Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

​वैद्यनाथ बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) वैद्यनाथ सहकारी नागरी बँकेच्या व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि बीड येथील ११ ठिकाणी छापे घातले. ‘वैद्यनाथ’मधील या संशयितांनी कट रचून बेकायदा २५ कोटी रुपये बीड येथून मुंबईला नेल्याचा ठपका ‘सीबीआय’ने ठेवला आहे.
दरम्यान, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे गटाच्या ताब्यात ही बँक आहे. खासदार प्रीतम मुंडे या बँकेच्या संचालिका असल्याने या घटनेला राजकीय रंग चढला आहे. मुंबई पोलिसांनी जप्त केलेले १० कोटी रुपये कोणाचे आहेत, यावरून जोरदार राजकीय चिखलफेक झाली होती. ‘सीबीआय’ने या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने ही रक्कम बीडवरून मुंबईला का नेली, याबाबत तपास करण्यात येत आहे.
‘सीबीआय’ने या प्रकरणी कट रचणे, फसवणूक करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या २५ कोटी रुपयांमधील १० कोटी रुपयांची रोकड मुंबई पोलिसांनी जप्त केली होती. या प्रकरणी चिंचवड येथील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले होते. ‘सीबीआय’ने या खासगी व्यक्तीविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड येथील बँकेच्या शाखेची झडती घेण्यात आली, तसेच चिंचवड येथील खासगी व्यक्तीच्या मालमत्तांमध्ये छापे घालण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांनी १९ नोव्हेंबर रोजी कट रचून बीड येथील बँकेच्या मुख्य शाखेतील २५ कोटी रुपयांची रक्कम (जुन्या नोटा) त्यांच्या घाटकोपर येथील शाखेत बदलण्यासाठी नेल्या होत्या. या संशयितांनी या २५ कोटींमधील १५ कोटी रुपये महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँकेत भरल्याचा ‘सीबीआय’ला संशय आहे. जुन्या नोटा बदलून नव्या आणि काही जुन्या नोटांच्या स्वरूपात असलेले दहा कोटी रुपये घेऊन ते बीडला निघाले होते. या दरम्यान मुंबई पोलिसांनी संशयितांचे वाहन अडवून दहा कोटी रुपये जप्त केले होते. ही रोकड ‘सनी निसान’ कारमधून जप्त करण्यात आली होती, तसेच ही कार शिरोळे नावाच्या व्यक्तीच्या नावाने नोंदवण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांनी जप्त केलेली रक्कम प्राप्तिकर विभागाकडे दिली होती. प्राप्तिकर विभागाने प्राथमिक तपासानंतर या घटनेची माहिती ‘सीबीआय’ला दिली होती.
दरम्यान, पंचवीस कोटी रुपयांपैकी १० कोटी १० लाख रुपयांची रक्कम ही पिंपरी-चिंचवडमधील वैद्यनाथ सहकारी अर्बन बँकेच्या काळेवाडी शाखेत भरण्यासाठी नेण्यात येत होती. या वेळी ती पोलिसांनी पकडली, असे बँकेतर्फे
सांगण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​बिल्डरबरोबरच आले फ्लॅटधारकही गोत्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अनधिकृत इमारतीत फ्लॅट खरेदी करून फ्लॅटधारकांनी सहकारी संस्था स्थापन केल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) बांधकाम व्यावसायिकाबरोबरच फ्लॅटधारकांवरही फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नऱ्हे येथील ‘स्फूर्ती आंगण’ या इमारतीतील फ्लॅटधारकांवर कारवाई होणार आहे.
‘स्फूर्ती आंगण’साठी २८ फ्लॅटचा समावेश असणाऱ्या आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. मात्र, मंजुरीपेक्षा १२ जादा फ्लॅटचे बांधकाम बिल्डरकडून करण्यात आले; तसेच मंजूर आराखड्यातील मोकळ्या जागेवर आणखी १२ फ्लॅटची बेकायदा इमारत बिल्डरने उभारली. या प्रकरणी संबंधित बिल्डर आणि फ्लॅटधारकांना सुनावणीची संधी देण्यात आली. त्यानंतर सर्वांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्याचे आदेश
‘पीएमआरडीए’ने दिले आहेत.
संबंधित इमारत पाच वर्षांपूर्वी बांधली गेली असून, हवेलीच्या तहसीलदारांनी चौकशी करून आठ डिसेंबर २०१४ रोजी अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्याचे आदेश दिले होते. मात्र, आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर फ्लॅटधारकांनी बिल्डरविरूद्ध कोणतेही
कायदेशीर पाऊल न उचलता इमारतीची सहकारी संस्था स्थापन करून अनधिकृत बांधकामाच्या व्यवस्थापनात सहभाग घेतला. त्यामुळे या प्रकरणी फ्लॅटधारकांविरूद्धही फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे ‘पीएमआरडीए’कडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘महाभारत रणभूमी नव्हे; रंगभूमी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘महाभारत म्हणजे युद्धभूमी, रणभूमी, नायक, शत्रू, राजकारण, नाट्य असे चित्र लोकांच्या मनावर बिंबवले गेले आहे. हे आपले अपयश आहे. महाभारतातील नैतिक मूल्यांबद्दल कोणीच बोलत नाही. वास्तविक महाभारत म्हणजे प्रेम, आत्मीयता, सहानभूती, भावनात्मक परंपरा आहे. ती रणभूमी नसून रंगभूमी आहे,’ अशा शब्दांत पौराणिक समाज, धर्म या विषयाचे व्यासंगी अभ्यासक डॉ. देवदत्त पटनायक यांनी शुक्रवारी महाभारताचा अन्वयार्थ उलगडून सांगितला.
पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) यांच्यातर्फे ‘एफटीआयआय’मध्ये आयोजित महाभारतावरील चित्रपट महोत्सवाच्या उद‍्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर, ‘एफटीआयआय’चे संचालक भूपेंद्र कँथोला, सेंटरच्या लतिका पाडगावकर व सुरेश छाब्रिया या वेळी उपस्थित होते. भांडारकर संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त तसेच संस्थेच्या महाभारत खंडाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
‘महाभारतामध्ये विचाराला अनेक पदर असून त्यामुळे भारतीय विचार मोठा आहे. महाभारत हे साहित्य नसून ती परंपरा आहे,’ याकडे डॉ. पटनायक यांनी लक्ष वेधले. ‘आपल्यापुढे नायक-शत्रू, वर्चस्ववाद असे सादर होणारे महाभारत हे ग्रीक मॉडेल आहे. हेच महाभारत आहे, असे आपण मानतो. महाभारत म्हणजे रणभूमी, नायक, शत्रू अशी ग्रीक पद्धतीची कथा आपण तयार केली आहे. वास्तविक महाभारत ही मानवतेची भारतीय कथा आहे. मात्र आपण कायम नायकाच्या शोधात असतो. ब्रह्मास्त्र आणि आताची आधुनिक शस्त्रे याचेच आपल्याला आकर्षण आहे. महाभारताचे चुकीचे चित्र रंगविण्यात आले आहे. आपण नायक, शत्रू, नाट्य, द्रौपदी यावरच भर देत आलो आहोत,’ अशा शब्दांत त्यांनी खरपूस समाचार घेतला. उत्तरार्धात ‘अ थ्रो ऑफ डाइस’ हा चित्रपट दाखविण्यात आला. प्रशांत गिरबने यांनी आभार मानले.

