Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘रेल्वेची क्षेत्रीय सल्लागार समिती हवीच कशाला?’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीतील सदस्यांच्या विविध मागण्यांकडे आणि प्रश्नांकडे गांभीर्याने पाहायचे नसेल, तर रेल्वे प्रशासनाला ही समिती हवीच कशाला, असा प्रश्न विविध समित्यांच्या सदस्यांनी उपस्थित केला. या प्रकाराविरोधात प्रशासनाविरुद्ध रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला आहे.

रेल्वेच्या प्रत्येक झोनसाठी दोन वर्षांकरिता स्वतंत्र क्षेत्रीय सल्लागार समिती नेमली जाते. या समितीची बैठक वर्षातून किमान तीन वेळा होणे अपेक्षित असते; मात्र नवीन समितीला एक वर्ष होऊनही आतापर्यंत केवळ एकच बैठक झाली आहे. बैठक घेण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असते; मात्र प्रशासनाकडून सदस्यांना दाद दिली जात नसल्याची तक्रार राज्यातील सदस्यांनी केली. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व कर्नाटक या राज्यांतील क्षेत्रीय समित्यांच्या काही सदस्यांची बैठक झाली. विकास देशपांडे, मोहनलाल भंडारी, कांचन खरे, घनःश्याम गांधी, मधू कोटियान, शिवाजी नरहरे यांच्यासह २५हून अधिक सदस्य या बैठकीला उपस्थित होते.

सदस्यांनी केलेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. रेल्वे प्रशासन व प्रवाशांमधील दुवा असलेल्या सदस्यांनाच अशी वागणूक मिळत असल्याबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत लवकरच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व रेल्वे मंडळाकडे तक्रार करण्यात येणार आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जवानांच्या त्यागाची जाणीव हवी

$
0
0

डी. बी. शेकटकर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘देशसेवेची भावना जवानांना मृत्यूशी लढण्याचे बळ देते. सैन्यात काम केल्याने जवानांची परिस्थिती आणि त्यांचा त्याग मी अनुभवला आहे. त्यामुळे देशासाठी लढताना जो त्याग जवान करतात त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे,’ असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. बी. शेकटकर यांनी व्यक्त केले.

वानवडी येथील ‘वीरस्मृती’ या वास्तूच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वीरस्मृती सुवर्णमहोत्सव कृतज्ञता समिती आणि सैनिक मित्र परिवारातर्फे वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, लेफ्टनंट (निवृत्त) कर्नल बिपिन शिंदे, पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे सदस्य विनोद मथुरावाला, ‘सैनिक मित्र परिवार’चे अध्यक्ष अशोक मेहेंदळे, उपाध्यक्ष आनंद सराफ, समितीचे खंडेराव जठार आदी उपस्थित होते. या वेळी २६ वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला.

शेकटकर म्हणाले, ‘सैन्यामध्ये कार्यरत असताना १९७१ साली झालेल्या युद्धात मी मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा आलो ते फक्त देशसेवेच्या भावनेमुळेच. देशसेवेचे काम इमानदारीने केल्यास आपण सैन्यादलसह इतर कोणत्याही क्षेत्रात उच्च पदापर्यंत पोहचू शकतो. देशसेवा हा धर्म मानून जवान सीमेवर आणि अंतर्गत सुरक्षेकरिता काम करतात. त्यामुळे आजच्या तरुणाईने त्यांचा आदर्श घ्यायला हवा.’

हुतात्मा आणि वीर जवानांच्या कुटुंबीयांना मायेची सावली देण्यासाठी १९६७ साली वीरस्मृती या वास्तूची पायाभरणी करण्यात आली. बलिदान व त्यागाचे प्रतीक असलेल्या या वास्तूच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त, राष्ट्राकरिता प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यापुढेही जवान व त्यांच्या कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परिवारातर्फे विविध कार्यक्रम केले जाणार आहेत, असे सराफ यांनी सांगितले. प्रा. दत्तात्रय बांदल यांनी सूत्रसंचालन केले. अनिल जिमन, सुनील मोरे, संतोष गोरे, अनिल गोरे, अजय मोरे, शिवाजी जगताप यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दभिं’ची समीक्षा मूलगामी होती

$
0
0

भारत सासणे यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘चिंतनशील बैठक आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हे ‘दभिं’चे अंगभूत वैशिष्ट्य होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेममय होते. ते इतरांना सतत मार्गदर्शन करत असत. त्यांची समीक्षा एका आपसूक लयीत प्रकट होत असे. ती मौलिक आणि मूलगामी होती,’ अशी भावना ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स्वायत्त मराठी विद्यापीठ, बदलापूर यांच्यातर्फे समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘स्मरण दभिंचे’ या कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाचे संस्थापक श्याम जोशी, प्रसिद्ध अनुवादक रवींद्र गुर्जर, पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे, परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते.

जाखडे म्हणाले, ‘डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या सहवासामुळे मी समृद्ध झालो. साहित्य व्यवहारात मला कोणतीही अडचण निर्माण झाल्यास ‘दभिं’चे नेहमीच पाठबळ मिळायचे.’ श्याम जोशी म्हणाले, ‘वादग्रस्त व्यामिश्र, अनुभवसंपन्न आणि ललितकलाचातुर्य असणारे विद्वान, असे ‘दभिं’चे वर्णन करता येईल. त्यांच्या नावे ग्रंथ लिहायचा झाला, तर त्याचे नाव ‘दभि - एक महाभारत’ असेच ठेवावे लागेल. समीक्षा किती लालित्यपूर्ण होऊ शकते, यांचा वस्तुपाठ म्हणजे त्यांचे लेखन होते.’

