Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बालभारती-पौड फाटा रस्त्याला अखेर मुहूर्त

$
0
0

विकास आराखड्यात बदल नसल्याने रस्ता मंजूर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराचा विकास आराखडा मंजूर झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बालभारती ते पौड फाटा दरम्यानच्या रस्त्याच्या कामातील अडथळे दूर होण्याची चिन्हे आहेत. कोथरूड आणि सेनापती बापट रस्ता जोडणाऱ्या या शंभर फुटी रस्त्यामुळे कर्वे रोडसह लॉ कॉलेज रोडवरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे.
कोथरूड आणि परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने बालभारती ते पौड फाटा दरम्यान रस्त्याची संकल्पना मांडण्यात आली होती. या रस्त्याचे एका बाजूचे काम महापालिकेने सुरू केले होते. या रस्त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याचा दावा करून पर्यावरणवाद्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावेळी, कोर्टाने हा कलम २०५ खाली आखलेला रस्ता रद्द केला होता. महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये (डीपी) रस्त्याची आणखी पुन्हा दर्शविण्यात आली. तसेच, त्यावर हरकती-सूचना मागवून सुनावणीही पूर्ण करण्यात आली. त्यामुळे, या डीपी रस्त्यांमध्ये त्याचा समावेश झाला होता.
राज्य सरकारने महापालिकेच्या ताब्यातून डीपी काढून घेतल्यानंतर नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनेही बालभारती ते पौड फाटा दरम्यानचा हा रस्ता कायम ठेवला होता. सरकारने नुकताच डीपी मान्य केला असून, त्यात रुंदी कमी-जास्त केलेल्या काही रस्त्यांवर पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्तचे डीपीतील सर्व रस्ते मंजूर झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बालभारती-पौड फाटा रस्त्याची रुंदी ३० मीटर (शंभर फूट) असून, रुंदीमध्ये कोणताही बदल दर्शवण्यात आलेला नाही. त्यामुळे, हा रस्ता मंजूर झाला असल्याने त्याचे रखडलेले काम पुन्हा मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेची भूसंपादन प्रक्रिया पालिकेतर्फे लवकरच सुरू केली जाईल, असे संकेत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.

दोन्ही बोगद्यांनाही मान्यता
शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी डीपीमध्ये दर्शविण्यात आलेल्या दोन बोगद्यांपैकी नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड) ते तळजाई दरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीत वाढ केली गेली आहे. हा रस्ता २४ मीटरपर्यंत वाढविण्यात आल्याने त्यावर पुन्हा हरकती-सूचना मागविण्यात येणार आहेत. तर, पाषाण लगतच्या पंचवटी येथील प्रस्तावित बोगद्यातील रस्त्याच्या रुंदीत बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे, हा रस्ताही मंजूर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीएनजी स्टेशनसाठी पालिकेच्या नऊ जागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उपनगरांमध्ये महापालिकेच्या ताब्यात आलेल्या अॅमेनिटी स्पेसच्या नऊ जागा सीएनजी स्टेशनसाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला (एमएनजीएल) तीस वर्षांच्या भाडेकराराने देण्यास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने खासगी आणि सरकारी वाहनांना सीएनजी सहजरित्या उपलब्ध होण्यात या स्टेशनचा उपयोग होणार आहे.
सीएनजीवरील वाहनांमध्ये सातत्याने भर पडत असून, गेल्या महिन्यातच सीएनजीवर चालणारी दुचाकी बाजारात दाखल झाली. त्यामुळे, सीएनजीवरील वाहनांना पुरेशा प्रमाणात गॅस उपलब्ध होण्यासाठी शहरातील पंपांची संख्या (सीएनजी स्टेशन्स) वाढवण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या ‘एमएनजीएल’ने शहराच्या विविध भागांतील जागा उपलब्ध करून देण्याची मागणी पुणे महापालिकेला केली होती. त्यानुसार, शहराच्या उपनगरातील नऊ जागा सीएनजी स्टेशनसाठी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. ३० वर्षांच्या भाडेकराराने या जागा देण्यास समितीने मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली.
नऊ जागांपैकी खराडी येथे सर्वाधिक १५ हजार चौरस मीटरची अॅमेनिटी स्पेस ‘एमएनजीएल’ला उपलब्ध होणार आहे. या शिवाय खराडीत आणखी एक जागा, बावधन (दोन जागा), बालेवाडी (दोन जागा), बाणेर (दोन जागा) आणि कोथरूड येथील एक अॅमेनिटी स्पेस ‘एमएनजीएल’ला सीएनजी स्टेशनसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या जागांच्या बदल्यात महापालिकेला वर्षाकाठी एक कोटी ७२ लाख रुपयांचे भाडे प्राप्त होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात गुंड विठ्ठल शेलारचा भाजपत प्रवेश

$
0
0

न म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुन्हेगारांना सन्मानाने ‘पावन’ करून घेण्याची मालिका कायम ठेवून भारतीय जनता पक्षाने पुणे जिल्ह्यातील कुख्यात गुंड विठ्ठल शेलार याला पक्षात सामील करून घेतले. खून, अपहरण, दरोड्याची तयारी आदी गुन्हे शेलार याच्या नावावर असून, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गतही (मोक्का) त्याला अटक झाली होती. सध्या जामिनावर असलेल्या शेलारला पक्षप्रवेश दिल्याने भाजपमधूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नेते ‘आयात’ केले जात आहेत. पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि मावळ भागात भाजपने जोर लावला असून, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी शेलार याला पक्षात घेतल्याचे सांगितले जात आहे. पालकमंत्री गिरीश बापट आणि आमदार बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत शेलारने ३० डिसेंबर रोजी समारंभपूर्वक भाजपमध्ये प्रवेश केला. इतकेच नव्हे, तर भोर, वेल्हा, मुळशी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षपदही त्याला देण्यात आले.

शेलार याच्यावर खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. ग्रामीण पोलिसांनी संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडून काढत असताना शेलारवर ‘मोक्का’नुसार २०१४मध्ये कारवाई केली होती. हायकोर्टाने त्याला चार महिन्यांपूर्वी जामीन मंजूर केला आहे. गुंड गजानन मारणे, गणेश मारणे आणि शरद मोहोळ या गुन्हेगारी

टोळ्यांमुळे मुळशीतील अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळले आहेत. त्यात आता ​शेलारचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या प्रयत्न भाजपने केला आहे.

कोण हा शेलार?

विठ्ठल शेलार मुळशी तालुक्यातील बोतरवाडी येथील आहे. मारणे टोळीसाठी वसुली करण्याची जबाबदारी त्याच्यावर असल्याची नोंद पोलिसात आहे. त्यातून त्याने मुळशीत दोघांचा खून केला. खंडणीसाठी अपहरण करण्याचा गुन्हाही त्याच्यावर आहे. ग्रामीण पोलिस दलातील एका अधिकाऱ्याने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे शहर पोलिसांच्या तपासात उघडकीस आले होते. शहर पोलिसांनी त्याला एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याने मुळशी येथील दुहेरी खुनाची कबुली दिली होती.

