Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बहुजन मोर्चातून आक्रोश व्यक्त

0
0


विविध समाज घटकांची मोठी उपस्थिती; तरुणांची लक्षणीय संख्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बहुजन समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यात विविध समाज घटकांनी बहुजन क्रांती मोर्चा काढून ‘आक्रोश’ केला. ‘एकच पर्व, बहुजन सर्व’ असा नारा देऊन आपल्या हक्कांसाठी लढा देण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
खंडुजीबाबा चौक ते ​​जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे रविवारी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती-जमाती, मुस्लिम समाजातील नागरिक सहभागी झाले होते. मोर्चासाठी खंडुजीबाबा चौकात सकाळी अकरापासून नागरिक सहभागी होण्यस सुरुवात झाली. स्वयंसेवकांकडून मोर्चासाठी आलेल्या नागरिकांना मदत करण्यात येत होती. सुमारे १२१ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झालेल्या या मोर्चासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी बारानंतर खंडुजीबाबा चौकातील वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आली. मोर्चात सहभागी होणाऱ्यांची संख्या दुपारी एकपर्यंत वाढत गेली. त्यामध्ये युवक-युवतींची संख्या लक्षणीय होती.
मोर्चा काढण्यापूर्वी खंडुजीबाबा चौकात जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत हा आक्रोश मोर्चा असल्याने आपले प्रश्न आणि हक्कासाठी लढा देण्याचा निर्धार करण्यात आला. सभेला भारत मुक्ती मोर्चाचे नेते वामन मेश्राम, भटक्या विमुक्त समाजाचे नेते लक्ष्मण माने यांची प्रमुख उपस्थिती होती. सभा झाल्यानंतर दोनच्या सुमारास मोर्चाला आरंभ करण्यात आला. लक्ष्मी रस्त्यामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. मोर्चा खंडुजीबाबा चौकातून अलका चौकामार्गे लक्ष्मी रस्त्यावर दाखल झाला. तेथून कुंटे चौकातून बेलबाग चौकात मोर्चा गेला. सोन्या मारुती चौक, संत कबीर चौक या मार्गाने मोर्चा दुपारी सव्वाचारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.
जिल्हाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्यामुळे ठिय्या मारण्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला. त्यावेळी जमलेल्यांनी निषेधाच्या घोषणा ​दिल्या. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर मोर्चाची सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास सांगता झाली.

घडले शिस्तीचे दर्शन

या मोर्चामध्ये नागरिकांनी शिस्त पाळली. मोर्चाच्या अग्रभागी तरुणी आणि महिला होत्या. त्यामागे तरुण आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सामील झाले होते. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती; तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सहभागी नागरिकांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. संबंधित कचरा कोठेही टाकला जाणार नाही, याची खबरदारी स्वयंसेवकांकडून घेण्यात आली.


मोर्चेकरांच्या प्रमुख मागण्या

* अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत भटक्या विमुक्त (एनटी) समाजाला संरक्षण देण्यात यावे.
* अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी.
* ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये.
* ओबीसी, भटक्या विमुक्त समाजाची जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे.
* अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.

मोर्चा एका दृष्टिक्षेपात
* मुस्लिम समाजातील युवक आणि महिलांचा लक्षणीय सहभाग.
* शिवछत्रपती पुरस्कार विजेते अपंग खेळाडू दिलीप सोनवणे तीनचाकी सायकलीसह सहभागी झाले.
* पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती.
* वारकऱ्यांचाही मोर्चात सहभाग.
* शिस्त आणि स्वच्छतेकडे स्वयंसेवकांचे विशेष लक्ष

