Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पर्यावरणवाद्यांना दिला दादांनी सबुरीचा सल्ला

0
0

लोकांचे रस्ते अडवू नका, विकासकामांना खोडा नको

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मेट्रोबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. मात्र, काही जण कोर्टात जाऊन विकास कामे थांबवत आहेत. हरीत लवादाने वनाझ ते रामवाडी या मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली आहे. इकडे कात्रज ते फुरसुंगी या रस्त्याप्रकरणी एक जण कोर्टात गेला आहे. लोकांचे रस्ते अडवू नका, विकासकामांमध्ये खोडा आणू नका, यात समाज हित नाही,’ असे सांगून अजित पवार यांनी पर्यावरणवाद्यांना सबुरीचा सल्ला दिला.
कात्रज येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर महापौर प्रशांत जगताप, माजी महापौर नगरसेवक दत्ता धनकवडे, नगरसेविका भारती कदम, प्रकाश कदम आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पवार यांनी उद्घाटन समारंभानंतर बोलताना जोरदार टोलेबाजी करून ‘एक दशक प्रगतीचे; दुसरे दशक समृद्धीचा’ नारा दिला. पुण्यात एकहाती सत्ता द्या, पिंपरी-चिंचवडसारखा विकास करून दाखवतो, असे आवाहनही त्यांनी केले.
‘भाजप सरकार निवडणुका आले की, टिकाव टाकण्याची कामे करते. बिहारची निवडणूक आली की इंदू मिलमध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे उद्घाटन केले. त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. महापालिका निवडणुका आल्यानंतर अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. या स्मारकाची जागा मी आणि जयंत पाटील यांनी शोधली. याबाबत बरेच काम आम्ही केले, मात्र याचे भूमिपूजन भाजपने केले. तसेच मेट्रोबाबतही झाले आहे. मेट्रोचे सर्वाधिक काम आम्ही केले. कात्रज ते निगडी अशी मेट्रो व्हावी,’ अशी आमची मागणी होती, असेही पवार म्हणाले.
‘मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या कामाला हरीत लवादाने स्थगिती दिल्याचे समजले. पुण्यात काही जण कोर्टात जाऊन विकास कामे थांबवतात. इकडे कात्रज ते फुरसुंगी या दरम्यानच्या रस्त्याप्रकरणी एक जण कोर्टात गेला आहे. ज्यांना टीडीआर पाहिजे असेल, त्यांनी टीडीआर घ्या, जमिनीचा रेट वाढवून पाहिजे असेल तर तोही घ्या. परंतु रस्ते, विकासकामे अडवू नका. हे समाजहिताचे नाही,’ असा टोला पवार यांनी पर्यावरणवाद्यांना लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आरपीआय’कडून २८ जागांची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आगामी महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले गट) भारतीय जनता पक्षाशी युती झाल्यास २८ जागांची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘आरपीआय’चे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी बुधवारी दिली. सध्या पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. त्या झाल्यानंतर भाजपकडे उमेदवारांची यादी सादर केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
नाना पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या आवारात रिपब्लिकन महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. पक्षाकडून १०९ इच्छुकांनी अर्ज नेले होते. त्यापैकी ६५ जणांनी अर्ज सादर केले आहेत. त्या सर्वांच्या मुलाखती यावेळी घेण्यात आल्या. यंदाच्या वर्षात इच्छुकांमध्ये एससी, एसटीसह ओबीसी व खुल्या प्रवर्गातीलही व्यक्तींचाही समावेश आहे. तसेच, पदवीधर तरुणांची संख्या उल्लेखनीय असून, डॉक्टर, वकिलांनीही उमेदवारीसाठी मुलाखत दिल्याचे कांबळे यांनी सांगितले.
दरम्यान, मुलाखतीसाठी इच्छुकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे मैदान कार्यकर्त्यांनी व्यापले होते. वाजत-गाजत कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखल झाले होते. कार्यकर्त्यांमध्ये महिलांची संख्याही जास्त होती. ‘आरपीआय’चे ज्येष्ठ नेते एम. डी. शेवाळे, प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ कांबळे, बाळासाहेब जानराव, महेश शिंदे, हनुमंत साठे, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, संजय सोनवणे, महिपाल वाघमारे यांनी मुलाखती घेतल्या. इच्छुकांची प्रभागाची माहिती, सामाजिक कार्य, युती न झाल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी आहे का, याबाबत विचारणा मुलाखत घेणाऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडकऱ्यांचा पुतळा पुन्हा पाण्यात सोडला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा मुठा नदीपात्रात शोधण्यात डेक्कन पोलिसांना बुधवारी दुपारी यश आले. मात्र, ‘डिजिटल पुरावा’ गोळा करण्यास पोलिस विसरल्याने पुतळा पुन्हा नदीपात्रात बुडवून मोबाइल कॅमेरे शूटिंगसाठी सज्ज झाल्यावर तो पुन्हा आला. राज्यभरात संवेदनशील बनलेल्या या प्रकरणाच्या तपासातील हा प्रकार बुधवारी सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता.

संभाजी उद्यानातील या पुतळ्याची तोडफोड करून तो हटविल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला होता. पोलिसांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत चौघा आरोपींना गजाआड केले. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि त्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान आरोपींनी पुतळा नदीपात्रात कोठे टाकला याची माहिती पोलिसांना दिली होती. तपासाचा भाग म्हणून चारपैकी दोन आरोपींना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास संभाजी उद्यानात नेण्यात आले.

हे आरोपी संभाजी उद्यानात घटनेच्या वेळी कसे आले, तेथून ते पुतळा घेऊन कसे बाहेर पडले, याची माहिती तपासाचा एक भाग म्हणून घेण्यात आली. पुत‍ळा तोडल्याचे ‘सीसीटीव्ही’ फुटेजमध्ये कैद झाले होतेच. त्यामुळे पोलिसांनी आरोपींच्या जाण्याच्या मार्गाची माहिती घेतली. पुतळा तोडल्यानंतर आरोपी संभाजी उद्यानाच्या नदीपात्राकडील गेटच्या दिशेने गेले होते. या गेटमधून ते नदीपात्रात पोहोचले. कै. विठ्ठल रामजी शिंदे पुलाखाली नदीपात्रात पुतळा टाकून आरोपी पसार झाले. ज्या मार्गाने आरोपी घटनेच्या वेळी गेले होते, अगदी तसेच पोलिस त्यांना घेऊन पुतळा टाकला त्या ठिकाणी गेले. नदीपात्राजवळच दोघे जण बसले होते. पोलिसांनी त्यांना पाण्यात उतरवले. त्यांना पुतळा शोधण्यास पंधरा मिनिटे लागली. पुतळा शोधल्यानंतर तो लगेचच काठावर ठेवण्यात आला.

