Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘एक्स्प्रेस-वे’वर अपघातात चार जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर मंगळवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास, खोपोली एक्झिटजवळील पुलाजवळ चार वाहनांच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये दोन ट्रेलर, एक टेम्पो व एका चारचाकीचा समावेश आहे. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक चार तास विस्कळित झाली होती.

बाळासाहेब वामन शिंदे (वय ४०, रा. फलटण, सातारा), संजय विठ्ठल पवार (वय ४०, रा. घणसोली, नवी मुंबई), राजेंद्र शंकरराव पाटणकर (वय ४१, रा. सावर्डे, चिपळूण, रत्नागिरी), ट्रेलर चालक नंदकिशोर रामधन माली (वय ४२, रा. राजस्थान) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. जखमींमध्ये भारत किसन मोरे (रा. सोनंद, सांगोला, सोलापूर), रामचंद्र रखमाजी जाधव (वय ५७, रा. पुणे), दत्तात्रय कानोबा शेजवळ (वय ५८, रा. मुळशी), नवनाथ वामन शिंदे, सागर व विष्णू (तिघेही राहणार फलटण, सातारा) यांचा समावेश आहे.

खोपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईला लोखंडी सळया घेऊन जाणाऱ्या ट्रेलरच्या चालकाचे, तीव्र उतार आणि वळणावर नियंत्रण सुटल्याने हा ट्रेलर, पुढे लोखंडी अँगल घेऊन जात असलेल्या दुसऱ्या ट्रेलरवर मागून जोरात आदळला. यामुळे दोन्ही अपघातग्रस्त ट्रेलर मार्गावरील दुसऱ्या लेनवरून जाणारी कार आणि तिसऱ्या लेनवरून जाणारी टेम्पो यांवर जोरात धडकले. दोन्ही ट्रेलर आणि टेम्पोमध्ये अडकलेल्या कारचा अक्षरशः चुराडा झाला.

यामुळे कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. लोखंडी रॉडची वाहतूक करणाऱ्या ट्रेलर चालकाचाही जागीच मृत्यू झाला असून, टेम्पोमधील दोघे जण जखमी झाले आहेत. अपघातामुळे टेम्पो मार्गालगतचे लोखंडी संरक्षक दुभाजक तोडून मार्गालगतच्या दरीच्या अगदी टोकावर उलटून दरीच्या टोकावरच अडकला. टेम्पोमधील चालकासह प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून टेम्पो दरीत कोसळला नाही. एका ट्रेलरमधील लोखंडी रॉड मार्गावर आणि दरीत कोसळले.

वाहतुकीची कोंडी

चार वाहनांच्या भीषण अपघातामुळे मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतूकीस बंद झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. अपघाताची माहिती कळताच दस्तुरी (बोरघाट) महामार्गाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सूर्यकांत फराडे, जी. जी. पवार, यू. आय. पटेल, व्ही. बी. खैरनार यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहनांतील मृत व जखमींना आपत्कालीन यंत्रणेच्या पथकाच्या मदतीने बाहेर काढले. जखमींना पुढील उपचारांसाठी तत्काळ पनवेल येथील एम. जी. एम. हॉस्पिटलमध्ये रवाना केले असून, जखमींवर तेथे उपचार सुरू आहेत. त्यानंतर मार्गावरील त्यानंतर मार्गावरील लोखंडी रॉड, अँगल व वाहने बाजूला करून वाहतूकीसाठी एक लेन सुरू केली. तोपर्यंत रस्त्यावर सुमारे सहा ते सात किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी साडेअकरा वाजता अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतुकीसाठी मार्ग खुला केला. दुपारी बारा वाजता मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदान केंद्रांबाहेर मांडणार उमेदवारांची ‘कुंडली’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निवडणुका आल्या, की उमेदवारी अर्ज भरतानाच वाजतगाजत मिरवणुका काढून उमेदवारांकडून प्रचाराची राळ उडवली जाते; पण या वेळच्या महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार असल्याने हे चित्र फारसे पहायला मिळणार नाही. या निर्णयामुळे उमेदवारांचा शक्तिप्रदर्शनाचा मार्ग बंद झाला आहे. तसेच आता निवडणूक आयोगाकडूनच मतदान केंद्रांबाहेर उमेदवारांची ‘कुंडली’ जाहीरपणे फलकावर लावली जाणार आहे. त्यामुळे मतदारांना आपल्या उमेदवारांची खरी ओळख आणि उमेदवारांना निकालाचे भवितव्य अगोदरच दिसणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दोन महत्त्वपूर्ण निर्णय या वेळी घेतले आहेत. त्यामध्ये उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरणे आणि उमेदवारांकडून देण्यात येणाऱ्या शपथपत्रातील मालमत्ता, गुन्ह्यांची माहिती मतदान केंद्रांबाहेर फलकावर लावणे यांचा समावेश आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच या दोन्ही ​निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे; मात्र या निर्णयांमुळे इच्छुक उमेदवारांपुढे आतापासून प्रश्न​चिन्ह निर्माण झाले आहे.

उमेदवारी अर्ज भरतानाच उमेदवार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी वाजतगाजत मिरवणुका काढतात. त्यामुळे होणारा पैशाचा अपव्यय आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायती आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये करण्यात आली. आता पुणे महापालिकेच्या निवडणुकीतही अर्ज ऑनलाइन भरले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांचा हिरमोड होणार आहे.

सध्या अनेक इच्छुक उमेदवार हायटेक प्रचाराचा अवलंब करू लागले आहेत. प्रचाराचाही इव्हेंट झाला असल्याने त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. आता ऑनलाइन अर्ज व्यवस्थित भरण्याची खबरदारी उमेदवारांना घ्यावी लागणार आहे.

उमेदवारांकडून सादर करण्यात येणारे शपथपत्र किंवा घोषणापत्रांमध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता, दाखल असलेले गुन्हे आणि शिक्षा आदी माहिती असते. आतापर्यंत ही शपथपत्रे निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर असायची; मात्र सर्वच नागरिकांकडून ती माहिती पाहिली जात नव्हती. त्यामुळे आपल्या उमेदवाराच्या पूर्वाश्रमीच्या करामती मतदारांना पहायला मिळाव्यात, यासाठी शपथपत्रांतील माहितीचा गोषवारा तयार करून तो प्रत्येक मतदान केंद्राबाहेर फलकांवर लावला जाणार आहे. याशिवाय वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन आयोगाकडून ही माहिती जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे मतदारांना उमेदवारांची खरी ओळख होणार आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरताना या वेळी उमेदवारांना फार काळजी घ्यावी लागणार आहे.

...............

ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरताना...

