Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

युवा वादकांना रसिकांची दाद

$
0
0

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवशी देबोप्रिया आणि शुचिस्मिता या दोघी बहिणींच्या बासरीवादनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी एस. बल्लेश आणि कृष्णा बल्लेश यांच्या सनई वादनालाही श्रोत्यांनी दाद दिली होती. त्यामुळे युवा वादकांना पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महोत्सवास या वर्षी तरुण वादकांना आणि गायकांना ऐकण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. त्याचा थेट प्रत्यय बासरीवादनाच्या दरम्यान आला.
प्रख्यात बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया यांच्या या दोन्ही शिष्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात राग ‘मारवा’ने केली. वातावरणात आल्हाददायी गारवा भरून राहिलेला असतानाही ‘मारवा’च्या स्वरांनी श्रोत्यांना आर्त केले. शुचिस्मिता हिचे काहीसे ठेहराव घेऊन आणि पाठिंबा दिल्याप्रमाणे केलेले वादन आणि तितकेच देबोप्रियाचे बहुतांशी पुढाकार घेऊन आणि आक्रमक पद्धतीने केलेले वादन र‌सिकांना भावले.
आज (९ डिसेंबर) डॉ. मैसूर मंजूनाथ आणि मैसूर नागराज यांच्या व्हायोलिन वादनासाठी, शनिवारी (दि. १०) लक्ष्य मोहन गुप्ता आणि आयुष मोहन गुप्ता यांच्या अनुक्रमे सतार आणि सरोदवादनासाठी आणि त्याच दिवशी डॉ. एल. सुब्रह्मण्यम् आणि अंबी सुब्रह्मण्यम् यांच्या व्हायोलिन वादनासाठी उत्सुक असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. रविवारी (११ डिसेंबर) होणारे ताकाहिरो अराई यांचे संतूरवादन आणि अमान अली बंगश व अयान अली बंगश यांच्या एकत्रित सरोद वादनाविषयीही तरुणांमध्ये उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घराण्याची संकल्पना कालबाह्य

$
0
0

प्रसिद्ध गायक पं. गणपती भट यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘एकाच गुरूचे दहा शिष्य वेगवेगळ्या प्रकारे गातात. ज्ञान ग्रहण करताना घराणी शुद्ध राहात नाही. त्यामुळे शास्त्रीय संगीतामध्ये घराण्याची संकल्पना हळूहळू कालबाह्य होत आहे,’ असे स्पष्ट मत प्रसिद्ध गायक पं. गणपती भट यांनी गुरुवारी व्यक्त केले. ‘सर्वच घराण्यांच्या गायकीमध्ये आलाप, ताना, लयकारी आणि बंदिशी असतात. त्यामुळे घराण्याचे वेगळेपण काय असे विचारले तर अनेकदा सांगता येत नाही,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६४ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील ‘अंतरंग’ उपक्रमात ते बोलत होते. या वेळी मंगेश वाघमारे यांनी भट यांच्यासह प्रसिद्ध सतार-सूरबहारवादक उस्ताद इर्शाद खाँ यांच्याशी संवाद साधला.
‘घराणे म्हणजे मूळ गोष्टीची शेवटची कॉपी असते. लिहिले आहे पण, वाचता येत नाही,’ असे पं. कुमार गंधर्व म्हणायचे, असा दाखला देऊन पं. भट म्हणाले, ‘महाविद्यालयामध्ये चार वर्षे सतारवादन शिकलो. सतार हे लयप्रधान वाद्य असल्याने त्याचा फायदा माझ्या गायकीला झाला. धारवाडला आल्यानंतर पं. बसवराज राजगुरू यांच्याकडे माझे सगळे संगीत शिक्षण झाले. किराणा घराण्याच्या गायकीमध्ये आलापी आणि रागविस्ताराला प्राधान्य आहे. त्यामुळे गंगुबाई हनगल आणि पं. भीमसेन जोशी यांचा माझ्यावर प्रभाव पडला.’
‘गायक म्हणून मैफलीला येताना वेगळी तयारी करून आल्यानंतर रसिकांकडून वेगळेच राग सादर करण्याची फर्माईश होते. श्रोत्यांना आनंद देणे हेच कलाकाराचे ध्येय असते. त्यामुळे त्यांना आवडेल ते गाण्यामध्ये कलाकाराला आनंद मानावा लागतो. त्यामध्ये हरकत असण्याचे काही कारण नाही,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
...
--------------
संगीत माझी मातृभाषा
‘माझ्या जन्मापासूनच घरात संगीताचे वातावरण आहे. त्यामुळे संगीत कधी शिकलो हे सांगता येणार नाही. संगीत हीच माझी मातृभाषा आहे,’ अशी भावना उस्ताद इर्शाद खाँ यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आजोबा उस्ताद इनायत खाँ यांच्याकडून वादनात उजव्या हाताचा वापर कसा करावा हे शिकलो. उस्ताद बडे गुलाम अली खाँ आणि उस्ताद आमीर खाँ हे घरी येत असल्यामुळे त्यांच्याकडून गायकी शिकलो. वडील उस्ताद इमरत खाँ आणि काका उस्ताद विलायत खाँ यांच्या वादनाचा माझ्यावर प्रभाव आहे. त्यामुळे माझ्या वादनामध्ये तंतकारीबरोबरच ख्याल आणि ध्रुपद गायकीचा मिलाफ असतो. माझी सतार माझ्या वडिलांनी ५५ वर्षांपूर्वी कोलकत्ता येथील हेरन रॉय यांच्याकडून त्यांच्यासाठी बनवून घेतली होती. सतारीच्या तारा जर्मनीहून आणाव्या लागतात. मी १२ वर्षांचा असताना वडिलांनी ही सतार वाजवून पाहा असे मला सांगितले. माझी वादनातील गती पाहून त्यांनी ही सतार मलाच देऊन टाकली. तेव्हापासून सतारीवर माझे प्रेम जडले.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयाची सुई आता बँक अधिकाऱ्यांवर