पुतळा शोधण्याच्या घटनेचे ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ केले नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. रेकॉर्डिंग करण्यासाठी पुतळा पुन्हा नदीपात्रातील त्या खराब पाण्यात सोडण्याचा निर्णय झाला. काठावर ठेवलेला पुतळा नदीपात्रातील दोघांकडे देताना पुतळ्याचा चेहरा नदीपात्राच्या दिशेने झाला. त्यांनी तो पुतळा नदीपात्रातील त्या पाण्यात सोडला. पोलिसांनी मग आपल्याकडील मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग, तसेच फोटो काढण्यास सुरुवात केली. पुतळा शोधणाऱ्या दोघांनी पुतळा शोधण्याचा बनाव केला. शोधाशोध केल्याचे दाखवून तो पुतळा पुन्हा एकदा घेऊन त्याला काठावर ठेवण्यात आले. त्या पुतळ्यावर कापड टाकण्यात आले आणि तो खांद्यावर टाकून पोलिस, आरोपी डेक्कन पोलिस ठाण्याकडे निघून गेले. हा सर्व प्रकार छायाचित्रकाराच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेच्या मुलाखतींना वाजतगाजत सुरुवात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शक्तिप्रदर्शन करून, झेंडे नाचवून, पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा जयजयकार करून आलेल्या इच्छुकांची गर्दी, मुलाखतीविषयीची धाकधूक आणि बंद दरवाजाआड दिग्गजांपुढे होणारी मुलाखतरूपी परीक्षा...
सेंट्रल पार्क हॉटेलमध्ये बुधवारी असेच चित्र होते. निमित्त होते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे घेण्यात येणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखतींचे. नेते राजन शिरोडकर, बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे आणि रिटा गुप्ता यांनी मुलाखती घेतल्या. दुपारी बारापासून मुलाखतींना सुरुवात झाली. रात्री आठपर्यंत ७६ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
पक्षाने गेल्या आठवड्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतच मुलाखतींचे नियोजन करण्यात आले होते. या वेळीच सर्व इच्छुकांना वाजतगाजत, शक्तिप्रदर्शन करून मुलाखतीसाठी येण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार शहराच्या विविध भागातून इच्छुकांनी रॅली काढून मुलाखतीच्या ठिकाणी येणे पसंत केले. इच्छुकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वाहनांमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. तसेच, पार्किंगचाही बोजवारा उडाला होता.
बुधवारी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य सर्व मतदारसंघातील ७६ इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. पहिल्यांदाच मुलाखत देणाऱ्यांची संख्याही मोठी होती. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. काहींनी एकट्याने तर काहींनी पती किंवा पत्नीसह मुलाखत दिली. आरक्षण व प्रभागरचना लक्षात घेत काहींच्या मुला-मुलींनीही मुलाखत दिली. कार्यअहवालाच्या प्रती हाती घेऊन मुलाखतीसाठी जाताना कार्यकर्ते आपल्याच नावाचा गजर करतील, याचीही दक्षता घेण्यात येत होती. गुरुवार आणि शुक्रवारीही या मुलाखती सुरू राहणार आहेत.

वाजतगाजत येण्याचा पुनर्विचार ?
पक्षाने मुलाखतीसाठी येताना वाजतगाजत येण्याचे फर्मान सोडले होते. मात्र, इच्छुकांनी ते फारच मनावर घेतल्याचे चित्र होते. वाहनांची मोठी संख्या, त्यातच हॉर्न वाजवत येणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे आपटे रोड परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास झाला. परिणामी, पक्षाच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी इच्छुकांनी साधेपणानेच मुलाखतीसाठी यावे, असा निर्णय घेण्याबाबतची चर्चा पक्षात सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे होणार ‘उत्तुंग’

0
0

म.टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

पुणे शहराच्या मध्यवस्तीमध्ये आणि उपनगरांमध्ये पुनर्विकासाला चालना देण्यासाठी नवीन विकास आराखड्यामध्ये भरपूर एफएसआय उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे. शहराची उभी वाढ (व्हर्टिकल ग्रोथ) व्हावी, यासाठी नवीन विकास आराखड्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या असून, शहराच्या मध्यवस्तीमध्ये या पुढे साडेतीन ते चार एफएसआय उपलब्ध होणार आहे. याचाच अर्थ शहराच्या जुन्या हद्दीत प्रत्येक घराला शंभर ते दीडशे चौरस फुटांची अतिरिक्त खोली बांधण्याची परवानगी मिळू शकेल.

पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या नवीन विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मान्यता दिली होती. (‘मटा’ने बुधवारच्याच अंकात त्याबद्दलचे वृत्त दिले होते.) आज पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी त्याची अधिकृत घोषणाही केली. मात्र, त्या विकास आराखड्याचे फारसे तपशील त्यांनी जाहीर केले नव्हते. हे सगळे तपशील व नवीन विकास नियमावली सोमवारपर्यंत ऑनलाइन स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे समजते.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विकास आराखड्यामध्ये शहराची उभी वाढ (व्हर्टिकल ग्रोथ) व्हावी या दृष्टीने धोरण अवलंबून निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचा फायदा शहरातील पेठांना व तेथील जुन्या वाड्यांना होणार आहे. सध्या शहरामध्ये मिळकतीच्या शेजारी असलेल्या रस्त्याच्या रुंदीनुसार दीड ते अडीच पट चटई क्षेत्र (एफएसआय) देण्यात येतो. म्हणजेच एक हजार चौरस फुटांच्या भूखंडावर दीड हजार ते अडीच हजार चौरस फूट बांधकाम करता येते. त्यामध्ये भाडेकरू असल्यास अतिरिक्त ३७ टक्के बांधकाम करण्याची परवानगी मिळते. त्यामुळे एक हजार चौरस फुटांवर सुमारे दोन ते तीन हजार चौरस फूट बांधकाम करता येते. नवीन धोरणानुसार जुन्या गावठाणामध्ये सरसकट अडीच पट चटई क्षेत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रत्येक भाडेकरूमागे अतिरिक्त शंभर चौरस फूट चटई क्षेत्र मोफत देण्यात येईल. याशिवाय जिने आणि पॅसेजमध्ये वापरले जाणारे चटई क्षेत्र प्रीमियम भरून नियमित करून घेता येणार आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून एक हजार चौरस फुटांच्या भूखंडावर चार हजार चौरस फुटांपर्यंत बांधकाम करता येणार आहे. त्याचप्रमाणे नऊ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्यात आल्याचे समजते. यापूर्वी गावठाणामध्ये टीडीआर वापरण्यास परवानगी नव्हती.

