Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

निरभ्र आकाश हरवले

0
0

वाढत्या वायू आणि प्रकाश प्रदूषणाचा परिणाम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
जल, ध्वनी आणि वायू प्रदूषणामध्ये वेगाने वाढत होत असलेल्या पुण्यात आता प्रकाश प्रदूषणाचीही भर पडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे वाढत्या वायू आणि प्रकाश प्रदूषणामुळे खगोल अभ्यासकांना आकाश निरीक्षणासाठी आता पुण्याबाहेर पन्नास किलोमीटर दूर जावे लागते आहे. या प्रदूषणाचे थेट परिणाम पर्यावरणावरही होत आहेत.
पुण्यामध्ये खगोल अभ्यासकांबरोबरच हौशी खगोल निरीक्षकांची संख्या मोठी आहे. शहरातील विविध संस्था या संदर्भात सातत्याने जनजागृती उपक्रम आयोजित करून नागरिकांना खगोल विश्वाशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. दहा वर्षांपूर्वीपर्यंत या संस्था सिंहगड जवळील खानापूर भागात किंवा हिंजवडी जवळ असलेल्या काही छोट्या गावांमध्ये कॅम्प नेऊन नागरिकांना आकाश निरीक्षणाचे धडे देत होते. संशोधकांचा अभ्यासासाठी देखील ही ठिकाणी समाधानकारक होती. मात्र आता शहराचा वाढता विस्तारामुळे वातावरणातील धूळ, धुलीकण आणि प्रकाशाचा थेट परिणाम या अभ्यासावर झाला आहे. परिणामी निरभ्र आकाश अनुभवण्यासाठी अभ्यासकांना आता चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतर दूर जावे लागते आहे.
शहरातील जमिनीलगतच्या वातावरणात धूर, धूलीकणाबरोबरच वेगवेगळे सूक्ष्मकण (एअरोसोल) मिसळलेले असतात. रात्री रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दिव्यांचा, ग्लो साइनचा अतिरिक्त प्रकाश आकाशाच्या दिशेने गेल्यास वातावरणातील या कणांवरून प्रकाशाचे अपस्करण होते आणि हा प्रकाश आकाशभर पसरतो. त्यामुळेच शहरातील आकाश रात्रीच्या वेळी लालसर (स्काय ग्लो) दिसते. या स्काय ग्लोची तीव्रता वायू प्रदूषणाचे प्रमाण आणि दिव्यांकडून आकाशाच्या दिशेने जाणाऱ्या अतिरिक्त प्रकाशाच्या प्रमाणावर अवलंबून असते. धक्कादायक बाब म्हणजे पुण्याच्या सर्वच दिशांना सुमारे ४० किलोमीटरच्या परीघामध्ये ‘स्काय ग्लो’ची तीव्रता प्रमाणाबाहेर वाढल्याचे दिसून आले आहे.
‘साधारणतः दहा ते पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही चांदणी चौकात जाऊन आकाशनिरीक्षण करीत होतो. आज तिथून काहीच दिसत नाही. चांदणी चौक, कात्रज डोंगरावरून आम्ही धूमकेतूचे फोटो काढले आहे. आता लोकांचा त्यावर विश्वासही बसत नाही. शहरातील वाढती धूळ, धुलीकणांचे प्रदूषण, आकाशात सोडण्यात येणाऱ्या प्रकाश दिव्यांमुळे शहरातील प्रकाश प्रदूषण वेगाने वाढते आहे. आज पन्नास किलोमीटर दूर गेल्याशिवाय आकाश निरीक्षण करता येत नाही,’ असे ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे अनिरूद्ध देशपांडे यांनी सांगितले.
‘गेल्या काही वर्षात हौशी खगोलप्रेमींची संख्या उल्लेखनीय वाढली आहे, या विषयाबद्दल जागरूकता वाढते आहे. मात्र, प्रकाश प्रदूषणामुळे त्यांना उत्तम आकाशनिरीक्षण करण्याची संधी मिळावी यासाठी खूप दूर घेऊन जावे लागते. प्रवासाच्या कालावधी वाढल्याने अनेकदा नागरिकांची विशेषतः विद्यार्थ्यांची गैरसोय होते,’ असे देशपांडे यांनी सांगितले.
आयुका संस्थेचे विज्ञान प्रसार अधिकारी समीर धुर्डे म्हणाले, ‘पुण्यापासून ८० किलोमीटर अंतरावर आयुका गिरवली वेधशाळा कार्यरत आहे. तेथे उत्तम दर्जाच्या दुर्बिणी असून विद्यार्थ्यांना पुण्याजवळच खगोलनिरीक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने वेधशाळा साकारण्यात आली आहे. मात्र प्रकाशाचे प्रदूषण सगळीकडे वाढते आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आकाश व्यापत असून या प्रदूषणाचा ‘स्पेक्ट्रम स्टडी’मध्ये हस्तक्षेप होतो आहे. कित्येकदा आकाशात दिसणारा प्रकाश हा नक्की कोणत्या दिशेने येतो आहे, याबद्दल संभ्रम होतो. चिलीसारख्या देशांना प्रकाश प्रदूषण रोखण्यासाठी तेथील सरकारने स्वतंत्र बंधने घालण्यात आली आहेत.
खगोल विश्व आणि सेंटर फॉर सिटिझन सायन्स (सीसीएस) या संस्थांच्या सर्वेक्षणानुसार पुण्याच्या चोहोबाजूला प्रकाश प्रदूषण वेगाने वाढत असून पन्नास किलोमीटर अंतरानंतर आकाशनिरीक्षण करणे शक्य होते. सर्वसाधारणपणे उघड्या डोळ्यांना पाच प्रतीचा तारा दिसू शकेल असे आकाश सामान्य मानले जाते. पंधरा वर्षांपूर्वी ५ प्रतीचा तारा दिसू शकेल असे आकाश पाहण्यासाठी आकाशनिरीक्षकांना २०-२५ किलोमीटर दूर गेले तरी चालत असे. सध्या शहराच्या उत्तर भागात कोरेगाव भीमा, राजगुरुनगर, पूर्व भागात चौफुला, दक्षिणकडे नसरापूर आणि पश्चिमेकडे पौड, तळेगाव या भागात आकाशनिरीक्षणाची संधी मिळते.
आकाश निरीक्षणात ताऱ्यांची प्रत ही संख्यारेषेप्रमाणे मोजली जाते. आकाशातील अभिजीत हा तारा शून्य प्रतीचा तारा मानले, तर त्यापेक्षा फिकट असणारे तारे हे उजव्या बाजूला असतात, तर तेजस्वी तारे हे डाव्या बाजूला असतात. शून्य प्रतीच्या ताऱ्यापेक्षा एक प्रतीचा तारा अडीच पटींने फिकट असतो. याच नियमा नुसार शून्यपेक्षा पाच प्रतीचा तारा शंभर पटींने फिकट असतो. मानवी डोळ्यांना अंधाऱ्या आणि निरभ्र आकाशातून सहा प्रतीपर्यंतचे तारे दिसू शकतात. मात्र प्रकाश प्रदूषणामुळे शहरामध्ये या निरभ्र आकाश पाहायलाच मिळत नाही.

..
सीसीएसच्या सर्वेक्षणानुसार
विविध भागातील दिसणारी फिकट ताऱ्यांची प्रत
- मगरपट्टा ३.८
- रेसकोर्स ३.५
- खराडी ३.८
- वानवडी ३.८
- बाणेर ३.०,
- वाकड ३.८,
- हिंजवडी ३.८
- पिंपरी ३.८,
- चिंचवड ३.८,
- दत्तवाडी३.०,
- राजाराम पूल ३.५
- दापोडी ३.८,
- येरवडा ३.८,
- लोहगाव ४.५,
- सर्व पेठा ३.०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपक्षांची तिसरी आघाडी?

