Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

​ आरामबस अपघातात चार ठार

$
0
0

तेरा जखमी; पुणे-सोलापूर रस्त्यावरील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, बारामती/ पुणे

हैदराबादहून मुंबईकडे निघालेली खासगी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातामध्ये चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तेरा प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ शनिवारी पहाटे हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्रवण माधव केंद्रे (वय २५ रा. डोंबिवली, मुंबई), विशाल गोकुळ लाड (वय ३२ रा. औरंगाबाद), घंटा करणारकर (वय ३२ रा. हैदराबाद), अमीरउल्ला बाबावल्ली खान (वय ३५ रा. फोर्ट व्हील कॉलनी, हैदराबाद) अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. प्रितेश पटेल (वय ३६ रा. अहमदाबाद), राजेश माणिक शितोळे (४६ रा. वाघोली), नीलेश सोमनाथ मिळशेटे (ता. कराड जि. सातारा), सुजित मिश्रा (वय ३८ रा. मुंबई) आणि नीलेश अशोक गोलबोले (रा. बदलापूर मुंबई) हे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या बाबत संदीप सदाशिव धनवडे (वय ३०,नवीन पनवेल जि. रायगड) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथून खासगी लक्झरी बस शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चाळीस प्रवासी घेऊन मुंबईकडे निघाली होती. शनिवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळील सरडेवाडी टोलनाक्याच्या पुढे काही अंतरावर बस आली असता चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर बस रस्तादुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला जाऊन पानाची टपरीला धडकली. श्रवण केंद्रे, संदीप धनवडे आणि सुजित मिश्रा हे तिघेही कंपनीच्या वार्षिक बैठकीसाठी हैदराबादला गेले होते. तेथून ते विमानाने मुंबईला जाणार होते. पण, तिकीट रद्द करून त्यांनी लक्झरी बसने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.

महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा
पुणे-सोलापूर महामार्गावरील रस्तादुभाजकातील झाडांची उंची योग्य त्या प्रमाणात नाही, तसेच, गतिरोधक व्यवस्थित दिसत नाहीत, स्थानिकांनी दुभाजक फोडून रस्ते तयार केले आहेत. भरीस भर म्हणून दुभाजकांमध्ये सर्रास जनावरे बांधली जातात, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. या सर्व गोष्टीमुळे महामार्गावर सतत अपघात होत असल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या आगामी निव‍डणुकीत युती करण्याबाबत शिवसेना, भाजपच्या शनिवारी झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. युती करण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असून, पुढील दोन दिवसानंतर पुन्हा बैठक घेतली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये केवळ चर्चाच सुरू असल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या पक्षांच्या बैठका सुरू आहेत. पालिका निवडणुकीसाठी युती की आघाडी करणार याकडे प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे. शहरात युती करण्यासाठी शुक्रवारी रात्री शिवसेना, भाजपच्या स्थानिक नेत्यांची बैठक होणार होती; मात्र काही पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. शनिवारी दुपारी ही बैठक झाली. या बैठकीत युतीच्या जागा वाटपाबाबत कोणतीही‌ चर्चा झाली नाही. एक तास दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर दोन दिवसानंतर पुन्हा एकदा बैठक घेऊन निर्णय घेण्याची चर्चा या वेळी करण्यात आली. शिवसेनेकडून माजी मंत्री शशिकांत सुतार, शहरप्रमुख विनायक निम्हण; तर भाजपकडून राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले हे या बैठकीत सहभागी झाले होते.
या बैठकीत युतीमध्ये प्रत्येक पक्षाला किती जागा द्यायच्या याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. या बैठकीत केवळ एकमेकांना युतीचा तपशील देण्यात आला. युती करण्याचा आधिकार स्थानिक नेतृत्वाला दिला असला तरी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा विचार घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. युतीबाबतच्या इतर प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली असून, पुन्हा दोन दिवसांनी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे भाजपचे शहराध्यक्षा गोगावले यांनी सांगितले. दोन्ही पक्षांना आवडेल अशा सन्मानपूर्वक युतीस आम्ही तयार आहोत. २६ जानेवारीपूर्वी युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही गोगावले यांनी स्पष्ट केले.
युती करताना विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेली मतांची आकडेवारी ग्राह्य धरून त्याद्वारे युती करावी, असा आग्रह भाजपने धरला आहे. तर सेनेने गेल्या महापालिका निवडणुकांचा फॉर्म्युलाच कायम ठेवून जागावाटपाची बोलणी करावी, अशी भूमिका मांडली आहे. यावर एकमत होत नसल्याने युतीच्या बैठकीत गेल्या काही दिवसांपासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. युतीबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते चांगलेच हवालदिल झाले आहेत.
युतीसाठी भाजपने ११७-४५ असा जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे. त्यामध्ये सेनेला ४५ जागा देऊन उर्वरित ११७ जागा भाजपने स्वत:साठी ठेवल्या आहेत. शिवसेनेबरोबरच महायुतीत सहभागी असणाऱ्या आरपीआयला जागा द्याव्या लागणार आहेत. तसेच, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, भारतीय संग्राम परिषद (शिवसंग्राम) या पक्षांनीही पालिका निवडणुकीत जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या सर्वांचा विचार करून भाजपला निर्णय घ्यावा लागणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक दिवस मतदानासाठी’ भाजपची जनजागृती मोहीम

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘एक दिवस मतदानासाठी’ हे अभियान राबवून मतदारांची जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या बुधवारी (२५ जानेवारीला) संपूर्ण शहरात हे अभियान राबविले जाणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले.
पारदर्शक कारभार, गतिमान प्रशासन, भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख सुशासन यासाठी अधिकाधिक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या तयारीसाठी शनिवारी भाजपच्या ४१ प्रभागांच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखांची तसेच सहायकांची बैठक पक्षाच्या कार्यालयात झाली. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचे सर्वेक्षण करण्यासाठी भाजपने तयार केलेले ‘मिशन-२०१७’ हे सॉफ्टवेअर आजपासून (रविवार) २२ जानेवारीपासून हजारी यादी प्रमुखांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सॉफ्टवेअरचा उपयोग करून नाव, आडनाव, पत्ता, भाषा आदी सोळाप्रकारे मतदार यादीचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले.
याबरोबरच येत्या मंगळवारी (२४ जानेवारीला) शहरातील ४१ प्रभागातील हजारी यादी प्रमुखांच्या बैठका प्रभागात आयोजित करण्यात आल्या आहेत. २५ जानेवारीला मतदान जागृती दिनाचे औचित्य साधून पक्षाचे कार्यकर्ते सकाळी साडेसात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत प्रभागातील घराघरात संपर्क साधून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी नागरिकांची भेट घेऊन जनजागृती करणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीत यश मिळविण्यासाठी सर्व ताकदीने प्रचारात उतरण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यासाठी हजारी यादी, जाहीरनामा आणि आरोपपत्र, सोशल मीडिया, साहित्य निर्मिती, पारंपरिक व अपारंपरिक प्रचार, सभांचे आयोजन, परिवार संपर्क यावर विशेष भर दिला जाणार आहे. यासाठी निवडणूक व्यवस्थापन समितीतील प्रमुखांच्या मॅरेथॉन बैठका आज, रविवारी (२२ जानेवारीला) पक्ष कार्यालयात होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ गायकी, बासरीतून मनामनाशी संवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

