचे पत्र ‘एफटीआयआय’ला मंगळवारी प्राप्त झाले.

२०१६ मध्ये प्रवेश घेतलेल्या व २०१९मध्ये पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना, तसेच यापुढे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही मास्टर्स डिग्री घेता येणार आहे. प्रमाणपत्र पदव्युत्तर पदविका असेच असेल पण ‘एआययू’च्या मूल्यांकनाच्या तळट‌ीपेमुळे ते पदव्युत्तर पदवी म्हणून जगात सर्वत्र ग्राह्य धरले जाईल.

- भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सब मामला गुपचूप’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पारदर्शी कारभाराच्या नावाखाली बंद दाराआड उमेदवारांशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीला निवडणूक कार्यालयात प्रवेश दिला जात नसल्याने राजकीय कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

अर्ज छाननीपासून ते अर्ज माघार घेण्यादरम्यान निवडणूक कार्यालयात जाण्यास कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आला. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या दबावाला बळी पडून बंद दाराआड ‘सब मामला चुपचाप’ चालला आहे, की काय अशी शंका राजकीय पक्षांनी उपस्थित केली आहे. यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त करून थेट पालिका आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. त्याशिवाय, संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना बदलण्याची मागणी करण्यात आली.

अर्ज छाननीच्या दिवशी काही निवडणूक अधिकाऱ्यांनी पारदर्शी कारभाराच्या नावाखाली उमेदवारांनाच थेट बाहेरचा रस्ता दाखविला. शहरातील अनेक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विविध पक्षांच्या शहराध्यक्षांना धाव घ्यावी लागली. काही शहराध्यक्षांनी याबाबत पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे तक्रार केली. म्हणणे ऐकून घेण्यापासून ते माहिती देण्यापर्यंत आणि कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात प्रवेश देण्याच्या उमेदवारांच्या विनंतीला निवडणूक अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखविण्यात आली. या प्रकारामुळे महापालिका आयुक्तांचेदेखील निवडणूक अधिकारी ऐकत नसल्याचे उघडकीस आले आहे.

उमेदवारांनी ऑनलाइन भरलेल्या कागदपत्रांवर उमेदवारांनी स्वाक्षरी केली नसल्याचे आढळले. तर, काहींना अर्ज भरताना पुरेशी कागदपत्रे असूनही ती गरज नसल्याने काढून टाका, असे सांगण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी छाननीदरम्यान तीच कागदपत्रे, प्रमाणपत्रे नसल्याचे कारण देऊन उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. त्या वेळी उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाला. तरीही, निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे म्हणणे ऐकून घेतले नाही. उलट ‘कार्यालयात प्रवेश देऊ नका’ असे आदेश कार्यालयाबाहेरील बंदोबस्तावरील पोलिसांना देण्यात आले, असे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. आदेश मिळाल्याने पोलिसांकडून कार्यकर्ते, उमेदवारांसह प्रसिद्धीमाध्यमांनादेखील कार्यालयात सोडण्यास मज्जाव करण्यात आला.

या दरम्यान अनेकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पालिका आयुक्तांनी थेट संबंधित अधिकाऱ्याला फोनही केला. मात्र, संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी फोन घेण्याची तसदी घेतली नाही. एका क्षेत्रीय कार्यालयात सहायक आयुक्त असलेल्या अधिकाऱ्याला संबंधित भागातील उमेदवार, कार्यकर्ते फोन करीत होते. त्या वेळी अधिकाऱ्याचे फोन वारंवार वाजत असल्याने संतापलेल्या महिला निवडणूक अधिकाऱ्याने थेट त्या अधिकाऱ्याला घरीच जायला सांगितले. हतबल अधिकाऱ्याने थेट घर गाठले. असे अनेक प्रकार विविध क्षेत्रीय कार्यालयांत झाल्याने सहायक आयुक्तांनीदेखील निवडणूक अधिकाऱ्याविरोधात आय़ुक्तांकडे तक्रार केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकोलकर यांचा पदाचा राजीनामा

0
0

म. टा. प्र‌तिनिधी, पुणे

पालिका निवडणुकीत उमेदवारी देताना चुकीच्या व्यक्तींना तिकीटे देण्यात आल्याने पक्षासाठी काम करणाऱ्या इच्छुकांची घोर निराशा झाली आहे. हे सर्व लोकशाहीला घातक असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामगार सेलचे उपाध्यक्ष अॅड. म. वि. अकोलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

