Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

​मंडईतील विक्रेते आले रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
पुणे-सोलापूर रोडवरील हडपसर उड्डाणपुलाखाली अनधिकृत रस्त्यावर भाजी विक्रेत्यांना बसू दिले जात आहेत. त्यामुळे ग्राहक महापालिकेच्या हडपसर भाजी मंडईमध्ये भाजी खरेदी करायला येत नसल्याने अधिकृत भाजीविक्रेत्यांनी रस्त्यावर भाजीविक्री करून आंदोलन केले. सुमारे शंभर भाजी विक्रते रस्त्यावर उड्डाणपुलाखाली भाजी विक्रीसाठी बसल्याने तब्बल तीन तास वाहतूक कोंडी झाली होती.
हडपसर उड्डाणपुलाखाली मागील चार महिन्यांपासून अनधिकृत भाजी विक्रते विक्री करत आहेत. याबाबत मंडईमधील महापालिकेला भाडे देणाऱ्या अधिकृत भाजी विक्रेत्यांनी हडपसर महापालिकेच्या कार्यालयाला वारंवार कळवूनही रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही, असा आरोप करून भाजी मंडईतील विक्रेते आज सकाळी रस्त्यावरच भाजीविक्री करण्यासाठी बसले होते. यामुळे तब्बल तीन तास वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे हडपसर पोलिस ताफ्यासह उड्डाणपुलाखाली आले. भाजी विक्रेत्यांना उठवण्याचा प्रयत्न करून महापालिका हडपसर कार्यालयासोबत चर्चा घडवून दिली. या वेळी हडपसर कार्यालयाचे सहायक आयक्त सुनील गायकवाड यांनी सांगितले, ‘आम्ही उड्डाणपुलाखालील अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. त्यानंतरही या ठिकाणी भाजी विक्रेते बसत आहेत. त्यामुळे उद्या सकाळपासून सलग पाच दिवस अतिक्रमण कारवाई करणार आहोत. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार म्हणाले, ‘महापालिकेच्या हडपसर कार्यालयासोबत भाजी विक्रीबाबतचे प्रश्न चर्चेने सोडवले पाहिजेत. यापुढे अशाप्रकारे कायदा हातात घेतला, तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळेच्या जागेवर अतिक्रमण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
पुणे महापालिकेच्या आचार्य अत्रे शाळेची येरवडा नवी खडकी येथील जागा बळकावून रस्ता आणि फूटपाथ तयार करण्याचा घाट क्षेत्रीय कार्यालयाकडून घातला जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आधीच मैदानासाठी जागा नसताना पालिकेकडून जागा बळकाविण्यात आली आहे. विशेष म्हणजे याबाबत शिक्षण विभाग आणि शाळेचे अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत.
येरवडा भागातील मुलांसाठी नवी खडकीमध्ये १९५१ साली आचार्य अत्रे शाळेची स्थापना केली गेली. साठ वर्षांपूर्वीही इमारत पूर्णपणे दगड वापरून बांधलेली होती. या शाळेत बालवाडी ते सातवीपर्यंतची पाचशेहून अधिक मुले-मुली शिक्षण घेतात. मात्र, मैदान नसल्यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळता येत नाहीत. जुनी इमारत पाडून त्या जागेवर खेळण्यासाठी छोटे मैदान उपलब्ध करता येईल, यादृष्टीने पालिकेकडून शाळेच्या आवारातील मागील बाजूस असणाऱ्या मोकळ्या जागेवर नवीन इमारत उभारण्यात आली. मात्र, जुन्या शाळेची इमारत ज्या जागेवर उभारली होती. ती संपूर्ण जागा शाळेला न देता त्यातील निम्मी जागा बळकाविण्यात आली आहे. जुन्या इमारतीच्या निम्म्या जागेत शाळेसाठी सीमाभिंत बांधण्यात आली असून उर्वरित निम्मी जागा सार्वजनिक वापरात घेतल्याचे दिसत आहे. शाळेच्या बळकाविलेल्या जागेवर फूटपाथ आणि सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्याचा घाट घातला जात आहे. स्थानिक नगरसेवक किशोर विटकर यांच्या पुढाकाराने सुमारे वीस लाख रुपये खर्चून शाळेसमोर रस्त्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. आचार्य अत्रे शाळेला लागून पालिकेने काळभैरवनाथ समाज मंदिर उभारले आहे. शाळेची जुनी इमारत जमीनदोस्त केल्यानंतर जुन्या शाळेच्या एका बाजूच्या भिंतीचे पुरावे समाज मंदिराला लागून दिसत आहेत. तरीही येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडून जागेची पाहणी न करता शाळेच्या जागेत काम करण्यास परवानगी दिली गेली.
याबाबत येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अजय परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता, ‘स्थानिक नगरसेवक किशोर विटकर यांच्या सूचनेप्रमाणे आचार्य अत्रे शाळेसमोर काँक्रीट रस्ता आणि फूटपाथ तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक रस्ता सोडून शाळेच्या जागेवर फूटपाथ होणार असल्यास प्रत्यक्ष पाहणी करून कामाबाबत निर्णय घेतला जाईल.

‘जुनी इमारत पाडून शाळेसाठी नवीन इमारत उभारली असली, तरी शाळेची जागा ही शाळेलाच मिळाली पाहिजे. शाळेच्या जागेवर कुठलेही अतिक्रमण करून कामे करता येणार नाहीत. याबाबत पुणे महापालिकेच्या भवन विभागाचा अभिप्राय पहिला जाईल. तसेच शिक्षण विभागाच्या सुपरवायझरला तत्काळ शाळेला भेट देऊन जागेची पाहणी करण्यास सांगितले आहे.’
- शुभांगी चव्हाण, शिक्षणाधिकारी, पुणे महानगरपालिका

शाळेला अजूनही मैदान नाहीच
शाळेला मैदान नसल्याचे सांगून ऐतिहासिक जुनी इमारत पाडून शाळेसाठी नवीन इमारतीची उभारणी केली. पण अद्यापही शाळेतील शेकडो मुलांना खेळण्यासाठी मैदान तयार झालेले नाही. याउलट शाळेची जागा बळकावून त्या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगसाठी लाखो रुपये खर्चून काँक्रीटचा रस्ता तयार केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे मेट्रोच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सायंकाळी पुण्यात दाखल होत आहेत. लोहगाव विमानतळ ते कृषी महाविद्यालयाचे मैदान असा त्यांचा प्रवास मोटालीने होणार असल्याने परिसरात सायंकाळच्या वेळी वाहनचालकांनी येण्याचे टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
मोदी सायंकाळी सहा ते रात्री आठ दरम्यान शहरात असणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आल्याने विमानतळ, येरवडा, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ, भोसलेनगर परिसरातील रस्त्यांवर येण्याचे टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. मोदींचा ताफा शहरात येणार असल्याने दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत पोल्ट्री फार्म चौक ते रेंजहिल कॉर्नर चौक दरम्यानचा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
कृषी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून केवळ ‘व्हीव्हीआयपी’ वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव किमान दोन तास आधी कार्यक्रमस्थळी पोहचावे, असे आवाहन वाहतूक उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे. कार्यक्रमस्थळी येताना कोणीही बॅग, पिशवी, पाण्याची बाटली आदी साहित्य आणू नये, असेही पोलिसांनी सांगितले.

