Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नापास झाल्यामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड इन्स्टिट्यूटमधील पॉलिटेकनिक कॉलेजच्या विद्यार्थ्याने होस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. एका विषयात नापास झाल्याचे समजल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रकार होस्टेलच्या वॉचमनला सांगितल्यानंतरही तो मोबाइलमध्ये गेम खेळण्यात रममाण होता. अखेर विद्यार्थ्यांनी आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्याला रूममधून बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले होते. मात्र, त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
यश राहुल बोरोटे (वय १७, रा. आंबेगाव बुद्रूक, मूळ रा. मोशी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. यश हा पॉलिटेकनिकच्या पहिल्या वर्षात शिकत होता. त्याला बुधवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान रिझल्ट समजला होता. रिझल्ट समजल्यानंतर तो तत्काळ त्याच्या रूममध्ये परतला. त्याचे रूम पार्टनर रात्री आठच्या सुमारास जेवणासाठी निघाले असताना त्यांनी त्याला बरोबर येण्याविषयी विचारणा केली होती. मात्र, यशने आपल्याला फोन येणार असल्याचे सांगत त्यांच्याबरोबर जाणे टाळले होते.
त्याचे रूमपार्टनर साडेआठच्या सुमारास रूमकडे परतले होते. तेव्हा त्यांना रूमचा दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आले. दरवाजा वाजवल्यानंतरही यशने प्रतिसाद न दिल्याने त्यांनी होस्टेलमधील इतर मुलांना त्याबाबत माहिती दिली. त्यातील एक जण भिंतीवर चढला आणि दरवाज्यावरील एका छोटाश्या फटीतून आत पाहिले असता यशने कपड्याच्या साह्याने फॅनला गळफास घेतल्याचे दिसले.
विद्यार्थ्यांनी तत्काळ दरवाजा तोडून आत प्रवेश केला. दरम्यान, इतर विद्यार्थ्यांनी तत्काळ अॅम्ब्युलन्स बोलावली तसेच होस्टेलमधील जबाबदारी व्यक्तींना घटनेची माहिती दिली. अॅम्ब्युलन्स पोहोचण्यासाठी वेळ लागत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांनी यशला दुचाकीवरून हॉस्पिटलमध्ये नेले होते. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.
भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली आहे. यश हा मोशी येथील राहणारा आहे. त्याचे वडील शेतकरी असून, आई गृहिणी आहे. होस्टेलच्या आवारात अॅम्ब्युलन्स ठेवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी होस्टेल प्रशासनाकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पे स्लीप’ भरण्यासाठी मोजा पैसे

$
0
0

अशिक्षित खातेधारकांना भुर्दंड
म. टा. प्रतिनिधी, येरवडा
नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात कॅशलेस व्यवहार व्हावेत यासाठी केंद्र सरकारकडून अधिकाधिक प्रयत्न होत आहेत. मात्र, आजही अनेक अशिक्षित खातेदारांना बँकेत पैसे भरण्यासाठी, काढण्यासाठी किंवा ट्रान्स्फर करण्यासाठी फॉर्म (पे स्लीप अथवा डीडी किंवा एटीएमसाठीचे अर्ज) भरता येत नाही. त्यासाठी तो फॉर्म भरून देणाऱ्या व्यक्तीला पैसे द्यावे लागत असल्याचे चित्र येरवड्यात पाहायला मिळते आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सामन्यांना जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी भीम अॅप लाँच केले. असे असले तरी अशिक्षित खातेदारांना आपल्या पगाराच्या खात्यातील अथवा पेन्शन खात्यातील व्यवहार करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीने फॉर्म भरून देणे आवश्यक असते. त्यासाठी फॉर्म (पे स्लीप) भरून देणारी संबंधित व्यक्ती बँक अकाउंटधारकाकडून दहा रुपये घेत असल्याचे समोर आले आहे. डिमांड ड्राफ्ट किंवा आरटीजीएससाठी वीस रुपये, बँकेत अर्ज करण्यासाठी तीस रुपये तर नवीन खाते उघडण्यासाठी चाळीस ते पन्नास रुपये मोजावे लागतात.
येरवडा आणि विश्रांतवाडी उपनगरातील बहुतांश भाग झोपडपट्टीचा आहे. या परिसरात महापालिकेतील आणि राज्य सरकारमधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी राहतात.
सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची बँक खाती बँक बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहेत. दर महिना पैसे काढण्यासाठी नागरिकांची येथे मोठी गर्दी होते. त्यांना लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे परिसरातील बँकांच्या बाहेर पैसे घेऊन फॉर्म भरून देणे हा व्यवसाय झाला आहे. फॉर्म भरून देणारी व्यक्ती दिवसाला पाचशे ते सहाशे रुपये कमावत असल्याची माहिती समोर आली.

असे आहेत दर
- बँकेत पैसे भरणे /काढण्याची स्लीप भरणे - १० रुपये
- डीडी/आरटीजीएस माहिती भरून देणे - २० रुपये
- पासबुक, चेकबुक किंवा एटीएमसाठी अर्ज भरून देणे
३० रुपये
- नवीन खाते उघडण्यासाठी अर्ज भरणे - ४० रुपये
- संयुक्त (जॉइंट) खाते उघडण्यासाठी ५० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीत पुणेकरांच्या ‘डीएनएत’ : झाकीर हुसेन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘पुण्याला संगीताची मोठी परंपरा आहे त्यातही शास्त्रीय संगीतावर पुणेकरांचा जीव आहे बाबूराव माने, हिराबाई बडोदेकर, पं. भीमसेन जोशी यांनी पुण्याला संगीताची मोठी परंपरा दिली, त्यामुळे संगीत पुणेकरांच्या ‘डीएनएतच’ आहे,’ असे गौरवोद्गार काढून उस्ताद झाकीर हुसेन यांनी पुणेकर रसिकांना त्यांच्या रसिकतेची पावती बहाल केली.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १५व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (पिफ) उद्घाटन गुरुवारी झाले. त्यामध्ये झाकीर हुसेन यांना संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी त्यांनी पुणेकरांच्या रसिकतेची परंपरा उलगडली. वयाच्या सातव्या वर्षांपासून पुणेकर रसिकांच्या प्रेमाचा वर्षाव होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या अपर्णा सेन व ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. जेर्झी स्टर, गोरान पास्कलजेव्हिक, जॉर्ज अरियागाडा, जेन्स फिशर, गौरी रामनारायण, बेनेट रत्नायके, नर्गिस अबायर आदी या वेळी उपस्थित होते. भारत आणि स्पेनच्या संबंधांना ६०वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महोत्सवाची सुरुवात फ्लेमिंको नृत्याच्या सादरीकरणाने करण्यात आली. गिटार, सतारचे अद‍्भूत मिश्रण आणि त्यावर सादर होणारे नृत्य असा अनोखा अविष्कार पुणेकरांना पहायला मिळाला.
‘अब्दुल करीम खाँ साहेबांपासून पुण्याला शास्त्रीय संगीताची परंपरा लाभली आहे. पुण्यात रसिक जे प्रेम देतात ते दुसरीकडे मिळत नाही. मला लहानाचा मोठा होताना पुण्याने पाहिले आहे,’ असे सांगत त्यांनी पुण्यातील आठवणींना उजाळा दिला. ‘सवाई गंधर्वमध्ये वाजन करायचो त्या वेळी जंगली महाराज रस्त्यावर एका खोलीत पाच कलाकार रहायचे. त्यामध्ये पं. शिवकुमार शर्मा, पं. जसराज यांच्याबरोबर राहण्याची त्यांना अनुभवण्याची संधी मिळाली,’ अशी आठवणही त्यांनी सांगितली.
‘आमच्यासारख्या कलाकारांनी केलेल्या कार्याचा आज गौरव होतो, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. हा सन्मान म्हणजे चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या माणसांनी केलेला गौरव आहे,’ असे सांगत अपर्णा सेन यांनी जीवनगौरव पुरस्कार ओम पुरींना अर्पण केला.