उपनगरांमध्येही नवीन विकास आराखड्यामध्ये अतिरिक्त चटई क्षेत्र देण्याची तरतूद करण्यात आल्याचे समजते. यापुढे उपनगरांमधील पुर्नविकास करताना प्रत्येक सदनिकेमागे पंधरा चौरस मीटर अतिरिक्त चटई क्षेत्र मोफत उपलब्ध करून देण्याची तरतूद नवीन विकास आराखड्यात करण्यात आली असल्याचे समजते.


गावठाणात सरसकट अडीच एफएसआय

- जुन्या गावठाणामध्ये सरसकट अडीच एफएसआय

- प्रत्येक भाडेकरूमागे शंभर चौरस फूट अतिरिक्त एफएसआय

- त्यामुळे जुन्या गावठाणामध्ये भूखंडाच्या चौपट बांधकाम शक्य

- उपनगरांमध्ये प्रत्येक सदनिकेमागे पंधरा चौरस मीटर मोफत एफएसआय


बहुतेक आरक्षणे पुनर्स्थापित

- दोन्ही नद्यांच्या ब्लू फ्लड लाइन व रेड फ्लड लाइनचा विकास आराखड्यातच समावेश

- जुन्या गावठाणांतील रस्ता रुंदी रद्द

- अमृतेश्वर ते संभाजी चौकी दरम्यानच्या शंभर फुटी रस्त्याचे आरक्षण रद्द

- चोक्कलिंगम समितीने उठविलेली बहुतेक आरक्षणे पुनर्स्थापित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधी पक्षनेत्याची ‘मनसे’ची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सभासदांची संख्या काँग्रेसपेक्षा अधिक असल्याचे विरोधी पक्षनेतेपद मनसेला द्यावे, अशी मागणी मनसेचे पालिकेतील गटनेते किशोर शिंदे यांनी महापौरांकडे केली आहे. पालिकेत मनसेच्या नगरसेवकांची संख्या २७ आहे, तर काँग्रेसकडे २३ नगरसेवक आहेत.
पालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करताना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे नोंदणी केल्याने पालिकेत सत्तेत सहभागी असतानाही विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे देण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ मनसेचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाल्याने विरोधी पक्षनेतेपद मनसेकडे आले होते. त्यानंतर सहा महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने विजय मिळविल्याने मनसे आणि काँग्रेसच्या सदस्यांची संख्या समान झाली होती. त्यावेळी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याचे सांगून महापौरांनी विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला दिल्याने अरविंद शिंदे या पदावर विराजमान झाले होते.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या पक्षातील सहा नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ केल्याने पालिकेतील काँग्रेसच्या सभासदांची संख्या २३वर आली आहे. मनसेच्या एका नगरसेविकेने राजीनामा दिल्याने मनसेची सदस्य संख्या २७ झाली आहे. पालिकेतली इतर पक्षांची सदस्य संख्या पाहता मनसे दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे विरोधी पक्षनेतेपद मनसेला द्यावे, अशी मागणी शिंदे यांनी महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे केली आहे.

काँग्रेसचे संख्याबळ कमी असताना पोटनिवडणुकीला सामोरे जाऊन निवडणूक लढवून आम्ही विरोधी पक्षनेतेपद मिळविले होते. मनसेमध्ये हिंमत असेल तर त्यांनी निवडणूक लढवून हे पद मिळवावे. पक्षाच्या सहा सभासदांना बडतर्फ करण्याचा ठराव मांडलेला आहे; अद्याप बडतर्फ केलेले नाही.

अरविंद शिंदे, विरोधी पक्षनेते

विरोधी पक्षनेतेपद द्यावे, असे पत्र मनसेने पाठविले आहे. प्रचलित कायदा तपासून नगरसचिवांकडून सदस्य संख्येची माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.

प्रशांत जगताप, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रणशिंग फुंकल्याने शिवसैनिक सज्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवसेनेने महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याचे रणशिंग बुधवारी मुंबईत फुंकल्याने शिवसैनिक कामाला लागले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील आठवडाभरात पुण्यात येऊन कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. दरम्यान, शिवसेनेत मोठ्या प्रमाणात ‘इन्कमिंग’ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठाकरे यांनी भाजपला थेट लक्ष्य केल्याने आगामी महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्यात येणार असल्याची ही नांदी असल्याचे बोलले जात आहे. स्वतंत्र लढलो तरी शिवसेनेची पुण्यातील ताकद कमी होणार नसल्याचा विश्वास स्थानिक नेतृत्वाला आहे. ठाकरे यांनीही पुण्यातील शिवसेनेच्या ताकदीबाबत चाचपणी केल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिका स्वतंत्र लढण्यासाठी शिवसेनेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, धनकवडी येथील सुनील खेडेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी मुंबईतील मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती शहर प्रमुख विनायक निम्हण यांनी दिली. महापालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू करण्यात आली आहे. आगामी काळात राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच मनसेमधून मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे निम्हण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाना पाटेकर यांचा जीवनप्रवास उलगडणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपल्या हुरहुन्नरी अभिनयाने रसिकांच्या मनात आणि ‘नाम फाउंडेशन’च्या सामाजिक कार्याद्वारे नागरिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या अभिनेते नाना पाटेकर यांचा जीवनप्रवास ‘तुमचा-आमचा नाना’ पुस्तकातून उलगडला जाणार आहे. या पुस्तकासाठी साहित्य, क्रीडा, अभिनय, गायन अशा क्षेत्रातील मान्यवरांनी लिखाण केले आहे. पुस्तकाचे प्रकाशन येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे.

‘इंद्रायणी साहित्यातर्फे मुग्धा कोपर्डेकर यांच्या पुढाकाराने या पुस्तकाची निर्मिती झाली असून, त्यात दिग्गज व्यक्तींनी नानांवर लिहिलेले सुमारे ३५ ते ४० लेख आहेत. श्रीकांत गद्रे यांनी या लेखांचे संकलन करून त्याचे पुस्तकात रूपांतर केले आहे. या पुस्तकात एन. चंद्रा, ना. धों. मनोहर, सुनील गावसकर, डॉ. रवी कसबेकर, रीमा, मंगेश तेंडुलकर, मोहन आगाशे, एन. चंद्रा, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, किशारी अमोणकर, सुभाष अवचट, रवींद्र साठे, अरविंद जगताप, विश्वजित शिंदे, डॉ. विकास आमटे, सुधीर गाडगीळ आदी दिग्गज व्यक्तींनी लेख लिहिले आहेत,’ असे गद्रे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी कोपर्डेकर उपस्थित होत्या.