‘एफटीआयआय’मधील आंदोलन म्हणजे महाभारत
‘आपल्या महाभारताच्या संकल्पेनुसार आजूबाजूला घडणाऱ्या सर्व घटना या महाभारतासारख्या असतात. संसदेमध्ये सुरू असणारा गोंधळ, एफटीआयआयमधील आंदोलन, भारत-पाकिस्तान सीमेवरील संघर्ष ही महाभारताचीच रूपे ठरतात,’ अशा उदाहरणांतून डॉ. देवदत्त पटनायक यांनी मार्मिक भाष्य केले. एफटीआयआयमधील आंदोलन म्हणजे महाभारत, या उदाहरणामुळे एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांना हसू आवरता आले नाही. ‘अर्धवट ज्ञान असणारे सध्या दूरचित्रवाणी व सोशल मीडियावर जोरात असतात,’ अशी टिप्पणी डॉ. पटनायक यांनी केली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सनबर्न फेस्टिव्हलला कायद्याने परवानगी

$
0
0

पुणे ः पुण्यात केसनंद येथे सुमारे ५० एकर जागेवर ‘सनबर्न फेस्टिव्हल’ होत असून, त्यास राज्याच्या पर्यटन खात्याचा ‘नॉन फायनान्शियल सपोर्ट’ आहे. या महोत्सवाला कायद्यानुसार परवानगी देण्यात आली आहे,’ असे राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
‘पुण्यात २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत केसनंद येथे हा महोत्सव होणार आहे. त्यामध्ये संगीत आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. हा महोत्सव गेल्या दहा वर्षांपासून गोव्यामध्ये आयोजित करण्यात येत होता. पहिल्यांदाच पुण्यात हा महोत्सव होणार आहे. राज्याच्या पर्यटन खात्याने ‘नॉन फायनान्शियल सपोर्ट’ केला आहे. कायद्यानुसार परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल,’ असे रावल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.
ते म्हणाले, ‘पुण्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने २८ वर्षांपूर्वी ‘पुणे फेस्टिव्हल’ सुरू केला. या माध्यमातून पुणे शहराचा नवीन चेहरा समोर येत गेला. ‘पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’मध्येही महामंडळाचा सहभाग आहे. आता तरुणाईची आवड लक्षात घेऊन ‘सनबर्न फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.’ ‘कंपनीच्या वतीने गोव्यात गेल्या दहा वर्षांपासून हा महोत्सव आयोजित करण्यात येत होता. पुण्यातील महोत्सवामध्ये सुमारे ४० ते ५० देशांतील नागरिक सहभागी होतील. दुपारी दोन ते रात्री ९.५५ या वेळेत तीन दिवस हा महोत्सव होणार आहे,’ असे परसेप्ट कंपनीचे मनोज अगरवाल यांनी सांगितले.

३५ घराण्यांचे वंशज पुण्यात वास्तव्यास
मुंबईत अरबी समुद्रामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या प्रकल्पाचे २४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जलपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला ऐतिहासिक घराण्यांच्या वंशजांना विशेष अति​थी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. संबंधित वंशजांशी संपर्क साधण्याची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे होती. त्यानुसार ३५ घराण्यांचे वंशज हे पुण्यात वास्तवास असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी ‘रॉयल बॉक्स’ असणार आहे,’ असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये इन्कमिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काँग्रेसचे माजी उपमहापौर हिरामण शिंदे, माजी नगरसेवक शंकर पवार, माजी नगरसेविका रिना पवार यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पुढील आठवड्यातही नगरसेवकांचे इन्कमिंग होणार असल्याचे भाजपमधून सांगण्यात आले.
केंद्र आणि राज्यात सत्ता मिळविल्यानंतर पालिकेत सत्ता मिळविण्यासाठी ‘साम, दाम दंड’ यांचा वापर करण्याचा निर्धार शहरातील भाजपच्या नेत्यांनी केला आहे. पालिकेत अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी इतर पक्षातील ‘सक्षम’ उमेदवारांना फोडून त्यांना प्रवेश देण्यास गेल्या तीन महिन्यांपासून भाजपने सुरुवात केली आहे. यापूर्वीही पालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीतील विद्यमान नगरसेवकांसह मनसेमधील नगरसेवकांना भाजपने आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे.
काँग्रेसचे माजी उपमहापौर, माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या काही पदा‌धिकाऱ्यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुकाराम पवार, प्रभाकर सावळे, सुनील भेगडे, रणधीर कांबळे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी मिलिंद शिंदे, प्रकाश भरेकर यांचा समावेश आहे. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, सरचिटणीस उज्ज्वल केसकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच, तीन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश धाडवे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे राजीनामा दिला. राष्ट्रवादीने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविल्याने आपण राष्ट्रवादीमध्येच असल्याचे स्पष्टीकरण धाडवे यांनी दिले होते. शुक्रवारी नगरसेवकपदाचा राजीनामा आयुक्तांकडे देऊन भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केल्याचे धाडवे यांनी जाहीर केले. चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी यांनीही आयुक्तांकडे राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

नाना- भाऊ दिलजमाई...?
गेल्या काही दिवसांत शहर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या प्रवेशांवरून अंतर्गत राजकारण रंगले होते. पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे यांच्या समर्थकांमध्ये स्पर्धा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर पक्षात दिलजमाईचा मूड दिसून येत आहे. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम, तसेच मोदी यांच्या सभेच्या स्थळपाहणीसाठीही विविध नेते एकत्र होते आणि त्यांच्यात हास्यविनोदही सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालनाट्य संमेलन दोन; अध्यक्ष एक

$
0
0

पुणे : नाट्य परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या बालनाट्य संमेलनासाठी अध्यक्ष शोधण्याची वेळ परिषदेवर आली आहे. नाट्य परिषदेच्या कामाच्या रचनेत बालरंगभूमी ‘विंगेत’ असल्याने बालरंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या रंगकर्मींची धड माहितीही नाट्य परिषदेकडे नाही. त्यामुळे आगामी संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ पूर्वीच्याच अध्यक्षांच्या गळ्यात घालण्याची सोयीची भूमिका परिषदेने घेतली आहे. दोन संमेलनांसाठी एकच अध्यक्ष, या परिषदेच्या अजब निर्णयाबाबत नाट्य वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बालनाट्य स्पर्धा घेण्यापलीकडे परिषदेचे बालरंगभूमीसाठी भरीव काम होत नसल्याने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे गेल्या वर्षीपासून बालनाट्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. गेल्या वर्षी पहिले संमेलन सोलापूर येथे झाले. ज्येष्ठ रंगकर्मी कांचन सोनटक्के यांना या संमेलनाचे अध्यक्ष करण्यात आले. आता दुसरे संमेलन नांदेड येथे होत आहे. ६ ते ८ जानेवारी २०१७ या कालावधीत होणाऱ्या या संमेलनाचा अध्यक्ष कोण असेल, हे अद्याप जाहीर करण्यात आले नाही. पण संमेलनाच्या अध्यक्ष सोनटक्केच असतील, असा निर्णय परिषदेने घेतला आहे.
नवीन अध्यक्ष शोधण्यापेक्षा परिषदेने सोनटक्के यांनाच दुसऱ्या संमेलनासाठी अध्यक्षपद भूषविण्याची विनंती केली आहे. सोनटक्के यांनी ती मान्यही केली आहे. पहिल्या संमेलनासाठी सोनटक्के यांची निवड करताना अध्यक्षाचा कालावधी दोन वर्षांचा असेल, असे ठरले नव्हते. नाट्य परिषद बालरंगभूमीसाठी विशेष काम करत नाही, अशी टीका होत असल्याने परिषदेने बालनाट्य संमेलनाचा घाट घातला. पण या संमेलनासाठी घटना किंवा काही नियमावली नसल्याने परिषदेने सोनटक्के यांचे नाव पुढे करून स्वतःची सुटका करून घेतल्याचे बोलले जात आहे.

