Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

'...तर नोटांवरून गांधीजींचा फोटो हटवला तर बरचं होईल'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदीच मोठे ब्रॅण्ड आहेत आणि भाजप सरकारच्या कार्यकाळात नोटांवरून हळूहळू गांधींचा फोटो हटवला जाईल,' असे तारे तोडणारे हरयाणाचे मंत्री अनिल वीज यांना त्यांचे नाव न घेता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांची चांगलेच सुनावले आहे. 'भ्रष्ट राजकारणी नोटांचा वापर भ्रष्टाचारासाठी करतात. त्यामुळे नोटांवरून बापूंचा फोटो हटवला तर बरंच होईल', असा टोला तुषार गांधी यांनी लगावला आहे.

खादी आणि ग्रमोद्योग आयोगाच्या कॅलेंडरवरून महात्मा गांधी यांचा फोटो हटवून त्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आयोगाच्या या कारभारावर टीका होत असतानाच हरयाणाचे एक वरिष्ठ मंत्री अनिल वीज यांनी गांधी यांच्यापेक्षा मोदीच मोठे ब्रॅण्ड असल्याचे तारे तोडले. शिवाय गांधींमुळे खादीची दुर्दशा झाली आणि खादीशी गांधींचं नाव जोडल्यापासून हा व्यवसाय डबघाईला आल्याचा तर्कटही त्यांनी मांडलं. वीज यांच्या विधानानं वादळ उठल्यावर भाजपनं ते वीज यांचं व्यक्तिगत मत असल्याचं सांगत वादातून अंग काढून घेतलं. त्यामुळं एकाकी पडलेल्या वीज यांनीही दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण वाद काही थांबलेला नाही. तुषार गांधी यांनीही काही राजकारणी भ्रष्टाचारासाठी नोटांचा वापर करत असल्यानं या नोटांवरून बापूंचा फोटो हटवला तर चांगलच होईल, असा टोला लागावत या वादावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

गांधींनी दहा लाखाचा सुट घातला नाही

पंतप्रधान पॉलिस्टरच्या वस्त्रांचे प्रतिक आहेत असं सांगतानाच बकिंग पॅलेसच्या दौऱ्यावर जाताना गांधीजी खादी घालून गेले होते. दहा लाखाचा सुट घालून गेले नव्हते, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नीट’ परीक्षेचा निकाल जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशातील वैद्यकीय (मेडिकल) कॉलेजांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे (पीजी) शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. या निकालाद्वारे विद्यार्थ्यांचे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांसाठी कॉलेजांमध्ये प्रवेश होणार आहे. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल www.neetpg.nbe.gov.in या वेबसाइटवर परीक्षेचा आयडी क्रमांक आणि जन्मतारीख टाकून पाहता येणार आहे, अशी माहिती वेबसाइटवर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
गेल्या डिसेंबर महिन्यात देशातील वैद्यकीय कॉलेजांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेण्यासाठी लागणारी ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा ५ ते १३ डिसेंबर दरम्यान देशातील विविध केद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेला देशभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बसले होते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यांच्या सरकारी, खासगी वैद्यकीय कॉलेजांमध्ये आणि अभिमत विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि डिप्लोमा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येईल.
या परीक्षेसाठी एकूण १५०० गुणांचा पेपर होता. निकालानुसार खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्क्यांहून अधिक गुण मि‍ळवणारे विद्यार्थी तर इतर राखीव प्रवर्गासाठी ४० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र झाले आहेत. तसेच, अपंग प्रवर्गात ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र झाले आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत कॉलेजांमध्ये प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वरबहार अन् जुगलबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सांजसमयी भावपूर्ण गायकीने फुललेला ‘श्री’ राग, राग मारुबिहागची बहारदार मेजवानी आणि शहनाईच्या सोबतीने रंगलेल्या अविस्मरणीय जुगलबंदीने ‘स्वरझंकार’ महोत्सवाचे दुसरे सत्र रंगले. प्रसिद्ध गायिका मंजूषा पाटील, पं. श्रीनिवास जोशी आणि विराज जोशी, ज्येष्ठ शहनाईवादक पं. दयाशंकर आणि ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये आदींच्या कलाविष्काराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ आणि व्हायोलिन अकादमी यांच्यातर्फे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग इथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या सत्राचा श्रीगणेशा मंजूषा पाटील यांनी ‘श्री’ रागाने केला. पुण्यात गायनाची मैफल करणे, ही प्रत्येक कलाकाराची इच्छा असते, अशी विनम्र भावना व्यक्त करत पाटील यांनी ‘गजरवा बाजे’ आणि ‘सांजभयी अबहू न आए मेरे प्रीतम’ या रचना गायल्या. ‘रंगी सारी गुलाबी चुनरियाँ रे, मोहे मारे नजरियाँ सावरिया रे’ ही प्रसिद्ध बंदिश गात त्यांनी संध्यासमयीचे वातावरण प्रफुल्लित केले. मिलिंद कुलकर्णी (हार्मोनिअम), अजिंक्य जोशी (तबला), अनघा परळीकर, सावनी वैशंपायन यांनी त्यांना साथसंगत केली.
राग मारुबिहागने गायनाला सुरुवात करून पं. श्रीनिवास जोशी आणि विराज जोशी या पितापुत्रांनी उपस्थितांना मुग्ध केले. ‘रसिया ना जा’, ‘पिया बिन मोरे नैना तरसे’ या रचना दोघांनी एकत्रित गायल्या. त्यानंतर आमीर खुसरो यांची ‘अजरत ख्वाजा’ ही प्रसिद्ध रचना जोशी यांनी सादर केली. उत्तरोत्तर रंगत चाललेल्या या गायनाचा समारोप पित्रापुत्रांनी ‘रघुवीर तुमको मेरी लाज’ या भावपूर्ण रचनेने केला तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या गायनाला दाद दिली. उदय कुलकर्णी (हार्मोनिअम), प्रशांत पांडव (तबला), बाळासाहेब गरूड (टाळ), विनय चित्राव, विनय गोहाड (तानपुरा) यांनी त्यांना साथसंगत केली.
मैफलीच्या उत्तरार्धातल्या शेवटच्या सत्रात रसिकांना जुगलबंदीचे वेध लागले. गेली वीसहून अधिक वर्षे दिल्ली येथील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचा श्रीगणेशा शहनाईने करणारे पं. दयाशंकर आणि ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांच्या मोहक वाद्याविष्काराने मैफलीला एका वेगळ्या उंचीवर नेले. ‘स्वरझंकार’ महोत्सव ज्येष्ठ शहनाईवादक बिस्मिल्ला खाँ यांना समर्पित केल्याची विनम्र भावना व्यक्त करून या दिग्गजांनी खाँ साहेबांच्या आवडीचा राग मालकंस सादर केला. विविध भावनांची बरसात करणारी शहनाई आणि तितक्याच मोहक अंगाने साथ देणारे व्हायोलिनवादन अशी ही जुगलबंदी अविस्मरणीय ठरली. अश्विनीशंकर (शहनाई सहवादन), सविता सुपनेकर (व्हायोलिन) आणि पं. रामदास पळसुले (तबला) यांनी त्यांना साथसंगत करत या मैफलीचा दमदार समारोप केला.
स्वरझंकार महोत्सवाचा समारोप आज (रविवारी) होणार आहे. पं. राहुल शर्मा (संतूर), पं. मुकेश जाधव (तबला साथ), उस्ताद राशीद खान, पं. विजय घाटे (तबला साथ) आणि मुराद अली (सारंगी), पं. ज्योती गोहो (संवादिनी) आदी कलावंतांचा कलाविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

मंजूषा पाटील यांना पुरस्कार

गायन क्षेत्रात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविणारी कामगिरी केल्याबद्दल प्रसिद्ध गायिका मंजूषा पाटील यांना स्वरझंकार महोत्सवात ‘सुलोचना दत्तात्रय कुलकर्णी स्मृतिसन्मान’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

