Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘नूपुरनादा’तून वसंताची अनुभूती

$
0
0

शास्त्रीय संगीताच्या आविष्काराची रसिकांवर मोहिनी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संतूरवादन, गायन, नृत्य व तबलावादन अशा वैविध्यपूर्ण सादरीकरणातून रसिकांनी परिपूर्ण शास्त्रीय संगीताची अनुभूती घेतली. गायन, वादन व नृत्य म्हणजे संगीत या व्याख्येला अनुसरून संगीताचा एक-एक प्रकार रसिकांनी कानात साठवून घेतला. नूपुरनाद महोत्सवात मन तृप्त करणारा शास्त्रीय संगीताचा आविष्कार रंगला आणि रसिकांना वसंत ऋतूची अनुभूती आली.

ज्येष्ठ संतूरवादक पं. धनंजय दैठणकर आणि भरतनाट्यम् नृत्यकलाकार स्वाती दैठणकर यांच्या नूपुरनाद संगीत सभेच्या वतीने नूपुरनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पं. शिवकुमार शर्मा यांचे बहारदार संतूरवादन, पं. उल्हास कशाळकर यांचे गायन, भरतनाट्यम् नृत्यकलाकार मालविका सरुक्काई यांचे विलक्षण पदन्यास असलेले नृत्य आणि तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या तालसाधनेने महोत्सव रंगला.

पूर्वार्धात पं. शिवकुमार शर्मा यांनी केलेल्या लयदार संतूरवादनाने रसिकांची ब्रह्मानंदी टाळी लागली. त्यांनी प्रारंभी राग ललत सादर केला. त्यानंतर विलंबित झपतालातील आणि तीन तालातील बंदिशी सादर केल्या. तबल्यावर योगेश सम्सी आणि तानपुऱ्यावर धनंजय दैठणकर यांनी साथसंगत केली.

पं. उल्हास कशाळकर यांनी वसंत पंचमीच्या अनुषंगाने भैरव बहार आणि बसंत पंचम हे दोन अनवट राग सादर केले. तराण्याने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर सुरेश तळवलकर आणि हार्मोनियमवर श्रीराम हसबनीस अशी साथसंगत होती.

उत्तरार्धात मालविका सरुक्काई यांनी आदितालातील नृत्यांजली सादर करून भगवान शंकराला नमन केले. त्यानंतर त्यांनी आदिशंकराचार्य रचित नृसिंहस्तोत्र आणि विष्णुसहस्रनामावर आधारित रचना सादर केली. पं. दिगंबर पलुस्कर रचित ‘ठुमक चलत’ या बंदिशीवर लहानग्या रामावरील कौसल्येचे प्रेम त्यांनी नृत्यातून रसिकांसमोर उभे केले. वसंताचे आगमन आणि कामदेवाचे नृत्य सादर करताना मालविका यांनी केलेल्या लयबद्ध पदन्यासामुळे कार्यक्रमात रंगत आली. कवी बंकिमचंद्र चटर्जी रचित ‘वंदे मातरम्’वर त्यांनी सादर केलेल्या नृत्याला रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली.

तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी ‘भजमन राम निसदिन’ या बंदिशीवर विलंबित रूपक ताल सादर केला. त्यांना पखवाजवर ओंकार दळवी, तबल्यावर आशय कुलकर्णी, हार्मोनियमवर तन्मय देवचक्के आणि नागेश आडगावकर यांची गायनसाथ लाभली. त्यानंतर गानतपस्वी मोगुबाई कुर्डीकर यांची प्रसिद्ध ‘चलो हटो पिया अब निकट ना आओ’ या सोहोनी रागातील बंदिशीवर त्यांनी आडाचौतालातील गत ताल पेश केला. या वेळी रंगलेल्या वाद्यांच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धनंजय हेगडे यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पूरिया कल्याण रागातील भावपूर्ण आलापीतून सायंकालीन रागानुकूल वातावरण निर्मिती आणि अत्यंत परिणामकारकतेने रागस्वरूप उलगडत जाणारी गायकी रसिकांना अनुभवता आली. कर्नाटक येथील प्रतिभावान युवा गायक धनंजय हेगडे यांनी रसिकांना आपल्या गायकीतून मंत्रमुग्ध केले. गानवर्धन संस्थेतर्फे या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

पं. व्यंकटेश कुमार, पं. विनायक तोरवी यांचे शिष्य असलेल्या हेगडे यांनी प्रारंभी विलंबित एकतालातील ‘आज सोबन’ हा ख्याल अत्यंत भावपूर्णरीत्या सादर केला. धीरगंभीर आवाज, भरजरी स्वर, खर्जातील वजनदार सूर व विलक्षण भावमधुरता ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये होती. उपजत प्रतिभा, ज्येष्ठांचे मार्गदर्शन व रियाजातून किराणा घराण्याची गायकी आपल्या अभ्यासातून कल्पकतेने सजवणाऱ्या हेगडे यांनी श्रोत्यांना मोहून टाकले. रागस्वरूप खुलवताना सहजसुंदर नजाकतींनी, हरकतींनी त्यांनी श्रोत्यांना अनोखा आनंद दिला. त्रितालातील ‘बहुत दिन बीते’ ही लोकप्रिय रचना त्यांची लालित्यपूर्ण शैलीने सादर केली.

द्रुत एकतालातील तराणा परंपरा व नावीन्यतेचा अनोखा संगम होता. छायानट रागातील तिलवाडा तालातील ‘अब गुंद’ हा ख्याल, तर त्रितालातील पारंपरिक ‘घर जाने’ ही बंदिश म्हणजे त्यांच्या अभ्यासू गायकीचा आविष्कार होता. ‘संतभार पंढरी’ हा अभंग विविध रागांची गुंफण करत त्यांनी सादर केला. पं. भीमसेन जोशी यांच्या गाजलेल्या कानडी रचनेने कार्यक्रमाची सांगता झाली. भरत कामत यांनी तबल्यावर केलेल्या दमदार साथीमुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. युवा संवादिनीवादक लीलाधर चक्रदेव याची साथही रसिकांची दाद मिळवून गेली. तानपुरासाथ अपूर्वा जोशी, प्रवीण हुगार यांची होती. निवेदन प्रियांका भडसावळे यांनी केले. या वेळी धनंजय परांजपे, ‘गानवर्धन’चे अध्यक्ष कृ.गो. धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथनाट्यांच्या चळवळीला निवडणुकीमुळे आली जाग

$
0
0

प्रचारासाठी सर्वच पक्षांकडून होणार वापर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘नोटाबंदीचे सरकार, हुकूमशाहीचे सरकार, मेट्रोच्या गाजरापुढे बीआरटीचा बळी, क्रिकेटची धरली कास, शेतकऱ्यांच्या गळ्याला फास,’ अशा प्रकारचे संवाद आणि आरोळ्या इंद्र-शिपाई, आबूराव-बाबूराव, कृष्ण-पेंद्या यांच्या तोंडून पुढचे काही दिवस पुणेकरांच्या कानी पडतील. कारण जवळजवळ मृतावस्थेत गेलेल्या पथनाट्य चळवळीला अचानक जाग आली असून, निवडणुकांमध्ये उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी या चळवळीने कंबर कसली आहे.

गेल्या आठवड्यात निवडणुकांचे अर्ज भरण्यावरून उडालेला गोंधळ शमल्यानंतर आता सर्व उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. प्रचारासाठी १० ते १२ दिवसांचाच कालावधी उरला आहे. तेवढ्या वेळात प्रत्यक्ष भेटीगाठी करण्याबरोबरच व्हिडिओ, सोशल मीडिया आणि पथनाट्यांच्या माध्यमातून विकासाचा अजेंडा अनेक मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे. पथनाट्यांमधून गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि पुढील पाच वर्षांचे व्हिजन लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातही विरोधी पक्षांनी पुणे शहराची कशी वाट लावली, कलाकारांमार्फत प्रभावी संवादफेकीच्या जोरावर रेटून सांगण्यात येणार आहेत.

