Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

माझ्या एका मताने काय फरक पडतो?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मतदारयादीत माझे नाव नाही’, ‘माझ्या एका मताने काय फरक पडतो?’, ‘आतापर्यंत केलेल्या मतदानाने काही बदल झाला आहे का?’... महापालिकेच्या निवडणुकीत मतदान न करण्यासाठी पुणेकरांनी दिलेली ही कारणे. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेने याबाबत केलेल्या पाहणीतून ती समोर आली आहेत. पालिकेच्या निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेचे, भ्रष्टाचारमुक्त आणि ‘अॅक्सेसिबल’ लोकप्रतिनिधी हवेत, अशा अशा अपेक्षाही मतदारांनी नोंदविल्या आहेत.

‘लोक मतदान का करीत नाहीत,’ या विषयावर पाहणी करण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाने गोखले संस्थेवर सोपविली आहे. त्यानुसार संस्थेने, पुण्यातील एनआयबीएम, विमाननगर, बालेवाडी आणि कोथरूड हे कमी मतदान होणारे, तर हडपसर आणि अलका टॉकीज हे अधिक मतदान होणारे वॉर्ड पाहणीसाठी निवडले होते. त्यात प्रत्येकी तीनशे अशा एकूण अठराशे विविध वयोगटांतील नागरिकांशी संवाद साधण्यात आला. अशीच पाहणी मुंबईतही करण्यात येणार असून, एकत्रित अहवाल आयोगाला देणार असल्याचे संस्थेचे प्रभारी संचालक प्रा. राजस परचुरे यांनी शनिवारी सांगितले. प्रा. मानसी फडके, प्रा. अंजली शितोळे, ‘यशदा’चे प्रा. ज्ञानदेव तळुपे आदी या वेळी उपस्थित होते.

‘मतदारयादीतच माझे नाव नाही, माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे आदी कारणांबरोबरच माझे नाव मतदान यादीत दिसत नाही, मतदानाच्या दिवशी नेमका मी बाहेर होतो, अशी कारणेही मतदान न करणाऱ्यांनी दिली आहे. येत्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेच्या आणि भ्रष्टाचारमुक्त उमेदवारांना मतदान करणार असल्याचे सांगितले. तसेच, परिसरातील विकासकामे करण्याच्यादृष्टीने आम्ही ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकू, अशा लोकप्रतिनिधीची आवश्यकता आहे, अशा सूचना नागरिकांनी सर्व्हेक्षणात दिल्या आहेत,’ असे प्रा. फडके यांनी सांगितले.

मतदान करणे हे माझे कर्तव्य आहे आणि उमेदवार चांगला असल्याने त्याला विजयी करण्यासाठी मतदान करत असल्याचेही काहींनी पाहणीत आवर्जून सांगितल्याचे नमूद करण्यात आले. या पाहणीसाठी ‘सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अॅन्ड कॉमर्स’ आणि ‘सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ची मदत घेण्यात आली.

चौकट

निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मतदानाची वेळ वाढविण्याची आणि मतदानाच्या दिवसापूर्वी नागरिकांना प्रेरित करण्यासाठी ‘एसएमएस’चा प्रभावी वापर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाला केल्या आहेत. तसेच, उमेदवारांकडूनदेखील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले जाते, त्यामुळे त्यांचादेखील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उपयोग करण्यात यावा, अशा काही सूचना केल्याचे प्रा. परचुरे यांनी सांगितले.


मतदान न करण्याची कारणे - नागरिकांची टक्केवारी

मतदान यादीत नाव नाही - ३०

माझ्या मताने काय फरक पडला -२३

शहरात काय बदल झाला - २२

एका मताने काय फरक पडतो - २०

मतदार यादीत नाव नव्हते - २०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमंदिरा...

$
0
0

अनिकेत कोनकर

काही महिन्यांपूर्वी असहिष्णुता (इन्टॉलरन्स) हा देशातील सर्वांत वापरला जाणारा शब्द बनला होता. त्याचा वापर खास करून केंद्र सरकारच्या विरोधात केला जात होता; मात्र सध्याच्या वातावरणाचा विचार केला, तर समाजात असहिष्णुता, असहनशीलता आणि असंवेदनशीलता वाढत चालल्याचे चित्र अनेकदा दिसते. लोकसंख्येच्या तुलनेत अशा व्यक्तींची संख्या फार कमी असली, तरी त्यांचे प्रमाण वाढू लागले आहे, असे मात्र विचार केला तर नक्की लक्षात येते.

जुन्या नाटकाचा वेगळाच अर्थ काढून भाषाप्रभू नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्याचे कृत्य नुकतेच पुण्यात झाले. पंचांगातील काही दिवस अशुभ दर्शवल्यामुळे जातीय तेढ पसरवणारे मेसेज सोशल मीडियातून पसरवण्याचे, पंचांगाची होळी करण्याचे प्रकारही घडले. खून, मारामाऱ्या, बलात्कार, अपहरण या गुन्ह्यांना तर धरबंधच नाही. कोणताही असा दिवस नसेल, की ज्या दिवशी एखाद्या शहरात यांपैकी एकही गुन्हा घडला नसेल/नोंदवला गेला नसेल. अगदी छोट्या-छोट्या कारणांतून माणसांची डोकी फिरतात आणि ती वाट्टेल ते करून बसतात, हे रोजच्या बातम्या वाचल्या, की सहज कळतं. पोलिस यंत्रणा त्यांचे काम करतेच आहे; पण मुळात माणसाची वृत्तीच निबर होत चालली असेल, तर पोलिस कुठपर्यंत पुरे पडणार, हाही प्रश्नच आहे. वृत्तीत अशा प्रकारे बदल होण्यासाठी अर्थातच समाजशास्त्रीय आणि आर्थिक कारणेही आहेत; पण तरीही अशा वृत्तीचे समर्थन करता येत नाही.

आंदोलनं, मोर्चे अशा प्रकारांना लोकशाहीत पूर्ण मुभा आहे आणि ती असलीच पाहिजे. सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरोधात आवाज उठवलाच पाहिजे, समाजहिताच्या विरोधातील गोष्टींशी दोन हात करायलाच हवेत. सुनियोजित मोर्चांच्या बाबतीत अलीकडच्या मराठा मोर्चांनी नक्कीच चांगला आदर्श घालून दिला आहे; पण बारीक-सारीक गोष्टींना नको ते रंग देऊन, त्यातून नको ते अर्थ काढून स्वतःच्या आणि समाजाच्या भावना दुखावून घेऊन रस्त्यावर उतरणे ही नक्कीच लोकशाही नव्हे. त्याला झुंडशाही म्हणता येईल. अगदी छोट्या-छोट्या कारणांवरून दुखावल्या जाण्याएवढ्या किंवा तडा जाण्याएवढ्या या भावना किंवा अस्मिता तकलादू कशा, या गोष्टीचं नेहमीच आश्चर्य वाटतं. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट दिसली...दुखावल्या भावना...एखाद्या वृत्तपत्रात कोणाचं वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध झालं...केली जाळपोळ...आक्षेपार्ह पोस्ट किंवा वादग्रस्त वक्तव्यांचं समर्थन होऊच शकत नाही; अशांना कायद्यानुसार योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी; पण या भावना दुखावल्याच्या प्रकरणामुळे ती पोस्ट किंवा वक्तव्य करणारा राहतो बाजूलाच आणि तिसऱ्याच कुठल्या तरी ठिकाणच्या वेगळ्याच कोणत्या तरी नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. परत ही भावना दुखावल्याची भावना फार लवकर पसरते. अलीकडे तर सोशल मीडियामुळे कमी वेळात या भावनेचा ‘फोर जी’ वेगाने प्रसार होतो आणि मग सारासार विचार न करता थेट तोडफोडीचा मार्ग अवलंबला जातो. अशा घटनांचा राजकीय फायदा उचलण्यासाठी पक्ष तयारच असतात आणि तसा तो पुरेपूर घेतला जातो...काही वेळा तो लक्षात येतो आणि काही वेळा समजत नाही.

बरे, एवढ्या लगेच भावना दुखावल्या जातात, म्हणजे समाज किती संवेदनशील आहे असे म्हणावे, तर मग भर रस्त्यावर महिलांची किंवा तरुणींची छेड काढली जाते, तेव्हा ही संवेदना कुठे जाते? बेंगळुरूत तर नव्या वर्षाच्या स्वागतालाच विनयभंगाच्या अनेक घटना घडल्या. त्या वेळी शेकडो नागरिक आणि पोलिसही तैनात होते. तरीही या घटना घडू शकतात. याचाच अर्थ विकृत वृत्तीच्या माणसांशी दोन हात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची मानसिकता पुरेशी अंगवळणी पडलेली नाही. त्या वेळी सर्वांना कायद्याची भीती वाटते.

अलीकडे शहरांत दिसणारा आणखी एक ट्रेंड म्हणजे कोणतेही कारण साधून रस्त्यावर मोठी गर्दी करायची. त्याबद्दल आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येक नागरिकाला त्याचे स्वातंत्र्य आहेच; पण कोणत्याही विधायक उद्दिष्टाविना रस्त्यावर गर्दी झाली, तर त्यातूनच हुल्लडबाजीचा जन्म होतो, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. (गर्दीला अक्कल नसते, असे कदाचित त्यामुळेच म्हटले जात असावे.) उदाहरणार्थ, नव्या वर्षाच्या स्वागताला मध्यरात्री रस्त्यावर येण्याचे प्रमाण गेल्या चार-पाच वर्षांत लक्षणीयरीत्या वाढल्याचे निरीक्षण अनेकांनी नोंदवले असेल. यात बहुतांश भरणा असतो तो तरुणाईचा आणि त्यात राडेबाजीचा पिंड असलेल्यांची संख्या बरीच असते. एरवी जे सहज करता येत नाही, त्या प्रकारांना इथे बळ मिळते. जल्लोषाच्या नावाखाली आरडाओरडा, धक्काबुक्की, वाहतुकीला अडथळा निर्माण करणे आणि बेंगळुरूतल्या विनयभंगासारखे प्रकार त्यातूनच घडतात. वाढदिवस साजरा करण्यासाठी मध्यरात्री रस्त्यावर गटाने जमून, कार पार्क करून, तिच्यात मोठ्याने गाणी लावून, तिच्या बॉनेटवर केक कापून, तो एकमेकांवर फेकून, एकमेकांच्या अंगाला फासून,आरडाओरडा करण्याची फॅशनही अलीकडे बोकाळू लागली आहे. (तसे केल्याबद्दल हटकणाऱ्या एका पोलिसालाच केक फेकून मारल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.) कदाचित, स्वैराचार ही तरुणाईची स्वातंत्र्याची नवी व्याख्या असावी!

