Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘भारत रंग महोत्सव’ रंगणार यंदा पुण्यात

$
0
0

‘भारत रंग महोत्सव’ रंगणार यंदा पुण्यात

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारतीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्यपरंपरेचा मेळ साधणारा आणि नाट्य रसिकांसाठी मेजवानी ठरणारा ‘भारत रंग महोत्सव’ यंदा पुण्यात रंगणार आहे. दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’तर्फे आयोजित हा महोत्सव ९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत अण्णा भाऊ साठे रंगमंदिरात पार पडणार आहे. या निमित्ताने पुणेकर रसिकांना भारतीय आणि विदेशी कलाविष्कार अनुभवता येणार आहे.
महोत्सवाची सुरुवात आसामच्या ‘हंसिनी’ या नाटकाने होणार आहे. आसाममधील प्रसिद्ध नाट्यकलाकार बहारूल इस्लाम यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असून, प्रसिद्ध नाटककार चेकाॅव यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नेपाळमधील ‘अॅना इन द ट्रॉपिक’ हे नाटक सादर केले जाणार आहे. क्युबा येथील प्रसिद्ध असलेल्या सिगारच्या व्यवसायावर हे नाटक आधारलेले आहे. महोत्सवाचे तिसरे सत्र मुंबईच्या सुनील शानबाग दिग्दर्शित ‘लॉरेटा’ या नाटकाच्या सादरीकरणाने रंगणार आहे. इंग्रजी आणि काेकणी भाषेत हा गोवन लोकनाट्याचा प्रकार सादर होणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक रामगोपाल बजाज, ज्येष्ठ लेखक सतीश आळेकर, राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाचे संचालक संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या देणगी प्रवेशिका लवकरच बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि अण्णा भाऊ साठे सभागृह येथे उपलब्ध केल्या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेहरूंचा पाठिंबा होता...

$
0
0

नेहरूंचा पाठिंबा होता...

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘चीनने हल्ला केला, तेव्हा तीन महिन्यांनंतरही वीस टक्के लोकांना काय चालू आहे ते माहीत नव्हते. या उलट कारगिलचे युद्ध लोकांनी पाहिले. हा विकास कसा होऊ शकला...? पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांनी शहाणपण दाखवले. अपयश आले, तेव्हा आम्हाला पाठबळ दिले. त्यांचा राजकीय व वैज्ञानिक पाठिंबा होता व स्वातंत्र्य होते म्हणूनच हे घडू शकले. पं. नेहरू, इंदिरा गांधी, शास्त्रीजी या लोकांची जातकुळीच वेगळी होती...’ पंतप्रधानांचे माजी वैज्ञानिक सल्लागार व ‘इस्रो’चे माजी संचालक डॉ. ई. व्ही. चिटणीस गतकाळात हरवून गेले होते. पं. नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांचे मोठेपण त्यांच्या शब्दाशब्दांतून जाणवत राहिले.
राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या ‘रेडिओ एफटीआयआय ९०.४ एफएम’ या सामाजिक रेडिओ केंद्राचा दहावा वर्धापनदिन सोमवारी साजरा झाला. यानिमित्त डॉ. चिटणीस यांची मुलाखत ध्वनिमुद्रित करण्यात आली. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला, विभागाचे प्रमुख संजय चांदेकर उपस्थित होते.
‘पं. नेहरू पंतप्रधान असताना १६६२ मध्ये विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली अंतराळ संशोधनासाठी समिती स्थापन करण्यात आली. अंतराळ संशोधनासाठी पैसे नव्हते. देशाचा अंतराळ कार्यक्रम कसा आखायचा हा प्रश्न होता. रशिया, अमेरिका हे देश विकसित होते. त्यांची नक्कल करणे शक्यच नव्हते. ‘नासा’कडे बघून ‘इस्रो’चा कार्यक्रम आखला नाही. तो आम्ही आखला. त्याचे कारण पंतप्रधानांनी दाखविलेला विश्वास...’ चिटणीस भरभरून सांगत होते.
‘डॉ. अब्दुल कलामांचे पहिले क्षेपणास्त्र अयशस्वी झाले होते. अपयश स्वीकारण्यासाठी सतीश धवन पुढे आले. पुढे जेव्हा यश मिळाले, तेव्हा त्यांनी कलामांना पुढे केले. त्यातूनच इस्रोमध्ये अनेक शास्त्रज्ञ घडले,’ अशी आठवण डॉ. चिटणीस यांनी जागवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाहीसाठी राष्ट्रवादावर प्रहार आवश्यक : डॉ. देवी

$
0
0

लोकशाहीसाठी राष्ट्रवादावर प्रहार आवश्यक : डॉ. देवी

पुणे : ‘स्वातंत्र्य, राष्ट्र व लोकशाही या तीन संकल्पना एका काळात येतात, असे वाटत असते; पण लोकशाही एका रात्रीत जन्म घेत नाही. राष्ट्र व लोकशाही हातात हात घालून एकत्र येत नसते. किंबहुना हे दोन विरुद्ध ध्रुवांवरील विचार आहेत. लोकशाही उत्सव साजरे करायचे असतील, तर राष्ट्रवादावर प्रहार करावेच लागतील,’ असा घणाघात ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी रविवारी केला. ‘लोक ही प्राथमिक व राष्ट्र ही दुय्यम कल्पना मानायला हवी,’ असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
लोकशाही उत्सव समितीतर्फे आयोजित लोकशाही उत्सवात ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ऎसीतैसी’ या विषयावर ते बोलत होते. सुनिती सु. र., गणेश विसपुते या वेळी उपस्थित होते. इतिहासाचे अभ्यासक प्रा. राजा दीक्षित अध्यक्षस्थानी होते.
‘स्व आणि पर हे समाजाचे दोन अंग आहेत. दुसऱ्याला संपविताना स्वत:ला उंचाविण्याचे काम अनेकदा झाले आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली मानवी मूल्ये पायदळी तुडवली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर दुसऱ्यावर आक्रमण न करता स्वत:चे उन्नयन करणे, हा खरा स्वातंत्र्याचा अर्थ आहे,’ याकडे डॉ. देवी यांनी लक्ष वेधले. ‘आदिवासींबाबत आपण संवेदनशील आहोत का, आपल्या स्वची क्षितिजे जड झाली आहेत का,’ असे सवाल त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मशिन चालवणाऱ्या माणसाचे महत्त्व घटले