$
0
0

Prasad.Panse@timesgroup.com
@prasadpanseMT
पुणे : बाजारातील मोठ्या चलन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आगळीक करणारे बँक अधिकारी आता सरकारच्या रडारवर आले आहेत. बँकेतून रक्कम काढण्यावर मर्यादा असतानाही काही व्यक्तींकडे मोठ्या प्रमाणावर रोकड आढळत असल्याने संशयाची सुई बँक अधिकाऱ्यांवर आहे. पुण्यासह राज्यातील काही खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांवर सरकारी यंत्रणांची बारीक नजर आहे. त्यातील काही अधिकाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार असल्याचेही समजते.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या चलनातील ८६ टक्के हिस्सा असणाऱ्या ५०० व १००० च्या नोटा अवघ्या चार तासांत बाद झाल्या. त्यानंतर मोठा चलन तुटवडा निर्माण झाल्याने बँक व्यवहारांवर निर्बंध आणण्यात आले. बाद झालेल्या नोटा बँकांमध्ये भरण्यासाठी रांगा लागल्या, तशाच रांगा नोटा बदलून घेण्यासाठीही लागल्या. याच काळात नियमबाह्य पद्धतीने विशिष्ट मर्यादेबाहेर जात नोटा बदलून देणाऱ्या बँक व पोस्टाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू झाली. नोटा बदलण्याची मुदत संपल्यानंतर आता नियमबाह्य पद्धतीने रक्कम बदलून देण्याचे रॅकेट सक्रिय झाले असून त्यावरच सरकारी यंत्रणांची नजर आहे.
हे अधिकारी बाद नोटांमधील रक्कम स्वीकारून त्या बदल्यात काही खातेदारांच्या माध्यमातून संबंधितांना वैध चलनातील रक्कम बदलून देत आहेत. अनेकदा खातेदारांच्या नावे पैसे काढल्याचे दाखवत ही रक्कम परस्पर संबंधित व्यक्तींच्या हवाली केली जात आहे. त्यासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आकर्षक कमिशनही दिले जात आहे. यामध्ये बँकांमधील शाखेतील अधिकाऱ्यांबरोबरच करन्सी चेस्ट व मुख्यालयातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
'रिझर्व्ह बँकेकडून बँकांना कमी रक्कम मिळत आहे. तरीही बँकांना दिली जाणारी सर्व रक्कम खातेदारांपर्यंत पोहोचताना दिसत नाही. दुसरीकडे नव्या पाचशेच्या नोटाही बाजारातून गायब आहेत. त्यातच काही विशिष्ट व्यक्तींकडे मोठ्या प्रमाणावर वैध चलन आढळून येत आहे. या व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीनुसार बँक अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हे पैसे फिरविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बँक अधिकारी परस्पर चलनाची फिरवा-फिरवी करून पैशाच्या काळ्याबाजाराला किंवा साठेबाजीला साथ देत असल्याने सरकारी यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
'पुण्यासह राज्यातील काही राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांकडून रिझर्व्ह बँकेच्या मर्यादांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे लक्षात आले आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आमची नजर आहे. यातील संशयास्पद अधिकाऱ्यांसंबंधीचे पुरावे गोळा करण्यात येत असून पुरावे हाती येताच त्यांना ताब्यात घेण्यात येईल,' असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
----
'ते' अधिकारी गॅसवर
नोटबंदीच्या काळात गैरव्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्राप्तीकर विभाग, सक्तवसुली संचालनालय, पोलिस व गुप्तचर यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. त्याचबरोबर थेट पीएमओच्या स्वतंत्र यंत्रणेकडूनही लक्ष ठेवले जात आहे. बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही या यंत्रणांची बारीक नजर असल्याने नोटांच्या नियमबाह्य आदलाबदली किंवा फिरवाफिरवीत गुंतलेले अधिकारी सध्या गॅसवर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिपूजनावरून रंगला वाद

$
0
0

मोदी की पवार यात अडकला कार्यक्रम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे मेट्रोच्या प्रकल्पाला केंद्रीय तसेच राज्य मंत्रीमंडळाने मान्यता दिल्याने मेट्रोच्या भूमिपूजनाचे वेध आता महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २४ डिसेंबरला एसएसपीएमएसच्या मैदानावर या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम भाजपने आखला आहे. तर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते मेट्राचे भूमिपूजनाचे नियोजन पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले आहे. पुढील दोन दिवसात या कार्यक्रमाची तारीख आणि स्थळ जाहीर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शहरातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला दहा वर्षाच्या चर्चेनंतर मान्यता मिळाली आहे. केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या सरकारने शहरासाठी मेट्रो प्रकल्प मान्य केला असल्याने पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्याचे भाजपने जाहीर केले आहे. पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असल्याने आघाडी सरकारच्या काळात मेट्रोसाठी अनेक प्रयत्न केले गेले. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अन्य पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचा ठराव पक्षनेत्यांच्या बैठकीत मान्य करण्यात आला आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी सर्वच पक्षांची जोरदार चढाओढ सुरू झाली आहे. मेट्रोच्या भूमिपूजनाचे औचित्य साधून पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. त्यासाठी सर्व मंडळी कार्यक्रमाच्या तयारीला लागली आहे. या उद्घाटनानिमित्त भाजपकडून शक्तिप्रदर्शन करून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणारा मेट्रो प्रकल्प शहरात आणण्यासाठी राष्ट्रवादीने वारंवार पाठपुरावा केला. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात शरद पवार यांनी यासाठी केंद्रीय नगरविकास मंत्र्यांची भेट घेतली. पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असून हा प्रकल्प पालिकेचा आहे. त्यामुळे याचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. येत्या दोन दिवसात या कार्यक्रमासाठीची वेळ आणि ठिकाण ‌निश्चित करून कार्यक्रम घेण्याचे नियोजन राष्ट्रवादीने सुरू केले आहे.
….
मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित आराखड्यानुसार नदीपात्रातून मेट्रोचा मार्ग‍ प्रस्तावित करण्यात आला आहे. या मार्गाला शहरातील काही स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) प्रतिनिधींनी आक्षेप घेत राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) तक्रार दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून यावर सुनावणी सुरु आहे. मेट्रोचे भूमिपुजन २४ डिसेंबरला होण्याचे निश्चित करण्यात आल्याने एनजीटीने यावर अंतिम निर्णय लवकर द्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती. त्याची दखल घेऊन २१ डिसेंबरला मेट्रोच्या निर्णयावर सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाडेकरूंची माहिती भरा ऑनलाइन

