Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नागरिकांच्या दारात फिरते पासपोर्ट केंद्र

$
0
0

पुण्याच्या शहरी, ग्रामीण भागात कार्यरत होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अर्ज भरण्यासाठी पासपोर्ट केंद्रात जाण्याऐवजी नागरिकांच्या दारात पासपोर्ट सेवा केंद्र आले तर... पुणे पासपोर्ट केंद्राच्या मोबाईल व्हॅनची अर्थात फिरत्या पासपोर्ट सेवा केंद्राची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाली आहे. पुढील काही दिवसातच पुणे पासपोर्ट विभागातर्फे शहर आणि ग्रामीण भागात मोबाइल पासपोर्ट केंद्र कार्यरत होणार आहे. असा उपक्रम राबविणारे पुणे देशातील पहिले कार्यालय ठरणार आहे.

दिवसेंदिवस वाढत असलेली पासपोर्ट अर्जदारांची संख्या लक्षात घेऊन पुणे पासपोर्ट कार्यालयातर्फे सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. गेल्या दोन वर्षात पासपोर्ट विभागाने अर्ज स्वीकारण्याची दैनंदिन मर्यादा वाढविली आहे. याशिवाय विभागाअंतर्गत येणाऱ्या शहरांमध्ये दर ठरावीक कालावधीनंतर मेळावा घेऊन अर्जदारांची सोय बघितली आहे. या उपक्रमांमुळे पासपोर्टची अपॉइंटमेंट मिळविण्यासाठी लागणारा कालावधी उल्लेखनीय प्रमाणात घटला आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून मोबाइल व्हॅनचा पर्याय निवडण्यात आला आहे.

बारामतीमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या पासपोर्ट मेळाव्यामध्ये विद्या प्रतिष्ठानच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या सहभागातून मोबाइल व्हॅनमध्ये पासपोर्ट अर्ज स्वीकारण्याचा प्रयोग केला. व्हॅनमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्याने तांत्रिकदृष्ट्या पासपोर्ट अर्जाची ऑनलाइन प्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर राबवलेला हा उपक्रम आता व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. अजूनपर्यंत इतर कोणत्याही शहरात मोबाइल पासपोर्ट सेवा केंद्र कार्यरत नाही. त्यामुळे देशातील हा पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे, असे पुणे विभागाचे वरिष्ठ पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी सांगितले.

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे विशेष सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनानुसार गोतसुर्वे यांच्यासह, जतीन पोटे, सुशील गारासे, विराज देशमुख आणि व्हिआयआयटीचे डॉ. अमोल गोजे यांनी मोबाइल व्हॅनचा प्रयोग राबविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नॅक’ची दिशाभूल करून ‘अ’दर्जा

$
0
0

आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचा विद्यापीठावर आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने नॅकला प्राध्यापकांची संख्या, प्राध्यापकांच्या विविध पदव्या आणि शैक्षणिक माहिती चुकीची माहिती देऊन अ दर्जा मिळवला आहे. या प्रकाराकडे नॅकनेही दुर्लक्ष केले आहे,’ असा आरोप आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी सोमवारी पत्रकारपरिषदेत केला.

कुलकर्णी म्हणाल्या,‘ विद्यापीठाने राष्ट्रीय मूल्यांकन अधिस्वीकृती परिषदेला (नॅक) सादर केलेल्या अहवालामध्ये प्राध्यापकांच्या संख्येची आणि त्यांच्या शैक्षणिक अर्हतेची चुकीची माहिती दिली आहे. विद्यापीठाने चुकीच्या माहितीच्या आधारे अ दर्जा मिळविला आहे. विद्यापीठ प्रशासनाचा बोगस कारभार सुरू असून, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. विद्यापीठातील एमटेकसह इतर काही अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याच्या पात्रतेबाबत आणि मान्यतेबाबतही गोंधळ आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच आपण नॅकशी पत्रव्यवहार केला आहे. त्याचे उत्तर काही दिवसात येणे अपेक्षित आहे.’

विद्यापीठातील एमटेक अभ्यासक्रमासाठी यापूर्वी कला आणि वाणिज्य शाखेचेही विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत होते. याबाबत पाठपुरावा केल्यानंतर विद्यापीठाने चुकीची दुरूस्ती केली. विद्यापीठाच्या बहिस्थ विभागाचे कामकाज नियमाप्रमाणे नव्हते. तेथील अभ्यास केंद्र, अभ्यासक्रम याबाबतही सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रश्न मार्गी लागल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले. दरम्यान, देशभरातील मुक्त विद्यापीठांमध्ये २००९ पासून एमफिल आणि पीएचडीला मान्यता देण्याचे बंद झाले होते. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठपुरावा केल्यानंतर ही मान्यता देण्याचा निर्णय झाला आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

मुक्त विद्यापीठातील पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता गरजेची होती. यासाठी पाठपुरावा केल्यानंतर मान्यता गरजेची नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याचप्रमाणे ‘बी-टेक’ अभ्यासक्रमाला ‘एआयसीटीई’ची मान्यता गरजेचे नसल्याचे सांगण्यात आले आहे. विश्वकर्मा क्रिएटिव्ह आय कॉलेजमधील ‘बीएफए’ आणि ‘एमएफए’ या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांबाबत असलेला संभ्रम दूर झाला असून, या अभ्यासक्रमांना ‘एआयसीटीई’च्या मान्यता गरजेची नाही. तसेच, ज्यांनी या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतले आहेत, त्यांच्या पदव्या ग्राह्य धरल्या जातील, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक वाढ म्हणजे सक्षमीकरण नव्हे

$
0
0

सनम अरोरा यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘स्त्रियांचा शिक्षणाचा टक्का वाढला म्हणजे त्यांचे सक्षमीकरण झाले, असे म्हणता येता येणार नाही. शिक्षण हे स्त्री सबलीकरणाच्या दिशेने उचलेले पहिले पाऊल आहे. परंतु, स्त्रियांचे वास्तवात सक्षमीकरण करण्यासाठी त्यांचे प्रथम आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन होणे गरजेचे आहे,’ असे मत लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथील तज्ज्ञ सनम अरोरा यांनी व्यक्त केले.

‘फ्रेंड्स ऑफ ज्ञानेश्वर मुळे’ या मंचाचे उद्घाटन अरोरा यांच्या ‘स्त्री सबलीकरण’ या विषयावरील व्याखानाने झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. ‘बीव्हीजी’ इंडिया ग्रुपच्या संचालिका वैशाली गायकवाड, सीड इन्फोटेकच्या संचालिका भारती बराटे, बडवे इंजिनीअरिंगच्या संचालिका सुप्रिया बडवे, सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख, जयश्री फिरोदीया यांचा परराष्ट्र विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. लीला पूनावाला, श्रीकांत बडवे, मंचाचे समन्वयक सचिन इटकर, विद्या येरवडेकर या वेळी उपस्थित होते.