0
0

इच्छुकांची चाचपणी सुरू; निवडणूक चिन्हासाठी कायदेशीर सल्लामसलती सुरू
म. टा. प्रतिनिधी, पुणे
आघाडी, युतीच्या चर्चा झडू लागल्याने अनेक इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. एकाच प्रभागातील परंतु राजकीय पक्षांकडून तिकिट न मिळाल्यास अपक्षांची ‘तिसरी आघाडी’ करता येऊ शकते, याची चाचपणी काही इच्छुकांनी सुरू केली आहे. या आघाडीला (चारही उमेदवारांना) एकच चिन्ह मिळू शकते का, यासाठी कायदेशीर सल्लामसलती सुरू झाल्या असून एक प्रकारे राजकीय पक्षांच्या उमेदवारांना ‘चेक’ देण्याचा प्रकार सुरू झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारच्या प्रभागाचा निर्णय घेत नऊ महानगरपालिका निवडणुकांमध्ये विरोधकांना चेक देण्याची राजकीय खेळी खेळली. या खेळात अपक्ष ‘चेकमेट’ झाले. नव्या प्रभागांमध्ये एकट्याच्या बळावर निवडून येणे अवघड बनले आहे. युती आणि आघाडी झाली तर अनेक इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरणार आहे. आघाडी, युती झाली तर प्रभागांतील समीकरणे बदलणार असल्याने ​इच्छुकांनी तिसऱ्या आघाडीचा पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे. अटीतटीच्या प्रभागांमध्ये तिसऱ्या आघाडीने राजकीय पक्षांच्या उमेदवारांविरोधात सक्षम पर्याय उभा केला, तर त्या विजयाचा दावा करणाऱ्या उमेदवारांचे धाबे दणाण्याची शक्यता आहे. त्यासाठी तिसरी आघाडी करणाऱ्या इच्छुकांनी चौघांनाही एकच चिन्हे मिळू शकते का, याची चाचपणी सुरू केली आहे.
प्रत्येक विभागात तिसरी आघाडी उदयाला येईल, असे नाही. मात्र, ज्या प्रभागात मातब्बर उमेदवार आहे आणि इतर उमेदवारांचा खर्च करू शकतील, अशा ठिकाणी तिसऱ्या आघाडी उदयाला येण्याची शक्यता अधिक आहे. कसबा, शि‍वाजीनगर, कोथरूड, खडकवासला आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातील काही प्रभागांमध्ये अशा प्रकारची तिसरी आघाडी निर्माण होऊ शकेल, अशी परिस्थिती असल्याची टिप्पणी एका बड्या राजकीय नेत्याने केली.
०००
स्वतंत्र लढण्याची तयारी
सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे. त्यासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. दुसरीकडे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना-भाजप यांच्यात अनुक्रमे आघाडी, युतीच्या चर्चा झडत आहेत. आघाडी, युती होणार की नाही, याबाबत काहीही ठरत नाही. आपआपल्या पक्षांमध्ये फार फुटतूट होऊ नये, यासाठी चारही पक्ष आघाडी-युतीची चर्चा महिना अखेरीपर्यंत सुरू ठेवतील, असेही सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तिकिट मिळण्याची शक्यता कमी असणाऱ्या इच्छुकांनी तिसऱ्या आघाडीच्या पर्यायाचा विचार सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतिम मतदार यादी आज जाहीर होणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळेत प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास पुणे महापालिकेला अपयश आले असून, मतदारांसह संभाव्य उमेदवारांनाही अद्याप त्याची प्रतीक्षा आहे. महापालिकेने प्रभागनिहाय याद्यांचे विभाजन करताना, त्यात बऱ्याच त्रुटी राहिल्या असल्याने त्यावर हरकतींचा पाऊस पडला होता. त्यामुळे, या सर्व दुरुस्त्या करून अंतिम मतदार याद्या आज, सोमवारी जाहीर केल्या जातील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

महापालिकेने प्रभागनिहाय प्रा-रूप मतदारयाद्या १२ जानेवारीला प्रसिद्ध केल्या होत्या. त्याचवेळी, एका प्रभागाच्या हद्दीवरील अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट झाल्याचे समोर आले होते. त्या संदर्भात मतदारांसह अनेक राजकीय पक्ष आणि संभाव्य उमेदवारांनीही आक्षेप घेतले होते. प्रा-रूप मतदार यादीवर हरकती नोंदविण्याची मुदत १७ जानेवारीपर्यंत होती. या कालावधीत तब्बल नऊशेहून अधिक हरकती नोंदविण्यात आल्या. मतदारांच्या प्रत्येक हरकतीवर सुनावणी घेण्यासाठी पालिकेकडे अत्यंत कमी वेळ उपलब्ध होता. अवघ्या तीन दिवसांमध्ये सर्व हरकतींवर निर्णय घेऊन त्यानुसार दुरुस्ती करणे महापालिकेला शक्य झाले नाही. पालिकेच्या सावरकर भवन येथील निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊनही हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही.

निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार २१ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे गरजेचे होते. महापालिकेतर्फे ही यादी रात्री उशिरापर्यंत प्रसिद्ध केली जाईल, असे आश्वासन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले होते. तरीही, शनिवारी आणि त्यापाठोपाठ रविवारीही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे पालिकेला शक्य झाले नाही. मतदार यादीतील नाव आपल्याच प्रभागात आहे का, हे तपासण्यासाठी मतदार इच्छुक आहेत. तसेच, संभाव्य उमेदवारांनाही दुसऱ्याच प्रभागात गेलेली आपल्या भागांतील मतदारांची नावे पुन्हा प्रभागात आली का, याची प्रतीक्षा आहे. आता, पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल, असे सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कष्टकऱ्यांचा नेता...

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
झोपडपट्टीधारक, कष्टकरी, हमाल, मोलकरीण, रिक्षा चालक यासारख्या असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी आपले आयुष्य वेचणारे बाबा आढाव खऱ्या अर्थाने पुणेकरांचे ‘बाबा’ बनले आहेत. गोरगरिबांकरिता संघर्ष करताना, अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे धाडस अंगी बाणलेल्या बाबांचे पूर्ण आयुष्य संघर्षमय राहिले आहे. बाबांनी अल्पकाळ राजकारण तर आयुष्यभर समाजकारण केले. पूर्व आणि पश्चिम पुणे ही केवळ भौगोलिक विभागणी नाही. ती मानसिक विभागणीही आहे. पूर्व पुणे हे उपेक्षितांचे असून, त्यांच्या न्याय हक्कांसाठी बाबांनी आयुष्यभर संघर्ष केला आहे.
बाबांनी केलेली आंदोलने तसेच त्यांच्या चळवळींची दखल ही देशपातळीवरही वारंवार घ्यावी लागली आहे. एक गाव एक पानवठा, हमाल माथाडी कायदा, पथारी व्यावसायिकांसाठीचे धोरण, रिक्षा पंचायतीद्वारे रिक्षाचालकांच्या प्रश्नांची झालेली सोडवणूक अशी अनेक उदाहरणे ही बाबांच्या चळवळींचे फलीत दर्शवणाऱ्या आहेत. बाबा १९६२ ते १९७१ या काळात पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. नागरी आघाडीतर्फे बाबांनी नाना पेठेचे प्रतिनिधीत्व केले. दोन्ही वेळेस ते याच वार्डातून निवडून गेले. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, काँग्रेसचे नेते शिवाजीरीव ढेरे, नामदेवराव काची, नामदेवराव मते असे मान्यवर त्यांचे पालिकेतील सहकारी होते.
पानशेत धरण १९६१ फुटले आणि पुणे पुराच्या तडाख्यात सापडले. या काळात पूरग्रस्तांसाठी वसाहतही सुरू करण्यात आल्या. याच काळात बाबांचे राजकारण बहरू लागले होते. हमाल पंचायत, झोपडपट्टी संघांच्या माध्यमातून बाबांनी समाजकारण सुरू केले. पुराच्या पाण्यामुळे बकाल झालेल्या झोपडपट्ट्या कॅनालच्या आजूबाजूला वसू लागल्या. सुरुवातीला दलित वस्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती. मात्र, पुणे विस्तारू लागले तेव्हा पुण्याची आर्थिक प्रगती होऊ लागली, तसे या झोपडपट्ट्यांमध्ये जात-धर्म वगळून गर्दी झाली. या झोपडपट्ट्यांचा विकास तेथील प्रश्न सोडवण्यासाठी बाबांनी प्रयत्न सुरू केले.
झोपडपट्टी पुनर्वसनात पक्षीय राजकारण नको, ही भूमिका घेतली गेली होती. बाबांनी २५० झोपडपट्ट्यांमध्ये संघटन केले होते. हमाल पंचायत, झोपडी संघ पुणे शहरातील प्रत्येक आंदोलनात सहभागी होत होते. महापालिका बजेटमध्ये कोणाचा नेमकी विचार केला जातो, असा प्रश्न बाबांनी उपस्थित करत झोपडपट्टीधारकांना उपरे समजले जाते, या विरोधात आवाज उठवला. झोपडपट्टीधारकांना घरे मिळवून देण्याच्या प्रयत्नांबरोबरच त्यांनी पूरग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
पूर्व आणि पश्चिम पुण्याचा मानसिक विभागणी कशी आहे, यावर त्यांनी या काळात खऱ्या अर्थाने प्रकाश टाकला. बजेटमध्ये कमला नेहरू उद्यानावर किती खर्च होतो तसेच पूर्वेकडील शाहू उद्यानावर होणारा खर्च किती, यातील फरक त्यांनी दाखवला. पश्चिमेकडील सांस्कृतिक भवनावर होणारा खर्च, तोच पश्चिमेत किती केला जातो, पूर्व आणि पश्चिम पुण्याला मिळणारे पाण्याची त्यांनी तांत्रिकदृष्ट्या मोजदाद केली आणि पूर्व पुण्यावर होणाऱ्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली. नानावाडा येथे हायस्कूल सुरू करण्यात आले. पालिकेची शाळा असलेले ते पहिले हायस्कूल होते.
बाबांनी अशा प्रकारे उपेक्षित, असंघटितांसाठी संघर्ष सुरू केला. त्यासाठी त्यांनी सक्रिय राजकारणाची पाठ सोडली. असंघटितांना पेन्शन मिळावे, यासाठी अनेक आंदोलने उभी केली. काही प्रमाणात त्यांच्या प्रयत्नांना यशही आले. हमाल, रिक्षा चालक, मोलकरीण, झोपडपट्टीधारक, अशा अनेक असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी बाबांचा संघर्ष सुरूच आहे.
...
काळ लोटला तरी असंघटित, झोपडपट्टीधारकांचे प्रश्न सुटलेले नाही. झोपडपट्टीधारकांना आजही उपरा समजले जाते, हे क्लेषदायक आहे. झोपडपट्टीधारकांना आजही आपण घर देऊ शकलो नाही. शेतकऱ्यांपुढील प्रश्न वाढत आहेत. शेतीमालाला हमी भाव मिळत नाही, त्यासाठी आंदोलने उभी करावी लागत आहेत.
- बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजमाची गडावर दारू पार्टी

