Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्यात हंगामातील नीचांकी तापमान

$
0
0

आठ अंश सेल्सिअसची नोंद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील थंडीचा प्रवास गुलाबी थंडी आ‌णि हुडहुडी भरविणाऱ्या थंडीपासून आता गोठविणाऱ्या थंडीकडे होऊ लागला आहे. शहरात गुरुवारी यंदाच्या हंगामातील नीचांकी; तसेच राज्यातीलही नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत किमान तापमानात आणखी किचिंत घट होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गुरुवारी शहरात २९.५ अंश सेल्सिअस इतके कमाल, तर ८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. गेल्या तीन चार दिवसांत शहरातील थंडी कमालीची वाढली आहे. दिवसभर उन्हामुळे किंचित उकाडा जाणवत असला, तरी सायंकाळनंतरची थंडी आणि बोचरे वारे पुणेकरांना हुडहुडी भरवत आहे. पहाटेच्या वेळी तर ही थंडी आणखी वाढल्याचे जाणवत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी पुणेकरांनी स्वेटर, शाली, कानटोप्या, जर्किन, मफलर अशा आयुधांचा वापर सुरू ठेवला आहे. त्यातच काही ठिकाणी शेकोट्याही पेटविण्यात येत आहेत. या शिवाय थंडीचा कडाका कमी करण्यासाठी रात्री मसाला दूध, चहा, गरम कॉफी किंवा सूप पिण्यासाठीही गर्दी होत आहे.
पुण्याबरोबरच राज्यातही कडाक्याच्या थंडीचे बस्तान कायम आहे. गुरुवारी नाशिक येथेही पुण्याइतकेच म्हणजे आठ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. जळगाव येथे ९.४, सातारा येथे ९.५, उस्मानाबाद येथे ८.९, गोंदिया येथे ८.६, अमरावती येथे ९.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले.
संपूर्ण राज्यात हवामान कोरडे आहे. परिणामी हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने कडाक्याच्या थंडीचा मुक्काम वाढणार आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून पुण्याचा पारा ७ अंशांपर्यंत उतरण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बलात्कार, वाहनचोरी, फसवणूक वाढली

$
0
0

पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची मा‌हिती; गंभीर गुन्ह्यांमध्ये घट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे पुणे पोलिस आयुक्तालयात गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. मात्र, सायबर गुन्हे, बलात्कार, वाहनचोरी, फसवणूक या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. वाहनचोरी ही पोलिसांपुढील डोकेदुखी ठरत असून त्यावर काम सुरू आहे. मात्र, पुणे पोलिसांच्या कामगिरीवर समाधानी आहे,’ अशी माहिती पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे पोलिस आयुक्तालयातील २०१६ च्या गुन्हेगारीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सहपोलिस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. शुक्ला म्हणाल्या, ‘शहरात २०१६ मध्ये खुनाचे १३० गुन्हे घडले आहेत. त्यापैकी १२२ गुन्हे उघडकीस आले आहेत, तर खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्षुल्लक कारणांवरून खुनाच्या प्रयत्नाच्या घटना घडल्याचे दिसून आले आहे. दरोडा, सोनसाखळी चोरी, जबरी चोरी, रात्री घरफोडी या गुन्ह्यांत घट झाली आहे. सदोष मनुष्यवध, नवविवाहितेचे मृत्यू, दिवसा घरफोडी, वाहनचोरी, पॉकेट चोरी, विश्वासघात, फसवणूक, दंगा, बलात्कार, एनडीपीएस गुन्ह्यांतही वाढ झाली आहे.’
‘गेल्या वर्षभरात पोलिसांनी ५० गुन्हेगारी टोळ्यांतील १६६ आरोपींना अटक केली; सोनसाखळी चोरी कमी करण्यातही यश आले असून यामध्ये ५७ टक्क्यांनी घट झाली आहे. अकरा टोळ्यांमधील १३७ आरोपींना अटक करत ७९ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घरफोडीच्या १४ टोळ्या उघडकीस आणल्या आहेत. मोबाइल चोरणाऱ्या चार टोळ्यांमधील ५२ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे; तसेच २५ गुन्हेगारांवर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन डेंजरस अॅक्टीव्हीटीनुसार (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. दहा टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे; तसेच आर्म अॅक्टचे ११३ गुन्हे दाखल करत १५० आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १५९ पिस्तुल आणि ४०२ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत,’ अशी मा‌हितीही शुक्ला यांनी ‌दिली.

सव्वा दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त
पुणे पोलिस आयुक्तालयात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार ६३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ८१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. वर्षभरात तब्बल दोन कोटी २५ लाख ६४ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. २०१५ च्या तुलनेत गेल्या वर्षी कारवाईमध्ये सात टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले
शहरात गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली आहे. २०१५ मध्ये पुण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांत गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण १५.८४ टक्के होते. मात्र, राज्य सरकार व पोलिसांकडून केलेल्या उपाययोजनांमध्ये वाढ झाली आहे. या वर्षी गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण ३६ टक्क्यांवर गेले आहे.

गुन्हे शाखेपेक्षा पोलिस ठाणी सरस
पोलिस ठाण्यांना विविध कामे असतात. तरीही झोनच्या पोलिस उपायुक्तांकडून खूपच चांगली कामगिरी होत आहे. गुन्हे शाखा फक्त गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करते. तरीही गुन्हे शाखेपेक्षा पोलिस ठाण्यांचे काम चांगले आहे. पोलिस ठाण्यांचे काम दिवसेंदिवस चांगले होत आहे. पोलिस ठाण्यांच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

वाहतूक सुधारणेत कमी
शहरातील वाहतूक सुधारणेत कमी पडत असल्याची कबुली पोलिस आयुक्तांनी दिली. नवीन वर्षात वाहतूक सुधारणेबरोबरच महापालिकेच्या निवडणुका भयमुक्त वातावरण व शांततेत पार पाडणे यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. पुण्यातील ३९ पोलिस ठाणी स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जबरी चोरी व सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यावर लक्ष राहणार आहे. महिला व तरुणींच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आमचे कर्तव्य आहे. नवीन वर्षात पेंडींग गुन्हे कमी करण्याचे प्रयत्न राहतील. सराईत गुन्हेगार, लॅन्डमाफिया यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नवीन वर्षात कमी पडणार नसल्याची ग्वाही पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांना ‘व्हॉट्सअॅप’वर गृहपाठ समजणार!