पार्किंगची व्यवस्था
-नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता) आणि सिमला ऑफिस चौकाकडून येणाऱ्या वाहन चालकांनी सिमला ऑयिस ते रेंजहिल कॉर्नर येथील उजव्या बाजूने सिंचननगर येथे आपली वाहने पार्क करावीत.
- पाषाण, बाणेर आणि औंध रोडने येणाऱ्या वाहनांनी रेंजहिल कॉर्नर येथून डाव्या बाजूने सिंचननगर येथे आपली वाहने पार्क करावीत.
- ‘आरटीओ’, संगमवाडी आणि संचेती चौकाकडून तसेच होळकर पुलावरून येणाऱ्या वाहनांनी पोल्ट्री फॉर्म चौकातून सरळ सिंचननगर येथे वाहने पार्क करावीत.
- जुना मुंबई रोडने निगडी आणि भोसरीकडून येणाऱ्या वाहनांनी शासकीय दूधडेअरीजवळून यू-टर्न घेऊन पोल्ट्री फॉर्म चौकातून डाव्या बाजूने सिंचननगर येथे वाहने पार्क करावीत. दरम्यान, नागरिकांनी आणि वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

व्हीव्हीआयपी, निमंत्रितांसाठी पार्किंग व्यवस्था
- कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टेजच्या पाठीमागे, अळंबी प्रोडक्‍शन प्रवेश कृषी महाविद्यालय मुख्यप्रवेशद्वार
- व्हीआयपी पार्किंग - कार्यक्रमाच्या ठिकाणी गेट नं - १, २, ३, ४ तसेच गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या शेजारी मोकळ्या जागेत.

दुचाकी पार्किंग
- सिंचननगर फाट्याच्या जवळ भोसलेनगर येथील मोकळ्या जागेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिपूजन नव्हे; इलेक्शन इव्हेंट

$
0
0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची नांदी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शनिवारी (२४ डिसेंबर) पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेऊन, महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडण्याची जय्यत तयारी भारतीय जनता पक्षाने केली आहे. दोन भव्य स्टेज, आकर्षक प्रकाशयोजना, एलईडी स्क्रीन अशा अद्ययावत व्यवस्थेद्वारे भूमिपूजनाचा कार्यक्रम ‘इलेक्शन इव्हेंट’ म्हणून ‘कॅश’ केला जाण्याची चिन्हे आहेत.
केंद्र सरकारने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मेट्रोच्या मंजुरीवर अंतिम मोहोर उमटवली. पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच पालिका निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असल्याने भाजपने तत्पूर्वीच मोदींच्या हस्ते मेट्रोचे भूमिपूजन निश्चित केले आहे. त्यासाठी, कृषी महाविद्यालयाच्या मागील मैदानावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी केली जात आहे. दोन भव्य व्यासपीठे उभारण्यात येत असून, त्यामागील बाजूस मोठा एलईडी स्क्रीन लावण्यात आला आहे. त्याशिवाय, या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांना कार्यक्रम पाहता यावा, यासाठी मैदानावरही ठिकठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमातून आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.
पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरून वादाला तोंड फुटले असले, तरी सर्व पक्षांना सोबत घेण्यात येणार असल्याने दोन स्वतंत्र स्टेजची व्यवस्था केली जात आहे. मुख्य स्टेजवर पंतप्रधान मोदी यांच्यासह १४ जणांचा समावेश असेल. यामध्ये, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह पुणे महापालिकेचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला धराडे यांच्यासह शहरातील सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही मुख्य व्यासपीठावरच असतील. शहरातील सर्वपक्षीय आमदारांसह पालिकेतील गटनेत्यांसाठी दुसऱ्या व्यासपीठाची रचना करण्यात आली आहे. ‘मेट्रो पुणे शहराची असल्याने सर्वपक्षीय खासदार, आमदार, गटनेते यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शहराच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पामध्ये राजकारण करण्याऐवजी सर्वांनी शहराच्या विकासासाठी सहभागी व्हावे’, असे आवाहन पालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी केले.

लाखभर नागरिक उपस्थिती लावणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एलईडीच्या माध्यमातून प्रस्तावित पुणे मेट्रोचे संकल्पचित्र भूमिपूजनाच्या कार्यक्रमातच पुणेकरांना दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे एक लाख नागरिक उपस्थित राहतील, असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तर टक्के बार बंद होणार ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सुप्रीम कोर्टाने देशातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर दारूच्या दुकानांना बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील तब्बल ५० ते ७० टक्के बिअरबार, परमिटरूम, वाइन शॉप, बिअरशॉपी बंद होणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यभरातील सर्व व्यावसायिकांची प्राथमिक माहिती घेतली असून, त्यामधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात सर्वात जास्त मद्यविक्री ही महामार्गांवर होत असल्याचे या आडेवारीतून उघड होत आहे.

या व्यावसायिकांना महामार्गापासून ५०० मीटर आतमध्ये व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल. मात्र, या दुकानांना थेट रस्ता असणार नाही, ते हायवेवरून दिसणार नाहीत, अशी अट सुप्रीम कोर्टाने घातली असल्याने अनेक व्यवसायिकांना दारूविक्रीचा व्यवसाय बंद करण्याची वेळ येणार आहे. पुणे शहरातून जाणाऱ्या महामार्गांबाबत नेमका काय निर्णय होणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, नाशिक रोड, सातारा रोड, सोलापूर रोड, नगर रोड, कात्रज-देहूरोड बायपास या महामार्गांवरील दारूविक्री दुकाने सध्यातरी बंद होणार असल्याची परिस्थिती आहे.

देशात दर वर्षी महामार्गांवर होणाऱ्या अपघातांत दीड लाख जण मृत्युमुखी पडतात. कोर्टाने अपघातातील बळी, रस्त्यांची लांबी आणि त्यावर असलेल्या मद्यविक्री व्यवसायांची संख्या ही सर्व माहिती घेतल्यानंतर महामार्गावर मद्य सहज उपलब्ध होत असल्याचे निरीक्षण नोंदवले. मद्यसेवन करून वाहन चालवल्याने होणाऱ्या अपघातांची संख्याही लक्षणीय आहे. हा बाबी लक्षात घेऊन कोर्टाने कुठल्याही परिस्थितीत महामार्गांवर मद्यविक्री होणार नाही, असे आदेश दिले. राष्ट्रीय, राज्य महामार्ग जर महापालिका, शहर, गाव असे कोठूनही जात असले तरी या ठिकाणी मद्यविक्री होणार नाही, असे कोर्टाने बजावले आहे.

