Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वेदनाविरहित दंतरोपण आता तासाभरात शक्य

0
0

पुणे : दातांचे दुखणे सुरू झाले, की तुम्हाला खाता-पिता येत नाही आणि शांतपणे झोपतादेखील येत नाही. डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार घेण्याशिवाय पर्याय नसतो. ‘सिरॅमिक रिकंस्ट्रक्शन’ (सीरेक) या पद्धतीच्या दंतचिकित्सा तंत्रज्ञानामुळे तासाभरात वेदनाविरहित दंतरोपण करणे शक्य झाले आहे.

नव्या प्रकारच्या तंत्रामुळे अगदी सहज आणि लवकर दंतचिकित्सा करणे शक्य होणार आहे. डिजिटल तंत्राचा उपयोग करून दाताचा अल्प भाग, दात अथवा कवळी बसवण्याबाबत निदान होऊ शकेल. त्रासदायक उपचार, घाणेरडी साधने, वेळेचा अपव्यय आणि चांगले दात अनावश्यकरीत्या काढणे ‘सिरेक’मुळे टाळता येणार आहे. एकदाच दंततज्ज्ञांकडे गेल्यानंतर त्या भेटीत सिरॅमिकचे दात बसविणे शक्य असल्याने त्यासाठी तुम्हाला वारंवार डॉक्टरांकडे जावे लागणार नाही. त्याशिवाय दातांचे नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवणे शक्य आहे.

‘दातांच्या आरोग्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. दातांचे आरोग्य जपण्यासाठी पुण्यात सिरॅमिकचे तंत्र प्रथमच उपलब्ध झाले आहे. एका भेटीत डिजिटल तंत्राचा वापर करून दातांच्या समस्या शोधून त्यावर उपाय करता येत आहेत. शिवाय या उपचारपद्धतीमध्ये इतर कोणतेही परिणाम होणार नाहीत. सिरॅमिक तंत्रज्ञानामुळे कॅप बसवणे सहज शक्य आहे,’ अशी माहिती दंतचिकित्सक डॉ. विजयकुमार ताम्हाणे यांनी दिली.

‘‘सीरेक’मुळे तुम्हाला दातांच्या आरोग्याची सहज आणि सोप्या पद्धतीने काळजी घेता येणार आहे. तपासणी, कॅपचा आकार या गोष्टी पेनाच्या आकाराएवढ्या एका उपकरणाद्वारे करून या मशीनद्वारे कॅप बनवली जाते आणि त्यानंतर बसवण्यात येते. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे,’ असे डॉ. मकरंद ठोके म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिस्तबद्ध भाजपचा उमेदवारीत सर्वाधिक घोळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सर्वांत शिस्तबद्ध पक्ष, असा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने यंदा उमेदवारीबाबत सर्वाधिक घोळ घातला आहे. आयत्यावेळी उमेदवारी बदलण्यापासून ते एकाच ठिकाणी दोन उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ देण्यापर्यंतच्या घटनांमुळे पक्षाच्या व्यवस्थापनामध्ये त्रुटी राहिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, एका बाजूला ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्या (आरपीआय) उमेदवारांना ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढविण्याचा हट्ट धरणाऱ्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनाच काही ठिकाणी चिन्हाशिवाय लढावे लागणार आहे.
येणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची सर्वाधिक संख्या होती. त्यामुळे, उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अर्जासोबत ‘एबी फॉर्म’ देण्याची आवश्यकता असताना, एकाच प्रभागात पक्षाने दोन उमेदवारांना हे फॉर्म दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे, शहरातील पाच प्रमुख प्रभागांमध्ये पक्षाने विचित्र परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. आयत्यावेळी वेगळाच उमेदवार पुढे करण्याच्या धरसोड वृत्तीमुळे दोन ठिकाणी सरळ-सरळ फटका बसला असून, संबंधित प्रभागात कमळाच्या चिन्हावर लढणारा अधिकृत उमेदवारच राहिलेला नाही. पक्षाचा एबी फॉर्म असूनही आता संबंधितांना अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागणार आहे, तर पक्षाला ‘पुरस्कृत उमेदवार’ अशी भूमिका घ्यावी लागणार आहे.
पक्षाने उमेदवारी जाहीर करतानाच, अचानक अनेक बदल केले. उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम मुदत शुक्रवारी संपत असल्याने गुरुवारपासून एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली. परंतु, गुरुवारी रात्री घडलेल्या अनेक घडामोडींनंतर उमेदवारांमध्येच बदल झाले. तत्पूर्वी, फॉर्म नेलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे, पुन्हा अध्यक्षांचे पत्र सादर करून अधिकृत उमेदवार कोण हे स्पष्ट करण्याची वेळ पक्षावर ओढवली. शिस्तबद्ध पक्ष असा दावा करणाऱ्या पक्षाने अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण केल्याने जुने कार्यकर्तेही दुखावले आहेत.
.............
असे प्रभाग... असा गोंधळ
पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी (प्रभाग क्र ७) या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेश्मा भोसले यांना पक्षाने एबी फॉर्म दिला. तत्पूर्वी, सतीश बहिरट यांनाही दिला होता. भोसले यांचा अर्ज ग्राह्य धरावा, असे पत्र दिले असले, तरी अर्जातील चुकीमुळे त्यांना कमळाच्या चिन्हावर लढता येणार नाही, हे स्पष्ट झाले. तर, बहिरट हेदेखील अपक्ष म्हणूनच राहिले.
डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी (प्रभाग क्र १४) या ठिकाणी पक्षाने माजी नगरसेविका ज्योत्स्ना सरदेशपांडे यांना उमेदवारी दिली. परंतु, आयत्यावेळी ज्योत्स्ना एकबोटे यांनाही अर्ज भरण्यास सांगत, त्यांनाही एबी फॉर्म दिला. अखेरीस, एकबोटे यांचा अर्ज ग्राह्य धरण्याचे पत्र देण्यात आले; पण हा तिढा रविवारी दुपारपर्यंत कायम राहिला. त्यानंतर, ज्योत्स्ना सरदेशपांडे यांनीही पक्षाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे.
नवी पेठ-पर्वती (प्रभाग क्र २९) या भागात अनुसूचित जाती महिला ही जागा पक्षाने आरपीआयसाठी सोडली असली, तरी पक्षाच्या उमेदवार सरस्वती शेंडगे यांनाही एबी फॉर्म दिला होता. त्यानंतर, आरपीआयच्या उमेदवार सत्यभामा साठे यांनाही एबी फॉर्म देण्यात आला. या ठिकाणी पक्षाने पत्र न दिल्याने शेंडगे यांनी आधी एबी फॉर्म आणून दिल्याने त्यांनाच अधिकृत उमेदवार समजण्यात येईल, हे स्पष्ट झाले.
कर्वेनगरमध्ये (प्रभाग क्र ३१) सुश्मिता चौधरी यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना एबी फॉर्म दिला गेला; पण शेवटच्या क्षणी त्यांच्याऐवजी रोहिणी भोसले यांना उमेदवारी देण्यात आली. तसे, पत्रही पक्षाने दिल्याने भोसले यांची उमेदवारी ग्राह्य धरण्यात आली. मात्र, भोसले यांनी उशिरा फॉर्म दिल्याचा दावा चौधरी यांनी केला असून, त्याविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकॉकच्या सौंदर्य स्पर्धेत पुण्यातील महिलेची निवड

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बँकॉकमधील पटाया शहरात फेब्रुवारीत होत असलेल्या ‘माइलस्टोन मिसेस इंडिया इंटरनॅशनल २०१७’ या सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्यातील श्रृती पाटोळे-क्लॅरेन्स यांची निवड झाली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पाच महाराष्ट्रीयन महिलांपैकी पाटोळे पुण्यातील आहेत.

श्रृती पाटोळे यांनी किंगफिशर एअरलाइन्स आणि इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी केली. पुणे विद्यापीठातून कला शाखेत इंग्रजी साहित्याचे शिक्षण घेतले. त्या लेखिका असून त्यांचे ‘लव्ह, अगेन’ हे पुस्तक गाजले आहे. त्यांचे पती मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी आहेत.

