Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भारतीय महिन्यांनुसार राष्ट्रीय दिनदर्शिका

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंचा’तर्फे राष्ट्रीय दिनदर्शिकेची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय महिन्यांनुसार ही दिनदर्शिका बनविण्यात आली आहे. शक संवतनुसार तारखांचा वापर कोठे व कसा करता येतो, याची माहितीही या दिनदर्शिकेत देण्यात आली आहे.

या दिनदर्शिकेत तिरंगी राष्ट्रध्वजाबाबत संपूर्ण माहिती, राष्ट्रीय फळ, फूल, प्राणी, पक्षी, राष्ट्रगीत, राजमुद्रा, राष्ट्रीय दिनदर्शिकेचा इतिहास आदी माहितीचा समावेश आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार भारतीय सौर वर्षातील तारखा काढण्याचा फॉर्म्युला, धनादेशावर राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणे तारीख कशी घालावी आदी माहितीही या दिनदर्शिकेत असल्याची माहिती गिरीश दातार, संदीप पाठक, आनंद देशमुख, अभय मराठे आणि दिलीप खोडेगावकर आदींनी दिली.

ही दिनदर्शिका शक संवतनुसार बनविण्यात आली आहे. याचा वापर गॅझेटसाठी, राष्ट्रीय वाहिन्यांवरील बातम्यांसाठी, सरकारी दिनदर्शिकेसाठी, सरकारी पत्रव्यवहारासाठी केला जातो. कायद्यानुसार पॅन कार्डही राष्ट्रीय तारखेनुसार मागता येते. एक एप्रिल १९५७नंतर जन्मलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जन्म प्रमाणपत्रावर त्यांचा जन्म दिनांक राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणेही नमूद करणे आवश्यक आहे. तसेच, रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार धनादेशावरही राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणे तारीख घालण्याची परवानगी आहे. त्याविषयीच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशाची माहिती व क्रमांकही या दिनदर्शिकेत देण्यात आला आहे. त्यासाठी कोणी नकार दिल्यास अथवा अडचण आल्यास bhartiya.kalganana@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरेसे पाणी देणार

0
0

रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस

पुणेकरांना महापालिका खर्चातून २४ तास पाणी कसे पुरवता येईल, हा प्रयत्न राहील. पेठांमधील पाण्याच्या जुन्या लाइन बदलण्यात येतील. उपनगरांमध्ये आजही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शहरात सगळीकडे पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यात येईल.
शहरातील पार्किंगची समस्या बिकट आहे. पालिकेच्या मोकळ्या जागांमध्ये मल्टीस्टोअर पार्किंग करण्याचा प्रयत्न राहील. बाजारपेठांमध्ये खासगी जागांवर पार्किंग करण्यासाठी जमीन मालकाला पुरेसा मोबादला देण्यात येईल. शहरात पुरेशी पार्किंग व्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न असेल.
सुरक्षेच्या दृष्टीने शहरात ‘सीसीटीव्ही’चे जाळे अधिक विणण्याचा प्रयत्न असेल. महिलांच्या सुरक्षेसाठी ‘सीसीटीव्हीचा’ वापर प्रभावी वापर करण्यावर भर असेल. महिला, ज्येष्ठ नागरिक सुरक्षेसाठी हेल्पलाइन तयार करण्यात येईल. शहरात अनेक ​ठिकाणी मजूर अड्डे आहेत. ते अद्ययावत करण्यावर आमचा भर राहणार आहे. या अड्ड्यांना शेड टाकणे, तेथे पिण्याची पाणी; तसेच स्वच्छतागृहांची उपलब्धता करण्यात येईल.
कचरा निर्मूलनासाठी सर्व प्रभागांमध्ये ओला, सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प सुरू करण्यात येतील. प्रभागात शक्य असेल, तर तेथे अथवा किमान क्षेत्रिय कार्यालयांच्या स्तरावर तरी कचऱ्यातून वीज निर्मिती करणारा प्रकल्प सुरू करण्यात येईल. गरीब नागरिकांना आरोग्य सेवा परवडत नाही. त्यासाठी प्रत्येक प्रभागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येतील. अल्पदरात रुग्णवाहिका, दंतचिकित्सा, आयुर्वेदिक दवाखाने सुरू करण्यात येतील.
महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही. महापालिकेच्या जागांवर बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करण्यात येतील. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेलची वानवा आहे. महापालिकेच्या माध्यमातून हे हॉस्टेल उभे करण्याचा मानस आहे; तसेच महिलांसाठी शौचालयांची संख्या तुलनेने कमी आहे. ठरावीक अंतरावर ही शौचालये वाढवण्यासाठी प्रयत्न असेल.
ज्येष्ठ नागरिकांसाठी पीएमपीच्या मोफत पासची सुविधा देण्यात येईल. त्यांच्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात येईल. महापालिका शाळांतून उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत ‘टॅब’ देण्यात येईल. महापालिकेच्या प्रत्येक शाळात ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करण्यात येईल. दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलतींच्या दरात पास देण्यात येतील. या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे इंग्रजी बोलता यावे, यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये इंग्रजीचे क्लास सुरू करणार आहोत.
वाहतूक हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसने मेट्रोचे काम सुरू केले होते. मेट्रोचे श्रेय कोणी घ्यावे, ही वेगळी बाब आहे. मात्र, हे काम जलतगतीने झाले पाहिजे, यासाठी काँग्रेस प्रयत्न करेल. पीएमपी बस वाढवण्यात येतील. त्यांची वारंवारिता वाढवण्यात येतील. शहराच्या मध्यवस्तीत लहान बस उपलब्ध करू. सायकल स्टेशन, सायकल मार्ग सुरू करण्यात येतील.
शहरातील ४२ टक्के लोक झोपडपट्टीमध्ये राहतात. प्रत्येक झोपडीधारकाला ५०० स्क्वेअर फूटचा फ्लॅट मिळाला पाहिजे, अशी काँग्रेसची मागणी आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टीत मुलांना शिक्षण देणे, त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी महोत्सव भरवण्यात येतील; तसेच झोपडपट्टीतील बालगुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस प्रयत्न करण्यात येतील.
आठवडे बाजार, फेरीवाले, स्टॉलधारक यांचे सर्व्हेक्षण करू. नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी नदी सुधारणा, घाटांचे जिर्णोद्धाराचा कार्यक्रम हाती घेण्यात येतील. ग्रे-वॉटर प्रक्रिया करून त्याचे पुनर्वापर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महापालिकेत सांस्कृतिक विभाग स्वतंत्र सुरू करण्यात येईल. ओपन आर्ट गॅलरी सुरू करणे, सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ नेमणे आणि महापालिका शाळातील विद्यार्थ्यांना त्यांचा उपयोग करून देणे, असा प्रयत्न असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबांच्या साहित्याने रसिक भारावले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘थांबला न सूर्य कधी, थांबली ना धारा.. धुंद वादळास कोठला किनारा..,’ अशा शब्दांतून जगण्याचे वास्तव मांडणारे थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे जीवनदर्शन रसिकांना रविवारी घडले. बाबांच्या साहित्याची अनुभूती घेताना त्यांच्या जीवनप्रवास रसिकांना अंतर्मुख करून गेला.

निमित्त होते, ‘करुणोपनिषदे’ या कार्यक्रमाचे. बाबा आमटे यांच्यात दडलेल्या संवेदनशील साहित्यिकाचा वेध घेणारा ‘करुणोपनिषदे’ हा संगीतमय कार्यक्रम रविवारी सृजन महोत्सवात सादर झाला. या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, डॉ. अमित त्रिभुवन यांनी अभिवाचन केले. काळे यांच्यासह अंजली कुलकर्णी यांनी गाणी सादर केली. संगीतकार नरेंद्र भिडे यांनी हार्मोनियमवर, तर अपूर्व द्रविड यांनी तबल्यावर साथसंगत केली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी रसिकांमध्ये बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. ‘सृजन फाउंडेशन’चे प्रमुख प्रकाश पायगुडे यावेळी उपस्थित होते.

गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात हेमलकसा, आनंदवनसारखे प्रकल्प उभारताना आलेल्या अडचणी, अनुभव, कुष्ठरोग्यांची सेवा करताना अनुभवलेले आणि असह्य वेदनांनी भरलेल्या आयुष्याचे संचित बाबा आमटे यांनी लिहून ठेवले आहे. आमटे यांच्या साहित्याने रसिक भारावून गेले. त्यांनी लिहिलेल्या उताऱ्यांतून आणि रचलेल्या कवितांतून जगण्याचे सत्य अगदी चपखलपणे मांडण्याचा प्रयत्न या वेळी झाला.

बाबांचे कार्य काव्य आणि उताऱ्यांमधून अनुभवताना आपण किती छोटे आहोत याची जाणीव झाली. बाबांची शब्दरूप भेट यानिमित्ताने घडली. वसंत पोतदारांमार्फत मी आमटे कुटुंबीयांच्या संपर्कात आलो. त्याला ४४ वर्षे लोटली आहेत. परंतु, त्या काळात त्यांनी कसे काम उभे केले असेल, हे पाहिले तर आजही अंगावर काटा येतो.

नाना पाटेकर, अभिनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉरिशसमध्ये मराठी पताका

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्रात मराठी टिकेल की नाही, याबाबत चर्चा असताना मॉरिशसमध्ये मात्र मराठी अस्मिता टिकून आहे. मराठी कुटुंबाचे चौथ्या पिढीचे प्रतिनिधी डॉ. बीदन अब्बा हे मराठी धर्माचे असल्याचे अभिमानाने सांगतात.

डॉ. अब्बा हे मॉरिशस येथील ‘महात्मा गांधी इन्स्टिट्यूट’चे मराठी विभागप्रमुख आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या ‘मराठी गझलेचा जागतिक संचार’ या चर्चासत्रात ते सहभागी झाले आहेत. यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला.

डॉ. अब्बा म्हणाले, ‘मॉरिशसमध्ये १९ व २०व्या शतकात फ्रेंच व इंग्रजांचे राज्य होते. मॉरिशसमध्ये दगडाखाली सोने सापडते, असे आमिष दाखवून इंग्रजांनी कोकणातून लोकांना तिथे नेले व गुलाम बनविले. डॉ. अब्बा यांचे पूर्वजही त्यापैकीच एक होते. मॉरिशसची राज्यभाषा इंग्रजी, तर राजभाषा क्रिओल आहे. क्रिओल ही भाषा फ्रेंच भाषेतून निर्माण झाली आहे. या भाषेवर भोजपुरी, हिंदी, तमीळ, तेलगू, उर्दू, मराठी या भाषांचा प्रभाव आहे. मॉरिशसची लोकसंख्या १२ लाख असून मराठी भाषिक ४८ हजार आहेत. माझे पणजोबा १८५८ मध्ये सिंधुदुर्ग येथून मॉरिशसला गेले. त्यानंतर भारताशी आमचा संपर्क तुटला. मी चौथ्या पिढीचा प्रतिनिधी आहे. पणजोबांचे नाव आप्पाजी होते, इंग्रजांनी ते अब्बा केले व तेच आमचे आडनाव झाले. आमचे मूळ गाव व नातेवाईक यांच्या मी शोधात आहे.’

डॉ. बीदन अब्बा हे नाव अरेबिक वाटेल; पण ते आहेत मराठी. मॉरिशसमध्ये ते विद्यार्थ्यांना मराठीचे धडे देतात. त्यांची मराठी कानाला थोडी जड वाटते. मॉरिशसमध्ये भाषेवरून धर्म ठरतो. मराठी भाषिक मराठी धर्माचे म्हणून ओळखले जातात. डॉ. अब्बा यांना मराठी धर्माचा अभिमान आहे. डॉ. अब्बा यांना संत तुकाराम महाराज, रामदास स्वामी यांचे अभंग, श्लोक मुखोद्गत आहेत. वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी त्यांचे आवडते लेखक आहेत. मॉरिशसमध्ये या लेखकांचा प्रभाव आहे. डॉ. अब्बा यांची पाच मराठी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

मॉरिशसमध्ये प्राथमिक शाळेत मराठी

डॉ. अब्बा म्हणाले, ‘मॉरिशसमध्ये १९६५पासून प्राथमिक शाळेत मराठी शिकवली जाते. त्यानंतर वीस वर्षांनी ती माध्यमिक व उच्च शिक्षणात समाविष्ट झाली. ‘महात्मा गांधी इन्स्टिट्यूट’चे उद्घाटन १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले. तेव्हापासून ही संस्था भारतीय भाषांसाठी काम करत आहे. २००२पासून आम्ही मराठी विषयात पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मराठी घरामध्ये क्रिओल ही भाषा बोलली जाते. मराठी शिकलेले मराठीत संवाद साधतात. तरुण पिढीने भाषा शिकण्याचे प्रमाण कमी असले तरी आमचे प्रयत्न सुरू आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवास निर्धोक केव्हा होणार?

0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com
पुणे ः शहरात पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस, रिक्षा खासगी कंपन्यांच्या प्रवासी कॅब आणि लोकलने प्रवास करताना गर्दीचा फायदा घेऊन, महिला प्रवाशांची छेड काढणे, अश्लील वर्तन करणे, उद्धटपणे बोलणे या गोष्टी सर्रासपणे घडतात. मात्र, महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने त्यांची सुरक्षा रामभरोसेच आहे.
आयटी इंजिनीअर तरुणीला तिच्यासोबत काम करणाऱ्या तरुणाने प्रेम प्रकरणातून कॅबमध्येच मारहाण करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात पहाटेच्यावेळी खडकी बाजार येथे घडली; तसेच काही वर्षांपूर्वी कॅब ड्रायव्हरने आयटी कंपन्यांतील तरुणींवर बलात्कार करून त्यांचा खून केल्याच्याही घटना घडून झाल्या आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात खडकी बाजार येथे घडलेल्या घटनेने महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
केंद्र सरकारने ‘महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने देशभरातील सार्वजनिक वाहतुकीच्या सर्व बसेसमध्ये आपत्कालीन बटन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि व्हेइकल ट्रॅकिंग डिव्हाइस बसविणे बंधनकारक केले आहे. जून २०१५ मध्ये याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सध्या राजस्थान राज्य महामार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रायोगिक तत्त्वावर दहा लक्झरी आणि दहा साधारण बसमध्ये आपत्कालीन बटन, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही हा नियम पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये लागू करण्यात आलेला नाही.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची पीएमपी ही लाइफ लाइन आहे. पीएमपीचा संचित तोटा वाढत चालला असला, तरीही सकाळी व सायंकाळी अनेक बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्याचे दिसून येते. या गर्दीमध्ये महिला प्रवाशांशी गैरवर्तन करण्याचे प्रमाण आजही जास्त आहे. या प्रकारांकडे सर्रासपणे डोळे झाक केली जाते. एखाद्या महिलेने आवाज उठविलाच, तर त्यावर फक्त तत्कालिक उपाय केला जातो. मात्र, हे प्रकार कायमस्वरूपी थांबविण्यासाठी काहीच योजना नाही; तसेच रात्री दहानंतर पीएमपीच्या बस स्टॉपवर थांबणाऱ्या महिला प्रवाशांना अनेक वाईट अनुभव आलेले आहेत.
शिवाजीनगर, पुणे स्टेशन व स्वारगेट येथून मोठ्या प्रमाणावर शेअर रिक्षा चालतात. या रिक्षांमध्ये तीन ते चार प्रवासी बसविले जातात. यामध्ये महिला प्रवाशांची कुंचबणा होते. रात्रीच्या वेळेला काही रिक्षाचालक मद्यपान करून रिक्षा व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास येते. अशा वेळी महिलेची जबाबदारी कोणावर, हा प्रश्नच आहे. लोकलमध्ये रात्री महिलांच्या डब्यात घुसून पैशांसाठी त्रास देणाऱ्या तृतीय पंथीयांची संख्या अधिक आहे. ही परिस्थिती पाहता पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये महिला प्रवाशांसाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची तातडीची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पिफ’मधून एमटीडीसीची ‘एक्झिट’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (पिफ) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) बाहेर पडल्याने यंदा लघुपटांच्या स्पर्धेला विद्यार्थी मुकले आहेत.

पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने एमटीडीसीने दोन वर्षांपूर्वी विविध स्थळांवर आधारित लघुपट स्पर्धेला सुरुवात केली. तीन विभागांत ही स्पर्धा दर वर्षी घेतली जाते. ‘पिफ’च्या स्पर्धात्मक विभागामध्ये आपल्या कलाकृती सादर करण्याची संधी विविध कलात्मक संस्थेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. त्यामुळे या स्पर्धेची विद्यार्थी वाट पाहतात. गेल्या वर्षी ‘औरंगाबाद अँड अ टुरिस्ट डेस्टिनेशन’, ‘वाइल्ड लाइफ ऑफ विदर्भ’ (ताडोबा) आणि ‘कोकण - बीचेस अँड स्कुबा ड्रायव्हिंग’ अशा तीन विभागांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती.

स्पर्धेच्या पारितोषिकाची रक्कम अनुक्रमे एक लाख २५ हजार रुपये व ७५ हजार रुपये अशी होती. परंतु, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांना मे महिन्यात पारितोषिकाची रक्कम हातात पडली. याबाबत नाराजी व्यक्त झाली असतानाच स्पर्धेचीच ‘एक्झिट’ झाल्याने विद्यार्थ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एमटीडीसीकडून स्पर्धेचा प्रस्तावच आला नसल्याचे ‘पिफ’च्या आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. आमचे एकामागोमाग एक अनेक महोत्सव झाले आहेत. त्यामुळे ‘पिफ’मधील लघुपट स्पर्धेचे आयोजन करता आले नाही. पुढच्या वर्षी स्पर्धा होईल, असे एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


अनेक महोत्सवांमुळे ‘पिफ’मधील लघुपट महोत्सवाचे आयोजन करायला फारसा वेळ मिळाला नाही. तरीही, पिफमध्ये आम्ही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सहभागी होऊ. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्या आम्ही संपर्कात आहोत. पुढच्या वर्षी ही स्पर्धा पुन्हा आयोजित केली जाईल.

स्वाती काळे, सरव्यवस्थापक, एमटीडीसी


यंदा एमटीडीसीकडून ‘पिफ’मध्ये लघुपट महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे ही स्पर्धा होणार नाही. पुढील वर्षी एमटीडीसी मोठ्या प्रमाणात महोत्सवात सहभागी होणार आहे.

- डॉ. जब्बार पटेल, संचालक, पिफ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीचा तिढा कायम

0
0

Rohit.Athavale

@timegroup.com

Tweet - @AthavaleRohitMT

पिंपरी : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडून युतीसाठी आयोजित केलेल्या बैठकांमध्ये सकारात्मक चर्चेऐवजी ‘मैत्रीपूर्ण’ चर्चेचा सूर उमटू लागला आहे. सांगवी-पिंपळेगुरव मधील ठरावीक प्रभागांसाठी अडून बसलेल्या भाजप-सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांमुळे युतीचा तिढा अद्याप कायम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मध्यस्थीनंतर झालेल्या तीन बैठकांमधून काहीच निष्पन्न न झाल्याने कार्यकर्त्यांची चलबिचल वाढली आहे.

युती झाली तर ठीक, नाही तर शतप्रतिशतचा नारा भाजपने लावून धरला आहे. तर, नुकत्याच झालेल्या बैठकीला शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांच्या अनुपस्थितीबाबत तर्क लढविले जात आहेत. मान-सन्मानाच्या मुद्द्यांवरून चर्चा ताणली जात असताना संघाच्या शब्दाला महत्त्व नाही का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. आझम पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी पुरती गारद झाली आहे. तर, येत्या काळात दोन बड्या नेत्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे युती करायची गरज आहे का, असा काही सवाल भाजपच्या पहिल्या फळीतील काही पदाधिकाऱ्यांना पडला आहे. त्यातूनच तीन बैठका होऊनदेखील सकारात्मक चर्चा होत नसल्याचे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भोसरीपाठोपाठ चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदार संघातील अनेकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप वीस जानेवारीनंतर होणाऱ्या या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवित आहेत. राष्ट्रवादीमधील कोणत्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश करून घ्यायचा यावरून सध्या खलबते सुरू आहेत. युती करताना या प्रवेशांचादेखील विचार करावा लागणार आहे. त्यामुळे युतीची चर्चा आणि पक्षप्रवेश यानंतरच उमेदवारी निश्चित केली जाऊ शकते.

ठरावीक प्रभागांवर चर्चेचे घोड अडल्याने एखाद्या भागासाठी संपूर्ण युतीवर त्याचा परिणाम होता कामा नये, असेही बैठकीला उपस्थित असलेल्यांपैकी अनेकांना वाटते. अमुक प्रभागांसाठी ‘मैत्रीपूर्ण’चा सल्ला शहरातील सर्वच जागांसाठी असता कामा नये, असे मत युतीमधील कार्यकर्त्यांचे आहे. विधानसभेच्या मागील निवडणुकीत कोणत्या पक्षाला कोणत्या प्रभागातून किती मतदान झाले, याचा विचारदेखील जागा वाटप करताना व्हायला हवे असे भाजपचे म्हणणे आहे. तर, पारंपारिक मतदार असलेल प्रभाग शिवसेनेला मिळायला हवा, अशी शिवसेनेची सध्या तरी भूमिका आहे.

शिवसेनेच्या कोणत्याही निर्णयप्रक्रियेत संपर्क प्रमुखांचे मत महत्त्वाचे मानले जाते. परंतु, नुकत्याच झालेल्या बैठकीला संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांची अनुपस्थिती शहरातील काही पदाधिकाऱ्यांची अस्वस्थता वाढविणारी ठरली आहे. कारण या बैठकीला उपस्थित असलेल्या दोन खासदारांनी आणि आमदारांनी ठराविक प्रभागांबाबत घेतल्या निर्णयावरून तोडगा निघालेला नाही. त्यावरूनच पुढील बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. एकंदरीत आत्तापर्यंत झालेल्या तीनही बैठकांमधून शाब्दिक चकमकच घडल्याचे दिसून आले आहे. परंतु दोन्ही पक्षातील पदाधिकारी मात्र, सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा दिखावा करीत आहेत.

२५ प्रभाग भाजपला अनुकूल

भाजपकडून झालेल्या सर्व्हेतून शहरातील ६४ प्रभागांपैकी १३ प्रभागांमध्ये भाजपला ए+ वातावरण असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. तर, १२ प्रभागांसाठी ए वातावरण अशी परिस्थिती असल्याचे सर्व्हे करणाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रचार सुरू होण्यापूर्वीच ५० जागा भाजपला अनुकूल असल्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याने भाजपमधील पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. परंतु, असे असले तरी युती झाली पाहिजे असे संघाला वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचा ‘प्रतिसाद’ एका क्लिकवर