आजचा जमाना वेगाचा आहे. आम्हाला फोर जी इंटरनेट हवे; एक्स्प्रेस हायवे हवा; मेट्रो हवी; बुलेट ट्रेन हवी; बरोबरच आहे, हे सारे गरजेचेच आहे; पण या वेगाच्या धावपळीत सामान्य माणूस आपल्या दैनंदिन जीवनातील शांतपणाही हरवून बसला आहे. तसे होता कामा नये. सहनशीलता संपून अवाजवी आक्रमकपणा येण्याचं मूळ या वेगात असावं असं वाटतं आणि ते रोजच्या जीवनातल्या अगदी साध्या-साध्या गोष्टींतूनही दिसतं. बस आणि रेल्वेमध्ये चढताना अगदी पहिल्याच स्टेशनवरही आणि रिझर्व्हेशन असलेल्या डब्याबाहेरही प्रवाशांची झुंबड उडते. आम्ही गाडीवरून चाललो असलो, तर सिग्नल पूर्ण हिरवा होईपर्यंतही आम्हाला थारा नसतो. सर्वांत पुढे असलेला गाडीवाला सिग्नल हिरवा होण्याच्या आधी पुढे निघाला नाही, तर मागच्या वाहनांच्या हॉर्नच्या आवाजांवरूनच त्यांच्या चालकांच्या रागाची पातळी सहज कळून मनात धडकी भरते. त्यात समजा सिग्नल सुटता सुटता पुढे उभ्या असलेल्या चालकाकडून चुकून गाडी बंद पडली, तर पाहायलाच नको.

सारांश, ‘मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिवीमोलाची’ हे तत्त्व हळूहळू मागे पडू लागले आहे की काय, असे वाटण्यासारखी स्थिती अनेकदा अनुभवायला मिळते आहे; पण मने आणि खास करून तरुणांची मने निगरगट्ट बनणे आपल्या समाजाला, देशाला परवडणारे नाही. अर्थात, मने घडवणाऱ्या तरुणाईचे/समाजाचे प्रमाण अजून तरी या सगळ्यापेक्षा जास्त आहे, ही समाधानाची गोष्ट. तेच समाधान येत्या काळात वाढीला लागो, अशी अपेक्षा.

‘मनमंदिरा तेजाने उजळून घेई साधका, संवेदना, संवादे, सहवेदना जपताना....’ या ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटातील गाण्याच्या ओळींमधील संदेश त्या दृष्टीने समर्पक आहे. कारण मन शुद्ध आणि शांत असले, तरच संवेदना, सहवेदना जपली जाईल आणि विसंवादाची जागा संवाद घेईल. त्याचीच सध्या गरज आहे.

Aniket.Konkar@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमाची बदलती गोष्ट!

$
0
0

सिद्धार्थ केळकर

श्रीमंत नायिकेच्या प्रेमात पडलेला गरीब नायक आणि मग मोठ्या संघर्षानंतर दोघांचं सफल होणारं प्रेम या फॉर्म्युलानं हिंदी चित्रपटसृष्टीचा कॅनव्हास जवळपास पाच दशकं व्यापला. आपणही प्रेक्षक म्हणून हे स्वीकारत राहिलो; कारण आपल्या आजूबाजूलाही यापेक्षा फारशी वेगळी परिस्थिती नव्हती. रूढार्थानं ‘सेटल’ न झालेल्या मुलाशी लग्न करण्यास मुलीचे आई-बाप अगदी गेल्या पंधरा-वीस वर्षांपर्यंत तयार होत नव्हते. आता बहुतांश वेळा मुलं थेट आपला जोडीदारच घेऊन घरी येत असल्यानं आई-वडिलांचा होकार वगैरे प्रश्नच संपला आहे. अर्थात, हे लागू आहे, प्रेमात पडलेल्या आणि नंतर लग्न करू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी; पण प्रेमाचं रूपांतर केवळ लग्नातच झालं पाहिजे, असं न मानणारा वर्गही अलीकडच्या काळात आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ वगैरे तांत्रिक नावं आपण त्याला देतोही; पण ते तेवढ्यापुरतंही मर्यादित नाही. त्याला त्या पलीकडेही आयाम आहेत आणि ते आता आताच समोर यायला लागले असल्यानं त्यांची चर्चाही आपण अडखळतच करतो आहोत.

प्रेम ही भावना कालातीत आहे, हे खरंच; पण त्याचा आविष्कार वेगवेगळा असू शकतो आणि या आविष्कारावर अपरिहार्यपणे काळाच्या खुणा असतात. व्यावसायिक हिंदी चित्रपट हे या खुणांचं एक प्रतिबिंब आहे, असं म्हणायला हरकत नाही. हा आरसा प्रत्येक वेळेस खरी रूपंच दाखवतो, असं नाही आणि तो दाखवणारही नाही; कारण मुदलात तो स्वप्नं विकण्याचा व्यवसाय आहे; पण असं असलं, तरी चित्रपटातल्या व्यक्तिरेखा या मानवी स्वभावांचाच कोलाज असल्यानं त्यांना पूर्णपणे नाकारण्याचंही कारण नाही. मध्यमवर्गीय प्रेमजाणिवांना गेली किमान सात दशकं प्रामुख्यानं हिंदी चित्रपटांतील प्रेमगीतांनी अभिव्यक्ती दिली आहे, हे विसरून कसं चालेल? गेल्या सात दशकांत हिंदी चित्रपटगीतांतून व्यक्त झालेले प्रेमाचे रंग याचं अगदी प्रातिनिधिक रूप म्हणता येईल. आणि मघाशी म्हटलं, तसं हे रूप पूर्णपणे प्रातिनिधिक नसलं, तरी ढोबळ मानानं जवळ जाणारं असतं, हेही खरंच. ही सगळी चर्चा करण्याचं कारण म्हणजे गेल्या महिनाभरात चर्चा झालेले प्रेम या विषयावरील ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘डिअर जिंदगी’ आणि ‘बेफिक्रे’ हे तीन हिंदी चित्रपट.

‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट करण जोहरच्या एकूणच ‘इमेज’शी किंवा या आधी त्यानंच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपेक्षा पूर्ण वेगळा आहे. हा चित्रपट म्हणजे त्याचा दिग्दर्शक म्हणून ‘रिसर्जन्स’ आहे, असं वाटावं, इतका त्याच्या ‘चित्रपट प्रकृती’पेक्षा वेगळा ठरतो. एरवी प्रेमाच्या साफल्यातच सुफळ संपूर्ण होणारी कहाणी दाखवणारा करण जोहर ‘ऐ दिल...’मध्ये प्रेमाचं एक वेगळं रूप मांडतो. चित्रपटाचा नायक आणि नायिका यांच्या नात्याचा प्रवास ओळख, मैत्री आणि प्रेम असा एकरेषीय नाही, हीच मुळात यात अनोखी गोष्ट ठरावी. नायक खराखुरा प्रेमात पडलाय; पण नायिकेसाठी नायक अखेरपर्यंत खूप चांगला मित्रच राहतो. करण जोहरच्याच ‘कुछ कुछ होता है’मध्ये नायिका प्रेमात आहे आणि नायक केवळ मैत्रीत; पण अखेर कथेची वळणं नायक-नायिकेला चांगल्या मैत्रीचं प्रेमात आणि नंतर पर्यायानं लग्नात रूपांतरित होण्याचा प्रवास घडवतात. आता खरं तर ‘कुछ कुछ होता है’ हा सिनेमा फार जुना नाही. तसा तो जागतिकीकरणोत्तर काळातलाच आहे; पण सधारण दोन दशकांपूर्वी असलेली प्रेमाच्या नात्यामधली गुंतागुंत आतापेक्षा खूप वेगळी आहे. ‘ऐ दिल...’मधलं अनुष्का शर्माचं पात्रं अगदी पहिल्यापासूनच तिच्या आणि रणबीर कपूरच्या पात्रामध्ये असलेल्या नात्याबाबत स्पष्ट आहे. रणबीरचं पात्रं तिच्या प्रेमात असल्याची कबुली देत असतानासुद्धा ती हेच म्हणते, की तू मला आवडतोस; पण तुला अपेक्षित आहे, त्या पद्धतीनं नाही. ती म्हणते, ‘तू तो मेरा जिगरा है।’ मैत्री आणि प्रेम यातली सीमारेषा पक्की माहीत असलेलं आणि त्याबाबत पूर्ण स्पष्टता असलेलं हे पात्र आहे. तिची ही भूमिका शेवटपर्यंत बदलत नाही, अगदी स्वतःच्या मनाप्रमाणे केलेल्या लग्नाच्या नात्यात अपयश येऊनसुद्धा. स्वतःचं मन मोकळं करण्याइतकंच नाही, तर अगदी एकत्र राहण्याचं स्वातंत्र्य उपभोगूनसुद्धा नायिकेची मैत्री प्रेमात रूपांतरित होत नाही आणि नायक प्रेमाचा भुकेला असला, तरी नायिकेच्या भावनेची अखेर कदर करतो. सुखान्त शेवट पाहण्याची मानसिकता असलेल्या सर्वसामान्य भारतीय प्रेक्षकांना हुल देत या सिनेमाची कथा नायिकेला तिच्या मतावर ठाम राहायला भाग पाडते आणि तेही करण जोहरचा सिनेमा असून. ‘कुछ कुछ होता है राहुल, तुम नहीं समझोगे’ अशा वाक्यांची गरज न पडता, आपल्या सर्व भावना स्पष्टपणे मांडणारी ही पात्रं आहेत, हा बदल आपण लक्षात घ्यायला हवा. एकविसाव्या शतकात परस्परस्नेहाचं असंही एक मोकळं ढाकळं नातं असू शकतं, याचं या निमित्तानं एक प्रतिबिंब दाखविण्याचा प्रयत्न हा सिनेमा करतो.

‘बेफिक्रे’ची कथा आणखीनच वेगळी. नायक-नायिकेचं ‘बेफिकिर’ सहअस्तित्व ‘लिव्ह इन’चा पर्याय आजमावून पाहून मग वेगळं होतं आणि नंतर तरल प्रेमाच्या जाणिवेनं कातरही. लक्षात घ्यायला हवं, की ‘वन नाइट स्टँड’बाबत मोकळेपणानं बोलणारी, ते अनुभवणारी आणि करिअर, आयुष्य, जोडीदार या सगळ्या गोष्टींना व्यावहारिकतेच्या कसोट्यांवर नीट तावून सुलाखून पाहणारी ही पिढी आहे. मुलीनं मागं वळून पाहिलं, तर ती आपल्या प्रेमात आहे, असं मानणारी ही स्वप्नाळू पिढी नाही (‘बेफिक्रे’मध्ये तसा एक सीनही आहे). एका अर्थानं प्रेमाची ‘शाहरूख स्टाइल’ आता मागं पडली आहे, असंही सांगणारी ही पिढी आहे. जागतिकीकरणोत्तर तरुणाईच्या एका आख्ख्या पिढीला वेड लावणारा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा सिनेमा बनवणाऱ्या आदित्य चोप्रानं ‘बेफिक्रे’ बनवला आहे, हा बदल त्याचाही ‘रिसर्जन्स’ दाखवणारा आहे. ‘दिलवाले...’मध्ये ट्रिपला गेलेल्या राज आणि सिमरनला एका रात्री एकत्र राहावं लागतं, तेव्हा दुसऱ्या दिवशी सिमरन राजला विचारते, ‘काल रात्री काही झालं तर नाही ना?’ ‘बेफिक्रे’मध्ये या प्रश्नालाच जागा नाही. प्रेमाच्या नात्याचं रुजणं या प्रश्नाच्या पलीकडे कधीच गेलंय. ‘बेफिक्रे’मधल्या जोडप्यालाही प्रश्न पडतातच; पण ते दोन दशकांपूर्वीच्या कुंपणापलीकडचे आहेत. त्यांना पडणारे प्रश्न हे त्यांच्या सहअस्तित्वाचं ‘रीझनिंग’ शोधणारे आहेत.