यंदाच्या बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कांचन सोनटक्के असतील. या संमेलनाच्या अध्यक्षांचा कालावधी दोन वर्षांचा करण्यात आला आहे. अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया नाही.
- दीपक करंजीकर, प्रमुख कार्यवाह, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रेय लाटण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

$
0
0

पालकमंत्री गिरीश बापट यांचा हल्लाबोल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सत्ता हातात असताना काम केले नाही. आता आम्ही मेट्रो मंजूर केली तर त्याचे भूमिपूजन करून श्रेय लाटण्याच प्रयत्न काँग्रेस करीत आहे. पुणेकर सुज्ञ आहेत; सर्व काही त्यांच्या लक्षात राहते,’ या शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी काँग्रेसवर टीका केली.
बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने मान्यता न दिल्याने मेट्रोला उशीर होत असल्याचा आरोप करून काँग्रेसने स्वारगेट चौकात मेट्रोचे भूमिपूजन केले. त्याविषयी विचारले असता बापट म्हणाले की, ‘हातात संधी होती; त्यावेळी काँग्रेसने दुर्लक्ष केले. गेली दहा वर्षे मेट्रो प्रकल्प मान्यतेच्या प्रतीक्षेत होता. त्यावेळी काम केले नाही. भाजपने केंद्र तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा करू प्रकल्पातील त्रुटी दूर केल्या आणि प्रकल्प मार्गी लावला. मेट्रोचे श्रेय भाजपला मिळेल अशी भीती वाटत असल्याने काँग्रेसचा खटाटोप चालू आहे.’
काँग्रेसने भूमिपूजन केल्याने प्रकल्पाचे उद्घाटन झाले असे होत नाही. भूमिपूजन करण्याचा अधिकार सरकारचा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केल्याने मोदी यांनी शहराच्या हितासाठी तातडीने प्रकल्पाला मंजुरी दिली. हा प्रकल्प कोणी मार्गी लावला, याला कोणी विरोध केला हे समजण्याइतपत पुणेकर सुज्ञ आहेत. शहराचा विकास सर्वांना एकत्र घेऊन करण्यात आम्हाला रस आहे. त्यामुळेच सर्व पक्षांना निमंत्रण देण्यात आले. मोदींच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाच्या खर्चाची काळजी तुम्ही करू नका. हा खर्च महामेट्रो कंपनी करणार आहे, असेही बापट म्हणाले.

काँग्रेसकडून मोदींना काळे झेंडे
पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त देशाची घोषणा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तरे देत नाहीत. नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून चाळीस दिवस उलटल्यानंतरही बँकेच्या बाहेर रांगाच रांगा लागत आहेत. मोदींच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने मोदींना काळे झेंडे दाखविले जाणार आहेत. मेट्रोच्या भूमिपूजनस्थळी जाणाऱ्या रस्त्यावर निषेध करण्यात येणार आहे. एअरपोर्ट रस्त्त्यावरील बर्माशेल येथे उभे राहून निषेध करण्यात येईल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​व्हायोलिन गाणार ‘रेडिओ एफटीआयआय’वर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ज्येष्ठ संगीतकार व व्हायोलिनवादक पं. प्रभाकर जोग यांच्या ८५ व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आठवणींचे स्वर जुळून येणार आहेत. ‘स्वर आले जुळूनी’ या मालिकेतून हे स्वर जुळणार आहेत. जोग यांच्यावर वीस भागांची श्राव्य मालिका राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) रेडिओ विभागातर्फे तयार केली जात आहे. यामध्ये पूर्वी ध्वनिमुद्रित केलेले व्हायोलिनवादन रसिकांना ऐकता येईल. ‘रेडिओ एफटीआयआय’ त्यांना ही अनोखी मानवंदना देत आहे.
जादुई स्वरांतून व्हायोलिनला गाते करणारे पं. प्रभाकर जोग २५ डिसेंबर रोजी ८५ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. हिंदी-मराठी चित्रपटक्षेत्रात त्यांनी दिलेल्या सांगीतिक योगदानाबद्दल त्यांना ही मानवंदना दिली जाणार आहे. पं. जोग यांचा सांगीतिक व जीवनप्रवास ‘स्वर आले जुळूनी’ या त्यांच्या आत्मचरित्रात शब्दबद्ध झाला आहे. या रेडिओ मालिकेमध्ये आत्मचरित्रातील आठवणींसह पं. जोग यांच्या मनोगतातून संगीताच्या सुवर्णकाळातील आठवणी ताज्या होणार आहेत. पं. जोग यांच्या मुलाखतीच्या ध्वनिमुद्रणाला शुक्रवारपासून एफटीआयआयमध्ये सुरुवात झाली. प्रकाशक रवींद्र घाटपांडे यांनी त्यांना बोलते केले. या मुलाखतीच्या निमित्ताने ‘एफटीआयआय’शी पहिल्यांदाच संबंध आल्याने पं. जोग यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना होती.
‘स्वर आले जुळूनी’ ही १५ मिनिटांची व वीस भागांतील रेडिओ मालिका आहे. पं. जोग यांच्या जन्मदिनापासून रेडिओ एफटीआयआय ९०.४ मेगाहर्ट‍्झ एफएम या केंद्रावर दर रविवारी आणि गुरूवारी दुपारी १ व सायंकाळी ५ वाजता ती प्रसारित केली जाणार आहे. एफटीआयआयच्या आजूबाजूच्या परिसरातील रसिकांना रेडिओवर ही मालिका ऐकता येईल,’ असे ‘एफटीआयआय’च्या रेडिओ केंद्राचे प्रमुख संजय चांदेकर यांनी पत्रकारांना सांगितले. या रेडिओ मालिकेची निर्मिती ओंकार इनामदार, संजय चांदेकर, सोनल इनामदार, मुग्धा धायगुडे, नीता तुपारे, नरेंद्र चिपळूणकर, हर्षवर्धन चांदेकर आणि प्रा. अश्विन सोनोने करत आहे.