जातीयुद्ध पेटविण्याचे राज्यात षडयंत्र : मेश्राम

‘मराठा विरुध्द अन्य मागासवर्गीय असे जातीयुद्ध पेटविण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. हे षडयंत्र भेदण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये बहुजन क्रांती मोर्चे काढण्यात येतील,’’ असे भारत मुक्ती मोर्चाचे नेते वामन मेश्राम यांनी यांनी स्पष्ट केले. बहुजन क्रांती मोर्चाला आरंभ करण्यापूर्वी रविवारी खंडुजीबाबा चौकात जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार आणि भटक्या विमुक्त समाजाचे नेते लक्ष्मण माने, कुमार काळे, प्रा. किसन चव्हाण, महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे दिलीप परदेशी, मौलाना निजामुद्दीन, मौलाना कारी इद्रीस, मुस्लिम छप्परबंद संघटनेचे हुसेनभाई, बंजारा क्रांती दलाचे मूर्ती राठोड, आरपीआयचे अशोक गायकवाड, नाभिक महासंघाचे भगवान बिडवे, बारा बलुतेदार संघटनेचे रामदास सुर्यवंशी, फर्जना सय्यद आणि सुनील खांबे आदी उपस्थित होते.
मेश्राम म्हणाले, ‘‘मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाविषयी गोखले इन्स्टिट्यूटने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारने हायकोर्टात सादर केला आहे. तो मान्य केला गेल्यास मराठा विरुद्ध ओबीसी असे आंदोलन सुरू होईल. ‘संघ परिवाराने ५२ टक्के असलेल्या ओबीसींच्या विरोधात यापूर्वीही मराठा समाजाला भडकवण्याचे काम केले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी एससी, एसटी, ओबीसींच्या विरोधात उभे केले आहे,’’ असा आरोप मेश्राम यांनी केला.
‘आमचे हक्क मिळावेत, यासाठी बहुजनांचे मोर्चे काढण्यात येत आहेत,’ असे माने म्हणाले.
‘अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करू दिले जाणार नाहीत,’ असे गायकवाड म्हणाले. माणूस धोक्यात आला असताना अशा आंदोलनांना साथ देणे सर्वांचेच कर्तव्य आहे, असे मौलाना निजामुद्दीन यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाचकांनी अनुभवली ‘अक्षरसायंकाळ’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं’, ‘मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा’ या कुसुमाग्रज यांच्या कवितांचे साक्षात नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांनी केलेले सादरीकरण...ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मंगेश पाडगावकर यांच्या ‘उदासबोध’ आणि ‘गुंडधर्म’ या कवितांचे तसेच, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या ‘मृदगंध’ ललिता संग्रहातील ‘गंधगाभारा’ या लेखाचे केलेले अभिवाचन... एकाच मंचावर तीन नामवंत कलाकारांना ऐकण्याची पर्वणी वाचकांनी रविवारी साधली.
निमित्त होते, डहाणूकर कॉलनीमध्ये सुरू करण्यात आलेल्या राजहंस अक्षरधारा बुक गॅलरीच्या उद घाटन समारंभाचे...
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते गॅलरीचे उदघाटन झाल्यावर कलाकरांची मैफल रंगली. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, आमदार मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे शहर संघटक श्याम देशपांडे, राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे आणि अक्षऱधाराच्या रसिका राठिवडेकर या वेळी उपस्थित होत्या.
‘पुस्तकांवर स्वतःच्या मुलांसारखे प्रेम केले पाहिजे. पुस्तके वाचण्याचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपविण्याचे काम निष्ठेने करण्याची गरज आहे,’ असे मत विक्रम गोखले यांनी व्यक्त केले. आज आपण वेगाने पुढे जात असताना तंत्रज्ञानाला शरण जात आहोत; मात्र या प्रवासात आपले सोबती असलेल्या पुस्तकांची साथ सोडू नका. नोटाबंदीनंतर आपण एटीएम पाहतो तशी पुस्तकांचीही दालने पाहिली पाहिजेत, अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. बोरसे यांनी प्रास्ताविक केले. रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ससून हॉस्पिटलमध्ये ‘कॅशलेस’ला सुरुवात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरकारच्या कॅशलेस धोरणाला प्रतिसाद देऊन ससून हॉस्पिटलने रुग्णांच्या सोयीसाठी कॅशलेस सुविधेला सुरुवात केली आहे. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काबरोबरच रुग्णांचे उपचार शुल्क स्वाइप मशिनद्वारे भरवण्याचा पर्याय आता उपलब्ध झाला आहे.
हॉस्पिटलच्या शुल्क भरणा विभागामध्ये बँक ऑफ बडोदाच्या मदतीने पाच स्वाइप मशिन बसविण्यात आली आहेत. कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या उपस्थितीत रुग्ण अंकुश चव्हाण यांच्या नातेवाइकांच्या हस्ते या उपक्रमाचे उद् घाटन करण्यात आले.
‘केंद्र सरकारच्या सुचनेनुसार सर्व व्यवहार कॅशलेस करणे, आव्हान असून ससून हॉस्पिटल आणि कॉलेजने ते पेलले आहे. दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना सर्व आरोग्य सुविधा मोफत असतात. मात्र, मध्यमवर्गीय रुग्णांसाठी अल्पदरात अहोरात्र अत्याधुनिक उपचार सेवा उपलब्ध आहेत. नोटांबदीमुळे सर्वसामान्य जनतेला दैनंदिन व्यवहार करणे अडचणीचे झाले आहे. या नव्या पर्यायामुळे नागरिकांना शुल्क भरणे सोयीचे होणार आहे,’असे मत डॉ. चंदनवाले यांनी व्यक्त केले. या वेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. सोमनाथ सलगर, डॉ. इब्राहिम अन्सारी, डॉ. पराग वऱ्हाडे, डॉ. अजित मोरे, बँक ऑफ बडोदाचे क्षेत्रीय व्यवस्थापक के. डी. गुप्ता तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जरोख्यांना मान्यता ​मिळणार?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात समान पाणीपुरवठा (२४ बाय ७) प्रकल्प राबविण्यासाठी कर्जरोखे उभारण्याच्या प्रस्तावावर आज, सोमवारी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. भारतीय जनता पक्ष वगळता इतर सर्वच पक्षांनी त्याबाबत सावध भूमिका घेतली असल्याने, प्रकल्प मान्य होणार का याबाबत औत्सुक्य आहे.
महापालिकेच्या २४ बाय ७ योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान प्राप्त होण्याची अपेक्षा होती. दुर्दैवाने, दोन्ही सरकाराने हात वर केल्याने संपूर्ण योजनेसाठी निधी उभारण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. सुमारे दोन हजार २०० कोटींचे कर्जरोखे उभारण्याचा प्रस्ताव सुरुवातीला स्थायी समितीसमोर मांडण्यात आला होता. परंतु, स्थायी समितीत राष्ट्रवादी-काँग्रेस आणि शिवसेनेने हा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला. त्यानंतर, आयुक्तांनी हा प्रस्ताव थेट सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर केला. कर्जरोख्यांमुळे महापालिकेवरील बोजा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी, या प्रस्तावाला मंजुरी देताना पाणीपट्टीच वाढ करण्याच्या वेळेस राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले होते. आता, निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष सावध झाले असून, प्रस्तावाला पाठिंबा देणार की फेटाळून लावणार याचे पत्ते आज, सोमवारी थेट सर्वसाधारण सभेतच उलगडले जाण्याची चिन्हे आहेत.
कर्जरोख्यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार विशेष आग्रही असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला आहे. स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला मान्यता मिळवण्यासाठीही आयुक्तांनी याच पद्धतीने सर्वांना गळ घातली होती. मात्र, या वेळी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष एकत्र असतील, तरच प्रस्तावाला पाठिंबा दिला जाईल, अशी भूमिका प्रमुख राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे, या प्रस्तावावर सर्वसहमती घडविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

प्रस्तावावर आडकाठी?
समान पाणीपुरवठा योजनेतील टाक्यांच्या बांधकामासाठी काढण्यात आलेल्या टेंडरला विधान परिषदेत आक्षेप घेण्यात आल्याने राज्य सरकारने नुकतीच सर्व प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आल्याने कर्जरोख्यांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तरी पुढील प्रक्रिया केली जाणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये मारामारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना कार्यकर्त्यांच्या दोन गटामध्ये रविवारी दुपारी जोरदार मारामारी झाली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रसाद प्रकाश शेलार यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून सोन्या खंडागळे, मन्या खंडागळे आणि तोहित काझी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील रासकर पॅलेस येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत होत्या. या वेळी बहुसंख्य इच्छुक उमेदवारांकडून हातात झेंडे घेऊन, घोषणाबाजी देत जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. प्रभाग क्रमांक १८ खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ या प्रभागातून प्रेम प्रकाश शेलार आणि रेखा चव्हाण हे दोघे इच्छुक आहेत. प्रसाद शेलार हे प्रेम शेलार यांचे बंधू आहेत. दुपारी अडीचच्या सुमारास या दोघांकडूनही मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन सुरू होते. त्यावेळी रेटारेटी झाल्याने चव्हाण यांचे समर्थक सोन्या खंडागळे, मोन्या खंडागळे आणि काझी या तिघांनी प्रसाद शेलार यांना शिवीगाळ करून झेंड्याच्या पाइपने मारहाण केली. त्यामध्ये दोन कार्यकर्ते जखमी झाले. दुपारी अचानक झालेल्या या भांडणामुळे गोंधळ उडाला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवस राजकीय घडामोडींचा

0
0

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये चढाओढ; युतीचा विकासकामांचा धडाका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहराची सत्ता हाती ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना सर्वच राजकीय पक्षांकडून पूर्वतयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखतींमध्ये आघाडी घेतली असून, सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तेवर असणाऱ्या भारती​य जनता पक्ष आणि शिवसेनेने शहरात एकापाठोपाठ एक विकासकामांचा धडाका लावला आहे. आज, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रविवार सुट्टीच दिवस असूनही शहरातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसून आले. विविध राजकीय पक्षांच्या हालचाली आणि पूर्वतयारी पालिका निवडणुकीची नांदी असल्याचे दिसून येत आहे.

