Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मधुमेहींसाठी देशी संशोधन

$
0
0

पुण्यातील शास्त्रज्ञांनी गाठला महत्त्वाचा टप्पा

मयुरेश प्रभुणे, पुणे

देशाच्या आरोग्य क्षेत्रासमोरील मोठे आव्हान असणाऱ्या मधुमेहाचे नेमके कारण शोधून त्यावर परिणामकारक उपचार शोधण्याच्या दिशेने पुण्यातील शास्त्रज्ञांनी महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मधुमेह झालेल्या पेशंटच्या पोटातील सूक्ष्मजीवांमध्ये होणारे बदल या संशोधनातून अभ्यासण्यात आले आहेत. मधुमेह झाल्यावर निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर नेमके उपचार करणे यामुळे शक्य होणार असून, भारतीयांना होणाऱ्या मधुमेहाच्या कारणांचाही मागोवा घेता येणार आहे.

मायक्रोबियल कल्चर कलेक्शन (एमसीसी), केईएम हॉस्पिटल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाने संयुक्तरीत्या हे संशोधन केले असून, त्यामध्ये प्राणिशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ. श्रीकांत भुते आणि प्रा. सरोज घासकडबी, ‘एमसीसी’चे संचालक डॉ. योगेश शौचे, ‘केईएम’च्या मधुमेह विभागाचे डॉ. चित्तरंजन याज्ञिक यांचा प्रमुख सहभाग आहे. या संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष नुकतेच ‘फ्रंटायर्स इन मायक्रोबायोलॉजी’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. मधुमेह झाल्यावर रक्तातील साखरेच्या प्रमाणात होणाऱ्या बदलासोबत माणसाच्या पोटात अधिवास असणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या संख्येतही बदल घडू लागतो. शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या या सूक्ष्मजीवांमधील बदलामुळे पेशंटला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

या संशोधनाबाबत डॉ. भुते यांनी महाराष्ट्र टाइम्सला माहिती दिली. ते म्हणाले, ‘केईएम हॉस्पिटलच्या मदतीने आम्ही १४ निरोगी व्यक्ती, तसेच मधुमेहाचे निदान झालेले मात्र उपचार सुरू नसणारे १४ आणि मधुमेहावर उपचार सुरू असणाऱ्या १६ पेशंटच्या विष्ठेचे नमुने तपासले. या अभ्यासातून मधुमेह झालेल्या ज्या पेशंटवर उपचार सुरू झाले नाहीत, अशांच्या पोटातील सूक्ष्मजीवांमध्ये मोठा बदल झाल्याचे आम्हाला आढळून आले. पोटामधील अन्नातून साखर मुक्त करणाऱ्या फर्मीक्यूट प्रकारातील जिवाणूंचे प्रमाण वाढले असतानाच अन्नपचनासाठी मदत करणाऱ्या बॅक्टेरॉइडिट्स प्रकारच्या जिवाणूंचे प्रमाण मात्र कमी झाल्याचे या अभ्यासात दिसून आले.’

‘फर्मिक्यूटच्या वाढलेल्या प्रमाणामुळे त्यांनी अन्नातून मुक्त केलेल्या साखरेचे प्रमाण आणि त्यातून चरबी वाढत जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. बॅक्टेरॉइडिट्सचे कमी झालेले प्रमाण मधुमेहींमधील अन्नपचनात अडथळा निर्माण करू शकते. सूक्ष्मजीवांमध्ये झालेले बदल समजल्यामुळे त्यानुरूप उपचारही भविष्यात शक्य होतील. या अभ्यासात मधुमेहींच्या पोटातील परजीवी आणि बुरशींमध्ये होणारे बदलही अभ्यासण्यात आले आहेत,’ असेही ते म्हणाले.

अशा प्रकारचे संशोधन परदेशातही झाले असून, तेथील मधुमेहींच्या पोटातील सूक्ष्मजीवांमध्ये होणाऱ्या बदलांपेक्षा आपल्याकडील बदल वेगळा असल्याचे या अभ्यासातून प्रथमच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतीय मधुमेही पेशंटवर उपचार करण्यासाठी भारतात झालेल्या संशोधनाचाच यापुढे आधार घ्यावा लागणार आहे.

............

स्वतंत्र संशोधनाची योजना

मधुमेह आणि पोटातील सूक्ष्मजीवांचा परस्परसंबंध अभ्यासताना पुण्यातील नमुने जमा करण्यात आले होते; मात्र भारताच्या विविध प्रदेशातील लोकांचे राहणीमान, तेथील आहारपद्धती निराळ्या असल्यामुळे अशा प्रकारचा अभ्यास देशातील सर्व प्रदेशांसाठी स्वतंत्रपणे करण्याची आवश्यकता ज्येष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांनी व्यक्त केली. मधुमेहामुळे पोटातील सूक्ष्मजीवांमध्ये बदल होतो, की पोटातील सूक्ष्मजीवांमध्ये बदल झाल्यावर मधुमेहाचा धोका वाढतो हे शोधण्यासाठी निरोगी तरुणांच्या एकाच गटाचा पुढील सुमारे पंधरा-वीस वर्षे सतत मागोवा घेऊन त्यांच्या आरोग्याचा अभ्यास करण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विनयभंगाप्रकरणी बसचालक अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उंड्री परिसरातील एका नामांकित इंग्लिश स्कूलमधील चार वर्षांच्या विद्यार्थिनीसोबत स्कूल बसचालकाने लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी बसचालकास अटक केली आहे. त्याने इतर विद्यार्थिंनींसोबतही लैंगिक चाळे केल्याचा संशय आहे.
दिनेश शिवाजी भिंताडे (वय ३०, रा. उंड्री) असे अटक करण्यात आलेल्या स्कूल बसचालकाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने (वय ३३) कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री परिसरात एका इंग्लिश स्कूलमध्ये पीडीत मुलगी शिकते. शाळेतील मुलांना ने-आण करण्यासाठी शाळेच्या बस आहेत. त्यातील एका बसवर आरोपी दिनेश भिंताडे हा चालक म्हणून नोकरी करतो. तर, तक्रारदार यांची चार वर्षांची मुलगी या बसमधून सकाळी शाळेत जाते. २३ जानेवारी रोजी विद्यार्थिनीने आईला भिंताडे हा लैंगिक चाळे करत असल्याचे सांगितले. शाळेतून घरी येताना बसच्या पाठीमागच्या सीटवर आरोपी त्रास देत असून त्याने दोन ते तीन वेळा असा त्रास दिल्याचे तिने सांगितले. हा प्रकार घरी सांगितल्यास डाक रुममध्ये कोंडण्याची धमकीही त्याने तिला दिली होती. २१ ते २३ जानेवारी दरम्यान हा प्रकार घडला असून मुलीने आईकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला.
मुलीने हे सांगितल्यानंतर तिच्या पालकांनी तत्काळ शाळेकडे २३ जानेवारी रोजी तक्रार केली. पण, त्याच्यावर शाळेकडून काहीच कारवाई न झाल्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करून कोंढवा पोलिसांनी तत्काळ बसचालकाला अटक केली आहे. त्याने आणखी काही मुलींसोबत लैंगिक चाळे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे. त्याला कोर्टाने ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

शाळेकडून दुर्लक्ष?
पीडित मुलीच्या पालकांनी घटना समजल्यानंतर २३ जानेवारी रोजीच शाळेकडे बसचालकाविरोधात तक्रार केली होती. पण, त्यानंतर चालकावर शाळेकडून कारवाई झाली नाही. शा‍ळेने पोलिसांकडेही तक्रार केली नाही. त्यामुळे अशा घटनांबाबत शाळा किती गंभीर आहेत, हा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​क्रेन अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

$
0
0

पिंपरी : बांधकाम साइटवरील क्रेनची उंची वाढवत असताना क्रेन नादुरुस्त झाल्याने खाली पडली, यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवार (४ फेब्रुवारी) दुपारी अडीचच्या सुमारास हिंजवडी फेज तीन येथे घडली.
रवींद्र प्रधान (वय २३) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. उर्वरित जखमींवर पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज तीनमध्ये ईवॉन या इमारतीचे बांधकाम सुरू होते. शनिवार दुपारी कामगार काम करत होते. त्या वेळी क्रेनची उंची वाढवत असताना क्रेन अचानक नादुरुस्त झाली. त्यामुळे तोल जाऊन ती खाली पडली. खाली काही कामगार काम करत होते. त्यांच्या अंगावर क्रेन पडल्याने त्यामधील चार ते पाच जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोन जण गंभीर जखमी होते. त्या पैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इन्फोसिसकडून सुरक्षेबाबत उपाययोजना जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सुरक्षारक्षकानेच गळा आवळून कर्मचाऱ्याची हत्या केल्यानंतर इन्फोसिसने आपल्या सुरक्षाव्यवस्थेचा नव्याने आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेचे बाह्य यंत्रणेकडून ऑडिट केले जाणार असून कर्मचाऱ्यांसाठीच्या वर्क फ्रॉम होम सुविधेत वाढ करण्यात येणार आहे.