असाही योगायोग

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या हस्ते १९९२ मध्ये स्वरझंकार उपक्रमाची सुरुवात झाली होती. त्याच व्यासपीठावर पंडितजींचे सुपुत्र पं. श्रीनिवास जोशी आणि नातू विराज जोशी गायनासाठी एकत्र आले, हा योग २५ वर्षांनी जुळून आला आहे, या योगायोगाची आठवण पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी रसिकांना करून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुक गिरवताहेत सभा कौशल्याचे धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...’ भाषणाच्या सुरुवातीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शब्द उच्चारताच लाखोंच्या जनसमुदायात एक प्रकारची शांतता पसरत असे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार, आचार्य अत्रे, प्रा. शिवाजीराव भोसले आदींनी आपल्या धीरगंभीर आवाजाने जनसमुदायावर गारूड निर्माण केले. त्यांचाच आदर्श समोर ठेवून आगामी महापालिका निवडणुकीत मतदारांसमोर प्रभावीपणे भाषण करण्यासाठी अनेक इच्छुक भाषणकौशल्याचे धडे गिरवत आहेत.
नुकतीच महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र, त्यापूर्वीपासूनच उमेदवारी मिळण्याची खात्री असलेल्यांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये कार्यकर्ते जमा करण्यापासून प्रचारसाहित्य गोळा करेपर्यंत विविध गोष्टींसाठी लगबग चालली आहे. तरुण, नवमतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी आणि एकूणच मतदारांना सामारे जाताना त्यांच्याशी संवाद कसा साधावा, जाहीर भाषणात कसे बोलावे, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासाठी भाषा तज्ज्ञ व भाषण कौशल्यात पारंगत असलेल्या व्यक्तींकडून रितसर धडे गिरवण्याचा ट्रेंड यंदा पाहायला मिळत आहे. यामध्ये तरुण इच्छुकांसह दोन ते तीन वेळा नगरसेवक पद भूषविलेल्यांचाही समावेश आहे.
आपला नगरसेवक बोलतो कसा किंवा त्याची मांडणी कशी, यावरून नागरिक त्यांच्या मनात एक प्रतिमा तयार होत असते. तसेच, यंदाच्या निवडणुकीसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग करण्यात आला आहे. त्यामुळे बहुतांश सर्वच प्रभागांची रचना बदली आहे. त्यामुळे नवीन भागात, नवीन मतदारांसमोर आपली बाजू मांडण्यासाठी जुन्या नगरसेवकांनाही चांगल्या भाषण कौशल्याची गरज वाटू लागली आहे.

महापालिकेसाठी इच्छुक असलेल्यांना मतदारांसमोर किंवा सभेमध्ये काय बोलायचे आहे, हे माहिती असते. पण, ते कसे बोलावे याबाबत त्यांच्या मनात भीती असते. तसेच, मोठ्या सभेत व्यासपीठावर पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत बोलताना दडपण असते. त्यामुळे मुख्यतः त्यांची भीती दूर करणे आणि राजकीय भाषणासाठी आवश्यक गोष्टींची माहिती देणे आदी गोष्टींना इच्छुकांकडून प्राधान्य दिले जात आहे.
प्राजक्ता मांडके, भाषण मार्गदर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभागनिहाय प्रचारासाठी ‘मिशन २०१७’ सॉफ्टवेअर

$
0
0

मतदार याद्यांची माहिती संभाव्य उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याठी विशेष सुविधा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या संभाव्य उमेदवारांना प्रभागनिहाय मतदार, त्यांचे पत्ते उपलब्ध व्हावेत आणि व्होटर स्लिप आधुनिक पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचावी यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. पक्षाच्या उमेदवारांनी बाजारात उपलब्ध विविध सॉफ्टवेअरचा आधार घेण्याऐवजी पक्षाच्या आयटी विभागातर्फेच विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरचा उपयोग करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
भाजपतर्फे आज, रविवारी घेण्यात येणाऱ्या हजारी यादीप्रमुखांच्या कार्यक्रमात या सॉफ्टवेअरचे औपचारिक उद्घाटन केले जाणार आहे. त्यानंतर, सर्व इच्छुकांसाठी ते उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय मतदार याद्या, मतदारांचा शोध यापासून ते मतदारांना व्होटर-स्लिप देण्यापर्यंतची अनेक सॉफ्टवेअर सध्या उपलब्ध आहेत. त्यात, आता पक्षीय स्तरावर भाजपने पुढाकार घेतला असून, संभाव्य उमेदवारांना सहज उपयोगी पडेल, अशा सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. कोणत्याही मतदाराचे नाव शोधण्यासह, त्याचा पत्ता, ठरावीक इमारतीमधील नागरिकांचे मतदार ओळखपत्र क्रमांक अशा विविध स्वरूपात मतदारांचा शोध घेण्याचे पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भाजपकडून काही वर्षांपूर्वी सदस्य नोंदणी करण्यात आली होती. मोबाइलद्वारे ‘मिस्ड कॉल’ देऊन करण्यात आलेल्या नोंदणीचा सर्व डेटा पक्षाकडे उपलब्ध असून, त्याचेही प्रभागनिहाय विभाजन करण्यात आले आहे. संबंधित प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्याची माहिती उपलब्ध होणार आहे.
‘विविध प्रभागातील मतदारांना मतदानापूर्वी त्यांचा मतदार यादीतील अनुक्रमांक, नाव पत्ता आणि मतदान केंद्र अशी माहिती असलेली स्लिप देण्यात येते. त्यासाठी, मोठ्या प्रमाणावर कागदाचा वापर होत असल्याने या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदारांना थेट त्यांच्या मोबाइल क्रमांकावरच मतदान केंद्र, खोली क्रमांक, अनुक्रमांक अशी सर्व माहिती पाठवण्यात येणार आहे’, अशी माहिती आयटी सेलच्या सचिन मांढरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदीलाट थोपवायला दोन्ही काँग्रेसची आघाडी?

$
0
0

पक्षांच्या वरिष्ठांचा दोन दिवसांत खल शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय जनता पक्षाला थोपविण्यासाठी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून निवडणूक लढवावी, असा विचार दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सुरू झाला आहे. दोन्ही पक्षांनी किती जागा लढवायच्या यावर एकमत झाल्यानंतरच आघाडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. आघाडीचा निर्णय घेण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक येत्या दोन ते तीन दिवसांत होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेना, भाजपच्या युतीची ‌चर्चा सुरू झाली आहे. राज्यात आणि केंद्रात मोदी लाटेवर विजयी मिळविल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. पालिका निवडणुकीला भाजपने सामोरे जाऊन ही निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी शहरातील नेत्यांची मागणी आहे. भाजपने शिवसेना, आरपीआयबरोबर महायुती करुन निवडणूक लढविल्यास जागा वाटपामध्ये भाजपला मोठा फटका बसेल, अशी भीती पक्षाच्या स्थानिक नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे युती नको, या भूमिकेवर ते ठाम आहेत.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर जो अविश्वास दाखविला आहे. तसाच प्रकार पालिकेच्या निवडणुकीत घडू नये यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत. विधानसभेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादीने स्वबळावर लढत एकमेकांच्या विरोधातच उमेदवार उभे केल्याने मतांचे विभाजन झाले होते. पालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे लढल्यास याचा फटका दोन्ही पक्षांना बसेल. त्यामुळे आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार या दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. दोन्ही पक्षांच्या शहरातील प्रमुखांची याबाबत बैठक झाली असून, निवडणुकीत भाजपच्या विजयाची घोडदौड रोखण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याची चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या शहरातील वरिष्ठ नेत्यांनी जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ तयार करून राष्ट्रवादीकडे दिला आहे. मात्र, यामध्ये अवास्तव जागांची मागणी करण्यात आल्याने जागावाटप अशक्य असल्याचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेच्या २०१२च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ५२ तर, काँग्रेसला २८ जागा मिळाल्या होत्या. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी तसेच काँग्रेसमधील काही नगरसेवक भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे सध्या पक्षाकडे असलेल्या सभासदांची संख्या आणि विजयी जागांची आकडेवारी पाहता त्यानुसार जागांचे वाटप झाले पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली आहे. पालिका निवडणुकीत आघाडी करायची झाल्यास दोन्ही पक्षांनी किती जागा लढवाव्यात याचा नवीन फॉर्म्युला राष्ट्रवादीने तयार केला आहे. या दोन्ही पक्षांची आघाडी झाल्यास ज्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे, तेथील जागा कोणी लढवायच्या यावर एकमत न झाल्यास हा वाद वाढू शकतो.