‘गेल्या वर्षी श्याम पुणेकर यांच्या स्टार मल्टिमीडिया संस्थेने आयोजित केलेल्या ‘स्टार मिसेस पुणे २०१६’चा किताब मला मिळाला. त्यासोबतच ‘दिवा’ संस्थेचा ‘मिसेस महाराष्ट्र इंटेलिजंट २०१६’ हा किताबही मला मिळाला आहे. या स्पर्धेमध्ये शंभरपेक्षा अधिक सौंदर्यवतींनी भाग घेतला होता. बँकॉक येथील स्पर्धा सौंदर्य दाखवण्याची स्पर्धा नाही, तर वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता दाखवण्याची आहे. त्यामध्ये रॅम्प वॉक, मेकअप, इंट्रॉडक्शन आदी गोष्टींचे प्रशिक्षण देणार आहेत,’ असे श्रृती पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थसंकल्पातील आकडेवारी अवास्तव

0
0

‘एनआयपीएफपी’चे संचालक डॉ. रथिन रॉय यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या अर्थसंकल्पात प्रत्यक्ष करांमध्ये वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. हे चांगले लक्षण असले, तरी सेस आणि सरचार्जचे उत्पन्न थेट केंद्र सरकारच्या तिजोरीत जाणार आहे. हा अर्थसंकल्प कागदावर चांगला वाटणारा असला, तरी त्यातील आकडेवारी ही अवास्तव वाटते,’ असे ‘एनआयपीएफपी’चे संचालक डॉ. रथिन रॉय यांनी रविवारी सांगितले.

‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे (पीआयसी) ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्स’मध्ये आयोजित अर्थसंकल्पावरील चर्चासत्रात डॉ. रॉय बोलत होते. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी’चे (एनआयपीएफपी) संचालक डॉ. रथिन रॉय, अर्थतज्ज्ञ अजित रानडे, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट’चे (एनआयबीएम) संचालक डॉ. अचिंतन भट्टाचार्य, गोखले अर्थशास्त्र संस्थेतील प्राध्यापक डॉ. प्रदीप आपटे, ‘इंडिया डेव्हलपमेंट फाउंडेशन’चे (आयडीएफ) संचालक डॉ. शुभाशिष गंगोपाध्याय या चर्चासत्रात सहभागी झाले होते.

‘नोटाबंदीनंतर करपात्र व्यक्तींची संख्या वाढून प्राप्तिकरात वाढ होणार आहे, असे सांगितले जाते. प्रत्यक्ष करवसुली वाढणार असेल, तर ते स्वागतार्ह आहे; मात्र त्याचे रूपांतर कर दहशतवादामध्येही होण्याची शक्यता आहे,’ असे डॉ. रॉय म्हणाले. ‘या अर्थसंकल्पात आर्थिक नियंत्रणावर भर देण्यात आला असून, या वर्षी वित्तीय तूट ३.५ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांपर्यंत नियंत्रित राखण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वित्तीय तुटीचे प्रमाण कमी करतानाच प्राप्तिकरामध्ये या वर्षी २५ टक्क्यांनी वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे,’ असे रानडे म्हणाले.

‘सरकारच्या धोरणात कोणतीही सुसूत्रता राहिलेली नाही. योजना आणि तरतुदींच्या बाबतीत पहिल्या दोन्ही अर्थसंकल्पांशी या अर्थसंकल्पाचा ताळमेळ दिसत नाही,’ असे डॉ. भट्टाचार्य म्हणाले.

‘सामाजिक गोष्टींवर केलेला खर्च हा सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये (जीडीपी) इतर राष्ट्रांप्रमाणे दिसणे गरजेचे आहे. केवळ गरिबांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवून उपयोग नाही, तर ते गरिबीतून बाहेर येणे गरजेचे आहे,’ असे गंगोपाध्याय म्हणाले.

‘पीआयसी’चे मानद संचालक प्रशांत गिरबाने यांनी प्रास्ताविक केले. माजी केंद्रीय अर्थसचिव डॉ. विजय केळकर यांनी आभार मानले.

‘यंत्रणा दिसत नाही’

‘शेतकऱ्यांना अर्थसाह्य करण्यासाठी १० लाख कोटी असे मोठे आकडे चांगले वाटतात; पण त्याच्या वाटपाचे सूत्र आणि जबाबदारी कोणाला दिली आहे, हे समजत नाही. तसेच अनेक ग्रामीण विकास योजना या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आल्या असल्या, तरी त्यासाठीची यंत्रणा दिसत नाही. कारण त्यावरच त्यांचे यश अवलंबून असते,’ असे डॉ. प्रदीप आपटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळभाज्या महाग, पालेभाज्या स्वस्त

0
0

मार्केट यार्डात रविवारी फळभाज्याची मोठी आवक; मागणीही वाढल्याने दरवाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मध्यंतरी असलेल्या ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाल्याने रविवारी फळभाज्यांची मोठी आवक मार्केट यार्डात झाली. आवक वाढली असली, तरी त्या तुलनेत मागणीही वाढल्याने बहुतांश फळभाज्या महागल्या आहेत, तर पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. भेंडी, टोमॅटो, दोडका, चवळी, काकडी, कारली, फ्लॉवर, वांगी, कोबी, डिंगरी, नवलकोल, मटार या भाज्यांचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. ही परिस्थिती कायम राहणार नसल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी नोंदवला.

मार्केट यार्डात रविवारी १७० ते १८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. वातावरणीय स्थितीमुळे फळभाज्यांचे उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांनी रविवारी शेतमाल विकायला आणल्याने आवक वाढली. मध्य प्रदेशातून मटारची २० ट्रक, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून शेवग्याची पाच ते सहा टेम्पो आवक झाली. हिरव्या मिरचीची मध्य प्रदेश, कर्नाटकातून १५ ते १६ टेम्पो, तोतापुरी कैरीची कर्नाटकातून पाच ते सहा टेम्पो आवक झाली. आल्याच्या १८०० ते २००० गोणींची आवक झाली. टोमॅटोच्या पाच ते साडेपाच हजार पेट्यांची आवक झाली. तसेच हिरवी मिरची चार ते पाच टेम्पो, फ्लॉवरची १४ ते १५ आणि कोबीची १८ ते २० टेम्पो आवक झाली. सिमला मिरच्यांची १० ते १२ टेम्पो, गाजरांची पाच ते सहा टेम्पो आवक झाली. तसेच तीन ते चार टेम्पो शेवग्याच्या शेंगाही बाजारात दाखल झाल्या. मटारच्या दीडशे ते दोनशे गोण्या, पावट्याचे पाच ते सहा टेम्पो, तांबड्या भोपळ्याचे १० ते १२ टेम्पो बाजारात दाखल झाले.

कांद्याचे दीडशे ट्रक, तसेच आग्रा, तळेगाव, इंदूरहून बटाट्याचे ६० ते ६५ ट्रक बटाट्याची आवक झाली आहे. लसणाची आवक वाढल्याने दर उतरले आहेत. चार ते साडेचार हजार गोण्या लसूण बाजारात दाखल झाली आहे. मध्य प्रदेशातून नवीन लसणीची आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे. कोथिंबिरीच्या पावणेदोन लाख जुड्या, तर मेथीच्या एक लाख जुड्यांची आवक झाली आहे.

..............

‘व्हॅलेंटाइन’साठी फुलांची प्रतीक्षा

‘व्हेलेंटाइन डे’ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाची गुलाबाची फुले बाजारात आणण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. व्हॅलेंटाइनच्या काही दिवस अगोदर फुलांची बाजारात आवक होईल. परंतु त्यांच्या दराबाबत सध्या काहीही सांगता येणार नाही. सध्या अन्य फुलांची आवक, मागणी सारखी असल्याने त्यांचे दर स्थिर आहेत.

.............

मागणीअभावी मासळीचे दर स्थिरावले

लगीनसराईचा हंगाम सुरू झाल्याने सध्या ग्राहकांकडून मासळीला मागणी कमी आहे. बाजारात मासळीची आवक साधारण असून, दरही स्थिर राहिले आहेत. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची १० टन, खाडीच्या मासळीची २०० ते ३०० किलो, नदीच्या मासळीची ४०० ते ५०० किलो आवक झाली. आंध्रातून रोहू, कतला आणि सिलनची १२ टन आवक झाली आहे.

अंड्यांच्या दरात सध्या घसरण झाली आहे. इंग्लिश अंड्याच्या दरांत शेकड्यामागे २० ते २५ रुपयांची घट झाली आहे, अशी माहिती अंड्याचे व्यापारी रूपेश परदेशी यांनी दिली.

लिंबे स्वस्त

बाजारात लिंबांच्या चार हजार गोण्यांची आवक झाली. पिवळ्या रंगाच्या लिंबांचे प्रमाण अधिक असल्याने दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. घाऊक बाजारात एका डझन लिंबाला १० रुपये द्यावे लागत होते. डाळिंबांची ६० टन, द्राक्षांची ७५ टन, चिकूच्या दोन हजार गोण्यांची आवक झाली. २० ते २५ टेम्पो कलिंगड आणि खरबुजाच्या १० ते २० टेम्पोंची आवक झाली आहे. तसेच ४५ टन मोसंबीची आवक झाली असून, मोसंबीच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे.



