Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

धन्य आम्ही भट देखियला..

$
0
0

प्रदीप निफाडकर लिखित ‘सुरेश भट आणि’ या पुस्तकाचे प्रकाशन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘गझलकार सुरेश भट यांच्या गझल, कवितांमधून विश्वाचे दुःख प्रकट झाले. त्यांनी दुःखाशी मैत्री केली. स्त्रियांचे मनोविश्व त्यांनी जितक्या कुशलतेने व्यक्त केले, तितके मराठी साहित्यात कुणालाही जमले नाही, अशा सुरेश भटांचा सहवास मिळाल्याने ‘धन्य आम्ही भट देखियला’ अशी भावना हृदयात दाटून येते,’ असे सांगून आगामी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी सुरेश भटांच्या साहित्याचे पैलू उलगडले.
नंदिनी पब्लिकेशन हाउसतर्फे प्रकाशित व प्रदीप निफाडकर लिखित ‘सुरेश भट आणि’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. काळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी सुरेश भटांच्या साहित्याचा मागोवा घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर, ज्येष्ठ कथाकार भारत सासणे, सुरेश भट यांच्या पत्नी पुष्पा भट, नंदिनी तांबोळी आदी या वेळी उपस्थित होते.
‘भटांनी गझलांना मोठे केले आणि गझलांनी भटांना मोठे केले. त्यांची कविता कालोत्तीर्ण राहिली. भटांनी दुःखाला जवळ करण्याच्या वृत्तीने सगळ्या दुःखितांचा भोग अंगावर घेतला,’ असे सांगून काळे यांनी भटांच्या गझलांचे दाखले दिले. मिर्झा गालिब, मीर यांच्या शायरीतील शेर ऐकवून त्यांनी भट यांच्या जगण्याचा आणि साहित्याचा आढावा घेतला. ‘सुरेश भट हे लोकांशी समरस झाले होते. त्यामुळे त्यांनी शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडली. सामान्य माणसांना भोगाव्या लागणाऱ्या दुःखाला आवाज फोडण्याची किमया त्यांना साधता आली,’ याकडे काळे यांनी लक्ष वेधले.
कुवळेकर म्हणाले, ‘निफाडकर यांनी सुरेश भट यांच्या जीवनाचा मांडलेला पट हा अधुनिक काळातील मराठी गझलेच्या प्रवासाचे, मराठी साहित्यव्यवहाराच्या अलीकडच्या काळाचे एक चित्र आहे. गुरूवरची निष्ठा, प्रेम, आदर हल्ली क्षणात बदलला जातो, अशा काळात निफाडकर यांच्यासारख्या शिष्याने आपल्या गुरूचे चरित्र लिहिणे ही उल्लेखनीय बाब आहे.’ प्रदीप निफाडकर यांनी पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विषद केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सामायिक परीक्षा बारगळली

$
0
0

तांत्रिक अडचण आणि पुरेशी तयारी नसल्याने एफटीआयआय व सत्यजित रे संस्थेचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
चित्रपट शिक्षणासाठी देशात सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचे तूर्तास बारगळले आहे. राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) व कोलकाता येथील सत्यजित रे चित्रपट संस्था या दोन संस्थांमध्ये सामायिक प्रवेश परीक्षेसाठी बोलणी सुरू होती. तांत्रिक अडचण व पुरेशी तयारी नसल्याने सामायिक परीक्षा घ्यायला नको, या निर्णयावर बोलणी थांबली आहेत. पुढच्या वर्षी ही सामायिक परीक्षा होऊ शकते, असे या दोन्ही संस्थांतर्फे सांगण्यात आले.
एफटीआयआय व सत्यजित रे या दोन संस्था केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्यांतर्गत येतात. यापैकी पुण्यातील एफटीआयआय ही देशातील सर्वात जुनी चित्रपट शिक्षण संस्था आहे. सत्यजित रे संस्था काही वर्षांपूर्वी स्थापन झाली आहे. चित्रपट कलेचे शिक्षण देणाऱ्या केंद्राच्या या दोनच संस्था आहेत. त्या एकाच खात्यांतर्गत येत असल्या, तरी त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य किंवा एकत्रित काम झालेले नाही. या पार्श्वभूमीवर सामायिक परीक्षेचा विषय महत्त्वाचा मानला जात होता.
सामायिक प्रवेश परीक्षेसाठी या दोन संस्थांमध्ये कोलकाता येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. दोन्ही संस्थांचे प्रमुख तसेच अधिकारी या बैठकीला हजर होते. दोन्ही संस्थांचे काम एकसारखे असल्याने प्रवेश परीक्षा सामायिक पद्धतीने कशी घेता येईल, देशाच्या कोणत्याही भागातून विद्यार्थ्याला दोन्ही संस्थासाठी एकच परीक्षा कशी देता येईल, परीक्षेचे स्वरूप कसे असेल, परीक्षा किती केंद्रांवर आयोजित करावी लागेल, अशा प्रकारची चर्चा या बैठकीत झाली. परीक्षा आगामी शैक्षणिक वर्षासाठी घ्यायची झाली तर ती पुढील काही महिन्यात आयोजित करावी लागेल, त्यासाठी पुरेशी तयारी नसल्याने यंदा सामायिक परीक्षा घेण्यात येऊ नये, या निर्णयावर बैठक उरकण्यात आली.
‘एफटीआयआयची देशभरात २४ ठिकाणी प्रवेश परीक्षा घेतली जाते. सत्यजित रे शिक्षण संस्थेची याच पद्धतीने प्रवेश परीक्षा होते. दोन्ही संस्थांनी मिळून परीक्षा घेतली तर दोन वेगळ्या परीक्षा द्याव्या लागणार नाहीत. विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध राहील. परीक्षेसाठी २५ लाखाच्या पुढे खर्च येतो, तसेच विद्यार्थ्यांनाही येणारा खर्च सामायिक परीक्षेमुळे कमी होऊ शकतो, अशा विचारातून बैठक घेण्यात आली, पण त्यात निर्णय होऊ शकला नाही,’ असे ‘एफटीआयआय’चे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी ‘मटा’शी बोलताना स्पष्ट केले.
-----------------
‘एफटीआयआय’च्या शैक्षणिक परिषदेची बैठक १७ जानेवारी रोजी होणार आहे. सामायिक परीक्षेसाठी झालेल्या दोन संस्थांच्या बैठकीत काही निर्णय झाला असता तर शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव ठेवता आला असता. आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेश झाल्यानंतर पुन्हा बोलणी सुरू करण्यात येईल. पुढील वर्षी सामायिक परीक्षा होऊ शकते.
- भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी हाच प्रचाराचा केंद्रबिंदू

$
0
0

इच्छुकांचा सोसायटी संपर्कावर भर

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २६मध्ये पिण्याच्या पाण्याचा मुद्दा प्रचाराचा केंद्रबिंदू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आचारसंहिता लागू होताच अनेक इच्छुकांनी सोसायट्यांमधील संपर्कावर भर दिला आहे. त्यापैकी प्रबळ इच्छुकांनी संपर्काचा पहिला टप्पादेखील पूर्ण केला आहे.