अॅड. अकोलकर म्हणाले, ‘निवडणूक लढविण्याची संधी मिळावी, यासाठी राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीमुळे सर्वच ठिकाणी अक्षरश: घोडेबाजार सुरू झाला आहे. सर्वच पक्षांनी उमेदवारी देताना चुकीच्या व्यक्तींना तिकीटे देण्यात आल्याने पक्षासाठी काम करणाऱ्या इच्छुकांची घोर निराशा झाली आहे. हे सर्व लोकशाहीला घातक आहे. कष्टकरी, असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी यापुढील काळात इंटक या संघटनेच्या माध्यमातून काम करणार आहे.’

महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांची यादी जाहीर करण्यापासून ते प्रत्यक्ष निवडणुकीत उमेदवार देण्यापर्यंत सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू होती. पालिकेत सत्ता मिळविण्यासाठी बहुतेक पक्षांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तिकिटे दिली आहेत. यामुळे एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मोहन धारिया, जयप्रकाश छाजेड यांच्या परंपरेला धक्का पोहोचला आहे. सध्या सर्वत्र सुरू असलेली परिस्थिती पाहता हे अत्यंत त्रासदायक आहे. त्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे अकोलकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी खर्चासाठी अद्यापही रोखीची सक्ती

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जाहीर सभांसाठी वापरण्यात येणाऱ्या महानगरपालिकांच्या जागेचे भाडे रोख स्वरूपात भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर रोख रकमेच्या वापरावर निर्बंध आल्याने सरकारी शुल्क चेकने स्वीकारण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीत बराचसा खर्च हा रोख स्वरूपात करावा लागतो. बँकेच्या नियमाप्रमाणे उमेदवाराच्या बचत खात्यामधून २४ हजार रुपये काढता येतात. सरकारी खर्च वगळता इतर खर्च चेकच्या माध्यमातून करणे शक्य आहे. मात्र, सरकारी खर्च हे रोख रकमेतून करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामध्ये महापालिकेचे मैदान सभेसाठी घेताना सहा रुपये प्रतिस्केअर फुटाने पैसे द्यावे लागतात आणि ही किमान रक्कम सात हजार रुपये आहे. आठवड्यातून चार वेळा सभा घेतली, तर ही रक्कम २८ हजार रुपयांच्या घरात जाते. त्यामुळे महापालिकेने ही रक्कम चेकच्या माध्यमातून स्वीकारावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक मानकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लढतींचे चित्र स्पष्ट