आज राष्ट्रवादीची बैठक?
पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने दिलेला जागावाटपाचा फॉर्म्युला आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तक्ता याची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादीची आज, (१५ जानेवारीला) बैठक होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याबरोबर ही बैठक होणार आहे. आघाडी करायची झाल्यास जागावाटप कसे असले पाहिजे, यावर चर्चा अपेक्षित आहे. बैठकीला राष्ट्रवादीचे शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर जागांची भाजपला अपेक्षा

$
0
0

आरपीआयच्या वाट्यामुळे प्रत्यक्ष जागा घटणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य पातळीवरून युतीसंदर्भात चर्चा करण्याच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर आता जागावाटपाचा निश्चित फॉर्म्युला काय असेल, यावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात बराच खल होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत ९० जागा लढविणाऱ्या भाजपकडून यंदा अधिक जागांची मागणी होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे ​आरपीआयला संबंधित पक्षाच्या कोट्यातूनच जागा सोडण्याचा निर्णय झाल्यास प्रत्यक्ष लढविल्या जाणाऱ्या जागांची संख्या कमी होणार असल्याने सर्वांना सांभाळून घेण्याची कसरत करावी लागणार आहे.
महापालिकेच्या २०१२मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ९०, तर शिवसेनेने ६२ जागा लढवल्या होत्या. दोन्ही पक्षांनी आपापल्या कोट्यातील अनुक्रमे दहा आणि पाच जागा आरपीआयसाठी सोडल्या होत्या. आगामी निवडणुकीत पालिकेतील सदस्यसंख्या दहाने वाढून १६२वर गेली आहे. त्यामुळे नेमक्या किती जागा मित्रपक्षांना सोडाव्या लागणार, यावर युतीचे समीकरण जुळणार की बिघडणार याचा फैसला अवलंबून आहे. गेल्या महापालिका निवडणुकीनंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला निर्भेळ यश मिळाले आहे. तसेच, गेल्या काही दिवसांत भाजपकडून लढणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढत असून, इतर पक्षांतून मोठ्या प्रमाणात ‘इन्कमिंग’ सुरू झाले आहे. त्याशिवाय, पक्षाच्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली जात आहे.
पूर्वीचा फॉर्म्युला कायम ठेवायचा झाल्यास १६२ पैकी किमान शंभर जागा मिळाव्यात ही भाजपची मुलभूत मागणी असेल. शंभरपेक्षा अधिक जागा लढविण्याचा आग्रह भाजपकडून धरला जाण्याची शक्यता आहे. शहरात आठही आमदार भाजपचे असल्याने अधिक जागांची मागणी होण्याची शक्यता आहे. युती झाली, तर सन्मानपूर्वक, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागांवर शिवसेना समाधानी राहणार का, असा प्रश्न आहे. त्यातच, आरपीआयकडूनही यंदा वीसपेक्षा अधिक जागांची मागणी करण्यात आली आहे.

युतीची बैठक उद्या?
महापालिकेच्या निवडणुकीसाठी युतीविषयी चर्चा करण्यासाठी उद्या, सोमवारी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होण्याची चिन्हे आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत युतीबाबत चर्चा सुरू राहिली, तर शिवसेनेला फटका बसतो हे विधानसभा निवडणुकीच्या अनुभवावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, ठरावीक मुदतीत युतीचा निर्णय घ्या, असा इशारा शिवसेनेकडून भाजपला दिला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपी’च्या अंमलबजावणीवर भर

$
0
0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या पाच वर्षांत शहरातील वाहतूक, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन अशा पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आम्ही उल्लेखनीय बदल केले. त्याचे दृश्य परिणाम पुणेकरांना बघायला मिळत आहेत. आता आगामी पाच वर्षांत शहराचा विकास आराखडा (डीपी) पूर्ण अंमलबजावणी करून दाखविणार आहोत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी ‘मटा’शी व्यक्त केला. शहराचा आगामी २५ वर्षांचा विचार करून पुण्याचे सर्वांगीण नियोजन आणि परिणामकारक निर्णय घेण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध घटकांच्या अपेक्षा ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘मटा जाहीरनामा’च्या माध्यमातून जाणून घेतल्या होत्या. व्यापारी महासंघ, रिक्षा संघटना, पथारी व्यावसायिक, आर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिक, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, अभ्यासकांनी मांडलेल्या अपेक्षांचे संकलन शहरातील राजकीय पक्षांसमोर मांडण्यात येत आहे. विविध समाज घटकांनी मांडलेल्या ‘जाहीरनाम्या’विषयी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी आमदार बापू पठारे या वेळी उपस्थित होते.
शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या रस्ते, वाहतूक, पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापनावर पक्षाने सुरुवातीपासूनच लक्ष दिले आहे. गेल्या पाच वर्षांत शहरातील काँक्रिटीकरण, पादचारी मार्गांचे काम करीत असताना फेरीवाल्यांचे धोरणही आम्ही मंजूर केले. या धोरणामुळे रस्त्यावर झालेले अतिक्रमण दूर होऊन फेरीवाल्यांचे पुनर्वसन होणार आहे. शहरातील दिवसेंदिवस वाढत असलेला वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी रेंगाळलेले उड्डाणपूल, भुयारी मार्ग आम्ही पूर्ण केले, याच वेळी सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पीएमपीची कार्यप्रणाली आम्ही सक्षम केली असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शहरातील कचरा व्यवस्थापनाला दिशा देण्याची सुरुवातच राष्ट्रवादीने केली. घराघरातून होणारे कचरा वर्गीकरण, कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याबद्दल पक्ष आग्रही असून, त्याअंतर्गत कचरा जिरविण्याचे प्रकल्प शहराच्या विविध भागात उभारण्यात आले. सोसायट्यांमध्ये केलेल्या जागृतीमुळे कचरा वर्गीकरण आणि विल्हेवाटीची समस्या नियंत्रणात आणण्यास आम्हाला यश आले आहे. आमच्या प्रयत्नांमुळे इतर महापालिकांबरोबर झालेल्या स्पर्धेत कचरा व्यवस्थापनाबद्दल पुण्याला दहा पैकी सात गुण मिळाले आहेत. तरीही यावर समाधान न मानता आम्ही दहा पैकी दहा गुण मिळविण्यासाठी आक्रमकरित्या या समस्येवर मार्ग काढत आहोत, असे चव्हाण आणि जगताप यांनी स्पष्ट केले.
सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरणाऱ्या पाणी प्रश्न पक्षाने उत्तम पद्धतीने हाताळला. गेल्या वर्षी शहरात दुष्काळ पडला असतानाही नियोजनबद्ध पाणी पुरवठ्यामुळे पावसाळ्यापर्यंत पुरेसे पाणी देण्यामध्ये आम्हाला यश आले. गेल्या उन्हाळ्यामध्ये खुद्द पालकमंत्र्यांच्या मनात पाणी पुरवठ्याबद्दल संभ्रम असताना माजी पालकमंत्री अजित पवार यांनी यात लक्ष घालून निर्णयप्रक्रियेला चालना दिली. आगामी काळात पुण्याला चोवीस तास पाणी देण्याचे आमचे ध्येय आहे. शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन विविध भागात पाणी साठवण टाक्यांची संख्या वाढविण्यात येते आहे. यासाठी २४८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याच वेळी शहरात सध्या होत असलेली पाण्याची चाळीस टक्के गळती रोखण्यासाठी आम्ही पाईप लाइन दुरुस्तीचे कामी हाती घेणार आहोत, असे वंदना चव्हाण यांनी सांगितले.

‘स्मार्ट सिटी ही फसवी योजना’
केंद्र सरकारने जाहीर केलेली स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया, स्कील इंडिया या सर्व योजना फसव्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या योजनांबद्दल जाहिराती करून पुणेकरांची दिशाभूल केली जाते आहे. स्मार्ट सिटी योजनेची मार्गदर्शक तत्त्वे चुकीची आहेत. चाळीस लाख लोकसंख्येला वेठीस धरून केवळ शहरातील ठरावीक भागाचा विकास होणार आहे. यापूर्वीच्या सरकारने आम्हाला पाच वर्षांत २८०० कोटी रुपये शहराच्या विकासकामांसाठी दिले होते. या सरकारने गेल्या अडीच वर्षांच्या काळात अवघा १५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पुण्याबद्दल दुजाभाव केला जातो आहे, असे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.