विठ्ठल शेलारची गुन्हेगारी पार्श्वभूमी

२००८: हाणामारी

२००९: डेक्कन भागात दरोड्याची तयारी

२०१०: टोळीयुद्धातून पिंटू मारणेचा खून

२०१२: प्रतिस्पर्धी टोळीतील दोघांचे अपहरण, खून, मृतदेह जाळून टाकले

२०१३: अपहरण, खंडणीची मागणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे, पिंपरीला अखेर ५० ‘तेजस्विनी’ मिळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्ररीत्या सुरू होणाऱ्या ‘तेजस्विनी बस’ योजनेतून अखेर पुणे व पिंपरी चिंचवडला ५० बस मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्य सरकारने नुकताच याबाबतचा आदेश काढला आहे. यापूर्वी पुणे वगळता पाच शहरांमध्ये प्रत्येकी ५० बस देण्याचा निर्णय झाला होता. त्या वेळी पुण्याला वगळण्यात आले होते.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मार्चमध्ये अर्थसंकल्प मांडताना, महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी सहा प्रमुख शहरांमध्ये महिलांसाठी तेजस्विनी बस सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. प्रत्येक शहरात ५० याप्रमाणे सहा शहरांसाठी तीनशे बस राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नागपूर या शहरांना त्या बस देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला. तेजस्विनी योजनेंतर्गत पुण्यालाही बस देण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शासन निर्णयात पुण्याचा समावेश नव्हता. त्यामुळे या योजनेतून पुण्याला वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
वास्तविक, पुणे व पिंपरी चिंचवड शहरासाठी पीएमपीच्या ताफ्यात उपलब्ध असलेल्या बस अपुऱ्या पडतात. या परिस्थितीत महिलांसाठी स्वतंत्र ५० बस मिळणे फायदेशीर ठरणार होते. प्रामुख्याने गर्दीच्या वेळी या बस फक्त महिलांसाठी धावणार आहेत. त्यामध्ये महिला वाहकांनाच प्राधान्य देण्याची कल्पना मांडण्यात आली असून, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. महिलांसाठीच्या या स्वतंत्र बससाठी तिकिट दरांमध्ये स्थानिक पद्धतीनुसार बदल करण्याचे अधिकार महापालिकांना देण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राघोबानगर गोळ्यांनी त्रस्त

$
0
0

ग्रामस्थांची सुरक्षा गोळीबार सरावामुळे धोक्यात
दौंड : राज्य राखीव पोलिस दलाच्या गोळीबार प्रशिक्षण मैदानातून गोळीबार सरावाच्या दरम्यान चुकलेल्या गोळ्यांचा पाऊस टेकडी पलीकडील राघोबानगरात पडतो. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे दिसून आले आहे.
गिरीमगावाच्या हद्दीत राघोबानगर हा भाग आहे. हा भाग प्रशिक्षण मैदानाच्या टेकडीच्या पलीकडे आहे. या भागात सरावादरम्यान चुकलेल्या गोळ्या पडतात. या परिसरात सुमारे दोनशे नागरिक राहतात. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. गृहखात्याशी पत्र व्यवहारही केला आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही उपाययोजना होत नसल्याची तक्रार राघोबा नगरातील नागरिकांनी दिली.
गोळीबार सरावाची पूर्वसूचनाही कधी कधी मिळत नाही. गोळीबाराचे आवाज ऐकू येऊ लागले की शेतात काम करणाऱ्या स्त्री-पुरुषांना जीव मुठीत घेऊन पळावे लागते. काही वेळेला गोळीबार सुरू झाल्यानंतर तेथेच आडोशाला थांबून राहावे लागते, अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली.
या प्रकाराबाबत येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांपासून ते गृहखात्यापर्यंत पत्र व्यवहार केला आहे. गोळीबार सरावाच्या गोळ्या शेळ्या, मेंढ्या व पाळीव जनावरे यांना लागल्याच्या घटनाही नमूद करण्यात आल्या आहेत. काही महिलांनी त्यांच्या अगदी जवळ गोळ्या पडल्याचेही सांगितले. पुरावाच पाहिजे असेल तर शेतात शोधा. तुम्हाला बादलीभर गोळ्या मिळतील, असे इथल्या महिला सांगतात. गोळ्यांमुळे घराच्या पत्र्यांनाही छिद्र पडल्याचे दिसून आले.
याबाबत गोळीबार सराव मैदानाचे नियंत्रक राज्य राखीव पोलिस दल बल गट क्रमांक पाचचे समादेशक संजय शिंत्रे यांना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. गोळीबार मैदानातून इतक्या लांब गोळी जाणे शक्य नाही आणि चुकून गोळी गेली तर गोळीची क्षमता संपलेली असते. अद्यापपर्यंत कुणाला गोळी लागून इजा झाल्याची नोंद नाही. या केंद्रावर पुणे सोलापूर जिल्ह्यातील पोलिस व प्रशिक्षणार्थी जवान सराव करत असतात. या केंद्राची रचना अभ्यासपूर्वक केलेली आहे. गोळीबार मैदानाच्या मागे असणारी रचना नैसर्गिक आहे. सरावाची आगाऊ सूचना ग्रामस्थांना दिली जाते. टेकडी पलीकडे अपवादाने गोळ्या जात असतील, तर मातीची भिंत बांधण्याची योजना आहे.’
००००
शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. गोळीबार मैदानातून इतक्या लांब गोळी जाणे शक्य नाही आणि चुकून गोळी गेली तर गोळीची क्षमता संपलेली असते. अद्यापपर्यंत कुणाला गोळी लागून इजा झाल्याची नोंद नाही. या केंद्राची रचना अभ्यासपूर्वक केलेली आहे. गोळीबार मैदानाच्या मागे असणारी रचना नैसर्गिक आहे. सरावाची आगाऊ सूचना ग्रामस्थांना दिली जाते. टेकडी पलीकडे अपवादाने गोळ्या जात असतील, तर मातीची भिंत बांधण्याची योजना आखली जाईल.
- संजय शिंत्रे, गोळीबार सराव मैदानाचे नियंत्रक, राज्य राखीव पोलिस दल बल गट क्रमांक पाचचे समादेशक
०००
भिंत बांधण्याची मागणी
दौंड-कुरकुंभ रस्त्यावर गावाच्या बाहेर निर्जन परिसरात गोळीबार सराव केंद्र आहे. राज्यातील एक महत्त्वाचे गोळीबार प्रशिक्षण केंद्र म्हणून गणले जाते. पुणे, सोलापूर येथील राज्य राखीव पोलिस दलाचे जवान व नानवीज पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी व जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी येथे गोळीबाराचा नियमित सराव करतात. नैसर्गिक पद्धतीने योग्य असल्यानेच येथे गोळीबार प्रशिक्षण केंद्राची निर्मिती झाली आहे. केंद्राच्या मागे टेकडी असून, या टेकडीवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भिंत बांधल्यास टेकडी पलीकडे राघोबानगर येथे गोळ्या पडणार नाहीत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नॅक’च्या मूल्यांकनासाठी ‘ग्रीन कॉलेज, क्लीन कॉलेज’

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com
@chintamanipMT
पुणे : पर्यावरण विषयाचे स्वरूप केवळ थेअरी व श्रेणी पुरते मर्यादित राहिले असताना शहरातील ८० कॉलेजमध्ये ‘ग्रीन कॉलेज, क्लीन कॉलेज’ ही चळवळ मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. नॅशनल अॅसेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिलकडून (नॅक) कॉलेजचे ‘ग्रीन ऑडिट’ करण्यात येणार आहे. ग्रीन ऑडिटच्या मूल्यांकनामुळे पर्यावरणाच्या कार्यानुभवास महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यावरण चांगले राखून मूल्यांकन मिळविण्यासाठी कॉलेजमध्ये चढाओढ लागली आहे.
‘ग्रीन कॉलेज, क्लीन कॉलेज’ ही चळवळ दोन वर्षांपूर्वी सुरू झाली असली, तरी गेल्या काही महिन्यात ही चळवळ स्वीकारणाऱ्या कॉलेजची संख्या कमालीची वाढली आहे. पर्यावरणाच्या जागरूकतेपेक्षा नॅकचे मूल्यांकन त्यास कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
‘पर्यावरण हा विषय साचेबद्ध न राहता कॉलेजचा परिसर पर्यावरणपूरक राहावा, विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या रोजच्या जीवनात त्याचे प्रतिबिंब पडावे, या सर्व घटकांमध्ये पर्यावरणविषयक भान जागृत व्हावे, या हेतूने किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाच्या पुढाकारातून ‘ग्रीन कॉलेज, क्लीन कॉलेज’ ही चळवळ राबविण्यास सुरुवात झाली. यामध्ये शहरातील ८० कॉलेजचा सहभाग असून टाकाऊ पदार्थ, ऊर्जा, वॉटर ऑडिट, प्रदूषण व जैवविविधता या पाच विषयांवर विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी काम करतात. त्यातून कॉलेजचे स्वरूप पर्यावरणपूरक होण्यास सुरुवात झाली आहे,’ असे एसपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांनी 'मटा'ला सांगितले.
‘विद्यार्थ्यांच्या सवयी बदलणे हा प्रमुख भाग आहे. नॅकचे ग्रीन ऑडिट, सीएसआर निधी व स्वच्छ भारत चळवळ या सर्वांचा एकत्रित परिणाम कॉलेजमध्ये दिसत आहे. ही चळवळ यापुढील काळात अधिक गतीने विस्तारणार आहोत,’ असे महोत्सवाचे वीरेंद्र चित्राव यांनी सांगितले.
------------------------
कॉलेजमधील सर्व कचरा, खाद्य पदार्थ आम्ही एकत्र करून त्याचे खत तयार करतो. कॉलेजमधील अनेक झाडांवर विविध पक्षांचे वास्तव्य आहे. त्यांना त्रास नको म्हणून आम्ही शांतता क्षेत्र निर्माण केले आहे. कॉलेजमध्ये स्वच्छ प्रकाश व हवा येत असल्याने वीजेचा वापर मर्यादित ठेवला आहे. पाण्याची व्यवस्था उत्तम असून गळणारे नळ दिसणार नाहीत. पर्यावरणाच्या जागृतीसाठी चित्र प्रदर्शन घेतले जाते. हे सर्व काम ‘ग्रीन कॉलेज, क्लीन कॉलेज’ या चळवळीचा भाग आहे. कॉलेजमधील विहिरीचे पाणी कॉलेजसह शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेला पुरविण्याचा प्रकल्प हाती घेण्याचा विचार आहे.
- वैष्णवी गवळी, तृतीय वर्ष, बीए, एस.पी. कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्दैवी मुलाच्या कुटुंबीयांना पालिकेची मदत