त्या जेव्हा चित्रपट संगीत गाऊ लागतात तेव्हा ते सहजतेने उपशास्त्रीय अंग घेते. त्यांच्या आवाजाचा पोत वेगळा, त्यांचा एक एक शब्द आणि शब्दामागून प्रकटलेला स्वर थेट काळजाला भिडतो. त्यांची गायकी आधुनिक संगीतातील अभिजातताच दर्शवते. रेखा भारद्वाज हे त्या प्रतिभावान गायकीचे नाव. मग त्या मैफल केवळ मैफल न उरता मनाशी मनाचा संवाद होऊन जाते. शनिवारची सायंकाळ अशीच अभिजात मनस्पर्शातून संवाद घडवणारी होती.
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे रमणबागेच्या मैदानावर आयोजित वसंतोत्सवातून ही रम्य सायंकाळ रसिकांनी अनुभवली. रेखा भारद्वाज यांची ब्रह्मानंदी टाळी लावणारी गायकी आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे व प्रख्यात बासरीवादक रोणू मुजुमदार यांचा जुगलबंदीतून रंगलेला स्वराविष्कार रसिकांना स्वरचिंब करणारा ठरला.
रेखा भारद्वाज यांनी पहिल्या गीतापासून जी पकड घेतली ती शेवटपर्यंत. रसिकांचे रंजन न करता त्यांनी आपल्या ‘इश्का इश्का’ या ध्वनिमुद्रिकेतील रचना सादर केल्या. ‘तेरे इश्क मे, तेरी रजा मेरी रजा’, ‘इश्का इश्का, आज रंग है’ या त्यांच्या रचना संथगतीने झुळूझुळू वाहणाऱ्या जलधारेप्रमाणे भासत होत्या. रसिकांच्या आग्रहास्तव ‘तेरे बिन नही लगता; दिल मेरा ढोलना’ ही नसरत फते अली खाँ यांची रचना, ये जवानी है दिवानी चित्रपटातील कबिरा हे गीत, वो जो अधुरिसी बात बाकी है हे बर्फीमधील गाणे सादर करून भारद्वाज यांनी आपल्या खास गायकीचा प्रत्यय रसिकांना दिला. भारद्वाज यांना साथीला असलेला प्रत्येक सहवादक स्वत:चे अस्तित्व राखून होता. राज सोडा यांनी सॅक्सोफोन, मयुर सरकार यांनी गिटारमधून अवीट गोडीच्या स्वराची ओंजळ रिती केली. मानस चौधरी (बेस), विनया नेटके (तबला), गिरीश विश्व (ढोलक),मुकुंद डोंगरे (ड्रम्स) यांची साथसंगत मैफल सजवणारी होती.
उत्तरार्धात राहुल देशपांडे, रोणू मुजुमदार यांनी स्वरांच्या लपंडावातून अनोखे विश्व उभे केले. राहुल यांच्या गळ्यातून व्यक्त होणारा प्रत्येक स्वर मुजुमदार आपल्या सफाईदार बासरीवादनात टिपत होते. राहुल यांच्या गळ्यातला स्वर ते त्याच स्वराचा बासरीतून प्रकटलेला स्ट्रोक संगीताच्या अलौकिक शक्तीची जाणीव करून देणारा होता. गणेश वंदना, अभोगी राग, केवळ स्वरांचा विहार, तराणा अशा रचनांतून स्वरांचा लपंडाव रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. सावरे आयजयो व वसंतराव देशपांडे यांच्या या भवनातील गीत पुराणे या जुगलबंदीतून रंगलेल्या रचनेने रसिकांना तल्लीन केले. मैफलीची सांगता निर्गुणी भजनाने झाली. चैतन्य कुंटे (हार्मोनियम) , निखिल फाटक ( तबला), सुखद मुंडे (पखवाज) व नारायण खिलारी (तानपुरा) यांची सुरेल साथसंगत स्वतंत्र स्वरतालविष्कार होता.

‘पुतळे तोडणे चुकीचे’
पुतळे तोडण्याचे प्रकार मला पटत नाहीत. तोडफोडीचे प्रकार चुकीचे आहेत. विचारांनी लढा देता यायला हवा. मला दहा वेळा विचारले तर मी हेच सांगेन,’ या शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गडकरी पुतळाप्रकरणावरून टीकास्त्र सोडले. बैलांच्या शर्यतीवरून तमिळनाडूमध्ये पेटलेल्या आंदोलनाबाबत बोलताना ही परंपरा सुरू राहिली पाहिजे. परंपरा संपवायच्याच असतील तर कबड्डी आणि गोविंदा पथकेही बंद करा. न्यायालयापेक्षा केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करायला हवा,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
..
‘जवानांचा लष्करात चांगला सांभाळ’

‘जवानांना चांगले खायला मिळत नाही, ही घटना तुरळक आहे. आपल्या मुलांपेक्षाही त्यांचा चांगला सांभाळ लष्कराकडून केला जातो,’ अशी टिप्पणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी शनिवारी वसंतोत्सवात केली. गेल्या वर्षभरात शहीद झालेल्या ३०६ जवानांच्या कुटुंबांना नाम फाउंडेशनतर्फे अडीच लाख देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
‘गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत केली. हे काम थांबणारे नाही. जमलेल्या साठ कोटी रुपयांपैकी बरीच रक्कम शिल्लक आहे. त्यातून जवानांच्या कुटुंबांना मदत करणार आहे. पैसे लागले तर लोकांकडे हक्काने मागेन. आपण रसिक स्वरांनी न्हाहतो; पण तिकडे सीमेवर जवान बेसुरांशी लढतात म्हणून आपण सुरक्षित असतो,’ अशी टिप्पणी नाना यांनी केली. राजकीय पक्षांच्या चिन्हात संगीताची वाद्ये नाहीत ते बरे आहे. पक्षाच्या चिन्हात वाद्य असती तर निवडणुकीमुळे अडचण निर्माण झाली असती, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ अपघात रोखणारी सतर्क कार ​