साखरेतील तेजी कायम; तूरडाळ, शेंगदाणे स्वस्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साखरेच्या दरांमध्ये गेला महिनाभर असलेली तेजी अद्यापही कायम राहिली असून, क्विंटलचे भाव चार हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. हरभरा डाळ, तूरडाळीसह शेंगदाणा, मिरचीची आवक वाढल्याने त्यांचे दर घसरले आहेत. मार्केट यार्डातील घाऊक भुसार विभागात तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू, रवा, आटा, मैदा, साबुदाणा, भगर, हळद, पोहे, गोटा खोबरे, नारळ आदी वस्तूंचे भाव स्थिर आहेत.

काही महिन्यांपासून साखरेच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. कारखान्यांकडून जादा दराने साखरेची विक्री होऊ लागली आहे. त्यामुळे सट्टेबाजारदेखील सक्रिया झाला आहे. या दोन्ही कारणांमुळे साखरेच्या दरात वाढ झाली आहे. क्विंटलसाठी तीन हजार ९७५ रुपयांपर्यंत दर पोहोचले आहेत. मागील आठवड्यात साखरेच्या दरात क्विंटलमागे १०० रुपयांची वाढ झाली होती. हे दर आणखी वाढल्यास साखरेचे किरकोळ बाजारात दर वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून तूरडाळीसह हरभरा डाळीची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. आवक वाढल्याने त्यांच्या दरात घसरण सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून डाळींचे दर घसरल्याने ते सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. तूरडाळीसह हरभरा डाळीच्या भावात ५०० रुपये, तर मसूर डाळीच्या दरात १०० ते २०० रुपयांची घट घट झाली आहे. हरभऱ्याचे भावही पाचशे रुपयांनी उतरले आहेत. हरभरा डाळ स्वस्त झाल्याने बेसनाच्या दरावर परिणाम होऊन ३०० रुपयांनी, तर भाजकी डाळदेखील सुमारे १५० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

नवीन शेंगदाण्यांची आवक सुरू झाल्याने त्यांचे दर क्विंटलमागे २०० रुपयांनी उतरले आहेत. मागणीअभावी गुळाच्या दरातही ५० ते १०० रुपयांची घट झाली आहे. आवक वाढल्याने मिरचीचे दर दोनशे रुपयांनी उतरले आहेत.

वस्तूंचे भाव (रुपये प्रति क्विंटल)

.

हरभरा डाळ : ७४०० ते ७७००

तूरडाळ : ७००० ते ७२००

साखर : ३९५० ते ३९७५

शेंगदाणे

स्पॅनिश : ८५००-९०००

घुंगरू : ७६००-८०००

गूळ : ३०५०-३७५०

भाजकी डाळ (४० किलो) : ३६५०-४०००

बेसन (५० किलो) : ४२५०-४५००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षभरात ३३ परवाने रद्द

0
0

सात जणांवर गुन्हा; रेशन दुकानदारांवर अन्नधान्य पुरवठा विभागाची कारवाई;
म. टा. प्रतिनिधी, पुणे
अन्नधान्य पुरवठा विभागाने गेल्या वर्षभरात धान्याचा काळाबाजार करणाऱ्या ३२ स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने रद्द, तर १६ दुकानदारांचे परवाने निलंबित केले आहेत. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
अन्नधान्य पुरवठा विभागाअंतर्गत असलेल्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्यांतील एप्रिल ते डिसेंबर २०१६ या कालावधीत केलेल्या कारवाईचा आढावा घेतला आहे. त्यानुसार ३२ परवाने रद्द आणि १६ निलंबित झाले असल्याचे अन्नधान्य पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
पुणे विभागामध्ये नऊ हजार २४३ दुकाने असून, तीन हजार १५१ दुकानांची तपासणी पुरवठा अन्नधान्य पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आली. त्यामध्ये दोन हजार ५७६ ठिकाणी नियमित तपासणी करण्यात आली, तर २२१ तपासणी अचानक करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी दिलेल्या तक्रारींवरून ३५४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यावरून विभागातील ३२ दुकानदारांचे परवाने रद्द, तर १६ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
या कारवाईमध्ये पुणे शहरातील आठ दुकानांचे परवाने रद्द आणि सहा दुकानांचे निलंबित करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील दहा परवाने रद्द झाले आहेत. सातारा येथील तीन, सांगलीत दहा आणि कोल्हापूरातील एका दुकानाचा परवाना रद्द झाला आहे. सांगलीतील नऊ आणि कोल्हापूरमधील एका दुकानदाराचा परवाना निलंबित करण्यात आला असल्याचे अन्नधान्य पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
.......................
जिल्हा तपासलेली दुकाने परवाने निलंबित परवाने रद्द
पुणे शहर ९०० ६ ८
पुणे जिल्हा ४४१ ० १०
सातारा ५२५ ० ३
सांगली ३३० ९ १०
कोल्हापूर ५५९ १ १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन हजार बालकांना मिळाले हक्काचे घर

0
0

५४ वर्षांत ‘सोफोश’ची कामगिरी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ससून हॉस्पिटलमधील पेशंटना आधार देण्यासाठी उभारलेल्या सोफोश संस्थेने आतापर्यंत सुमारे चार हजार निराधार बालकांना मायेचा आधार दिला आहे. या बालकांपैकी तीन हजारांहून अधिक बालकांना आई-वडिलांचा आधार देताना ‘हक्काचे घर’देखील मिळवून देण्यात आले आहे.

ससून हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या गरीब व गरजू पेशंटना मदतीसाठी सोफोश या संस्थेची स्थापना ५४ वर्षांपूर्वी झाली. या संस्थेच्या माध्यमातून श्रीवत्स ही संस्था गेल्या ४३ वर्षांपासून निराधार, निराश्रित बालकांसाठी ससून हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. संस्थेचे देणगीदार, हितचिंतकांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली. या वेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, ससून हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. अजय तावरे, भोई प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई आदी उपस्थित होते.

‘सोफोश संस्थेच्या वतीने आतापर्यंत गेल्या ५४ वर्षांत चार हजार बालकांचा सांभाळ केला. त्यापैकी तीन हजार १४४ बालकांना दत्तक स्वरूपात हक्काचे घर मिळवून दिले. त्यामध्ये एक हजार ४५९ मुले आणि एक हजार ६८५ मुली आहेत. २०१६ या वर्षात सुमारे ७० बालकांचे दत्तक स्वरूपात पुनर्वसन केले आहे. त्यात ३२ मुले व ३९ मुलींचा समावेश आहे,’ अशी माहिती ‘सोफोश’चे सचिव अरविंद हेर्लेकर यांनी दिली.

‘ससून हॉस्पिटलमधील पेशंटना सोफोश संस्थेच्या वतीने समुपदेशन केले जाते. तसेच विविध तपासण्यांसाठी मदत केली जाते. हॉस्पिटलला विविध स्वरूपाच्या देणग्या मिळवून देण्यात ‘सोफोश’ने नेहमीच पुढाकार घेतला आहे,’ असे डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितले. संदीप पाटील यांच्या ऑर्केस्ट्रातून बालकांचे मनोरंजन झाले. डॉ. करीर यांच्या हस्ते बालकांना भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संयोजन ‘सोफोश’च्या प्रशासकीय विभाग प्रमुख शर्मिला सय्यद यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता तरी बंडखोरांना आवरा, उमेदवारांचा टाहो

0
0

Sunil.Landge@timesgroup.com

Tweet : @sunillandgeMT

.....

पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी बंडखोरी केलेल्या उमेदवारांना आता आवरा,’ अशी विनवणी प्रमुख पक्षांचे अधिकृत उमेदवार पक्षश्रेष्ठींकडे करू लागले आहेत. त्यामुळे प्रबळ बंडखोरांवर राजकीय आश्वासनांची खैरात चालू असल्याचे दिसून येते. उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या क्षणी अनेकांची मने वळवून बंडखोरी थोपवण्यात यश मिळेल, असा दावा पक्षांचे पदाधिकारी करू लागले आहेत.

‘आयाराम-गयाराम’च्या प्रकारांमुळे यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत शर्यत रंगली होती. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांवर प्रमुख पक्षांनी भर दिला होता. त्यामुळे चुरस दिसून आली. उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अखेरच्या क्षणी काँग्रेस आणि शिवसेनेची उमेदवारी पदरात पाडून घेतली. काही नाराज कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आता नाही तर परत कधीच नाही,’ अशी भूमिका घेऊन काहींनी बंडाचा पवित्रा कायम ठेवण्याची प्रतिज्ञाही केली आहे.

