Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चायनीज हॉटेलांनी वाढवली लज्जत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘चायनीज’ हा शब्द जरी उच्चारला तरी डोक्यात चायनीज वस्तूंपासून ते चीन नागरिकांपर्यंत अनेक विचार येतात. मात्र, त्याच वेळी पोटाची भूक भागवणारे लज्जतदार आणि चटपटीत चायनीज खाद्यपदार्थ आठवत नाहीत. बदलत्या काळात खवय्यांना चायनीज खाद्यपदार्थांनी लोकांना हळूहळू भुरळ घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी कॅम्प परिसरात मोजक्या ठिकाणी असणारी चायनीज हॉटेल शहारात विविध भागात विस्तारू लागली आहेत. याच कारणाने पौड फाटा ते कर्वेनगरच्या चौकापर्यत खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरवणारी हॉटेल वाढली आहेत.

काही वर्षांपूर्वी शहरात चायनीज खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा झाल्यास कॅम्प भागात अथवा काही ठराविक महागड्या हॉटेलमध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, जसे जसे शहराचे विस्तारीकरण झाले आणि शहरात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली, तेव्हा पारंपरिक खाद्यपदार्थांबरोबर चायनीज खाद्यपदार्थांची रेलचेल वाढतच गेली. पौड फाट्याहून थोडे समोर गेल्यावर करिश्मा सोसायटीच्या चौकात मूनलाइट चायनीज, पिंटू सावजी, न्यू बीजींग, रिअल चायना गार्डन अशी एका रांगेत चायनीज खाद्यपदार्थांची हॉटेल आहेत. संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यत खवय्यांची चायनीज खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठी चांगलीच गर्दी असते. कित्येक वेळा तर ‘वेटिंग’त अनुभव खवय्यांना घ्यावा लागतो.

या हॉटेलांमध्ये व्हेज टॉम-यम , वॉन टॉन, कोरिएंडर गार्लिक, मंचाव, टोमॅटो, फ्रेंच ओनियम असे भरपूर व्हेज सूपचे प्रकार आहेत. तसेच नॉन-व्हेजमध्ये चिकन टोमॅटो, पालक, मंचाव, वॉनटॉन, मशरूम, क्लिअर, टोलोमेन असे चविष्ट सूप उपलब्ध आहेत. तसेच, चिकन मंच्युरियन, लॉलिपॉप, शेजवान, गार्लिक, चिली, हाँगकाँग, इन हुनन सॉस, चिकन चॉप्सी, अमेरिकन चॉप्सी, शेजवान चॉप्सी असे खमंग खाद्यपदार्थं खायला मिळतील. चायनीज म्हटल्यावर राइसचे प्रकार सोडून चालणार नाहीत. त्यामुळेच हक्का न्यूडल्स, अंडा व चिकन न्यूडल्स, जिंजर व गार्लिक न्यूडल्स, अंडा फ्राइड राइस, चिकन फ्राइड राइस, जिंजर राइस, पेकिंग राइस, ट्रिपल राइस, शेजवान ट्रिपल राइस असे कितीतरी पोटाची भूक भागवणारे प्रकार उपलब्ध आहेत. खवय्यांसाठी न्यूडल्स आणि स्टार्टर ग्रेव्हीसोबत तसेच ड्राय स्वरूपातही उपलब्ध आहेत.