‘शहरांपेक्षा ग्रामीण भागातील महिलांची अवस्था दयनीय आहे. हक्क, अधिकार, स्वातंत्र्य यापासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. आरोग्याचे, शिक्षणाचे, सामाजिक स्थानाबाबतचे प्रश्न गंभीर आहेत,’ याकडे लक्ष वेधून अरोरा म्हणाल्या, ‘ग्रामीण भागात रुग्णालये मोठ्या प्रमाणावर उभी करणे शक्य होत नसेल, तरी महिलांना आरोग्याचे धडे दिल्यास तेथील आरोग्याचे अनेक प्रश्न मिटतील. जन्माच्या पहिल्या दिवसापासून मुलीवर स्त्रीपण लादले जाते. स्त्री देखील एक मनुष्य आहे, तिला देखील आशा आकांक्षा आहेत हे न पाहता तू केवळ लग्न कर आणि ज्या घरी लग्न करून जाशील त्या घरातील नाते जप, अशी शिकवण तिला दिली जाते. ही मानसिकता बदलावी लागेल.’

‘स्त्रियांमधील क्षमता देशाच्या विकासात लावली, तर भारत अधिक गतीने प्रगती करेल. आजचा युवक भारतातील समस्यांनी त्रस्त होऊन परदेशी स्थायिक होण्याचे स्वप्न पाहतो. परंतु, हा समस्यांपासून पळण्याचा स्वभाव असून आपण भारतीयांनी देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिले पाहिजे, ही भावना युवकांमध्ये जागृत करण्याची गरज आहे,’ अशी अपेक्षा मुळे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडूंसाठी वेब पोर्टल

$
0
0

गुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न; क्रीडामंत्री गोयल यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देशातील खेळाडूंना आणि त्यांच्या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा मंत्रालयाद्वारे नावीन्यपूर्ण स्पोर्ट टॅलेंट सर्च वेब पोर्टल तयार केले असून त्याचे उद्घाटन लवकर करण्यात येईल. या वेब पोर्टलवर खेळाडूंना त्यांची सविस्तर माहिती टाकता येणार आहे,’ अशी माहिती केंद्रीय क्रीडा आणि युवक मंत्री विजय गोयल यांनी मंगळवारी दिली. युवक-युवतींनी केवळ राजकारणाचा विचार न करता इतर क्षेत्रांचा देखील तेवढाच विचार केला पाहिजे. फळाची अपेक्षा न करता मेहनतीने काम करण्यात सातत्य राखले पाहिजे, असेही गोयल यांनी सांगितले.

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित (एमआयटी-एसओजी) हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग असणाऱ्या तीन दिवसीय सातव्या भारतीय छात्र संसदेचे (बीसीएस) उद्‍‍घाटन मान्यवरांच्या हस्ते घंटानाद करून करण्यात आले. या वेळी गोयल बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, खासदार अॅड. वंदना चव्हाण, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, माइर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, डॉ. मंगेश कराड, ‘मिटसॉग’च्या सहकारी संचालक शैलाश्री हरिदास, ‘मिटसॉम’च्या संचालिका डॉ. सायली गणकर, प्राचार्य डॉ. रवी चिटणीस आदी उपस्थित होते. गोयल यांच्या हस्ते अॅड. चव्हाण यांना गार्गी पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना काही दिवसांनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

गोयल म्हणाले, ‘देशातील बहुतांश खेळाडूंना त्यांची कला दाखवण्याची फारशी संधी मिळत नाही. त्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या खेळांडूंसाठी एक नावीन्यपूर्ण वेब पोर्टल तयार करण्याचे ठरवले. मंत्रालयाने गेल्या सहा महिन्यांत अथक प्रयत्न करून हे पोर्टल तयार केले आहे. त्यामध्ये कोणत्याही खेळाडूला त्याच्याविषयी आणि तो खेळणाऱ्या खेळाविषयी माहिती टाकता येईल. त्याला ही माहिती छायाचित्र व चित्रफितीद्वारे अपलोड करता येईल. तसेच, त्याला मिळणाऱ्या चांगल्या-वाईट सोयीसुविधांची माहितीही अपलोड करता येईल. या माहितीची योग्य ती दखल ‘स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया’कडून घेऊन कारवाई करण्यात येईल. पोर्टलचे उद्घाटन येत्या काही दिवसांत करण्यात येईल.’

अॅड .चव्हाण म्हणाल्या, ‘फक्त राजकारणात सहभागी झाल्यानेच देशातील प्रश्न सुटतील असे नाही. त्यामुळे आपण प्रत्येक क्षेत्रात चांगल्या कामाने देशाच्या उभारणीत उत्तम काम करू शकतो. डॉ. विजय भटकर याचे उत्तम उदाहरण आहे. देशातील समस्यांचे स्वरूप बदलत आहे. देशात महिला आणि मुली सुरक्षित नाहीत. अशावेळी त्या समस्या सोडविण्यासाठी आणि महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी युवकांनी समोर येण्याची गरज आहे.’

जगताप म्हणाले, ‘राजकारणात येण्यासाठी पैसे आणि राजकीय पाठबळ लागते असे नाही. याचे उदाहरण मी स्वतः आहे. मला कोणत्याही प्रकारचे राजकीय पाठबळ नसताना केवळ चांगल्या लोकांच्या सहवासात आल्यानेच तरुण वयात पुण्याचा महापौर झालो. त्यामुळे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांनी राजकारणात यावे.’ प्रा. कराड यांनी भारतीय छात्र संसदेची माहिती सांगून प्रास्ताविक केले. डॉ. भटकर, डॉ. कराड यांनी मनोगत व्यक्त केले. नीलम शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.

‘समाजकार्यात लक्ष द्या’

‘राजकारणात येऊन काम करण्याची इच्छा असणाऱ्यांनी केवळ आमदार, खासदार होण्याचे स्वप्न न पाहता सामाजिक कामांमध्ये गुंतवून घेतले पाहिजे. त्यासाठी सामाजिक संघटनाची उभारणी केली पाहिजे अथवा संघटनेत सहभागी झाले पाहिजे. यशा-अपयशाची अपेक्षा न करता मेहनतीने काम करण्यात सातत्य राखले पाहिजे,’ असे गोयल यांनी सांगून आपला राजकीय जीवनप्रवास उलगडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आमदार कुलकर्णींकडून विद्यापीठाची बदनामी’

$
0
0

शिवसेनेचा आरोप; कारवाईची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबद्दल अपप्रचार व खोटी माहिती देऊन आमदार मेधा कुलकर्णी या विद्यापीठाची सातत्याने बदनामी करीत आहेत, असा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे कुलकर्णी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

राज्यपाल, तसेच विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेचे पुणे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, शहरप्रमुख विनायक निम्हण, शहर संघटक श्याम देशपांडे, संदीप मोरे, गजानन थरकुडे, राजेश पळसकर, उमेश भेलके आदींनी ही मागणी केली आहे.