* निवडणूक आयोगाने दिलेल्या वेबसाइटवर जाऊन युजरनेम आणि पासवर्ड टाकावा.

* ‘क्रिएट अ कँडिडेट रजिस्ट्रेशन’ यावर जाऊन उमेदवाराची नोंदणी करावी.

* त्यानंतर कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक लढवायची आहे, याचे पर्याय दिसतील. त्यापैकी महापालिका हा पर्याय उमेदवारांना निवडावा लागेल.

* हा पर्याय निवडल्यावर उमेदवाराला वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. त्यामध्ये नाव, वडील किंवा पतीचे नाव, आडनाव, महसूल विभाग, जिल्हा, तालुका, महापालिकेचा प्रभाग क्रमांक ही माहिती भरावी लागेल. माहिती परिपूर्ण असल्यास ‘सेव्ह सक्सेसफुली’ हा संदेश दिसेल.

* ही माहिती भरल्यावर उमेदवारी अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी पुन्हा युजरनेम व पासवर्ड टाकून ‘क्रिएट अ कँडिडेट रजिस्ट्रेशन’ यावर क्लिक केल्यावर स्क्रीनवर उमेदवारी अर्ज दिसेल.

* उमेदवारी अर्जामध्ये वैयक्तिक माहिती भरल्यावर शपथपत्रे भरावी लागतील. ही माहिती भरून झाल्यावर उमेदवाराला नोंदणी क्रमांक मिळू शकेल. त्याचा उपयोग पुढील टप्प्यात होणार असल्याने संबंधित क्रमांक उमेदवाराला लक्षात ठेवावा लागणार आहे.

* अर्जासोबत स्कॅन केलेली अत्यावश्यक कागदपत्रे उमेदवाराला अपलोड करावी लागणार आहेत.

* उमेदवारी अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून उमेदवाराने त्यावर सही करावी. त्या अर्जाबरोबर अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या प्रती जोडून संबंधित अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिल्म इन्स्टिट्यूट की कारागृह?

$
0
0

कडक सुरक्षाव्यवस्थेमुळे ‘एफटीआयआय’मधील मुक्त वातावरण हरवल्याची चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला (एफटीआयआय) आलेल्या लेटर बॉम्बच्या पार्श्वभूमीवर संस्थेतील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. ‘एफटीआयआय’मध्ये यापुढे महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक महामंडळाची सुरक्षा असेल. यामुळे संस्थेला भेट देणाऱ्यांबरोबरच संस्थेतील सर्व घटकांच्या वावरण्यावर बंधने आली आहेत. संस्थेचे महत्त्व लक्षात घेता सुरक्षा आवश्यक असली, तरी कलेचे शिक्षण देणाऱ्या संस्थेतील मुक्त वातावरण हरवत चालल्याचे बोलले जात आहे. नवीन वर्षात शैक्षणिक संस्थेचे रूपांतर कारागृहात व्हायला सुरुवात झाल्याची टीका विद्यार्थ्यांनी केली आहे.

‘एफटीआयआय’ला सुरक्षा पुरवणाऱ्या खासगी कंपनीचे कंत्राट या महिन्याच्या शेवटी संपत आहे. नवीन वर्षात खासगी कंपनीपेक्षा सरकारी सुरक्षेवर विश्वास दाखवून संस्थेने हे कंत्राट न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक महामंडळ या सरकारी संस्थेकडे देण्यात आली आहे. या खाकी वर्दीतील सुरक्षारक्षकांनी संस्थेत कडक सुरक्षेची अंमलबजावणी केली आहे. संस्थेला भेट द्यायला आलेल्या लोकांशी अरेरावी करणे, असभ्य भाषेत बोलणे अशा तक्ररी खासगी कंपनीबाबत संस्थेला मिळाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनादरम्यान संस्था चर्चेत आल्याने तेव्हापासून संस्थेतील मुक्त प्रवेशावर बंधने आली आहेत. या दरम्यान एफटीआयआय व रानडे इन्स्टिट्यूटला पार्सलद्वारे स्फोटके आणि धमकीचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर सुरक्षा अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदूकधारी, तसेच गणवेशातील ५० रक्षक सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

‘एफटीआयआय ही महत्त्वाची राष्ट्रीय संस्था आहे. अशा संस्थेमध्ये सुरक्षाव्यवस्था चांगली असणे आवश्यक आहे. यापूर्वी ‘लेटरबॉम्ब’सारखे प्रकार घडले आहेत. तसेच सुरक्षा अधिक कडक करण्याची सूचना पुणे पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडे काही गुप्त माहिती असेल, तर सुरक्षेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राष्ट्रीय संस्थेला साजेशी सुरक्षाव्यवस्था संस्थेत नाही, असे पत्र पोलिसांकडून २०११पासून येत आहे. त्यामुळे खासगी संस्थेपेक्षा राज्य सरकारच्या संस्थेला सुरक्षा व्यवस्थेचे काम देण्यात आले आहे,’ असे संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी सांगितले. स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याचा आरोप त्यांनी खोडून काढला. दरम्यान, ‘एफटीआयआय संस्थेत सुरक्षेचे अनेक प्रश्न आहेत. ‘लेटरबॉम्ब’मुळे प्रश्न अधिकच गुंतागुंतीचे झाले आहेत. खासगी सुरक्षा संस्था चांगल्या प्रकारे सुरक्षा पुरवू शकत नाही, हे दिसून आले आहे,’ असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

............

बंदूकधारी सुरक्षारक्षक शैक्षणिक संस्थेत असणे हा घाबरवण्याचा प्रकार आहे. सुरक्षा आवश्यक असली, तरी मुक्त वातावरणदेखील तितकेच आवश्यक आहे. चित्रपट व कलेविषयी शिक्षण देणाऱ्या संस्थेतील वातावरण अधिक मुक्त असायला हवे. नवीन व्यवस्थेमुळे शैक्षणिक संस्थेचे रूपांतर कारागृहात झाल्यासारखे वाटत आहे.
- यशस्वी मिश्रा, सदस्य, एफटीआयआय विद्यार्थी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लघुपट निर्मितीच्या कार्यशाळेचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आरभाट फिल्म्स’च्या वतीने ‘शूट अ शॉर्ट’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यशाळेचे हे सहावे पर्व आहे. पाच ते आठ जानेवारीदरम्यान ही लघुपट निर्मितीची कार्यशाळा कोथरूडच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात होणार आहे. कार्यशाळेत उमेश कुलकर्णी आणि चित्रपट अभ्यासक व प्राध्यापक समर नखाते मार्गदर्शन करणार आहेत.