0
0

पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी थेट तर, काही ठिकाणी तिरंगी लढती
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रभागनिहाय लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी थेट तर, काही ठिकाणी तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या १२८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर ७५८ उमेदवार नशीब अजमावत आहेत. भारतीय जनता पक्षाने बिनविरोध निवडीच्या माध्यमातून खाते उघडले आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने तुल्यबळ पॅनेल उभे करून लढत सोपी नसल्याचा इशारा दिला आहे. युती आणि आघाडी तुटल्यामुळे सर्व जागांवर प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना यांच्या तुलनेत काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बहुतांशी जागांवर उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’ला एकहाती सत्तेची हॅटट्रिक करण्यात भाजप-सेनेचा मुख्य अडथळा असणार आहे. यंदा निवडणुकीत पक्षाचे विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या पत्नी उषा वाघेरे, माजी आमदार विलास लांडे यांचे पूत्र विक्रांत लांडे, विद्यमान महापौर शकुंतला धराडे, माजी महापौर आर. एस. कुमार, योगेश बहल, मंगला कदम, अपर्णा डोके, डॉ. वैशाली घोडेकेर, आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे आदी नशीब अजमावत आहेत.
बहुसदस्यीय पद्धतीमुळे अनेक ठिकाणी थेट लढती पाहावयास मिळणार आहेत. त्यामध्ये भोसरीतून वसंत लोंढे विरुद्ध सागर गवळी, अजित गव्हाणे विरुद्ध सचिन लांडगे, आशा सुपे विरुद्ध यशोदा बोईनवाड, राजेंद्र लांडगे विरुद्ध विशाल लांडगे, संतोष लोंढे विरुद्ध संतोष लांडगे, पिंपळे-गुरव भागातून कैलास कुंजीर विरुद्ध शत्रुघ्न काटे, नाना काटे विरुद्ध जयनाथ काटे, शोभा आदियाल विरुद्ध सागर आंघोळकर, श्याम जगताप विरुद्ध शशिकांत कदम, माधवी राजापुरे विरुद्ध भक्ती टण्णू, उषा ढोरे विरुद्ध ज्योती ढोरे, सुषमा तनपुरे विरुद्ध शारदा सोनवणे यांची समावेश आहे. थेरगावमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कमालीची चुरस असून, भाजपनेही पुरस्कृत उमेदवारीच्या माध्यमातून रंगत निर्माण केली आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांची राजकीय वाटचालही या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे. रावेतमधून विद्यमान नगरसेवक मोरेश्वर भोंडवे आणि माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे हे सलग दुसऱ्यांदा एकमेकांसमोर निवडणुकीला उभे राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेले नाना काटे, राहुल कलाटे, मंगला कदम, सुलभा उबाळे, चंद्रकांता सोनकांबळे, एकनाथ पवार आदी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही भविष्य अजमावत आहेत.
.....
लक्षवेधी मुद्दे
- शहराचे सहा माजी महापौर निवडणूक रिंगणात.
- माजी महापौर आर. एस. कुमार सलग सातव्यांदा शर्यतीत.
- आमदार महेश लांडगे यांचे बंधू ऐन वेळी आखाड्यात.
- रावेतमध्ये दोघे सख्खे बंधू दुसऱ्यांदा एकमेकांविरोधात.
- चार दाम्पत्य प्रथमच एकत्रित राजकीय नशीब आजमावणार.
- दापोडीत तीन विद्यमान नगरसेवक एकमेकांविरोधात.
- पालिका इतिहासात भाजपचा उमेदवार प्रथमच बिनविरोध.
- बंडखोरी थोपविण्यात प्रमुख पक्षांना मोठ्या प्रमाणात यश.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण हटवण्यासाठीसीमा भिंत बांधणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील असेलल्या लष्कराच्या जागांवर अतिक्रमणांनी विळखा घातला आहे. गोळीबार मैदानाजवळील आंबेडकर शाळा, पूना कॉलेज या ठिकाणच्या जागांवर रिक्षा, दुचाकी वाहनतळापासून ते कचराकुंडी असे अतिक्रमण झाल्याने या जागांवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी सीमा भिंत बांधण्यात येणार आहे.
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या चर्चेनुसार या ठिकाणी सीमा भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी कार्यवाही करण्याचे ठरले आहे. त्याशिवाय या जागांवर वृक्षारोपण ही करण्यात येणार आहे.
पूना कॉलेजच्या समोरील मोकळ्या जागेत सध्या दुचाकी वाहने, तसेच रिक्षा लावण्यात येत आहेत. तेथे विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बसेस थांबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांच्या गाड्या देखील थांबतात. गोळीबार मैदानाजवळील आंबेडकर शाळेच्या परिसरात मोकळी जागा आहे. त्या मोकळ्या जागेची सध्या कचराकुंडी झाली आहे. घोरपडी भागात देखील अय्यप्पा मंदिर आहे. त्या ठिकाणी चारचाकी वाहने थांबविली जात आहेत. त्यामुळे या जागांवर अतिक्रमण होऊ लागले आहे.
या संदर्भात लष्कराच्या मालमत्ता विभागाने जानेवारी महिन्यात पुणे कँटोन्मेंट बोर्डाला पत्र पाठवून लक्ष वेधले आहे. तसेच वाढत्या अतिक्रमणाबाबत चिंता व्यक्त करून अतिक्रमण हटवून, त्या ठिकाणी सुरक्षा भिंत अथवा सीमा भिंत बांधण्याचे आदेशही बजावले आहेत.
‘पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत लष्कराच्या मालकीच्या तीन मोकळ्या जागा आहेत. त्या जागांवर सध्या वाहनांचे पार्कंगसह अन्य स्वरूपाचे अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षा भिंत बांधण्याची गरज आहे. त्या ठिकाणी झाडे लावण्याचे नियोजन आहे. पूना कॉलेजसमोरील जागेत वाहनांसह किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. तेथील अतिक्रमण काढण्याची गरज आहे. ही जागा कोणाच्या वैयक्तिक मालकीची नाही. ही देशाची संपत्ती आहे. त्यामुळे त्याचे जतन करण्याची आमची जबाबदारी आहे. या ठिकाणी होणारे अतिक्रमण टाळण्यासाठी सीमा भिंतीचे बांधकाम करण्यात येणार आहे,’ असे पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांनी स्पष्ट केले.
‘हे अतिक्रमण खूप पूर्वीपासून झाले आहे. अतिक्रमण झालेल्या जागेकडे यापूर्वी लक्ष देण्यात आले नव्हते. सध्या नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे तातडीने या ठिकाणी असणारे अतिक्रमण हटविणे शक्य नाही. सध्या पुणे महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात अतिक्रमणे हटविणे किंवा तेथील विक्रेत्यांना बाहेर काढणे योग्य नाही. निवडणुका झाल्यानंतर याबाबत तातडीने कारवाई केली जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
००
ही जागा कोणाच्या वैयक्तिक मालकीची नाही. ही देशाची संपत्ती आहे. त्यामुळे त्याचे जतन करण्याची आमची जबाबदारी आहे. या ठिकाणी होणारे अतिक्रमण टाळण्यासाठी सीमा भिंतीचे बांधकाम करण्यात येणार आहे.
- डॉ. डी. एन. यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कँटोन्मेंट बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी-चिंचवडला आदर्श महानगर करू

