Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गल्लीबोळांत धूम ‘होम मिनिस्टर’ची

0
0

इच्छुक उमेदवारांकडून बक्षिसांची खैरात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असले तरी उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसली तरी, विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आपापल्या प्रभागातील महिला मतदारांना आकर्षित कऱण्यासाठी त्यांच्यासाठी लकी ड्रॉ, सौभाग्यवती, होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा आदी स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना दुचाकीपासून घरगुती वापराच्या वस्तू बक्षीसरूपाने भेट देण्याची अहमहमिका लागली आहे.
शहरात निवडणुकीचे वातावरण रंगू लागले आहे. आघाडी, युती काहीही झाली तरी, उमेदवारी मात्र आपल्यालाच मिळाली पाहिजे यासाठी इच्छुकांच्या भाऊगर्दी, मोर्चेबांधणी आणि वशिलेबाजीला ऊत येऊ लागला आहे. शहराच्या विविध प्रभागातील विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनी मतदारांवर छाप पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या शिवाय कार्यअहवाल पोहोचविण्याची मोहिमही हाती घेण्यात आली आहे. तसेच, थेट मतदारांपर्यंत उमेदवार आणि त्याचे चिन्ह पोहोचविण्यासाठी विविध कल्पना लढविल्या जात आहेत.
मतदारांना विशेषतः महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसह विद्यमान नगरसेवकांनी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. लकी ड्रॉ, पैठणींचा खेळ, सौभाग्यवती, होम मिनिस्टर आदी स्पर्धा भरविल्या आहेत. मनोरंजनासाठी काही कलाकारांनाही आमंत्रित करण्यात येत आहे. त्यामुळे प्रचाराचा वेगळा माहोलच शहरात तयार होत असल्याचे दिसू लागले आहे. विजयी स्पर्धकांना दुचाकी, वॉशिंग मशीन, प्रेशर कुकर, मिक्सर, वॉटर फिल्टर, सोन्याचे नेकलेस, फ्रीज, एलसीडी टीव्ही, मोबाइल, शिलाई मशिन, पैठणी, घरगुती वापराची भांडी, ओव्हन आदी बक्षिसे देण्यात येत आहेत. या स्पर्धांतून मतदार महिलांच्या कलागुणांना वाव देण्याच्या नावाखाली प्रचार करण्याचा उद्देश आहे.
आपल्या प्रभागातील विविध चौकाचौकांत स्पर्धा, कार्यक्रमांच्या जाहिरातींचे फलक आता झळकू लागले आहेत. त्यावरून मतदारांपर्यंत संदेशही पोहोचविले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हडपसर दंगलीतील तिघांना सशर्त जामीन

0
0

हडपसरमधून बाहेर राहण्याचे हायकोर्टाचे आदेश

मुंबई : हडपसरमध्ये दंगल भडकवल्याचा आरोप असलेल्यांपैकी विजय गंभीरे, गणेश उर्फ रणजीत यादव व अजय लालगे या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. त्याचवेळी या तिघांनी हिंदू राष्ट्र सेना किंवा तत्सम कोणत्याही धार्मिक संघटनेशी संबंध ठेवायचा नाही आणि पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याव्यतिरिक्त हडपसरमध्ये प्रवेश करायचा नाही, अशा अटी कोर्टाने ठेवल्या आहेत.
सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, २ जून २०१४च्या संध्याकाळी हडपसरमध्ये हिंदू राष्ट्र सेनेने एक बैठक घेतली होती. त्यावेळी संघटनेचे धनंजय देसाई यांनी चिथावणीखोर भाषण केले होते. त्यानंतर रात्रीच्या वेळी या तीन आरोपींसह अनेक जण मोटारसायकलींवर हॉकी, बॅट आदींसह फिरू लागले. तेव्हा आयटी कंपनीत काम करणारा मोहसीन शेख हा त्याचा भाऊ व मित्रासह मोटारसायकलवर जात असताना आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. इतर दोघांनी सुटका करून घेतली, तर मोहसीन या जमावाच्या तावडीत सापडला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहसीनला नंतर रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी नंतर या तिघांना ३ व ४ जून रोजी अटक करून त्यांच्याविरुद्ध दंगल व हत्येचा गुन्हा नोंदवला.
‘आरोपी निरपराध असून, हत्येच्या घटनेच्या वेळी ते तिथे नव्हतेच. या प्रकरणात न्यायालयाने यापूर्वी ११ सहआरोपींना जामीन दिलेला आहे. यांचीही तशीच भूमिका होती. त्यामुळे त्यांनाही जामीन द्यावा,’ अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली, तर आरोपींना हॉकी स्टिक, बॅट आदी घेऊन घटनास्थळी जाताना पोलिस व काही साक्षीदारांनी पाहिले होते. त्यामुळे या हत्येत त्यांचा सहभाग असल्याने त्यांना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती अतिरिक्त सरकारी वकील विनोद चाटे यांनी केली. मात्र, ‘दोन्ही बाजू तपासल्यानंतर ही हत्या वैयक्तिक द्वेषातून झालेली नसून, धर्माच्या नावाखालील चिथावणीमुळे झाल्याचे दिसत आहे,’ असे निरीक्षण नोंदवत तसेच आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे लक्षात घेऊन न्या. मृदुला भाटकर यांनी त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. त्यात ४० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेसह एक किंवा दोन जामीनदार द्यायचे, ३१ मार्चपर्यंत प्रत्येक महिन्यात १ व १५ तारखेला पोलिस ठाण्यात हजेरी लावायची, कनिष्ठ न्यायालयाच्या तारखांना हजेरी लावायची, अशा अटीही न्यायालयाने घातल्या. तसेच कोणत्याही अटीचा भंग आरोपींनी केला तर पोलिस जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करू शकतात, अशी मुभाही न्यायमूर्तींनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदुबाला ढेरे यांचे ‌निधन

0
0

पुणे : संत साहित्याचे अभ्यासक व दिवंगत संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या पत्नी इंदुबाला ढेरे (८३) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांच्यामागे प्रसिद्धी कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, वर्षा गजेंद्रगडकर या दोन मुली आणि मुलगा छायाचित्रकार मिलिंद ढेरे असा परिवार आहे. गेल्या महिन्याभरापासून त्या आजारी होत्या. सहकारनगर येथील ‘विदिशा’ या त्यांच्या निवासस्थानीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुरुवातीच्या काळात इंदुबाला स्वत: कविता करायच्या. १९५५ मध्ये डॉ. रा. चिं. ढेरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि मग त्यांनी स्वतःचे लेखन बाजूला सारून ढेरे यांच्या संशोधनाच्या कार्यात त्यांना साथ दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढगाळ हवामानामुळे शहरातील थंडी गायब