याशिवाय नानांच्या सात ते आठ मित्रांनी नानांच्या बालपणातील आणि तारुण्यातील आठवणींवर लेख लिहिले आहे. या पुस्तकात नानांचा चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रवासासोबतच त्यांना आवडणाऱ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे. नाना पाटेकर यांच्या शाळेपासून ते आतापर्यतचा प्रवास दोनशे चाळीस पानांच्या रंगीत पुस्तकातून उलगडला जाणार आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम नानांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात होणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते होईल, याबाबत आतातरी ठरलेले नाही. वाचकांना कमी किमतीत हे पुस्तक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती गद्रे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आदिवासी शाळातील गैरप्रकारांवर कठोर कारवाई करणार’

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आदिवासी विकास विभागाच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, निवडलेल्या नामांकित शाळा किंवा एकलव्य शाळांमध्ये गैरप्रकार खपवून घेणार नाही. असे प्रकार आढळल्यास होत असल्यास तातडीने फेरतपासणी करून संबंधितांवर निलंबनासारखी कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच शाळांची संलग्नताही रद्द करण्यात येईल,’ असा इशारा आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी गुरुवारी दिला.
आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक सावरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, आयुक्त राजीव जाधव, उपसचिव स. ना. शिंदे यांच्यासह नाशिक, नागपूर, ठाणे आणि अमरावतीचे अपर आदिवासी आयुक्त आणि अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होत. ‘बुटीबोरी, बुलढाणा येथे आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींशी गैरवर्तनाचे व छळाचे प्रकार पाहता विभागातील सर्वच घटकांनी संवेदनशील राहून तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. सरकारकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी घेतलेल्या चांगल्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी होईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. या शाळांना अधिकाधिक सेवा सुविधा पुरविण्याकडे लक्ष देतानाच तेथे योग्य व्यवस्थापन होते, की नाही, याकडेही लक्ष द्यावे,’ असेही सावरा यांनी बजाविले. अशा गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने सर्वच आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी केली.

‘त्रुटींची तातडीने पूर्तता करावी’
‘सरकारी आणि अनुदानित आश्रमशाळा, निवडलेल्या नामांकीत आणि एकलव्य शाळांमधील त्रुटींची तातडीने पूर्तता करावी. आश्रमशाळांमधील मुलींच्या गैरवर्तणूक होत असल्याच्या तक्रारी असतात. हे लक्षात घेऊन महिला समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीकडून यापुढेही नियमित तपासणी करण्याचा आदेश सावरा यांनी दिला. दरम्यान, आदिवासी विकास विभागातील रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकारांचे सुसूत्रीकरण करण्याबाबत विचार करण्यात येईल. तसेच अतिरिक्त पदांचे समायोजन, आश्रमशाळांच्या इमारती, सरकारी इमारती बांधण्याचे प्रस्ताव याकडेही लक्ष पुरवावे,’ अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी स्मार्टवर्क करण्यावर भर द्यावा : बापट

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘गुन्ह्यांची उकल करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून तुम्ही ‘स्मार्ट वर्क’ करण्यावर पोलिसांनी भर द्यावा. त्यामुळे वेळ वाचेल आणि कामात गतीशिलता येईल. भविष्यकालीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पोलिसांनी अपडेट व्हायला हवे,’ असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी केले.

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात सायबर लॅबचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे, उपअधीक्षक बरकत मुजावर, पोलिस निरीक्षक शिवाजीराव देवकर यांच्यासह विविध पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बापट म्हणाले, ‘बदलणाऱ्या आधुनिक यंत्रसामुग्रीचे आणि समाजाचे सर्वात आधी प्रतिबिंब पोलिस दलात व्हायला पाहिजे. परंतु, दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. सध्याचे युग संगणकाचे आहे. या काळात समाजात अनेक बदल झाले आहेत. त्याला अनुसरून पोलिस खात्यात प्रगती झाली पाहिजे. पोलिस दलानेही यामध्ये पाठीमागे न राहता काळासोबत पुढे आले पाहिजे.

पोलिस खात्यात अनेक गोष्टी संगणकाच्या माध्यमातून झाल्या पाहिजेत. कामाच्या प्रमाणात पोलिसांचे संख्याबळ कमी असल्यामुळे पोलिसांवर ताण पडत आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता अत्याधुनिक तंत्रज्ञाच्या सहाय्याने अपडेट होणे गरजेचे आहे. समाज पोलिसांकडे रक्षक म्हणून पाहतात; पण काही अपप्रवृत्तीमुळे पोलिसांची समाजातील प्रतिमा खराब होत आहे. ही प्रतिमा सुधारण्यासाठी पोलिसांनी अधिक लोकाभिमुख झाले पाहिजे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्ही आघाडीसाठी मागे फिरणार नाही

0
0

स्वबळावर लढण्याच्या तयारीचे दादांचे सूतोवाच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘समविचारी पक्ष स्वतंत्र लढल्यास त्यांच्यात होणाऱ्या मतविभागणीमुळे जातीयवादी पक्षांचा फायदा होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. तरीही, काँग्रेसला स्वतंत्र लढायचे असल्यास, आम्ही आघाडीसाठी मागे-मागे फिरणार नाही,’ असे सांगून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वबळावर लढण्याची आपली तयारी असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले.
पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीतील उद्यानाच्या उद्घाटनापूर्वी काँग्रेसला सोबत यायचे नसल्यास आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज असल्याचे पवार यांनी पत्रकारांना ठामपणे सांगितले. ‘आगामी निवडणुकीत सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या समविचारी पक्षांनी एकत्र आल्यास इतरांना त्याचा फायदा होणार नाही. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते, नेत्यांची मानसिकता काय आहे, हे तपासूनच त्याबद्दल निर्णय व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागांचे वाटपही सन्मानपूर्वक व्हायला पाहिजे,’ असे पवार म्हणाल.

पुतळ्यांना अधिक सुरक्षा
संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची मोडतोड करणाऱ्यांच्या पाठीमागे समाज कधीही उभा राहणार नाही. ही विकृतीच असून, ही घटना निषेधार्ह असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला. तसेच, आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन गडकरी यांचा पुतळा महापालिकेतर्फे पुन्हा बसवण्यात येणार असून, अशा ठिकाणी पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आणि महापालिकेने सुरक्षा व्यवस्था पुरवावी, असेही त्यांनी सुचविले.