0
0

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी घेतली शपथ
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘मी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार पारदर्शक, सुशासनमुक्त, विकासाभिमुख, गतिमान, आणि भ्रष्टाचारमुक्त करेन. नगरसेवक म्हणून कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व समाजाला सोबत घेऊन पिंपरी-चिंचवड शहराला देशातील आदर्श महानगर करेन,’ अशी शपथ भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांनी बुधवारी (८ फेब्रुवारी) निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्पासमोर घेतली.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस वर आणि शिवसेनेचे नाव न घेता टीका केली. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, भाजपा प्रदेश सचिव उमा खापरे, राज्यलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, संघटन सरचिटणीस माऊली थोरात, भाजपा प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, सरचिटणीस बाबू नायर, महिला शहराध्यक्षा शैला मोळक यांच्यासह ३२ प्रभागातील भाजपचे उमेदवार आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवडमध्येही परिवर्तन होऊ शकते असे मानणारे आम्ही आहोत. भाजप हा देशातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. देशात आणि महाराष्ट्रात जे घडले तेच पिंपरी-चिंचवडमध्ये घडणार आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप एक क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यामुळे परिवर्तन होणार.’
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे देशात नाव नाही. महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा, विदर्भात नाव नाही. पश्चिम महाराष्ट्रातील दोन-तीन जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष राहिला आहे. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसा तडफडतो तशी अजितदादांची तडफड सुरू आहे,’ अशी टीका बापट यांनी केली. ‘पिंपरी-चिंचवडच्या निवडणुकीकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यामुळे शहरात भाजप निवडून यायला पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम करावे,’ असेही ते म्हणाले.
बापट म्हणाले, ‘काही राजकीय पक्ष जातीच्या आधारे, धर्म-धर्मांमध्ये भांडणे लावून तर काही जण सत्तेच्या जोरावर निवडणूक लढवतात. मात्र भाजप हा कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणूक लढवणारा एकमेव पक्ष आहे. गेल्या २५ वर्षात पिंपरी-चिंचवड शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही. शहरातील पाण्याचा प्रश्न, वाहतूक, झोपडपट्टी धारकांच्या घरांचे प्रश्न जैसे थे आहेत. आम्ही कोणावर टीका करण्यापेक्षा नागरिकांना आम्ही काय करणार हे सांगणार आहोत.’
...
पक्षातील नाराजी शमली आहे. बंडोखोरी केलेल्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. ज्यांनी अर्ज मागे घेतले नाहीत, त्यांचे मन वळविण्यात येईल. भाजपचा कार्यकर्ता निवडणूक लढविण्यास इच्छुक असतो. तिकीट मिळाले नाही तर कार्यकर्ता नाराज होतो. पण तरीही पक्ष सांगेल त्यांचे काम करत असतो.
- गिरीश बापट, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीक्षित, बहुलकरांना पुरस्कार