‘डिअर जिंदगी’ ही रुढार्थानं प्रेमकहाणी नाही; पण प्रेमाशीच संबंधित एक वेगळी कथा मांडणारा हा चित्रपट आहे, हे नक्की. एखादी व्यक्ती एखाद्या कारणासाठी आवडली, तरी दुसऱ्या एखाद्या कारणासाठी नावडू शकते; पण मग म्हणून मनाच्या प्रत्येकच कप्प्यासाठी वेगवेगळ्या व्यक्ती असू शकतात का? असं झालं, तर एक वेगळी व्यवस्थाच अस्तित्वात येऊ शकते का?... कथेच्या जोडीनं हा सिनेमा असे काही मूलभूत प्रश्नही उपस्थित करतो.

या तिन्ही सिनेमांमध्ये दाखवलेली कथा, त्यातील पात्रांची स्वतःची म्हणून असलेली आयुष्याकडे, प्रेमाकडे पाहण्याची दृष्टी ही चूक का बरोबर, हे खरं तर शोधायलाच जाऊ नये; कारण त्याला निश्चित असं एकच उत्तर नाही. गंमत पाहा, प्रेमामध्ये सिनेमाचा प्रवासही ‘दीवाना दिल’, ‘पागल दिल’, ‘बेकरार दिल’ इथपासून थेट ‘बद्तमीज दिल’पर्यंत आलाय आणि लेखाच्या सुरुवातीला म्हटलं, तसं प्रत्यक्ष आयुष्यातही प्रेमाची व्याख्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ वगैरे तांत्रिक नावांच्याही पलीकडे जाऊ लागली आहे. मुद्दा असा आहे, की चित्रपट ही शेवटी काल्पनिक कथा असली, तरी त्यातील मानवी भावनांची गुंतागुंत वास्तवात पडणाऱ्या प्रश्नांभोवतीच गुंफली गेलेली असते. त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यात सिनेमातली ही पात्रं भेटतीलच असं नाही; पण त्यातील भावना व्यक्तीपरत्वे तुकड्यातुकड्यांमध्ये दिसू शकतील. शेवटी सिनेमा हा या अशा तुकड्या तुकड्यांना एकत्र करून स्वतंत्र चित्र मांडणाऱ्या शोभादर्शकासारखाच असतो की!

Siddharth.Kelkar@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तमिळनाडूत शशिकला पर्व

$
0
0

आशिष चांदोरकर

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा अशी दोन्ही पदे भूषविणाऱ्या दिवंगत जे. जयललिता यांचे तमिळनाडूच्या राजकारणावर असलेले निर्विवाद वर्चस्व गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिद्ध झाले होते. एम. जी. रामचंद्रन यांच्यानंतर तमिळनाडूमध्ये सलग दोन विधानसभा निवडणुका जिंकण्याचे कसब त्यांनी करून दाखविले होते. पक्षामध्ये असलेला त्यांचा दरारा सर्वज्ञात होताच. दोन वेळा जेव्हा मुख्यमंत्रिपद सोडावे लागले, तेव्हा ओ. पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारले. पण, ते नाममात्र मुख्यमंत्री होते. राज्यशकट जयललिताच सांभाळत होत्या. जयललिता अत्यवस्थ असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पन्नीरसेल्वम यांनी जयललितांचे छायाचित्र टेबलावर ठेवले होते.

मात्र, अचानाकपणे त्यांचे आजारपण उद्भवले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण वगैरे प्रश्नांची उत्तरे मिळालीच नाहीत. दोन वेळा मुख्यमंत्रिपद सांभाळल्यामुळे साहजिकच पन्नीरसेल्वम यांचे नाव स्पर्धेत आघाडीवर होते आणि तेच पुन्हा मुख्यमंत्री झाले. काही वर्षांचे वितुष्ट वगळले, तर शशिकला या गेल्या ३५ वर्षांपासून जयललिता यांच्या समवेत होत्या. त्यामुळे त्यांच्या वारसदार म्हणून त्यांचीच वर्णी लागू शकली असती. मात्र, घाईघाईने उरकलेल्या शपथविधीमध्ये त्यांची संधी हुकली आणि पक्षाच्या सरचिटणीसपदी त्यांची निवड करण्यात आली.

अण्णा द्रमुकमध्ये अम्मा एके अम्मा अशी परिस्थिती असली, तरीही राज्यामध्ये ओ. पन्नीरसेल्वम आणि केंद्रामध्ये एम. थंबीदुराई असे दोन नेते त्यांचे सेकंड इन कमांड म्हणून ओळखले जात. त्यापैकी ओ. पन्नीरसेल्वम यांचे पंख कापून गेल्या विधानसभा निवडणुकीत जयललितांनी त्यांचे महत्त्व थोडे कमी केले होते. तसा संदेशही पक्षात सर्वत्र पोहोचविण्यात आला होता. त्यांना मंत्रिपद द्यायचे की नाही, याबाबतही सुरुवातीच्या काळात चर्चा सुरू होती. मात्र, त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली, नि बाकी चर्चांना पूर्णविराम मिळाला. थंबीदुराई हे सध्या लोकसभेचे उपसभापती आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जयललिता यांच्यामधील मैत्रीपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर अण्णा द्रमुकला हे पद प्रदान करण्यात आले आणि पक्षाचा दिल्लीत किल्ला लढविणाऱ्या तंबीदुराई यांची लोकसभेच्या उपसभापतिपदी निवड करण्यात आली.

पन्नीरसेल्वम आणि थंबीदुराई यांच्यामध्ये आडवा विस्तवही जात नाही. पन्नीरसेल्वम हे थेवर या जातीमधील मारवर या उपजातीचे प्रतिनिधित्व करतात. तर, थंबीदुराई हे कोंडु वेल्लालर या जातीचे आहेत. तमिळनाडूमधील या दोन जाती या परस्परविरोधी जाती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे दोन विरोधी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या नेत्यांचे फारसे जमत नाही. शशिकला अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस झाल्या. आता त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री व्हावे, ही थंबीदुराई यांनी व्यक्त केलेली अपेक्षा याच भावनेतून केलेली आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

जयललिता यांच्या निकटवर्तीय आणि मैत्रीण या पलिकडे शशिकला यांचे कार्यकर्तृत्व फारसे काही नाही. त्यांनी आतापर्यंतच्या वाटचालीत किंवा जयललिता यांच्या सहकारी म्हणून कार्यरत असताना एकही जाहीर किंवा कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केलेले नाही. मध्य आणि दक्षिण तमिळनाडूतील प्रमुख समजल्या जाणाऱ्या थेवर जातीमधील मुक्कूलाथोर या उपजातीचे प्रतिनिधित्व करतात. मोठ्या प्रमाणावर पैसा आणि जमीन बाळगणारी ही मंडळी राज्यामध्ये सात टक्क्यांच्या आसपास आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये ही जमात वर्चस्व प्रस्थापित करून आहे. राजकीय पक्षांमध्येही या जातीचे वर्चस्व आहे.

शशिकला यांच्याकडे जयललिता यांच्यासारखा करिष्मा नाही. जयललिता या अय्यंगार ब्राह्मण असल्या, तरीही त्यांचा वैयक्तिक करिष्मा लाजवाब होता. त्यामुळे त्या तमिळनाडूतील मागास नि अतिमागास प्रवर्गांमध्येही प्रचंड लोकप्रिय ठरल्या. आपल्या अनुभवाच्या आणि करिष्म्याच्या जोरावर त्यांनी जातीय समीकरणे योग्य पद्धतीने सांभाळली. द्रमुकच्या राजकारणाला जयललिता पुरून उरल्या. शशिकला या राजकारणात नवख्या आहेत. राजकारणातील अननुभव आणि मध्यम स्तरावरील जात या दोन गोष्टी त्यांच्यासाठी नकारात्मक ठरू शकतात.

असे असले, तरीही जयललिता यांच्या सर्व संपत्तीच्या वारसदार शशिकला याच ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण जयललिता यांनी मृत्यूपत्र केलेले नाही. त्यामुळे शशिकला यांच्याकडेच सारी संपती आपसूक चालून येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्त कोणताही चेहरा अण्णा द्रमुकमधील सर्व स्तरांवरील नेत्यांमध्ये स्वीकारार्ह नाही. मला नाही, तर तुलाही नाही, अशी वृत्ती असल्याने बाकीची नेते मंडळी एकमेकांचे पाय ओढण्यातच मश्गूल आहेत. त्यामुळेच शशिकला यांच्या नावाला कोणाचाही विरोध नाही.

शिवाय, अण्णा द्रमुकमधील नेते एकमेकांमध्ये भांडत बसले, तर पक्षाची शकले व्हायला वेळ लागणार नाही आणि भारतीय जनता पार्टी त्याचीच वाट पाहत आहे. सत्ता आहे तोपर्यंत तरी ही सारी मंडळी नक्की एकत्र राहतील, अशीच तूर्त परिस्थिती आहे. निवडणूक नुकतीच झाली असून, पक्षाला सरकार चालविण्यासाठी पुरेसे बहुमत आहे. आणखी चार वर्षांचा कालावधी हे सरकार अलगदपणे पूर्ण करेल, याबाबत शंका घेण्याचे काही कारण नाही. फक्त त्या आणि त्याच अण्णा द्रमुक पक्षातील सर्व गटांना आणि नेत्यांना एकत्र ठेवू शकतात. या पार्श्वभूमीवर शशिकला यांचे नेतृत्व मान्य करण्याखेरीज अण्णा द्रमुकच्या नेत्यांकडे पर्यायच नसल्याचे स्पष्ट होते आहे. त्यामुळे पुढील चार वर्ष तमिळनाडूत आणि अण्णा द्रमुकमध्ये शशिकला पर्व असेल आणि पुढील निवडणुकीतील निकालांनंतर पक्षाचे भवितव्य निश्चित खऱ्या अर्थाने निश्चित होईल, एवढेच आपण आता म्हणू शकतो.

