Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अॅम्ब्युलन्सला द्या प्राधान्य

$
0
0

सिंहगड रस्ता वाहतूक समस्या निवारण मंचातर्फे प्रबोधन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंहगड रस्ता वाहतूक समस्या निवारण मंचातर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ‘वे टू अॅम्ब्युलन्स : रुग्णवाहिकेस प्राधान्यक्रम,’ असा उपक्रम नुकताच राबवण्यात आला. सिंहगड रोडवर धायरी फाटा ते सावरकर चौकापर्यंत हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात संतोष हॉल चौकात दत्तवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. जी. करपे यांच्या हस्ते करण्यात आली.

‘अॅम्ब्युलन्सला वाट देऊन आपण आपले सामाजिक दायित्व पार पाडावे,’ असा संदेश घेऊन अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवण्यात आला. प्रत्येक चौकामध्ये मंचाचे दोन सदस्य अॅम्ब्युलन्सला प्राधान्य देण्याविषयी प्रबोधन करत होते. मंचाच्या कार्याला सिंहगड रोडवरील डॉक्टरांच्या संघटनेनेही सक्रिय पाठिंबा दिला. डॉ. अमृत गुंदेचा यांनी मंचाच्या सदस्यांबरोबर प्रबोधनात सहभागही घेतला. या वेळी दत्तवाडी वाहतूक विभागातर्फे करपे यांनी मंचाच्या सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या उपक्रमासाठी अर्पण वृद्धाश्रमाचे डायरेक्टर डॉ. दीपक शिंदे यांनी अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली. अॅम्ब्युलन्सचालक गणेश लवटे यांनीही सक्रिय सहभाग घेतला. या अभियानात मंचाचे कार्यकर्ते अश्विन शिंदे, धनंजय मुळे, अ‍ॅड. नरहर कुलकर्णी, आशा पारनेरकर, अनिकेत दिवेकर, सानिका परुळेकर, राहुल तरडे, भूषण सणस, अनिल जाधव, सुधाकर मोरे, वृषाली शेकदार, विजय शेकदार यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न न सोडवल्यास मोर्चा काढू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीने विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न महत्त्वाचा आहे. येत्या काही दिवसांत हा प्रश्न न सुटल्यास मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान भवनावर विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी बुधवारी दिला.

राज्यात अनेक विद्यापीठांचे कार्यक्षेत्र साधारणपणे चार ते पाच जिल्ह्यांचे आहे. त्यामुळे विद्यापीठाचे मुख्य केंद्र असलेला जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कामांसाठी शेकडो किलोमीटरचे अंतर कापून थेट विद्यापीठ गाठावे लागते. एकाच कामासाठी विद्यार्थ्यांना अनेक वेळा विद्यापीठात चकरा माराव्या लागतात. यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे आर्थिक व शैक्षणिक नुकसान त्यांना न परवडणारे आहे. तसेच, यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा वेळ जातो. याच कारणाने विद्यार्थ्यांकडून प्रत्येक जिल्हा पातळीवर विद्यापीठ उपकेंद्राची मागणी पुढे येत आहे. त्यानुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने २० डिसेंबर ते १० जानेवारीच्या कालावधीत राज्यभरात सात ठिकाणी मोर्चे काढले, असे कोते-पाटील यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र होण्यासाठी अहमदनगर व नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर, तर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली व साताऱ्याला होण्यासाठी तेथील जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मोर्चे काढले. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचे उपकेंद्र बुलढाणा व वाशिमला होण्यासाठी विद्यापीठावर, तसेच अकोल्याला स्वतंत्र विद्यापीठ होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकेंद्र धुळ्याला होण्यासाठीदेखील तेथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. येत्या काळात विद्यापीठांचे उपकेंद्र होण्यासाठी सरकारने प्रयत्न न केल्यास मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात विधान भवनावर हजारो विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा कोते-पाटील यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कला जीवनाला ऊर्जा देते

$
0
0

चित्रकार प्रा. डॉ. दत्तात्रय बनकर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘कला कोणतीही असो, ती जीवनाला चेतना व ऊर्जा देते. कलावंतांनी कलाकृती साकारून आनंद मिळवावा आणि कलाकृतीच्या माध्यमातून आनंद द्यावा. या आनंदातूनच कलाकार जिवंत राहतो,’ अशी भावना प्रसिद्ध चित्रकार प्राचार्य डॉ. दत्तात्रय बनकर यांनी व्यक्त केली.

भारती कला महाविद्यालयातर्फे आयोजित कलावंत मेळाव्यात ते बोलत होते. प्राचार्य अनुपमा पाटील, उपप्राचार्य रूपेश हिरगुडे, उमाकांत कानडे, प्रा. मानसिंग काटकर, पोपट माने, श्रीकांत कदम, सुधीर पवार, सुनील देशपांडे या वेळी उपस्थित होते.

‘समाजात घडणाऱ्या घटनांवर कलावंत भाष्य करत असतो. आपल्यातील कलाकार जिवंत ठेवणे नितांत आवश्यक असते. कलावंताने जीवनात ध्येय ठेवून वाटचाल करावी. जीवनात जशी कोणतीही गोष्ट अशक्य नाही, तसे कलावंतांनीही ध्येयानुसार वाटचाल केल्यास यश निश्चितच मिळते,’ असे डॉ. बनकर यांनी सांगितले.

प्रा. हिरुगडे म्हणाले, ‘कलावंताने नेहमी सतेज राहायला हवे. कलाकृती निर्माण करून आनंद द्यायला हवा. गुरू-शिष्यात पूर्वी भावनिक नाते होते. हा आपुलकीचा जिव्हाळा आता कमी होऊ लागला आहे. शिष्यांची होणारी प्रगती ही गुरूंना एक नवी प्रेरणा, काम करण्याची ऊर्जा देत असते.’