‘देश विदेशातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’ असल्याचे आकर्षण कायम आहे. आतापर्यंत लाखो विद्यार्थी येथे शिक्षण घेऊन देश व परदेशात विविध महत्त्वाच्या पदांवर यशस्वीपणे काम करत आहेत. ‘टाइम्स हायर एज्युकेशन’ या जागतिक नामवंत संस्थेने पुणे विद्यापीठाला देशातील दुसरे स्थान दिलेले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात विद्यापीठाबद्दल गौरोद्गार काढले होते. असे असताना कुलकर्णी यांनी विद्यापीठाची बदनामी करून मानव विकास मंत्रालय आणि कुलगुरूंची नेमणूक करणाऱ्या कुलपती यांच्या प्रमाणिकपणाबद्दल शंका घेतली आहे,’ असे निवेदनाद्वारे सांगितले आहे.

दरम्यान, कुलकर्णी या विद्यापीठाची सातत्याने बदनामी करीत असल्याच्या निषेधार्थ उद्या, गुरुवारी दुपारी १२ वाजता विद्यापीठातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याजवळ निषेध सभा होणार आहे. पुणेकर म्हणून आणि विद्यापीठाचे आजी-माजी विद्यार्थी या बदनामीच्या विरोधात एकत्र येऊन निषेध करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निषेध सभेस उपस्थित राहावे, असे आवाहनही शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृत नाट्य स्पर्धा सुरू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
संस्कृतमधील अस्खलित संवाद... प्राचीन वेशभूषा... संस्कृतमधील संवादाला साजेसा अभिनय... अशा मिलाफातून प्राचीन नाटकांचा रस्वास्वाद घेण्याची संधी नाट्यवेड्या रसिकांना व संस्कृतप्रेमींना मिळत आहे. तरुण रंगकर्मी संस्कृत नाटकांना नवसंजीवनी देत आहेत. निमित्त आहे राज्य हौशी संस्कृत नाट्य स्पर्धेचे.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ५६ व्या राज्य हौशी संस्कृत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला सोमवारपासून सुरुवात झाली. भरत नाट्य मंदिर येथे २० जानेवारीपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ संस्कृत तज्ज्ञ वर्षा सारडा, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहायक संचालिका अमिता तळेकर व स्पर्धेचे समन्वयक भरत डाके उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये सोमवारी गार्हस्थ्योपनिषद, बालका: वयम, अरण्यरूदन, विशंतिचक्रयोग: या संस्कृत नाटिका सादर झाल्या. मंगळवारी उदकशांन्ति, एकक संव:, प्रात: काले भानू वासरे, देवशुनी या नाटिकांचे सादरीकरण झाले. पुढील तीन दिवसांत उमायनम, अत्र मूल्यर्विलज्जित, भ्रमप्रमादौ देयादेयो, बिंदू संदेश:, पादत्राणहीन:, महाभारत बिटाविन द लाइन, बंधवर्धनम, आलेख, सज्जीवन समाधी, अद्यतन साक्षात उपहार:, ओम मंगलम आणि चरैवेति चरैवेति या नाटकांचा आस्वाद घेता येणार आहे. दिवसभर रंगणारा हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.



संस्कृत भाषेचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. संस्कृत भाषेसाठी काम करणारे भरपूर लोक आहेत. त्यातील प्रत्येक जण त्या-त्या क्षेत्रात काम करून संस्कृतची सेवा करीत आहेत. पण, आता स्वतंत्रपणे संस्कृतच्या क्षेत्रामध्ये परिश्रम घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नाटकांना मिळणारा प्रतिसाद आश्वासक आहे.
- वर्षा सारडा, ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तौफिक कुरेशी यांना मधुरिता सारंग सन्मान

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट‍्सतर्फे देण्यात येणारा मधुरिता सारंग सन्मान ख्यातनाम तालवादक उस्ताद तौफिक कुरेशी यांना जाहीर झाला आहे. १९ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. प्रख्यात हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. संस्थेच्या संचालक अर्चना संजय यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
कथक नृत्यगुरू पं. राजेंद्र गंगाणी आणि उस्ताद तौफिक कुरेशी यांची एकल आणि युगल प्रस्तुती हे या कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे. याच समारंभात कलाविषयक ‘कलात्म’ या त्रैमासिकाचे प्रकाशन पं. गंगाणी यांच्या हस्ते होणार आहे. ‘अभिव्यक्ती’ हे या पहिल्या अंकाचे सूत्र असून, प्रख्यात अभिनेते डॉ श्रीराम लागू ‘कलात्म’चे संस्थापक सल्लागार संपादक आहेत.
२० जानेवारी रोजी देशभरातील उद्योन्मुख कलावंतांची कथक प्रस्तुती सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. युवा प्रतिभेला संधी देण्याचा हा प्रयत्न आहे. दोन्ही कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत. यापूर्वी पं. रोणू मुजुमदार, पं. सुरेश तळवलकर, पं. राजेंद्र गंगाणी, डॉ. प्रभा अत्रे, पं. कुमार बोस अशा कलावंतांना मधुरिता सारंग सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणुसकी हा जगण्याचा अविभाज्य भाग : धर्मेंद्र