$
0
0

मशिन चालवणाऱ्या माणसाचे महत्त्व घटले

माणूस आणि मशिनचे नाते उलगडत औद्योगिकीकरणाच्या काळात बदलत चाललेल्या समाजमनाचा ‘लेथ जोशी’ या चित्रपटातून वेध घेण्यात आला आहे. नुकतेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘संत तुकाराम’ पुरस्काराने या चित्रपटास गौरविण्यात आले. वेगळ्या धाटणीचा विषय आणि चौकटीपलीकडची मांडणी करत या चित्रपटाचा दिग्दर्शक मंगेश जोशी याने पुणेकर रसिकांचे मन जिंकले. याविषयी आदित्य तानवडे यांनी त्याच्याशी संवाद साधला...
..................
‘लेथ जोशी’च्या माध्यमातून माणूस आणि मशिनचे नाते उलगडणारी वेगळ्या धाटणीची संकल्पना का मांडावीशी वाटली?

जोशी : सध्याचे युग औद्योगिकीकरणाचे आहे; जिथे माणसापेक्षा मशिनला जास्त महत्त्व आहे. एका वेळी अनेक माणसांचे काम एक मशिन कोणत्याही मदतीशिवाय करत असल्याने तिचे महत्त्व वाढले. त्याच वेळेला मशिन चालवणाऱ्या माणसाचे महत्त्व कमी झाले. गेल्या ३० वर्षांपासून कंपन्यांमध्ये लेथ मशिन चालवणारे अनेक कामगार आहेत. हाती मिळालेला एखादा पार्ट तासण्यापलीकडे त्यांना काम उरलेले नाही. मात्र, या कामगारांचे त्या मशिनशी एक नाते आहे, ते मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. एवढेच नाही, तर औद्योगिकीकरणामुळे कामगारांच्या कुटुंबांवर आणि पर्यायाने समाजमनावर कसा परिणाम होत गेला, याचे चित्रण चित्रपटात दाखवले आहे.

या चित्रपटाचे निर्माते तुम्हीच आहात?

जोशी : माझा निर्मात्यांबद्दलचा अनुभव फारसा चांगला नाही. या आधीच्या एका चित्रपटासाठी मी अनेक निर्मात्यांची दारे झिजवली; पण अपयश आले. त्यांचे ‘रिकव्हरी’चे गणित न झेपणारे होते. ‘लेथ जोशी’ मला हवा तसा करायचा होता. माझ्या भावना त्यात मांडायच्या होत्या. त्यामुळे मी आणि पत्नी सोनाली जोशी आम्ही दोघांनीच याची निर्मिती करायची असे ठरवले आणि चित्रपट केला. प्रेक्षकांना तो आवडला. त्यामुळे आता कदाचित निर्मात्यांकडून विचारणा होईलही.

चौकटीपलीकडचा चित्रपट विकला जाण्यासाठी चित्रपट महोत्सवांमध्ये त्याला मिळणारे यश कारणीभूत असते का?

जोशी : मला असे वाटत नाही, पण चित्रपट महोत्सवात एक व्यासपीठ मिळते. त्यामुळे तो चित्रपट सुजाण प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आणि त्यांच्यामार्फत चित्रपटाची प्रसिद्धीही होते. कोणत्याही चित्रपटाची जर कथा, संकल्पना, विषय प्रक्षकांना कनेक्ट करणारे असतील, तर त्या चित्रपटाला यश मिळतेच. अर्थात पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाल्याचा चित्रपटाला फायदाच झाला आहे. या आधीही हा चित्रपट मेक्सिको, रशिया, आफ्रिका, न्यूयॉर्क या ठिकाणच्या चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला आहे. त्याठिकाणीही तो प्रेक्षकांना आवडला. मराठी चित्रपटांचा कॅनव्हास बदलतो आहे. महोत्सवांमध्ये हा कॅनव्हास जगासमोर मांडण्याची संधी मिळते.

तुझ्या चित्रपटात कोणीही स्टार कलाकार नाही?

जोशी : चित्रपटाची कथा आणि मांडणी ‘स्टार’ असेल, तर सेलिब्रिटी चेहऱ्याची गरज भासत नाही. माझ्या चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, ओम भूतकर आणि सेवा चौहान यांनी काम केले आहे. त्यांच्या पात्रांना त्यांनी न्याय दिला आहे. प्रेक्षकांनाही त्यांचे काम भावले आहे. त्यामुळे सेलिब्रिटी स्टेटस असलेल्या कालाकारांनाच घेऊन चित्रपट करता येतो, असे नाही. माझ्या चित्रपटातील कलाकारांचे अभिनय क्षेत्रातील योगदान मोठे आहे. शिवाय मला अभिप्रेत असलेली पात्र ही या कलाकारांशिवाय दुसरे कोणी साकारू शकले नसते.

तुझ्या पुढील वाटचालीविषयी काय सांगशील?

जोशी : लेथ जोशी तयार करून महोत्सवाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे माझे दिग्दर्शक म्हणून पहिले काम होते. आता ते संपले असले, तरी निर्माता म्हणून माझे काम सुरू झाले आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातल्या सुजाण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला तो प्रदर्शित करायचा आहे. सध्याची परिस्थिती पाहता तो मी आणि माझी पत्नी मिळूनच प्रदर्शित करू. ते झाल्यावर माझ्या पुढील चित्रपटांच्या दोन संहितांवर काम सुरू होईल. ‘लेथ जोशी’ प्रदर्शित होईपर्यंत ते काम सुरू करणार नाही. सध्या तीच माझी प्राथमिकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षारक्षकानेच घेतला रसिलाचा जीव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

एकटक बघण्याचा जाब विचारून तक्रार करण्याची तंबी दिल्याने इन्फोसिस कंपनीतील इंजिनीअर रसिला राजू ओ. पी. हिचा खून केल्याची कबुली सुरक्षारक्षक भाबेन सैकिया याने सोमवारी दिली.

कंपनीच्या (हिंजवडी फेज २) रविवारी सायंकाळी कम्प्युटरच्या केबलने गळा आवळून खून करण्यात आला. या घटनेनंतर भाबेन हा दोन तास ड्युटी करून मग तेथून निघून गेला. रात्री ही घटना समजल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी वेगाने सूत्र फिरवून भाबेन याला मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून अटक केली.