0
0

Chaitrali.chandorkar@timesgroup.com
पुणे - नोकरीसह विविध कारणांमुळे रात्री उशिरापर्यंत घराबाहेर असणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या संकल्पनेमधून पुणे ग्रामीण पोलिसांनी नुकतेच ‘प्रतिसाद’ हे अ‍ॅप सुरू केले आहे. अ‍ॅपमधील सुविधेनुसार अडचणीच्या काळात महिलांना एका क्लिकवर पोलिसांची मदत मिळणार आहे.
नोकरी करणाऱ्या महिलाच नव्हेत; तर गृहिणी, महिला, मुली, शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक यांना संकटसमयी तातडीने पोलिसांची मदत मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मोबाइलच्या प्ले स्टोअरमधून हे अ‍ॅप उपलब्ध आहे. ते डाउनलोड केल्यानंतर महिलेला तिची प्राथमिक माहिती विचारली जाईल. यामध्ये नाव, वय, पत्ता, रक्तगट, भ्रमणध्वनी क्रमांक आणि ओळखपत्राचा समावेश असेल. माहिती भरल्यानंतर संकटसमयी असताना आपली माहिती ज्या सक्षम नातेवाइकांना कळविणे गरजेचे आहे त्याचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक भरणेही अपेक्षित आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘इमर्जन्सी’ नावाचा लोगो मोबाइलच्या स्क्रिनवर दिसतो. संकटप्रसंगी हा लोगो बदलल्यानंतर महिला धोक्यात असल्याची माहिती तत्काळ पोलिसांना आणि नातेवाइकासही मिळणार आहे. संबंधित महिला ज्या परिसरात आहेत त्या ठिकाणची माहिती पोलिसांना देऊन प्रत्यक्ष कामास सुरूवात होईल. या सेवेसाठी स्मार्ट फोन, इंटरनेट आणि जीपीएस या सुविधा आवश्यक आहेत. ज्या नागरिकांना अ‍ॅप डाउनलोड करण्यात अडचणी येऊ शकतात त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन मदत घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. महिलांसंदर्भातील गुन्हे रोखण्यासाठी हे अॅप उपयोगी ठरले, असे पोलिसांनी सांगितले आहे.
‘अॅप’चा वापर वाढला
महिलाही सुरक्षेबद्दल जागरूक झाल्या आहेत. रात्रीअपरात्री होणाऱ्या प्रवासात सुरक्षेचा उपाय म्हणून सेफ्टी अ‍ॅपचा वापर वाढला आहे. महिला सुरक्षेसाठी अनेक कंपन्या, संस्था आणि पोलिसांनी तयार केलेले जवळपास दीडशेहून अधिक अॅप्लिकेशन सध्या कार्यरत आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून अडचणीत सापडलेल्या मुलींनी तत्काळ कुटुंबीयांशी अथवा मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधणे शक्य होते आहे. निर्भया प्रकरणानंतर पुण्यातील विविध कंपन्यांनीही कर्मचारी आणि तरुणींच्या सुरक्षेसाठी अॅप्लिकेशन तयार केली आहेत. पहिली वर्ष दोन वर्षे या अॅप्लिकेशनला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता महिला अधिक जागरूक झाल्या आहेत. मुख्यतः विथ अस, रक्षा, निर्भया, हिंमत, सेल्फ डिफेन्स, ट्रॅक यू अशी विविध अ‍ॅप प्ले स्टोअरला मोफत डाउनलोड करता येतात. अ‍ॅपमध्ये आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधावा, हे नंबर द्यावे लागतात. संकटप्रसंगी एक बटन दाबतातच कुटुंबीयांपर्यंत अलर्ट जातो आणि ट्रॅकिंग करणे सोपे जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आघाडीची प्राथमिक चर्चा निष्फळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने प्राथमिक चर्चा केली असली तरी त्यातून फारसे काही निष्पन्न झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापपर्यंत आघाडीबाबत सकारात्मक पुढाकार घेण्यात आलेला नाही. सन्मानाने आघाडी झाली तरच अनुकूल असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.

काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे आणि सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर प्रशांत जगताप आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यात आघाडीची प्राथमिक चर्चा झाली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. काँग्रेसने आघाडीसाठी एक पाऊल पुढे टाकून राष्ट्रवादी काँग्रेसला प्रस्ताव दिला आहे. दोन्ही पक्षांनी आपआपल्या सध्याच्या नगरसेवकांच्या जागा घ्यायच्या. अशा प्रकारे ८० जागांचे वाटप होईल. उर्वरित जागांमध्ये निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचा विचार करायचा आणि त्यानंतर राहिलेल्या जागांमध्ये गेल्या निवडणुकीत ज्या पक्षाच्या उमेदवाराला जादा मते असतील त्याला त्या जागा सोडण्यात याव्यात, असा प्रस्ताव काँग्रेसकडून देण्यात आला आहे. काँग्रेसच्या प्रस्तावानुसार काँग्रेसला ७१ तर राष्ट्रवादी काँग्रेलसा ९१ जागा मिळतील.

काँग्रेसकडून आघाडीबाबत विचारणा करण्यात आली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत कुठलिही प्रतिक्रिया दिलेली नाही. आघाडी करण्याचा निर्णय हा माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घेण्यात येणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून मौन पाळण्यात येत आहे. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यातील प्राथमिक चर्चेनंतरच आघाडीची कोंडी फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रवादीने काँग्रेसचे नगरसेवक फोडायला सुरुवात केल्याने आघाडी होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीकडून हालचाल होत नसल्याने काँग्रेसनेही स्वतंत्र लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत चारचा प्रभाग असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आघाडीचा लवकर व्हावा, यासाठी स्थानिक नेते प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला सुरक्षेसाठी ‘सीसीटीव्ही’ची मदत

0
0

Shrikrishan.Kolhe@timesgroup.com
पुणे ः महिलांसंदर्भातील गुन्ह्यांसाठी पुणे शहर पोलिसांकडून ‘सीसीटीव्ही’चा प्रभावी वापर केला जात आहे. गेल्या वर्षभरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून शंभर गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. त्यामध्ये साखळी चोरीबरोबरच इतर अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे; तसेच गर्दीची ठिकाणे, कॉलेज गेट परिसर या ठिकाणी महिलांच्या विरोधात गुन्हे घडू नयेत, म्हणून सीसीटीव्हीवरून लक्ष ठेवण्यात येत आहे.
संपूर्ण पुणे शहरावर सीसीटीव्हीतून नजर ठेवली जाते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात १२३४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यापैकी ९६५ कॅमेरे अचल आहेत, तर २३१ कॅमेरे फिरते आहेत. शहरातील संवेदनशील, गर्दीची ठिकाणे, महत्त्वाचे चौक, रस्ते या ठिकाणी हे कॅमेरे बसिवण्यात आले आहेत. सीसीटीव्हीचा नियंत्रण कक्ष पुणे पोलिस आयुक्तालयात आहे. या ठिकाणाहून चोवीस तास नजर ठेवली जाते. या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये कर्मचारी काम करतात; तसेच प्रत्येक पोलिस ठाण्याला त्यांच्या हद्दीत बसविलेल्या कॅमेरे पाहण्याची सोय करून देण्यात आली आहे. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात बसून पोलिस कर्मचारी समोर दिसणाऱ्या स्क्रीनवर सतत लक्ष ठेवून असतात. एखाद्या ठिकाणी काही गडबड आढळून आल्यास तत्काळ मार्शल व स्थानिक पोलिस ठाण्याला कळविले जाते. त्या ठिकाणी पोलिस जाऊन कारवाई करतात; तसेच अनेक वेळा गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठीदेखील या सीसीटीव्हीची मदत झाली आहे. गेल्या वर्षभरात सीसीटीव्हीवरून शंभर गुन्हे उघडकीस आले आहेत.
महिला संदर्भातील गुन्ह्यातदेखील पुणे पोलिसांकडून सीसीटीव्हीचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. महिलांचे दागिने हिसकाविणाऱ्या साखळी चोरांनाही सीसीटीव्हीच्या माध्यमातून पकडण्यात आले आहे; तसेच महिलांसंदर्भातील गुन्ह्यांत सीसीटीव्हीची मदत घेण्यात आली आहे. शहरात महिलांची गर्दी असणाऱ्या तुळशीबागेसारख्या परिसरात सीसीटीव्हीची नजर असते. महिलांची छेडछाड व टिंगळटवाळी करणाऱ्यांवर सीसीटीव्हीतून वॉच ठेवला जातो. शहरातील कॉलेजच्या गेट परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. या ठिकाणीही नियंत्रण कक्ष व पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीच्या स्क्रीनवरून सतत लक्ष ठेवले जाते. काही गडबड आढळून आल्यास त्या ठिकाणी तत्काळ मार्शलना पाठविण्यता येते. महिलांसंदर्भातील गुन्ह्यात विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आली असून, त्या दृष्टीने सीसीटीव्हीवरून महत्त्वाच्या ठिकाणी नजर ठेवली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस नियंत्रण कक्षात कॉलेजच्या बाहेरील कॅमेऱ्यावरून लक्ष ठेवण्यात येते. मात्र, ज्या कॉलेजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यांचे चित्रीकरणही पोलिस सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात बसून बघायला मिळावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कॉलेजमध्ये तरुणींना होणाऱ्या त्रासांच्या घटना कमी होण्यास मदत होणार आहे. असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष न्यायालयांचे कामकाज संथच