महोत्सवाच्या उद्घाटनात सरकारला स्थान नाही.
‘चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र सरकारचा अधिकृत महोत्सव आहे,’ असे महोत्सवाचे मुख्य संयोजक डॉ जब्बार पटेल वारंवार सांगतात. उद्घाटनाच्या दिवशी मात्र सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या उपसंचालिका अमिता तळेकर या उपस्थित असूनही त्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही. याबाबत विचारणा केली असता ‘आचारसंहितेमुळे मंत्री उपस्थित राहू शकत नाहीत आणि सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांशिवाय व्यास्पीठावर स्थान देता येत नाही,’ असे स्पष्टीकरण पटेल यांनी दिले.

‘मला पैठणी का नाही?’
कार्यक्रमात अपर्णा सेन आणि सीमा देव यांना पुरस्कार देताना त्यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर झाकीर हुसेन यांनी उपरणे आणि पुणेरी पगडीने सन्मानित केले. त्या वेळी ‘मला पैठणी का नाही,’ असा मिश्कील सवाल झाकीर हुसेन यांनी केला आणि सभागृहात एकच हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसापची शुद्धलेखन पुस्तिका अशुद्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शुद्धलेखनाचे धडे देणाऱ्या व साहित्य संस्थांची आद्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शुद्धलेखन अशुद्ध ठरले आहे. परिषदेने काढलेल्या ‘सुगम मराठी शुद्धलेखन’ पुस्तिकेत लेखनाच्या चुकांचा भडिमार असून अशुद्धलेखनामुळे पुस्तिका मागे घेण्यात आली आहे. साहित्य परिषदेकडूनच लिखाणात चूक होणे अक्षम्य असल्याची तिखट प्रतिक्रिया साहित्यिक वर्तुळातून उमटत आहे. या कामाबद्दल पदाधिकाऱ्यांना शनिवारवाड्यावर जाहीर सत्काराचे आमंत्रण देण्यात आले आहे.
साहित्य क्षेत्रातील मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या साहित्य परिषदेकडून मराठी भाषेचे संवर्धन आणि विकासाचे काम अपेक्षित आहे. परिषदेने प्रकाशित केलेली सुगम मराठी शुद्धलेखन पुस्तिका लेखक, शिक्षक, पालक व विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयोगी ठरणार होती.
परीक्षा विभागाचे कार्यवाह माधव राजगुरू यांना पुस्तिकेचे काम देण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने आखून दिलेल्या १८ नियमांनुसार शुद्धलेखन पुस्तिका तयार करण्यात आली होती. लिखाणातील चुका टाळण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या पुस्तिकेतील चुका दुरुस्त न करताच तिचे घाईत प्रकाशन केल्याने परिषदेपुढे नामुष्की ओढावली आहे.
या ३२ पानी पुस्तिकेत शुद्धलेखन व मुद्रितशोधनाच्या तब्बल २७ चुका असल्याचे समोर आले आहे. प्रकाशनासाठी अरविंद नवरे यांनी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले होते. तर लेखनासाठी व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांनी मार्गदर्शन केले होते. पहिल्या पानावरील ई-मेल आयडी, प्रस्तुत ऐवजी प्रस्तृत, बोलीभाषा ऐवजी बोली भाषा तसेच अनुस्वार, शब्दविराम असे अनेक व्याकरण दोष समोर आले आहेत.


लेखनाबाबत भाषातज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. पुस्तिकेत काही दोष जरूर राहिले आहेत. ते लवकरात लवकर दूर करून पुस्तिका उपलब्ध केली जाईल. तसेच, वेबसाइटवर ती मोफत डाउनलोड करता येईल. हा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. तो फसला असे म्हणता येणार नाही. चुकांची जबाबदारी लेखकाची आहे.
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, साहित्य परिषद

महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून साहित्यविषयक, मराठी भाषाविषयक महत्त्वाचे काम अपेक्षित आहे. मूलभूत काम न करता कार्यक्रमांची घोषणाबाजी करण्यात पदाधिकारी मश्गूल आहेत. साहित्य पत्रिका व पुस्तिकेतील चुकांची जबाबदारी कार्याध्यक्ष व प्रकाशक म्हणून प्रमुख कार्यवाह यांनी घ्यायला हवी. साहित्यप्रेमींतर्फे आम्ही पदाधिकाऱ्यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन शनिवारवाड्यावर करीत आहोत. त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देणार आहोत.
- सुनील महाजन, माजी कोषाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन निर्णयातून काय साधणार ?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने राज्यातील सरकारी, अनुदानीत शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांऐवजी रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँकेच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाद्वारे खरचं विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळतील का, असाच प्रश्न निर्माण झाला आहे. या पाठ्यपुस्तकांच्या अनुदानाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार कधी, ती रक्कम विद्यार्थ्याच्या हातीच पडेल का, या रक्कमेतून पुस्तकेच विकत घेतली जाणार का, अशा असंख्य प्रश्नांची शिक्षण वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या वर्षीपर्यंत राज्य सरकारच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत पहिली ते आठवीपर्यतच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताना पुस्तके मिळायची. बालभारतीच्या वितरण विभागाकडून ही पाठ्यपुस्तके संबंधित शाळांमध्ये पाठविली जाते. मात्र, ही पुस्तके विद्यार्थ्यांना वेळेत मिळत नसल्याने शाळा सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती निर्माण होते. यावर आता एकप्रकारे उपाय म्हणून पाठ्यपुस्तकांऐवजी त्यांच्या अनुदानाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार केल्यास त्यांच्या बँकेच्या खात्यात पाठ्यपुस्तकांची रक्कम जमा करणे योग्य वाटच नाही. या रक्कमेचा वापर नवी पाठ्यपुस्तके खरेदी करण्यासाठीच होईल, असे ठाम सांगता येणार नाही. विद्यार्थी जुने अथवा ओळखीच्या व्यक्तींकडून पुस्तके आणू शकतात. त्यामुळे या रक्कमेचा विनियोग इतर गोष्टी करण्यात देखील होऊ शकतो. या निर्णयाद्वारे शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरण करण्यात समर्थ नसल्याचे दिसून येते, असे शिक्षणतज्ज्ञ अ. ल. देशमुख यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांला बँकेतून मिळणाऱ्या रक्कमेतून पालक पाठ्यपुस्तकेच विकत घेतील, असे नाही. त्या रक्कमेतून पालक काही पुस्तके विकत घेतील आणि राहिलेल्या रक्कमेचा वापर इतर गोष्टींसाठी करण्यात येईल, असेच चित्र राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळेत पाहायला मिळेल, असे पुण्यातील एका प्रतिष्ठित शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.