या प्रकरणी अभिजित कोठारी (२८, रा. वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. कोठारी इन्फोसिस कंपनीत सीनिअर असोसिएट म्हणून काम करतात. रसिलासह इन्फोसिसच्या हिंजवडी आणि बेंगळुरू येथील १५ जणांची टीम एका प्रोजेक्टवर सध्या काम करीत होती. भाबेन सैकिया हा सुरक्षारक्षक होता. आसाममधील आपल्या मूळ गावी जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

‘शनिवारी ती कंपनीत आल्यावर भाबेनने तिच्याकडे एकटक पाहिले होते. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा आणि त्याची नोकरी घालविण्याचा इशारा तिने त्याला दिला होता. त्याने तिला तसे न करण्याची विनंती दिली. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा कंपनीत आली, तेव्हा भाबेन याने तिला तक्रारीबाबत विचारले. पुन्हा विनंती केली. काही वेळाने रसिला मीटिंग रूममध्ये गेली. तेव्हा कम्प्युटरचे क्रमांक घेण्याचा बहाणा करून भाबेन तिच्या मागे गेला. तेथे पुन्हा त्याने तक्रार न करण्याबाबत तिला विनंती केली. ती ऐकत नसल्याने तू मर आणि मीपण आत्महत्या करतो, असे म्हणत कम्प्युटरच्या केबलने गळा आवळला,’ अशी माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.

गळा आवळल्याने मृत्यू झाला की नाही, हे तपासण्यासाठी भाबेनने रसिलाच्या तोंडावर लाथा मारल्या होत्या. यानंतर तो तेथून निघून बाहेर आला. रसिलाशी संपर्क होत नसल्याने कोठारी यांनी इतरांना कंपनीत पाठविल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

रसिलाच्या मृत्यूने खूप मोठा धक्का बसल्याचे ‘इन्फोसिस’ने म्हटले आहे. ‘आम्ही आमचा एक सहकारी गमावला आहे. रसिलाच्या घरच्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटने संदर्भात पोलिसांना आवश्यक ते सहकार्य दिले जाईल,’ असेही कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

पोलिस कोठडी

आरोपी भाबेन सैकियाला सोमवारी शिवाजीनगर कोर्टात सादर करण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अ. सू. बारुळकर यांनी त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली. सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीची शक्यता धुसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काँग्रेसच्या प्रदेश निवड समितीने पुणे शहरातील प्रमुख प्रभागातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यास सुरुवात केली असून मंगळवारी सकाळी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसच्या या पवित्र्यामुळे आघाडीची शक्यता धुसर झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसने आपला अंतिम प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसला दिला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याच्यावर उत्तर आले नसल्याचे वरिष्ठ नेत्याने सांगितले. महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील आघाडीचा घोळ गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलेल्या नगरसेवकांना राष्ट्रवादीने काही शब्द दिले आहेत. काँग्रेस त्यांच्या मूळ जागांवर दावा करीत असल्याने राष्ट्रवादीला आपला शब्द पाळण्यात अडचणी येत आहेत. कोंढव्यातील रईस सुंडके यांच्या चार जागांसह जवळपास १० ते १२ जागांचा घोळ कायम आहे. या जागांची बोलणी गेल्या चार दिवसांपासून सुरू होती. अखेर हा प्रश्न प्रदेश नेत्यांसमोर ठेवण्यात आला होता.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधून काँग्रेसने दिलेल्या प्रस्तावाबद्दलची माहिती घेतली आहे. या चर्चेतून आघाडी तुटल्याचे सांगण्यात येत नसले, तरी आघाडीची शक्यता धुसर असल्याची चर्चा सुरू आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये अद्याप चर्चा सुरू असून आघाडीचा निर्णय हा मंगळवारी होईल, असे वरिष्ठ नेत्याने सांगितले. दरम्यान, मुंबईत टिळक भवन येथे काँग्रेसच्या प्रदेश निवड समितीची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या बैठकीत यादीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. वादग्रस्त जागांवर उमेदवार निश्चित केले असले, तरी आघाडी झाल्यास तेवढे बदल तत्काळ करण्यात येतील, असे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजभेटीचा वेगळा अर्थ काढला : शाहरुख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सिनेमासाठी खूप जणांनी मेहनत घेतलेली असते. अनेकांचे पैसे त्यात गुंतलेले असतात. अशा वेळी केवळ संबंधित सिनेमातील एखादे दृश्य किंवा संवाद याविषयी गैरसमज झाल्याने किंवा कुणाच्या भावना दुखावण्याची शक्यता निर्माण झाल्याने मी सिनेमाचे प्रदर्शन थांबवू शकत नाही. ज्याला लोक हल्ली ‘मार्केटिंग’ म्हणतात, त्याला मी माहिती देणे (इन्फर्मिंग) म्हणतो. याचसाठी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटायला गेलो होतो. माध्यमांचा त्या भेटीविषयी काहीतरी गैरसमज झाला,’ असे थेट स्पष्टीकरण सुपरस्टार शाहरुख खान याने दिले.

‘रईस’च्या प्रसिद्धीसाठी सोमवारी पुण्यात आलेल्या शाहरुखने हॉलिवूड सिनेमांनी बळकावलेले बॉक्स ऑफिस, दोन मोठे सिनेमे एकत्र प्रदर्शित होणे, वेब सीरिज आणि मराठी सिनेमांची निर्मिती याविषयी गप्पा मारल्या. सिनेमे पूर्ण बनण्याच्या आधीच सेटवर कुठल्याही पद्धतीची तोडफोड होऊ नये, याचसाठी माझाही सगळा आटापिटा सुरू असल्याचे शाहरुखने ‘पद्मावती’चे नाव न घेता सांगितले. सिनेमातील काही तरी खटकले; म्हणून हल्ली सर्जनशील माणसांना व्यक्त होण्याचे सतत वेगवेगळे मार्ग शोधत राहावे लागत असल्याविषयीही त्याने खंत व्यक्त केली.