0
0

गैरप्रकारांकडे पुरातत्त्व विभाग आणि पोलिसांचे दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

विकेंड साजरा करण्यासाठी राजमाची गडावर शनिवारी रात्री आयोजित केलेली दारू पार्टी दुर्गप्रेमींनी उधळून लावली. गडावर दारू आणि हुक्का पार्टी होणार असल्याची माहिती मिळताच दुर्गप्रेमी गडावर केले. पोलिसांकडून सहकार्य मिळाले नसतानाही, त्यांनी गडावरील गैरप्रकार थांबविला. मात्र या घटनेची आमच्याकडे माहिती नाही, अशी भूमिका कामशेत पोलिसांनी घेतली आहे.

विसापूर किल्ल्यावर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पर्यटकांनी केलेल्या बेकायदा पार्टीचा प्रकार ताजा असतानाच आता राजमाचीवरील पार्टी शिवप्रेमींनी उधळून लावली आहे. किल्लाप्रेमींकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील काही पर्यटक शनिवारी लोणावळ्याजवळील राजमाची गडावर पार्टीसाठी हुक्का, दारूच्या बाटल्या घेऊन आले होते. काही वेळातच दुर्गप्रेमी कार्यकर्ते गडावर गेले. त्यांनी त्या तरुणांना गडावर पार्टी न करण्याची विनंती केली. मात्र, पर्यटकांनी कार्यकर्त्यांना दमदाटी केली. तत्काळ कामशेत पोलिस स्टेशनशी संपर्क साधूनही पोलिस घटनास्थळी आले नाहीत. अखेर कार्यकर्त्यांनी पर्यटकांकडील दारूच्या बाटल्या, हुक्याचे साहित्य घेऊन कामशेत पोलिसांच्या ताब्यात दिले. पर्यटक तत्काळ मुंबईला पळून गेले.

गेल्या चार वर्षांपासून मावळातील गड-किल्ले, लेण्या आणि पर्यटन स्थळांवर पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी अंमली आणि मादक पदार्थांचे सेवनही केले जाते. याकडे पुरातत्त्व, वन विभागासह पोलिस सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत आहेत, अशी प्रतिक्रिया दुर्गप्रेमींनी दिली. आम्ही रात्री साडेअकरा वाजता गडावर पोहचलो असता गड परिसरात अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या होत्या. पर्यटक दारू आणि हुक्का पित होते. आम्ही त्यांना पार्टी थांबविण्याची विनंती केली मात्र त्यांनी अरेरावी केली. तक्रार करूनही पोलिस आले नाहीत म्हणून आम्ही पहाटे साडेचार वाजता तेथील दारूच्या बाटल्या आणि हुक्क्याचे साहित्य कामशेत पोलिस ठाण्यात जाऊन जमा केले आहे, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान, कामशेत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आय. एस. पाटील म्हणाले, ‘गडावर पार्टी झाल्याची आमच्याकडे कोणतीही माहिती अथवा पार्टीचे साहित्य आले नाही. आमचे कर्मचारी घटनास्थळी गेले असताना त्यांना कोणतेही साहित्य मिळाले नाही. अशा प्रकारचे गैरप्रकार टाळण्याठी यापुढे शनिवार आणि रविवार दोन दिवस गडावर पोलिस संरक्षण तैनात करण्यात येणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्दिष्टपूर्तीसाठी व्यापक प्रयत्न हवेत

0
0

घरबांधणीसंदर्भात हिरानंदानी यांची सरकारकडून अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘येत्या २०२२ सालापर्यंत देशातील सर्वांना घर देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केलेले उद्दिष्ट घरबांधणी व्यवसायाला जोरदार चालना देणारे असले, तरी त्याच्या पूर्तीकरिता सरकारच्या व्यापक प्रयत्नांची जोड असली पाहिजे,’ असे मत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ‘नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल’च्या (नरेडको) पश्चिम विभागाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी नुकतेच व्यक्त केले.

मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन (एमबीव्हीए) आणि ‘नरेडको’ यांनी आयोजित केलेल्या ‘नोटाबंदीनंतरची दिशा’ या विषयावरील परिसंवादात हिरानंदानी बोलत होते. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, ‘एमबीव्हीए’चे अध्यक्ष गजेंद्र पवार, ‘नरेडको’चे उपाध्यक्ष राजन बेंडेलकर, ‘नरेडको’च्या पूर्व विभागाचे अध्यक्ष अनिल सुरी, ‘एमबीव्हीए’चे सचिव संदीप कोल्हटकर उपस्थित होते.

‘गृहकर्जावरील व्याज कमी करणे, ही कर्जे ३० ते ३५ वर्षे एवढी दीर्घकालीन करून मासिक हप्ता कमी करणे, बँकांनी बांधकाम व्यवसायासाठी ठरवलेले जोखमीचे प्रमाण कमी करणे असे उपाय परवडणारी घरे बांधण्यास उत्तेजन देऊ शकतील. शहरांमध्ये परवडणारी घरे बांधणे शक्य नसल्याने शहराबाहेरच्या परिसरात घरबांधणीसाठी सरकारने पायाभूत सुविधाचे जाळे निर्माण केले पाहिजे,’ असेही हिरानंदानी म्हणाले. ‘बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात पारदर्शकता आणून ग्राहकांचा आणि वित्त पुरवठादारांचा विश्वास संपादन केला पाहिजे,’ असे मराठे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात झालेल्या चर्चेत तज्ज्ञांनी ‘नोटाबंदी’नंतरच्या वातावरणाबद्दल मते मांडली. ‘परवडणाऱ्या घरांसाठी नव्या योजना आणण्यासाठी बँका प्रयत्नशील आहेत,’ असे स्टेट बँकेच्या गृहकर्ज विभागाचे सरव्यवस्थापक राजीव कोहली यांनी सांगितले. ‘बेनामी व्यवहारांना आळा घालणारा कायदा बांधकाम क्षेत्रातील गैरव्यवहार रोखण्यात प्रभावी ठरेल,’ असे मत नामवंत वकील परिमल श्रॉफ यांनी व्यक्त केले. ‘वाहन उद्योग, वस्त्रोद्योग, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी सरकारी पातळीवर जसे प्रयत्न झाले, तसे बांधकाम क्षेत्रासाठी झाले नाहीत,’ याविषयी वक्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

गजेंद्र पवार यांनी ‘एमबीव्हीए’विषयी, तर बेंडेलकर यांनी ‘नरेडको’ची भूमिका मांडली. ‘एमबीव्हीए’चे सचिव संदीप कोल्हटकर यांनी प्रास्ताविक केले. कायदेविषयक समितीचे प्रमुख अभिजित शेंडे यांनी आभार मानले.