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, येरवडा
‘चित्रपटसृष्टीत कोणीही, कितीही मोठा स्टार असला तरी त्याच्याकडे माणुसकी असणे महत्त्वाचे आहे. माणुसकी नसलेला अभिनेता हा स्टार बनू शकत नाही. माणुसकी हा जगण्याचा अविभाज्य भाग असायला हवा. कारण माणसावर प्रेम करणे हाच माणुसकीचा धर्म आहे. पण, अलीकडच्या काळात आपण माणुसकीची शिकवण विसरत आहोत. त्याच भावनेने आज माझ्याशी लाखो चाहते जोडले गेले आहेत,’ अशा भावना ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी व्यक्त केली.
युएसके फाउंडेशनतर्फे भारतीय चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल धर्मेंद्र यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विमाननगर येथील हयात रिजेन्सी या पंचतारांकित हॉटेलमध्ये सोमवारी हा पुरस्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी आदित्य बिर्ला सेंटर फॉर कम्युनिटी इनिशिएटिव्ह अँड रूरल डेव्हलपमेंटच्या चेअरपर्सन राजश्री बिर्ला, अॅक्सिस बॅँकेच्या सह्योगी उपाध्यक्षा अमृता फडणवीस, खासदार संजय काकडे, संयोजिका डॉ. उषा काकडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना ‘ऊर्जा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये लेखन आणि साहित्यातील योगदानाबद्दल प्रसिद्ध लेखक चेतन भगत, नाट्य-चित्रपटसृष्टीतील कार्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा, संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल पंडित शिवकुमार शर्मा यांच्या वतीने दिलीप काळे, ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या बडोदा संस्थानच्या राधिका राजे, अभिनेत्री रविना टंडन, शिक्षण क्षेत्रासाठी डॉ. विश्वजित कदम, आरोग्य क्षेत्रासाठी रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेझ ग्रांट, उद्योजक अजिंक्य फिरोदिया, युवा उद्योजिका अनन्या बिर्ला आणि टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी हुतात्मा सौरभ फराटे यांना प्रदान करण्यात आलेला ‘शौर्य पुरस्कार’ त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला.
जीवन गौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर धर्मेंद्र म्हणाले, ‘आपण सगळे माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. चांगले माणूस होणे गरजेचे आहे. माणुसकीची शिकवण आत्मसात करीत चांगला माणूस बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यातून यशस्वी व्यक्तिमत्त्व घडत जाते. माझ्या कारकीर्दीत आणि आयुष्यात पुण्याने मला ही माणुसकीची भावना दिली आहे. पुणे हे माझे आवडते शहर आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने पुण्यात येण्याचा प्रयत्न करीत असतो.’
या वेळी पुरस्कार मिळालेले रविना टंडन, चेतन भगत, राधिकाराजे गायकवाड, डॉ. विश्वजित कदम, प्रार्थना ठोंबरे, डॉ. परवेझ ग्रांट यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय काकडे यांनी केले. सूत्रसंचालन योगिनी गांधी यांनी केले.


‘दारू प्यायलो नाही’
‘पुणे शहरात जीवन गौरव पुरस्कार मिळणार आहे, हे समजल्यावर कार्यक्रमासाठी येणार असल्याचा होकार दिला. पण, काही दिवसांपूर्वी मला अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तब्येत खालावली आहे. त्यामुळे चालताना मदत घ्यावी लागते. हे पाहिल्यावर मी दारू पिऊन तर आलो नाही ना, असा प्रश्न पडला असेल. मात्र, मी दारू प्यायलो नाही,’ असे धर्मेंद्र यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. या वेळी धर्मेंद्र यांनी केलेल्या ‘एक होती है तारीफ अहमियतकी, इन्सानियत कि लेकिन कदर होती है’ या शायरीला उत्स्फूर्त दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डागर यांना ‘दाजीकाका गाडगीळ’ पुरस्कार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ आणि व्हायोलिन अकादमीच्या वतीने आयोजित तीन दिवसीय ‘स्वरझंकार’ महोत्सव नुकताच रसिकांच्या तुडुंब प्रतिसादात पार पडला. गायिका कौशिकी चक्रवर्ती, संतूरवादक राहुल शर्मा यांसारख्या युवा कलाकारांसह तबला वादक पं. कुमार बोस, शहनाईवादक पं. दयाशंकर यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांच्या उत्तम सादरीकरणास या वेळी पुणेकरांची भरभरून दाद मिळाली.
या वेळी धृपद गायकीतील अध्वर्यू प्रख्यात गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचा ज्येष्ठ गायक उस्ताद राशीद खाँ यांच्या हस्ते ‘रसिकाग्रणी दाजीकाका गाडगीळ’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी डागर यांच्या पत्नी रेहाना डागर, पीएनजी ज्वेलर्सचे पराग गाडगीळ, ज्येष्ठ व्हायोलिन वादक पं. अतुलकुमार उपाध्ये आणि ‘एसबीआय’चे महापात्रा मंचावर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सिंहगड घेऱ्यात घरफोड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अवघ्या दोन दिवसांत सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आनंदवन या फार्महाउस सोसायटीतील चार ते पाच फार्महाउस चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील दोन फार्महाउसचे मालक परदेशी असल्यामुळे काय-काय चोरीला गेले, हे समजू शकलेले नाही. या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात एका ठिकाणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंहगडाच्या पायथ्याजवळ सिंहगड घेरा परिसरातात आनंदवन सोसायटीत फार्महाउस आहेत. या घरांचा वीकेंड होम किंवा सुट्ट्यांपुरता वापर होतो. या ठिकाणी फक्त सुरक्षारक्षक असतात. ११ व १२ जानेवारी दरम्यान या फार्महाउस सोसायटीत चार ते पाच घरफोड्या करण्यात आल्या. चोरट्यांनी घरांची कुलूपे किंवा लॅच तोडून आत उलथापालथ केली आहे. कपडे किंवा अन्य वस्तू फेकल्या आहेत. घरातील ओव्हन, डीव्हीडी, टीव्हीसारख्या वस्तू चोरून नेल्या आहेत. चोरीनंतर जवळच्याच झाडाखाली काही दारूच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ सापडले. स्पार्की नावाचा पाळीव कुत्राही चोरीनंतर गायब आहे. घरफोड्यांचे सत्र थांबत नसल्याने येथील रहिवासी धास्तावले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी घरफोडी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका फार्महाउसमधून नऊशे रुपयांचे साहित्य व नळ चोरीला गेले आहेत. त्याचा तपास सुरू असल्याचे हवेली पोलिसांनी सांगतिले.

आतापर्यंत २५-३० घरफोड्या
दोन वर्षांपासून आतापर्यंत या परिसरात २५ ते ३० घरफोड्या झाल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी येथे मोठ्या प्रमाणावर चोरी झाली होती. चोरट्यांनी टीव्ही, फ्रीज अशा महागड्या वस्तू चोरून नेल्या होत्या. त्या वेळी चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते. त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत होते. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत त्या चोरीचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले होते. पण, त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही, अशी माहिती सोसायटीतील रहिवाशांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​दहा कोटींची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कंपनीत केलेल्या गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना आर्थिक गुन्हे पथकाने अटक केली. सात वर्षांत या आरोपींनी पुण्यातील तब्बल तीनशे नागरिकांची साडेदहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
अजय माधव प्रभुदेसाई (वय ४२, रा. कात्रज) आणि अमोल चंद्रकांत शहा (वय ३८, रा. ससाणेनगर, हडपसर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यातील मुख्य आरोपी राजेश दिनकर कांबळे
आणि त्याची पत्नी विद्या राजेश कांबळे हे दोघे फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. २०१९ ते २०१६ दरम्यान ही घटना घडली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा परदेशात पळून गेला आहे. तर, त्याची पत्नी येथेच असून तिचा पोलिसांकडून शोध घेतला
जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश आणि विद्या कांबळे यांनी साथीदार अजय प्रभुदेसाई आणि अमोल शहा यांच्या मदतीने कोंढवा परिसरात ‘इव्हॉल्व्ह कन्सल्टन्सी’ नावाची कंपनी सुरू केली. कंपनीत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला गुंतवलेल्या रकमेवर पाच टक्के अधिक परतावा मिळेल, असे नागरिकांना आमिष दाखविले. त्यानुसार कोंढवा परिसरासह शहरातील २५० ते ३०० नागरिकांकडून त्यांनी कोट्यवधी रुपये घेतले. ग्राहकांना विश्वास बसण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला त्यांना परतावा दिला. मात्र, गुंतवणुकदारांची संख्या वाढल्यावर परतावा देण्यास नकार देऊन आरोपी पळून गेले. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना प्रभुदेसाई आणि शहा हे दोघे कोंढवा व बिबवेवाडी परिसरात राहत असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास कोळी व कर्मचारी विकास कोळी, संतोष गणबोटे यांच्या पथकाने के. के. मार्केट परिसरात सापळा रचून शहा याला अटक केली. त्याच्या मदतीने प्रभुदेसाई यालाही पोलिसांनी अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘डेमू’ची चाचणी यशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/दौंड