रसिला राजू ओपी हिच्या हत्येबाबत इन्फोसिसने दुःख व्यक्त केले आहे. तसेच तिच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचेही कंपनीच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच त्यात अतिरिक्त सुरक्षा उपायांची माहिती देण्यात आली आहे.

जिथे फक्त एक व्यक्ती काम करत आहे, अशा गोष्टींचा पुनर्विचार करून कोणीही एकट्याने काम करणार नाही, याची दक्षता कंपनीकडून घेतली जाणार आहे. गरजेनुसार अतिरिक्त सुरक्षारक्षक (महिला सुरक्षारक्षकांसहित) नियुक्त करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सुरक्षारक्षकांकडून कामाच्या ठिकाणी घालण्यात येणाऱ्या गस्तीची वारंवारिताही वाढविण्यात येईल.
ज्या ठिकाणी घरून किंवा बाहेरून काम करणे शक्य असेल, अशा ठिकाणी वर्क फ्रॉम होम सुविधा देण्यात येईल. सुरक्षिततेसाठी इमारतीत अनेक ठिकाणी पॅनिक बटन बसविण्यात येतील. तसेच रॅपिड रिस्पॉन्स टीमही तैनात केल्या जातील.

बाह्य एजन्सीकडून कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेचे पूर्ण ऑडिट करून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलिसांशी सल्लामसलत करून अन्य उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. सुरक्षेसंदर्भात काही सूचना असल्यास त्या कळविण्याचे आवाहन कंपनीकडून सर्व कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे.

‘इन्फोसिस’तर्फे सर्व केंद्रांवर चोवीस तास कार्यरत असणारी हेल्पलाइन चालविण्यात येते. त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांकडे इन्फोसिस इमर्जन्सी अॅप हे मोबाइल अॅप्लिकेशन पूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. कोणत्याही केंद्रावर अनधिकृत व्यक्तीला प्रवेश करता येणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र सुरक्षा समिती नेमण्यात आली आहे. तसेच कंत्राटी स्वरूपात भरती केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चारित्र्य पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना स्वसंरक्षणाचे धडेही देण्यात येत आहेत.

सुरक्षेची बाब लक्षात घेता सर्व कर्मचाऱ्यांना रात्री आठ वाजेपर्यंत कार्यालयातून बाहेर पडण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. महिला कर्मचारी रात्री आठनंतर कार्यालयातून बाहेर पडणार असल्यास त्यांना घरापर्यंत सोडण्यासाठी वाहनव्यवस्था करण्यात येत असल्याचेही पत्रकात नमूद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमडीएस’ विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
तीन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ‘एमडीएस’च्या सुमारे ४६ दंतचिकित्सक डॉक्टर विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ आणि एम. ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजच्या प्रवेशासंदर्भातील वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. परीक्षा उत्तीर्ण होऊनही अद्याप त्यांना पदवी प्रमाणपत्र प्राप्त झाले नसल्याने हातातील नोकऱ्याही गमवाव्या लागल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
‘बीडीएस’ ही दंतवैद्यकशास्त्रातील पदवी पूर्ण करून ‘एमडीएस’ या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी २०१४ मध्ये सुमारे ४६ विद्यार्थ्यांनी एम. ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर गेल्या तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. कॉलेजचे शुल्कही भरले. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या तीन वर्षांच्या परीक्षा घेण्यात आल्या. तसेच त्या परीक्षा देऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाही देण्यात आल्या. परंतु, पदवी प्रमाणपत्र दिले नाही. यासंदर्भात विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून वाद सुरू झाला होता. त्या वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून अनेकांना ‘एमडीएस’चे पदवी प्रमाणपत्र नसल्याने नोकऱ्या मिळत नाहीत’, अशा शब्दांत एमडीएसच्या डॉक्टर विद्यार्थ्यांच्या पालकांनी ‘मटा’कडे तक्रारी केल्या.
‘एमडीएस’चे पदवी प्रमाणपत्र मिळाले नसल्याने डेंटल कौन्सिलकडे त्याची नोंदणी करता येत नाही. त्याशिवाय ‘बीडीएस’ पदवीचे प्रमाणपत्र, दहावीचे प्रमाणपत्र, शाळा- कॉलेज सोडल्याचे दाखलेदेखील कॉलेजने ठेवून घेतले आहेत. प्रवेशावेळी घेतलेली कोणतीही कागदपत्रे विद्यार्थ्यांना कॉलेजकडून देण्यात आली नाहीत. या वादामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधातरी आहे. त्याशिवाय अनेकांना देशभरात अथवा परदेशात नोकरीची संधी असूनही जाता येत नाहीये, अशी खंत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
कॉलेजकडे यासंदर्भात विचारणा केल्यानंतर ‘विद्यापीठाकडे जाऊन तक्रार करा आणि पदवी प्रमाणपत्र मिळवा’, असा सल्ला कॉलेजच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. तर विद्यापीठाकडे विचारल्यास ‘कॉलेजशी संपर्क साधावा’, अशी सूचना केली जात आहे. दोन्हीकडून विद्यार्थ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
या संदर्भात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे. मात्र प्रमाणपत्र का मिळाले नाही हे तपासून पाहावे लागेल.’
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. के. डी. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, ‘एमडीएस’च्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र हे मे मध्ये होणाऱ्या समारंभात दिले जाईल. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील काही गुंता असेल तर त्यासंदर्भात निर्णयाचे अधिकार प्रवेश नियंत्रण समितीकडे आहेत. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यास पुढची प्रक्रिया होऊ शकते. याबाबत अधिक माहिती घेऊ,’ असे त्यांनी सांगितले.

रंगूनवाला डेंटल कॉलेजच्या २०१४-१५पासून पुढील तीन वर्षांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आरोग्य विद्यापीठाकडून आम्हाला हरकत घेण्यात आली होती. त्याबाबत आम्ही हाय कोर्टात धाव घेतली. आमच्या बाजूने निकाल देताना विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत. तसेच त्यांची परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावेत, असे आदेश कोर्टाने दिले होते. आता आदेशानुसार प्रवेश, परीक्षा आणि निकालही जाहीर झाले आहेत. मग विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना द्यायला हवे. पण ते दिले जात नसल्याने पुन्हा आम्हाला कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आली आहे.
- पी. एन. इनामदार, अध्यक्ष महाराष्ट्र कॉस्मोपोलेटिन एज्युकेशन सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गंधर्वाकार’मध्ये बालकलाकारांचे सादरीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गायन, वादन आणि साहित्य या कलांची आवड शालेय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी कार्यरत असणाऱ्या ‘आकार’ संस्थेतर्फे येत्या ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत ‘गंधर्वाकार’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ‘बालगीतरामायण’, ‘स्वतंत्रते भगवती’ आणि ‘अभंगरंग’ असे तीन कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर इथे दररोज संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत होणार आहेत.
‘महाराष्ट्र टाइम्स’ या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे. कार्यक्रमाच्या प्रत्येक दिवशी पं. उपेंद्र भट, शरद पोंक्षे, आनंद माडगूळकर, सावनी शेंड्ये, कॅ. नीलेश गायकवाड, अभिजित खांडकेकर उपस्थित राहणार आहेत. ‘बालगीतरामायण’ या उपक्रमात मूळ गीतरामायणातील कथानुरूप बारा गीतांचा समावेश करण्यात आला आहे. ‘स्वतंत्रते भगवती’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या निवडक कविता मुले सादर करणार आहेत; तर ‘अभंगरंग’मध्ये वेगवेगळ्या संतांनी लिहिलेल्या बारा अभंगांचा समावेश असेल. गायन, वादन, निवेदन आणि नृत्य सारे काही मुलांचेच असे या ‘आकार’च्या कार्यक्रमाचे स्वरूप असते.
संगीतशिक्षिका म्हणून काम करणाऱ्या चित्रा देशपांडे यांनी ‘आकार’ ही संस्था सुरू केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून शालेय मुलांमध्ये संगीत-साहित्याची गोडी निर्माण होण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. वर्षागणिक होणाऱ्या कार्यक्रमांसाठी विविध शाळांतील मुले ऑडिशनमधून निवडली जातात आणि त्यांचे दिग्दर्शन करून देशपांडे तो कार्यक्रम रंगमंचावर आणतात. ‘आकार’च्या उपक्रमांना भारतात आणि भारताबाहेरही प्रतिसाद मिळत असून, २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान मुले अंदमानला जाणार आहेत. तिथे अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलनात ही मुले ‘स्वतंत्रते भगवती’ हा कार्यक्रम सादर करतील.
या महोत्सवासाठी प्रवेशमूल्य आहे. मटा ‘कल्चर क्लब’च्या सदस्यांना यामध्ये सवलत मिळेल. त्यासाठी ‘मटा’च्या कार्यालयात संपर्क साधावा. हा महोत्सव इतर रसिकांसाठीही खुला असून त्यासाठीची तिकीटविक्री टिळक स्मारक मंदिर इथे सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंडोबा थंडोबा होणार का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उमेदवारी देण्याबाबत अंधारात असलेल्या इच्छुकांनी भरून ठेवलेले उमेदवारी अर्ज मागे घेणे, ही आता सर्वच राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरली आहे. पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजांची मनधरणी करण्यास सुरुवात केली असली, तरी हे बंडोबा थंडोबा होणार का, याचा फैसला अद्याप झालेला नाही. दरम्यान, ए-बी फॉर्ममध्ये पक्षांनी घातलेला घोळ आणि अर्जांतील त्रुटी यांमुळे काही उमेदवार छाननीमध्येच लढतीतून बाहेर गेले आहेत.