$
0
0

पुणे पोलिसांतर्फे गुरुवारपासून सुविधा उपलब्ध; ई-सेवा देणारे पहिले दल असल्याचा दावा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन सेवा पुरवण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले असून त्यामध्ये घरबसल्या पासपोर्ट-चारित्र्य पडताळणी, ऑनलाइ प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) देण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आता भाडेकरूंची माहितीही ऑनलाइन देता येणार आहे.
पुणे पोलिस दलाने गुरुवारपासून ‘टेनंट इन्फॉर्मेशन फॉर्म’ ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे पुणेकरांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन सायबर सेलचे उपायुक्त दीपक साकोरे यांनी केले आहे. अशा प्रकारे ई-सेवा पुरवणारे पुणे पोलिस दल हे देशातील पहिले दल ठरले असल्याचा दावाही साकोरे यांनी केला आहे.
पुणे शहरात हजारो फ्लॅट भाड्याने दिले जातात. दहशतवादी, नक्षलवाद्यांकडून पुण्यात भाड्याने वास्तव्य करत या ठिकाणी आक्षेपार्ह कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांना देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. यापूर्वी पोलिस ठाण्यात उपलब्ध असलेला किंवा पुणे पोलिसांच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेला फॉर्म योग्य कागदपत्रांसह भरून संबंधित पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष नेऊन द्यावा लागत असे. पोलिस ठाण्यातील अनेक विचित्र अनुभवांमुळे नागरिक ही माहिती देण्यास टाळाटाळ करण्याचे प्रमाण ​अधिक होते. तसेच, भाडेकरू बदलला तर बदलल्या भाडेकरूची माहिती पुन्हा पोलिस ठाण्यात जाऊन देण्यास घरमालकांकडून हलगर्जीपणा केला जात असे.
पुणे पोलिसांनी नागरिकांना पोलिस ठाण्यात जाण्याची गरज भासणार नाही आणि भाडेकरुची माहितीही पोलिसांना मिळेल, यासाठी ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. यासाठी आवश्यक असणारी तांत्रिक मदत येरोन्युब कंपनीचे पंकज घोडे व अविराज मराठे हे करत आहेत.
..
कशी माहिती भराल
पुणे पोलिसांच्या punepolice.co.in या वेबसाइटवरील ‘अदर’ या टॅबवर जावे. येथे क्लिक केल्यानंतर टेनंट इन्फर्मेशन फॉर्म हा टॅब दिसतो. त्यावर क्लिक केल्यानंतर घरमालकाने स्वतःचा मोबाइल नंबर तेथे भरावा. त्या मोबाईल क्रमाकांवर एक वन टाइम पासवर्ड असलेला मेसेज येईल. तो पासवर्ड तेथे भरल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर तेथे एक फॉर्म येईल तो भरावा. अशा प्रकारे भाडेकरूची माहिती ऑनलाइन भरून पोलिसांना देता येईल. फ्लॅट मालकाचे नाव, त्याचा मोबाइल क्रमांक, भाडेकरूचे नाव, त्याचा पत्ता, आधारकार्ड, पॅनकार्ड, कायमस्वरूपी पत्ता, त्याचा मोबाइल क्रमांक, जन्म तारीख याची माहिती भरावी. विद्यार्थी, कुटुंब, परदेशी नागरिक यापैकी आवश्यक तो विभाग निवडावा. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांना एक आयडी दिला जाईल.
..
संशय आल्यास पोलिस माहिती घेणार
भाडेकरूंची येणाऱ्या माहितीची खात्री पोलिसांच्या विशेष शाखेकडून केली जाणार आहे. विशेष शाखेत ऑनलाइनद्वारे आलेली माहिती संबंधित पोलिस ठाण्यांना पाठवून तिची खात्री केली जाईल. एखाद्या भाडेकरूबाबत काही संशय आल्यास पोलिस प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरुषोत्तम महाअंतिम फेरी सुरू