‘नदी सुधार ही निव्वळ दिशाभूलच’
तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गाजावाजा करून पुण्याला नदीसुधार योजनेसाठी जायका कंपनीकडून निधी उपलब्ध केल्याचे सांगितले. मात्र, आजपावेतो या कामांसाठी एक रुपयाही आलेला नाही. यापूर्वी योजनेचा निधी महापालिकेकडे सुपूर्द केल्यावर सरकार हस्तक्षेप करीत नव्हते, असेही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नागरिकांच्या सुरक्षिततेवर भर
बाळासाहेब बोडके, स्थायी समिती अध्यक्ष

शहरातील मध्यवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांचे प्रश्न आणि उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या वेगळ्या आहेत. प्रभागातील कचरा प्रभागातच जिरवावा, यासाठी पाठपुरावा केला जात असला तरी मध्यवर्ती भागांमध्ये जागेची उपलब्धता कमी असल्याने हे प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभे राहू शकत नाही. कचराकुंड्या पालिकेने काढून टाकल्याने अनेक नागरिक सकाळी फिरायला बाहेर पडाताना कचऱ्याची पिशवी घेतात आणि रस्त्यांच्या कडेला टाकून देतात. पेठांमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात पहालया मिळतो. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी केवळ बकेट वाटप आणि जनजागृती करुन उपयोग नाही तर जोपर्यंत नागरिकांच्या घरचा कचरा योग्य पद्धतीने उचलला जात नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. रस्त्यावरील पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याबरोबरच शहर बकाल करणाऱ्या फ्लेक्सवर निर्बंध आणण्याची गरज आहे.
कचरा प्रकल्प राबविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शहरातील विविध भागांसाठी स्थायी समितीमार्फत मंजुर करण्यात आला आहे. कचरा टाकण्यासाठी पालिकेला हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली होती. मात्र, ही घोषणा कागदावरच आहे. शहराचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे आमदार, खासदार त्यासाठी पाठपुरावा करत नाहीत. रस्त्यावरील पथारी व्यावसायिकांमुळे अनेक भागात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. पालिकेने पथारी धोरण तयार केले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी ठोसपणे होत नसल्याने हा प्रश्न सुटत नाही. पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी बांधण्यात आलेल्या गाळ्यांमध्ये तसेच मंडईमध्ये या व्यावसायिकांनी बसावे असे बंधनकारक करणे गरजेचे आहे. जे पथारी‌व्यावसायिक याकडे दुर्लक्ष करतील, तसेच त्याचा गैरवापर करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.
शहरातील प्रत्येक चौकात बेकायदा पद्धतीने होर्डिंग तसेच फ्लेक्स उभारले जातात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी होर्डिंग पॉलिसी तयार करण्यात आलेली आहे. मनमानी पद्धतीने फ्लेक्स लावले जात असल्याने शहराचा बकालपणात वाढ होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर प्राधान्यक्रमाणे बेकायदा पद्धतीने लावल्या जाणाऱ्या फ्लेक्सवर बंधने आणली जातील, शहरातील महत्त्वाच्या चौकात पालिकेची होर्डिंग असली पाहिजे. त्यावर केवळ महापालिका तसेच राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्याची व्यवस्था असावी. नागरिकांना सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी मोकळे फूटपाथ, होर्डिंग फ्री शहर करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे.

शहरहिताच्या निर्णयांवर भर राहील
अॅड. वंदना चव्हाण, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पुणेकरांनी, ज्या विश्वासाने गेले दोन टर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक नगरसेवकांना पालिकेत काम करण्याची संधी दिली, त्या विश्वाला पात्र ठरून आम्ही नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या. अत्यंत वेगाने आणि झपाट्याने वाढणारे शहर अशी ओळख पुण्याची झाली असून, अधिकाधिक अत्याधुनिक सुविधा पुरविण्यासाठी आपचा पक्ष सदैव प्रयत्नशील राहिला आहे. ज्या वेगाने शहराचा विकास होत आहे, त्याचा विचार करून आवश्यक त्या सुविधा पुरविण्यामध्ये पग्लिका प्रशासनाला अपयश आले, ही वस्तुस्थिती आहे. नागरिकांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी पालिकेत सत्ताधारी असूनही राष्ट्रवादीने महत्वाच्या प्रश्नावर आवाज उठविला. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरले. आगामी काळात शहरातील कचरा प्रश्न, उच्च दाबाने पाणीपुरवठा याबरोबरच संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे.
पुढील ५० ते ६० वर्षांचा विचार करून शहराचे नियोजन झाले पाहिजे. सत्तेचे सर्वाधिकार हातात असल्यास ठोस निर्णय घेता येत‌ात. निर्णय चुकला तरी त्याची संपूर्ण जबाबदारी ही आपल्यावर असते. पालिकेची सत्ता संपूर्ण हातात असताना काय करता येऊ शकते आणि कोणती कामे होतात याचे सर्वांत चांगले उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवड महपालिका होय. या भागातील मतदारांनी राष्ट्रवादीवर विश्वास दाखवून पक्षाचे उमेदवार बहुमताने विजयी केले. त्यामुळे पालिकेच्या सभागृहात कोणताही विकासाचा निर्णय घेताना इतर पक्षांची कधी गरज पडली नाही. मात्र, पुणे पालिकेत हे पाहायला मिळत नाही. महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी घेण्यासाठी कधी काँग्रेस, मनसे तर भाजप, शिवसेनेची मदत घ्यावी लागत असल्याने निर्णय घेण्यासाठी वेळ लागतो. हे करताना तारेवरची कसरत करावी लागते. गेली दहा वर्षे पालिकेत काम करताना शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिकाधिक सक्षम कशी होईल, यासाठी पीएमपीएमएल बसची खरेदी, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, सांडपाण्यार प्रक्रिया करणारे प्रकल्प, हॉकर्स पॉलिसी, पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठीचे निर्णय आम्ही घेतले. याचा अर्थ सत्ताधारी म्हणून काम करताना शहरातील सर्वच प्रश्न सुटले असा होत नाही. झपाट्याने विकास होत असलेल्या शहरामध्ये समस्यांचा वेगही वाढत असल्याचे नाकारता येणार नाही.
केंद्रात आणि राज्यात आघाडीची सत्ता असताना शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळत होता. मात्र, गेल्या अडीच वर्षांत फारच थोडका निधी पालिकेकडे आला आहे. पुणेकरांनी ज्या विश्वासाने आठही विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार विजयी केले. तसेच खासदारांनाही मोठ्या मताधिक्याने विजयी केले. परंतु, नदीसुधारणा योजना, स्मार्ट सिटी योजनांच्या नावा‍खाली केवळ घोषणा करण्याचे काम या सरकारने केले आहे. शहरातील प्रश्नांवर आठ आमदार, खासदार ठोस भूमिका घेत नसल्याने पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असल्याने राजकारण म्हणून विरोध केला जातो. आगामी निवडणुकीमध्ये पालिकेत बहुमताने राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर पुणेकरांवर कोणताही भुर्दंड न लावता शहर हिताचे निर्णय घेतले जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिका वेबसाइटवरून माहिती अधिकार गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या महापालिकेच्या वेबसाइटवरून माहिती अधिकार कायदा गायब करण्यात आला आहे. माहिती अधिकार कायद्यातील कलम ४ अंतर्गत सर्व सरकारी कार्यालयांनी आपापल्या वेबसाइटवर माहिती अधिकार कायद्याची माहिती देणे बंधनकारक आहे. त्यानुसार पालिकेच्या नवीन वेबसाइटवर गेले सहा महिन्यांपासून ही माहिती नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

ही वेबसाइट अद्ययावत करण्यासाठी पालिकेने लाखो रुपये खर्चले आहेत. पालिकेच्या जुन्या वेबसाइटवर माहिती अधिकाराचे तपशील होते. मात्र, नवीन आणि अद्ययावत वेबसाइटवरून तो तपशील हटविण्यात आल्याचा दावा सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने महापालिका प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी मुख्य सचिवांकडे करण्यात आली आहे.

माहिती अधिकार कायदा २००५मधील कलम ४ नुसार सरकारी​ कार्यालयांना माहिती अधिकार कायद्यासह, दैनंदिन कामकाज, प्रशासकीय अधिकारी, तसेच पालिकेच्या इतर काही कामांची माहिती कार्यालयांमध्ये दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. तसेच, शासकीय संस्थांच्या वेबसाइटवरही माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र, पुणे महापालिकेच्या नवीन वेबसाइटवर माहिती उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. सहा महिन्यांपूर्वी स्मार्ट सिटीच्या नावाखाली पालिकेने जुनी वेबसाइट बंद करून तेथे लाखो रुपयांचे काम खासगी संस्थेस देऊन वेबसाइट सादर केली. मात्र, तेथे कुठेही माहिती अधिकार कायद्यानुसार, बंधनकारक असणारु माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत तरुणीवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

आजारी असलेल्या आजीला हॉस्पिटलमध्ये भेटायला चाललेल्या मुलीला एसटीस्थानकात नेऊन प्रौढ व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. शनिवारी (१४ जानेवारी) सायंकाळी संत तुकारामनगर पिंपरी येथे ही घटना घडली.