नोटाबंदीमुळे फसवणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेकांची अडचण झाली असल्याचे स्पष्ट करून आजही बँकेत जुन्या चलनातील ५८५ कोटी रुपये पडून आहेत. एवढी मोठी रक्कम जमा करून घेतली जात नाही आणि त्या बदल्यात नव्या नोटाही दिल्या जात नाहीत, असे गाऱ्हाणे त्यांनी मांडले. नोटाबंदीचे दूरगामी परिणाम काय होतील, त्यासाठी काय नियोजन केले पाहिजे, याचा कोणताही आढावा न घेता, हेकेखोर पद्धतीने पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांची फसवणूक झाल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले.

शेतकऱ्यांच्या कर्जाला मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. एक नवा पैसाही शेतकऱ्यांच्या हातात पडणार नाही.
अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना

0
0

काँग्रेसश्रेष्ठींचा आदेश अंतिम राहील : बागवे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, असाच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सूर आहे. या संदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पक्षश्रेष्ठींना अहवाल पाठविण्यात येईल. मात्र, पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आम्ही मान्य करू, असे शहर काँग्रेसने गुरुवारी स्पष्ट केले.
आगामी निवडणुकीत आघाडी करावी की नाही, याबाबत दोन्ही काँग्रेसमध्ये वेगवेगळी मते आहेत. याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी शहर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, अजित दरेकर, मुख्तार शेख आणि रमेश अय्यर या वेळी उपस्थित होते. ‘निवडणुकीत आघाडी करण्याबाबत अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा झालेली नाही. आम्ही स्वबळावर लढविण्याच्या तयारीनेच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण केली आहे. विविध प्रभागांमधून पक्षाकडे ५३५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या असून, त्यामध्ये २१० महिलांचा समावेश आहे. सध्या इच्छुकांच्या नावांची प्राथमिक छाननी सुरू असून लवकरच संभाव्य नावांची यादी प्रदेशच्या निवड मंडळाकडे पाठविण्यात येईल,’ असे बागवे म्हणाले.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सूर निवडणूक स्वबळावर लढण्याचाच आहे. याबाबत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून प्रदेशाला अहवाल सादर करण्यात येईल. मात्र, श्रेष्ठींचा आदेश आम्ही सर्वजण मान्य करू, असेही ते म्हणाले. दरम्यान, पक्षातील काही आजीमाजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षांतराची वाट धरली आहे. याबाबत विचारले असता, सत्तेच्या हव्यासापोटी इतर पक्षांकडे गेलेल्यांना मतदार धडा शिकवतील आणि ते बाहेर गेल्यामुळे पक्षातील नव्या पिढीला संधी मिळेल, अशी टिप्पणीही बागवे यांनी केली.

नोटबंदीविरूद्ध आज आंदोलन
देशात लागू झालेल्या नोटबंदीची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याविरोधात काँग्रेसच्या वतीने आज, शुक्रवारी देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून घेराव घालण्यात येणार आहे. तसेच येत्या सोमवारी (९ जानेवारी) प्रमुख चौकांमध्ये घंटानाद आणि थाळीनाद करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यकर्त्यांमुळेच ‘डीपी’ला विलंब

0
0

विविध प्रक्रियांमध्ये दहा वर्षांची लटकंती कारणीभूत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखड्याचे (डीपी) २००७-२७ या वीस वर्षांसाठी पुनरावलोकन करण्याचा इरादा जाहीर करण्यापासून ते त्याला अंतिम मंजुरी मिळेपर्यंतच दहा वर्षांचा कालावधी लागला. यामध्ये, महापालिका प्रशासन, सर्वसाधारण सभा, नियोजन समिती आणि तत्कालीन आघाडी सरकार आणि युती सरकार यांनी आपापल्या पद्धतीने वेळ घेतल्याने १० वर्षांनी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.
शहराच्या जुन्या हद्दीचा डीपी १९८७ मध्ये झाला होता. त्यामुळे, २००७-२०२७ या कालावधीसाठी त्याची प्रक्रिया त्यापूर्वीच सुरू होणे अपेक्षित होते. दुर्दैवाने, त्याचा इरादा जाहीर करण्याचा ठरावच सर्वसाधारण सभेने फेब्रुवारी २००७ मध्ये मान्य केला. तेव्हापासून प्रशासकीय पातळीवरही बरीच दिरंगाई झाली. ठरावीक मुदतीत डीपीचे प्रा-रूप जाहीर करणे अपेक्षित असताना, त्यासाठी दोनवेळा प्रशासनाने मुदतवाढ घेतली. सरकारने कायद्यातच बदल केल्याने अंतिम मुदत निश्चित करून त्यापूर्वी डीपी सादर करण्याचे आदेश दिले.
प्रशासकीय पातळीनंतर राजकीय स्तरावरही तत्कालीन आघाडी सरकारने डीपीची प्रक्रिया लवकर व्हावी, या दृष्टीने अभावानेच पुढाकार घेतला. डीपीवरील हरकती-सूचनांची मुदत संपल्यावर त्यावर सुनावणी घेण्यासाठी नियोजन समिती नियुक्त करणे गरजेचे होते. त्यासाठी, आघाडी सरकारने आठ महिन्यांचा वेळ घेतला. त्यानंतर, या समितीचे काम प्रत्यक्ष सुरू झाले. आघाडी सरकारप्रमाणेच युती सरकारने डीपी ताब्यात घेतल्यानंतर सहा महिन्यांत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. २०१५ च्या अखेरच्या टप्प्यात डीपी सरकारला सादर झाल्यानंतर तब्बल वर्षभर राज्य सरकारकडून विविध स्तरांवर त्याची छाननी सुरू होती. त्यामुळे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर तो जाहीर केला गेला. कदाचित, निवडणुका असल्याने त्याला विलंब लावण्यात आल्याची होणारी टीका चुकीची म्हणता येणार नाही.
सर्वसाधारण सभा आणि नियोजन समिती यांनीही डीपीवर त्वरेने निर्णय घेण्याची मानसिकता दाखवली नाही. राज्य सरकारने दिलेली मुदत संपत येणार असल्याचे दिसत असूनही सर्वसाधारण सभेत डीपीवर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. तर, राज्य सरकारनियुक्त नियोजन समितीमध्येही हरकती-सूचनांवरील शिफारसींवरून दोन गट पडल्याचे दिसून आले. त्यामुळे, पालिकेतील सदस्यांनी आणि सरकार नियुक्त समितीने, शिफारसींचे दोन स्वतंत्र अहवाल सर्वसाधारण सभेला सादर केले होते. या सर्व गोंधळात राज्य सरकारने डीपीच पालिकेकडून काढून घेतल्याने शहराचा विकास आराखडा करण्याची संधी पुन्हा एकदा हिरावून घेतली गेली.