चेन्नई येथून रेल्वेच्या पुणे विभागात दाखल झालेल्या नव्या कोऱ्या ‘डेमू’ची (डिझेल मल्टीपल युनिट) ‘ट्रायल रन’ पुणे-दौंड मार्गावर मंगळवारी यशस्वीपणे पार पडली. सकाळी सात वाजून ३७ मिनिटांनी पुण्याहून सुटलेली गाडी दौंडला जाऊन पुन्हा पुण्यात दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी दाखल झाली. या चाचणीनंतर उपनगरीय सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आणखी बळावली आहे.

पुणे-दौंड मार्गावर उपनगरीय प्रवासी सेवा सुरू करण्याची गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली चर्चा आता पूर्णत्वास येण्याची चिन्हे आहेत. बहुप्रतीक्षेनंतर पुणे-दौंड मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. या कामाची रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी पाहणी करून सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला. मात्र, या मार्गावर लोकलची (इमू- इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) सेवा सुरू करण्यासाठी अनेक अडथळे असल्याने, लोकलचे स्वप्न लगेच साकार होणार नसल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर रेल्वे बोर्डाकडून उपलब्ध झालेल्या ‘डेमू’मुळे उपनगरीय प्रवासी सेवेच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
पुणे स्टेशनवरून सकाळी सात वाजून ३७ मिनिटांनी सुटलेली ‘डेमू’ दौंड जंक्शनला नऊ वाजून ५० मिनिटांनी पोहोचली. तर, तेथून १० वाजून २० मिनिटांनी सुटल्यानंतर सव्वाबारा वाजता पुण्यात पोहोचली. साधारणपणे पॅसेंजर गाडीला हे अंतर कापण्यासाठी दीड ते पावणे दोन दोन तासांचा अवधी लागतो. एक्स्प्रेस गाडीला एक ते सव्वातास लागतात. त्यातुलनेत ‘डेमू’ने प्रत्येक स्टेशनचा थांबा घेतल्याने वेळ वाढला.
‘डेमू’ ही गाडी ‘इमू’ सारखीच आहेत. फक्त ‘इमू’ इलेक्ट्रिकवर चालते आणि ‘डेमू’ डिझेलवर चालते. यामध्ये ‘इमू’च्या एका कोचला दोन्ही बाजूचे मिळून चार दरवाजे असतात. तर, ‘डेमू’ला दोन दरवाजे आहे. या दोन्ही गाड्यांना दोन टोकांना इंजिन आहे.

प्रत्येक कोचमध्ये बायोटॉयलेटचा समावेश
पंख्यांची उपलब्धता
चढ-उतारासाठी पायऱ्या व दाराला दोन हॅण्डल
खिडक्यांना अॅडजस्टेबल काचा
प्रत्येक कोचमध्ये माहिती फलक व लाउड स्पीकर
दोन्ही बाजूच्या इंजिनच्या शेजारील डबा महिला प्रवाशांसाठी राखीव
एका डब्यात १०८ प्रवासी बसण्याची व १३० उभे राहण्याची क्षमता आहे.
माल घेऊन प्रवास करणाऱ्या व्यावसायिकांसाठी स्वतंत्र डबा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॉर्म्युल्यावरून युतीत विसंवाद

$
0
0

विधानसभेच्या जागांनुसार विभागणीचा भाजपचा आग्रह

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत झालेल्या प्राथमिक बैठकीत जागावाटपाच्या सूत्रावरूनच विसंवाद झाल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या स्थितीनुसार जागांची विभागणी व्हावी, असा आग्रह भाजपने धरला होता. तर, गेल्या पालिका निवडणुकांतील स्थिती आणि पालिकेतील वाढलेली सदस्यसंख्या लक्षात घेऊन जागावाटप निश्चित केले जावे, असा आग्रह शिवसेनेने धरला आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्ता प्राप्त केल्यानंतर भाजपला महापालिकेतही सत्तांतर घडवून आणायचे आहे. त्यासाठी, इतर पक्षांतील अनेक इच्छुकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही केली आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेकडूनही सर्व जागांसाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तरीही, युतीबाबत चर्चा करण्याचे संकेत राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी दिल्याने सोमवारी रात्री उशिरा भाजप-सेनेच्या शहरातील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चेची पहिली फेरी झाली. ही बैठक अर्ध्या तासाच्या आत संपली असली, तरी युतीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत भाजपने दिले होते. प्रत्यक्षात, युतीची बोलणी विधानसभेच्या सूत्रानुसार व्हावीत, अशी प्रमुख अट भाजपने घातली असल्याचे समजते. विधानसभेच्या निवडणुकीत आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार निवडून आल्याने अधिकच्या जागा मिळविण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या वेळी १५२ पैकी ९० जागा भाजपच्या वाट्याला आल्या होत्या. यंदा, कार्यकर्त्यांमधील उत्साह, बाहेरून पक्षात झालेले प्रवेश आणि केंद्र-राज्याच्या योजनांमुळे मतदारांची बदललेली मानसिकता यामुळे भाजपकडे इच्छुकांची सर्वाधिक संख्या आहे.
विधानसभेच्या आकडेवारीवर आधारित युती करायचा भाजपचा आग्रह कायम राहिल्यास त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसण्याची भीती आहे. कारण, वडगावशेरीचा अपवाद वगळता इतर कोणत्याही मतदारसंघात शिवसेनेला समाधानकारक मते पडलेली नाहीत. म्हणूनच, गेल्या पालिका निवडणुकीच्या आधारावर आणि विद्यमान नगरसेवकांच्या संख्येनुसारच जागावाटप केले जावे, अशी भूमिका शिवसेनेने लावून धरली आहे.