शहरात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये बंडखोरीची लागण झाली आहे. नैराश्यापोटी पक्षश्रेष्ठींवर आरोप केले जात आहेत. पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलने केली जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केलेल्यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. आयारामांना संधी देऊन भाजपने निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्त्यांना डावलले आहे. तिकीटवाटप करताना स्थानिक नेत्यांनी पक्षाच्या विचारांना हरताळ फासला आहे. स्वत:च्या फायद्यासाठी आणि स्वार्थ पाहून उमेदवारीचे वाटप केले गेले. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी डावलून त्यांचे राजकीय खून केल्याचा आरोप करून माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे शहरातील सर्व निष्ठावंत एकत्र येऊन कदाचित नवीन पक्ष स्थापन करण्याची भूमिका घेतील, असा दावाही दुर्गे यांनी केला आहे. ‘पक्षाने खरोखरच पारदर्शीपणा, भ्रष्टाचार आणि भयमुक्त कारभार या तत्त्वाप्रमाणे तिकीटवाटप केले का,’ असा संशय व्यक्त करून सरचिटणीस अमोल थोरात यांनी संशय व्यक्त केला आहे. नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘शहरात भाजपची पुरेशी ताकद नसताना पक्ष वाढवण्यासाठी जिवाचे रान केले. सत्तेत नसताना अहोरात्र कष्ट करून पक्षाचा प्रचार केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकहाती कारभाराविरोधात सातत्याने आवाज उठवला; मात्र शहरातील पक्षनेतृत्वाने त्याच पक्षातील आयात केलेल्या उमेदवांराना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली. हा भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय आहे. नेत्यांचे हे वागणे म्हणजे इंग्रजांची वृत्ती आहे,’ असा घणाघातही दुर्गे यांनी केला आहे. शिवाय, या स्थितीच कधीही स्फोट होऊ शकतो. त्याची सुरुवात उमेदवारी वाटपाच्या माध्यमातून झाल्याचेही दुर्गे यांनी म्हटले आहे.

निवडणुकीसाठी भाजपने सर्वेक्षण करून प्रबळ उमेदवारांची माहिती संकलित केली होती. त्यानुसार निवडून येण्याचे निकष असलेल्या पक्षातील उमेदवारांना संधी देण्यात येणार होती. तरीही भाजपने ऐन वेळी आयारामांना एबी फॉर्म देऊन पक्षाच्या प्रबळ उमेदवारांवर अन्याय केला. त्यामुळे भाजपने खरेच सर्वेक्षण केले का आणि पारदर्शीपणा, भ्रष्टाचार आणि भयमुक्त कारभार या तत्त्वाप्रमाणे तिकीटवाटप केले का, असे मुद्दे थोरात यांनी उपस्थित केले आहेत. पक्षाच्याच कोअर कमिटीतील सदस्यांवरही संशय व्यक्त करून भविष्यात जुन्या-नव्यांच्या वादाला तोंड फुटेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

विद्यमान नगरसेविका नीता पाडाळे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘ऐन वेळी भाऊसाहेब भोईर यांच्यामुळे माझे तिकीट कापले,’ असा आरोप करून त्यांनी प्रसंगी कोर्टात धाव घेण्याचा इशारा दिला आहे. उमेदवारी नाकारलेले विविध पक्षांतील प्रमुख कार्यकर्ते भविष्यात काय भूमिका घेतात, याकडे जरी लक्ष लागले असले तरी नाराजी दूर करण्यासाठी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी विशेष प्रयत्न करत आहेत.

....

...यांच्या भूमिकेकडे लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत शितोळे, नीता पाडाळे, सोनाली जम, अमिना पानसरे, झामाबाई बारणे, भाजपच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैला मोळक, महेश कुलकर्णी, राजू दुर्गे, माउली थोरात, प्रकाश जवळकर, अमोल थोरात, सूरज बाबर, वीणा सोनवलकर, अजय पाताडे या प्रमुख कार्यकर्त्यांच्या भूमिककेडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदानाचा टक्का वाढवण्याचे प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शहरात महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मतदार जनजागृतीमध्ये शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा एकूण मतदानाच्या ७५हून अधिक टक्के मतदानाचे उद्दिष्ट पालिका प्रशासनाने ठेवले आहे. त्या अनुषंगाने मतदार जनजागृती मोहीम राबवण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच भाग म्हणून आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या कक्षात विविध स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. सहआयुक्त दिलीप गावडे, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष सूर्यकांत मुथियान, संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, सांगली जिल्हा मित्रमंडळाचे अध्यक्ष रणजित औटे, गायत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष हिरामण भुजबळ, समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर दाणी, अक्षय बने, जलदिंडी प्रतिष्ठानचे राजीव भावसार, ग्राहक पंचायतीचे कोषाध्यक्ष रमेश सरदेसाई आदी उपस्थित होते.

वाघमारे म्हणाले, ‘निवडणुकीमध्ये मतदारांनी आपली मतदानाची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडून जनहितासाठी सक्षम आणि योग्य उमेदवार निवडून द्यावा. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांना चार उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. त्यासाठी प्रत्येक प्रभागात अ/ब/क/ड अशा चार जागांसाठी मतदान करावयाचे आहे. त्यामुळे नागरिकांना एकाच वेळी चार उमेदवार निवडून देण्याची संधी उपलब्ध आहे. सर्व प्रभागांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करावे. यापूर्वी कमी मतदानाच्या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करून विविध माध्यमांद्वारे जनजागृती केली जाणार आहे.’

डॉ. माने म्हणाले, ‘निवडणुकीमध्ये प्रत्येक रंगाच्या मतपत्रिकेवरील कोणतेही एक बटण दाबून एकूण चार मते नोंदवून मतदानाचा हक्क बजावावा. कोणत्याही आमिषाला आणि प्रलोभनाला मतदारांनी बळी पडून नये.’

प्रत्येक प्रभागातील ‘अ’ जागेच्या मतपत्रिकेचा रंग पांढरा, ‘ब’ जागेच्या मतपत्रिकेचा रंग फिकट गुलाबी, ‘क’ जागेच्या मतपत्रिकेचा रंग फिकट पिवळा, तर ‘ड’ जागेच्या मतपत्रिकेचा रंग फिकट निळा असणार आहे. निवडणूक निर्भयमुक्त, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

............

आवाहनाला प्रतिसाद

महापालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनाला चिंचवड येथील संस्कार प्रतिष्ठान आणि पोलिस स्टेशन यांनी जनजागृती अभियान राबवले. चिंचवडगाव मंडई, गांधी पेठ, चापेकर चौक, मोरया बसस्टॉप आदी ठिकाणी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला. डॉ. मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात सोमनाथ पतंगे, अनिल माने, शब्बीर मुजावर, मच्छिंद्र राजगुरव, टी. प्रभाकरन, रवींद्र मुळे, आणि चिंचवड पोलिस यांनी भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत होणार दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा होणार आहेत.

महापालिकेसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार असून, उमेदवारांचे पॅनेल निश्चित झाल्यानंतर बहुतेक सर्वांनीच एकत्रितरीत्या पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला. रविवारी सुटीचा दिवस असल्यामुळे कार्यकर्त्यांनी नियोजन करून प्रचार करण्यावर भर दिला. प्रचाराच्या रणधुमाळीत ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार माजीद मेमन, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांच्या जाहीर सभा होतील, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री सभा घेणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते सभा घेणार आहेत. काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री पंतगराव कदम, हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत हंडोरे यांच्या सभा होणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे माजी आमदार बाळा नांदगावकर यांची सभा होणार असून, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही सभेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी चिंचवडमध्ये १६०९ मतदान केंद्रे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात एक हजार ६०९ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यासाठी ११ लाख ९२ हजार मतदारांची संख्या ग्राह्य धरण्यात आली आहे.

महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी याबाबतची माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक नऊ आणि २१मध्ये सर्वाधिक प्रत्येकी ६४ आणि प्रभाग २५मध्ये सर्वांत कमी ३५ मतदान केंद्रे असणार आहेत. एकूण मतदार ११ लाख ९२ हजार ०८९ आणि मतदान केंद्रांची संख्या एक हजार ६०९ आहे.

प्रभाग क्रमांक, मतदारांची संख्या आणि कंसात मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे :

१ - ३३,७९४ (४५), २ - २८,२८५ (३७), ३ - २९,१६८ (४१), ४ - ३६,६६६ (५०), ५ - २७,७९९ (३७), ६ - ३३,२०९ (४५), ७ - ३१,९९० (४४), ८ - ३४,९१७ (४८), ९ - ४९,९१२ (६४), १० - ४१,५६४ (५६), ११ - ३५,५९२ (४७), १२ - ३६,२६३ (४७), १३ - ४१,४९४ (५४), १४ - ४५,७०४ (६१), १५ - ४०,९८२ (५४), १६ - ३९,७१७ (५५), १७ - ४१,४३६ (५६), १८ - ४३,२०८ (५९), १९ - ४६,६९६ (६२), २० - ३९,४६२ (५४), २१ - ४७,६१४ (६४), २२ - ३९,९९९ (५५), २३ - २६,३७१ (३६), २४ - २९,९६५ (४५), २५ - २५,८८१ (३५), २६ - ३९,०९५ (५८), २७ - ३३,२५४ (४४), २८ - ३६,६२५ (४८), २९ - ३६,५०१ (५१), ३० - ४४,४०८ (५९), ३१ - ३८,९८७ (५१), ३२ - ३६,६३१ (४७)




१४३ उमेदवारांचे अर्ज झाले बाद

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या दोन हजार ३८८पैकी १४३ उमेदवारी अर्ज बाद ठरले आहेत. यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक सद्गुरू कदम यांचा समावेश आहे. रविवारी (पाच फेब्रुवारी) पहाटेपर्यंत छाननीचे काम चालू होते.