कर्वे पुतळा ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहापर्यंत नव्यानेच दोन ते तीन ‘स्वस्तात मस्त’ अशी चायनीज हॉटेल झाली आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची या हॉटेलांवर मोठी गर्दी असते. कर्वे रस्त्यावर मयूर कॉलनीजवळ नव्यानेच गोल्डन ड्रॅगन नावाचे हॉटेल सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून फॅमिलीसाठी आणि कॉलेजच्या युवक-युवतींनी हे हॉट डेस्टिनेशन झाले असून दिवसेंदिवस येथे खवय्यांची गर्दी वाढतच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ओल्ड कांचनसोबत काही अंतरावर आणखी चायनीज हॉटेल नव्याने सुरू झाली असून संध्याकाळी सर्व वयोगटातील नागरिकांची तेथे गर्दी असते. या हॉटेलांमध्ये अंडा आणि चिकन फ्राइड राइस, चिकन शेजवान राइस, चिकन ६५ ला भरपूर मागणी असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कात्रज परिसरात रस्त्यावर सुरू असलेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
किरण शिवाजी डोळे (वय २३, र संतोषनगर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याच्यासह एका अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस नाईक सोनवणे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोळे हा चालक म्हणून काम करतो; तर अल्पवयीन मुलगा शाळेत शिकतो. या दोघांची रविवारी दुपारी संतोषी माता मंदिराच्या पायथ्याशी भांडणे सुरू होती. त्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली. त्यानुसार पोलिस नाईक सोनवणे हे त्या ठिकाणी गेले. त्यांनी भांडणांमध्ये हस्तक्षेप केल्याने या दोघांनी मिळून सोनवणे यांना मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. याची माहिती सोनवणे यांनी पोलिसांना दिल्यानंतर डोळेला अटक करण्यात आली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचावन्न हजार शेततळी मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत ५५ हजार ७१४ शेततळ्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी नऊ हजार ६०६ शेततळ्यांचे काम प्रत्यक्षात पूर्ण झाले असून, या शेततळ्यांमुळे सुमारे ४० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली येणार आहे.
या योजनेसाठी एक लाख ८३ हजार २५४ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ९७ हजार १०४ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यातील ७६ हजार ८०१ शेतकऱ्यांची जमीन शेततळ्यासाठी योग्य ठरली आहेत. ५५ हजार ७१४ शेततळ्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर करण्यात आलेल्या शेततळ्यांपैकी नऊ हजार ६०६ शेततळी पूर्ण झाली आहेत. खरीप हंगामात या शेततळ्यांमधून पाण्याची साठवणूक सुरू होईल. एप्रिल महिन्याअखेरीस कामांना मंजुरी मिळालेली सर्व शेततळी पूर्ण होतील, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी किमान वीस गुंठे क्षेत्र असणे आवश्यक आहे. शेततळ्याच्या आकारानुसार २२ ते ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येत आहे.
शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढावी, यासाठी शेततळी बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये ही योजना जाहीर करण्यात आली. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत किमान एकदा टंचाईग्रस्त गाव जाहीर झालेल्या गावांना या योजनेत सहभागी करून घेतले जात होते. त्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात होते. मात्र, ही अट ऑक्टोबर २०१६ मध्ये काढून टाकण्यात आली. आता ‘मागेल त्याला शेततळे’ अशी योजना लागू करून मागेल त्याला अनुदान या तत्त्वानुसार शेततळी बांधण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजक्षेत्रातील बदलांमुळे महावितरणची स्थिती प्रतिकूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘महावितरणमधील आर्थिक प्रतिकूलता ही व्यवस्थापन, अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांमुळे आलेली नाही. त्यामागे महावितरणच्या नियंत्रणाबाहेरील आणि देशातील वीजक्षेत्राच्या परिस्थितीत होत असलेले बदल कारणीभूत आहेत,’ असे मत महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी व्यक्त केले.
सबॉर्डिनेट इंजिनीअर्स असोशिएशनच्या (एसईए) ४४ व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्‌घाटन बालेवाडीमधील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झाले. त्यावेळी संजीव कुमार बोलत होते. कार्यक्रमाला महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे, महापारेषणचे संचालक रवींद्र चव्हाण, ‘एसईए’चे अध्यक्ष संजय ठाकूर, सरचिटणीस सुनील जगताप, महावितरणचे मुख्य अभियंता रामराव मुंडे, नागनाथ इरवाडकर; तसेच असोशिएशनचे आबासाहेब मोराळे, अशोक गडदे, हनुमंत मोरे, अतुल देशपांडे आदी उपस्थित होते.
‘देशात वीजक्षेत्रातील बदलांमुळे महावितरणची सद्यस्थिती प्रतिकूल आहे. त्यावर मात करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी एकजुटीने काम करावे.’ असे आवाहन संजीव कुमार यांनी केले.
‘उत्कृष्ट ग्राहकसेवेसोबतच नवीन वीजजोडण्या तत्काळ देणे, बिलांची नियमित आणि थकबाकी वसूल करणे या कामांना प्राथमिकता द्यावी. महावितरणने अंतर्गत कामकाजासाठी तयार केलेल्या मोबाइल अ‍ॅप्समुळे मीटर रिडींग, नवीन वीजजोडणी; तसेच इतर ग्राहकसेवा वेगवान झाल्या आहेत,’ असे ते म्हणाले.
‘राज्यात कृषिपंपांना आठ ते १२ तासांपर्यंत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला. हा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून पूर्वनियोजनासह तातडीने कार्यवाही करण्यात आली.’ असे त्यांनी नमूद केले.
जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. मोरे यांनी प्रास्ताविक केले. अनिल वर्पे आणि मृदुला शिवदे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारजे आणि धायरीत सोनसाखळी चोऱ्या वाढल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सोनसाखळी चोरीच्या घटनांनी पुन्हा शहरात डोके वर काढले आहे. पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व गंठण हिसकाविल्याच्या घटना वारजे व धायरीत घडल्या. या दोन घटनांमध्ये एक लाख ६० हजार रुपयांचा चोरट्यांनी ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत ५३ वर्षीय (रा. भुगाव) महिलेने वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला या रविवारी सकाळी साडे सातच्या सुमारास वारजे येथील ओंकार कॉलनीतून पायी चालत जात होती. त्यावेळी दुचारकीवरून आलेल्या चोरट्यांनी ९० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले.
दुसरी घटना शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास धायरी येथील गोल्डन व्हॅली कंपाउंड येथे घडली. याबाबत धायरी येथील ४३ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. ही महिला पायी जाताना चोरट्यांनी गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसका मारून नेले. या प्रकरणी उपनिरीक्षक गिरीष सोनवणे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजारातील जनुकांचे संशोधन शक्य

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे
अनेक लोकांना झालेल्या एखाद्या आजारातील जनुकांचे एकत्रित संशोधन करणाऱ्यासाठी आणि त्या आजारावर नेमके कोणते रामबाण औषध उपयोगी पडेल, याची माहिती आता काही क्षणात सॉफ्टवेअरद्वारे मिळणार आहे. तसेच, या जनुकांद्वारे निर्माण होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील संगणकीय माहिती (डेटा) नियंत्रित करण्यासाठी आणि या डेटाचे सुसज्ज ‘नेटवर्क’ तयार करण्यासाठी प्रगत संगणन विकास केंद्राद्वारे (सी-डॅक) सॉफ्टवेर्सची निर्मिती केली आहे.
सी-डॅकच्या वतीने १७ ते १९ जानेवारी दरम्यान ‘अॅक्सलरेटिंग बायोलॉजी’ या सातव्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये जीवशास्त्राच्या विविध विषयांवर आणि त्यामध्ये उद‍्भवणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. हाय परफॉर्मन्स सुपरकम्प्युटिंगद्वारे (एचपीसी) या समस्या सोडविण्यासाठी चर्चा देखील होईल परिषदेच्या उद्घाटनच्या वेळी ‘डिपिक्ट’ आणि ‘न्युरॉन’ या दोन सॉफ्टवेअर्सचे अनावरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सी-डॅकचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जैव-माहितीशास्त्रज्ञ (बायोइन्फॉर्मेटीक्स) सहायक संचालक डॉ. राजेंद्र जोशी उपस्थित होते.
‘डिपिक्ट’ या सॉफ्टवेअरद्वारे लोकांना झालेल्या एखाद्या आजारातील जनुकांचे संशोधन करता येणार शक्य होणार आहे. तसेच, या जनुकांना थ्रीडी स्वरूपात कम्प्युटरच्या अथवा डिजिटल स्क्रीनवर पाहता येणार आहे. या सॉफ्टवेअरद्वारे असंख्य लोकांच्या आजारांमधील जनुकांचा अभ्यास करता येईल आणि त्यातून पाहिजे ती माहिती मिळवता येणार आहे. त्यामुळे दोन व्यक्तींना एकसारखा आजार झाल्यास त्यांच्या जनुकांच्या अभ्यासाद्वारे एकसारखी औषधे देता येणार आहेत. हे सॉफ्टवेअर आरोग्य क्षेत्रात आणि विशेषत: डॉक्टरांना उपयोगी पडणार आहे, अशी माहिती डॉ. दरबारी यांनी दिली. मोठ्या संख्येने नागरिकांच्या जनुकांचा अभ्यास केल्यानंतर ‘डेटा’ निर्मिती ही प्रचंड होणार आहे. हा डेटा व्यवस्थित नियंत्रित करण्यासाठी आणि त्याचे नियोजन करण्यासाठी ‘न्युरॉन’ या सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे, असे डॉ. दरबारी यांनी सांगितले.
परिषदेच्या उद्घाटनाला १७ जानेवारी रोजी प्रमुख पाहुणे संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मुना, ‘इन्फॉर्मेशन सेंटर ऑफ जेनिटिक इंजिनिअरिंग’चे संचालक डॉ. दिनकर साळुंखे, डॉ. जोशी उपस्थित राहणार आहेत.