बहुतांशी सोसायट्यांचा समावेश असलेल्या प्रभागातील लोकसंख्या गेल्या दशकात खूप वेगाने वाढली आहे. त्यामुळे विकास आराखड्यानुसार सोयीसुविधा देण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. टोलेजंग इमारती आणि भव्य गृहप्रकल्पांमुळे वाकड, पिंपळे निलख परिसराचे रूप पालटून गेले आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार प्राथमिक सुविधा पुरवण्याचे मोठे आव्हान या ठिकाणी निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून हिवाळ्यातही अनेक सोसायट्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली आहे. विकास आराखड्यामध्ये पुरेशा प्रमाणात आरक्षणे नसल्यामुळे सर्वांगीण विकास होण्यात अडथळा निर्माण होत आहे. याशिवाय नागरी सुविधांच्या बाबतीत मोठा ताण निर्माण झाला आहे. रस्ते अरुंद आहेत. भू-संपादन रखडले आहे. त्यामुळे नव्या लोकप्रतिनिधींसमोर कडवी आव्हाने आहेत.

सध्या या भागात नगरसेवक विलास नांदगुडे, आरती चोंधे, स्वाती कलाटे, विनायक गायकवाड प्रतिनिधित्व करत आहेत. हिंजवडी आयटी पार्कमुळे उच्चशिक्षित नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे.’ स्थानिक-बाहेरचा’ हा मुद्दा कालबाह्य ठरू लागला आहे. त्यामुळे प्रभावी जनसंपर्क आणि सुविधांच्या बाबतीत पाठपुरावा करणारा लोकप्रतिनिधी नागरिकांना हवा आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच मुळा नदी सुधार योजना, पूररेषा, सांडपाणी व्यवस्थापन हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी इमारती उभारताना अनेक ओढे-नाले गायब झाले आहेत. सांडपाणी थेट नदीमध्ये जात असल्यामुळे जलप्रदूषणाचा मुद्दा प्रकर्षाने जाणवत आहे.

गाव ते महानगर प्रवासाच्या वाटचालीत वाकड, पिंपळे निलखमधील चित्र झपाट्याने बदलले आहे. ग्रामपंचायतीपासून नगरपालिका, महापालिकेत आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे; मात्र गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेचा प्रभाव जाणवला. त्यामुळे सेना-भाजपला चांगली मते मिळाली. हीच संधी ‘कॅच’ करण्याचा प्रयत्न युतीकडून होत आहे. झालेल्या चुका सुधारून राष्ट्रवादी काँग्रेस वर्चस्व कायम ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. नव्या कार्यकर्त्यांची मोठी फळी या ठिकाणी निर्माण होत आहे. त्यामुळे उमेदवार निवडीचे अवघड काम प्रमुख पक्षांना करावे लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, मयूर कलाटे यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे आणि शहरप्रमुख राहुल कलाटे यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रमुख पक्षाची उमेदवारी मिळो किंवा न मिळो, आता थांबायचे नाही, या इराद्याने अनेक नवे कार्यकर्ते तयारी करत आहेत. त्यांच्यासाठी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पर्याय उपलब्ध आहेत.

....
पिंपरी-चिंचवड
प्रभाग क्रमांक २६

लोकसंख्या आणि आरक्षण

अनुसूचित जाती : ७१७२

अनुसूचित जमाती : १२१४

एकूण : ४९,८४७

आरक्षण : अ (अनुसूचित जाती महिला), ब (नागरिकांचा मागासवर्ग), क (सर्वसाधारण महिला), ड (सर्वसाधारण).

.....

समाविष्ट भाग

पिंपळे निलख, विशालनगर, पार्कस्ट्रीट, कस्पटेवस्ती, अनमोल रेसिडेन्सी, धनराज पार्क, दत्तमंदिर परिसर, अण्णा भाऊ साठेनगर, वेणूनगरचा भाग, रक्षक सोसायटी, भारत इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आघाडीच्या चर्चेला अद्याप गती नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीबाबत चर्चेला वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीबाबत चर्चेमध्ये फारशी प्रगती झालेली नाही. त्याबाबत लवकरच निर्णय होईल, असे सांगण्यात आले.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी युतीबाबत चर्चेच्या घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. शिवसेनेने तर २० जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय न घेतल्यास स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये आघाडीबाबत काय चर्चा झाली, याबाबतचे तपशील जाहीर झालेले नाहीत. अंतर्गत पातळीवर याबाबतच्या हालचाली असल्या, तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र अद्यापही संभ्रमावस्था असल्याचे दिसून येते.

या संदर्भात ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘येत्या चार दिवसांत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शहरात बैठक घेणार आहेत. त्यामध्ये आघाडीबाबतही सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे.’ काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोज मरे त्याला कोण रडे

$
0
0

किरीट सोमय्या यांचे शिवसेनेवर शरसंधान

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘नोटाबंदीचा मुद्दा असो किंवा महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रस्तावित असलेल्या युतीवरून शिवसेनेकडून वारंवार होणारी टीका म्हणजे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी अवस्था आहे,’ अशा शब्दांत भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर शरसंधान केले. युवा शक्ती मंचाच्या वतीने पिंपरी येथील संत तुकारामनगरमधील आचार्य अत्रे सभागृहात शुक्रवारी ‘भ्रष्टाचारविरुद्ध लढा’ या विषयावर सोमय्या यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, एकनाथ पवार, प्रदेश सदस्या उमा खापरे, महिला शहराध्यक्षा शैला मोळक, संघटन सरचिटणीस माऊली थोरात, सारंग कामतेकर, सीमा सावळे आदी या वेळी उपस्थित होते.

‘महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदीतही भ्रष्टाचार केला. आज तुम्ही देवालाही खिशात ठेवले. काही तरी लाज वाटली पाहिजे. प्रत्येकाला कधी ना कधी जावे लागणाऱ्या स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनी खरेदीतही भ्रष्टाचार केला. थोडे तरी तारतम्य बाळगायला हवे होते,’ अशा शब्दांत सोमय्या यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

‘पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या डझनभर घोटाळ्यांची यादी भाजपचे शहर पदाधिकारी तयार करत आहेत. महापालिकेत ठेकेदार, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे ‘संधान’ मोडून काढायचे काम भाजप करणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचे ‘व्हिजन’ भाजप तयार करणार आहे. शहराच्या विकासापेक्षा येथील सत्ताधारी पक्षातील नेत्यांचा विकास अधिक झाला आहे. भ्रष्टाचार उकरून काढून भ्रष्टाचार करणाऱ्याला शिक्षा होईपर्यंत लढत बसण्यापेक्षा यंत्रणा बदलण्याचे काम भाजप करणार आहे,’ असे सोमय्या म्हणाले.

‘नोटाबंदीनंतर विरोधकांनी खूप आवाज उठवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेले ५० दिवस नागरिकांनी दिल्याने विरोध करणारे पुरते नामोहरम झाले. औद्योगिक उत्पादन ५.४ टक्क्यांनी वाढले,’ असा दावाही खासदार सोमय्या यांनी केला.