यंदाच्या निवडणुकीत प्रथमच सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी अखेरच्या क्षणी उमेदवारांच्या हातात ‘एबी फॉर्म’ दिले. त्यामुळे गोंधळ उडाला. त्यानंतर अर्ज छाननीच्या वेळी वादावादी, आक्षेप यामुळे वातावरण काहीसे गंभीर होते. अनेक ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्याचे प्रकारही घडले. त्यामुळे रात्री उशिराच नव्हे, तर अगदी पहाटेपर्यंत छाननीचे कामकाज चालू होते.

छाननीनंतर १४३ उमेदवारांचे अर्ज वेगवेगळ्या कारणास्तव बाद ठरवण्यात आले. तीनपेक्षा जास्त अपत्यसंख्या, एकाच प्रभागात दोन नामनिर्देशन अर्ज, सूचक आणि अनुमोदक त्याच प्रभागातील नसणे आदी त्रुटींमुळे अर्ज बाद झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रभाग क्रमांक आणि कंसात अर्ज बाद झालेल्यांची संख्या पुढीलप्रमाणे - १ (३), २ (१५), ३ (११), ४ (५), ५ (५), ६ (६), ७ (१), ८ (११), ९ (१), १० (१), ११ (१३), १५ (२), १८ (१), १९ (६), २० (३), २१ (३), २४ (५), २५ (१९), २६ (२), २७ (२०), २९ (४), ३० (१), ३२ (३), ३२ (२).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नी, मुलीचा खून करून प्रौढ पुरुषाची आत्महत्या

0
0

कर्जबाजारीपणाला कंटाळून कृती केल्याचा संशय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एका व्यक्तीने पत्नी व दोन मुलींचा झोपेत गळा आवळून खून करत स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी कात्रज परिसरातील दत्तनगर येथे उघडकीस आला. आत्महत्येपूर्वी या व्यक्तीने सुसाइड नोट लिहून ठेवली असून, ‘आम्ही चौघे जात असून यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये,’ असे म्हटले आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दीपक सखाराम हांडे (वय ४२, रा. गल्ली क्रमांक ८, टेल्को कॉलनी, दत्तनगर कात्रज) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने पत्नी स्वाती (वय ३५), मुलगी तेजस (वय १५), वैष्णवी (वय १०) यांचा दोरीने गळा आवळून खून केला. तेजस कात्रज येथील हुजूरपागा माध्यमिक शाळेत दहावीत शिकत होती, तर, वैष्णवी ही पोतदार इंटरनॅशनल स्कूल येथे पाचवी शिकत होती, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी दिली.

डायरीत सापडल्या उधारीच्या नोंदी


पत्नी व दोन मुलींचा झोपेत गळा आवळून खून करून कुटुंबप्रमुखाने स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर कात्रज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हे कृत्य करणारे दीपक हांडे यांच्या घरात पोलिसांना एक डायरी मिळाली असून, त्यामध्ये हांडे यांनी उधारीने घेतलेल्या पैशाची नोंद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कृत्य करणारे दीपक हांडे मूळचे संगमनेरचे असून, नोकरीच्या निमित्ताने काही वर्षांपासून पुण्यात राहत होते. तळेगाव येथील संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना येथे ते नोकरीला होते. हांडे व त्यांचा भाऊ यांनी टेल्को कॉलनीत घर बांधले आहे. पहिल्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये हांडे राहत होते. तळमजल्यावरील भाग भाड्याने दिला होता. रविवारी सकाळी दहा वाजले तरी कोणीही बाहेर आले नाही. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणारे श्रीकांत कोयले यांनी दरवाजा ठोठावला; पण बराच वेळ दरवाजा न उघडल्यामुळे त्यांनी खिडकीची काच फोडून आतमध्ये पाहिल्यानंतर हांडे यांनी हॉलमधील पंख्याला गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ भारती विद्यापीठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. हांडे वन बीएचके फ्लॅटमध्ये राहत होते. या फ्लॅटचा हॉल व किचन एकत्रच आहे. नागरिकांनी फ्लॅटचे लॅच तोडून आत प्रवेश केला. त्या वेळी हांडे यांनी हॉलमधील पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. हॉलमधील कॉटवर तेजस हिचा मृतदेह होता, तर बेडरूममधील कॉटवर स्वाती व वैष्णवी निपचित पडलेल्या होत्या. तिघींचाही दोरीने गळा आवळून खून केल्याचे आढळून आले. हांडे यांनी लिहून ठेवलेली सुसाइड नोट पोलिसांना मिळाली आहे. ‘आम्ही चौघे जात आहोत. आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये,’ असे त्यामध्ये म्हटले आहे. हांडे यांनी तिघींचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खून व आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...........

नागरिकांची मोठी गर्दी

दत्तनगर परिसरात ही घटना घडल्याची बातमी परिसरात पसरल्यावर घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांनादेखील काही अंतरावर गाड्या उभ्या करून घटनास्थळी जावे लागले. चौघांचे मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये पाठवल्यानंतर येथील गर्दी कमी झाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


तिघींच्या हातात शंभराची नोट..

घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना तिघींच्या हातात शंभर रुपयांची नोट आढळून आली. तसेच, या नोटेला हळद-कुंकू लावल्याचे दिसले. तसेच, स्वतः देखील त्याने गंध लावल्याचे आढळून आले आहे. हा नेमका प्रकार काय हे पोलिसांना सुरुवातीला समजला नाही. पण, सुसाईड नोट वाचल्यानंतर या तिघींना आयुष्यभर काही देऊ शकलो नसल्याचे हांडे यांनी म्हटले आहे. त्यामुळेच त्याने खून करण्यापूर्वी प्रत्येकीच्या हातात शंभराची नोट ठेवल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील प्रकाशकांना फटका

0
0

साहित्य संमेलनातील ग्रंथ विक्रीला अत्यल्प प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डोंबिवलीत होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर निवडणूकांच्या रणधुमाळीची संक्रांत ओढवली असताना त्याचा परिणाम ग्रंथ विक्रीवरही झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाची ग्रंथविक्री निम्म्याहून कमी आहे. त्याचा सर्वात जास्त फटका पुण्यातील प्रकाशकांना बसला आहे.

साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनात पुण्यातील एकूण १७२ स्टॉल्स आहेत. राज्यभरातून आलेल्या प्रकाशकांच्या तुलनेत हे स्टॉल्स सर्वाधिक आहेत. गेल्या वर्षी साहित्य संमेलनात झालेल्या विक्रमी ग्रंथ विक्रीमुळे यंदाच्या संमेलनाची ग्रंथ विक्रीही नवा उच्चांक गाठेल, अशा विश्वासाने पुण्यातील काही बड्या प्रकाशकांनी ग्रंथविक्रीची जय्यत तयारी केली होती. मात्र, त्यांच्या तयारीवर पाणी पडल्याची चिन्हे संमेलनात पहायला मिळाली. संमेलनाचे तीनही दिवस संमेलनाकडे नेत्यांनी आणि प्रसिद्ध साहित्यिकांनी पाठ फिरवली. त्यामुळे, साहित्यप्रेमींनीही न येणेच पसंत केल्याने पहिल्या दोन दिवसांमध्ये ग्रंथप्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद अत्यल्प होता. काही मोजक्याच प्रकाशकांच्या स्टॉल्सवर थोड्याप्रमाणात गर्दी होती. संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी मात्र काही प्रमाणात गर्दी वाढली. या दिवशीची विक्री आधीच्या दोन दिवसांचे नुकसान भरून काढू शकली नाही. गंथविक्रीला मिळालेल्या या थंड प्रतिसादामुळे पुण्यातील प्रकाशकांचा भ्रमनिरास झाला. साहित्य संमेलन म्हणजे प्रकाशकांची पुस्तके मोठ्याप्रमाणावर वाचकांपर्यंत पोहोचवण्याची एक संधी असते. संमेलनात व्यवसायही चांगला होतो. यंदा मात्र प्रकाशकांसाठी पुस्तकांची चांगली विक्री हे प्रकाशकांसाठी ‘दिवास्वप्न’ बनून राहिल्याची चिन्हे आहेत.
संमेलनाअंतर्गत घेण्यात आलेले कार्यक्रम, निमंत्रित साहित्यिकांची संख्या, कलाकारांची अनुपस्थिती आणि नेत्यांनी फिरवलेली पाठ अशा अनेक कारणांमुळे जसा संमेलनाला फटका बसला, तसा तो गंथविक्रीलाही बसला असल्याचे प्रकाशकांचे मत आहे. गेल्या अनेक संमेलनांच्या तुलनेत यंदाच्या संमेलनात दर्जेदार कार्यक्रमांची वानवा होती. शिवाय मुख्यमंत्री वगळता संमेलनात कोणीही नेते मंडळी फिरकली नाही. प्रसिद्ध साहित्यिक आणि कलाकारांचीही अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. या सर्व कारणांमुळे साहित्यप्रेमींनीही संमेलनाकडे पाठ फिरवली, त्याचा सर्वात मोठा फटका ग्रंथप्रदर्शनाला बसला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, प्रकाशकांनीही त्याला दुजोरा दिला आहे.