डीपीविरोधात कोर्टबाजी
विविध उपसूचनांसह सर्वसाधारण सभेत मान्य करण्यात आलेला डीपीचा ठरावच बेकायदेशीर असल्याचा आरोप करून भाजपचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, नगरसेवक अशोक येनपुरे आणि शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत बधे यांनी हायकोर्टात धाव घेतली. सरकारने त्या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केल्याने कोर्टाने डीपीवर स्थगिती दिली नाही. परंतु, डीपीला अंतिम मान्यता देण्यापूर्वी याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार, नगरविकास विभागाने त्यांची सुनावणी घेतली. त्यांच्याप्रमाणेच पालिकेच्या ताब्यातून डीपी काढून घेतल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीनेही कोर्टात दावा दाखल केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुधारित ‘डीपी’चे पालिकेत पडसाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या विकास आराखड्याला (डीपी) मान्यता दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी बुधवारी जाहीर केल्यानंतर त्याचे वेगवेगळे पडसाद गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत उमटले. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आरक्षणे वगळणाऱ्या त्रिसदस्यीय समितीची चौकशी करा, अशी मागणी केली. शहराच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्र्‍यांचे अभिनंदन केले पाहिजे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाने केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शहराच्या प्रलंबित डीपीला मान्यता दिल्याचे जाहीर केले. तसेच, ९३७ पैकी ८५० आरक्षणे कायम ठेवण्यात आल्याचे सूतोवाच त्यांनी केले. पालिकेच्या ताब्यातून डीपी काढून घेतल्यानंतर तो सरकारला सादर करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अनेक शिफारसी सरकारने अमान्य केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यावरून पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी या समितीवरच निशाणा साधला.
त्रिसदस्यीय समितीने नेमलेल्या अनेक शिफारसी सरकारने स्वीकारल्याच नसल्याने ही समिती नेमण्याचा फार्स कशासाठी केला, अशी विचारणा सभागृहनेते बंडू केमसे यांनी केली. तसेच, या समितीची सीआयडी चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. सभागृहनेत्यांप्रमाणेच विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सरकारच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले. शहर नाही, तर भाजप केंद्रबिंदू ठेवून डीपीची घोषणा करण्यात आली असून, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल पाळला नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला. अशा पद्धतीची व्यवस्था लोकशाहीच्या हिताची नाही, असेही त्यांनी सुनावले.
दरम्यान, भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी मात्र सरकारकडे एक वर्ष असूनही त्यापूर्वीच डीपी जाहीर केल्याबद्दल समस्त पुणेकरांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव करावा, अशी सूचना केली. समाविष्ट गावांचा डीपी टप्प्याटप्प्याने मंजूर करणाऱ्यांना कोणताही प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिले.

काँग्रेसकडूनही स्वागत
काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी मुख्यमंत्र्यांनी शहरातील पेठांसाठी अतिरिक्त एफएसआय देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच, शहरातील या परिसरात यापूर्वीच रस्ता रुंदी करण्यात आली असून, प्रस्तावित रुंदीकरण रद्द करण्याच्या मागणीलाही सकारात्मक प्रसिताद दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. परंतु, त्रिसदस्यीय समितीने घेतलेले निर्णय रद्द करून पुन्हा नव्याने निर्णय घेतले जातात, म्हणजेच त्यांच्यावर विश्वास नसल्याने सिद्ध होत असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांचे प्रस्तावित रूंदीकरण केले रद्द

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या मध्यवस्तीतील अनेक रस्त्यांचे प्रस्तावित रुंदीकरण रद्द करून महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मी रस्त्याचे रुंदीकरण पूर्णतः रद्द करण्यात आले असून, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, शास्त्री रस्ता, नेहरू रस्ता अशा महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण कमी करण्यात आले आहे.
महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रा-रूप विकास आराखड्यात महत्त्वाचे रस्ते रुंद करण्याचे प्रस्तावित केले गेले होते. त्यावर अनेक हरकती-सूचना दाखल झाल्यानंतर नियोजन समितीने रस्त्यांचे रुंदीकरण रद्द करण्याची शिफारस केली होती. मात्र, सरकारकडे डीपी सादर करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने शहराच्या वाहतुकीचा वेग वाढण्यासाठी महत्त्वाच्या रस्त्यांचे पुन्हा रुंदीकरण प्रस्तावित केले होते. त्यावरून, स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. रस्ता रुंदीकरणामुळे अनेक घरे आणि दुकाने बाधित होणार होती. राज्य सरकारकडे हे रुंदीकरण रद्द करण्याची मागणी अनेकांनी केली होती. त्यानुसार, विकास आराखडा मंजूर करताना, प्रस्तावित रस्त्यांचे रुंदीकरण पूर्णतः रद्द किंवा कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे, शहराच्या मध्यवस्तीतील अनेकांना दिलासा मिळणार आहे.
लक्ष्मी रस्ता २४ मीटर (सुमारे ८० फूट) करण्याचे त्रिसदस्यीय समितीने सुचवले होते. लक्ष्मी रस्त्याच्या दोन्ही बाजूस व्यापारी इमारती असल्याने हे संपूर्ण रुंदीकरणच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, शिवाजी रोड, बाजीराव रोड कुमठेकर रोड यासह इतर प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातील काही रस्ते, १८ मीटरपासून २४ मीटरपर्यंत प्रस्तावित करण्यात आले होते. त्याची रुंदी सध्या आहे तेवढीच ठेवण्यात आली असून, काही ठिकाणी त्यात किरकोळ वाढ सुचविण्यात आली आहे. रस्त्यांचे रुंदीकरण रद्द केल्यामुळे अनेक घरे आणि दुकाने वाचणार आहेत.

कोंडी कमी करण्याची गरज
शहरातील प्रस्तावित रस्त्यांचे रुंदीकरण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी हे सर्वच रस्ते आताच वाहतूक कोंडीने गजबजलेले आहेत. त्यामुळे, या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीला चालना देऊन खासगी वाहने कमी करण्याचे उपाय महापालिकेला योजावे लागणार आहेत. यातील काही रस्त्यांवरून मेट्रो प्रस्तावित असली, तरी इतर रस्त्यांवरील कोंडी कमी करण्यासाठी कोणते निर्णय घेतले जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘राष्ट्रवादी’त वाजली ‘इन्कमिंग’ची रिंग