‘एचपीसीद्वारे संशोधन’
सी-डॅकच्या बायोइन्फॉर्मेटिक्स गटाद्वारे एखादा आजार बरा करण्यासाठी उपयोगी पडणारे औषध दुसरा आजारावर उपयोगी पडू शकते का, याचे संशोधन करण्यात येत आहे. त्यासाठी देश-विदेशातील विविध संशोधन संस्थांसोबत मिळून काम करण्यात येत आहे. विविध प्रकारचे जनुकांचे सॅम्पल गोळा करण्यात येत आहे. तसेच, कॅन्सर, मधुमेह, कुष्ठरोग यांसारख्यावर आजारांवर तसेच धान्यांच्या पिकांवर एचपीसीद्वारे संशोधन करण्यात येत असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चा सकारात्मक; फॉर्म्युला गुलदस्त्यात

$
0
0

भाजप-शिवसेनेतील संभाव्य युतीबाबत चर्चेच्या पहिल्या फेरीचा निष्कर्ष
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांच्यातील संभाव्य युतीची प्राथमिक बैठक सोमवारी झाली. या बैठकीत युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला असला, तरी जागांची संख्या किंवा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील काही दिवसांत दोन्ही पक्षांचे स्थानिक नेतृत्व त्याविषयी सविस्तर चर्चा करणार असून, अंतिम निर्णय घेण्यासाठी पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.
भाजप-शिवसेनेच्या राज्य स्तरावरील नेत्यांनी युतीबाबत चर्चा करण्याचे सूतोवाच केल्यानंतर सोमवारी सायंकाळी दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. तर, शिवसेनेकडून संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शहरप्रमुख विनायक निम्हण आणि उपनेते शशिकांत सुतार उपस्थित होते. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत अगदी प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली असून, शहरात परिवर्तन घडविण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचा विचार मांडण्यात आला. तसेच, पहिली बैठक सकारात्मक वातावरणात झाल्याचे सांगत, जागावाटप फॉर्म्युला किंवा आकड्यांबाबतची चर्चा यावेळी झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत १५२ जागांपैकी भाजपने ९०, तर शिवसेनेने ६२ जागा लढवल्या होत्या. यामध्ये, दोन्ही पक्षांनी आरपीआयला ठराविक जागांचा वाटा दिला होता. या वेळी, पालिकेतील सदस्यससंख्या १६२ झाली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत युती होणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था असल्याने दोन्ही पक्षांनी सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने तयारी आणि नियोजन केले आहे. अनेक ठिकाणी सक्षम उमेदवार मिळत नसल्याचे चित्र या वेळी समोर आल्याने पुन्हा युती करून लढण्याच्या पर्यायाची चाचपणी दोन्ही बाजूंकडून सुरू आहे.
...................
‘विधानसभेतील बदललेली परिस्थिती, शहरातील वॉर्डांची वाढलेली संख्या आणि दोन्ही पक्षांच्या विद्यमान नगरसेवकांची संख्या, याचा आढावा पुढील दोन-तीन दिवसांत घेण्यात येईल. त्यानंतर, जागावाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी पुन्हा चर्चा होईल.’
- गिरीश बापट, पालकमंत्री
...
‘जनतेशी असलेली बांधिलकी जपत, परिवर्तन घडविण्यासाठी कोणत्याही अटी-शर्तींशिवाय प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली. दोन्ही पक्ष एकमेकांच्या प्रस्तावांचे आदान-प्रदान करतील. चारच्या प्रभागातील बलाबलाचा आढावा घेऊन पुढील टप्प्यात जागांबाबतचा फॉर्म्युला ठरेल’
- डॉ. अमोल कोल्हे, संपर्कप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. २३ फेब्रुवारीपर्यंत हा प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे. या आदेशांचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रामानंद यांनी दिला आहे.
पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायती समितीच्या निवडणुका पुढील महिन्यात होणार आहेत. २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या कालावाधीत प्रचार फेरीत एकावेळी तीनपेक्षा वाहनांचा वापर करण्यात येऊ नये. दोन ताफ्यातील अंतर १५ मिनिटांचे असावे. हे आदेश केंद्र, राज्य मंत्री किंवा उच्चपदस्थ व्यक्ती यांच्यासाठी लागू राहणार नाहीत. प्रचारफेरीत आक्षेपार्ह कृत्य किंवा घोषणा देऊ नयेत. ज्या मार्गाने प्रचारफेरी काढण्यात येणार आहे. त्या मार्गाबाबतची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिवर्धकांचा आवाज मोठा नसावा. प्रचारसभांसाठी पोलिासांची परवानगी आवश्यक आहे, असे रामानंद यांनी आदेशात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आघाडीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात

$
0
0

जागांच्या अदलाबदलीनंतर होणार निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते आघाडीसाठी सकारात्मक असल्याने यापूर्वी दोन्ही पक्षांनी दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार पाच ते दहा जागांची अदलाबदली करून आघाडीच्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
‘महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने सुरुवातीला स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. पालिका निवडणुकीत समविचारी पक्षाबरोबर युती करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, कोणाच्या मागे पळणार नाही,’ अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. पालिका निवडणुकीत भाजपला रोखायचे असेल तर आघाडी झाली पाहिजे, अशी‌ चर्चा‍ गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये आघाडीच्या चर्चे‍ला वेग आला. पालिकेसाठी आघाडी करावी, असा प्रस्ताव काँग्रेसने राष्ट्रवादीला दिला. या प्रस्तावामध्ये काँग्रेसला ७१ जागा द्याव्यात, आणि राष्ट्रवादीने ९१ जागा लढवाव्यात, असा फॉर्म्युला देण्यात आला होता. या प्रस्तावाचा विचार करून त्याचा सविस्तर अभ्यास करून राष्ट्रवादी काँग्रेसने ५२ आणि ११० जागांचा फॉर्म्युला काँग्रेससमोर ठेवला आहे. यामध्ये किती जागांवर ठाम राहायचे आणि किती जागा सोडायच्या याचा निर्णय करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर बैठक होणार आहे. पालिका हातात ठेवायची असेल तर दोन्ही काँग्रेसने एकत्र आले पाहिजे, यावर दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते आग्रही आहेत. त्यामुळे दहा जागा एकमेकांना सोडून आघाडीचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
...
‘दोन्ही पक्षात एकी होईल’
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश आणि पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडे होत असलेले इन्कमिंग पाहता भाजपची ताकद शहरात वाढली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये या दोन्ही पक्षांची आघाडी झाल्यास त्याचा फायदा दोन्ही‌ काँग्रेसला होइल, असे सांगण्यात आले होते. आघाडी झाल्यास पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या फुटिरांना चपराक बसणार आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेस आघाडीसाठी अनुकुल असल्याने दोन्ही पक्ष एकत्र येतील, असा विश्वास या सूत्रांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीसाठी चर्चेच्या फेऱ्या

$
0
0

सर्व पक्षांची ‘पहिले आप-पहिले आप’ खेळी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या असून, सर्व पक्षांकडून ‘पहिले आप, पहिले आप’ अशी खेळी सुरू आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता, पहिला निर्णय कोणाचा जाहीर होणार, त्यावर कदाचित युती-आघाडीची पुढील दिशा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर, स्वबळाची भाषा करणाऱ्या सर्वच पक्षांनी नरमाईचे धोरण स्वीकारले असून, एकत्र लढण्याबाबत विचार-विनिमय सुरू झाला आहे. राज्य स्तरावरील नेत्यांनीही त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्याने स्थानिक पातळीवर युती-आघाडीमध्ये चर्चेच्या फेऱ्या, प्रस्तावांची मांडणी, जागावाटपाची संभाव्य शक्यता या अनुशंगाने प्राथमिक स्तरावर बोलणी सुरू आहेत. भाजप-शिवसेना यांच्यामध्ये युती होणार, की राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यात आघाडी होणार, याबाबत सर्वच पक्षांकडून चाचपणी सुरू असून, युती-आघाडीबाबत पहिला निर्णय कोण जाहीर करणार, याबद्दल उत्सुकता आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये युतीत फाटाफूट झाल्याचे भाजपने जाहीर केले होते. त्यापाठोपाठ, राष्ट्रवादी-काँग्रेस यांची आघाडी फुटली. सर्व पक्ष स्वबळावर लढल्याने प्रत्येकाला आपल्या ताकदीचा अंदाज आला. तेव्हापासून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती-आघाडी होणार, की स्वतंत्रपणे लढणार याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. युती करून लढण्याचा निर्णय आधी जाहीर केला गेला, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही आघाडी होण्याचे दाट शक्यता आहे. तसेच, विधानसभेप्रमाणे युती किंवा आघाडीत फाटाफूट झाली, तर इतर पक्षही त्यानुसारच निर्णय घेण्याचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे, निर्णय जाहीर करण्यात पुढाकार कोण घेणार, यावर इतर पक्षांची रणनीती ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने प्रत्येकानेच आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाहीत.
...................
अर्ज भरण्याची लगबग
महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत २७ जानेवारी ते तीन फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यामुळे, सर्वच पक्षांकडे पुरेसा अवधी उपलब्ध असून, यापूर्वीच्या अनुभवानुसार अखेरच्या एक-दोन दिवसांतच अर्ज भरण्याची लगबग दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे जिल्ह्यात २९ जानेवारीला पोलिओ मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुणे जिल्ह्यात येत्या २९ जानेवारी आणि २ एप्रिलला पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ० ते ५ वयातील पाच लाखांहून अधिक बालकांना ‘दो बूंद जिंदगी के’ दिले जाणार आहेत.
पुणे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेसाटी जिल्हाधिकारी सौरव राव यांच्या अध्यतेखाली बैठक झाली. त्या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजीवकुमार जाधव, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चेतन खाडे आदी उपस्थित होते.
‘पुणे जिल्ह्यात २९ जानेवारी आणि २ एप्रिलला पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. शहरासह जिल्ह्यातील सुमारे पाच लाख सहा हजार ६३ एवढ्या ० ते ५वयातील बालकांना लस देण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीन हजार ९०० तसेच शहरी भागामध्ये ३५६ असे चार हजार २५६ पोलिओचे बूथ कार्यान्वित केले जाणार आहेत. तसेच प्रवासातील लाभार्थ्यांसाठी एकूण ३६९ एवढे पथकाद्वारे लसीकरण केले जाणार आहे. अति जोखमीच्या कार्यक्षेत्रात ऊसतोड मजूर वस्ती, वीट भट्ट्या, झोपडपट्टी भागातील बालकांना लसीकरण केले जाणार आहे,’ अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव पवार यांनी दिली.
पोलिओची रविवारी मोहीम झाल्यानंतर ग्रामीण भागात तीन दिवस तसेच शहरी भागात पाच दिवस घरी जाऊन लसीकरण केल्याची खात्री केली जाणार आहे. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लसीकरणाचा जिल्ह्यातील शून्य ते पाच वयातील सर्व बालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातग्रस्तांचे अवयव वापराविना