एम. जी. रामचंद्रन आणि जयललिता यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद आणि पक्षाचे सरचिटणीसपद अशी दोन्ही पदे स्वतःकडेच ठेवली होती. अर्थात, त्यांची आणि शशिकला यांची तुलनाही होऊ शकत नाही. पण, दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे असतील तर राज्यशकट आणि पक्षाचे कामकाज अशा दोन्ही गोष्टींवर वचक राहू शकतो. तुम्हाला दुसरा पर्याय निर्माण होऊ शकत नाही. पण तेवडा वकुब आणि कसब शशिकला यांच्याकडे आहे किंवा कसे, याबाबत आताच काही बोलता येणार नाही. त्यासाठी थोडी वाट पाहावीच लागणार आहे.

ashish.chandorkar@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लघुग्रहाचा निरीक्षणांनी आकार निश्चित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लाखो किलोमीटर दूर असणाऱ्या एका लघुग्रहाचा प्रत्यक्ष निरीक्षणांनी आकार निश्चित करण्याचा अभिनव प्रयोग पुण्यातील आकाश निरीक्षकांनी नुकताच यशस्वी केला. २५ डिसेंबरच्या पहाटे २२ कॅलिओप नावाच्या लघुग्रहाने सारथी तारकासमूहामधील एका फिकट ताऱ्याला काही सेकंदांसाठी झाकले. ‘इंटरनॅशनल ऑकलटेशन टायमिंग असोसिएशन’च्या (आयोटा) मार्गदर्शनाखाली पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्था, आकाशमित्र आणि ‘सेंटर फॉर सिटिझन सायन्स’च्या (सीसीएस) निरीक्षकांनी या ग्रहणाचे (पिधानाचे) निरीक्षण नोंदवून लघुग्रहाचा आकार निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

सूर्यापासून ४३.५ कोटी किलोमीटर अंतरावरून लघुग्रहांच्या पट्ट्यातून फिरणारा २२ कॅलिओप १६७ किलोमीटर लांबीचा असून त्याला लायनस नावाचा एक चंद्रही आहे. जमिनीवरील सर्वांत मोठ्या टेलिस्कोपमधून पाहिल्यास हा लघुग्रह एखाद्या ताऱ्यासारखा प्रकाशमान बिंदू दिसतो. अशा लघुग्रहांचा आकार निश्चित करण्यासाठी त्यांच्याद्वारे होणाऱ्या ताऱ्यांच्या ग्रहणाचा (पिधान) आधार घ्यावा लागतो. २५ डिसेंबर २०१६च्या पहाटे सारथी तारकासमूहातील टीवायसी २४३०-०११२४-१ या ९.२ मॅग्निट्यूडच्या ताऱ्याला २२ कॅलिओप या लघुग्रहाने काही सेकंदांसाठी झाकले. या वेळी लघुग्रहाची सावली आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात मार्गाने पुढे युरोपपर्यंत सरकली.

लघुग्रहाच्या सावलीच्या पट्ट्यात जाऊन पुण्यातील आकाश निरीक्षकांच्या गटांनी या अत्यंत फिकट ग्रहणाचा कालावधी नोंदवला. ‘आयोटा’चे तज्ज्ञ डॉ. पॉल मॅले यांच्या नेतृत्वाखाली ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या निरीक्षकांनी पुणे ते औरंगाबाददरम्यान आठ ठिकाणांहून व्हिडिओच्या साह्याने, तर तीन ठिकाणांहून प्रत्यक्ष दुर्बिणीच्या साह्याने पिधानाचे निरीक्षण नोंदवले. ‘सीसीएस’च्या गटांनी पुणे ते नाशिकदरम्यान तीन ठिकाणांहून प्रत्यक्ष दुर्बिणीच्या साह्याने, तर एका ठिकाणाहून डीएसएलआर कॅमेराच्या साह्याने पिधानाचा कालावधी नोंदविला. ‘आकाशमित्र’च्या एका गटाने सावलीच्या पट्ट्याच्या मध्यरेषेवरून या घटनेचे निरीक्षण केले.

लघुग्रहाच्या सावलीच्या पट्ट्यातून पुण्यातील निरीक्षकांनी नोंदवलेला पिधानाचा कालावधी सर्व ठिकाणी वेगळा होता. या वेगवेगळ्या कालावधीवरूनच लघुग्रहाच्या सावलीचा आणि लघुग्रहाचा आकार निश्चित करणे शक्य झाले, असे डॉ. पॉल यांनी सांगितले.

‘हौशी निरीक्षकांना खगोल संशोधनात संधी’

हौशी आकाशनिरीक्षण म्हटल्यावर अंधाऱ्या रात्री शहरापासून दूर दुर्बिणीतून ग्रह, तारकापुंज, नेब्युला पाहणे, छायाचित्रण करणे, असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, हौशी आकाशनिरीक्षक प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रयोगांमध्ये सहभागी होऊन खगोल संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, याचे उदाहरण या पिधानाच्या निरीक्षणाने घालून दिल्याची प्रतिक्रिया नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली. राज्यातील हौशी आकाशनिरीक्षण संस्थांच्या समन्वयातून येत्या काळात अशाच प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग राबवण्यासाठी आयुका आणि नेहरू तारांगणातर्फे पुढाकार घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वरवर बर्फाची चादर; तापमान शून्यावर

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा सातत्यानं घसरत असून सध्या तापमानानं नीचांक गाठला आहे. सातारा जिल्ह्यातील वेण्णा लेक परिसरात शून्य अंश तापमानाची नोंद झाली आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्येही दवबिंदू गोठले असून संपूर्ण शहरावर बर्फाची चादर पसरली आहे.

राज्याच्या विविध जिल्ह्यांतील थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढतच असून अनेक शहरांत नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात यंदाच्या मोसमातील सर्वात कमी म्हणजे ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नगर येथे ६.३ तर नाशिक येथे ७.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस राज्यभर हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये ११ डिसेंबरला ८.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर गुरुवारी (५ जानेवारी) शहरात आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर शनिवारी हंगामातील सर्वाधिक नीचांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

जळगाव येथे ८, मालेगाव येथे ९, औरंगाबाद येथे ११.१, नांदेड येथे १३, अमरावती येथे ९.६ तर नागपूर येथे १०.७ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. सध्या उत्तरेकडील राज्यात थंडी वाढली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या काही भागात बर्फवृष्टी होत आहे. तेथून राज्याकडे थंड व कोरडे वारे वाहत आहेत. राज्यातही हवामान कोरडे असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील तीन चार दिवसात उत्तरेकडील राज्यातील तापमानात २ ते ४ अंशांची घट अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यातही थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत यंदा करवाढ नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पुढील आर्थिक वर्षात (२०१७-१८) कोणतीही करवाढ न करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शुक्रवारी घेण्यात आला. ऑनलाइन पद्धतीने एप्रिल ते जून २०१७ कालावधीत कर भरणाऱ्यांना पाच टक्के सवलत देणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. आगामी आर्थिक वर्षात करवाढ न करता चालू आर्थिक वर्षाप्रमाणेच कराची आकारणी व्हावी, अशी शिफारस स्थायी समितीने सर्वसाधारण सभेला केली होती. त्याबाबतच्या प्रस्तावावर फारशी चर्चा न होताच मान्यता मिळाली. निवडणुका तोंडावर असल्यामुळे सर्वच नगरसेवकांनी नागरिकांवर करवाढीचा बोजा लादू नये, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात शहरवासियांवर करवाढीचा बोजा पडणार नसल्याचे स्पष्ट झाले. शहरातील अनधिकृत बांधकामांसाठी लागू केलेला शास्ती कर राज्य सरकारने पूर्णतः माफ करावा, अशी मागणी सभेमध्ये करण्यात आली. शास्तीकर माफ होत नाही तोपर्यंत पालिकेकडून देण्यात येणाऱ्या कराच्या पावतीत शास्तीच्या रकमेचा उल्लेख करू नये. त्याची स्वतंत्र पावती देण्यात यावी, अशी मागणी प्रशांत शितोळे यांनी केली.
सुलभा उबाळे म्हणाल्या, ‘शास्तीकर भरलेल्या नागरिकांवर अन्याय होऊ नये, याची दक्षता घ्यावी. राज्यात सत्तेत असूनही शिवसेनेने शास्तीकरासंदर्भात सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची तयारीची भूमिका आहे.’
अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणासंदर्भात राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. शास्तीकराची टांगती तलवार दूर करावी. त्याचबरोबर शास्तीकर भरलेल्या नागरिकांची रक्कम सामान्य करांमध्ये समायोजित करावी, अशी मागणी योगेश बहल यांनी केली. शास्तीकर माफीचा निर्णय लवकर करण्याबाबतचा विनंती प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा, अशी सूचना पक्षनेत्या मंगला कदम यांनी केली. अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराच्या बाबतीत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची आठवणही या निमित्ताने करून देण्यात आली.

बसखरेदीसाठी तरतूद
पीएमपीसाठी फायनान्स मेकॅनिझम पद्धतीने आठशे बस खरेदी करण्याचा प्रस्ताव ऑगस्ट २०१६ मध्ये महापालिका सभेने मंजूर केला आहे. या खरेदीसाठी मासिक पद्धतीने हप्ते भरण्यात येतील. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ४० टक्के दायित्वानुसार थेट बसपुरवठादाराच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी, प्रतिमहा संचलन तूट भरून निघावी, असे प्रस्तावात नमूद केले आहे. ठिकठिकाणी नवीन बसडेपो उभारणीसाठी, नवीन टर्मिनल बांधण्यासाठी, जुने डेपो आणि टर्मिनलच्या नूतनीकरणासाठी तसेच या अनुषंगाने मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. ते तयार झाल्यानंतर गरजेनुसार महापालिकेने बजेटमध्ये खर्चाची तरतूद करावी, असा निर्णयही या वेळी घेण्यात आला.

ऑनलाइन पद्धतीने मिळकत कराचा भरणा करणाऱ्या करदात्यांना सवलत देण्याची उपसूचना सर्वसाधारण सभेत मांडण्यात आली. त्यानुसार एक एप्रिल ते ३० जून २०१७ कालावधीत ऑनलाइन पद्धतीने कर भरणाऱ्या नागरिकांना पाच टक्के सवलत मिळणार आहे. तसेच एक जुलै २०१७ ते ३१ मार्च २०१८ कालावधीत ऑनलाइन पद्धतीने कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना दोन टक्के सूट दिली जाणार आहे. कॅशलेसपद्धतीने अधिकाधिक करभरणा करावा, यासाठी महापालिकेने ही स्मार्ट सवलत दिली असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपी’तील बदलांवर हरकती स्वीकारणार

$
0
0

राज्य सरकारतर्फे लवकरच सुनावणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या विकास आराखड्यात (डीपी) कायम ठेवण्यात आलेल्या ८५० पैकी ४०५ आरक्षणे मंजूर करण्यात आली असून, २३५ आरक्षणांत बदल करण्यात आल्याने त्यावर नागरिकांकडून पुन्हा हरकती-सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. शहरातील शंभरहून अधिक रस्त्यांच्या रुंदीमध्ये बदल करण्यात आल्याने त्यावरही सुनावणीची प्रक्रियाही सरकारतर्फे घेण्यात येणार आहे.
महापालिकेचा २००७-२७ या २० वर्षांसाठीचा डीपी सरकारने दोन दिवसांपूर्वी मान्य केला. सरकारनियुक्त त्रिसदस्यीय समितीने वगळलेली आरक्षणे पुनर्स्थापित करण्याचेही निश्चित करण्यात आले. ही आरक्षणे वगळता, ४०५ आरक्षणांमध्ये कोणताही बदल नसल्याने ती मान्य झाली असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिले. तसेच, महापालिकेने इमारतींच्या ‘ओपन स्पेस’वर प्रस्तावित केलेली सर्वच्या सर्व ५० आरक्षणे रद्द करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.
शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या लक्षात घेऊन दाट वस्तीच्या भागांमधील काही आरक्षणात बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्रिसदस्यीय समितीकडून निवासी किंवा व्यावसायिक भागात समाविष्ट करण्यात आलेल्या आरक्षणांमध्ये बदल करून ती पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तसेच, शनिवारवाडा ते नारायण पेठ या दरम्यानचा शंभर फुटी रस्ता रद्द करताना, त्या लगतच्या जागेचा वापर पार्किंग किंवा महापालिकेच्या इतर वापरासाठी करता येऊ शकेल का, याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांकडे देण्यात आले आहेत.
सरकारी जागांवरील सर्व आरक्षणे सरसकट रद्द करण्यात आली नसून, अशा ठिकाणांवरील २९ आरक्षणे कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणासाठी (पीएमआरडीए) येरवडा परिसरात ‘गोल्फ क्लब’च्या जवळ दर्शविण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यात आले होते. ते सरकारने पुनर्स्थापित केले आहे.