$
0
0

कुडाळच्या ‘मैत’ नाटकाने स्पर्धेला सुरुवात
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. महाअंतिम फेरीला कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या ‘मैत’ या एकांकिकेच्या सादरीकरणाने सुरुवात झाली. राज्यभरातील पाच केंद्रांवरील १८ विजेते त्यांच्या एकांकिका सादर करणार आहेत.
विजय दळवी लिखित मैत ही एकांकिका जातिव्यवस्थेवर भाष्य करणारी होती. राऊळ महाविद्यालयाचा विद्यार्थी विश्वजित पालव याने या एकांकिकेचे दिग्दर्शन केले होते. काही वर्षांपूर्वी समाजात स्पृश्य आणि अस्पृश्य असा भेद केला जात होता. जातीनुसार, वर्णानुसार लोक विभागले गेले होते. त्याच काळातील ही कथा होती. रूढी, परंपरा यांच्या विळख्यात माणूसपण जपले पाहिजे, याची जाणीव या एकांकिकेने करून दिली. त्यानंतर अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘१४ एप्रिलची रात्र’ ही एकांकिका सादर केली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच्या सत्रात दोनच एकांकिकांचे सादरीकरण झाले. आज (९ डिसेंबर) दोन सत्रांमध्ये स्पर्धा पार पडणार असून, सकाळी नऊच्या सत्रात पु. ओ. नहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ यांची ‘धागा’, इचलकरंजी नाइट कॉलेजची ‘प्रेम अ-भंग’, आणि नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी, जळगावची ‘सांबरी’ या एकांकिका रंगणार आहेत. संध्याकाळी पाच वाजताच्या सत्रात राजेंद्र माने पॉलिटेक्निक कॉलेज, देवरूख यांची ‘रसिक’, सी. पी. अँड बेरार कॉलेज, नागपूर यांची ‘अनोळखी ओळख’, आणि शिवाजी विद्यापीठ नृत्य व संगीत विभाग, कोल्हापूरची ‘अजन्म’ ही एकांकिका रंगणार आहे.
------------------------
पुणेकर तरुणांची स्पर्धेकडे पाठ
पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीमध्ये पुण्यासह राज्यातील इतर कलाकारांच्या दर्जेदार एकांकिका पाहायला मिळतात. मात्र, यंदाच्या वर्षी पहिल्याच दिवशा सादर होणाऱ्या दोन एकांकिकांना अत्यंत कमी प्रेक्षक होते. स्पर्धेसाठी आलेल्या इतर स्पर्धकांचीच संख्या सभागृहात जास्त होती. शनिवार, रविवारच्या दिवशी पुण्याचे संघ सादरीकरण करणार असल्याने त्या वेळी गर्दी होईल, असे संयोजकांचे म्हणणे आहे. मग बाहेरून आपली कला सादर करण्यासाठी आलेल्या स्पर्धकांना पुणेकरांनी प्रोत्साहन द्यायचे नाही का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच दरम्यान पुण्यात सुरू असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवामुळे देखील कदाचित तरुणांनी या स्पर्धेकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेट्रो’ला राज्याचीही मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्राबरोबरच राज्य सरकारचीही गुरुवारी अंतिम मंजुरी मिळाल्याने प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

शहरात मेट्रो प्रकल्प राबवायचा झाल्यास २८ टक्के खासगी, तर ७२ टक्के सरकारी जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्पांची कामे ‘महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड’ या कंपनीमार्फत केली जाणार असून या कंपनीमार्फत ही कार्यवाही होणार आहे. भूसंपादन करण्यासाठी पुणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिकांची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारबरोबरच गुरुवारी पुणे मेट्रो प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. मेट्रो प्रकल्पाच्या नियोजित वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेटपर्यंतच्या ३१ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी सर्वसाधारण ११० एकर जागेची आवश्यकता आहे. यामध्ये, राज्य आणि केंद्र सरकारच्या ताब्यातील ७५ एकर आणि दोन्ही मार्गांलगतच्या खासगी मालकीच्या ३४ ते ३५ एकर जागेचा समावेश आहे. पुणे मेट्रो प्रकल्पासाठी स्वतंत्र विशेष हेतू वहन कंपनी (एसपीव्ही) स्थापन न करता ‘महाराष्ट्र रेल कार्पोरेशन कंपनी’ला या प्रकल्पाचे काम देण्यात आले असल्याने लवकरच हे काम सुरू होईल, असे पालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पुणे तसेच पिंपरी चिंचवड पालिकेच्या हद्दीत हा प्रकल्प होणार असल्याने जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकली जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतचे कोणतेही आदेश अद्याप आलेले नसल्याचेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पाचे भूम‌िपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. चार वर्षांत हा प्रकल्प मार्गी लागून मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल, असेही बापट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौरी यांच्या गायनाने‘ बिरज में धूम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘बिरज में धूम मचाए कान्हा’ ही भीमपलास रागातील प्रसिद्ध बंदीश आणि त्या दरम्यान घेतल्या गेलेल्या हरकती, आलाप आणि ताना यामुळे गायिका गौरी पाठारे यांचे गायन रंगतदार झाले. ठेहरावाने सादर केलेल्या बड्या ख्यालानंतर सादर झालेल्या या छोट्या बंदिशीने रसिकांची तुफान वाहवा मिळवली.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ६४व्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या बुधवारी, पहिल्याच दिवशी गौरी यांच्या गायनाने दर्दींना विशेष दाद द्यायला भाग पाडले. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या मार्गदर्शनाखाली किराणा घराण्याची उत्तम तालीम घेतलेल्या गौरी यांचे नंतरचे शिक्षण पं. जितेंद्र अभिषेकी आणि पंडिता पद्माताई तळवलकर यांच्याकडे झाले. पं. अरुण द्रविड यांच्याकडून २०१० सालापासून जयपूर घराण्याची गायकी शिकणाऱ्या गौरी यांनी भीमपलास रागातीलच ‘रंग डारुंगी’ ही आणखी एक चीज पेश केली.

श्री रागातील छोट्या ख्यालानंतर त्यांनी दादरा सादर करून मैफलीची सांगता केली. त्यांनी आपल्या गायनात जयपूर, ग्वाल्हेर आणि किराणा या तिन्ही घराण्यांच्या गायकीचा उत्तम मेळ साधला. त्यांना सुधीर नायक यांनी हार्मोनियमची आणि रामदास पळसुले यांनी तबल्याची साथ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यातील पिंपरी बुद्रुक पहिले कॅशलेस गाव

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

देशाला कॅशलेस बनविण्याच्या केंद्रसरकारच्या निर्णयाची एकीकडे विरोधक खिल्ली उडवत असताना पुण्यातील पिंपरी बुद्रूक या गावाने मात्र देशातील पहिले कॅशलेस गाव होण्याचा मान मिळविला आहे. या गावात रेशनपासून ते दैनंदिन जीवनासाठी लागणारे सर्वच व्यवहार ऑनलाइन होत आहेत.