मराठी भाषेत होणाऱ्या या कार्यशाळेविषयी कुलकर्णी म्हणाले, ‘लघुपट निर्मितीसाठी फक्त तंत्र पुरेसे नसून, एक कलामाध्यम म्हणून त्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी ही कार्यशाळा आहे. लघुपट निर्मितीची इच्छा असणाऱ्यांसाठी लघुपटाची मूलभूत संकल्पना, लघुपटाकडे कला आणि माध्यम म्हणून बघणे, याही गोष्टींचे मार्गदर्शन या वेळी केले जाणार आहे.’ लघुपट निर्मितीत रस असलेल्या १८ वर्षांवरील सर्वांसाठी ही कार्यशाळा खुली आहे. कार्यशाळेविषयीच्या अधिक माहितीसाठी ९१६७६७७८०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुरडा पार्ट्याही झाल्या कॅशलेस

$
0
0

थंडी वाढल्याने पर्यटकांची कृषी केंद्रांमध्ये गर्दी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रोख रकमेच्या टंचाईवर मार्ग काढून पुणे जिल्ह्यातील बहुतांश कृषी पर्यटन केंद्रांनी ऑनलाइन पेमेंट, तसेच चेकचा पर्याय निवडल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून हुरडा पार्ट्यांचा बहर वाढला आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये शेतात शेकोटी पेटवून जोडीला हुरडा, चटणी आणि मडक्यातल्या गोड दह्याची मेजवानी, चुलीवरच्या गरम भाकऱ्या, वांग्याचे भरीत अन् मिरचीचा ठेचा, असा फक्कड बेत असलेल्या हुरडा पार्ट्यांमुळे कृषी पर्यटन केंद्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. ‘कॅशलेस’ झाल्यावर गेल्या वर्षीच्या तुलनेत व्यवसाय पन्नास टक्क्यांनी वाढल्याचाही काही केंद्रांचा अनुभव आहे.

गेल्या काही दिवसांत थंडी वाढल्यामुळे उत्साही पर्यटकांची पावले कृषी पर्यटन केंद्रांकडे वळत आहेत. रोजच्या धावपळीतून सुटीच्या दिवशी निवांत क्षण घालवण्यासाठी पर्यटक सतत नवनवीन ठिकाणांच्या शोधात असतात. पावसाळ्यात धबधब्यांच्या ठिकाणी असलेली हॉटेल्स, तर थंडीमध्ये हिल स्टेशन आणि कृषी पर्यटनाला जाण्याचा नवा ट्रेंड आला आहे. पुणे परिसराला लागून असलेल्या कृषी पर्यटन केंद्रांवर आवर्जून हुरडा पार्ट्यांची चौकशी केली जात आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्या कमी कालावधीच्या असल्याने पर्यटकांनी हुरडा पार्ट्यांचा बेत रचला असून, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाही काही केंद्रांचे बुकिंग फुल झाले आहे.

दर वर्षी साधारणतः नोव्हेंबरअखेरीस थंडी वाढली, की हुरडा पार्ट्यांना सुरुवात होते. जानेवारी अखेरपर्यंत शेतकरी हुरड्याचा बेत ठेवतात. गेल्या महिन्यात सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे लोकांकडे रोख रकमेची टंचाई निर्माण झाली होती. बहुतांश केंद्रे ग्रामीण भागात असल्याने तिथे कॅशलेस व्यवहार होत नव्हते. परिणामी हुरडा पार्ट्यांचा यंदाचा हंगाम वाया जाण्याची चिन्हे दिसू लागली होती; मात्र शेतकऱ्यांनी ऑइनलाइन पेमेंटचा पर्याय स्वीकारला असून, गेल्या पंधरा दिवसांपासून या केंद्रांवर हुरडा पार्ट्या रंगायला सुरुवात झाली आहे.

‘हुरडा पार्टीची क्रेझ वाढली असून, दर वर्षी पर्यटकांची संख्या वाढते आहे. त्यांच्या आवडीनुसार आता काही केंद्रांनी अळूवडी, मासवडी असे पदार्थही उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. तसेच तुळस, गवती चहा यांचा वापर करून बनवलेल्या ‘हर्बल टी’चा पर्यायही पर्यटकांना आवडला आहे. पर्यटकांना आम्ही गरमागरम हुरडा, जोडीला लसूण-खोबरे चटणी, गोड दही असे दुपारी खायला देतो आणि रात्रीच्या जेवणात गावरान पद्धतीची चुलीवरची झुणका-भाकर, वांग्याची भाजी, ठेचा असतो. थंडीच्या आल्हाददायक वातावरणात या जेवणाला मजा येते,’ असे ‘सह्याद्री अॅग्रो टुरिझम’चे बाळासाहेब बराटे यांनी सांगितले.

‘पर्यटकांच्या सोयीसाठी आम्ही ऑनलाइन पेमेंट आणि चेक स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रोकडटंचाईचा फटका तर बसला नाहीच, उलट या वर्षी पर्यटकांची संख्या पन्नास टक्क्यांनी वाढली आहे. नाताळच्या सुट्ट्यांमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हुरडा आणि शाकाहारी जेवणाचे पर्याय उपलब्ध असून, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोकांचे बुकिंग होते आहे,’ असे ‘मनाली अॅग्रो फार्म’चे जितेंद्र रानडे यांनी सांगितले.

...

कॅम्प फायर आणि सांस्कृतिक कार्यक्रम

‘साधारणतः सकाळी अथवा सायंकाळी चार ते सहादरम्यान हुरडा खाण्याची पद्धत आहे; मात्र अलीकडे पर्यटक ‘रात्री शेकोटी करून मग हुरडा द्या’ अशी मागणी करत आहेत. रात्रीच्या मुक्कामाला पारंपरिक संगीत अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम असावेत, अशी पर्यटकांची अपेक्षा आहे,’ असे जितेंद्र रानडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावंत, लायगुडेंचा भाजपमध्ये प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पालिकेतील माजी पदाधिकाऱ्यांसह विद्यमान नगरसेवकांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेशांचा ‘सिललिसा’ सुरूच असून, मंगळवारी रात्री उशिरा काँग्रेसमधून शीतल सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राजाभाऊ लायगुडे यांचे ‘इन्कमिंग’ झाल्याचे कळते.
येत्या काही दिवसांत भारतीय जनता पक्षामध्ये आणखी काही प्रवेश होण्याची शक्यता वाढली असून, पक्षात येण्यास इच्छुक असणाऱ्यांना घेऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कदाचित मुंबईच्या आणखी एक-दोन फेऱ्या कराव्या लागण्याचे संकेत आहेत.
गेल्या काही दिवसांतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणखी प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार, मंगळवारी रात्री खडकवासला प्रभागातील मनसेचे नगरसेवक राजाभाऊ लायगुडे आणि येरवड्यातील काँग्रेसच्या नगरसेविका शीतल सावंत यांचा प्रवेश झाल्याचे समजते.
यापुढील काही दिवसांत आणखी काँग्रेस-मनसेसह राष्ट्रवादीमधूनही आणखी काही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असून, कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यातच सर्वांचा एकाचवेळी प्रवेश होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासपोर्ट काढायचाय; टपाल कार्यालयात जा