‘साठोत्तरी मराठी समीक्षेचे पात्र ‘दभिं’नी आपल्या समीक्षालेखनातून अधिक रुंद केले. ते अभिरुचीशी प्रामाणिक असणारे व्रतस्थ समीक्षक होते. त्यांच्या अभिरुचीचा भंग करणाऱ्या साहित्याची त्यांनी कधीही भलावण केली नाही. महाकाव्य ते महाकथा अशी ‘दभिं’च्या समीक्षेची झेप होती. ते म्हणजे वाङ्मयप्रेमाने झपाटलेला महावृक्ष होते,’ असे मत प्रा. जोशी यांनी व्यक्त केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. वि. दा. पिंगळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संमेलनाध्यक्षाचे आत्मकथन’ येतेय

$
0
0

डॉ. श्रीपाल सबनीस यांनी नऊ दिवसांत लिहिले वर्षभराचे ‘संचित’

Chintamani.Patki@timesgroup.com

Tweet: @chintamanipMT

पुणे : साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या गाजलेल्या अध्यक्षीय कारकिर्दीवर आधारित असलेले पुस्तक आता लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे. ‘संमेलनाध्यक्षाचे आत्मकथन’ या पुस्तकातून डॉ. सबनीस यांनी आपले अनुभव मांडले आहेत. अध्यक्ष होण्याआधीपासूनच सातत्याने चर्चेत राहिलेल्या डॉ. सबनीस यांच्या पुस्तकातून आता वाचक आणि साहित्यिकांना वाद-संवादासाठी कोणते खाद्य मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

डॉ. सबनीस यांची अध्यक्षीय कारकीर्द डोंबिवली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात संपणार आहे. त्याआधीच ‘संमेलनाध्यक्षाचे आत्मकथन’ हे पुस्तक अवघ्या नऊ दिवसांत लिहून सबनीस यांनी आपला ‘संवाद व संघर्ष’ सुरू ठेवला आहे. गेल्या संमेलनाआधी सबनीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील विधान वादग्रस्त ठरले होते. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अशा बड्या नेत्यांसह सामान्य माणसाशी संवादाचे प्रसंग कसे आले व व्यक्ती कशा भावल्या हे संवाद पर्वातून मांडण्यात आले आहे. संजीव पुनाळेकर, खासदार अमर साबळे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, विश्वास पाटील, डॉ. माधवी वैद्य, रामदास फुटाणे व डॉ. सदानंद मोरे यांच्याशी झालेल्या संघर्षाचे प्रसंग व त्यावरील डॉ. स्वतःचे मत संघर्ष पर्वात मांडले आहे.

‘वर्षभराच्या अध्यक्षीय कारकिर्दीवर मी समाधानी आहे. परंतु अनेक संघर्षाचे प्रसंग व नाट्यमय घडामोडी गेल्या पंधरा महिन्यांत घडल्या आहेत. तसेच काही संवादाचे चांगले प्रसंगही घडले आहेत. याचा वेध मी पुस्तकातून घेतला आहे. १४ जानेवारीला लिखाण सुरू केले व २३ जानेवारी रोजी म्हणजे नऊ दिवसांत लिखाण पूर्ण झाले,’ असे सबनीस यांनी ‘मटा’ला सांगितले.

…………

वर्षभरात वैचारिक संघर्ष न होता, तो व्यक्तिवादी झाल्याचे दु:ख वाटते. माझ्यावर केवळ शेरेबाजी करण्यात आली. मी तुमची पुण्याई मान्य करतो, मग तुम्ही माझी पुण्याई अमान्य का करता, असे माझे म्हणणे आहे. पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात वैचारिक वाद होत नाहीत, हे दुर्दैव आहे.
- डॉ. श्रीपाल सबनीस

………


सहा लाखांचा हिशेब देणार

डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या म्हणण्यानुसार संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यापासून गेल्या पंधरा महिन्यांत त्यांनी ७० ते ८० हजार किलोमीटर प्रवास केला असून, साडेतीनशेहून अधिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहिले आहेत. कार्यक्रमांतून १२ लाख रुपये मानधन मिळाले आहे. संमेलनाध्यक्षाला एवढे मानधन मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. साहित्य महामंडळाने दिलेल्या एक लाख रुपयांच्या निधीसह पिंपरीच्या संमेलनाच्या आयोजकांनी दिलेल्या पाच लाख रुपये निधीचा हिशेब ते देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट संग्रहालयांची घोषणा हवेत विरली

$
0
0

केंद्रीय सचिव मित्तल यांनी केले घूमजाव

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याराज्यांमध्ये चित्रपट संग्रहालयांची स्थापना करण्याची घोषणा सहा महिन्यांपूर्वीच करणाऱ्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांनी ‘सध्या तरी नवी चित्रपट संग्रहालये विचाराधीन नाहीत,’ असे सांगत घूमजाव केले आहे. ‘एनएफएआय’तर्फे आयोजित ईशान्य भारतीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘पुण्यातील चित्रपट संग्रहालय आणि सुसज्ज करण्यावर भर देणार आहे. चित्रपट जतन करण्यासाठी आवश्यक क्षमता वाढवणार असून, राज्याराज्यांमध्ये चित्रपट संग्रहालये करण्याचा सध्या कोणताही मानस नाही,’ असे प्रतिपादन त्यांनी केले. ‘पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या धर्तीवर (एनएफएआय) विविध राज्यांतील प्रमुख शहरांमध्ये राज्य चित्रपट संग्रहालये सुरू करण्यात येतील. चित्रपट जतनाचे काम वाढावे, तसेच त्या-त्या राज्यांतील चित्रपटांचा ठेवा जतन व्हावा, या उद्देशाने राज्याराज्यांमध्ये संग्रहालये गरजेची असून, राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमेसाठी २०२१पर्यंत सहाशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत,’ अशी घोषणा मित्तल यांनी ऑगस्ट महिन्यात ‘एनएफएआय’च्या भेटीदरम्यान केली होती.

‘चित्रपटांची उज्ज्वल परंपरा जतन करण्याचे काम एकाच ठिकाणी होत असल्याने अनेक अडचणी येत आहेत. ते वाढवण्यासाठी आगामी काळात विविध राज्यांमध्ये चित्रपट संग्रहालये सुरू करण्यात येणार येतील. त्यासाठी कर्नाटक व केरळ राज्य सरकारकडून प्रस्ताव आला असून, संग्रहालय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक व तांत्रिक मदत करील,’ असेही मित्तल यांनी ऑगस्टमध्ये सांगितले होते; मात्र त्यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे राज्यांमधील चित्रपट संग्रहालयाची घोषणा सध्या तरी हवेतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

............
सध्या पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’अंतर्गत विकास केला जाणार असून, संग्रहालयाची जतनक्षमता वाढवून अत्याधुनिक सुविधा देण्यावर भर दिला जाईल. पुढील काळात गरज भासल्यास इतर चित्रपट संग्रहालयांचा विचार करू.मित्तल, सचिव, केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईच्या धड्यांमुळे येते जीवनभान : बांदेकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आयुष्यात यशस्वी होण्यामागे आईच्या संस्कारांचा मोठा वाटा असतो. लहानपणापासून आईने दिलेल्या धड्यांमुळेच कठीण वेळी आपण कसे वागावे याचे भान आपल्याला येत असते,’ अशी भावना प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांनी व्यक्त केली.