0
0

Vandana.Ghodekar@timesgroup.com
पुणे ः महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणे लवकर निकाली निघावीत म्हणून विशेष महिला न्यायालये स्थापन करण्यात आली असली, तरीही न्यायदानास विलंब होत असल्याचे चित्र आहे. अशा प्रकरणांची वाढती संख्या, प्रलंबित खटले, अपुरा कर्मचारी वर्ग, न्यायाधीशांपुढे असलेल्या खटल्यांची मोठी संख्या यामुळे विशेष कोर्टांच्या कामकाजावर परिणाम होत असून, त्यामुळे न्यायदानास विलंब होतो आहे. न्याय मिळण्यास विलंब लागत असल्यामुळे महिला अत्याचाराच्या केसेस दाखल करण्यासाठी पुढे येत नाहीत.
न्याय जलदगतीने मिळाल्यास; तसेच पोलिसांकडून तातडीने दखल घेऊन गुन्हे दाखल केले गेल्यास विनयभंगाची प्रकरणे दाखल करण्यासाठी महिला पुढे येतील. बेंगळुरू येथे झालेल्या विनयभंगांच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच महत्त्वाच्या शहरातील महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तरीही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढते आहे. समाजात आपली बदनामी होईल, पोलिसांकडून सहकार्य मिळेल याची खात्री नसल्याने; तसेच कोर्टात होणाऱ्या उलटतपासणीला आपण सामोरे जावू शकणार नाही या भीतीमुळे महिला विनयभंगाची प्रकरणे दाखल करण्यासाठी पुढे येत नाहीत.
विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीकडून अधिक त्रास दिला जावू शकतो किंवा गंभीर स्वरूपाचा हल्ला होऊ शकतो, या भीतीने महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर कोणताही वचक बसत नाही.
पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. मिलिंद पवार सांगतात, ‘महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या गंभीर घटना घडल्यानंतर सर्व यंत्रणा जागी होते. महिला अत्याचाराच्या केसेस तातडीने निकाली निघाव्यात म्हणून विशेष महिला न्यायालय स्थापन करण्यात येते. गंभीर घटनांची तीव्रता ताजी असेपर्यंत सर्व यंत्रणा कामाला लागलेली असते; परंतु पुन्हा सर्व प्रक्रियाच थंडावते.’ ‘विशेष महिला न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत; परंतु या न्यायालयांपुढे असलेल्या खटल्यांच्या संख्येमुळे आणि अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे न्याय मिळण्यास विलंब लागतो. विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये कोर्टात साक्ष देण्यासाठी आलेल्या महिलांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नसते. या महिलांना न्यायालयातील खटल्याची सुनावणी होईपर्यंत बसण्यासाठी वेगळी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षित वाटू शकेल,’ असेही अॅड. पवार म्हणाले.
पोलिसांकडे २०१६ मध्ये बलात्काराचे ३६४ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील ३५१ गुन्हे उघडकीस आले. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये ९७ टक्के आरोपी फिर्यादींच्या परिचयातील आहेत. यातील १३ टक्के आरोपी नातेवाइक आहेत. ६८ टक्के आरोपी ओळखीचे आहेत; तर १६ टक्के आरोपी शेजारचे आहेत. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या गुन्ह्यांचे प्रमाण ५० टक्के आहे. २०१६ मध्ये १७७ गुन्हे लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्यात आल्याचे आहेत. पुण्यात २०१५ या वर्षाच्या तुलनेत २०१६ मध्ये विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये सहा टक्के घट झाली असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी वार्षिक गुन्हे आढावा परिषदेत दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामती विभागात गुन्ह्यांच्या प्रमाणात घट

0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती
बारामती विभागात गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी बारामती अप्पर पोलिस अधीक्षक पथकाने उत्कृष्ट कामगिरी करून गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यात यश मिळवले आहे.
बारामती विभागात विविध गुन्ह्यांमधील एकूण ९६ पैकी ७८ आरोपींना अटक केली. गेल्या वर्षात बारामती विभागात खुनाच्या गुन्ह्यात २९ टक्के, खुनाचा प्रयत्न २८ टक्के, दरोडा ५७ टक्के, जबरी चोरी ३९ टक्के, घरफोडी ४० टक्के, वाहन चोरी १४ टक्के वाढ झाली. नवविवाहितांच्या मृत्यूंच्या गुन्ह्यांमध्ये तब्बल ८४ टक्के वाढ झाल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक तानाजी चिखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२०१५-१६ मध्ये सहा महिन्यापासून बारामतीतील एम. आय. डी. सी. भागातील सूर्यनगरी, तांबेनगर परिसरातून बुलेट व इतर मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली होती. याबाबत बारामती शहर व बारामती तालुका पोलिसांत गुन्ह्यांची नोंद झाली होती. पोलिसांना खबऱ्यांमार्फत सुनील हनुमंत दराडे (वय २५ रा. रुई, ता. बारामती) हा बारामतीतील एम. आय. डी. सी. परिसरातून मोटारसायकलची चोरी करत असल्याची माहिती मिळाली. दराडे याने इतर तीन साथीदारांसह या परिसरातून या दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याने भालचंद्र ऊर्फ बाळा भागवत मुंढे (२१, रा. खालापुरे, ता. शिरूरकासार, सध्या रा. सूर्यनगरी, बारामती), अक्षय कांतीलाल आव्हाड (१९, रा. रुई) व अन्य दोन फरारी साथीदारांनी एमआयडीसी भागतील सूर्यनगरी, तांबेनगर परिसरातून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. चोरीस गेलेल्या एकूण दहा लाख ५० हजार रुपये किमतीच्या १५ मोटारसायकली जप्त केल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ग्रामीण पोलीस अधीक्षक बारामती तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक बारामती कार्यालय व गुन्हे शोधपथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस हवालदार शिवाजी निकम, पोलिस नाईक संदीप जाधव, दशरथ कोळेकर , संदीप मोकाशी, बाळू भोई, संदीप कारंडे, अनिल काळे, रवी कोकरे, सुभाष डोईफोडे, तुषार सानप, सदाशिव बंडगर यांनी ही कारवाई केली.
शिक्षेचे प्रमाण कमी
महिलांसंबंधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बारामती ग्रामीण विभागात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले असताना या गुन्ह्यांबाबत शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. ही चिंतेची बाब असल्याचे मत नोंदविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक नियमांचा पथनाट्यातून जागर

0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत येरवडा वाहतूक विभागाकडून शास्त्रीनगर चौकात शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने पथनाट्ये सादर करून वाहतुकीविषयी जनजागृती करण्यात आली. येरवड्यातील गेनबा सोपानराव मोझे आणि एसएनबीपी शाळेतील सुमारे ऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांनी पथनाट्यांचे सादरीकरण केले.
वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष आणि वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे दर वर्षी हजारो नागरिकांना जीव गमवावा लागतो. वाहनचालकांमध्ये वाहतूकविषयक जनजागृती होण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाकडून वर्षाच्या सुरुवातीला विविध कार्यक्रम घेऊन वाहनचालकांना प्रबोधन केले जाते. यंदा नऊ ते २३ जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परिमंडळ चारचे सहाय्यक आयुक्त, येरवडा वाहतूक विभागाचे बाजीराव मोळे, सहाय्यक निरीक्षक सचिन काळे, मनोज पाटील आणि कर्मचाऱ्यांकडून विविध जनजागृती आणि प्रबोधन कार्यक्रम चालू आहे.
येरवडा विभागातील मोझे हायस्कूल आणि एसएनबीपी ज्युनियर कॉलेजमधील ८०हून अधिक विद्यार्थ्यांनी शानिवारी शास्त्रीनगर चौकात वाहतूक नियम पाळण्याबाबत विविध पथनाट्ये सादर केली. या वेळी विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या चिन्हांची आणि नियमांची वाहनचालकांना माहिती दिली; तसेच रस्त्यावरून वाहने चालविताना नियम पाळण्याची प्रतिज्ञा घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडांच्या जागी वाहनतळ?