‘पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांचे नेतृत्व मानणारे आणि महत्त्वाचे म्हणजे भ्रष्टाचारमुक्त ‘सिस्टीम’ आणि विकास याच्यासाठी जो तयार होऊन आमच्याकडे येईल, त्या प्रत्येकाला सोबत घेण्यात येणार आहे,’ अशा शब्दांत त्यांनी पक्षातील ‘इन्कमिंग’बाबतची भूमिका मांडली.




सिंचन घोटाळ्यातील दोन मोठ्या ठेकेदारांना अटक झाली आहे. अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याविरोधात २०१६मध्ये आरोपपत्र दाखल झाले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. येत्या काळात या दोघांनादेखील अटक होईल.
- किरीट सोमय्या, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी-चिंचवड हे रसिकांचे शहर

$
0
0

रमेश देव यांचे गौरवोद्गार

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘पिंपरी-चिंचवड हे रसिकांचे शहर आहे. या शहराने नेहमीच मला साथ दिली. इथे यायला मला खूप आवडते. शहरात होणारा चित्रपट महोत्सव नक्कीच स्तुत्य आहे,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) पिंपरी-चिंचवड विस्तारित विभागाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

पुणे फिल्म फाउंडेशन, महाराष्ट्र सरकार आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पिंपरी-चिंचवड विभागाचा उद्घाटन समारंभ चिंचवडच्या कार्निव्हल सिनेमा (बिग सिनेमा) येथे शुक्रवारी रमेश देव आणि सीमा देव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुक्त दिनेश वाघमारे होते.

रमेश देव म्हणाले, ‘चित्रपट महोत्सवात माझ्या पत्नीचा गौरव होणार असल्याने मी आवर्जून इकडे आलो आहे. आज मी सीमाचा पदर धरून येथे आलोय. संगीत चैतन्यमय आहे. मी दु:खी असलो, की

लता, आशा, महमद रफीची गीते ऐकतो. मला पुन्हा ताजेतवाने वाटते.’

आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड शहरात चित्रपटनिर्मितीसाठी पोषक वातावरण आहे. इथल्या तरुणांकरिता मार्गदर्शक असे चित्रपटनिर्मिती केंद्र शहरात झाले तर त्यांना मार्गदर्शन मिळेल. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल.’

सीमा देव म्हणाल्या, ‘कलाकाराला मिळालेला पुरस्कार हा त्याच्यासाठी टॉनिकसारखा असतो. त्याला आणखी काम करण्यासाठी प्रोत्साहन देतो. मला मिळालेल्या जीवनगौरव पुरस्कारामुळे माझे वजन वाढले आहे.’

पोलिस सहआयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर, ‘पिफ’चे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल, शहर सहअभियंता आणि समन्वयक प्रवीण तुपे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी मकरंद पाटणकर, मनीषा लताड आणि सहकाऱ्यांचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम सादर झाला. उद्घाटन कार्यक्रमानंतर ओम पुरी यांचा ‘जाने भी दो यारो’ हा चित्रपट दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा दातार यांनी, तर प्रास्ताविक डॉ. जब्बार पटेल यांनी केले. आभार सतीश इंगळे यांनी मानले.

ठेका धरला

रमेश आणि सीमा देव यांच्यावर चित्रित झालेले ‘सूर तेच छेडिता’ हे गीत उद्घाटनापूर्वी सादर होत असताना त्या दोघांनी ठेका धरला. या एव्हरग्रीन दाम्पत्याच्या नृत्याला रसिकांची दाद मिळाली. वयाच्या ९१व्या वर्षीही रमेश देव यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा होता.

पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा भ्रमनिरास

‘पिफ’च्या पहिल्या दिवशीचा पूर्वनियोजित जर्मन सिनेमाचा पहिलाच शो तांत्रिक अडचणींमुळे रद्द झाल्याने प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाला. चौथ्या स्क्रीनवर या सिनेमाचे स्क्रीनिंग होणार होते. परंतु या ठिकाणी ‘ती सध्या काय करते’ हा मराठी सिनेमा थिएटरच्या प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आला होता. त्यामुळे ‘पिफ’चे पास काढून आलेल्यांना थिएटरमधून बाहेर काढण्यात आले. तांत्रिक कारण देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमीन खरेदी-विक्रीत ५१ लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

जमीन खरेदी-विक्री व्यवहारात ५१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक काळूराम पवार यांचे भाऊ बाळू मारुती पवार (३३, रा. आनंदनगर, चिंचवड) यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळू पवार यांच्यासह जागामालक बाळासाहेब जगन्नाथ साळवे (४०, रा. चिंचवड), पंकज रवींद्र चिटणीस (४३, रा. मोरवाडी, पिंपरी), सागर गोरखनाथ नढे (३०, रा. नढेनगर, काळेवाडी), संजय भाऊसाहेब शिंदे (४५, रा. चिंचवड) आणि विनोद शिंदे (४०, रा. मोरवाडी) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महेश तोताराम सुखवानी (४२, रा.शिरीन गार्डन, परिहार चौक, औंध, पुणे) यांनी पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील एका जागेच्या विक्रीचा व्यवहार ५१ लाख २० हजार रुपयांत ठरला होता. त्यानुसार खरेदीखत झाल्यानंतर ही रक्कम सुखवानी यांनी या सर्वांना दिली. या जमिनीचा ताबा देण्यासाठी या आरोपींशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून टाळाटाळ होत होती. त्यामुळे सुखवानी यांनी जागेची पाहणी केली असता, या जागेला कुंपण घातलेले होते आणि त्या ठिकाणी विश्‍वकर्मा को-ऑपरेटिव्ह हाउसिंह सोसायटीचा बोर्ड होता. त्यानंतर या आरोपींकडून पैशाची मागणी केल्यावर जमीन खरेदी-विक्री एजंट संजय शिंदे याने दिलेला ९५ लाख रुपयांचा चेक बँकेत वटला नाही. सहायक निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुकचा वापर करून चोरट्याला केले जेरबंद

$
0
0

निगडी पोलिसांची कामगिरी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

मुलाखत देण्यासाठी आल्याचा बहाणा करून मित्रांच्या खोलीतून लॅपटॉप, मोबाइल, चार्जर, बूट चोरणाऱ्याला निगडी पोलिसांनी फेसबुकचा वापर करून अटक केली. त्याच्याकडून एकूण एक लाख २७ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. ताबाण जायरखान पठाण (२१, रा. जी वॉर्ड इराणा चाळ, गुरुद्वाराजवळ, लोणावळा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलाखत देण्यासाठी आलो आहे,’ असे सांगून ताबाण पठाण प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक २६मध्ये भाड्याने राहत असलेल्या मित्रांच्या खोलीवर राहण्यासाठी आला होता. मित्र रूमवर नसताना त्यांचे लॅपटॉप, मोबाइल, चार्जर, बूट घेऊन तो पसार झाला. या प्रकरणी मित्रांनी मंगळवारी निगडी पोलिसांत तक्रार दिली होती.