$
0
0

Harsh.Dudhe@timesgroup.com
Tweet : @HarshDudheMT

पुणे : इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांसमोर मराठी शाळांचा ‌टिकाव लागतो की नाही, अशी परिस्थिती असताना पेरुगेट येथील मुलांच्या भावे हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेने ‘डिजिटल होमवर्क’ (गृहपाठ) ही नावीन्यपूर्ण संकल्पना आणली आहे. शिक्षकांनी दिलेल्या गृहपाठाची माहिती पालकांना व्हावी आणि विद्यार्थ्यांनी ते करावे यासाठी शाळेने ‘स्मार्टफोन’ व ‘व्हॉट्सअॅप’चा प्रभावी वापर केला आहे. त्या अंतर्गत शाळेतील सुमारे अठराशे विद्यार्थ्यांचा वर्गांनुसार त्यांच्या पालकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक्स यंत्रणेद्वारे घेऊन या शाळेने राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यातील पुढील टप्पा म्हणून ‘डिजिटल होमवर्क’चा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामध्ये वर्गशिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे ‘व्हॉट्सअॅप’वर ग्रुप तयार केले आहेत. ग्रुपमध्ये आठवड्याचे गृहपाठ दिवसानुसार टाकण्यात येणार आहेत. त्यामध्ये सोमवारी, मंगळवारी भाषा विषयाचे, बुधवारी, गुरुवारी इतिहास आणि भूगोलचा गृहपाठ देण्यात येणार आहे. शुक्रवारी आणि शनिवारी विद्यार्थ्यांना तुलनेने अवघड वाटणाऱ्या गणित आणि विज्ञान या विषयांचे गृहपाठ टाकण्यात येईल. त्यामुळे रविवारी ते करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळेल, असे प्राचार्य के. एन. अर्ना‍ळे यांनी सांगितले.
‘डिजिटल होमवर्क’ संकल्पना राबविण्यासाठी इयत्ता पाचवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वर्गांनुसार सुमारे ३५ ग्रुप तयार केले आहेत. यात सुमारे अठराशे विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांला काय गृहपाठ दिला आहे, याची माहिती होईल. या प्रत्येक ग्रुपवर वर्गशिक्षकांचे नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत काय गृहपाठ दिला जातो, याची माहिती मिळेल. त्याचबरोबर आपला पाल्य शाळेत दिलेला गृहपाठ करतो की नाही, याकडेही लक्ष ठेवता येणार आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या तुलनेत मराठी शाळाही मागे नाहीत, त्यामुळेच ‘बायोमेट्रिक्स’ आणि ‘डिजिटल होमवर्क’ सारखे प्रयोग राबविण्यात येत आहे.
आज, शुक्रवारी माजी विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत या संकल्पनेचा शुभारंभ होईल, असेही अर्नाळे यांनी सांगितले.

शाळेत दिल्या जाणाऱ्या गृहपाठाची माहिती विद्यार्थी त्यांच्या पालकांना देत नाहीत. त्यामुळे पालकसभेत पालक शिक्षक विद्यार्थ्यांना गृहपाठच दिला जात नसल्याच्या तक्रारी करतात. हे लक्षात आल्यानंतर, शाळेतील किती पालकांकडे स्मार्टफोन आहेत, याची माहिती घेण्यात आली. त्यानंतर डिजिटल होमवर्क ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना होईल, अशी आशा आहे.
- के. एन. अर्नाळे, प्राचार्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कवितेतून विश्वाचा शोध घ्यावा्’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘कवीला कवितेची देवता प्रसन्न झाली तरच त्याची कविता बहरत जाते. कवितेची सेवा केल्यानंतरच कवितेची देवता कवीला प्रतिष्ठा प्राप्त करून देते. कवीने त्याच्या कवितेतून विश्वाचा शोध घ्यायचा असतो त्या शोधातून त्याला काय मिळते यावर त्याच्या कवितेचे पूर्णत्व अवलंबून असते,’ असे सांगत ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांनी कवी आणि कवितेचे नाते उलगडले.
दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित सुरेश व सुजाता नातू लिखित कवडसे या काव्यसंग्रहाचे व रुपेरी वाळूतील पाउलखुणा या पुस्तकाचे प्रकाशन भारत सासणे व डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी सासणे यांनी कवितेच्या सेवेने उलगडत जाणारी कवीची प्रतिमा रसिकांसमोर मांडली. रोटरी क्लबचे दीपक शिकारपूर, मोहन पालेशा, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे आदी या वेळी उपस्थित होते.
‘कवितेची देवता तिच्या उपासकांना भेटते फक्त तो काळ प्रत्येकाच्या आयुष्यात यावा लागतो. कवीने कवितेच्या पलीकडे जाऊन विश्वाचा शोध घ्यावा. त्या वेळी हाती काय पडते, यावर कवीची प्रतिभा ठरते. सुजाता नातूंच्या कवडसे या काव्यसंग्रहातून कवितेचा आणि नृत्याचा संबंध उलगडला आहे. त्यांच्या कवितेतून एकप्रकारचे नृत्यच डोकावते. सुरेश नातू यांच्या पुस्तकातून देखील त्यांचे कवी मन समोर उभे राहते,’ असे सासणे यांनी सांगितले.
डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, कवितेचा जीवंतपणा अधिकाधिक अधोरेखित करण्यासाठी कवीकडे एकप्रकारची दृष्टी असावी लागते. कविता आत्मिक आनंदासाठी रचली जाते. सुजाता नातू यांच्या कविता रोजच्या जगण्यातल्या गोष्टींकडे माणसाचा पाहण्याचा जो दृष्टीकोन आहे, त्यातील गोडवा विलक्षण आहे. छोट्या-छोट्या गोष्टीतून जीवन जगण्याचा अनोखा अनुभव कवितेतून नातू यांनी मांडलेला आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सुजाता नातू आणि सुरेश नातू यांनी लग्नाची ५० वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने त्यांची मुलाखत घेण्यात आली. एकत्र सहवासात आलेली सुखदुःखांचे प्रसंग नातू दाम्पत्याने या वेळी रसिकांसमोर उलगडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन्यजीव छायाचित्र लाइकपुरतीच: वन्यजीव छायाचित्रकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘वन्य जीवनाचा फक्त फोटो काढून तो फेसबुकवर टाकणे उपयोगाचे नाही. तर वन्य जीवनाविषयी माहिती करून घेणे आवश्यक आहे. वाइल्ड लाइफ फोटोग्राफीचे प्रमाण वाढत आहे; पण त्याचा निसर्गाला व पक्षी, प्राण्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. वन्य जीवनाची माहिती नसल्याने अनेकांची वाइल्ड लाइफ फोटोग्राफी केवळ फेसबुकवर लाइक, कमेंटपुरती उरते,’ असे निरीक्षण वन्य जीवनातील हौशी छायाचित्रकारांनी शुक्रवारी नोंदविले.
किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवात वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध छायाचित्रकार दिनेश कुंबळे यांच्या हस्ते झाले. यामध्ये चंद्रपूरच्या अमोल बैस या छायाचित्रकाराने प्रथम, पुण्याच्या इंद्राणी बासू याने द्वितीय, सांगलीच्या सार्थक पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला. अनिता किंद्रे, स्वप्नील पवार, नितीन सोनवणे, संग्राम गोवर्धने यांना पारितोषिक मिळाले. या निमित्त प्रदर्शनाच्या पूर्वी आयोजित वार्तालपात या छायाचित्रकारांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘फोटोग्राफी ही खर्चिक बाब आहे. महागडा कॅमेरा विकत घेऊन व खर्च करून छायाचित्रकाराला फिरावे लागते. अशा परिस्थितीत प्रत्येकाला चांगला फोटो मिळेलच असे नसते. वन्यजीव छायाचित्रणात व्यावसायिकता आणू नये. प्रसिद्धी मिळेल हा हव्यास छायाचित्रकारांनी टाळायला हवा,’ असे मत बैस याने व्यक्त केले. ‘मी काढलेल्या वाघाच्या छायाचित्रावर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून टपाल तिकीट निघाले. वाघाचा बछडा व त्याची आई यांचे प्रेम मी माझ्या छायाचित्रातून टिपले आहे. प्राण्यांनाही भावना असतात, हे या छायाचित्रातून दिसते. त्यामुळे वाघ वाचवा हा संदेश पुढे जायला मदत होईल,’ अशी भावना बैस याने व्यक्त केली.
‘वन्यजीव छायाचित्रण ही मोठी प्रक्रिया आहे. सुरुवातील फेसबुक पुरते हे छायाचित्रण असते. वन्यजीवनाचे भान बाळगणे आवश्यक आहे. कारण निसर्ग राहिला तर वाइल्ड लाइफ फोटोग्राफी राहील,’ याकडे बासू याने लक्ष वेधले.
‘फोटो काढून फेसबुकवर टाकणे हे केवळ उपयोगाचे नाही, हे छायाचित्रकारांनी लक्षात घ्यायला हवे. छायाचित्रणाबरोबर निसर्गाची माहिती घ्यायला हवी. पक्षी, प्राण्यांचे जवळून फोटो काढताना फ्लॅश वापरू नये, हे साधे तत्त्व पाळायला हवे. तसेच फोटो काढताना आवाज न करता जवळ जाऊन पुन्हा तसेच मागे फिरता आले पाहिजे. आपल्या एका फोटोसाठी प्राण्यांना त्रास देणे योग्य नाही,’ यावर गोवर्धने याने बोट ठेवले.
केंद्रीय जलअकादमी (सीडब्ल्यूपीआरएस) चे संचालक डॉ. मुकेश कुमार सिन्हा यांनी सरकारच्या विविध धोरणांबाबत पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, 'नदी स्वच्छतेच्या कामात नागरिकांचा व उद्योगांचा सहभाग वाढवण्यासाठी जागृती निर्माण करण्याची गरज आहे. हे काम केवळ सरकारचे नसून ती लोकांची चळवळ व्हायला हवी. गंगा, भागिरथी या नद्यांसाठी सरकारच्या पातळीवर काम सुरू आहे. विविध समित्या त्यासाठी नेमण्यात आल्या आहेत. नद्यांच्या सुधारणेसाठी गंगा कायदा केंद्र सरकार तयार करत असून त्याचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे. कचरा नदीमध्ये टाकण्याऐवजी तो योग्य ठिकाणी जिरवल्यास अनेक प्रश्न सुटतील.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वेदपाठशाळांची अवस्था बिकट’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देशातील मदरशांना सरकारतर्फे ६०० कोटींची मदत करण्यात येते; पण वेदपाठशाळांना सहा रुपये देखील मिळत नाहीत. देशातील वेदपाठशाळांची अवस्था बिकट असून, मदतीविना ही विद्या लुप्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वेदपाठशाळेत घनपाठी तयार झाल्यानंतर त्याने पुढे काय करायचे; ही गंभीर समस्या आहे,’ या शब्दांत वेदभवनचे प्रधानाचार्य वेदमूर्ती मोरेश्वर घैसास यांनी गुरुवारी वेदपाठशाळांच्या अवस्थेकडे लक्ष वेधले.
‘इंग्रज आल्यापासून वेदांचा राजाश्रय संपला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजाश्रयाची संकल्पना राहिली नाही. वेदपाठशाळेत घनपाठी तयार होतात; पण त्यांना नोकरी नाही. त्यामुळे ते पौराहित्यात अडकून पडतात. हे एक प्रकारे अवमूल्यन आहे. सरकार वेदपाठशाळांसाठी काहीही करत नाही,’ अशी टीका घैसास यांनी पत्रकारांशी बोलताना केली. ‘वेदपाठशाळा चालवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. गुरुजींना चांगले मानधन द्यावे लागते. घनपाठी घडतात, पण त्यांना पुढे काही मार्ग नसतो. विद्यापीठांमधील वेदाभ्यास हा वरवरचा असतो. त्यांना वेदांचे पठण करता येत नाही. वेदांमध्ये अष्टविकृतीला महत्त्व आहे. एखादी व्यक्ती काय म्हणते याला महत्त्व नसून ती या अष्टविकृतीमध्ये वेदांचे पठण करते का हे तपासावे लागते. विद्यापीठांमध्ये अशा प्रकारे अध्ययन होत नाही. विद्यापीठांमध्ये घनपाठींनी रुजू करून घेतले तर हे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत जाईल तसेच योग्य ज्ञानाचा प्रसार होईल,’ याकडे घैसास यांनी लक्ष वेधले.