काही राजकीय पक्षांनी एकाच प्रभागात दोघा उमेदवारांना ए-बी फॉर्म दिले. त्यामुळे शनिवारी दिवसभर छाननीमध्ये त्यावरच सुनावणी सुरू होती. आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेश्मा भोसले यांनी भाजपची उमेदवारी मिळविली होती. मात्र, याच प्रभागात दोन ए-बी फॉर्म झाल्यामुळे दोन्ही उमेदवार अपक्ष ठरले असून, या प्रभागातील त्या गटात कमळ चिन्ह दिसणार नाही. तसेच, अर्जातील त्रुटींमुळे काँग्रेसचे माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांचा अर्ज बाद ठरला. रात्री उशिरापर्यंत सर्वच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये छाननीदरम्यान हे नाट्य सुरू होते.

दरम्यान, प्रमुख पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत समाप्त होईपर्यंत उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या नव्हत्या. मात्र, इच्छुकांनीही चलाखी करून अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल करून ठेवले आहेत. त्यामुळे ही बंडखोरी रोखण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी इच्छुकांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप प्रमुख इच्छुकांनी त्यांना दाद दिलेली नाही. माघारीची मुदत समाप्त होईपर्यंत हे समजूत काढण्याचे काम नेत्यांना करावे लागणार आहे. उमेदवारी निश्चित करण्यास पक्षांनी प्रचंड विलंब लावल्यामुळे मोठ्या प्रभागात नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत कमी मुदत मिळाली आहे. त्यामुळे आज, प्रचाराच्या पहिल्या रविवारी अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून प्रचाराचे नियोजन उमेदवारांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोसले, बहिरटांचा उमेदवारी अर्ज रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रेश्मा अनिल भोसले यांची भाजपची उमेदवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केली. या शिवाय सतीश बहिरट यांचीही भाजपची उमेदवारी रद्द झाली असून, आता हे दोघेही अपक्ष म्हणून रिंगणात असतील.
दरम्यान, रेश्मा भोसले यांनी या निर्णयाविरोधात निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्योत्स्ना सरदेशपांडे आणि ज्योत्स्ना एकबोटे यांच्याबाबतचा निर्णयही उशिरापर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. सायंकाळी उशिरा बहिरट आणि भोसले या दोघांचीही भाजपकडची उमेदवारी रद्द झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी गर्दी केली. तणाव वाढू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निर्णय जाहीर होताच बहिरट यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, तर भोसले यांच्या गोटात तणावाचे वातावरण पसरले होते.
बहिरट यांचा अर्ज छाननीला आला असताना भोसले यांचे प्रतिनिधी असलेल्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला. आमच्या उमेदवाराकडे एबी फॉर्म आणि पक्षाध्यक्षांचे पत्रही आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, सहा जानेवारी २००७ रोजीच्या एका सरकारी अध्यादेशाचा दाखलाही त्यांनी दिला. मात्र, त्यानुसार प्रदेशाध्यक्षांची सही असलेले पत्र हवे, अशी मागणी बहिरट यांनी केली. भोसले यांच्या वकिलांनी अध्यादेश वाचून दाखविले. त्यामध्ये पक्षाचे पत्र असे म्हटलेले असून कुठेही प्रदेशाध्यक्षाचे पत्र असे म्हटलेले नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी सायंकाळपर्यंत निर्णय राखून ठेवला. सायंकाळी उशिरा पांगारकर यांनी दोघांचीही भाजपकडून उमेदवारी रद्द ठरविल्याने वातावरण तंग झाले होते.
शनिवारी दिवसभर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात मोठी गर्दी होती. तीन दिग्गज उमेदवारांच्या बाबतीत एबी फॉर्मचा गोंधळ झाल्याने या क्षेत्रीय कार्यालयाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सर्वच उमेदवारांनी समर्थकांसहित गर्दी केली होती. प्रसारमाध्यमांनाही आत प्रवेश दिला जात नव्हता.
‘हा निर्णय म्हणजे धननिष्ठेचा नव्हे तर एकनिष्ठतेचा विजय आहे. पूर्वी एबी फॉर्म देऊन आयत्यावेळी भोसले यांना फॉर्म दिला. परंतु, आता अपक्ष म्हणून लढून भाजपचेच पॅनेल निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे,’ अशी प्रतिक्रिया बहिरट यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​‘फ्रॉड’साठी डोमेन विक्री करणारे दोघे अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बनावट कंपनी उघडून नायजेरियातील व्यक्तींना ‘डोमेन’ची विक्री करणाऱ्या पंजाब येथील कॉल सेंटरचा सायबर सेलने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे. या आरोपींनी आतापर्यंत चाळीस हजार डोमेनची नायजेरीतील व्यक्तींना विक्री केली असून त्याच्या मदतीने देशभरातील अनेक जणांना नायजेरीयन गुंडांनी गंडविल्याचे समोर आले आहे.
हरगुरुनाज करमसिंग विजयसिंग (वय २०), परभनाज करमसिंग विजयसिंग (वय २५, दोघेही रा. जालंधर, पंजाब) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हरगुरुनाज याचे बीसीए झाले असून त्याचा भाऊ बारावी शिकला आहे. २००८ साली आरोपींनी बनावट कंपनी स्थापन करून डोमेन विक्रीतून जवळजवळ एक कोटी रुपये कमविल्याचे तपासात निष्पन्न होत आहे, अशी माहिती सायबर सेलचे पोलिस उपायुक्त दीपक साकोरे व वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.
मुंढवा परिसरातील अजयकुमार ठाकूर हे चीन येथील एका कंपनीला दहा टक्के रक्कम आगाऊ देऊन कच्चा माल खरेदी करतात. त्या मालाच्या आधारे वजनकाटे तयार करून देशभर विकतात. एका ईमेल आयडीवरून ठाकूर यांनी त्या कंपनीला ऑक्टोबर २०१६ मध्ये ७२ हजार अमेरिकन डॉलरची ऑर्डर दिली होती. त्यासाठी त्यांनी दहा टक्के रक्कम भरली. पण, त्यांना पुन्हा तीस टक्के रक्कम मागण्यात आली. त्यांना संशय आल्याने ठाकूर यांनी कंपनीला फोन करून विचारणा केली. त्या वेळी त्यांनी अशी मागणी केली नसल्याचे सांगितले. त्या वेळी त्यांना मेल आयडी हॅक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सायबर सेलकडे तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास सायबर सेलच्या राधिका फडके व सहायक निरीक्षक सचिन गवते यांच्या पथकाने सुरू केला. त्या वेळी हा गुन्हा नायजेरियातून झाल्याचे आढळून आले. यामध्ये अधिक तपास केल्यानंतर गुन्ह्याचा डोमेन भारतातील असल्याचे समजले. त्यानंतर वरील आरोपी जाळ्यात सापडले. या आरोपींकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी स्वतःची आयडीयाबीझ नावाची डोमेनची बनावट कंपनी सुरू करून ती कंपनी नायजेरियातील असल्याचे दाखविले. पब्लिक डोमेन रजिस्टर या अधिकृत कंपनीचे ‘रीसेलर’ म्हणून दोघे काम करत होते. या बनावट कंपनीच्या मार्फत त्यांनी चाळीस हजार बनावट डोमेन रजिस्टर केल्याचे आढळून आले, अशी माहिती साकोरे यांनी दिली.