रंगत-संगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘आदर्श आई पुरस्कार’ दिल्लीतील तिहार जेलमधील कैद्यांच्या मुलांसाठी, तसेच अनाथ मुलांच्या परदेशी दत्तक प्रक्रियेच्या समन्वयक म्हणून ३५ वर्षे काम करत असलेल्या गिरिजा आनंद सप्रे यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अॅड. प्रमोद आडकर, फाउंडेशनचे भारत देसडला व सचिन इटकर या वेळी उपस्थित होते.

‘आई व सासू यांनी वेळोवेळी माझ्या कामासाठी प्रोत्साहन दिले म्हणून मी हे कार्य उभे करू शकले. आई-वडिलांच्या गुन्ह्यामुळे मुलांनादेखील तुरुंगात राहावे लागते. त्यांना या चक्रातून बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न केला. ग्रामीण भागातील महिलांची परिस्थिती अंगावर काटा आणणारी आहे,’ असे मनोगत सप्रे यांनी व्यक्त केले. प्रज्ञा गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याला ‘सेव्हन सिस्टर्स’ची भुरळ

$
0
0

ईशान्य भारतीय चित्रपट महोत्सवाला उत्तम प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बांबूपासून तयार केलेल्या वाद्यांच्या सुरात नागालँडचे संगीत वाजते...तेथील जंगलांमधील प्राणी-पक्षांचे आवाज कानी येतात...गायनाच्या अनोख्या पद्धतीमुळे पाश्चात्य देशांमधील ‘ऑपेरा’ची आठवण होते... ईशान्य भारतातील खाद्यपदार्थांचा सुगंध दरवळतो आणि पाहावे तिकडे ईशान्य भारताच्या सांस्कृतिक परंपरेचा सहवास जाणवतो. हे वर्णन नागालँड, मिझोराम किंवा मणिपूरचे नसून पुण्यातील नॅशनल फिल्म अर्काइव्ह (एनएफएआय) येथील आहे. ईशान्य भारतातील ‘सेव्हन सिस्टर्स’ शनिवारी सायंकाळी ‘एनएफएआय’मध्ये अवतरल्या आणि पुणेकरांना भारताच्या विविधतेतील एकतेची प्रचिती आली.

‘एनएफआय’तर्फे पुण्यात ईशान्य भारतीय चित्रपटांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी नागालँड आणि आसाममधील कलाकारांनी पारंपरिक कला सादर करून पुणेकरांना थक्क केले. केंद्रीय चित्रपट महोत्सव संचालनालयाचे प्रमुख सी. सेंतलराजन, चित्रपट दिग्दर्शक भास्कर हजारिका, ‘एनएफएआय’चे संचालक प्रकाश मगदूम, ‘एफटीआयआय’चे संचालक भूपेंद्र कँथोला, आंशू सिन्हा आदी या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रमात नागालँडच्या नागाजिनियस या ग्रुपने बांबूपासून तयार केलेल्या वाद्यांचे वादन केले. नागालँडमधील घनदाट जंगलांमध्ये ऐकू येणारे प्राणी-पक्ष्यांचे आवाज त्यांनी वाद्यातून साकारले. त्यांनी गायलेल्या विशिष्ट गाण्यांमधून पाश्चात्य देशांमध्ये रंगणाऱ्या ‘ऑपेरा’ची प्रचिती येत होती. ‘जय हो’ हे हिंदी गाणे सादर करून त्यांनी एकात्मतेचा संदेश दिला. आसामच्या अन्वेषा महंता यांनी आसामी शास्त्रीय नृत्यातून कृष्ण आणि विष्णूची विविध रूपे उलगडत रसिकांना मंत्रमुग्ध केले. सभागृहात सादर होणाऱ्या कला आणि बाहेर ईशान्येकडील खाद्यपदार्थांचा सुटलेला खमंग वास पुणेकरांना ईशान्य भारताची सफर घडवत होता.

‘ईशान्य भारतातील नागरिकांना केवळ राजकीयदृष्ट्या नव्हे, तर भावनिकदृष्ट्या भारताशी जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी भारतातील सगळ्या शहरांमध्ये असे चित्रपट महोत्सव व्हायला हवेत. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ असे मित्तल यांनी सांगितले. ‘‘प्रसारभारती’तर्फे ईशान्य भारतासाठी लवकरच ‘दूरदर्शन’ची स्वतंत्र वाहिनी सुरू होणार असून, त्या माध्यमातून तेथील संस्कृती देशभरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,’ असे मित्तल म्हणाले. भास्कर हजारिका दिग्दर्शित ‘कोथानोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाला सुरुवात झाली. त्यात अभिनय साकारलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री सीमा विश्वास, काश्वी शर्मा, मनीषा भुईया या वेळी उपस्थित होत्या.

.........

रिळांच्या मूल्यांकनाचा प्रकल्प

‘एनएफएआय’ने सुरू केलेल्या १९ हजार चित्रपटांच्या तब्बल एक लाख ३० हजारांहून अधिक रिळांचे मूल्यांकन करण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले. ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’अंतर्गत भारत सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवींनी नव्या वाटा निर्माण कराव्यात

$
0
0

कवी प्रकाश घोडके, संजीवनी बोकील यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मळलेल्या जुन्या वाटांवरून चालणे सोपे काम असते. त्यात नवीन असे काही नसते. प्रतिभावंतांनी मनाची मशागत करणाऱ्या नव्या वाटा निर्माण केल्या पाहिजेत,’ असे मत प्रसिद्ध कवी प्रकाश घोडके आणि कवयित्री संजीवनी बोकील यांनी मांडले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘एक कवयित्री एक कवी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. परिषदेचे कार्यवाह अॅड. प्रमोद आडकर आणि कवी उद्धव कानडे यांनी या दोन्ही कवींची प्रकट मुलाखत घेतली.

बोकील म्हणाल्या, ‘काव्यनिर्मितीची प्रक्रिया सगळ्यात अवघड असते. काव्य जन्माला येताना जाणिवा आणि नेणिवेची प्रगल्भता मोलाची असते. शुभ्र पक्षांचा थवा आकाशातून विहरावा, तसा प्रतिभावंत काव्यानुभवात विहरत असतो. बालवयातच कविता संवेदनाचे आकाश बनून श्वासात घर करून बसली. कवितेचे ऋण कधीच फेडता येणार नाही.’