चार वेदांचे अध्ययन केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. वेदांचा अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा, यासाठी वडिलांनी प्रयत्न केला होता. पण, पुढे काहीही झाले नाही. वेदांच्या अभ्यासाला विद्यापीठ स्तरावर मान्यता, वेदपाठशाळांना निधी व मान्यता याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बोलणी सुरू आहे. महर्षि सांदिपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान उज्जैन या संस्थेमार्फत केंद्र सरकार देशातील विविध ३०० पाठशाळांना अनुदान देते. पण ते अगदी तुटपुंजे असते. इंदिरा गांधींच्या काळात संस्था स्थापन झाली. पण तेव्हापासून वेदपाठशाळांना भरीव मदत मिळाली नाही.
- वेदमूर्ती मोरेश्वर घैसास

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कविता आणि कवितेतील गाणे साधणार ‘संवाद’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
कवितेचे गाणे होतानाचा प्रवास संगीतकार गायक डॉ. सलील कुलकर्णी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांसमोर उलगडणार आहेत. उद्याच्या रविवारपासून (दि. ८) त्यांचे ‘कवितेचे गाणे होताना’ हे पाक्षिक सदर ‘संवाद’ या पुरवणीतून वाचकांसमोर येणार आहे. विविध कवितांविषयीच्या गोष्टी आणि प्रत्यक्षात ती चाल, गाण्यातून समोर येणारे शब्द हे सारे या सदरातून अनुभवता येणार आहे. प्रत्यक्ष कविता, गाणे, गायक आणि संगीतकार हे सारे एकाच सदरातून भेटविण्याचा हा अभिनव प्रयोग आहे.
विविध कवींच्या कविता आपल्याला वेगवेगळ्या वेळी, वयात भेटतात. आपल्याला त्या जशा जाणवतात, तशाच संगीतकारालादेखील भेटतात. एखादी कविता भेटणे आणि तिचे गाणे होणे, हा प्रवास संगीतकाराच्या नजरेतून अनुभवता यावा, त्या शब्दांची गंमत उमजावी आणि त्या प्रवासातील आपणही साथीदार व्हावे, असे अनेकांना वाटत असते. डॉ. सलील कुलकर्णी यांच्या दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातून ही अनुभूती वाचकांना देण्याचा ‘महाराष्ट्र टाइम्स’चा प्रयत्न आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वेबसाइटवर त्याच दिवशी हे सदर पाहता आणि अनुभवता येईल. अशा प्रकारे कविता आणि गाणे यांच्या मुळाशी जाणारे, वाचकांना त्याची विविधांगाने अनुभूती देणारे सदर, हा मराठीमधील पहिलाच प्रयत्न असावा. या सदरातून सलील हे संत कवी, विंदा करंदीकर, शांता शेळके, ग्रेस, आरती प्रभू यांच्यापासून आजच्या काळातील कवी संदीप खरे यांच्यापर्यंतच्या विविध कवितांविषयी बोलणार आहेत.
‘आपण एखादी कविता वाचताना आपल्या अनुभवानुसार, संवेदनशीलतेनुसार तिचे चित्र समोर उभे राहते. माझ्या या लेखनातून वाचकांपुढेही अशी कवितेची चित्रे उभी करण्याचा हा एक प्रयत्न आहे,’ असे सलील सांगतात. ही कविता आपल्या आत्म्याला भिडली, की ती आपल्याशी संवाद साधू लागते. अशा संवाद साधणाऱ्या कवितांविषयी ते या सदरातून बोलणार आहेत. त्यांची चाल कशी घडत गेली, हेही सांगणार आहेत. कवितेतील एखादा शब्द, त्या शब्दाचे स्थान आणि त्याचे महत्त्व याविषयीदेखील त्यांच्या लेखनातून चर्चा होईल. प्रत्येक कविता वाचणाऱ्या प्रत्येकाला वेगळेपणाने दिसते, भावते. एका संगीतकाराला, त्याच्या संवेदनशील मनाला ती कशी दिसली, हे या सदरातून वाचकांपर्यंत पोहोचेल.