पं. जोग यांच्या जन्मदिनानिमित्त ‘स्वर आले जुळूनी’ ही मालिका प्रसारित करणार आहोत. ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांच्या मनोगतातून माहिती संग्रहित व्हावी, या हेतूने अशा मालिका यापुढे ध्वनिमुद्रित केल्या जाणार आहेत. पं. बबनराव हळदणकर यांच्या मुलाखतीचे काम पूर्वीच पूर्ण झाले आहे. संगीतकार यशवंत देव व फैयाज हुसेन खाँ यांच्या मुलाखती ध्वनिमुद्रित केल्या जाणार आहेत. रेडिओ तसेच edaa.in या वेबसाइटवर व यू-ट्यूबवर त्या विनामूल्य उपलब्ध असतील.
- संजय चांदेकर, रेडिओ केंद्र प्रमुख, एफटीआयआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेसची स्टंटबाजी; भाजपची फ्लेक्सबाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होण्यापूर्वीच प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरून राजकारणाची मेट्रो सुसाट सुटली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमापूर्वीच काँग्रेसने शुक्रवारी प्रतिकात्मक भू​मिपूजनाचा ‘इव्हेंट’ उरकून घेतला. ही काँग्रेसची ‘स्टंटबाजी’ असल्याची टीका करणाऱ्या भाजपनेही भरीस भर म्हणून संपूर्ण शहर ‘फ्लेक्समय’ करून टाकले आहे.
महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांनी आपल्या पद्धतीने धडपड सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या भूमिपूजनासाठी आज, शनिवारी शहरात येत आहेत. या निमित्ताने पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची तयारी असून, ‘भाजपने हा प्रकल्प शहरात आणला,’ असे सांगणारे फलक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लावले आहेत. तर, दुसरीकडे ‘मेट्रोच्या प्रस्तावाला काँग्रेसने प्रथम मान्यता दिली; मात्र भाजप सरकारच्या विलंबामुळे प्रकल्प रखडला,’ असा आरोप करून काँग्रेसजनांनी प्रकल्पाचे प्रतिकात्मक भूमिपूजनही उरकले.
जानेवारीच्या आरंभी निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचे भूमिपूजन करण्याचा मुहूर्त भाजपने निवडला आहे. कृषी महाविद्यालयाच्या मागील मैदानावर मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमातून आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्याबरोबरच शहरात पदाधिकाऱ्यांनी शेकडो फ्लेक्स लावले असून, त्यामध्ये निवडणुकीतील इच्छुकांचे प्रमाण अधिक आहे. ‘होय.. करून दाखविले’, ‘चला ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊ या..’, ‘भरकटलेला रूळ आता सुसाट धावणार; पुण्याचा कायापालट भाजपच करणार’ या आशयाचे फलक उभारण्यात आले आहेत.

काँग्रेसचेही शक्तिप्रदर्शन
मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फ्लेक्स लावले होते तर, रस्त्यांवर भाजपचे झेंडे देखील लावण्यात येत होते. मेट्रोचे श्रेय केवळ भाजपला मिळू नये, यासाठी मेट्रोच्या विलंबाला भाजप सरकार कारणीभूत असल्याचा आारोप करून निषेध करण्यासाठी शहर काँग्रेसने स्वारगेट चौकात शुक्रवारीच मेट्रोचे अनौपचारिक भूमिपूजन करून निषेध केला. त्यावेळीही पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींच्या स्वागतासाठी पुणे सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे भेटीसाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची तयारी केली आहे. मोदींचे सायंकाळी सव्वासहा वाजता लोहगाव विमानतळावर आगमन होईल आणि त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत मोदी कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ‘पुणे मेट्रो’च्या भूमिपूजनासाठी निघणार आहेत. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात पंतप्रधानांचा ताफा वीस मिनिटांत कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहे.
पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा जाणाऱ्या रस्त्यांवर दुतर्फा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ताफ्यामध्ये कोणीही घुसू ​शकणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर (सिंचन भवन) येथे पुणे मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. मैदानाच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक इमारतीत पोलिस तैनात करण्यात आले आहेत. उंच इमारतींमध्ये, इमारतींवर कमांडो तैनात करण्यात आले आहेत. कार्यक्रमस्थळी म्हणजे सिंचननगर येथील रस्त्यावर, कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच शहरातील संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस फाटा तैनात असणार आहे. जलद प्रतिसाद दलाच्या तीन तुकड्या या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. नागरिकांनी कार्यक्रमस्थळी वेळेत पोहोचावे अन्यथा पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा आल्यानंतर कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी अडचण येण्याची शक्यता आहे.

आगमन आणि परतीचा प्रवास
पंतप्रधानांचे आगमन आणि परतीच्या प्रवासाच्या बंदोबस्ताची विभागणी २२ भागांत करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी पुणे पोलिस दलातील बहुतांश अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आल आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.


पंतप्रधानांचा दौरा एका दृष्टिक्षेपात...
सायं. ५.३० वा. पंतप्रधान मुंबईहून पुण्याकडे रवाना.
सायं. ६.१५ वा. लोहगाव विमानतळावर आगमन.
सायं. ६.४० वा. कार्यक्रमस्थळी आगमन.
सायं. ७.३५ वा. पंतप्रधान कार्यक्रमस्थळ सोडणार.
रात्री ८ वा. लोहगाव विमानतळावर आगमन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वनाज’पासून कामाला सुरुवात

$
0
0

Suneet.Bhave@timesgroup.com

Tweet: @suneetMT

पुणे : शहराच्या बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोचे आज, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत असतानाच, वनाज आणि पिंपरी-चिंचवड या दोन स्थानकांपासून मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. विविध स्वरूपातील तांत्रिक सर्वेक्षण, भूसंपादन अशा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील चार ते सहा महिन्यांत या जागांवर मेट्रोचे बांधकाम सुरू होऊ शकणार आहे.

‘मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यावर वर्षातील सर्व दिवस अहोरात्र मेहनत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून मेट्रो वेळेपूर्वीच पुणेकरांच्या सेवेत दाखल करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत,’ अशी माहिती महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. मेट्रो भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न वेळेत साकार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, याची ग्वाही त्यांनी दिली.

शहरातील मेट्रोच्या दोन्ही मार्गांचा विचार करता, शक्यतो डेपोची जागा निश्चित केलेल्या ठिकाणापासून कामाला सुरुवात केली जाते. मेट्रोच्या सविस्तर प्रकल्प अहवालात डेपोची जागा वनाज येथे निश्चित करण्यात आली असून, वनाजसह पिंपरी-चिंचवड येथील स्टेशन ‘एलिव्हेटेड’ असल्याने या दोन्ही ठिकाणांहून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. त्यानंतर, रामवाडी येथून, तर सरतेशेवटी भुयारी मार्गाचे काम केले जाईल. सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून पुढील पावसाळ्यापूर्वी मेट्रोचे काम सुरू झाल्याचे पुणेकरांना दिसेल, असे दीक्षित यांनी सांगितले. मेट्रोच्या प्रत्यक्ष कामापूर्वी आवश्यक असलेल्या ‘जिओ-टेक्निकल’ सर्वेक्षणासाठी जागांची निश्चिती झाली असून, पोलिसांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) मिळताच, पुढील काम सुरू होईल, असे त्यांनी नमूद केले.

मेट्रो स्टेशनची रचना आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यात येणार असून, त्यासाठी जगातील सर्वोत्तम आर्किटेक्टची मदत घेण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. नागपूरच्या धर्तीवर स्टेशनच्या ठिकाणीच विविध कार्यालये, मॉल्स आणि इतर सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. पुणे मेट्रोच्या प्रशासकीय कार्यालयासाठी कोरेगाव पार्क येथील जागा निश्चित करण्यात आली असून, येणाऱ्या काही दिवसांत पूर्ण क्षमतेने मेट्रोचे कार्यालय सुरू होईल, असेही दीक्षित यांनी स्पष्ट केले.