मुख्यत्वे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे विद्यमान नगरसेवक आणि उमेदवारांनी पथनाट्याच्या माध्यमातून विकासाचा अजेंडा समोर आणला आहे. ‘राष्ट्रवादी’ला पूर्ण बहुमत नसतानाही गेल्या पाच वर्षांत शहराचा विकास झाला. मेट्रो पुण्यात आणण्याची संकल्पना शरद पवारांनी मांडली. शहराच्या शिक्षणाचा स्तर वाढवण्यासाठी पालिकेने प्रयत्न केले, मोदींच्या नोटाबंदीमुळे सामान्यांना वेठीस धरले, असे अनेक मुद्दे ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारांच्या पथनाट्यातून अधोरेखित केले जाणार आहेत, तर ‘अजित पवार पालकमंत्री असताना पुण्याच्या नागरिकांना कधी पाणी पाणी करावे लागले नाही,’ असा टोलाही पालकमंत्री गिरीश बापट यांना लगावला जाणार आहे.

दुसरीकडे, ‘राष्ट्रवादीने पुण्यात माफियाराज आणले असून शहरात गुंडांचा सुळसुळाट झाला आहे. क्रिकेटकडे लक्ष देता देता शेतकऱ्यांचा बळी गेला, लाचखोरीला कंटाळलेल्या जनतेला आता केंद्र आणि राज्याप्रमाणे पालिकेतही परिवर्तन हवे आहे, नोटाबंदीमुळे पालिकेतील काळे धंदे थांबले,’ असे मुद्दे भाजपच्या पथनाट्यांतून रिंगणात येणार आहेत. काँग्रेस, शिवसेना आणि मनसे यांच्याही काही उमेदवारांनी पथनाट्याद्वारे विकासकामे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

यंदाच्या निवडणुकीची लढाई जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपली शस्त्रे उपसली असून, पथनाट्याच्या शस्त्राचाही प्रभावी वापर करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात या शस्त्राची धार कमी झाली असली, तरी करमणुकीच्या माध्यमातून प्रचाराची ही पद्धत मतदारांना आकर्षित करेल, असा विश्वास उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे.

.........

अचूक संवादफेक, विकासकामांची मांडणी, विरोधी पक्षाला काढलेले चिमटे अशी पथनाट्यांची रचना असणार आहे. संबंधित उमेदवाराने केलेला विकास आणि त्याचा अजेंडा मांडण्यात येईल. पथनाट्य लोकांना कंटाळवाणे वाटू नये, यासाठी विनोदी पात्रे रंगवण्यात आली आहेत.
- सुनील महाजन, पथनाट्य संयोजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​संस्कृतीच्या देवाणघेवाणीसाठी भारत रंग महोत्सव

$
0
0


भारतीय नाट्यचळवळीसह परदेशी रंगभूमीचा वेध घेणारा ‘भारत रंग महोत्सव’ यंदा पहिल्यांदाच पुण्यात रंगणार आहे. दिल्ली येथील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ने (एनएसडी) त्याचे आयोजन केले आहे. नऊ ते १४ फेब्रुवारीदरम्यान अण्णा भाऊ साठे सभागृहात पुणेकरांना भारतीय नाटकांसह तीन विदेशी नाटकांचा अनुभव घेता येणार आहे. आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात ‘एनएसडी’मधून करणारे अभिनेते गिरीश परदेशी या महोत्सवाच्या संयोजकाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्याशी आदित्य तानवडे यांनी साधलेला हा संवाद...

..............

प्रश्न : भारत रंग महोत्सव आयोजित करण्यामागचा उद्देश काय?

परदेशी : भारतीय रंगभूमीचा विकास व्हावा, या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गेल्या १९ वर्षांपासून ‘एनएसडी’मार्फत हा महोत्सव सुरू आहे. त्यात भारतीय नाटकांची परंपरा पुढे चालवणारे कलाकार आणि पाश्चात्य कलाकारांमध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून संस्कृतीची देवाणघेवाण होते. रंगभूमीचे अनेक पैलू उलगडतात. भारतीय आणि पाश्चात्य रंगभूमीला एका व्यासपीठावर आणण्याच्या दृष्टीने महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. नाट्यशास्त्राच्या शास्त्रोक्त प्रशिक्षणाचे पुढचे पाऊल म्हणून या महोत्सवाकडे पाहिले जाते.

प्रश्न : हा महोत्सव यंदा पहिल्यांदाच पुण्यात होत आहे. त्याबद्दल काय सांगाल?

परदेशी : नाट्यचळवळीच्या दृष्टीने पुणे हे एक व्यासपीठ आहे. माझ्या करिअरची सुरुवात पुण्यातूनच झाली आणि मग मी ‘एनएसडी’मध्ये गेलो. पुण्यात नाटकांचा जाणकार प्रेक्षक आहे. शिवाय भारत रंग महोत्सवात होणाऱ्या नाटकांमधून पुण्यासह सातारा, सांगली, नगर, सोलापूर या जिल्ह्यांमधील कलाकारांना काहीतरी नवीन गोष्टी शिकता याव्यात, या दृष्टीने यंदाचा महोत्सव पुण्यात आयोजित केला. दिल्ली येथे पार पडलेल्या भारत रंग महोत्सवाचा हा एक भाग असल्याने या ठिकाणी परदेशी नाटकांची, तेथील नाट्यचळवळीची विस्तृत माहिती महाराष्ट्रातील कलाकारांना घेता येणार आहे.

प्रश्न : भारतीय आणि पाश्चात्य रंगभूमीमध्ये काय फरक जाणवतो?

परदेशी : भारतात अद्याप नाटकाला करिअर म्हणून मान्यता मिळू शकलेली नाही. हा दोन्ही रंगभूमींवरचा मूलभूत फरक आहे. पाश्चात्य देशांमध्ये नाटकाला करिअर मानले जाते. कलाकारांना प्रसिद्धी, पैसे, आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. भारतात आजही लोक नाटके पाहतात, त्याचे कौतुक करतात; पण करिअर म्हणून नाटक नको, असा त्यांचा सूर असतो. त्यामुळेच अनेक कलाकारांना नाटक सोडून ‘टेलिव्हिजन’चा रस्ता धरावा लागला. त्यामुळे नाटकाला देशात लोकमान्यता मिळायला हवी.

प्रश्न : सध्या ‘एनएसडी’तील बहुतांश कलाकारांनी टीव्हीची वाट धरलेली पाहायला मिळते. त्याबद्दल काय सांगाल?

परदेशी : आर्थिक गणित हे त्यामागचे सर्वांत महत्वाचे कारण आहे. सध्याच्या काळात केवळ नाटक केल्याने जगण्यापुरते पैसे मिळत नाहीत. त्यामुळे कलाकारांना नाटक सोडून टेलिव्हिजनची वाट धरायला लागते; मात्र त्यांचे पहिले प्रेम हे नाटकच असते. एखादी चांगली संहिता आली की ते नाटकही करतात. आजही अनेक कलाकारांनी केवळ नाटकाला वाहून घेतले आहे. पुढील काळात नाटक हे करिअर म्हणून समाजाने मान्य केले, तर अनेक तरुण कलाकार आयुष्यभर फक्त नाटकालाच वाहून घेतील.

प्रश्न : अभिनेता म्हणून तुम्हाला सर्वांनी पाहिले आहे. महोत्सवाचे संयोजक म्हणून तुमचा अनुभव कसा आहे?

परदेशी : या महोत्सवाच्या संयोजनातून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. अभिनेते म्हणून आपण नाटकात, चित्रपटात काम करतो आणि निघून जातो; पण जी माणसे त्याचे संयोजन करतात, त्यांची काय तारांबळ उडते हे प्रत्यक्षात संयोजकाच्या भूमिकेत आल्याशिवाय कळत नाही. हा महोत्सव म्हणजे माझ्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. माझ्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वाचा ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफर पुण्याच्या वारशाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जनवाणी व ‘इन्टॅक पुणे’च्या वतीने आयोजित ‘पुणे हेरिटेज फेस्टिव्हल’च्या दुसऱ्या दिवशी पुणेकरांना वैविध्यपूर्ण पक्षी, वास्तू स्थापत्य, चित्रपट कला, कथाकथन, संगीत, खाद्यपदार्थ आदींची सफर घडली.