प्रास्ताविक नितीन थोरात यांनी केले. प्रशांत लासूरकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रणाली हरपुडे, विदुला मालेकर, साईनाथ दंडवते, अस्मिता शहा, सुप्रिया गावडे, प्रसन्न मुसळे, प्रफुल्लता कुंभार, संजय वाघमारे, दिनेश सुतार, संपदा शेवाळे, वृषाली पाटील, सुरेंद्र कुडपणे, संतोष पाटील, अमित भूतकर यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनता ‘राष्ट्रवादी’चे योग्य मूल्यमापन करील

$
0
0

अजित पवार यांचा विश्वास

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. महापालिका निवडणुकीत जनता या विकासकामांचे मूल्यमापन योग्य पद्धतीने करील,’ असा विश्वास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी व्यक्त केला.

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा मेळावा पुण्यात पार पडला. त्या वेळी पवार बोलत होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, खासदार अॅड. वंदना चव्हाण, पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार बापू पाठारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस माजी शहराध्यक्ष मंगेश गोळे, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋषी परदेसी आणि असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष खोट्या आश्वासनांची खैरात करून लोकांची फसवणूक करून सत्तेत आला. त्यातच केंद्र सरकारने कोणतीही पूर्वतयारी न करता नोटाबंदीसारखा जुलमी निर्णय घेतला. भाजप सत्तेत आल्यास ‘अच्छे दिन’ येतील, महागाई कमी होईल, शेतकरी सुखी होईल, अशी खोटी आश्वासने देण्यात आली; मात्र यापैकी एकाही गोष्टीवर त्यांनी काम केले नाही. समाजातील युवक, विद्यार्थी, महिला, शेतकरी, व्यापारी असा एकही घटक या सरकारच्या काळात सुखी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून, दोन्ही शहरांतील नागरिक त्यांचे योग्य मूल्यमापन करतील.’

दरम्यान, ‘राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा ‘महाविद्यालय तिथे शाखा’ हा उपक्रम चांगला असून, या उपक्रमामुळे महाविद्यालयीन स्तरावर पक्षसंघटना बळकट होईल. भाजप जनतेची कशा प्रकारे दिशाभूल करत आहे, याचा विद्यार्थी संघटनेने पर्दाफाश करावा,’ असे पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॅट्रिमोनियल साइटवरून फसवणूक

$
0
0

सात उच्चशिक्षित महिलांना गंडा घालणारा अटकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शादी डॉट कॉम या वेबसाइटवरून ओळख झाल्यानंतर लग्नाच्या आमिषाने महिलांची फसवणूक करणाऱ्याला उच्चशिक्षित व्यक्तीला सायबर सेलने अटक केली आहे. त्याने पुण्यासह इतर शहरातील सात महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

रवींद्र सुधाकर कुलकर्णी (५०, रा. डीएसके विश्व) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कुलकर्णी याने इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले असून, काही नामांकित कंपन्यांत काम केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याने शादी डॉट कॉम वेबसाइटवरून उच्चशिक्षित महिलांना हेरून लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे, अशी माहिती सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.

नऱ्हे येथे राहणाऱ्या महिलेने विवाहासाठी शादी डॉट कॉमवर नोंदणी केली होती. त्यांचे प्रोफाइल पाहून कुलकर्णी याने त्यांना फोन केला आणि फोटो आवडल्याचे सांगितले. तसेच, सिंगापूर येथील एका कंपनीत व्हाइस प्रेसिडेंट असल्याची बतावणी करून तक्रारदार महिलेशी त्याने संपर्क वाढवला. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून लग्नानंतर सिंगापूर येथे राहायला जावे लागणार असल्याचे सांगितले. त्यासाठी पासपोर्ट, व्हिसा व इतर कारणांसाठी त्यांच्याकडून त्याने वेळोवेळी १५ लाख ६९ हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्याने लग्न केले नाही. तक्रारदार महिलेने कुलकर्णी याच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली; पण त्याने पैसे व दागिने परत न करता फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार आल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विजयमाला पवार, सागर परमानंद यांच्या पथकाने कुलकर्णी याला पकडले. त्याला अटक करून सिंहगड रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कुलकर्णी याने पुण्यातील डेक्कन, विश्रामबाग, येरवडा, सिंहगड रोड, हिंजवडी, गंगापूर येथील महिलांची लग्नाच्या आमिषाने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून विविध बँकांच्या खात्यावर पैसे घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इनकमिंग’मुळे चुरस

$
0
0

Sunil.Landge@timesgroup.com

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार ‘इनकमिंग’ सुरू आहे. त्याचे मुख्य कारण अर्थातच सत्ता आणि पद हेच आहे. त्यामुळे भाजपने ‘पार्लमेंटपासून पालिकेपर्यंत’ असा नारा दिला आहे. भाजपच्या आक्रमक चालींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड होत असून, या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे.

लोकसंख्यावृद्धीचा राज्यात सर्वाधिक वेग असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निवडणुकीचा रणसंग्राम भाजपमधील ‘इनकमिंग’मुळे गाजतो आहे. या पालिकेच्या आजपर्यंत सहा सार्वत्रिक निवडणूका झाल्या. त्या सर्वच्या सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताने जिंकल्या. २००७ आणि २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली. आता ते हॅट् ट्रिकचे स्वप्न बाळगून आहेत. परंतु, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर स्वप्न पूर्ण करणे म्हणावे तितके सोपे राहिले नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये एक विद्ममान आमदार, एक माजी खासदार, एक बडा स्थानिक नेता, पंचवीसहून अधिक नगरसेवक, दहा माजी नगरसेवक यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त धक्का दिला आहे. त्यामुळेच येथे आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत.