‘पीएमपीसोबत काम करणार’

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस सेवेसह मेट्रोचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करावा यासाठी समन्वयातून काम केले जाणार आहे. मेट्रोच्या सध्याच्या मार्गांवर धावणाऱ्या पीएमपी बसच्या मार्गांमध्ये बदल करून अंतर्गत भागांतील नागरिकांना बससेवेद्वारे जोडण्यात येईल. यामुळे, मेट्रोसाठीचे प्रवासी वाढतील; पण मेट्रोपासून काही अंतरावर राहणाऱ्या नागरिकांनाही थेट मेट्रो स्टेशनपर्यंत बस सेवा उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.

पुणे मेट्रोच्या अंमलबजावणीसाठी महा-मेट्रोच्या कंपनी स्थापनेची प्रक्रिया १५ जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर, संचालक मंडळाची बैठक घेऊन पुढील कामांना त्वरेने गती दिली जाईल.
- ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महा-मेट्रो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीसाठी मेट्रो रखडवली

$
0
0

पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपवर आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘केंद्र आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार दुटप्पी असून, निवडणुकीसाठी विकासाचे ढोंग रचण्यात त्याचा हातखंडा आहे. त्यामुळे, नागपूर मेट्रोला सहा महिन्यांत मान्यता देणाऱ्या सरकारने पुण्याच्या मेट्रोला पालिका निवडणुकीपर्यंत जाणीवपूर्वक रखडवले,’असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला.
पुणे आणि नागपूर मेट्रोला यूपीए सरकारने एकाचवेळी मान्यता दिली असताना पुण्याच्या मेट्रोला अडीच वर्षे उशीर होण्याचा जाब शहरातील भाजपच्या मंत्र्‍यांनी, खासदार-आमदारांनी कधी पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांना विचारला आहे का, असा टोलाही त्यांना लगावला. पुणे मेट्रोचे भूमिपूजन शनिवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वीच, पुणे मेट्रोचा प्रस्ताव आणि त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा-प्रयत्न काँग्रेसने केल्याचा दावा करून शुक्रवारीच चव्हाण यांच्या हस्ते स्वारगेट येथे मेट्रोचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी चव्हाण यांनी शहराच्या मेट्रो प्रकल्पासाठी भाजप सरकारने कसा विलंब केला याचा पाढा वाचला.
‘पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राचा आतापर्यंत खूप विकास झाला आहे. आता विदर्भाचा विकास करायचा असल्याने सर्व प्रकल्प त्याच भागांत झाले पाहिजेत, अशा प्रादेशिक आकसापोटी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक परवानग्या बाकी असतानाही नागपूर मेट्रोचा प्रकल्प पुढे रेटला. पुण्यापेक्षा कमी लोकसंख्या-वाहनसंख्या असलेल्या नागपूरमध्ये मेट्रो नेता; मग पुण्याला का वगळता,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
‘पंतप्रधान मोदी विकासाची संकल्पना मांडत असले, तरी भाजपला निवडणुकांच्या राजकारणातच अधिक रस असल्याचे पुणे मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून स्पष्ट होते. अडीच वर्षे सरकारकडे प्रस्ताव असताना, पालिका निवडणुकीपूर्वी त्याचे भूमिपूजन करण्याचे कारण मतदारांना निश्चित उमगेल’, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.
यापूर्वी मेट्रोला मान्यता दिली असती, तर शहरातील नागरिक ते विसरले असते. म्हणून, निवडणुकीपूर्वी भूमिपूजन करून ‘राजकीय स्टंट’ करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांचीही या वेळी भाषणे झाली. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, रजनी त्रिभुवन, माजी उपमहापौर आबा बागूल, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

उपमहापौर अनुपस्थित
शहर काँग्रेसच्यावतीने घेण्यात आलेल्या या भूमिपूजन समारंभात काँग्रेसचे बहुतेक सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. परंतु, विद्यमान उपमहापौर मुकारी अलगुडे यांची अनुपस्थिती खटकत होती. स्वारगेट येथे झालेल्या कार्यक्रमस्थळी आणि आसपास लावण्यात आलेल्या मोठमोठ्या फ्लेक्सवर अनेक माजी पदाधिकारी, आमदार झळकत असले, तरी उपमहापौरांना त्यातून वगळण्यात आले होते. उपमहापौरपदाची प्रतिष्ठा राखण्यात पक्ष कमी पडल्यानेच कार्यक्रमापासून दूर राहणे पसंत केल्याचा खुलासा अलगुडे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुम्हीही व्हा सिक्रेट सांता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चिमुकल्यांच्या ओठांवर रूळणाऱ्या ‘जिंगल बेल...जिंगल बेल’ गाण्यातील त्यांचा आवडता सांताक्लॉज म्हणजे नाताळच्या सकाळी गिफ्ट देणारा मित्रच असतो. ख्रिसमसच्या सकाळी उशीजवळ सांताक्लॉजने काय गिफ्ट ठेवले असेल याची उत्सुकता चिमुकल्यांच्या आनंदात भर टाकत असते; पण गरीब कुटुंबातील गरजू आणि निराधार मुलांसाठी असा कोणताही सांताक्लॉज येत नाही की त्यांना गिफ्ट देत नाही. या आनंदापासून वंचित असलेल्या मुलांसाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘टाइम्स फाऊंडेशन’ यांनी ‘मिट्टी के रंग’ संस्थेच्या सहकार्याने खास ‘सिक्रेट सांता’ ही अभिनव कल्पना सादर केली आहे.
समाजातील गरजू व निराधार मुलांसाठी सांताक्लॉजची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी ‘मटा’ च्या माध्यमातून वाचकांना देण्यात आहे. यामध्ये वाचकांनी मुलांसाठी नवीन वस्तू, खेळणी, शालोपयोगी वस्तू, उपयुक्त अशी अवांतर वाचनाची पुस्तके भेट म्हणून ‘मटा’ च्या कार्यालयात जमा करावयाची आहेत. या भेटवस्तू नव्याच असणे आवश्यक आहे. गिफ्ट द्यायची वस्तू छान पॅक करून त्यावर स्वतःचे नाव, पत्ता व फोन नंबर लिहून ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या, टाइम्स हाउस, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरील कार्यालयात जमा करायच्या आहेत. या भेटवस्तू ख्रिसमसच्या दिवशी सेवाभावी संस्थेला देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निलंबित न्यायाधीशाला तीन वर्षे सक्तमजुरी

$
0
0

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी निलंबित न्यायाधीश नागराज शिंदे याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला. विशेष कोर्टाने सहा महिन्यांच्या आत या खटल्याचा निकाल दिला.

निलंबित न्यायाधीश नागराज सुदाम शिंदे याला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ‘बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२’चे कलम आठ आणि ‘भारतीय दंडविधान कलम ३५४’नुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड. प्रताप परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली होती. अॅड. परदेशी यांनी या खटल्यामध्ये अकरा साक्षीदार तपासले. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त जयवंत देशमुख आणि मिलिंद मोहिते, पोलिस उपनिरीक्षक पैरवी अधिकारी पांडुरंग मडबाळ, सहायक पो​लिस उपनिरीक्षक रामभाऊ कोरे, पोलिस हवालदार राजेंद्र गिरमे यांनी केला.