‘गेय कवितेने मराठी कवितेची वाट लावली हे म्हणणे चुकीचे आहे. गेय कवितांनी मराठी कविता श्रीमंत केली. गेय कविता लिहिणाऱ्या कवींनीच मराठीत स्वतःच्या नव्या वाटा निर्माण केल्या आहेत,’ असे सांगून, ‘समीक्षकांना माझी कविता समजली नाही. माझ्या कवितेची समीक्षा झाली असती, तर मी कवी म्हणून मोठा झालो असतो. मला मोठे होऊ द्यायचे नव्हते, म्हणून माझ्या कवितांची समीक्षा झाली नाही,’ असा आरोप घोडके यांनी केला.

घोडके आणि बोकील या दोघांनी एकापाठोपाठ एक अशा कसदार कविता सादर करून रसिकांची उस्फूर्त दाद मिळवली. घोडके यांनी त्यांच्या असा बावळा सावळा, अशा तुझ्या आठवणी, धर्मपीठ, तुझ्या दाराहून जाता या गेय कविता सादर केल्या. बोकील यांनी त्यांच्या मूर्तिकार, काळीजकुपी, आर्जव, एकांत रेघेवर या दर्जेदार कविता सादर केल्या. परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले व कवींचा सत्कार केला. शिरीष चिटणीस यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयटी इंजिनीअर तरुणीचा ‘इन्फोसिस’मध्ये खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

हिंजवडी आयटी पार्कमधील इन्फोसिस (फेज २) कंपनीमध्ये एका आयटी इंजिनीअर तरुणीचा कम्प्युटरच्या वायरने गळा आवळून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उघडकीस आली. रसिला राजू ओपी असे या इंजिनीअर तरुणीचे नाव असून, ती मूळची केरळची असल्याचे समजते.

इन्फोसिस कंपनीच्या नवव्या मजल्यावरील मीटिंग रूममध्ये रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एका अज्ञात इसमाने कम्प्युटरच्या वायरनेच गळा आवळून तिचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. रविवारची सुटी असूनही रसिला ऑफिसमध्ये काही कामानिमित्त आली होती. तिला काम नेमून देणाऱ्या अधिकाऱ्यांना याची माहिती होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. त्यानंतर, या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या परिसरात तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, नवव्या मजल्यावर तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे हिंजवडी परिसरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, इन्फोसिस कंपनीत ही घटना घडूनही त्या संदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती कंपनीमार्फत देण्यात आली नाही. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त वैशाली जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर, रघुनाथ उंडे यांच्यामार्फत पुढील तपास सुरू आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकटक बघणाऱ्याला हटकलं म्हणून 'इन्फोसिस'च्या इंजिनीयरचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

एकटक बघणाऱ्याला जाब विचारत तक्रार करण्याची तंबी दिल्याने इन्फोसिस कंपनीतील इंजिनिअर रसिला राजू ओपी हिचा खून झाल्याची धक्कादायक माहिती पुढं आली आहे. आरोपी सुरक्षा रक्षकानं स्वत:च पोलिसांकडं तशी कबुली दिली आहे. खून करून आसाममध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना हिंजवडी पोलिसांनी आज पहाटे त्याला अटक केली आहे.

इन्फोसिस कंपनीच्या हिंजवडी फेज २ मधील कार्यालयात काल सायंकाळी कंम्प्युटरच्या केबलने गळा आवळून रसिला ओपी हिचा खून करण्यात आला होता. ही घटना समजल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी वेगाने हालचाली करून बबन नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन हा इन्फोसिस कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. तर, रसिला राजू ओपी (२४) ही त्याच कंपनीत कम्प्युटर इंजिनीअर म्हणून काम करीत होती.

बबनला एसडीबी १० या इमारतीच्या ९ व्या मजल्यावर ड्युटी लागली होती. रविवार असल्यामुळे या मजल्यावर कमी कर्मचारी होते. ही संधी साधून बबन रसिलाकडे एकटक नजरेने पाहात होता. त्यावरून रसिलानं त्याला 'असे काय पाहतो' म्हणत हटकले. ई मेलवरून तुझी तक्रार करते आणि नोकरी घालवते असे म्हणून ती आत गेली; तेव्हा तो तिच्या पाठोपाठ मिटिंगरूममध्ये गेला. तिची माफी मागितली आणि कम्प्युटरच्या केबलने गळा आवळून रसिलाचा खून केला. त्यानंतर बबनने तेथून पळ काढला.

मूळगावी आसामला जाण्यासाठी तो मुंबईला गेला. दरम्यान, रसिला हिचा संपर्क होत नसल्याचे तिच्या वरिष्ठांनी कंपनीत कळवले होते. कंपनीतील अन्य सुरक्षा रक्षकांनी शोध घेतला असता रसिलाचा खून झाल्याचे उघड झाले. पोलिसांना ही माहिती मिळताच कंपनीतील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे बबनला मुंबई येथून पहाटे अटक करण्यात आली.

सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एरणीवर

हिंजवडी आयटी पार्कमधील खून आणि आत्याचारांच्या घटनांमुळे तरुणींच्या सुरक्षेबाबत अनेकदा कडक धोरण पोलिसांनी अवलंबविले आहे. हिंजवडी आयटी असोसिएशने देखील पोलिसांच्या सूचनेनुसार आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. परंतु, कंपनीतच सुरक्षा रक्षकाकडून खून झाल्यानं सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकारणातील अवलिया व्यक्तिमत्त्व

$
0
0

सलग सहा वेळा सहा चिन्हांवर नगरसेवक म्हणून निवड... घरोघरी दूध घालणारे महापौर... विधानसभेवर पत्नीला निवडून आणणारा पती आणि ३८ वर्षे ताडीवाला रोड आणि कोरेगाव पार्क या परिसरावर र्निविवाद सत्ता राखणारे उल्हास उर्फ नाना ढोले पाटील हे शहराच्या राजकारणातील एक अवलिया म्हणून प्रसिद्ध आहेत.
योग्य वेळी योग्य पत्ता टाकून डाव जिंकण्यात ​किंवा जिंकून आणण्यात नानांचा हात कोणी धरला नाही. म्हणूनच ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांना सोनेरी टोळीचे प्रमुख शिलेदार म्हणून संबोधतात. माजी मंत्री शशिकांत ​सुतार, माजी आमदार रामभाऊ मोझे आणि नानांच्या या ‘सोनेरी टोळी’ने शहराच्या राजकारणात बराच काळ अधिराज्य गाजवले.