पोलिसांनी त्याच्या मोबाइलवर फोन करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा मोबाइल बंद होता. नंतर त्याला ‘फेसबुक’वर शोधले असता तो ‘ऑनलाइन’ असल्याचे दिसून आले. पोलिसांनी फेसबुकवर मुलीच्या नावाने खोटे अकाउंट तयार करून त्याला ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवली. त्याने ती स्वीकारली. नंतर पोलिसांनी त्याच्याशी चॅटिंग करून त्याचा विश्वास संपादन केला. त्याने पुणे स्टेशन येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ भेटण्यासाठी बोलावले.

पोलिसांनी त्याच्या मित्रांना सोबत घेऊन रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. एका महिला पोलिसाला साध्या वेशात स्थानक परिसरात उभे करण्यात आले. तो स्थानकाजवळ आल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला ओळखले. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले आणि पोलिस ठाण्यात आणले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीचा गुन्हा कबूल केला. चोरीला गेलेला लॅपटॉप, मोबाइल, चार्जर, बूट असा एकूण एक लाख २७ हजार रुपयांचा माल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. त्याला कोर्टापुढे उभे केले असता १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निगडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘जातीयवादी पक्ष असलेले भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांना पालिकेत सत्ता स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी समविचारी, पक्षांनी, तसेच संघटनांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. यासाठी सर्व समविचारी पक्षांशी चर्चा करण्याचा निर्णय स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने घेतला आहे. पालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये समविचारी पक्षांना आपला पाठिंबा आहे,’ असे पक्षाचे शहराध्यक्ष अशोक जगताप यांनी सांगितले.

‘केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजप, शिवसेनेने आता पालिकेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. साम, दाम, दंड याचा वापर करून सत्ता मिळवण्यासाठी हे जातीयवादी पक्ष प्रयत्नशील आहेत. त्यांना मात द्यायची असेल, तर सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष पुढाकार घेणार आहे,’ असे जगताप यांनी सांगितले. या वेळी पक्षाचे केंद्रीय समितीचे सदस्य, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेद परंपरेतील वैद्यांचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

औषधनिर्मिती क्षेत्रातील ‘वेदिक फार्म्स’च्या वतीने नामवंत वैद्य आणि आयुर्वेद क्षेत्रातील तज्ज्ञांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आयुर्वेद क्षेत्रातील तज्ज्ञ एकाच व्यासपीठावर एकत्र आले. वैद्यचूडामणी दिवंगत वैद्य मा. व. कोल्हटकर प्रतिष्ठान व वैद्य दादा खडीवाले वैद्यक संशोधन संस्था या संस्थांचाही गौरव करण्यात आला. शाल-श्रीफळ, पुणेरी पगडी आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

वैद्य सदानंद देशमुख, चंद्रकांत लावगनकर, रमेश नानल, अजित जोशी, श्याम शेंड्ये, य. गो. जोशी, डी. आर. जुवेकर, दि. प्र. गाडगीळ, समीर जमदग्नी, प्रशांत सुरू यांचा सन्मान करण्यात आला. ‘वेदिक फार्म्स’चे संचालक श्रीनाथ आगाशे, आमोद केळकर, प्रद्युम्न गोडबोले, मनकर्णिका प्रकाशनचे गिरीश गांधी, वैद्य वृंदा साठे, वैद्य धनंजय खासगीवाले, वैद्य विक्रांत पाटील, वैद्य वैभव मेहता, वैद्य प्रमोद कुलकर्णी, वैद्य सरिता वैद्य, वैद्य चंद्रकुमार देशमुख, वैद्य सारंग गलगली या वेळी उपस्थित होते.

आयुर्वेदाचा वारसा सक्षमपणे पुढे नेणाऱ्या सर्व वारसदारांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे संयोजकांनी सांगितले. ‘हा सन्मान म्हणजे केवळ आमच्यासारख्या वारसांचा सन्मान नसून, ज्या परंपरेमधून आम्ही आलो आहोत, त्या परंपरांचा, भारतीय संस्कृतीचा हा सन्मान आहे,’ अशी भावना पुरस्कारार्थींनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष मोहिमेद्वारे अजगर संवर्धन

$
0
0

निर्मल कुलकर्णी यांचा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तस्करी आणि विविध कारणांमुळे संकटात सापडलेल्या अजगरांच्या संवर्धनासाठी ‘लिव्हिंग विथ पायथन’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. वन्यजीव अभ्यासक निर्मल कुलकर्णी आणि त्यांच्या टीमची ही कल्पना असून, त्या अंतर्गत देशभरातील विविध जंगलांमध्ये आणि रहिवासी क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या अजगरांच्या माहितीच्या संकलनास सुरुवात झाली आहे.

‘लिव्हिंग विथ पायथन’ या उपक्रमातून अजगरांबद्दल जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. सध्या इंडियन रॉक पायथन (अजगर), बर्मिस पायथन आणि रेटिक्युलेटेड पायथन असे तीन प्रकारचे अजगर भारतात आढळतात. यातील रेटिक्युलेटेड पायथन हा जगातील सर्वांत मोठ्या सापांपैकी एक आहे. वन विभागाच्या निकषांनुसार, अजगर हा शेड्युल वन म्हणजेच संकटग्रस्त प्राण्यांच्या यादीमध्ये आहे. तरीदेखील या प्राण्याबद्दल आतापर्यंत सखोल अभ्यास झालेला नव्हता. गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या किती प्रमाणात घटली, याचे शास्त्रीय निष्कर्ष आपल्याकडे उपलब्ध नाहीत. या धर्तीवर देशभरातील अजगरांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ‘लिव्हिंग विथ पायथन’ हा उपक्रम राबवण्यात येतो आहे.

‘अजगर वनक्षेत्राबरोबरच मानवी वस्त्यांजवळही आढळतात. अजगर हा परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी असल्याने ऐन मुंबईत, चेंबूर भागातही अजगर सापडतात. वस्त्यांजवळ रहाणारे अजगर मुख्यतः घुशी, मांजराची पिल्ले आणि छोट्या कुत्र्यांवर जगतात. अजगरांवर आतापर्यंत सर्वंकष माहिती देणारा अभ्यास झालेला नाही. वन्यजीव अभ्यासक एस. भूपती यांनी अजगरांवर खूप काम केले होते; मात्र अलीकडेच त्यांचे अपघाती निधन झाले. वन्यजीव कायद्यानुसार अजगराला वाघाएवढे संरक्षण देणे आवश्यक आहे. नष्ट होत असलेले अधिवास आणि अंधश्रद्धेमुळे होणारी तस्करी या कारणांमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अजगरांचे कातडीला तस्करीच्या बाजारपेठेत भरपूर मागणी आहे. रस्ता ओलांडताना गाडी खाली येऊनही मोठ्या प्रमाणात साप आणि अजगरांचा मृत्यू होतो आहे,’ अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

फेसबुक पेजही

‘नवीन वर्षाचे औचित्य साधून उपक्रमाला नुकतीच सुरुवात झाली असून, सध्या वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते आहे. मी स्वतः विविध ठिकाणी जाऊन अजगरांची माहिती गोळा करतो आहे. या शिवाय वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार, विविध संस्थांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. ‘लिव्हिंग विथ पायथन’ या नावाने फेसबुकवर आम्ही स्वतंत्र पेज सुरू केले असून, त्यावर देशाच्या कानाकोपऱ्यातून अजगरांबद्दलच्या नोंदी आणि फोटो येण्यास सुरुवात झाली आहे,’ असे कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीचा निर्णय आठवड्यात घ्या

$
0
0

शिवसेनेकडून चेंडू भाजपच्या कोर्टात

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी युतीचा अंतिम निर्णय २० जानेवारीपर्यंत घ्या,’ असे स्पष्ट करून शिवसेनेने चेंडू भारतीय जनता पक्षाच्या कोर्टात टाकला आहे. ‘युतीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट करावी,’ असे शिवसेनेने शुक्रवारी स्पष्ट केले.

युतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांची आकुर्डीतील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे या वेळी उपस्थित होते. बैठकीनंतर शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

बारणे म्हणाले, ‘महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडे सर्व प्रभागांत सक्षम उमेदवार आहेत; मात्र भाजपबरोबर युती व्हावी, असा सर्वेक्षण अहवाल आहे. त्यानुसार युतीबाबत शिवसेना निश्चितच सकारात्मक आहे. राज्यात अन्यत्र युती होवो किंवा न होवो. परंतु, पिंपरी-चिंचवडमध्ये युतीबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही चर्चेबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांना सर्वाधिकार दिले आहेत. त्यामुळे आम्ही युती व्हावी असाच अहवाल पाठवला आहे.’

‘जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल,’ याबाबत सर्वांनाच उत्सुकता असल्याचे नमूद करून बारणे म्हणाले, ‘कोणी किती जागा लढवायच्या यापेक्षा सर्वाधिक जागा जिंकून युतीची सत्ता येईल, याला आम्ही महत्त्व देणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे जागावाटपात झुकते माप मिळावे, अशी भाजपची अपेक्षा असेल. परंतु, दोघांचे नुकसान होऊन तिसऱ्या पक्षाचा लाभ होईल, अशी आडमुठेपणाची भूमिका घेऊ नये. शिवसेनेला सन्मानाची वागणूक मिळावी. किमान समसमान जागावाटप व्हावे, अशी अपेक्षा आहे.’

आढळराव-पाटील म्हणाले, ‘येत्या २० तारखेपर्यंत अनेक बैठका होतील. महापालिकेबरोबर जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही युती व्हावी, अशी आमची मागणी आहे. जागावाटप निश्चित करताना प्रभागातील पक्षाची ताकद, यापूर्वी झालेले मतदान या निकषांचा विचार होणे आवश्यक आहे. दोन्ही पक्षांनी सर्वेक्षण केलेले आहे. त्यामुळे कोणालाही कमी न लेखता अंतिम निर्णय व्हावा. ‘प्रभाग टू प्रभाग’ या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली आहे.’

‘मेट्रो स्वारगेटपासून पिंपरीऐवजी निगडीपर्यंत व्हावी, अशी शिवसेनेची भूमिका आहे; मात्र महापालिकेनेच पिंपरीपर्यंतचा प्रस्ताव पाठवण्याची चूक केली आहे,’ असे बारणे यांनी सांगितले. ‘शिवसेनेच्या प्रचारासाठी आगामी काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.


उमेदवार यादी २५ जानेवारीला

‘निवडून येण्याची क्षमता’ या प्रमुख निकषावरच शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार आहे. युतीचा अंतिम निर्णय आणि जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर २५ किंवा २६ जानेवारीला शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले. ‘महापालिकेत सत्ता आल्यानंतर पदांचे जागावाटप कशा प्रकारे असेल, याबाबतचा आराखडाही आत्ताच निश्चित केला जाईल,’ असे बारणे यांनी नमूद केले.


‘जाहीरनामा एकच’

‘महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप-सेनेची युती होण्याबाबत आम्ही आशावादी आहोत. त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी दोन्ही पक्षांचा एकत्रित जाहीरनामा असेल,’ अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. ‘आचारसंहिता लागू झाली तरी अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकर याबाबतचे प्रश्न सुटले नाहीत. त्याचा फटका युतीला बसणार असला तरी आमच्यापेक्षा भाजपच्याच उमेदवारांना अडचणीचे ठरणारे आहे,’ असे बारणे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लडिवाळ स्वरांनी घेतला ठाव

$
0
0

कौशिकींच्या गायनाने, तबला जुगलबंदीने रसिक तृप्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हुडहुडी वाढवणारी थंडी... मंचाजवळ केलेली फुलांची प्रसन्न सजावट आणि मधुर स्वरांची काहीशा ठहरावाने होणारी अखंड बरसात... अशा धुंद वातावरणात शुक्रवारची सायंकाळ सजली. कौशिकी चक्रवर्ती यांच्या गोड स्वरांतील दाणेदार ताना आणि एकामागून एक सलग सादर होणाऱ्या सरगमनी उपस्थितांना थक्क केले.
‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ आणि व्हायोलिन अकादमीच्या वतीने आयोजित ‘स्वरझंकार’ महोत्सवाची बहारदार सुरुवात कौशिकी यांच्या गायनाने झाली. पतियाळा घराण्याचे बारकावे अतिशय नजाकतीने आपल्या गायनातून उलगडणाऱ्या कौशिकी यांनी आपल्या गायनाने पुणेकर रसिकांची भरभरून दाद मिळवली.
भीमपलास रागाने त्यांनी आपल्या गायनास सुरुवात केली. बडा ख्यालानंतर ‘राजन तू बलमा’ या दृत बंदिशीने मैफल खुलवली. गंधाराला मध्यम स्वराची मींड देत आणि कोमल निषाद खरोखरीच अतिशय कोमलतेने रंगवत सादर झालेले बोलआलाप, एकेका स्वराचा पाठलाग करणारी आरोही सरगम आणि दाणेदार तानांच्या सादरीकरणाने कौशिकी यांच्या आवाजाने पुणेकरांवर अक्षरशः मोहिनी घातली. उस्ताद बडे गुलाम अली खाँसाहेब यांचा मिश्र पहाडी रागातील ‘अब तो आओ साजना’ हा लोकप्रिय दादरा सादर करताना ‘पुरी हो मन की आशा’ या रचनेतील दुसऱ्या ओळीवरील ठहराव विशेष लडिवाळ होता.
रिषित देशीगन या आपल्या सात वर्षांच्या मुलाला सांभाळून आणि मध्येच शिस्तीची आई ही भूमिका निभावून कौशिकी यांनी मैफलीची सांगता ‘सुंदर ते ध्यान’ या अभंगाने केली. तारसप्तकातील षड्ज आणि मध्यमापर्यंतची लीलया होणारी आवाजाची फिरत थक्क करणारी होती. कौशिकी यांना तितकीच अप्रतिम तबला साथ ओजस अढिया यांनी आणि संवादिनी साथ मिलिंद कुलकर्णी यांनी केली. मेघोदीपा आणि गौरी देशपांडे यांनी तानपुरा साथ केली.
मैफलीचा उत्तरार्ध रंगला तो पं. कुमार बोस आणि पं. अनिंदो चॅटर्जी यांच्या तबला जुगलबंदीने. त्यांच्यासह दिलशाद खान यांच्या सारंगीनेही विशेष दाद मिळवली. जुगलबंदीची सुरुवात दोन्हीही दमदार कलाकारांनी तीनतालाने केली. त्यात कायदे, रेले, तुकडे सादर करत मैफलीला उत्तम लय मिळवून दिली. बोस यांचे काहीसे आक्रमक वादन आणि चॅटर्जी यांच्या वादनातील लयबद्ध बढत यामुळे या वादनाने उपस्थितांना जागीच ठेका धरायला भाग पाडले.