भामा नदीच्या काठावर हे गाव असून गावाची लोकसंख्या जेमतेम केवळ २८०० एवढी आहे. पुणे शहरापासून ६१ किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे गाव खऱ्या अर्थाने डिजिटल झाले आहे. या गावाला कॅशलेस करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने बँकींगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. केंद्रसरकारच्या सेंटर फॉर गुड गव्हर्न्सनेही या गावाला बुधवारी कॅशलेस गाव म्हणून जाहिर केले आहे. या गावातील प्रत्येक गावकऱ्याचे बँकेत खाते आहे. त्यामुळे या गावातील लोक दळणापासून ते रेशनिंग पर्यंतचे सर्व व्यवहार कॅशलेस पद्धतीने करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​स्वच्छतागृहामध्ये मुलीचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
महंमदवाडी येथील माध्यमिक शाळेतील स्वच्छतागृहात १६ वर्षांच्या मुलीचे हात बांधून तिचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा वानवडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
महंमदवाडी येथील शाळा भरणाच्या वेळेस प्रार्थना सुरू असताना संबंधित विद्यार्थिनी स्वच्छतागृहात गेली होती. त्या वेळी तोंडाला कापड गुंढाळलेला एक इसम त्या ठिकाणी आला. त्याने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला प्रतिकार करून हातापायाने मारहाण केली. तिचा विरोध पाहून आरोपीने हात एका कापडी फडक्याने बांधून तिथून पोबारा केला. स्वच्छतागृहात आलेल्या इतर विद्यार्थ्यांनी मुलीला त्या ठिकाणी हात बांधून पडलेल्या अवस्थेत पहिले. त्यांनी ही घटना शिक्षकांना कळविली. शिक्षकांनी वानवडी पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलिस उपायुक्त कल्पना बारावकर, सहायक आयुक्त रवींद्र रसाळ, पोलिस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी भेट दिली. पुढील तपास उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​विद्यार्थी संघटनांत बाचाबाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामेदव सभागृहात गुरुवारी झालेल्या ‘लेफ्ट राइट लेफ्ट’ या नाटकानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) व स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनांच्या विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ विद्यापीठातील वातावरण चांगलेच तापले होते.
विद्यार्थ्यांना शहरात फोफावत असलेला दहशतवाद समजावा, ‘अभाविप’कडून यासाठी या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. हे नाटक नक्षलवादावर भाष्य करणारे असून महाराष्ट्रात त्याचे विविध ठिकाणी यशस्वी प्रयोग होत आहेत. नक्षलवादावर या नाटकातून टीका केल्यामुळे डाव्या विचारांच्या तसेच नक्षवादाला समर्थन करणाऱ्या लोकांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला गेला. विशेष म्हणजे आयोजकांनी प्रयोगानंतर प्रश्न विचारण्याची मुभा दिली असतानाही, अशा प्रकारचा गोंधळ घालण्याचा अयशस्वी प्रयत्न डाव्यांकडून केला गेल्याचा आरोप ‘अभाविप’ने केला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाल्याने शेवटी विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या संदर्भात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे विद्यापीठातील उपाध्यक्ष सतीश पडोळकर म्हणाले, ‘शैक्षणिक संस्थामध्ये अशा प्रकारचे भडक नाटक दाखवण्याचे नेमके कारणच काय, हे आम्हाला न समजणारे आहे.’ या नाटकावरून विद्यापीठातील वातावरण तापलेले होते. यावर विद्यापीठ प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

नक्षलवाद विरोधी नाटकामुळे डाव्यांना त्रास होतोय; कारण ते अशा प्रकारांचे कायमच समर्थक राहिलेले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोष्टी करणाऱ्या डाव्या संघटनेने आमचा कार्यक्रम उधळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, याचा आम्ही जाहीर निषेध करतो.
-प्रतिक दामा, अभाविप अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

नाटक दाखवण्याचा नेमका काय उद्देश होता, याची चौकशी व्हावी. या नाटकातील संहितेची ऐतिहासिक तथ्यता तपासावी. विशेषतः मार्क्सवाद, कम्युनिष्ट आणि नक्षलवाद यातील फरक स्पष्ट करावा; तसेच विद्यापीठ प्रशासनाकडून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.
- नसीर शेख, एसएफआय अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सात कोटींची थकीत बिले जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिले न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात सहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, तर २४ हजार ग्राहकांनी सात कोटी रुपयांची थकीत बिले भरली आहेत.
पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा या पाचही जिल्ह्यांत थकीत बिलांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम गेल्या महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवड्याभरात २४ हजार २२० ग्राहकांनी सात कोटी १५ लाख रुपयांचा भरणा केला, तर सुमारे तीन कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी सहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
गेल्या काही महिन्यांत पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडळात थकबाकीचे प्रमाण कमी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्याचे आदेश प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले. त्यानुसार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पुणे परिमंडळात अडीच हजार, बारामतीमध्ये अडीच हजार आणि कोल्हापूरमध्ये ८७३ थकबाकीदारांचा समावेश आहे.
महावितरणची ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकीत बिलांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिलांच्या आकारणीबाबत तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात येणार आहे. बिले भरण्यासाठी स्थानिक वीजबिल भरणा केंद्रे, ऑनलाइन पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाइट तसेच मोबाइल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.