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील हवामान ढगाळ झाले असून, मंगळवारी काही ठिकाणी हलकासा शिडकावा झाला. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. पुण्यासह राज्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ असून, तापमानात वाढ झाली आहे.
उत्तरेकडून राज्याकडे थंड आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्याचवेळी पूर्वेकडून बंगालच्या उपसागरावरून असलेल्या वातावरणाच्या वरच्या थरात असलेल्या चक्राकार स्थितीमुळे तेथून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहत होते. त्यामुळे वातावरण ढगाळ राहत होते. आता मात्र, ही स्थिती विरून गेली आहे. त्यामुळे एक ते दोन दिवसात राज्यातील हवामान कोरडे होऊन आकाश निरभ्र होईल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
पुण्यात मंगळवारी २९.५ अंश सेल्सिअस कमाल तर, १४.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. हे किमान तापमान सरासरीपेक्षा चार अंशांनी अधिक होते. राज्यातील सर्वात नीचांकी तापमान विदर्भातील गोंदिया येथे ११ अंश सेल्सिअस नोंदले गेले. नगर येथे १४.८, नाशिक येथे ११.६, जळगाव येथे १३, सांताक्रूझ येथे १६.६, उस्मानाबाद येथे ११.५, नांदेड येथे १६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महामेट्रो’च्या स्थापनेला वेग येण्याची शक्यता

0
0

‘महामेट्रो’च्या स्थापनेला वेग येणार; पुण्याच्या आयुक्तांना स्थान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’च्या (महामेट्रो) औपचारिक स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळावर राज्य सरकारचे पाच प्रतिनिधी नियुक्त करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. सध्याच्या नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह पुणे आणि नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना संचालक मंडळावर स्थान देण्यात आले आहे. सरकारने पाच संचालकांच्या नियुक्तीला मान्यता दिल्याने कंपनी स्थापनेची उर्वरित प्रक्रिया गतीने होऊ शकणार आहे.
मुंबई वगळता राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी एकच कंपनी स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार, पुणे मेट्रोचे कामही महामेट्रोतर्फे होईल असे स्पष्ट करण्यात आले होते. नागपूर मेट्रोची पुनर्स्थापना महामेट्रो अशी करण्याचे राज्य सरकारने निश्चित केले होते. त्या संदर्भातील कंपनीची औपचारिक नोंदणी नुकतीच ‘रजिस्ट्रार ऑफ कंपनीज’कडे करण्यात आली होती. त्यानंतर, कंपनीवरील संचालक मंडळाची पुनर्रचना करण्याचे काम करणे आवश्यक होते. त्यालाही, सरकारने मान्यता दिली असून, अपेक्षेप्रमाणे पुणे महापालिकेच्या आयुक्तांना यामध्ये स्थान मिळाले आहे. राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नागपूर महापालिकेचे आयुक्त या तीन संचालकांसह कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, अशा पाच नावांची निश्चिती संचालक मंडळातर्फे करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकल्प होणार असला तरी, पिंपरीच्या आयुक्तांना संचालकांमध्ये स्थान देण्यात आलेले नाही.
मेट्रोसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या कोणत्याही स्वतंत्र कंपनीचे (एसपीव्ही) अध्यक्षपद केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या मुख्य सचिवांकडे असते. त्यांच्यासह केंद्राच्या विविध विभागातील पाच अन्य संचालकांची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे. ही प्रक्रिया येत्या आठवड्याभरात पूर्ण होण्याची शक्यता असून, कंपनी स्थापनेची औपचारिक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

कंपनी स्थापनेपूर्वीच शहरात मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर विविध स्वरूपाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. संचालक मंडळाची नियुक्ती पूर्ण झाल्यानंतर औपचारिक बैठक घेऊन मेट्रोच्या कामाला, टेंडर प्रक्रियेला अधिक वेग देता येणे शक्य होणार आहे.

कोर्टात शुक्रवारी सुनावणी
मेट्रोच्या नदीपात्रातील मार्गाला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) नुकतीच स्थगिती दिली होती. या स्थगितीच्या विरोधात महापालिकेने सुप्रीम कोर्टात दाद मागितली असून, येत्या शुक्रवारी (२० जानेवारी) त्याची सुनावणी होणार आहे. एनजीटीने २५ जानेवारीपर्यंत मेट्रोच्या नदीपात्रातील मार्गामध्ये कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यास मनाई आदेश दिला आहे. परंतु, शहरात मेट्रो अॅक्ट लागू झाला असल्याचा दावा करून या स्थगिती आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यात आले आहेत.

‘पुणे मेट्रो’साठी नोकरभरती करणार

शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी जिओ-टेक्निकल आणि टोपोग्राफीच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू असताना, आगामी कामांना गती मिळावी, यासाठी आता पुणे मेट्रो प्रकल्पासाठी भरती केली जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात विविध क्षेत्रांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार असून, त्यानंतर आवश्यकतेनुसार अन्य मनुष्यबळ भरण्यात येणार आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक अशा विविध सर्वेक्षणांना गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) या स्वतंत्र कंपनीमार्फत (एसपीव्ही) मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नागपूर मेट्रोसाठी काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच पुणे मेट्रोच्या कामाची जबाबदारी देण्यात आली होती. आता कंपनी स्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम अधिक वेगाने व्हावे, यासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची निर्मिती केली जाणार आहे. मेट्रोच्या व्यवस्थापनासाठी अत्यावशक असलेल्या विविध क्षेत्रांमध्ये सुरुवातीला वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

जनरल मॅनेजर (वित्त), असिस्टंट जनरल मॅनेजर, चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, अॅडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, सिनियर डेप्युटी चीफ मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर यासारखी सुमारे ११ पदे पहिल्या टप्प्यात भरण्यात येणार आहेत. महामेट्रोचे पुण्यातील कार्यालय सध्या कोरेगाव पार्क येथील जागेमध्ये सुरू झाले असून, मेट्रोच्या कामासाठी भविष्यात आणखी मनुष्यबळ नेमण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप गुंडांचा पक्ष; अजित पवारांचा आरोप

0
0

माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गंभीर आरोप

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘भारतीय जनता पक्ष गुंडांचा पक्ष बनला आहे. तडीपार, ‘मोक्का’अंतर्गत नोटिसा, खुनाचा आरोप असणारे आणि खंडणीचे गुन्हे दाखल असलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा एककलमी कार्यक्रम राज्यात चालू आहे,’ असा गंभीर आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केला.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीपूर्वी पत्रकार परिषदेत पवार यांनी भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या. या वेळी महापौर शकुंतला धराडे, पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, पक्षनेत्या मंगला कदम, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, प्रवक्ते योगेश बहल, सुजाता पालांडे, हनुमंत गावडे उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर भाजपमध्ये जाण्यास अनेकांनी सुरुवात केली. त्यानंतर बहुमतासाठी त्यांनी जाणीवपूर्वक आयात कार्यकर्त्यांना स्थान दिले; मात्र त्यांच्या लक्षातच आले नाही, की आपण गुंडांना प्रवेश देत आहोत. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाने निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रवेशाचे समर्थन करताना त्यांच्या नाकी नऊ आले. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजीही ओढवून घेतली. सद्यस्थितीत गुंडांचा पक्ष म्हणून भाजपची प्रतिमा निर्माण होत आहे. तडीपार, ‘मोक्का’अंतर्गत नोटिसा, खुनाच्या आरोपांशी संबंध असणारे, खंडणीचे गुन्हे दाखल असलेल्या कार्यकर्त्यांना भाजप प्रवेश देत आहे. वास्तविक गुंडांच्या बाबतीत सर्वच राजकीय पक्षांनी कडक भूमिका घेण्याची गरज आहे.’