या सदरातून कवितेचा अर्थ सांगावा किंवा संगीताचे व्याकरण समजवावे, हा हेतू नाही. कवितेचा आत्मा समजून घेणे आणि संगीताचा आनंद घेण्याचा हा सोहळा असेल.
- डॉ. सलील कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीई प्रवेश लवकरच

$
0
0

राज्यात जानेवारीच्या अखेरीस सुरू होणार प्रक्रिया

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी जानेवारीच्या अखेरीस सुरू होणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना किलोमीटरची अट नसेल, अशी शक्यता आहे. तशा सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षण खात्याला केल्या आहेत. त्यामुळे या वर्षी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होऊन शाळा सुरू होण्यापूर्वी संपेल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेमधून एका लाखाच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांना शाळेच्या ‘एन्ट्री पॉइंट’नुसार राखीव जागांवर प्रवेश मिळतो. मात्र, प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून ही प्रवेश प्रक्रिया नेहमी उशिरा म्हणजेच एप्रिल किंवा मे महिन्यात सुरू होते, अशी पालकांची आणि संघटनांची तक्रार असते. इंग्रजी माध्यमांच्या शाळा नेमक्या त्याच काळात सुरू होतात. त्यानंतर त्यामध्ये पालकांना आणि शाळांना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी यामुळे प्रवेश प्रक्रिया भरपूर रेंगाळते. गेल्या वर्षी ही प्रवेश प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरू होऊन नोव्हेंबर महिन्यांपर्यत रेंगाळली होती. त्यामुळे पालकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला होता. या कारणाने अनेक संघंटनांनी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने यावर्षीपासून आरटीई प्रक्रिया लवकर सुरू करण्याच्या हालचाली केल्या. प्रक्रिया लवकर सुरू करण्याबाबतच सविस्तर अहवाल शिक्षण खात्याकडे पाठविण्यात आला असून येत्या काही दिवसांत त्यावर निर्णय येणे अपेक्षित आहे. सध्या, आरटीई प्रवेश प्रक्रियेमधून गरजू विद्यार्थ्यांना घरापासून एक किंवा तीन किलोमीटरच्या आतील शाळेत राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेश मिळतो. मात्र, यंदा ही किलोमीटरची अट काढून टाकण्याबाबतच्या सूचना या अहवालात दिल्या आहेत. काही पालकांनी देखील ही अट काढण्याची मागणी केली होती.

ऐनवेळची धावपळ टळणार

आरटीईची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू झाल्यास पालकांची ऐनवेळी होणारी धापळ होणार नाही. तसेच, शाळेमध्ये प्रवेशासाठी पुरेसा कालावधी मिळेल आणि प्रवेश प्रक्रिया रेंगाळणार नाही. सर्वांत महत्वाचे म्हणजे खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा या इतर शाळांच्या तुलनेत म्हणजेच जून महिन्यापूर्वी सुरू होतात. त्यामुळे या शाळांमध्ये प्रवेश घेताना पालकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. तो सामना करण्याची आवश्यकता भासणार नाही, असे पालकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खूनप्रकरणी तरुणाला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्यामुळे तिच्या प्रियकरावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याप्रकरणी एका तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि ५,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवाणी यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

आकाश मुकेश शेलार (वय २१, रा. सिद्धीविनायक अपार्टमेंट, ओंकारेश्वर नगर, सिंहगड रोड) याला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. या केसचे कामकाज अतिरिक्त सत्र वकील जावेद खान यांनी पाहिले. त्यांनी या केसमध्ये १२ साक्षीदार तपासले. लक्ष्मीकांत गजानन भिसे (वय २० रा. जनवाडी, गोखलेनगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. १९ फेब्रुवारी २०१४ रोजी सूर्यनंदा लॉन्सशेजारी राजाराम पुलाजवळ रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. फिर्यादी लक्ष्मीकांतचा भाऊ विशाल भिसे आणि त्याची प्रेयसी रेश्मा यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी विशाल हा बाहेर जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर लक्ष्मीकांत यांना शेजारी राहत असलेल्या एका व्यक्तीचा फोन आला. तुझ्या भावाला दीनानाथ हॉस्पिटल येथे अॅडमिट केले आहे, असे त्याने सांगितले. हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेण्यात आलेल्या विशालच्या अंगावर चाकूने वार करण्यात आले होते. याप्रकरणी रेश्माला विचारले असता तिने आकाश आणि विशालमध्ये बाचाबाची झाली. त्यात आकाशने चाकूने​ विशालवर चाकूने वार केले. त्यांच्या झटापटीत रेश्माच्या डाव्या मांडीला जखम झाली. घटनास्थळी जमा झालेल्या लोकांनी आणि पोलिसांनी आकाशचा पाठलाग करून त्याला पकडले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौघा आरोपींच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नाटककार राम गणेश गडकरी यांचा संभाजी उद्यानातील पुतळा हटविल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या अटक केलेल्या चार कार्यकर्त्यांची पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सू्त्रधाराचा शोध घ्यायचा आहे, त्यासाठी आरोपींकडे अधिक तपास करण्यासाठी त्यांची पोलिस कोठडी वाढविण्यात यावी, अशी विनंती सरकार पक्षाकडून करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवेपाटील यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
दरम्यान, पोलिसांवर राजकीय दबाव असून, दबावाखाली तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी राजकीय क्षेत्रातील व्यक्तीचे नाव घेण्यासाठी पोलिसांकडून आरोपींवर दबाव टाकण्यात येत असल्याचा अर्ज आरोपींच्या वकिलांनी कोर्टासमोर सादर केला. पोलिसांनी या प्रकरणी हर्षवर्धन महादेव मगदूम (वय २३, रा. बालाजीनगर), प्रदीप भानुदास कणसे (२५, रा. नऱ्हे, आंबेगाव), स्वप्नील सूर्यकांत काळे ( २४ रा. चऱ्होली), गणेश देविदास कारले (वय २६ रा. चांदूस, ता. खेड) या चौघांना अटक केली आहे. छत्रपती संभाजी उद्यानाचे उद्यानप्रमुख अशोक घोरपडे ( ४७, रा. वडगावशेरी) यांनी फिर्याद दिली आहे.
अटक आरोपींनी संगनमत करून संभाजी उद्यानातील गडकरी यांचा पुतळा तीन जानेवारी रोजी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास हटविला. गडकरी यांचा अर्धपुतळा हातोडा आणि कुऱ्हाडीने घाव घालून खाली पाडण्यात आला. त्यामुळे सरकारी मालमत्तेचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान केले. गडकरी यांनी संभाजी महाराजांविषयी बदनामीकारक लिखाण केले असून, त्याचा निषेध म्हणून आम्ही हे कृत्य मराठा असल्यामुळे केले आहे अशी व्हिडिओ चित्रफित तयार करून ती सोशल माध्यमांतून प्रसारित केली. आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले. ‘या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आहेत याचा तपास करण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडी वाढवून देण्यात यावी,’ अशी विनंती सहायक सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केली. बचाव पक्षातर्फे अॅड. मिलिंद पवार, अॅड. रविराज पवार, अॅड. सुहास फराडे, अॅड. विजय शिंदे, अॅड. विश्वजित पाटील यांनी बाजू मांडली.
आरोपींच्या उपस्थितीत नदीपात्रातून पुतळा मिळविण्यात यश आल्याने पोलिस कोठडीची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे


हेल्मेट न घालता दबंगगिरी करणाऱ्या पोलिसांवर आता संक्रात येणार आहे. हेल्मेट न घालणारे पोलिस पकडले गेले, तर ही नोंद थेट सेवा पुस्तकात (सर्व्हिस रेकार्ड) घेतली जाणार आहे. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी तसे आदेशच दिले असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी ही पोलिसांपासून सुरू करण्यात आली आहे. यापूर्वीही वारंवार आदेश देत पोलिसांना हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. मात्र, पहिल्यांदाच नियम मोडल्याप्रकरणी त्याची नोंद सेवा पुस्तकात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशामुळे पोलिसांना धडकीच भरली असून हेल्मेट घेण्यासाठी धावपळही सुरू झाली आहे.
वाहतूक पोलिसांकडून दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालावे यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात येत आहे. त्याची पहिली पायरी म्हणून पोलिसांसाठी हेल्मेट सक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या आदेशांना अनेकदा पोलिस कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली दाखवण्यात येत असल्यामुळे कारवाईचा ही नवीन बडगा उगारण्यात आला आहे.
आयुक्तालयाच्या आवारातही हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयुक्तालयाच्या गेटवर दुचाकी घेऊन येणाऱ्या दुचाकीस्वारांच्या डोक्यात हेल्मेट नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. हेल्मेट सक्तीची पहिला टप्पा हा पोलिसांपासून सुरू करण्यात आला आहे. पोलिसांना हेल्मेटचे वाटप करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कारवाईचेही टार्गेट
पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत, अशा स्पष्ट सूचना शुक्ला यांनी दिल्या आहेत. नियम मोडणाऱ्या किमान २५ पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश आहेत आणि ही माहिती वाहतूक पोलिस उपायुक्तांना दररोज पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित पोलिस कर्मचारी ज्या शाखेत नोकरीस आहे, त्या शाखेला ही माहिती पाठवण्यात येणार आहे.

काय होतील परिणाम?
हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांच्या सेवा पुस्तकात शिस्तभंग केल्याप्रकरणी नोंद केली जाईल. या नोंदीमुळे संबंधित पोलिसांना सरकारी सेवेतील फायदे मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्यांची बढती, त्यांना मिळणारे विविध पुरस्कार यालाही या नोंदीचा फटका बसू शकतो, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​नवजात बालकांच्या विक्रीचे रॅकेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
फरासखाना पोलिसांनी तीन महिलांसह एका संस्थाचालकाला गजाआड करत नवजात बालकांची विक्री करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. त्यांच्या ताब्यातील एका महिन्याच्या बालकाची सुटका करण्यात आली असून, अटक करण्यात आलेली महिला या बालकाची आई आहे.
लतिका सोमनाथ पाटील (वय २३, डोंबिवली पूर्व, ठाणे), दिप्ती संजय खरात (वय ३०, रा. खडकवासला), आशा नाना अहिरे (वय २७, रा. स्टेशन रोड, उल्हासनगर, ठाणे), केशव शंकर धेंडे (वय ४२, रा. राजीव गांधी सोसायटी, तरवडे वस्ती, महंमदवाडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
आरोपी केशव सासवडमध्ये निरंकार वस‌तिगृह चालवतो; तर लतिका आणि दिप्ती बेरोजगार आहेत. त्यांनी पुण्यात एका व्यक्तीशी संपर्क साधत लहान मुलाचा दाखला काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. ही माहिती पोलिस नाईक शंकर कुंभार यांना मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक महेंद्र जाधव यांच्या पथकाने कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाजवळ सापळा रचला. पोलिसांनी दोन्ही महिलांसह तिघांना ताब्यात घेतले; तसेच त्यांच्याजवळील एका महिन्याच्या बालकाची सुटका केली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार लतिका या बालकाची आई असल्याचे निष्पन्न झाले आहे. उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात या बालकाचा जन्म झाला आहे. तिला यापूर्वी दोन मुले आहे. तिची दिप्ती आणि केशव यांची पूर्वीपासून ओळख आहे. पोलिसांनी या प्रकरणी बाल न्याय अधिनियम २०१५ च्या कलम ८१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. कोर्टाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली.

कसे आहे रॅकेट?
केशव याची निरंकार संस्था आहे. तो बालकांची विक्री करत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. दिप्ती आणि केशव यांची ओळख आहे, तर उल्हासनगर येथील आशा आणि दिप्ती यांची ओळख आहे. आशा आणि लतिका या ​मैत्रिणी आहेत. लतिकाला अनैतिक संबंधातून बाळ झाले होते. ती या बाळाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात होती. तेव्हा आशाने तिला बाळाची विक्री करण्याची कल्पना सुचवली आणि आशाने दिप्तीशी संपर्क साधला. ते बाळ आठ दिवसांपूर्वी दिप्तीने पुण्यात आणले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुठा नदीत सापडली आरोपींची हत्यारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडण्यासाठी वापरण्यात आलेले तीन हातोडे आणि एक कुऱ्हाड मुठा नदीपात्रातील पाण्यात सापडली. आरोपींनी पुतळा पाण्यात टाकताना ही हत्यारेही त्याच परिसरात टाकली होती. डेक्कन पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी हत्यारे पाण्याबाहेर काढली. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी परिसरात पुतळ्याचा शोध घेण्यात आला होता. तेव्हा हत्यारे आढळून आली नव्हती.
संभाजी उद्यानातील गडकरींच्या पुतळ्याची तोडफोड करून तो हटविल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला होता. पोलिसांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत चौघा आरोपींना गजाआड केले. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि त्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी पुतळा नदीपात्रात कोठे टाकला याची माहिती पोलिसांना दिली होती. हा पुतळा बुधवारी दुपारी पाण्याबाहेर काढण्यात आला होता. संशयितांकडे केलेल्या तपासात त्यांनी पुतळा फोडण्यासाठी वापरलेली हत्यारे नदीच्या पाण्यात टाकल्याची माहिती दिली. त्यानुसार शुक्रवारी दुपारी पुन्हा पाण्यात ती हत्यारे शोधण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कदम यांच्या उपस्थितीत आरोपींनी ही हत्यारे नदीत कोठे टाकली हे दाखवले होते. यावेळी शोध घेतला असता तीन हातोडे आणि एक कुऱ्हाड शोधण्यात यश आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्राचा शर्ट मदतीला आला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतल्याने ते थिएटरवर स्थिरावले होते; पण परिस्थिती बेताचीच होती. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी आले तेव्हा, त्यांच्याकडे ना पैसे होते...ना चांगले कपडे. मुलाखत परीक्षेसाठी एका मित्राचा शर्ट त्यांनी तात्पुरता घेतला व संस्थेत प्रवेश मिळवला. अडचणी इथेच संपल्या नाहीत. हा थिएटरचा चांगला कलाकार आहे, पण तोंडावर डाग असल्याने चित्रपटात चमकणार नाही, अशी कुजबुज संस्थेत सुरू झाली...या सर्वांवर मात करत त्यांनी प्रतिभावान अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध केले. त्यांचे नाव ओम पुरी. तर शर्ट देणारा मित्र म्हणजे प्रख्यात अभिनेते नसिरुद्दीन शाह.