‘मोठ्या व्यवहारांसाठी रोकड कशाला हवी?’


‘नोटाबंदीनंतरच्या काळात चलन तुटवडा निर्माण झाला; मात्र त्यामुळे घरखरेदी आणि दागिन्यांच्या खरेदीवर परिणाम झाला, असे म्हणणे चुकीचे आहे. मोठ्या व्यवहारांसाठी रोख रकमेची गरजच काय,’ असा सवाल उपस्थित करून ‘इतर देशांचे दाखले देण्यापेक्षा भारतानेच डिजिटल पेमेंटमध्ये आघाडी घेऊन उदाहरण घालून द्यावे,’ असे मत ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ रवींद्र मराठे यांनी व्यक्त केले.

एमबीव्हीए व ‘नरेडको’तर्फे आयोजित कार्यक्रमात ‘नोटाबंदी’ या विषयावर ते बोलत होते. ‘किरकोळ व्यवहारांसाठी रोख रकमेचा वापर योग्य ठरतो; मात्र घरखरेदी, दागिन्यांची खरेदी व मोठे व्यवहारही रोखीच्या माध्यमातून होत असतील, तर ते धोक्याचे लक्षण असते. म्हणूनच सर्वांनी डिजिटल व्यवहारांकडे वळावे, व्यवहार पारदर्शी पद्धतीने व्हावेत, यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला असावा,’ असे मराठे म्हणाले.

‘रोख रकमेची योग्य जागा बँका हीच आहे. अन्य व्यवहारांसाठी डिजिटल पेमेंट हा पर्याय आहे. त्यात बँकांना मोठी संधी आहे. चलन तुटवड्यानंतर आता नोटा अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्यातील काही नोटा पुन्हा चुकीच्या ठिकाणी जात आहेत, ही बाब योग्य नाही,’ असे निरीक्षणही मराठे यांनी नोंदवले.

ते पैसे ‘एनपीए’त नाहीत

‘नोटाबंदीच्या काळात बँकांमध्ये अभूतपूर्व पैसा जमा झाला. बाद नोटांच्या रूपात कर्जफेडही मोठ्या प्रमाणावर झाली; मात्र ही रक्कम नियमित कर्जफेड करणाऱ्या खात्यांतच जमा झाली. ही रक्कम अनुत्पादित किंवा बुडित खात्यात (एनपीए) जमा झाली असती, तर ते अधिक योग्य ठरले असते,’ असेही रवींद्र मराठे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक कर्मचाऱ्यांना हवे पूर्वीचे ‘स्टेटस’

0
0

‘नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स’ या संघटनेचे नवनियुक्त सरचिटणीस उपेंद्र कुमार नुकतेच पुण्यात आले होते. बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, बँकांमधील परिस्थिती आदी विषयांवर प्रसाद पानसे यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

..............

- तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत?
- बँकांच्या विलिनीकरणाला आमचा सक्त विरोध आहे. त्याचबरोबर बँकांमधील भरती प्रक्रियेला चालना देण्यात यावी. बँकांमधील अनुत्पादित कर्जांचे (एनपीए) वाढते प्रमाण थांबवणे, दोषींवर कारवाई करणे आवश्यक आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांचे २५-३० वर्षांपूर्वी असलेले स्थान (स्टेटस) आम्हाला पुन्हा मिळवून देण्यात यावे. त्यासाठी योग्य वेतनश्रेणी देण्यात यावी.

- वेतनकराराबाबत काय सांगाल?
- इंडियन बँक्स असोसिएशन आणि बँक कर्मचारी संघटनांमध्ये अकरावा द्विपक्षीय वेतन करार लवकरच होणे अपेक्षित आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांचे पगार एक नोव्हेंबर २०१७पासून वाढतील, या कराराच्या चर्चेची सुरुवात चालू महिन्यापासून व्हायला हवी. वेतनकरारामध्ये भूमिका मांडण्याचा किंवा तडजोड करण्याचा अधिकार असलेल्या कम्युनिस्ट संघटनाच बँक कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कमी वेतनास कारणीभूत आहेत. वेतन आयोगाचे लाभ मिळणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच बँक कर्मचाऱ्यांनाही वेतन व भत्ते देण्यात यावेत. २५-३० वर्षांपूर्वी बँकिंग क्षेत्र सर्वाधिक वेतन देणाऱ्या तीन क्षेत्रांपैकी एक होते. ही ओळख आता खूप मागे पडली आहे. सध्या बँक कर्मचाऱ्यांपेक्षा इतर काही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना खूप जास्त पगार आहेत. वेतनकरारानुसार पेन्शन वाढले, तरी पेन्शनर्सचे पेन्शन वाढत नाही. त्यातही कालसुसंगत वाढ व्हावी, ही आमची मागणी आहे.

- नोटाबंदीच्या काळात कसे काम केले?
- या काळात देशभरात बँक कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम केले. अनेकांनी त्यासाठीचा ओव्हरटाइमही नाकारला. डिजिटल पेमेंटच्या प्रचार-प्रसारासाठीही मोठ्या प्रमाणावर काम केले; मात्र पैशाच्या लालचेपोटी गैरव्यवहार केलेल्या दहा टक्के बँक कर्मचाऱ्यांमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अन्य सर्वच बँक कर्मचाऱ्यांच्या प्रतिमेला तडा गेला; मात्र त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी आम्ही लावून धरणार आहोत.

- वाढत्या ‘एनपीए’बाबत तुमचे काय मत आहे?
- अनुत्पादित कर्जांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे ‘एनपीए’चे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी या व्यक्तींना कर्ज देणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जावी. ज्या संचालकांनी, अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कर्जासाठी दबाव आणला असेल, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्याचबरोबर कोणत्याही दबावाला बळी न पडता कर्जवसुली केली जावी. सहेतुक कर्जबुडव्यांची यादीही प्रसिद्ध केली पाहिजे.

- बँकांना मनुष्यबळाची कमतरता भासत आहे का?
- गेल्या काही वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये भरतीच झालेली नाही. त्यामुळे बँकांना मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता जाणवते आहे. दर वर्षी सव्वा लाख लिपिक, ६२ हजार शिपाई व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, ५३ हजार सशस्त्र सुरक्षारक्षक आणि २२ ते २५ हजारांदरम्यान अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या पदासाठीही अतिउच्चशिक्षित उमेदवार अर्ज करत आहेत. ही परिस्थिती बदलून योग्य अर्हतेचेच उमेदवार पात्र असतील, अशी नियमावली केली पाहिजे. लिपिक पदासाठी पदवीधर ही अट काढून दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच संधी द्यावी, असे आमचे मत आहे. पदवीधर विद्यार्थी अन्य ठिकाणी संधी मिळाल्यास निघून जातात. त्यामुळे बँकांना पुन्हा उमेदवारांचा शोध घ्यावा लागतो. दहावी-बारावी या पात्रतेवरच नोकरी मिळाल्यास हे उमेदवार कायमस्वरूपी बँकेच्या सेवेत राहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॅटफॉर्म तिकीट अजूनही १० रुपयेच