गेल्या वर्षात दहा कोटींचे फ्रॉड
इन्शुरन्स फ्रॉड, जॉब फ्रॉड, लॉटरी फ्रॉड, टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स फ्रॉड, सीडस् फ्रॉड, ऑनलाइन बिझनेस फ्रॉड हे नायजेरियन फ्रॉडचे प्रकार आहेत. पुण्यात गेल्या वर्षभरात फसवणुकीचे ३९१ अर्ज सायबर सेलकडे आले आहेत. यामध्ये जवळजवळ दहा कोटींची फसवणूक झाली आहे. या गुन्ह्यातील आरोपींनी विकलेल्या चाळीस हजार डोमेनच्या विक्रीतूनच पुण्यातील हे गुन्हे झालेत का, याचा तपास सायबर सेलकडून केला जाईल, असे पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाक्षरी अभावी झाला शिवरकरांचा अर्ज बाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उमेदवारी अर्ज छाननीत कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील १३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामध्ये माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकरांचे चिरंजीव आणि माजी नगरसेवक अभिजित शिवरकर, शिवसेनेचे उमेदवार जान मोहंमद आणि भारतीय जनता पत्र-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युतीचे यादव हरणे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.
कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक २४, २५ आणि २६ मधील एकूण १३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. रामटेकडी-सय्यदनगर (२४) या प्रभागात एकूण ३६ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी सहा जणांचे अर्ज बाद झाले. त्यामध्ये शिवसेनेचे जान मोहंमदत आणि पाच अपक्षांचा समावेश आहे. वानवडी (२५) प्रभागातील एकूण २६ उमेदवारांपैकी पाच जणांचे अर्ज बाद झाले. त्यामध्ये अभिजित शिवरकर आणि चार अपक्षांचा समावेश आहे. तर, महमंदवाडी-कौसरबाग (२६) प्रभागात ३० पैकी दोन उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. शिवरकर यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर सही नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. यावेळी बाळासाहेब शिवरकर यांनी वकिलामार्फत कायदेशीर बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न फोल ठरले. महमंदवाडी-कौसरबाग प्रभागात फारूक इनामदार यांनी शिवसेनेचे प्रमोद भानगिरे व भाजपचे संजय घुले यांच्या अर्जाबाबत आक्षेप नोंदविला होता. मात्र, तांत्रिकदृष्ट्याचा त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला.

काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद
औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येत असलेल्या बाणेर, बालेवाडी, पाषाण (प्रभाग क्रमांक ९) मधील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार स्वाती सूर्यवंशी यांचा अर्ज छाननीत बाद झाला. सूर्यवंशी यांनी अर्जाबरोबर जात पडताळणी प्रमाणपत्र जोडले नसल्याने त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविला. बोपोडी,औंध (प्रभाग ८) मधील काँग्रेसचे उमेदवार कैलास गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याच्या निकालाबाबत राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक मुरकुटे यांनी आक्षेप घेतला, मात्र या अर्जाला पुरावे जोडले नसल्याने हा अर्ज माघारी घेण्यात आला. छाननीमध्ये प्रभाग क्रमांक ८ मधून ७२ तर प्रभाग ९ मध्ये ५५ अर्ज पात्र ठरले आहेत.

९१ उमेदवार भिडणार
पुणे : कोथरूड क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रभाग क्रमांक १०, ११ आणि १२ मधून प्रमुख पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारांनी भरलेल्या अर्जांची शनिवारी छाननी झाली. या तिन्ही प्रभागात मिळून ९१ उमेदवारांनी १०५ अर्ज दाखल केले. तिकीट न मिळाल्याने कोथरूडमध्ये शुक्रवारी सकाळी काही उमेदवारांनी अचानक पक्षांतर करून वेगळ्या पक्षातून अर्ज भरले. शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म आणि इतर कागदपत्रे देण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू होती.

सरस्वती शेंडगेंना लॉटरी
पुणे : नवी पेठ-पर्वती प्रभागात अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव जागेवर दोन ‘एबी फॉर्म’ दिल्याने झालेल्या गोंधळात अखेर भारतीय जनता पक्षाच्या सरस्वती शेंडगे यांचा अर्ज वैध ठरला. त्यामुळे, मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय) जागा सोडूनही या प्रभागातून भाजपचाच उमेदवार रिंगणात असेल. पक्षाने शेंडगे यांना माघार घेण्यास सांगितले, तर सत्यभामा साठे भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून लढतील. येत्या दोन दिवसांत त्याबाबतचा निर्णय होईल. कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तीन प्रभागांतून एकूण १७८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १४५ अर्ज वैध ठरले असून, ३३ अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान, शनिवार पेठ-सदाशिव पेठ प्रभागातील मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील-ठोंबरे यांनी भाजपच्या उमेदवार गायत्री खडके-सूर्यवंशी यांच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेतला. उमेदवार यादीत खडके यांचे दोन ठिकाणी नाव असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्याची मागणी त्यांनी केली.

तणाव अन् कार्यकर्त्यांचा संताप
पुणे : कोंढवा खुर्द - मिठानगर या प्रभाग क्रमांक २७ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रईस सुंडके यांचा अर्ज शौचालयाचे प्रमाणपत्र नसल्याच्या कारणास्तव बाद ठरविण्यात आला. त्यानंतर उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी म्हणणे मांडल्यानंतर सायंकाळी उशिरा त्यांचा अर्ज वैध ठरला. या प्रभागातील कॉँग्रेसचे उमेदवार उस्मान तांबोळी, प्रभाग क्रमांक ३७ मधील कॉँग्रेसचे उमेदवार विजय मोहिते यांचे देखील अर्ज अवैध ठरविण्यात आले. प्रभाग क्रमांक २७ मधील उमेदवारांची छाननी सुरू झाली. त्यावेळी काँग्रेसचे उस्मान तांबोळी यांनी जातपडताळणी प्रमाणपत्राची पोचपावती जोडली नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविला. त्यावेळी तांबोळी स्वतः गैरहजर होते. काही वेळानंतर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार चव्हाण, अंकुश काकडे यांनी सुंडके यांचा अर्ज ग्राह्य धरण्यासाठी लेखी अर्ज दिला. ‘सात दिवसांत अर्जासोबतची कागदपत्रे जोडण्याची मुदत असते. तरीही निवडणूक निर्णय अधिकारी अर्ज कसे अवैध करू शकतात’, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.

२४ उमेदवारांचे अर्ज बाद
टिळकरोड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक ३० (दत्तवाडी जनता वसाहत), प्रभाग क्रमांक ३३ (वडगाव बुद्रुक धायरी) आणि प्रभाग क्रमांक ३४ (हिंगणे खुर्द सनसिटी) या प्रभागांतील १५० उमेदवारांपैकी २४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामध्ये चार अपत्य असल्याने अपक्ष उमेदवार तानाजी ताकपेरे यांचा समावेश आहे. भाजपचे उमेदवार, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप आणि हरिदास चरवड यांच्या कुणबी जातीच्या प्रमाणपत्रावर घेतलेला आक्षेप फेटाळण्यात आल्याने त्यांचे अर्ज वैध ठरले आहेत. मनसेचे नगरसेवक राहुल तुपेरे यांनी जातीचे प्रमाणपत्र सादर केल्याने त्यांचा अर्ज वैध ठरला. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव आणि रवि पवार यांनी अर्जाची छाननी केली. १५० उमेदवारांपैकी २४ जणांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे १२६ जण रिंगणात राहिले आहेत.

शिवसेना, मनसेला फटका
अखेरच्या दिवशी घाईघाईने उमेदवारी अर्ज सादर केल्याने अनेक उमेदवारांचे अर्ज शनिवारी छाननीमध्ये बाद झाले. येरवडा क्षेत्रीय कार्यालयात एकूण ३२ उमेदवारांचे तर नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातून ५१ अर्ज बाद झाले. अनेक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अनुमोदक, सूचक व स्वतःची सही व केल्याने तसेच आवश्यक कागदपत्रे न जोडल्याने अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजित देशमुख यांनी दिली. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (शुक्रवारी ) येरवडा क्षेत्रीय कार्यालयात २३१ अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले होते.त्यामुळे एकूण २७५ अर्ज जमा झाले होते.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शनिवारी केलेल्या छाननीत विविध कारणांमुळे सुमारे ३२ उमेदवारांचे अर्ज बाद झाले.यामध्ये प्रभाग १ मधून शिवसेनेकडून निवडणूक लढविणारे चेतन चव्हाण, प्रभाग २ मधून विद्यमान नगरसेविका सुनंदा देवकर, योगिता शिर्के, मनसेचे राजकुमार ढाकणे, यांचा समावेश आहे.