या बाबत १९ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. घटनेनंतर संबंधित भाजीविक्रेता फरारी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पीडितेच्या आजीवर महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. शनिवारी ती आजीला भेटण्यासाठी जात होती. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये सोडतो या बहाण्याने आरोपीने तिला दुचाकीवर बसवले. त्यानंतर वल्लभनगर एसटी स्थानकाच्या आवारात नेऊन बलात्कार केला. या वेळी पीडितेच्या डोक्याला मार लागला. या प्रकारानंतर आरोपी फरारी झाला.

युवती भानावर आल्यावर पळत रस्त्याच्या दिशेने आली. तेव्हा एसटी स्थानकाच्या सुरक्षा रक्षकाने पीडितेच्या डोक्याला लागल्याचे पाहून रिक्षात बसवून वायसीएम हॉस्पिटलला पाठवून दिले.

दरम्यान, युवतीवर प्राथमिक उपचार सुरू असतानाच आजीला भेटण्यासाठी आलेल्या नातेवाइकांनी पीडितेला जखमी अवस्थेत पाहिले. ते तिला संत तुकारामनगर पोलिस चौकीत घेऊन आले. तेथे महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर घटना उघड झाली. त्यानंतर उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार पळसुले, सहाय्यक निरीक्षक गजानन कडाळे, फौजदार रत्ना सावंत, हरिष माने आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

फौजदार रत्ना सावंत यांनी पीडितेची चौकशी केल्यावर आरोपीचे नाव निष्पन्न झाले असून, पथक त्याच्या मागावर रवाना झाले आहे. पीडितेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे तिच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनावापर जमिनी सरकारजमा होणार

$
0
0

पंचवीस संस्थांविरोधात सरकारचे पाऊल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरकारकडून घेतलेल्या आणि विनावापर पडून असलेल्या सुमारे पंचवीस शिक्षण संस्थांकडील जमिनी सरकारजमा करण्याचे पाऊल उचलण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यातील प्रमुख नेत्यांशी संबंधित शिक्षणसंस्थांचाही समावेश आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, तसेच पतंगराव कदम, जयंत पाटील आदी बड्या नेत्यांशी संबंधित शिक्षणसंस्थांच्या जमिनींचा यामध्ये समावेश आहे. शैक्षणिक कार्यासाठी राज्यातील संस्थांना नाममात्र दराने सरकारी जमिनी भाडेतत्त्वावर देण्यात आल्या. यापैकी वर्षानुवर्षे विनावापर पडून असलेल्या जमिनी सरकारजमा करण्याची सूचना राज्य सरकारने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या जमिनींची तपासणी केली आणि २५ शिक्षणसंस्थांनी जमिनींचा वापर केला नसल्याचे समोर आले आहे. काही संस्थांनी सरकारी जमिनींचा व्यावसायिक वापरही सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. करारांचे नूतनीकरण न करण्याचेही प्रकार समोर आले आहे. ही सर्व माहिती संकलित करून कारवाई करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.

पूर्वीच्या तरतुदींनुसार सरकारी जमिनींसाठी वार्षिक एक रुपया नाममात्र भाडे आकारण्यात येते. काही मोजक्या संस्थांनी ही रक्कम भरली असली, तरी अद्याप करारांचेही नूतनीकरण करण्यात आलेले नाही. आता कारवाईचा बडगा उगारल्यानंतर काहीजणांनी सरकारशी चर्चा सुरू केली आहे. सरकारी जमिनी प्राप्त केलेल्या संस्थांमध्ये महाराष्ट्र महिला उद्यम ट्रस्ट (मुळशी), छत्रपती शैक्षणिक संस्था (इंदापूर), कासेगाव एज्युकेशन सोसायटी (मावळ), पुणे जिल्हा शिक्षण मंडळ (मुळशी), वागेश्वर विद्यालय (नाझरे), भारती विद्यापीठ (भोर) आणि दादा जाधवराव ट्रस्ट (पुरंदर) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यविक्रीसाठी ‘डायव्हर्जन’?

$
0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com
Tweet : @kuldeepjadhavMT

पुणे : राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील मद्य विक्रीची दुकाने हटविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर, जिल्ह्यात अनेक ठिकाणी काम सुरू असलेल्या महामार्गांना गावांच्या ठिकाणी वळण (डायव्हर्जन) देण्याची मागणी केली जात आहे. तसेच, काही ठिकाणी ग्रामसभेने ठराव करून, तर काही ठिकाणी ग्रामस्थांनी वैयक्तिक पातळीवर त्यासाठीचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडे सुपूर्द केले आहेत.

देशात दरवर्षी महामार्गांवर होणाऱ्या अपघातांत दीड लाख जण मृत्युमुखी पडतात, अशी आकडेवारी समोर आली आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने गांभीर्याने दखल घेत, देशातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर दारूच्या दुकानांना बंदी घालण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत आदेश दिला असून, सध्याच्या दुकानांच्या परवान्यांचे ३१ मार्चनंतर नूतनीकरण करू नये, असेही कोर्टाने बजावले आहे. केवळ दारू दुकाने बंद न करता अशा दुकानांची माहिती देणारे महामार्गांवरील फलकही हटविण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार महामार्गालगतच्या मद्य विक्रीच्या दुकानांची पाहणी केली जात आहे. मात्र, त्यापूर्वीच अनेकांनी आपापली मद्याची दुकाने अखंडीतपणे चालू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

जिल्ह्यातून पुणे-बेंगळुरू महामार्ग, सोलापूर महामार्ग, एक्स्प्रेस वे, जुना मुंबई महामार्ग, नाशिक महामार्ग, नगर-कल्याण महामार्ग जातात. त्याबरोबरच नव्याने पालखी मार्गासह पुणे विभागातील २६ राज्यमार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच, जिल्ह्यातून नगर रस्ता, ताम्हिणी घाट, वरंध घाट, अशा अनेक राज्यमार्गांचा समावेश आहे. या महामार्गांलगत असलेल्या तालुक्याच्या ठिकाणांव्यतिरिक्त अनेक गावांमध्ये बाजारपेठा विकसित झाल्या असून बहुतांश ठिकाणी मद्य विक्रीची दुकाने आहेत. या दुकांनाचा व्यवसायही आता स्थिरावलेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे त्यांना दुकाने हटविण्याची वेळ येऊ नये, यासाठी गेल्या महिन्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) महामार्ग व राज्यमार्गांना गावाबाहेरुन वळण देण्याचे अनेक प्रस्ताव दाखल झाले आहेत. दरम्यान, यामध्ये आपापल्या मतदारसंघातील खासदारांनाही साकडे घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

व्यापार बुडण्याची भीती

महामार्गाला गावाबाहेरून वळण देण्याचा प्रस्ताव सादर करताना गावांतील व्यापार बुडण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. या मागे थेट मद्यविक्रीच्या दुकानांना वाचविण्याचा हेतू असल्याचे जाणीवपूर्वक दर्शविले जात नाही. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयापूर्वी महामार्गांची आखणी करतानाच काही गावांनी महामार्गाला विरोध करित ‘डायर्व्हजन’ची मागणी केली होती. मात्र, आता मद्य विक्री दुकाने हटविण्याची मागणी केल्यानंतर राष्ट्रीय व राज्य महामार्गाला ‘डायर्व्हजन’ची मागणी वाढली आहे. त्या निर्णयामुळेच हे प्रस्ताव वाढले असण्याची शक्यता संबंधित यंत्रणांतील सूत्रांनी ‘मटा’ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्करदिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारताच्या ६९व्या लष्करदिनानिमित्त लष्करातर्फे हुतात्मा सैनिक, अधिकाऱ्यांना मानवंदना देण्यात आली. या निमित्त वानवडी येथील नॅशनल वॉर मेमोरिअल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लष्करी अधिकाऱ्यांबरोबरच नागरिकांनीही या मेमोरिअला भेट देऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

लष्कराच्या दक्षिण क्षेत्रातर्फे (सदर्न कमांड) क्षेत्राचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एम. हारिस यांनी वॉर मेमोरिअल येथे पुष्पचक्र अर्पण केले. लष्करात कार्यरत अनेक अधिकारी, सैनिक, माजी अधिकारी व सैनिक, प्रशासकीय अधिकारीही या वेळी उपस्थित होते. लष्कराच्या बँडपथकाने देशभक्तीपर गीते सादर केली. परिसरातील काही शाळांच्या विद्यार्थ्यांनीही या प्रसंगी उपस्थित राहून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. लष्करदिनानिमित्त वॉर मेमोरिअल रात्री आठपर्यंत सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीही वॉर मेमोरिअलला भेट देऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. त्याचबरोबर लगतच्या सदर्न कमांड संग्रहालयालाही अनेकांनी भेट देऊन लष्कराचा, दक्षिण क्षेत्राचा इतिहास, शस्त्रास्त्र व गणवेशात झालेले बदल, महत्त्वाच्या लष्करी संस्था, युद्ध व कारवायांची माहिती घेतली.