ज्येष्ठांना दिला दिलासा
येरवडा परिसरात ससून हॉस्पिटलच्या धर्तीवर सुसज्ज हॉस्पिटल, शिवाजीनगर-भांबुर्डा भागात मॅफकोच्या परिसरात स्टेडियम, ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा यासारखी अनेक आरक्षणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या समितीने उठवली होती. ही लोकोपयोगी आरक्षणे सरकारने पुनर्स्थापित करून नागरिकांना दिलासा दिला आहे.

जुन्या आरक्षणांना कात्रजचा घाट
शहराच्या भवितव्याचा विचार करून महापालिकेने अनेक आरक्षणे निश्चित केली होती. त्यामध्ये, विविध समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने, त्रिसदस्यीय समितीने अनेक आरक्षणांना कात्री लावली. त्यावरून, बराज गहजब झाल्यानंतर अखेर सरकारने त्यातील बहुतांशी आरक्षणे कायम केली आहेत. त्यामुळे, पालिकेने केलेल्या प्रा-रूप आराखड्याचे स्वरूप सुमारे ७० टक्के कायम राहिल्याने त्रिसदस्यीय समितीचा घाट सरकारने कशाला घातला, अशी विचारणा केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरसेविकेला हायकाेर्टाचा दणका

$
0
0

पिंपरी ः झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील कथित भ्रष्टाचारप्रकरणी रिट पिटिशन ऐवजी जनहित याचिका दाखल करण्याचे तसेच त्यासाठी याचिकाकर्त्या नगरसेविका सीमा सावळे यांना दहा लाख रुपये भरण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने केली आहेत. दोन आठवड्यांत हे दहा लाख रुपये भरावे लागणार आहेत.
नगरसेविका सावळे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सेक्टर क्रमांक २२ या क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पावर आक्षेप घेतला होता. या सदनिका बांधताना मोठा भ्रष्टाचार झाला असून, जेएनएनयूआरएम या योजनेअंतर्गत ६३० कोटी खर्चूनही भ्रष्टाचाराची तूट भरून काढण्यासाठी लाभार्थ्यांकडून स्वहिस्सा रक्कम घेतली जात आहे. त्यावर प्रतिबंध करावा, अशी मागणी करणारी याचिका सावळे यांनी केली होती. तसेच प्रकल्प राबविताना संरक्षण विभाग, पर्यावरण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणीही केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान प्रकल्पातील ११ हजार ७६० सदनिकांचे वाटप कोर्टाच्या परवानगीशिवाय केले जाऊ नये, असा आदेश हायकोर्टाने मार्च २०१२ मध्ये दिला होता.
या याचिकेवर निर्णय देताना हायकोर्टाचे न्यायाधीश ए. एस. गडकरी व आर. एम. बोर्डे यांनी, याचिकाकर्त्याचा याचिकेशी वैयक्तिकरीत्या कोणताही संबंध दिसत नसल्यामुळे, तुम्ही वैयक्तिकरीत्या याचिका का दाखल केली असा सवाल करत, याचिकेशी तुमचा वैयक्तिक संबंध स्पष्ट करावा अन्यथा दोन आठवड्यात दहा लाख रुपये भरून या संबंधी जनहित याचिका न्यायालयामध्ये दाखल करावी, अशा सूचना हायकोर्टाने सीमा सावळे यांना केली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

राज्यात ११ जानेवारीपासून दूधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ होणार आहे. पुणे येथे झालेल्या खासगी आणि राज्य सहकारी दूध संघाच्या बैठकीत हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.

खासगी आणि राज्य सहकारी दूध संघाच्या बैठकीत दूध खरेदीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय झाला. गाईच्या दूध खरेदी दरात ३ रुपयांची तर विक्री दरात २ रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. सध्या शेतकऱ्यांकडून २२ रुपये प्रति लिटर दराने खरेदी करण्यात येणारे दूध आता २५ रुपये प्रति लिटर दराने घेण्यात येणार आहे. तर ग्राहकांना सध्या ४० रुपये प्रति लिटर दराने दूध विक्री करण्यात येत आहे. म्हशीच्या दूधाच्या दरात वाढ करण्याबाबतही लवकरच निर्णय होणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. या ११ जानेवारीपासून कात्रज, अमूल, चितळे आणि कृष्णा दूधाच्या दरात वाढ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तेंडुलकरांनी जगणे समजावले’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘विजय तेंडुलकरांच्या एका नाटकात अडीचशे संवाद आणि त्या संवादांच्यामध्ये तितक्याच वेळा ‘पॉज’ होता. हा ‘पॉज’ म्हणजे तेंडुलकरांनी आयुष्यातील शोधून काढलेली पोकळी होती. माणसाला अशी पोकळी का जाणवावी, हा त्यांनी लावलेला खूप मोठा शोध आहे. त्यांनी प्रेक्षकांना जगणे समजावले,’ असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
इंद्रनील प्रकाशनतर्फे लेखक डॉ. चंद्रशेखर बर्वे यांनी लिहिलेल्या ‘तेंडुलकरांची नाटके’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन डॉ. पटेल यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, डॉ. चंद्रशेखर बर्वे, विजय तेंडुलकर यांची कन्या तनुजा मोहिते आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. पटेल म्हणाले, ‘माणूस काय आहे, त्याचे जगण्याचे तर्कशास्त्र काय आहे, हे समजावून देणारा पहिला माणूस म्हणजे विजय तेंडुलकर होय. प्रेक्षकांना प्रेक्षागृहामध्ये खिळवून ठेवण्याची ताकद तेंडुलकरांच्या नाटकांमध्ये होती. आपण लिहिलेला शब्द रंगभूमीवर कसा पोहचेल याकडे ते विशेष लक्ष द्यायचे.’ ‘नाट्यवाचनावर त्यांची हुकुमत होती. तेंडुलकरांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीला नवसंजीवनी दिली, तसेच राष्ट्रीय रंगभूमी निर्माण करण्याचे काम केले. तरुण पिढीमध्ये अजूनही तेंडुलकर नावाचा माणूस वास्तव्यास आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. आगाशे म्हणाले, ‘तेंडुलकरांची नाटके अस्तित्वाचा शोध घेणारी होती. मराठी नाटकांच्या उत्क्रांतीमधील ठळक बिंदू म्हणून तेंडुलकराकडे पाहिले पाहिजे. ‘दिशाभूल झालेल्या नाटकांना दिशा देणारे नाटककार’ म्हणून त्यांचे इतिहासातील स्थान अढळ आहे. या वेळी डॉ. अमृता सुभाष, ज्योती सुभाष व किरण यज्ञोपवीत यांनी दृकश्राव्य माध्यमातून पुस्तकातील निवडक भागाचे वाचन केले. प्रवीण जोशी आणि मंजिरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्गीकरणाचा ‘कचरा’

$
0
0

Chaitrali.Chandorkar@timesgroup.com

Tweet : @chaitralicMT

पुणे : ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने पुण्याने प्रवास सुरू केला असला, तरी शहराची प्राथमिक गरज असलेल्या स्वच्छता मोहिमेला महापालिका आणि नागरिकांनी कचरापेटी दाखवली आहे. ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ या मोहिमेसाठी महापालिकेतर्फे गेल्या दहा वर्षांत कोट्यवधी रुपये खर्चून नानाविध उपक्रम राबवण्यात आले; मात्र कचरा विल्हेवाटीवर अद्याप रामबाण उपाय सापडलेला नाही. कचरा वर्गीकरण जनजागृती, कचरा विल्हेवाटीसाठी सोसायट्यांना नोटिसा, वेगवेगळ्या वॉर्डमध्ये बायोगॅस प्रकल्प असे अनेक प्रयोग सुरू असताना आजही शहरातील पन्नास टक्के कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही.

फुरसुंगीमधील नागरिकांच्या आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केल्यानंतर साधारणतः आठ वर्षांपूर्वी कचरा वर्गीकरण ही संकल्पना पुढे आली. तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. नितीन करीर यांनी ‘नागरिकांनी घरातच ओला आणि सुका कचरा वेगळा करावा,’ असा फतवा काढला; पण नागरिकांसह खुद्द महापालिकेतील घनकचरा विभागानेही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. पुढे फुरसुंगीचा कचरा डेपो बंद करण्याची वेळ आल्यावर कचरा वर्गीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला. घरातला ओला-सुका कचरा एकत्रित दिला, तर तो स्वीकारला जाणार नाही, असे महापालिकेने ठणकावून सांगितले. ‘स्वच्छ’ संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी ‘वर्गीकरणाशिवाय कचरा उचलणार नाही’ अशी ठाम भूमिका घेतली. नव्याने उभारण्यात आलेल्या सोसायट्यांकडून ओला कचरा स्वीकारला जाणार नाही; घंटागाडी केवळ कोरडा कचरा उचलणार; सोसायट्यांनी आवारातच कचरा जिरवण्याचा प्रकल्प बांधावा, अशी सक्ती करून नोटिसा पाठवण्यात आल्या. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या नागरिकांनी कचरा वर्गीकरणास सुरुवात केली. यानंतर मध्यवर्ती पुण्यातील जुन्या इमारती, वाड्या, वस्त्या, उपनगरांमधील नव्याने बांधलेल्या गृहनिर्माण सोसायट्या, बंगल्यांमधून कचरा वर्गीकरणाला अवघा वर्षभर चांगला प्रतिसाद मिळाला. ‘स्वच्छ’च्या कार्यकर्त्यांमुळे झोपडपट्टी आणि वस्त्यांमधूनही नागरिकांचे सहकार्य मिळाले; पण हळूहळू गेल्या दोन वर्षांत ही चळवळ पुन्हा शांत झाली आहे. घंटागाड्या अजून नागरिकांकडून वर्गीकरण केलेला कचरा उचलत असल्या, तरी बहुतांश भागांत कर्मचाऱ्यांकडून हा कचरा पुन्हा एकत्रच केला जातो. मतदारांच्या सोयीसाठी अनेक प्रभागांमध्ये खुद्द नगरसेवकांनी कचरा उचलणाऱ्या खासगी गाड्यांची यंत्रणा उभारली आहे. या गाड्या रोज लोक देतील तसा कचरा सोसायटीतून उचलतात, पुढे हा कचरा कुठे टाकला जातो, याबद्दल न बोलणेच योग्य ठरेल.

वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात ई-कचरा, तसेच वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे; पण आपल्याकडे ही समस्या शास्त्रीय पद्धतीने हाताळणारी सक्षम यंत्रणा नाही, हे वास्तव आहे. शहरात सध्या श्रेडर, बायोगॅस प्रकल्प, ओल्या कचऱ्यातून खतनिर्मिती, वैद्यकीय कचऱ्यासाठी इन्सिलेटर, ई-कचरा वर्गीकरण असे अनेक प्रकल्प सुरू आहेत. याशिवाय दर वर्षी नवीन खर्चिक अत्याधुनिक यंत्रणा आणून, कचऱ्यावर मार्ग काढण्यासाठी महापालिकेचे प्रयोग सुरू आहेत; पण मुळातच कचऱ्याची निर्मिती होत असलेल्या ठिकाणी म्हणजे नागरिकांना शिस्त लावण्याबद्दल महापालिका आक्रमक भूमिका घेण्यास इच्छुक नाही. रस्त्याच्या दुतर्फा कोठेही कचरा फेकणाऱ्यांवर, कचरा वर्गीकरण न करणाऱ्या सोसायट्या, नागरिकांवर आजपर्यंत दंडात्मक कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनाही महापालिकेच्या पोकळ आवाहनांकडे दुर्लक्ष करण्याची सवय झालेली आहे. दर थोड्या दिवसांनी राबवण्यात येत असलेल्या नवनवीन प्रयोगांमुळे समस्या सुटण्याऐवजी त्यातील गुंतागुंत वाढते आहे. त्यामुळेच शहरातील कचरा समस्येवर मार्ग काढण्यासाठी स्वतंत्र धोरणाची गरज आहे.

...........

पुण्यातील कचऱ्याचा पसारा

.........

दररोज गोळा होणारा कचरा : १६०० टन

कचरा गोळा करणाऱ्या पालिकेच्या गाड्यांची संख्या : किमान १७०० (डंपर, हॉटेल ट्रक, कॉम्पॅक्टर, घंटागाड्या)

सुरू असलेले बायोगॅस प्रकल्प : २०

होऊ घातलेले बायोगॅस प्रकल्प : १५

गांडूळ खत प्रकल्प सुरू असलेल्या सोसायट्या : किमान दोन हजार

दररोज होणारे ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण : १०४ टन

बायोगॅस प्रकल्प सुरू असलेल्या सोसायट्या : ३५

श्रेडर मशिन बसवलेली उद्याने : सात

दररोज प्रक्रिया होणारा उद्यानातील कचरा : ७५ ते ८० टन

दररोज तयार होणारा जैववैद्यकीय कचरा : ६ टन

(चारशे ठिकाणांहून गोळा होणारा)

दर वर्षी तयार होणारा ई-कचरा : सुमारे १० हजार टन

ई-कचऱ्याच्या निर्मितीमध्ये पुण्याचा राज्यातील क्रमांक : दुसरा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा जिल्ह्यांचे नकाशे होणार डिजिटल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील सहा जिल्ह्यांमधील जमिनींचे नकाशे डिजिटाइज्ड करण्याचे काम भू‌मिअभिलेख विभागाने हाती घेतले असून, त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश आहे. डिजिटल नकाशे तयार झाल्यावर ज​मिनींचे गैरव्यवहार रोखले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे १५० कोटी रुपये खर्च येणार असून, त्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे नकाशे डिजिटाइज्ड झाल्यावर जमिनीच्या मालकीवरून होणारे तंटे कमी होऊ शकणार असल्याचे भूमिअभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया भू‌मिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमा’अंतर्गत (एनएलआरएम) देशभरात डिजिटल नकाशे तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के निधी देणार आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांतील नकाशे डिजिटाइज्ड करण्याचे काम सुरू करण्यात येणार असून, एप्रिल २०१८पर्यंत पहिल्या टप्प्यातील काम होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अनेकदा शेतीच्या सीमारेषा ठरविण्यावरून वाद निर्माण होतात. त्यातून कोर्टात खटले दाखल केले जातात. आता नकाशे डिजिटाइज्ड होणार असल्याने हे वाद संपुष्टात येण्यास मदत होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सातबारा उतारे पूर्णत्वाकडे

पुणे जिल्ह्यातील नकाशे डि​जिटाइज्ड करण्याच्या कामासाठी टेंडरप्रकिया राबविली जाणार आहे. त्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जमिनींबाबत निर्माण होणारे प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहेत. राज्यातील जमिनींचे सातबारा उतारे ऑनलाइन करण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. नकाशे डिजिटाइज्ड करण्याचे काम पूर्ण झाल्यावर सातबाऱ्यांवर डि‌जिटल सही उपलब्ध होऊ शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नद्यांना सुधारणेची प्रतीक्षाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये शहरातील मुळा-मुठा नद्यांचा समावेश आहे. त्यांच्या शुद्धीकरणासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची पडला असून, अजून एक हजार कोटी रुपयांचा नदी सुधारणेचा प्रकल्प लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. तरीही नद्यांच्या स्वरूपात अद्याप तसूभरही फरक पडलेला नाही, हे वास्तव स्वीकारून महापालिका आणि राजकीय पक्ष त्यात बदल घडवण्यासाठी गांभीर्याने विचार कधी करणार, अशी भावना व्यक्त होत आहे.

जीवनवाहिन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नद्यांचे प्रदूषण वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, नदीच्या पात्रात टाकला जाणारा राडारोडा आणि नदीतीरावर होणारे अतिक्रमण यामुळे नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे. गेल्या दशकात देशांतील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये पुण्यातील मुठा आणि मुळा यांचा समावेश झाला. पालिकेतील तत्कालीन कारभाऱ्यांनी नदी-सुधारणेसाठी पुढाकार घेऊन, केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेतून (जेएनएनयूआरएम) मोठा निधी प्राप्त केला. त्यातून नदीच्या पात्रात सुमारे शंभर कोटी रुपयांहून अधिक खर्चाची कामे केली गेली. अनेकदा ही कामे कोर्टाच्या निकालांच्या कचाट्यात सापडली. त्यामुळे त्यावरील खर्चही वाढला. परंतु तरीही या केवळ दिखाऊ कामांमुळे नदीतील पाण्याचे स्वरूप बदलले नाही. जलचरांच्या दृष्टीने ती अधिकाधिक प्रदूषित होत चालली. शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारण्यात आली असली, तरी ती पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने मोठ्या प्रमाणावर सांडपाण्याचा निचरा नदीतच होऊ लागला. त्यावर स्वयंसेवी संस्थांसह अनेकांनी आवाज उठवूनही त्यात कोणताही बदल झाला नाही.

नदीची दुरवस्था सुधारण्यासाठी आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात आला. भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांचा विस्तार आणि कोणत्याही स्वरूपात अशुद्ध पाणी नदीत सोडले जाऊ नये, याकरिता नव्या मैलापाणी वाहिन्यांचे जाळे, अशा स्वरूपात त्याची रचना करण्यात आली. तत्कालीन यूपीए सरकारपासून त्याच्या मान्यतेसाठी पाठपुरावा केला जात होता. केंद्रातील सत्तांतरानंतर भारतीय जनता पक्षाच्या सरकारतर्फे त्याला अंतिम मान्यता देण्यात आली. जपानमधील ‘जायका’तर्फे त्याला आर्थिक मदत देण्याचेही निश्चित झाले. त्यासाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. परंतु, दुर्दैवाने गेल्या आठ महिन्यांहून अधिक काळात या प्रकल्पाची पुढील सर्व प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे नक्की काय होणार आणि शहरातील नदी-सुधारणेला नेमका केव्हा मुहूर्त मिळणार, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

.....................

नदी आणि कोर्टाच्या फेऱ्या

शहरातील नदीच्या पात्राचा विविध कारणांसाठी उपयोग केला जात असल्याने त्याविरोधात स्वयंसेवी संस्थांनी सातत्याने लढा उभारला आहे. नदीपात्रातून पालिकेने दुचाकींसाठी रस्ता खुला केला असला, तरी विठ्ठलवाडी येथील नियोजित रस्ता संपूर्ण उखडण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली. नदीपात्रातून जाणाऱ्या प्रस्तावित मेट्रो मार्गालाही विरोध होत असून, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) त्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. नदीचे स्वरूप कायम राहावे आणि त्याच्या प्रवाहात कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत, म्हणून शहरातील पर्यावरणप्रेमी अत्यंत जागरूक असले, तरी नदी सुधारणेसाठी एखादा कालबद्ध कृती कार्यक्रम कसा राबवता येईल, यासाठी त्यांनी उपाय सुचवल्याचे किंवा पालिकेकडे पाठपुरावा केल्याचेही कधी दिसून आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’ने एकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वाइन फ्लूच्या संसर्गाने लोणी काळभोर येथील एका ३६ वर्षांच्या तरुणाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये मृत्यू झाला. संसर्गामुळे न्यूमोनियासह मूत्रपिंडाला जखम झाल्याचे निदान झाले.

सर्दी, खोकला, ताप यांसारखी लक्षणे दिसू लागल्याने या तरुणाच्या लाळेचे नमुने ३१ डिसेंबरला घेण्यात आले. ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने संबंधित पेशंटला रुबी हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या पेशंटला सहा महिन्यांपासून मूतखड्याचा आजार होता. त्याशिवाय खोकला, सर्दीदेखील होती.

मूतखड्याच्या आजारावर त्याचे उपचार सुरू होते. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने त्यावर उपचार सुरू होते. त्या दरम्यान त्याचा हॉस्पिटलमध्ये रविवारी पहाटे मृत्यू झाला. शहरातील हा पहिला मृत्यू झाल्याचे मानले जाते. आतापर्यंत दोघांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आत्ताचे सत्ताधीश झाले ‘दंडाधिकारी’