राज्यमंत्र्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये तणाव
प्रभाग क्रमांक २० मधील भाजपच्या उमेदवार कल्पना बहिरट यांचे जातप्रमाणपत्र यापूर्वीच्या निवडणुकीत रद्द करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली. कार्यालयात कोणालाही सोडण्यात येत नव्हते. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि अभय छाजेड यांनाही रोखण्यात आले. कल्पना बहिरट यांच्या अर्जावर सुनावणी सुरू झाल्यावर राज्यमंत्री दिलीप कांबळे कार्यालयात जाण्यासाठी आले. त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. अखेर कांबळे यांना पुन्हा खाली येणे भाग पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएसएनएल ‘सुसाट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
खासगी दूरसंचार कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) ‘फायबर टू द होम’ (एफटीटीएच) या योजनेचा विस्तार करण्यासाठी पावले उचलली आहेत. योजनेतून ग्राहकांना १०० एमबीपीएसच्या सुसाट वेगाने इंटरनेट वापरता येणार आहे. त्यामुळे अवघ्या काही सेकंदात एखादा चित्रपट अथवा मोठी फाइल डाऊनलोड करता येईल. एवढेच नव्हे; तर योजनेचा विस्तार करण्यासाठी बीएसएनएल थेट बांधकाम व्यावसायिकांशी अथवा फ्लॅटधारकांच्या समूहाशी करार करण्यासाठी इच्छुक आहे. यातून होणारा नफा दोघांमध्ये वाटून घेण्यात येईल.
पुणे विभागाचे सरव्यवस्थापक डी. सी. द्विवेदी आणि विपणन सरव्यवस्थापक यांनी ही शुक्रवारी माहिती दिली. या योजनेत बीएसएनएसने कॉपरऐवजी फायबर ऑप्टिक केबलचा वापर केला आहे. गेल्या काही महिन्यांत पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सुजय गार्डन, लेकविस्टा, व्यंकटेश क्षितीज, निर्मल टाऊनशिप आदी सोसायट्यामंध्ये ही योजना सुरू झाली. आता या योजनेत सोसायट्यांशी किंवा बांधकाम व्यावसायिकांशी करार करण्यात येईल. त्यामध्ये इमारतीमध्ये व परिसरात फायबर ऑप्टीक केबल तसेच इंटरनेटच्या सुविधेसाठी आ‍वश्यक त्या उपाययोजना करायच्या आहेत. त्यानंतर सोसायटीमध्ये फ्लॅटधारकांनी अथवा बांधकाम व्यावसायिकाने १० वर्षांसाठी बीएसएनएलशी करार करून एफटीटीएचचा लाभ घ्यायचा आहे, असे द्विवेदी यांनी यांगितले.
ग्राहकांना याद्वारे विविध प्लऐनमध्ये ठराविक रक्कमेत २, ४, ४०, ६०, ८० आणि १०० एमबीपीएसच्या वेगाने इंटरनेट वापरता येईल. या योजनेत महिन्याला ४९९९ रुपयांत २ हजार जीबी डेटा (१०० एमबीपीएस), ३९९९ रुपयांत १ हजार जीबी डेटा (८० एमबीपीएस), २९९९ रुपयांत ७५० जीबी डेटा (६० एमबीपीएस), १९९९ रुपयांत ५०० जीबी डेटा (४० एमबीपीएस), ११९९ रुपयांत २ एमबीपीएस अनलिमिटेड डेटा व कॉलिंग, ६४५ रुपयांत १० जीबी डेटा (४ एमबीपीएस ) असे प्लॅन दिले आहे. सरकारी कार्यालयात हे प्लॅन सुरू झाले आहे. दरम्यान, महापालिकेच्या नियमांमुळे खोदाई करून केबलची वेळेत दुरुस्ती करण्यास अडचणी येतात. त्यामुळे ग्राहकांना विनाअडथळा सेवा देता येत नाही, असे द्विवेदी यांनी सांगितले.

‘मोबी कॅश’ अॅपची निर्मिती
बीएसएनएलने ‘आधारकार्ड’शी लिंक करत नवीन ग्राहकांना कनेक्शन देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सर्व अधिकृत डीलर्सना केवायसी मशिन्स पुरविण्यात आल्या आहेत. तसेच, डीलर्स व रिटेलरच्या मदतीसाठी आणि अधिक उत्पन्नासाठी एसबीआय बँक व बीएसएनएलने ‘मोबी कॅश’ या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या अ‍ॅपद्वारे मनी ट्रान्स्फरपासून रिचार्जपर्यंतची कामे करता येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ काँग्रेसचे पाच अर्ज बाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

छाननीमध्ये अर्ज बाद करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी उमेदवाराला सुनावणीसाठी वेळ देण्याची मागणी फेटाळल्याने काँग्रसने वरिष्ठ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. दरम्यान, काँग्रेसचे पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. अप्पर इंदिरानगर, मार्केट यार्ड, लोहियानगर, कोंढवा खुर्द आणि वानवडी येथील काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.काँग्रेसचे प्रभाग क्रमांक ३७ अप्पर इंदिरानगर येथील उमेदवार विजय मोहिते, प्रभाग क्रमांक २५ वानवडी येथील अभिजित शिवरकर, प्रभाग क्रमांक ३६ मार्केट यार्ड-इंदिरानगर येथील अपर्णा सोनकांबळे, प्रभाग क्रमांक १९ लोहियानगर-कासेवाडी येथील सुनीता लडकत आणि कोंढवा खुर्द मीठानगर प्रभाग क्रमांक २७ या ठिकाणी उस्मान तांबोळी या पाचजणांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यापैकी सोनकांबळे आणि लडकत यांचा अर्ज बाद करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सुनावणीची संधी द्यावी, असे विनंती प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांनी केली होती.भवानी पेठ आणि सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेसची सुनावणीची विनंती अमान्य केली. या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद मागितल्याची माहिती छाजेड यांनी दिली. सोनकांबळे आणि लडकत यांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान देऊन त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. दोघींचेही जात प्रमाणपत्र लग्नापूर्वीचे आहे. त्यांच्या लग्नानंतरच्या नावावर आक्षेप घेऊन अर्ज बाद करण्यात आले. दोघींनीही लग्न झाल्याचे पुरेसे पुरावे दिल्यानंतरही अर्ज बाद झाला.या दोन्हीही क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे काँग्रेसने सुनावणीसाठी वेळ मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली. कायद्यानुसार एखाद्या उमेदवाराने सुनावणीसाठी वेळ मागितली तर, त्याला ती देण्यात यावी. अर्ज माघार घेण्याच्या तारखेच्या दिवशी सकाळी अकरापर्यंत सुनावणी घ्यावी, अशी कायद्यात तरतूद असताना अधिकाऱ्यांची मनमानी उमेदवारांना त्रासदायक ठरत असल्याचा आरोप छाजेड यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमध्ये बंडखोरी होणार नाही

$
0
0

बापट यांचा दावा; प्रचारात शिवसेनेवर टीका करणार नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘उमेदवारी न मिळाल्याने भारतीय जनता पक्षातील काही इच्छुकांमध्ये नाराजी आहे. मात्र, त्यांची नाराजी दूर करण्यात आम्हाला यश येत आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही प्रभागात भाजपमध्ये बंडखोरी होणार नाही,’ असा दावा पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी केला. शिवसेना आमचा मित्रपक्ष असून, प्रचारात आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही असेही ते म्हणाले.
महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने भाजपमधील इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे. काही इच्छुकांनी पक्षाच्या कार्यालयापुढे उपोषण केले आणि नेत्यांच्या छायाचित्रांना काळेही फासले. ‘हे सर्व आमचेच कार्यकर्ते आहेत. ते दुखावले, तर पालकमंत्री या नात्याने त्यांच्या भावना लक्षात घेऊन नाराजी दूर करणे, हे माझे कर्तव्य आहे. हे सर्व आमचेच लोक असून ते आम्हाला नक्की सांभाळून घेतील आणि पक्षाच्या प्रचारात सहभागी होतील,’ असेही बापट म्हणाले. शिवसेनेशी पूर्वीपासून आमची वैचारिक पातळीवर युती आहे. ती फक्त या निवडणुकीपुरती नाही. त्यामुळे आम्ही प्रचारात सेनेवर टीका करणार नाही, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारली. या चुकीच्या पायंड्याला आणि पक्षातील दादागिरीला कंटाळून त्यांनी आमच्याकडून उमेदवारी मागितली. निवडणूक हा राजकीय आखाडा असून, असे डावपेच खेळावे लागतात, असेही बापट म्हणाले. रिपब्लिकन पक्षाला ठरल्याप्रमाणे आणखी दोन जागा देण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.