निलंबित न्यायाधीश नागराज शिंदे याच्याविरुद्ध संबंधित पीडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे आरोपी शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी शिंदे आणि फिर्यादी हे एकाच सोसायटीत राहणारे आहेत. फिर्यादीचा फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर आहे, तर शिंदे चौथ्या मजल्यावर राहत होता. ही दोन्ही कुटुंबे एकाच गावाची असल्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे सुरू होते. आरोपीची पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेली होती. त्या वेळी तो एकटाच घरात राहत होता. त्यामुळे फिर्यादी, त्यांचा मुलगा आणि पीडित मुलीमार्फत त्याला जेवण पाठवत असत. दरम्यानच्या काळात आरोपीने मुलीबरोबर लगट वाढवली. ‘चांगल्या ठिकाणी शिक्षण करून देतो, एमपीएससी, यूपीएससीचे क्लास लावून देतो,’ असे आमिष त्याने तिला दाखविले. तिला भुरळ पाडून फोनवर मेसेज आणि प्रेमपत्रे पाठवण्यास भाग पडले. ती १५ वर्षांची आहे हे माहीत असतानाही त्याने तिच्याबरोबर प्रेमसंबंध निर्माण केले. २६ जून २०१४ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्याने संबंधित मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच ‘हा प्रकार कोणाला सांगू नकोस,’ अशी धमकीही दिली होती. पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला, तसेच अश्लील चाळे केले अशी फिर्याद पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती. या खटल्यात कोर्टाने आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

...........

स्वतःच केस लढवली

आरोपी स्वतःच न्यायाधीश होता. त्यामुळे या खटल्यात त्याने स्वतःच आपली केस लढवली. कोर्टात खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत या खटल्याचा निकाल देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासपोर्टला ‘आधार’चा आधार

$
0
0

परराष्ट्र मंत्रालयाने केले नियम शिथिल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पासपोर्टसाठी जन्मतारखेचा पुरावा देण्यासाठी नागरिकांची होणारी धावपळ आता संपणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टसाठीचे नियम शिथिल केले असून, जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स ग्राह्य धरले जाणार आहे. येत्या २६ डिसेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत.

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री (निवृत्त) जनरल व्ही. के. सिंह यांनी पासपोर्टशी संबंधित नव्या नियमांची माहिती शुक्रवारी जाहीर केली. १९८९नंतर जन्मलेल्या अर्जदारांना जन्मदाखला देणे आतापर्यंत बंधनकारक होते. तसेच त्यापूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना शाळेचा दाखला किंवा अॅफिडेव्हिट द्यावे लागत होते. जुने नियम शिथिल करून मंत्रालयाने सरसरकट सगळ्यांना एकच नियम जाहीर केला आहे. यापुढे जन्मतारखेचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एलआयसी पॉलिसी यांपैकी कोणतेही कागदपत्र चालणार आहे.

सध्या देशभरात एक अब्जाहून अधिक नागरिकांकडे आधार कार्ड आहे. या कार्डामुळे अनेक सरकारी सेवा आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा फायदा त्यांना मिळत आहे. आता पासपोर्टसाठीदेखील आधार कार्ड फायदेशीर ठरणार आहे. पासपोर्ट प्रक्रियेमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक बदल झाले असून, पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मंत्रालयाच्या नव्या निर्णयामुळे लाखो अर्जदारांना दिलासा मिळाला आहे. मुख्यतः ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना जन्मदाखला सादर करताना खूप अडचणी येत होत्या. नव्या नियमांमध्ये ‘अॅनेक्श्चर’चे काही प्रकारही करण्यात आले आहेत. अॅफिडेव्हिटचे नियम शिथिल करून यापुढे वैयक्तिक हमीपत्र (सेल्फ डिक्लरेशन) ग्राह्य धरण्यात येणार आहे, असे पुणे विभागाचे मुख्य पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी सांगितले.

...

कोट

परदेशगमनाच्या संधी वाढल्यामुळे पासपोर्ट प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी, यासाठी परराष्ट्र मंत्रालय प्रयत्नशील आहे. गेल्या दोन वर्षांत पासपोर्ट प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले असून, पासपोर्ट अल्पावधीतच नागरिकांच्या हातात मिळतो आहे. या नव्या बदलांमुळे नागरिकांबरोबरचे आमचे काम अधिक सोपे होईल.

अतुल गोतसुर्वे, पासपोर्ट अधिकारी, पुणे विभाग

....

नवीन नियम

- सरकारी कर्मचाऱ्यांना पासपोर्ट काढण्यासाठी संबंधित मंत्रालय किंवा खात्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते; मात्र ते तातडीने मिळण्यास अडचण येत असल्यास ना हरकत प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाचा पुरावा स्वाक्षरीसह ग्राह्य धरणार.

- साधू-संन्यासींना पासपोर्टवर माता-पित्याच्या नावांऐवजी आपल्या आध्यात्मिक गुरूचे नाव देता येईल; मात्र त्या नावाचे पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र यांपैकी एक पुरावा आवश्यक.

- घटस्फोटित अर्जदाराला मुलांचा पासपोर्ट काढताना एका पालकाचे नाव लिहिण्यास परवानगी.

- आई किंवा व‌डिलांचे नाव पासपोर्टवर नमूद केले जाऊ नये, अशी अर्जदार व्यक्तीची इच्छा असेल तर तीही आता मान्य होणार आहे.

- अर्ज भरताना लागणारे अॅनेक्श्चर ए, सी, टी, ई, जे आणि के यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्याऐवजी नागरिकांकडून ‘सेल्फ डिक्लरेशन’ स्वीकारणार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणे ते दिल्ली आठ तासांत

$
0
0

‘ट्रान्सपोर्ट व्हिजन २०३५’ मध्ये तरतूद ; पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे आव्हान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याहून दिल्लीला रस्ते वाहतुकीने जाण्यासाठी सध्या अंदाजे २४ तासांचा कालावधी लागतो. पण, तोच प्रवास अवघ्या आठ तासांत पूर्ण करता आला तर! सध्याची परिस्थिती पाहता आणि वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गडद होत चालली असताना ही गोष्ट अशक्यच वाटत आहे. पण, ‘टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग अॅँड अॅसेसमेंट कौन्सिल’ ने (‘टायफॅक) जाहीर केलेल्या ‘ट्रान्सपोर्ट व्हिजन २०३५’मध्ये ही तरतूद केली असून, तंत्रज्ञानाचा वापर करून त्यादृष्टीने पायाभूत सुविधा करण्याची गरज व्यक्त केली आहे.
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) येथे ‘ट्रान्सपोर्ट व्हिजन २०३५’ जाहीर करण्यात आले. या वेळी ‘टायफॅक’चे कार्यकारी संचालक प्रा. प्रभात रंजन यांनी ‘व्हिजन’मधील ‘सुरक्षित आणि वेगवान वाहतूक’ या विषयाची माहिती दिली. आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागात वाहतुकीच्या गरजाही भिन्न आहेत. शहरी भागात प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेला अधिक महत्त्व आहे, तर ग्रामीण व निमशहरी भागात प्रवासाचे अंतर हे महत्त्वाचा घटक आहे. त्यानुसार एखाद्या जिल्ह्यातील कोणत्याही गावातून जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणापर्यंतचा प्रवास जास्तीत जास्त तीन तासांत पूर्ण करता यावा. राज्याच्या राजधानीपर्यंत जाण्यासाठी पाच आणि देशाच्या राजधानीत जाण्यासाठी आठ तासांत प्रवास पूर्ण झाला पाहिजे, अशी तरतूद असल्याचे प्रा. रंजन यांनी सांगितले.
‘महानगरांमध्ये एका भागातून दुसऱ्या कोणत्याही भागात जाण्यासाठी एक तासापेक्षा जास्त कालावधीचा प्रवास करण्याची वेळ येणार नाही, या दृष्टीने शहराअंतर्गत वाहतूक योजना राबविली पाहिजे. येत्या २०३५ सालापर्यंत कोणत्याही व्यक्तीला घरापासून किमान एक किमी अंतरावर सार्वजनिक वाहतुकीचे साधन उपलब्ध होईल, या दृष्टीने विकास साधला पाहिजे. त्यामध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, रस्ता वाहतूक टेक्नॉलॉजी आणि वाहतूक व्यवस्थापन याची सांगड घालावी लागणार आहे,’ असेही प्रा. रंजन यांनी सांगितले.