जलपर्णीने भरलेल्या आणि रुक्ष वाटणाऱ्या पाषाण तलावातील जैवविविध्य किती समृद्ध आहे, याचे गुपित पक्षी अभ्यासक धर्मराज पाटील यांनी ‘नेचर ट्रेल’मधून उलगडले. तलावावर येणारे स्थलांतरी पक्षी, तसेच स्थानिक विविध पक्ष्यांची माहिती त्यांनी या वेळी दिली. या वेळी नागरिकांना पन्नासहून अधिक पक्षी बघायला मिळाले. पक्षी कसे बघावेत, चोच, पंख, डोळे यांतील वैशिष्ट्यानुसार पक्षाचा प्रकार ओळखणे, त्याच्या नावामागचा इतिहास आदी गोष्टी पाटील यांनी सांगितल्या.

स्थापत्य कलाप्रेमी आणि चित्रकलेच्या चाहत्यांसाठी ‘स्केचिंग सेशन’ हा अत्यंत आवडता कार्यक्रम असतो. म्हणूनच पुण्यात आर्किटेक्ट आणि चित्रकारांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिर येथे हा कार्यक्रम झाला. या मंदिराचे संवर्धन करण्यात आल्याने मूळ स्थितीतील मंदिरापेक्षा सध्याचे मंदिर अधिक आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. त्यामुळे येथे महिनाभर ‘स्केचिंग सेशन’ होऊ शकते अशी प्रतिक्रियाही सहभागींनी व्यक्त केली.

‘सिनेमा हेरिटेज’ दाखवण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात वारसा सहल आयोजित करण्यात आली होती. तेथील ‘डॉक्युमेंटेशन’ विभाग, ग्रंथालय आणि फिल्म विभाग सहभागींना दाखवण्यात आला. संग्रहालयाच्या रिसर्च अँड डॉक्युमेंटेशन विभागप्रमुख आरती कारखानीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वीणा क्षीरसागर यांनी ग्रंथालयाची माहिती दिली आणि किरण दिवार यांनी फिल्म एडिटिंगविषयी मार्गदर्शन केले.

‘टाटा सेंट्रल अर्काइव्ह अँड कॅम्पस’ या वारसास्थळ भेटीला चांगला प्रतिसाद मिळाला. येथे टाटा कुटुंबीयांची स्थावर संपत्ती, टाटा याना भारतरत्न सन्मान मिळाला त्या वेळी त्यांनी घातलेले कपडे अशा विविध गोष्टींचे प्रदर्शन मांडलेले होते. महोत्सवाचा समारोप वटवाघूळ वसाहतींना भेट देऊन झाला. या वेळी विशाखा कोरड यांनी, पुण्यात वटवाघळांच्या १५ जाती असून, पूर्ण भारतात ११३ आणि जगभरात १२ हजार जाती ओळखल्या गेल्याचे सांगितले. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाजवळील ‘फ्रूट बॅट’ या वटवाघळाचे निरीक्षण करण्यात आले.

…………
प्रश्नमंजूषेचे आयोजन
पुणे हेरिटेज फेस्टिव्हलमध्ये आयोजित केलेल्या ‘जाज्वल्ल्य अभिमान’ प्रश्नमंजूषेत मनीष आणि अभ्युदित माणके विजयी ठरले आहेत. सलील दिवेकर आणि वेदान्त आफळे उपविजेते झाले. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी हा अटीतटीचा सामना रंगला होता. पुण्याविषयी अभिमान आणि इत्थंभूत माहिती बाळगणाऱ्या पुणेकरांसाठी या प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांना पुणे शहर, भवतालचा परिसर, पुण्यातील खाण्याची प्रसिद्ध ठिकाणे, फिरण्याची ठिकाणे, लोकांची स्वभाववैशिष्ट्ये, शिक्षण संस्था, महत्त्वाच्या संस्था या विषयावर प्रश्न विचारण्यात आले. तसेच ही प्रश्नमंजूषा केवळ तोंडी नसून नकाशावरही ही ठिकाणे स्पर्धकाने नोंदवणे आवश्यक होते. त्यामुळे स्पर्धकांचे भौगोलिक ज्ञानही तपासले गेले. यात विजेत्यांनी १५० गुण, तर उपविजेत्यांनी १४० गुण पटकावले होते. प्रत्येक गटात किमान एक सदस्य १५ वर्षांखालील असणे आवश्यक होते. असे सुमारे २८ संघ सहभागी झाले होते. त्यातून अंतिम फेरीत ६ संघ निवडले गेले. थिंक टू विन, आयोजन कॉलेज, हेरिटेज इंडिया या संस्था स्पर्धेच्या सहसंयोजक होत्या. देवेंद्र देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अंतर्गत शत्रूंपासूनही देशाचे संरक्षण गरजेचे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘देशात दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढला आहे. या विपरीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी जवान सज्ज आहेत. त्यासाठी योग्य प्रशिक्षण घेतलेल्या या जवानांना हातामध्ये हत्यार घेऊन सीमेसोबतच, देशांतर्गत शत्रूंपासून देशाचे संरक्षण करावे लागेल,’ असे मत सिमला येथील लष्कराच्या ट्रेनिंग कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी नुकतेच व्यक्त केले.

‘आर्म्ड कोअर सेंटर अँड स्कूल’मध्ये नुकतेच ‘नगर नॉस्टॅल्जिया २०१७’ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी तेथे २३० जवानांचे शानदार संचलन झाले. त्या वेळी सोनी बोलत होते. या निमित्ताने लष्कराच्या घोडदळातील निवृत्त अधिकारी, सध्या कार्यरत असलेले अधिकारी एकत्र आले होते.

हुतात्मा अधिकारी, जवानांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर दिमाखदार टॅटू शो झाला. घोडदळाची परंपरा कायम ठेवून निवृत्त अधिकारी व सध्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांदरम्यान सायकल पोलो मॅचचे आयोजनही करण्यात आले होते.

‘‘नगर नॉस्टॅल्जिया’हा मेळावा दर पाच वर्षांनी आयोजित करण्यात येतो. या निमित्ताने आर्म्ड कोअरमध्ये देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये काय सुधारणा झाली आहे, याबाबत सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना माहिती मिळते. तसेच अनुभवांचीही देवाणघेवाण होते,’ असे ‘आर्म्ड कोअर सेंटर अँड स्कूल’चे प्रमुख मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोरपडीमध्ये नाही शौचालयांची सुविधा

$
0
0

अन्य सात वॉर्ड हागणदारीमुक्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील बहुतांश भाग हागणदारीमुक्त झाला असला, तरी घोरपडी भागातील वॉर्ड क्रमांक सातमधील काही भागांत शौचालये नसल्याने कँटोन्मेंट हागणदारीमुक्त करता येणे अशक्य झाले आहे. या भागात शौचालय बांधणीसाठी आता जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे.

पुणे कँटोन्मेंट बोर्डातील घोरपडी भागातील काही भाग जिल्हाधिकाऱ्यांच्या, तसेच काही भाग लष्कराच्या मालमत्ता विभागाच्या अखत्यारीत येतो. परंतु, घोरपडी भागातील चिमटे वस्ती पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आहे. लष्कराच्या मालमत्ता विभागाकडून शौचालय बांधण्यासाठी जमीन मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत अवघड आणि क्लिष्ट आहे. गेल्या काही वर्षांपासून या वस्तीतील नागरिकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध झाली नाही. तेथील नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे.

घोरपडी भागाच्या नगरसेविका डॉ. किरण मंत्री म्हणाल्या, ‘घोरपडी भागातील चिमटे वस्ती भागात लोकसंख्या अधिक असल्याने त्या भागात अधिक शौचालयांची गरज आहे. शौचालयासाठी आवश्यक जागेचा शोध सुरू आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा केली आहे.’

‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सर्वच नगरसेवकांकडे आम्ही हागणदारीमुक्त वॉर्डसंदर्भात विचारणा केली आहे. सर्वच वॉर्ड हागणदारीमुक्त असतील, तर त्या आधारावर हागणदारीमुक्त कँटोन्मेंट बोर्ड असे जाहीर करता येऊ शकते. परंतु, बोर्डाच्या हद्दीतील आठ वॉर्डांपैकी एका वॉर्डात शौचालयांची सुविधा नाही. जागा उपलब्ध नसल्याने कँटोन्मेंट बोर्ड शौचालये बांधू शकले नाही. त्यामुळे नागरिकांना त्या ठिकाणी सुविधा देणे शक्य झाले नाही. चिमटे वस्तीच्या नजीकच्या भागात आम्ही शौचालयांची सुविधा उपलब्ध केली आहे. परंतु, लोकसंख्या अधिक असल्याने तेथे शौचालये अपुरी पडत आहेत. लष्कराच्या मालमत्ता विभागाकडून चिमटे वस्ती भागात शौचालये बांधण्यासाठी आम्ही जागेची मागणी केली आहे. ही जागा मिळाल्याने चार ठिकाणी शौचालये बांधण्यात येतील,’ अशी माहिती पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांनी दिली.