‘खाते नाही; आधार कार्ड नाही’
दरम्यान, राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे बँकेत खाते नसण्याची शक्यता आहे. यातच भर म्हणजे राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांची रक्कम कशी मिळेल, याची शंका असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे बँकेत खाते काढण्याची जबाबदारी ही शिक्षकांसोबत पालकांना विभागून देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकाच्या अनुदानाची रक्कम वेळेत जमा झाली तरच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके घेता येईल, अन्यथा विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील की नाही, याबाबत शंकाच आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता अशा प्रकारची अनुदानाची रक्कम बँकेच्या खात्यात वेळेत जमा होत नाही.
- एच. एम. गायकवाड, उपाध्यक्ष,
पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुस्ती नको; दोस्ती करा’

$
0
0


Sunil.Landge@timesgroup.com
Tweet - @sunillandgeMT

पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेबरोबर कुस्तीपेक्षा दोस्ती करावी,’ असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला आहे. त्या अनुषंगाने चर्चेला येत्या आठवड्यात वेग येणार असून, भाजप-सेनेचे स्थानिक पदाधिकारीही युतीसाठी अनुकूल असल्याचे म्हटले आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता रोखण्यासाठी भाजप-सेनेने जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून युती करण्यासंदर्भातही सकारात्मक दृष्टिकोन बाळगला जात आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपचे केवळ तीनच नगरसेवक निवडून आले होते. ही संख्या दोन आकडीच नव्हे; तर तीन आकडी होण्यासाठी युतीशिवाय पर्याय नाही, असा सूर दोन्ही पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. राज्यात अन्य महापालिकांच्या निवडणुकीमध्ये काय होणार? यापेक्षा पिंपरी-चिंचवडमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वारू रोखण्यासाठी युती आवश्यक असल्याचे संकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
या संदर्भात प्राथमिक पातळीवर यशस्वी चर्चादेखील झाली आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असताना महापालिकेतही एकाच पक्षाकडे सत्ता आल्यास विकास करणे सुलभ होईल, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘फॉर्म्युला’ वापरून त्यांच्यावर ‘बूमरँग’ करण्याचे तंत्र वापरण्याबाबत दोन्ही पक्ष गांभीर्याने विचार करीत आहे. त्यासाठी चांगली संधी निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. भाजप-सेनेने केलेल्या सर्वेक्षणातही युतीबाबत कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जागावाटपाला फारसे महत्त्व न देता बलाढ्य राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्यासाठी तडजोड करण्याची मानसिक तयारी भाजप-सेनेने दर्शविली आहे.
एकेकाळी महापालिकेच्या निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे हाती असलेले आमदार जगताप, आझम पानसरे तसेच काँग्रेसची सूत्रे हाताळणारे खासदार श्रीरंग बारणे हे सर्वचजण आता माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या निवडणूक रणनीतीला ओळखून आहेत. त्यामुळेच राजकीय वैर विसरून पिंपरी-चिंचवडमध्ये विरोधकांच्या एकजुटीशिवाय पर्याय नाही, असा निष्कर्ष काढण्यात येत आहे. महापालिकेत सध्या शिवसेनेचे संख्याबळ १४ आणि भाजपचे तीन आहे. या सर्व विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी देण्याबाबत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे एकमत आहे. याशिवाय पक्षांमध्ये इनकमिंग करणाऱ्या सक्षम कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याबाबतही अनुकूलता असल्याचे समजते.
युती झाल्यास जागावाटपाचा फॉर्म्युला ५०-५० टक्के असा प्रस्तावित असला तरी काही ठिकाणी मागेपुढे करता येईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मैत्रीपूर्ण लढतीची सोयीस्कर तडजोड करायची नाही, याबाबतही दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. त्यामुळे पुण्यात कुस्ती झाली तरी पिंपरी-चिंचवडमध्ये दोस्ती करण्यासाठी चर्चेची दारे सदैव खुली असतील, असे सांगण्यात आले. या प्रक्रियेला पुढील आठवड्यात वेग येण्याची शक्यता आहे.