व्हिजन २०३५ मधील तरतुदी
- प्रत्येक तालुकास्तरावर आपत्कालिन परिस्थितीत मदतकार्यासाठी हेलिपॅड असावे.
- सुरक्षित पादचारी योजना राबविण्याची गरज. कोठेही पादचाऱ्याचा अपघाती मृत्यू होणार नाही यासाठी चालकांना तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण दिले पाहिजे.
- पादचाऱ्यांची सुरक्षिततता.
- मोठ्या शहरांमध्ये एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी कमाल एक तासाचा अवधी.

आम्ही सूचविलेल्या तरतुदी या सत्य आणि स्वप्नवत यांमधील आहेत. त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास ते प्रत्यक्षातही येऊ शकते.
- प्रा. प्रभात रंजन, कार्यकारी संचालक, टायफॅक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पायाभूत सुविधांसाठी नागरिकांनी पुढे यावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सद्य परिस्थितीत उपलब्ध असलेल्या पायाभूत सोयीसुविधा वाहतुकीचा ताण घेण्यास सक्षम नाहीत. ‘व्हिजन २०३५’ अंतर्गत सादर केलेले ट्रान्सपोर्ट व्हिजन डॉक्युमेंट लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात हे व्हिजन प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तंत्रज्ञांबरोबरच संबंधित सरकारी यंत्रणा आणि नागरिकांनी देखील पुढे येण्याची गरज आहे,’ असे मत ‘टायफॅक’चे (टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग अँड अॅसेसमेंट कौन्सिल) अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’च्या (एआरएआय) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘ट्रान्सपोर्ट व्हिजन कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते. या वेळी ‘ट्रान्सपोर्ट व्हिजन डॉक्युमेंट २०३५’ चे अनावरण करण्यात आले. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) संचालक डॉ. अश्विनीकुमार नांगिया, ‘टायफॅक’चे कार्यकारी संचालक डॉ. प्रभात रंजन, ‘ट्रान्सपोर्ट व्हिजन २०३५’ चे प्रमुख गौतम गोस्वामी, या व्हिजनच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत मराठे, ‘एआरएआय’च्या संचालिका रश्मी उर्ध्वरेषे आदी या वेळी उपस्थित होते.
‘आज भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. वाहतूक व दळणवळण अधिक वेगवान व सुरक्षित होणे गरजेचे आहे. मात्र, त्यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला पाहिजे. वैयक्तिक वाहनांचा वाढलेला वापर व दुर्लक्षित असलेली सार्वजनिक व्यवस्था, यामुळे सध्याच्या पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. भविष्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देणे गरजेचे आहे. तसेच, तुलनेने अतिशय स्वस्त असलेल्या रेल्वे आणि जलवाहतुकीकडे सक्षम पर्याय म्हणून पाहिले पाहिजे,’ असे डॉ. काकोडकर म्हणाले.
गेल्या तीन दशकांत वाहन उद्योगा वाढला आणि त्याबरोबरच वाहतुकीच्या समस्याही वाढल्या. सर्वच शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी सर्वंकष वाहतूक धोरणाची गरज आहे. सध्या सार्वजनिक वाहतुकीतील घटक एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत. तसे न होता या घटकांनी एकमेका सहकार्य केल्यास परिस्थितीत बदल होऊ शकतो, असे डॉ. मराठे म्हणाले.
या वेळी ‘एआरएआय’ची गेल्या ५० वर्षांची कामगिरी दर्शविणारे एक प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते. डॉ. काकोडकर व इतर मान्यवरांनी त्यास भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटक्या कुत्र्यांच्या शोधात बिबट्या शिरला वस्तीत

$
0
0

चैत्राली चांदोकर । पुणे

कोंढव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंटच्या ऑफिसमध्ये महिला सफाई कर्मचारी शनिवारी सकाळी आठच्या दरम्यान साफसफाई करीत असताना अचानक ऑफिसच्या आतल्या खोलीत कसला तरी आवाज ऐकायला आला, त्यांनी वाकून पाहिले असताना बेसिनखाली बिबट्या लपलेला दिसला. घाबरलेल्या अवस्थेतच त्यांनी तत्काळ सिक्युरिटी गार्डला बोलावून ऑफिसच्या मुख्य दरवाजा बाहेरून लावल्याने बिबट्या जेरबंद झाला.

स्थानिक पोलिस आणि वन विभागाशी संपर्क साधून बिबट्याची माहिती दिली. थोड्या वेळातच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ऑफिसमधील कपाट, टेबल आणि खुर्च्यांमुळे लपण्याच्या अनेक जागा असल्याने तासभर बिबट्या नक्की कुठे लपलाय हे कळायला मार्ग नव्हता. थोड्यावेळाने त्याने बाहेर पडण्यासाठी धावपळ सुरू केली, त्यावेळी रेस्क्यू टीमने त्याला ट्रँक्विलाइज करण्याचे प्रयत्न केले, पण नेम लागत नव्हता. पाच इंजेक्शन वाया गेल्यानंतर अखेरचा नेम यशस्वी ठरला. बेशुद्ध झालेल्या बिबट्याला वनाधिकाऱ्यांनी कात्रज येथील प्राणी अनाथालयामध्ये नेले असून बैद्यकीय तपासणीनंतर त्याला निसर्गात सोडण्यात येणार आहे.