0
0

दीक्षित, बहुलकरांना पुरस्कार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘साहित्याचा शिक्षक म्हणून काम करताना अनेक प्रश्न पडले. त्या प्रश्नांमधून समीक्षेची कास धरली. हा प्रवास अत्यंत रंजक होता. पदोपदी अनेक गोष्टी शिकायला मिळत होत्या, आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळत होती आणि या संपूर्ण प्रवासात सहचारीणीने दिलेली साथ मोलाची ठरली,’ असे सांगताना हिंदी साहित्यातील ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक आनंदप्रकाश दीक्षित भावूक झाले.
पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात साहित्य अकादमीतर्फे आनंदप्रकाश दीक्षित आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे मानद सचिव श्रीकांत बहुलकर यांना भाषा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी स्वतः पुण्यात येऊन दीक्षित आणि बहुलकर यांचा सन्मान केला. त्या वेळी ९३ वर्षीय दीक्षित यांनी त्यांच्या कारकिर्दीचा वेध घेतला.
दीक्षित म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता त्यांच्या विचारांशी माझे विचार जुळले त्यातून अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत लेखनाचा प्रवास सुरू झाला. हिंदी साहित्याची समीक्षा ही त्याचीच पुढची पायरी होती. पुण्याच्या जयकर ग्रंथालयात असलेल्या पाचशे हस्तलिखितांचा एक संग्रह करताना काही ऐतिहासिक ग्रंथांचा अभ्यास करता आला. त्यामुळे, ऐतिहासिक साहित्याचे संशोधन करण्यास सुरुवात केली. लेखन आणि समीक्षेच्या या प्रत्येक टप्प्यावर नव्याने साहित्यविश्वाचा उलगडा होत गेला.’
‘भाषा या नद्यांसारख्या असतात, त्यांच्या उगमापासून ते संगमापर्यंत त्यामध्ये अनेक गोष्टी, संस्कृती, परंपरा जोडल्या जातात. संस्कृत भाषेबाबतीतही तसेच झाले आहे. अनेक परंपरा, संस्कृतीबरोबरच संस्कृत भाषेचाही विकास होत गेला, हे मी केलेल्या अभ्यासानंतर स्पष्ट झाले. त्या कार्याबद्दल हा सन्मान मिळत असल्याने साहित्य अकादमीचा आभारी आहे,’ असे श्रीकांत बहुलकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी ब्रिगेडकडून संमेलनातील ठरावाचा निषेध

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘डोंबिवलीत नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविण्याच्या कृतीचा एकतर्फी निषेध करणे ही दुर्देवी घटना आहे,’ असे सांगत संभाजी ब्रिगेडने संमेलनातील ठरावाचा निषेध केला आहे.
संभाजी ब्रिगेडने मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी ही माहिती दिली. ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे, सिद्धार्थ कोंढाळकर, सुरेखा जुजगर आदी उपस्थित होते. ‘पुणे महानगरपालिका तसेच मोहन जोशी, विक्रम गोखले, अमोल पालेकर, शरद पोंक्षे, पुष्कर श्रोत्री, विजय पटवर्धन या कलाकारांना ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुळका असेल तर, त्यांनी पुण्यात जागोजागी त्यांचे पुतळे बसवावेत; मात्र संभाजी उद्यानात गडकरी यांचा पुतळा आम्ही बसवू देणार नाही. तसेच, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गडकरींचा पुतळा हटविण्याच्या कृतीचा ठराव एकतर्फी संमत करण्यात आला, हे दुर्दैवी आहे,’ असे आखरे यांनी सांगितले.
‘साहित्य संमेलनाला राज्य सरकार पैसा पुरवते. हा पैसा जनतेचा आहे. त्यामुळे संमेलनावर सर्व जनतेचा हक्क आहे. मात्र, संमेलनात काही ठरावीक विचारसरणीच्या लोकांची मक्तेदारी आहे. त्यामुळे संमेलनाला देण्यात येणाऱ्या निधीला आमचा विरोध आहे. साहित्य संमेलन हे आता राजकीय आखाडा झाला आहे. तसेच, गडकरी यांचा पुतळा उभारण्याला एक कोटीचा निधी सरकारकडून मिळू नये, यासाठी संभाजी ब्रिगेड प्रयत्न करणार आहे,’ असेही आखरे यांनी सांगितले.