‘दादा, मला संधी द्याच’
कार्यकर्त्यांची तुडूंब गर्दी... त्यांना आवरण्यासाठी थेट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची होणारी लगबग... ‘दादा, या वेळी मला संधी द्याच,’ असा होणारा आग्रह... अगदी २५ वर्षांच्या तरुणापासून ६५ वर्षांच्या आजीपर्यंत सगळ्यांची उमेदवारी मिळवण्यासाठी चाललेली धडपड... अन्.. इच्छुकांकडून आलेला प्रत्येक अहवाल निरखून वाचणारे ‘दादा’...
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यानची ही काही क्षणचित्रे... कसबा, हडपसर, कॅन्टोंन्मेंट आणि पर्वती विधानसभा मतदार संघातील २५० इच्छुकांच्या मुलाखती रविवारी संपल्या. बिबवेवाडी येथील रासकर पॅलेसमध्ये सकाळी साडेआठपासून या मुलाखतींना प्रारंभ झाला. गेल्या दोन दिवसांत ४९० इच्छुकांनी मुलाखती दिल्या.
शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी आमदार कमल ढोले-पाटील, दीपक मानकर, अण्णा थोरात, रवींद्र माळवदकर, प्रवक्ते अंकुश काकडे, अशोक राठी, कृष्णकांत कुदळे, सुभाष जगताप, राकेश कामठे, शशिकांत तापकीर, पंडित कांबळे, इक्बाल शेख, मिलिंद वालवाडकर, शैलेश बडदे आदींनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
अगदी चकचकीत, गुळगुळीत कागदावरील रंगबेरंगी छपाई, आकर्षक डिझाइन असलेले कार्यअहवाल घेऊन उमेदवार मुलाखतीला आपल्या समर्थकांसह दाखल होत होते. महेश सोसायटी चौक ते अप्पर इंदिरानगर दरम्यान मुलाखतींमुळे वाहतूक कोंडी झाली होती. दुतर्फा वाहनांच्या लागलेल्या रांगा वाहतूक कोंडीत भर घालत होत्या. त्याचवेळी इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांचे लोंढे रासकर हॉलवर धडकत होते. ‘आयात उमेदवारांना संधी देऊ नका, पक्षासाठी तन, मन, धन देऊ, पक्ष बळकटीसाठी पूर्ण प्रयत्न करू, फक्त तुम्ही लढ म्हणा,’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सेविका म्हणून निवृत्त झालेल्या ६५ वर्षांच्या आजीही समाजसेवेचे व्रत पूर्ण करण्यासाठी तिकिटाची मागणी करीत होत्या.
प्रत्येकाची वैयक्तिक चौकशी करून उमेदवारांनी दिलेल्या अहवालावर नजर फिरवित अजित पवार संवाद साधत होते.

‘शिवसेनेकडे इच्छुकांची लाट’
‘शिवसैनिकांना महापालिका निवडणुका पहिल्यांदाच स्वबळावर लढायला मिळत असल्याने त्यांच्यात प्रचंड उत्साह आहे. सर्वच प्रभागांमध्ये शिवसेनेकडे तगडे उमेदवार आहेत. जवळपास ७०० इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांची यादी अंतिम होईल,’ अशी माहिती शहरप्रमुख माजी आमदार विनायक निम्हण यांनी दिली.
शिवेसनेकडून गेले तीन दिवस इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर होणाऱ्या कार्यक्रमापासून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची तयारी जोरदार सुरू होईल, असे निम्हण म्हणाले.
‘शिवसैनिकांना प्रथमच महापालिका निवडणुका स्वबळावर लढायला मिळत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. प्रत्येक प्रभागात आणि प्रत्येक विभागात शिवसेनेकडे उमेदवार आहेत. अनेक प्रमुख पक्षांना सर्वच ठिकाणी उमेदवार मिळणे अवघड बनले असताना शिवसेनेकडे मात्र इच्छुकांचा ओघ आहे,’ असे निम्हण म्हणाले.
सोशल मीडियाच्या प्रभावी वापरासाठी शिवसेनेची सोशल मीडिया लॅब सज्ज होत आहे. उमेदवारांना प्रत्येक प्रकारची मदत तसेच प्रभावी प्रचारतंत्राची मदत करण्यासाठी पक्षाकडून पूर्ण प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत, असेही निम्हण यांनी सांगितले. इच्छुकांच्या यादी आम्ही पक्षातील प्रमुख सचिवांकडे पाठवणार आहोत. त्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अंतिम यादी जाहीर करतील. या सर्व प्रक्रियेला जानेवारीचा पहिला आठवडा उजाडेल, असेही ते म्हणाले.