केंद्राच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने देशातील सर्व कँटोन्मेंट बोर्डांना पत्रे पाठवण्यात आली आहेत. शौचालयांची सुविधा आपल्या भागात उपलब्ध असल्यास कँटोन्मेंट हागणदारीमुक्त असल्याचे जाहीर करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, पुणे कँटोन्मेंट बोर्डात आठपैकी एका वॉर्डात शौचालये नसल्याची वस्तुस्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारभावानुसार भाडे मिळणार

$
0
0

ट्रान्सफॉर्मरच्या जागेसाठी ‘महावितरण’शी कराराचा मार्ग मोकळा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महावितरण’चे ट्रान्सफॉर्मर किंवा उपकेंद्रांसाठी (सबस्टेशन) दिलेल्या जागेचे बाजारभावानुसार भाडे मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात ‘महावितरण’ने अखेर कार्यवाही सुरू केली आहे; मात्र हा भाडेकरार करण्यासाठी संबंधित हाउसिंग सोसायटी किंवा जागामालकांना आपल्या जागेच्या मालकीचा पुरावा सादर करावा लागणार आहे.

नागरिकांना वीजपुरवठा करण्यासाठी ‘महावितरण’ला ठिकठिकाणी ट्रान्सफॉर्मर किंवा उपकेंद्रे उभारावी लागतात; मात्र शहरांमध्ये त्यासाठी जागा उपलब्ध होणे, हा मोठा अडसर ठरतो. त्यासाठी खासगी जागा, हाउसिंग सोसायट्यांच्या जागा किंवा हॉटेल-व्यावसायिक इमारतींमधील जागा घेण्यात येतात. या जागांसाठी जागामालकास बाजारभावानुसार भाडे द्यावे, अशी तरतूद २००५मधील पुरवठा अधिनियमात (सप्लाय कोड) करण्यात आली आहे. त्यामुळे हे भाडे मिळवण्यासाठी यापूर्वी विविध सोसायट्या व ग्राहक प्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरू होता; मात्र या तरतुदीची अंमलबजावणी ‘महावितरण’कडून करण्यात येत नव्हती. नाना पेठेतील श्रीराम जयराम सहकारी गृहरचना संस्थेने यासाठी दिलेल्या जागेसंदर्भात भाडेकरार करावा, याबाबत ऑगस्ट २०१५पासून पाठपुरावा सुरू केला होता; मात्र ही मागणी मान्य करण्यात आली नव्हती.

सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी या संदर्भात काय तरतूद आहे, अशी विचारणा माहिती अधिकार कायद्याअंतर्गत केली होती. त्याविषयी ‘महावितरण’ने कायदेशीर अभिप्राय मागविला होता. ‘सप्लाय कोड’मधील ५.५ या तरतुदीनुसार ‘जागामालकाशी बाजाराभावाने भाडेकरार करावा,’ असा अभिप्राय देण्यात आला होता; मात्र त्यानंतरही मुख्यालयाकडे अभिप्राय मागवण्यात आला. त्यावर ‘सप्लाय कोड’मधील तरतूद आणि कायदेशीर अभिप्रायानुसार कार्यवाही करावी,’ असे निर्देश देण्यात आले.

अखेर या संदर्भात भाडेकरार करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे ‘महावितरण’च्या रास्ता पेठ विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मान्य केले आहे. ‘महावितरण’ने सुरू केलेल्या या कार्यवाहीमुळे सहकारी गृहरचना संस्था, व्यावसायिक किंवा निवासी इमारती, हॉटेल यांना ट्रान्सफॉर्मर किंवा उपकेंद्रांसाठी दिलेल्या जागांचे बाजारभावानुसार भाडे मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; मात्र या संदर्भात संबंधितांनी जागेच्या मालकीची कागदपत्रे सादर करणे आवश्यक ठरणार आहे.

.............

माहितीसाठी संपर्क साधा

‘महावितरण’ने भाडे द्यावे, यासाठी ग्राहकांकडून सुरू असलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे. याबाबत काही माहिती व मार्गदर्शन हवे असल्यास सजग नागरिक मंचाशी ९८५००६३४८० या क्रमांकावर किंवा pranku@vsnl.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन विवेक वेलणकर यांनी केले आहे.

............

‘कन्व्हेअन्स डीड’साठी पाठपुरावा हवा

सोसायट्यांना भाडे मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी त्यासाठी जागेच्या मालकीची कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यासाठी विकसकाशी कन्व्हेअन्स डीड करणे आवश्यक आहे. अन्यथा ‘डीम्ड कन्व्हेअन्स’साठी पाठपुरावा करावा लागणार आहे.



भुर्दंड सोसायचा कोणी?


वीजपुरवठ्यासाठी उभारण्यात येणारी उपकेंद्रे किंवा ट्रान्सफॉर्मरसाठी जागामालकांना भाडे दिल्यास या खर्चाचा भार नक्की कोणी सोसायचा, असा पेच या निर्णयामुळे उभा राहिला आहे. ‘महावितरण’ने हा खर्च केल्यास तो साहजिकच ग्राहकांना वीजबिलांमधून भरावा लागणार आहे; मात्र तो सरसकट सर्व ग्राहकांनी भरावा, की त्या उपकेंद्र-ट्रान्सफॉर्मरद्वारे वीजपुरवठ्याचा लाभ घेणाऱ्या ठराविक ग्राहकांनी सोसावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वीजपुरवठा करण्यासाठी उपकेंद्र आणि ट्रान्सफॉर्मर उभारणी आवश्यक आहे; मात्र पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जागांचे भाव गगनाना भिडलेले असताना त्यासाठी जागा मिळणे अवघड ठरते. त्यासाठी सोसायट्यांच्या आवारात किंवा अन्य खासगी इमारतींच्या आवारात ही यंत्रणा उभारण्यात येते. आता यासाठी बाजारभावानुसार भाडे अदा करावे, या ‘सप्लाय कोड’मधील तरतुदीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे संबंधित जागामालकांना बाजारभावाने पैसे मिळणार असले, तरी ‘महावितरण’ने हा पैसा कोठून वसूल करावा, असा प्रश्न निर्माण होणार आहे.

‘महावितरण’ने सरसकट पैसे दिले, तर ते उत्पन्नातून, म्हणजे सर्व ग्राहकांच्या वीजबिलांमधून वसूल करावे लागणार आहेत; मात्र अशी उपकेंद्रे किंवा ट्रान्सफॉर्मरद्वारे मोजक्याच ग्राहकांना वीजपुरवठा होतो. त्यासाठी येणारा हा अतिरिक्त भार राज्यभरातील सर्व ग्राहकांनी का सोसावा, हा प्रश्न यापूर्वी एका वेगळ्या प्रकरणात उपस्थित झाला आहे. औरंगाबादमध्ये वीजपुरवठ्याच्या साधनांवर महापालिकेकडून स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) आकारण्यात येतो. हा भार राज्यभरातील ग्राहकांवर पडू नये, अशी भूमिका ‘महावितरण’ने घेतली होती. त्यावर राज्य वीज नियामक आयोगाने ‘करआकारणी होत असलेल्या संबंधित महापालिका क्षेत्रातील ग्राहकांकडून हा खर्च वसूल करावा,’ असे निर्देश दिले आहेत.

‘महावितरण’ने ही भूमिका कायम ठेवली, तर संबंधित ट्रान्सफॉर्मर किंवा उपकेंद्रांमधून वीजपुरवठा होणाऱ्या ग्राहकांकडून त्या जागेच्या भाड्याचा खर्च वीजबिलांतून वसूल करावा लागणार आहे. पुण्यासारख्या शहरात असे हजारो ट्रान्सफॉर्मर असून, त्यापैकी अनेक खासगी जागांमध्ये आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता महावितरण हा पैसा उपलब्ध करण्याबाबत काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार्यकर्त्यांची नेतृत्वावर आगपाखड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेतील सत्ता पुन्हा प्राप्त करण्यासाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी आणि मैत्रीपूर्ण लढती, अशी दुहेरी खेळी केल्याने काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे, दुखावलेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर आगपाखड सुरू केली असून, काँग्रेसच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांना पालिका निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहनच केले जात आहे.

पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी अगदी शेवटच्या क्षणी झाली. तत्पूर्वी, काँग्रेसने अनेकांना अर्ज भरून ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. आघाडीमुळे काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना आयत्यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे, नाराज झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता पक्षाविरोधातच शड्डू ठोकला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसच्या विरोधातील संदेश सर्वांपर्यंत पोहोचवले जात आहेत.

माजी नगरसेवक आणि प्रदेश काँग्रेसचे चिटणीस संजय बालगुडे यांचे तिकीट कापण्यात आले. त्यामुळे, नाराज झालेल्या बालगुडे यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देताना, निष्ठा व त्यागाची शिकवण देणाऱ्या काँग्रेसच्या विचारधारेला धक्का लावण्यात आल्याचा आरोप केला आहे. बालगुडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेत्यांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांना धडा शिकवा, असे जाहीर आवाहनच केले आहे. बालगुडे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी; तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांची छायाचित्रे टाकली असून, या नेत्यांच्या विचारांना सध्या किंमत राहिली नसल्याचा दावा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेच्या उमेदवारांना ‘बाळ’कडू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मतदारांपर्यंत पोहोचविणे, पक्षाचे काम त्यांच्यापर्यंत पोहोचविणे, पुढील विकासकामांची माहिती देऊन सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करणे, आदी विषयांवर शिवसेनेचे नेते शहरातील सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे १३ दिवस राहिले आहेत. यंदा चार उमेदवारांचा प्रभाग असल्याने सर्वच प्रभागांचा भौगोलिक विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे या १३ दिवसांत सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान, उमेदवारांपुढे असणार आहे. तसेच, या निवडणुकीसाठी झालेली उलथापालथ पाहता, मतदारांना विश्वासात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेने आठ फेब्रुवारीला उमेदवारांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. नेमका प्रचार कसा करावा, उमेदवारांनी पक्षाचे काम घेऊन मतदारांपर्यंत कसे पोहोचावे, प्रचाराची पातळी उच्च राखणे, जाहीर सभा व प्रचार फेऱ्यांचे नियोजन कसे करावे, याबाबत शिवसेना पक्षाचे नेते व खासदार विनायक राऊत, उपनेते शशीकांत सुतार, संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, डॉ. निलम गोऱ्हे व शहरप्रमुख विनायक निम्हण हे उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी चार उमेदवारांचा प्रभाग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे यापूर्वी कोणाच्याही पदरी अशा निवडणुकीचा अनुभव नाही. त्यामुळे अनुभवी नगरसेवक देखील यंदा बचावात्मक पवित्र्यात असल्याचे दिसून येते. त्यातच नवख्या उमेदवारांची संख्या अधिक असल्याने त्यांना अनुभवाचे चार बोल सांगण्याची गरज पक्ष नेतृत्वाला वाटत आहे.


शिवसेनेचा उद्या वचननामा

शिवसेनेचा वचननामा देखील आठ फेब्रुवारीला पत्रकार भवन येथे जाहीर केला जाणार आहे. या वचननाम्यात शहर विकासाचे ठोस धोरण आणि विविध समस्या सोडविण्यासाठीचा कार्यक्रम यांचा समावेश आहे, अशी माहिती शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी दिली. पुणेकरांचा सर्वांगीण विकास, समतोल आणि पारदर्शी कारभाराद्वारे पुणे खऱ्या अर्थाने नंबर एकचे शहर करण्याचा दावा शिवसेनेने वचननाम्यात केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसाल्याचा मार्ग पुनरुज्जीवित होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ऐतिहासिक पर्यटनाला प्रोत्साहन देत केरळ पर्यटन मंडळातर्फे आगामी काळात पर्यटकांना आकर्षित करण्यात येणार आहे. या अंतर्गत भारताचा दक्षिण किनारा ते युरोपला जोडणारा दोन हजार वर्षे जुना मसाल्याचा मार्ग पुनरुज्जीवित करण्यात येणार आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन’तर्फे सहकार्य मिळणार आहे.

पुण्यातून अंतर्गत पर्यटनाची प्रेरणा घेत, केरळ सरकारच्या पर्यटन विभागाने पुण्यामध्ये नुकताच रोड शो आयोजित करण्यात आला होता. शहरातील नामांकित ट्रॅव्हल एजंट्स आणि टूर चालक ‘देवाच्या स्वतःच्या देशाच्या’ सर्वोत्कृष्ट स्थळांची माहिती देणे हा उद्देश होता.

या वेळी केरळच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केरळ सरकारच्या पर्यटन विभागाचे पर्यटन माहिती अधिकारी के. एस. शाईन आणि सजीव के. आर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पर्यटन मंडळातर्फे ऐतिहासिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मसाल्याच्या मार्गाचा पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. केरळमधील दोन हजार वर्षे जुना ऐतिहासिक मसाल्याचा मार्ग भारताच्या दक्षिण किनाऱ्याला युरोपशी जोडतो. संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यटन संस्थेतर्फे हा प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित आहे. केरळच्या स्थानिक मसाल्याच्या बाजारपेठ हे देशातील तसेच परदेशातील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरते. या प्रकल्पासाठी काही महिन्यांपूर्वी आयोजित केलेल्या स्पाइस रूट कलिनरी फेस्टिव्हल सर्व देशातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंधरा देशांतील प्रसिद्ध शेफ यामध्ये सहभागी झाले होते. त्यात फ्रान्सच्या संघ आणि इजिप्त संघाचे शेफ विजेते ठरले, असे शाईन यांनी सांगितले.

पर्यटकांत वाढ

पर्यटन विभागाने सातत्याने राबवविलेल्या विविध योजनांमुळे जगभरातील आवर्जून पाहाव्यात अशा लोकप्रिय ठिकाणांमध्ये केरळचा समावेश झाला आहे. गेल्या वर्षभरामध्ये परदेशी पर्यटकांच्या संख्येत ५.६१ टक्क्यांनी तसेच देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत ६.०१ टक्क्याने वाढ झाली आहे. परदेशी पर्यटकांकडून राज्याला ६ हजार ९४९ कोटी रुपये उप्तन्न मिळाले. तसेच, एकूण महसुलात ७.२५ टक्क्यांनी वाढला असून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष खात्यांमधून २६ हजार ६८९ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगडावर सुराज्याचे तोरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी आतूर झालेल्या भारतीय जनता पक्षाने सर्व उमेदवारांना सोमवारी ‘किल्ले सिंहगडा’वर नेऊन सुराज्याची भावनिक शपथ दिली. महापालिकेचा कारभार पारदर्शकतेने चालविण्याची ग्वाही देत, भ्रष्टाचारमुक्त, गतिमान आणि विकासाभिमुख कारभारातून सुराज्य निर्माण करण्याचा दावा या वेळी भाजपने केला.

पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी भाजपने हा आगळा-वेगळा उपक्रम घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सर्व उमेदवारांना पारदर्शकतेची शपथ दिली. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, संघटनमंत्री रवी भुसारी, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, आमदार मेधा कुलकर्णी, आरपीआयचे नवनाथ कांबळे या वेळी उपस्थित होते.

मुंबईमध्ये रविवारी हुतात्मा स्मारक येथे सर्व उमेदवारांना शपथ देण्यात आल्यावर त्याच पद्धतीने पुण्यातील उमेदवारांना सिंहगडावर शपथ देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा बराच कालावधी पुण्यात गेला असल्याने मतदारांना भावनिक दृष्टीने जोडून घेण्यासाठी सनई-चौघडा व तुतारीच्या निनादात आणि छत्रपतींच्या जयजयकारात हा शपथ सोहळा घेण्यात आला. या वेळी, सिंहगडावरील चारही दरवाजांना सुराज्याचे तोरण बांधण्यात आले होते. तत्पूर्वी, गडावरील कोंडणेश्वर व अमृतेश्वर मंदिरात महाअभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आणि राजाराम महाराजांच्या समाधीचे पूजन करण्यात आले.

‘केंद्र, राज्य आणि नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सत्ता संपादन केली. त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीतही पक्षाला बळ देण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून काम करावे, असे आवाहन दानवे यांनी केले.