‘आरएससएस’चाही सल्ला घेणार?
युतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, अॅड. सचिन पटवर्धन; तर शिवसेनेकडून संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव-पाटील, शहरप्रमुख राहुल कलाटे यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. या दोन्ही पक्षांनी प्राथमिक अहवाल सकारात्मकच दिले आहेत. ‘आरएससएस’चाही सल्ला भाजपकडून विचारात घेतला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे गारठले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराबरोबरच राज्यातील कडाक्याची थंडी सर्वांचीच परीक्षा पाहणारी ठरत आहे. गुरुवारी तापमानात आणखी घट होत शहरात ७.४ अंश सेल्सिअस इतक्या हंगामातील नव्या नीचांकी तापमानाची नोंद झाली, तर राज्यातील सर्वात नीचांकी तापमान नाशिक येथे (६ अंश सेल्सिअस) नोंदले गेले.
पुण्यात बुधवारी ७.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले होते. त्यात किंचित घट होऊन गुरुवारी ७.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. मात्र, शहरातील कमाल तापमानात घट होऊन हे तापमान २६.९ अंशांपर्यंत उतरले. शहरातील किमान तापमान सरासरीपेक्षा साडेतीन, तर कमाल तापमान सरासरीपेक्षा अडीच अंशांनी कमी होते. त्यामुळे शहरात दिवसा आणि रात्रीही थंडीचा कडाका कायम होता.
पुण्यात गेल्या तीन वर्षात जानेवारी महिन्यात नोंदले गेलेले सर्वात नीचांकी तापमान ७ अंश सेल्सिअस आहे. शुक्रवारी कदाचित पुण्यातील किमान तापमान सात अंशांपर्यंत उतरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुण्यातील आतापर्यंतच्या जानेवारी महिन्यातील सर्वांत नीचांकी तापमानाची (१.७ अंश सेल्सिअस) नोंद १७ जानेवारी १९३५ रोजी झाली होती.
उत्तरेकडील राज्यातील काही ठिकाणी तीव्र थंडीची लाट कायम आहे. काही ठिकाणी हिमवृष्टीही झाली. या राज्यांकडून महाराष्ट्राकडे थंड व कोरडे वारे वाहत आहेत. त्यातच राज्यातील वातावरण कोरडे असल्याने राज्यातील थंडी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
राज्यात विदर्भात थंडीची लाट होती, तर मराठवाड्यात शीत दिवसाची (कोल्ड डे) नोंद झाली. नगर येथे ६.८, मालेगाव येथे ७, जळगाव येथे ८, सातारा येथे ९.५, उस्मानाबाद येथे ७.९, परभणी येथे ८.४, अकोला येथे ८, नागपूर येथे ८.५, सोलापूर येथे १०.६, महाबळेश्वर यथे ११.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीई प्रवेशासाठीचे प्रवेश १६ जानेवारीपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शाळेत प्रवेशासाठीचे वेळापत्रक शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. ही प्रवेश प्रक्रिया १६ जानेवारी ते २९ एप्रिल दरम्यान पार पाडावी लागणार आहे. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून, वेळापत्रक लवकर जाहीर झाल्याने पालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेद्वारे समाजातील आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना शाळेच्या ‘एंट्री पॉइंट’मध्ये २५ टक्के राखीव प्रवेश कोट्यातून प्रवेश देण्यात येतो. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्याबाबत मंगळवारी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांबाबत निर्णय घेतला. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आरटीई अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांच्या नोंदणीसाठी १६ जानेवारी ते ३ फेब्रुवारी पर्यत असा १९ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
शाळांची नोंदणी झाल्यानंतर पालकांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी ५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीपर्यत हा कालावधी आहे. पहिली प्र‍वेश प्रक्रियेची यादी २७ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. त्यानंतर १ मार्च ते ९ मार्च या दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कालावधी देण्यात आला आहे. नंतर शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा दर्शविण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. यानंतर १४ मार्चला दुसरी प्रवेशाची यादी जाहीर होणार आहे. १६ ते २१ मार्च दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. त्याचबरोबर तिसरी प्रवेश यादी २४ मार्चला जाहीर होणार असून, २७ मार्च ते १ एप्रिलपर्यत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचे आहे. चौथी प्रवेश यादी ७ एप्रिलला जाहीर होऊन १० ते १५ एप्रिल दरम्यान शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. शेवटची पाचवी प्रवेश यादी १८ एप्रिल रोजी जाहीर होऊन २१ ते २७ एप्रिल दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. शाळांनी २५ टक्के प्रवेशाबाबतची माहिती फलक शाळेच्या दर्शनी भागात लावणे, प्रवेश प्रक्रियेचा कालावधी, आवश्यक कागदपत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या सूचना ही माहिती पालकांना देणे आवश्यक असल्याचे वेळापत्रकातून सांगण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे
- जन्माचे प्रमाणपत्र आणि वास्तव्याचा पुरावा
- सामाजिक वंचित घटकांमधील पालकांचा जातीचा दाखला
- आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्न दाखला
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गायकवाड यांचा ‘शेकाप’त प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शेतकरी हितासाठी स्थापन झालेल्या पक्षातून निवडणुका आणि जनतेसाठी पन्नास वर्षे लढत राहिलो. राज्यात कधी तरी परिवर्तन घडून येईल, या आशेवर परिवर्तनाची ज्योत तेवत ठेवली. चांगल्या कार्यकर्त्यांच्या रूपाने पक्षात परिवर्तनाचे पाऊल पडायला सुरुवात झाली आहे,’ या शब्दांत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी समाधान व्यक्त केले.
संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यासह शांताराम कुंजीर, श्रीमंत कोकाटे, अजय भोसले आदींनी गुरुवारी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, आमदार धैर्यशील पाटील, माजी आमदार मीनाक्षी पाटील, संपतरावपवार, राहुल पोकळे आदी या वेळी उपस्थित होते. ‘आतापर्यंत पक्षातून आउटगोइंग होत होते. मात्र, आता इन्कमिंग होत असल्याचा आनंद वाटत आहे,’ असे पाटील यांनी नमूद केले
‘छत्रपतींच्या वंशजांमुळे आशा निर्माण झाली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी खासदारकी देऊन शाहूंचा वंश बाटवला,’ अशी टीका गायकवाड यांनी खासदार संभाजीराजे यांचे नाव न घेता केली. शाहूंचा वंश बाटवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा काउंटडाउन सुरू झाला आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री, मोदी म्हणजे इव्हेंट कंपनी
पक्षप्रवेशावेळी गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. ‘मोदी आणि फडणवीस म्हणजे इव्हेंट कंपनी आहे, असा टोला त्यांनी लगावला. राज ठाकरे यांचा इतिहास फंदफितुरीचा आहे. आमच्या अस्मितेवर कोणी शितोंडे उडविल्यास आम्ही त्यांचा गडकरी केल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.

‘नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे हाल’
नोटाबंदीमुळे श्रीमंत आणखी श्रीमंत झाला आहे. काळा पैसा पांढरा झाला आणि मोदी अजरामर झाले. अदानी, अंबानी आणि टाटा यांच्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला. या मंडळींनी हकार चळवऴ बुडविली. शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतून पैसे मिळत नाहीत. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, या शब्दांत गायकवाड यांनी निर्णयाचा विरोध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका उभारणार आधुनिक नियंत्रण कक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निवडणूक प्रचारामध्ये सोशल नेटवर्किंगचा वाढता प्रभाव लक्षात घेता आघाडी घेण्यासाठी आणि आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या प्रचाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली आहे. त्याची ठोस अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेला कक्ष उभारला जाणार आहे. या माध्यमातून नागरिकांना पोलिस, प्राप्तिकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे थेट तक्रारी करता येणार आहेत. त्यासाठी संबंधित विभागांचे दूरध्वनी क्रमांक, ई-मेल, व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उमेदवारांची प्रचारमाध्यमे, त्यातील मजकूर आणि त्याचे स्वरूपही तपासण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र समिती असेल. आचारसंहितेचा भंग केल्याचे आढळून आल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.
आचारसंहिता लागू झाली असली तरी, निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर म्हणजेच २७ जानेवारीपासून उमेदवारांच्या खर्चाचा तपशील ठेवला जाणार आहे. या काळात उमेदवारांना दररोज हिशेब द्यावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना स्वतंत्र बँक खाते उघडावे लागेल. निवडणूक झाल्यानंतर महिनाभरात राजकीय पक्षांकडून खर्चाचा तपशील मागविण्यात येणार आहे.