$
0
0

देशात ७० टक्के प्रमाण; ‘नोटो’ची धक्कादायक माहिती
Mustafa.Attar@timesgroup.com
................
@MustafaattarMT
पुणे : देशात दर वर्षी रस्त्यांवर होणाऱ्या भीषण अपघातांमध्ये दीड लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. त्यातील हृदय, मूत्रपिंड, यकृत यासारखे अवयव वापरणे शक्य असून, त्यामुळे गरजूंची संख्या कमी करण्यास मदत होणार आहे. परंतु, ७० टक्के अपघातग्रस्तांचे अवयव वापराविना वाया जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत ‘नॅशनल ऑर्गन अॅन्ड टिश्यू ट्रान्स्प्लांट ऑर्गनायझेशन’ (नोटो) हा विभाग कार्यरत आहे. त्या विभागाच्या माध्यमातून देशभरात अवयवदानाची मोहीम राबविली जाते. कोणत्या राज्यात अथवा शहरांत अवयवांची गरज आहे याचा माहितीसाठी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
‘देशात अवयवदात्यांची संख्या अपुरी असून, गरजूंची संख्या दिवसेंदिवस वर्षानुवर्षे वाढत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे. यासाठी ‘नोटो’मार्फत आम्ही देशातील सर्व राज्यांमध्ये अवयवदान प्रक्रिया वाढविण्याबाबत पावले उचलत आहोत. देशात आजमितीला दोन लाखांहून अधिक व्यक्ती मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र अवघी सहा हजार एवढेच मूत्रपिंड उपलब्ध होतात. त्यापैकी पाच हजार हे जिवंत व्यक्तींकडून तर एक हजार ‘ब्रेनडेड’ पेशंटकडून मूत्रपिंड मिळत आहेत. दुसरीकडे देशात ५० हजार जणांना यकृताची गरज असताना अवघे दीड हजार जणांना जीवदान मिळत आहे. परंतु, देशामध्ये रस्त्यावर दर वर्षी दीड लाख अपघात होतात. त्यापैकी ३० ते ३५ टक्के ग्रस्तांचे अवयव खराब झालेले असल्याने ते वापरता येत नाहीत. सुमारे ७० टक्के अवयव हे वापराविना वाया जातात. हे अवयव वापरल्यास गरजू पेशंटना जीवदान मिळून प्रतीक्षा यादी कमी होऊ शकेल,’ असा विश्वास डॉ. विमलकुमार भंडारी यांनी व्यक्त केला.
‘एका व्यक्तीला दोन मूत्रपिंड असतात. दीड लाखापैकी पंधरा हजार व्यक्तींचे मूत्रपिंड मिळाले तरी एकावेळी ३० हजार मूत्रपिंड उपलब्ध झाले, तर मूत्रपिंडाची प्रतीक्षा कमी यादी होण्यास मदत होईल. परंतु, अतिदक्षता विभागातील डॉक्टरांकडून त्या अवयवांचा वापर करता येईल यासाठी प्रयत्न होत नाहीत,’ अशी खंतही डॉ. भंडारी यांनी व्यक्त केली.
...
जिल्हा हॉस्पिटलमध्ये ‘रिट्रायव्हल’ सेंटर हवे
‘प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ‘ब्रेनडेड’ जाहीर करण्याची समिती नसते. प्रत्येक हॉस्पिटलला ‘ब्रेनडेड’ पेशंटचे अवयव काढण्याची (रिट्रायव्हल) परवानगी नसते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्हा हॉस्पिटलमध्ये ‘ब्रेनडेड’ पेशंट जाहीर करण्याची सुविधा असावी. तसेच ‘ब्रेनडेड’ पेशंटच्या नातेवाइकाने संमती दिल्यानंतर त्याचे अवयव काढण्याची (रिट्रायव्हल) सुविधा तेथे असावी,’ अशी अपेक्षा ‘नोटो’चे संचालक डॉ. विमलकुमार भंडारी यांनी व्यक्त केली. देशात दर वर्षी प्रत्यारोपण करणाऱ्या तसेच ‘ब्रेनडेड’ पेशंट जाहीर करणाऱ्या सुमारे ५० डॉक्टरांना प्रशिक्षित करण्याची केंद्र सरकारची तयारी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारे कार्यकर्ते आपलेच

$
0
0

इच्छुकांसह विद्यमानांकडून विशेषणे लावण्याचा ट्रेंड
म. टा. प्रतिनिधी, पुणे
आपला कार्यकर्ता, नेता नव्हे कार्यकर्ता, आपला माणूस, हक्काचा माणूस, आपला जवळचा माणूस.., महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इच्छुक व्यक्ती आणि आजी-माजी माननीयांकडून नागरिकांना भावनिक साद घालणारी विशेषणे नावामागे लावण्याचा ट्रेंड यंदा पाहायला मिळत आहे.
महापालिका निवडणुकीचे बिगूल आता वाजले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मात्र, आता शिवसेना-भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमध्ये युती-आघाडी चर्चा सुरू आहे. त्यामुळे अद्याप सर्वच पक्षांच्या उमेदवारांची अंतिम यादी तयार होण्यास अजून काही दिवसांची प्रतीक्षा आहे. मात्र, महापालिकेत नगरसेवक विराजमान होण्यास इच्छुक असलेल्यांनी अगदी दिवाळीपासून जनसंपर्क वाढविला असून, तेव्हापासूनच प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रीतीने प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, यंदाच्या त्यांच्या प्रचारात नागरिकांना भावनिक साद घालण्यासाठी नावामागे विशेषणांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. शहरात फेरफटका मारताना ठिकठिकाणी लावलेल्या फलकांवरील तपशील वाचून हे लक्षात येते.
‘नेता नव्हे कार्यकर्ता’, ‘आपला माणूस’ ही विशेषणे काही ठराविक ‘माननीयां’कडून फार पूर्वीपासून लावली जातात. त्यांची ती ओळखच बनली आहे. मात्र, यंदा ‘कार्यकर्ता’, ‘लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर’, ‘आपल्या जवळचा, आपल्या हक्काचा माणूस’ आदी विशेषणे अगदी नवख्या इच्छुकांकडूनही लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. अद्याप उमेदवार याद्या जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, बहुतांश जणांचे कार्यअहवाल, व्यक्ती परिचय अहवाल प्रभागात घरोघरी पोहोचले आहेत. दिवाळीला उटणे, नवीन वर्षाच्या सुरुवातीला कॅलेंडर आणि मकर संक्रातीला ‘तीळगूळ’ देण्याबरोबरच या सर्व ‘आपल्या’ माणसांनी मतदारांपर्यंत प्रतिमा निर्मितीसाठी जोरदार प्रयत्न केले.
दिवाळीला दिलेल्या तेल, उटण्याच्या पिशव्या, नवीन वर्षानिमित्त प्रभागात लावलेले शुभेच्छा फलक, मकरसंक्रातीला दिलेल्या ‘तीळगुळा’च्या पॅकेटवर, कार्यअहवालाच्या मुखपृष्ठावर आदी ठिकाणी इच्छुकांनी ‘कार्यकर्त्या’ची मोहोर उमटविली आहे. आपण सामान्य नागरिकांमध्ये वावरतो, कोणत्याही वेळेला नागरिकांना सहज उपलब्ध होतो, नागरिक हक्काने मला येऊन त्यांची कामे सांगू शकतात, आदी गोष्टी नागरिकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न याद्वारे केला जात आहे.
.........................
टोपणनावे पडली मागे
राजकारणातील जुन्या नेत्यांपासून अगदी नवख्या कार्यकर्त्यापर्यंत सर्व अण्णा, दादा, भाऊ, अप्पा आदी टोपणनावे लावून घेण्यात पटाईत आहेत. मात्र, या महापालिका निवडणुकीदरम्यान पारंपरिक अण्णा, भाऊ, दादा या टोपणनावांना फाटा देऊन विशेषणे लावण्याला अधिक महत्त्व देण्यात आल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी काँग्रेसशी एकनिष्ठ