0
0

मनसेच्या तीन नगरसेविकांनी बांधले घड्याळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षांतील आजी-माजी नगरसेवकांची भारतीय जनता पक्षात जाण्याची स्पर्धा सुरू असतानाच राष्ट्रवादीतही ‘इन्कमिंग’ सुरू झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन नगरसेविका आणि काँग्रेसचा एक अशा चार नगरसेवकांनी गुरुवारी घड्याळ हाती बांधले.
मनसेच्या नगरसेविका आशा साने, प्रिया गदादे, अर्चना कांबळे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक रइस सुंडके,तसेच अनिस सुंडके आणि शिवाजी गदादे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. साने या वाकडेवाडी परिसरातील, तर कांबळे या बोपोडी परिसरात मनसेच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. प्रिया गदादे या देखील पर्वती परिसरातील मनसेच्या नगरसेविका आहेत. या सर्वांच्या प्रवेशामुळे संबंधित परिसरातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाही बळ मिळणार आहे. गेल्या काही दिवसांत भाजपमध्ये प्रवेशासाठी आजी-माजी नगरसेवकांची रीघ लागली आहे. अजूनही निवडकीच्या तोंडावर पक्षांतराची लाट सुरूच राहणार, हे यातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांची ‘आगीतून फुफाट्यात’ पडल्यासारखी अवस्था होऊ देणार नाही, अशी हमी पवार यांनी दिली. आमदार अनिल भोसले यांच्या आमदार निधीतून करण्यात येणाऱ्या विकासकामांचे उदघाटन पवार यांच्या हस्ते झाले. महापौर प्रशांत जगताप, भोसले, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, महापालिकेतील सभागृह नेते बंडू केमसे आदी या वेळी उपस्थित होते. ‘गेल्या दहा वर्षांत शहरात अनेक मोठे प्रकल्प उभारले आहेत. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी मेट्रोचे नियोजन आघाडी सरकारच्या काळात झाले. फक्त या प्रकल्पातील काही परवानग्या देण्याचा सोपस्कार केंद्र सरकारने पूर्ण केला,’ असा टोला पवार यांनी लगावला. केंद्र आणि राज्य सरकार केवळ घोषणाबाजी करीत आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार जनतेची दिशाभूल करीत असून त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. सत्तेत येऊन अडीच वर्ष प्रकल्पांना मंजुरी का दिली नाही, असा सवाल त्यांनी विचारला.

पक्षात अनेकजण प्रवेश करीत असल्याने जुन्या-नव्या कार्यकर्त्यांशी मनात कोणत्याही शंका आणू नयेत. प्रभागातील जनसंपर्क, प्रतिमा आणि कामे पाहून तिकीट दिले जाणार आहे. त्यात जात-पात कुठेही आणली जाणार नाही.
अजित पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वच पक्ष आपले विरोधक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘धनुष्यबाण हाच आपला उमेदवार. प्रत्येक उमेदवाराच्या रूपात उद्धव ठाकरे यांना पाहून पक्षाचे काम करा. या निवडणुकीत पालिकेवर भगवा फडकवा,’ असा मंत्र खासदार अनिल देसाई यांनी इच्छुकांना देऊन सर्वच पक्ष आपले विरोधक असून, संघर्षांसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले.
शिवसेनेतर्फे गुरुवारी ‘उमेदवार प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन केले होते. यावेळी उमेदवारांना बोलावे, चालावे कसे याचे मार्गदर्शन करतानाच अंगावरील कपडे कसे असावेत, याचीही माहिती देण्यात आली आहे.
ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ समीरण वाळवेकर यांनी ‘निवडणूक व प्रसिद्धीमाध्यमे’ या विषयावर, दीपक शेंडे यांनी मतदारयादीचे वाचन कसे करावे याची माहिती दिली. विनय मोरे यांनी ‘संभाषण कौशल्य’ या विषयावर उ​पस्थितांना मार्गदर्शन केले. शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई, संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, शशिकांत सुतार, शहरप्रमुख विनायक निम्हण, रघुनाथ कुचिक, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, श्याम देशपांडे, अजय भोसले, सचिन तावरे, निर्मला केंडे आदी उपस्थित होते. ‘इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तिकीट मिळो अथवा न मिळो, कोणीही नाराज न होता धनुष्यबाणच हाच आपला उमेदवार मानून तन, मन आणि धनाने काम करा,’ असा सल्ला देसाई यांनी दिला.

युती होणार की नाही?
इच्छुक उमेदवारांनी थेट कोल्हे यांनाच युती होणार की नाही, असा प्रश्न विचारला. युतीचा निर्णय हा व​रिष्ठ पातळीवर होईल. निर्णय काहीही झाला तरी आपण निष्ठेने काम केले पाहिजे, अशी सूचना कोल्हे यांनी केली. यावेळी काही इच्छुकांनी तर आपण स्वबळावरच लढण्याच्या भावना मांडल्या. तिकीट मिळाले नाही तरी नाराज न होता पक्षाचे काम केले पाहिजे. ​निष्ठावान शिवसैनिकांचा आधी विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

शरद मोहोळची पत्नी शिवसेनेत
खून, खंडणी यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शरद मोहोळ याची पत्नी स्वाती यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. इंडियन मुजाहिदीनचा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकी याचा येरवडा जेलमध्ये खून केल्यानंतर मोहोळ प्रसिद्धीझोतात आला. कोथरूड परिसरातून स्वाती यांना निवडणुकीत उतरविण्याचा शिवसेनेचा मानस आहे. याबाबत ​शहरप्रमुख निम्हण म्हणाले की, ‘मोहोळ यांनी बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजसेवा केली आहे. मोहोळ यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्या शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यां म्हणून चांगले काम करतील.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवीगाळ करून अभिनेत्याला मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चारचाकी रस्त्याच्या बाजूला न घेतल्याने दोघांनी ‘रेगे’फेम अभिनेत्याला शिवीगाळ करून मारहाण केली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता कर्वे रस्त्याजवळील कलिंगा हॉटेलज‍वळ हा प्रकार घडला. या वेळी त्यांनी रागाच्या भरात अभिनेत्याला दगड मारण्याचाही प्रयत्न केला; मात्र, दगड चारचाकीच्या बोनेटवर पडल्याने गंभीर दुखापत झाली नाही.
या प्रकरणी अभिनेता आरोह नितीन वेलणकर (वय २७, रा. कोथरूड) यांच्या तक्रारीहून डेक्कन पोलिसांनी प्रवीण ज्ञानेश्वर मोहोळ (वय २९, त्रिमूर्तीनगर, कोथरूड) आणि संग्राम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रवीणला अटक केली आहे.
आरोह त्याच्या मित्राची वाट पाहत कलिंगा हॉटेलजवळ चारचाकी वाहनात बसला होता. तेवढ्यात इनोव्हा गाडीतून दोघे आले आणि त्यांनी कर्कश हॉर्न वाजवून गाडी बाजूला घेण्याचा इशारा केला. तेव्हा आरोहने लगेच गाडी बाजूला घेतली. मात्र, गाडी रस्त्यात असल्याचा राग मनात धरून प्रवीण मोहोळ आणि संग्रामने आरोहच्या गाडीच्या मागे गाडी लावली व उतरून आरोहला शिवीगाळ करायला सुरुवात केली. या दोघांनी एवढ्यावरच न थांबता आरोहच्या गाडीची काच खाली घेऊन त्याला मारहाणही केली. या वेळी एकाने दगड उचलून आरोहला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेम हुकल्याने तो दगड बोनेटवर पडला. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रवीणला अटक केली असून संग्रामबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
मला मारहाण करणारे दोघेही मद्यधुंद होते. मी एकटा असल्याने गाडीच्या बाहेर निघालो नाही. बाहेर निघालो असतो, तर रक्तबंबाळ होईपर्यंत त्यांनी मारहाण केली असती. माझ्यानंतर त्यांनी तेथून जवळ असणाऱ्या आणखी एकाला मारहाण केली. मला मारहाण करणाऱ्या दोघांपैकी एक असणारा संग्राम हा माजी नगरसेवकाचा मुलगा आहे, असे समजले आहे. मला मारहाण होतानाचा तमाशा लोक पाहत होते; मात्र, त्यापैकी एकानेही मदत केली नाही, असे आरोहने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील महिला सुरक्षित