‘तुटेपर्यंत ताणणार नाही’

‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत जातीयवादी पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी समविचारी आणि धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर आघाडी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक आहे, तुटेपर्यंत ताणणार नाही,’ अशी आपली भूमिका असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यासाठी २००४ आणि २००९च्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा जो फॉर्म्युला वापरला त्यानुसार वाटप व्हावे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘पवारांना तुरुंगात पाठवू,’ या खासदार किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘तुरुंगात कधी जाऊ’ असा मार्मिक प्रश्न पवार यांनी विचारला. ‘मी चूक केली असेल तर त्याची किंमत मला मोजावी लागेल,’ असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

.....

‘अरे’ला ‘का रे’ उत्तर

‘पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही चांगली विकासकामे केली आहेत. त्या बळावर पुन्हा बहुमत मिळवू. त्यामुळे कोणी एकटेपणाची भावना बाळगू नये. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही. परंतु, आमच्या वाटेला गेल्यास आम्ही ‘अरे ला का रे’ असे उत्तर देऊ. केवळ बघ्याची भूमिका घेणार नाही,’ असा इशारा अजित पवार यांनी दिला. ‘काही जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना भाजपने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले; मात्र आमच्या पक्षातून भाजपमध्ये गेल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तेच कार्यकर्ते स्वच्छ, पारदर्शक वाटू लागले आहेत. ही भाजपची दुतोंडी भूमिका कितपत योग्य आहे? त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक असते. निवडणुका जवळ आल्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याव्यतिरिक्त एकही मुद्दा त्यांच्याकडे नाही. आरोप करण्यापेक्षा त्यांनी चौकशी करून जनतेसमोर सत्य मांडावे,’ असे आव्हान पवार यांनी दिले.

......

पानसरेंना काय कमी केले?

आझमभाई पानसरे यांच्या भाजपमधील प्रवेशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, ‘त्यांनी आणि मी पक्षात एकत्र काम केले. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुलाखती, जाहीरनामा या प्रक्रियेत ते सोबत होते. अचानक ते भाजपमध्ये का गेले, हे त्यांचे त्यांनाच माहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर काय अन्याय केला ते सांगावे? त्यांना स्थायी समिती अध्यक्ष, पक्षनेता, महापौर ही पदे दिली. पालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही त्यांना स्वीकृत नगरसेवक केले. पक्षाचे शहराध्यक्षपद दिले. विधानसभा, लोकसभेची उमेदवारी दिली. दुर्दैवाने ते पराभूत झाले. त्यानंतर महामंडळाचे अध्यक्षपदही दिले. काँग्रेसमधून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यावर सन्मानाची वागणूक दिली. विधान परिषदेची उमेदवारी दिली असती, तरी त्यांना अपयश आले असते. शिवाय अनिल भोसलेंना दुसऱ्यांदा संधी देण्याचा निर्णय एकमताने झाला. त्यानंतरही पानसरे भाजपमध्ये का गेले? हे त्यांचे त्यांनाच ठाऊक.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या मध्यस्थीने तटकरे कुटुंबीय एकत्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या कुटुंबियांमधील राजकीय वाद पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने मंगळवारी मिटला आहे. पवार यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.

पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवास्थानी तटकरे कुटुंबियांनी त्यांची भेट घेतली. यावेळी सुनील तटकरे यांच्यासमवेत त्यांची मुलगी आदिती, मुलगा अनिकेत आणि पुतणे अवधूत आणि संदीप यांनी सकाळी पवार यांची भेट घेतली. मात्र ‘तटकरे कुटुंबियांमधील वाद त्यांच्या गावीच मिटला आहे. आज सगळे कुटुंबीय एकत्रपणे भेटायला आले होते. एकदिलाने पक्षासाठी ,लोकहितासाठी काम करू, अशी ग्वाही त्यांनी मला दिली आहे. त्यांच्या एकत्र येण्याचे राजकीय परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसतीलच,’ असे राजकीय संकेत पवार यांनी दिले.

सुनील तटकरे यांचे पुतणे आणि आमदार अवधूत तटकरे यांचे भाऊ संदीप यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या रोहा नगरपालिका निवडणुकीत बंडखोरी केली होती. मात्र संदीप तटकरे स्वगृही परतले असल्याने आगामी काळातील सर्व निवडणुकीत त्यांचा फायदा दिसून येईल, असे सांगण्यात येत आहे.

आघाडीबाबत सकारात्मक

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत जातीयवादी पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी समविचारी आणि धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर आघाडी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक आहे, तुटेपर्यंत ताणणार नाही, अशी आपली भूमिका असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यासाठी २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा जो फॉर्म्युला वापरला त्यानुसार वाटप व्हावे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘पवारांना तुरुंगात पाठवू’, या खासदार किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘तुरुंगात कधी जाऊ?’ असा मार्मिक प्रश्न पवार यांनी विचारला. ‘मी चूक केली असेल तर त्याची किंमत मला मोजावी लागेल’, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मावळात सेनेला धक्का, गजानन बाबर भाजपत

0
0

म.टा. प्रतिनिधी, पिंपरी, पुणे

ठाणे, नवी मुंबईतीनंतर आता मावळमधून शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून ३ वेळा नगरसेवक आणि २ वेळा आमदार, खासदार म्हणून निवडून आलेले गजानन बाबर यांनी भाजपत प्रवेश केला आहे. मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप हे नेते उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारी नाकरल्याने बाबर मनसेमध्ये गेले होते. आमदार जगताप यांनी शेकापच्या चिन्हावर मनसेच्या पाठिंब्याने लोकसभा निवडणूक लढवली होती, तेव्हा बाबर जगताप यांच्या बरोबर होते. पण विधानसभा निवडणुकीपूर्वी बाबर मनसेतून बाहेर पडले. तेव्हापासून ते विजनवासात होते. त्यांच्या शिवसेना प्रवेशासाठी मनोहर जोशी आणि इतर नेत्यांनी प्रयत्न केले होते. मात्र, मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी त्याला जोरदार विरोध केला होता.