कोरेगाव पार्क, ताडीवाला परिसरातून १९७४ च्या दरम्यान मित्रांनी नानांना पालिका निवडणुकीत लढण्यास भाग पाडले. भेळभत्त्यावर ही निवडणूक झाली. नाना ‘सायकल’ चिन्हावर पालिकेत निवडून गेले. महापौर झाले तरी त्यांनी दुधाचा व्यवसाय सुरू ठेवला. ऑस्ट्रेलियातील एका शहराचा महापौर त्या काळात नानांसारखाच दूध व्यवसाय करत होता. शरद पवारांनी त्यांना त्या महापौराची आठवण सांगत दूध व्यवसाय बंद न करण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला त्यांच्या पथ्यावर पडला आणि त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली.
‘पुलोद’च्या काळात नाना पालिकेत ​अपक्ष म्हणून निवडून आले आणि महापौरही झाले. स्थायी समितीचे अध्यक्षपद वगळता पालिकेतील सर्व समितींच्या अध्यक्षपदाची धूरा त्यांनी सांभाळली. नाना, शशिकांत सुतार आणि रामभाऊ मोझे हे आजही घट्ट मित्र आहेत. पालिकेत नाना महापौर, तर सुतार विरोधी पक्षनेते होते. लता मंगेशकर यांना पालिकेकडून मानपत्र द्यायचे होते. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांनी मानपत्र स्वीकारण्यास नकार दिला होता. नानांनी लतादीदींबरोबरच ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनाही साकडे घातले आणि अखेर लतादीदींनी मानपत्र स्वीकारण्याचे मान्य केले. सुतार यांनी हे मानपत्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते देण्याचा आग्रह धरला; तर बापट यांनी या कार्यक्रमासाठी प्रमोद महाजनांची प्रमुख उपस्थिती असावी, असे सांगितले. नानांनी दोघांचीही विनंती मान्य करत ठराव केला. मात्र, त्यांची पवारांकडे तक्रार झाली. पवारांनी नानांना याबाबत विचारणा केली असता नानांनी त्यांना पालिका चालवण्यासाठी विरोधकांना बरोबर घेत असल्याचे सांगितले. पवारांनीही खुल्या दिलाने हा युक्तीवाद मान्य करून या सोहळ्यास काँग्रेसचे नेते रामकृष्ण मोरे यांनाही बोलवावे, अशी ​सूचना केली.
नानांचे परदेश दौरे असो की ‘उटी’चा दौरा.. दोन्हीही दौरे खूप गाजले. विरोधकांना चेकमेट करण्यात नाना कायमच यशस्वी झाले. माजी मंत्री सुरेश कलमाडी विरोधात असतानाही पवारांशी एकनिष्ठ राहत त्यांनी बेरजेचे राजकारण केले. त्याचा परिणाम त्यांच्या पत्नी कमल (नानी) ढोले पाटील आमदार झाल्या. महापालिकेत तीन वेळा निवडून येणारे दाम्पत्य, असा राज्यभरातील एकमेव मान त्यांनी मिळविला आहे.

संघर्ष नसल्याने सध्याचे राजकारण अळणी झाले आहे. पैशांच्या जीवावर राजकारण होऊ लागल्याने यातील गंमत संपली आहे. पालिका अधिकाऱ्यांचा नगरसेवकांवर विश्वास नाही. मतदारांना पैशांची सवय लावली गेली आहे. चांगल्या माणसांना सभागृहात जाण्यासाठी भीती वाटावी, अशी परिस्थिती आहे.
- उल्हास ढोले पाटील, माजी महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीव्हीवर क्राइम सीरियल पाहत होतो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

रसिलाचा खून केल्यानंतर भाबेन मीटिंग रूममधून बाहेर आला. त्याच्या बुटाला लागलेल्या रक्ताचे डाग मीटिंग रूमबाहेर दिसत होते. घटनेनंतर तो दोन तास तेथेच ड्युटी संपवून सध्या राहत असलेल्या ठिकाणी गेला. मीटिंग रूममध्ये सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडथळे येते होते. परंतु रूममध्ये आतबाहेर करणाऱ्यांचे चित्रीकरण अन्य एका सीसीटीव्हीत होत होते.

तत्पूर्वी आई व अन्य एकाला फोन केल्यावर भाबेन याने स्वतःचा पुण्यातील मोबाइल बंद केला होता. त्याला पकडल्यानंतर याबाबत विचारले असता, ‘टीव्हीवरील क्राइम सीरियल पाहिल्या असून, त्यामध्ये मोबाइल बंद केला की पोलिस पकडत नाहीत असे बघितले आहे,’ असे भाबेनने सांगितले. परंतु तो सध्या फुकट इंटरनेट सेवा पुरविणारे कार्ड वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून तपासाला गती मिळत गेली.

भाबेन मुंबईला व तेथून पुढे आसाम येथे पळून जात असल्याचे समजल्याने सोशल मीडियाच्या वापराने बारा तासाच्या आत सहायक निरीक्षक गणेश धामणे, अमित डोळस, प्रदीप पाटील, फौजदार अमोल धस, विजय शिंदे, ज्ञानोबा निकम, भूषण कोते, पवन पाटील, कर्मचारी आनंद खोमणे, नीलम येरूणकर, सचिन उगले, विवेक गायकवाड, आशिष बारटक्के, महेश मोहळ, ज्ञानेश्वर मुळे, आतिक शेख, सतीश गायकवाड, नूतन कोंडे आदींच्या सहा पथकांनी त्याला मुंबई येथून पहाटे अटक केली.

आत्महत्येचा प्रयत्न आणि आईला फोनवरून माहिती

रसिला हिचा खून केल्यानंतर भाबेन बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या करणार होता. त्यासाठी तो बिल्डिंगच्या टेरेसवर गेला होता. परंतु तेव्हा बिल्डिंगच्या खाली एक सुरक्षारक्षक दिसला. त्यामुळे त्याने आत्महत्या केली नाही. रसिला हिचा खून केल्याची माहिती भाबेनने मोबाइलवरून आसाम येथे आईला कळविली होती. तेव्हा ‘तू आधी पोलिसांकडे जा,’ असे त्याच्या आईने त्याला सांगितल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेटंटला विद्यापीठाचा आधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आविष्कार स्पर्धेत विजयी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावीण्यपूर्ण संशोधन प्रकल्पांना जागतिक स्तरावर मान्यता मिळावी यासाठी विद्यापीठ सर्वोतोपरी मदत करणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना पेटंट मिळवण्यासाठी आर्थिक मदत आणि प्रकल्पामध्ये संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांसाठी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे,’ अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सोमवारी दिली.

नुकत्याच पार पडलेल्या राज्य आंतरविद्यापीठ संशोधन आविष्कार स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले आणि विविध ज्ञानशाखांमध्ये वैयक्तिक पारितोषिके पटकाविली. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गाडे यांनी माहिती दिली. महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, डॉ. रवींद्र जायभाये आदी उपस्थित होते.