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, पुणे
आंबिल ओढा येथील चेंबरमध्ये पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंगळवारी पालिकेच्या मुख्य सभेत दिले. संबधित विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांना पालिकेकडून दोन लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला.
आंबिल ओढा येथील चेंबरमध्ये पडून तीन दिवसापूर्वी गणेश चांदणे या पंधरा वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. चेंबरचे झाकण उघडे राहिल्याने ही दुर्घटना घडली होती. मात्र, महापालिकेचे कोणतेही काम या ठिकाणी सुरू नसल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. या प्रकरणाचे पडसाद मंगळवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. नगरसेविका मनीषा घाटे आणि धनंजय जाधव यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले.
प्रशासनाच्या चुकीमुळे संबधित विद्यार्थ्याला प्राण गमावावे लागले आहेत. या चेंबरपासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर स्वच्छ भारत अभियानाचे काम सुरू होते. त्यासाठी चेंबर फोडण्यात आला असल्याचा आरोप घाटे यांनी केला. पालिका प्रशासनाने संबधित विद्यार्थ्याच्या नातेवाइकांना पाच लाख रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
यावर खुलासा करताना पालिका आयुक्त कुमार यांनी या ठिकाणी महापालिकेकडून कोणतेही काम सुरू नसल्याचे सांगितले. येथे पालिकेच काम सुरू असून प्रशासन चुकीची माहिती देत असल्याचा आरोप नगरसेवक घाटे आणि जाधव यांनी केला. त्यावर आयुक्तांनी त्रयस्थ संस्थेमार्फत या घटनेचा तपास केला जाईल आणि संबधित दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. पालिकेच्या नियमानुसार तीन लाख रुपये देण्याचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी प्रशासनाला दिले. मात्र, स्थायी समितीच्या बैठकीत अगोदरच दोन लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा संसद २८ जानेवारीला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशातील तरुणांचा राजकारणात सहभाग वाढावा. युवाशक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणाविषयी आवड निर्माण व्हावी. तसेच, राजकारणातील अनेक गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी दुसऱ्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संसेदत विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.
डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे २८ व २९ जानेवारी रोजी नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे. यामध्ये देशभरातील राजकारण, समाजकारण आणि विविध विषयांतील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी तरुणांना मिळणार आहे, अशी माहिती संसदेचे संस्थापक अध्यक्ष शार्दुल जाधवर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
संसदेसाठी देशभरातून विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असून, सामाजिक चळवळ आणि युवक, अभिव्यक्ती- देशभक्ती आणि देशद्रोह, राजकारण आणि नैतिकता अशा विविध विषयांवर संसदेत चर्चा होणार आहे. या चर्चासत्रांमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी, खासदार राजू शेट्टी, सरपंच पोपटराव पवार, उद्योजक रामदास माने, पत्रकार विलास बडे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. राज्यातून दोन हजार विद्यार्थी या संसदेमध्ये उपस्थित राहणार आहे, अशी माहिती जाधवर यांनी दिली. या वेळी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. सुधाकर जाधवर, माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे योगेश पांडे, बापू कारंडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शुद्धलेखनाच्या नियमांचा बाऊ नको : डॉ. परांजपे

$
0
0



म .टा. प्रतिनिधी, पुणे
‘रोजच्या व्यवहारात जी भाषा बोलली जाते ती चुकीची नसते; मात्र लिहिल्या जाणाऱ्या भाषेला संकेतबद्ध प्रमाण असल्याशिवाय वळण लागत नाही. या संकेतांमुळे अनेकदा भाषेच्या आकलनात अडथळे तयार होतात. त्यामुळे भाषेच्या शुद्धलेखनापेक्षा प्रमाणलेखन असा शब्द वापरता येऊ शकेल. त्याने भाषेचे लेखन अधिक शुद्ध होण्यास मदत होईल,’ असे मत ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. प्र. ना. परांजपे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे माधव राजगुरू लिखित सुगम मराठी शुद्धलेखन पुस्तिकेचे डॉ. परांजपे व ज्येष्ठ साहित्यिक न. म. जोशी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. परांजपे म्हणाले, ‘मराठी भाषेचे ध्वनिशास्त्र अद्याप विकसित झालेले नाही. भाषेमुळे सामाजिक तणावही निर्माण होतात. ललित लेखनात बोलीभाषा वापरली जाते. मात्र, निबंधात्मक, चर्चात्मक लेखनात प्रमाणलेखन अपेक्षित असते. यावरून वादंग होऊ शकतो. भाषेबाबत कोणाच्याही मनात न्यूनगंड निर्माण होऊ नये, यासाठी भाषेत मोकळेपणा यायला हवा. शुद्धलेखनाच्या नियमांचा बाऊ केला जाऊ नये. भाषेबाबतचे अत्याग्रही आणि सत्याग्रही यामधून मध्यम मार्ग काढता यायला हवा.’
‘भाषा व्यवहारावरून अनेकदा वादाला तोंड फुटते. केवळ भाषेचे आकलन आणि मान्यता यासाठी शुद्धलेखनाचे संकेत वापरले जातात. मात्र भाषा आपल्याला कळणे, तिचे बहुसंख्य लोकांना आकलन होणे आणि ती लिखित स्वरूपात अवतरणे असा शुद्धलेखनाचा विचार केला जाऊ शकतो. वर्णमालेतील वापरात नसणाऱ्या अक्षरांचा पुनर्विचार करण्याची गरज असून, उपयोग नसल्यास ही अक्षरे वगळावीत,’ असे डॉ. न. म. जोशी यांनी सांगितले. ‘पुणे महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीमध्ये शुद्धलेखन पुस्तिकेबाबतचा मुद्दा चर्चेला घेऊन अनुदान प्राप्त करण्याचा प्रयत्न करुन अल्पदरात अनेक लोकांपर्यंत ही पुस्तिका पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.’ याकडे जोशी यांनी लक्ष वेधले.
राजगुरू म्हणाले, ‘शुद्धलेखन भाषाव्यवहार, लेखनव्यवहारातील महत्त्वपूर्ण बाब आहे. भाषेबाबत अनेकदा चुकीच्या संकल्पनांना पेव फुटतो. त्यामुळे चुकीचे नियम बरोबर वाटू शकतात. त्यासाठी शुद्धलेखन पुस्तिका मार्गदर्शक ठरू शकते आणि त्याचा भाषेच्या आकलनासाठी अधिक उपयोग होईल.’ पुस्तिकेच्या लेखनासाठी ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे मार्गदर्शन लाभले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.