बाबर यांच्या भाजप प्रवेशासाठी चंद्रकांत पाटील आणि लक्ष्मण जगताप यांनी प्रयत्न केले आहेत. शहरातील व्यापारी आणि अन्य ४० संघटनांचे गजानन बाबर अध्यक्ष आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपद्रवी उदमांजरे अखेर ताब्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लष्कराच्या कडेकोट बंदोबस्तात असलेल्या क्वीन्स गार्डनमधील अप्पर पोलिस महासंचालकाच्या घरात चोरपावलांनी घुसलेल्या दोन उदमांजरांना सापळ्यात पकडण्यात नुकतेच यश आले. गेली सहा महिने या मांजरांनी उच्छाद मांडला होता.

हा उच्छाद कोणी मांडला, हे शोधण्यासाठी ‘सीसीटीव्ही’ बसवण्यात आले होते. मात्र, त्याचा तपास लागत नव्हता. अखेर वनविभागाचे कर्मचारी आणि वेगवेगळ्या प्राणिमित्रांच्या प्रयत्नानंतर ते उदमांजर सापळ्यात अडकल्याने तूर्तास तरी त्याचा उपद्रव थांबला आहे. ‘वाइल्ड लाइफ वेल्फेअर’ असोसिएशन (डब्ल्डूडब्ल्यूए)चे समन्वयक रवी लोहिरे, सुरेश लोहिरे आणि शरद साळुंके यांच्या टीमने या उदमांजरांना सापळ्यात पकडले. पोलिसांच्या वायरलेस विभागाचे प्रमुख अप्पर पोलिस महासंचालक रितेश कुमार हे क्वीन्स गार्डनमध्ये वास्तव्यास आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून बेडरुमच्या खिडकीतून एक प्राणी त्यांच्या घरात येत होता. कित्येकदा फर्निचरच्या मागे लपणे, बाहेर केलेली शिकार घरात आणून खाण्याचाही त्याने प्रयत्न केला होता. हा प्राणी चपळ असल्याने तो घरातील माणसांच्या नकळत खोलीत शिरून धुडगूस घालत होता. यावर मार्ग काढण्यासाठी कुमार यांनी वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाचे कर्मचारी आणि वेगवेगळ्या प्राणिमित्रांनी बंगल्याचा परिसर पिंजून काढला पण ‘चोरा’चा शोध काही लागत नव्हता. काही दिवसांपूर्वी वाइल्ड लाइफ वेल्फेअरच्या स्वयंसेवकांपर्यंत ही माहिती पोहोचली आणि त्यांनी दोन आठवडे प्रयत्न करून या मांजरांचा छडा लावला.

या संदर्भात लोहिरे म्हणाले, ‘क्वीन्स गार्डन परिसरात जैववैविध्य टिकून आहे. आम्ही पकडलेले उदमांजर हे कुमार यांच्या घराला लागून असलेल्या झाडाच्या डोलीत वास्तव्यास होते. साधारणतः ही मांजरे झाडांच्या डोलीतच राहतात. ज्या भागांमध्ये जुनी झाडे आहेत, तिथे ती दिसतात. कुमार यांनी केलेल्या वर्णनानुसार ते उदमांजरच असावे, हे आम्हाला समजले होते.’

लोहिरे म्हणाले, ‘मांजराचा शोध घेण्यासाठी आम्ही सुरुवातीला बेडरूमकडे जाणाऱ्या खिडकीच्या दिशेने कॅमेरे बसवून कोणता प्राणी याचे फुटेज मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, काहीच माहिती मिळाली नाही. अखेर झाडांजवळ पहारा देऊन आम्ही मोबाइलमध्ये त्याचे फोटो मिळविले. पहिल्यांदा पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते कौलांमध्ये लपून पळून गेले. दोन दिवसांपूर्वी पिंजरे लावले होते. सोमवारी रात्री ते पिंजऱ्यात अडकले आणि कुमार यांच्या घरातून आम्हाला फोन आला. विशेष म्हणजे मंगळवारी सकाळी अजून एक मांजर पिंजऱ्यात सापडले आहे. पकडलेली दोन्ही मांजरे ही पूर्ण वाढ झालेली सुदृढ आहेत. त्यामुळे वन विभागाच्या परवानगीनुसार त्याला दुसऱ्या ठिकाणी निसर्गात सोडण्यात येणार आहे.’

घर ब्रिटिशकालीन असल्याने छत आणि आताचे फॉलसिलिंग यामध्ये मोठी फट आहे. त्यामुळे या फटींमध्ये ही मांजरं रोज रात्री संपूर्ण घरात वावरत होती. आमच्या घरच्या कर्मचाऱ्यांनी पकडायचा प्रयत्न केला पण हे मांजर झाडात गेल्यावर गायब होत होते. वन विभाग आणि प्राणिमित्रांना अखेर मांजराला पकडण्यात यश आले आहे, असे कुमार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा साहित्याचा जागर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

युवकांची अभिव्यक्ती प्रकट व्हावी आणि महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या युवकांना व्यासपीठ मिळावे, या दृष्टीने युवक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ व २४ जानेवारी रोजी हे संमेलन, पं. नेहरू सांस्कृतिक भवन येथे रंगणार आहे. युवकांच्या साहित्यकृतींचा गजर या संमेलनातून केला जाणार आहे.

राज्यातील तरुण लेखकांचा सहभाग संमेलनात राहणार असून पुरोगामी विचारांनी प्रेरित होऊन लेखन करणाऱ्या युवा साहित्यिकांना या संमेलनात त्यांच्या साहित्यावर चर्चा करण्याची संधी प्राप्त होणार आहे. ग्रंथदिंडी, चर्चासत्र, परिसंवाद, कविसंमेलन, शाहिरी जलसा असे विविध कार्यक्रम या संमेलनात पार पडणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त युवा कवी वीरा राठोड या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहे. ‘अग्निपंख’ या संस्थेतर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

२३ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, मराठवाडा साहित्य परिषदेचे दगडू लोमटे व कवी येशू पाटील यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर अहमदाबाद येथील छारा समाजातील सामाजिक कार्यकर्ते दक्षिणकुमार बजरंगी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. महापौर प्रशांत जगताप, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, माजी युवा संमेलनाध्यक्ष सचिन परब, संमेलनाध्यक्ष वीरा राठोड यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला असणार आहे. संमेलनात दोन दिवस सोशल मीडिया, माध्यम आणि मराठी भाषा, साहित्य व्यवहार आणि युवक अशा अनेक विषयांवर चर्चासत्र रंगणार आहेत. ज्येष्ठ कवयित्री प्रतिभा इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनही होणार असून त्यात रवी कोरडे, शर्मिष्ठा भोसले, अनिल साबळे, सुनील उबाळे, फोलिक्स डिसुझा, विनायक येवले, वैभव छाया, दिशा केणे, भाग्यश्री मारणे, सुदाम राठोड, अवधूत बागल अशा युवा कवींचा सहभाग असणार आहे.