$
0
0

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची खंत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सरंजामशाही, वतनदारीचा तीव्र विरोध केला. वतनदारीमुळे स्वराज्यातील बुरूजातटांचे मोठमोठे वाडे त्यांनी होऊ दिले नाहीत. आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे. सध्या दिल्लीपासून गल्ली पर्यंत राजकीय, सामाजिक स्तरावर सरंजामशाही फोफावली आहे. सरकारी संस्थांपासून सामाजिक संस्थांपर्यंत सर्व सत्ताधीश दंडाधिकारी झाले आहेत,’ अशी खंत व्यक्त करत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर ताशेरे ओढले.
डॉ. उदय कुलकर्णी लिखित ‘द एरा ऑफ बाजीराव’ या पुस्तकाचे प्रकाशन पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे यांच्या कालखंडातील घडामोडींचा संदर्भ देऊन सध्याच्या व्यवस्थेवर भाष्य केले. एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ राजा दिक्षित उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे यांनी केलेल्या त्यागाचे कुणीही अनुकरण करत नाहीत. बाजाराव पेशव्यांचे व्यसन समाजाने लगेच घेतले. छत्रपतींनी राष्ट्र निर्माण करण्याची भावना उरी बाळगली होती. ते करत असताना सरंजामशाही,वतनदारीच्या लोभाला कुठेही जागा नव्हती. दुर्दैवाने त्याच महाराजांच्या स्वराज्यात आज वतनदारी पुन्हा फोफावली आहे. महापौर, आमदार, खासदारकीची आमिषे दाखवून राजकीय व्यवस्थेला खालच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जग घेते, पण महाराष्ट्रात फक्त त्यांचा जयजयकार केला जातो. परदेशी इतिहासकारांना आपल्या इतिहासात जे जाणवले ते आपल्याला जाणवत नाही.’
‘निजामशाहीला संपवण्याचा निर्धार करणारे बाजीराव किरकोळ नव्हते. मराठी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे ते एक सेनानी होते. मात्र, मस्तानीमुळे त्यांचे स्वकीयांनीच खच्चीकरण केले. त्यांनी बाजीरावांना नको नकोसे करून सोडले होते. बाजीराव पेशवे आणि शिवाजी महाराजांच्या त्यागाचा इतिहास तरुणांनी अधिक वाचला पाहिजे,’ याकडे पुरंदरे यांनी लक्ष वेधले.
राजा दीक्षित म्हणाले, ‘चित्रपट, नाटक, मालिका अशा कलेच्या क्षेत्रात इतिहासातल्या व्यक्तींचे चित्रण कसे असावे, हा वादाचा विषय आहे. बहुसंख्य नाटककार, कथा-कादंबरीकार यांनी फक्त बाजीराव आणि मस्तानीचे नाते रंगवले. स्वराज्यासाठी लढणारा बाजीरावही लोकांसमोर येणे गरजेचे आहे. इतिहासाबाबत समाजात साक्षरता असली पाहिजे. त्यासाठी संशोधक आणि अभ्यासकांबरोबरच सामान्य इतिहासप्रेमींनी त्यांच्या छंदाला अभ्यास आणि संशोधनाची जोड देणे आवश्यक आहे. त्यामुळे इतिहासाबद्दल निकोप वातावरण तयार होईल.’ ‘उदय कुलकर्णी यांनी कपोलकल्पित न लिहिता संशोधनावर आधारित बाजीराव पेशवे यांचे चरित्र या पुस्तकातून मांडले आहे,’ असेही दीक्षित यांनी नमूद केले.
‘सह्याद्रीतला शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हा पठारावर आणून त्याद्वारे असंख्य लढाया मराठ्यांनी बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या. इतिहासात डोकावून पाहिले तर त्यांच्या चांगल्या कामांना फारसे महत्त्व देण्यात आलेले नाही. शाहू महाराजांनी बाजीरावांची केलेली पारख आणि बहाल केलेले पेशवेपद या इतिहासातल्या अत्यंत महत्त्वाच्या घटना आहे,’ असे भूषण गोखले यांनी सांगितले. उदय कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात पुस्तकामागची भूमिका विषद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कलाकारांचा गौरव ही पुण्याची परंपरा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पुणे हे रसिकांचे शहर असून कलेचे माहेर म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांनी कलेची कदर ठेवून कलाकारांचा गौरव केला होता. पुण्यात कलाकारांचा गौरव करण्याची परंपरा तीनशे वर्षांपासून निरंतर सुरू आहे,’ असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.

पुणे महापालिकेतर्फे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतिनिमित्त देण्यात येणारा स्वरभास्कर पुरस्कार तबलायोगी पं. सुरेश तळवलकर यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ गायक पद्मश्री पं. उल्हास कशाळकर, माजी आमदार उल्हास पवार, माजी उपमहापौर आबा बागूल, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. ‘पं. सुरेशजींचे वादन म्हणजे तबल्यावरचं नृत्य आणि बोटातून प्रकट होणारं उत्कृष्ट दर्जाचं वक्तृत्व आहे,’ असे गौरवोद्गार काढून पुरंदरे यांनी इतिहासातील कलाकार व रसिकतेचे दाखले दिले.

पुरंदरे म्हणाले, ‘शिवाजी महाराजांच्या काळात मता बेगम नावाची पुण्यात एक गायिका होती, तिच्या वृद्धापकाळात तिची परिस्थिती गरिबीची असल्याचे समजताच शिवाजी महाराज, शहाजी महाराज आणि जिजाऊसाहेब यांनी तिचा सत्कार केला होता. महादजी शिंदे यांनी समोरच्या पर्वतीच्या पूर्वेच्या डोंगर उतारावर अर्धा तास शोभेची दारू उडवून त्या वेळी वाद्येही वाजवली होती, असे इंग्रजांचा पुण्यातील प्रतिनिधी असलेल्या विल्यम्स चार्लस मॅलेट याने लिहून ठेवले आहे.’ ‘पं. तळवलकर, पं. कशाळकर ही सरस्वतीची मुले आहेत. ते केवळ वादन किंवा गायन करीत नाहीत, तर पुढच्या पिढीला शिकवण्याची परंपरा त्यांनी निर्माण करून मोठे काम केलं आहे,’ याकडे पुरंदरे यांनी लक्ष वेधले.

तळवलकर म्हणाले, ‘भीमसेन जोशी कलादालनाच्या सान्निध्यात मिळालेला स्वरभास्कर हा पुरस्कार आयुष्यात खूप काही देऊन जाईल. पं. भीमसेन जोशी यांना साथ करण्याचे भाग्य मला मिळाले. मी कोण, हे विसरून जाऊन कलेची साधना करणे, हे आपण त्यांच्याकडून शिकलो. भीमसेन जोशी यांच्या स्मृतिनिमित्त दिलेला हा पुरस्कार आपण प्रसाद म्हणून स्वीकारत आहोत.’ या वेळी पं. तळवलकर यांचा तालकीर्तन मैफलीचा कार्यक्रम झाला. घनश्याम सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदे, बटाटे, आले, मटार स्वस्त

$
0
0

नव्या वर्षाच्या सुरुवातीला आवक वाढल्याने ग्राहकांना दिलासा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कांदे, बटाटे, आले आणि मटारी मार्केट यार्डात मोठी आवक झाल्यामुळे त्यांचे दर स्वस्त झाले आहेत. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीला ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गुलटेकडी मार्केट यार्डात १६० ते १७० ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे. मध्य प्रदेशातून ३०-३२ ट्रक मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून २०-२२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून पाच-सहा ट्रक कोबी आणि राजस्थानातून १०-११ ट्रक गाजरांची आवक झाली आहे. साताऱ्यातून तीन हजार गोण्या आले आणि टोमॅटोच्या साडेपाच हजार ते सहा हजार कॅरेटची आवक झाली. चार-पाच टेम्पो हिरवी मिरची, १३ ते १४ टेम्पो फ्लॉवर, १८ ते २० टेम्पो कोबी, आठ ते १० टेम्पो सिमला मिरची, आणि सहा टेम्पो गाजरांची आवक स्थानिक भागांतून झाली.

पुरंदर, पारनेर, वाई, सातारा या भागांतून मटारची मोठ्या प्रमाणात आवक झाली. पर राज्यांतून ३५ ट्रक मटार आल्याने मार्केट यार्डात ३०० ते ३५० गोण्या मटार दाखल झाला. त्याशिवाय पाच-सहा टेम्पो पावटे आणि आठ ते १० टेम्पो लाल भोपळाची मार्केट यार्डात आला आहे.

बाजारात जुना आणि नवा अशा दोन्ही प्रकारच्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. आग्रा, इंदूर या ठिकाणांसह स्थानिक भागांतून मिळून सुमारे ९० ट्रक बटाटे बाजारात दाखल झाल्याने त्यांचे दर उतरले आहेत. मध्य प्रदेशातून साडेचार हजार गोण्या लसूण आली आहे. कोथिंबिरीच्या दीड लाख, तर मेथीच्या ५० हजार गड्ड्यांची आवक झाली आहे. आवक वाढल्याने या दोन्ही भाज्या सामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. हरभरा गड्ड्यांचीही आवक सुरू झाली असून, किरकोळ बाजारात एका गड्डीसाठी १० ते २० रुपये मोजावे लागत आहेत.

............

फुलांमध्ये स्वस्ताई

शोभेच्या फुलांना फारशी मागणी नसल्याने फूलबाजारात सध्या मंदी आहे. सध्या या फुलांची आवकदेखील कमी आहे. मागणी कमी असल्याने कार्नेशन, जरबेरा, डच गुलाब यांच्या दरात घसरण झाली आहे. त्याशिवाय झेंडू, गुलछडी, बिजली यांसारख्या फुलांचे दरदेखील उतरले आहेत.

.........

लिंबे, डाळिंबे महाग

थंडीमुळे लिंबांची आवक घटली असून, त्यांच्या दरात ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या लोणचे उत्पादकांकडून लिंबांची शेतावरच खरेदी केली जात असल्यानेही आवक कमी झाली आहे. त्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसत आहे. डाळिंबाचीही आवक घटली आहे. केवळ २५ ते ३० टन डाळिंबांची आवक झाल्याने दरांत डझनामागे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अननस, चिकू, पेरू, कलिंगड, खरबूज यांसारख्या फळांची आवक व्यवस्थित सुरू आहे. नव्या आणि जुन्या हंगामातील सुमारे ६० ते ६५ टन मोसंबी बाजारात दाखल झाली आहे. चमेली, उमराण, चेकनट प्रकारच्या बोरांचीही आवक वाढू लागली आहे. ५० ते ५५ टन द्राक्षेही बाजारात आली आहेत. स्ट्रॉबेरीची आवकही होऊ लागली आहे; मात्र तिचे प्रमाण जास्त नाही. तीन ते चार हजार पेट्या सफरचंदे आणि सात-आठ हजार पेट्या किन्नू संत्र्यांची आवक झाली आहे.

..................

रशियातील सफरचंदे मार्केट यार्डात दाखल

पुणे : चवीला गोड, रसाळ आणि दिसायला आकर्षक असलेली रशियातील सफरचंदे रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डात दाखल झाली. २२ किलोच्या एका पेटीला १८०० ते २२०० रुपये दर मिळाला असून, किरकोळ बाजारात या सफरचंदाला एका किलोला दीडशे रुपयांचा भाव आला आहे.

मार्केट यार्डात अमेरिकन, तसेच अन्य जातींच्या सफरचंदांची आवक नेहमी होत असते. मार्केट यार्डातील फळ बाजारात रविवारी पहिल्यांदाच रशियातील सफरचंदाच्या दीडशे पेट्यांची आवक झाली. २२ किलोच्या एका पेटीला १८०० ते २२०० रुपये दर मिळाल आहे. या सफरचंदाला सध्या ग्राहक, व्यापारी, तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी आहे. रशियातील रॉयल गाला, रॉयल मस्ट, रेड चीफ या प्रकारच्या सफरचंदांचा त्यात समावेश आहे, अशी माहिती फळांचे व्यापारी युवराज काची यांनी दिली.

‘ही रशियन सफरचंदे चवीला गोड आहेत. त्याशिवाय त्यांचा दर्जा चांगला, आकार मोठा आणि रंग आकर्षक असल्याने त्यांच्याकडे लक्ष वेधले जाते. या फळांना स्थानिक भागासह गोव्यातून मागणी आहे. पुढील तीन महिने या सफरचंदाची आवक सुरूच राहणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.

..............