संकेतस्थळावरही पुस्तिका मिळणार
विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींना उपयोगी पडावी, यासाठी तयार केलेली ही सुगम मराठी शुद्धलेखन पुस्तिका www.masapapune.org या संकेत स्थळावर लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे. संकेतस्थळावर ही पुस्तिका विनामूल्य डाउनलोड करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलींद जोशी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महासंग्रामाची लढाई सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकांची तारीख बुधवारी अंतिम झाल्याने आता विविध पक्षांमध्ये खऱ्या अर्थाने महासंग्रामाची लढाई सुरू झाली आहे. पुढील ४० दिवसांत मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रयत्न केले जाणार असून, पुढील महिन्यात महापालिकेत ‘कारभारी’ कोण होणार, हे ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या निवडणुका केव्हा जाहीर होणार, याची उत्सुकता सर्वच पक्षांमध्ये होती. यापूर्वी, जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात आचारसंहिता जाहीर झाली असल्याने यंदा उशीर का, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर, निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार, २१ फेब्रुवारीला महापालिकेची निवडणूक होणार असून, २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

शहरातील सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये प्रा-रूप प्रभागरचना जाहीर झाल्यापासून तयारीला सुरुवात केली होती. यंदा प्रथमच चार सदस्यांचा प्रभाग होणार असल्याने हद्दींचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. तसेच, प्रभागातील मतदारसंख्याही वाढली आहे. त्यादृष्टीने, इच्छुक उमेदवारांकडून नियोजन केले जात होते. चार सदस्यांच्या प्रभागामध्ये विविध भागांतील इच्छुकांना संधी मिळणार असला, तरी सर्व उमेदवार ताकदीचे असावेत, यासाठी पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. शहरातील सर्व राजकीय पक्षांनी इच्छुकांकडून अर्ज मागवून घेत, त्यांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण केली आहे. निवडणूक अर्ज भरण्यास जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात सुरुवात होणार असल्याने त्यापूर्वीच उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. काही पक्षांकडून कदाचित त्यापूर्वी एखादी यादी जाहीर केली जाईल, असे संकेत मिळत आहेत.

पक्षांतराला अधिक वेग येणार

केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने पालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेमधून अनेक जण भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्येही इतर पक्षांतील काही इच्छुकांनी प्रवेश केला आहे. पुढील काही दिवसांत पक्षांतराला अधिक वेग येण्याची चिन्हे असून, निवडणुकीचा अर्ज दाखल करेपर्यंत ही आवक-जावक सुरू राहणार असल्याची शक्यता आहे.


पुणे महापालिका

प्रभाग : ४१

सदस्य संख्या : १६२

महिलांची संख्या : ८१

अनुसूचित जमाती (एसटी) : २

अनुसूचित जाती (एससी) : २२

इतर मागासवर्गीय (ओबीसी) : ४४

खुल्या गटासाठी : ९४

लोकसंख्या : ३१ लाख २४ हजार (२०११ जनगणनेनुसार)

मतदारसंख्या : २६ लाख ४२ हजार (अंदाजे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची यादी दोन दिवसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात झाल्याचे स्पष्ट करून पक्षाचे काम तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. पुढील दोन दिवसांत पहिल्या टप्प्यात उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा विचार केला जात आहे.

पालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना गेली दहा वर्षे पालिकेत सत्ताधारी म्हणून काम करताना राष्ट्रवादीने केलेल्या कामांची माहिती मतदारांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे कशी पोहोचविता येईल, यासाठी पक्षाने नियोजन केले आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, या सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन गाठीभेटी घेऊन प्रचार करण्याबरोबरच जाहिराती, फ्लेक्स यांच्या माध्यमातून नागरिकांशी सुसंवाद साधण्याचे नियोजन पक्षाने केल्याचे शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले. पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेने व्हावा, यासाठी प्रत्येक प्रभागासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे. या पदाधिकाऱ्यावर जबाबदारी टाकली जाणार असून प्रचाराचे संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी या पदाधिकाऱ्यावर असणार आहे.

आम्ही निवडणुकीसाठी जय्यत यंत्रणा उभी केली आहे. बूथरचना आणि जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांत शहरात केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रभागाचे स्वतंत्र फेसबुक अकाउंट करण्यात आले आहे. उमेदवार जाहीर झाल्यावर थेट नागरिकांपर्यंत आणि सोशल मीडियामार्फत प्रचारयंत्रणा राबविण्यात येईल. तसेच, ज्येष्ठ सदस्यांना सहकारी उमेदवारांच्या प्रचाराचीही जबाबदारी देण्यात येईल.

खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी


शिवसेनेच्या रणनीतीकडे लक्ष

देशात आणि राज्यात सत्तेचे वाटेकरी असले, तरी विरोधकाची धुरा सांभाळणारी शिवसेना आगामी महापालिका निवडणुकीत कसा डाव मांडणार याकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे. शिवसेना-भाजपच्या युतीवर अनेक गणिते अवलंबून असली तरी शिवसेनेने जोरदार तयारी करत भाजपसह सर्वांनाच टक्कर देण्यासाठी डरकाळी फोडली आहे.

शिवसेनेचे गतनिवडणुकीत १५ सदस्य निवडून आले होते. गेल्या विधानसभा, लोकसभेत भाजपला भरघोस यश मिळाल्याने शिवसेनेला काहीशी मगरळ आली होती. मात्र, स्थानिक नेत्यांवर विशेष जबाबदारी टाकण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला. डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनीही शिवसैनिकांना महापालिकेच्या रणसंग्रामाला चेतवले. जवळपास ७०० इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. प्रत्येक प्रभागात आणि विभागात उमेदवार असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसैनिकांमध्ये अंगात उत्साह संचारला आहे.

शिवसेनेची ताकत असलेल्या भागात जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणत महापालिकेत आपला दबाबगट निर्माण करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. मात्र, चारच्या प्रभागांमध्ये सक्षम उमेदवार देत निवडणुकीत रंगत आणण्यात शिवसेनेला कितपत यश मिळेल, याची उत्सुकता राहणार आहे.


प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर लगेचच शिवसेनेनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ज्या उमेदवारांना तिकिट मिळण्याची शक्यता अधिक आहे, अशा इच्छुकांना कल्पना देण्यात आली आहे. शिवसेनेने आठही विधानसभा मतदारसंघातील प्रभागनिहाय आढावा घेतला. प्रत्येक मतदारयादीनुसार यादी प्रमुखाची ​नेमणूक झाली असून इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इच्छुकांची प्रभागातील प्रचाराची पहिली फेरी पूर्ण होत आली आहे. शिवसेना या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपला जाहीरनामा प्रसिद्ध करेल.

विनायक निम्हण, शहरप्रमुख, शिवसेना


भाजपचा ‘रोडमॅप’ निश्चित

महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम निश्चित झाल्याने यापुढील टप्प्यात बूथ रचना, प्रभागांचा जाहीरनामा आणि इतर उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाने ठरवले आहे. विद्यमान नगरसेवकांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत पक्ष संघटनेतील प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली गेली असून, पुढील ४० दिवसांचा ‘रोडमॅप’ निश्चित केला गेला आहे.

पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका २१ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने, पक्षातील सर्व इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. इच्छुकांची चाचपणी करण्यासाठी पक्षाने नुकताच चार दिवसांचा मुलाखतीचा कार्यक्रम घेतला. या चार दिवसांत तब्बल साडेआठशे जणांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे, या पुढील टप्प्यात उमेदवार निश्चित करताना भाजपसमोरील आव्हान अधिक खडतर होण्याची शक्यता आहे. तरीही, निवडणुकांची तारीख निश्चित झाल्याने पुढील ४० दिवसांच्या कालावधीतील विविध टप्पे ठरविण्यात आले आहेत. त्याची सुरुवात येत्या रविवारी (१५ जानेवारी) होणाऱ्या बूथ प्रमुखांच्या कार्यक्रमाने होणार आहे. बूथ रचनेच्या दृष्टीने सर्वांना सविस्तर यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सर्वांकडून माहिती संकलित करून घेतली जाणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली. त्यापुढील टप्प्यात पक्षातर्फे करण्यात आलेल्या विविध संचलन समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. सर्व विद्यमान नगरसेवकांची बैठक येत्या शुक्रवारी (१३ जानेवारी) होणार आहे. तर, त्यानंतर अंतिम जाहीरनामा करण्यासाठीच्या बैठकांनाही वेग येईल. शहरातील प्रतिष्ठित आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ नागरिकांच्या सूचना संकलित करण्याचे कामही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक आज, गुरुवारी ठाण्यात होणार आहे. पक्षाकडून नुकत्याच घेण्यात आलेल्या मुलाखतींच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती या बैठकीत वरिष्ठांना देण्यात येणार असून, निवडणूक अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर झाले असल्याने त्यादृष्टीने पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे संकेत शहराध्यक्ष गोगावले यांनी दिले.

‘मनसे’च्या आज बैठका

पक्षाचे अनेक नगरसेवक पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. तरुण कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षाने तयारीला सुरुवात केली आहे. आज (गुरुवारी) पक्षाच्या विभागवार बैठका होणार असून त्यामध्ये प्राथमिक नियोजनाला अंतिम रूप देण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाने बुधवारी राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्याचवेळी आचारसंहिताही लागू झाली. प्रत्यक्ष निवडणुकीला अजून ४० दिवस असले, तरी तारखा जाहीर झाल्याने खऱ्या अर्थाने निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनेही नियोजनाला सुरुवात केली आहे. पक्षातर्फे ज्येष्ठ नेत्यांनी गेल्या आठवड्यातच इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून काही उर्वरित मुलाखती येत्या तीन चार दिवसांत पार पडतील. निवडणुकीच्या प्रत्यक्ष तारखा जाहीर होण्यापूर्वीच पक्षाच्या इच्छुकांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे. काही इच्छुक स्वतंत्रपणे तर काही एकत्रित प्रचार करत आहेत.

गुरुवारी दुपारनंतर पक्षातर्फे विभागावर बैठका घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये सद्यस्थितीचा आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांना तयारीविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. वरिष्ठांशी संपर्क साधून प्रचाराचे नियोजन, कोपरा सभा, रॅली, मोठ्या सभा, रोड शो च्या तारखांची जुळवाजुळव आदी गोष्टींना सुरुवात होईल. मात्र, गुरुवारपासून पक्षाच्या सर्व शाखा जोमाने प्रचारात उतरतील, असे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.

यंग ब्रिगेड सक्रिय

पालिकेच्या गेल्या निवडणुकीत पक्षाचे २८ नगरसेवक निवडून आले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पक्षाला दारूण पराभव स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सात-आठ नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. काही नगरसेवक पक्षांतरासाठी योग्य मुहूर्ताच्या शोधात आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षातील कार्यकर्त्यांची यंग ब्रिगेड सक्रिय झाली आहे. गद्दारांना धडा शिकवायचाच, या निर्धाराने कार्यकर्ते प्रचारात उतरले आहेत.

काँग्रेससाठी निवडणूक आव्हानांची

पुणे महानगरपालिकेत सातत्याने सत्तेत राहिलेल्या काँग्रेससाठी या वेळची महापालिका निवडणूक आव्हान निर्माण करणारी आहे. पारंपारिक मतदार आणि तळागाळात पोहोचलेल्या काँग्रेसला गेल्या निवडणुकीतील आपली सदस्य संख्या कायम ठेवून त्यात वाढ करणे जमेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

काँग्रेसकडून महानगरपालिकेची सत्ता घेत राष्ट्रवादी काँग्रेसने २००७मध्ये पुणे शहरात आपले पाय रोवण्यास सुरुवात केली. गेली पंधरा वर्षे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. पुणे पॅटर्न, तर कधी काँग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादीने आपली सत्ता राखली. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपने आव्हान निर्माण केले असल्याने साहजिकच त्याचा फटका काँग्रेसलाही बसला आहे. काँग्रेसचे २८पैकी तीन नगरसेवक इतर पक्षांत दाखल झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस आपली गेल्या निवडणुकीत विजयी संख्या यावेळीही राखणार का? पक्षातील गटबाजी रोखून विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार का, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे.


काँग्रेसने गेल्या तीन-चार महिन्यांपासून निवडणुकांची जय्यत तयारी सुरू केली आहे. विधानसभा मतदारसंघ तसेच ब्लॉक कमिटींच्या अनुषंगाने मेळावे, बैठका घेतल्या आहेत. पक्षाचा जाहीरनामा अंतिम टप्प्यात असून लवकरच तो आम्ही प्रकाशित करू. आजी-माजी आमदारांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून आमची पहिली यादी आठवडाभरात जाहीर करण्यात येईल. मोदी सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्यास काँग्रेस यशस्वी होत असून कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या निवडणुकीत उतरले आहेत.

रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीसमोर भाजपचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा बिगुल वाजताच पिंपरी-चिंचवड महापालिकेतही राजकीय शर्यत सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकहाती सत्तेच्या हॅट् ट्रिकसाठी इच्छुक असून, त्यांच्यापुढे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे कडवे आव्हान निर्माण केले आहे.

राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार २१ फेब्रुवारीला मतदान होणार असून, मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी २१ जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. विधानसभेच्या मतदार यादीत नवीन मतदार म्हणून नावाच्या समावेशासाठी २१ ऑक्टोबर २०१६ पर्यंत अर्ज केलेल्या व त्यातील भारत निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या नावांचाच महापालिकेच्या मतदार यादीत समावेश असणार आहे. विधानसभेच्या मूळ मतदार यादीत कोणत्याही दुरुस्त्या होणार नाहीत. प्रभागनिहाय विभाजन करताना झालेल्या चुकाच फक्त दुरुस्त करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

सर्वसामान्य नागरिक, मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार, निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांच्या ट्रू व्होटर अॅप विकसित केले आहे. त्यामुळे मतदारांना यादीतील आपले नाव आणि मतदान केंद्र शोधता येणे शक्य होईल. उमेदवारांनी शपथपत्राद्वारे भरलेली माहितीदेखील या अॅपच्या माध्यमातून पाहता येईल. तसेच उमेदवारांना त्यांचा दैनंदिन खर्चदेखील सादर करणे शक्य होणार आहे. याशिवाय संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे आणि शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.

निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात होताच शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, त्याबाबत सर्वच पक्षांनी अनुकूल भूमिका घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. येत्या काही दिवसांत हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरच याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले असले तरी पक्षश्रेष्ठींशी विचारविनिमय करूनच पावले टाकली जातील, असे स्पष्ट करण्यात आले.


महापालिका निवडणूक कार्यक्रम २०१७

नामनिर्देशनपत्र सादर करणे - २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी

नामनिर्देशनपत्रांची छाननी - ४ फेब्रुवारी

उमेदवारी माघारीची मुदत - ७ फेब्रुवारी

निवडणूक चिन्हवाटप - ८ फेब्रुवारी

मतदान केंद्रनिहाय मतदार यादीची प्रसिद्धी - ८ फेब्रुवारी

मतदान - २१ फेब्रुवारी

मतमोजणी - २३ फेब्रुवारी


तक्रार निवारण कक्षाची स्थापना

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत ई-निविदा कक्ष, मध्यवर्ती भांडार विभागात तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली आहे. त्याचे प्रमुखपदी सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या ठिकाणी निवडणूक विषयी तक्रारीची नोंद घेण्यासाठी २४ तास तक्रार निवारण कक्ष कार्यरत असणार आहे. या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-६७३३१५९० असून, ई-मेल आयडी mccpcmc@pcmcindia.gov.in तर, टोल फ्री-हेल्पलाइन तक्रार निवारण क्रमांक १८००२७०६१११ असा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुण कार्यकर्त्यांवर भिस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय पक्षांतील घडामोडींनी वेग घेतला असून, प्रभाग २५मधील राजकीय धुरा सांभाळण्यासाठी नवी पिढी सरसावली आहे. त्या अनुषंगाने तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी या भागात सक्रिय झाली आहे.