‘मतदान वाढविणार’
मागील काही निवडणुकांमध्ये शहरात केवळ ५० ते ५५ टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. येत्या निवडणुकीत हे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे करडण्यात येणार आहे. त्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्या सोसायट्यांमधून अधिक मतदान होईल, त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येतील. मतदान करण्याबाबत महाविद्यालये, स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार असल्याचेही आयुक्त म्हणाले.

फ्लेक्स काढण्याची मोहीम तीव्र करणार

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत उभारण्यात आलेले बेकायदा फ्लेक्स आणि बॅनर काढण्याची मोहीम तीव्र करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. आचारसंहिता जाहीर झाल्याने नगरसेवकांच्या नावांच्या पाट्या तातडीने झाकण्याचेही आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शहरात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक आणि फ्लेक्स उभारले आहेत. मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरांमध्येही फलक उभारण्यात आले आहेत. अनेक चौकांत चुकीच्या पद्धतीने उभारलेल्या फ्लेक्सचा नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यामुळे कारवाईचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तीन दिवस सुरू असलेल्या कारवाईमध्ये सुमारे आठ हजार फलक, बॅनर आणि विविध पक्षांच्या झेंड्यांचा समावेश आहे.
फलक हटविण्याची मोहीम तीव्र करण्याबाबत पंधरा क्षेत्रीय कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. कारवाईचे नियोजन क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर करण्यात आले आहे. त्यानुसारच अंमलबजावणी सुरू असल्याचे उपायुक्त विजय दहिभाते यांनी सांगितले. आचारसंहिता लागू झाल्याने नगरसेवकांनी प्रभागात केलेल्या विकासकामांवरील नावांचे फलक झाकण्यात येणार आहेत. नगरसेवक, आमदार, खासदार, यांच्या विकासनिधीतून केलेल्या कामांच्या ठिकाणची नावे झाकली जाणार आहेत. याबरोबरच पालिकेतील पदाधिकारी, गटनेते यांच्या केबिनमधील नेत्यांची छायाचित्रे, पक्षांची चिन्हेदेखील झाकली जाणार असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांनी कळवावेत संशयास्पद व्यवहार

$
0
0

जिल्हाधिकारी सौरभ राव यांचे स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निवडणूक आचारसंहितेच्या काळात पैशांचा गैरवापर होऊ नये, यासाठी बँकांना मोठ्या प्रमाणातील रोख रकमेची वाहतूक करावयाची असल्यास, तसेच एखाद्या खात्यात संशयास्पद व्यवहार झाल्याचे​ आढळल्यास त्याची माहिती जिल्हाधिकारी आणि प्राप्तिकर विभागाला कळवावी लागणार आहे.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत या विषयी माहिती दिली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विक्रांत चव्हाण आदी उप​स्थित होते. ​जिल्ह्यातील तेरा पंचायत समिती आणि ​जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाल्याचे राव यांनी सांगितले. ‘निवडणुकीच्या काळात पैशाचा गैरवापर होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यानुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम न्यायची असेल, तर बँकांना ही माहिती जिल्हा प्रशासनाला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, या काळात एखाद्या खात्यात संशयास्पद व्यवहार झाल्याचे आढळल्यास ती माहितीही देणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसरची नेमणूक केली जाणार आहे,’ अशी माहिती राव यांनी दिली.
निवडणूक आयोगाने नैतिकतापूर्ण मतदानाचे धोरण स्वीकाल्याने मतदान नैतिकतापूर्ण होण्यासाठी विद्यार्थी आणि गृहनिर्माण सोसायट्यांची मदत घेतली जाणार आहे. मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कामही हाती घेण्यात येणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. ‘जिल्ह्यात दोन महापालिका, जिल्हा परिषद आणि १३ पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. नगरपरिषद परिसरात आचारसंहिता नसली, तरी तेथे केलेल्या विकासकामांचा उद्घाटन समारंभ किंवा महत्त्वाच्या निर्णयाचा संबंध जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील मतदारांशी असल्यास मनाई केली जाईल. त्यासाठी संबंधित नगरपरिषदांनी त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्यावी. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्यावर निर्णय घेतला जाईल,’असेही राव म्हणाले.

‘व्हिडिओ शूटिंग होणार’
निवडणुकीला उभ्या असणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार असून, देण्यात येणाऱ्या आश्वासनांची माहिती घेतली जाईल. उमेदवारांची मालमत्ता आणि त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती वृत्तपत्रांतून जाहीर केली जाईल, असेही जिल्हा​धिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका ठरविणार सभास्थान

$
0
0

राजकीय पदाधिकाऱ्यांची चर्चा करणार; आयुक्तांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना जाहीर सभांच्या आयोजनावरून प्रशासन आणि राजकीय पक्षात होणारे वाद टाळण्यासाठी सभा घेण्याच्या जागा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन जागांची निश्चिती केली जाणार आहे. पालिकेने ठरवून दिलेल्या जागांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी सभांचे आयोजन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी स्पष्ट केले. पालिका निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला. या पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या निवडणूक तयारीची माहिती कुमार यांनी दिली. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, आता सर्वच पक्ष सभांच्या नियोजनात व्यग्र झाले आहेत.
महत्त्वाच्या चौकांमध्ये तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर सभा घेण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने अनेकदा प्रशासन आणि राजकीय पक्ष यांच्यात वाद होतात. रस्त्यावर होणाऱ्या सभांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन त्याचा फटका सर्वसामान्यांना बसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सभा घेण्याच्या जागा निश्चित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रचाराच्या सभा घेताना ठिकाणांमुळे राजकीय पक्षांचा गोंधळ उडू नये यासाठी शहरातील मैदाने, मोकळ्या जागांची पाहणी करण्यात येत आहे. राजकीय पक्षांनी निवडलेल्या जागांची पाहणी करून तेथे सभा घेण्यास अडचण तर येणार नाही ना, याची खातरजमा पोलिसांनी केल्यानंतर जागा निश्चिती होणार आहे.
निवडणूक आयोगाने ५ जानेवारीला अंतिम केलेल्या मतदार यादीनुसार मतदारांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. याद्यांची फोड करून प्रभागनिहाय यादी पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये काही हरकत आणि सूचना असल्यास १७ जानेवारीपर्यंत क्षेत्रीय कार्यालयांकडे लेखी स्वरूपात नोंदविता येणार आहे. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केल्यानंतर मतदारांना स्लिपचे वाटप केले जाणार आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

एका छताखाली परवानग्या
निवडणुकीच्या काळात प्रचारसभा, मंडप, स्पीकर्स तसेच दुचाकी रॅली काढण्यासाठी विविध खात्यांच्या परवानग्या घ्याव्या लागतात, यासाठी पालिकेने एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे. लवकरच पोलिस आयुक्तांबरोबर बैठक घेऊन पालिकेतच संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक केली जाणार आहे, असेही आयुक्तांनी नमूद केले.