संमेलनाचे संयोजक हनुमंत पवार म्हणाले, ‘युवकांची अभिव्यक्ती समाजासमोर यावी, या हेतूने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या आयोजनापासून ते प्रत्यक्ष सहभागापर्यंत प्रत्येक कार्यक्रमात युवकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. परिसंवाद आणि कार्यक्रमांचे अध्यक्षपद केवळ ज्येष्ठ साहित्यिकांकडे देण्यात आले आहे. पुरोगामी भूमिका मांडून लेखन करणाऱ्या तरुण लेखकांना अनेकदा हिणवले जाते. त्यांना त्यांचे लेखन सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत नाही. अशा ग्रामीण, कृषी आणि झोपडपट्टीतून आलेल्या लेखकांना संमेलनात संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. संमेलनात शाहीर, कीर्तनकार, चित्रपट दिग्दर्शक यांसह मराठी भाषेच्या अभिव्यक्तीसाठी काम करणाऱ्या तरुणांचा सहभाग असणार आहे.


संमेलनात सहभागी झालेले अनेक तरुण सोशल मीडियावर कायम त्यांचे विचार आणि त्यांनी केलेले लेखन मांडतात. साहित्य व्यवहारात तथाकथित साहित्यिकांनी स्थान दिलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर लिहिले गेलेले साहित्य आणि असे अनेकदा सांगण्यात येते. मात्र, तरुणांच्या दृष्टीने सोशल मीडिया हेच आमचे पुस्तक, दैनिक, दिवाळी अंक आहे.

हनुमंत पवार, संयोजक, युवा मराठी साहित्य संमेलन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण संकल्पना हवेतच

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यंदाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘पर्यावरण’ या संकल्पनेवर आधारित असल्याची घोषणा केली असतानाही महोत्सवात पर्यावरणावर आधारित फक्त सात चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. या चित्रपटांकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने पर्यावरणाची संकल्पना केवळ नावापुरती राहिल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी पार पडलेल्या चित्रपट महोत्सवाच्या समारोपात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढील महोत्सव पर्यावरण या संकल्पनेवर असावा, असा सल्ला आयोजकांना दिला होता. त्याप्रमाणे यंदाचा महोत्सव पर्यावरणावर आधारित ठेवण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला. परंतु, प्रत्यक्ष महोत्सवात आयोजित केलेले सात चित्रपट आणि ‘पिफ बझार’मधील एक राज्य सरकारच्या वन विभागाचा स्टॉल वगळता महोत्सवाचा पर्यावरणाशी संबंध आलेला नाही. शिवाय, जे चित्रपट पर्यावरण विभागांतर्गत निवडण्यात आले आहेत. त्याला फारसे प्रेक्षकही मिळालेले नाही. असे असताना केवळ महोत्सवाचा लोगो पर्यावरणाशी संबंधित ठेवून पर्यावरणाची जनजागृती केली जाणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चित्रपट महोत्सवाबरोबरच सुरू असलेल्या ‘पिफ बझार’मध्येही पर्यावरणासंदर्भात कुठेही चर्चा झाली नाही. त्यामुळे संयोजकांना या महोत्सवाला पर्यावरणपूरक महोत्सवाचे स्वरूप का दिले असावे, हे कळायला मार्ग नाही.


सध्या महोत्सवासाठी निवडण्यात आलेल्या सात चित्रपटांमधून जगातील पर्यावरणाच्या समस्यांविषयी भाष्य केले आहे. मात्र, त्याची जनजागृती होण्यासाठी या चित्रपटांचे अधिकाधिक स्क्रीनिंग केले जाणे गरजेचे होते. शिवाय, महोत्सवात जागतिक आणि स्पर्धेसाठी पात्र असलेल्या चित्रपटांमध्ये एकही चित्रपट पर्यावरणावर भाष्य करत नाही. मग अशा चित्रपट महोत्सवाच्या थीमचा नेमका हेतू कसा साध्य करणार, हा प्रश्न अनेक चित्रपटप्रेमींना पडला आहे. ज्या पर्यावरण विभागात जे सात चित्रपट प्रदर्शित करण्यात येत आहेत, त्याकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने महोत्सवाला गंमत म्हणून पर्यावरणाशी जोडले असल्याचे जाणवत आहे.

पर्यावरणाच्या चित्रपटांसाठी एक वेगळा विभाग केला आहे. त्यामध्ये पर्यावरणाशी संबंधित दर्जेदार चित्रपट आहेत. मात्र, जागतिक चित्रपटांमध्ये आणि स्पर्धा विभागात पर्यावरणाशी संबंधित चित्रपट पात्र होऊ शकले नाही तर त्याला काय करणार? पर्यावरणावरील चित्रपटांना प्रेक्षक जात नाहीत. याला तेच कारणीभूत आहेत.

जब्बार पटेल, मुख्य संयोजक, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसिकांसाठी ‘इन्स्ट्रुमेंटल जर्नी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाद्यवृंदाच्या सुरावटींवर सादर झालेला नव्या व जुन्या हिंदी-मराठी गीतांचा ‘अ‍ॅन इन्स्ट्रुमेंटल जर्नी’ हा अनोखा कार्यक्रम रसिकांची दाद मिळवून गेला.

सूरज दोशी संचालित ‘म्युझिकल डिव्हाइन’ या गिटार व सिंथेसायझर विद्यालयाच्या सुमारे तीस विद्यार्थ्यांचा या वाद्यवृंदात समावेश होता. गिटार, सिंथेसायझर, बासरी या वाद्यांवर सादर झालेल्या ओ. पी. नय्यर, शंकर जयकिशन, आर. डी. बर्मन, बप्पी लाहिरी ते शंकर एहसान लॉय तसेच चिनार-महेश व अजय अतुल यांच्या सैराटमधील गाण्यांनी उपस्थितांना ठेका धरायला लावला.