हायवेच्या बाहेरील बाजूपासून ५०० मीटर अंतरामध्ये मद्यविक्री करता येणार नाही. तसेच मद्यविक्री करणारे व्यवसाय वाहन चालकाला लगेच लक्षात येतील, वाहन चालकाला त्या ठिकाणी जाण्यासाठी लगेच रस्ता मिळेल, अशी कुठलीही व्यवस्था असणार नाही, असे या आदेशात म्हटले आहे. केवळ दारू दुकाने बंद न करता अशा दुकानांची माहिती देणारे महामार्गांवरील फलकही हटविण्याचे निर्देश सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठाने दिले आहेत. न्या. धनंजय चंद्रचूड आणि एल. नागेश्वर राव यांचाही त्यात समावेश होता.

पुण्यात ७० टक्के दुकाने बंद होणार

कोर्टाच्या आदेशानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्य भरातील महामार्गांवर काय परिस्थिती आहे, याची माहिती मागवली आहे. पुणे विभागाने ही माहिती संकलित केली असून, त्याचा प्राथमिक अहवाल राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या आयुक्त कार्यालयाला पाठवला आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील ७० टक्के दारू विक्रीची दुकाने बंद होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामचुकार अधिकारी कारवाईच्या कचाट्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी वारंवार अर्ज करूनही त्याची दखल न घेणाऱ्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यावर आता कारवाईची टांगती तलवार उभी राहणार आहे.
‘नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दिलेल्या सर्व अर्जांची दखल घेण्यात आली असून, त्यामध्ये दिरंगाई झाल्याचे लक्षात आल्यास माझ्यावर प्रशासकीय कारवाई करण्यास हरकत नाही,’, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र नोंदणी अधिकाऱ्यांकडून लिहून घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. आयोगाने घेतलेल्या भूमिकेमुळे कामचुकार अधिकाऱ्यांना चाप बसणार आहे.
निवडणुकीत अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा, यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक उपक्रम राबविले जातात. मतदारयादीत नव्याने नाव समाविष्ट करण्याबरोबरच यादीतील दुरुस्तीसाठी जाहिराती देऊन आयोगाकडून जनजागृती केली जाते. यासाठी निवडणूक आयोग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूकही करण्यात येते. मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याबरोबरच यादीतील दुरुस्तीसाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्याची आणि सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली जाते. मात्र नागरिकांकडून आलेल्या अर्जाची अधिकारी दखल घेत नसल्याने अनेकदा अर्ज करूनही संबंधित नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होत नाही. परिणामी मतदानाच्या दिवशी वादाचे प्रकार घडतात. यापूर्वी आयोगाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अनेकदा अर्ज करूनही याची दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या.
मतदान करणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. त्याविषयी अर्ज करूनही दखल घेतली जात नाही. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे नागरिकांना आपल्या हक्कापासून वंचित रहावे लागत असल्याचे प्रकार समोर आल्याने आयोगाने संबंधित अधिकाऱ्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आयोगाच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या मतदान नोंदणी तसेच दुरुस्तीच्या मोहिमेच्या काळात आलेल्या अर्जाची योग्य ती दखल घेण्यात आली असून; ५ जानेवारीला प्रसिद्ध होणारी मतदार यादी अद्यावत करण्यात आली आहे. यंदा प्रथमच आयोगाने अधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’त लाथाळ्या

$
0
0

महापौरांच्या कोलांटउड्यामुळे पक्षात नाराजीचे सत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या महत्त्वाकांक्षी ‘पुणे मेट्रो’च्या भूमिपूजनावरून राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या तीन दिवसांत तीन वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने पक्षात नाराजी पसरली आहे. महापौर प्रशांत जगताप यांनी कोणालाही विश्वासात न घेता, भूमिपूजनाचा निर्णय परस्पर जाहीर केला अन् तो नंतर मागे घ्यावा लागल्याने राष्ट्रवादीची नाचक्की झाल्याची भावना पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे भूमिपूजन २४ डिसेंबरला घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रित केले जावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. त्याबाबत, भारतीय जनता पक्षाने कोणताही थेट निर्णय न घेता पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या राजशिष्टाचारानुसार व्यवस्था केली जाईल, असे स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी पुण्यात विविध कार्यक्रमांसाठी आले होते. त्याचवेळी, राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार पवार यांना निमंत्रित केले जाणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते. त्यामुळे, राष्ट्रवादी पंतप्रधानांच्या कार्यक्रमात सहभागी होणार, अशी चिन्हे दिसून येत होती.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर अचानक राष्ट्रवादीने भूमिका बदलली. पवारांना योग्य सन्मान मिळत नसल्याचा दावा करून महापौरांनी थेट स्वतंत्र भूमिपूजन घेण्याचा घाट घातला. इतर सर्व पक्षांनाही त्यांनी सोबत घेतले. दरम्यान, मंगळवारी रात्रीच पवार मुख्य व्यासपीठावर असतील आणि त्यांना भाषण करण्याची संधी दिली जाईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले होते. पवारांचा सहभाग निश्चित झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बुधवारी सकाळी महापौरांना ‘यू टर्न’ घेण्यावाचून पर्यायच राहिला नाही. या सर्व गदारोळात दर दिवशी राष्ट्रवादीची भूमिका बदलत राहिल्याने अनेक पदाधिकाऱ्यांना काय चालले आहे, याचा अंदाज येत नव्हता. त्याशिवाय, महापालिकेतील इतर सर्व पक्षांनी विश्वास ठेवल्यानंतर ऐनवेळी पलटी घेत, भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द केल्याने त्यांनीही राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली. तसेच, राष्ट्रवादी आणि भाजपचे अंतर्गत साटेलोटे असल्याचेही आरोप केले.