दरम्यान, मिलिटरी हॉस्पिटलतर्फे (सीटीसी) लष्कर दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. मेजर जनरल दीपक कालरा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिरात अधिकारी, सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनीही रक्तदान केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाव्य युतीबाबत आज पहिली बैठक

$
0
0

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांच्यातील संभाव्य युतीबाबतची पहिली औपचारिक बैठक आज, सोमवारी होणार आहे. युती करायची की नाही, करायची झाल्यास जागावाटप काय असेल, दोन्ही पक्षांसाठी सन्मानपूर्वक युती होईल का, अशा अनेक प्रश्नांची दिशा सोमवारच्या बैठकीत ठरण्याची चिन्हे आहेत.

विधानसभेमध्ये आठही आमदार निवडून आल्याने महापालिकेमध्ये स्वबळावरच लढण्याची भावना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती. तरीही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालिकेतील युती संदर्भात बोलणी करण्याच्या सूचना स्थानिक स्तरावरील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार, शहरातील भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची युतीबाबतची बैठक सोमवारी सायंकाळी होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले हे भाजपकडून, तर संपर्कनेते डॉ. अमोल कोल्हे आणि शहरप्रमुख विनायक निम्हण हे शिवसेनेकडून या बैठकीत सहभागी होणार आहेत.

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती झाली होती. त्यामध्ये, भाजपने ९० तर शिवसेनेने ६२ जागा लढविल्या होत्या. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत १६२ सदस्य असतील. त्यानुसार, जागावाटप करण्यासाठी प्राथमिक बोलणी या बैठकीत होण्याची शक्यता आहे. शहरात भाजपचे आठही आमदार असल्याने आतापर्यंतच्या सूत्राऐवजी नवे सूत्र भाजपकडून मांडले जाण्याची शक्यता आहे. तर, कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या सूत्रानुसार जागावाटप पदरात पाडून घेण्याची शिवसेनेची मनस्थिती नाही. सन्मानपूर्वक युतीमध्ये शिवसेनेला योग्य स्थान मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात येत आहे. एकाचवेळी सर्व जागांवर लढण्याची तयारी दोन्ही पक्षांनी यापूर्वीच केली आहे. त्यानुसार, मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असली, तरी अनेक ठिकाणी सक्षम उमेदवारांची वानवा असल्याने युती झाल्यास फायदा अधिक फायदा होईल, अशी शक्यता आता स्थानिक इच्छुकांकडून वर्तवली जात आहे. तसेच, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होण्याचे संकेत मिळत असल्याने युती करूनच निवडणूक लढविणे गरजेचे असल्याचा मतप्रवाह व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचे निषेध आंदोलन

$
0
0

गांधीजींच्या ऐवजी मोदींचा फोटो छापल्याचा निषेध

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहर जिल्हा काँग्रस कमिटीने रविवारी सकाळी पुणे रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून मोदी सरकारच्याविरोधात आंदोलन केले. काँग्रेसच्या आंदोलनाच धसका घेऊन पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला, तसेच पुतळ्याजवळ जाण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना विरोध केला होता. या वेळी पोलिस आणि काँग्रेस नेते-कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाचीही झाली.

खादी आणि ग्रामउद्योग महामंडळाच्या डायरी व कॅलेंडरवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र काढून टाकण्यात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने मोदी सरकारविरोधात काळ्या फिती लावून, तसेच घोषणा, निषेधाचे फलक दाखवत रविवारी आंदोलन केले. या प्रसंगी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी आमदार रामभाऊ मोझे, दीप्ती चवधरी, सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, सुधीर जानजोत, सोनाली मारणे, विकास लांडगे, नगरसेविका लता राजगुरू, लक्ष्मी घोडके, अजित दरेकर, अनिल सोंडकर, मुख्तार शेख, सदानंद शेट्टी, नीता रजपूत, रजनी त्रिभूवन, शेखर कपोते, सुनील मलके, अॅड. नीलेश बोराटे, संगीता तिवारी, नदीम मुजावर आदी उपस्थित होते.

‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्या मोदी सरकाचा धिक्कार असो’, ‘नही चलेंगी नही चलेंगी हिटलरशाही नही चलेंगी’, ‘गांधींचा चरखा चोरणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा असलेले फलक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातात होते. ‘भाजप सरकार आपला मनमानी कारभार करत आहे. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणे. नोटाबंदीचा निर्णय घेऊन गोरगरीबांना वेठीस धरणे आणि आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान करण्यासही या सरकारने कमी केलेले नाही. खादी म्हणजे गांधी, अशी जगभरात ओळख असतानाही पंतप्रधान मोदींचा कॅलेंडरवर फोटो छापण्यात आला आहे. गांधी विचार संपवण्याचा हा कट असून ही अत्यंत निंदनीय घटना आहे,’ अशी टीका बागवे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संतूरच्या सुरांत ‘स्वरझंकार’ची सांगता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संतूरसारखे नाजूक सुरांचे वाद्य, त्याचे तितक्याच नजाकतीने केलेले वादन आणि संथ आणि दृत सादरीकरणाचा साधलेला नेमका मेळ यांनी पुणेकर रसिकांची मने जिंकली. ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ आणि व्हायोलिन अकादमीच्या वतीने आयोजित ‘स्वरझंकार’ महोत्सवाच्या तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या दिवसाची सुरुवातच यमन रागाच्या प्रसन्न सुरावटींनी झाली. प्रख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य आणि सुपुत्र संतूरवादक राहुल शर्मा यांनी उपस्थित रसिकांना आपल्या बहारदार सादरीकरणाने थक्क केले.

‘यमन’चा अत्यंत महत्त्वाचा स्वर असलेल्या तीव्र मध्यमाला हळूवारपणे गोंजारत ‘नीरेग’ या लक्षणाच्या स्वरांशी खेळणारे हे वादन दर्दींना मोहून टाकणारे होते. तांब्याच्या डग्ग्याने सर्वसामान्यपणे एरवी घुमारा निर्माण होतो; पण त्याच तांब्याच्या डग्ग्याचा तबल्याच्या साथीने उत्तम उपयोग करून मुकेश जाधव यांनी संतूरसह केलेली तबला साथ खुलवली. या दोन्ही कलाकारांच्या अप्रतिम वादनाने, तार आणि ताल वाद्य किती सुरेख संवाद साधू शकते, याचा उत्तम अनुभव पुणेकरांनी घेतला.

दृत स्वर समुच्चयाचा पाठलाग करणारे दोन किंवा तीनच स्वतंत्र स्वर विशिष्ट ठेहरावाने पेश करताना राहुल त्या वादनाचा स्वतःही मनापासून आस्वाद घेत होते. बांगड्यांच्या किणकिणाटाप्रमाणे आपले वाद्य मंजुळ ध्वनी निर्माण करू शकते, याचे पूर्ण भान ठेवून राहुल यांनी कधी संपूर्ण हाताने संतूरच्या तारांवर दाब देत, तर कधी फक्त नखाने काही तारा छेडून यमन रागाची वैशिष्ट्येही फार खुबीने पेश केली. रसिकांच्या आग्रहाखातर त्यांनी वादनाची सांगता पहाडी धून पेश करून केली.