‘घराणेशाहीचा आरोप चुकीचा’
पक्षात बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली, घराणेशाही झाली, असे आरोप नाराज इच्छुकांकडून करण्यात येत आहेत. मात्र, घराणेशाहीचा आरोप करताना मी काही माझ्या मुलाला उमेदवारी दिलेली नाही, हे लक्षात घ्यावे. सुनील कांबळे हे विद्यमान नगरसेवक आहेत. तसेच, सिद्धार्थ शिरोळे देखील गेली अनेक वर्षे पक्षाचे काम करीत असून, त्यांनी प्रदेश पातळीवरही काम केले आहे, अशी टिप्पणीही बापट यांनी केली. इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपमध्ये नातेवाइकांना उमेदवारी देण्याचे प्रमाण खूपच कमी आहे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन मुलींसह बायकोला मारून आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील कात्रज येथे एका इसमानं स्वत:च्या दोन मुलींसह बायकोचा खून करून स्वत: गळफास लावून घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संबंधित इसमानं सुसाइड नोटमध्ये कोणावरही दोषारोप न केल्यानं या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.

कात्रज येथील दत्तनगर भागातील टेल्को कॉलनीत ही घटना घडली. दीपक सखाहारी हांडे (४२) असं आत्महत्या करणाऱ्याचं नाव आहे. शनिवारी रात्री त्यानं पत्नी स्वाती (३५), मुलगी तेजस (१६) व वैष्णवी (१२) यांचा गळा दाबून खून केला व नंतर स्वत:ला संपवले. आज सकाळी हांडे यांचे शेजारी श्रीकांत कोयले हे त्यांच्या घरी गेले असता त्यांना घरातून कुणीही प्रतिसाद देत नव्हते. कोयले यांना संशय आल्यानं त्यांनी घराची खिडकी फोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना चार मृतदेह आढळून आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांना दीपकनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्ठी सापडली आहे. आम्ही चौघेही आयुष्य संपवत असून कोणाविरुद्धही कसलीही तक्रार नाही, असं त्यात म्हटलं आहे. मात्र, हांडे यांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला असावा, याबाबत आता पोलीस चौकशी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फिजिओथेरपी’ने मिळते नवे आयुष्य

$
0
0

हृदयविकारांपासून मधुमेहापर्यंत आणि अर्धांगवायूपासून पार्किन्सन्स, सांध्याचे विकार, सांधेरोपण, मज्जातंतू, सेरेब्रल पाल्सी, मेंदूचे विकार, नसांचे विकार अनेकांना होतात. त्याशिवाय खेळताना होणाऱ्या दुखापतीमुळे कधी कधी लवकर बरे होणे अशक्य असते. त्या वेळी आराम करण्याबरोबर इतर उपाय केले जातात. फिजिओथेरपीसारख्या उपचारांमुळे अशा पेशंटना नवे आयुष्य मिळते.


Mustafa.Attar@timesgroup.com
Tweet : @mustafaattarMT


पुणे : सध्या धकीधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे जवळपास प्रत्येकाचे दुर्लक्ष होत आहे. दुर्लक्ष केल्याने विविध व्याधींना आयुष्यभर सामोरे जावे लागते हे नक्की. त्या वेळी विविध उपचार सुचवताना हाडांपासून मेंदूविकारापर्यंतच्या अनेक दुखण्यांमध्ये ‘फिजिओथेरपी’चा सल्ला दिला जातो. तेव्हा फिजिओथेरपी कशाला हवी, असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु याच फिजिओथेरपीच्या उपचारामुळे अनेकांना नवे आयुष्य मिळते, हे अधोरेखित करावे लागेल. त्यामुळे वैद्यकशास्त्रात अनेक उपचारांबरोबर फिजिओथेरपीचे उपचार महत्त्वाचे ठरत आहेत, हे कोणीही नाकारणार नाही.

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आधुनिक वैद्यकशास्त्राची सर्वोत्तम उपचारपद्धती म्हणजे फिजिओथेरपी. फिजिओथेरपी म्हणजेच भौतिक उपचार. विज्ञानात भौतिकशास्त्रातील सिद्धांत मानवी शरीरासाठी योग्य रूपात वापरले जातात. परिणामी, शरीराची क्रियापद्धती सुधारून कार्यक्षमता वाढते. फिजिओथेरपिस्ट हे वैद्यकीय तज्ज्ञ असतात. उपचारपद्धतीचा वापर करून ते पेशंटना बरे करतात. व्याधी नसलेल्या इतरांना व्यायामाचे महत्त्व आणि प्रकार दाखवून आजारांपासून दूर ठेवतात.

‘फिजिओथेरपिस्ट विविध शारीरिक व्याधींवर उपचार करतात. यात प्रामुख्याने हाडे, मेंदू, नस (मज्जातंतू), हृदय, श्वसन, फुफ्फुसांच्या कार्यासाठी, खेळांमधील दुखापती, लहान मुले, स्त्रिया यांचे विकार, वार्धक्यातील त्रासाकरिता, तसेच काम करताना होणाऱ्या त्रासांसाठी आणि सामाजिक आरोग्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात,’ असे संचेती हॉस्पिटलचे फिजिओथेरपिस्ट डॉ. अपूर्व शिंपी सांगतात. फिजिओथेरपीचे काही प्रकार आहेत.

ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी :

संधिवात (आर्थ्रायटिस), स्पाँडिलायटिस, सायटिका, अपघात, सांधेरोपण, स्नायूंची आणि तंतूंची दुखापत, फ्रोझन शोल्डर अशा बऱ्याच व्याधींवर उपचार म्हणून फिजिओथेरपी केली जाते. पेशंटचे दुखणे कमी करण्यासाठी विविध उपकरणांचा वापर केला जातो. त्यामुळे त्याला होणाऱ्या वेदना कमी होतात. ते दैनंदिन काम आणि व्यायाम करू शकतात. तसेच स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आणि सांध्याची हालचाल राखण्यासाठी नियमित व्यायाम दिले जातात.

न्यूरॉलोजी फिजिओथेरपी

पॅरालिसिस (अर्धांगवायू), पार्किन्सन्स, स्मृतिभ्रम, मेंदूचे विकार, सेरेब्रल पाल्सी, नसांचे विकार अशा अनेक व्याधींवर फिजिओथेरपिस्ट उपचार करतात. अशा पेशंटना बऱ्याच वेळा आपले शरीर किंवा अवयव हलवता येत नाहीत. त्यांची हालचाल होत नाही. यासाठी अनेकदा फिजिओथेरपीचा सल्ला दिला जातो. शरीराच्या विविध भागांचा वापर कसा करावा, स्नायूंचा कडकपणा कमी कसा करावा, कमजोर स्नायू कसे हलवावेत, कमजोर स्नायूंना आधार कसा द्यावा, यासंबंधीचे मार्गदर्शन केले जाते, असे डॉ. शिंपी म्हणाले.

कार्डिऑलॉजी आणि रेस्पिरेटरी फिजिओथेरपी

हृदयविकाराचा झटका, बायपास, हृदयात छिद्र, दमा, श्वसनाचे विकार यांसारख्या व्याधींवर फिजिओथेरपीद्वारे उपाय केले जातात. डॉक्टरांच्या औषधोपचारांबरोबर फिजिओथेरपी करावी लागते. तसेच श्वास आणि फुफ्फुसांच्या कार्यासाठी अतिदक्षता विभागात इतर वेळी करण्याचे व्यायाम सांगितले जातात. दम लागण्याचा त्रास होणाऱ्या पेशंटना श्वासावर नियंत्रण ठेवण्याचे व्यायाम अत्यंत उपयोगी आहेत. या शिवाय बरगड्यांच्या हालचालीचे व्यायाम, हृदय, फुफुसाची कार्यक्षमता वाढवण्याचे व्यायाम, उच्च रक्तदाब नियंत्रण करण्याचे व्यायाम शिकवले जातात.