$
0
0

परराष्ट्र मंत्रालयाचा निर्णय; सेवांचे विकेंद्रीकरण करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पासपोर्ट केंद्राच्या सुविधांचा अधिका​धिक विस्तार करण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्रालयातर्फे आता टपाल कार्यालयांची मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे पासपोर्ट काढू इच्छिणाऱ्यांना किंवा नूतनीकरण करणाऱ्यांना विभागीय कार्यालयात जाण्याऐवजी जवळच्या टपाल कार्यालयातच अर्ज भरणे शक्य होणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्व विभागीय कार्यालयांमध्ये हा बदल करण्यात येणार आहे.

पासपोर्ट अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुधारण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने चार वर्षांपूर्वी टाटा कन्स्ल्टन्सी सर्व्हिसेसबरोबर (टीसीएस) करार केला होता. त्याअंतर्गत देशभरातील पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये अर्ज स्वीकारले जातात. देशाच्या कानाकोपऱ्यातून वाढत असलेली पासपोर्टची वाढती मागणी लक्षात घेता, पासपोर्ट सेवा केंद्रांबरोबरच समांतर यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी टपाल कार्यालयांना सामावून घेण्यात येणार आहे. सध्या टपाल खात्यातर्फे पासपोर्ट घरी पोहोचविण्याचे काम केले जाते. लवकरच तेथेही अर्जही स्वीकारण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात दिल्ली आणि काही मोजक्या राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे मॉडेल राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मुंबई विभागांतर्गत औरंगाबाद पोस्ट ऑफिसची निवड करण्यात आली आहे. संबंधित टपाल कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. पोस्टातील कर्मचाऱ्यांवर अर्जाची छाननी, कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्या मुळे पासपोर्ट सेवांवर येणारा ताण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, ग्रामीण भागातील जनतेला कोणत्याही कामासाठी पासपोर्ट सेवा केंद्राकडे खेटे मारावे लागणार नाहीत.

‘सध्या पुण्यातील पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचे अर्ज स्वीकारले जातात. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी छोटे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सातारा, आणि कोल्हापूरमध्ये आम्ही विशेष पासपोर्ट मेळावे घेत आहोत. याशिवाय बाणेर येथे पुण्यातील दुसऱ्या पासपोर्ट सेवा केंद्र उभारणीचे काम सुरू आहे,’ अशी माहिती पुणे विभागाचे मुख्य पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली.

नगर, कोल्हापूरची शिफारस

पासपोर्टची वाढती मागणी लक्षात घेता पासपोर्ट केंद्रे अपुरी पडत आहेत. टपाल कार्यालयांमध्ये अर्ज स्वीकारल्यास नागरिकांच्या वेळेत आणि प्रवासखर्चात बचत होणार आहे. पुणे विभागातील पासपोर्ट सेवा केंद्र विस्तारासंदर्भात केंद्राकडून अद्याप सूचना आलेल्या नाहीत. सूचना आल्यास मी नगर आणि कोल्हापूरची शिफारस करणार आहे. या दोन्ही शहरातील पासपोर्टची वाढती मागणी पाहता, स्थानिक टपाल कार्यालयांमध्ये सेवा केंद्र सुरू होणे आवश्यक आहे, असेही गोतसुर्वे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन व्यवहारांवर पाच टक्के सवलत

$
0
0

नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेची योजना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी विविध आकर्षक सवलती जाहीर केल्याने त्यापासून बोध घेऊन महापालिकेनेही मिळकतकरधारकांना ऑनलाइन व्यवहारांवर पाच टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. पाच जानेवारी ते ३१ मार्चअखेर थकित रकमेसह सर्व कर भरणाऱ्या आणि पुढील वर्षाचा (२०१७-१८) संपूर्ण कर ३१ मेपर्यंत भरणाऱ्या करधारकांना सर्वसाधारण करावर पाच टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे.
केंद्र सरकारने गेल्या महिन्यात जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्य नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, केंद्र सरकारने डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड यासह ऑनलाइन बँकिंग, इ-वॉलेट अशा स्वरूपात विविध स्वरूपाचे कर-शुल्क भरणाऱ्यांना विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्याच धर्तीवर महापालिकेनेही आता मिळकतकर धारकांसाठी ऑनलाइन व्यवहारांवर सवलत देण्याचे निश्चित केले आहे. स्थायी समितीने मंगळवारी त्याला एकमताने मान्यता दिली असून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी पुढील महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेने त्याला मान्यता देण्याची गरज आहे, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले.
पाच जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत थकबाकीसह संपूर्ण कर ऑनलाइन स्वरूपात भरणाऱ्यांना सर्वसाधारण करात पाच टक्के सवलत दिली जाणार आहे. ही सवलत पुढील आर्थिक वर्षांत पहिल्या दोन महिन्यांत संपूर्ण कर भरणाऱ्या मिळकतधारकांना देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. गांडूळ खत प्रकल्प/रेन-वॉटर हार्वेस्टिंग किंवा सौर ऊर्जा प्रकल्प राबविणाऱ्यांना सध्या पाच टक्के सवलत दिली जातेच; त्याशिवाय ऑनलाइन करभरणा केल्यास ही अतिरिक्त पाच टक्क्यांची सवलत दिली जाणार असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले.