गडकरी यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण केले आहे. साहित्यिकांनी गडकरींच्या लिखाणावर जाहीर खुली चर्चा करावी. आम्ही देखील खुल्या चर्चेस तयार आहोत. त्यामुळे जगासमोर सत्य येईल. मात्र, साहित्यिक चर्चेला तयार होत नाहीत.
- मनोज आखरे, प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनोद दोशी शिष्यवृत्तीचे नाव बदलले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे दर वर्षी पाच प्रतिभावान रंगकर्मींना देण्यात येणाऱ्या विनोद दोशी शिष्यवृत्ती पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे. यापुढे ही शिष्यवृत्ती ‘तेंडुलकर-दुबे स्मृती पुरस्कार’ या नावाने ओळखली जाईल. यंदाचा पुरस्कार फॉयझे जलाली, शीना खालीद, भारवी, अजीत सिंग पालावत आणि आशिष पाठोडे या देशातील युवा रंगकर्मींना देण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता पंडित फार्म येथे ज्येष्ठ समीक्षक व नाट्य अभ्यासक पुष्पा भावे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

‘साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक मधु गानू यांच्या नावाने पहिले तीन वर्षे पुरस्कार सात रंगकर्मींना प्रदान केला गेला. उद्योगपती विनोद दोशी यांच्या नावाने विनोद आणि शरयू दोशी फाउंडेशन यांच्या पाठिंब्यासह गेली आठ वर्षे हा पुरस्कार प्रदान केला जात होता. गतवर्षीपर्यंत ४७ कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यापुढे फाउंडेशनचा सहभाग नसल्याने प्रतिष्ठान स्वत:च्या निधीतून हा पुरस्कार देणार आहे,’ अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त अशोक कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. विश्वस्त सतीश आळेकर, दिलीप माजगावकर, दिग्दर्शक किरण यज्ञोपवित, मोहित टाकळकर या वेळी उपस्थित होते.
शिष्यवृत्ती देण्याची संकल्पना तेंडुलकर-दुबे यांची होती. त्यांचे रंगभूमीवरील अजोड योगदान पाहता, त्यांच्या नावाने पुरस्कार देत आहोत. त्यामुळे नावात बदल केला आहे. युवा रंगकर्मींना विनाअट शिष्यवृत्ती देणे, ही कल्पना तेंडुलकरांचीच होती. केवळ कल्पना देऊन ते थांबले नाहीत तर, त्यांनी त्यासाठी आवश्यक असलेला निधी जमा करण्यास हातभारही लावला. त्यामुळे या दोघांच्या स्मृतिनिमित्त पुरस्कार देत आहोत. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये आहे. १२ धनादेशांच्या स्वरूपामध्ये शिष्यवृत्ती देण्यात येईल, याकडे कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफटीआयआय माझा देश