प्रतिभावान प्रख्यात अभिनेते ओम पुरी हे माजी विद्यार्थी असल्याने फिल्म इन्स्टिट्यूट शुक्रवारी नॉस्टेल्जियात हरवून गेली. संस्थेतर्फे पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या कलेला अभिवादन करण्यासाठी सायंकाळी ‘अर्धसत्य’ हा त्यांचा गाजलेला चित्रपट दाखविण्यात आला. पुरी यांनी १९७४ मध्ये फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनय कोर्ससाठी प्रवेश घेतला होता.
ते फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आले तेव्हा चर्चा अशी होती की, थिएटरवर ओळख मिळवत असलेला हा माणूस चित्रपटात किती चमकेल? कारण चित्रपट हे कॅमेऱ्याचे माध्यम आहे. चांगला चेहरा त्यासाठी आवश्यक असतो. नायिकेबरोबर बागेत गाणी व नृत्य हा कसा सादर करू शकेल? चेहऱ्यावर डाग व खड्डे असल्याने त्यांच्या योग्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. मात्र आपल्या दोन वर्षांच्या शिक्षण काळात व दमदार कारकिर्दीने चेहरा महत्त्वाचा असतोच असे नाही, हे त्यांनी दाखवून दिले. पुरी यांचा ‘घाशीराम कोतवाल’ हा पहिला चित्रपट संस्थेतच तयार झाला. तेव्हाही त्यांच्याकडे पैसे नव्हते...पुरी यांचे सहकारी व संस्थेच्या चित्रपट विभागाचे प्रमुख अमित त्यागी आठवणी सांगत होते.

फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही एकाच काळात शिकलो. गिरीश कार्नाड तेव्हा संचालक होते. वर्धा येथील गांधी आश्रमाच्या माहितीपटावेळी आमची ३५ वर्षांनी भेट झाली. ओम पुरी यांनी मला ओळखले. बहादूरशाह जफर या माहितीपटासाठी आम्ही एकत्र काम करत होतो. एक दिवसाचे चित्रीकरण राहिले होते. पण आता ते कधीच होणार नाही.
- भरत नेरकर, ‘एफटीआयआय’चे प्राध्यापक व प्रसिद्ध कॅमेरामन

आंदोलनादरम्यान ते आम्हाला भेटायला आले होते. सर्वांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली आणि जरा रागावलेही. हिलाल हा विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असताना ते त्याला भेटायला तिथे गेले. एका विद्यार्थ्यासाठी एवढा मोठा कलाकार आल्याचे पाहून सर्व जण आश्चर्यचकित झाले होते. हिलाल सेलिब्रेटी झाला होता.
- नच्चिमुथ्थू, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वरझंकार’ महोत्सव १३ जानेवारीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि व्हायोलिन अकादमीच्या वतीने आयोजित केला जाणारा ‘स्वरझंकार’ महोत्सव यंदाही होणार आहे. येत्या १३ ते १५ जानेवारी दरम्यान रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या या महोत्सवात कौशिकी चक्रवर्ती, उस्ताद रशीद खाँ, राहुल शर्मा यांच्यासह अनेक नामवंत आपली कला पुणेकरांसमोर सादर करणार आहेत.

महोत्सवाचे यंदाचे आठवे वर्ष असून गेली सहा वर्षे हा महोत्सव ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वर्धापनदिनाच्या दरम्यान आयोजित करण्यात येतो. यंदाचा महोत्सव सनईसम्राट उस्ताद बिस्मिल्ला खॉँ यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आला आहे. महोत्सवाचा प्रारंभ पतियाळा घराण्याच्या लोकप्रिय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या गायनाने होणार अाहे. त्यांना तबल्यावर ओजस आढिया व हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी साथसंगत करणार आहेत. त्याच दिवशी फरुखाबाद घराण्याचे ज्येष्ठ तबला वादक पं. अानंदो चटर्जी व बनारस घराण्याचे लोकप्रिय तबलावादक पंडितकुमार बोस यांच्यामधील तबला जुगलबंदीचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. त्यांना दिलशाद खान सारंगीवर साथसंगत करणार आहेत.

महोत्सवामध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला मंजूषा पाटील यांचे गायन होणार आहे. त्यांना सुलोचना कुलकर्णी यांच्या स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. व्हायोलिन अकादमीच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या विविध संगीत उपक्रमांचा प्रारंभ भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या हस्ते १९९२मध्ये झाला होता. त्याला यंदा पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त पंडितजींचे सुपुत्र श्रीनिवास जोशी आणि नातू विराज जोशी यांचे सहगायन होणार आहे. दुसऱ्या दिवसाची सांगता पं. अतुलकुमार उपाध्ये (व्हायोलिन) आणि दिल्ली घराण्याचे ज्येष्ठ शहनाई वादक पं. दयाशंकर यांच्या बहारदार शहनाई-व्हायोलिन जुगलबंदीने होणार आहे. त्यांना रामदास पळसुले तबल्यावर साथ करणार आहेत. महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाचा प्रारंभ जागतिक किर्तीचे संतुरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र राहुल शर्मा यांच्या संतुर वादनाने होणार असून त्यांना तबला साथ मुकेश जाधव करणार आहेत. त्यानंतर रामपूर घराण्याचे आजच्या पिढीतील आघाडीचे लोकप्रिय गायक उ. राशिद खाँ यांच्या गायनाने समारोहाची सांगता होईल. त्यांना तबला साथ पं. विजय घाटे करणार असून सारंगीवर मुराद अली संगत करणार आहेत.

सर्व कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथील मैदानावर सायंकाळी ६ ते १० या वेळेत होणार आहे. कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर, नावडीकर मुझिकल्स (कोथरूड), शिरीष ट्रेडर्स (कमला नेहरू पार्क), खाऊवाले पाटणकर (बाजीराव रस्ता) येथे उपलब्ध आहेत.

मटा कल्चर क्लब सभासदांना सवलत

मटा कल्चर क्लबच्या सभासदांना स्वरझंकार महोत्सवाच्या देणगी प्रवेशिका खास सवलतीच्या दरात मिळणार आहेत. नामदार गोखले रोडवरील ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ऑफिसमध्ये सकाळी ११ नंतर क्लबच्या सभसदांना देणगी प्रवेशिका उपलब्ध होतील. सभासद नसलेल्या वाचकांना क्लबचे सभासदत्व घेऊनही सवलतीच्या दरातील प्रवेशिकांचा लाभ घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘दृश्यम्’ पाच वेळा बघून केला खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

व्याजाने घेतलेले पाच लाख रुपये परत करण्यासाठी तगादा लावणाऱ्या तरुणाचा पैसे घेतलेल्या बापलेकाने कुदळवाडी-चिखली भागात खून केला. हा खून करण्यापूर्वी आरोपीने आपण पाच वेळा दृश्यम् सिनेमा बघितल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.