यासंदर्भात मराठी प्रकाशक परिषदेचे रमेश राठिवडेकर म्हणाले, ‘गेल्या वर्षी साहित्य संमेलनात झालेल्या विक्रमी पुस्तक विक्रीमुळे प्रकाशकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. यंदाच्या वर्षीही ग्रंथविक्री विक्रीचा उच्चांक गाठणार, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात तसे घडलेले नसून यंदा प्रदर्शनाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. संमेलनाचे सुरुवातीचे दोन दिवस अत्यंत निराशाजनक होते. समारोपाच्या दिवशी मात्र ग्रंथप्रदर्शनात गर्दी वाढली. अपेक्षेएवढी विक्री झालेली नाही. याउलट काही प्रकाशकांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ग्रंथविक्री निम्म्यापेक्षा कमी झाली.’
...
संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाचा प्रतिसाद घटल्याने पुण्या-मुंबईच्या प्रकाशकांचे अर्थिक नुकसान झाले नाही. मात्र त्यांची निराशा झाली. नागपूर, औरंगाबाद या ठिकाणाहून आलेल्या प्रकाशकांचे आर्थिक नुकसानही झाले आहे. संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी गर्दी झाल्याने थोड्याफार प्रमाणात का होईना, प्रकाशकांना दिलासा मिळाला.
- अनिल कुलकर्णी, कार्याध्यक्ष, मराठी प्रकाशक परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोषारोपपत्रासाठीची आवश्यक कागदपत्र नाहीत

0
0

हायकोर्टाचे निरीक्षण; दोषारोपपत्रात सर्व कागदपत्रे समाविष्ट करण्याची तपास अधिकाऱ्यांना शासनांची तंबी
Shrikrishna.Kolhe@timesgroup.com
...........
@ShrikrishnaMT
पुणे : गुन्हा सिद्ध करण्यास आवश्यक असलेली अनेक कागदपत्रे राज्यातील पोलिसांकडून दोषारोपपत्रामध्ये दाखल केली जात नसल्याची गंभीर बाब कोर्टाच्या निदर्शनास आली आहे. पंचनामा, पोस्टमॉर्टेम व वैद्यकीय अहवाल, कबुली जबाब, ओळख परेड अहवाल या गोष्टी दोषारोपपत्रामध्ये आहेत का, याची खात्री तपास अधिकाऱ्यांनी करावी. या सूचना तपास अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्याव्यात, अशी तंबी विधी व न्याय विभागाने तपास अधिकाऱ्यांना दिली आहे.
एखाद्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांनी केलेला तपास हा महत्त्वाचा असतो. सरकार पक्षाला पोलिसांनी केलेल्या तपासावर अवलंबून राहून कोर्टासमोर युक्तिवाद करावा लागतो. त्याच तपासाच्या आधारे आरोपीला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पण, अलीकडे अनेक घटनांमध्ये फौजदारी प्रकिया संहिता १९७३ कलम १७३ नुसार दोषारोपपत्र दाखल करताना अनेक गोष्टी समाविष्ट केल्या जात नसल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये पोस्टमॉर्टेम अहवाल, वैद्यकीय अहवाल, परिस्थितीजन्य पुरावा, कबुलीजबाब, ओळख परेड या गोष्टीं दोषारोपपत्रात जोडल्या जात नसल्याचे अनेक हायकोर्टाच्या निदर्शनास आले. या गोष्टी दोषारोपपत्रात नसल्याचा फायदा गुन्हेगाराला होतो. त्यामुळे कोर्टाने ही गोष्ट सरकारच्या विधी व न्याय विभागाच्या सचिवांना कळवली असून, त्यांनी यात लक्ष घालावे अशी सूचना केली आहे.
...
आदेश गांभीर्याने घेण्याची तंबी
विधी व न्याय विभागाने ही गोष्ट खूपच गांभीर्याने घेतली आहे. गुन्ह्यात आरोपीला शिक्षा मिळवून देण्यासाठी सरकार पक्षाला अवलंबून राहता येतील, अशा गोष्टी दोषारोपपत्रात ‘सीआरपीसी’नुसार अंतर्भूत कराव्यात. यामध्ये पोस्टमॉर्टेम व वैद्यकीय तपासणी अहवाल, तज्ज्ञांचा अहवाल, अटक, जप्ती, घटनास्थळाचा पंचनामा, ओळख परेड अहवाल आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. या गोष्टी दोषारोपपत्र दाखल करताना सोबत जोडल्या असल्याची खात्री तपास अधिकाऱ्यांनी करावी. असे केल्यास युक्तिवाद करताना सरकार पक्षाची बाजू अधिक मजबूत होईल. त्यामुळे हा आदेश गांभीर्याने घ्यावा, अशी ततंबी विधी व न्याय विभागाच्या सचिवांनी तपास अधिकाऱ्यांना दिली आहे. याबाबतचा आदेश विधी व न्याय विभागाने नुकताच काढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारासाठी जेमतेम १२ दिवस मिळाल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे मुख्यमंत्र्‍यांपासून ते केंद्रीय मंत्र्‍यांपर्यंतची फौजच प्रचारासाठी मैदानात उतरणार आहे. पुढील काही दिवसांत केंद्र किंवा राज्य स्तरावरचा मंत्री अथवा वरिष्ठ नेतृत्वाच्या माध्यमातून सर्व विधानसभा मतदारसंघात जाहीर सभांद्वारे वातावरण अनुकूल करण्याचा निर्धार शहर भाजपने केला आहे.
भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ आज, सोमवारी थेट सिंहगडावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत होणार आहे. मंगळवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस असून, त्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे. केंद्र आणि राज्यात सत्तांतर घडवल्यानंतर आता भाजपला महापालिकेमध्येही परिवर्तन घडवायचे आहे. त्याकरिता, केंद्र-राज्य स्तरावरील ‘स्टार प्रचारकां’ना मैदानात उतरवण्यात येणार असून, मुख्यमंत्र्‍यांसह राज्यातील वरिष्ठ मंत्रीही पुण्यात प्रचाराला येणार आहेत.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर मूळचे पुण्याचे असल्याने भाजपच्या शहरातील प्रचारामध्ये ते सक्रिय असतील. त्यांच्यासह केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू प्रचारात सहभागी होणार आहेत. त्यांच्या खात्याअंतर्गत शहरासाठी गेल्या अडीच वर्षांत घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे.
केंद्राप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील उमेदवारांच्या निवडीमध्ये विशेष लक्ष घातले होते. गेल्या महिन्यात शहराच्या विविध भागांतील विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजेरी लावली होती. आता पुन्हा विविध मतदारसंघात ते प्रचारासाठी येणार आहेत. त्यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याही सभांचे नियोजन करण्याचे काम शहर भाजपतर्फे सुरू आहे.
केंद्रापासून ते राज्य सरकार आणि महापालिकेपर्यंत सत्ता असूनही शहराचे अनेक प्रलंबित प्रश्न राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला सोडवता आले नाहीत, यावरच भाजपच्या प्रचाराचा भर असेल. त्याशिवाय, केंद्रातील मोदी सरकारने आणि राज्यातील फडणवीस सरकारने मेट्रोपासून ते पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणापर्यंतच्या (पीएमआरडीए) अनेक प्रकल्पांवर तातडीने निर्णय घेतल्याची वस्तुस्थिती मतदारांपुढे मांडली जाणार आहेत. शहराच्या अधिक गतिमान विकासासाठी पालिकेतही भाजपला संधी देण्याचे आवाहन पक्षातर्फे प्रचारादरम्यान केले जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली.
.................
जाहीरनामा लवकरच
भारतीय जनता पक्षाचा शहरासाठीचा जाहीनामा अंतिम टप्प्यात असून, येत्या आठवड्यातच तो प्रकाशित केला जाणार आहे. त्याशिवाय, प्रथमच पक्षाने शहरातील सर्व प्रभागांसाठी स्वतंत्र जाहीरनामा तयार केला आहे. सर्व प्रभागांमध्ये एकाचवेळी हा जाहीरनामा प्रकाशित करण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल, असेही स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंधरा नगरसेवक घरी बसणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकीत समोरासमोर निवडणूक लढवून १५ विद्यमान नगरसेवक घरी बसणार आहेत. ४१ प्रभागांपैकी १३ प्रभागांमध्ये पालिकेत विद्यमान असलेले नगरसेवक एकमेकांच्या विरोधात लढणार असून, एका प्रभागात तीन विद्यमानांमध्ये तिरंगी लढत होणार असल्याने २९ विद्यमान नगरसेवकांमध्ये लढत होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या सभागृहात पुन्हा स्थान ‌मिळविण्यासाठी सर्वच विद्यमान नगरसेवकांनी जोरदार ताकद लावली आहे.