सुटीच्या दिवशी भरणा केंद्रे सुरू
पश्चिम महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील महावितरणची सर्व बिल भरणा केंद्रे आज (शनिवारी) उद्या आणि सोमवारी सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. येत्या गुरुवारपर्यंत (१५ डिसेंबर) पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा बिलांसाठी स्वीकारण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​मेट्रोच्या श्रेयवादात काँग्रेसचीही उडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मेट्रो प्रकल्पाच्या श्रेयवादाच्या लढाईत भाजप, राष्ट्रवादीपाठोपाठ आता काँग्रेसनेही उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या उद्घाटनाच्या तारखेच्या अगोदरच उद्घाटन करण्याचा विचार काँग्रेसने सुरू केला आहे. हा प्रकल्प सर्वसामान्य पुणेकरांसाठी असल्याने नागरिकांच्या हस्तेच याचे उद्घाटन करण्याचे नियोजन केले जात आहे.
शहरातील बहुचर्चित पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्र तसेच राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी प्रयत्न केल्याचा दावा करत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ डिसेंबरला याचे भूमिपूजन करण्याची तयारी सुरू केली आहे. तर पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रकल्प पालिकेचा असल्याचा दावा करत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते २२ डिसेंबरला करण्याचा ठराव पक्षनेत्यांच्या बैठकीत मान्य करण्यात आला आहे. या ठरावाला काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता.
मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी प्रयत्न करत असतील, तर महापालिकेत सत्तेत असताना आणि त्यानंतर केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रसने मेट्रोचा पहिला प्रस्ताव २००६ तयार केला होता. याचा डीपीआर देखील काँग्रेसच्या काळात मंजूर करण्यात आला होता. पुण्यात मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी काँग्रेसने केली आहे. हे पुणेकरांपर्यंत पोहचविण्यासाठी काँग्रेसने या प्रकल्पाचे उद्घाटन करावे, अशी चर्चा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झाली. त्याला अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिल्याने याचे उद्घाटन करण्याचे नियोजन केले जात असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रो मार्गिकांची तांत्रिक पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या दोन दिवसांत पुणे मेट्रोला ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानंतर शुक्रवारी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (एनएमआरसी- नव्याने महाराष्ट्र मेट्रो) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुण्याला भेट देऊन मेट्रोच्या दोन्ही मार्गांची सविस्तर पाहणी केली. मेट्रोची अलाइनमेंट, त्याचे प्राथमिक सर्वेक्षण कशा पद्धतीने सुरू करता येईल, याची चाचपणी या वेळी करण्यात आली.
केंद्र सरकारने बुधवारी, तर राज्य सरकारने गुरुवारी पुणे मेट्रोला मंजुरी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुणे मेट्रोचे भूमिपूजनही याच महिन्यात केले जाणार आहे. देशातील इतर शहरांच्या तुलनेत हा प्रकल्प काहीसा मागे पडल्याने त्याला गती दिली जाणार असल्याचे संकेत पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले होते. त्यानुसार, केंद्र आणि राज्याच्या मंजुरीनंतर तातडीने नागपूर मेट्रोच्या तज्ज्ञांच्या पथकाने गुरुवारी पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाची माहिती करून घेतली. नागपूर मेट्रोचे संचालक (प्रकल्प) महेश कुमार यांच्यासह मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांना धावती भेट दिली.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीची सर्व जबाबदारी ‘नागपूर मेट्रो’कडे (महामेट्रो) असल्याने महेशकुमार यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मेट्रो मार्गांची तांत्रिक पाहणी केली. ‘मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर तीव्र वळणे कुठे आहेत; तसेच पाणी, मलनिस्सारण आणि विजेच्या सेवा वाहिन्या कुठे आहेत, याचा प्राथमिक अभ्यास या पाहणीदरम्यान करण्यात आला. यापुढील टप्प्यात मेट्रोसाठी डेपोची जागा आणि इतर अनुषांगिक पाहणी करून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरू केले जाईल’, अशी माहिती नागपूर मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी शिरीष आपटे यांनी दिली.

‘नागपूर मेट्रोच्या कामाचा अनुभव गाठीशी आहे. त्यामुळे पुणे मेट्रोचे काम आम्ही अधिक गतीने पूर्ण करू. पुणे मेट्रोला उशीर झाल्याने त्याबाबत निराशा आहे; पण पुढील काही महिन्यांतच कामाचा वेग पाहून पुणेकर आश्चर्यचकित होतील.’
- ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, नागपूर मेट्रो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संशोधनास वाव देण्याची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देशात अवकाश संशोधनापेक्षा विविध प्रकारच्या विकासात्मक योजनांवर अधिक भर दिला आहे. त्यामुळे संशोधनाच्या क्षेत्रात आपण मागे पडत आहोत. यावर मात करण्यासाठी शिक्षणामध्ये संशोधनात्मक गोष्टींना वाव देण्याची गरज आहे. तसेच अवकाश मोहिमांसाठी जागतिक स्तरावर भागीदारी करून गुंतवणूक वाढवली पाहिजे,’ असे मत भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. कस्तुरीरंगन यांच्या हस्ते मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) व प्राज उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी लिहिलेल्या ‘अॅज इज व्हॉट इज’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी डॉ. कस्तुरीरंगन ‘इस्रोचे धोरण - शाश्‍वत शास्त्रीय प्रयत्नासाठी’ या विषयावर बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ‘पीआयसी’चे मानद संचालक प्रशांत गिरबने, परिमल चौधरी आदी उपस्थित होते. विश्वकर्मा प्रकाशनाने पुस्तक प्रकाशित केले आहे.
डॉ. कस्तुरीरंगन म्हणाले, ‘इस्रोने आतापर्यंत १२२ मोहीमा हाती घेतल्या. पीएसएलव्हीची ३८ पैकी ३७ प्रक्षेपणे यशस्वी झाली आहेत. मात्र प्रत्येक प्रक्षेपण हे नवीन आणि पहिलेच प्रक्षेपण असल्यासारखा विचार करून त्यावर काम करावे लागते. सध्या सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद अवकाश मोहिमांसाठी केली गेली आहे. ‘इस्रो’त साडेसतरा हजाराहून थोडे अधिक लोक विविध प्रकल्प आणि योजनांवर काम करत आहेत. कमी आर्थिक भांडवलामध्ये यशस्वी उपक्रम राबविल्यामुळे इस्त्रोसाठीची आर्थिक तरतूद सातत्याने वाढविण्यात आली आहे. मात्र यापुढील काळात आता जागतिक स्तरावर भागीदारीचे पर्याय खुले करून गुंतवणूक आणली गेली पाहिजे.’
चौधरी म्हणाले, ‘सातत्याने नावीन्यपूर्ण संशोधन सुरू ठेवणे हे सध्याच्या काळात क्रमप्राप्त झाले आहे. ‘इनोव्हेशन’ हाच प्रगतीचा कणा बनला आहे. या प्रवासात अनेक लोक भेटले आणि त्यांनी मदत केली. त्यामुळे मला पैशापेक्षा लोक महत्त्वाचे वाटतात. नव्या संकल्पना, संशोधन आणि सकारात्मक दृष्टिकोन, हे या प्रवासाचे सार आहे.’
डॉ. माशेलकर यांनी मनोगत व्यक्त केले. गिरबने यांनी प्रास्ताविक केले.