प्रत्येक प्रभागात पाच बक्षिसे
ऑनलाइन कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्वरूपात पालिकेकडे कर भरणाऱ्या नागरिकांमधून ‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात पाच भाग्यवंत विजेत्यांची निवड केली जाणार आहे. अशा ७५ जणांना १५ हजार रुपयांचे बक्षिस महापालिकेने जाहीर केले आहे. हे बक्षीस थेट करधारकांच्या अकाउंटवर ट्रान्स्फर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोटाबंदीमुळे दगावली देशाची अर्थव्यवस्था

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

‘नोटाबंदीनंतर देशाची अर्थव्यवस्था दगावल्यात जमा आहे. केंद्र सरकार सहकारी अर्थव्यवस्था उध्वस्त करायला निघाले आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
बारामतीमध्ये राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नोटाबंदीवरून केंद्रावर टीकास्त्र सोडले.
‘केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर करून पन्नास दिवस होत आहेत. ही परिस्थिती अजून काही महिने राहिल्यास त्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसणार आहे. हे सरकार सहकारी अर्थव्यवस्था मातीमोल करायला निघाले आहे, असे वाटते. सहकारी बँकांच्या ग्राहकांना पैसे मिळत नाहीत. याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टानेही बँकांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतरही सरकार निर्णय घेत नाही, ही बाब खेदजनक आहे,’ असे पवार म्हणाले.
सहकारी बँकांमध्ये नागरिकांनी सुमारे सहा हजार आठशे कोटी रुपये भरले आहेत. त्या रकमेवर बँकांनी दोन महिने व्याज दिले आहे. या नोटांचे काय करायचे, हा प्रश्न अजूनही कायम आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सोसायट्या व जिल्हा मध्यवर्ती बँका उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत, अशी टीका पवार यांनी केली.

नोटेवर लिहिलेली रक्कम देण्यास आम्ही बांधील आहोत, अशी लेखी हमी त्यावर दिलेली असते. मात्र, नोटा रद्द केल्या, तेव्हा या हमीचा तुम्ही भंग केला आहे. सरकारकडून अशा प्रकारे हमीचे उल्लंघन केले जाते, तेव्हा नागरिकांचा अर्थव्यव्थेवरील विश्वास उडतो आणि हे चांगले लक्षण नाही.

शरद पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोक्का

$
0
0

टोळीवर कारवाईचा राज्यातील पहिलीच घटना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा काळाबाजार करणाऱ्या टोळीतील दहा जणांवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. धान्याचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर मोक्काची कारवाई होण्याची राज्यातील पहिला घटना आहे.
गोरख किसन कुऱ्हाडे (वय २८, रा. कात्रज-कोंढवा रोड, इस्कॉन मंदिरामागे), अनिल किसन मटकर (वय ३४, रा. माळवाडी, हडपसर), उत्तरेश्‍वर दत्तू बोराडे (वय ४२, रा. खेड शिवापूर), अविनाश राम कच्छवे (वय ३४, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी), संजय शिवलिंग वाघोलीकर (वय ४६, रा. बिबवेवाडी), विलास किसन मटकर ( वय ३६, काळेपडळ, हडपसर), उमेश शंकर मारकड (वय २५, रा. शेलारवाडी, ता. मावळ), वैशाली काकासाहेब कांबळे (वय ३८, रा. शिंदे वस्ती, घोरपडी), शंकर शांताराम गायकवाड (वय २८, रा. काळेपडळ, हडपसर) आणि रमेश शंकर मारकड (रा. शेलारवाडी, देहुरोड) यांच्याविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पुरवठा निरीक्षक अनिता वसंत शिनगारे (वय ४६, रा. शासकीय वसाहत, येरवडा) यांनी तक्रार दिली आहे.
घोरपडी गाव येथील महिला बचत गटावर सरकारकडून मिळालेले धान्य रेशन दुकानदारांना वाटप करण्याची जबाबदारी होती. त्यांना मिळालेले २०० पोती तांदूळ, १७९ पोती गहू काळ्या बाजारात विकण्यासाठी ट्रकमध्ये भरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना २६ ऑक्टोबर रोजी मिळाली. त्यांनी त्वरीत छापा टाकून दोन वाहने ताब्यात घेतली. त्यातील २६ लाख ७९ हजार रुपयांचे धान्य जप्त केले. पोलिसांनी महिला बचत गटाचे दुकान सील केले. विलास किसन मटकर आणि उमेश शंकर मारकड हे दोघे धान्य माफिया आहेत. मारकडवर खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्याकडे होता. त्यांनी प्रकरणाचा सखोल तपास करून या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्काच्या कारवाईचा प्रस्ताव सहआयुक्त सुनील रामानंद यांच्याकडे सादर केला. रामानंद यांनी मंगळवारी प्रस्तावाला मंजुरी दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिलायन्स कंपन्यांच्या कार्यालयांना टाळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मोबाइल टॉवरच्या ८३ कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे महापालिकेच्या मिळकतकर विभागाने मंगळवारी रिलायन्स इन्फ्रा आणि रिलायन्स कम्युनिकेशन या दोन्ही कंपन्यांची कार्यालये ‘सील’ केली. रिलायन्ससह अमेरिक टॉवर कंपनी (एटीसी) आणि व्हीएम टॉवर या कंपन्यांची कार्यालयेही सील करण्यात आली.
थकबाकी भरण्याबाबत वारंवार नोटीस बजावून आणि पाठपुरावा करूनही पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दाद न देणाऱ्या बड्या कंपन्यांवर महापालिकेने प्रथमच कारवाईचा बडगा उचलला आहे. कार्यालये ‘सील’ करूनही अद्याप कर भरण्याबाबत कंपन्यांकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नसल्याचे मिळकतकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शहरात रिलायन्स इन्फ्राचे सुमारे २३५ टॉवर आहेत. या सर्व टॉवरची मिळून सुमारे ८३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीचा भरणा त्वरेने करावा, यासाठी वारंवार नोटीस बजावण्यात आली. तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या अभय योजनेचा लाभ कंपनीने घ्यावा, असेही सुचविण्यात आले होते. तरीही, पालिकेला कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने कंपनीचे कार्यालय ‘सील’ करण्यात आल्याची माहिती करसंकलन विभागाचे अधिकारी वैभव कडलख यांनी दिली. कंपनीच्या कल्याणीनगर येथील मारीगोल्ड इमारतीमध्ये असणाऱ्या सातव्या मजल्यावरील कार्यालय सील करण्यात आले. रिलायन्सप्रमाणेच एटीसी आणि व्हीएम टॉवर कंपनीवरही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडेही सुमारे ७५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
‘शहराच्या अनेक भागांत मोबाइल कंपन्यांकडे पालिकेची कर विभागाची थकबाकी आहे. करभरणा करण्यासाठी मुदत देऊनही कर चुकविणाऱ्या कंपन्यांची गय केली जाणार नसून, त्यांच्यावरील कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे’, असे मिळकतकर विभागप्रमुख सुहास मापारी यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. दीक्षित यांना ‘साहित्य अकादमी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,पुणे