वीस हजार कर्मचारी तैनात
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकाच दिवशी होणार असल्याने त्या सुरळीत पार पडाव्यात यासाठी सुमारे २० हजार कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार याबरोबरच पालिका उपायुक्तांचा समावेश आहे. प्रत्येक विभगातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. त्या सर्वांच्या नेमणुकीचे आदेश काढण्यात आले आहेत, असेही कुमार यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संख्याबळ की बहुमत?

$
0
0

पालिका निवडणुकीसाठी युतीबाबत भाजपमध्ये तिढा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अधिक कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी देऊन संख्याबळाला प्राधान्य द्यावे, की व्यावहारिकतेतून युती करून सत्ता मिळविण्याचे प्रयत्न करावेत, असा पेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांपुढे पडला आहे. गेल्या काही काळात शहरात नवी राजकीय समीकरणे तयार होऊ लागल्याने या प्रश्नाच्या उत्तरावरच युतीचा फैसला होणार आहे.
राज्यातील दहा प्रमुख महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार का, याची प्रचंड उत्सुकता दोन्ही पक्षांच्या हजारो कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. युती करण्याबाबत प्राथमिक पातळीवर तरी दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली असली,तरी यंदा युती आकारास येण्यात अनेक आव्हाने-अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पुण्यातही युतीबाबत शक्यता निर्माण झाल्यामुळे दोन्ही पक्षांत वेगवेगळे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपमध्ये याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. विद्यमान नगरसेवक, तसेच उमेदवारी मिळणे निश्चित असलेले इच्छुक आणि महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी पावले उचलणाऱ्या नेत्यांमध्ये युती झाली पाहिजे, अशी मानसिकता आहे. तर युती झाल्यावर संबंधित प्रभागातील जागा मित्रपक्षाच्या वाट्याला गेल्याने संधी हुकण्याची भीती असलेल्या कार्यकर्त्यांचा स्वबळावरच लढण्याचा आग्रह आहे.
पक्षाच्या काही नेत्यांनी शहरातील राजकीय स्थितीचा आढावा घेतला, त्यामध्ये पक्षाला आघाडी मिळण्याची शक्यता असली, तरी बहुमतापर्यंत पोहोचण्यासाठी युतीची गरज असल्याचे एक निरीक्षण आहे. त्याबरोबरच मित्रपक्षाशी लढून आपली आणि त्यांची शक्ती कमी झाली, तर बहुमताचा आकडा गाठण्यात अडचणी येतील, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, युती केली, तर काही हुकमी जागा मित्रपक्षाला द्याव्या लागतील आणि बहुमताची शक्यता वाढली, तरी त्यात आपल्या पक्षाचे संख्याबळ कमी होईल, असा अंदाज आहे. या दुहेरी पेचातून मार्ग काढण्यासाठी पक्षात खल सुरू आहेत.
दरम्यान, लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच यंदाही भाजपची मोठी हवा आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढल्या, तरी सत्ता येईल असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच चार जणांच्या प्रभागात कमळाच्या चिन्हावर निवडून येणे सहजसाध्य आहे, असाही विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे. युतीमुळे वर्षानुवर्षे संधीच न मिळालेल्या कार्यकर्त्यांना यंदा अनुकूल वातावरणात तरी लढण्याची तरी संधी द्या, असा प्रचंड दबाव आहे. त्यामुळेच युतीबाबत निर्णय घेताना याचाही विचार प्राधान्याने करावा लागणार आहे.

‘तुमचीही वेळ येईल...’
भाजपमध्ये सध्या विविध पक्षांमधून इन्कमिंग सुरू आहे. त्यामुळे आपली संधी हुकण्याची भीती अनेक निष्ठावंतांमध्ये निर्माण झाली आहे. त्यातच युती झाल्यास आणखी कार्यकर्त्यांना त्यागाची संधी मिळणार आहे. ‘सक्षम उमेदवार नसेल, तेथेच इतरांना संधी देण्यात येईल,’ असे नेते म्हणत आहेत. पण, लोकसभा आणि विधानसभेच्या तुमच्या निवडणुकीत कामे करताना आम्ही सक्षम होतो, मग आताच आम्ही सक्षम नसल्याचा साक्षात्कार झाला का असा सवाल विचारून पुन्हा तुमची वेळ येईलच, अशा भावना कार्यकर्ते खासगीत व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळेच पक्षाच्या नेत्यांवर मोठा दबाव येणार ,हे निश्चित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत प्रवासाची योजना बारगळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शहरात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमधून मोफत प्रवासाची योजना पुढील दोन महिने बारगळण्याची शक्यता आहे. मोफत बस प्रवासाचा ठराव आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मान्य करण्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेला अपयश आल्याने शहरवासीयांना आणखी दोन महिने शेवटच्या सोमवारी तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे.
शहरातील खासगी वाहनांची संख्या कमी करून नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या सोमवारी सर्व प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागूल यांनी दिला होता. बागूल यांच्या प्रस्तावाला स्थायी समिती आणि त्यापाठोपाठ पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने एकमताने मान्यता दिली होती. एक दिवस मोफत प्रवासाची सुविधा देताना, त्यासाठी पीएमपीला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची तजवीज केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. पीएमपीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांचा वाटा असल्याने अशाच पद्धतीचा ठराव पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये मान्य होणे गरजेचे होते. त्यासाठी, पीएमपीच्या संचालक मंडळाकडून पाठपुरावा करण्यात आला होता. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता बुधवारी जाहीर झाली. तत्पूर्वी, अखेरच्या सोमवारी मोफत प्रवास देण्याचा ठराव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करणे क्रमप्राप्त होते. तरच, या महिन्यापासून त्याची अंमलबजावणी शक्य झाली असती. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने हा ठराव वेळेत मंजूर न केल्याने आता निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मोफत प्रवासाची सुविधा पीएमपीच्या प्रवाशांना देता येणे शक्य होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामंडळाची घटनादुरुस्ती रखडली