केंद्र आणि राज्यातील सरकारने शहराच्या विकासाबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून, त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे, पुणेकरांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झाली आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे व त्याला ताकद देणे हेच आमचे काम असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी नमूद केले. खासदार शिरोळे, काकडे यांचीही या वेळी भाषणे झाली.


शिवसेनेची दखल घेणार नाही

‘राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आमचा सर्वांत मोठा शत्रू काँग्रेस-राष्ट्रवादी असल्याने शिवसेनेने कितीही टीका केली, तरी त्याची दखल घेणार नाही’, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्ष पारदर्शकतेच्या विचारावरच निवडणुकीला सामोरा जाणार असून, पुण्यातही आम्ही स्वबळावर यशस्वी होऊ, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी सकाळी दानवे यांच्या उपस्थितीत सिंहगड किल्ल्यावर झाला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तरच देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. ‘भाजपवर टीका करून शिवसेना वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी हेच आमचे मुख्य शत्रू आहेत. शिवसेनेच्या टीकेवर, त्यांच्या प्रचारावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा केंद्र-राज्यातील भाजप सरकारच्या कामाच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाऊ’, असे दानवे यांनी नमूद केले. महापालिका आणि इतर निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून अनेक प्रश्न विचारले जात असून, त्याची उत्तरे जनताच मतपेटीतून देईल, असा ठाम विश्वास व्यक्त करत नगर पंचायतीच्या निवडणुकांप्रमाणे या निवडणुकांनंतरही राज्यभरात भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे येईल, अशी टिप्पणी त्यांनी केली.

तिकिटासाठी निधी घेतला नाही

भारतीय जनता पक्षाच्या तिकिटांसाठी पुणे आणि नाशिक महापालिकेमध्ये प्रत्येकी दोन लाख रुपये घेतल्याच्या आरोपांचे दानवे यांनी खंडन केले. शहरातील उमेदवारांना दहा लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार असून, त्यांचा खर्च मर्यादेबाहेर जाऊ नये, यासाठी पक्षातर्फे सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रत्येकी दोन लाख रुपये गोळा केले जात आहेत. पक्षातर्फे केल्या जाणाऱ्या प्रचारासाठी हा निधी वापरला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यात कोणाची गरज नाही

पुण्यातील १६२ जागांपैकी १० जागा मित्रपक्ष आरपीआयला सोडण्यात आल्या असून, उर्वरित सर्व जागांवर पक्षाचे उमेदवार लढणार आहेत. पुण्यात पहिल्यांदाच सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्याची संधी मिळाली असून, त्याचा पक्षाला निश्चित फायदा होईल. पुणे महापालिकेच्या निवडणुकांनंतर आम्हाला दुसऱ्या कोणाचीही गरज पडणार नाही. स्बळावर पालिकेची सत्ता मिळवू, असा ठाम विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.


यंदाच्या निवडणुकीत पक्षाकडून अनेक उमेदवार इच्छुक होते. त्यामुळे, प्रत्येकाला तिकीट देता येणे शक्य नाही. त्यामुळे, काही जणांमध्ये असंतोष निर्माण झाला असेल, तर पक्ष त्यांच्याकडे निश्चित लक्ष देईल.

रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप


टोल न देताच कार्यकर्ते गडावर

पारदर्शकेच्या कारभाराचा प्रचार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी सिंहगडावर जाताना तेथील यंत्रणेला कुठलीही माहिती दिली नाही आणि तेथील टोलही भरला नाही. सामान्य नागरिकांना गडावर जाताना टोल भरावा लागतो. सिंहगडावर जाण्याच्या रस्त्याच्या टोलनाक्यापाशी सोमवारी सकाळी सहा वाजताच झेंडेधारी स्वयंसेवकांच्या गाड्यांच्या रांगा लागल्या. त्यामु‍ळे तेथील वन कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला. भाजपचे झेंडे घेऊन ही मंडळी नेमकी कशासाठी गडावर जात आहेत, याची माहिती देणे तर दूरच कार्यकर्त्यांनी टोल देण्यासही टाळाटाळ केली. बहुतांश कार्यकर्ते टोल न देताच सुसाट वेगात घाट रस्त्यावर निघून गेले. सिंहगड हा वन विभागाच्या हद्दीत असल्याने संयोजकांनी वनाधिकाऱ्यांना पूर्व कल्पना देणे आवश्यक होते, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. भाजपचा हाच का पारदर्शकेचा कारभार, अशी चर्चा या ठिकाणी स्थानिकांत रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिता सुरू; विवाह नोंदणी 'बंद'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळे निवडणूक पूर्ण होईपर्यंत विवाह नोंदणी करता येणार नाही,’ असे अजब उत्तर महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयातून एका नागरिकाला देण्यात आले. आचारसंहिता आणि विवाहाचा काय संबंध, असा प्रश्न त्या नागरिकाला पडला, तेव्हा या काळात इतर कामे लांबणीवर टाकण्यासाठी नोकरशाहीला निवडणुकीचे निमित्त मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ‘आचारसंहिता चालू; कामे बंद’ असा अनुभव संपूर्ण शहरात नागरिकांना येत आहे.

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिकेची मुख्य इमारत आणि क्षेत्रिय कार्यालयांमधील अनेक कामे रखडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी भेटत नाही, ही पूर्वीपासूनची तक्रार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या तर बहुसंख्य कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांना भेटावयास येणाऱ्या नागरिकांना ‘साहेब इलेक्शन ड्यूटीवर गेले आहेत,’ असे सांगून वाटेला लावण्यात येत आहे. क्षेत्रिय कार्यालयांमधून जन्म मृत्यू दाखले, तसेच विविध दाखल्यांसाठी अर्ज स्वीकारण्याचे काम चालते. तसेच गेल्या काही काळापासून या कार्यालयांमध्ये विवाहनोंदणी करण्यात येते. येथील एक नागरिक विवाह नोंदणीचा अर्ज घेऊन तो नोंदविण्यासाठी बिबवेवाडी येथील कार्यालयात गेले, तेव्हा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरच विवाहनोंदणी करता येईल, असे उत्तर त्यांना देण्यात आले. हीच स्थिती महापालिकेची मुख्य इमारत आणि अन्य कार्यालयांमध्येही आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेश्मा भोसलेच भाजप उमेदवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या नगरसेविका रेश्मा भोसले यांना, प्रभाग क्रमांक ७ मधून भाजपची उमेदवारी आणि कमळ चिन्ह देण्यात यावे, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. मात्र, तो वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या जागेसाठी भाजपकडून सतीश बहिरट आणि रेश्मा भोसले या दोघांनाही पक्षाकडून ‘एबी फॉर्म’ देण्यात आला होता. भोसले यांना पक्षाचे पक्षाचे पत्रही देण्यात आले होते. त्यावर बहिरट यांच्यासह अन्य उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने हा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी दोघांचाही अर्ज अपक्ष म्हणून वैध ठरवला होता. त्याला रेश्मा भोसले यांच्या वकिलांनी हरकत घेऊन निवडणूक आयुक्तांकडे दाद मागितली होती. त्यावर महापालिका आयुक्त व निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल कुमार यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत मार्गदर्शन करावे, असे पत्र पाठवले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांनी या अर्ज व कागदपत्रांची पडताळणी करून रेश्मा भोसले यांनाच भाजपची अधिकृत उमेदवारी देण्यात यावी, असा निर्णय घेतला. त्यानंतर कुणाल कुमार यांच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी हा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर अखेर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रभागातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात आम्ही हायकोर्टात दाद मागणार असल्याचे बहिरट यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ‘राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली येऊन अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.’