0
0

पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची मा‌हिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पुण्यातील महिला सुरक्षित आहेत. महिलांना आणि मुलींना सुरक्षा देणे आमचे प्रथम कर्तव्य आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून लवकरच जनजागृती कार्यक्रमही राबविण्यात येणार आहेत,’ अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गुरुवारी दिली.
पुणे पोलिस आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शुक्ला यांनी २०१६ मध्ये पुणे शहरात झालेल्या गुन्ह्यांचा वार्षिक आढावा घेतला. बेंगळुरू येथे ३१ ‌डिसेंबरच्या रात्री झालेल्या विनयभंगाच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्या बाेलत हाेत्या. ‘महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांबाबत पुणे पोलिस अत्यंत संवेदनशील आहेत. महिलांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी यावे. महिलांनी पोलिसांकडे मदतीसाठी कॉल केल्यास त्यांच्यापर्यंत पोहाेचण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा हा आमचा प्रयत्न आहे,’ असेही शुक्ला यांनी नमूद केले.
‘पोलिसांकडे २०१६ मध्ये बलात्काराचे ३६४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील ३५१ गुन्हे उघडकीस आले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये ९७ टक्के आरोपी फिर्यादींच्या परिचयातील आहेत. यातील १३ टक्के आरोपी नातेवाईक आहेत. ६८ टक्के आरोपी ओळखीचे आहेत; तर १६ टक्के आरोपी शेजारचे आहेत. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या गुन्ह्यांचे प्रमाण ५० टक्के आहे. २०१६ मध्ये १७७ गुन्हे लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्यात आल्याचे आहेत. २०१५ या वर्षाच्या तुलनेत २०१६ मध्ये विनयभंगाच्या केसेसमध्ये सहा टक्के घट आहे. स्ट्रीट क्राइममध्ये २०१६ मध्ये ३० टक्क्यांनी घट झाली आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली.
‘महिलांविरुद्ध झालेल्या गुन्ह्यांमध्ये तक्रार देण्यासाठी महिला पुढे येत नाहीत. अशा महिलांनी पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार दाखल करावी. पोलिसांकडून त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल. महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिस बीट मार्शलची संख्या वाढविण्यात आलेली आहे; तसेच शाळा आणि कॉलेजबाहेर मुलींना त्रास दिला जाऊ नये याकडेही पोलिस लक्ष देत आहेत,’ असे शुक्ला यांनी सांगितले.

गुन्हे - २०१६
गुन्हा - दाखल - उघड
बलात्कार - ३५४ -३५१
विनयभंग -६६१ - ६४०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हे दाखल होऊनही बिल्डर अद्याप मोकाट

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील नामांकित बिल्डरवर ‘महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट’नुसार (मोफा) २६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे असले तरी अद्याप एकावरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोलिसांचा बिल्डरांवर वरदहस्त असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढीस लागली आहे.
बिल्डरने ठरलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा ताबा देण्यापूर्वी भोगवटापत्र दिले नसेल, तर संबंधितांवर ‘मोफा’नुसार कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. ‘मोफा’नुसार गुन्हा दाखल झाल्यास बिल्डरला एक ते पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. पुण्यात २०१६ मध्ये विविध पोलिस ठाण्यात बिल्डरांवर ‘मोफा’नुसार २६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक नामांकित बिल्डरचा समावेश आहे. पण,अद्याप एकाही बिल्डवर कारवाई झालेली नाही. याबाबत पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांना विचारले असता, ‘शहरात बिल्डवर मोफानुसार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये तपास पूर्ण करून कारवाई केली जाईल. यामध्ये कोणालाही सोडले जाणार नाही,’असे त्यांनी स्पष्ट केले.
मोफाच्या गुन्ह्यात तक्रारदारांना मदत करणारे निवृत्त पोलिस उपअधीक्षक काशीनाथ तळेकर यांनी सांगितले, की ‘पुण्यात विविध ठाण्यात मोफाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एका गुन्ह्यात मी तक्रारदार आहे. पोलिसांनी मोफानुसार गुन्हे दाखल केले आहेत. पण, एकाही गुन्ह्यात बिल्डरला अटक झालेली नाही. तसेच, पोलिसांनी बिल्डरच्या कार्यालयाची आणि त्यांचे भागीदार कोण आहेत याचा देखील तपास अनेक गुन्ह्यांत केलेला नाही. मुंबई पोलिस कायदा कलम ६४ नुसार दखलपात्र गुन्ह्यात आरोपीला तत्काळ अटक करावी, असे म्हटले आहे. मोफा हा दखलपात्र गुन्हा आहे. मात्र, त्यामध्ये बिल्डवर कारवाई झालेली नाही. मोफाच्या गुन्ह्यात पोलिस निष्काळजीपणा दाखवत असल्याचे दिसून येत आहे.‘

बालेवाडी प्रकरणातील आरोपी फरारीच
बालेवाडी येथे स्लॅब कोसळून सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी बिल्डर अद्याप फरार आहे. याबाबत श्रीमती शुक्ला म्हणाल्या की,‘ हायकोर्टाने त्यांचा जामीन फेटाळला आहे. त्यांना जामीन मिळू नये यासाठी आम्ही प्रयत्न केले. आम्ही त्यांच्या मागावर आहोत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. व्हाइट कॉलर आरोपींना अटक करण्यास पोलिस कचरत नाहीत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images