श्रीराम शिवाजी वाळेकर (२६, रा. बालघरेवस्ती चिखली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मेहबूब समीदुल्ला मणियार (२६, रा. कुदळवाडी, चिखली) व त्याचे वडील समिदुल्ला मणियार (५२) या दोघांना अटक करण्यात आली आहे. सहायक पोलिस आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार पळसुले, निरीक्षक शंकर अवताडे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

श्रीराम वाळेकरकडून काही महिन्यांपूर्वी समीदुल्ला अकबर अली मणियार व मेहबूब समीदुल्ला मणियार याने व्याजाने पाच लाख रुपये घेतले होते. भंगाराचा व्यवसाय करण्यासाठी समिदुल्ला मणियार याने अनेकदा पैसे घेतले होते. ते पैसे मेहबूबला फेडावे लागत असत. घेतलेली रक्कम आणि व्याज यामुळे वादाचे प्रसंग घडत होते. दरम्यान श्रीराम याचा खून करायचे मेहबूबने ठरविले. मृतदेह मिळालाच नाही, तर पोलिस काही करू शकत नाहीत, असे मेहबूब याने ‘दृश्यम्’ सिनेमामध्ये पाहिले होते. त्यामुळे आरोपी मेहबूब याने पाच वेळा दृष्यम् सिनेमा बघितला. मृतदेह पुरण्यासाठी स्वतःच्या भंगार गोडाउन शेजारी एक प्लॉट भाडेतत्त्वावर घेतला. त्यानंतर काही दिवस गेल्यावर मनियार बापलेकांनी २७ सप्टेंबर २०१६ ला सकाळी नऊच्या सुमारास कुदळवाडी येथील गोडाउनमध्ये श्रीरामला बोलावून घेतले. दोघांनी श्रीरामचा चाकूने भोसकून आणि गळा चिरून खून केला. त्यानंतर एका प्लास्टिक पिशवीत बंद करून मृतदेह पुरून टाकला.

दुसरीकडे शिवाजी वाळेकर यांनी श्रीराम बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. निगडी पोलिसांनी आपली सूत्रे फिरविली. निगडीचे पोलिस ठाण्यातील कर्मचारी किरण खेडकर, संदीप पाटील यांना खबऱ्याकडून व मोबाइल लोकेशनवरून श्रीराम बेपत्ता झाला तेव्हा तिघे एकत्र असल्याचे समजले. त्यामुळे मणियार बापलेकावर संशय बळावल्यानंतर सहायक निरीक्षक देवेंद्र चव्हाण, फौजदार रघुनाथ भोये, कर्मचारी तात्या तापकीर, नारायण जाधव, संदीप पाटील, नारायण जाधव, मंगेश गायकवाड, किशोर पडेर, शरीफ मुलानी, विलास केकाण, मच्छिंद्र घनवट, अनंत चव्हाण, रमेश मावसकर, जमीर तांबोळी यांनी चौकशी व पाहणी सुरू केली. बऱ्याच प्रयत्नानंतर मेहबूब याने श्रीरामचा मृतदेह नदीत टाकल्याचे सांगितले. नदीपात्रात पाहणी केली; पण मृतदेह मिळाला नाही. पोलिसी खाक्या दाखवल्यावर अखेर मेहबूबने सगळा घटनाक्रम कथन केला. मेहबूबला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाने चोरलेल्या वस्तू विकण्यात आईचा सहभाग

$
0
0

पुणे ः मुलाने आणि त्याच्या साथीदारांनी चोरून आणलेल्या ऐवजाची विल्हेवाट लावत असलेल्या आईला खडक पोलिसांनी अटक केली असून तिला कोर्टाने सात जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

आशा विठ्ठल पाटोळे (वय ४८, रा. कासेवाडी, भवानी पेठ) या महिलेला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यास्मीन इस्माइल बागवान (वय ४१, रा. भवानी पेठ) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. १२ डिसेंबर २०१६ रोजी फिर्यादीच्या घरी हा प्रकार घडला. या प्रकरणात यापूर्वी आकाश ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे (२२, रा. गुरुद्वारा शेजारी, कॅम्प), विनायक बंडू कराळे (२०, रा. कासेवाडी, भवानी पेठ) आणि आकाश ऊर्फ चांग्या अनिल पवार (१९, रा. कासेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी बागवान यांच्या घरातील सर्व जण झोपी गेल्यानंतर पहाटे चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरला होता. या सर्व मालाची आरोपी आशा पाटोळे विल्हेवाट लावत असे. चोरी गेलेला माल जप्त करण्यासाठी तसेच चोरीत मदत करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आरोपीची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील डी. एल. मोरे यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेपोसाठी जागा आरक्षित

$
0
0

वनाज ते रामवाडी मेट्रोसाठी नगर रोडवर पर्याय उपलब्ध

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेत मेट्रो की शिवसृष्टी हा वाद चिघळण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने नगर रोडवर मेट्रोच्या डेपोसाठी आणखी एक पर्यायी जागा शोधली आहे. नगर रोड परिसरात कचरा डेपोइतक्याच सुमारे २५ एकर जागेवर मेट्रोसाठी आरक्षण दर्शविण्यात आले असून, त्या ठिकाणी वनाज ते रामवाडी मार्गासाठी आवश्यक डेपो होऊ शकेल, असे संकेत आहेत.
महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) कचरा डेपोच्या जागेवर ‘सांस्कृतिक केंद्रासाठी’चे (सीसी) आरक्षण होते. या जागेवर शिवसृष्टी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, त्याच ठिकाणी मेट्रोचा डेपो प्रस्तावित करण्यात आल्याने नक्की संबंधित जागेचा वापर कशासाठी होणार, याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मेट्रो आणि शिवसृष्टी एकाच ठिकाणी व्हावी, असेही सुचविण्यात आले होते. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने मेट्रोच्या डेपोसाठीच संबंधित जागा आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे, शिवसृष्टीसाठी पर्यायी जागेचा शोध घेण्यात येत होता.
राज्य सरकारने मंजूर केलेल्या डीपीतून मेट्रोच्या डेपोसाठीच पर्यायी जागा तयार ठेवली असल्याचे चित्र आहे. नगर रोडवर वाडिया स्टड फार्मलगतच्या २५ एकर जागेवर मेट्रोचे आरक्षण दर्शविण्यात आले आहे. मेट्रो कोचच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ही जागा वापरता येऊ शकते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे, वनाज ते रामवाडी मार्गासाठी डेपो म्हणून कदाचित याच जागेचा वापर केला जाऊ शकतो, अशी दाट शक्यता आहे. कचरा डेपोच्या जागेवरील सीसीच्या आरक्षणात बदल करून ते पब्लिक-सेमी पब्लिक (पीएसपी) असे करण्यात आले होते. ‘पीएसपी’मुळे या ठिकाणी मेट्रोचा डेपोही अस्तित्वात येणे शक्य होते. परंतु, शिवसृष्टीसाठी सातत्याने सर्वपक्षीयांकडून आग्रह धरण्यात येत होता; तसेच त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे, हा वाद आणखी चिघळण्यापूर्वीच मेट्रो डेपोसाठी सरकारने पर्यायी जागा तयार ठेवली असल्याचे दिसते.