या महापालिकेच्या राजकारणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १९९२ पासून लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्या वेळी काँग्रेसचे तत्कालीन नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांच्याबरोबर राजकीय समेट घडवून दादांनी नेतृत्त्व केले. त्या वेळी त्यांना पानसरे, माजी आमदार विलास लांडे, संजोग वाघेरे-पाटील, लक्ष्मण जगताप, प्रकाश रेवाळे, योगेश बहल या तरुण नेतृत्वांनी खंबीर साथ दिली. त्या बळावर अजितदादांनी हुकुमत गाजवली. कारभार हाती ठेवताना अस्त्र आता त्यांच्या अंगावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपने शहरवासियांकडून मते मागण्यास सुरुवात केली आहे. आघाडीचे सरकार अस्तित्त्वात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निमाण अभियानाच्या (जेएनएनयूआरएम) माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मदतनिधी मिळविला. त्यामुळे शहरात मोठे प्रकल्प आकाराला येऊ शकले, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत भाजपने भावनिक साथ घातली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीचे गुऱ्हाळ कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीचा तिढा कायम असून, आज (शनिवारी) अंतिम निर्णय होणार असल्याचे वृत्त विश्वसनीय सूत्रांनी दिले. काँग्रेसने अचानक ७२ जागांवर दावा सांगितल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. दोन्ही काँग्रेसमधील महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रभागात जागावाटपावरून मतभेद असल्याने आघाडीत बिघाडीची चिन्हे आहेत.
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण आणि महापौर प्रशांत जगताप यांच्यात शुक्रवारी आघाडीबाबत बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसने ७२ जागांची मागणी केल्याने बैठकीतील चर्चेचा सूर बदलला होता, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. महत्त्वाच्या पंधरा जागांबाबत तिढा कायम असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची शनिवारी होणारी नियोजित बैठक पुढे ढकलली असून, ती सोमवारी होणार आहे. कोंढव्यातील चार जागा, वारजे, वानवडी, बाणेर, हडपसर, मुंढवा, वडगाव शेरी आणि भवानी पेठ या प्रभागांमधील महत्त्वाच्या जागांवर दोन्हीही पक्ष दावा करत आहेत. काँग्रेसकडून कोंढव्यात दोन जागांवर दावा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीला तेथील चारही जागा लढवायच्या आहेत. वानवडी येथे काँग्रेसकडून दोन जागा मागण्यात येत आहेत. या जागा काँग्रेसला देण्यास राष्ट्रवादी तयार आहे. शिवाजीनगर, बोपोडी येथेही अशाच प्रकारचा तिढा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आघाडीच्या बैठकांबाबतची माहिती घेतली असून, हा निर्णय शनिवारपर्यंत घेण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसकडून कार्ड कमिटीची बैठक शुक्रवारी रात्रीपर्यंत सुरू होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. दोन्हीही पक्षांकडून वादात अडकलेल्या प्रभागांमध्ये आपले प्राबल्य असल्याचा दावा करण्यात येत आहे.

काँग्रेसने जागा वाढवल्या
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे ६९ जागांची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसने गुरुवारी रात्री प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांच्या निवासस्थानी कार्ड कमिटी तसेच ब्लॉक अध्यक्षांची बैठक बोलावली होती. या वेळी प्रमुख नेत्यांनी प्रत्येक ब्लॉक अध्यक्षांशी तटस्थपणे चर्चा करून आघाडी करण्याबाबत चाचपणी केली. यावेळी अनेक ब्लॉक अध्यक्षांनी आघाडी करू नये, असा सूर आळवल्याने काँग्रेसने आपल्या जागांमध्ये वाढ केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ खाऊ वाटपातही मलिदा

$
0
0

शिक्षण मंडळाची प्रजासत्ताकदिनी करामत; कंत्राटात गडबड

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बाजारात चार रुपयांना मिळणारा बिस्कीटचा पुडा निविदेमार्फत साडेचार रुपयांनी विकत घेऊन विद्यार्थ्यांना गुरुवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी वाटण्याचा प्रकार पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने केला आहे. महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा सुमारे एक लाख ६ हजार बिस्किटच्या पुड्यांचे वाटप करण्यात आले.
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनी आणि इतर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दर वर्षी खाऊचे वाटप करण्यात येते. या विविध प्रकारच्या खाऊचे वाटप करण्यासाठी शिक्षण मंडळाकडून निविदा काढण्यात येतात. निविदेमध्ये सर्वांत कमी रुपयांची रक्कम भरणाऱ्या कंत्राटदाराला खाऊ वाटपाचे कंत्राट दिले जाते. शैक्षणिक वर्षात येणारे विविध प्रकारच्या दिवसांचे उपक्रम, स्नेहसंमेलन आदी कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना नियोजनानुसार खाऊचे वाटप करण्यात येते. त्यानुसार प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांना खाऊमध्ये बिस्किटचे पुडे वाटण्यात आले.
प्रजासत्ताक दिनी बिस्किटचे पुडे वाटण्यासाठीचे कंत्राट मंडळाने साडेचार रुपये प्रति पुडा या हिशेबाने दिले. प्रत्यक्षात बाजारात या पुड्याची किंमत चार रुपये आहे. त्यामुळे हा पुडा साडेचार रुपयांनी विकत घेण्याचे कारण कळू शकलेले नाही. मंडळाने गुरुवारी महापालिकेच्या शाळांतील सुमारे एक लाख सहा विद्यार्थ्यांना पुड्यांचे वाटप केले आहे. दरम्यान, बिस्किटच्या पुड्याचे वजन ६० ते ७० ग्रॅम राहणे अपेक्षित असताना ते केवळ ५४ ग्रॅम भरल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव आणि विक्रांत अमराळे यांनी केला.
एका बिस्किट पुड्याची किंमत चार रुपये असताना तो पुडा साडेचार रुपयांनी विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी कंत्राटदाराला कंत्राट देणे, तसेच पुड्याचे वजन कमी असणे हा प्रकार चुकीचा आहे. मंडळाचे प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या संगमनताने हा प्रकार झाला आहे. इतर खाऊ वाटपाच्या कार्यक्रमात देखील विविध खाद्यपदार्थ वाटण्यात असाच प्रकार झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाऊ वाटपाची महापालिकेने चौकशी करावी, असे यादव म्हणाले.