महापौरांमुळे राष्ट्रवादीची नाचक्की
महापौरांच्या धरसोड वृत्तीमुळे मेट्रोवरून राष्ट्रवादी राजकारण करत असल्याचा समज नागरिकांमध्ये पसरल्याची भीती काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पक्षाच्या काही नगरसेवकांनीही महापौरांच्या उलट-सुलट भूमिकेमुळेच राष्ट्रवादीला तोंडघशी पडावे लागल्याचे निरीक्षण नोंदवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा-रूप मतदार यादी पालिकेच्या पोर्टलवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रा-रूप मतदार यादी गुरुवारी पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली. त्यात नाव-पत्त्यातील किरकोळ स्वरूपाच्या दुरुस्त्या सुचविण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
सप्टेंबर २०१६ पर्यंतच्या मतदारांचा या प्रा-रूप मतदार यादीत समावेश असून, त्यानंतर घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत अर्ज करणाऱ्यांची पुरवणी यादी पुढील महिन्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणूक घेण्यात येणाऱ्या सर्व महापालिकांनी प्रभागरचनेनुसार प्रा-रूप मतदार यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात दिल्या होत्या. १५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, आगामी निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होणार असल्याने प्रभागांचा आकार खूप मोठा झाला होता. त्यामुळे, पालिकेच्या स्तरावर विधानसभानिहाय उपलब्ध असलेल्या मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्यात वेळ गेला. अखेर, गुरुवारी शहरातील ४१ प्रभागांनुसारची मतदार यादी नागरिकांच्या माहितीसाठी महापालिकेच्या www.punecorporation.org या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विधानसभा यादीनुसार एखाद्या मतदाराचे नाव चुकून वेगळ्याच ठिकाणी प्रसिद्ध झाले असेल किंवा नावात किरकोळ दुरुस्ती करायची असेल, तर संबंधित मतदारांनी क्षेत्रीय कार्यालयात लेखी अर्ज सादर करावा, असे आवाहन महापालिकेचे निवडणूक विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले आहे. पाच जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर हरकती-सूचना घेण्यासाठी आणि त्यानुसार यादीत दुरुस्ती करण्यासाठी उपलब्ध असलेला वेळ मोजका असल्याने आताच यादी पाहून त्यात दुरुस्ती सुचविता येऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले.

अंतिम यादी २१ जानेवारीला
निवडणूक आयोगाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या मोहिमेत दाखल झालेल्या अर्जांसह विधानसभा मतदारसंघाची एकत्रित यादी पाच जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीचे पुन्हा प्रभागनिहाय विभाजन करून त्या १२ जानेवारीला प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर, नागरिकांना १७ जानेवारीपर्यंत हरकती नोंदविता येणार असून, २१ जानेवारीला मतदार याद्यांना अंतिम प्रसिद्धी दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपनगरीय रेल्वेप्रस्ताव पन्नास वर्षांनी साकार

$
0
0

गो. द. खिरे यांनी केली होती मांडणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहर आणि परिसराचा विस्तार पाहता मुंबईच्या धर्तीवर लोकल रेल्वेसारखी सार्वजनिक वाहतूक सेवा शहरात असावी, असा विचार कोथरूडमधील ज्येष्ठ नागरिक गो. द. खिरे यांनी पन्नास वर्षांपूर्वी मांडला होता. आता मेट्रो प्रकल्पाच्या निमित्ताने याला मूर्त स्वरूप आल्याने हा पुणे शहरासाठी सुवर्णक्षणच आहे, अशा शब्दांत त्यांनी स्वप्नपूर्तीचे समाधान व्यक्त केले आहे.
महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाचे उद्या, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. त्यानिमित्ताने खिरे यांनी यासाठी केलेल्या पाठपुराव्याच्या आठवणींना उजाळा दिला. पुण्याभोवती आणि शहरातही मुंबईच्या धर्तीवर लोकल सेवा असावी, हा प्रस्ताव खिरे यांनी १९६७ मध्ये मांडला होता. त्यावर ‘स्वराज्य’ साप्ताहिकात त्यांनी लेखही लिहिला होता. या प्रस्तावाची तत्कालीन महानगर प्रादेशिक महामंडळाने दखलही घेतली होती. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही आणि हा प्रस्ताव कागदावरच राहिला. हा प्रस्ताव लागू झाला असता, तर पुण्याचा विकास अधिक वेगाने आणि चौफेर झाला असता, असे खिरे यांनी म्हटले आहे.
पुणे महानगर प्रादेशिक विकास महामंडळाने १९७०-७१ दरम्यान या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार केला. तसे पत्र आठ फेब्रुवारी १९७१ रोजी समितीचे सचिव जी. आर. दिवाण यांनी खिरे यांना पाठवले होते. रेल्वेच्या विस्ताराबाबतचा विचार प्रादेशिक आराखड्यात केला गेला असून, तो सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, शहरात सध्या नवे रेल्वेमार्ग निर्माण करणे शक्य वाटत नसल्याचेही पत्रात म्हटले होते.
‘माझ्या माहितीनुसार डिसेंबर १९६७ पूर्वी या प्रकारचा विचार कोणीही मांडलेला नाही. तो मी मांडला, याचा मला अभिमान आहे. माझ्या प्रस्तावाला जनता, व्यासंगी विद्वान, धोरणी राजकारणी यांच्याकडून योग्य आणि पुरेपूर पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे घडले नाही,’ अशी खंत खिरे यांनी व्यक्त केली. त्याचवेळी पंतप्रधानांच्या हस्ते होणारे मेट्रोचे भूमिपूजन हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असेल. आज वयाच्या ८१ व्या वर्षी मी ४९ वर्षांपूर्वी मांडलेल्या प्रस्तावावर कार्यवाही होत असल्याचा मला आनंद आहे, असेही खिरे यांनी नमूद केले.

खिरे यांचा तत्कालीन प्रस्ताव

देहूरोड-औंध कॅम्प-औंध गाव- गणेशखिंड-लॉ कॉलेज-पौड फाटा-मुठा नदी - विठ्ठलवाडी-पर्वती-लक्ष्मीनगर-अरण्येश्वर-मुकुंदनगर--गोळीबार मैदान-रेसकोर्स-घोरपडीमार्गे हडपसर स्टेशनला रेल्वेमार्गाने जोडल्यास पुढे उरुळी कांचनपर्यंतचा भाग आपोआपच जोडला जाईल. तसेच, चिंचवड-पिंपरी-भोसरी-दिघी-लोहगाव-रामवाडी भागातून हडपसरला जोडणारा व संगम पुलापासून मुठा नदीच्या उजव्या तीरावरून थेट कोथरूडपर्यंत एक रेल्वेमार्ग आखून तो इतर मार्गांशी जोडल्यास फायद्याचे ठरेल, असे खरे यांनी तत्कालीन प्रस्तावात म्हटले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेलिब्रेशनला शून्य फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नोटांच्या तुटवड्यामुळे भल्याभल्यांचे रोखीचे व्यवहार ठप्प झाले असले, तरी नातळ आणि नवीन वर्षाच्या पर्यटनाला याचा फटका बसलेला नाही. ख्रिसमसच्या सेलिब्रेशसाठी पर्यटकांनी कोकण आणि थंड हवेच्या ठिकाणी सहलींचे नियोजन केले असून महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ आणि खासगी हॉटेलच्या बुकिंगला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
भटकंतीची आवड असलेले पुणेकर सुट्ट्यांचे निमित्तच शोधत असतात. ख्रिसमसच्या सुट्ट्या देखील याला अपवाद ठरत नाही. या वर्षी नोटबंदीचे पडसाद या सुट्ट्यांमधील पर्यटनावर होतील, असा बाजारपेठेत सूर होता. मात्र काळाची गरज ओळखून हॉटेल, रिसॉर्टचालक, होम स्टेच्या मालकांनी ऑनलाइन पेमेंटचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे रोख रकमेचा तुटवडा असतानाही ऑनलाइन पेमेंटमुळे बहुतांश हॉटेलचे दोन जानेवारीपर्यंतचे बुकिंग फुल्ल झाले आहेत.
ख्रिसमस या वर्षी रविवारी आला असला, तरी अनेक कंपन्यांना शनिवार ते मंगळवार अशा सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. बहुतांश शाळांना आठवडाभर सुट्ट्या आहेत. त्यामुळे सध्याच्या आल्हाददायक वातावरणाची मजा अनुभवण्यासाठी पुणेकरांनी पुढील चार दिवस आउटिंगचे जोरदार नियोजन केले आहे. तर काहींनी नवीन वर्षांचे स्वागत निसर्गाच्या सानिधान्य व्हावे, यासाठी सहलीच्या तारखा निश्चित केल्या आहेत.
‘महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर, पाचगणी, पन्हाळा, कोयना, लोणावळा, खंडाळा या एव्हरग्रीन ठिकाणांबरोबरच कोकणातील बहुतांश समुद्र किनाऱ्यांवरील रिसॉर्टचे मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले आहे. ख्रिसमसचे आमच्याकडील बुकिंग हे नोटाबंदीपूर्वीच सुरू झाले होते आणि नंतरही नोंदणीवर काही परिणाम झाला नाही. अनेकांनी ऑनलाइन बुकिंगाला प्राधान्य दिले आहे,’ असे महामंडळाच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक वैशाली चव्हाण यांनी सांगितले.
‘नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात सहलींवर परिणाम झाला होता. डिसेंबर महिन्यांत चांगले बुकिंग झाले. ख्रिसमस ते नवीन वर्षाची सुरुवात या कालावधीसाठी पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या भागांतील सर्वच हॉटेल चालकांनी ऑनलाइन ट्रान्स्फर, चेक स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. अनेकांकडे पेटीएमची सुविधा उपलब्ध आहेत,’ असे ‘टीजीसीएल’ टूर्सचे अमित बोराडे यांनी सांगितले.