प्रतीक्षा मुंबईतील निर्णयाची
राज्यात महापालिका निवडणुका होणाऱ्या बहुतेक ठिकाणी भाजप-शिवसेना यांच्यात युती करून लढण्याचा प्रस्ताव पुढे येत असला, तरी मुंबईत नेमका काय निर्णय घेतला जाणार, यावरच राज्याच्या इतर भागांतील युतीचे भवितव्य अवलंबून असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात येत आहेत. युती झाली, तर संपूर्ण राज्यात अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच मांडली आहे. तर, भाजपनेही युतीसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे, मुंबईतील तिढा मिटल्यावरच इतर सर्व ठिकाणी युतीबाबतची संभ्रमावस्था दूर होईल, अशी शक्यता आहे.

पालिकेसाठी सेनेची स्वबळाची तयारी
शिवसेना-भारतीय जनता पक्षात युतीबाबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला अपेक्षित जागा देण्यावरून भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने स्वबळाची तयारी सुरू केली. पक्षाच्या शहरातील नेत्यांनी हडपसर आणि वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या तयारीचा आढावा घेतला. येत्या काही दिवसांत उर्वरित विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या आढावा बैठका घेतल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सेना-भाजपच्या नेत्यांची सोमवारी एकत्रित बैठक झाली. या बैठकीत जागा वाटपाची सकारात्मक चर्चा झाल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, सेनेच्या दृष्टिकोनातून चर्चा निष्फळ ठरली असून, विधानसभेच्या वेळचा अनुभव गाठीशी असल्याने सेनेने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार शहरातील नेत्यांनी कार्यकर्त्यांना तयारी ठेवण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
सेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी वडगावशेरी आणि हडपसर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व प्रभागातील इच्छुकांच्या बैठका घेतल्या. या बैठकीत मतदार याद्यांची छाननी करणे, प्रचारात प्राधान्याने घ्यायवयाचे मुद्दे, प्रचार कसा करावा, प्रभागात लढत कशी राहील, उमेदवारी अर्ज कसा भरावा आदींची माहिती इच्छुकांना देण्यात आली.
दरम्यान, यंदा महापालिका निवडणुकीच्या आधी सर्वच पक्षातील विद्यमान नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांच्या इन्कमिंग-आउटगोइंगची जोरात चर्चा आहे. परंतु, सेना-भाजपमध्ये युती होणार म्हणून अन्य पक्षातून सेनेत येऊ पाहणाऱ्यांनीही ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीचा प्रस्ताव गृहितकांवर आधारित

$
0
0

चर्चेअंती बदल करण्याची राष्ट्रवादीची तयारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यसंख्येत काही दिवसांमध्ये झालेली वाढ आणि त्याचवेळी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांची घटलेली संख्या आदी गृहितकांवर आघाडीचा मूलभूत प्रस्ताव तयार करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केला जात आहे. तरीही, चर्चा सुरू करण्यासाठीचा हा केवळ प्राथमिक अंदाज असून, त्यामध्ये आणखी बदल करण्यास वाव असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची सोमवारी रात्री बैठक झाली. या बैठकीमध्ये पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानुसार, राष्ट्रवादी ११६ जागा लढवेल, तर उर्वरित ४६ जागा काँग्रेसला सोडण्यात येतील असे समीकरण मांडण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून महापालिका निवडणुकांमध्ये आतापर्यंत कधीही काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी केलेली नाही. त्यामुळे आघाडीसाठी दोन्ही पक्ष नेमक्या किती जागा लढविणार हे निश्चित करणे आवश्यक होते. काँग्रेसने त्यांचा प्रस्ताव दिला असताना, राष्ट्रवादीच्या प्रस्तावात मात्र त्यांची अतिशय कमी जागांवर बोळवण करण्यात आली असल्याचे जाणवते.
जागावाटपाचे धोरण ठरवण्यासाठी सध्याची नगरसेवकांची संख्या हाच मूलभूत आधार धरण्यात आला आहे. पक्षात प्रवेश केलेले आणि पक्ष सोडून गेलेल्या दोन्ही पक्षातील नगरसेवकांचा आढावा घेतल्यानंतर ११६-४६ हा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. चर्चेला सुरुवात करण्यासाठी काही ठोकताळे निश्चित करावे लागत असल्याने आता यानुसार पुढील चर्चा होईल.
राष्ट्रवादीने दिलेल्या प्रस्तावावर पुढील चर्चा करण्यासाठी दोन्ही शहराध्यक्षांमध्ये मंगळवारी बैठक होणे अपेक्षित होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांची तब्येत बरी नसल्याने ही बैठक होऊ शकली नाही. येत्या एक-दोन दिवसांत जागावाटपाबाबत काँग्रेसची भूमिका जाणून घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले.

‘आघाडी सन्मानपूर्वक हवी’
राष्ट्रवादीने दिलेल्या ११६-४६ च्या प्रस्तावावर काँग्रेसमध्ये तीव्र असंतोष उमटला आहे. या स्वरूपाचा प्रस्ताव काँग्रेसला अपमानित करणारा असून, आघाडी सन्मानपूर्वक व्हायला हवी अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे नगरसेवक आणि कार्यकर्ता यांचा अजिबात बळी जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शिंदे यांनी मांडली.

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याची आमची तयारी आहे. त्याचा प्रस्ताव सादर केला असून, त्यामध्ये काही कमी-जास्त बदल होऊ शकतात. येत्या आठवड्याअखेरपर्यंत आघाडीबद्दल अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
अॅड. वंदना चव्हाण
शहराध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेना, भाजपशी आघाडी अशक्य’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