स्पोर्ट्स फिजिओथेरपी

खेळाडूंना होणाऱ्या दुखापतींवरदेखील फिजिओथेरपीचे उपचार केले जातात. खेळाडूंना दुखापती होऊ नयेत म्हणून उपाययोजना सांगून खेळाडूंना अधिक कार्यक्षम बनवले जाते. क्रिकेट, भालाफेक, तबकडीफेक, रग्बी, सायकल, डायव्हिंग, स्केटिंग, फुटबॉल, हॉकी, धावण्याची शर्यत, रॅकेट स्पोर्ट्स, खोखो, कबड्डीसारख्या खेळांमध्ये दुखापती होऊ शकतात. हाड मोडणे, सांधा निखळणे-निसटणे आणि स्नायूंना (मांस-पेशी, तंतू) सूज येणे किंवा ते फाटणे या दुखापतींवर फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांबरोबर इलाज करतात. क्रीडाप्रकार आणि तीव्रतेनुसार खांदा, मनगट, हात, खुबा, गुडघा, घोटा आणि मणक्याला इजा होऊ शकते. स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट खेळाडूंच्या फिटनेसवर अधिक भर देतात. त्यात ताकद, स्टॅमिना, लवचिकता आणि कौशल्य हे महत्त्वाचे घटक आहेत.

कम्युनिटी फिजिओथेरपी

यात वार्धक्यातील त्रास, काम करताना होणारा त्रास, प्रसूतीमधील त्रास, सामाजिक आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी उपाय सांगितले जातात. तसेच गर्भावस्थेतील व्यायाम, प्रसूतीनंतरचे व्यायाम, मधुमेह आणि स्थूलतेसाठीचे व्यायाम, काम करण्याच्या योग्य पद्धतीसंदर्भात (अर्गोनॉमिक्स) मार्गदर्शन केले जाते, असेही डॉ. शिंपी यांनी स्पष्ट केले.
...........
केवळ हाडांच्या दुखण्यांवरच नव्हे, तर खेळाडूंनाही फिजिओथेरपी करण्याचा सल्ला दिला जातो. या उपचारांमुळे विविध प्रकारचे दुखणे कायमचे बरे करून अनेकांना नवे आयुष्य मिळते. फिजिओथेरपीचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे मेंदूचे विकार किंवा हृदयाचे आजारही बरे करण्यासाठी उपयोग होतो.

- डॉ. अपूर्व शिंपी,
कम्युनिटी फिजिओथेरपिस्ट, संचेती हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोसायटीचे अध्यक्ष, सचिव होणार मतदारदूत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका निवडणुकीमध्ये सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष व सचिवांना ‘मतदारदूत’ म्हणून भूमिका बजवावी लागणार आहे. या पदाधिकाऱ्यांनी सोसायटीची बैठक घेऊन मतदानासाठी सभासदांना आवाहन करावे, अशा सूचना सहकार खात्याने दिल्या आहेत. या आदेशाची काय अंमलबजावणी केली, त्याचा अहवालही सहकार आयुक्तालयाकडे देण्याचे सुचवले आहे.
प्रत्येक सोसायटीत शंभर टक्के मतदान व्हावे, यासाठी मतदारजागृती करण्याची मोहीम राबवली जाणार आहे. महापालिका आणि सहकार खात्याच्या सहकार्याने हे काम केले जाणार आहे. महापालिकांनी मतदार जागृतीसाठी सोसायटीच्या दर्शनी भागात फलक लावावेत. त्यासाठी संबंधित गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व सचिव; तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य घेण्याचेही सहकार खात्याने सूचित केले आहे.
सहकार खात्याच्या सूचनेप्रमाणे या निवडणुकीत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांना आपापल्या सोसायटीची बैठक घेऊन मतदार जागृतीबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सहकार आयुक्तालयाला द्यावा लागणार आहे.
सहकार खात्याने मतदार जागृतीच्या कामाला सुरवात केली असून, गृहनिर्माण सोसायट्यांमधून पत्रके आणि सभा घेण्यात येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत कोंढवा, पिंपळे गुरव, वानवडी, खराडी, नऱ्हे, आंबेगाव आदी परिसरातील सुमारे साडेतीनशे सोसायट्यांमध्ये पत्रकांचे वाटप आणि सभा घेऊन मतदार जागृती करण्यात आली आहे. बैठकांशिवाय पथनाट्यांद्वारे मतदारांमध्ये जागृतीचे काम केले जात असल्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
........
बूथ लेव्हल व्हॉलेंटियर्स
सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणजेच ‘बूथ लेव्हल व्हॉलेंटियर्स’ म्हणून नेमण्याचे निवडणूक आयोगाने यापूर्वीच घोषित केले आहे. याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने १३ ऑक्टोबर २०१६ मध्ये काढला आहे. या आदेशानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांना या कामात सहभागी व्हावे लागणार आहे. सोसायटीतील नवीन मतदारांची नोंदणी, मृत्यू झालेल्या किंवा सोसायटी सोडून गेलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळण्याचीही कामे यापुढे करावी लागणार आहेत. विविध प्रकारच्या निवडणुकांमध्ये गृहनिर्माण संस्थांतील सदस्यांचा सहभाग वाढावा, हा यामागील उद्देश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रीपूर्ण आघाडीने मतदारांचा गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मैत्रीपूर्ण आघाडीच्या निर्णयाने मतदार गोंधळल्याचे चित्र आहे... एका प्रभागात आघाडी तर दुसऱ्या प्रभागात एकमेकांसमोर काटेकी टक्कर... तिसऱ्या प्रभागात चार जागांपैकी दोन जागांवर आघाडी आणि इतर दोन जागांवर एकमेकांची लढाई तर ‍उर्वरित प्रभागांमध्ये दोन जागांवर मैत्रीपूर्ण लढत...अशी अवस्था झाली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची. भारतीय जनता पक्षाला (भाजप) रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसने आघाडीचा निर्णय घेतला. मात्र, तो घेताना ज्या जागांवर एकमत झाले नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे प्रत्येक प्रभागात आघाडीचे वेगळे राजकीय समीकरण बनले असून त्याने आघाडीचे कार्यकर्ते अधिक गोंधळात सापडले आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात लढायची पूर्ण तयारी केली असताना अचानक झालेला आघाडीचा निर्णय अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. कुठल्या प्रभागात कोणाचा प्रचार करायचा, या संभ्रमात कार्यकर्ते सापडले असल्याचे चित्र आहे. या गोंधळाच्या स्थितीचे वर्णन करणारे अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ‘असाल तसे निघून या, कुणीही रागा‍वणार नाही ते मतदानाची तारीख पुढे ढकला,’ हे मसेज सर्वाधिक फॉरवर्ड होत आहेत.
एकमेकांवर भ्रष्टाचारापासून विविध मुद्द्यांवर आरोप करून गरळ ओकणारे नेते मंडळी पडद्यापाठीमागे एकमेकांचे हितसंबंध जोपासतात, आणि त्याचवेळी त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले असतात, ही वस्तुस्थिती सर्वच पक्षात सारखीच असते. पुण्यात आघाडीतील नेतेमंडळींनी अचानक आघाडीचा निर्णय घेत कार्यकर्त्यांना गोंधळात टाकले असून त्याचे प​डसाद काँग्रेस भवनपासून विविध प्रभागांत उमटू लागले आहेत.
..
मतदानाची तारीख पुढे ढकला
निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख पुढे ढकलावी. कोण कुठल्या पक्षात आहे हे समजून घेण्यासाठी मतदारांना एक महिन्याचा अवधी द्यावा, असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजकीय पक्षांनी शेवटच्या टप्प्यांत अचानक उमेदवार बदल्याने मतदारांमधील गोंधळ हा मेसेजमधून बाहेर पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सरवरील संशोधन वाढायला हवे

$
0
0

देशात कॅन्सरच्या विविध प्रकारांचे प्रमाण वाढत आहे; पण अमेरिकेच्या तुलनेत भारतात रक्ताच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असून, त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात संशोधन व्हायला हवे. टाटा मेमोरियलसारख्या संस्था वगळता संशोधनाची कमतरता आहे. या संदर्भात अमेरिकेतील यूएचएस विल्सन मेडिकल सेंटरच्या पॅथॉलॉजी विभागाचे वैद्यकीय संचालक डॉ. जगमोहन सिधू यांच्याशी मुस्तफा आतार यांनी साधलेला हा संवाद...

..................

प्रश्न : कॅन्सरच्या प्रकारापैकी रक्ताच्या कॅन्सरविषयी अमेरिका आणि भारतातील तुलनात्मक चित्र कसे आहे?