शिवसेना-भाजपमध्ये विकासकामांची स्पर्धा
शिवसेना, भारतीय जनता पक्षाची महापालिका निवडणुकीसाठी युती करण्याबाबत दोन्ही पक्षांचे नेते चर्चा करीत असताना महापालिकेत मात्र विकास कामांच्या उदघाटनावरून या दोन्ही पक्षांत चांगलीच जुंपली आहे. महापालिकेच्या माध्यमातून कोंढवा बुद्रुक येथे झालेल्या विविध विकास कामांच्या उदघाटनासाठी भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि शिवसेनेकडून जलसंपदा व जलसलंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते उदघाटनाचा स्वतंत्र कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.
आमदार योगेश टिळेकर आणि शिवसेनेच्या संगीता ठोसर कोंढवा प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात. कोंढवा बुद्रुकमध्ये फायरब्रिगेड केंद्र, दवाखाना, मराठी व उर्दू शाळा उभारण्यात आली आहे. या कामांच्या उदघाटनासाठी टिळेकर यांनी खास मुख्यमंत्र्यांना आज आमंत्रित केले आहे. त्यानुसार संपूर्ण प्रभागात फ्लेक्सबाजी करण्यात आली. रस्त्यांची डागडुजीही करण्यात आली. हा कार्यक्रम शत्रुंजय मंदिर चौक येथे दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने देखील या सर्व कामांचे उदघाटनासह हेरिटेज पार्क, व्यायाम शाळा व विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन करण्यासाठी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना पाचारण केले आहे.
शिवसेनेचा कार्यक्रम स्वामी विवेकानंद उद्यान येथे सकाळी दहा वाजता आयोजिण्यात आला आहे. त्यामुळे प्रभागात दोन्ही पक्षांतील शीतयुद्धाची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम हा महापालिकेचा अधिकृत कार्यक्रम आहे. ‘या कार्यक्रमात शिवसेनेच्या नगरसेविका ठोसर यांनी सहभागी झाले पाहिजे होते. या ठिकाणी विकास कामांचे उदघाटन व पक्षाचा मेळाव असे स्वतंत्र कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत,’ असे टिळेकर यांनी सांगितले.
महापालिकेत उदघाटनाच्या कार्यक्रमाचा ठराव झाला, त्यावेळी ठोसर यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव सुचविले होते. मात्र, आम्हाला विश्वासात न घेता केवळ मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उदघाटन करण्याचा घाट घालण्यात आला. प्रभागात त्यासंबंधीचे फ्लेक्स पाहिल्यानंतर आम्हाला त्याची जाणीव झाली. त्यामुळे आम्हाला वेगळा कार्यक्रम घ्यावा लागत असल्याचे ठोसर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निवडणुकीत काय होईल माहीत नाही’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आगामी महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांचा प्रभाग असणार आहे. त्यामुळे तेव्हा काय होईल, हे मी सांगू शकत नाही,’ असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले.
पुणे महापालिकेने एरंडवणे फायरब्रिगेड केंद्राच्या आवारात उभारलेल्या फायरब्रिगेड संग्रहालयाचे उदघाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. फायरब्रिगेड संग्रहालयाच्या उदघटनच्यावेळी व्यासपीठावर मनसेचे नगरसेवक अनिल राणे आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे हे दोघेही उपस्थित होते. ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाचा समारोप करताना दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकाच व्यासपीठ उपस्थित असल्याचे सांगत ते म्हणाले, ‘आजकाल हे चित्र पाहायला मिळत नाही. यापुढे तर चार सदस्यांचा प्रभाग असणार आहे. त्यामुळे काय होईल, हे मी सांगू शकत नाही.’
या वेळी महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसचे प्रमुख प्रभात रहांगदळे, फायरब्रिगेडचे मुख्याधिकारी प्रशांत रणपिसे, महापालिकेचे उपायुक्त नितीन उदास, मनसेचे प्रदेश सरचिटणीस अनिल शिदोरे, मनसेचे महापालिकेतील गटनेते बाबू वागसकर, बाळा शेडगे, किशोर कदम आणि फायरब्रिगेडचे अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. फायरब्रिगेड आणि पोलिस कर्मचारी जीवावर उदार होऊन जनतेसाठी कार्यरत असतात. मात्र, सामान्य नागरिक आणि सरकारकडूनही त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. तर, फायर सर्व्हिसेसच्या क्षेत्रात कोणतीही गोष्ट सुरुवातीला मुंबई फायरब्रिगेडकडून केली जाते. मात्र, यावेळी संग्रहालय उभारणीमध्ये पुण्याने बाजी मारल्याचे रहांगदळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानांच्या संगोपनात नागरिकांचा सहभाग हवा

0
0

राज ठाकरे यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राज्यातील अनेक शहरांमध्ये मोकळी जागा दिसली; की ती विकली जाते. शहरातील इंच-इंच जागा विकायला काढली जात असताना, उद्यानांसाठी जागा मिळणे आणि ती विकसित केली जाणे, हे भाग्य आहे. उद्याने म्हणजे शहराची फुफ्फुसे असून, महापालिकेला प्रत्येकवेळी उद्याने जोपासण्याचे काम करता येणे शक्य नाही. अशावेळी नागरिकांनीच आपल्या पाल्यांप्रमाणे उद्यानांचे संगोपन करावे,’ असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी केले.
कोरेगाव पार्क परिसरात (प्रभाग क्र २१) मनसेचे नगरसेवक राजेंद्र आणि वनिता वागसकर यांनी महापालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण केलेल्या बंडगार्डन येथील उद्यानाचा लोकार्पण सोहळा ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ते बोलत होते. वागसकर यांच्या प्रभागातील इतरही विकासकामांचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, मनसेचे उपाध्यक्ष बाळा शेडगे, शहरप्रमुख अजय शिंदे, हेमंत संभूस, गटनेते अॅड. किशोर शिंदे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
उद्यानाच्या उदघाटनानंतर ठाकरे यांनी उद्यानात उभारलेल्या जॉगिंग ट्रॅकची पाहणी केली आणि बहुमोल सूचना केल्या. ज्येष्ठ नागरिक संघ पुणे सेंट्रलच्यावतीने आयोजित छोटेखानी कार्यक्रमामध्ये बोलताना ठाकरे यांनी वागसकर दाम्पत्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ‘शहरातील एकाच प्रभागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे प्रकल्प बहुधा या दोनच नगरसेवकांनी राबविले असतील’, अशा शब्दांत त्यांनी वागसकरांच्या कार्याचा गौरव केला.

शाळेसाठी योगदान दिल्याचा आनंद
नगरसेवक राजेंद्र वागसकर यांचे शिक्षण नॉर्थ मेन रोडवरील कस्तुरबा विद्यालयात झाले. कोरेगाव पार्क परिसरातील शाळेची जागा एका व्यावसायिकाच्या घशात घालण्याचा डाव होता; पण महापालिकेच्या माध्यमातून ही जागा ताब्यात मिळवून त्याचे नूतनीकरण करण्यासाठी पाठपुरावा केला. माजी विद्यार्थी म्हणून शाळेसाठी काहीतरी योगदान देता आले, याचा विशेष आनंद होत असल्याचे सांगताना वागसकर यांचा कंठ दाटून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पार्ट्यांच्या स्कॅनिंगवर ‘उत्पादन शुल्क’चा भर

0
0

जिल्ह्यासाठी चौदा पथकांची नियुक्ती; बड्या हॉटेलवरही नजर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन अवघ्या काही दिवसांवरच आले आहे. या पार्श्वभूमीवर पंचतारांकित हॉटेल, लॉन्स, बारमध्ये मद्याचे पेलेच्या पेले रिचविण्यासाठी आयोजित पार्ट्यांचे ‘स्कॅनिंग’ करण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरुवात केली आहे. शहराच्या विविध भागात ‘शनिवारी रात्री अशा प्रकारच्या किमान अठरा ते वीस पार्ट्या होत असून तेथेही विक्री करण्यात येत असलेल्या मद्याची तपासणी करण्यात येत आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या पार्ट्यांच्या तपासणीसाठी १४ पथके नेमण्यात आली आहेत. या पार्ट्यांमध्ये ‘सर्व्ह’ करण्यात येणारे मद्य ​अधिकृत ठिकाणाहूनच खरेदी करण्यात येत आहे अथवा नाही, बनावट मद्याची विक्री तर होत नाही ना, मद्य वितरित करण्यासाठी परवाना घेण्यात आला आहे की नाही आदींची तपासणी करण्यात येत आहे. अनधिकृतपणे जर पार्ट्यांचे आयोजन होत असेल तर त्याची माहिती नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, असे आवाहन उपअधीक्षक सुनील फुलपगार यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यात आणि शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बारा रेंज आहेत. त्याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. अशा प्रकारे १४ पथके जिल्ह्यात आणि शहरातील विविध ठिकाणी छापे घालून बेकायदा मद्यविक्रीवर कारवाई करीत आहे. या पथकांनी आता पंचतारांकित हॉटेल, लॉन्स आ​णि खासगी पार्ट्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