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. आनंदप्रकाश दीक्षित यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. अकादमीतर्फे भाषा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. दीक्षित यांनी मध्ययुगातील साहित्य व अभिजात साहित्य या प्रकारात भरीव योगदान दिल्याबद्दल नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीतर्फे फेब्रुवारी महिन्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये, ताम्रपट, शाल व श्रीफळ असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. डॉ. दीक्षित हे १९६६ ते १९८५ पर्यंत विद्यापीठात हिंदी विभाग प्रमुख होते. २०१०पर्यंत ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ९३ वर्षांचे असेलेले दीक्षित आजही सक्रिय आहेत. त्यांना यापूर्वी इंदूर येथील हिंदी साहित्य समितीतर्फे अखिल भारतीय साहित्य पारितोषिक, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे अखिल भारतीय सेवा पुरस्कार, अलहाबाद येथील हिंदी साहित्य संमेलनात साहित्य वाचस्पती, कानपूर येथील हिंदी साहित्य समितीतर्फे साहित्य भारती, लखनऊ येथील उत्तर प्रदेश हिंदी संस्थानतर्फे साहित्यभूषण असे सन्मान मिळाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदी चकचकीत फकीर

$
0
0

भाई वैद्य यांचा केंद्र सरकारवर हल्ला

म. टा. प्रतिनिधी,पुणे

‘सध्याचे सरकार भाजपचे किंवा नरेंद्र मोदी यांचे नसून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. धार्मिक तेढ वाढविण्याचा दृढनिश्चय करून आलेले हे लोक आहेत. सब का साथ, सब का विकास ही निव्वळ धूळफेक आहे. स्वत:ला फकीर म्हणवून घेणारे मोदी खरे नसून, चकचकीत फकीर आहेत,’ या शब्दांत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केंद्रावर हल्ला चढवला.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या समारोपात ते बोलत होते. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रझिया पटेल व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रामनाथ चव्हाण यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. बाबुरावजी घोलप महाविद्यालयाला ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार’ देण्यात आला. प्राचार्य मनोहर चासकर यांनी पुरस्कार स्वीकारला. मोहन म्हस्के लिखित ‘दुष्काळाच्या गर्भातून पँथरची डरकाळी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन या वेळी झाले. ज्येष्ठ नेते उल्हास पवार, संमेलनाध्यक्ष प्रकाश रोकडे, स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, डॉ. भालचंद्र भागवत, शंकर आथरे, महेंद्र भारती, उद्धव कानडे उपस्थित होते.
‘भारतापाठोपाठ अमेरिकतही सत्तापालट झाल्याने संकुचित विचारांचे प्रवाह जोराने वाहत आहेत. मुस्लिमांना शत्रुत्वाची वागणूक दिली जाऊ लागली आहे. हिंदू राष्ट्राची निर्मिती असे ध्येय असलेले लोक देशद्रोही आणि देशप्रेमाचे शिक्के मारत आहेत,’ असे टीकास्त्रही वैद्य यांनी सोडले. ‘जातीचे मोर्चे निघताहेत, पण कोणी मानवतेचा मोर्चा का काढत नाही, असा प्रश्न मला पडतो. मानवता हाच धर्म आणि भारतीय हीच ओळख हा विचार आपल्या मनात रुजला, तर देशाची एकात्मता कायम राहू शकेल. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा उद्योग सत्ताधाऱ्यांनी बंद करावा,’ अशी टीका पवार यांनी केली.
डॉ. पटेल म्हणाल्या, ‘स्वातंत्र्यानंतरही महिलांचे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. माणुसकीचे अध:पतन झाल्याने दु:ख, वेदना वाढत आहेत. सत्ताधाऱ्यांमधील असंवेदनशीलता पाहून मन व्यथित होते. गुजरात हत्याकांड, मुझफ्फरनगरची दंगल, रोहित वेमूला प्रकरण अशा अनेक घटना मानवतेचा ऱ्हास करणाऱ्या आहेत.’

जातीचे संघटन, मोर्चे प्रबळ होत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली, तर भविष्यात अराजक माजेल. जानीनिर्मूलन, जातीचे उच्चाटन केल्याशिवाय देशात अच्छे दिन येणार नाहीत.
प्रा. रामनाथ चव्हाण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीआरटी’साठी २२५ कोटी

$
0
0

पथदर्शी मार्गांसह जाळेही विस्तारणार; ‘स्थायी’ची मान्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील जलद बस वाहतूक योजनेचे (बीआरटी) जाळे विस्तारण्याच्या दृष्टीने गणेशखिंड रोड आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गासह स्वारगेट ते कात्रज या पथदर्शी मार्गांचे पुनरूज्जीवन करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. त्यासाठी, २२५ कोटी रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली असून, पुढील अडीच वर्षांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहराची सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी हा विस्तार आवश्यक असला, तरी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय झाला असल्याने त्याचा फटका बसण्याची भीती आहे.
शहरात सध्या संगमवाडी-विश्रांतवाडी (आळंदी रोड) आणि पर्णकुटी ते वाघोली (नगर रोड) या दरम्यान बीआरटी सेवा दिली जाते. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही बीआरटीचे मार्ग विकसित करण्यात आले असून, त्यातील काही मार्ग पुण्याशी जोडण्यात आले आहेत. आजमितीस पिंपरी बीआरटीचे मार्ग सांगवी आणि दापोडीपर्यंत पूर्ण झाले असून, त्यापुढील महापालिका हद्दीतील मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर झाला होता. राजीव गांधी पूल ते शिवाजीनगर (वेधशाळा), हॅरिस ब्रिज ते पाटील इस्टेट आणि संगमवाडी ते महापालिका भवन (मार्गे पाटील इस्टेट) हे तिन्ही मार्ग विकसित करण्यासाठी १४९ कोटी रुपये खर्च येणार असून, स्थायी समितीने त्याला एकमताने मान्यता दिली. या खर्चामध्ये भूसंपादन, बस थांब्यांची उभारणी आणि पुढील पाच वर्षांची देखभाल-दुरुस्ती या सर्व कामांचा समावेश असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली. या तिन्ही मार्गांचे काम पूर्ण होण्यास सुमारे अडीच वर्षांचा कालावधी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘स्वारगेट ते कात्रज’चे पुनरूज्जीवन
शहरात सर्वप्रथम सुरू झालेल्या सातारा रोडवरील स्वारगेट ते कात्रज या बीआरटी मार्गाचेही पुनरूज्जीवन केले जाणार आहे. संपूर्ण सातारा रस्त्याचा कायापालट करण्याची महापालिकेची योजना असून, त्या अंतर्गत इतर बीआरटी मार्गांप्रमाणेच या ठिकाणचे बसथांबेही रस्त्याच्या मधोमध उभारले जाणार आहेत. तसेच, सध्या अस्तित्वात असूनही अतिक्रमणांनी व्यापलेल्या सायकल ट्रॅक आणि फूटपाथची पुनर्रचना करण्यात येणार असून, बीआरटी व्यतिरिक्त इतर वाहनांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे, असेही बोडके यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण कामासाठी सुमारे ७० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे संपूर्ण काम आगामी दीड वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.