‘हॉलिवूड सिनेमे बॉलिवूडचे मार्केट खातात, असे म्हणून त्यांना येथे प्रदर्शित होण्यापासून रोखण्यापेक्षा आपणच आपल्या सिनेमांचा दर्जा आणखी चांगला करूया. आजही फक्त एक ते दीड टक्केच लोक थिएटरपर्यंत येऊन सिनेमे पाहतात. त्याव्यतिरिक्तचे लोक हॉलिवूड सिनेमांकडे पूर्णपणे वळायच्या आतच आपण, म्हणजे फक्त हिंदी नाही, तर प्रादेशिक सिनेमांचा स्तरही उंचावूया,’ असे मत शाहरुखने व्यक्त केले. थिएटरमध्ये मिळणाऱ्या स्क्रीन्सचा प्रश्न फक्त दोन मोठ्या हिंदी सिनेमांच्या एकत्र प्रदर्शनावेळीच नाही, तर प्रादेशिक सिनेमांबाबतही सुटला पाहिजे, याविषयीही तो आग्रही होता. सध्याच्या एक हजार स्क्रीन्सऐवजी येत्या वर्षात जेव्हा एक हजार ५०० स्क्रीन्स तयार होतील, तेव्हा हा प्रश्न सुटेल, अशी आशा त्याने व्यक्त केली. सिनेमाची प्रसिद्धी कुणाला दुखवण्यासाठी किंवा मारण्यासाठी केली जात नाही. मात्र, सिनेमाच्या ट्रेनमधून केलेल्या प्रमोशननंतर झालेल्या धक्काबुक्कीतून एक व्यक्ती मृत झाल्याविषयी त्याने हळहळ व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशाचा पाऊस झाला खोटा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घरामध्ये पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची तब्बल २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यावसायिकाने पत्नी आणि आईचे दागिने, ओळखींच्या लोकांकडून उसने पैसे घेऊन भोंदूबाबाला दिले. पैसे घेऊन भोंदूबाबा पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मंदार अरविंद वैद्य (वय ४७, रा. राधाकृष्ण बंगला, विठ्ठलनगर, सिंहगड रोड) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून सागरनाथ मिठानाथ परमार, चंदूलाल सागरनाथ परमार (रा. वडगाव, जि. पालमपूर, गुजरात), जयपाल एस. परमार (रा. पालनपूर, गुजरात) यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. शिरवळ येथे वैद्य यांचा शोभेच्या फटाक्यांचा कारखाना आहे. ते धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे त्यांच्याकडे नेहमी साधु व बाबांचे येणे-जाणे असायचे. परमार याने त्यांच्याकडे जाऊन शिधा नेला होता. त्या वेळी ‘तुम्हाला धंद्यात अडचणी आहेत, त्यावर उपाय सांगतो,’ असे त्याने सांगितले.

‘मी तुम्हाला अक्षयकुंभ देतो, त्याने सगळ्या अडचणी दूर होतील. तुमच्या १०० पिढ्यांना पुरेल इतके धन मिळेल,’ अशी त्याने बतावणी केली. त्यासाठी स्मशानभूमीमध्ये विधी करावा लागेल, असे सांगत नऊ हजार रुपये घेतले. अडथळे दूर झाल्याशिवाय अक्षयपात्रातून धन मिळणार नसल्याचे सांगून आणखी एका पूजेसाठी ४० हजार रुपये घेतले. त्यानंतर सागरनाथ याने वैद्य यांना घेऊन पूजा घातली. त्याने आणलेल्या मडक्यामधून कापड बांधून त्याने ५० व १०० रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडला. ‘या अक्षयकुंभातून जेव्हा पाहिजे तेव्हा पैशांचा पाऊस पाडू शकाल. पण, तुमच्यावर करणी केली असून आळंदी येथील स्मशानभूमीमध्ये पूजा घालण्यासाठी १२ लाख रुपये द्या. पैसे न दिल्यास वचनात अडकल्यामुळे बारा भुतांचा कोप होईल,’ अशी भीती आरोपींनी फिर्यादीस दाखविली.

घाबरलेले वैद्य यांनी दीड लाख रुपये दिले. त्यानंतर पुन्हा परमारचा फोन आल्यावर पत्नी व आईचे दागिने बँकेत गहाण ठेवून आठ लाख रुपये व मुदत ठेवी मोडून चार लाख असे बारा लाख त्याला पाठवले. त्यानंतर त्याने पुन्हा आणखी पाच लाख मागितले. हे पैसेही अंगडियामार्फत गुजरातला पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांना सागरनाथ यांना रक्ताची उलटी झाल्याचे सांगून करणी तुमच्यावर उलटणार असल्याची भीती घातली. बाबांचा मृत्यू झाल्यास मृतदेह घरी आणून टाकण्याची भीती घातली. त्यामुळे वैद्य यांनी दहा लाख रुपये जयपालच्या खात्यावर वर्ग केले. त्यानंतरही पूजा घालण्यासंदर्भात आरोपी त्यांना फोन करीत राहीला. वैद्य यांना फसवले गेल्याची जाणीव होताच त्यांनी आरोपीचे फोन घेणे बंद केले. शिक्रापूर पोलिसांकडे अशाच स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांनी आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंडाळा बोगद्यात दरड कोसळून रेल्वे कर्मचारी ठार

$
0
0

लोणावळा : पुणे-मुंबई लोहमार्गावर अप मार्गावर खंडाळा घाटातील मंकी हिल व नागनाथ बोगद्याजवळील बोगदा क्रमांक सहाच्या तोंडावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, सात कर्मचारी जखमी झाले आहेत. यामध्ये रेल्वेच्या पाच कंत्राटी व दोन कायम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दोन जखमी कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर रेल्वे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याने रेल्वेसेवेवर कोणताही परिणाम झाला नाही.