वाकड, पुनावळे आणि पालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ताथवडे गावांचा मिळून नवीन प्रभाग तयार झाला आहे. सध्या येथील प्रतिनिधित्व शेखर ओव्हाळ, यमुना पवार, स्वाती कलाटे, विनायक गायकवाड करीत आहेत. विकासकामांना भरपूर वाव असलेल्या या प्रभागात निवडणूक लढविण्यासाठी युवा पिढीची मोठी गर्दी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला वर्चस्व टिकविण्यासाठी अधिक क्षमतेने प्रयत्न करावे लागणार आहेत. तर, परिसरावर पक्षाचा प्रथमच झेंडा फडकविण्यासाठी भाजप उत्सुक आहे. शिवसेनेच्या दृष्टीने अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. तर, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपुढे सक्षम उमेदवार देण्याचे आव्हान आहे. सर्वच प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीसाठी प्रामुख्याने युवक कार्यकर्तेच उत्सुक आहेत.

तूर्तास राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. ‘राष्ट्रवादी’कडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी नगरसेवक नाना काटे यांची भूमिका महत्त्वाची आहे. भाजपकडून शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडून शहरप्रमुख राहुल कलाटे स्वतःच इच्छुक असल्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. तर, काँग्रेसचे माजी खासदार नाना नवले कोणाची शिफारस करतात, की एखाद्याला पाठिंबा व्यक्त करतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.

हा परिसर नव्याने विकसित होत आहे. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ताथवडे गावचा विकास आराखडा गेल्याच आठवड्यात मंजूर झाला आहे. त्यामुळे विकासकामांना वाव आहे. प्राथमिक सुविधा पुरविण्यावर नव्या लोकप्रतिनिधींना भर द्यावा लागणार आहे. याशिवाय प्रभागात माळी समाजाची संख्या मोठी असल्यामुळे येथे जातीय समीकरणालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण ते शहरी या वाटचालीत प्रभागाच्या नेतृत्त्वाची धुरा सोपविताना मतदारही जागरूक आहेत. प्राथमिक सुविधांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा ते व्यक्त करीत आहेत. वाड्या-वस्त्यांना जोडणारे पक्के रस्ते व्हावेत, सांडपाण्याची सोय व्हावी, पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळावे, क्रीडांगणे आणि उद्यानांची आरक्षणे विकसित व्हावीत याबाबतीत नागरिकांचा आग्रह आहे.


लोकसंख्या आणि आरक्षण

अनुसूचित जाती - १०,९११

अनुसूचित जमाती - १,१०५

एकूण - ५०,६१०

आरक्षण - अ (अनुसूचित जाती महिला), ब (नागरिकांचा मागासवर्ग महिला), क (सर्वसाधारण), ड (सर्वसाधारण).


समाविष्ट भाग

माळवाडी, पुनावळे, पांढरे वस्ती, काटेवस्ती, नवले वस्ती, ताथवडे, अशोकानगर, निंबाळकरनगर, भूमकर वस्ती, वाकड, काळा खडक, मुंजोबानगर, मानेवस्ती, भुजबळ वस्ती, वाकडकर वस्ती, केमसे वस्ती, रोहन तरंग सोसायटी, प्रिस्टाईन सोसायटी, स्वरा प्राइड सोसायटी इत्यादी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातही निवडणुकीचा आखाडा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्ह्यात निवडणुकीचा आखाडा आजपासून सुरू झाला आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू असलेल्या जि. प. निवडणुकीची राज्याच्या निवडणूक आयुक्तांनी बुधवारी घोषणा केली. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेबरोबरच २१ फेब्रुवारीला पुणे जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार असून २३ फेब्रुलारीला मतमोजणी होणार असल्याचे आता स्पष्ट झाले.

राज्य निवडणूक आयुक्तांनी राज्यातील २५ जिल्हा परिषदांची घोषणा केली. या निवडणुका दोन टप्प्यांत होणार असून पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया एक फेब्रुवारीला सुरू होणार आहे. अर्जांची छाननी सात फेब्रुवारीला होईल आणि त्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत १३ फेब्रुवारीपर्यंत आहे. अंतिम उमेदवारयादी १५ फेब्रुवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणुकीच्या घोषणेबरोबर आजपासूनच आचारसंहिताही लागू झाली आहे.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकहाती वर्चस्व आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर शिवसेना हा सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४२ आणि शिवसेनेचे १३ सदस्य आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसचे ११, भारतीय जनता पक्ष व दौंड नागरी हित आघाडीचे प्रत्येकी तीन सदस्य, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक आणि दोन अपक्ष सदस्य आहेत.

नवीन समीकरणांचा प्रभाव काय?

संख्याबळाचा विचार करता जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. तर, नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचा विचार करता, काँग्रेस व भारतीय जनता पक्ष बलाढ्य राहिला आहे. जेजुरी, सासवड आणि इंदापूर नगरपालिकेत काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि आळंदी, लोणावळा व तळेगाव नगरपालिकेत भाजपचा नगराध्यक्ष विराजमान झाला आहे. जुन्नर व बारामती येथे अनुक्रमे शिवसेना व राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष आहे. तर, शिरूर व दौंडमध्ये स्थानिक आघाड्यांनी वर्चस्व मिळविले आहे. त्यामुळे या नवीन समीकरणांचा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय प्रभाव पडणार, याची कसोटी आता सुरू होणार आहे.


जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल : एकूण जागा : ७५

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - ४२

शिवसेना- १३

काँग्रेस - ११

भारतीय जनता पक्ष - ३

दौंड नागरी हित आघाडी - ३

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - १

अपक्ष - २

जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर गटांची परिस्थिती

- पुरंदर तालुक्यातील सर्व गट इतर मागासवर्गीयांसाठी राखीव

- वेल्हे तालुक्यातील सर्व गट सर्वसाधारण

- ७५ गटांपैकी ३८ जागा सर्व प्रवर्गातील महिलासांठी राखीव

- सर्वसाधारण जागेतील ४३ गटांपैकी २१ जागा महिलांसाठी राखीव

- इतर मागासवर्गीय जाती (ओबीसी) प्रभागातील २० पैकी १० जागा महिलांसाठी राखीव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एप्रिलअखेर संपवा आरटीई प्र​वेशप्रक्रिया

$
0
0

राज्य सरकारचे शिक्षण संचालकांना आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांतील प्रवेशप्रक्रिया जानेवारीत सुरू करून एप्रिलअखेर संपविण्याचे आदेश राज्य सरकारने प्राथमिक शिक्षण संचालक आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या शाळांची यादी तयार करण्याविषयी बजावण्यात आले आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेद्वारे समाजातील आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना शाळेच्या ‘एंट्री पॉइंट’मध्ये २५ टक्के राखीव प्रवेश कोट्यातून प्रवेश देण्यात येतो. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्याबाबत मंगळवारी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांबाबत निर्णय घेतला. या निर्णयानुसार आरटीई प्रवेश प्रक्रिया जानेवारीत सुरू करून एप्रिलअखेरीस संपवायची आहे. त्यासाठी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. तसेच, गरजेप्रमाणे कालावधीत बदल करण्याचे अधिकार संचालकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आरटीई नियम लागू होणाऱ्या शाळांची यादी तातडीने तयार करणे गरजेचे आहे. तसेच, प्रवेश प्रकियेची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी प्रसिद्धी पत्रके आणि प्रसार माध्यमांचा उपयोग करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याच्या दृष्टीने शाळांना नोंदणीसाठी पंधरा दिवसांचा कालावधी देण्याचीही सूचना करण्यात आली आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये शाळांची नोंदणी करण्यासाठी शाळा प्रमुख आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण मदत केंद्रांद्वारे घेण्यात यावे, केंद्रांची यादी शिक्षण संचालकांनी त्वरित जाहीर करून स्थापना शिक्षणाधिकाऱ्यांनी करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रियेतून शाळेत निवड झालेल्या आणि निवड न झालेल्या मुलांची नावे पालकांना विहित मुदतीत द्यावी लागणार आहेत.