हॉटेल, रिसॉर्ट फुल्ल
पुणे परिसरातील लहानमोठ्या पर्यटनस्थळांबरोबरच इतर जिल्ह्यातील हिल स्टेशन आणि निसर्गरम्य स्थळांजवळील हॉटेल, रिसॉर्ट फुल्ल झाली आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे बहुतांश रिसॉर्ट येत्या तीन जानेवारीपर्यंत बुक आहेत. महाराष्ट्राबरोबरच, गोवा, कर्नाटक, गुजरात, केरळ या भागात पर्यटनालाही चांगले बुकिंग मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जखमी नागरिकाचा उपचाराविना मृत्यू

$
0
0

धडक देणाऱ्या कारचालकाचा रस्त्यात टाकून पोबारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गजबजलेल्या चौकात भरदुपारी कारच्या धडकेत ६० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी होतात... त्यांना कारचालक उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असल्याचे भासवतो आणि कारमध्ये बसवतो. त्यानंतर त्यांना हॉस्पिलमध्ये घेऊन न जाताच उंड्री परिसरात सोडतो...उपचारांविना तडफडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू होतो... कोंढवा पोलिसांना ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह सापडतो आणि अखेर त्याची नोंद ‘बेवारस मयत’ म्हणून दप्तरी करतात...
हा प्रकार म्हणजे सध्या टीव्हीवर सुरू असणाऱ्या आणि गाजणाऱ्या कोणत्याही गुन्हेगारीविषयक डेली सोपचा एखादा एपिसोड नसून, शहरातील मध्यवर्ती भाग असणाऱ्या कोथरूडमध्ये घडलेली सत्यघटना आहे. सात डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. राजा मंत्री पार्कजवळील महादेव मंदिर चौकात रामचंद्र कोंडिबा तोंडे (वय ६०, रा. एंरडवणे) या ज्येष्ठाला पांढऱ्या रंगाच्या कारने धडक दिली. त्यानंतर त्यांचा मृतदेह उंड्रीत कोंढवा पोलिसांना सापडला. त्यांच्या खिशात कुठलेही ओळखपत्र न मिळाल्याने कोंढवा पोलिसांनी बेवारस मृत्यू म्हणून त्याची पोलिस दप्तरी नोंदही केली.
तोंडे यांचा मुलगा दुसऱ्या दिवशी अलंकार पोलिस ठाण्यात पोहोचला. आपले वडील हरवले असून, त्याची तक्रार द्यायची असल्याचे त्याने फौजदार अंबरीश देशमुख यांना सांगितले. यापूर्वीही रामचंद्र तोंडे दोनदा घरातून निघून गेल्याने त्यांनी पुन्हा घर सोडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तोंडे आठ तारखेला मध्यरात्री हरवल्याची तक्रार दाखल पोलिसांनी दाखल करून घेतली आणि तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान अचानक अपघात पाहणारा साक्षीदार देशमुख यांना भेटला. पांढऱ्या कारने एका ज्येष्ठ नागरिकाला उडवल्याची माहिती त्याने दिली. ‘त्या कार चालकाने जखमीला उपचार करण्यासाठी कारमध्ये बसवले होते. ती ती कार महादेव मंदिर चौकातून गुळवणी महाराज रोडने गेल्याचे मी पाहिले होते,’ असे साक्षीदाराने पोलिसांना सांगितले.

संशयित वाहनांची तपासणी सुरू
तोंडे यांचा अपघात झाल्याचे समजताच चक्रे वेगाने फिरली. शोधादरम्यान शवागारात बेवारस मृतदेहांमध्ये तोंडे यांचा मृतदेह असल्याचे त्यांच्या मुलाच्या लक्षात आले. त्याने ही माहिती तत्काळ कोंढवा आणि कोथरूड पोलिसांना दिली. देशमुख यांनी गुळवणी महाराज रोडवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पांढऱ्या कारचा शोध सुरू केला. त्यांना काही संशयित कार मिळाल्या असून, त्यांची खातरजमा करण्यात येत आहे. घटनेचा तपास सहायक निरीक्षक चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संत तुकाराम’चे दुर्मिळ छायाचित्र उजेडात