‘अवकाश कायद्याची गरज’
शिक्षण, शेती, आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक देशोपयोगी उद्देशांसाठी इस्रो काम करीत असून, चांद्रयान, मंगळयांनासारख्या अनेक ग्रहांच्या मोहिमा काढल्या जाणार आहेत. मात्र, यासाठी खासगी कंपन्यांनी पुढे आले पाहिजे. तर भारताचा हा अवकाश कार्यक्रम आणखी पुढे जाईल. तसेच अवकाश सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम अवकाश कायद्याची गरज भासणार असल्याचे डॉ. कस्तुरीरंगन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नाट्यशाले’स तन्वीर पुरस्कार प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रंगमंचावर अवतरलेले चंद्र, सूर्य... मानवाची उत्पत्ती कशी झाली, हे मूकाभिनयातून दाखवणारे कलाकार... प्रकाशयोजना आणि संगीताचा प्रभावी वापर करून रंगलेले नाट्य... प्राणी, पक्षी, फुले, झाडे यांच्या हुबेहूब अभिनयाने सादर केलेला बहारदार नाट्याविष्कार शुक्रवारी पुणेकरांनी अनुभवला. नाट्यशाला संस्थेच्या विशेष कलाकारांनी हा आविष्कार सादर केला आणि क्षणभर रसिक अवाक् झाले.
रूपवेध प्रतिष्ठानतर्फे नाट्यशालामार्फत विशेष मुलांच्या आयुष्याला एक नवे वळण देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी कांचन सोनटक्के यांना आणि त्यांच्या नाट्यशाला संस्थेला दीपा लागू यांच्या हस्ते तन्वीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाट्यशालातील विशेष विद्यार्थ्यांनी ‘भरारी’ हे मूकनाट्य सादर केले.
एखाद्या पट्टीच्या कलाकाराला लाजवेल, असा अभिनय साकारत या कलाकारांनी उपस्थितांना थक्क केले. म्हणायला ही मूले मूकनाट्य सादर करीत होती; पण त्यांनी मानवाच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे आणि तत्कालीन समाजव्यवस्थेवर नेमकेपणाने भाष्य केले. माणूस कसा घडत गेला याचा तो एक मूकपट असला तरी क्षणाक्षणाला रसिकांशी अभिनयाने बोलत होता. या बोलक्या अभिनयाने संबंध सभागृह अंतर्मुख झाले. विशेष मुले ही सामान्यच असतात फक्त त्यांना मायेने जवळ घेणाऱ्या हातांची गरज असते. कांचन सोनटक्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मुलांना मायेने जवळ करून प्रत्येकात घडवलेला कलाकार सर्वांना दिसला. तो कलाकार एखाद्या मुरलेल्या अभिनेत्याला लाजवेल अशी कला सादर करत होता. सोनटक्के यांची ३५ वर्षांची तपश्चर्या याला कारणीभूत ठरली. आम्हीही सामान्यांप्रमाणे खेळू शकतो, नाचू शकतो, नाटक करू शकतो, त्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि तो काढून घेऊ नका, अशाप्रकारचा एक संदेशच या मुलांनी समाजाला दिला.
‘नाटक, गायन, वादन यांसारखे कलाप्रकार आत्मसात करून आणि त्यांचे उत्तम सादरीकरण करून विशेष मुले आम्ही वेगळे नाहीत, हे सिद्ध करतात. समाज त्यांना स्वीकारतोय ही समाधानाची बाब आहे. तन्वीर सन्मान मिळणे म्हणजे माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांना आणि या निरागस मुलांना दिलेली एक पावती आहे. त्यामुळे आणखी जोमाने काम करण्याचे बळ मिळाले आहे,’ अशा भावना कांचन सोनटक्के यांनी व्यक्त केल्या. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, कमलाकर सोनटक्के आदी या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘नीट’ परीक्षा प्रादेशिक भाषांतही