नवे बीआरटी मार्ग....
नवीन मार्ग लांबी बसथांबे
राजीव गांधी पूल ते शिवाजीनगर ६.५किमी ११
हॅरिस ब्रिज ते पाटील इस्टेट ५.७ किमी ११
संगमवाडी ते महापालिका १.२ किमी २
लक्ष्मीनारायण टॉकीज ते कात्रज ५.४ किमी ११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिडीबस खरेदीला ‘स्थायी’ची मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या मध्यवस्तीतील गजबजलेल्या भागांमध्ये वाहतूक सेवा देताना निर्माण येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात १२० मिडी-बस घेण्यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. या बस खरेदीसाठी ३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सुमारे १५५० नव्या बस दाखल करण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातील साडेपाचशे बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. तर, आठशे बस हप्तेबंद पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याशिवाय, २०० बस पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून खरेदी केल्या जाणार आहेत. या दोनशे बस ‘मिडी’ स्वरूपाच्या असाव्यात, असे पीएमपीने महापालिकेला कळविले होते. शहराच्या अंतर्गत भागात वाहतूक सेवा देण्यासाठी कमी लांबीच्या या बस अधिक उपयोगी ठरतील, असे सुचविण्यात आले होते. त्यानुसार, पीएमपीतील महापालिकेच्या हिश्श्यानुसार १२० बस खरेदी करण्यास मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिल्याचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी सांगितले.
मिडी बससाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये टाटा मोटर्सकडून सर्वांत कमी दर देण्यात आल्याने त्यांच्याकडूनच बस खरेदी केली जाणार आहे. या बसमध्ये ‘आयटीएमएस’ यंत्रणाही कार्यान्वित केली जाणार असून, त्यात सीसीटीव्ही असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये महापालिकेच्या ताफ्यात सर्व बस दाखल होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कविसंमेलन नव्हे; भाषांचे स्नेहसंमेलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भाषेवरून रोज संघर्ष होत असताना विविध भाषांचे कवितेतून एकत्र येणे, भाषांचा परस्परसंबंध आणि भाषिक संवाद भाषाप्रेमींनी मंगळवारी अनुभवला. निमित्त होते...बहुभाषा कविसंमेलनाचे.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘युनिव्हर्सिटीज ऑफ पेनसिल्व्हानिया’च्या डिपार्टमेंट ऑफ रिलीजस स्टडीजतर्फे बहुभाषा कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या टाटा सभागृहात हे संमेलन रंगले. या वेळी संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर उपस्थित होते. साहित्यिक राधावल्लभ त्रिपाठी अध्यक्षस्थानी होते.
कविसंमेलनात ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, गझलकार रमण रणदिवे व डॉ. संगीता बर्वे यांनी मराठी कविता सादर केल्या. डॉ. दामोदर खडसे यांनी हिंदी, गोवर्धन शर्मा यांनी सिंधी, नजीर फतेपुरी यांनी उर्दू, एस.एस. राही यांनी गुजराती, डॉ. महेश देवकर यांनी पाली, डॉ. बहुलकर तर परशुराम परांजपे आणि डॉ. श्रीनंद बापट यांनी संस्कृत कविता सादर केल्या. अमेरिकास्थित डॉ. विद्युतलेखा अकलूजकर यांनी विविध कवितांचे वाचन केले.
‘खूप दारं आहेत या कवितेला’, ‘माणसांना टाळणारी माणसे मी पाहिली’, ‘जिवापाड जपलेल्या पुस्तकातून वाढत चालली आहे वाळवी’ या अनुक्रमे डॉ. ढेरे, रणदिवे आणि बर्वे यांच्या कवितांना रसिकांची दाद मिळाली. ‘सुखा पेड खडा है’ या डॉ. खडसे यांच्या कवितेने विशेष दाद मिळवली. शर्मा यांनी हायकू या जपानी कवितेचा सिंधी अनुवाद सादर केला. फतेपुरी यांचे उर्दू शेर दाद मिळवून गेले. ‘पंडित ने पढा कुराण, मुल्लाने पढा वेद और शायर ने देखा सपना मिट गये सारे भेद’ हा त्यांचा शेर विशेष ठरला. ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ या ग. दि. माडगूळकरांच्या कवितेचा डॉ. बापट यांनी ‘न्यवसन पुरा तटाके’ हा संस्कृत अनुवाद सादर केला. ‘हम जब होंगे साठ साल के’ या गाण्याच्या संस्कृत अनुवादाला उपस्थितांनी डोक्यावर घेतले.
या कविसंमेलनाला बहुभाषिक रसिक उपस्थित होते. परदेशी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. सूत्रसंचालन प्रकाश पायगुडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपमहापौरांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आलेल्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजन समारंभास जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिल्याबद्दल उपमहापौर मुकारी अलगुडे यांना पक्षाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. दोन दिवसांत तातडाने खुलासा करावा; अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा थेट इशाराही देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी झाले. तत्पूर्वीच, काँग्रेसने शुक्रवारी मेट्रोच्या भूमिपूजनाचा प्रतिकात्मक कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी उपस्थित होते; पण उपमहापौर मुकारी अलगुडे यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली. पक्षाकडून सन्मान राखला जात नसल्याने कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे त्यांनी जाहीर केले असले, तरी आता पक्षानेच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षाने घेतलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहणे अनिवार्य असताना, आपण विरोधी पक्षातील नेत्यांसमवेत चर्चा करत होता; तसेच काही वेळ पालिकेतील कार्यालयातच बसून असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, पक्षाच्या विविध बैठकांनाही आपण सातत्याने गैरहजर राहत असल्याने दोन दिवसांत त्याचा लेखी खुलासा सादर करावा, असे पत्रच काँग्रेसचे पालिकेतील गटनेते आणि विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी अलगुडे यांना दिले आहेत. या संदर्भात वेळेत खुलासा न केल्यास पक्षाकडून पुढील कार्यवाही केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’ करणार निकालांचे विश्लेषण