डॉ. गाडे म्हणाले, ‘विद्यापीठाच्या विद्यार्थी आणि प्राध्यपकांनी मिळून एकूण पाच ज्ञानशाखांमध्ये ११ संशोधन प्रकल्पांमध्ये पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. या प्रकल्पांमध्ये अधिक संशोधन केल्यास त्याचा वापर व्यावसायिकदृष्ट्या म्हणून होऊ शकतो. आविष्कार स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प हे नावीण्यपूर्ण असून त्यामध्ये संशोधन केल्यास त्याचा वापर समाजोपयोगी होऊ शकतो. त्यामुळे आतापासून आविष्कार स्पर्धेत विजयी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावीण्यपूर्ण संशोधन प्रकल्पांना जागतिक स्तरावर मान्यता मिळावी यासाठी विद्यापीठ सर्वोतोपरी मदत करणार आहे. विद्यार्थ्यांना पेटंट मिळवण्यासाठी आर्थिक मदत आणि प्रकल्पामध्ये संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांसाठी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांमधील क्षमता तपासण्याची जबाबदारी विविध क्षेत्रातील शास्त्रज्ञांना देण्यात येईल.’

दरम्यान, नावीण्यपूर्ण संशोधनासाठी पदवी अभ्यासक्रमात पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना दहा महिन्यांसाठी तीन हजार रुपये तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना चोवीस महिन्यासांठी सहा हजार रुपये देण्यात येणार आहे, असे डॉ. गाडे यांनी सांगितले. आविष्कार स्पर्धा नुकतीच नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पार पडली. या स्पर्धेत एकूण १९ विद्यापीठे सहभागी झाली होती. या वेळी एकूण ५६२ संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात ४७ प्रकल्प हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे होते. अंतिम फेरीत विद्यापीठाचे २२ प्रकल्प निवडण्यात आले. दरम्यान, विद्यापीठाने विविध ज्ञानशाखांमध्ये वैयक्तिक पारितोषिके पटकाविल्याने विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले.

भाषा आणि कला विभागात पराग शिंदे यांनी द्वितीय, तर सुरेश जुनागरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी न्याय विभागात विशाल अमोलिक यांनी प्रथम, तर देवयानी पटेल यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. मूलभूत विज्ञान विभागात रुचा देशपांडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. औषध आणि फार्मसीमध्ये ऋतुजा जगताप यांनी प्रथम, तर श्वेता पढरे, ज्ञानदेव गाढवे, शिल्पा क्षेत्रीय यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागात अनुज नाहर यांनी प्रथम, संदीपकुमार वानखेडे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनसोडे यांचा नाराजीनामा

$
0
0

पिंपरीत एकाधिकारशाहीचे कारण देऊन राष्ट्रवादीला रामराम

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
एकाधिकारशाही आणि स्थानिक नेतृत्व मोठे होऊ न देणे आदी कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच उमेदवारी यादी जाहीर करताना समर्थकांना त्यात स्थान मिळणार नसल्याचे कारण देखील बनसोडे यांच्या राजीनाम्यामागे आहे. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न प्रदेशपातळीवरील नेत्यांकडून सध्या सुरू आहे.

तीन वेळा वेगवेगळ्या वॉर्डमधून नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, अध्यक्ष आणि आमदारकी असा बनसोडे यांचा पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवास आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर २२०० मतांनी बनसोडे यांचा २०१४च्या विधानसभेला पराभव झाला आहे. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्या पाठोपाठ आझमभाई पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पक्षाची मोठी पडझड झाली आहे. येत्या काळात या तिघांचे समर्थक आजी-माजी नगरसेवक देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मदार ही माजी आमदार आण्णा बनसोडे आणि विलास लांडे यांच्यासह शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक नाना काटे यांच्यावर आहे. परंतु, उमेदवारी यादी जाहीर होण्याच्या तोंडावर पक्षातील अंतर्गत बंडाळी वाढली आहे.

समर्थकांना पहिल्याच यादीत डावलले जाणार असल्याचे बनसोडे यांना वाटते. ‘अनेक स्थानिक नेते पक्ष सोडून गेल्यावर आहे त्यांना तरी विश्वासात घेऊन पुढील निर्णय झाले पाहिजेत. परंतु, तसे होत नाही. कोणाला उमेदवारी द्यायची हे मला चांगले समजते, असे पक्षाचे नेते म्हणत आहेत. त्यामुळे आता पक्षाला आमची देखील गरज नाही, ’ असे बनसोडे यांचे म्हणणे आहे. आण्णा बनसोडे यांच्याकडे बहुजनांचे मताधिक्य अधिक आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर ते निवडून आले होते.

दापोडी ते निगडी या पट्ट्यात विस्तारलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पिंपरी सिंधी कॅम्पमध्ये देखील बनसोडे यांचे वर्चस्व आहे. सिंधी समाजाचे नगरसेवक देखील बनसोडे गटाचे आहेत, असे मानले जाते. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारी मिळावी म्हणून अनेक आजी-माजी नगरसेवक बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयात ठाण मांडून आहेत. तसेच ते शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याबरोबर पक्षाची पडझड रोखण्यासाठी वाटाघाटी करीत होते. पण त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये देखील गोंधळ उडाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या निव्वळ चर्चा अन् बैठकाच

$
0
0

भाजपच्या निव्वळ चर्चा अन् बैठकाच

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील उमेदवार निश्चितीसाठी बैठकांवर बैठका घेऊन आणि रात्री उशिरापर्यंत खल करूनही भारतीय जनता पक्षाची यादी अजूनही अंतिम होऊ शकलेली नाही. प्रभागनिहाय उमेदवारांची अंतिम शिफारस प्रदेश भाजपकडे करण्यासाठी आता सहा जणांची सुकाणू समिती निश्चित केली गेली असून, येत्या दोन दिवसांत यादी जाहीर केली जाईल, असे संकेत मिळत आहेत.
भाजपतर्फे गेल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील सुमारे ७० उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आल्याचे सांगितले जात होते. यातून अनेक विद्यमान नगरसेवकांची नावे वगळण्यात आल्याने बराच गहजब झाला होता. त्याचा आढावा घेत उर्वरित नावे निश्चित करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी रात्री बैठक झाली. सोमवारी पहाटे दोन-अडीचपर्यंत ही बैठक सुरू होती. या बैठकीत सर्वच आमदार आपल्या विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या प्रभागातील उमेदवारांसाठी विशेष आग्रही होते. त्यामुळे संबंधित प्रभागांसाठी ‘शॉर्ट-लिस्ट’ करण्यात आलेल्या नावांतून नेमक्या कोणत्या नावाची निवड करायची, यावर निर्णय होत नव्हता. सर्वसहमती झालेल्या प्रभागांव्यतिरिक्त इतर प्रभागांचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला.
शहरातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये काही जागांवरून मतभेद निर्माण झाल्याने जावडेकर यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची समिती वादग्रस्त जागांवरील नावांबाबत प्रदेशाकडे अंतिम शिफारस करण्याचा निर्णय घेईल, असे निश्चित करण्यात आले. ही शिफारस करताना संबंधित भागातील आमदारांचे मत विचारात घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. सोमवारी मध्यरात्री ही बैठक संपल्यानंतर सायंकाळी पुन्हा एकदा सर्व वरिष्ठांची बैठक झाली. त्यामध्ये संभाव्य उमेदवारांबाबत पुन्हा सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील भाजपच्या सर्व उमेदवारांची यादी आता प्रदेशाकडे देण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत?