डॉ. सिधू : अमेरिकेत रक्ताचा कॅन्सर हा सर्वसाधारण असतो म्हणजेच अनेकांमध्ये आढळतो; पण भारतात त्याचे पेशंट दुर्मिळ स्वरूपात सापडतात. अमेरिका आणि भारतातील आजारांमध्ये बरीच तफावत आढळते. अमेरिकेत रक्ताचा कॅन्सर का होतो, याचे कारण सांगता येत नाही. त्यावर बरेच संशोधन सुरू आहे. हा आजार नेमका विषाणू, पर्यावरण, आनुवंशिक अथवा अन्य कोणत्या कारणामुळे होतो, हे तज्ज्ञांना सांगणे अवघड आहे. परंतु, अमेरिकेत या आजाराचे प्रमाण अधिक आहे, हे मात्र नक्की. तेथे स्त्री-पुरुषांमध्ये हा आजार दिसून येतो. शरीरातील पेशी कशामुळे नष्ट होतात, डीएनए कशामुळे खराब होतात, याचे निश्चित कारण स्पष्ट करता येत नाही.

प्रश्न : कॅन्सरच्या संशोधनासंदर्भात नेमकी काय परिस्थिती आहे?

डॉ. सिधू : अमेरिकेत कॅन्सरवरील संशोधन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या ठिकाणच्या संशोधनाचा दर्जाही वेगळा आहे. त्या तुलनेत भारतात कॅन्सरवर संशोधन होत असले तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मुंबईतील टाटा मेमोरियलसारख्या काही मोजक्या संस्थांमधून हे संशोधन होते. खरे तर रक्ताच्या कॅन्सरपासून अन्य प्रकारच्या कॅन्सरवरही सखोल संशोधन होण्याची गरज आहे. पश्चिम युरोपात चांगले संशोधन होत आहे. भारताच्या तुलनेत रक्ताच्या कॅन्सरचे उपचार अमेरिकेत महागडे आहेत.

प्रश्न : रक्ताच्या कॅन्सरवरील उपचार अमेरिकेत महाग का आहेत?

डॉ. सिधू : रक्ताच्या कॅन्सरचे उपचार अमेरिकेत महाग, पण भारतात स्वस्त आहेत. अमेरिकन कंपन्या ‘क्लिनिकल ट्रायल’ करतात. त्यामुळे उपचारांच्या खर्चात वाढ होते.

प्रश्न : अमेरिकेत होणारे कॅन्सरचे निदान, उपचार, तपासणीसंदर्भात काही सांगाल?

डॉ. सिधू : तंबाखू, धूम्रपानाच्या सवयीमुळे तोंडाचा, तर ‘एचपीव्ही’ विषाणूंच्या संसर्गामुळे गर्भाशयाचा कॅन्सर होतो. अमेरिकेत कोणताही कॅन्सर झाला, तरी त्याचे वेळेत निदान होते. कारण त्या ठिकाणी वेळोवेळी तपासणी केली जाते. परिणामी, उपचार करण्यास वाव मिळतो. त्या तुलनेत भारतात या आजारांबाबत जनजागृती कमी असल्याने तपासणी होत नाही. तपासणीसाठी कायमस्वरूपी अशा सोयीसुविधा नाहीत. तपासणी, निदान चाचण्यांची केंद्रे निर्माण व्हायला हवीत. अमेरिकेत स्वतंत्रपणे सरकारमार्फत तपासणी, निदान केले जाते. अमेरिकेत फुफ्फुसासह अन्य अवयवांच्या कॅन्सरचे वेळीच निदान होते. त्या धर्तीवर भारतातही केंद्र सरकारने सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये मोफत तपासणी केंद्रे उभारायला हवीत. त्यातूनदेखील संशोधन होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्पना बहिरट यांचा अर्ज वैध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात तीन प्रभागांमधून दाखल झालेल्या २६५ उमेदवारी अर्जांपैकी ३७ अर्ज बाद ठरले आहेत. ३४ अर्ज दोनदा प्राप्त झाले आहेत. अर्ज छाननीची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने या क्षेत्रीय कार्यालयात दोन दिवस गोंधळाचे वातावरण होते. शनिवारी काम पूर्ण होऊ न शकल्याने रविवारी काम सुरूच होते. भाजपच्या कल्पना बहिरट यांचा अर्ज अनेक तासांच्या छाननीनंतर रविवारी वैध ठरविण्यात आला.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १८,१९ व २० हे प्रभाग आहेत. यामध्ये अनुक्रमे खडकमाळ आळी, लोहियानगर, ताडीवाला रस्ता व ससून हॉस्पिटल हा भाग येतो. तीन प्रभागातून मिळून २६५ अर्ज भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडे दाखल झाले होते. यापैकी ३७ अर्ज बाद झाले. प्रभाग १९ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. प्रभाग २० (ताडीवाला रस्ता-ससून) ‘ब’मधून भाजपच्या कल्पना बहिरट यांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी रविवारपर्यंत सुरू होती. अखेर त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. प्रताप परदेशी यांनी बहिरट यांच्या वतीने बाजू मांडली. दरम्यान, पोलिस कार्यालयात सोडत नसल्याने वादावादीचे प्रसंग या ठिकाणी घडले. पोलिस ठरावीक लोकांना आत प्रवेश देत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांसह सूचक, अनुमोदक, पत्रकार यांना अडवून धरल्याने वादावादीचे प्रसंग घडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यातील प्रवेश गुणवत्ता यादीनुसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात येत्या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्ष इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमामध्ये ऑल इंडिया १५ टक्के कोट्यांचे प्रवेश हे ‘जेईई मेन’ परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार होणार आहे. त्यानंतरही या कोट्यात जागा शिल्लक राहिल्यास त्या जागा राज्याच्या सामायिक परीक्षेच्या (सीईटी) गुणवत्ता यादीनुसार भरण्यात येतील.

मात्र, दोन्ही परीक्षेद्वारे या कोट्यात प्रवेश घेतल्यावंतर जागा शिल्लक राहिल्यास त्या मॅनेजमेंट कोट्यात जाणार का, याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. दरम्यान, गेल्या वर्षी या कोट्यातील प्रवेश हे प्रवेश सीईटीद्वारे झाले होते. राज्य सरकारद्वारे इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घेण्यात येते, तर इतर राज्यात जेईई मेन परीक्षेद्वारे प्रवेश होतात. त्यामधून खासगी कॉलेजच्या एकूण जागांच्या ६५ टक्के जागा सीईटीद्वारे, २० टक्के जागा मॅनेजमेंट कोट्यातून, तर ऑल इंडिया कोट्याच्या १५ टक्के जागा या सीईटी अथवा जेईई मेन परीक्षेद्वारे भरण्यात येतात. गेल्या वर्षी म्हणजेच २०१६-१७ या वर्षासाठी ऑल इंडिया कोट्याच्या १५ टक्के जागा या सीईटीद्वारे भरण्यात आल्या होत्या. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना या कोट्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी सीईटी किंवा जेईई मेन परीक्षा यापैकी एका परीक्षेच्या गुणांद्वारे प्रवेश घ्यावा लागत असे.

मात्र, राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्ष अभ्यासक्रमामध्ये २०१७-१८ शैक्षणिक वर्षासाठी ऑल इंडिया कोट्याच्या १५ टक्के जागा जेईई मेन परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे देशातील इतर राज्यातील विद्यार्थ्यांना राज्यातील चांगल्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेता येणार आहे. त्याचप्रमाणे सीईटीमध्ये कमी गुण मिळाल्यावर देखील जेईई मेन परीक्षेत मिळालेल्या चांगल्या गुणांच्या आधारे इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळेल. त्यामुळे या नव्या निर्णयामुळे इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिल्लक राहणाऱ्या जागा भरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान, सीईटी आणि जेईई मेन या दोन्ही परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांनी कोट्यात प्रवेश घेतल्यावरदेखील जागा शिल्लक राहिल्यास त्या मॅनेजमेंट कोट्यामध्ये जाणार का, याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकात दिलेली नाही. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार राज्यात ३६५ कॉलेजांमध्ये सुमारे एक लाख ४३ हजार ८५३ जागा आहेत.


राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने घतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. या निर्णयामुळे जेईई मेनचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल. तसेच, राज्यात राष्ट्रीय पातळीवर अयणाऱ्या परीक्षेबाबत चांगले वातावरण तयार होईल.

- दुर्गेश मंगेशकर, संचालक, आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images