0
0

म. टा. प्रतिनिधी, राजगुरूनगर

गेल्या वर्षी एक जुलैला पार पडलेल्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत खेड तालुका प्रांत कार्यालयाच्या आवारात पाठीमागच्या बाजूला लागवड केलेली झाडे जेसीबी मशिनने तोडून ती जागा साफ करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. झाडे तोडल्यानंतर ती जाळून टाकण्यात आली. झाडे तोडून साफ केलेल्या जागेत चारचाकी गाड्यांसाठी वाहनतळ म्हणून वापर करण्याचा घाट घातला जाणार असल्याचे समजते.

दरम्यान, प्रांताधिकाऱ्यांनी ही वृक्षतोड व जागा साफ करण्याशी आमच्या कार्यालयाचा काहीही संबंध नसल्याचे सांगून हात झटकले आहेत. संबंधित अधिकारी जबाबदारी झटकत असले, तरी या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच झाडे तोडून जागा जेसीबीने साफ करण्यात आलेली आहेत. गेल्या वर्षी एक जुलैला खेड तालुक्यात मोठ्या उत्साहात सुमारे तीन लाख रोपांची लागवड करण्यात आली होती. या वृक्षलागवड कार्यक्रमात विशेषत: चाकण व राजगुरूनगर वनविभाग, इतर सर्व शासकीय यंत्रणा, पंचायत समिती, सर्व ग्रामपंचायती, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, तालुक्यातील शाळा-कॉलेज, खासगी संस्था, चाकण एमआयडीसीतील विविध कंपन्या; तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. दरम्यान, खेडचे तत्कालीन प्रांताधिकारी हिम्मतराव खराडे, तहसीलदार सुनील जोशी, नायब तहसीलदार लतादेवी वाजे, नायब तहसीलदार राजेंद्र जाधव व महसूल कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रांत कार्यालयाच्या आवारात मागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत वीसपेक्षा अधिक विविध जातींच्या दीड वर्ष वयाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. ही सर्व रोपे महिंद्रा फायनान्स या कंपनीने पुरविली होती. मुळातच या कार्यालयाच्या आवारात पूर्वीच एक छोटी बाग विकसित करण्यात आलेली आहे; तसेच कार्यालयाच्या पाठीमागे अनेक झाडे आहेत. या ठिकाणी पाण्याची उपलब्धतादेखील चांगली असल्यामुळे पाण्याचा तुटवडा कधी जाणवत नाही.

गेल्या वर्षी केलेल्या वृक्षारोपणामुळे कार्यालयाच्या आवाराला आणखी सौंदर्य लाभले होते; परंतु दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास जेसीबी मशिन आणून कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली झाडे तोडून जागा सपाट करण्यात आली. एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर या ठिकाणी चारचाकी गाड्यांसाठी वाहनतळ तयार केला जाणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सैनिकांची कॅन्टिनही आता होणार कॅशलेस’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लष्करातील अधिकारी, कर्मचारी व माजी सैनिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरविणारी कॅन्टीन स्टोअर्सही आता कॅशलेस होणार आहेत. त्यामुळे माजी सैनिकांनीही कार्डाच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार कसे करावेत, हे शिकून घ्यावे, असे आवाहन लष्कराच्या दक्षिण क्षेत्राचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एम. हारिस यांनी माजी सैनिकांना उद्देशून केले.

फिल्ड मार्शल माणेकशॉ आणि करिअप्पा हे १४ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे यंदापासून हा दिवस ‘आर्म्ड फोर्सेस व्हेटरन डे’ म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त लष्कराचे दक्षिण मुख्यालय (सदर्न कमांड) आणि बॉम्बे सॅपर्सतर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्हाईस अॅडमिरल पी. चौहान (नि), दक्षिण महाराष्ट्र सब एरियाचे प्रमुख मेजर जनरल प्रिथी सिंह, बीईजी सेंटरचे प्रमुख ब्रिगेडिअर धीरज मोहन, सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल सुहास जतकर (नि) उपस्थित होते. आर्मी वाईव्ह्ज वेल्फेअर असोसिएशनच्या स्थानिक अध्यक्ष झरिना हारिस यांच्या हस्ते वीरपत्नींचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात १५०० हून अधिक माजी सैनिक, शौर्यपदक विजेते व हुतात्मा सैनिकांचे नातेवाइक सहभागी झाले होते. माजी सैनिकांसाठीच्या विविध सुविधा, बँकांच्या योजनांचे स्टॉल व आरोग्य तपासणी शिबिरही आयोजिण्यात आले होते.

‘दक्षिण मुख्यालयाकडे गेल्या वर्षभरात आलेल्या माजी सैनिकांच्या १७०० तक्रारींपैकी ७५ टक्के तक्रारांचे निवारण करण्यात आले आहे,’ असे हारिस यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीएचडीच्या नियमावलीत बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सूचनेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘पीएचडी’च्या नियमावलीत बदल केले आहेत. त्यामुळे प्रवेश पात्रता, प्रवेशपूर्व परीक्षा, प्रबंध सादर करण्याच्या कालमर्यादेत आणि लेखन पद्धतीत बदल होणार आहे.

एकीकडे महिला व अपंग संशोधकांना प्रबंध सादर करण्यासाठी विशेष मुदत वाढही देण्यात आली आहे, तर दुसरीकडे मार्गदर्शकांकडील विद्यार्थी संख्येवर मर्यादा आणली आहे. हे सर्व बदल आणि निकष जुलै २०१६पासून पुढे लागू राहणार आहे. विद्यापीठाच्या प्रशासनाने यूजीसीच्या आदेशानुसार हे बदल केले असून, यासंदर्भातील नियमावली विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या वेबवाइटवर प्रसिद्ध केली आहे. पीएचडी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे यापुढील काळात २०० गुणांऐवजी केवळ १०० गुणांची परीक्षा घेतली जाईल. त्यामुळे विद्यापीठाच्या एखाद्या विभागातर्फे किंवा संशोधन केंद्राकडून घेतली जाणारी १०० गुणांची लेखी परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारा तीन महिन्यांचा कालावधी वाचणार आहे. विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत ५० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी पीएचडीच्या प्रवेशास पात्र असतील.

तसेच, पीएचडी प्रवेशाच्या पात्रतेसाठी पूर्वी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के गुणांची मर्यादा होती. आता ही गुणांची मर्यादा ५५ टक्के केली आहे. मात्र, मागासवर्गीय व अपंग विद्यार्थ्यांसाठी पाच टक्के सवलत दिली आहे. नेट, सेट, जेआरएफ, गेट अशा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना; तसेच विद्यापीठातून एमफिल पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेतून सूट दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना कमीत कमी दीड वर्षात एमफिल करता येत होते. आता ही मर्यादा एक वर्ष केली आहे.