$
0
0

पक्षांतराचा विचार नसल्याचे उपमहापौर अलगुडे यांच्याकडून स्पष्ट
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘काँग्रेस पक्षाचा पहिल्यापासून आपण क्रियाशील कार्यकर्ता असून इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा कोणताही विचार नाही,’ असे उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांचा पक्षांतरावरून सुरू असलेल्या चर्चेला सोमवारी पूर्णविराम मिळाला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या दहा आजी-माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आणखी काही विद्यमान नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपसह अन्य पक्षात प्रवेशाच्या तयारीत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि उपमहापौर अलगुडे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची जोरदार चर्चा सुरू होती. अलगुडे भाजप किंवा सेनेच्या वाटेवर असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल, असे सांगितले जात होते. या चर्चेचा अलगुडे यांनी इन्कार केला.
‘बालवयापासून आपण काँग्रेसचे काम करत आहोत. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणूनच मी आजवर काम केले आहे. यापूर्वी पक्षाने तिकीट नाकरल्यानंतर देखील मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि निवडून आलो. मात्र, विजयी झाल्यानंतर काँग्रेसच्या सोबतच राहिलो. पक्षाने मला तीन टर्ममध्ये दोन वेळा स्थायी समितीवर आणि एकदा उपमहापौर या पदावर संधी दिली आहे. त्यामुळे अन्य पक्षात जाण्याच्या संबंधच नाही,’ असा खुलासा उपमहापौर अलगुडे यांनी केला.
०००००००००००००
मी लहानपणापासून काँग्रेसचे काम करत आहे. काँग्रेसने तिकीट नाकारल्यावर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र, जिंकून आल्यावर मी काँग्रेसच्या सोबतच राहिलो आहे. पक्षाने मला तीन टर्ममध्ये दोन वेळा स्थायी समितीवर आणि उपमहापौर म्हणून संधी दिली आहे. त्यामुळे मी पक्षांतर करण्याचा संबंध नाही.
- मुकारी अलगुडे, उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतिम मतदार यादी शनिवारी जाहीर होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय मतदार याद्यांवर हरकती-सूचना नोंदविण्याचा आज, मंगळवारी अखेरचा दिवस आहे. बऱ्याच मतदारांची नावे वेगळ्याच प्रभागात गेल्याची तक्रार केली जात असून, येत्या शनिवारी (२१ जानेवारी) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
निवडणूक आयोगाने पाच जानेवारीला विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली होती. शहरातील ४१ मतदारसंघांमध्ये यादीतील मतदारांचे विभाजन करण्यात येऊन गेल्या गुरुवारी प्रा-रूप मतदारयादी जाहीर करण्यात आली होती. त्यावर, हरकती-सूचना नोंदविण्यासाठी मंगळवारपर्यंतची मुदत आहे. महापालिकेचे सावरकर भवन येथील निवडणूक कार्यालय; तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मंगळवारी कार्यालयीन वेळेत नागरिकांना हरकती दाखल करता येतील.
सोमवारी सायंकाळपर्यंत शहरातील ४६० नागरिकांनी मतदार यादीबाबत विविध तक्रारी दाखल केल्या आहेत. मंगळवारी, अखेरच्या दिवशी हरकतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एका प्रभागातील नावे दुसऱ्याच प्रभागात गेल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली. नागरिकांनी दाखल केलेल्या हरकतींची तपासणी करून पुढील चार दिवसांत आवश्यकतेनुसार दुरुस्ती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील सर्व ४१ प्रभागांची अंतिम मतदारयादी २१ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदारयादीत घोळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मतदारयाद्या फोडताना अनेक मतदारांची नावे आसपासच्या प्रभागांमध्ये दाखवली गेल्याच्या त्रासाला सध्या उमेदवार सामोरे जात आहे. मतदार याद्यांमध्ये आपले मतदार शोधताना उमेदवारांना नाकीनऊ आले असून मतदार दुरुस्तीसाठी त्यांना धाव घेतली आहे.