$
0
0

‘एआरएआय’, कॉग्निझंट यांची संयुक्त निर्मिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टेस्टिंग ट्रॅकवर धावणारी छोटेखानी इलेक्ट्रिक कार वाटेत असलेल्या पादचाऱ्याला पाहून थांबते आणि समोर असलेल्या दुसऱ्या गाडीला बाजूने सुरक्षितरित्या ओलांडून पुढे जाते...ते पाहून केंद्रीय मंत्र्यांससह उप​स्थित सर्वजण टाळ्यांचा कडकडाट करतात. कारण ही ‘ऑटोनॉमस’ म्हणजेच स्वयंचलित कार सर्वार्थाने चालकरहित असते.
पुण्यातील ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एआरएआय) कॉग्निझंट कंपनीच्या सहकार्याने या प्रकल्पावर काम करत आहे. त्याची पहिली झलक ‘एआरएआय’मध्ये आयोजित ‘एसआयएटी’ प्रदर्शनाच्या समारोपाप्रसंगी शनिवारी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांना दाखविण्यात आली.
अपघात रोखण्यासाठी कायम सतर्क असणारी आणि आणीबाणीच्या प्रसंगी भावनारहित निर्णय घेणारी ही कार लवकरच प्रत्यक्षात येऊ शकेल. वाहनचालकरहित गाडीपेक्षा वाहनचालकाला साह्यभूत ठरेल आणि प्रवास अधिक आरामदायी, सुखकर आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित करेल, अशी यंत्रणा या कारवर बसविण्यात येणार आहे. सध्या एका इलेक्ट्रिक कारवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यावर कंट्रोल सिस्टिम्सच्या साह्याने विविध तंत्रज्ञानांचा वापर करून चाचणी घेण्यात येत आहे.
या यंत्रणेबाबत एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक एम. आर. सराफ यांनी ‘मटा’ला माहिती दिली. ‘ही कार स्वयंचलित तंत्रज्ञानावर आधारित असली, तरी चालकरहित नसेल; तर चालकाला मदत करणारी, त्याच्यावरील ताण कमी करणारी आणि आणीबाणीच्या क्षणी गाडीचा ताबा घेऊन सुरक्षित मार्ग काढणारी यंत्रणा असे तिचे स्वरूप असेल.’या यंत्रणेमध्ये कॅमेरा, सेन्सर्स आणि रडारचा वापर करण्यात आला आहे. एकूण सहा टप्प्यात ही यंत्रणा विकसित केली जाईल. सराफ म्हणाले, ‘ही यंत्रणा म्हणजे बेस्ट ड्रायव्हर्स ब्रेन असेल. सर्वोत्तम चालकांच्या अनुभवावर आधारित अल्गोरिदम विकसित करण्यात येतील. अपघाताच्या वेळी किंवा गडबडीच्या वेळी चालक घाबरून गोंधळून जातात. त्याचक्षणी योग्य निर्णय घेऊन कार्यवाही आवश्यक असते. तेच काम ही यंत्रणा अचूक रीतीने करू शकेल. यासाठी एआरएआय सुरक्षा निकष, वाहतुकीचे नियम, सुरक्षितता आणि चाचणी या क्षेत्रावर काम करत असून, कॉग्निझंटतर्फे त्यासाठीच्या कंट्रोल सिस्टिम्स विकसित केल्या जात आहेत. इंटरनेट ऑफ थिंग्जच्या धर्तीवर इंटरनेट ऑफ व्हेइकलच्या माध्यमातून हवामान, रस्त्याची स्थिती, एकूण अंतर या बाबी इनपुट म्हणून या यंत्रणेला पुरविल्या जातील.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेवर चालणाऱ्या वाहनांची गरज : गीते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पर्यावरण रक्षणासाठी सीएनजी-एलएनजी इंधनावर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती केली. मात्र,आता शंभर टक्के विजेवर चालणाऱ्या वाहनांची (इलेक्ट्रिक व्हेइकल) गरज आहे,’ असे मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी शनिवारी व्यक्त केले. तसेच, वाहननिर्मितीच्या क्षेत्रात भारत अन्य विकसित देशांच्या बरोबरीने प्रगती करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘एआरएआय’तर्फे आयोजित ‘सिम्पोझिअम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी परिषदेत’च्या (सिअ‍ॅट) समारोपाच्या कार्यक्रमाच गीते बोलत होते. केंद्रीय अवजड, उद्योग विभागाचे सहसचिव विश्वजित सहाय, ‘युनायटेड नेशन्स इकोनॉमिक कमिशन फॉर युरोपच्या सस्टेनेबल ट्रान्स्पोर्ट’ या विभागाच्या संचालिका इवा मोलनार, ‘एआरएआय’ पुणेच्या संचालिका रश्मी उर्ध्वरेषे, उपसंचालक आनंद देशपांडे आदी या वेळी उपस्थित होते.
‘पर्यावरण आणि प्रदूषण या एकाच नाण्याच्या दोन बाजूंनी जगाला ग्रासले आहे. निसर्ग आणि मानवाने त्यामध्ये संतुलन राखणे गरजेचे आहे. जगभरात वाहनांची मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिले जाते. या स्पर्धेत आपण टिकून राहण्याची आवश्यकता आहे,’ असे गीते म्हणाले. भारतातील नागरिकांची बौद्धिक क्षमता ही इतरांच्या तुलनेने जास्त असून त्याचा वापर निर्मिती क्षेत्राची क्षमता वाढविण्यासाठी झाला पाहिजे, अशी अपेक्षा मोलनार यांनी व्यक्त केली.
संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी स्मरणिकेचे व संदर्भसूचीचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. ‘सिअ‍ॅट’च्या निमित्ताने एम. व्ही. गणेश प्रसाद आणि व्ही. विक्रमण या दोघांना विभागून तरुण इंजिनीअर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इंजिन स्टँडर्डमध्ये बदल
सध्या देशातील वाहनांच्या इंजिनची क्षमता ‘बीएस ४’ (बेसिकली स्टेज इमिशन स्टँडर्ड) आहे. त्यामुळे इंजिनातून उत्सर्जित होणाऱ्या वायूच्या धोकादायक पातळीवर नियंत्रण आणले आहे. मात्र, परदेशात सध्या इंजिनची क्षमता ‘बीएस ६’ वर नेण्यात आली आहे. त्यामुळे अवजड उद्योग, रस्ते वाहतूक व पर्यावरण मंत्रालयाने एकत्रितपणे २०२० पर्यंत देशातील सर्व वाहनांच्या इंजिनची क्षमता ‘बीएस ६’ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गीते यांनी दिली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा वर्षांपूर्वीच्या खुनाला फुटली वाचा

$
0
0

फ्लॅटविक्रीच्या वादातून प्रेयसीला संपवले; खुन्याला कोठडी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फ्लॅट विक्रीच्या वादातून प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याचा गुन्हा दहा वर्षांनी उघडकीला आणण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. प्रेयसीचा खून केल्यानंतर तिच्या जागी डमी महिला उभी करून फ्लॅट विक्री केल्याच्या गुन्ह्याचा तपास करताना हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
संतोष नंदकिशोर कातोरे (वय ३५, रा. श्रॉफ सृष्टी, म्हाळुंगे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत अर्चना दगडू सांगळे (वय ३०, रा. बाणेर) या महिलेचा खून झाला होता. मे २००७ पासून ही महिला हरवल्याची तक्रार चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तरीही सांगळे यांच्या नावावर असलेला बाणेर येथील फ्लॅट कातोरेने डमी महिला उभी करून विकल्याचे आढळून आले. संघटित गुन्हेगारी विरोधी पथक (उत्तर) यांच्याकडून गुन्ह्याचा तपास करत असताना महिलेच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील आणि अरुण वालतुरे यांनी दिली.
अर्चना यांचा विवाह झाला होता. पतीसोबत त्यांचे पटत नसल्यामुळे त्या वेगळ्या राहत होत्या. त्यानंतर त्यांची कातोरेशी ओळख झाली. त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर दोघांनी मिळून बाणेर येथे फ्लॅट विकत घेतला होता. त्या फ्लॅटवरून वादावादी झाल्यानंतर अर्चना बेपत्ता झाल्या. या प्रकरणी अर्चनाच्या वडिलांनी तक्रार दिली होती. अपहरणाच्या गुन्ह्यात त्यावेळी कातोरेला पोलिसांनी अटक केली होती. पण, त्यामध्ये काहीच निष्पन्न झाले नाही. अर्चना बेपत्ता असतानाही कातोरेने २०१४ मध्ये डमी महिला उभी करून फ्लॅट नावावर करून घेतला. नंतर या फ्लॅटची विक्री करण्यात आली. या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात कातोरेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड तपास करत असताना फ्लॅटच्या वादातूनच कातोरेने १ नोव्हेंबर २००६ रोजी कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी जाण्याचा बहाणा करून अर्चना यांचा गळा आवळून खून केला. त्यांचा मृतदेह सांगली जिल्ह्यातील किल्ले मच्छिंद्रगड येथे टाकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात त्याला मदत करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे, असे पाटील म्हणाले.

आरोपी वेश्याव्यवसायातही
कातोरेवर पूर्वी वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालवित असल्याचा हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत. या प्रकरणी कातोरेला कोर्टात हजर केले असता, २४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. कातोरे याची सूर्यप्रकाश फाउंडेशन नावाची संस्था आहे. कातोरे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्यामुळे तपासावर परिणाम होण्याची भीती कोर्टाकडे व्यक्त करण्यात आली. त्यावर विचारणा केली असता गायकवाड यांनी कातोरे पोलिस आयुक्तालयात सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निवेदन देण्यात येत असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बैलगाडा शर्यत सुरू करा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, पेटा या संघटनेवर बंदी घालावी या मागणीसाठी पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी आंदोलन करण्यात आले. या वेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

जल्लिकट्टूवरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी तमिळनाडूत गेल्या चार दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलने चालू झाली आहेत. त्यानंतर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याच्या मागणीनेही जोर धरला आहे. त्याच मुद्यावर पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातही शनिवारी आंदोलन झाले. तसेच, पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील बैलगाडाप्रेमींनी चाकण येथे दुपारी बाराच्या सुमारास आंदोलन केले. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी राज्यव्यापी लढा देण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला.

खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार सुरेश गोरे, महेश लांडगे, माजी आमदार दिलीप मोहिते, जयसिंह एरंडे, रामकृष्ण टाकळकर, कैलास सांडभोर, अनिल राक्षे, शरद बुट्टे, राजेश जवळेकर या वेळी उपस्थित होते. बैलगाडा शर्यत आणि जल्लिकट्टू स्पर्धेवरील बंदी उठवावी, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. त्यासाठी कायद्यात दुरूस्ती करून किंवा थेट राष्ट्रपतींनी वटहुकूम काढून बैलगाडा शर्यती पूर्ववत करावी, असे निवेदन तहसीलदार सुनील जोशी यांना देण्यात आले. आंदोलनामुळे पुणे-नाशिक महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

‘बैल वाचवा ,पेटा हटवा’ यासह इतर घोषणांचे फलक बैलगाडा मालक, शेतकरी, शर्यतप्रेमी यांनी हाती घेतले होते. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, मावळ, हवेली तालुक्यांतील बैलगाडा मालक आणि शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला. बंदी उठविण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिले. महेश शेवकरी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादाच्या आड कंपनीवादाचा अजेंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सरकारला, प्रशासनाला आणि मूलतत्त्ववाद्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना राष्ट्रदोही ठरविणे आणि त्यांचा वापर राजकीय हत्यार म्हणून करणे, हे सध्याच्या राजकीय पक्षांचे काम झाले आहे. सरकारला देशात राष्ट्रवादाच्या अजेंड्याखाली भांडवलशाही आणि कंपनीवाद राबवायचे आहेत,’ अशी खरमरीत टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी शनिवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादाचे समर्थन करीत जगभर फिरतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात आ​णि वर्तनात मोठा फरक आहे, अशी टीकाही पाटकर यांनी केली.
विचारवेध संमेलनात ‘वंचितांचा आणि शोषितांचा राष्ट्रवाद’ या विषयावर श्रीमती पाटकर बोलत होत्या. या वेळी सई ठाकूर, पल्लवी रेणके, उल्का महाजन आदी उपस्थित होत्या. ‘एकीकडे देशाचे पंतप्रधान जय जगत करत जगभर फिरतात तर दुसरीकडे देशातील आदिवासी, शोषित आणि वंचितांना त्यांचे अधिकार मिळत नाहीत. अशा परिस्थितीत देशात खरंच प्रभावी राष्ट्रवादाची गरज आहे का या प्रश्नाचा विचार करणे आपण गरजेचे आहे. देशात काही लोकांकडून राष्ट्रवादाच्या नावाखाली लोकांना मानवाधिकारापासून आणि मानवी मूल्यांपासून दूर नेण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रवादामुळे देशाचे प्रश्न समाजिक आणि आर्थिक प्रश्न सुटणार आहेत का, या राष्ट्रवादामुळे आदिवासी नागरिकांचे साधे प्रश्न सुटणार आहेक का, असे असंख्य प्रश्न विचारण्याची गरज झाली आहे. देशात राष्ट्रवादाबाबत गोंधळ घालून सरकारने बाजारीकरणाचे धोरण राबवून मुंबई- दिल्ली कॉरिडॉरमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनींचा ताबा घेतला आहे,’ असे पाटकर म्हणाल्या.
आदिवासी जनतेला नोटाबंदीच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागल्या. ते लोक आधीपासूनच कॅशलेस होते. मात्र, सरकारने नोटाबंदी करून त्यांना काही रुपयांसाठी रांगेत उभे केले. त्यामुळे त्यांच्या दररोजच्या व्यवहारांवर गदा आली, असेही पाटकर यांनी नमूद केले. महाजन, ठाकूर, रेणके यांनी देखील मनोगत व्यक्त केले. दरम्यान, संमेलनात संध्याकाळी झालेल्या सत्रात शाहीर संभाजी भगत, शीतल साठे आणि कलाकारांनी ‘विद्रोही शाहिरी जलसा’ सादर केला.

‘आमची बाजू ऐकतच नाहीत’
‘नर्मदा’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्यात न्यायालय आणि न्यायाधीश आमची बाजू व्यवस्थित ऐकूनच घेत नाहीत. एवढंच काय न्यायालयात न्यायमूर्तींनी दिलेले आदेश गुजरातच्या वकिलांच्या सांगण्यावरून बदलतात, असा आरोप पाटकर यांनी केला.

‘समाजवाद्यांचाही मोर्चा निघावा’
शाहिरी विद्रोही जलसा कार्यक्रमात शाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते विद्रोही कार्यकर्ते सचिन माळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विविध समाजाचे मोर्चे निघत असताना समाजवादी, मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी विचारसरणीच्या लोकांनी पुण्यात समोर येऊन मोर्चे काढण्याची आवश्यकता आहे. पुण्यात आगामी काळात जलसा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे माळी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघाकडून धर्म आणि जातीयवादाला खतपाणी

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात मतभेद, भेदभाव, द्वेष आणि नोटाबंदीसारख्या चुकीच्या मुद्द्यांनाच प्रोत्साहन दिले. या विरोधात आवाज उठविणाऱ्यांना, चुका समोर आणणाऱ्या व्यक्तींना गायब केले जात आहे. सत्तेच्या जोरावर विवेकवाद्यांचा आवाज दडपण्यात आला. देशाच्या विभाजनाचे काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून धर्म आणि जातीयवादाला खतपाणी घालण्यात येत आहे,’ अशा शब्दात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा नेता मोहित पांडे याने मोदी आणि संघ परिवाराला लक्ष्य केले.
हम समाजवादी संस्थेतर्फे आयोजित अखिल भारतीय समाजवादी युवा संमेलनाचे उद्घाटन पॉस्कोविरोधी आंदोलनाच्या युवा नेत्या मनोरमा यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, मोहित पांडे, जी.जी. पारीख, राष्ट्र सेवा दलाचे सदाशिव मगदूम, युसूफ मेहरअली,नीरज जैन आदी उपस्थित होते.
निवडणुका जवळ आल्यावर जातीयवाद, धार्मिक तेढ प्रश्न निर्माण केले जातात. गुजरातचे विकास मॉडेल जिओ सिमप्रमाणे माथी मारले जात आहे. सरकार लोकांना वारंवार द्वेष, अंधभक्ती, अस्वस्थतेच्या, निराशेच्या पातळीवर ढकलत आहे. रोहित वेमुलाची हत्या करणाऱ्या कुलगुरूंना पुरस्काराने गौरविण्यात येत आहे; तर जेएनयूच्या नदीम अहमद या विद्यार्थ्याला अभाविपने गायब केले आहे.
आंबेडकरांचे नाव घेत आरक्षणाविषयी वादंग निर्माण केला जात आहे. मात्र, आंबेडकर विषमता आणि जातीयवाद नष्ट करण्यासाठी अविरत संघर्ष करत होते, ही बाब हिंदुत्त्ववाद्यांकडून मांडली जाणार नाही. डॉ. आंबेडकर यांचे नाव घेऊन आरक्षण बंद करा, असे सांगणाऱ्यांनी अगोदर आंबेडकरांचे नाव घेऊन मनुवाद, ब्राह्मणवाद संपवावा, असे मोहितने सांगितले.
‘जातीयवाद, धर्मांधता देशातील एकोपा संपवत आहेत. त्याविरोधातली चळवळ गावागावांपर्यंत पोहोचवली पाहिजे. व्हॉट्सअॅपवर आपण अडकलेलो आहोत. त्यामुळे व्हॉट्स डाउनकडे पाहायला आपल्याला वेळ नाही. अॅट्रोसिटी रद्द करण्याला आमचा सक्त विरोध आहे,’ असे पाटकर यांनी सांगितले.
या वेळी नोटाबंदीः काय कमावले? काय गमावले? पुस्तकाचे मेधा पाटकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. उद्घाटनानंतरच्या सत्रात अहमदाबाद येथील दलित हक्क कार्यकर्ते मार्टिन मकवान यांनी ‘दलितांसमोरील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर मासूम संस्थेच्या मनीषा गुप्ते यांनी लिंगभेदाचे स्त्री-पुरुषांवर होणारे विविध परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नेट’च्या गोंधळाने परीक्षा‌‌र्थींना मनस्ताप

$
0
0

परीक्षा केंद्राच्या चुकीच्या माहितीने अनेकांची संधी हुकली

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) देण्यासाठी परगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर चुकीचा पत्ता छापून आल्याने काही विद्यार्थी वेळेवर परीक्षेस पोहोचू शकले नाहीत. तर, हॉल तिकिटावर सेंटरचा पत्ता एका परीक्षा केंद्राचा आणि प्रत्यक्षात परिक्षा क्रमांक दुसऱ्या सेंटरवर, अशा प्रकारची परिस्थिती उद्भविल्याने अनेक विद्यार्थ्यांना रविवारी परीक्षा देता आली नाही. याचा फटका परगावाहून आलेल्या अंध व अपंग विद्यार्थ्यांना बसला आहे.