चंदनकुमार पाठभ (२५, रा. बिहार) असे दरड दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. कुंदनकुमार मकान प्रसाद (२२, रा. बिहार), प्रभाकर इंदोरे (२२), जगन उघडे (२७), संदीप हिंदोळे (१८, सर्व रा. ठाकूरवाडी, रायगड) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. दुपारच्या जेवणानंतर काही कर्मचारी पाणी पिण्यासाठी जात असताना बोगद्याच्या वरच्या पठारावरील एक सैल झालेली दरड सुमारे १०० ते १२० फूट उंचीवरून रेल्वेच्या बोगद्याच्या तोंडावर कोसळली. जादा रेल्वे कर्मचाऱ्यांची कुमक मागवून युद्ध पातळीवर रेल्वेट्रॅकवर पडलेल्या दरडी बाजूला करण्याच्या व तुटलेले रुळ जोडण्याच्या कामाला सुरुवात झाली. पठारावरील सैल झालेल्या दरडी हटविण्याचे कामही सुरू झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडला खुनाचा धक्कादायक घटनाक्रम

$
0
0

पिंपरी : एकटक बघण्याचा जाब विचारत तक्रार करण्याची तंबी दिल्याने इन्फोसिस कंपनीतील इंजिनिअर रसिला ओपी हिचा खून केल्याची धक्कादायक कबुली सुरक्षारक्षक भाबेन सैकिया याने दिली आहे. रसिला हिचे बी. टेक.पर्यंतचे शिक्षण पुण्यातील कॉलेजमध्ये झाले. गेल्या चार वर्षांपासून ती पुण्यात राहत असून, सध्या इन्फोसिस कंपनीत काम करीत होती.

बेंगळुरू आणि पुणे येथून १५ जणांची टीम एका बहुराष्ट्रीय फुड अँड बेव्हरेज चेन मार्केटसाठी ‘इन्फोसिस’अंतर्गत काम करते. ऑनलाइन पद्धतीने बेंगळुरू आणि हिंजवडी येथील टीम संपर्कात असतात.शनिवारी भाबेन तिच्याकडे एकटक बघत होता. याबाबत जाब विचारून तक्रार करणार असल्याचे रसिला हिने भाबेन याला सुनावले होते. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा कंपनीत आल्यावर भाबेन याने तक्रार केली का, असे विचारले होते. याच वेळात ती कामाच्या ठिकाणाहून मीटिंग रूममध्ये गेली. भाबेन हादेखील तिच्याशी बोलत तेथे गेला. त्यानंतर कम्प्युटरचे क्रमांक घ्यायचे आहेत, असा बहाणा करून तो वारंवार तेथे जात होता.

या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक अॅक्सेस कार्डची गरज होती. रसिलाकडून त्याने हे कार्ड घेतले. त्यानंतर रसिला हिचा खून केला. तसेच नंतर शांत डोक्याने तो बाहेर आला. ऑनलाइन काम सुरू असताना कोठारी व अन्य एक प्रमुख दोन्ही टीमवर लक्ष ठेवून असतात. रविवारी काही कालावधीनंतर रसिला हिचा बेंगळुरू येथील कंपनीशी संपर्क तुटला. त्यांनी वारंवार तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिचा प्रतिसाद येत नव्हता. हाच अनुभव कोठारी यांनादेखील आला. त्यामुळे त्यांनी कंपनीशी संपर्क साधून तत्काळ तिचा शोध घ्या, असे सांगितले. पण कोणत्याही विभागात जायचे झाल्यास इलेक्ट्रॉनिक अॅक्सेस कार्ड लागते. ते संबंधितांकडे नव्हते. त्यामुळे त्यांनी पुन्हा काही लोकांशी संपर्क करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती नवव्या मजल्यावर मीटिंग रूममध्ये मृतावस्थेत आढळून आली.

‘महिला सुरक्षारक्षक नेमा’

‘झिरो टॉलरन्स टू ऑल टाइप्स ऑफ व्हायोलन्स अगेन्स्ट विमेन’ हा प्रकल्प पोलिसांनी हाती घेण्याचीही मागणी शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे. सुरक्षारक्षक कंपन्यांत महिलांचा समावेश करून आयटी कंपन्यांत महिला सुरक्षारक्षकांच्या नेमणुका करण्याच्या सूचना आयटी कंपन्यांना देण्याची मागणीदेखील आमदार डॉ. गोऱ्हे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात स्कूल बस, रिक्षा, टॅक्सीचा संप

$
0
0

पुण्यात स्कूल बस, रिक्षा, टॅक्सीचा संप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

परिवहन शुल्कवाढीच्या विरोधात आज, मंगळवारी चक्का जाम आंदोलन आणि शहरात रिक्षांचा संप पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करून दोनशे जादा गाड्या सेवेत सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार परिवहन विभागाने दहापटीपर्यंत केलेल्या शुल्कवाढीविरोधात बहुतांश रिक्षा संघटनांनी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी व मालवाहतूकदार संघटनेच्या संयुक्त कृती समितीतर्फे राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे टॅक्सी, स्कूल व्हॅन, ट्रक, टॅम्पो, खासगी बस आदी वाहनेही बंद राहणार आहेत. या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामगार सेल व रिक्षाचालक मालक संघटनाही आंदोलनात सक्रिय सहभागी होणार आहेत.

दरम्यान, रिक्षाचालकांच्या संपामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळित होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पीएमपीने पुणेकरांच्या सोयीसाठी पावले उचलली. सर्व डेपो मॅनेजर व वर्कशॉप मॅनेजरनी बंद बसचा आढावा घेऊन, नियमित ताफ्यापेक्षा सोमवारी दोनशे जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंगळवारी पीएमपीच्या एकूण १७०० बस मार्गावर असणार आहेत; तसेच ड्रायव्हर, कंडक्टर यांच्यासह तिकीट तपासनीस, डेपो मॅनेजर, स्टार्टर, क्लार्क आदींच्याही साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांना महत्त्वाच्या थांब्यांवर ड्युटी लावण्यात आली आहे, अशी माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.

शुल्कवाढीचा ‌निषेध

परिवहन विभागाने २९ डिसेंबरपासून नवीन वाहन नोंदणी (दुचाकी) ६० रुपयांऐवजी ३०० रुपये, खासगी चारचाकी वाहनांसाठी २०० रुपयांवरून ६०० रुपये, मध्यम प्रवासी वाहनांसाठी ४०० वरून एक हजार रुपये शुल्क केले आहे. दुचाकीवर कर्ज बोजा चढविण्यासाठी १०० रुपयांवरून पाचशे रुपये, रिक्षावर कर्ज बोजा चढविण्यासाठी १०० रुपयांवरून दीड हजार रुपये आणि मध्यम व जड वाहनांसाठी कर्ज बोजा चढविण्यासाठी १०० रुपयांवरून तीन हजार रुपये शुल्क वाढविण्यात आले आहे. त्याचा वाहतूकदार संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. आज, मंगळवारी होणाऱ्या चक्का जामच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी खासगी वाहनांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना कारमधून दूध, भाजीपाला, फळे, खाद्यतेल, अन्नधान्य व औषधांची वाहतूक करणे शक्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

येथे चिंचवडजवळ रुळाला तडे गेल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वेवाहतूक आज पहाटे सुमारे सव्वा तास खोळंबली होती. रुळ दुरुस्त करण्यात आल्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास वाहतूक पुन्हा सुरू झाली.