राहुल यांनी सादर केलेल्या यमनच्या प्रसन्न सुरावटींमुळे अत्यंत स्वाभाविकपणे वातावरणच उत्साही होऊन गेले. त्याला संपूर्ण छेद देणाऱ्या पुरियासारख्या गंभीर स्वरूपाच्या रागाने रामपूर-सहस्वान घराण्याचे प्रख्यात गायक उस्ताद राशीद खाँ यांनी आपल्या गायनास प्रारंभ केला. बडा ख्याल आणि दृत बंदिशीत ‘पुरिया’ सजला. अत्यंत करुण रसपूर्ण अशा पुरिया रागाचा विस्तार मुराद अली यांच्या सारंगी साथीने अधिक खुलला. खाँ यांना पं. विजय घाटे यांनी तबल्याची, ज्योती गोहो यांनी हार्मोनियमची आणि संदीप देशमुख व नागेश आडगावकर यांनी तानपुरा साथ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील सर्व घटकांना न्याय देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या मध्य भागात छोट्या बसच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्यापासून ते पथारी व्यावसायिक-फेरीवाल्यांसाठी आठवडे बाजार सुरू करण्यापर्यंतच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहरातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाईल. मुंबई-ठाण्याच्या धर्तीवर स्वतंत्र मेडिकल कॉलेज आणि नागरिकांना विविध सुविधा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यावरही काँग्रेसकडून भर दिला जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध घटकांच्या अपेक्षा ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘मटा जाहीरनामा’च्या माध्यमातून जाणून घेतल्या होत्या. व्यापारी महासंघ, रिक्षा संघटना, पथारी व्यावसायिक, आर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिक, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, अभ्यासकांनी मांडलेल्या अपेक्षांचे संकलन शहरातील राजकीय पक्षांसमोर मांडण्यात येत आहे. विविध समाज घटकांनी मांडलेल्या ‘पुण्याच्या जाहीरनाम्या’विषयी रविवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे या वेळी उपस्थित होते.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी, यासाठी काँग्रेसने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आगामी काही वर्षांत शहरात मेट्रो सुरू होण्याची शक्यता असल्याने जलद बस वाहतूक (बीआरटी) योजनाही प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. बीआरटी व्यवस्थेतील त्रुटी दूर करून ही सेवा नागरिकांना फायद्याची ठरावी, यासाठी काँग्रेसकडून पाठपुरावा केला जाईल, असे बागवे यांनी सांगितले; तसेच शहरांतर्गत लहान-लहान रस्त्यांवर नागरिकांच्या सोयीसाठी छोट्या बस उपलब्ध करून देण्याची काँग्रेसची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेची अनेक हॉस्पिटल आहेत; परंतु अजूनही पालिकेचे स्वतंत्र मेडिकल कॉलेज नाही. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून कॉलेजची निर्मिती व्हावी, यासाठी काँग्रेसकडून पुढाकार घेतला जाईल. पालिकेच्या विविध हॉस्पिटलसाठी दोनशे डॉक्टरांची टीम यामुळे उपलब्ध होऊ शकेल, असा दावा विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केला.
महापालिकेच्या हद्दीतील सर्व नागरिकांना समान पाणीपुरवठा करण्यापासून ते कचरा निर्मूलनासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय व्यवस्था करण्यापर्यंत विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले; तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात असूनही ‘जन्मदाखला’ घरपोच देण्याची व्यवस्था अंमलात येऊ शकलेली नाही. ती कार्यान्वित करण्यासाठी काँग्रेसकडून पाठपुरावा केला जाणार असल्याचे स्पष्ट करून नागरिकांशी संबंधित सर्वच सेवा ऑनलाइन करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचे बागवे व शिंदे यांनी सांगितले.

करदात्यांना सवलत

महापालिकेचा मिळकतकर प्रामाणिकपणे भरणाऱ्या करदात्यांवर अधिकचा बोजा लादण्याऐवजी थकबाकी वसूल करण्यासाठी काँग्रेसकडून प्राधान्य देण्यात येणार असल्याचा दावा विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी वसूल झाली, तर करात सवलत देण्याचाही विचार त्यांनी व्यक्त केला; तसेच पालिकेचा कर भरणाऱ्यांना ‘मेडिकल इन्शुरन्स’ देता येईल का, याची चाचपणी काँग्रेसतर्फे केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोथरूडला आनंदाची पर्वणी

$
0
0


‘हॅपी स्ट्रीट’ उपक्रमामध्ये विद्यार्थी, नागरिकांचा उत्साही सहभाग

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कुठे ‘झुंबा’च्या तालावर थिरकरणारी तरुणाई, कुठे झेंबे वादनाचा ठेका धरलेले आबालवृद्ध, कुठे रंगलेला फुटबॉल, तर कुठे बापलेक बॅडमिंटनमध्ये दंग. कुठे लाइव्ह स्टेजवर बँडसह गाण्याची उत्सुकता, तर कुठे दोरीच्या उडीची रंगलेली स्पर्धा... अशा धम्माल प्रसन्न वातावरणात कोथरूडमधला श्रीकांत ठाकरे रस्ता आनंदात जणू न्हाऊन निघाला होता.

निमित्त होते, महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, व्हीजे डेव्हलपर्स आणि पुणे पोलिस, पुणे वाहतूक पोलिस, पुणे महापालिकेतर्फे आयोजित हॅपी स्ट्रीट उपक्रमाचे. कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रोड, वारजे, एरंडवणा, शिवाजीनगर, बावधन, पाषाण अशा विविध भागातून आलेल्या उत्साही पुणेकरांच्या गर्दीने हा रस्ता फुलून गेला होता. कोथरूडमधील यंदाच्या हंगामातील हा शेवटचा हॅपी स्ट्रीट असल्याने हजारो नागरिकांनी आवर्जून हजेरी लावली होती. यापुढील हॅपी स्ट्रीट पुढील रविवारी पिंपळे सौदागर येथे होईल.

शाळा कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी आपल्या मित्रमैत्रिणींसह हॅपी स्ट्रीटवर विविध उपक्रमांची मजा लुटत होते. काहींनी कुटुंबीयांसहित हजेरी लावली होती. नोकरदार व्यक्तीही आपल्या मित्र-मैत्रिणींसह या हॅपी स्ट्रीटवर धमाल करत होते. काही ज्येष्ठ नागरिकही आपल्या सवंगड्यांसह ही मजा अनुभवत योगासने आणि ध्यानधारणाही करत होते.

‘झुंबा डान्स’ हा या हॅपी स्ट्रीटवरचा सर्वाधिक हीट कार्यक्रम ठरला. स्टेजवरच्या मार्गदर्शकांकडे पाहत विविध गाण्यांच्या तालावर त्यांच्या बरहुकुम नाचण्याचा आनंद घेत होते. ड्रम सर्कलवर अनेकांनी पहिल्यांदाच ड्रम वाजविण्याचा आनंद घेतला. लाइव्ह स्टेजवर उत्तम बँडसह सर्वांसमोर विविध प्रकारची गाणी सादर करण्याची संधीही अनेकांनी आवर्जून साधली. स्ट्रीट आर्ट झोन हे लहान मुलांसाठी आकर्षण ठरले. रस्त्यावरच अनेक मुलांनी खडूच्या साहाय्याने आकर्षक चित्र, रांगोळ्याही काढल्या. छोट्या सायकल घेऊन मुले मनसोक्त फिरत होती. मोठ्यांनी मोठ्या सायकलवर फिरण्याचा आनंद घेतला. लहान मुलांसह ज्येष्ठांनीही आकर्षक सजावट केलेल्या सायकल रिक्षात फेरी मारली आणि फोटोही काढले. स्केटबोर्ड आणि वेव्हबोर्डवर फिरणारी मुले या स्ट्रीटवर दिसून येत होती.‘जोर लगाके हैया’ म्हणत ज्येष्ठांबरोबरच लहान मुलांनीही रस्सीखेचचा आनंद लुटला. ध्यानधारणा आणि योगासनांचा योगही अनेकांनी साधला. वैयक्तिक आणि जोडीनेही दोरीच्या उड्या मारणे, सापशिडी, संगीतखुर्ची असे खेळही येथे रंगात आले होते. ई वेस्ट गोळा करण्याच्या स्टॉलला आणि वंचित मुलांसाठी जुनी पण चांगली खेळणी दान करण्याच्या स्टॉललाही उत्तम प्रतिसाद मिळाला. काही संस्थांकडून नेत्रदानाचा जागरही करण्यात आले.