मतदारयाद्यांतील घोळामुळे बहुतांश उमेदवार वैतागले असल्याचे चित्र आहे. नवीन ​मतदार याद्या तयार करताना त्या फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी राहणारे मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागांमध्ये दाखवण्यात आली आहेत. काही ठिकाणी तर एकाच घरातील व्यक्तींची नावे वेगवेगळ्या ठिकाणी आली आहेत.
मतदारयाद्यांमध्ये नाव नोंदणीसाठी गठ्ठ्याने अर्ज स्वीकारायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अनेक ठिकाणी मान​नीयांनी यंत्रणेला हाताशी धरून गठ्ठ्याने अर्ज दिले आहेत. या बहुतांश अर्जांची नोंदणीच झाली नसल्याचे उघड झाले आहे. काही इच्छुकांकडून तर आपल्याला मानणाऱ्या मतदारांची नावे यादीत दिसत नसल्याने ते हवालदील झाल्याचे चित्र आहे. अनेक उमेदवारांनी स्वतंत्र एजन्सी नेमून ‘मिसिंग मतदारां’चा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. ज्या मतदारांचा प्रभाग बदलला गेला आहे, त्यांनी दुरूस्तीसाठी अर्ज केले आहेत. मात्र, दाद मागणाऱ्या मतदारांची संख्या संख्या अत्यंत कमी आहे.

गठ्ठ्याने अर्ज दिले गेले नसल्याने मतदारांना अर्ज पोहोचल्याची पावती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा अर्जदारांना प्रशासनाकडे दादही मागता येत नसल्याचे अडचण झालेली आहे. निवडणूक आयोगाने पाच जानेवारीपर्यंतची यादी अंतिम धरण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मतदार याद्यांतील चुकीची दुरुस्ती केवळ करता येणार आहे. त्यासाठी हरकती, सूचना मागवण्यात आल्या आहेत.
...
मतदार याद्या फोडताना अनेक चुका झाल्या असून त्याचा फटका मतदारांना बसला आहे. शहरातील सर्व ४१ प्रभागांमध्ये अशा प्रकारच्या गोंधळाची स्थिती आहे. प्रशासानाने अजून थोडा वेळ घ्यावा, मात्र मतदारांना त्यांच्या सोयीनुसार नावे याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात यावीत. हा गोंधळ पाहून प्रशासानाने कोणाला तरी फायदा व्हावा, या अनुषंगाने याद्या फोडल्या आहे की काय, अशी शंका येत आहे.
- प्रशांत जगताप, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अठरा ते वीस जानेवारी शाळा सुरूच राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सोशल माध्यमांवर काही संघटनांकडून तीन दिवस शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे संदेश फिरत आहेत. हा संदेश खोटा आणि चुकीचा असून, कोणत्याही संघटनेने असा निर्णय घेतलेला नसल्याचे शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे १८ ते २० जानेवारी दरम्यान शाळा सुरूच राहणार आहेत.
शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या मागण्यांसाठी १८ ते २० जानेवारी दरम्यान राज्यातील सर्व शाळा बंद राहणार असल्याची माहिती सोमवारी सोशल माध्यमांवर व्हायरल झाली. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी शाळाबंदची चर्चा चुकीची असल्याचे सांगितले. राज्य सरकारी कर्मचाऱ्य़ांनी तीन दिवस संप पुकारला आहे. या संपाला महामंडळाचा पाठिंबा आहे. केवळ १९ जानेवारी रोजी महामंडळातर्फे सर्व जिल्हाधिकारी कार्यालर्यासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी शाळा बंद ठेवल्या जाणार नाही, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. याला राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे आर. पी. जोशी यांनीही दुजोरा दिला. महामंडळाच्या निर्णयाला आमचाही पाठिंबा आहे. त्यामुळे तीनही दिवस शाळा सुरूच राहतील, असे जोशी यांनी सांगितले.
राज्यातील संस्थाचालकांनी शाळा बंदचा निर्णय घेतला नसल्याने आमचाही त्याला पाठिंबा नाही. संस्थाचालकांनी आदेश दिले, तर आम्ही शाळा बंद ठेवू. मात्र, अद्याप तसा निर्णय झालेला नाही. त्यामुळे शाळा सुरूच राहतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष रावसाहेब आवारी यांनी दिली. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष एच. एम. गायकवाड यांनी देखील शाळा बंद ठेवण्याचा अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्वेकडील रिंग रोडला मान्यता

$
0
0

राज्य सरकारकडून अध्यादेश जारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) दोन टप्प्यांत तयार करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या पूर्व भागाला मान्यता देणारा अध्यादेश राज्य सरकारने जारी केला आहे. या रस्त्याला ‘विशेष राज्यमार्गा’चा दर्जा देण्यात आला आहे. ‘एमएसआरडीसी’च हा रस्ता तयार करणार आहे. या कामासाठी पर्यावरण, वन विभागाच्या मान्यता; तसेच भूसंपादनाच्यादृष्टीने प्रशासकीय प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानेही (पीएमआरडीए) रिंग रोड आखला आहे. मात्र, हा रिंग रोड दोन्ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या जवळून जाणारा आहे. ‘एमएसआरडीसी’चा रिंग रोड दोन्ही शहरांपासून दूर अंतरावर आहे. ‘एमएसआरडीसी’च्या रिंग रोडचा विकास आराखडा तयार करून अंमलबजावणीच्यादृष्टीने ‘एमएसआरडीसी’ने सुरवात केली आहे. ‘पीएमआरडीए’च्या रिंग रोडला नुकतीच मान्यता मिळाली आहे.
‘एमएसआरडीसी’कडून बनवण्यात येणारा रिंग रोड पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांच्या बाहेरून जाणारा, १०० किलोमीटर लांबीचा आणि ११० मीटर रुंदीचा आहे. त्यामध्ये दोन टप्पे आहेत. उर्से ते खेडशिवापूर हा पूर्व भागाचा पहिला टप्पा असेल. पूर्व भागातील रिंग रोडबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. दुसऱ्या टप्प्यात खेड शिवापूरपासून कल्याण - मालखेड - मुठा - पौड येथील चाले आणि गोडांबेवाडी - पिंपळोली - चांदखेड - परंदवाडी येथून पुणे - मुंबई एक्स्प्रेस हायवेपर्यंतचा समावेश आहे. या रस्त्याच्या दोन टप्प्यांपैकी सुरुवातीला पूर्व भागाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या मार्गामध्ये वन खात्याची जमीन आहे. त्यामुळे वन खात्याच्या परवानगीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या रस्त्यासाठी पर्यावरण विभागाचीही परवानगी अत्यावश्यक आहे. त्या प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली आहे. या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे ‘एमएसआरडीसी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यातील रस्ता
- उर्से येथे पुणे मुंबई एक्स्प्रेस-वेजवळ रिंग रोडला सुरुवात होईल.
- उर्सेपासून मावळ तालुक्यामधील वडगावपासून-काटवी - आंबी - आकुर्डीपर्यंत.
- आकुर्डीनंतर राज्य मार्ग क्रमांक ५०वरील नानोली - यलवडी - देहू - निघोजे - मोई - कुरळी - ​चिंबळीपर्यंत.
- चिंबळी येथून पुणे नगर रस्स्त्यारील आळंदी-चिंचोली खुर्द - सोकी - गोळेगाव - भावडी - लोणीकंद
-लोणीकंद येथून जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवरील बकोरी - वाडेबोल्हाई - भिवरीपर्यंत.
- भिवरी येथून सासवड रस्त्यावरील आळंदी म्हातोबाची - लोणीकाळभोर - वडकीपर्यंत.
-वडकी येथून होळकरवाडी - वडाची वाडी - आसकरवाडी - गोगलेवाडी - वेळू - शिवरे आणि राज्य महामार्ग क्रमांक चारजवळील खेड शिवापूरपर्यंत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंड मार्गावर ‘डेमू’ची चाचणी