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून २० रुपये झाल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने अद्याप आपल्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयेच असल्याचे स्पष्ट केले. गेल्या तीन दिवसांपासून रेल्वेचे एक प्लॅटफॉर्म तिकीट ‘व्हॉट्सअप’वर फिरत आहे. त्या तिकिटावर एका व्यक्तीसाठी २० रुपये शुल्क असल्याचे नमूद केले आहे. मात्र, ते तिकीट विजयवाडा येथील आहे. पुणे विभागात अद्याप प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ करण्यात आलेली नाही. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पगार कधी होणार?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ज्युनिअर कॉलेज आणि माध्यमिक शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दोन ते तीन महिन्यांपासूनचे रखडलेले पगार होणार कधी, असा सवाल शिक्षकांनी विचारला आहे. पगारच हाती न आल्याने विविध प्रकारच्या कर्जाचे हप्तेही आपल्याला फेडता आलेले नाहीत; तसेच दैनंदिन खर्च भागवायचा तरी कसा, असा प्रश्न उभा राहिला आहे, असे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
शिक्षकांच्या वेतनाचे अनुदान इतरत्र वळवल्याने तसेच वेतनाचे नियोजन योग्य पद्धतीने न केल्याने दोन्ही माध्यमांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मासिक पगार झालेले नाहीत. पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालय क्षेत्रात येणाऱ्या पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांतील ज्युनियर कॉलेजच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचा शेवटचा पगार हा २६ ऑक्टोबरला झाला आहे. त्यानंतरचे सगळे पगार रखडलेले आहेत. ज्युनियर कॉलेजच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचा पगार न होण्याला आता काही दिवसांत तीन महिने होतील; तर माध्यमिक शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांचा पगार न होण्याला दोन महिने होतील.
गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज अशी विविध प्रकारची काढलेली कर्ज आणि विमा पॉलिसींचे हप्ते महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँकेच्या खात्यातून देय असतात. मात्र, खात्यात वेतनच जमा होत नसल्याने ही रक्कम भरण्यात संबंधिक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना नाहक दंड भरण्याचीही वेळ आली आहे. काहीही चूक नसताना शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आर्थिक भुर्दंड का सहन करावा, असा सवाल शिक्षक उपस्थित करीत आहेत. काही शिक्षकांना तर दैनंदिन खर्च भागवणेही अवघड होऊन बसले आहे.
पगार न झाल्याचा फटका ८२६ कॉलेजांमधील १२ हजार १८८ शिक्षक आणि ५१२७ कर्मचाऱ्यांना; तर माध्यमिक शाळांतील दोन हजार २७५ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसला आहे.
दरम्यान, याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधला असता, गेल्या आ‍ठवड्यात पगार होईल असे सांगण्यात आले होते. आतादेखील पगार लवकर होतील, असे कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अद्यापही त्यांचे पगार झालेले नाहीत. शिक्षकांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेतून झाल्यास शिक्षकांचा त्रास कमी होईल, असे राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष अविनाश ताकवले यांनी सांगतले.

थकीत पगार एकरकमी मिळेल?
दरम्यान, शिक्षक व कर्मचाऱ्यांना केवळ एका महिन्याचा पगार मिळेल, की संपूर्ण थकीत पगार एकरकमी मिळेल, याबाबत अद्याप शंकाच आहे. त्यामुळे केवळ एका महिन्याचा पगार झाला; तर पुन्हा ज्युनियर कॉलेजच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचे दोन तर माध्यमिक शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार रखडलेलाच असेल, असे शिक्षक-शिक्षकेतर संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आमचा जीवनसंघर्ष संगीतात उतरतो...’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील मंडळी शास्त्रीय सोडून काही पेश करत नाहीत. ते शास्त्रीय सोडून काही ऐकतही नाहीत. रॉक संगीतातील लोकांचेही तसेच आहे. शास्त्रीय संगीतात काय सुरू आहे, हे रॉकमधील अनेकांना कळत नाही. आम्ही संगीताची विभागणी करत नसल्याने आमच्यात कोणती भिंत येत नाही. शास्त्रीय, लोकसंगीत, रॉक असे सर्व संगीत आपलेच आहे, असे आम्ही मानतो. आम्ही अशिक्षित आहोत ते बरेच आहे...’ तरुणांसह ज्येष्ठांनाही आपल्या गायकीची भुरळ पाडणारे आणि आपल्या आवाजाने आसमंत कवेत घेणारे विख्यात रॉक गायक राहुल राम यांचे हे बोल. 'आमचा जीवनसंघर्ष संगीतात उतरतो,' हे त्यांचे सांगणे देखील त्यांच्या गायकीप्रमाणेच भिडणारे असते.
वसंतोत्सवात रविवारी इंडियन ओशन बँडने रसिकांना संगीताची अनोखी अनुभूती दिली. रॉक संगीताला नावे ठेवणारे देखील अमित खिल्लम, राहुल राम, निखिल राव, हिमांशू जोशी, तिहून चक्रवर्ती या बँडच्या कलाकारांनी दिलेला झटक्याने सुखावून गेले. या रॉकिंग मैफलीनंतर राहुल राम यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘जीवनाशी जोडले आहे ते बाहेर येते. आम्ही जी गाणी करतो ती आमच्या आयुष्याशी निगडित असतात. मी नर्मदा आंदोलनात पाच वर्षे काम केले आहे. ते नकळतपणे माझ्या संगीतात उतरते...’ राम सांगत होते.
‘कल्पना सुचली की आम्ही थोडे काम करतो. पुन्हा अडखळतो. पुन्हा काम सुरू करतो. संगीत गोड हलव्याप्रमाणे हळूहळू शिजते. संगीतासाठी जीवनसंघर्ष, तत्वज्ञान व बैठक लागते. संगीत हा आपल्या आत्म्याशी संवाद असतो. बॉलिवूडच्या गरजेप्रमाणे काम करणे आम्हाला जमत नाही,’ अशा शब्दांत राहुल राम यांनी आपल्या संगीताची निर्मिती प्रक्रिया उलगडली.
फ्यूजनविषयी ते म्हणाले, ‘बॉलिवूड संगीत हे पूर्ण फ्यूजन आहे. अमेरिका, आफ्रिका असे विविध ठिकाणचे संगीतप्रकार चित्रपट संगीतातील चार मिनिटांच्या गाण्यात येतात. देशात बँड संस्कृती वाढत आहे. आम्ही एक अल्बम करत आहोत. अल्बम हे आपले अपत्य म्हणून छान वाटते; पण आता अल्बम कोणी विकत घेत नाही. अल्बम किंवा एक-एक गाणी इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.’

पुण्याचे रसिक भारी आहेत. आम्ही आलो तर शास्त्रीय संगीतासाठी रांगा लागलेल्या पाहिल्या. दिल्लीत असे होत नाही. आजच्या काळात संगीतासाठी अशी गर्दी जमणे अवघड आहे. आमच्यासाठी हा सुंदर अनुभव होता. बंदे हे गाणे काही जणांना जड होईल, असे वाटले होते. तसे ते झालेच; पण पं. रोणू मुजुमदार यांनी आम्हाला पावती दिली. आणखी काय हवे?
- राहुल राम, विख्यात रॉक गायक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​शुल्कवाढ आकारणीचा आरटीओमध्ये गोंधळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्याच्या परिवहन विभागाने केलेल्या शुल्कवाढीच्या आकारणीवरून प्रादेशिक परिवहन विभागात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुल्कवाढ ही केंद्र सरकारने आदेश काढलेल्या तारखेपासून करायची की, प्रलंबित तारखेपासून याची स्पष्टता नसल्याने ठिकठिकाणी शुल्क आकारणीत तफावत असल्याचे दिसून आले आहे.
लर्निंग लायसन्स काढण्यापासून आंतरराष्ट्रीय वाहन परवाना घेण्यापर्यंत आणि नवीन वाहनाच्या नोंदणीपासून वाहन हस्तांतरणापर्यंत अशा एकूण २८ प्रकारच्या कामांसाठी परिवहन विभागाने दुपटीपासून दहापटीपर्यंत शुल्क वाढ केली आहे. केंद्र सरकारने २९ डिसेंबर रोजी यासंबंधीचा आदेश काढला. मात्र, राज्याच्या परिवहन आयुक्तालयाने सहा जानेवारी रोजी दिला. त्यामुळे २९ डिसेंबर ते सहा जानेवारी या कालावधीत झालेल्या व्यवहारांचा अनुशेष भरून काढण्याच्या सूचनाही आरटीओला देण्यात आल्या. त्यानुसार पुणे आरटीओने दहा हजार जणांना नोटीस पाठविली.
नवीन दरानुसार शुल्क आकारणी करताना केंद्र सरकारने दिलेल्या आदेशाच्या तारखेपासून ही अंमलबजावणी करावी. त्या तारखेपूर्वीच्या प्रलंबित कामांसाठी जुन्या दरानुसारच शुल्क आकारणी करावी, अशी वाहतूकदार संघटनांची मागणी आहे. कोल्हापूर आरटीओमध्ये या प्रमाणेच शुल्क आकारणी केली जात आहे. मात्र, पुणे आरटीओत प्रलंबित कामांसाठीही नवीन शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुण्यातही कोल्हापूर आरटीओप्रमाणे शुल्क आकारणी करावी, अशी मागणी रिक्षा फेडरेशनचे खजिनदार बापू भावे यांनी केली.
दरम्यान, परिवहन विभागाच्या शुल्क आकारणीबाबत राज्याच्या परिवहन आयुक्तालयाने केंद्रीय परिवहन विभागाकडे अभिप्राय मागविला आहे. केंद्राकडून अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर, राज्यातील शुल्क आकारणीबाबत पुन्हा निर्णय येणे अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडकरींचा पुतळा बसवू