देशात आणि पुण्यात रविवारी नेटची परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी विद्याशाखेनुसार पेपर - १, पेपर - २ आणि पेपर - ३ असे तीन पेपर होते. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता पेपर-१ ने ही परीक्षा सुरू झाली. या परीक्षेसाठी शहरामधील नऱ्हे, रेसकोर्स, लुल्लानगर, शिवाजीनगर, विश्रांतवाडी, दिघी या परिसरात शाळा आणि कॉलेजांमध्ये परीक्षा केंद्रे होती. या परीक्षेसाठी पुण्यासह इतर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी पुण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर सकाळी सात वाजता पोहोचण्याच्या सूचना असल्याने सकाळी सहा वाजल्यापासून अनेक विद्यार्थी फिरत होते.

हॉलतिकिटावर लुल्लानगरच्या परीक्षा केंद्राचा पत्ता दिलेल्या काही विद्यार्थ्यांना त्यांचा क्रमांक तेथे नसल्याचे आढळले. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. बसस्थावक, रेल्वे स्टेशन, बसथांब्यांहून परीक्षा केंद्रांचे अंतर दूर असल्याने आणि इतर कारणांमुळे काही विद्यार्थी केंद्रांवर काही मिनटे उशिरा पोहोचल्यामुळे त्यांना केंद्रप्रमुखांनी परीक्षेस बसू दिले गेले नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

साताऱ्याच्या संतोष देशमुख या विद्यार्थ्याच्या हॉल तिकिटावर परीक्षा केंद्राचा पत्ता आर्मी पब्लिक स्कूल, कोंढवा असा दिला होता. त्या ठिकाणी पोहोचल्यावर, त्याला परीक्षा केंद्र दिघी येथील आर्मी पब्लिक स्कूल असल्याचे सांगण्यात आले. दिघी येथे पोहोचल्यावर त्याला तुमचा क्रमांक सिंहगड पब्लिक स्कूल, आंबेगाव येथे आहे, असे सांगितले, या सर्व गोंधळात त्याला परीक्षा देता आली नाही. असे अनेक प्रकार रविवारी विविध परीक्षा केंद्रांवर घडले. हॉल तिकिटावर पत्ता एका ठिकाणचा आणि प्रत्यक्षात क्रमांक दुसरीकडे अशी परीस्थिती होती, असे विद्यार्थ्यानी सांगितले.

जळगावहून आलेला अंध विद्यार्थी जितेंद्र पाटील म्हणाला, ‘माझे परीक्षा केंद्र बाणेर येथील म्हाळुंगे रस्त्यावरील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल हे होते. सकाळी ९ वाजून ३१ मिनिटांनी ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूच्या गेटवर पोहचलो. मात्र, त्यांनी दुसऱ्या गेटला जाण्यास सांगितले. तेथे गेल्यावर ते गेट बंद होते. या परिक्षेसाठी माझ्यासह इतर सर्वसाधारण सुमारे २० ते २५ विद्यार्थी होते. मी अपंग असल्याने माझ्यासाठी जास्त वेळ असतो. मात्र, केंद्रप्रमुखांनी कोणतीही चर्चा करण्यासाठी नकार दिल्याने मला परिक्षा देता आली नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेट्रो’च्या स्थानकांची जागानिश्चिती लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गावरील प्रस्तावित स्टेशनची नेमकी जागा आणि मार्ग लवकरच निश्चित होणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने या दोन्ही मार्गांचे ‘डिफरन्टशिअल ग्लोबल पोझिशनिंग सर्व्हे’चे (डीजीपीएस) काम सुरू आहे. या सर्व्हेद्वारे सर्व स्टेशनची नेमकी जागा आता निश्चित होणार आहे.

केंद्रीय मंत्र‌िमंडळाने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाझ ते रामवाडी या पहिल्या टप्प्याला मान्यता दिली. त्यानंतर डिसेंबरअखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या कामाचे भूमिपूजन झाले. आता दोन्ही मार्गावर कामदेखील सुरू झाले आहे. सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (डीपीआर) या दोन्ही मार्गांच्या ‘अलाइनमेंट’ निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच मेट्रो स्टेशन कोठे कोठे असणार, त्यांची ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यामुळे या परिसरातील स्टेशन नेमके कोठे होणार, त्यासाठी खासगी मालकीची जागा संपादित केली जाणार का, हे प्रश्न अनुत्तरीत असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आणि जागा जाण्याच्या भितीने चिंताही आहे.

स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मार्गात १५ आणि वनाझ ते रामवाडी या मार्गात १६ असे एकूण ३१ मेट्रो स्टेशन पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात असणार आहेत. मात्र, अजूनपर्यंत या सर्व स्टेशनची नेमकी जागा निश्चित झालेली नाही. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर तातडीने ‘जीडीपीएस’ सर्व्हेचे काम हाती घेण्यात आले आहे. या सर्व्हेचे काम पूर्ण झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने कागदावरील मेट्रो मार्ग रस्त्यावर दिसणार आहे.

दरम्यान, मेट्रो स्टेशन व मार्गात खासगी जागा जात असल्यास त्या ठिकाणी सरकारी मालकीच्या जागा उपलब्ध असल्यास, आवश्यक तेथे बदल करण्याचा आदेश ‘महामेट्रो’च्या अधिकाऱ्यांना दिला आहे, अशी माहिती ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ‘मटा’ला दिली.

‘डीपीआर’मध्ये मेट्रो मार्ग व मेट्रो स्टेशन निश्चित करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात स्टेशन कोणत्या जागी असेल? स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या मार्गाने मेट्रो जाणार म्हणजे, ती रस्त्याच्या मधून जाणार की कडेने जाणार, या गोष्टी ‘डीजीपीएस’ सर्व्हेद्वारे समजणार आहेत, असे दीक्षित यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पिफ’मुळे वातावरण बदलले

$
0
0

‘पिफ’मुळे वातावरण बदलले

पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकार यांच्यातर्फे आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला. ‘पिफ’मुळे गेल्या पंधरा वर्षांत शहरात चित्रपट चळवळ वाढली. यंदाच्या ‘पिफ’च्या निमित्ताने महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्याशी चिंतामणी पत्की यांनी साधलेला संवाद
--------------------

पंधरा वर्षांपूर्वी शहरात चित्रपट साक्षरता किती होती?
पंधरा वर्षांपूर्वी शहरात चित्रपट महोत्सवांचे फारसे वातावरण नव्हते. चित्रपट चळवळ बाळसे धरायला लागली होती, पण चित्रपट साक्षरता हे शब्द अनेकांच्या ध्यानीमनी नव्हते. पिफमुळे पंधरा वर्षांत वातावरण बदलले.

पिफची वैशिष्ट्ये काय सांगता येतील?
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दर्जेदार करण्याचा आम्ही दरवर्षी प्रयत्न करीत आहोत. आमचा हेतू चांगला आहे. चित्रपटाच्या शैक्षणिक बाजूवर भर हे ‘पिफ’चे वैशिष्ट्य म्हणता येईल. इतर कोणत्याही महोत्सवात चित्रपटाच्या शैक्षणिक बाजूवर इतका भर दिला जात नाही. अनेक व्याख्यानांमधून निर्मिती प्रक्रिया उलगडते. त्याचा फायदा तरुणांना होतो.

यंदाच्या ‘पिफ’मध्ये ते वातावरण नसल्याची चर्चा होती?
रसिकांची संख्या यंदा पाचशेने घटली आहे, पण रसिकांनी महोत्सवाकडे पाठ फिरवलेली नाही. कमी झालेल्या संख्येचा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. आम्ही आमच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले. अनेक चांगल्या गोष्टी यादरम्यान घडल्या. चित्रपट पाहून बाहेर आलेल्या तरुणांच्या गप्पा ऎकण्यासारख्या होत्या.

इतर महोत्सव आणि ‘पिफ’ची तुलना केली जाते, त्याबाबत काय वाटते?
सव्वा कोटी रुपयांमध्ये पिफ यशस्वी केला जातो. या तुलनेत गोव्यातील इफ्फी, केरळ व इतर ठिकाणच्या महोत्सवांचे अंदाजपत्रक जास्त असते. या सर्व महोत्सवातील चित्रपट पिफमध्ये प्रदर्शित केले जातात. या महोत्सवांप्रमाणे पिफचा आशय राखण्याचा प्रयत्न असतो.