नोंदणी न करणाऱ्यांवर कारवाई
आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेल्या शाळांची पडताळणी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी करायची आहे. ज्या शाळा आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव कोट्यामध्ये प्रवेशासाठी पात्र असूनही नोंदणी करीत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या शिवाय एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा उपलब्ध न करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संगीतातील दिग्गजांना अनुभवण्याची संधी

$
0
0

‘मटा’च्या वर्धापनदिनानिमित्त ‘स्वरझंकार’चे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महाराष्ट्र टाइम्स’ कल्चर क्लब आणि व्हायोलिन अकादमीच्या वतीने यंदा १३ ते १५ जानेवारी दरम्यान ‘स्वरझंकार’ महोत्सवाचे आयोजत करण्यात आले आहे. रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या महोत्सवात कौशिकी चक्रवर्ती, उस्ताद रशीद खॉँ, राहुल शर्मा यांच्यासह अनेक नामवंत आपली कला सादर करणार आहेत.
महोत्सवाचे यंदाचे आठवे वर्ष आहे. गेली सहा वर्षे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वर्धापनदिनानिमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान आयोजित करण्यात येतो. यंदाचा महोत्सव उस्ताद बिस्मिल्ला खॉँ यांना अर्पण करण्यात येणार आहे. महोत्सवाचा प्रारंभ शुक्रवारी (१३ जानेवारी) पतियाळा घराण्याच्या लोकप्रिय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या मैफलीने होणार आहे. त्यांना तबल्यावर ओजस आढिया, हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी साथ करणार आहेत. त्याच दिवशी फरुखाबाद घराण्याचे ज्येष्ठ तबलावादक पंडित अनिंदो चटर्जी आणि बनारस घराण्याचे लोकप्रिय तबलावादक पंडितकुमार बोस यांच्यात जुगलबंदी रंगणार आहे. त्यांना दिलशाद खान सारंगीवर साथ करणार आहेत.
शनिवारी (१४ जानेवारी) मंजूषा पाटील यांचे गायन होणार आहे. त्यांना सुलोचना कुलकर्णी स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. व्हायोलिन अकादमीच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या विविध संगीत उपक्रमांना पंडित भीमसेन जोशी यांच्या हस्ते १९९२मध्ये प्रारंभ झाला होता. त्याला यंदा पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त पंडितजींचे सुपुत्र श्रीनिवास जोशी आणि नातू विराज जोशी यांचे सहगायन होणार आहे. दिवसाची सांगता पंडित अतुलकुमार उपाध्ये (व्हायोलिन) आणि दिल्ली घराण्याचे ज्येष्ठ सनईवादक पं. दयाशंकर यांच्यातील जुगलबंदीने होणार आहे. त्यांना रामदास पळसुले तबल्यावर साथ करतील.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात जागतिक कीर्तीचे संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र राहुल शर्मांच्या संतूरवादनाने होणार असून, त्यांना मुकेश जाधव तबल्यावर साथ देतील. त्यानंतर रामपूर घराण्याचे लोकप्रिय गायक उस्तादर राशिद खाँ यांच्या गायनाने समारोहाची सांगता होईल. त्यांना तबलासाथ पं. विजय घाटे करणार असून, सारंगीवर मुराद अली संगत करतील. सर्व कार्यक्रम रमणबागेच्या मैदानावर सायंकाळी ६ ते १० या वेळेत होणार आहेत. कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर, नावडीकर म्युझिकल्स (कोथरूड), शिरीष ट्रेडर्स (कमला नेहरू पार्क), खाऊवाले पाटणकर (बाजीराव रस्ता) येथे उपलब्ध आहेत.

कल्चर क्लब सभासदांना सवलत
मटा कल्चर क्लबच्या सभासदांना स्वरझंकार महोत्सवाची तिकिटे सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत. शिवाय सभासदांनी भारतीय बैठकीचे एक तिकीट विकत घेतल्यास त्यांना एक तिकीट मोफत मिळणार आहे. तसेच, खुर्चीच्या तिकिटांवर ४० टक्के सवलत मिळणार आहे. कल्चर क्लबच्या सभासदांची तिकिटे महाराष्ट्र टाइम्सच्या नामदार गोखले रोडवरील कार्यालयात सकाळी ११ ते ७ या वेळेत उपलब्ध होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केटरिंग इन्स्टिट्यूटची जागा अखेर सरकारजमा

$
0
0

कित्येक वर्षे विनावापर ठेवल्यामुळे कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरकारी जमीन मिळाल्यानंतर तिचा दिलेल्या कारणासाठी वापर न करता पडीक ठेवल्यास संबंधित जमिनी जिल्हा प्रशासन ताब्यात घेणार आहे. या नियमानुसार ‘महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी’ला दिलेली बालेवाडीतील जमीन ताब्यात घेऊन पुन्हा सात-बाराच्या उताऱ्यावर राज्य सरकारची नोंद करण्यात आली आहे.
या संस्थेला बालेवाडी येथील सर्व्हे क्रमांक ४/१/१ मधील सहा हेक्टर जमीन २१ जुलै १९९४ला देण्यात आली होती. मात्र, दिलेल्या कारणासाठी जमिनीचा वापर होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून संस्थेला नोटीस बजावण्यात आली. या नोटिशीचा संस्थेकडून खुलासा करण्यात आला नाही. जागा देताना लावण्यात आलेल्या अटी आणि शर्तीचा संस्थेने भंग केल्याचे स्पष्ट झाले; तसेच जमीन वाटपाच्या आदेशातील उद्देश सफल न झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही जमीन पुन्हा सरकारजमा करण्याचा आदेश २८ डिसेंबर २०१६ला जारी करण्यात आला. त्यानुसार ६ जानेवारीला अभिलेख दुरुस्त करण्यात आला असून, जमिनीच्या सातबारावर ‘महाराष्ट्र शासन (महसूल विभाग)’ अशी नोंद करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, सरकारी जमीन संस्थेला दिल्यानंतर तिचा वापर नमूद कारणांसाठीच होत आहे की नाही, याचा तपास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पथक तयार केले आहे. या पथकाकडून संबंधित जमिनींच्या वापराचा शोध घेण्यात येतो. योग्य कारणासाठी वापर न केल्यास किंवा जमीन पडीक ठेवल्यास शर्तभंग होतो. त्यामुळे अशा जमिनी पुन्हा सरकारजमा करण्यासाठी माहिती गोळा करण्यात येत आहे. सरकारी जमिनींवर संबंधित संस्थांनी फलक लावण्याची सक्ती आहे. या फलकावर जमिनीचा सर्व्हे क्रमांक, आकार, कराराची मुदत, नूतनीकरणाची तारीख, कोणत्या उपक्रमासाठी जमीन देण्यात आली आहे आदी माहिती देणे गरजेचे आहे. मात्र, अनेक संस्था फलक लावत नसल्याचे आढळून आले. त्या संस्थांनाही नोटिसा बजावल्या आहेत.