या नव्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना पाच वर्षांत पीएचडी करता येईल. मात्र, विद्यार्थ्यांना पीएचडीच्या संशोधनासाठी दोन वर्षांची मुदतवाढ दिली जाऊ शकते. महिलांना नियोजित कालावधीपेक्षा १८० दिवस अधिक आणि अपंग विद्यार्थ्यांना १० वर्षांपर्यंत पीएचडी पूर्ण करता येईल. तसेच, पीएचडीचे संशोधन सुरू करण्यापूर्वी असणाऱ्या ‘कोर्सवर्क’ला २० श्रेयांक होता तो आता १६ केला आहे. संशोधन प्रबांधातील पानांची संख्या कमी करण्यासाठी पानांच्या दोन्ही बाजूने लिहिता येणार आहे आणि पानेही ‘ए फोर’ आकारात लागणार आहेत. दरम्यान, २००९च्या नियमांनुसार ज्यांचे पीएचडीसाठी प्रवेश झाले आहेत त्यांना नवे नियम लागू राहणार नाहीत.

किती विद्यार्थ्यांना एक गाइड?

पीएचडीच्या नव्या नियमांनुसार प्राध्यापकांना आठ, सहयोगी प्राध्यापकांना सहा आणि सहायक प्राध्यापकांना चार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल. एमफिलसाठी प्राध्यापकांना तीन, सहयोगी प्राध्यापकांना दोन आणि सहायक प्राध्यापकांना एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा एल् निनोचा प्रभाव नाही

0
0

मयुरेश प्रभुणे, पुणे

भारतीय मान्सूनवर प्रभाव टाकणारे प्रशांत महासागराचे तापमान २०१७ मध्ये बहुतांश काळ सरासरीच्या दरम्यान (०.५ अंश सेल्सिअस कमी-अधिक) राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने नुकताच वर्तवला आहे. या स्थितीला ‘एल निनो’ची न्यूट्रल अवस्था म्हटले जाते. विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सध्या सरासरीच्या दिशेने वाढत असून, फेब्रुवारीमध्ये ‘ला निना’ची अवस्था संपुष्टात येण्याची चिन्हे असल्याचे क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने म्हटले आहे. न्यूट्रल अवस्थेचा भारतीय मान्सूनवर नकारात्मक परिणाम होत नाही असे आकडेवारी दर्शवते.

‘एल निनो’चा अंदाज देणाऱ्या याच गटाने गेल्या तीन वर्षांत संबंधित वर्षीचा पावसाळा कसा असेल याची साधारण कल्पना जानेवारीमध्येच दिली होती. या गटाने गेल्या वर्षी ‘ला निना’चा दिलेला अंदाज खरा ठरला असला, तरी त्याचा कालावधी आणि तीव्रता अचूक वर्तवण्यात अपयश आल्यामुळे बहुतांश संस्थांचे मान्सूनचे अंदाज चुकले होते. मान्सूनच्या उत्तरार्धात सुरू झालेली ‘ला निना’ची स्थिती फेब्रुवारीमध्ये संपुष्टात येण्याची चिन्हे असून, त्यानंतर संबंध मान्सूनच्या काळात ‘एल निनो’ची अवस्था न्यूट्रल राहण्याचा अंदाज आहे. न्यूट्रल ‘एल निनो’च्या काळात बहुतांश वर्षी भारतातील मान्सून सरासरीच्या दरम्यान राहिला असल्याचे आकडेवारी सांगते.

जगभरातील एकूण १५ डायनॅमिक मॉडेल आणि आठ स्टॅटिस्टिकल मॉडेलची सरासरी काढून वर्तवलेल्या अंदाजानुसार ऑक्टोबर २०१७पर्यंत विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअस कमी-अधिक (न्यूट्रल) राहण्याची शक्यता आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट अँड सोसायटीने जारी केलेल्या अंदाजानुसार फेब्रुवारी ते मे या कालावधीत प्रशांत महासागरातील स्थिती न्यूट्रल राहण्याची शक्यता ६५ ते ७५ टक्के असून, जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या कालावधीत तीच शक्यता सुमारे ५० ते ६० टक्के राहील. फेब्रुवारी ते मे या कालावधीत ‘एल निनो’ची स्थिती निर्माण होण्याची शक्यता दोन ते २० टक्के इतकी कमी असून, मान्सून काळात ‘एल निनो’ची स्थिती निर्माण होण्याची शक्यता २८ ते ३६ टक्के इतकी राहील. हा अंदाज प्रशांत महासागरातील ताज्या नोंदींवर आधारित आहे. हा अंदाज खरा ठरल्यास यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रतिकूल प्रभाव राहण्याची शक्यता कमी असल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पिफ’मधील आशय हरवला?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशविदेशातील अभिजात चित्रपट पाहण्याची संधी देणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (पिफ) आशय हरवला आहे. जागतिक स्पर्धेच्या नावाखाली रटाळ सिनेमांची भाऊगर्दी, सर्व ठिकाणी येणाऱ्या तांत्रिक अडचणी व प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ यामुळे ‘पिफ’मधून आशय हरवल्याची जोरदार चर्चा चित्रपट अभ्यासकांमध्ये सुरू आहे. दर वर्षी डोळे दिपवून टाकणारा ‘पिफ’चा झगमगाट यंदा कोठे गेला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकार यांच्यातर्फे १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सध्या पुणे व पिंपरी-चिंचवडमधील १३ चित्रपटगृहांत सुरू आहे. मात्र, हा महोत्सव १३ चित्रपटगृहांमध्ये खरच रंगतोय का, असा प्रश्न रसिकांच्या अल्प प्रतिसादाने उपस्थित झाला आहे. पिफ दर्जेदार करण्यापेक्षा तो उरकण्यात येत असल्याची प्रतिक्रिया चित्रपट तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

महोत्सवाचे मुख्य ठिकाण असलेल्या सिटीप्राइड कोथरूड येथे दर वर्षी रसिकांची तुडुंब गर्दी असते. यंदा तेवढ्या पुरती रांग दिसून येतेय; पण चित्रपट न आवडल्यामुळे लोक उठून जात असल्याने लोकांना बसायला व्यवस्थित जागा मिळत आहे. उभा राहून किंवा पायऱ्यांवर बसून चित्रपट पाहण्याचे ‘थ्रील’ चित्रपटप्रेमी ‘मिस’ करीत आहेत. चित्रपटगृहाच्या आवारात असलेल्या ‘पिफ’ बझारचा उद्देश काय, असा प्रश्न विचारला जात आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे प्रदर्शन सोडले तर स्टॉलमध्ये रसिकांसाठी काय याबाबत संदिग्धता आहे. एखादा कार्यक्रम सोडला तर पिफ बझार ओस पडले आहे, असे येथील चित्र आहे. शहरातील दुसऱ्या चित्रपटगृहांमधील अवस्था यापेक्षा वाईट असल्याचे चित्र आहे. आयोजनातील ढिसाळपणामुळे ‘पिफ’चा उत्साह यंदा जाणवत नाही, असे चित्रपटप्रेमींचे म्हणणे आहे. ‘पिफ’ची रसिकांना ओढ असते आणि ती वातावरणातून दर वर्षी दिसते; पण यंदा असे काहीच वातावरण नसल्याने महोत्सव सुरू आहे की नाही, हाच प्रश्न अनेकांना पडला आहे.