असे घडले नाट्य

- रेश्मा भोसले यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
- भाजपने एबी फॉर्म दिला असूनही राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केल्याने त्यांचा अर्ज बाद
- निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेण्याची भोसले यांची विनंती
- निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आयुक्तांना वस्तुस्थितीचे पत्र
- आयुक्तांनी रविवारी निवडणूक आयोगाच्या सचिवांना पत्र लिहून खुलासा करण्याची विनंती केली
- निवडणूक आयोगाचे भोसले यांची भाजपची उमेदवारी ग्राह्य धरण्याचे आदेश
- रेश्मा भोसले भाजपच्याच उमेदवार असल्यावर सोमवारी शिक्कामोर्तब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फोर्ब्ज’च्या यादीत आलोक राजवाडे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील युवा रंगकर्मी आणि प्रयोगशील अभिनेता-दिग्दर्शक आलोक राजवाडे याचे नाव प्रतिष्ठेच्या ‘फोर्ब्ज इंडिया’ मासिकात झळकले आहे. ‘फोर्ब्ज इंडिया थर्टी अंडर थर्टी’ अंतर्गत जगभरात विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत ‘आश्वासक ३०’ युवक-युवतींना या विशेष यादीमध्ये स्थान देण्यात येते. त्यामध्ये २७ वर्षीय आलोकचा समावेश झाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी पुणेकर तरुण ‘फोर्ब्ज’मध्ये झळकला आहे.

देशातील युवा प्रतिभावान व आश्वासक युवकांच्या यादीमध्ये गेल्यावर्षी पुण्यातील तरुण रंगकर्मी निपुण धर्माधिकारी याचा समावेश झाला होता. निपुणनंतर आलोकच्या रुपाने देशातील नाट्य चळवळीतील आश्वासक तरुण म्हणून पुन्हा पुण्यातील कलाकाराची निवड झाली आहे. संगीत, क्रीडा, रंगभूमी, ई-कॉमर्स, साहित्य, कायदा अशा विविध क्षेत्रातील ३० वर्षांखालील युवकांचा या यादीमध्ये समावेश असतो. पुरुषोत्तम स्पर्धा, आसक्त व नाटक कंपनी या संस्थांच्या माध्यमातून आलोक प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत आहे. ‘सायकल’ या एकांकिकेसह ‘गेली एकवीस वर्षे’, ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ ही नाटके तसेच ‘विहीर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याचे कौतुक झाले आहे. ‘मी गालिब’ या नाटकातून त्याने दिग्दर्शनातही पाऊल टाकले आहे.

‘दहा दिवसांपूर्वी माझ्याशी संपर्क साधण्यात आला होता. त्यानंतर ही यादी जाहीर झाली. देशातील विविध ३० प्रकारात एका तरुणाची निवड केली जाते. भारतातून नाटकसाठी माझी निवड झाली आहे. फोर्ब्जच्या यादीत नाव आल्याचा आनंद नक्कीच आहे,’ अशी भावना आलोकने मटाशी बोलताना व्यक्त केली.

नाटकातील कामामुळे माझे नाव समाविष्ट केले आहे. नाटक ही समूह कला असल्याने त्यामध्ये माझ्या एकट्याचे योगदान नाही. आसक्त व नाटक कंपनी या संस्था तसेच सर्व सहकारी यांच्यामुळेच हे होऊ शकले. नाटकासाठी अनेकांना एकाचवेळी एकत्र यावे लागते. नाटकाचे काम चित्रपटासारखे नसते. या यशामागे सर्वांचा सहभाग व सहकार्य आहे.
आलोक राजवाडे, युवा रंगकर्मी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निष्ठावंत ठाम; भाजपला घाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील महत्त्वाच्या प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात पक्षाच्याच जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांनी भरलेले अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी दिवसभर पक्ष नेतृत्वाची कसोटी पणाला लागली होती. पालकमंत्री, शहराध्यक्ष यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी माघारीसाठी प्रयत्न करत असले, तरी सर्वजण निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याने भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आयत्यावेळी उमेदवार बदलले. यादीमध्ये एका उमेदवाराचे नाव जाहीर करूनही दुसऱ्याच उमेदवाराला ‘एबी फॉर्म’ देण्यात आला. त्यामुळे, नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विरोधात दंड थोपटले असून, निवडणूक लढणारच असा निर्धार व्यक्त केला आहे. शहरातील महत्त्वाच्या प्रभागांमध्येच उमेदवारीबाबत मोठा घोळ निर्माण झाला असून, निष्ठावंत कार्यकर्त्यांना सातत्याने डावलले जात असल्याची भावना तयार झाली आहे. त्यामुळे, या वेळी माघार नाही, असा पवित्रा सर्वांनीच घेतला असून, नागरिकांचाही आम्हांलाच पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे.
पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी प्रभागातून रेश्मा भोसले, मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनीमधून वासंती जाधव, डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनीमधून ज्योत्स्ना एकबोटे, नवी पेठ-पर्वतीमधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) सत्यभामा साठे हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र, या प्रत्येक प्रभागात आधी वेगळ्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येऊन, आयत्यावेळी पक्षाने बदल केल्याने सर्व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे, या सर्व प्रभागातून अनुक्रमे सतीश बहिरट, ज्योत्स्ना कुलकर्णी, ज्योत्स्ना सरदेशपांडे आणि सरस्वती शेंडगे या पक्षाच्या जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांनी भरलेले अर्ज सोमवारी कायम ठेवले. या उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून दिवसभर काहींची मनधरणी करण्यात आली; पण कोणीच त्याला दाद दिली नाही. अर्ज माघारी घेण्याचा आज, मंगळवारी अखेरचा दिवस असून, दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. त्यामुळे, पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांचे मन वळवण्यासाठी दूरध्वनीवर संपर्क साधण्यात येत होता; पण काहींचे फोन बंद होते. तर, काही कार्यकर्ते ‘आCट ऑफ स्टेशन’ गेल्याने त्यांच्याशी चर्चाच होऊ शकली नाही.

सिंहगड रोडवर स्वतंत्र पॅनेल
पक्षाचे काम सातत्याने करूनही डावलले जात असल्याने नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रोड) हिंगणे खुर्द-सनसिटी या प्रभागातून पक्षाच्या सर्व उमेदवारांविरोधात स्वतंत्र पॅनेलच उभे केले जाणार असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी निश्चित केले आहे. या प्रभागात पक्षात आयात केल्या जाणाऱ्या उमेदवारांविरोधात तीव्र नाराजी असून, त्यांच्याविरोधात पूर्ण ताकदीने लढण्यात येणार असल्याचे महेंद्र धावडे, संगीता धावडे, अनुपमा लिमये, सचिन मोरे, मनोहर बोधे या कार्यकर्त्यांनी ठरवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप दलालांचा पक्ष; अजित पवारांची टीका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘भारतीय जनता पक्ष सत्तेचा गैरवापर करून निवडणूक यंत्रणेत हस्तक्षेप करीत आहे,’ असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सोमवारी केला. शहराच्या विकासासाठी बहुजनांच्या हाती सत्ता द्यायची की जातीधर्मामध्ये तेढ माजवणाऱ्या मूठभरांच्या हाती याचा निर्णय पुणेकरांनी घ्यायचा आहे. भाजप हा गुंडांचा, दलाली करणाऱ्यांचा पक्ष असल्याची घणाघाती टीकाही पवार यांनी केली.

सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ पवार यांच्या हस्ते फोडण्यात आला. शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी‌ उपमहापौर दीपक मानकर यांच्यासह पक्षाचे उमेदवार या वेळी उपस्थित होते. जाहीर सभेत पवार यांनी राज्यातील भाजप सरकार आणि त्यांच्या चुकीच्या धोरणांवर कडक शब्दात टीका केली. गेले दहा वर्षे पालिकेत सत्ताधारी म्हणून जो विकास केला, त्याच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात असल्याचे स्पष्ट करून पवार म्हणाले की, ‘पिढीचे भवितव्य ठरविणारी ही निवडणूक आहे. शहराचा विकास करताना गेले दहा वर्षांमध्ये पक्षावर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत, ही आमची जमेची बाजू आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार येऊन अडीच वर्षे उलटून गेल्यानंतरही शहरासाठी काहीही काम करण्यात आलेले नाही. निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांकडून पैसे घेऊन तिकीट देऊन भाजप दलाली करत आहे. ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यांना भाजने उमेदवारी दिल्याने त्यांचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने गुंडांचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची औकात काढली, असेही पवार म्हणाले.

जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांना सत्तेपासून बाजूला ठेवा असे आवाहन करताना केंद्र सरकारच्या नोटाबंदीमुळे किती नकली नोटा मिळाल्या, किती काळा पैसा सापडला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नोटाबंदीचा निर्णय अंगलट आल्यावर लोकांचे लक्ष केंद्र सरकारकडून विचलित केले जात आहे. राज्यात महागाई, रोजगार, कायदा सुव्यवस्था, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी भाजपचे सरकार अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी केली.