मेट्रोसाठी नव्याने २२ स्टेशन्स
शहराच्या प्रा-रूप विकास आराखड्यात मेट्रोचे मार्ग निश्चित करण्यात आले असले, तरी त्यासाठी आवश्यक स्टेशन्ससाठी काही मोजक्याच ठिकाणी स्वतंत्र आरक्षणे निश्चित केली गेली होती. विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या समितीने त्या आरक्षणात वाढ केली, तर राज्य सरकारने २२ ठिकाणी मेट्रो स्टेशनसाठी आरक्षणे निश्चित केली आहेत. यामध्ये, शहराच्या उपनगरांपासून ते मध्यवस्तीपर्यंत सर्व ठिकाणी मेट्रोच्या स्टेशनसाठी संबंधित जागेवर आरक्षण टाकण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत यंदा करवाढ नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पुढील आर्थिक वर्षात (२०१७-१८) कोणतीही करवाढ न करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शुक्रवारी घेण्यात आला. ऑनलाइन पद्धतीने एप्रिल ते जून २०१७ कालावधीत कर भरणाऱ्यांना पाच टक्के सवलत देणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. आगामी आर्थिक वर्षात करवाढ न करता चालू आर्थिक वर्षाप्रमाणेच कराची आकारणी व्हावी, अशी शिफारस स्थायी समितीने सर्वसाधारण सभेला केली होती. त्याबाबतच्या प्रस्तावावर फारशी चर्चा न होताच मान्यता मिळाली. निवडणुका तोंडावर असल्यामुळे सर्वच नगरसेवकांनी नागरिकांवर करवाढीचा बोजा लादू नये, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात शहरवासियांवर करवाढीचा बोजा पडणार नसल्याचे स्पष्ट झाले. शहरातील अनधिकृत बांधकामांसाठी लागू केलेला शास्ती कर राज्य सरकारने पूर्णतः माफ करावा, अशी मागणी सभेमध्ये करण्यात आली. शास्तीकर माफ होत नाही तोपर्यंत पालिकेकडून देण्यात येणाऱ्या कराच्या पावतीत शास्तीच्या रकमेचा उल्लेख करू नये. त्याची स्वतंत्र पावती देण्यात यावी, अशी मागणी प्रशांत शितोळे यांनी केली.
सुलभा उबाळे म्हणाल्या, ‘शास्तीकर भरलेल्या नागरिकांवर अन्याय होऊ नये, याची दक्षता घ्यावी. राज्यात सत्तेत असूनही शिवसेनेने शास्तीकरासंदर्भात सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची तयारीची भूमिका आहे.’
अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणासंदर्भात राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. शास्तीकराची टांगती तलवार दूर करावी. त्याचबरोबर शास्तीकर भरलेल्या नागरिकांची रक्कम सामान्य करांमध्ये समायोजित करावी, अशी मागणी योगेश बहल यांनी केली. शास्तीकर माफीचा निर्णय लवकर करण्याबाबतचा विनंती प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा, अशी सूचना पक्षनेत्या मंगला कदम यांनी केली. अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराच्या बाबतीत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची आठवणही या निमित्ताने करून देण्यात आली.

बसखरेदीसाठी तरतूद
पीएमपीसाठी फायनान्स मेकॅनिझम पद्धतीने आठशे बस खरेदी करण्याचा प्रस्ताव ऑगस्ट २०१६ मध्ये महापालिका सभेने मंजूर केला आहे. या खरेदीसाठी मासिक पद्धतीने हप्ते भरण्यात येतील. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ४० टक्के दायित्वानुसार थेट बसपुरवठादाराच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी, प्रतिमहा संचलन तूट भरून निघावी, असे प्रस्तावात नमूद केले आहे. ठिकठिकाणी नवीन बसडेपो उभारणीसाठी, नवीन टर्मिनल बांधण्यासाठी, जुने डेपो आणि टर्मिनलच्या नूतनीकरणासाठी तसेच या अनुषंगाने मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. ते तयार झाल्यानंतर गरजेनुसार महापालिकेने बजेटमध्ये खर्चाची तरतूद करावी, असा निर्णयही या वेळी घेण्यात आला.

ऑनलाइन पद्धतीने मिळकत कराचा भरणा करणाऱ्या करदात्यांना सवलत देण्याची उपसूचना सर्वसाधारण सभेत मांडण्यात आली. त्यानुसार एक एप्रिल ते ३० जून २०१७ कालावधीत ऑनलाइन पद्धतीने कर भरणाऱ्या नागरिकांना पाच टक्के सवलत मिळणार आहे. तसेच एक जुलै २०१७ ते ३१ मार्च २०१८ कालावधीत ऑनलाइन पद्धतीने कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना दोन टक्के सूट दिली जाणार आहे. कॅशलेसपद्धतीने अधिकाधिक करभरणा करावा, यासाठी महापालिकेने ही स्मार्ट सवलत दिली असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपी’तील बदलांवर हरकती स्वीकारणार

$
0
0

राज्य सरकारतर्फे लवकरच सुनावणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या विकास आराखड्यात (डीपी) कायम ठेवण्यात आलेल्या ८५० पैकी ४०५ आरक्षणे मंजूर करण्यात आली असून, २३५ आरक्षणांत बदल करण्यात आल्याने त्यावर नागरिकांकडून पुन्हा हरकती-सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. शहरातील शंभरहून अधिक रस्त्यांच्या रुंदीमध्ये बदल करण्यात आल्याने त्यावरही सुनावणीची प्रक्रियाही सरकारतर्फे घेण्यात येणार आहे.
महापालिकेचा २००७-२७ या २० वर्षांसाठीचा डीपी सरकारने दोन दिवसांपूर्वी मान्य केला. सरकारनियुक्त त्रिसदस्यीय समितीने वगळलेली आरक्षणे पुनर्स्थापित करण्याचेही निश्चित करण्यात आले. ही आरक्षणे वगळता, ४०५ आरक्षणांमध्ये कोणताही बदल नसल्याने ती मान्य झाली असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिले. तसेच, महापालिकेने इमारतींच्या ‘ओपन स्पेस’वर प्रस्तावित केलेली सर्वच्या सर्व ५० आरक्षणे रद्द करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.
शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या लक्षात घेऊन दाट वस्तीच्या भागांमधील काही आरक्षणात बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्रिसदस्यीय समितीकडून निवासी किंवा व्यावसायिक भागात समाविष्ट करण्यात आलेल्या आरक्षणांमध्ये बदल करून ती पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तसेच, शनिवारवाडा ते नारायण पेठ या दरम्यानचा शंभर फुटी रस्ता रद्द करताना, त्या लगतच्या जागेचा वापर पार्किंग किंवा महापालिकेच्या इतर वापरासाठी करता येऊ शकेल का, याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांकडे देण्यात आले आहेत.
सरकारी जागांवरील सर्व आरक्षणे सरसकट रद्द करण्यात आली नसून, अशा ठिकाणांवरील २९ आरक्षणे कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणासाठी (पीएमआरडीए) येरवडा परिसरात ‘गोल्फ क्लब’च्या जवळ दर्शविण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यात आले होते. ते सरकारने पुनर्स्थापित केले आहे.

ज्येष्ठांना दिला दिलासा
येरवडा परिसरात ससून हॉस्पिटलच्या धर्तीवर सुसज्ज हॉस्पिटल, शिवाजीनगर-भांबुर्डा भागात मॅफकोच्या परिसरात स्टेडियम, ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा यासारखी अनेक आरक्षणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या समितीने उठवली होती. ही लोकोपयोगी आरक्षणे सरकारने पुनर्स्थापित करून नागरिकांना दिलासा दिला आहे.

जुन्या आरक्षणांना कात्रजचा घाट
शहराच्या भवितव्याचा विचार करून महापालिकेने अनेक आरक्षणे निश्चित केली होती. त्यामध्ये, विविध समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने, त्रिसदस्यीय समितीने अनेक आरक्षणांना कात्री लावली. त्यावरून, बराज गहजब झाल्यानंतर अखेर सरकारने त्यातील बहुतांशी आरक्षणे कायम केली आहेत. त्यामुळे, पालिकेने केलेल्या प्रा-रूप आराखड्याचे स्वरूप सुमारे ७० टक्के कायम राहिल्याने त्रिसदस्यीय समितीचा घाट सरकारने कशाला घातला, अशी विचारणा केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images