$
0
0

काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत?

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी आघाडी करताना काही जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत होत नसल्याने एक किंवा दोन प्रभागातील जागा या दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे करून मैत्रीपूर्ण लढत करावी, अशी चर्चा सुरू झाली आहे. आघाडीचा ‌निर्णय घेताना नक्की किती जागांवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, यावर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाल्यानंतरच आघाडी करायची की नाही, यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. याबाबत सोमवारी रात्री उ‌शिरा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू होती. त्यामुळे मंगळवारी आघाडीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीत आघाडी व्हावी, यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सुरुवातीपासून सकारात्मक भूमिका घेतली आहे. प्रत्येक प्रभागातील पक्षाच्या ताकदीप्रमाणे उमेदवार द्यावेत, असा फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे. सात प्रभागांमध्ये एकमत होत नसल्याने वरिष्ठ पातळीवर त्याची चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे. मैत्रीपूर्ण लढत करण्यास हरकत नाही, मात्र किती प्रभागात करायची त्यावर आघाडी करायची की नाही, याचा निर्णय होणार असल्याचे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी सां‌गितले. काँग्रेसच्या नेत्यांची सोमवारी रात्री मुंबईत बैठक होणार असल्याने या बैठकीनंतर आघाडीचा निर्णय होऊ शकतो, असे चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनुष्य ते हात व्हाया रेल्वे इंजिन

$
0
0

धनुष्य ते हात व्हाया रेल्वे इंजिन

पुणे : कसब्यातून शिवसेनेच्या तिकिटावर एक धडाडीचा कार्यकर्ता महापालिकेची पहिली निवडणूक जिंकतो..., त्यानंतर राज ठाकरे यांच्या आकर्षणामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून तिथेही महापालिकेत झेंडा रोवतो..., विधानसभेत कसब्याच्या आमदारांना ‘टफ’ लढत देतो..., पण दुर्दैवाने यंदाच्या महापालिका निवडणुकीपूर्वी पुन्हा आमदारांच्याच पक्षात प्रवेश मिळविण्यासाठी त्याला धडपड करावी लागते..., स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या प्रचंड विरोधामुळे त्याला इतर पर्यायांची चाचपणी करावी लागते..., पालिकेतील कारभाऱ्यांनाही भेटतो; अखेर काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतो...
शिवसेनेपासून सुरू झालेला प्रवास मनसेच्या दीर्घ मुक्कामानंतर भाजप, राष्ट्रवादीच्या चर्चेने अखेर काँग्रेसपर्यंत येऊन ठेपला आहे. कसब्यातून इंजिनाच्या बळावर महापालिकेत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम करणाऱ्या रवींद्र धंगेकर यांनी आता मतदारांसमोर ‘हात’ पुढे केलाय.
पालिकेच्या २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे संपूर्ण पॅनेल निवडून आले. रमेश बोडके यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यासह रवींद्र धंगेकर आणि विजय मारटकर असे शिवसेनेचे नव्या दमाचे शिलेदार निवडून आले. त्यानंतर २००६ मध्ये धंगेकर यांनी शिवसेनेतून मनसेत प्रवेश केला. त्यानंतर, २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे पहिल्याच प्रयत्नात आठ नगरसेवक निवडून आले. स्वाभाविकच धंगेकर यांनाच मनसेचे गटनेतेपद मिळाले. २०१२ मध्ये मनसेने घवघवीत यश मिळविले. त्यावेळी, धंगेकर यांच्याऐवजी इतरांना गटनेतेपदाची संधी देण्यात आली. तरीही, त्यांना स्थायी समिती; तसेच इतर समित्यांवर संधी देण्यात आली. एवढेच नाही, तर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावरही इतर ज्येष्ठ सदस्यांना डावलून धंगेकर यांची वर्णी लावण्यात आली. सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळेल, अशा अपेक्षेने धंगेकर यांनी भाजप प्रवेशाची हुल उठवली. त्यांचा प्रवेश निश्चित झाल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह कसब्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाला जोरदार विरोध केला. त्यामुळे धंगेकर यांचा प्रवेश लांबणीवर पडला. भाजपमधील प्रवेशावर फुली मारली गेल्याचे लक्षात येताच, त्यांनी इतर पक्षांची चाचपणी सुरू केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारी नको; पण ‘एनओसी’ आवरा...

$
0
0

उमेदवारी नको; पण ‘एनओसी’ आवरा...