‘भोसलेंवर कारवाई करू’

आमदार अनिल भोसले यांनी पक्षाशी गद्दारी करण्याचे काहीच कारण नव्हते. त्यांनी घेतलेली भूमिका पाहता गद्दार या शब्दालाही लाज वाटेल, या शब्दात पवार यांनी भोसलेंवर टीका केली. भोसलेंना महिनाभरापूर्वीच आमदारकी देण्यात आली. त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी द्या, असे नेत्यांचे आदेश होते. त्यानुसार भोसले यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे भोसले यांनी गद्दारी करण्याचे काहीच कारण नव्हते. त्यांच्याशी माझे अजून बोलणे झालेले नाही. मात्र, पक्षाकडून त्यांना नोटीस दिली जाईल आणि नंतर त्यांच्यावरील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तेच्या जोरावर प्रक्रियेत हस्तक्षेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘भारतीय जनता पक्ष (भाजप) सत्तेचा वापर करून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहेत. निवडणूक, पोलिस यंत्रणेला हाताशी धरून विरोधकांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत. भाजपची ही कृती घटनाबाह्य असून, त्याविरोधात हायकोर्टात दाद मागणार आहोत,’ असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे आठ तसेच, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज बाद केले आहेत. त्याउलट भाजपच्या एकाही उमेदवाराचा अर्ज बाद झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रश्मी भोसले यांनी अर्ज भरला असताना त्यांचा अर्ज एकदा बाद केला जातो, तर लगेचच तो निर्णय ​फिरवून त्यांची भाजपची उमेदवारी ग्राह्य धरली जाते. प्रत्येक पक्षाला वेगळा न्याय देण्यात येत आहे, अशी टीका बागवे यांनी केली. काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज मोठ्या प्रमाणात बाद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रमेश बागवे, काँग्रेसचे उपाध्यक्ष अजित दरेकर, माजी आमदार मोहन जोशी, प्रवक्ते रमेश अय्यर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
‘भोसले यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरला. त्या अर्जाला भाजपचा एबी फॉर्म जोडण्यात आला. दोन पक्षांचे फॉर्म आल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे अभिप्राय मागवून त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. ही सर्व कृती घटनाबाह्य आहे. बिबवेवाडी वॉर्ड ऑफिसमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या. तेथेही काँग्रेस उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत होते. आम्ही तेथे पोहोचलो तर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना भेटू देण्यात आले नाही. त्याही परिस्थितीत आम्ही त्यांना भेटून आमची बाजू मांडल्यानंतर दोन अर्ज बाद होण्यापासून वाचले,’ असे बागवे म्हणाले.
भारतीय जनता पक्षाकडून सत्तेचा गैरवापर करण्यात येत आहे. ही हुकूमशाही असून यंत्रणांचा गैरवापर करून घेण्यात येत असल्याचे बागवे म्हणाले.

धंगेकरांच्या अर्जावर निर्णय नाही
काँग्रेसचे कसबा पेठेतील उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पक्षाच्यावतीने दिलेला अर्ज बाद करण्यात आला आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागे घेण्यात येत असताना त्यांचा अर्ज स्वीकारण्यात येत नाही. धंगेकर यांनी दिलेल्या अर्जावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरतीसाठी आलेल्यांवर रस्त्यावर झोपण्याची वेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे,हडपसर

सैन्यदलातील अवघ्या ४४ जागांसाठी आयोजित भरतीसाठी बारा हजार तरुण रेसकोर्स मैदानाशेजारील परिसरात रविवारी रात्रीच दाखल झाले होते. मात्र, राहण्याची सोय नसल्याने त्यांच्यावर रस्त्याच्या कडेला झोपण्याची वेळ आली.

भरतीसाठी महाराष्ट्रासह आठ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशातील तरुणांनी सहभाग घेतला होता. रेसकोर्स मैदानाच्या चहुबाजूने अंधार असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या पथदिव्यांच्या खाली त्यांना रात्र काढावी लागली. पहाटे पाच वाजता सुरू केलेली भरती प्रक्रिया सायंकाळपर्यंत चालू होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण आल्याने पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. प्रशासनाने या तरुणांची राहण्याची सोय केली असती, तर गैरसोय टळली असती अशी तक्रार भरतीसाठी आलेल्या तरुणांनी केली. बहुतांश तरुण गरीब कुटुंबातील असल्याने त्यांना राहण्याचा वैयक्तिक खर्च पेलवत नाही.

भरतीसाठी नांदेड येथून आलेले सदानंद साळुंखे म्हणाले, ‘सैन्यभरतीसाठी ४४ जागांसाठी सुमारे १० ते १२ हजार तरुण आले आहेत. परिसरात कुठेही राहण्याची सोय नसल्याने जीव धोक्यात घालून रस्त्याच्या कडेला आम्हाला झोपावे लागले.’ संदीप पवार म्हणाला, ‘सैन्यात भरती होणे हेच लक्ष्य डोळ्यांसमोर होते. त्यामुळे शासनाने काय सुविधा केल्या पाहिजेत याचा विचार मी केला नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्ली प्रायोजकांचेच शक्तिप्रदर्शन

$
0
0

पं. सत्यशील देशपांडे यांची संगीताच्या कार्यक्रमांवर सडकून टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘प्रायोजक ही जमात संगीताच्या कार्यक्रमातून शक्तिप्रदर्शन करत असते. अशाने गाणे फुलविण्यासाठी योग्य वातावरण राहात नाही,’ अशी खरमरीत टीका करून ‘विरहामधील गाणे दहा हजार लोकांसमोर कसे सादर करायचे,’ असा सवाल ज्येष्ठ गायक-विचारवंत पं. सत्यशील देशपांडे यांनी सोमवारी उपस्थित केला. ‘संगीतात प्रमाणबद्धता हवी,’ असे मत त्यांनी मांडले.
बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे ज्येष्ठ गायक श्रीकांत पारगावकर यांच्या ‘मनी जे दाटले’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी पं. देशपांडे बोलत होते. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, लेखिका डॉ. वीणा देव, सुलभा तेरणीकर, मंदार जोगळेकर आणि पारगावकर या वेळी उपस्थित होते.
‘मेलडीच्या नावाखाली स्वर ताणला जातो. अति ताणल्यामुळे स्वरांचे सौंदर्यमूल्य हरवते. गायक शब्दांचा भाषिक अर्थाखेरीज नखी म्हणून वापर करत असतो, पण आता भाषा संस्कृतीच नष्ट होत आहे,’ असे टीकास्त्र देशपांडे यांनी सोडले. ‘घराण्याची मूल्य संक्रांत होत असताना, कलावंताने केवळ गुरुंचे अनुकरण करायचे नसते तर गायक ज्या घराण्यातून व प्रदेशातून येतो त्याचे रहिवासी व्हायचे असते. मध्यलयीमध्ये गाणे फुलविणे सर्वांत अवघड आहे. भाषेच्या कठोर व्यंजनामुळे स्वरांच्या आत्म्याला इजा होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते,’ या शब्दांत त्यांनी गायकीतील बारकावे समजावून सांगितले.
पटेल म्हणाले, ‘बाबूजी आणि गदिमांचे संगीत समोर ठेवण्याचे मोठे काम पारगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. घाशीराम कोतवाल नाटकाचा प्रयोग कोलकात्याला होता, तेव्हा खूप पाऊस सुरू होता. त्यामुळे पारगावकर यांनी रेल्वे प्रवासात तालीम घेतली होती.’ ‘कलाकाराला पाय जमिनीवर ठेवून स्वत:मधील कलावंत घडवायचा असतो. दुसरे त्यासाठी धडपडत नसतात,’ असे देव म्हणाल्या.
उत्तरार्धात पारगावकर यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन अरुण नूलकर यांनी केले.

‘ते धनादेशातील नाव बघतात’
‘हल्ली गायक कमी वाचतात. ते केवळ जाहिरात आणि धनादेशातील स्वत:चे नाव बरोबर आहे की नाही हे पाहतात. बंदिशींतील शब्दांबाबत ते उदासीन असतात. आम्ही शब्दांच्या पलीकडचे आहोत, ही मिजास वर असते,’ या शब्दांत देशपांडे यांनी गायकांना फटकारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images