चिंचवड व आकुर्डी दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याचे सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी लक्षात आले. त्यानंतर तातडीने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेससह तीन लांब पल्ल्याच्या गाड्या अलिकडेच वेगवेगळ्या स्थानकांवर थांबविण्यात आल्या होत्या. पुणे-लोणावळा मार्गावरील लोकलचाही खोळंबा झाला होता. सकाळीच रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीयर रसिलाच्या हत्येमागे कंपनीतील वरिष्ठ?

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील इन्फोसिस कंपनीच्या कार्यालयात रविवारी झालेल्या इंजिनीयर तरुणीच्या हत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. या हत्येमागे एकटा सुरक्षारक्षक नसून तिच्या वरिष्ठांचाही यात सहभाग असू शकतो, असा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.

मूळची केरळमधील कोझीकोडे येथील असणारी २२ वर्षीय रसिला राजू ओपीची रविवारी तिच्या कार्यालयातच गळा आवळून हत्या करण्यात आली होती. एकटक बघणाऱ्या सुरक्षारक्षकाला हटकल्यानं तिची हत्या झाल्याची माहिती पोलीस तपासात पुढं आली आहे. मात्र, रसिलाच्या वडिलांना हे मान्य नाही. रसिलानं तिच्या वरिष्ठांकडे वारंवार बदलीची मागणी केली होती. पण तिला ती मिळाली नाही, असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे. शिवाय, सुरक्षारक्षक कार्यालयात कसा पोहोचला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ज्या सुरक्षारक्षकानं रसिलाचा खून केला. त्याच्याविरोधात तिनं आधीच वरिष्ठांकडं तक्रार केली होती. मात्र, त्याकडं दुर्लक्ष केलं गेलं, असा आरोप रसिलाच्या काकांनी केला आहे. कुटुंबीयांच्या या आरोपामुळं खळबळ उडाली असून पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरू केल्याचं समजतं.

रसिलाच्या हत्येप्रकरणी सुरक्षारक्षक भाबेन सैकियाला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसिलाच्या कुटुंबियांना एक कोटीची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी, पुणे

इंजिनिअर रसिला राजू ओपी हिच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत (सानुग्रह अनुदान) देण्याची घोषणा इन्फोसिस कंपनीने केली आहे. तसेच तिच्या कुटुंबियातील एका व्यक्तीला इन्फोसिस कंपनी नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे. याशिवाय विम्याची रक्कमदेखील कुटुंबियाना दिली जाणार असल्याचे पत्र कंपनीने रसिलाच्या वडिलांना दिले आहे.

एकटक बघण्याचा जाब विचारत तक्रार करण्याची तंबी दिल्याने इन्फोसिस कंपनीतील इंजिनिअर रसिला ओपी हिची हत्या केल्याची धक्कादायक कबूली सुरक्षारक्षक भाबेन सैकिया याने दिली आहे. कंपनीच्या (हिंजवडी फेज २) रविवारी (२९ जानेवारी) सायंकाळी कंम्प्युटरच्या केबलने गळा आवळून रसिलाची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर भाबेनने दोन तास ड्युटी केल्यानंतर निघून गेला. रात्री घटना समजल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. आसाममधील मूळगावी पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भाबेनला पोलिसांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनकावरून अटक केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकारकडून कष्टकऱ्यांना त्रास’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘कष्टकऱ्यांना त्रास देऊन आपण सरकार चालवू शकतो, असे भारतीय जनता पक्षाला वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. येणाऱ्या निवणुकांमध्ये आम्ही आमचे मत वाया जाणार नाही, याची खबरदारी घेऊ,’ असा इशारा रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी मंगळवारी दिला.

परिवहन शुल्क वाढीविरोधात माल व प्रवासी वाहतूकदार संघटना संयुक्त कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. टिंबर मार्केट येथील रिक्षा पंचायतीच्या कार्यालयापासून हा मोर्चा सुरू झाला. डॉ. आढाव यांनी मोर्चाचे नेतृत्त्व केले. केंद्र सरकारच्या आदेशाने राज्याच्या परिवहन विभागाने शुल्कामध्ये अवास्तव पटीत वाढ केली आहे. या शुल्क वाढीचा फटका सामान्य नागरिकांसह रिक्षा, टेम्पो, टॅक्सी, ट्रक, बस चालक यांना बसणार आहे. त्याबरोबरच दंडाच्या रकमेत मनमानी पद्धतीने वाढ केली आहे. हा शुल्कवाढीचा निर्णय तत्काळ रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सादर करण्यात आले. या वेळी नितीन पवार, बाबा शिंदे, राजू घाटोळे, नाना क्षीरसागर, संजय कवडे, श्रीकांत आचार्य, बाबा कांबळे, नवनाथ बिनवडे, अशोक साळेकर, खलील पठाण, राम कदम यांच्यासह माल वाहतूकदार, रिक्षाचालक, स्कूल व्हॅनचालक, कष्टकरी, हमाल, मापाडी, तोलणार, कामगार आदी सहभागी झाले होते. ‘सध्या या विषयावर शिवसेना आपल्यासोबत आहे. मात्र, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुल्क वाढ मागे घेण्यासाठी पावले उचलायला हवीत,’ असे डॉ. आढाव म्हणाले.

‘शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी उपोषण केले असता, त्या वेळी सरकारकडून पालकमंत्री गिरीश बापट यांनी भेट दिली होती. बापट यांनी मागण्या मान्य करण्याचे अश्वासन दिले होते. मात्र, ते अश्वासन सरकारने पाळले नाही. त्यामुळे आता परिवहन शुल्कवाढ मागे घेईपर्यंत लढा सुरूच ठेवावा लागणार आहे. आजचे आंदोलन एक इशारा आहे. मागणी मान्य न झाल्यास सरकारला धडा शिकविण्यासाठी येत्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल,’ असे डॉ. आढाव यांनी स्पष्ट केले.