डाळींचे दर घटायला सुरुवात

तांदूळ, नारळ, शेंगदाणे, साबुदाण्याच्या भावांत वाढ

पुणे : गेल्या वर्षी ज्यांचे दर गगनाला भिडले होते, त्या तूर डाळीसह हरभरा डाळीचे भाव उतरायला सुरुवात झाली आहे. मालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने डाळी पुन्हा आवाक्यात येऊ लागल्या आहेत. त्याशिवाय भाजकी डाळ, बेसनाचे दरही उतरले आहेत; मात्र साबुदाणा, नारळाच्या भावांत थोडीशी वाढ झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरी, खाद्यतेल, मिरची, गोटा खोबरे, भगर, हळद, पोहे, मुरमुरे, कडधान्ये, तसेच अन्य प्रकारच्या डाळींचे दर स्थिर राहिले आहेत.

मार्केट यार्डातील भुसार घाऊक बाजारात नव्या तांदळाची आवक घटली आहे. नोटाबंदीमुळे वाहतुकीचा खर्च करण्यात शेतकऱ्यांना अडचण येत असल्यामुळे आवक घटल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे सध्या तांदूळ ‘भाव’ खायला लागला आहे. कोलम आणि आंबेमोहोर तांदळाच्या दरामध्ये सध्या थोडी तेजी आहे. गेल्या आठवड्यात तूर डाळीच्या दरात क्विंटलमागे एक हजार रुपयांची, तर हरभरा डाळीच्या दरात क्विंटलमागे ५०० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे तूर डाळीचा किलोचा भाव ७० रुपयांपर्यंत, तर हरभरा डाळीचा भाव ९० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

संक्रातीसाठी गुळाला मागणी असल्याने दर तेजीत आहेत. संक्रांतीसाठी पावशेर, अर्धा किलो आणि एक किलो वजनाच्या आकाराच्या गुळाच्या ढेपी बाजारात आल्या आहेत. सध्या स्थानिक भागातून येणारा गूळ महाराष्ट्राच्या विविध बाजारांत विक्रीसाठी जात आहे. तमिळनाडूतून येणाऱ्या नारळाची आवक सध्या कमी झाल्याने नारळाच्या शेकड्याच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली आहे. हरभरा डाळीचे दर उतरल्याने भाजकी डाळ, बेसनाचे भावही घटले आहेत. भाजक्या डाळीच्या दरात ७० ते ८० आणि बेसनाच्या दरात १०० ते १२५ रुपयांची घसरण झाली आहे. घुंगरू जातीच्या शेंगदाण्यांची आवक कमी असल्याने क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झाली आहे.

...........

दर (प्रति क्विंटल, रुपयांत)

तूर डाळ : ६००० ते ७०००

हरभरा डाळ : ८५००ते ९०००

मूग डाळ : ६००० ते ६२००

उडीद डाळ : ८००० ते ८५००

मसूर डाळ : ५८०० ते ५९००

शेंगदाणा : ८००० ते ८४०० (घुंगरू)

साबुदाणा : ६००० ते ६५००

भाजकी डाळ (४० किलो) : ७००० ते ८०००

बेसन (५० किलो) : ४७५० ते ५१००

नारळ (शेकडा)

नवा माल : ७५०० ते ८५००

पालखोल : १००० ते ११००

मद्रास : २००० ते २२००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारची सकाळ ठरली ऊर्जादायी

$
0
0

कोथरूडवासीयांनी लुटला ‘हॅपी स्ट्रीट’चा मनसोक्त आनंद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सुट्टीच्या दिवशी कुडकुडवणाऱ्या थंडीचा आनंद घेऊन ब्लँकेटमध्ये गुरफटून उशिरापर्यंत पडून राहायचे, निवांत उठून जेवणाच्या वेळेत नाष्टा घेऊन भटकंतीला बाहेर पडायचे, अशी मानसिकता असलेल्या कोथरूडमधील शेकडो नागरिकांसाठी रविवार ‘हटके’ ठरला. घरातील लहान मुलांसह भल्या सकाळीच उत्साहात घराबाहेर पडून या नागरिकांनी मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला. बघता बघता हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले अन् ‘हॅपी स्ट्रीट’ची गल्ली नागरिकांच्या गर्दीने फुलून गेली.

‘झुंबा’च्या तालावर थिरकरणारी तरुणाई, कुठे झेंबे वादनाचा ठेका धरलेले आबालवृद्ध, स्केटबोर्डवरून वाऱ्याच्या वेगाने फिरणारे विद्यार्थी, तर काही ठिकाणी दोर ओढण्यासाठी ताकद लावणाऱ्या कुटुंबांचे समूह...सकाळच्या प्रसन्न वातावरणात अशी सामूहिक धमाल करण्याचा अनुभव कोथरूडवासीयांनी घेतला. कोथरूड येथील आशिष गार्डन परिसरातील श्रीकांत ठाकरे रस्त्यावर आयोजित केलेल्या ‘हॅपी स्ट्रीट’ उपक्रमाला नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, व्हीजे डेव्हलपर्स आणि पुणे पोलिस, पुणे वाहतूक पोलिस, पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. उजाडण्यापूर्वीच नागरिकांची या रस्त्यावर वर्दळ सुरू झाली होती आणि साधारणतः साडेआठच्या दरम्यान अनेक उत्साही नागरिक या रस्त्यावर खेळण्यामध्ये मग्न होते. सर्वाधिक प्रतिसाद झुंबा आणि ड्रम सर्कलला मिळाला. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकही झेंबेवादनात मग्न झाले होते. प्राथमिक वादनापासूनचा हा तालप्रवास जुगलबंदीपर्यंत रंगला. स्ट्रीट आर्ट झोन हे लहान मुलांसाठी आकर्षण ठरले. छोट्या सायकल घेऊन मुले मनसोक्त फिरत होती. स्केटबोर्ड आणि वेव्हबोर्ड घेऊनही अनेक मुले सहभागी झाले होती. ‘जोर लगाके हैया’ म्हणत ज्येष्ठांबरोबरच लहान मुलांनीही रस्सीखेच करण्याचा अनुभव घेतला.

‘आजूबाजूच्या सोसायट्यांतील मैत्रिणी, परिचयातील कुटुंबांनी एकत्र येऊन एखाद्या सकाळी गेट-टुगेदर करू, असे आम्ही वर्षभर ठरवत होतो; पण वेळ ठरत नव्हती. ‘हॅपी स्ट्रीट’मुळे आमचे अचानक गेट-टुगेदर झाले. सगळ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आम्ही दोन दिवस आधीच ठरवले होते आणि त्याप्रमाणेच सगळे जण सहभागी झालो. सगळ्या खेळांचा आम्ही मनसोक्त आनंद लुटला,’ असे नीला खरे यांनी सांगितले.

‘हॅपी स्ट्रीटसाठी सकाळी सात वाजता कोथरूडमध्ये ये,’ असा मेसेज माझ्या मित्राने केला होता. एवढ्या थंडीत सकाळी कसे बाहेर पडायचे, असा विचार आल्यामुळे मी कंटाळा करत होतो; पण इथे आल्यावर आठवड्याचा कामाचा थकवा दूर झाला. झुंबा आणि झेंबेवादनामुळे एकदम ताजेतवाने झाल्यासारखे वाटले,’ असे अंकुश माने याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमबीबीएसना आयुर्वेदात एमडी?

$
0
0

‘आयुष’ने ठेवला ‘सीसीआयएम’समोर प्रस्ताव; चर्चेनंतर होणार अंतिम निर्णय
Mustafa.Attar@timesgroup.com
Tweet : @MustafaAttarMT
पुणे : आयुर्वेद-अॅलोपॅथी या दोन पॅथींमध्ये देशभर ‘क्रॉसपॅथी’चा वाद सुरू असताना एमबीबीएस डॉक्टरांना आता ‘आयुर्वेदा’मध्ये ‘एमडी’ पदवी संपादन करण्यासाठी आयुर्वेदाचे दरवाजे खुले करण्याचा प्रस्ताव ‘आयुष’ने ठेवला आहे. या प्रस्तावावर आयुर्वेदाची परिषद असलेल्या ‘सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन’च्या (सीसीआयएम) काही सदस्यांनी विरोध दर्शविताना ‘क्रॉसपॅथी’चा मुद्दा निकालात काढण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आयुष विभागाच्या झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या संदर्भात काही मुद्दे उपस्थित करून या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करण्याची सूचना ‘सीसीआयएम’च्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी ‘आयुष’ला केली. या प्रस्तावामुळे आयुर्वेद क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
एमबीबीएस झालेल्या परदेशातील अनेक डॉक्टरांना आयुर्वेदामध्ये एमडी करण्याची इच्छा आहे. त्याकरिता हे डॉक्टर भारतात येऊन पदवी संपादन करण्याचा प्रयत्न करतात. परदेशासह भारतातील 'अॅलोपॅथी'च्या ‘एमबीबीएस’ डॉक्टरांसाठी ‘आयुर्वेदात एमडी’ करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. यामुळे आयुर्वेदाचा जगात प्रचार, प्रसार करणे शक्य होईल असा प्रस्ताव ‘आयुष’ने ठेवला आहे. त्यावर ‘सीसीआयएम’चे मत मागवले आहे. ‘आयुर्वेदात एमडी पदवी घेण्याची एमबीबीएस डॉक्टरांना परवानगी देताना ‘क्रॉसपॅथी’च्या गोष्टी तपासून घ्याव्यात. त्या संदर्भात मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय), केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयुष तसेच ‘सीसीआयएम’ या सर्वांचे मत विचारात घेण्याचे ठरले आहे,’ अशी माहिती ‘सीसीआयएम’चे कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर थोरात यांनी ‘मटा’ला दिली. हा अभ्यासक्रम तयार करताना वेगळा पॅटर्न मांडण्यात यावा. तसेच ‘बीएएमएस’नंतर तीन वर्षांचा ‘एमडी’चा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे ‘आयुष’ने याबाबत सर्व घटकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असे डॉ. थोरात यांनी स्पष्ट केले.
‘क्रॉसपॅथी’वरून देशात वाद सुरू असताना ‘आयुष’ने एमबीबीएस डॉक्टरांसाठी आयुर्वेदाच्या पायघड्या घालण्याची तयारी सुरू केली आहे. ‘आयुष’च्या या प्रस्तावाबाबत ‘सीसीएमएम’च्या काही माजी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘एमबीबीएस डॉक्टरांना आयुर्वेदात एमडी करण्यास परवानगी द्यायची असेल तर आयुर्वेदाच्या डॉक्टरांना ‘एमडी मेडिसीन’ करण्याची संधी हवी,’ अशी मागणी ‘सीसीआयएम’चे माजी सदस्य डॉ. सुहास परचुरे यांनी केली.
....
एमबीबीएस डॉक्टरांना आयुर्वेदात एमडी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, या संदर्भात ‘आयुष’च्या बैठकीत चर्चा करण्यात आली. परंतु, या संदर्भात ‘सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन’च्या (सीसीआयएम) बैठकीत चर्चा व्हायची आहे. त्यानंतर त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
- मनोज नेसरी, सल्लागार, आयुष
....
आयुर्वेदाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या एमबीबीएस डॉक्टरांना आयुर्वेदात एमडी करण्यास परवानगी द्यायची असेल तर आयुर्वेदाच्या डॉक्टरांना देखील ‘एमडी मेडिसीन’ करण्याची संधी मिळायला हवी.
- डॉ. सुहास परचुरे, माजी सदस्य, सीसीआयएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images