जेथे पार्टी; तेथीलच मद्य
अनेकदा पार्टी करताना घरी असलेल्या स्कॉच, व्हिस्कीच्या बाटल्या वापरल्या जातात. अशा प्रकारच्या पार्ट्यांचे आयोजन करायचे असल्यास, एक दिवसाचा पार्टी परवाना घ्यावा लागतो. परवाना घेताना मद्य कोठून विकत घेणार आहात, याचीही माहिती लिहून द्यावी लागते. पार्टीमध्ये वापरण्यात येणारे मद्य आता त्याच ठिकाणाहून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. एका ​ठिकाणी सुरू असणाऱ्या पार्टीत दुसरीकडील मद्य वापरले गेल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

वीकेंडला चाळीस पार्ट्या
पुणे शहर आणि परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एक दिवसाचा परवाना घेऊन शनिवार-रविवारी सरासरी १८ ते २० पार्ट्या करण्यात येतात. पंचतारांकित हॉटेल्समध्ये अनेकदा अशा पार्ट्यांचे आयोजन होते. पूलसाइड पार्टी किंवा वेगळ्या हॉलमध्ये पार्टी करायची असेल, तरहीही परवाना घेणे बंधनकारक आहे. या ​पार्ट्यांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे फुलपगार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेः शहीद सौरभ फराटेंना अखेरचा निरोप

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

जम्मू-काश्मीरमधील पॅम्पोर येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले लान्सनायक सौरभ नंदकिशोर फराटे यांच्यावर आज फुरसुंगीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्राच्या या वीर सुपुत्राला शेवटचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता. 'सौरभ फराटे अमर रहे'च्या घोषणा गावात घुमल्या तेव्हा सगळ्यांच्याच एका डोळ्यात दुःखाचे तर एका डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते. यावेळी गावकऱ्यांनी 'पाकिस्तान मुर्दाबाद'चेही नारे दिले.

सौरभ फराटे १३ वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते. त्यांना दोन मुली आहेत. त्यांचा लहान भाऊ रोहितही सैन्यदलात आहे. त्यांचे वडील खासगी कंपनीत कामाला होते, तर आई गृहिणी आहे. सौरभ खूप मनमिळावू व शांत स्वभावाचे होते. त्यांच्या जाण्याने हडपसर परिसरावर शोककळा पसरली आहे.

श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पॅम्पोर येथे लष्करी ताफ्यावर शनिवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा आणि दोन जवान जखमी झाले होते. त्यातच सौरभ फराटे यांनाही वीरमरण आलं होतं. पुलवामा जिल्ह्यातील पॅम्पोर येथील कडलबल भागात गर्दीच्या वेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सुरक्षा रक्षकांनी नागरिकांची जिवीतहानी होऊ नये म्हणून हल्ल्याला प्रत्युत्तर दिले नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्येसाठी झाडलेली गोळी शेजाऱ्याच्या मानेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविकेच्या मुलाने असाध्य आजाराला कंटाळून रिक्षात स्वतःवर देशी गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. मात्र, त्याच्या डोक्यातून आरपार गेलेली गोळी त्याच्या सहकाऱ्याच्या मानेत घुसल्याचा प्रकार आता समोर आला आहे. घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी सांगवी पोलिसांनी हा प्रकार उघड केला आहे.

कैलास मकवन उर्फ लोहार (वय ३७, रा. पिंपळे गुरव) असे गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या मानेत गोळी अडकली आहे. शस्त्रक्रियेद्वारे ही गोळी काढण्यात येणार आहे. सेवासिंग गुरुमितसिंग अदियाल (वय ३८, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) याने बुधवारी (दि. १४) रात्री असाध्य आजाराला कंटाळून आत्येभावाच्या रिक्षात स्वतःवर गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्महत्या केली होती.
सेवासिंग हा राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शोभा अदियाल यांचा मुलगा आहे. सेवासिंग याने स्वतःवर गोळी झाडली. त्या वेळी रिक्षात त्याचा आत्येभाऊ सुखविंदर सिंग आणि कैलास असे तिघे जण होते. सेवासिंगने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्यानंतर ती गोळी सेवासिंगच्या डोक्यातून आरपार जाऊन पुढे बसलेल्या कैलासच्या
मानेत घुसली.

सुरुवातीला कैलासला किरकोळ दुखापत झाल्याचे वाटले होते. मात्र, एक्स-रे तपासणीत कैलासच्या मानेत गोळी अडकल्याचे समोर आले. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगवी पोलिसांनी सांगितले. मात्र, घटना घडल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी सांगवी पोलिसांनी हा प्रकार उघड केल्याने या आत्महत्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. सांगवी पोलिस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वेटर खरेदी रखडली

0
0

महापालिका आणि शिक्षण मंडळाची उदासीनता कारणीभूत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षण मंडळ आणि महापालिका प्रशसानाच्या उदासीन धोरणामुळे पालिका शाळांमधील स्वेटर खरेदी रखडली आहे. हिवाळा सुरू अनेक अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना स्वेटर मिळालेले नाहीत. स्वेटर खरेदीचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे अडकल्याने ही खरेदी झाली नसल्याचे समोर आले आहे.
दर वर्षी महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वेटर दिले जातात. यंदाच्या वर्षीही मंडळाने स्वेटर खरेदी प्रक्रिया राबविली होती. मात्र, विधान परिषदेच्या निवडणूकीच्या आचारसंहितेत ही खरेदी प्रकिया अडकली. ही आचारसंहिता शिथील झाल्यानंतर यासाठीचे टेंडर उघडण्यात आले. यामध्ये पात्र ठरलेल्या ठेकेदाराने जो सर्वात कमी दर दिला आहे, तो मंडळाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक असल्याचे कारण देऊन त्यावर मंडळाने निर्णय घेतला नसल्याने ही खरेदी प्रक्रिया अडकली आहे. अखेर या संबधीचा प्रस्ताव मंडळाने आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे अंतिम निर्णयासाठी पाठविला आहे. मात्र, तीन आठवडे झाल्यानंतरही आयुक्तांनी त्यावर निर्णय घेतला नसल्याने ही खरेदी प्रक्रिया रखडली आहे.
या सगळ्या प्रशासकीय कारभारामुळे विद्यार्थ्यांना थंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे विद्यार्थ्यांना स्वेटरपासून वंचित राहावे लागत असल्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठीचे साहित्य खरेदी करण्याऐवजी त्यांना थेट पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करता येईल का? याची चाचपणी पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. यासाठी आधी विद्यार्थ्यांची बँक खाती सुरू करावी लागणार आहेत. त्यानंतर पालकांना स्वत: स्वेटर खरेदी करून त्याची पावती जमा केल्यानंतर त्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. यासाठी मोठा कालावधी लागणार असल्याने विद्यार्थ्यांना थंडी संपल्यानंतरच स्वेटर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फी भरा ऑनलाइन