सर्व संघटना प्रथमच एकत्र

राज्यातील रिक्षा चालक-मालक संघटना डॉ. बाबा आढाव आणि कै. शरद राव यांच्या नेतृत्वाखाली विभागल्या गेल्या आहेत. पुण्यात १९८०नंतर प्रथमच या दोन्ही नेत्यांना मानणाऱ्या सर्व संघटना या शुल्कवाढी विरोधात मंगळवारी रस्त्यावर एकत्र उतरल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘काँग्रेस, राष्ट्रवादीला यंदा हद्दपार करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी लोणावळा

‘मी येथे कमळाचा प्रचार करायला आले आहे. भ्रष्टाचाराने ज्यांचे हात बरबटले आहेत तेच आमच्यावर आरोप करीत आहेत. जर आपल्याला बदल हवा असेल, तर देश आणि राज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मत देवून राष्ट्रवादी व काँग्रेसला हद्दपार करा,’ असे आवाहन महिला बालकल्याण व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर मावळातील कामशेत येथे भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. या वेळी मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, मावळ भाजपचे अध्यक्ष प्रशांत ढोरे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रूपलेखाताई ढोरे, केशवराव वाडेकर, भास्कर म्हाळसकर, नगराध्यक्षा सुरेखा जाधव व चित्रा जगनाडे, अविनाश बवरे, सविता गावडे, मंगलताई भेगडे, गुलाबराव वरघडे, दत्तात्रय गुंड, पंचायत समितीच्या सभापती मंगल वाळुंजकर, उपसभापती गणेश गायकवाड, बाळासाहेब घोटकुले, सुनील शेळके, गणेश भेगडे, रामनाथ वारिंगे, ज्ञानेश्वर दळवी, माऊली शिंदे, एकनाथ टिळे, चंद्रशेखर भोसले आदी उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणल्या, ‘आजपर्यंत ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत तेच आता आमच्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्यांच्या सरकारने सामन्य माणूस कंगाल केला असून, विकासाच्या नावाखाली त्यांनी विकासाचा पैसा नातेवाइक व स्वकीयांच्या विकासासाठी वापरला. आम्ही राज्याच्या विकासासाठी राजकारण न करता सत्ताधारी व विरोधी असा भेदभाव करत नाही. विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदार संघातील विकास कामासाठी निधी वाटपातही भेदभाव करत नाही. भाजप केवळ घोषणाबाजी करत नाही, तर त्याची अंमलबजावणी करणारा पक्ष आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘योग्य धोरण, नियोजनाची गरज’

$
0
0

‘योग्य धोरण, नियोजनाची गरज’

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘पुणे वेगाने विकसित होत असले, तरी पुण्यापुढे काही आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी योग्य धोरण आणि पुरेशा नियोजनाची गरज आहे. त्यासाठी सरकार, उद्योगजगत, शैक्षणिक क्षेत्र आणि नागरिक यांच्यामध्ये योग्य समन्वयाची गरज आहे,’ असा सूर ‘रॉकफेलर फाउंडेशन’तर्फे आयोजित ‘१०० रेझिलिएंट सिटीज’ कार्यशाळेत मंगळवारी उमटला.
‘रॉकफेलर फाउंडेशन’तर्फे गेल्या वर्षी जगभरातील ‘१०० रेझिलिएंट सिटीज’ची निवड करण्यात आली. यात पुण्यासह भारतातील एकूण पाच शहरांची ‘रेझिलिएंट सिटी’ म्हणून निवड झाली आहे. त्यासाठी व्यापक विचारमंथन करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजिण्यात आली होती. पुणे महापा‌लिकेचे आयुक्त कुणाल कुमार, ‘१०० रेझिलिएंट सिटीज’चे आशिया-पॅसिफिक क्षेत्रासाठीचे सिटी अँड प्रॅक्टिस मॅनेजमेंट विभागाचे सहसंचालक विक्रम सिंग या वेळी उपस्थित होते.
‘स्मार्ट सिटी म्हणून निवड झालेल्या पुण्यापुढे भविष्यात अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी सुरुवातीपासून योग्य नियोजन व अंमलबजावणीची गरज आहे. त्यासाठी रॉकफेलर फाउंडेशनच्या रेझिलिएंट सिटी उपक्रमातून मिळणारी मदत फायद्याची ठरेल,’ असे कुणाल कुमार यांनी सांगितले.

पुण्याला काय मिळणार
‘या कार्यशाळेत झालेल्या चर्चेवर आधारित एक कृती अहवाल तीन महिन्यांत तयार केला जाईल. त्याचबरोबर शहर प्रशासन, नागरिक आणि १०० रेझिलिएंट सिटी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी चीफ रेझिलिएंट ऑफिसरची नेमणूक केली जाईल. जगविख्यात तज्ज्ञांची मदत आणि मार्गदर्शन मिळू शकणार आहे,’ असे सिंग यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस वेवरील टोल बंद करण्याची मागणी