इन्स्टिट्यूटमध्ये शिरलेल्या या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. रेस्क्यू टीमने केलेल्या तीन तासांच्या ऑपरेशननंतर दुपारी दीड वाजता बिबट्याला भूलीचे इंजेक्शन देण्यास यश आले. सध्या वैद्यकीय चाचणीसाठी त्याला कात्रज येथील प्राणी अनाथयालामध्ये नेण्यात आले आहे. या भागात असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या शोधात बिबट्या आला असावा, अशी शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

पकडलेला बिबट्या तीन ते साडेतीन वर्षांचा पूर्ण वाढ झालेला आहे. एनआयबीएमला लागून असलेल्या टेकडीवरून लोणी काळभोर मार्गे तो आला असावा, या भागात भटकी कुत्री भरपूर असल्याने तो कुत्र्यांच्या शोधात ऐन वस्तीत आला असणार. सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवलिलेल्या प्रसंगावधानपणामुळे मोठा अपघात टळला. संस्थेच्या बाहेर वस्ती जास्त असल्याने त्या पकडणे आव्हान ठरले असते, असे पुणे विभागाचे उपवनसंरक्षक सत्यजीत गुजर आणि वन परिक्षेत्र अधिकारी विष्णू गायकवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावांना डिजीटल करणे आवश्यक: नरेंद्र मोदी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

गावात शहरांसारख्या सुविधा हव्यात, शहरांप्रमाणे संधी हव्यात तरच खेड्यांकडून शहरात जाण्याची ओढ कमी होईल. गावांचा आत्मा तोच ठेवून शहरांसोबत गावांनाही डिजीटल केल्यास दोन्हीतली दरी कमी होईल. दुसरीकडे केवळ निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून काम केले तर शहरांपुढील आव्हानांना तोंड देऊ शकत नाही. २०-२५ वर्षांनंतर शहर कसे असेल याचे नियोजन करू शकलो तरच हे वेगाने शहरीकरण आव्हानाला तोंड देऊ शकू असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात केले.

पुणे मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उद्घाटन झाले. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री व्यासपीठावर उपस्थित होते. गावांसाठी रर्बन मिशनअंतर्गत विकास करण्याचे ध्येय आहे. या योजनेंतर्गत आत्मा गावचा आणि सुविधा शहराची असेल. काळानुसार विकासाच्या साधनांमध्येही बदल करायला हवेत. रेल आणि रोडपासून वॉटरगेज, डिजीटल नेटवर्क, गॅसग्रीड अशा सुविधा आम्ही निर्माण करत आहोत, असे मोदी म्हणाले. आपल्या देशात झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे कितीही व्यवस्था करा, ज्या गतीने शहरीकरण होतेय ते पाहता, दोन दिशांमध्ये काम करणे अपरिहार्य आहे. पण आपण गाव विकसित करू शकतो आणि तेथील जीवनमानाची गुणवत्ता उंचावू शकतो, असे ते म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न ८ नोव्हेंबरच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे वाढले आहे. बेहिशेबी मालमत्तेसंदर्भातला अध्यादेश १९८८ साली आणला पण धूळखात पडला होता. आधीच्या सरकारने माझ्यासाठी अनेक कामे करायची बाकी ठेवली आहेत. तेव्हाच्या सरकारने ही कामे केली असती तर आज देशातल्या इमानदार नागरिकांना त्रास झाला असता. देश वाचवण्याचे वचन दिले होते, म्हणून आज कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

पवारांनी भाषण टाळले

पुणे मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर आले होते. पण शरद पवारांनी यावेळी भाषण करण्याचे टाळले. मागच्याच आठवड्यात शरद पवारांनी मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगत मोदींवर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर पवार आज मोदी व्यासपीठावर असताना काय भाषण करतील याबाबत उत्सुकता होती, पण पवारांनी भाषण न करणे पसंत केले.

मोदींचे अनोखे स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना त्यांच्या मोबाईलचे टॉर्चलाइट एकाच वेळी पेटवून हात उंचावून त्या प्रकाशात मोदींचे स्वागत करण्याचे आवाहन केले आणि पुणेकरांनी तसे करत मोदींचे अनोखे स्वागत केले. शुक्रवारी भूमिपूजन केले त्याची टर्र उडवत मुख्यमंत्र्यांनी लाल किल्ल्यासमोर जाऊन भाषण दिल्याने कुणी पंतप्रधान होत नाही असे सांगितले. ज्यांनी आदल्या दिवशी भूमीपूजन केले, त्यांनी मेट्रोला मान्यता द्यायची होती तेव्हा २५६ त्रुटी का काढल्या होत्या, असा सवालही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेज शिफ्टमध्ये चालवा

$
0
0

‘यूजीसी’चे माजी अध्यक्ष अरुण निगवेकर यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देशात शिक्षणहक्क कायद्याचा (आरटीई) ४५ टक्के फायदा झाल्यास पुढच्या पंधरा वर्षात उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या तब्बल सात ते आठ कोटी होईल. अशा वेळी या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याच्या काय सोयीसुविधा असतील, हा प्रश्न आहे. त्यामुळे आतापासूनच सध्या उपलब्ध असणारे कॉलेज तीन शिफ्ट चालवायला काय हरकत आहे,’ असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष प्रा. अरुण निगवेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
सेंटर फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट अॅडमिनिस्ट्रेशनतर्फे (सेडा) आयोजित कार्यक्रमात प्रा. निगवेकर यांच्या हस्ते ‘एज्युसर्च’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन झाले. या वेळी प्रा. निगवेकर बोलत होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, ‘सेडा’चे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, सचिव धनंजय कुलकर्णी, एसपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, प्रा. वर्षा देशपांडे, प्रा. बीना इनामदार आदी उपस्थित होते. संगमनेर नगरपालिका आर्टस्, डी. जे. मालपाणी कॉमर्स अँड बी. एन. सारडा सायन्स कॉलेजला इनोव्हेटिव्ह कॉलेज तर ‘सीओईपी’च्या प्रा. मनीषा खळदकर यांना इनोव्हेटिव्ह टिचर्स अवॉर्ड प्रदान करण्यात आले.
प्रा. निगवेकर म्हणाले, ‘सध्या देशात दीड कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिवसेंदिवस या संख्येत वाढ होत आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी सरकारने आरटीई योजना सुरू केली आहे. या आरटीईचा ४५ टक्के फायदा झाल्यास पुढच्या पंधरा वर्षात उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या तब्बल सात ते आठ कोटी होईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भरपूर संख्येने कॉलेज आणि विद्यापीठ लागणार आहेत. मात्र, यांची उभारणी होईलच असे नाही किंवा त्याला कालावधी लागेल. त्यामुळे सध्या उपलब्ध असणारे कॉलेज तीन शिफ्ट चालवल्यास अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळेल.’
डॉ. विद्यासागर म्हणाले, ‘आपण क्लासरूम टिचिंगला अधिक महत्त्व देतो. त्याद्वारे संपूर्ण विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नाही. त्यामुळेच त्यापैकी केवळ २५ टक्के विद्यार्थ्यांना रोजगार मिळतो. ही परिस्थिती बदलायची असेल तर विद्यार्थ्यानी पार्टिसिपेटिव्ह लर्निंगचा अवलंब केला पाहिजे आणि शिक्षकांनी केवळ माहिती देण्याचे काम न करता समन्वयकाची भूमिका बजवावी लागेल.’ ए. जी. गोसावी यांनी पुस्तिकेची माहिती सांगितली. देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. कुलकर्णी यांनी आभार मानले.
.........
‘इनोव्हेशन शिक्षणातून गायब’
‘देशाला प्रगती करायची असेल तर अमूलाग्र इनोव्हेशनची गरज आहे. मात्र, हे ‘इनोव्हेशनच ’आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमातून गायब आहे. ते केवळ उद्योग क्षेत्रात दिसते, अशी खंत प्रा.निगवेकर यांनी व्यक्त केली. शिक्षण क्षेत्राने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याला आत्मसात करून वाटचाल केल्यास त्याचा फायदा काही वर्षांनी नक्की दिसेल,’ असे प्रा. निगवेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images