कार्यक्रमाची संकल्पना विद्यालयाचे संचालक सूरज दोशी यांची होती. प्रतीक भडसावळे, केदार खिरे, अपूर्वा हुंडेकरी, प्रतीक आपटे आदी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली गोलमाल, इव्हिनिंग इन पॅरिस, जो जिता वही सिकंदर, शराबी, तारे जमी पर, अग्निपथ, भूलभुलैय्या अशा गाण्यांच्या प्रभावी सादरीकरणातून उपस्थित रसिकांनी आनंद घेतला. वाद्यवृंदाच्या समूह आविष्कारातून साकारलेल्या टायटन सिंफनीचा आविष्कार विलक्षण होता. राष्ट्रगीताच्या समूह वादनातून देशाच्या सीमा रक्षण करणाऱ्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

ज्येष्ठ वादक अभिजित भदे, विजू मूर्ती, पराग पांडव, सचिन वाघमारे, अनिल करमरकर तसेच धवल चांदवडकर अशा कलावंतांचाही कार्यक्रमात सहभाग होता. ज्येष्ठ संगीत संयोजक विवेक परांजपे यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. संदीप पाटील यांच्या रंजक निवेदनामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर बहरत गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुश्राव्य संगीताची रसिकांना मेजवानी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘माझे जीवनगाणे’, ‘स्वप्नात रंगले मी’, ‘उगवला चंद्र पुनवेचा’, ‘माझे राणी माझे मोगा’, ‘मोहे पनघट पे’, ‘लग जा गले’, ‘अल्ला तेरो नाम’ अशा मराठी आणि हिंदी गीतांचा हार्मोनियम वादनातून झालेला आविष्कार रसिकांना वेड लावून गेला.

‘मास्टर कीज - अ जर्नी ऑफ मेलडीज’ या कार्यक्रमात दीप्ती कुलकर्णी यांच्या हार्मोनियम वादनातून रसिकांना सुश्राव्य वादनाची अनुभूती मिळाली.

एस. एम. जोशी सभागृहात रंगलेल्या या मैफिलीमध्ये पं. संदीप अवचट, हार्मोनियम वादक पं. प्रमोद मराठे, व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे उपस्थित होते. ‘नमन नटवरा विस्मयकारा’ या नांदीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर संगीतकार मिलिंद वासुदेव यांच्या हंसध्वनी रागातील बंदिशी सादर झाल्या. ‘जिवलगा कधी रे येशील तू’, ‘विकत घेतला श्याम’ या गाण्यांच्या सादरीकरणाला रसिकांची दाद मिळाली.

ठसकेबाज लावण्या सादर होताच शिट्ट्यांचा पाऊस पडला. तर, अभंगांनी रसिक भक्तिरसात न्हाऊन निघाले. सुधीर फडके, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, नौशाद, ओ. पी. नय्यर, मदन मोहन, एस. डी. बर्मन, जयदेव, रोशन, आर. डी. बर्मन या संगीतकारांच्या गीतांचे सादरीकरण रंगले. ‘कैवल्याच्या चांदण्यांना’, ‘लागा चुनरी मे दाग’ व ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गाण्यांनी कार्यक्रमाची सांगता झाली. विक्रम भट (तबला), अजय अत्रे (तालवाद्य), प्रसाद जोशी (पखवाज), अनय गाडगीळ (की बोर्ड) यांनी साथसंगत केली. केदार परांजपे यांनी संगीत संयोजन आणि नीलेश यादव यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. श्रीधर कुलकर्णी यांनी सहकार्य केले. श्रेयस बडवे यांनी निवेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीई प्रवेशप्रक्रियेत त्रुटी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राबविण्यात येणाऱ्या प्रवेशप्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचे वय, शाळा प्रवेश स्तर, शाळेची पोच पावती, रहिवाशी पुरावा, शाळेचे अंतर याबाबत त्रुटी असल्याचे राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने मान्य केले आहे. त्यानुसार या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्याची विनंती प्राथमिक शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांना केली आहे. त्यामुळे यावर आता काय निर्णय होतो, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळेत प्रवेशासाठी आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती आणि सविस्तर वेळापत्रक सरकारच्या शालेय विभागाने १० जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. या माहितीमध्ये विद्यार्थ्यांचे वय, शाळा प्रवेश स्तर, शाळेची पोचपावती, रहिवाशी पुरावा, शाळेचे अंतर याबाबत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे आम आदमी पक्षाच्या पालक युनियनने प्राथमिक शिक्षण संचालक नांदेडे यांच्या निदर्शनास काही दिवसांपासून आणून दिले होते. त्यानुसार नांदेडे यांनी या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी नंदकुमार यांना साकडे घतले आहे.
यामध्ये पाल्याचे वय पाच वर्षे आठ महिने असणे गरजेचे असताना ते पाच वर्षे चार महिने देण्यात आले आहे. प्रवेशाचा स्तर हा शाळेचा ‘एन्ट्री पॉइंट’ असताना तो शाळेने ठरवावा अशी माहिती दिली आहे. प्रवेश प्रक्रियेत ग्राह्य धरण्यात येणाऱ्या रहिवाशी पुराव्यांच्या कागदपत्रांमध्ये स्पष्टता नसल्याची आणि तीन किलोमीटर अंतरावरील शाळेला ये-जा करण्याच खर्च हा पालकांनी करावा, हे कायद्याविरोधी असल्याचे युनियनतर्फे समन्वयक मुकुंद किर्दत आणि पालकांनी यांनी नांदेडे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर नांदेडे यांनी या त्रुटींमध्ये दुरुस्ती करुन निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘छंदश्री’ दिवाळी अंक आंतरराष्ट्रीय स्पर्धा यंदापासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात १०६ वर्षांची प्रदीर्घ आणि समृद्ध पंरपरा असलेल्या ‘छंदश्री’ दिवाळी अंकाने आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी दिवाळी अंकाची स्पर्धाच आयोजित केली आहे. स्पर्धेला परदेशात प्रतिसाद मिळत असून महिलांनी प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकालादेखील स्पर्धेत पारितोषिक दिले जाणार आहे.

‘छंदश्री’ दिवाळी अंकाचे संपादक दिनकर शिलेदार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी ‘इन्फ्लक्स ग्रुप’चे शिवाजी चमकिरे उपस्थित होते. शिलेदार म्हणाले, ‘छंदश्री दिवाळी अंकाची सुरुवातीला आंतरराज्य स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. परंतु, स्पर्धेत थेट अमेरिकेतूनच एका दिवाळी अंकाची प्रवेशिका प्राप्त झाली. त्यामुळे ही स्पर्धा आंतरराज्यऐवजी आंतरराष्ट्रीय अशी जाहीर कऱण्यात आली आहे. महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी पहिल्या वर्षापासून दोन विभाग करण्यात आले आहेत. महिलांनी तयार करून प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाला कमलाबाई रसिकलाल धारिवाल हा फिरता पुरस्कार दिला जाईल. त्यामुळे स्त्री आणि पुरुष विभागासाठी दोन फिरत्या ट्रॉफी असणार आहेत,’