‘जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपशी आघाडी होणार नाही,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीवेळी काँग्रेस आणि समविचारी पक्षाशी आघाडी केली होती. आगामी काळातील सर्व निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर चर्चा होऊनच निर्णय घेण्यात येतील. काँग्रेसची राष्ट्रवादीसोबत आघाडी झाल्यास आम्ही निवडणुकीस मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जाऊ, असेही तटकरी यांनी स्पष्ट केले.
‘आमच्या कुटुंबियांमध्ये मध्यंतरी जे गैरसमज झाले होते. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समोर सामोपचाराने मिटविण्यात आले आहेत. आगामी निवडणुकीच्या निकालानंतर आपणास सर्वत्र चित्र बदलले असल्याचे दिसेल. ग्रामीण, शहरी भागातील कामगार, शेतमजूर, शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये राज्य सरकारला अपयश आले. सरकारचे अपयश जिल्हा परिषद निवडणुकीत मतपेटीच्या रुपात पाहायला मिळेल. गेल्या महापालिका निवडणुकीपेक्षा यंदा राष्ट्रवादीला नक्कीच जास्त जागा मिळतील,’ अशी आशाही तटकरे यांनी व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली नक्कीच यश मिळेल अशी खात्री आहे. ठाणे, सोलापूर येथे काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्ये, पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन करून निर्णय घेण्यात येईल, असेही तटकरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदार याद्यांवर ९०० हरकती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रा-रूप प्रभागनिहाय मतदार याद्यांवर नऊशे हरकती-सूचना नोंदविण्यात आल्या असून, पुढील तीन दिवसांत सुनावणी घेण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. प्रभागनिहाय मतदारांची अंतिम यादी २१ जानेवारीला जाहीर केली जाणार आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार महापालिकेने यंदा प्रथमच प्रभागनिहाय मतदारयादी गेल्या महिन्यात वेबसाइटवर जाहीर केली. त्यानंतर, मतदार नोंदणी मोहिमेत दाखल झालेल्या अर्जांचा समावेश करून पुरवणी यादी पाच जानेवारीला प्रसिद्ध केली गेली. त्याचे विभाजन करून प्रा-रूप मतदारयादी गेल्या गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर, हरकती-सूचना नोंदविण्याची मुदत मंगळवारी संपली. या कालावधीत पालिकेचे निवडणूक कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नऊशे हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी किंवा त्यावर निर्णय घेण्यासाठी पालिका प्रशासनाकडे अवघे तीन दिवस आहेत. या दरम्यान सर्व ९०० हरकती नोंदवणाऱ्या नागरिकांचे म्हणणे संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांकडे मांडता येणार आहे.
धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातून सर्वाधिक हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. तर, येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांतून सर्वांत कमी हरकती नोंदविण्यात आल्याची माहिती आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आणि पालिकेचे उपायुक्त सुहास मापारी यांनी दिली.

निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती
महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार असल्याने त्यासाठी महापालिकेने प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. औंध क्षेत्रीय कार्यालयाला दोन प्रभाग जोडण्यात आले असून, उर्वरित तिन्ही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी तीन प्रभाग असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याच्या विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवदर्शन, सहलींसह मोफत संदेशांवर भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सहली, देवदर्शनाबरोबरच मोफत वायफाय, एलइडी स्क्रीन, व्हॉटस्अप मेसेज आदी डिजिटल यंत्रणेचाही प्रभावीपणे वापर होऊ लागला आहे. त्यामुळे मोबाइल, फेसबुकवर प्रचारयुद्ध सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
निवडणुकीच्या प्रचारयंत्रणेतही कालानुरूप बदल घडत आहेत. संक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करून वाण म्हणून भेटवस्तू देण्याची परंपरा अजूनही सुरू आहे.
सहली, देवदर्शनाचे आमिष दाखवून मतदारांना आकर्षित करण्याचे नियोजन केले जात आहे. त्याचबरोबर डिजिटल यंत्रणेचाही प्रभावीपणे वापर होऊ लागला आहे. पूर्वी रिक्षांवर स्पीकर लावून प्रचार होत असे. त्याचा पुढील टप्पा म्हणून गर्दीच्या आणि चौकाच्या ठिकाणी डिजिटल यंत्रणेच्या माध्यमातून एलइडी स्क्रीन लावण्यात येत आहेत. त्यावर इच्छुक उमेदवाराचा परिचय, केलेले समाजकार्य किंवा विकासकामे आणि भविष्यकालीन योजना याविषयी माहिती देण्यात येत आहे. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी इलेक्ट्रिक स्टँडबोर्डही लावण्यात आले आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी अहमहमिकाच सुरू झाली आहे. त्यासाठी आकर्षक संदेश तयार केले जात आहेत. डिझाइन पॅकेज करून ते मोबाइलधारकांपर्यंत यशस्वीरित्या पोहचविण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यन्वित करण्यास इच्छुकांकडून प्राधान्य दिले जात आहे. अनेक इच्छुकांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये प्रभागामध्ये सर्वेक्षण मोहीम राबविली आहे. त्यातील निष्कर्षांनंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी सर्वेक्षणानंतर आणि पक्षाकडून उमेदवारी मिळेल या खात्रीनंतर स्वतःऐवजी कुटुंबातील महिलेला निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केल्याचे दिसून येते.

मोफतचा धडाका
निवडणुकीच्या निमित्ताने संक्रांतीचे वाण म्हणून अनेकांनी महिलांना भेटवस्तू देण्याचा जणू सपाटाच लावला आहे. मोफत सहली, देवदर्शन, साड्यावाटप, आरोग्य शिबिरे, स्मार्ट आधारकार्ड याबरोबरच आता मोफत वायफाय सेवा, रिक्षा वाहतूक इतकेच काय एका इच्छुकाने तर आपल्याच पीठ गिणीतून दळण मोफत देण्याचा उपक्रम जाहीर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुण्यातही लक्ष द्या...’

$
0
0

काँग्रेसजनांना प्रतीक्षा दोघा ‘चव्हाणां’ची

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई-ठाण्यापाठोपाठ राज्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत विविध पक्षांचे राज्यातील प्रमुख नेते सक्रिय सहभागी होत असताना काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र पुण्याकडे काणाडोळा केल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, नेत्यांमधील वाद मिटविण्यासाठी आणि पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी दोघा ‘चव्हाणां’नी पुण्यातही लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच बहुतेक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी विविध कार्यक्रम, बैठका आणि भेटीगाठींच्या निमित्ताने पुण्यात भेट दिली. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेट्रोच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने प्रचाराचा नारळच वाढविला. तसेच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही अनेक विकासकामांच्या उद्घाटन-भूमीपूजनांचा धडाका उडवून गेले. तसेच राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही गेल्या काही दिवसांत पुणे-पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निमित्ताने याच भागात तळ ठोकून होते. जाहीरनामा प्रकाशन, इच्छुकांच्या मुलाखतींबरोबरच पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी आणि अन्य पक्षांतील सक्षम उमेदवारांना खेचण्यासाठी त्यांच्या पडद्याआडून जोरदार हालचाली सुरू आहेत. मनसेचे राज ठाकरेही पुणे दौरा करून गेले.
त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मात्र अद्याप पुणे महापालिकेच्या निवडणुकीस प्राधान्य दिलेले नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण काही महिन्यांपूर्वी पुण्यात भेट देऊन गेले. त्याप्रमाणेच पुण्याची जबाबदारी असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही मेट्रोच्या प्रतीकात्मक उद्घाटनास उपस्थित राहिले होते. मात्र, त्यानंतर या दोघांसह प्रदेशातील प्रमुख नेते अद्याप पुण्यात आलेले नाहीत. शहर काँग्रेसच्या नेत्यांचा त्यांच्याशी दैनंदिन संपर्क असला, तरी जाहीर कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणे, त्यांच्या अडचणी सोडविणे आणि त्यांना ‘ताकद ’ देणे, या दृष्टिने अद्याप वरिष्ठांनी लक्ष घातले नसल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी अद्याप पूर्णवेळ पुण्यासाठी दिलेला नाही. त्यामागे काय कारणे असावीत, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