डेक्कन जिमखाना, मॉडेल कॉलनी या प्रभाग क्रमांक १४ मध्ये स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब बोडके राष्ट्रवादी काँग्रेसकडून, विद्यमान उपमहापौर मुकारी अलगुडे काँग्रेस, शिवसेनेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राजू पवार यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. याच प्रभागातून शिवसेनेच्या नीता मंजाळकर आणि भाजपच्या नी‌लिमा खाडे यांच्यात लढत होणार असल्याने पाच विद्यमान नगरसेवक या प्रभागातून लढत आहेत. प्रभाग क्रमांक २ फुलेनगर, नागपूर चाळमधून गेले पाच वर्षे राष्ट्रवादीला महापालिकेत पा‌ठिंबा देणारे आरपीआयचे डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि राष्ट्रवादीचे सुनील गोगले यांच्यात लढत होणार आहे. वडगाव शेरी, कल्याणीनगर या प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपचे योगेश मुळीक आणि शिवसेनेचे सचिन भगत एकमेकांच्या समोर लढणार आहेत. प्रभाग ७ मध्ये सर्वसाधारण जागेवर काँग्रेसचे दत्ता बहिरट आणि अपक्ष उमेदवार रेश्मा भोसले, प्रभाग ८ मध्ये काँग्रेसचे कैलास गायकवाड विरुद्ध भाजपचे प्रकाश ढोरे, प्रभाग ९ मध्ये सर्वसाधारण जागेवरून राष्ट्रवादीचे बाबूराव चांदेरे व शिवसेनेचे सनी निम्हण यांच्यात लढत होणार आहे.

बावधन, कोथरूड डेपो या प्रभाग क्रमांक १० मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रभागातून सभागृह नेते बंडू केमसे राष्ट्रवादीकडून आणि मनसेचे किशोर शिंदे एकमेकांसमोर आहेत. प्रभाग क्र. १६ मध्ये ओबीसी प्रवर्गातून भाजपचे गणेश बीडकर आणि अपक्ष रवींद्र धंगेकर, प्रभाग २३ मध्ये ओबीसी महिला प्रवर्गातून राष्ट्रवादीच्या वैशाली बनकर आणि शिवसेनेच्या विजया कापरे, प्रभाग २६ मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून नंदा लोणकर आणि काँग्रेसच्या विजया वाडकर, प्रभाग २९ मध्ये ओबीसी प्रवर्गातून राष्ट्रवादीचे विनायक हनमघर आणि शिवसेनेचे अशोक हरणावळ, प्रभाग ३५ मधून सर्वसाधारण जागेवरून राष्ट्रवादीचे सुभाष जगताप व शिवसेनेचे शिवलाल भोसले; तसेच प्रभाग ४० मध्ये भाजपचे अभि‌जित कदम व मनसेचे वसंत मोरे यांच्यात सरळ लढत होणार आहे. विद्यमान नगरसेवकांमध्ये होणाऱ्या या लढतींमध्ये कोणते उमेदवार पालिकेच्या सभागृहात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगभरातील प्रेमिकांना मावळच्या गुलाबांची भुरळ

0
0

म. टा. वृत्तसेवा, लोणावळा

जगभरातील तरुणाईला उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाइन डे आठवड्यावर येऊन ठेपला आहे. या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. ही फुले पुरवण्यासाठी मावळातील गुलाब फूल उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू झाली आहे. मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी आहे. या वर्षी व्हॅलेंटाइन डेला मावळातून ७० ते ७५ लाख फुलांची निर्यात होणार असून, या कालावधीत मावळात १२ ते १५ कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.

व्हॅलेंटाइन डे अर्थात १४ फेब्रुवारीला देश-विदेशातून गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर मावळातील फूल उत्पादक शेतकरी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कामाला सुरुवात करतो. २० जानेवारी ते १० फेब्रुवारी हा जागतिक बाजारपेठेत फुलांची निर्यात होण्याचा कालावधी असतो. या वर्षी मावळातील गुलाबांच्या निर्यातीला २६ जानेवारीला सुरुवात झाली. या वर्षी पोषक वातावरण असल्याने फुलांच्या उत्पादनवाढीबरोबर दर्जाही उत्तम आहे. औषधांवर नाहक होणारा खर्च पोषक वातावरणामुळे कमी झाला असून, उत्पादन, दर्जा चांगला असल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे; मात्र या वर्षी विदेशी व स्थानिक बाजारपेठेत मागणी घटल्याने शेतकऱ्यांसह उत्पादक कंपन्यांना काहीसा फटका बसणार आहे.

फुलांची प्रतवारी देठाच्या लांबीनुसार ठरवली जाते. स्थानिक व जागतिक बाजार पेठेत ४० ते ६० सेंटीमीटर लांबीच्या फुलांना मोठी पसंती असते. या वर्षी मावळातील फुलांना प्रतवारीनुसार जागतिक बाजारपेठेत एका फुलाला १२ ते १५ रुपये, तर स्थानिक बाजारपेठेत पाच ते आठ रुपये भाव मिळत आहे.

पाचशे एकरवर गुलाब उत्पादन

मावळ तालुक्यातील पवन, आंदर आणि नाणे मावळातील काही शेतकऱ्यांनी ग्रीन हाउसची उभारणी केली आहे. मावळात सुमारे सहाशे एकर क्षेत्रावर फूल उत्पादन घेतले जात असून, त्यापैकी पाचशे एकर क्षेत्रावर फक्त गुलाबांचे उत्पादन होत आहे. उर्वरित शंभर एकर क्षेत्रावर जरबेरा, कार्नेशन, कलर कॅप्सिकम (रंगीत सिमला मिरची) व इतर फुलांचे उत्पादन घेतले जाते. मावळ आणि तळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये एकूण दहा फूल उत्पादक कंपन्या व पॉलिहाउसेस आहेत. यामध्ये एस्सार अॅग्रोटेक, सोयक्स फ्लोरा, इलिगंड फ्रेश, संकल्प फार्म्स, ओरियन एक्स्पोर्ट, साई रोझेस, समृद्धी, जय अंबे, लेक व्हॅली, प्रबोधन फार्म, ग्लोबल अॅग्रोटेक, विक्रम ग्रीनटेक, रुजूल अॅग्रो यांच्यासह पवन मावळातील पवना फूल उत्पादक संघाचा समावेश आहे.

सामूहिक शेतीमुळे भरभराट

पवन मावळात छोटे शेतकरी असल्याने कमी उत्पादन क्षमतेमुळे निर्यात फायदेशीर होत नव्हती. जवळपास स्थानिक बाजारपेठ नसल्याने उत्पादनापेक्षा निर्यातीवरच अधिक खर्च होत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सोसावा लागत होता. यामुळे दोन वर्षापूर्वी पवन मावळातील दहा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक फुलशेतीची कल्पना आखून ती यशस्वीपणे अंमलात आणली आहे. या पवना फूल उत्पादक संघाने पहिल्या वर्षी अवघ्या चार हेक्टर क्षेत्रावर फुलांचे उत्पादन घेतले होते. सध्या सुमारे २० एकरवर गुलाब फुलांचे उत्पादन घेतले जात असून, येत्या दोन वर्षांत त्यांचे ५० एकर क्षेत्रावर उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट आहे. पवना फूल उत्पादक संघाने विदेशात सहा लाख फुलांच्या निर्यातीचे बुकिंग केले असून, स्थानिक बाजारपेठेसह ९० लाख ते सव्वा कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.

......