मराठी चित्रपटांना गर्दी

जागतिक चित्रपट स्पर्धेतील चित्रपट दर्जेदार नसल्याने अनेक चित्रपट समीक्षकांचे म्हणणे आहे. जागतिक चित्रपट पाहायला मिळणे, हेच आकर्षण असताना लोकांची गर्दी मात्र मराठी चित्रपटांना होत आहे. जागतिक चित्रपट दहा मिनिटे पाहून निघून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दर वर्षी साडेचार हजार रसिक महोत्सवात सहभागी होत असल्याचे आयोजकांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात यंदा ही संख्या दोन हजारच्या आसपास असल्याचे खास सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले. चित्रपटगृह चालकांनी सायंकाळी सहापर्यंत शो ठेवल्याने काम आटपून रात्रीचे शो पाहणाऱ्या रसिकवर्गाने पाठ फिरवली आहे. वर्षातून एखादा महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम चित्रपटगृहांनी आयोजित करावा असा सरकारचा निर्णय आहे. चित्रपटगृह चालकांनी ‘पिफ’मध्ये सहभागी होऊन ही जबाबदारी पार पाडत व्यावसायिक गणिते सांभाळण्यासाठी ‘प्राइम टाइम’ राखीव ठेवला आहे. यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ओमला जगण्याने छळले होते…’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘एक सर्वसामान्य आदिवासी ते देशाचा अध्यक्ष अशा बहुरंगी भूमिका ओम पुरीने आपल्या समृद्ध ‌कारकिर्दीत केल्या. त्याचा चेहरा म्हणजे अभिनयाच्या दृष्टीने एक ‘लँडस्केप’ होते. उत्तरार्धात मात्र आयुष्याने घेतलेल्या अवघड वळणांमुळे ओम एकाकी झाला. दुःखाने त्याची सुटका केली. ओमला जगण्याने छळले होते…’ असे बोलताना अभिनेते नसीरुद्दीन शाह कमालीचे भावूक झाले होते. त्यांचे अनुभव ऐकताना सभागृह अक्षरशः स्तब्ध झाले होते.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सुरू असलेल्या ‘पिफ बझार’ अंतर्गत ‘ओम पुरी जाणून घेताना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरींच्या आठवणी, अभिनय आणि व्यक्तिमत्त्वाचा ओझरता पट डोळ्यांसमोरून घालवताना शाह यांना भावना अनावर झाल्या होत्या. अनिल झणकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

‘ओम आणि माझी ४६ वर्षांची घट्ट मैत्री होती,’ असे सांगून शहा म्हणाले, ‘१९७० साली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकताना रेल्वे क्वाटर्सच्या बाहेर अडगळीच्या जागेत राहणाऱ्या ओमला पहिल्यांदा भेटलो. त्याच अडगळीत त्याने स्वतःच्या हाताने करून खाऊ घातलेली अंडाकरी आजही आठवते. तिथपासून आम्ही एकत्र सुरू केलेला अभिनयाचा प्रवास अनेक वर्ष सुरू होता. मला त्याच्या अभिनयाच्या कलेचा आणि त्याला माझ्या इंग्रजीचा कायम हेवा वाटायचा. असे असूनही मी तुझ्यापेक्षा जास्त इंग्रजी चित्रपट केले आहेत, असे सांगून ओम कायम मला हिणवायचा. कालांतराने त्याने इंग्रजीवरही प्रभुत्व मिळवले. मग त्याने आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये ठसा उमटवला. झिया उल हक या पाकिस्तानी अध्यक्षांपासून ते आदिवासी पुरुष, पोलिस अधिकारी, काळजीने ग्रासलेला वडील अशा अनेक भूमिकांना त्याने न्याय दिला.’

‘घेतलेले काम तडीस नेणे हे ओमच्या रक्तात होते. आयुष्याचा उत्तरार्ध जगत असताना मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक दुःखद प्रसंग घडले आणि ओम एकाकी पडला. एका चित्रपटात त्याच्याच तोंडी ‘मै इतनी भी क्यूँ पी लेता हू’ असा संवाद होता. त्याचा शेवट होताना हा संवाद खरा ठरला. एका अर्थी त्याचा शेवट झाला ते बरे झाले. त्याची दुःखातून सुटका झाली,’ असे नसीरुद्दीन म्हणाले. काही क्षणात भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेत्यांची प्रदीर्घ मैत्री संपूर्ण सभागृहाच्या डोळ्यांसमोरून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐतिहासिक मोडी पत्रे प्रकाशात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठी इतिहासातला शिवशाही ते पेशवाई हा इतिहासप्रेमी तसेच अभ्यासकांच्या आवडीचा कालखंड, या काळातली समाजव्यवस्था, राजकीय स्थिती आणि देवकार्य आदी बाबींवर प्रकाश टाकणारा ऐतिहासिक ठेवा मोडी पत्रांच्या रूपाने प्रकाशात आला आहे. इतिहास अभ्यासक घन:श्याम ढाणे यांना सातारा येथील वडगावच्या मठात ऐतिहासिक व्यक्तींची मोडी लिपीतली पत्रे मिळाली आहेत. या पत्रांमध्ये छत्रपती शाहू महाराज, सेनापती संताजी घोरपडे, माधवराव पेशवे यांच्या पत्रांचा समावेश असल्याने हा ठेवा अभ्यासकांसाठी मोलाचा ठरणार आहे.

वडगाव मठात सध्या गादीवर असणारे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराजांना या मठाची सफाई करताना एक दफ्तर सापडले. त्यामध्ये पंचवीस ते तीस मोडी कागदपत्रे होती. स्वामींनी अभ्यासक ढाणे यांच्याशी संपर्क साधून त्याच्या प्रती ढाणे यांच्याकडे अभ्यासासाठी दिल्या. ढाणे यांनी या पत्रांचा सखोल अभ्यास आणि संशोधन करून हा ठेवा अभ्यासकांसाठी खुला केला आहे. या पत्रांमध्ये दानपत्रे, इनामपत्रे, ताकीदपत्रे, रोख रकमा आणि श्रींच्या नैवेद्यास दिवाबत्तीसाठी चीजवस्तूंचा उल्लेख असलेली पत्रे असल्याने तत्कालीन समाजजीवन, राजकीय स्थिती आणि देवकार्य यांचा परस्परांशी असणारा संबंध स्पष्ट होत आहे.

रामदासी सांप्रदायातील पंचायतन गणले गेलेल्या जयराम स्वामी वडगावकर यांचा मठ वडगाव येथे आहे. या मठात संताजी घोरपडे यांचे सरकार पागा आणि शिलेदार यांना मठाच्या वाटे न जाण्याबाबतचे ताकीदपत्र (इसवी सन १६९६), रामचंद्रपंत अमात्य यांचे ईनामपत्र (इसवी सन १६९७), श्रीनिवास महादेवराव यांचे आज्ञापत्र (इसवी सन १७०८), नारो प्रल्हाद यांचे ताकीदपत्र (इसवी सन १७०८), नारोशंकर सचिव यांचे ताकीदपत्र (इसवी सन १७१०), छत्रपती शाहू महाराजांचे आज्ञापत्र (इसवी सन १७१२), परशराम त्र्यंबक प्रतिनिधींचे वडगावच्या देशमुख-देशपांड्यांना पत्र (इसवी सन १७१८), जयसिंगराव सेनापती यांचे इनामपत्र (इसवी सन १७२७), श्रीनिवास परशराम (इसवी सन १७२७), बाळाजी बाजीराव पेशवे ताकीदपत्र (इसवी सन १७६३) अशा मोडी पत्रांचा समावेश आहे.

या ठेव्यामध्ये विविध विषय असणारी फत्तेसिंग भोसले, जनकोजी शिंदे, गोविंदराव गायकवाड, महादजी शिंदे, शंकराजी नारायण, त्र्यंबकजी नारायण आणि माधवराव पेशवे आदी मान्यवरांची पत्रेही आहेत. ही पत्रे तात्कालीन राजनीती, समाजव्यवस्था तसेच देवकार्यावर प्रकाश टाकणारी आहेत. ही सगळी पत्रे अस्सल पत्रांवरून नकलून घेतलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक पत्राच्या तळात ‘अस्सल बरहूकूम नक्कल’ असा शेरा आहे.

पुस्तकरूपात येणार

मूळ पत्रांवरील शिक्के आणि मुद्रा नकल केलेल्याने हाताने वर्तुळ अथवा ज्या पद्धतीची मुद्रा आहे त्याप्रमाणे आकृती काढून देवनागरीमध्ये लिहिलेल्या आहेत. या पत्रांमुळे तत्कालीन परिस्थितीसह त्या त्या व्यक्तींचे विचार आणि व्यक्तिमत्त्वाचे पैलूही समोर येत असल्याने हा ठेवा अभ्यासकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या कागदपत्रांची आणि मठातल्या ठेव्याची माहिती पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणण्याचा मानस आहे, अशी माहिती इतिहास अभ्यासक घन:श्याम ढाणे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images