$
0
0

प्रस्तावांना मंजुरी नसल्याने अद्याप मुहूर्त नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या प्रस्तावित घटनादुरुस्तीला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. घटना दुरूस्तीतील काही प्रस्तावांना अद्याप सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून घटनादुरुस्ती रखडली आहे.
सप्टेंबर महिन्यात कोल्हापूर येथे झालेल्या महामंडळाच्या सर्वसाधारण बैठकीत घटनादुरुस्तीच्या जवळपास सर्वच तरतुदींना सदस्यांनी मान्यता दिली होती. त्यामध्ये काही सभासदांनी अतिरिक्त मुद्दे सुचविले होते. त्यावर विचार करून ऑक्टोबर महिन्यात घटनादुरुस्तीवर शिक्कामोर्तब करून नवी घटना अंमलात आणली जाणे अपेक्षित होते. मात्र, नवे वर्ष उजाडले तरीही महामंडळाने घटनादुरुस्तीसंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळावर नवीन कार्यकारिणी निवडून आल्यानंतर घटनेची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि त्यांच्या कार्यकारिणीने पुढे आणला. त्यात कलाकारांच्या हिताच्या अनेक तरतुदी मांडण्यात आल्या. त्यासाठी तज्ज्ञांची समितीदेखील नेमण्यात आली. प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे समितीच्या अध्यक्षपदी होते. या समितीने महामंडळाच्या संचालक मंडळाकडे घटनादुरुस्तीच्या तरतुदींचा अहवाल सादर केला. त्याला संचालक मंडळाकडून मान्यताही मिळाली. त्यामुळे महामंडळाने विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली. या सभेत महामंडळाने मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जवळजवळ नव्या घटनेतील सर्व मुद्दे सभासदांना मान्य असल्याचे महामंडळाच्या कार्यकारिणीकडून सांगण्यात आले. मात्र, तीन महिने उलटून गेले तरीही घटनेच्या दुरुस्तीवर अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे कलाकारांच्या हितासाठी करण्यात येणाऱ्या घटनेच्या दुरूस्तीला विलंब का होतो, असा प्रश्न चित्रपटवर्तुळासमोर उभा राहिला आहे.
घटनादुरुस्तीसाठी नव्याने केलेल्या तरतुदींमध्ये ‘ब’ वर्ग सभासदत्वाचा कालावधी तीन वर्षांवरून दोन वर्षे करण्यात यावा, दोन वर्षांनंतर त्वरित सभासदांना ‘अ’ वर्ग सभासदपद मिळावे, दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना मतदानाचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळावा, महामंडळाचे संचालक मंडळ १७ जणांचे असावे, संचालक मंडळात एका निर्मात्याची, एका दिग्दर्शकाची वाढ करावी, नृत्य आणि संगीत मिळून एक संचालक मंडळात असायचा; आता मात्र दोन्ही विभाग वेगळे करून नृत्यासाठी स्वतंत्र संचालक असावा, संचालक मंडळात तीन स्वीकृत सदस्य असावेत, अशा तरतुदी करण्यात आल्या होत्या. याशिवाय महामंडळाच्या संचालक मंडळामध्ये दोन उपाध्यक्ष असावेत, अशा तरतुदी मांडण्यात आल्या आहेत. या तरतुदींना मान्यताही मिळालेली आहे. केवळ सभासदांनी केलेल्या नव्या तरतुदींना घटनेत समाविष्ट करायचे अथवा नाही करायचे याचा निर्णय सर्वसाधारण सभेत होणे आवश्यक आहे. मात्र तो अद्याप होऊ शकलेला नसल्याने घटनादुरुस्ती रखडली आहे.

चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेमध्ये घटनादुरुस्तीला अंतिम मंजुरी मिळणार आहे. त्यासाठी लवकरच सर्वसाधारण सभा आयोजित केली जाईल. जवळजवळ सर्व तरतुदींना मान्यता मिळालेली असून, काही तरतुदींवर विचार सुरू आहे. सर्व सभासदांना विचारात घेऊन दुरूस्ती व्हावी, असा महामंडळाचा हेतू आहे.
मेघराज राजे भोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑपरेशनसाठी ‘त्याने ’ केल्या १३ घरफोड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

ऑपरेशनचा खर्च भागविण्यासाठी घरफोडी करणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली. अहमदनगरवरून पुणे, पिंपरी-चिंचवडला येऊन चोऱ्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.

अंकुश लक्ष्मण लष्करे (२९, रा. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी सहायक आयुक्त अरुण वालतुरे आदी या वेळी उपस्थित होते.

लष्करेने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात १३ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिस कोठडी दरम्यान ऑपरेशनचा खर्च भागविण्यासाठी आपण दररोज नगर-पुणे-नगर असा एसटी बस प्रवास करून घरफोडी करण्याचा मार्ग स्वीकारल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याच्याकडून तीन लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
या आरोपीने यापूर्वी त्याच्यावर झालेल्या ऑपरेशनचा खर्च भागविण्यासाठी घरफोडी केली व नंतर याची त्याला चटकच लागली. त्याकरीता तो सकाळी एसटी बसने नगरहून पुण्यात येत बंद घर हेरायचा व रात्री चोरी करून बसने नगरला निघून जात. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांसाठी आव्हान बनले होते. लष्करे याच्यावर यापूर्वी पुणे शहरात घरफोडीचे ५० गुन्हे दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुबार मतदारांना यंदा चाप बसणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ग्रामीण भागातील मतदारांची शहरात नोंदणी करणाऱ्या दुबार मतदारांना चपराक बसण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने पालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या ​निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेऊन दुबार मतदारांच्या प्रयत्नांना खीळ घातली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी ग्रामीण भागातील मतदारांची शहरात नोंदणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या आहेत. मतदारयाद्यांमध्येही मोठ्या प्रमाणात दुबार मतदार असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. ग्रामीण भागातील मतदारांची नावे शहरांत नोंदवून त्यांच्याकडून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र, यंदा महानगरपालिका निवडणुकीत या प्रकारांना चाप बसणार आहे.
महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने दहा महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हापरिषदांच्या निवडणुका पालिका निवडणुकीबरोबरच घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुबार नावनोंदणी केलेल्या मतदारांना कोणत्याही एकाच ठिकाणी मतदान करावे लागणार आहे. महानगरपालिका निवडणुकीत उपनगरांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांची नावे मतदारयादीत नोंदवून त्यांचे मतदान घडवून आणण्याचे प्रकार घडत होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, यंदा दोन्ही निवडणुका एकत्र आल्याने दुबार नोंदणी केलेल्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. बोटाला शाई लागल्याने त्यांना दोन्ही ठिकाणी मतदान करणे पूर्वीइतके सोपे जाणार नाही.

बोगस मतदानाला खीळ बसणार
ग्रामीण भागातील मतदारांची नोंदणी शहरात केल्यामुळे अनेकदा वाद झडले आहेत. काही इच्छुकांनी मतदारयाद्यांची छाननी करण्याचे काम व्यावसायिक संस्थांना दिले आहे. सासवड, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आळंदी, चाकण, शिरूर परिसरातील अनेक नागरिकांची नावे शहरातील मतदारयाद्यांमध्ये झळकत असल्याची उदाहरणे आढळली आहेत. निवडणूक आयोगाकडून अनेकदा प्रयत्न करण्यात येत असले तरी दुबार मतदारांना रोखणे शक्य होत नव्हते. मात्र, यंदा आयोगाने पालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समित्यांचे मतदान एकाच दिवशी ठेवल्याने त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचं निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्याचे माजी महापौर, माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत छाजेड यांचं आज पुण्यात राहत्या घरी अल्पशा आजारानं निधन झालं. ते ६४ वर्षाचे होते.