0
0

बलिदान देण्याची तयारी; गजेंद्र चौहान यांनी टीकाकारांना ठणकावले
Chintamani.Patki@timesgroup.com
..............
chintamanipMT
पुणे : ‘गजेंद्र चौहान भगवा अजेंडा राबविणार, तो वाईटच असेल, असे मत करून मला दोषी ठरविले गेले. विद्यार्थी कच्च्या मातीचे असतात. त्यांना भडकवले गेले. पण मी ही गोष्ट नकारात्मकतेने घेतली नाही. एफटीआयआय ही संस्था माझ्यासाठी देश असून, या देशासाठी मी बलिदान द्यायला तयार आहे,’ अशा शब्दांत फिल्म इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी बुधवारी टीकाकारांना ठणकावले. चौहान यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी खास संवाद साधताना ‘माझा अजेंडा भगवा नाही. संस्थेसाठी चांगले काम करत राहणे हा माझा अजेंडा आहे,’ अशा कानपिचक्या टीकाकारांना दिल्या.
राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष म्हणून गजेंद्र चौहान यांच्या निवडीनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. यामुळे संस्थेचे काम ठप्प होऊन देशाचे लक्ष वेधले गेले. दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांचे आंदोलन मोडून काढून गेल्या वर्षभरात अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यातच असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) संलग्नतेमुळे ‘एफटीआयआय’च्या पदव्युत्तर पदविकेला (डिप्लोमा) पदव्युत्तर पदवीचे स्वरूप आले आहे. यामुळे विद्यार्थी जगात कुठेही एम.फील, पी.एचडीचे शिक्षण घेऊ शकतील. ‘एफटीआयआय’च्या इतिहासातील हा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘मटा’ने चौहान यांच्याशी संवाद साधून त्यांचा अजेंडा जाणून घेतला.
‘मी भगवा अजेंडा राबविणार असल्याची टीका झाली. मला वाईट ठरविण्यात आले. भगवा रंग हा बलिदानाचा आहे. एफटीआयआय माझ्यासाठी देश असून संस्थेच्या वैभवासाठी मी बलिदान द्यायला तयार आहे,’ असे सूचक वक्तव्य करत चौहान यांनी टीकाकारांचा खरपूस समाचार घेतला. ‘मी संस्थेमध्ये एकदाच आलो आहे हे खरे आहे. व्यस्ततेमुळे नियामक मंडळाच्या बैठका मुंबईत पार पडल्या आहेत. पण संस्थेत येणे महत्त्वाचे नसून काम होणे महत्त्वाचे आहे,’ असे तर्कट मांडून लवकरच संस्थेत येणार असल्याचे चौहान यांनी स्पष्ट केले. काही विद्यार्थी मला मुंबईत येऊन भेटून गेले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
-----------------
‘एफटीआयआय’मध्ये जे बदल होत आहेत, त्याबाबत मी आनंदी आहे. मी टीकाही सकारात्मकतेने घेतो. एकदा जबाबदारी घेतली की ती योग्य पद्धतीने पार पाडायची हे मला कळते. संस्थेच्या व संस्थेतील प्रत्येक घटकाच्या भल्याच्या दृष्टीने मी पाऊले टाकत आहे. संस्थेचे काम आता शांततापूर्ण सुरू आहे. विरोध होत असतोच. पण अंतिमत: विद्यार्थीही निर्णयांचे स्वागत करतील.
- गजेंद्र चौहान, अध्यक्ष, एफटीआयआय
------------
गजेंद्र चौहान यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे निर्णय
० नवीन व अद्ययावत अभ्यासक्रम.
० श्रेयांक व सेमिस्टर पद्धत.
० क्लासरूम थिएटर व अँक्टिंग स्टुडिओ बांधणीच्या कामाला सुरुवात.
० इतिहासात पहिल्यांदाच नागरिकांसाठी ‘ओपन डे’
० पदव्युत्तर पदवीच्या समकक्ष पदवीला मान्यता.
० जालियनवाला बाग व सेल्युलर जेलची प्रतिकृती उभारून क्रांतिकारकांना अभिवादन.
० फॅकल्टीसाठी मुलाखतीचा कार्यक्रम.
० कमी कालावधीचे अभ्यासक्रम.
० जलद प्रवेश प्रक्रिया.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकतकरात १२ टक्के वाढीचा प्रस्ताव

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेचा २०१७-१८ चा अर्थसंकल्प तयार करण्यास महापालिका आयुक्तांनी सुरुवात केली आहे. भविष्यात शहरात उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी मिळकतकरात सरासरी १२ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. सध्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसून नवीन सभासद सभागृहात आल्यानंतर आयुक्तांचे बजेट स्थायी समिती मार्फत सर्वसाधारण सभेत मांडून त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.

महापालिका निवडणुकीची सर्वत्र धामधुम सुरू असली तरी विविध प्रकारचे खर्च करण्यासाठी महापालिका आयुक्तांना अर्थसंकल्प तयार करावा लागतो. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आयुक्त आपला अर्थसंकल्प सादर करतात. सध्या आचारसंहिता सुरू असली तरी चालू वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास आयुक्त कुणाल कुमार यांनी सुरुवात केली आहे. महापालिकेच्या सर्वच विभागाना त्यांचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश आयुक्तांनी‌ दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागाकडून प्रस्ताव येण्यास सुरुवात झाली आहे. आयुक्तांकडे आपला प्रस्ताव सादर करताना पा‌लिकेच्या मिळकतकर (प्रॉपर्टी टॅक्स) विभागाने सर्वसाधारण करापासून सर्वच करांमध्ये १२ टक्के वाढ सुचविली आहे. याला सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यास निवडणुकीनंतर वाढीव कराचा भुर्दंड सर्वसामान्य पुणेकरांवर पडणार आहे.

महापालिकेतील नगरसेवकांनी अर्धवट तरतुदींच्या आधारे सुरू केलेल्या तसेच निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी केवळ भूमिपूजनाचे सोपस्कार केलेल्या प्रकल्पांच्या निधीला पालिकेच्या पथ, भवन तसेच इतर विभागांनी आयुक्तांकडे आपले प्रस्ताव सादर करताना कात्री लावली आहे. मात्र जे प्रकल्प पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहेत, त्यांच्यासाठीच उर्वरित रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे. आयुक्तांकडे आपल्या विभागाचे प्रस्ताव सादर करताना बहुतांश विभागांनी नव्याने कुठलेही प्रकल्प सुचविलेले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images