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आगामी महापालिका निवडणुकीत भाजप सत्तेत आला; तर राम गणेश गडकरींचा पुतळा छत्रपती संभाजी उद्यानातच सन्मानाने बसवू,’ असे आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी सोमवारी दिले. गडकरींचा पुतळा बसवणार असल्याचे यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केले असून त्यापाठोपाठ आता भाजपनेही आश्वासन दिल्याने या प्रकरणाला निवडणुकीचे रंग चढू लागले आहेत.
राम गणेश गडकरी यांच्या ९७व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून कोथरूड नाट्य परिषद व रमाबाई आंबेडकर संस्था यांच्यातर्फे छत्रपती संभाजी उद्यानात गडकरींना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आमदार मेधा कुलकर्णी यांनी भाजपची सत्ता आल्यास त्वरित पुतळा बसवू असे, जाहीर करून गडकरींच्या पुतळ्याचा निवडणुकीच्या अजेंड्यात समावेश केला.
या कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने छत्रपती संभाजी उद्यानाच्या गेटवरच कार्यक्रम करण्यात आला. ज्येष्ठ समीक्षक, लेखक वि. भा. देशपांडे व श्री. म. जोशी यांच्या हस्ते गडकरींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अभिनेते आणि लेखक योगेश सोमण, प्रवीण तरडे, अभय देवरे, प्रदीप निफाडकर, शाम भुर्के, अयाज काझी, सेवा भावे, विनिता पिंपळखरे, अभय देवरे, पुणे महानगरपालिकेच्या मराठी संवर्धन समितीचे अनिल गोरे यांच्यासह नाटक, चित्रपट आणि साहित्यक्षेत्रातील मंडळी या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात सुरुवातीला दिवंगत ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेले गडकरीलिखित महाराष्ट्र गीत ऐकवण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजी उद्यानातील गडकरी यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळी आचार्य अत्रे यांनी केलेल्या भाषणाची ध्वनिफीत ऐकवण्यात आली. याशिवाय उपस्थित रंगकर्मींकडून ‘राजसंन्यास’, ‘भावबंधन’, ‘एकच प्याला’ या नाटकातील प्रवेश आणि त्यांच्या काही निवडक कवितांचे वाचन करण्यात आले. पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात हा कार्यक्रम पार पडला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी उद्यानात गडकरींच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम होऊ न देण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मेधा कुलकर्णी आणि ब्रिगेड यांच्यात गेल्या आठवड्यात रान पेटले होते. महापालिकेनेही कुलकर्णी यांना कार्यक्रमाची परवानगी नाकारली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शहाण्या माणसांची फॅक्टरी’ अनुभवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
समाजात घडणाऱ्या घटना, विसंगती तसेच व्यक्तिचित्रांपासून ते कवितांवरचे विचार आणि खुसखुशीत गोष्टी हे सगळे एका वेगळ्या अंगाने अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. संगीतकार-गायक डॉ. सलील कुलकर्णी यांचे ‘शहाण्या माणसांची फॅक्टरी’ हे पुस्तक प्रजासत्ताकदिनी (दि. २६) प्रकाशित होत आहे. कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी सव्वादहा वाजता प्रसिद्ध लेखक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
आपल्या आसपासच्या अनेक घटना, त्यातील विसंगती, व्यक्तिचित्र इथपासून ते विविध कवितांवरचे सलीलचे विचार आणि काही खुसखुशीत गोष्टी, अशा वेगवेगळ्या गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत. ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे हे पुस्तक प्रकाशित होत आहे. २०११ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘लपवलेल्या काचा’ या सलील यांच्या पहिल्या पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतरचे सलील यांचे हे दुसरे पुस्तक आहे. दि. २६ रोजी या पुस्तकातील काही लेखांचे अभिवाचन, नाट्यानुभव आणि प्रकाशन असा कार्यक्रम होईल. महाराष्ट्रातील नाट्यचळवळीतील तरुण कलाकार हे सादरीकरण करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशिका सोबत असणे आवश्यक आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ सदस्यांसाठी प्रवेशिका ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कार्यालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सकाळी अकरा वाजल्यापासून प्रवेशिका संपेपर्यंत वितरण सुरू राहणार आहे. जागा मर्यादित असल्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक

0
0

कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कृषी खात्यातील शिपायाला कृषी सेवक पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने दहा लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका कृषी अधिकाऱ्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कर्मचारी प्रकाश गंगा राठोड (२७, रा. देशमुखवाडी, जि. बुलडाणा) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून कृषी अधिकारी प्रकाश लहूजी धुरंधर (सध्या रा. यवतमाळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ डिसेंबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ यादरम्यान हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश राठोड हे जामोद येथील कृषी खात्यात शिपाई पदावर कार्यरत आहेत. प्रकाश धुरंधर पुण्यात कृषी अधिकारी पदावर कार्यरत होते. सध्या त्यांची बदली यवतमाळ येथे झाली असून, ते उपजिल्हा कृषी अधिकारी या पदावर कार्यरत होते. डिसेंबर २०१५मध्ये राठोड कार्यालयीन कामकाजासाठी पुणे येथील कृषी आयुक्तालयात आले होते. त्या वेळी त्यांची ओळख धुरंधर यांच्याशी झाली. धुरंधर यांनी राठोड यांना कृषी खात्यातच कृषी सेवक पदावर येत्या भरतीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी पंधरा लाखांची मागणी केली; मात्र दहा लाख रुपयांमध्ये तडजोड झाली.

राठोड यांनी वेळोवेळी सेंट्रल बिल्डिंग शेजारील हॉटेल सहकारमध्ये भेटून राठोड याला साडेसात लाख रुपये रोख आणि अडीच लाख रुपये चेकने दिले. त्यानंतर कृषी सेवक पदासाठी परीक्षा घेण्यात आली; मात्र या परीक्षेनंतर राठोड यांची निवड झाली नाही. त्यामुळे राठोड यांनी धुरंधर यांच्याशी संपर्क साधला; मात्र वरिष्ठांनी आणखी अडीच लाखांची मागणी केली असल्याचे त्याने सांगितले. राठोड यांनी आणखी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली आणि दिलेले पैसे परत मागितले. परंतु धुरंधर यांनी नोकरी लावतो असे सांगून वारंवार टाळाटाळ केली. तीन-चार महिन्यांपूर्वी धुरंधर यांची यवतमाळ येथे बदली झाली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राठोड यांनी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार धुरंधर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डी. डी. करांडे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोसायट्यांवरच जबाबदारी

0
0

रखवालदारांच्या ‘पीएफ’बाबत तपासणीसाठी ‘ईपीएफओ’चा निर्णय

Sujit.Tambade@timesgroup.com

Tweet : @sujittambadeMT

पुणे : गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सिक्युरिटी एजन्सीमार्फत नेमण्यात आलेल्या रखवालदारांच्या वेतनातून प्रॉव्हिडंट फंडाची (पीएफ) रक्कम कपात केली जाते की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी ‘एम्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन’ने (ईपीएफओ) संबंधित सोसायट्यांवरच सोपवली आहे. ‘पीएफ’ची कपात होत नसलेल्या रखवालदारांचा शोध घेण्यासाठी ‘ईपीएफओ’ने पथके तयार केली असून, ‘पीएफ’ संरक्षण न मिळणाऱ्या रखवालदाराची नेमणूक झाल्याचे आढळल्यास संबंधित सोसायट्यांवर ‘ईपीएफओ’कडून कारवाई केली जाणार आहे.