0
0

सुविधा नसल्यास कॅशलेसची सक्ती नाही; शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शाळांचे शुल्क ऑनलाइन, धनादेश अथवा डेबिट कार्डने भरण्याची व्यवस्था शाळेत उपलब्ध झाल्यास पालक विद्यार्थ्यांचे शुल्क ‘कॅशलेस’ पद्धतीने भरू शकतात. तसेच, ज्या शाळेत अशा प्रकारची सुविधा उपलब्ध आहे, त्या शाळांनी पालकांकडून शुल्क स्वीकारावे. मात्र, याबाबतची सक्ती अद्याप शिक्षण विभागाने केलेली नाही, अशी माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.
नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर पालकांना त्यांच्या पाल्यांचे म्हणजेच विद्यार्थ्यांचे शाळांचे शुल्क भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पालक शुल्क हे ऑनलाइन, धनादेश अथवा डेबिट कार्डने भरू शकतात. ज्या शाळेत अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत, तेथे पालकांकडून शुल्क नाकारण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत भावे हायस्कूलचे मुख्याध्यापक के. एन. अर्नाळे म्हणाले, ‘शाळांमध्ये ऑनलाइन, धनादेश अथवा डेबिट कार्डने शुल्क भरण्याची व्यवस्था उपलब्ध झाल्यास शालेय प्रशासनाने विद्यार्थ्यांचे शुल्क घ्यायला कोणतीच अडचण नाही. अशी सुविधा उपलब्ध झाल्यास एकप्रकारे त्याचा फायदा शाळा आणि पालकांना होईल.’ शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी नोटाबंदीच्या निर्णयामुळे काही दिवसांपूर्वी परिपत्रक काढून शाळांना धनादेशाद्वारे शुल्क स्वीकारण्याचे आदेश दिले होते.
पुणे जिल्ह्यातील शाळांना ऑनलाइन, धनादेश अथवा डेबिट कार्डने शुल्क स्वीकारण्याबाबत कोणत्याही प्रकारची सक्ती केली नाही. शाळा शुल्क स्वीकारण्यासाठी या पद्धतीचा वापर करू शकतात. तसेच,शाळांमध्ये सुविधा उपलब्ध असल्यास शाळांनी पालकांकडून शुल्क अशा पद्धतीने स्वीकारावे, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख (प्राथमिक) यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसही सज्ज

0
0

निवडणुकीची पूर्वतयारी सुरू
म. टा प्रतिनिधी, पुणे
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महापालिका निवडणुकीत आघाडीची शक्यतेचा चर्चा होत असली, तरी राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसनेही आता महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. पुढील आठवड्यापासून उमेदवारी अर्जांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. अद्याप आघाडीचा कोणताही प्रस्ताव ठेवण्यात आलेला नसून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच त्याबाबत विचार करता येईल, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.
काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी उमेदवारी अर्जांचे वाटप, इच्छुकांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. या प्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, चंद्रकांत छाजेड, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते.
पाणी, वाहतूक, नदीकाठच्या परिसराची दुरावस्था आदी शहरातील प्रमुख समस्यांवर प्रचारादरम्यान मांडणार आहोत. जाहीरनाम्याचे काम अंतिम टप्प्यात आले आले आहे. आघाडीबाबत आम्ही कोणालाही प्रस्ताव दिलेला नाही किंवा राष्ट्रवादीकडून तसा काही प्रस्ताव आलेला नाही. काँग्रेसने महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केली आहे, असे बागवे म्हणाले.
..
निष्ठावान कार्यकर्ते काँग्रेसमध्येच
जे नगरसेवक, पदाधिकारी इतर पक्षांमध्ये गेले आहेत, त्यांनी कधी काँग्रेस भवनची पायरीही चढली नव्हती. सत्तेच्या हव्यासापोटी ते इतर पक्षांत गेले आहेत. काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही, अशी टिप्पणीही बागवे यांनी यावेळी केली.
..
भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग
भाजपने सत्तेचा दुरुपयोग करून काँग्रेस नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना फोडण्याचे काम केले आहे. नगरपालिका निवडणुकांचे हाती आलेल्या निकालांमध्ये काँग्रेलसा चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीतही काँग्रेसचा अपेक्षित यश मिळेल, असे माजी मंत्री पाटील म्हणाले.
जिल्हा बँकावर घालण्यात आलेले निर्बंध चुकीचे होते. सुप्रीम कोर्टानेही त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही हे निर्बंध पूर्णपणे उठवण्यात आलेले नाहीत. ज्या जिल्हा बँकांनी चुकीच्या पद्धतीने पैसे स्वीकारले असतील तर त्यांच्यावर कारवाई करा. मात्र, सरसकट सगळ्यांना एकच न्याय का, असा सवालही पाटील यांनी केला.
००
असे होईल अर्ज वाटप आणि मुलाखती
- अर्ज वाटप २१ ते २५ डिसेंबर सकाळी १० ते दुपारी ६ या वेळेत.
- उमेदवारी अर्जाची फी ५०० रुपये.
- पक्षनिधी- खुला गट- १० हजार रुपये, ओबीसी महिला/पुरुष सात हजार ५०० रुपये आणि मागासवर्गीय महिला/पुरुष पाच हजार रुपये.
- मुलाखती या २७ ते ३० डिसेंबर या कालावधीत काँग्रेस भवन येथे घेण्यात येणार.
- दर दिवशी चौदा प्रभाग या प्रमाणे मुलाखतींसाठी इच्छुकांना बोलावण्यात येणार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिटफंड कंपनीकडूनलाखोंची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राजेश्री कुरीज प्रायव्हेट लिमिटेड चिटफंड कंपनीने गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याच्या अमिषाने ३० ते ३५ जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोपटप्रसाद वागनप्रसाद परदेशी (६०, रा. संतोषनगर, कात्रज) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून पी. के. वेणू आणि विवेक वेणू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी यांचे इंजिनीअरिंग वर्कशॉप आहे. त्यांना त्यांच्या एका मित्रामार्फत राजेश्री कुरीज प्रा. लि. चिटफंडबाबात माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आरोपींकडे संपर्क साधला. त्यात पाच लाखांची भिशी होती. परदेशी यांनी भिशी लावली. त्यानुसार ते महिन्याला साडेबारा हजार रुपये भरत होते. परदेशी यांच्यानुसार आणखीही काही जणांनी भिशी लावली होती. वेणू यांनी या सर्व लोकांकडून १८ महिन्यांत प्रत्येकी एक लाख ७१ हजार रुपये गोळा केले. अशा प्रकारे एकूण आठ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे आढळून आले आहे.
चिटफंडामध्ये पैसे गुंतवल्यास जास्त परतावा देण्याच्या आमिषाने वाघमारे व इतर ३० ते ३५ जणांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. आरोपींचे चिटफंडचे पहिले कार्यालय मित्रमंडळ चौकामध्ये होते. तेथून त्यांनी ते हिराबाग येथील नटराज पोर्ट इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर नेले. मात्र, आरोपी एप्रिल २०१६ मध्ये कार्यालयाला कुलूप लावून पसार झाले. तक्रारदार व इतरांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी तक्रार अर्जाचा तपास केला. त्या वेळी अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर या दोघांवर गुन्हे दाखल केले. या प्रकरणी उपनिरीक्षक बी. एस. गुरव हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शस्त्रपरवान्यासाठी ऑनलाइन नोंदणी