उत्कृष्ट दिवाळी अंकासाठी सात वेगवेगळे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार दिले जाणार आहेत. उत्कृष्ट मुखपृष्ठ, उत्कृष्ट व्यंगचित्र, विषयानुसार लेखकांचा समावेश, उत्कृष्ट छपाई, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट कविता, उत्कृष्ट बाल दिवाळी अंक असे पुरस्कार दिले जाणार आहेत. तज्ज्ञांकडून दिवाळी अंकाचे परीक्षण केलेजाणार आहे. छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल ३१ मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे. समारंभात पुरस्कार्थींना गौरविले जाणार आहे. नियम व अटींची पूर्तता करण्यासाठी संबंधितांनी ९८२२०४३६९९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शुल्कवाढीच्या विरोधात संयुक्त आंदोलन

0
0

रिक्षा, टेम्पो, ट्रक संघटनांचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्याच्या परिवहन विभागाने केलेली शुल्क वाढ सरकारने येत्या आठवड्यात मागे घ्यावी, अन्यथा रिक्षा, टेम्पो, ट्रक, बस यांचे संयुक्त आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी पुण्यात आल्यानंतर त्यांची गाडी अडविण्याचा इशारा रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला. तसेच, एवढ्या मोठ्या प्रमाणावर शुल्क वाढ केल्याने केंद्र सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न डॉ. आढाव यांनी उपस्थित केला.
रिक्षा व टेम्पो पंचायतीच्या वतीने आयोजित शुल्क वाढीविरोधातील निषेध सभेत डॉ. आढाव बोलत होते. पूना मोटर गुड्‌स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी राजू खेडेकर, कृष्णाजी मोरे, नगरसेवक रवींद्र माळवदकर, निमंत्रक नितीन पवार, सचिव संपत सुकाळे, हमाल पंचायतीचे उपाध्यक्ष गोरख मेंगडे, पथारी पंचायतीचे सचिव बाळासाहेब मोरे, भाई कात्रे आदी या वेळी उपस्थित होते.
‘नोटाबंदीमुळे सध्या मंदीचे वातावरण असून व्यवहार विस्कटले आहेत. त्यामुळे रिक्षा टेम्पो चालक हवालदिल झाले आहेत. तीन महिन्यांपूर्वी राज्याच्या परिवहन विभागानेही परिवहन शुल्कामध्ये मोठी वाढ केली होती. त्यात आता पुन्हा केंद्राने भरमसाठ दरवाढ केली आहे. हम करेसो कायदा,अशी जर सरकारची भूमिका असेल तर सरकारला धडा दिल्याशिवाय वाहतूकदार राहणार नाहीत,’ असे डॉ. आढाव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सार्वजनिक शौचालयांमध्ये वीज पुरवठा नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून शहरात ३५ हजार वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालये बांधल्याचा दावा महापालिकेच्या वतीने केला जात आहे. मात्र, असे असले तरी बहुतांश सार्वजनिक शौचालयांमध्ये पाण्याच्या टाक्या तसेच पाणी चढविण्यासाठी वीज पुरवठ्याची व्यवस्थाच केली नसल्याचे समोर आले आहे. पालिकेने केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी पुढील काही दिवसांमध्ये केंद्र सरकारचे पथक येणार असल्याने पालिका यंत्रणेची तारांबळ उडाली असून, काही ठिकाणी पालिकेच्या खांबावरून आकडा टाकून वीज घेण्याचे प्रकार सुरू झाले आहे.
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानातंर्गत पुणे शहराला प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळावे, यासाठी महापालिका विशेष प्रयत्नशील आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रशासन किती काम करत आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून पालिकेने ३५ हजार शौचालये बांधली आहेत. तसेच शहरातील विविध भागात असलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत. काही ठिकाणी स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून शौचालयांची उभारणी केली आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. येत्या २६ जानेवारीला ‘पुणे हागणदारी मुक्त शहर’ म्हणून घोषित केले जाणार आहे. देशपातळीवर स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ४ जानेवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत केंद्र सरकारचे अधिकारी याचे परीक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणार आहेत.
.........
समस्या नेमकी काय?
० महापालिकेच्या १४ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्यात आली.
० यापैकी ६०पेक्षा अधिक ठिकाणी असणाऱ्या शौचालयांमध्ये पाण्याच्या टाक्या नाहीत. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी असल्याने ते चढविता येत नाही. पाणी चढविण्यासाठी मोटार बसविण्याची गरज आहे.
० वीजपुरवठा नसल्याने मोटारी बसविल्या जात नाहीत. पर्यायाने पाण्याअभावी ही शौचालये नागरिकांना वापरता येत नाहीत.

०००
शहरातील काही भागातील शौचालयांच्या छतावरील टाक्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. कमी दाबामुळे पाणी टाकीत पडत नाही. या ठिकाणी पाणी चढविण्यासाठी मोटरी बसविल्या जाणार आहेत. काही भागात पालिकेच्या स्ट्रीट लाइटमधून मोटारींसाठी वीज घेण्यात आली आहे.
- सुरेश जगताप, प्रमुख, घनकचरा विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुलेट, स्कॉर्पिओ चोरणाऱ्यांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहर व इतर जिल्ह्यात वाहनचोरीचे गुन्हे करणाऱ्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसह चार जणांस गुन्हे शाखा युनिट तीनने अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन स्कॉर्पिओ, सात बुलेट, तीस इतर दुचाकी असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील एका आरोपीकडून चोरीच्या तब्बल २५ दुचाकी जप्त केल्या आहेत.
अशोक रामनाथ हिंगे (२२, रा. मुंगसेवाडी, ता. पाथर्डी, नगर), सुमित गणेश असवले (२१, रा. वारजेमाळवाडी), महेश नारायण राऊत (२१, रा. वरकुटे बुद्रुक, ता. इंदापूर) आणि धीरज सुरेश लोखंडे (२०, रा. भंडीशेगाव, शाहूचौक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील हिंगे, असवले आणि राऊत हे तिघेजण वाहने चोरून त्या वाहनांची विक्री करत होते. लोखंडे एकटाच वाहनचोरीचे गुन्हे करत होता. त्याच्याकडून २५ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्यावर पूर्वीचे वाहनचोरीचे १२ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील वाहनचोरी, चेनचोरी व इतर मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी युनिट तीनकडून प्रयत्न सुरू होते. त्या वेळी पोलिस कर्मचारी संदीप तळेकर व कल्पेश बनसोडे यांना खबऱ्याकडून तीन आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सीताराम मोरे यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे तपास केला असता शहराबरोबच नगर, सातारा व पुणे जिल्ह्यातून बुलेट व इतर दुचाकी आणि स्कॉर्पिओ चोरल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून तीन स्कॉर्पिओ आणि बारा दुचाकी अशी १५ वाहने जप्त केली.
आरोपी रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या भागात फिरून बुलेटची चोरी करत असत. गाडीचे हँडल लॉक तोडण्यासाठी गाडीवर बसून दोन्ही हाताने हँडल फिरवून बुलेटचे लॉक तोडण्यात येत असे. राऊतचे मोटार ड्राइव्हिंग स्कूल असल्यामुळे तो चोरीच्या गाड्यांची बनावट आरसी बुक तयार करत असे. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे या सर्व गाड्यांची विक्री केली गेली. हिंगे सातवी शिकला असून, असवले बारावीत आहे. राऊत इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.
लोखंडेची माहिती युनिट तीनला मिळाली होती. त्यानुसार सहायक निरीक्षक रवींद्र बाबर यांच्या पथकाने त्याला अटक करून २५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. लोखंडे याने पुणे शहर, सासवड, फलटण, सातारा, पंढरपूर येथून वाहने चोरल्याचे समोर आले आहे. तो डुप्लिकेट चावीने वाहने चोरत होता. त्याच्यावर पुणे शहर व जिल्ह्यात १२ वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.
----
वडिलांच्या उपचारासाठी चोरी
‘अशोक हिंगेच्या वडिलांना लिव्हरचा अजार आहे. तो काम करण्यासाठी पुण्यात आला होता. त्याला सेंट्रिंगच्या कामावर दहा हजार महिना पगार मिळत होता.पण, वडिलांच्या उपचारासाठी त्याला जास्त पैसे हवे होते. त्याची राऊत व असवले यांच्याशी ओळख झाली. राऊत याला त्याने पैशांबाबत विचारले. त्या वेळी त्याने दुचाकी चोरीची आयडिया दिली. एक दुचाकी चोरल्यानंतर तुला २० ते २५ हजार रुपये मिळतील, असे सांगितले. त्यामुळे त्याने दुचाकी चोरी करण्यास सुरुवात केली,’ अशी माहिती पोलिस निरीक्षक सीताराम मोरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्याम देशपांडेंचे डोळे तपासायला हवेत