‘अतिरिक्त रक्कम वसूल करू’
शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाच्या निविदा प्रक्रियेत एकूण तीन कंत्राटदारांनी सहभाग घेतला. यात बिस्किट पुड्याची सर्वांत कमी रक्कम म्हणजेच साडेचार रुपये भरणाऱ्याला वाटपाचे कंत्राट देण्यात आले. चार रुपयांचा बिस्किट पुडा साडेचार रुपयांना दाखवून त्याचे विद्यार्थ्यांना वाटप केले असल्यास जादा रक्कम कंत्राटदाराकडून वसूल करण्यात येईल किंवा इतर खाऊच्या रकमेत समायोजन करण्यात येईल, असे शिक्षण मंडळाच्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुलाल उधळून शिवसैनिकांचा जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ राहिलेल्या युतीमधून ‘सुटका’ झाल्याचा आनंद शिवसैनिकांनी गुलाल उधळून शुक्रवारी साजरा केला. ‘या कमळीचे करायचे काय; खाली डोके वर पाय,’ अशा घोषणा देऊन आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षावरच हल्ला चढविण्याचा इरादा सैनिकांनी बोलून दाखवला.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपबरोबर युती नाही, अशी घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर डेक्कन जिमखाना येथील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात सकाळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. या वेळी गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. या वेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्षालाच टार्गेट करण्यात आले. शहरप्रमुख विनायक निम्हण, महादेव बाबर, सचिन तावरे, श्याम देशपांडे, अशोक हरणावळ आदी उपस्थित होते. ‘आता फक्त शिवसेना या चार अक्षरांसाठी लढायचे,’ अशी शपथ शिवसैनिकांनी घेतली. मनसेच्या नगरसेविका रेखा साळुंखे यांच्यासह अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
‘गेली अडीच वर्षे शिवसैनिकांची घुसमट होत होती. वाघ दोन पावले मागे घेतो; तो झेप घेण्यासाठी.. या निवडणुकीत शिवसेना महापालिकेवर भगवा फडविल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपही या निवडणुकीतील शिवसेनेचे शत्रू असतील. युतीसाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु भाजपमुळेच युती होऊ शकली नाही. युती होणार नाही, अशी खबरदारी भाजपने घेतली,’ असे निम्हण म्हणाले.

नोटाबंदीप्रमाणेच मतदार या निवडणुकीत भाजपवर बंदी घालतील. भाजपवर आत्मचिंतनाची वेळ आणल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही.भाजपला गची बाधा झाली आहे. त्या पक्षाला सूज आली आहे आणि सूज उतरल्याशिवाय राहत नाही.
विनायक निम्हण, शहरप्रमुख, शिवसेना

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती व्हावी, असा आमचा पहिल्यापासून प्रयत्न होता. दुर्दैवाने, शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. स्वबळावर लढण्याची आमचीही तयारी आहे.
योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकबरूद्दीन ओवेसी बुधवारी शहर दौऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएम आणि मित्र पक्षाच्यावतीने उभ्या राहणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा येत्या बुधवारी (१ फेब्रुवारीला) होणार आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीचे सदस्य अंजूम इनामदार यांनी ही माहिती दिली. पालिका निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची तयारी केली असल्याने ही जाहीर सभा होणार आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुका या पक्षाच्या तिकिटावर लढण्याची संधी मिळावी, यासाठी पुणे शहरातून ७० तर, पिंपरी- चिंचवडमधून ५० इच्छुकांनी पक्षाकडे मुलाखत दिली आहे. पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व इच्छुकांनी पुणे शहरात हैदराबादचे आमदार आणि एमआयएमचे नेते ओवेसी यांची जाहीर सभा घ्यावी, अशी आग्रही मागणी केल्याने ही सभा घेणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. या सभेसाठी शहरातील चार मैदानांची मागणी करण्यात आली असून, आवश्यक त्या परवानगीसाठी पोलिसांकडे अर्जही दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तसेच निवडणूक कार्यालयाने परवानगी दिल्यानंतर पुढील दोन दिवसांत सभेचे ठिकाण जाहीर केले जाणार आहे. या सभेसाठी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, आमदार वारीस पठाण, प्रदेशाध्यक्ष मोईन सय्यद, पक्षाबरोबर युतीतील घटक पक्ष असलेल्या बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे नेते डॉ. सुरेश माने, राहुल डंबाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे इनामदार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रतीब...दुधाचा अन् विकासकामांचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नागरिकांशी दररोज सकाळी हमखास संपर्क घडवून आणणारा व्यवसाय म्हणजे, दूधविक्रीचा... डेअरीमध्ये दूध विक्री करताना किंवा दूधाची घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या या दुग्ध व्यावसायिकांचा जनसंपर्क दांडगा असतो. दूध विक्रेत्यांनी ‘दूधाची लाइन’ टाकून वाढलेल्या जनसंपर्काच्या जोरावर महापालिकेत नगरसेवक पदापर्यंत मजल मारली.
राजकारण आणि समाजकारण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. राजकारणात जाऊन अनेक जण सामाजिक कार्यकर्ते होतात. तर, सामाजिक कार्याची आवड असलेल्या व्यक्ती समाजकार्य करता करता राजकारणात प्रवेश करतात. मात्र, काहींना पोटापाण्याच्या व्यवसायामुळे राजकारणात प्रवेश मिळतो. असे उदाहरण सध्याच्या काळात क्वचितच पाहायला मिळते. मात्र, सत्तरच्या दशकात पुण्याच्या उपनगरांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यापूर्वी दुग्ध व्यावसायिक महापालिकेच्या रणांगणात उतरल्याचे पाहायला मिळते. दुग्ध व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणावर होणारा जनसंपर्क हा त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरला.
नंदू घाटे १९७०-७५ या कालावधीत नगरसेवक म्हणून निवडून आले. हनुमंत अमरा‍ळे पंधरा वर्षे नगरसेवक होते. तसेच, १९८५ ते १९८७ या कालावधीत त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले. उल्हास ढोले-पाटील १९८० ते १९९७ या कालावधीत नगरसेवक होते. बुवा नलावडे १९८५ आणि १९९२मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. बाळासाहेब राऊत यांनी १९८५ ते १९९० या कालावधीत महापालिकेत प्रतिनिधित्व केले आणि शहराच्या प्रथम नागरिकाचा मानही त्यांना मिळाला. विजय काळे १९८५ पासून २००२ पर्यंत नगरसेवक होते. शिवाजी केदारी १९९२ ते २००२ या कालावधीत तीन टर्म नगरसवेकपद मिळवले. सुहास कुलकर्णी १९९२ ते २००७ पर्यंत नगरसेवक होते.
काळे यांनी महापालिकेत कामकाज केल्यानंतर म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. तसेच, २०१४मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवाजीनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडूनही आले.