महोत्सव आंतरराष्ट्रीय असला, तरी मराठी चित्रपटांनाच का गर्दी होते?
अनेक मराठी चित्रपट पहिल्यांदा पिफमध्ये प्रदर्शित होतात. आशय दर्जेदार असला, तरी काही मराठी चित्रपट कमी खर्चात केलेले असतात. त्यामुळे हे चित्रपट प्रदर्शित होत नाहीत. मराठी चित्रपटांसाठी पिफ हे हक्काचे व्यासपीठ आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कलाकारांसाठी व रसिकांसाठी पिफ ही संधी असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझा वॉर्ड त्यांना का?

$
0
0

भाजप-शिवसेना युती होण्याआधीच इच्छुकांमध्ये नाराजी

Rohit.Athavale@timesgroup.com
Tweet : @AthavaleRohitMT

पिंपरी : महापालिकेची सत्ता काबिज करण्यासाठी भाजप-शिवसेना युतीची बोलणी सुरू असतानाच संभाव्य जागावाटपाची यादी फुटली आहे. त्यामुळे माझा वॉर्ड युतीने त्यांना का सोडला अशी विचारणा इच्छुक उमेदवारांकडून नेत्यांना होऊ लागली आहे. आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये युतीसंदर्भात चार ते पाच बैठका झाल्या आहेत. त्यातून कोणताच तोडगा निघू शकलेला नाही. परंतु, इच्छुक उमेदवारच नेत्यांना जाब विचारू लागल्याने नेत्यांची मात्र कोंडी झाली आहे.

अमुक एका प्रभागातील चार पैकी दोन जागांवर फुली, तर अन्य दोन जागांवर बरोबर अशी खूण जागांच्या यादीत आहे. काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या हाती ही यादी लागली असून, त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. मी गेल्या पाच वर्षांपासून पक्षाचे काम करीत आहे. मला यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन देखील नेत्यांनी दिले. काम सुरू कर, असे देखील सांगितले असाताना माझा वॉर्ड त्यांना कसा सोडायचे ठरले. हे ठरविताना आम्हाला विश्वासात का घेतले नाही, असा सवाल इच्छुक उमेदवार विचारू लागले आहेत. एकंदरीत ही परिस्थिती पाहता निवडणुकीत कोण कोणाचे काम करणार यावरून देखील चर्चा रंगू लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता काढून घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना अनेक क्लुप्त्या लढवत आहे. शिवसेना ५०-५० फॉर्म्युल्यावर ठाम आहे, तर भाजपने आपला प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवला आहे. यंदा चारचा प्रभाग असल्याने आणि पक्षांतराची मोठी रांगच लागल्याने इच्छुकांची संख्या देखील तेवढीच वाढली आहे. युतीसंदर्भात नुकत्याच झालेल्या पाचव्या बैठकीत ५८, ५५ व १५ असा प्रस्ताव शिवसेनेने दिला होता. तर त्यानंतर पुन्हा बैठक घेण्याचे ठरले आहे. यातूनच अद्याप तोडगा निघत नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेकडून सुरुवातीला भाजपला अॅल्टीमेटम दिला गेला.

तशी पत्रकार परिषद देखील घेतली गेली. तर असा कोणताही अल्टीमेटम आम्हाला देण्यात आलेला नाही, असे भाजपकडून सांगण्यात आले. त्यानंतर दोन बैठका झाल्या आहेत. सुरुवातीला जागांबाबत चर्चा झाली. त्यानंतर कोणत्या प्रभागात किती जागा एका पक्षाला द्यायच्या याबाबत बोलणी करण्यात आली आहे. त्याची एक यादी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून बनविण्यात आली असून, ती यादीच फुटल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिफचा ‘बाजार’

$
0
0

पिफचा ‘बाजार’

Aditya.Tanawade@timesgroup.com
Tweet: @AdityaTanawade

पुणे : नुकताच पर पडलेला १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘गाजला’; पण महोत्सवात दाखवलेल्या दर्जेदार चित्रपटांमुळे नाही, तर संपूर्ण महोत्सवाच्या नियोजनातील ढिसाळ कारभारामुळे. महोत्सवादरम्यान वारंवार अनुभवायला आलेली गोंधळाची परिस्थिती, सन्मानचिन्हांच्या अभावी गुंडाळलेला महोत्सवाचा समारोप समारंभ, पर्यावरण संवर्धनाचा नुसताच फार्स आणि कोथरूड सिटीप्राइड वगळता इतर ठिकाणी झालेले दुर्लक्ष अशा सर्व गोष्टींमुळे ‘पिफ’च्या नियोजनात अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
यंदाचा महोत्सव अनेक कारणांनी गाजला. महोत्सवाच्या घोषणेपासूनच संयोजकांनी वादंग अंगावर ओढून घेतले. पर्यावरण संवर्धन आणि ‘सेव्ह द टायगर्स’ अशी थीम महोत्सवाला देण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष महोत्सवात पर्यावरणाकडे कुणी डोकावूनही पाहिले नाही. महोत्सवात पर्यावरणावर आधारित केवळ सात चित्रपट होते, त्यातील तीन लघुपट होते. वर्ल्ड सिनेमा आणि ग्लोबल सिनेमा या विभागांमध्ये एकही चित्रपट पर्यावरणावर आधारलेला नव्हता. २०१६ सालच्या ‘पिफ’मध्ये राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले म्हणून महोत्सवासाठी पर्यावरणाची थीम देण्यात आली का, अशी शंका ‍‍‍व्यक्त केली जात आहे. महोत्सवात जे काही सात चित्रपट होते, त्यांच्याकडे प्रेक्षक फिरकलेही नाहीत. त्यामुळे ही संकल्पना केवळ नावापुरती वापरली गेली.
यंदा हा महोत्सव केवळ कोथरूडपुरता मर्यादित राहिला. संपूर्ण महोत्सवाच्या काळात पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून १३ ठिकाणी पिफचे आयोजन करण्यात आले होते. सिटीप्राइड कोथरूड हे महोत्सवाचे होम पिच होते. तेवढे एक ठिकाण सोडले, तर इतर ठिकाणी शुकशुकाटच होता. अनेक ठिकाणी तांत्रिक कारणांनी चित्रपटांचे प्रक्षेपणच झाले नाही, तर काही ठिकाणी अनेक खेळ आयत्यावेळी रद्द केले गेले. सिटीप्राइड-कोथरूड वगळता इतर ठिकाणी प्रेक्षकांशी संवाद साधण्याची संधीच निर्मात्या-दिग्दर्शकांना दिली गेली नाही. एका स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळालेल्या दिग्दर्शकाने खंत व्यक्त करून दाखवली.
‘मराठी चित्रपट हा खऱ्या अर्थाने पिफचा यूएसपी आहे. तो जपला जाणे अत्यंत गरज आहे. दर्जेदार मराठी चित्रपटांची महोत्सवासाठी निवड केली जात नसेल, तर मग महोत्सवाची यशस्वीता कमी झाली, असे म्हणावे लागेल. कान्स, बर्लिन, बुसान, व्हेनिस अशा चित्रपट महोत्सवांची काही तत्त्वं आहेत. त्या तत्त्वांनुसार ते चालतात म्हणून ते महोत्सव अत्यंत प्रसिद्ध आहेत. पिफचीही तशी तत्वे असावीत तरच या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक दर्जा प्राप्त होईल’, असे मत दिग्दर्शक सुजय हडाके याने व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रसिकांची नव्हे, महोत्सवांचीच भाऊगर्दी