$
0
0

उपनगरीय प्रवासी सेवेच्या आशा पुन्हा पल्लवित

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-दौंड रेल्वे मार्गावर उपनगरीय प्रवासी सेवा सुरू करण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या मार्गावर सध्या लोकल (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) सेवा सुरू करणे शक्य नसल्याने रेल्वे प्रशासनाने डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) रेल्वे गाडीचा पर्याय अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंगळवारी या मार्गावर ‘डेमू’ची चाचणी घेण्यात येणार आहे.

पुणे-दौंड मार्गावर लोकल सेवा सुरू करण्यासाठी अनेक गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे. सद्यपरिस्थितीत लोकल सेवा सुरू करणे अवघड आहे. त्यामुळे या मार्गावर ‘मेमू’द्वारे (मेन लाइन मल्टिपल युनिट) उपनगरीय सेवा देण्याचा मध्य रेल्वेचा प्रस्ताव आहे. त्यासाठी रेल्वे बोर्डाकडे सहा ‘मेमू’ रेकची मागणी करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी गेल्या आठवड्यात दिली होती. तसेच, या मार्गावर उपनगरीय सेवा नेमकी केव्हा सुरू होईल, याबाबत निश्चित कालमर्यादा सांगू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर दहाच दिवसात रेल्वे बोर्डाकडून पुणे रेल्वे प्रशासनाला दहा रेकची ‘डेमू’ गाडी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या गाडीद्वारे सेवा देणे शक्य आहे का, याची चाचपणी घेण्यात येत आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास पुणे-दौंड मार्गावर लवकरच उपनगरीय सेवा देणे शक्य होईल, अशी माहिती वरिष्ठ व्यवस्थापक (वाणिज्य) कृष्णात पाटील यांनी दिली.

लोकल अर्थातच ‘इमू’ने प्रवासी सुरू करण्यास सध्या अनेक अडथळे आहेत. त्यामध्ये मांजरी, कडेठाण आणि खुटबाव या स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याची गरज आहे. कारण, येथील प्रवाशांना ‘इमू’मध्ये चढ-उतार करणे शक्य होणार नाही. या पार्श्वभूमीवर डब्यामध्ये चढ-उतारासाठी पायऱ्या उपलब्ध असलेल्या ‘डेमू’ गाडीचा पर्याय यशस्वी झाल्यास लवकरच सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

मांजरी, कडेठाण व खुटबाव या स्टेशनच्या विकासासह अन्य काही बाबींच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेला निधी देखील लवकरच उपलब्ध होण्याचे संकेत आहे. त्यामु‍ळे या मार्गावर आवश्यक ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये असलेला निधीचा अडथळाही दूर होऊन, कामे लवकर होतील, अशी अपेक्षा आहे.- कृष्णात पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक (वाणिज्य), पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा रुपयांच्या वादातून आयुष्याची राखरांगोळी

$
0
0

जाळून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहा रुपयांवरुन झालेल्या वादातून मारहाण झाल्यामुळे महिलेने स्वतःला जाळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार जनवाडी परिसरात घडला. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिसांनी बारा वर्षाच्या मुलीला ताब्यात घेतले असून, अन्य दोघांना अटक केली आहे.

सुदरम्मा परशुराम शेलार (वय ३०) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मयत महिलेचे पती परशुराम शेलार (वय ३०, रा. जनवाडी) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून हरिश लक्ष्मण गायकवाड (वय १९) याच्यासह ३५ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. तर, बारा वर्षीय मुलीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलार आणि आरोपी हे एकमेकांच्या घराजवळ राहतात. मयत शेलार आणि त्यांचे पती सेंट्रिंगची कामे करतात. शेलार यांचा मुलगा राहुल १२ जानेवारी रोजी दहा रुपये घेऊन दुकानात जात होता. त्यावेळी आरोपी महिलेच्या बारा वर्षांच्या मुलीने त्याच्याजवळील रक्कम हिसकावली. त्यामुळे राहुल रडतरडत घरी गेला. घडलेला प्रकार त्याने आईला सांगितला. त्यानंतर शेलार हिसकावलेले पैसे परत आणण्यासाठी आरोपीकडे गेल्या. त्यावेळी आरोपी आणि शेलार यांच्यात वाद झाला. आरोपींनी शेलार यांना शिवीगाळ करून केस धरून हाताने मारहाण केली. तसेच, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

सर्वांसमोर मारहाण केल्याचा प्रकार शेलार यांना सहन झाला नाही. भांडणानंतर त्या घरी गेल्या. तेथे त्यांनी डिझेल ओतून जाळून घेतले. त्यात शेलार ८० टक्के भाजल्या. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची माहिती कळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. तसेच, शेलार यांच्या पतीची तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला.

उपचारादरम्यान श्रीमती शेलार यांचा रविवारी मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणी सहायक निरीक्षक एस. एम. बोबडे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images