दूधवाल्यांची मदत लागणार
सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू आहे. यंदा चार सदस्यीय नगरसेवकांची प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी अधिक धावपळ करावी लागणार आहे, असे दिसते. त्यामुळे अनेक इच्छुक आतापासून दूध विक्रेत्यांच्या नेटवर्कचा प्रचारासाठी वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

दूधविक्रीच्या निमित्ताने लोकांशी दैनंदिन संपर्क येतो. किमान पाचशे ते हजार नागरिकांना भेटणे होते. या संपर्काचा फायदा निवडणुकीसाठी होऊ शकतो, याची कल्पना सुरुवातीला नव्हती. भारतीय जनता पक्षाने १९९२मध्ये मला नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली. निवडणुकीच्या महिनाभर आधी मला निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश देण्यात आले. तोपर्यंत मला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे त्यानंतर सर्व तयारी केली. माझ्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवारासह भाजपचा बंडखोर उमेदवारही उभा ठाकला होता. मात्र, तरीही माझा विजय झाला. तयारीसाठी मला अल्प कालावधी मिळाला असला, तरीही माझा विजय सहज झाला. या विजयामागे दुग्ध व्यवसायामुळे माझा निर्माण झालेला जनसंपर्क कारणीभूत ठरला.
सुहास कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतळ्याखाली हार वाहण्याची नामुष्की

$
0
0

आधुनिक शिडी वेळेवर सुरू न झाल्याचा फटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी पालिकेने मोठ्या हौसेने बसविलेली हायड्रोलिक शिडी सुरू न झाल्याने प्रजासत्ताक दिनी महापौरांना पुतळ्याखालीच हार अर्पण करावा लागला. लाखो रुपये खर्च करून उभारलेली शिडी वेळेवर सुरू न झाल्याने नाराज झालेल्या महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी अग्निशमन दलाची साधी शिडी आणून जवानांकडून फुले यांच्या पूर्णा‍कृती पुतळ्याला हार घातला.
महापा‌लिकेच्या मुख्य इमारतीसमोर असलेल्या हिरवळीचे नूतनीकरण सध्या सुरू आहे. त्यासाठी पालिकेने तब्बल पावणेदोन कोटी रुपये खर्च केले. नूतनीकरण करताना पालिकेसमोर महात्मा फुले यांचा पुतळा बसविण्यासाठीच्या चौथऱ्याचेही नूतनीकरण करण्यात आले. पुतळ्याला हार घालणे सोयीचे व्हावे, यासाठी जुनी शिडी काढून आधुनिक हायड्रोलिक शिडी बसविण्यात आली. मात्र, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना ही शिडी सुरूच न झाल्याने महापौरांवर पुतळ्याच्या खाली हार अर्पण करण्याची नामुष्की ओढवली. वेळेवर शिडी न उघडण्याची घटना यापूर्वीही एकदा घडली असून वेळीच दुरुस्ती न करणाऱ्या अधिकाऱ्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
महापालिकेने नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही अशा पद्धतीने आयत्या वेळेस हार घालण्यासाठी शिडी कार्यान्वित होत नसेल तर एवढा खर्च करून उपयोग काय, अशी चर्चा महापालिकेत सुरू आहे. पालिकेने ही शिडी सुरू आहे की नाही याची चाचणी का घेतली नाही, असा प्रश्नही विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेतू’च्या तपासणीचे आदेश

$
0
0

तहसीलदार घेणार महिनाभरात झाडाझडती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महा-ई-सेवा केंद्र आणि सेतू सुविधा केंद्रांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व केंद्रांची तहसीलदारांच्या पथकाद्वारे महिन्यात तपासणी करण्यात येणार आहे. या केंद्रांनी ‘ऑफलाइन’ अर्ज स्वीकारू नयेत, दराचे फलक कार्यालयात लावावेत, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. नागरिकांकडून जास्त शुल्क आकारणी​ केल्याचे आढळल्यास परवाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महा-ई-सेवा आणि सेतू सुविधा केंद्रांमध्ये नागरिकांना योग्य सेवा देण्यात येत नाही; तसेच जास्त शुल्क आकारणी केली जाते अशा प्रकारच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ​अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी शहरातील महा-ई- सेवा केंद्रचालकांची बैठक घेतली. या बैठकीत संबंधित केंद्रचालकांना समज देण्यात आली. नागरिकांशी योग्य पद्धतीने वर्तन करण्यात येत नसल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. या केंद्रांमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामध्ये नागरिकांची पिळवणूक केली जाते, नागरिकांकडून जास्त पैसे घेण्यात येतात. अनेक केंद्रांमध्ये ऑफलाइन अर्ज स्वीकारून ते पुढील कार्यवाहीसाठी पाठविले जातात. या त्रुटी सुधारून सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
मुठे म्हणाले की, ‘महा-ई-सेवा केंद्रांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी तहसीलदारांची पथके नेमण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या पथकांकडून एका महिन्यात सर्व केंद्रांची तपासणी केली जाणार आहे. त्याचे अहवाल आल्यानंतर त्रुटी आढळलेल्या केंद्रांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत.’ ‘अनेक केंद्रांमध्ये ऑनलाइन अर्ज घेण्याऐवजी ऑफलाइन अर्ज घेऊन ते पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. यापुढे ऑनलाइनच अर्ज घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक कागदपत्रासाठी किती शुल्क आकारले जाते, याचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्याचा फलक केंद्राच्या बाहेर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यापेक्षा जास्त पैसे आकारल्याचे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.’

फलकाचे फोटो पाठविण्याचे आदेश
‘बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली आहे की नाही आणि सूचनांचे पालन करण्यात येते का, हे तपासण्यासाठी सर्व महा-ई-सेवा केंद्रचालकांचा व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. त्यावर दराच्या फलकांचे फोटो पाठवण्याचे आदेश केंद्रचालकांना देण्यात आले आहेत.’ असे अतिरिक्त जिल्हाधिकारी काळे यांनी सांगितले.