‘ईपीएफओ’ने हा निर्णय घेतला असून, सोसायट्यांच्या तपासणीसाठी पथके तयार केली आहेत. त्यामुळे शहरातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना याबाबत दक्ष राहावे लागणार आहे. अन्यथा सोसायट्यांना जबाबदार धरून ‘ईपीएफओ’ कायद्याअंतर्गत कारवाई होणार आहे.

कोणतीही​ कंपनी किंवा संस्थेमध्ये कमीत कमी २० आणि त्यापेक्षा जास्त कर्मचारी काम करत असतील, तर त्यांना ‘पीएफ’चे संरक्षण देण्याची जबाबदारी ती कंपनी किंवा संस्थेची असते. काही संस्थांमध्ये कर्मचारी किती आहेत, ही बाब लपवून ठेवण्यात येते. सिक्युरिटी एजन्सीमध्ये अनेक कर्मचारी काम करत असतात; पण काही कर्मचाऱ्यांची ‘पीएफ’ कपात करण्यात येत नसल्याचे ‘ईपीएफओ’च्या निदर्शनास आले आहे. त्यामध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रखवालदार म्हणून काम करणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत.

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रखवालदार म्हणून काम करणारे कर्मचारी सिक्युरिटी एजन्सीद्वारे नेमलेले असतात; पण सगळ्यांनाच ‘पीएफ’चे संरक्षण दिले जात नाही. त्यामुळे ही जबाबदारी आता गृहनिर्माण सोसायटीवरच देण्यात आली आहे.

‘गृहनिर्माण सोसायट्यांनी आपल्या सोसायटीत काम करणाऱ्या रखवालदाराच्या वेतनातून ‘पीएफ’ कपात होत आहे की नाही, याची चौकशी करणे आवश्यक आहे. ‘पीएफ’ची कपात होत नसल्यास ही बाब सिक्युरिटी एजन्सीच्या निदर्शनास आणून द्या​वी. तरीही सिक्युरिटी एजन्सीने कार्यवाही न केल्यास ‘ईपीएफओ’कडे माहिती दिल्यास त्या सिक्युरिटी एजन्सीवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी ९८२३३६८९९५ किंवा ८८८८८९४७४५ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल,’ असे नोडल ऑफिर तथा सहायक पीएफ आयुक्त बी. बी. वागदरी यांनी सांगितले.

‘गृहनिर्माण सोसायट्यांमधील रखवालदारांच्या ‘पीएफ’ कपातीबाबत सोसायट्यांमध्ये जाऊन तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या पथकांच्या तपासणीमध्ये रखवालदाराला ‘पीएफ’चे संरक्षण मिळत नसल्याचे आढळून आल्यास संबंधित सोसायटीवर कारवाई होणार आहे,’ असे वागदरी यांनी स्पष्ट केले.

..................

काय कारवाई होऊ शकते?

* एखादी संस्था किंवा कंपनीकडे ‘पीएफ’ची थकबाकी असल्यास पहिल्यांदा संबंधित कंपनीला नोटीस देण्यात येते.

* नोटीस देऊनही थकबाकी न भरल्यास संबंधित कंपनीचे बँकेतील खाते सील करण्यात येते.

* कंपनीच्या मालमत्तेची जप्ती करणे किंवा मालमत्तेचा लिलाव करणे, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून थकबाकीदाराला अटक करणे या प्रकारची कारवाई होऊ शकते.

* संस्था किंवा कंपनीप्रमाणे गृहनिर्माण सोसायट्यांनाही या प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.

..........................

गृहनिर्माण सोसायट्यांमधील रखवालदार आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना ‘पीएफ’चे संरक्षण मिळत आहे की नाही, याचा तपास करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे सोसायट्यांनी रखवालदारांकडे चौकशी करून कार्यवाही करावी.
- राजेशकुमार सिन्हा, पीएफ आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भटक्या प्राण्यांच्या धोक्यावर लक्ष

0
0

गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर पोलिस दक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतात दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी भटकी कुत्री, प्राण्यांचा वापर होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिस, दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून, शहरातील संवेदनशील ठिकाणी बॉम्बशोधक पथकांकडून तपासणी करण्यात येत आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देशभरातील पोलिस दलांना खबरदारीचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये स्फोटके पेरलेले भटके प्राणी गर्दीमध्ये पाठवून घातपात घडवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गर्दीमध्ये भटके प्राणी घुसणार नाहीत, याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या इशाऱ्यांबद्दल चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे शहराने यापूर्वी तीन दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे. ‘इंडियन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेचा पुणे हा मुख्य तळ होता. त्याशिवाय ‘लष्करे तैयबा’च्या दहशतवाद्यांचे पुणे, औरंगाबाद परिसरात कनेक्शन आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यामुळे पुणे पोलिसांकडून ​अधिक काळजी घेण्यात येते. प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणांची पुणे पोलिसांच्या घातपातविरोधी पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. जलद प्रतिसाद दलाची (क्यूआरटी) पथके शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

रेल्वे अपघातांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात मिरज मार्गावर गेल्या वर्षाभरात रुळाला तडे जाऊन डबे घसरल्याच्या दुर्घटना घडल्या. तसेच पुणे रेल्वे स्टेशनवर महाराष्ट्र एक्स्प्रेसचे डबे घसरले होते. या पार्श्वभूमीवर, पुणे विभागाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे विभागातील सर्व मार्गांवर सातत्याने पोलिसिंग आणि सुरक्षितता मोहीम राबवली जात आहे, अशी माहिती पुणे विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक (वाणिज्य) यांनी दिली.

..........

रेल्वे ट्रॅकचीही काळजी

आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यात शनिवारी रात्री अकराच्या सुमारास जगलपूर-भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे इंजिन आणि नऊ डबे रुळावरून घसरून ३६ प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत. यापूर्वी अलीकडेच अशा प्रकारचे दोन अपघात झाले असून, तिन्ही अपघातांमध्ये सुमारे ११५ नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या अपघातांपाठीमागे नक्षलवादी किंवा दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. राष्ट्रीय तपास पथक (एनआयए) , ‘एटीएस’ची पथके या घटनांचा तपास करत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस, एटीएस आणि रेल्वे पोलिसांकडून पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेत असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीबाजारामुळे अस्वच्छता

0
0

कुंभारबावडीतील बाजारपेठेचे स्थलांतर करण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॅम्पातील न्यू मोदीखान्याजवळील कुंभारबावडी येथील भाजीबाजारामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून, त्यामुळे अस्वच्छता वाढत आहे. विक्रेते ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ त्या ठिकाणी विक्री करत असल्याने सफाई करणे अशक्य होत असून, भाजीविक्रेत्यांना त्या ठिकाणाहून अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक अतुल गायकवाड यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या. त्या तक्रारींची दखल घेऊन गायकवाड यांनी भाजीबाजार स्थलांतरित करण्याची मागणी बोर्डाच्या प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात अद्याप बोर्डाकडून कारवाई करण्यात येत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

न्यू मोदीखाना येथील कुंभारबावडी येथे भाजीविक्रेत्यांना सकाळी सात ते दुपारी अडीच वाजेपर्यंत विक्रीची वेळ ठरवून दिली आहे. त्या वेळेनंतरही सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत हे विक्रेते भाजीची विक्री करत असतात. त्यामुळे भाजीबाजाराची साफसफाई करण्यास आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना सफाई करता येत नाही. परिणामी, सायंकाळनंतर विक्रेते घरी गेल्यावर पालेभाज्यांसह अन्य कचरा त्या ठिकाणी पडून राहतो. त्याचे दुष्परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. भाजीविक्रेत्यांमुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

‘कुंभारबावडी येथील भाजीबाजारामधील विक्रेत्यांमुळे अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याबाबत लोकप्रतिनिधी या नात्याने स्थानिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. तसेच लाखो रुपये खर्च करून या भागात सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. विक्रेत्यांना विक्रीसाठी दिलेल्या वेळा पाळल्या जात नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी कँटोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांकडून साफसफाई वेळेवर होण्यास विलंब होत आहे. कुंभारबावडी येथे विक्री करणारे व्यापारी स्थानिक नाहीत. त्यांच्यावर बोर्डातील अधिकाऱ्यांचा वचक नाही. त्यामुळे या विक्रेत्यांकडून त्या ठिकाणचा रस्ता अडवला जात आहे. परिणामी, भाजीबाजार अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी पत्राद्वारे कँटोन्मेंट बोर्डाकडे केली आहे,’ अशी माहिती पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे सदस्य अतुल गायकवाड यांनी दिली.