स्थानिक मंडळी ‘अॅक्टिव्ह’
शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम आणि आजी-माजी आमदारांसह स्थानिक वरिष्ठ नेते वेगवेगळ्या चर्चा-बैठकांमध्ये सहभागी होत आहेत. मात्र, निवडणुकीत पक्षाची वातावरण निर्मिती करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्रदेशानेही बळ दिले पाहिजे, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभेच्या आधारे काँग्रेसचा आघाडी प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काँग्रेसने आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला ७१ जागांचा प्रस्ताव आघाडीद्वारे लढलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहे. प्रत्येक प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा किमान एक उमेदवार असावा, सध्या नगरसेवक असलेल्या जागी त्याच पक्षाला उमेदवारी द्यावी आणि ज्या ठिकाणी आघाडीचा नगरसेवक निवडून आलेला नाही, त्या ठिकाणी द्वितीय क्रमांकाची मते असलेल्या पक्षाला उमेदवारी द्यावी, असे सूत्र अवलंबण्यात आले आहे.
काँग्रेसने आघाडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला ९१ आणि स्वतःला ७१ जागा असा प्रस्ताव दिला आहे. काँग्रेसने या जागांचा प्रस्ताव कसा तयार केला याबाबत एका बड्या नेत्याने सांगितले की, ‘प्रत्येक प्रभागात दोन्ही पक्षांचा किमान एक उमेदवार असला पाहिजे. असे असेल तरच दोन्ही पक्ष एकमेकांचा प्रामाणिकपणे प्रचार करतील. अशा प्रकारे दोन्ही पक्षांच्या वाट्याला ४१ जागा येतील.’
एखाद्या प्रभागामध्ये काँग्रेसचे चारही नगरसेवक निवडून आलेले असले तरी, त्या ठिकाणची एक जागा राष्ट्रवादीला सोडण्याची काँग्रेसची तयारी आहे. तसेच, सूत्र राष्ट्रवादीला अवलंबावे लागेल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. आघाडी होण्याबाबत या सूत्राभोवती कळीचा मुद्दा राहणार आहे. ज्या प्रभागांमध्ये विद्यमान ​नगरसेवक आहेत, त्या जागा त्यांना सोडण्यात याव्यात. तसेच ज्या प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांचे नगरसेवक नसतील, त्या ठिकाणी द्वितीय क्रमांकांची मते असतील, त्या पक्षाला ती जागा सोडावी. या सर्व जागांचा विचार केला असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला ९१ तर, काँग्रेसला ७१ जागा येत आहेत.
काँग्रेसने आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीला जागा वाटपांबाबतचे सूत्र सांगितले आहे. हेच सूत्र विधानसभा निवडणुकांमध्ये अवलंबण्यात आले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यापूर्वी महापालिका निवडणूक आघाडी करून लढले नसल्याने विधानसभा निवडणुकीतील सूत्र अवलंबवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीबाबत काँग्रेसला ४६ जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. दोन्ही पक्षांकडून सन्मानपूर्वक आघाडीची भाषा वापरली जाऊ लागली आहे. जागा वाटपाबाबत चर्चेसाठी पुन्हा बैठक बोलवण्यात येणार आहे. या बैठकीत सन्मानपूर्वक आघाडीची आघाडीची दिशा ठरेल, अशी अनेकांना आशा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुठे गेली होती ‘पारदर्शकता’?

$
0
0

शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपला सवाल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवसेनेच्या जीवावर भारतीय जनता पक्षाने राज्यभरात हातपाय पसरले. विजयासाठी अनेक ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा घ्याव्या लागल्या. त्यामुळे आता युतीसंदर्भात ‘पारदर्शकते’ची भाषा करणाऱ्या भाजपची पारदर्शकता तेव्हा कोठे गेली होती, अशा भावना शिवसेनेच्या गोटातून व्यक्त करण्यात येत आहेत.
भाजपने महापालिका निवडणुकीसाठी वेगळी भूमिका मांडून शिवसेनेशी संभाव्य युतीबाबत झाकली मूठ कायम ठेवली आहे. नाशिक येथे युती तोडल्याची चर्चा आहे, तर पुण्यातही अद्याप फारशी काही सकारात्मक परिस्थिती नाही. मुंबईत युती होणार की नाही, याबाबतही शंकाच आहे. ‘पालिका निवडणुकीत पारदर्शक अजेंडा असावा’, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडून युतीची चर्चा सरळ होणार नसल्याचे संकेतच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये भाजपविरुद्ध नाराजीचे वातावरण आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना स्वतंत्र लढली. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी पुन्हा एकत्र आले. गेल्या दोन वर्षांत शिवसेनेने राज्य सरकारमध्ये राहून विरोधाची भूमिका वारंवार बजावली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सेनेशी युती करायची की नाही, यावर भाजप मौन बाळगून आहे. दोन्ही पक्षांत चर्चेच्या फैरी झडतील, मात्र त्यातून फारसे काही निष्पन्न होईल अशी सध्याची स्थिती नाही. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांकडून भाजपच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
भाजप अडचणीत असताना शिवसेनेने कायमच सहकार्याची भूमिका घेतली. भाजपच्या नेत्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभांची मागणी करत आपल्या जागा कशा निवडून येतील, पक्ष कसा वाढेल ही भूमिका घेतली. शिवसेनेने कायमच भाजपला मदत केली. सध्या भाजपला ‘अच्छे दिन’ आले आहेत. अशा परिस्थितीत भाजपकडून शिवसेनेला मिळणारी वागणूक अस्वस्थ करणारी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत युती करण्याविरोधात शिवसेनेतील एक गट आहे. या गटाला भाजपकडे युतीसाठी हात पसरवणे मान्य नाही. जनमताचा कौल घेऊन सन्मानाने निवडणुकीला सामोरे जाण्यात त्यांना धन्यता वाटत आहे. तर, पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत, अशी भूमिका दुसऱ्या गटाची आहे.

भाजपचे ‘गरज सरो...’
भाजप आणि सेना यांच्या स्थानिक नेत्यांमध्ये युतीसंदर्भात चाचपणी करण्यासाठी सोमवारी बैठक झाली. मात्र, त्यामध्ये काहीच निष्पन्न झाले नाही आणि काही मिनिटांतच बैठक आटोपली. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्येही नाराजीचा सूर आहे. ‘गरज असेल, तेथे युती करायची, आणि गरज नसेल, तेथे दुर्लक्ष करायचे,’ असाच भाजपचा पवित्रा दिसून येत असल्याची भावना सेनेच्या गोटातून व्यक्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images