महा-ई-सेवा केंद्रांवर गैरप्रकार होत असल्याची तक्रार आल्यास त्याची ताबडतोब तपासणी केली जाणार आहे. तक्रारीत तथ्य आढळल्यास संबधित केंद्रचालकाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.
- राजेंद्र मुठे
निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा प्रस्थापितांना ‘धक्का’

$
0
0

काही विद्यमानांची संधी हुकणार; काहींना अन्य पर्याय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधानसभेप्रमाणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या संभाव्य यादीतून अनेकांना काही धक्के बसण्याची शक्यता आहे. शहरातील काही विद्यमान नगरसेवकांचे ‘तिकीट’ कापले जाण्याची दाट चिन्हे असून, काही नगरसेवकांना पक्षहितासाठी यंदा दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढविण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.
भाजपच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी उमेदवार यादीवर अंतिम निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी दिवसभर मुंबईत तळ ठोकला होता. तत्पूर्वी, गेल्या तीन दिवसांत शहराच्या सर्व प्रभागांतील संभाव्य उमेदवारांच्या नावावर जोरदार चर्चा झाली. शहरातील प्रत्येक आमदाराने आपल्या पसंतीच्या उमेदवारांची नावे लावून धरली होती, असे समजते. तर, इतर पदाधिकाऱ्यांनी काही वेगळे पर्याय सुचवले होते. शहरातील सर्व विद्यमान नगरसेवकांच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. भाजपचे शहरात सध्या २६ नगरसेवक असून, आगामी निवडणुकीसाठी काही मोजके अपवाद वगळता पुन्हा सर्वांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. काही विद्यमान नगरसेवकांचे तिकीट धोक्यात आले असून, त्यांच्याऐवजी दुसऱ्या सक्षम पर्यायाचा विचार पक्षाकडून केला जाऊ शकतो, असे दिसते. तसेच, प्रभागरचना बदलली असल्याने पक्षाच्या गरजेनुसार काही विद्यमानांच्या प्रभागांमध्येही बदल होऊ शकतो, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. काही प्रभागांमध्ये भाजपला मानणाऱ्या परंपरागत मतदारांची संख्या कमी असल्याने अशा ठिकाणी संपूर्ण पॅनेल विजयी होण्यासाठी काही ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांना तेथून लढण्याची जबाबदारी देण्यात येण्याची चिन्हे आहेत.
भाजपच्या उमेदवार यादीवर स्थानिक नेतृत्वासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही (आरएसएस) प्रभाव असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांतील भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये संघाने आग्रह धरलेल्या उमेदवारांना संधी दिली जाऊ शकते, असाही मतप्रवाह आहे. येत्या दोन दिवसांत भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याने नेमके कोणाला जोर का झटका बसणार आणि कोणाला सुखद धक्के मिळणार, हे स्पष्ट होणार आहे.
...
वर्षा तापकीर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा

पुणे महानगरपालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नगरसेविका वर्षा विलास तापकीर यांच्या विरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत किरण परदेशी (वय ४५, रा. धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ६९ मधून वर्षा तापकीर यांनी निवडणूक लढविली होती. तापकीर या खुल्या प्रवर्गातील असताना देखील त्यांनी नगरसेवकपदाचा फायदा घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडे कुणबी जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केले. निवडून आल्यानंतर नगरसेवक पदाचे सर्व फायदे घेतले. तापकीर यांनी निवडणुकीत जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी कोर्टात दावा दाखल केला केला होता. या दाव्यात सुनावणी होऊन कोर्टाने सहकारनगर पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कोर्टाच्या आदेशावरून तापकीर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची पहिली यादी रविवारपर्यंत?

$
0
0

सत्तर जागांवरील उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेत शिवसेनेसोबत युती होणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातर्फे पहिल्या टप्प्यात थेट सत्तरहून अधिक जणांची उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. शहरातील १६२ जागांपैकी निम्म्या जागांवर पक्षाच्या निवडणूक निवड मंडळाची (पार्लमेंटरी बोर्ड) सहमती झाली असून, पहिली यादी रविवारपर्यंत जाहीर केली जाईल, अशी चिन्हे आहेत.
शहरातील विद्यमान नगरसेवक, विधानसभेनंतर वाढलेली पक्षाची ताकद, इच्छुकांची प्रचंड संख्या आणि इतर पक्षांतून झालेले इनकमिंग, यामुळे युती झाल्यास नेमकी कोणाला संधी द्यायची, असा गहन प्रश्न भाजपसमोर उपस्थित झाला असता. युती संपुष्टात आल्याचे गुरुवारी रात्री जाहीर झाल्यानंतर भाजपमधील अनेक इच्छुकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. युती झाल्यास कदाचित अनेक इच्छुकांच्या जागा मित्रपक्षाला द्याव्या लागल्या असत्या. आता, स्वबळावर लढण्याची संधी मिळणार असल्याने उमेदवारी केव्हा जाहीर होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने गेल्या तीन दिवसांत शहरातील सर्व प्रभागांचा आढावा घेऊन संभाव्य उमेदवारांची ‘शॉर्ट लिस्ट’ तयार केली आहे. ४१ प्रभागांतील १६२ जागांपैकी निम्म्या जागांवर एकमत झाल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी उर्वरित जागांवर वाद असल्याने संबंधित जागांचा निर्णय प्रदेशाकडे सोपवण्यात आला आहे. या जागांवर निर्णय घेण्यापूर्वी सर्वसहमती झालेल्या उमेदवारांची यादी प्रदेश भाजपतर्फे दोन दिवसांत जाहीर केली जाईल, असे संकेत मिळत आहेत.
प्रभागनिहाय यादी अंतिम करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी शुक्रवारी दिवसभर मुंबईत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेण्यात आली आणि संभाव्य यादीबाबत विचार-विनिमय झाला.