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक असलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) घेण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात मोठी गर्दी होत असून तब्बल २२ प्रकारच्या एनओसी घ्याव्या लागत असल्याने इच्छुक हवालदिल झाले आहेत. एनओसी घेण्यासाठी पालिकेकडे तीन हजाराहून अधिक अर्ज आले असून, यापैकी अवघे ५०० अर्ज निकाली काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना विविध खात्यांकडील २२ प्रकारच्या ‘एनओसी’ उमेदवारांना द्याव्या लागणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी महापालिका प्रशासनाकडे अर्ज केले असून, ते जमा करण्यासाठी पालिकेने एलबीटी कार्यालयात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पालिका निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अवघे चार दिवस उरले आहे. त्यामुळे या मुदतीत या एनओसी मिळाव्यात, यासाठी विद्यमान नगरसेवकांबरोबरच सर्व पक्षीय इच्छुकांची मोठी गर्दी या कार्यालयात होत आहे. तीन दिवसांपूर्वी एकाच दिवशी प्रशासनाकडे एक हजार इच्छुकांनी एनओसीसाठी अर्ज दाखल केले असून, तीन हजारांपेक्षा अधिक अर्ज पालिकेकडे आले आहेत. ज्या संख्येने प्रशासनाकडे अर्ज येत‌ आहेत, त्यावर निर्णय घेऊन ते निकाली काढण्यासाठी पुरेसे कर्मचारीच प्रशासनाने उपलब्ध करून न दिल्याने वेळेत एनओसी मिळत नसल्याची केली जात आहे. अनेक तास थांबूनही प्रशासन एनओसी देत नसल्याने काही वादाचे प्रकारही या कार्यालयात घडले.
निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या एनओसीसाठी इच्छुकांना पालिकेच्या सर्व विभागात हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी पालिकेने एक खिडकी योजना सुरू केली असून, एका अर्जाद्वारे सर्व एनओसी दिल्या जात असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी अर्ज केल्यानंतर पालिकेतील कर्मचारी सर्व विभागांमध्ये हे अर्ज पाठवून एनओसी घेत असल्याचे प्रशासन अधिकारी प्रकाश जंगले यांनी स्पष्ट केले. अर्ज आल्यानंतर तातडीने एनओसी देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एनओसीसाठी आलेल्या अर्जापैकी ५०० अर्ज निकाली काढण्यात आल्याचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. सर्वांना एनओसी दिले जाणार असून कर्मचारी वर्ग वाढविला जाणार आहे. उमेदवारी अर्जासोबत घोषणापत्र म्हणून इच्छुक ‘एनओसी’ जोडतात. कोणत्याही कारणांमुळे अर्ज बाद होणार नाही, यासाठी एनओसी सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. निवडणूक प्रक्रियेत कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना संबधितांना देण्यात आल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया उद्यापासून

$
0
0

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया उद्यापासून

पुणे : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी​ उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्यास बुधवारपासून (एक फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालये आणि महा-ई सेवा केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे ७५ गट आणि पंचायत समित्यांच्या १५० गणांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यासाठी बुधवारपासून ऑनलाइन अर्ज भरले जाणार आहेत. सहा फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. या वेळी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार असल्याने प्रशासनाच्या वतीने अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अर्ज भरताना उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म सोबत देण्याची आवश्यकता नाही; तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती सादर केली, तरीही अर्ज भरता येणार आहे. तहसीलदार कार्यालय किंवा महा-ई सेवा केंद्राशिवाय सायबर कॅफेतूनही उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची मुभा आहे.
संख्याबळानुसार सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आणि एक अपक्ष असे ४२, शिवसेनेचे १३, काँग्रेस ११, भाजप ३, मनसे १, अपक्ष (राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल समर्थक) ३ आणि आघाड्यांचे दोन सदस्य आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदेशच मिळाला नाही

$
0
0

आदेशच मिळाला नाही

पुणे : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अर्थिक गैरव्यवहारांसंदर्भात कोल्हापूर विभागाच्या धर्मादाय सहआयुक्तांनी धर्मादाय उपायुक्तांना महामंडळाच्या चौकशीचे आदेश दिले. या आदेशाला आठ महिने झाले, तरी त्याची प्रत मिळाली नसल्याचा धक्कादायक खुलासा धर्मादाय उपायुक्तांनी केला आहे. धर्मादाय आयुक्तालयाच्या या ‘प्रतापा’मुळे चित्रपट महामंडळाच्या अर्थिक गैरव्यवहारांची चौकशी अद्याप सुरू झालेली नाही.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे मध्यवर्ती कार्यालय पुण्यात आहे. मात्र, संस्थेची मूळ नोंदणी कोल्हापूर येथे आहे. याच कारणाने कोल्हापूर धर्मादाय आयुक्तालयात चित्रपट महामंडळाच्या २०१० ते २०१५ या कालावधीतील कार्यकारिणीच्या विरोधात अर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी याचिका दाखल केली गेली. त्या याचिकेवर सुनावणी करत कोल्हापूर विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी ६ मे २०१६ रोजी चित्रपट महामंडळाची चौकशी करण्याचे आदेश धर्मादाय उपायुक्त सुरेंद्र वडगावकर यांना दिले. महामंडळाची चौकशी करून तीन महिन्याच्या आत अहवाल सादर करावा, असे उपायुक्त सुरेंद्र वडगावकर यांना सांगण्यात आले; परंतु या संदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली असता ‘हा आदेश माझ्यापर्यंत पोहोचलाच नाही, मला त्याबद्दल काहीच माहिती नाही,’ असा दावा वडगावकर यांनी केला आहे. उपायुक्तांना आदेशच मिळाला नसल्याने त्यांनी या प्रकरणी चौकशीसाठी कोणाचीही नेमणूक केली नाही. त्यामुळे आठ महिने होऊनही महामंडळाच्या एकाही कागदपत्रांची चौकशी झालेली नाही. त्यामुळे सहआयुक्तांनी काढलेला चौकशीचा आदेश नक्की गेला तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला असून यामागे काही काळेबेरे दडले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
२०१० ते २०१५ या कालावधीत अभिनेते विजय पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली चित्रपट महामंडळाचे संचालक मंडळ कार्यरत होते. विजय पाटकर यांच्यासह कार्यकारिणीतील १५ सदस्यांच्या विरोधात रणजित जाधव, भास्कर जाधव, विजय शिंदे, प्रमोद शिंदे यांनी कोल्हापूरच्या धर्मादाय आयुक्तालयात याचिका दाखल केली. ती याचिका निकाली लागली खरी, मात्र त्याची चौकशीच झाली नाही. या संपूर्ण प्रकरणात धर्मादाय आयुक्तालयातील अधिकारी आणि चित्रपट महामंडळाचे तत्कालीन संचालक मंडळ यांचे काही लागेबांधे आहेत का, असा संशय निर्माण झाला आहे.
धर्मादाय उपायुक्त सुरेंद्र वडगावकर म्हणाले, ‘मे २०१६ या महिन्यात धर्मादाय सहआयुक्तांनी काढलेला आदेश माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही. आदेश आल्यानंतर त्वरीत त्यावर अधिकाऱ्याची नेमणूक करून चौकशीचे आदेश दिले जातात. मात्र चित्रपट महामंडळाच्या चौकशीचे आदेश अद्याप मला मिळालेले नाहीत त्यामुळे मी कोणत्याही अधिकाऱ्याची चौकशीसाठी नेमणूक केलेली नाही. आदेश माझ्यापर्यंत का पोहोचला नाही, याची मला कोणतीही कल्पना नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images