वेबसाइटचे अनावरण
द व्हायोलिन अकादमीच्या वतीने गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या हस्ते ‘स्वरमंदिर’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन महोत्सवात झाले. या वेळी ‘स्वरझंकार डॉट कॉम’ या वेबसाइटचे अनावरणही करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला भोवणार गुंडांचा प्रवेश

$
0
0

एकहाती सत्तेची चावी हरविण्याचा अंदाज

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि परिसरातील विविध गुंडांचा गेल्या तीन महिन्यांत भाजपमध्ये झालेल्या प्रवेशामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्याचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत बसण्याची दाट शक्यता आहे. या ‘उद्योगां’मुळे भाजपला एकहाती सत्ता मिळवणे अवघड होईल, असा अंदाज गुप्तचर विभागाने वर्तवला आहे. भाजप पुणे महापालिकेत सर्वाधिक मोठा पक्ष ठरला तरी, एकहाती सत्ता मिळवण्याचे आव्हान उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.
देशात, राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट कायम असून, त्या लाटेवर स्वार होण्यासाठी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. भाजपकडेही अनेक प्रभागांमध्ये उमेदवार नसल्याने त्यांनी इतर पक्षातील पुढाऱ्यांना पायघड्या घातल्या आहेत. शहरातील ४२ टक्के जनता झोपड्यांत राहते. झोपडपट्टीतील मतदारांवर आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी भाजपने काही गुन्हेगारांना प्रवेश दिला. हे प्रवेश दस्तुरखुद्द प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत देण्यात आले. भाजपच्या पारंपारिक मतदाराला तसेच मोदीभक्तांना गुंडांचे प्रवेश फारसे काही रूचलेले नाहीत. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्तेही जिल्ह्यातील बड्या गुंडाला नुकताच पक्षात प्रवेश देण्यात आला.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या गोपनीय अहवालात भाजपला एकहाती सत्ता मिळणे अवघड असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भाजपचा पारंपारिक मतदार ‘इन्कमिंग’मुळे दुखावला गेला आहे. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांच्या मनात तिकीट न मिळण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला थेट लक्ष्य न करता निवडणूक लढवली जात असल्याने मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे, असे मुद्दे नमूद करण्यात आले आहे.

एकहाती सत्ता अशक्यच
पुण्यात भाजप हा सर्वाधिक मोठा ठरेल. मात्र, एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपला संघर्ष करावा लागणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपकडून वातावरण तयार करण्यात येत असले तरी, त्यांना सहजासहजी सत्ता मिळणार नाही. दोन्ही महानगरपालिकांमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून, भाजपकडून राष्ट्रवादीला थेट लक्ष्य करावे लागणार आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीसाठी आठवड्याची डेडलाइन

$
0
0

भाजप शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य स्तरावरील नेत्यांनी युतीचे संकेत दिल्यानंतर शहर स्तरावरही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये युतीसंदर्भात शुक्रवारी प्राथमिक चर्चा झाली. सविस्तर चर्चा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्याच्या अखेरपर्यंत युतीबाबत अंतिम निर्णय घ्यायचा, अशी डेडलाइन ठरवण्यात आल्याचे समजते.
गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका निवडणुकांसाठी युती होणार की नाही, याचा संभ्रम कार्यकर्त्यांच्या मनात होता. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधातील आक्रमक भूमिकेचे एक पाऊल मागे घेत, युतीसाठी सकारात्मक वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये पुढील आठवड्यात सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचे प्राथमिक संकेत शुक्रवारी मिळाले असून, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि शिवसेनेचे पुणे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांच्यात दूरध्वनीवरून बातचीत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
जागा वाटपाबाबतची सविस्तर बोलणी पुढील आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्या संदर्भातील निश्चित तारीख आणि वेळ येत्या एक-दोन दिवसांत ठरवण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांतील महापालिकेच्या सर्व निवडणुका भाजप-शिवसेनेने एकत्रच लढवल्या आहेत. पालिकेतील एकूण जागांपैकी ६० टक्के जागा भाजपने, तर उर्वरित ४० टक्के जागा शिवसेनेने लढवायच्या, असे यापूर्वीच्या बहुतेक निवडणुकांमधील जागा वाटपाचे सूत्रहोते. या वेळी विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्व आमदार निवडून आल्याने भाजपकडून अधिक जागांची मागणी केली जात आहे, तर यापूर्वीच्या निवडणुकांमधील सूत्रानुसारच जागा वाटप व्हायला हवे, असा शिवसेनेच्या नेत्यांचा आग्रह आहे. त्यामुळे, त्यातून दोन्ही पक्षांना मान्य होईल, असा तोडगा काढण्याची प्रमुख जबाबदारी भाजप-शिवसेनेच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर असेल.

युती हवी; आणि नकोही
शहरातील अनेक प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांकडे चारही जागांवर सक्षम उमेदवार आहेतच, असे नाही. अशावेळी युती झाली, तर त्याचा फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. त्याच वेळी काही भागांमध्ये हमखास एका पक्षाचे सर्व उमेदवार निवडून येण्याची शक्यता असताना युती झाल्यास काही जागा मित्र पक्षासाठी सोडाव्या लागल्या, तर त्याचा फटकाही बसण्याची भीती आहे. त्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रमावस्था कदाचित युतीचा नेमका निर्णय होईपर्यंत कायम राहण्याची चिन्हे आहेत.

आघाडीचे तळ्यात मळ्यात
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पुण्यात आघाडी करायची की नाही, याचा निर्णय होत नसल्याने गोंधळाची स्थिती कायम आहे. आघाडीसंदर्भात अनौपचारिक पातळीवर चर्चा सुरू असली, तरी अधिकृतपणे दोन्ही पक्षांमधून अजूनही मौनाचा रागच आळवण्यात येत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सोलापूर आणि ठाण्यात आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये यावर अद्याप चर्चा सुरू झालेली नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांशी संपर्क साधला होता; तसेच पुण्यात काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीसंदर्भात विचारणा केली आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून त्यावर कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आघाडी करण्यासदंर्भात कुठलाही सिग्नल मिळाला नसल्याने इच्छुकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्ररित्या इच्छुकांच्या मुलाखती घेत आपआपल्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. सध्या नगरसेवक असलेल्या माननीयांकडून जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे. मात्र, चारच्या प्रभागांमध्ये चार उमेदवार कोण असणार, हे अनेक ठिकाणी निश्चित नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आहे. आघाडी होणार की नाही, याचा निर्णय झाल्यास गोंधळाची ही स्थिती संपेल, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली.
मुंबई, ठाणे आणि नागपूर येथे दोन्ही काँग्रेसची ताकद तुलनेने कमी असल्याने त्या ठिकाणी आघाडीचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकडूनच आघाडीबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचा थेट हस्तक्षेप असल्याने या ठिकाणी आघाडी करण्याचा निर्णय त्यांच्याकडून घेतल्यानंतरच अंमलात येईल, अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना यांच्यात युती झाली, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करतील, अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणुकांप्रमाणेच युती झाली नाही, तर आघाडी होण्याची शक्यताही कमी असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शंभर दाम्पत्यांना हवीय उमेदवारी