‘आम्ही सलग तिसऱ्या रविवारी हॅपी स्ट्रीट उपक्रमात सहभागी झालो आहोत. आमचा शाळेतला सर्व ग्रुप इथे आहे. आम्ही इथल्या सर्वच अॅक्टिव्हिटिजमध्ये भाग घेतो. इथल्या तीन तासांच्या मजामस्तीत आठवडाभराचा ताण दूर होतो,’ असे अक्षय, रितिका, हर्षल, गायत्री, कुणाल, दीपिका यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक कर्तव्याला महत्त्व द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘तरुणांनी करिअरपेक्षा सामाजिक कर्तव्याला महत्त्व दिल्यास त्यांना जगण्याचा खरा अर्थ समजेल. जीवनात ‘अर्निंग’ हे एकमेव ध्येय नसल्याचे समजून समाजाशी नाते जोडल्यास आयुष्याचे सार्थक होईल,’ असा मंत्र तरुणांचे आदर्श असणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, डॉ. अनिल अवचट आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांनी रविवारी दिला.

महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका), मुक्तांगण मित्र आणि साधना ट्रस्टच्या वतीने ‘पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना’ या कार्यक्रमात ‘एमकेसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी डॉ. बंग, डॉ. अवचट आणि डॉ. नाडकर्णी यांच्याशी संवाद साधला. या वेळी डॉ. बंग यांच्या हस्ते डॉ. अवचट लिखित ‘कुतुहलापोटी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. बंग म्हणाले, ‘तेरा वर्षांचा असताना मला आणि माझ्या मोठ्या भावाला प्रश्न पडला, की जीवनात काय करायचे. तेव्हा मी शेती विषयाशी, तर भावाने आरोग्याशी निगडीत काम करण्याचे ठरवले आणि गेली ५३ वर्षांपासून हेच काम करत आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयुष्यात करिअरला अधिक महत्त्व देण्याऐवजी सामाजिक कर्तव्य पार पाडण्याला अधिक महत्त्व दिले. त्यामुळेच राज्यातील सर्वांत दुर्गम भागातील गडचिरोली जिल्ह्यात जाऊन काम करण्याचे निश्चित केले आणि तेथील समस्यांशी नाळ जुळवून काम करायला सुरुवात केली. या कारणानेच आयुष्य सुखी आणि समाधानी झाले. समस्यांचा विचार केल्यावर त्या अधिक असल्याचे समजले आणि सोडविण्यासाठी मी व राणी असे दोघेच असल्याचे समजले. त्यामुळे ‘निर्माण’ संस्थेची स्थापना केली. स्वयंकेंद्रीकरणातून ‍व्याप्तीकेंद्रीकरणाकडे येणाऱ्या आणि समाजासाठी काम करणाऱ्या तरुणाईसाठी व्यासपीठ आहे.’

डॉ. नाडकर्णी म्हणाले, ‘गणिताची आवड नसल्याने मी इंजिनीअरिंग क्षेत्राकडे न वळता वैद्यकीय शिक्षण घेण्याचे ठरविले. मनोविकारशास्त्राचे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेताना माझे शिक्षक मला नेहमी सांगायचे, की तुझ्यासोबत लोक खूप चांगले बोलतात आणि व्यक्त होतात. त्यामुळे मला समाजासाठी काही तरी काम करण्याची प्रेरणा मिळाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी मेडिकल कॉलेजमध्ये विभागप्रमुख देखील होऊ शकलो असतो. मात्र, तसे न बाहेर पडून करता समाजिक सेवा करण्यावर भर दिला. स्वत:च्या कल्पना स्वत:च्या शक्तीवर पडताळून पाहण्याची संधी मिळाली आणि शिकत गेलो.’

डॉ. अवचट म्हणाले, ‘जीवन जगताना ज्या गोष्टीत माझे मन रमत नाही, ती गोष्ट मी करतच नाही, तर सोडून देतो. म्हणजेच ‘बाय डिडक्शन’ या तत्त्वाचा वापर करत जगलो. माझ्या जीवनात महत्त्वाकांक्षा अजिबातच नव्हत्या. त्यामुळे जीवनात जे घडत गेले, ते स्वीकारत गेलो. कदाचित याच कारणाने आज आनंदाने जीवन जगत आहे. गरजा कमी ठेवा. त्या वाढवल्या, तर तुमचे आयुष्य विक्रीला काढावे लागेल. कमी गरजांमध्ये सुखी आणि समाधानी जीवन जगता येईल.’ साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. मुक्ता पुणतांबेकर उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचा भर आरोग्यावर

$
0
0

अरविंद शिंदे, गटनेते
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टींवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. यामध्ये शहरातील आरोग्य सुविधा आणि त्या अनुषंगिक बाबींवर सर्वाधिक भर दिला जाणार आहे. विविध हॉस्पिटल्ससाठी महापालिकेने जादा एफएसआय दिला असला, तरी त्या बदल्यात पालिकेला खाटा किंवा इतर लाभ मिळण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्या संदर्भात वेळोवेळी झालेल्या करारांमध्ये काही त्रुटी राहून गेल्या आहेत. त्यामुळे यापुढील काळात करारांचे नूतनीकरण करताना किंवा कोणत्याही हॉस्पिटलसाठी नव्याने एफएसआय देताना करारांची तपासणी अधिक काटेकोरपणे केली जावी, यासाठी काँग्रेस दक्ष असेल; तसेच करारानुसार अंमलबजावणी व्हावी, यासाठीही पाठपुरावा केला जाईल. शहरातील पालिकेच्या हॉस्पिटलना डॉक्टर उपलब्ध व्हावेत, याकरिता महापालिकेचे मेडिकल कॉलेज स्थापन करण्यासाठीही काँग्रेसचा प्रयत्न असेल. त्यामुळे या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या डॉक्टरांची सेवा दोन वर्षांसाठी पालिकेला उपलब्ध होऊ शकेल. मेडिकल इन्शुरन्स हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. महापालिका शहरातील सर्व नागरिकांकडून मिळकतकराच्या माध्यमातून कर आकारणी करत असली, तरी त्या बदल्यात पालिकेकडून काय मिळते, अशी नागरिकांची धारणा आहे. ती बदलण्यासाठी पालिकेमार्फत कर भरणाऱ्या नागरिकांना मेडिकल इन्शुरन्स देता येईल का, याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे कर भरणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही वाढेल, अशी शक्यता आहे.
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील पटसंख्या सातत्याने घसरत असून, मराठी शाळांची संख्याही कमी होत आहे. त्यामुळे शहरातील नामवंत खासगी शाळांचे सहकार्य घेऊन शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कसा मिळेल, यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असेल. पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांसमवेत एकत्र शिक्षणाची संधी मिळाली, तर त्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारावी, याकरिता पीएमपीला सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहेच. मात्र, मुळातच दहा वर्षांनंतरही पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) या स्वतंत्र कंपनीला अस्तित्व निर्माण करता आलेले नाही. पीएमटीपेक्षाही पीएमपी अधिक तोट्यामध्ये आहे; तसेच केवळ संचलन तूट किंवा इतर गोष्टींसाठी पालिकेकडून निधी घेतला जातो; पण कोणतेही उत्तरदायित्व नाही. त्यामुळे पीएमपी कंपनीचे विभाजन करून पूर्वीप्रमाणे पुणे महापालिकेसाठी स्वतंत्र परिवहन व्यवस्था निर्माण करण्याची काँग्रेसची मागणी आहे. पीएमटी अस्तित्वात आल्यास त्यावर महापालिकेचे नियंत्रण राहील. वाहतूक व्यवस्थेतील सुधारणेसाठी शहरातील प्रचंड कोंडी होणाऱ्या चौकांमध्ये उड्डाणपुलांची साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न असेल.
शहरातील विविध प्रश्नांवर योग्य तोडगा काढण्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अभ्यासक यांची एकत्रित समिती करण्यात येईल. त्यांच्याकडून विविध सूचना घेण्यात येऊन त्यानुसार नियोजन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहील. त्याशिवाय शहराचे पर्यावरण उत्तम राहावे, डोंगरमाथा-डोंगरउतार यावरील बांधकामांबाबत निश्चित धोरण असावे, अशी काँग्रेसची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. राज्य सरकारकडे हा प्रश्न प्रलंबित असल्याने त्यांनी त्यावर योग्य निर्णय घ्यावा.
पुणे शहराच्या परिसरामध्ये अनेक मोठे उद्योजक, कंपन्या आहेत. या सर्वांना त्यांच्या उत्पादने-वस्तूंच्या प्रदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता असते. दुर्दैवाने, दिल्लीतील प्रगती मैदानाच्या धर्तीवर पुण्यासारख्या शहरामध्ये प्रदर्शनासाठी मोठ्या जागेची कमतरता आहे. त्यामुळे ‘एक्झिबिशन सेंटर’च्या निर्मितीसाठी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असेल. याद्वारे, अनेक उद्योजकांना संधी मिळू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images