$
0
0

जयललिता, अमिताभ यांचीही छायाचित्रेही ‘एनएफएआय’च्या संग्रहात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठी बोलपटांच्या पहिल्या शृंखलेतील ‘संत तुकाराम’ या चित्रपटाचे दुर्मिळ छायाचित्र नुकतेच उजेडात आले आहे. या शिवाय जॉयमती या पहिल्या आसामी चित्रपटाचे छायाचित्र, जयललिता यांचे शहजादी मुमताज या चित्रपटातील छायाचित्र आणि अमिताभ बच्चन यांच्या अप्रदर्शित जमानत या चित्रपटाचे पोस्टर्स उजेडात आले आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (एनएफएआय) हा ठेवा प्राप्त झाला असून, छायाचित्रे डिजिटाइज करण्याचे काम सध्या सुरू आहे.
चित्रपट संग्रहालयाला या वर्षभरात साडेसात हजार दुर्मिळ छायाचित्रे, चार हजार पोस्टर्स आणि अडीच हजार गाण्यांची पुस्तके मिळाली आहेत. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मगदूम म्हणाले, की ‘आम्ही केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाशी संबंधित असलेला दुर्मिळ ठेवा रसिक संग्रहालयाकडे जतन करण्यासाठी देत आहेत. त्यामुळे संग्रहालयाकडे असलेल्या साहित्यात भर पडत आहे. सध्या संग्रहालयाकडे दीड लाख छायाचित्रे, २७ हजार पोस्टर्स आणि १७ हजार गाण्यांची पुस्तके असा ठेवा उपलब्ध आहे. हा ठेवा डिजिटाइज करण्याचे काम सध्या सुरू असून, लवकरच तो टप्प्याटप्प्याने वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल.’
बाबजीराव राणे दिग्दर्शित संत तुकाराम हा चित्रपट १९३२ मध्ये प्रदर्शित झाला होता. अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट प्रभात कंपनीने याच वर्षात प्रदर्शित केला. त्यानंतर चार वर्षांनी प्रभातचा संत तुकाराम चित्रपट आला. १९३२ मध्ये प्रदर्शित झालेल्या संत तुकाराम चित्रपटाची फारशी माहिती उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे दुर्मिळ छायाचित्र हा अमूल्य ठेवा आहे. तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचे शहजादी मुमताज या १९७७ मधील चित्रपटातील छायाचित्र, १९३५ मधील जॉयमतीचे छायाचित्र आणि जमानत या अप्रदर्शित चित्रपटाचे पोस्टर आता संग्रहालयात दाखल झाले आहे.

घटक यांच्या चित्रपटांचा ठेवा
ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्या तीन अपूर्ण बंगाली चित्रपटांची चित्रफित संग्रहालयाला मिळाली आहे. १९५९ ते १९७१ या कालावधीतील ‘काटो अजनारे’, ‘बंगार बंगा दर्शन’ आणि ‘रंगेर घुलम’ या चित्रपटांचा त्यात समावेश आहे. ‘ तिताश एक नदी का नामक’ या घटक यांच्या १९७३ मधील चित्रपटाची माहिती पुस्तिका संग्रहालयाला मिळाली आहे. पश्चिम बंगाल सरकारचा माहिती व सांस्कृतिक विभाग तसेच ऋत्विक घटक ट्रस्टकडून हा ठेवा मिळाला आहे, असे प्रकाश मगदूम यांनी सांगितले. दुर्मिळ चित्रठेवा संग्रहालयाला मिळण्यासाठी कर्नाटक, केरळ या राज्यांशी बोलणी सुरू असल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुधारित वेळापत्रक जाहीर

$
0
0

दहावीची ७मार्चला, तर बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक मंडळाने गुरुवारी जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान तर, दहावीची परीक्षा ७ मार्च ते १ एप्रिल दरम्यान होणार आहे. बारावीची परीक्षा पूर्वी जाहीर झालेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार होणार असून, दहावीच्या परीक्षेत इतिहास आणि भूगोलसह सर्वच विषयांच्या पेपर दरम्यान एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या https://mahahsscboard.maharashtra.gov.in वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संभाव्य वेळापत्रकात इतिहास आणि भूगोल या दोन विषयांच्या पेपरमध्ये सुट्टी नव्हती. मात्र, अंतिम वेळापत्रकात इतिहास आणि भूगोल यांच्यासह सर्वच विषयांना एक दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळणार आहे.
वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेले वेळापत्रक केवळ माहितीसाठी असून, मंडळाकडून परीक्षेपूर्वी शाळा आणि ज्युनियर कॉलेजांकडे पाठविले जाणारे वेळापत्रक अंतिम असेल. तसेच, मंडळाकडून प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वंतत्रपणे शाळा आणि कॉलेजांकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.

दहावीचे वेळापत्रक


तारीख वेळ विषय

७ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - मराठी
९ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - हिंदी
११ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - इंग्रजी
१४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - बीजगणित
१६ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - भूमिती
१८ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - विज्ञान - १
२० मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - विज्ञान - २
२२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - इतिहास
२५ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - भूगोल

बारावीचे वेळापत्रक

तारीख वेळ विषय

२८ फेब्रु सकाळी ११ ते दुपारी २ इंग्रजी
२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - मराठी
४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - भौतिकशास्त्र
६ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - गणित
८ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - रसायनशास्त्र
१० मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - जीवशास्त्र
१४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - इतिहास
१७ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - भूगोल
२० मार्च -११ ते १.३० आयटी (शिक्षणशास्त्र प्रविष्ट परीक्षार्थी वगळून ) आणि इतर ‍व्यावसायिक विषय पेपर -१
२२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १.३० आयटी (ग्रंथलाय व माहितीशास्त्र प्रविष्ट परीक्षार्थी वगळून ) आणि इतर ‍व्यावसायिक विषय पेपर -१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप नेत्याच्या हट्टामुळे मेट्रो अडीच वर्षे लांबली

$
0
0

अजित पवार यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील मेट्रो भाजपमुळेच लांबल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली. शहरातील भाजपच्या एका नेत्याच्या हट्टामुळेच पुणे मेट्रो अडीच वर्षे लांबली, यामुळे प्रकल्पाचा खर्च अडीच हजार कोटींनी वाढल्याचा आरोप पवार यांनी केला.
कर्वेनगर येथील प्रभाग क्रमांक ३१ मध्ये उभारण्यात आलेल्या इंटरनॅशनल सिंथेटिक टेनिस कोर्टचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते शंकर केमसे, नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, बाबा धुमाळ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
‘शहरातील वाहतुकीची गंभीर परिस्थिती लक्षात घेता काही वर्षांपूर्वीच राज्य आणि केंद्र सरकारने मेट्रो प्रकल्पाला मंजुरी द्यायला पाहिजे होती. शहरातील भाजपच्या एका नेत्याने धरलेल्या हट्टामुळे मेट्रोला मंजुरी मिळण्यास अडीच वर्षांचा विलंब झाला’, अशी टीका पवार यांनी शहराचे खासदार अनिल शिरोळे यांचे नाव न घेता केली. संबंधित नेत्याच्या हट्टामुळे प्रकल्पाचा खर्च अडीच हजार कोटींनी वाढला असल्याचेही त्यांनी सांगितले. निगडी ते कात्रज या मार्गावर मेट्रो करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे पाठपुरावा करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीने नेहमी विकासाला साथ दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