$
0
0

एकाच घरात दोन तिकिटे देण्याचा आग्रह

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण केली असून, त्यात जवळपास शंभर जोडप्यांनी विविध पक्षांकडून उमेदवारीची मागणी केली आहे. पुढील काही दिवसांत किती ‘श्री’ आणि ‘सौं’ना उमेदवारी मिळणार आणि त्यापैकी किती जण महापालिकेच्या संसाराचा डोलारा सांभाळणार, हे स्पष्ट होईल.
पालिकेच्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभागरचना झाली आहे. यापूर्वी, दोनच्या प्रभागात एक जागा महिलांसाठी आरक्षित असल्याने अनेक ‘श्रीं’ची निवडणूक लढविण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती. या वेळी प्रत्येक प्रभागात दोन जागा महिलांसाठी राखीव असल्याने जोडीने उभे राहण्याची संधी मिळावी, यासाठी अनेक विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनीही प्रयत्न सुरू केले आहेत.
शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांची निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिल्या टप्प्यातील चाचपणी पूर्ण झाली आहे. यामध्ये, इच्छुकांकडून अर्ज मागवून त्यांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत. यामध्ये, अनेक प्रभागांमधून पती-पत्नी अशा दोघांनीही तिकिटाची मागणी केली असल्याचे चित्र दिसून आले. पाचही प्रमुख राजकीय पक्षांकडे उमेदवारी मिळवण्यासाठी दिलेल्या मुलाखतींमध्ये शंभर जोडप्यांनी दोन तिकिटांची मागणी केली आहे. कधी पती, कधी पत्नी अशा स्वरूपात घरातील दोघांनीही महापालिकेत प्रतिनिधीत्त्व केले असले, तरी एका निवडणुकीसाठी एकाच घरात दोन तिकिटे अगदीच अभावाने दिली गेली आहेत. त्या ठिकाणी दुसरा कार्यकर्ता सक्षम नसेल आणि आरक्षण अनुकूल नसेल, तरच दोघांनीही एकाचवेळी तिकिटे देण्यात आली आहेत.
विद्यमान महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभागृहनेते सुभाष जगताप, उषा जगताप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी गटनेते बाबू वागसकर आणि वनिता वागसकर अशा दोन जोड्या पालिकेत कार्यरत होत्या. नव्या पालिकेत ही दोन जोडपी कायम राहणार की सोबत आणखी काही नवे चेहरे घेऊन येणार, याची उत्सुकता आहे.

भाजपकडे सर्वाधिक मागणी
नव्या प्रभागरचनेत चारपैकी दोन तिकिटे दाम्पत्यालाच द्यावीत, असा आग्रह धरणाऱ्यांची सर्वाधिक संख्या भारतीय जनता पक्षात आहे. विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांपैकी सुमारे ४० जोडप्यांनी उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखती दिल्या आहेत. भाजप खालोखाल राष्ट्रवादीकडे जोडीने उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वीसपेक्षा अधिक आहे. तर, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्याकडे पती-पत्नी अशा दोघांनीही उमेदवारी मागण्याचे प्रमाण प्रत्येकी १० आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष प्राविण्यासाठी हजारी यादीचा धडा

$
0
0

भाजप देणार २७०० प्रमुखांना प्रशिक्षण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकीचे काउंटडाउन सुरू झाले असून, त्यातच मतदानाचा टक्का वाढवण्यासह ते पक्षाला अनुकूल राहावे, यासाठी ‘हजारी यादी’च्या मूलमंत्राचे धडे भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा गिरवले जाणार आहेत. शहरातील प्रत्येक हजार मतदारांसाठी नेमण्यात आलेल्या सत्तावीसशे प्रमुखांची दोन तासांची शाळाच या निमित्ताने येत्या रविवारी (१५ जानेवारी) आयोजिण्यात आली आहे.
महापालिकेची आगामी निवडणूक भाजपसाठी स्थानिक स्तरावरील सर्वांत मोठी परीक्षा आहे. या परीक्षेसाठी विविध स्वरूपाचे मार्गदर्शन इच्छुक उमेदवार, कार्यकर्त्यांना केले जात असले तरी परीक्षेतील यशासाठी अत्यावश्यक असलेल्या ‘रामबाण उपाया’वर विशेष सत्र घेतले जाणार आहे. आजवरच्या निवडणुकीच्या विविध परीक्षांमध्ये पक्षाला भरघोस यश मिळवून देणाऱ्या ‘हजारी यादी’चा विषय त्यासाठी निवडण्यात आला असून, सर्व यादीप्रमुखांच्या मार्गदर्शनासाठी थेट दिल्लीहून विषयतज्ज्ञ संघटनमंत्री व्ही. सतीश यांना निमंत्रित करण्यात आले आहे. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेच्या ४१ वर्गखोल्यांमध्ये शहरातील सर्व यादीप्रमुखांच्या उजळणीसाठी तासिकाही निश्चित करण्यात आल्या आहेत.
निवडणुकीच्या मुख्य परीक्षेपूर्वी हजारी प्रमुखांसाठी घेण्यात येणाऱ्या या पूर्वपरीक्षेसाठी प्रत्येकाला ओळखपत्र दिले जाणार आहे. ४१ प्रभागांसाठी स्वतंत्र वर्ग निश्चित केले गेले असून, प्रत्येक यादीप्रमुखाला त्याच्याच वर्गात बसावे लागणार आहे. एखाद्या शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे हजारी प्रमुखांच्या दिवसाची सुरुवातही राष्ट्रगीत, प्रतिज्ञेने होणार आहे. त्यानंतर, तीन तासिकांमधून आगामी निवडणुकीची तयारी कशी करायची, याचे सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. पहिला तास हजारी यादीचे काम कसे करायचे, यासाठी खर्ची घालण्यात येणार आहे. दुसऱ्या तासिकेला सोशल मीडिया या नव्या अभ्यासक्रमाचा पाठ घेतला जाईल. तिसऱ्या तासिकेला आचारसंहितेचा धडा गिरवला जाणार आहे. त्यानंतर, संघटनमंत्र्यांच्या मुख्य कार्यक्रमासाठी सर्व वर्गातील हजारी प्रमुखांची शाळेच्या मैदानावर एकत्र बैठकव्यवस्था करण्यात आली आहे. या मुख्य कार्यक्रमात संघटनमंत्र्यांच्या संदेशानुसार सर्व हजारी प्रमुखांना पुढील काही दिवसांत आपापल्या भागांत ‘गृहपाठ’ करावा लागणार आहे. हा गृहपाठ पक्का झाला, तरच भाजपला आगामी निवडणुकीत ‘विशेष प्राविण्य’मिळण्याची शक्यता असल्याने रविवारच्या दोन तासांच्या कार्यक्रमाची शहर भाजपतर्फे जोरदार तयारी सुरू आहे.