$
0
0

आजपासून प्रदेशस्तरीय बैठकीला सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नगरपालिका निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण आणि आगामी महापालिका; तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची रणनिती आज, बुधवारी पुण्यात होणाऱ्या पक्षाच्या प्रदेश स्तरावरील बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व खासदार-आमदार, माजी आमदार, राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि निवडणूक निरीक्षक-प्रभारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत समविचारी पक्षांशी आघाडी करण्यापासून आगामी निवडणुकीची ध्येय-धोरणे ठरविण्यात येणार आहेत.
राज्याच्या विविध भागांत नुकत्याच नगरपालिकांची निवडणूक झाली. पुढील वर्षी फेब्रुवारीत १० प्रमुख महानगरपालिका आणि २७ जिल्हा परिषदांसाठी निवडणूक होणार आहे. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने त्याचा आढावा घेऊन पुढील निवडणुकीच्या नियोजनासाठी महत्त्वाची बैठक पुण्यात घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
शरद पवार यांच्या उपस्थितीत तीन सत्रांमध्ये निसर्ग मंगल कार्यालय येथे ही बैठक घेण्यात येणार आहे. पहिल्या सत्रात राज्यस्तरावरील जिल्हा प्रभारी यांची बैठक होणार असून, त्यानंतर सर्व विद्यमान खासदार-आमदार यांच्यासमवेत चर्चा केली जाणार आहे. अखेरच्या सत्रात पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष-शहराध्यक्ष आणि निवडणूक निरीक्षक यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. पक्षाच्या २००९ ते २०१४ दरम्यानच्या माजी आमदारांनाही या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले.

‘भाजपचा राजकीय हेतू सफल’
नगरपालिकांच्या निवडणुकीत विशिष्ट राजकीय हेतू ठेवून थेट नगराध्यक्ष निवडण्याचा कायदा करण्याचा राज्य सरकारचा हेतू सफल झाल्याचे निकालांवरून दिसून येत आहे. परंतु, नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि बहुमत वेगळ्याच पक्षाचे असल्याने संबंधित नगरपालिकांचा विकास कसा होणार, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. केंद्र आणि राज्यातील सरकारचा फायदा करून घेण्यासाठी महापालिकांमध्येही चार सदस्यीय प्रभाग पद्धत हेतूपरस्पर लागू करण्यात आल्याची टीका त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समविचारी पक्षांच्या आघाडीला अनुकूल

$
0
0

‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे संकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकीत समविचारी पक्षांशी आघाडी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल असून, त्यासंबंधीचे अधिकार स्थानिक स्तरावर देण्यात आले आहेत. स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्यात अडचणी असतील, तर प्रदेश पातळीवरून पुढाकार घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीची बैठक आज, बुधवारी पुण्यात होत आहे. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले असले, तरी भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी आगामी पालिका-जिल्हा परिषदांच्या निवडणुकीकरिता त्यांच्यात दिलजमाई होण्याचे संकेत तटकरे यांनी मंगळवारी दिले. प्रदेश पातळीवरून स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याबाबत सूचना दिल्या असल्या, तरी स्थानिक स्तरावरील नेतृत्वाकडून त्याचा चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात ढकलला जात आहे. त्याबाबत विचारणा केली असता, स्थानिक स्तरावरून अनुकूलता असली तरी अंतिम निर्णय होत नसल्यास आघाडी करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. मात्र, स्थानिक निवडणुकांमध्ये अशा गोष्टी होत असल्याचे सांगून तटकरे यांनी निवडणुकांसाठी आघाडी करताना कोणतीही कटूता राहणार नसल्याचे सूचित केले.

‘मेट्रो पवारांमुळेच’
पुणे मेट्रोच्या भूमिपूजन समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रित करून बोलण्याची संधी दिली नाही. त्याचे वेगवेगळे पडसाद उमटत असले, तरी राजशिष्टाचार पाळण्यात पवार यांचा हात दुसरा कोणी धरू शकणार नाही, असे तटकरे म्हणाले. पुण्याच्या मेट्रोबद्दल पवार यांनीच पुढाकार घेतला असल्याने त्याबद्दल वेगळे काही बोलण्याची गरज नव्हती, असा खुलासाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झालीच तर सर्वत्रच; अन्यथा कुठेही नाही

$
0
0

भाजपशी करावयाच्या युतीबाबत शिवसैनिकांची भावना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकीत युती करण्याबाबत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील दबावतंत्राला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये युतीसाठी अनुकूलता तर, पुण्यात काणाडोळा असा पवित्रा भाजपकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘युती झालीच तर सगळीकडे; अन्यथा कुठेच नाही,’ असे अस्त्र शिवसेनेने बाहेर काढल्याचे वृत्त आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप-सेनेची युती होणार का, हा दोन्ही पक्षांसह अन्य पक्षांसाठीही उत्सुकतेचा प्रश्न ठरला आहे. नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजपची कॉलर ताठ झाली असून, त्या जोरावरच भाजपचे पदाधिकारी स्वबळाची भाषा करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात युती होणार का याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. युती करण्याची आम्हाला इच्छा आहे असे भाजपचे पदाधिकारी जाहीरपणे सांगत असले तरी, पक्षात उलटसुलट मते आहेत. पुणे महापालिकेत युती करू नये, असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा दबाव असला तरी महापालिकेत सत्ता आणायची असल्यास युती करावीच लागेल असे वरिष्ठ खासगीत सांगत आहेत. मात्र, युतीसंदर्भातील निर्णय प्रामुख्याने मुंबईतील परिस्थितीवर अवलंबून असल्यामुळे तो स्थानिक पातळीवर कितपत होईल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांचा युतीला विरोध आहे. युती पुण्यात नको; पिंपरीत हवी असे भाजपच्या गोटातून बोलले जात आहे.
युतीबाबत भाजपचे तळ्यातमळ्यात सुरू असताना शिवसेनेने मात्र कडक धोरण अवलंबले आहे. एखाद्या शहरात युती करायची आणि दुसरीकडे करायची नाही असे चालणार नाही. युती झालीच तर, पुणे आणि पिंपरीत, अन्यथा कुठेच नाही,’ असा आग्रह शिवसेनेने धरला आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत वरिष्ठांची भेट घेतली असता त्यांनाही सर्वत्र युती असावी, असेच सूचित करण्यात आले होते. गरज असेल तेथे युती असे धोरण चालणार नसल्याची शिवसैनिकांची भावना बनली आहे.


...तर तुम्हालाही नाही
नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपचे काही नेते स्वबळाची भाषा करीत असले, तरी, शहराच्या सर्व भागांत सक्षम उमेदवार मिळविण्याचे आव्हान दोन्ही मित्रपक्षांसमोर आहे. विशेषतः राखीव आणि महिला राखीव प्रभागांमध्ये हे आव्हान मोठे आहे. त्यामुळे ही निवडणूक संपूर्ण शक्ती पणाला लावून लढविण्याचे शिवसैनिकांनी ठरविले आहे. अशा स्थितीत आम्हाला बाजूला सारणाऱ्यांचे स्वप्न आम्ही पुरे होऊ देणार नाही, अशी भावना शिवसैनिकांमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images