0
0

युनिक आयडेंटिफिकेशन नंबर घेण्याची सक्ती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शस्त्रपरवाना घेतल्यानंतर त्याबाबतची माहिती न देणाऱ्यांना आता ‘चाप’ बसणार आहे. जिल्ह्यातील शस्त्रपरवानाधारकांना यापुढे ऑनलाइन माहिती भरून त्याबाबतचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर प्राप्त करण्याची सक्ती करण्यात आली आहे. वेळीच माहिती न देणाऱ्यांचे शस्त्रपरवाने अवैध ठरवण्यात येणार आहेत.
शस्त्रपरवानाधारकांनी ऑनलाइन माहिती भरावी, यासाठी महसूल आणि पोलिस विभागामार्फत पोलिस स्टेशनमध्ये शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. संबंधित माहिती न भरल्यास शस्त्रपरवाने अवैध ठरवले जाणार आहेत.
केंद्र सरकारने तयार केलेल्या एनडीएल या बेबसाइटवर शस्त्रपरवानाधारकांना शस्त्रपरवान्याची माहिती भरून युनिक आयडेंटिफिकेशन नंबर मिळवावा लागणार आहे. त्यानंतर डाटाबेसमध्ये माहिती भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. शस्त्रपरवानाधारकांच्या शस्त्र परवान्याची माहिती अद्ययावत करण्यासाठी ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
या शिबिरांमध्ये परवानाधारकांकडून परवान्याचा तपशील, त्यांचे नूतनीकरण, शस्त्राची खातरजमा, शस्त्रपरवानाधारक​ दिलेल्या पत्यावर राहतात​ किंवा कसे आदी माहिती तपासण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितले.
‘मूळ परवानाधारक मरण पावले असल्यास त्यांच्या वारसदारांनी मृत्यू झालेल्या परवानाधारकांचा मृत्यूचा दाखला, मूळ परवाना आणि शस्त्रजमा पावती आदी सादर करणे आवश्यक आहे. शिबिराला परवानाधारक उपस्थित न राहिल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल,’ असे मुठे यांनी स्पष्ट केले.
.............
विभाग - शिबिरची तारीख - पोलिस ठाणे
आंबेगाव-जुन्नर २२ डिसेंबर - मंचर
खेड २० डिसेंबर - खेड
भोर-वेल्हा ३० डिसेंबर - भोर
दौंड-पुरंदर २८ डिसेंबर व १२ जानेवारी - दौंड, सासवड
मावळ-मुळशी तीन जानेवारी व ३० जानेवारी - वडगाव मावळ
पुणे शहर- शिरूर ६ जानेवारी - शिरूर
हवेली उपविभाग २४ जानेवारी व ३ फेब्रुवारी - लोणीकाळभोर
बारामती-इंदापूर १७ जानेवारी व २० जानेवारी - बारामती, इंदापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाधी महोत्सवाची सांगता

0
0

श्री मोरया गोसावी मंदिरात विविध पारंपरिक कार्यक्रम; भ‌ाविकांची गर्दी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या ४५५व्या संजीवन समाधी महोत्सवाचा सोमवारी उत्साहात समारोप झाला. मोरयाच्या जयघोषात निघालेली दिंडी, पुष्पवृष्टी आणि पारंपरिक पद्धतीचा महाप्रसाद ही सोहळ्याची वैशिष्ट्ये ठरली.

भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणाऱ्या या महोत्सवाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष होते. नऊ ते १९ डिसेंबरच्या कालावधीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये दासबोध पारायण, सामुदायिक सूर्यनमस्कार, भजन, कीर्तन, शास्त्रीय आणि अभंग गायन, सुगम संगीत, प्रवचन, अथर्वशीर्ष पठण, श्री मोरया गोसावी चरित्र पठण, सामुदायिक महाभिषेक, रक्तदान शिबिर, श्री गणेशयाग, श्रीसूक्तपठण, दंत आणि नेत्र चिकित्सा शिबिर, माफक दरात चष्मे वाटप, नाथ सांप्रदायिक हवन, रुद्र स्वाहाकार यांचा समावेश होता.

देऊळमळा पटांगणावर भव्य मंडप उभारण्यात आला होता. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ शुक्ल यांच्या हस्ते रविवारी (१८ डिसेंबर) पुरस्कार वितरण झाले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, सतीश गडाळे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, गजानन चिंचवडे उपस्थित होते.

पुरस्कार वितरणानंतर प्रसिद्ध कलाकार पं. रोणू मुजूमदार यांचे बासरीवादन झाले. मुजूमदार यांनी राग बागेश्रीने कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर झपतालात बंदीश पेश केली. मुजूमदार यांना कल्पेश साचला (बासरी), प्रताप पाटील (पखवाज), अविनाश पाटील (तबला) यांनी साथ केली.