$
0
0

रसिकांची नव्हे, महोत्सवांचीच भाऊगर्दी

Chintamani.Patki@timesgroup.com
Tweet: @chintamanipMT

पुणे : ‘पिफ’ यंदा चित्रपटांपेक्षा आयोजनातील कुरबुरींमुळेच जास्त लक्षात राहिला. रसिकांचे प्रमाण कमी झाल्याचे बोलले गेले. डिसेंबर ते जानेवारी हा काळ शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुगीचा असतो. या दोन महिन्यांत इतके काही कार्यक्रम आदळत असतात की ते मोजणेही अवघड झाले आहे. महोत्सवांचीच भाऊगर्दी इतकी झाली आहे की या गर्दीत वाट काढत जायचे तरी कुठे कुठे, असा प्रश्नच आहे. रसिक म्हणून समाजातील सर्व स्तरांतील एक वर्ग असतो; तो किती कार्यक्रमांना पुरून उरणार आहे, यावर कोणी बोलताना दिसत नाही. नवीन रसिक न घडल्याने अशा महोत्सवांमध्ये गर्दी जाणवत नाही आणि तेच चेहरे दिसत राहतात.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकार यांच्यातर्फे आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला. मागे वळून पाहताना ‘पिफ’ने शहराला भरभरून काही दिल्याचे नक्की म्हणता येईल. पण नवीन रसिक घडण्याची प्रक्रिया या महोत्सवाच्या बाबतीतही मंदावल्याचे दिसले. शहरातील चित्रपट चळवळीला एक मोठे व्यासपीठ आणि आंतरराष्ट्रीय आयाम पिफमुळे मिळाला. सुरुवातीच्या दहा वर्षांतील महोत्सवाचा आलेख नक्कीच उंचावणारा होता. पण गेल्या काही वर्षांत हा आलेख खाली येताना दिसत आहे. देशातील इतर महोत्सवांच्या तुलनेत तर हे प्रकर्षाने जाणवते. शहरातील चित्रपट चळवळीच्या दृष्टीने हे चित्र नक्कीच आश्वासक नाही. ‘पिफ’ला पुन्हा ते वैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर आयोजकांना अंग झटकून ‘अॅक्शन’ म्हणण्याशिवाय पर्याय नाही.
फिल्म इन्स्टिट्यूट व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या महत्त्वाच्या संस्था देशात केवळ पुण्यात आहेत. या संस्थांच्या निमित्ताने शहरात चित्रपट चळवळीने आकार घेतला. आशयसारख्या फिल्म क्लबने त्यास चळवळीचे रूप दिले. या कार्यात पुढे ‘पिफ’ने मोठे योगदान दिले. सुरेश कलमाडी यांनी पुण्याला एक नवीन ओळख देणारे जे उपक्रम सुरू केले, त्यामध्ये पिफ हा महत्त्वाचा महोत्सव आहे. पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत शहरात आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवले जायचे; पण ‘पिफ’मुळे एक मोठे व्यासपीठ निर्माण झाले. चित्रपट महोत्सवांना सर्वत्रच एक मानाचे स्थान मिळत असल्याने पुण्यानेही हा महोत्सव उचलून धरला. पहिल्या पाच वर्षांत या महोत्सवाला येणाऱ्यांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण अधिक होते. नंतर तरुणांची संख्या वाढू लागली. एक आश्वासक वातावरण या महोत्सवामुळे निर्माण झाले. पण ते वातावरण आता जाणवत नसल्याचे चित्रपट तज्ज्ञांचे व रसिकांचे मत आहे.
‘देशात केरळ, पश्चिम बंगाल, गोवा या नंतर पुण्याच्या महोत्सवाचा क्रमांक लागतो. पूर्वी चित्रपट रसिक इतर ठिकाणच्या महोत्सवांना जायला तयार नसत. त्याचे कारण आर्थिक नक्कीच आहे. गेल्या काही वर्षांत चित्रपट महोत्सवासाठी गोव्याला जायचे प्रमाण वाढले आहे. चित्रपट संग्रहालयामध्ये वारंवार विविध महोत्सव होत असतात व ते मोफत असतात. त्यामुळे रसिक आपली चित्रपट भूक या महोत्सवातून भागवताना दिसतात. या सर्वांमुळे पिफला येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे,’ असे निरीक्षण चित्रपट चळवळीतील तज्ज्ञांनी नोंदविले.
पहिल्या दहा वर्षांत महोत्सवाने एक उंची नक्कीच प्राप्त केली होती. ‘पिफ’ला जाणे म्हणजे प्रतिष्ठेचे मानले जात होते. आता लोक आम्ही पिफला जाणार नाहीत, असे म्हणू लागले आहेत. यंदाच्या महोत्सवात ते प्रकर्षाने जाणवले. आयोजनातील गोंधळ हे त्याचे कारण आहे. चित्रपट चळवळ वाढावी व महोत्सवाची उंची राहावी म्हणून वर्षभर काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. अचानक एक महोत्सव आयोजित करून चित्रपट चळवळ वाढणार नाही; तसेच ‘पिफ’चे स्थानही कायम राहणार नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. फिल्म इन्स्टिट्यूटसारखी संस्था किंवा शहरातील कॉलेज, विद्यापीठ यांच्याशी कृतिशीलतेने जोडून घेणे आवश्यक आहे. इतर रसिकांमध्ये जागृती करत आपला दर्जा सांभाळणेही आवश्यक आहे. हे होणार नसेल तर पंधरा वर्षांनंतर ‘पिफ’ कुठे आहे, याचा शोध आयोजकांनाच घ्यावा लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ‘एकला चलो रे’चा नारा

$
0
0

युतीला विलंब होत असल्याने दोन्ही पक्षांकडून उमेदवारांना संदेश
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या आठवड्यापासून संभाव्य युतीबाबत चर्चा करूनही निष्कर्ष निघत नसल्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून आता ‘एकला चलो रे’चा मार्गच अवलंबण्यात येण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीसाठी येत्या शुक्रवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याने कार्यकर्त्यांना अधिक ‘वेटिंग’वर न ठेवता, सर्व जागांची तयारी करा, असे संकेत देण्यात येत आहेत.
राज्यातील भाजप-शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर युतीसंदर्भात चर्चा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, गेल्या सोमवारी आणि शनिवारी भाजप-शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने युतीबाबत चाचपणी करण्याच्या दृष्टीने प्राथमिक स्तरावर चर्चा केली. या चर्चेमध्ये गेल्या पालिका निवडणुकांमधील जागेप्रमाणेच दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार केला जावा, यावर चर्चा झाली. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये त्यावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे, येत्या २-३ दिवसांत पुन्हा बैठक घेतली जाण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबईमध्येही युती होण्याबाबत साशंकता कायम असल्याने स्थानिक स्तरावर सर्व जागा लढविण्याचा निर्धार एका बाजूने व्यक्त केला जात आहे. सर्व १६२ जागा लढविण्याची तयारीही दोन्ही पक्षांनी केली असून, युतीचे चित्र अद्याप अस्पष्ट असल्याने कार्यकर्त्यांना तयारीला लागा, असा संदेश देण्यात आला आहे. पालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे, कदाचित आठवड्याच्या अखेरपर्यंत पक्षाची पहिली यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार, युती होऊ शकली नाही, तर संभाव्य उमेदवारांची यादी अंतिम करण्याचे कामही दोन्ही पक्षांना तातडीने करावे लागणार आहे. यापूर्वी, विधानसभेची निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढवली असल्याने नेमकी आपली ताकद कुठे आहे, कोणत्या भागांत आपण कमी पडतो, याचा पुरेसा अंदाज आला आहे. तसेच, गेल्या काही दिवसांत भाजपमध्ये विविध पक्षांतून मोठ्या प्रमाणात ‘इन्कमिंग’ झाले असल्याने तेथील पक्षाच्या उणिवा भरून निघतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे. म्हणूनच, पालिका निवडणूकही स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने ‘एकला चलो रे’चा मंत्रच अंमलात येईल, असे दिसते.
..................
शिवसेना ठाम
महापालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह अगदी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही अनेक विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व पक्षांतरामध्ये केवळ शिवसेना या एकाच पक्षातून एकही विद्यमान किंवा माजी नगरसेवक बाहेर पडलेला नाही. त्यामुळे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘शिवबंधना’वर अजूनही सर्व कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास असून, त्या बळावरच पालिका निवडणुकीत एकट्याने लढण्याचीही तयारी असल्याचा ठाम विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. भाजपने दिलेल्या तुटपुंज्या जागांवर समाधान मानण्याऐवजी स्वबळावर मतदारांना सामोरे जाण्याची तयारी त्यांनीही सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेवर टीका नाही