चहा विकला असता तर...
‘चूक झाली आणि राजकारणात आलो, चहा विकला असता तर बरे झाले असते’... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर गुजरात तेथील एका चहा विक्रेत्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सापडली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हे वक्तव्य करताच एकच हास्यकल्लोळ झाला. कोणत्याही नागरिकाला २०१७ मध्ये पैशासाठी रांगेत उभे राहायला लागू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारनगरमध्ये बंद घराला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सहकारनगर येथील दशभुजा मंदिराजवळ असणाऱ्या एका बंद घराला गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन बंबाच्या मदतीने काही वेळेत आग विझवली. या आगीत कोणत्याच प्रकारची जीवितहानी झाली नसून घराचे थोडे नुकसान झाले, अशी माहिती अग्निशमन दलाचे कर्मचारी वसंत भिलारे यांनी दिली.
या बंद घराजवळ राहणाऱ्या रहिवाशांना रात्री साडेनऊच्या सुमारास जळण्याचा वास परिसरात येऊ लागला. तेव्हा बंद घराला आग लागल्याचे समजल्यावर अभिषेक उपाध्ये यांनी अग्निशमन दलाला कॉल करून घटनेची माहिती सांगितली. दलाच्या चार ते पाच जवानांनी घटनास्थळी येऊन एका बंबाच्या मदतीने काही वेळेतच आग विझवली. या आगीत घरातील काही वस्तू जळाल्या असल्याची शक्यता आहे. या घराला लागूनच वन विभागाची संरक्षण भिंत आहे आणि जागा आहे. आग वेळीच विझवली गेली, असे भिलारे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केंद्र व राज्यातील भाजपचं सरकार दुटप्पीः चव्हाण

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

‘केंद्र आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार दुटप्पी असून, निवडणुकीच्या राजकारणासाठी विकासाचे ढोंग रचण्यात त्याचा हातखंडा आहे. त्यामुळे, नागपूर मेट्रोला सहा महिन्यांत मान्यता देणाऱ्या सरकारने पुण्याच्या मेट्रोला पालिका निवडणुकीपर्यंत जाणीवपूर्वक रखडवले’, असा घणाघाती आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला. पुणे आणि नागपूर मेट्रोला यूपीए सरकारने एकाचवेळी मान्यता दिली असताना, पुण्याच्या मेट्रोला अडीच वर्षे उशीर होण्याचा जाब शहरातील भाजपच्या मंत्र्यांनी, खासदार-आमदारांनी कधी पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांना विचारला आहे का?, असा टोलाही त्यांना लगावला.

पुणे मेट्रोचे भूमीपूजन शनिवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वीच, पुणे मेट्रोचा प्रस्ताव आणि त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा-प्रयत्न काँग्रेसने केले असल्याचा दावा करून शुक्रवारीच चव्हाण यांच्या हस्ते स्वारगेट येथे मेट्रोचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी, चव्हाण यांनी शहराच्या मेट्रो प्रकल्पासाठी भाजप सरकारने कसा विलंब केला, याचा पाढाच वाचला.

‘पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातला आतापर्यंत खूप विकास झाला आहे. आता विदर्भाचा विकास करायचा असल्याने सर्व प्रकल्प त्याच भागांत झाले पाहिजेत, अशा प्रादेशिक आकसापोटी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक परवानग्या बाकी असतानाही नागपूर मेट्रोचा प्रकल्प पुढे रेटला. पुण्यापेक्षा कमी लोकसंख्या-वाहनसंख्या असलेल्या नागपूरमध्ये मेट्रो नेता, मग पुण्याला का वगळता?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

‘पंतप्रधान मोदी विकासाची संकल्पना मांडत असले, तरी भाजपला निवडणुकांच्या राजकारणातच अधिक रस असल्याचे पुणे मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून स्पष्ट होते. अडीच वर्षे सरकारकडे प्रस्ताव असताना, पालिका निवडणुकांपूर्वीच त्याचे भूमिपूजन करण्याचे कारण मतदारांना निश्चित उमगेल’, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.

यापूर्वीच, मेट्रोला मान्यता दिली असती, तर शहरातील नागरिक ते विसरले असते. म्हणून, निवडणुकांपूर्वी भूमिपूजन करून ‘राजकीय स्टंट’ करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांचेही या वेळी भाषण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅडमिशनच्या आमिषाने साडेदहा लाखांची फसवणूक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
गुजरात येथील एका व्यावसायिकाच्या मुलास एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने साडेदहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
नरेंद्र बच्चुभाई विरडिया (वय ५४, रा. पंचवटी सोसायटी, धनकवडी) आणि दीपककुमार चोबे (वय ४७, रा. मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी गुजरातचे व्यापारी विनोद पटोलिया (४६, रा. राजकोट) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात येथे पटोलिया यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या मुलाला एमबीबीएसचे शिक्षण घ्यायचे होते. त्याबाबत माहिती घेत असताना त्यांचे नातेवाइक विरडिया यांनी पुण्यात नामांकित कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळू शकतो, असे सांगितले. त्यानुसार विरडिया यांच्यामार्फत प्रवेश मिळवून देण्यासाठी काही एजंट लोकांशी संपर्क साधला. पटोलियांनी मुलाच्या एमबीबीएसच्या प्रवेशासाठी विरडिया व इतर आरोपींकडे साडे दहा लाख रुपये दिले. मात्र, त्यांच्या मुलाला एमबीबीएसला प्रवेश मिळाला नाही.
तक्रारदार यांनी आरोपींकडे चौकशी केली. त्यांनी दिलेल्या पैशाची त्यांच्याकडे मागणी केली. पण, आरोपींनी त्यांना पैसे देण्यास झुलवत ठेवले. पैसे देत नसल्यामुळे पटोलिया यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून विरडिया व चोबे यांना अटक केली आहे. इतर आरोपींचा तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक व्ही. बी. जगताप हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागतिक योग महोत्सव १३ जानेवारीपासून