भाजीबाजार नागरिकांच्या सोयीसाठी आहे. परंतु, विक्रेत्यांनीदेखील ठरलेल्या वेळेनुसारच विक्री केल्यास त्या ठिकाणी होणारा कचरा स्वच्छ करता येऊ शकतो. विक्रेत्यांनी आडमुठेपणाची भूमिका न घेता समजूतदारपणा दाखवल्यास परिसर स्वच्छ राहू शकते. तसेच स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही.
- अतुल गायकवाड, सदस्य, पुणे कँटोन्मेंट बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे जिल्ह्याचे ‘थम्ब इम्प्रेशन’

0
0

स्वस्त धान्य वितरणात विभागात आघाडी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अंगठ्याचा ठसा (थम्ब इम्प्रेशन) घेऊन स्वस्त धान्य आणि केरोसीनचे वितरण करण्यास राज्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पुणे विभागातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये सुमारे पाच हजार ३३३ व्यवहार झाले आहेत. त्यामध्ये पुणे ​जिल्हा आघाडीवर आहे.

डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांतून ‘थम्ब इम्प्रेशन’च्या आधारे धान्य आणि केरोसीन वितरित करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यात दोन स्वस्त धान्य दुकानांत धान्य वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सोमवारी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन या योजनेचा आढावा घेतला.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यापासून पुणे विभागात आतापर्यंत पाच हजार ३३३ व्यवहार झाले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये एक हजार ५५३ व्यवहार झाले आहेत. त्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून, जिल्ह्यामध्ये ४८१ व्यवहार झाले आहेत. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात ४०८ व्यवहार झाले आहेत. सर्वांत कमी व्यवहार सातारा जिल्ह्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबत पुणे विभागाच्या पुरवठा उपायुक्त नीलिमा धायगुडे म्हणाल्या, ‘शिधापत्रिका आधार क्रमांकाशी जोडण्याचे काम सुरू आहे. धान्य वितरणासाठी शिधापत्रिकाधारकांच्या अंगठ्याचे ठसे घेण्यात येत आहेत. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसून खऱ्या लाभार्थ्यांनाच धान्य मिळू शकणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यातील दोन दुकानांमध्ये ही योजना सुरू झाली आहे. त्यामध्ये पुणे विभाग आघाडीवर आहे.’

.....................

जिल्हा आणि ई-व्यवहारांची संख्या

पुणे - ४८१

सोलापूर - ४०८

कोल्हापूर - २७१

सांगली - २१८

सातारा - १७५

....................

गोदामांची होणार तपासणी

शिधापत्रिकांच्या माध्यमातून होत असलेला धान्यघोटाळा रोखण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरील गोदामांची तपासणी करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने काढला आहे. तपासणी पथकांनी कोणत्याही पूर्वसूचना न देता गोदामांची तपासणी करून त्याचे अहवाल द्यावेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नौदलामध्ये नोकरीचे आमिष; साडेआठ लाखांची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय नौदलात नोकरी लावल्याचे बनावट नियुक्तीपत्र देऊन सात जणांची साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत उषा जगन्नाथ जाधव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार सचिन संजय जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा जाधव यशवंतराव मुक्त विद्यापीठात शिक्षण घेत असून, नोकरीच्या शोधात आहेत. आरोपी सचिन जाधव याने बालाजीनगरमध्ये सुरभी करिअर सोल्युशन नावाने फर्म सुरू केली होती. त्याने ‘सैन्यदलात शंभर टक्के भरती’ अशी जाहिरात करून त्याचे पत्रक परिसरात वाटले. हे पत्रक पाहिल्यानंतर उषा व आणखी काही लोक त्याच्याकडे गेले. त्या वेळी त्याने वेगवेगळी कारणे सांगून ‘नोकरी लावतो’ असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला; मात्र त्यासाठी पैसे लागतील असे सांगितले. ‘नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर पैसे द्या,’ असेही त्याने सांगितले. त्यामुळे सर्वांचा त्यावर विश्वास बसला.

त्याने दहा दिवसांपूर्वी सात जणांना भारतीय नौदलात नियुक्ती झाल्याचे बनावट पत्र दिले. तसेच त्याने त्यांना, ‘२० जानेवारी रोजी कोची येथे जायचे आहे. त्यासाठी १८ तारखेला पुण्यातून निघावे लागणार आहे,’ असे सांगितले. दरम्यान, त्याने जाण्याअगोदार सर्वांकडून मिळून आठ लाख ४४ हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपी १७ जानेवारी रोजीच आरोपी फरार झाला. उषा व इतर लोक १८ जानेवारी रोजी कोचीला जाण्यासाठी सुरभी करिअर सोल्युशन फर्म येथे गेले. त्या वेळी त्यांना फर्म बंद असल्याचे कळले. त्यांनी शोध घेतला; मात्र त्याचा काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेऊन घटनेची माहिती दिली. या प्रकरणी सहकारनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांच्या ‘सेल्फी’ची ‘हजेरी’

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘बायकोने मंत्र्यांबरोबर बेडरूममध्ये सेल्फी ‘क्लिक’ केला...अंबाडा आणि पदर ठीक केला आणि लाडालाडात पुटपुटली...घरी असला तेव्हा ‘सेल्फी’ काढणार आहे...घरची ‘हजेरी’ भरणार आहे...’ ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी या वात्रटिकेतून शिक्षणमंत्र्यांच्या ‘सेल्फी’ निर्णयाची सोमवारी चांगलीच ‘हजेरी’ घेतली. ‘सेल्फी’ निर्णयावर ‘सेल्फी’ वात्रटिकेतून घेतलेल्या फिरकीने उपस्थित पोट धरून हसले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेना आणि संवाद पुणे संस्थेतर्फे प्रसिद्ध कवी संदीप खरे आणि सुधीर मुळीक यांना ‘मार्मिक कवी पुरस्कार’ फुटाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यानिमित्त रंगलेल्या कविसंमेलनात फुटाणे यांनी ‘सेल्फी’ निर्णयाची पोल खोलली. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, युवासेनेचे शहराध्यक्ष किरण साळी, संवादचे सुनील महाजन, निकिता मोघे उपस्थित होते. कविसंमेलनात रामदास फुटाणे, संदीप खरे, कल्पना दुधाळ, सुधीर मुळीक, तुकाराम धांडे यांनी विविध ढंगात कविता सादर करून वाग्बाण सोडले.
‘समाज कुठे चालला आहे आणि आपले मंत्री सेल्फीसारख्या कल्पना राबवून राज्याला भलतीकडेच घेऊन जात आहे. अशा विसंगतीतूनच कविता सुचते. सर्वसामान्य माणसाला पडणारे प्रश्न आणि दु:ख कवितेत दिसले की ती कविता जवळची वाटते,’ अशा शब्दांत फुटाणे यांनी कवितेमागची प्रेरणा उलगडली. संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले.

‘नेता बॅनरद्वारेच लोकांपर्यत पोहोचतो’
‘राजकारण्यांजवळ जायला मराठी माणूस घाबरायचा. आपले काम त्यांच्याकडून होईल की नाही याबद्दल साशंकता व भीती असे. बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या मनामध्ये निर्भयता रुजवली,’ असे रामदास फुटाणे यांनी सांगितले. ‘आजच्या काळात नेता केवळ बॅनरद्वारेच लोकांपर्यंत पोहोचतो. बाळासाहेब त्यास अपवाद होते,’ अशी टिप्पणी संदीप खरे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images