$
0
0

युती न झाल्यास भाजपची रणनीती; पालिकेतील कारभाऱ्यांवर करणार हल्लाबोल
म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या होऊनही जागा वाटपासंदर्भात अद्याप सर्वमान्य तोडगा निघत नसल्याने एकमेकांवर दोषारोप करण्याऐवजी पालिकेतील कारभाऱ्यांना हटवण्याच्या अजेंड्यावर मतदारांना सामोरे जाण्याची चाचपणी केली जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेवर कोणताही हल्ला न चढविता मतदारांना आकृष्ट करून घेतले होते. हीच रणनीती कायम ठेवून पालिका निवडणुकीतही शिवसेनेविरोधात लढावे लागले, तरी त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी विद्यमान सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविण्याचे मनसुबे आखले जात आहेत.
गेल्या आठवड्यामध्ये भाजप-शिवसेनेत जागा वाटपासाठी दोन वेळा बैठक झाली. या बैठकीत केवळ एकमेकांच्या प्रस्तावाचे आदान-प्रदान झाले असले, तरी युतीच्या दृष्टीने बोलणी पुढे सरकलेली नाहीत. विधानसभेत आठ आमदार निवडून आल्याने स्थानिक स्तरावरील अनेक कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळेल, असे वाटते. बहुतेक आमदारांनीही स्वबळावरच लढण्याचा आग्रह धरला आहे. शिवसेनेबोसत युती केल्यास, काही हक्काच्या जागांवर पाणी सोडावे लागले, असा भाजपमधील काही ज्येष्ठ मंडळींचाही होरा आहे. त्यामुळे, भाजपतर्फे ही निवडणूक विधानसभेप्रमाणे स्वतंत्रच लढवली जाईल, अशी शक्यता आहे.
भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास, अनेक वर्षांपासून मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर कोणत्याही स्वरूपाची टीका करायची नाही, असे पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सुचविले आहे.
...
निवडणुकीनंतर युतीची चाचपणी
विधानसभा निवडणुकीदरम्यानही शिवसेनेने भाजपवर टीका केली असली, तरी पंतप्रधान मोदी यांनीच सूचना केल्याने भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर जिव्हारी टीका करणे टाळले होते. हाच फॉर्म्युला पुन्हा वापरत पालिकेतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्यासाठी शिवसेनेवर टीका न करण्याचा पवित्रा भाजपकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेवर टीका न करता, त्यांना सांभाळून घेत, निवडणुकीनंतर पुन्हा युती करण्याबाबतही चाचपणी केली जाऊ शकते, असे कळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळे सौदागरला आनंदयात्रा

$
0
0

‘हॅपी स्ट्रीट’मध्ये आबालवृद्धांची धमाल

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
वाहने आणि प्रदूषण नसलेल्या रस्त्यावर धमाल करण्याची पर्वणी पिंपळे सौदागरमध्ये नागरिकांनी हॅपी स्ट्रीट उपक्रमात अनुभवली. या वेळी परिसरातील आबालवृद्धांनी गर्दी केली होती.

महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, व्हीजे डेव्हलपर्स आणि पुणे पोलिस, पुणे वाहतूक पोलिस, पुणे महापालिकेतर्फे हॅपी स्ट्रीट उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये पिंपळेसौदागर येथील कोकणे चौक ते गोविंद गार्डन चौकातपर्यंत धूम पाहायला मिळाली. पिंपळेसौदागर, नवी-जुनी सांगवी, वाकड, हिंजवडी, पिंपरीगाव, नाशिकफाटा, पिंपळेनिलख अशा विविध भागातून आलेल्या उत्साही पिंपरी-चिंचवकडकरांच्या गर्दीने हा रस्ता फुलून गेला होता. शाळा कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी आपल्या मित्रमैत्रिणींसह हॅपी स्ट्रीटवर विविध उपक्रमांची मजा लुटत होते. नोकरदार व्यक्तीही आपल्या मित्र-मैत्रिणींसह या हॅपी
स्ट्रीटवर धमाल करत होते.

‘झुंबा डान्स’ हा हॅपी स्ट्रीटवरचा सर्वाधिक हीट कार्यक्रम ठरला. स्टेजवरच्या मार्गदर्शकांकडे पाहत विविध गाण्यांच्या तालावर नाचण्याचा आनंद अनेकांनी घेतला. ड्रम सर्कलवर अनेकांनी पहिल्यांदाच ड्रम वाजविण्याचा आनंद घेतला. लाइव्ह स्टेजवर उत्तम बँडसह सर्वांसमोर विविध प्रकारची गाणी सादर करण्याची संधीही अनेकांनी आवर्जून साधली. छोट्या सायकल घेऊन मुले मनसोक्त फिरत होती. मोठ्यांनी मोठ्या सायकलवर फिरण्याचा आनंद घेतला. स्केटबोर्ड आणि वेव्हबोर्डवर फिरणारी मुले या स्ट्रीटवर दिसून येत होती. ‘जोर लगाके हैया’ म्हणत ज्येष्ठांबरोबरच लहान मुलांनीही रस्सीखेचचा आनंद लुटला. ध्यानधारणा आणि योगासनांचा योगही अनेकांनी साधला. वैयक्तिक आणि जोडीनेही दोरीच्या उड्या मारणे, सापशिडी, संगीतखुर्ची असे खेळही येथे रंगात आले होते. ई कचरा गोळा करण्याऱ्या स्टॉलला आणि वंचित मुलांसाठी जुनी पण चांगली खेळणी दान करण्याच्या स्टॉललाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांना करावा लागतोय दहशतीचा सामना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राजकीय पक्षांकडून उमेदवारी निश्चित न केल्याचे दुष्परिणाम शहरात दिसू लागले आहेत. उपनगरांतील काही प्रभागामध्ये दादागिरी, दहशतीचे प्रकार घडत आहेत. इच्छुकांना प्रचारासाठी फिरू न देण्याच्या घटना वाढू लागल्या असून, त्यासाठी स्थानिक गुन्हेगारांकडून दहशत पसरवली जात आहे. इच्छुकांना आपले भित्तीपत्रकेही मध्यरात्री, पहाटे चिकटवावी लागत आहेत. त्यांनी चिकटवलेली पत्रके फाडून टाकण्याचे प्रकार घडत आहेत.

महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली असून, येत्या २७ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. युती आणि आघाडीच्या चर्चा झडत आहेत. ज्या इच्छुकांना (विद्यमान माननीय) उमेदवारी मिळणार आहे, याची कल्पना आहे, त्यांच्याकडून प्रतिस्पर्ध्यांवर या ना त्या कारणाने कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. उपनगरातील काही प्रभागांमध्ये तर प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रभागांमध्ये प्रचारासाठी फिरू दिले जात नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

माननीयांचा ‘कोअर एरिया’ असलेल्या भागात विरोधकांना प्रचारासाठी पोहोचता येत नाही. या इच्छुकांना पत्रके वाटण्यासाठीही घरोघरी फिरता येत नाही. पत्रकांचे वाटप करणारी मुले सोसायटीतील लेटर बॉक्समध्ये पत्रक टाकतात आणि तत्काळ गायब होतात. घरोघरी प्रचार करण्यास गेले तर स्थानिक गुंडांच्या दहशतीचा सामना करावा लागत असल्याचे प्रकार घडत आहेत.

गुन्हेगारांच्या वावरामुळे तसेच ते राहत असलेल्या भागांमध्ये तर त्यांच्या परवानगीशिवाय प्रचार करणेही अवघड झाले आहे. प्रचारासाठी कोणी आले तर या गुन्हेगारांच्या साथीदारांकडून प्रचाराला फिरायचे नाही, कोणाच्याही घरी जायचे नाही, असे निरोप फिरू लागले आहेत. प्रभाग मोठा असल्याने उमेदवारांकडून उर्वरित भागात प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर, प्रचाराच्या धामधुमीत कोणाशी वाद नको असल्याने या गुंडशाहीचे फावत असल्याच्या प्रतिक्रिया काही इच्छुकांकडून व्यक्त होत आहेत.

पोलिसांनी गोपनीय माहिती काढून अशा माननीयांच्या बंदोबस्तासाठी सक्षम यंत्रणा उभी करणे गरजेचे बनले आहे. केवळ तक्रार आल्यानंतर कारवाई करू अशी भूमिका घेतली तर निकोप वातावरणात निवडणुका होणार नाही, अशी स्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images