‘मोरगाव परंपरेचा सन्मान’

‘महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार या पावनभूमीत मोरयावरच्या लिखाणाकरिता दिला जात आहे. तो अभूतपूर्व आहे. हा सन्मान म्हणजे चिंचवड परंपरेने मोरगाव परंपरेचा केलेला गौरव होय,’ अशी भावना विद्यावाचस्पती प्रा. स्वानंदशास्त्री पुंड यांनी व्यक्त केली. त्यांना श्री मोरया जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उषा बेलसरे, प्रवीण निकम, प्रणव देव, दिलीप सावंत, भानुदास तुपे, रवींद्र नामदे, मोरेश्वर शेडगे, मोहन गायकवाड यांचाही पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाभारतावरील चित्रपट महोत्सव शनिवारपासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाभारत हा आपल्या प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा आणि औत्सुक्याचा विषय. आतापर्यंत हा विषय घेवून अनेक चित्रपट निघाले आणि रसिकांनी ते डोक्यावर देखील घेतले. याच चित्रपटांचा आस्वाद पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना घेता यावा, या हेतूने पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने महाभारतावरील चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

२४ ते २६ डिसेंबर दरम्यान लॉ कॉलेज रस्त्यावरील एफटीआयआय येथे सकाळी १०. ३० ते रात्री ९ दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवातील चित्रपटांचा रसिकांना विनामूल्य आस्वाद घेता येणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एपिक वाहिनीवरील ‘देवलोक’ हा कार्यक्रम करणारे डॉ. देवदत्त पटनाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेचे मानद सचिव श्रीकांत बहुलकर, एनएफएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अजमेरा या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. ‘अ थ्रो ऑफ डाइस’ या चित्रपटाने महोत्सवाला सुरुवात होईल.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच, संस्थेच्या ‘महाभारत’ विषयावरील दुर्मिळ ग्रंथाच्या प्रकाशनाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. हा दुहेरी योग साधून या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

दरम्यान, महाभारत या विषयाकडे विस्तृतपणे पाहता यावे, यासाठी हिंदी, तेलगू, तमिळ आणि इंग्रजी मूकपट, चलतचित्र, बालचित्रपट, अॅनिमेशन, कॉश्चूम ड्रामा, मॉडर्न अॅडाप्शन, टेली सिरियल या सर्व भाषा आणि माध्यमांमध्ये साकारण्यात आलेले महाभारत पुणेकर रसिकांना पाहायला मिळणार आहेत. यातील अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनीच्या वादातून खून

0
0

ममहाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाडसह सहा जणांना अटक

म. टा. प्रतिनिधी , हडपसर

वडकी येथे जमिनीच्या वादातून आणि पूर्व वैमनस्यातून एका व्यक्तीला रस्त्यात अडवून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाडसह सहा आरोपींना लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली आहे.
शिवाजी दामोदर गायकवाड ( वय ५० रा. वडकी ता. हवेली , जि . पुणे ) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी महाराष्ट्र केसरी दत्तात्रय भानुदास गायकवाड, सचिन मुरलीधर फाटे, संतोष सर्जेराव मोडक, सोमनाथ संतराम गायकवाड, दीपक दत्तात्रय गायकवाड, लखन गुलाब मोडक (सर्व रा. वडकी) यांना अटक केली आहे. विवेक पंडित-मोडक आणि पंडित परशुराम मोडक यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी अजिंक्य शिवाजी गायकवाड (वय २३, रा. वडकी ) याने तक्रार दिली आहे.
पोलिस उपअधीक्षक वैशाली कडूकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि शिवाजी गायकवाड यांच्या जमिनीचा वाद आहे. त्यावरून त्यांच्यात सतत भांडणे होत होती. २०१५मध्ये दोन गटांमध्ये भांडणे झाल्यानंतर तक्रार झाली होती. त्यातील काही जण सध्या तुरुंगात आहेत. त्याचा राग मनात धरून शिवाजी गायकवाड यांचा खून करण्यात आला. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शिवाजी गायकवाड दुचाकीवरून हडपसरमधील सिरम कंपनीत निघाले होते. वडकी गावाच्या मुख्य रस्त्यावरून ते जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर कोयता आणि गजाने वार केले. या हल्ल्त गायकवाडा यांचा जागीच मृत्यू झाला. खुनानंतर आरोपी पळून गेले. आजूबाजूच्या नागरिकांनी गायकवाड यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. लोणीकाळभोर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू करून सहा आरोपींना अटक केली. आरोपींमध्ये महाराष्ट्र केसरी दत्तात्रय गायकवाडचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसआरए’मध्ये १०९ लाभार्थी बोगस

0
0

पिंपरी-चिंचवड महापालिकेची पोलिसांकडे तक्रार

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याचा आरोप नगरसेविका सीमा सावळे यांनी केला होते. त्यावर महापालिका प्रशासनाने शिक्कामोर्तब केले होते. निगडी, सेक्टर क्रमांक २२मधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बोगस आणि बनावट जन्म दाखल्याद्वारे १०९ अपात्र लाभार्थ्यांना घरांचे वाटप केल्याचे हे प्रकरण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंगलट आले आहे. महापालिकेने हे प्रकरण पोलिसांकडे सोपविले आहे. त्याबाबत पिंपरी पोलिसांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

महापालिकेने केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. त्याअंतर्गत निगडी येथील सेक्टर २२, अजंठानगर, उद्योगनगर, वेताळनगर, मिलिंदनगर, विठ्ठलनगर या झोपडपट्ट्या, तसेच रस्तारुंदीकरण बाधित, रेल्वे मार्गानजिकचे, पूरबाधित नागरिकांसाठी एकूण १८ हजार ३२ घरे बांधून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पांसाठी केंद्राने १६६ कोटी २६ लाख आणि राज्य सरकारने ९९ कोटी २९ लाख रुपयांचे अनुदान दिले. प्रत्यक्षात महापालिकेने आतापर्यंत ४९५ कोटी ७७ लाख रुपयांचा खर्च केला आहे.

केवळ बांधकामातच नव्हे, तर राष्ट्रवादीचे नगरसवेक, पदाधिकाऱ्यांनी झोपडपट्टीधारकांच्या नावाने आपले सगेसोयरे, मित्रमंडळींसाठी ही घरे बळकावल्याचे समोर आले आहे. राजकीय वजन वापरून खऱ्या लाभार्थ्यांऐवजी बोगस लाभार्थ्यांना घरकुले मिळवून देण्यात आली. त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. या सर्व प्रकाराचा नगरसेविका सावळे यांनी भांडाफोड केला होता. निगडी, ओटास्कीम येथे ३ हजार घरांचे वाटप करण्यात आले. त्यातील २०० लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासल्यानंतर नगरसेविका सावळे यांना त्यातील १४१ बोगस लाभार्थी असल्याचे पुरावे सादर केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सावळे केली होती.

तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखापरीक्षक आणि झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वनस विभागाचे सहायक आयुक्त यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर १४१ पैकी १०९ लाभार्थी बोगस असल्याचे शिक्कामोर्तब केले. या त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल डॉ. परदेशी यांच्या बदलीनंतर आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे सादर केला. या अहवालात अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यानुसार आयुक्त दिनेश वाघमारे यांनी हे प्रकरण पोलिसांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त सुभाष माछरे यांनी पिंपरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

बोगस लाभार्थी नेमके किती?

अवघ्या २०० लाभार्थ्यांची कागदपत्रे तापसल्यानंतर त्यापैकी १०९ लाभार्थी बोगस निघाले आहेत. त्यामुळे घरांचे वाटप केलेल्या सर्व ३ हजार लाभार्थ्यांची कागदपत्रे तापसल्यास बोगस लाभार्थ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images