चंद्रकांत छाजेड गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज पहाटे त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्यानं सकाळी ७.४५ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. छाजेड यांच्या पार्थिवावर आज दुपारी तीन वाजता बोपोडीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राजकीय क्षेत्रात मामू या नावानं लोकप्रिय असलेल्या छाजेड यांचा लोकसंग्रह आणि लोक संपर्क प्रचंड होता. पुणे महापालिकेवर पाचवेळा निवडून आलेल्या छाजेड यांनी पुण्याचं महापौरपदही भुषविलं होतं. महापालिका सभागृह नेते म्हणूनही त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली होती. त्यानंतर बोपोडी विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. त्यांनी आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्रीच्या ट्रेकिंगवर बंदी

$
0
0

पुणे मिरर वृत्त

थर्टी फर्स्टच्या रात्री लोणावळा येथील विसापूर किल्ल्याजवळ काही गिर्यारोहकांवर झालेला हल्ला आणि त्यांना लुटल्याच्या घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी रात्रीच्या ट्रेकिंगवरच बंदी घातली आहे. सूर्योदयानंतर कुठल्याही ट्रेकर्सना किल्ल्यांवर जाऊ देऊ नका, अशा सूचनाही पोलिसांनी पुरातत्व खात्याच्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

पुणे व मुंबईतील काही गिर्यारोहक ३१ डिसेंबरला विसापूर किल्ल्यावर ट्रेकसाठी गेले होते. तिथं चोरट्याच्या एका टोळीनं त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील वस्तू लुटून नेल्या. ट्रेकर्सच्या ग्रुपनं पोलिसांकडं तक्रार केल्यानंतर या प्रकरणी तीन महिलांसह ११ लोकांना अटक करण्यात आली होती. मात्र, या घटनेनं सावध झालेल्या पोलिसांनी सूर्योदयानंतरच्या ट्रेकवर बंदी घालण्याचं पाऊल उचललं आहे.

लोहगडाच्या पायथ्याशी एक दरवाजा असून रात्र पडण्याच्या सुमारास तो बंद केला जातो. विसापूर किल्ल्यावर तशी कुठलीही सोय नाही. या किल्ल्याचा परिसरही मोठा असून तो पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहे. रात्रीच्या वेळी इथं अनुचित प्रकार घडण्याची भीती असते. ते टाळण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या ट्रेकवरच बंदी घातली आहे. ट्रेकर्सना अटकाव करण्यासाठी पुरातत्व खात्यानं काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणीही पोलिसांनी केली आहे. दिवसभरात किती पर्यटक व ट्रेकर किल्ल्यावर गेले आणि किती बाहेर पडले, याची नोंद ठेवण्यासाठी रजिस्टर ठेवण्याची विनंतीही पोलिसांनी केली आहे.

लोणावळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येदे-पाटील यांनी याबाबत माहिती दिली. विसापूर किल्ल्याच्या परिसरात विकेण्ड व सुट्टीच्या दिवशी, विशेषत: रात्रीच्या वेळेस गस्त वाढविण्याचाही निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

गिर्यारोहकांमध्ये नाराजी

अनुचित घटना टाळण्यासाठी ट्रेकिंगवरच बंदी घालण्याच्या पोलिसांच्या निर्णयामुळं गिर्यारोहक व पर्यटकांमध्ये नाराजी आहे. हा रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याचं गिर्यारोहकांचं म्हणणं आहे. 'सरकारी यंत्रणांनी बेकायदेशीर गोष्टींना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. ट्रेकिंगवर बंधन हा काही उपाय होऊ शकत नाही,' असं 'एव्हरेस्टवीर' उमेश झिपरे यांनी सांगितलं. 'रात्रीच्या ट्रेकिंगमध्ये अलीकडं मोठी वाढ झाली आहे. अशा चांगल्या उपक्रमाला आपण बळ दिले पाहिजे,' अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमच्या संसारात ‘अभिमान’ नाही

$
0
0

सीमा देव यांचे स्पष्टिकरण
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘एक काळ असा होता की आम्ही दोघेही यशाच्या एका उंचीवर होतो. दोघात कोण श्रेष्ठ असा अहंकाराचा भाव मी येऊ दिला नाही, कारण त्याने संसाराची घडी विस्कटली असती व मुलांवरही परिणाम झाला असता. अभिमान चित्रपटातील प्रसंग आमच्या संसारात घडला नाही,’ अशी प्रांजळ कबुली सीमा देव यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ‘सीमा माझ्यापेक्षा दहापट चांगली कलाकार आहे. मला केवळ चांगल्या भूमिका मिळत गेल्या, म्हणून मी काम केले. सीमा या गुणी कलाकारापुढे मी कायम दबलेला होतो आणि आजही दबून आहे,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी व्यक्त केले.
१५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या गुरुवारी झालेल्या उद्घाटन समारंभात सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्त देव दाम्पत्याने शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल व ‘पीफ बझार’चे समन्वयक श्रीरंग गोडबोले या वेळी उपस्थित होते. ‘राजाभाऊ परांजपे यांच्यासारखे गुरू मिळाल्यामुळे मला खूप काही शिकायला मिळाले. त्यामुळे माझा अभिनयाचा प्रवास केवळ सुखकर झाला. त्यामुळेच मला नाव आणि कीर्तीही मिळाली. आज मी जी उभी आहे. ते केवळ माझ्या गुरूंमुळे. राजाभाऊंप्रमाणेच राजा ठाकूर आणि मधुकर उर्फ बाबा पाठक या दिग्दर्शकांचाही जडण-घडणीत वाटा आहे,’ अशा शब्दांत सीमा देव यांनी गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
---------------------
मराठी अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीत भाषेमुळे टिकत नाहीत. तुम्हाला काम जमले नाही, असे म्हणून हिंदीतील लोक अभिनेत्रींना घाबरून सोडतात. त्यातून चुका होण्याचे प्रमाण वाढते. मलाही हिंदी भाषेची भीती वाटली होती, पण मी स्थिरावले. संजीव कुमारसारख्या संवेदनशील अभिनेत्याबरोबर काम करताना मला सुरुवातीला अवघड वाटले होते. मात्र जेव्हा त्याने आपणहून ‘मी तुमचा फॅन’ आहे, असे सांगितले तेव्हा मला खूप हायसे वाटले. अभिनेत्रींनी हिंदीत जाताना पुरेशी तयारी करायला हवी.
- सीमा देव, ज्येष्ठ अभिनेत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images