0
0

आमदार मेधा कुलकर्णींची टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
श्याम देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पदव्यांसोबत त्यांचे डोळेही तपासण्याची वेळ आता आली आहे. विद्यापीठातील गैरव्यवहार थांबवण्याचा मी प्रयत्न करू नये का, असा प्रश्न आमदार मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना केला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबद्दल अपप्रचार व खोटी माहिती देऊन कुलकर्णी या विद्यापीठाची बदनामी करीत आहेत, असा आरोप शिवसेनेने केला होता. त्यामुळे कुलकर्णी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, शहरप्रमुख विनायक निम्हण, शहर संघटक श्याम देशपांडे, संदीप मोरे, गजानन थरकुडे, राजेश पळसकर, उमेश भेलके आदींनी केली होती. त्याला कुलकर्णी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी असल्यामुळेच विद्यापीठाविषयी नितांत आदर आहे. मात्र, विद्यापीठातील काही लोकांच्या गैरकारभारामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलीन होत आहे, याची मला खंत वाटते. त्यामुळे विद्यापीठातील गैरप्रकार सर्वांनी डोळे मिटून पाहावेत आणि हे गैरव्यवहार थांबवण्याचा मी प्रयत्न करू नये, असे शिवसेनेचे मत आहे का?’ असे कुलकर्णी यांनी सांगितले.
कुलकर्णी म्हणाल्या, ‘विद्यापीठातील गैरप्रकाराचे पुरावे माझ्याकडे असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ते घेऊन जावेत. कोणत्याही विषयाला राजकीय वळण देण्याची गरज नाही. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सर्वांना भावनिक करायचे व स्वार्थ साधायचा हे उद्योग आता बंद करावेत. माझ्यासह अनेकांचे अभिमानाचे व आदराचे स्थान असणाऱ्या या विद्यापीठाची प्रतिमा मलीन करू पाहणाऱ्यांविरुद्ध मी आवाज उठवत राहणार आहे.’
.........
निषेध सभेचे आयोजन
कुलकर्णी या विद्यापीठाची सातत्याने बदनामी करीत असल्याची टीका करीत आज (गुरुवारी) दुपारी १२ वाजता विद्यापीठातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याजवळ निषेध सभा होणार आहे. पुणेकर म्हणून आणि विद्यापीठाचे आजी-माजी विद्यार्थी या बदनामीच्या विरोधात एकत्र येऊन निषेध करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निषेध सभेस उपस्थित राहावे, असे आवाहनही शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामेट्रोला हिरवा कंदिल

0
0

दिल्लीतील बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन या स्वतंत्र कंपनीमार्फत (एसपीव्ही) राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यावर येत्या शुक्रवारी (२० जानेवारी) शिक्कामोर्तब होणार आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक शुक्रवारी दिल्लीत होणार असून, त्यात महा-मेट्रोच्या स्थापनेला हिरवा कंदील मिळण्याची दाट चिन्हे आहेत. या वेळी या कंपनीवर केंद्राच्या पाच संचालकांची नियुक्ती जाहीर केली जाण्याची शक्यता असून, त्यामुळे महामेट्रोच्या स्थापनेची औपचारिकता पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

मेट्रोसारखा महत्त्वाचा प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत स्वतंत्र कंपनी स्थापन केली जाते. मुंबई, नागपूरपाठोपाठ पुण्यातही मेट्रो होणार असल्याने प्रत्येक शहरासाठी वेगवेगळी कंपनी स्थापन केली जाते. कंपनीच्या स्थापनेपासून ते विविध परवानग्या आणि प्रक्रिया मिळविण्यात जाणारा वेळ कमी व्हावा म्हणून सर्व शहरांसाठी एकच कंपनी असावी, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्यादृष्टीने, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची पुनर्रचना करून महामेट्रोची स्थापना केली जाणार आहे. या कंपनीवरील संचालक मंडळात राज्य सरकारच्या प्रतिनिधींची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. आता, कंपनीच्या स्थापनेवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक शुक्रवारी सकाळी नवी दिल्लीत होणार आहे. नागपूर मेट्रोचे अध्यक्ष आणि केंद्रीय नगरविकास विभागाचे प्रधान सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. या बैठकीत महामेट्रोच्या स्थापनेवर अंतिम मोहोर उमटविण्यात येणार आहे. तसेच, महामेट्रोवरील केंद्र सरकारच्या पाच संचालकांची नियुक्तीही केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

कामाला वेळ मिळणार

महामेट्रोच्या स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामांना आणखी वेग मिळण्याची शक्यता आहे. तसेच, महामेट्रोच्या नवनियुक्त संचालक मंडळाची पहिली बैठकही कदाचित पुढील आठवड्यात होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या पुणे मेट्रो प्रकल्पासाठी विविध स्वरूपाची सर्वेक्षणे सुरू आहेत. संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर त्यापुढील कामांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू करता येणार आहे. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी मेट्रोचे काम प्रत्यक्ष सुरू करण्याचा मानस महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी यापूर्वीच व्यक्त केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images