सर्व वर्गातून एकाचवेळी मार्गदर्शन
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडच्या शाळेतील सर्व वर्गांमध्ये ध्वनिक्षेपक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे, सुरुवातीच्या उद्घोषणा आणि त्यापुढील प्रत्येक तासिकेचे मार्गदर्शन ४१ वर्गात बसलेल्या सर्व हजारी प्रमुखांना एकाचवेळी दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूएसके फाउंडेशनतर्फे धर्मेंद्र यांना जीवनगौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यूएसके फाउंडेशनतर्फे भारतीय चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना यंदा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही ऊर्जा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. येत्या सोमवारी, (१६जानेवारी) सायंकाळी ७.३० वाजता हॉटेल हयात रिजन्सी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
ऊर्जा पुरस्कार यंदा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या बडोदा संस्थानच्या राधिकाराजे, प्रसिद्ध लेखक चेतन भगत, ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा, पं. शिवकुमार शर्मा, उद्योजिका अनुराधा देसाई, अभिनेत्री रविना टंडन, डॉ. विश्वजित कदम, डॉ. परवेझ ग्रांट, उद्योजक अजिंक्य फिरोदिया, युवा उद्योजिका अनन्या बिर्ला आणि टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे यांना जाहीर झाला आहे. या शिवाय शहीद सौरभ फराटे यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती यूएसके फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उषा काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष असून, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना समाजासमोर आणून त्यांचा गौरव करण्याचा हा प्रयत्न आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आदित्य बिर्ला सेंटर फॉर कम्युनिटी इनिशिएटिव्ह अँड रूरल डेव्हलपमेंटच्या राजश्री बिर्ला, अॅक्सिस बँकेच्या सहयोगी उपाध्यक्ष अमृता फडणवीस या अध्यक्षस्थानी असतील, असे श्रीमती काकडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक, कर्मचाऱ्यांचे पगार येत्या आठवड्यात

$
0
0

उपसंचालक दिनकर टेमकर यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उच्च माध्यमिक शाळांतील (ज्युनियर कॉलेज) शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेले मासिक वेतन पुढच्या आठवड्यात होईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी शुक्रवारी दिली. शिक्षकांच्या वेतनाचे अनुदान इतरत्र वळवल्याने पुणे, नगर आणि सोलापूर येथील शिक्षकांचे वेतन रखडल्याचे शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान इतरत्र वळवण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले, असा आरोप करण्यात आला होता. ज्युनियर कॉलेजच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन दोन महिन्यांपासून झालेले नाही. त्यांनी विविध प्रकारचे कर्ज आणि विमा पॉलिसी काढल्याने त्याचे हप्ते महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँकेच्या खात्यातून देय असतात. मात्र, खात्यात वेतनच जमा होत नसल्याने ही रक्कम भरण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना नाहक दंड भरण्याची वेळही आली आहे. काहीही चूक नसताना शिक्षकांनी आर्थिक भुर्दंड का सहन करावा, असा सवाल शिक्षक उपस्थित करीत आहेत.
दोन महिने आणि तेरा दिवस उलटून गेल्यावर देखील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना वेतन न मिळालेले नाही. वेतन नेमके किती तारखेला होईल याबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याच प्रकारची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षक आणि कर्मचारी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, माध्यमिक शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्यापासून झाले नसल्याची तक्रार शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन पुढच्या आ‍ठवड्यात होईल, अशी माहिती टेमकर यांनी दिली. दरम्यान, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम त्यांना महिन्याच्या पहिल्या तारखेला होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ते सहकारी बँकेत जमा न होता राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्याची मागणी विविध शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरू रोहिणी भाटे कथकच्या दीपस्तंभ

$
0
0

ज्येष्ठ नृत्यांगना कुमुदिनी लाखिया यांची भावना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘कथकसाठी आयुष्य वेचताना या नृत्यप्रकाराला लोकमान्यता मिळवून देण्यात रोहिणी भाटे यांचे योगदान दीपस्तंभासारखे आहे,’ अशी भावना ज्येष्ठ कथक नृत्यांगना गुरु कुमुदिनी लाखिया यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
ज्येष्ठ नृत्यगुरु रोहिणी भाटे यांच्या कथक क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नादरूप, महाराष्ट्र कल्चरल सेंटर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र आणि संगीत नाटक अकादमी यांच्यातर्फे ‘संस्मरण’ या तीन दिवसीय कार्यक्रमाचे टिळक रोडवरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन लाखिया यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी लाखिया यांनी भाटे यांच्या योगदानाबद्दल उपस्थितांशी संवाद साधला. ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी, भाटे यांच्या गुरुभगिनी पद्मा शर्मा, अरविंदकुमार आझाद, निखील फाटक, सुनील कोठारी आदी या वेळी उपस्थित होते. भाटे यांच्या हस्ते सर्वांचा सन्मान करण्यात आला.
‘भाटे यांच्या अथक प्रयत्नांमुळे पुणे कथकचे माहेरघर झाले. खडतर प्रवास करत कलाकारांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडविल्या. समर्पणवृत्तीने त्यांनी कथकला वाहून घेतले. कलाकार समाज घडवत असतो,’ असेही लाखिया म्हणाल्या. कथक केवळ नृत्यतंत्र नसून तंत्रज्ञान आहे. त्यामुळे त्याचा आत्मा आणि वैभव जपण्याचे भान ठेवा, असे आवाहनही त्यांनी नवोदितांना केले. परंपरेचा धागा जपून भाटे यांनी कथकमध्ये सर्जनशील प्रयोग केलेच; पण नृत्यनिष्ठा आणि कल्पनाशक्ती असा त्रिवेणी संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असल्याने कथकला भाषासौंदर्याची जोड देण्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल, असे वाजपेयी म्हणाले. शर्मा यांनी भाटे यांच्या मुंबई येथील भातखंडे संगीत विद्यालयात गुरू पं. मोहनराव कल्याणपूर यांच्याकडे नृत्य शिकत असतानाच्या आठवणी मनोगतात मांडल्या.
नीलिमा अध्ये यांनी भाटे यांच्या परंपरागत आमद नृत्याची ओळख करून दिली.

शिष्यांकडून अनोखी मानवंदना
गौरी शर्मा आणि पार्वती दत्ता यांनी भाटे यांना समर्पित नृत्यप्रकार सादर केला. शिववंदना, परणबुडी, आमद, तोडे, ततकार, लढी, कवित्त या प्रकारांचे सादरीकरण करून भाटे यांच्या शिष्यांनी गुरूप्रती असणारा आदर व्यक्त केला. अमीरा पाटणकर, अवनी गद्रे, शिवानी मोहिते, सानिका करमरकर, रागिणी नायर आदींच्या नृत्यप्रस्तुतीला दाद मिळाली. कोलकाता येथील मालविका मित्रा यांनीही नृत्यप्रस्तुती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images