विविध जातींच्या फुलांना मागणी

व्हॅलेंटाइन डेला मावळातील ‘डच फ्लॉवर’ प्रजातीच्या लाल रंगाच्या टॉप सिक्रेट, बोरडेक्स, फॅशन, सामुराई, कप्परक्लास, ग्रीनगला, फर्स्ट रेड, पिवळ्या रंगाच्या गोल्ड स्ट्राइक, गुलाबी रंगाच्या रिव्हायव्हल,पॉइजन, नारिंगी रंगाच्या ट्रॉपिकल अॅमेझॉन, झाकिरा, पांढऱ्या रंगाच्या अविलॉस या जातीच्या फुलांना दर्जा व टिकाऊपणामुळे जपान, हॉलंड, थायलंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, जपान, दुबई व इथिओपिया या देशांतील आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसह पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, बडोदा, जयपूर, लखनौ, जबलपूर, पाटणा, कोलकाता, भोपाळ, इंदूर, सुरत, हैदराबाद व गोवा या देशांतर्गत बाजारपेठांमध्ये सर्वाधिक मागणी असते. या वर्षी मावळातून विदेशात ७० लाख आणि स्थानिक बाजारपेठांत २० ते २५ लाख फुलांच्या निर्यातीचा अंदाज फूल उत्पादकांनी व्यक्त केला आहे.

...........

‘स्थानिक बाजारपेठांत हवेत गाळे’

‘या वर्षी चांगल्या वातावरणामुळे फुलांचे उत्पादन आणि दर्जा उत्तम असून, फुलांना भावही समाधानकारक मिळत आहे; मात्र या वर्षी मागणीत काही प्रमाणात घट झाल्याने खंत वाटत आहे. पवना फूल उत्पादक संघाच्या वतीने पवन मावळात सध्या सामूहिक फुलशेतीच्या माध्यमातून २० एकर क्षेत्रावर गुलाबांचे उत्पादन घेतले जात असून, येत्या दोन वर्षांत ५० एकरावर गुलाबांचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट आहे; मात्र स्थानिक शेतकऱ्यांना फुलांची साठवण करण्यासाठी पुणे, मुंबईसारख्या स्थानिक बाजारपेठांत गाळ्याची अत्यंत गरज असल्याने आम्ही गाळ्यासाठी संबंधित विभागाकडे मागणी केली आहे. सरकार लवकरच आमच्या मागणीची पूर्तता करेल,’ अशी अपेक्षा पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिस्तबद्ध भाजपचा उमेदवारीत सर्वाधिक घोळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्वांत शिस्तबद्ध पक्ष, असा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने यंदा उमेदवारीबाबत सर्वाधिक घोळ घातला आहे. आयत्यावेळी उमेदवारी बदलण्यापासून ते एकाच ठिकाणी दोन उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ देण्यापर्यंतच्या घटनांमुळे पक्षाच्या व्यवस्थापनामध्ये त्रुटी राहिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, एका बाजूला ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्या (आरपीआय) उमेदवारांना ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढविण्याचा हट्ट धरणाऱ्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनाच काही ठिकाणी चिन्हाशिवाय लढावे लागणार आहे.

येणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची सर्वाधिक संख्या होती. त्यामुळे, उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अर्जासोबत ‘एबी फॉर्म’ देण्याची आवश्यकता असताना, एकाच प्रभागात पक्षाने दोन उमेदवारांना हे फॉर्म दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे, शहरातील पाच प्रमुख प्रभागांमध्ये पक्षाने विचित्र परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. आयत्यावेळी वेगळाच उमेदवार पुढे करण्याच्या धरसोड वृत्तीमुळे दोन ठिकाणी सरळ-सरळ फटका बसला असून, संबंधित प्रभागात कमळाच्या चिन्हावर लढणारा अधिकृत उमेदवारच राहिलेला नाही. पक्षाचा एबी फॉर्म असूनही आता संबंधितांना अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागणार आहे, तर पक्षाला ‘पुरस्कृत उमेदवार’ अशी भूमिका घ्यावी लागणार आहे.

पक्षाने उमेदवारी जाहीर करतानाच, अचानक अनेक बदल केले. उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम मुदत शुक्रवारी संपत असल्याने गुरुवारपासून एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली. परंतु, गुरुवारी रात्री घडलेल्या अनेक घडामोडींनंतर उमेदवारांमध्येच बदल झाले. तत्पूर्वी, फॉर्म नेलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे, पुन्हा अध्यक्षांचे पत्र सादर करून अधिकृत उमेदवार कोण हे स्पष्ट करण्याची वेळ पक्षावर ओढवली. शिस्तबद्ध पक्ष असा दावा करणाऱ्या पक्षाने अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण केल्याने जुने कार्यकर्तेही दुखावले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्याची आत्महत्या मोबाइलवर लाइव्ह

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील पिंपरीगाव येथे ३२ वर्षांच्या एका व्यापाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येआधी मोबाइल व्हिडिओ मोडवर ठेवल्यानं त्याच्या आत्महत्येचं लाइव्ह रेकॉर्डिंग पोलिसांना मिळालं आहे. कर्जबाजारीपणाच्या तणावातून त्यानं हे पाऊल उचललं असावं, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

हरेश पेशवाणी असं मृत व्यापाऱ्याचं नाव असून तो आई-वडील, पत्नी व दोन वर्षांच्या मुलीसह राहत होता. शनिवारी रात्री घरातील सर्वजण बाहेर गेले असताना त्यानं स्वत:ला संपवलं. त्याचे आई-वडील घरी परतल्यानंतर हरेशनं गळफास घेतल्यांचं त्यांना आढळून आलं.

आत्महत्येपूर्वी हरेश भरपूर दारू प्यायला होता. त्यानं सिगारेटही ओढली. त्यानंतर ओढणी पंख्याला बांधली आणि दुसऱ्या टोकानं गळ्याभोवती फास लावला. घटनास्थळी सापडलेल्या मोबाइलमधील लाइव्ह रेकॉर्डिंगवरून पोलिसांनी ही माहिती दिली. 'ही व्हिडिओ क्लिप तब्बल २९ मिनिटांची आहे. हरेशच्या मोबाइलवर पुढचा कॉल येईपर्यंत हे रेकॉर्डिंग तसंच सुरू होतं. त्याच्या मोबाइलवर कॉल येताच हे रेकॉर्डिंग आपोआप सेव्ह झालं. हा मोबाइल फोन पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडं पाठवण्यात येणार आहे,' असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. मुगलीकर यांनी सांगितलं.

हरेशच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, हरेशनं सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. मात्र, धंद्यात तोटा झाल्यानं त्याला नैराश्य आलं होतं. तो दारूच्या आहारीही गेला होता. त्यातूनच त्यानं हा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा बोललं जातंय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकरांना श्रद्धांजलीसाठी अखंड भारताची निर्मिती हवी

0
0

सुनील चिंचोलकर यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुत्ववादी होते, म्हणून त्यांची उपेक्षा करण्यात आली. सावरकरांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल, तर पाकिस्तान नष्ट करून अखंड भारताची निर्मिती करावी लागेल,’ असे वक्तव्य समर्थ साहित्याचे अभ्यासक सुनील चिंचोलकर यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धा समितीतर्फे या स्पर्धेचे महाविद्यालयीन व शालेय स्तरावर आयोजन करण्यात आले होते. यंदा महाविद्यालयीन स्पर्धेत ३५, तर शालेय स्पर्धेत १२५ स्पर्धक सहभागी झाले होते. या समारंभात माजी कुलगुरू डॉ. शं. ना.नवलगुंदकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्र. ल. गावडे, समितीचे अध्यक्ष सु. ह. जोशी, स्पर्धेचे संयोजक किशोर सरपोतदार, शुभा मराठे या वेळी उपस्थित होते. महाविद्यालयीन गटात अथर्व मुळमुळे, मैत्रेयी भावे आणि मिहीर मुळे यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. शालेय अ गटात अजिंक्य गायकवाड, तर ब गटात मीनल गानू आणि आदिती देशमुख यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कनिष्ठ अ गटात मिहीर देशपांडे, तर ब गटात चैत्राली इंदोरे हिने प्रथम क्रमांक पटकावला.

‘सावरकरांची जयंती व पुण्यतिथी सरकार पाळत नाही; मात्र जनतेकडून हे दिवस लक्षात ठेवून उपक्रम आयोजित केले जातात. सावरकरांचे काव्य कळण्यासाठी बुद्धीची उंची वाढवावी लागेल. सावरकरांच्या साहित्यातील स्त्री दुर्बल किंवा अबला नव्हती. ज्याला आज ‘घरवापसी’ म्हणतात, त्या गोष्टी सावरकरांनी तुरुंगातून सांगितल्या. अतिसहिष्णुता हा हिंदू धर्मातील दोष असल्याचे सावरकर म्हणत,’ याकडे चिंचोलकर यांनी लक्ष वेधले.

जोशी म्हणाले, ‘सध्या सावरकरांना चांगले दिवस येत आहेत. एफटीआयआय हा डाव्यांचा अड्डा होता, तिथे आता सावरकरांना ठेवण्यात आलेल्या अंदमान करागृहाची प्रतिकृती उभारण्यात आली. सावरकरांचे विचार जोपासले असते, तर भारत आज खूप पुढे गेला असता. हिंदू राष्ट्र हे सत्य होते, पण आज ते स्वप्न वाटत आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images