आरपीआयला १५ जागा?
शहरात शिवसेनेसोबत युती होणार नाही, हे स्पष्ट झाले असले, तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत (आरपीआय) लढणार असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शहराच्या विविध भागांत आरपीआयने २८ जागांची मागणी केली आहे. शिवसेना सोबत नसल्याने आता भाजपकडून आरपीआयला किती जागा दिल्या जाणार, याबाबतही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या पालिका निवडणुकीत भाजप-शिवसेनेने आरपीआयला १५ जागा दिल्या होत्या. यंदाही १०-१५ जागाच आरपीआयसाठी सोडल्या जातील, असे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘तोंड बंद, कान खुले हाच फंडा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भिडू...लोगोंको प्यार...मी कामगार आहे. मला फक्त काम करता येते, बोलता येत नाही. तोंड बंद आणि कान खुले हाच, बोले तो हाच आपला फंडा आहे भिडू. इतरांच्या आधी स्वत:चा सन्मान करा. गोड बोला, माणसांचा आदर राखा...हे शब्द त्याने उच्चारताच टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा पाऊस पडला. शिट्टी वाजविण्याचा मोह त्यालाही आवरता आला नाही; मग त्यानेही एक जोरदार ‘शिट्टी’ ठोकली...हा कलंदर कलाकार माणूस म्हणजे सर्वांचा लाडका जग्गूदादा...अर्थात जॅकी श्रॉफ.

कलासंस्कृती परिवारातर्फे आयोजित स्टार ऑफस्क्रिन पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांना जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते ‘कलाकृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. बाबा शिंदे, तन्मय पेंडसे, विवेक दामले, भारत कुमावत, प्रवीण जोशी यांना ‘समाजसंस्कृती पुरस्कार’; तर यशवंत भुवड व शिवानंद आक्के यांना ‘निकोप सेवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. पडद्यामागील कलाकार अनिल शेलार, बाळू शेलार, बाळू भोकरे, अमित इंगळकर, विठ्ठल सलगर, चंद्रकांत भंडारी, नितीन पोपळभट, मिशेल काकडे व जगदीश जगदाळे यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, चारूदत्त सरपोतदार, सुधीर मांडके व कलासंस्कृती परिवार आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते.

सहाय्यक तंत्रज्ञ आणि विविध भागांतील कामगारांना पुरस्कार स्वरूपात दोन लाखांची पॉलिसी दिली जाते, त्याचा उल्लेख होताच जग्गूदादाने गतवर्षी हा पुरस्कार मिळालेल्या कामगारांना आपल्या पॉलिसीचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन केले. ‘आज या व्यक्ती आहेत म्हणून आम्ही आहोत’ अशी भावना त्याने व्यक्त केली. मराठी चित्रपटांबद्दल काय वाटते असे विचारले असता, ‘पिक्चर तो एकही होता है, मी केवळ पोपट आहे, स्वत:ची भाषा नीट बोलता येत नाही, इतर भाषा काय बोलणार ?’ अशी टिप्पणी जग्गूदादाने केली. सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले.

‘रसिकांच्या प्रेमामुळे मी इथंवर’

‘ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांना यंदाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला पत्र दिले आहे,’ असे मेघराज राजेभोसले यांनी सांगितले. ‘रसिकांनी इतके प्रेम दिले की त्या प्रेमामुळेच मी इथंवर पोहोचले,’ अशी भावना सुलोचना दिदी यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालभारती’मधील दारूपार्टीची चौकशी होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) कार्यालय परिसरात मंगळवारी सायंकाळी दारूपार्टी झाल्याचे उघडकीस आले आहे. परिसरात मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच सापडल्याने कार्यालयात मद्यपार्टी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याची; तसेच मद्यपार्टीची चौकशी करण्याचे आदेश ‘बालभारती’चे संचालक डॉ. सुनील मगर यांनी दिले आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्तीच्या कार्यक्रमांदरम्यान हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

‘बालभारती’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने २३ ते २७ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सरकारी कामांसाठी येणाऱ्या व्यक्तींसाठी ‘बालभारती’च्या कार्यालयाच्या आवारात गेस्ट हाउस आहेत. या ‘गेस्ट हाउस’मधील खोली क्रमांक ५१२ च्या बाहेर मंगळवारी सायंकाळी दारूच्या बाटल्यांचा खच सापडला. त्याच वेळी ‘बालभारती’चा एक अधिकारी मद्यधुंद अवस्थेत इतर कर्मचाऱ्यांना आढळून आला. घडलेल्या प्रकाराची वाच्यता होऊ नये, म्हणून इतर कर्मचाऱ्यांनी हा प्रकार ‘सेटल’ केल्याचे समजते.

हा अधिकारी कोण, त्या अधिकाऱ्यासोबत इतर कोण अधिकारी व कर्मचारी होते आणि पार्टी नेमकी कधी झाली, याबाबत अजून कोणत्याच प्रकारची ठोस माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. या प्रकरणाची माहिती बुधवारी उघडकीस आली. खोलीबाहेर मद्याच्या लहान-मोठ्या मिळून २० ते ३० बाटल्या होत्या. त्यामुळे या मद्यपार्टीला दहापेक्षा अधिक लोकांनी हजेरी लावली असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत ‘बालभारती’च्या प्रशासनाकडून पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आलेली नाही.

‘बालभारती’ कार्यालयाच्या बाजूच्या इमारतीत शिक्षण आयुक्त कार्यालय आहे; तसेच ‘बालभारती’च्या पुस्तकांचे गोडाउन आहे. त्यामुळे या परिसरात पुरेशा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असते. असे असतानादेखील प्रवेशद्वारातून मद्याच्या बाटल्या कार्यालयांच्या परिसरात आणल्या जातात, हे फार धोकादायक असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. या पूर्वीदेखील असे प्रकार घडले असल्याचे कर्मचाऱ्यांनी नमूद केले. ‘कार्यालयाच्या परिसरात सात ते आठ सीसीटीव्ही कॅमेरे असून, येत्या काळात यामध्ये वाढ करण्यात येईल. हे कॅमेरे आवश्यक त्या ठिकाणी लावण्यात येतील आणि कार्यालयात ये-जा करणाऱ्यांची तपासणी करण्यात येईल,’ असे डॉ. मगर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांना उधाण