सरकारी जमिनी दिल्यावर संबंधित संस्थांनी जागेचा वापर केला नाही किंवा दिलेल्या कारणासाठी वापर केला नाही, तर त्या जमिनी पुन्हा सरकार जमा करण्यात येणार आहेत. त्या जमिनींच्या सात-बारा उताऱ्यावर राज्य सरकारची नोंद केली जाणार आहे.
- राजेंद्र मुठे
निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरातन सभामंडप होणार इतिहासजमा

$
0
0

मुरलीधर मंदिरासाठी पालिकेने फिरवला आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सुमारे दोनशे ते अडीचशे वर्षांची परंपरा असणारे आणि मध्यवर्ती पुण्यातील पेशवेकालीन देवालय म्हणून परिचित असणाऱ्या श्री माहेश्वरी मुरलीधर देवालयाचा पुरातन सभामंडप पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बांधकामाला परवानगी देऊन पालिकेच्या हेरिटेज सेलने स्वतःचाच निर्णय फिरवला आहे. ११ ऑगस्ट २०१४ला मंदिराला कोणताही धक्का न लावण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, हा निर्णय मागे घेऊन मंदिराच्या आवारात बांधकामाची परवानगी दिल्याने वारसाप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मंदिराचा सभामंडप पाडून तेथे चार मजली इमारत बांधण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा आहे. ‘६, गुरुवार पेठ’ येथे मुरलीधराचे प्रशस्त मंदिर आहे. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी सरदार घोरपडे यांनी हे मंदिर बांधल्याचा इतिहास अभ्यासकांचा अंदाज आहे. मंदिराचा सभामंडप, गाभारा आणि आवाराची रचना तुळशीबागेतील श्रीराम मंदिराप्रमाणे तसेच बेलबागेतील पेशवेकालीन विष्णू मंदिरासारखी असून गाभाऱ्यात पुरातन चित्राकृतीही होत्या. या चित्राकृती ट्रस्टने ऑइलपेंट देऊन नष्ट केल्याने पुरातन ठेव्याचे अतोनात नुकसान झाले. मंदिरातील श्रीकृष्णाची मूर्ती काळ्या पाषाणातील आहे. गोकुळाष्टमीला सूर्यकिरणे थेट कृष्णमूर्तीवर पडतात, हे मंदिराच्या स्थापत्यकलेचे वैशिष्ट्य आहे.
शहरातील पुरातन वारसा नष्ट होत असल्याने मंदिराचा सभामंडप पाडण्याचा कट समोर येताच नागरिकांनी महापालिकेकडे धाव घेतली. पालिकेच्या हेरिटेज विभागाने तेव्हा मंदिराच्या ट्रस्टला कोणतेही पाडकाम न करण्याविषयी स्पष्ट बजावले होते. मात्र, पालिका आयुक्तांसोबत ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय कसा काय बदलला गेला, असा प्रश्न गुरुवार पेठेतील नागरिकांनी उपस्थित केला. त्यासाठी मुरलीधर मंदिर बचाओ कृती समितीने पुढाकार घेतला आहे. महापालिकेने स्वतःचाच आदेश बदलल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ट्रस्टशी हातमिळवणी करून नव्याने मंदिर पाडण्याचा कट रचल्याचा आरोपही समितीने केला आहे. मंदिराच्या रचनेत कोणताही हस्तक्षेप होऊ नये, यासाठी वास्तूची पुरातन वारसा म्हणून नोंद का केली नाही तसेच, मंदिराच्या आवारातील अनाधिकृत बांधकामावर कारवाई का नाही केली, याचा जाब महापालिकेच्या हेरिटेज सेलने द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

बांधकामाला परवानगी नाहीच : आयुक्त
ट्रस्टने मंदिराच्या आवारात इमारत बांधण्याचा प्लॅन पास करून घेतला होता. मंदिर पुरातन असल्याने तिथे बांधकामासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी स्थानिकांनी केली होती. त्यानुसार मंदिर पाडले जाऊ नये, असा आदेश देऊन काम थांबविण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. या सगळ्या प्रकाराची चौकशी नागरिकांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली असता, मंदिराच्या आवारात कोणत्याही बांधकामाला परवानगी दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुरलीधर मंदिराला वेगळा न्याय का?
महानगरपालिकेतर्फे सोमवार पेठेतील पुरातन अशा नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच त्याचे लोकार्पण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शहराचे वैभव असणाऱ्या मुरलीधर मंदिराकडे दुर्लक्ष करून त्याचा सभामंडप पाडण्याचा आदेश देऊन या मंदिराला वेगळा न्याय कोणाच्या हितासाठी लावला आहे, असा प्रश्नही समितीने उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवसायाचे आमिष दाखवून फसवणूक

$
0
0

सायबर सेलकडून चौघांना अटक; दोघे फरारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

क्युनेट या वेबसाइटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवून देण्याच्या आमिषाने पुण्यातील दहा जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर सेलने चौघांना अटक केली आहे. या आरोपींनी देशातील दोनशेहून अधिक जणांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.
टिनू रोशनलाल वाधवानी (वय २४, रा. लखनौ, उत्तर प्रदेश), सिद्धार्थ अरुण हरले (वय ३०, रा. जुनी सांगवी), विजय काशिनाथ भोई (वय २७, रा. मळकर रोड, आळंदी), राहुल प्रवीण पात्रा (वय २५, औरा अपार्टमेंट, बालेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. मयुरी खानवाले, स्वप्नील जाधव आणि विनोद पचराला हे आरोपी अद्याप फरारी आहेत. महेश उत्तम माने (वय २८, रा. नवी सांगवी) यांनी तक्रार दिली आहे.
या फसवणूक प्रकरणात मयुरी आणि टिनू हे दोघे मुख्य आरोपी आहेत. व्यवसाय करण्यासाठी सर्वसामान्यांना उद्युक्त करून त्यांना ठरावीक रक्कम भरण्यासाठी ते भाग पाडत होते. त्यानंतर आणखी व्यक्तींना या व्यवसायासाठी भाग पाडल्यानंतर त्यांच्याकडून भरण्यात येणाऱ्या रकमेवर कमिशन देण्याचे आमिष दाखविण्यात येत असे. आरोपींच्या जाळ्यात फसून कमिशनच्या हव्यासाने शंभरपेक्षा अधिक जणांनी टिनूकडे रक्कम सोपविल्याचे समोर आले आहे. अशी माहिती सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने आणि हरले मित्र आहेत. हरलेने माने यांना फोन करून व्यवसायासाठी दोन ते तीन लोकांची गरज असल्याचे सांगितले. आपण मोठा व्यवसाय करीत असून, त्यामध्ये पाच वर्षांत चार कोटी रुपये कमिशनचे मिळाल्याचे थाप त्याने मारली. त्यानंतर हरलेने माने यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन अन्य आरोपींची ओळख करून दिली. व्यवसायासाठी चार लाख रुपये भरावे लागतील. त्यानंतर पुढील चार वर्षांत पाच कोटी रुपये कमविता येतील, असेही हरले यांना सांगण्यात आले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने माने यांनी कर्ज काढून चार लाख रुपये भरल्यानंतर त्यांना ‘क्युनेट’ची कल्पना देण्यात आली.

पुण्यात चाळीस लाखांचा गंडा
त्यानंतर माने यांना अन्य सभासदांना या व्यवसायात सहभागी करण्याविषयी बजावले. नव्या सभासदांनी पैसे भरल्यानंतर ठरावीक रक्कम कमिशनच्या नावाखाली अन्य आरोपींच्या खात्यात भरण्यात आली. त्यानंतर माने यांना आरोपींनी परिषदेच्या नावाखाली युरोपची सैर करविली. त्याचा खर्च आगाऊ भरलेल्या रकमेतून केल्याचे भासविण्यात आले. त्यानंतर माने यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वाधवानींकडे पैसे परत मागितले. पैसे परत करता येत नसल्याचे उत्तर मिळाल्यावर अखेर माने यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या आरोपींनी पुण्यात दहा जणांची चाळीस लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगर परिषद उमेदवारांनाहिशेब देण्याचा आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी अर्ज भरलेल्या आणि निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना १३ जानेवारीपर्यंत खर्चाचा हिशेब सादर करावा लागणार आहे. खर्चाचा हिशेब न दिल्यास सबंधित उमेदवारांवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करण्याचा इशारा जिल्हा निवडणूक समन्वय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात बारामती, इंदापूर, जेजुरी, सासवड, आळंदी, लोणावळा, शिरूर, दौंड, जुन्नर आणि तळेगाव दाभाडे या दहा नगर परिषदांच्या निवडणुकांची मतमोजणी १५ डिसेंबर २०१६ रोजी झाली. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निकालानंतर ३० दिवसांच्या आत खर्चाचा हिशेब शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विहित नमुन्यात आणि शपथपत्रासह निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. संबंधित उमेदवारांनी खर्चाचा हिशेब सादर न केल्यास त्यांना तीन वर्षांसाठी अपात्र करण्याची कारवाई होऊ शकते.
नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या आणि निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी खर्चाचा हिशेब लेखी स्वरुपात आणि TRUE VOTER MOBILE APP द्वारे ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने १३ जानेवारीपर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक समन्वय अधिकाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images