$
0
0

एक्स्प्रेस वेवरील टोल बंद करण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर टोल आकारणीचे उद्दीष्ट नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झालेले आहे. मात्र, त्यानंतरही टोल वसुली सुरूच आहे. त्यामुळे राज्य सरकारने येत्या १५ दिवसांत टोल वसुली बंद करावी अन्यथा मुख्यमंत्री, राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) मंत्री व व्यवस्थापकीय संचालक यांच्याविरोधात गुन्हा तक्रार दाखल करण्याचा इशारा सजग नागरी मंचाने दिला.
एक्स्प्रेस वेवर ऑगस्ट २०१९ पर्यंत दोन हजार ८६९ कोटी रुपये टोलद्वारे वसूल करण्याचे उद्दीष्ट होते. ऑक्टोबर २०१६ अखेर २८६७ कोटी रुपये वसूल झाले होते. नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीच्या निर्णयानंतर टोल आकारणी बंद ठेवल्यामुळे संपूर्ण महिन्यात केवळ १३ कोटी जमा झाले. त्याचवेळी टोल वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण झाले. मात्र, त्यानंतरही टोल वसुली सुरूच ठेवल्याने डिसेंबर महिन्यात ४३ कोटी रुपये अतिरिक्त जमा झाले असून जानेवारीत अद्यापही टोल वसुली सुरूच आहे. याबाबत मुख्यमंत्री, ‘एमएसआरडीसी’चे मंत्री एकनाथ शिंदे व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना टोल आकारणी बंद करण्याचे निवेदन दिले आहे. अजून त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्र्यांना आम्ही १५ दिवसांची मुदत देत आहोत. या १५ दिवसांत टोल आकारणी बंद न केल्यास तिघांच्या विरोधातही अँटी करप्शन विभागाकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘एक्स्प्रेस वेवर टोल‘पूर्ती’ झाल्यापासून आम्ही टोल‘मुक्ती’साठी प्रयत्न करीत आहोत. सर्व संबंधितांना याबाबत सातत्याने पत्रव्यवहार केला आहे; तसेच कायदेशीर नोटीसही पाठविली आहे. आता राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास आम्ही कोर्टात धाव घेऊ,’ असा इशाराही त्यांनी दिला. संजय शिरोडकर, प्रवीण वाटेगावकर आणि श्रीनिवास घाणेकर या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनएफएआय’ला ‘चेतना’

$
0
0

‘एनएफएआय’ला ‘चेतना’

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफएआय) संग्रहात चित्रपट व चित्रपटांशी दुर्मिळ साहित्याचा समावेश झाला आहे. २५ बंगाली व हिंदी दुर्मिळ चित्रपट, गाण्यांची पुस्तके, छायाचित्रे, पोस्टर्स व ‘चेतना’ या चित्रपटाची मूळ लिखित प्रत संग्रहालयाला उपलब्ध झाली आहे. शर्बोन संध्या हा बंगाली (१९७३), सुचित्रा सेन यांचा पहिला चित्रपट असलेला चंद्रनाथ (१९५७), राजबोधू (१९८२) हे दुर्मिळ चित्रपट ३५ एमएम या प्रकारात मिळाले आहेत.
‘संग्रहालयाला गेल्या आठवड्यात अंजन बर्वे व नरेश बोडे या संग्रहकांनी एक हजार गाण्यांची पुस्तके, चित्रपट विषयक पुस्तके, छायाचित्र व पोस्टर्स जतन करण्यासाठी दिली आहेत. कोलकाता येथील एका व्यक्तीने १६ एमएम या दृश्य प्रकारातील २५ चित्रपटांच्या प्रती संग्रहालयाकडे सुपूर्द केल्या आहेत,’ असे संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
१९७० मधील ‘चेतना’ या चित्रपटाची मूळ प्रत दीप्ती नवल यांनी दिली आहे; तसेच त्यांनी दिग्दर्शित केलेला २००८ मधील ‘दो पैसे की धूप, चार आणे की बारीश’ हा चित्रपट मिळणार आहे. प्रदर्शित न झालेला हा चित्रपट नवल यांच्या उपस्थितीत लवकरच दाखवला जाऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोरयाच्या जयघोषात रंगला जन्मोत्सव सोहळा

$
0
0

गणेश दर्शनासाठी रांगा; माघी चतुर्थीनिमित्त विविध कार्यक्रम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
फुलांच्या आकर्षक रचना, रांगोळ्यांचे रेखीव गालिचे आणि रोषणाईने सजविलेल्या गणपती मंदिरांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच मंत्रोच्चाराला सुरुवात झाली. अथर्वशीर्ष पठण, गणेश वंदन, गणेश यागाबरोबरच धार्मिक विधी करून भक्तांनी उत्साहात गणेश जन्माचे स्वागत केले. शहराच्या विविध भागातील गणपती मंदिरांबरोबरच मंडळांतील गणपतीच्या दर्शनासाठी भाविकाच्या दिवसभर रांगा लागल्या होत्या.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणेश मंदिरामध्ये सुभाष सरपाले यांनी केलेली फुलांची आकर्षक सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी पहाटे चार ते सहा या वेळेत लोकप्रिय भक्ती रचना सादर करून गणरायासमोर सेवा रूजू केली. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ट्रस्टने केलेल्या बोधचिन्हाचे या वेळी प्रकाशन करण्यात आले. या स्वराभिषेकानंतर सकाळी गणेश याग करण्यात आला. सुहासिनींनी अथर्वशीर्ष पठण केले. वाघेश्वरी मंडळाच्या महिलांनी गणेश वंदना सादर केली. संध्याकाळी फुलांनी सजविलेल्या रथामध्ये पालखी ठेवून नगर प्रदशिक्षणा काढण्यात आली. गणरायाच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती.
श्री देवदेवेश्वर संस्थानच्या वतीने सारसबाग, रमणा गणपती आणि दशभुजा गणपती मंदिरामध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सारसबाग मंदिरामध्ये सकाळी गणेश याग, किर्तन आणि संध्याकाळी प्रसिद्ध गायिका मंजिरी आलेगावकर यांचे गायन झाले. पहाटेपासून मंदिरामध्ये भाविकांची वर्दळ पाहायला मिळाली.
सनईचे मंजुळ स्वर, वेदमंत्रांचा घोष, ब्रह्मणस्पती सूक्त, ज्ञानसूक्त आणि अन्नसूक्ताचा अभिषेक, महाआरती, ‘मंगलमूर्ते विघ्नहरा दूरित नाशना कृपा’चा जप आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी अशा चैतन्यमय वातावरणात वेदभवनात दुपारी बारा वाजता श्री गणेशाचा जन्म झाला. वेदभवनचे प्रमुख आचार्य मोरेश्वर घैसास गुरुजीनी महापूजा करून गणेश जन्मसोहळ्याचा प्रारंभ केला. या वेळी आचार्यांबरोबर विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष, शंकराचार्यरचित मुदकरात स्तोत्र पठण केले. श्री मोरया गोसावी यांनी लिहिलेल्या गणेशाच्या ‘श्री देव देव गणनायक सुख सौख्यदाता’ या अष्टोत्तरशत नामस्तोत्रांनी गणेशावर गुलाल उधळण्यात आला. त्यानंतर सर्वांनी पाळणा म्हटला. शहराच्या विविध भागातील गणपती मंदिरांमध्येही उत्साहात गणेश जयंती साजरी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images