$
0
0

वाणाच्या आड वस्तूंचे वाटप जोरात

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असली तरी, अजूनही उमेदवारी जाहीर झाली नसल्याचा फायदा शहरातील बहुतेक सर्वच पक्षांचे इच्छुक उठवित असल्याचे चित्र आहे. प्रमुख पक्षांची यादी जाहीर होण्यापूर्वीच आपापल्या प्रभागातील मतदारांना विविध गोष्टींचे वाटप करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे.
संपूर्ण शहरामध्ये संक्रांतीच्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांचे पेव फुटले असून, वाण म्हणून अनेक गोष्टींचे वाटप राजरोसपणे सुरू आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदारांना विविध गोष्टींचे वाटप करणे नवीन नाही. यापूर्वीही अनेकदा अशाप्रकारे केले गेलेले वाटप हा चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र आचारसंहितेमुळे उमेदवारांच्या वैयक्तिक खर्चावर मर्यादा येते. साहजिकच त्या काळामध्ये काही गोष्टींचे वाटप करणे अडचणीचे होते. त्यामुळे यंदा उमेदवारांनी हा नवा मार्ग चोखाळला आहे. संक्रांतींचे वाण म्हणून पूजेच्या ताटापासून ते प्लास्टिकच्या डब्यांपर्यंत आणि महिन्याचे किराणा सामान असलेल्या पिशवीपासून मिक्सर ग्राइंडरपर्यंत अनेक गोष्टींची लयलूट सुरू आहे. अनेक ठिकाणी हळदीकुंकू स्वीकारण्यासाठी हजारो महिलांच्या रांगा लागत असून, याकडे निवडणूक यंत्रणेचे कोणतेही लक्ष नाही.

विशेष स्पर्धांचे आयोजन
एका मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या मालिकेशी साधर्म्य असलेला खेळही सध्या प्रत्येक प्रभागात सुरू आहे. दिवाळीनंतर शहरात अशा प्रकारचे किमान शंभराहून अधिक कार्यक्रम झाले असून, त्यामध्ये विजेत्यांसाठी स्कूटर, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशिन आदी बक्षिसे ठेवण्यात येतात. त्याचप्रमाणे या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये पैठण्याही बक्षीस म्हणून दिलया जातात. कार्यक्रमाला येणाऱ्या महिलेला हमखास वस्तू भेट म्हणून दिली जाते. हा कार्यक्रम करण्यासाठी संबंधित कलाकारांना हजारो रुपये मानधन, तसेच कार्यक्रमांवरही प्रचंड खर्च करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची यादी उद्या जाहीर होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती तुटल्यानंतर पुणे महापालिका निवडणुकीसाठी सेनेची पहिली यादी उद्या, सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवारी निश्चितीबाबत शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी २७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तीन फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची उमेदवारी यादी तयार करण्याची लगबग सुरू आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत सेनेचे १५ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी प्रमोद भानगिरे यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी सदस्यत्वाचा राजीनामा देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढविली. तसेच, भरत चौधरी आणि विजय देशमुख यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यामुळे सेनेच्या खात्यात १२ नगरसेवक आहेत. सध्याच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन काही नगरसेवकांनी युती झाली, तरच स्वतः लढण्याचा निर्णय घेतला होता. आता युती न झाल्याने ते स्वतः लढणार की, कुटुंबातील महिलेला उमेदवारी देण्याचा प्रयत्न करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी सेनेची ७० उमेदवारांची यादी तयार झाल्याचे वृत्त आहे. त्याबरोबरच सेनेची पहिली प्राथमिक यादीदेखील तयार असून, त्यावर पक्षश्रेष्ठींची मोहोर उमटणे बाकी असल्याचे समजते.

ज्येष्ठ सैनिक रणांगणात
महापालिका निवडणुकीच्या रणांगणात ज्येष्ठ शिवसैनिक आता सक्रिय होणार आहेत. पक्षाच्यावतीने रविवारी सकाळी कृष्णसुंदर गार्डन येथे ज्येष्ठांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. जुन्या आणि ज्येष्ठ शिवसैनिकांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनसे’ची यादी ‘वेटिंग लिस्ट’वर

$
0
0

पदा​धिकाऱ्यांचे मत जाणून ठाकरेंकडे पाठविणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्यास आणखी काही दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे. संभाव्य यादी तयार करण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शनिवारी बैठक घेण्यात आली. एक ते दोन दिवसात शहरातील पदाधिकाऱ्यांचे अभिप्राय जाणून घेऊन संभाव्य यादी पक्षप्रमुखांकडे पाठविण्यात येणार आहे.
गेल्या आठवड्यातच पक्षाची संभाव्य यादी तयार असून, साहेब केव्हाही यादी जाहीर करतील असे सांगितले जात होते. मात्र, आठवडा उलटून गेला तरी यादीला अजून मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वाढत आहे. युती-आघाडीच्या निर्णयाची वाट पाहण्यासाठी ही यादी लांबवण्यात येत असल्याचीही चर्चा होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तत्पूर्वी, शुक्रवारी नेते अनिल शिदोरे आणि शहर पदाधिकाऱ्यांनी उर्वरित इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण केल्या.
त्यानंतर शनिवारी या बैठकीला राजन शिरोडकर, बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, शहराध्यक्ष अजय शिंदे, हेमंत संभूस, गटनेते किशोर शिंदे, उपाध्यक्ष बाळा शेडगे, बाबू वागस्कर, वसंत मोरे आदी उपस्थित होते. या बैठकीत नेत्यांनी मुलाखतींबाबतचे आपले मत मांडून शहर पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारांबाबत आपला अभिप्राय देण्यास सांगितल्याचे समजते.
शहर पदाधिकाऱ्यांना दोन दिवसात याबाबतचा अभिप्राय देण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर पुन्हा बैठक होऊन संभाव्य यादी पक्षप्रमुखांना पाठविण्यात येईल. पक्षप्रमुखांच्या मान्यतेनंतर अंतिम यादी प्रसिद्ध होईल, असे सूत्रांनी सांगितले.

शिवसैनिक मनसेत
शिवसेनेतून प्रभाग १४ (डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर) मधून संतोष चव्हाण, प्रभाग ७ (पुणे विद्यापीठ) मधून काशिनाथ कांबळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या उपस्थितीत भांडारकर रस्त्यावरील मध्यवर्ती कार्यालयात हा प्रवेश झाला.

आयाराम, गयारामांवर लक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणखी काही नगरसेवक पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत. काहींची सेनेत घरवापसी होण्याची चर्चा असून काही भाजप तर काही राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर तिकीट वाटपानंतर अन्य पक्षातील छोटे मोठे मासेही मनसेच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. त्याबाबत काय भूमिका घ्यायची, यावरही शनिवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images