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
इन्स्टिट्यूट ऑफ योग, लक्ष्मी व्यंकटेश चॅरिटेबल अँड एज्युकेशन ट्रस्ट, मल्टिव्हर्सिटी यांच्या वतीने येत्या १३ ते १५ जानेवारी या काळात तिसरा जागतिक योग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पौडजवळ कोळवणमध्ये चिन्मय विभूतीमध्ये हा निवासी महोत्सव होणार आहे.
या तिन्ही संस्थांसह योग संस्था (सांताक्रूझ), कैवल्यधाम (लोणावळा), एस. व्यास योग विद्यापीठ (बेंगळुरू), योग विद्या निकेतन (वाशी), जनार्दनस्वामी योग अभ्यासी मंडळ (नागपूर), आरोग्य भारती (नागपूर), योग संजीवनी (मुंबई), भारत योग (सहारनपूर), महर्षी विनोद प्रतिष्ठान (पुणे), महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान (पुणे) या संस्थाही योग महोत्सवाच्या संयोजनात सहभागी आहेत.
स्वामी गोविंददेव गिरी, डॉ. विजय भटकर, डॉ. शरद हर्डीकर, डॉ. संप्रसाद विनोद, डॉ. रामचंद्र देखणे, पं. वसंतराव गाडगीळ, प्रो. विदुला शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव पार पडणार आहे. यामध्ये जागतिक योगदिनाचे प्रवर्तक आणि पंतप्रधानांचे योगगुरू डॉ. एच. आर. नागेंद्र, स्वामी भारत भूषण, साध्वी आभा सरस्वती, स्वामी रंगराज अय्यंगार, डॉ मुकुंद भोळे आणि ओ. पी. तिवारी, हंसाजी जयदेव, के. के. दीपक, डॉ. काशिनाथ मेत, मकरंद टिल्लू, हिमांशू नंदा, डॉ मिलिंद मोडक, डॉ भास्कर खांडेकर, संस्कृत तज्ज्ञ डॉ. कला आचर्या, त्याचबरोबर योगाचार्य साबीर शेख, श्रीकांत क्षीरसागर अशा नामवंत योगगुरूंकडून प्रत्यक्ष योग शिकण्याची संधी मिळणार आहे.
या योग महोत्सवामध्ये प्रामुख्याने प्राणायाम, शवासन, हस्तमुद्रा, मंत्रयोग, सूर्यनमस्कार, ध्यान धारणा, योग आणि मानसिक सौंदर्य, सांधेदुखी, मानसिक ताण, मधुमेह, लठ्ठपणा, योगासने, भक्ती योग, ज्ञान योग, हास्य योग, संगीत योग, हठयोग असे योगासनाचे प्रकार शिकण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवामध्ये भाग घेण्यासाठी वयाची किंवा पुर्वानुभवाची अट नाही. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना विशेष सवलत असून, या महोत्सवासाठी नाममात्र शुल्कात निवास आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. नुकतेच योग महोत्सवाच्या www.puneyogafestival.com या वेबसाइटचे अनावरण झाले.
या महोत्सवामध्ये भाग घेण्यासाठी (२०) ३९६३१४३४ किंवा +९१ ७०२८०२१९६९ वर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मल्टीनॅशनल कंपनीला आग

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
नऱ्हे-आंबेगाव येथील इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणाऱ्या एका मल्टीनॅशनल कंपनीला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. या अगीत कंपनी जळून खाक झाली असून, यामध्ये चार ते पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने या अगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाने सहा फायरगाड्यांच्या मदतीने शुक्रवारी सकाळी बारापर्यंत ही आग आटोक्यात आणली.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे आंबेगाव परिसरातील सर्व्हे क्रमांक ४६ मध्ये व्हिस्मार्ट थरमोटेक प्रायव्हेट लि. नावाची कंपनी आहे. मोकळी जागा भाड्याने घेऊन साडेचार हजार चौरस फुटाचे शेडमध्ये ही कंपनी आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तापमान मोजण्याची विविध उत्पादने, इलेक्ट्रानिक सेन्सर अशी उत्पादने बनविली जातात. कंपनीत वस्तू बनविण्यासाठी कच्चा माल मोठ्या प्रमाणात ठेवलेला होता. या कंपनीची उत्पादने पूर्ण भारतासह इतर देशांमध्ये विक्री केली जातात. शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कंपनीमध्ये आग लागल्याचे येथील एका नागरिकाने पाहिले. त्याने तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. सिंहगड व कात्रज अग्निशमन दलाच्या गाड्यांनी काही वेळातच घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. पूर्ण कंपनीला आगीने वेढले होते. त्यामुळे अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते. या अगीत कंपनीतील वायर, बॉक्स आणि नवीन बनवलेले साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आगीमुळे पूर्ण परिसरात व आकाशात धुराचे लोट पसरले होते. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सहा फायरगाड्यांच्या मदतीने पहाटेच्या सुमारास आगीवर नियत्रंण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. शुक्रवारी दुपारी बारावाजेपर्यंत येथील आगीवर कुलिंगचे काम सुरू होते. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. तर, या घटनेत सुदैवाने कोणीही जीवितहानी झालेली नाही. अगीत तब्बल चार ते पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमरटकर यांनी दिली.

कोथरूडमध्ये कारला आग
कोथरूड परिसरातील डीपी रोडवर आशिष गार्डनसमोर पार्किंग केलेल्या कारला शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमासार आग लागली. आगीमध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​गाडी घ्यायची नाही का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वाहन खरेदी करताना पार्किंगसाठी जागा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यावरच नवीन वाहनाची नोंदणी करून घेण्याचा प्रकार म्हणजे, गरीबांना वाहनखरेदीचा हक्क नाकारण्याचा प्रयत्न आहे. वाहनांची वाढती संख्या रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने जरुर पावले उचलावीत, पण पार्किंगच्या जागेचे बंधन घालणे योग्य नाही. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वीच पुन्हा एकदा विचार करावा, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
पार्किंगसाठी पुरेशी जागा असेल तरच यापुढे नव्या वाहन नोंदणीस (रजिस्ट्रेशन) परवानगी देण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे. सध्याची वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी अशा पद्धतीचा निर्णय गरजेचा असल्याचे मत केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी व्यक्त केले होते. सामान्य नागरिकांमध्ये हा विषय चर्चेचा ठरला असून वाहनांची जरूर रोखा, पण कोणाच्या हक्कावर गदा आणू नका, असा नागरिकांच्या चर्चेचा सूर असल्याचे दिसून आले. या विषयी व्यावसायिक मंगेश काळे म्हणाले, ‘वाहनसंख्या आटोक्यात आणण्यासाठी यापूर्वीच प्रयत्न करण्याची आवश्यकता होती. आता सरकार त्या दृष्टिने विचार करीत आहे, ही चांगली बाब आहे. पण, सरकार करीत असलेला विचार व्यवहार्य नाही. या निर्णयामुळे शहराच्या मध्यवस्तीत राहणारे, पार्किंगसाठी स्वतःची जागा खरेदी करू न शकणारे नागरिक वाहन खरेदीपासून वंचित राहू
शकतील. हा त्यांच्यावर अन्याय असेल.’
आमच्या संपूर्ण कुटुंबात केवळ एक दुचाकी असून अद्याप कोणाकडेही चारचाकी वाहन नाही. येत्या काळात आम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करीत आहोत. मात्र, आमच्याकडे पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. तसेच, नव्याने जागा खरेदी करण्याची आमची आर्थिक परिस्थितीदेखील नाही.त्या उलट आमच्या शेजारी राहणाऱ्यांकडे दोन चारचाकी वाहने आहेत. आमच्या दोन्ही कुटुंबांची तुलना करता, सरकार करीत असलेला विचार योग्य आहे का, याचा पुनर्विचार त्यांनीच करावा, असे संदीप साळवे यांनी सांगितले. वाहनांच्या संख्येला चाप लावण्यासाठी सद्यपरिस्थितीत ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक कार आहेत. त्यांच्यावर आधी बंधने आणावीत, अशी मागणी शीतल खेतकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images