$
0
0

पुणे ः देशात वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) परीक्षा पुढील वर्षापासून प्रादेशिक भाषेतही होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली. त्यामुळे नीट परीक्षा इंग्रजी आणि हिंदीसह आता मराठी भाषेत होण्याची शक्यता आहे.
नीट परीक्षेसंदर्भात लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी पटेल यांनी सांगितले की, २०१७ मध्ये होणारी नीट परीक्षा इंग्रजी आणि हिंदीसह प्रादेशिक भाषांमध्येही होणार आहे. पुढील वर्षी ही परीक्षा मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलगूमध्ये घेण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारांच्या आरक्षणाबाबतच्या धोरणाला कोणताही धक्का लागणार नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले. ‘इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट, १९५६मधील सेक्शन १० डी’नुसार, हिंदी, इंग्रजीसह इतर प्रादेशिक भाषांमध्येही ही परीक्षा देता येणार आहे. सीबीएसई आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया यांचा नीट प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याला विरोध होता. पेपर फुटण्याची भीती असल्याचे सीबीएसईचे म्हणणे आहे; तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमाची पुस्तके इंग्लिश वगळता अन्य भाषांमध्ये उपलब्ध नसल्याने हा पर्याय योग्य नसल्याचे एमसीआयने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सायबर सुरक्षेचा नवा अभ्यासक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कम्प्युटरद्वारे निर्माण होणाऱ्या माहितीची सुरक्षितता आणि सायबर सुरक्षा हे सध्याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यातच दिवसेंदिवस ऑनलाइन व्यवहार आणि कॅशलेस देवाणघेवाणीच्या संख्येत भर पडत आहेत. त्यामुळे एकंदरित ‘डेटा’ची सुरक्षा करण्यासाठी आणि त्यावर ‘व्हायरस’चा हल्ला रोखण्यासाठी तज्ज्ञ आयटी प्रोफेशनल्स आणि अभियंत्यांची आवश्यकता आहे. हे प्रोफेशनल आणि अभियंते तयार करण्याची जबाबदारी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उचलली असून तंत्रज्ञान विभागाकडून ‘एमटेक इन्फर्मेशन सिक्युरिटी (आयएस)’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.
विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी ही माहिती दिली. क्विक हिल अॅकॅडमीच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, ‘क्विक हिल’चे अध्यक्ष कैलाश काटकर, विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर उपस्थित होते. या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांना प्रवेश हा प्रवेश परीक्षेद्वारे मिळणार आहे.
डॉ. गाडे म्हणाले, ‘देशात माहिती तंत्रज्ञानात झपाट्याने वाढ आणि बदल होत आहेत. सरकारचे प्रशासकीय विभाग डिजिटल प्रणालीचा अवलंब करीत आहेत, तसेच देशात ‘डिजिटायझेशन’ची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकारांतून डेटाची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय झाला आहे. मात्र, या डेटाची सुरक्षा करण्यासाठी कुशल आणि तज्ज्ञ आयटी प्रोफेशनल उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत हा अभ्यासक्रम प्रोफेशनल्स तयार करण्यासाठी उपयोगी पडेल आणि विद्यार्थ्यांना रोजगाराच्या विविध संधी मिळतील.’ काटकर म्हणाले, ‘सायबर हल्ले आणि नवनवीन व्हायरसचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. या हल्ल्यांना रोखण्यासाठी कुशल तंत्रज्ञ आणि अभियंते मिळत नाही. त्यामुळे या अभ्यासक्रमाद्वारे कुशल तंत्रज्ञ आणि अभियंते तयार करण्याचे प्रयत्न
राहणार आहे.
या अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता तीसची असून क्विक हिल अॅकॅडमीकडून प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. अभ्यासक्रमाचा कालावधी हा दोन वर्षांचा राहणार असल्याची माहिती डॉ. अभ्यंकर
यांनी दिली.

ऑनलाइन करा अर्ज
‘एमटेक इन्फर्मेशन सिक्युरिटी’ या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. परीक्षेसाठी इच्छुकांनी ९ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान www.unipune.ac.in या वेबसाइटहून ऑनलाइन अर्ज भरून ५ जानेवारीपर्यंत विभागात सादर करायचे आहेत. ८ जानेवारीला परीक्षा; तर १० जानेवारीला मुलाखत होईल. अधिक माहितीसाठी विभागाशी संपर्क साधावा किंवा वेबसाइटला भेट द्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेडिट कार्डांनी फसवणूक

$
0
0

पुणे ः ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ची ३३ बनावट क्रेडिट कार्ड तयार करून त्याद्वारे सुमारे दीड कोटी रुपयांचा व्यवहार करणाऱ्या तिघांना सायबर सेलने गजाआड केले. आरोपींनी या क्रेडिट कार्डचा वापर करून बँकेची ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
देविदास वीरेंद्र यादव (वय २४, रा. शिवणे, मूळ रा. बिहार), सागर भुदेवसिंह फौजदार (वय २८, रा. शिवणे) आणि उमेश अजित निंबरे (वय २९, रा. कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांनी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ची ३३ बनावट क्रेडिट कार्ड तयार केल्याचे उघडकीस आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. या प्रकरणी ‘एसबीआय’चे फ्रॉड कंट्रोलर स्वप्नील राऊत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
गुडगाव येथील ग्लोबल इनोव्हा कंपनीने २०१३ ते २०१५ या दरम्यान डेक्कन येथील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड पुरवली आहेत. यातील एक आरोपी हा ‘ग्लोबल’शी संबंधित होता. त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने बँक ऑफ महाराष्ट्राच्या ग्राहकांच्या बँक स्टेटमेंटचा आधार घेऊन बनावट नावाने क्रेडिट कार्ड तयार केले आणि त्यावरून सुमारे दीड कोटी रुपयांचे व्यवहार केले. या व्यवहारांदरम्यान त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाची ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सायबर सेलने तिघांनाही अटक केली असून त्यांना कोर्टाने कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे, सहायक निरीक्षक सागर पानमंद, फौजदार प्रवीण स्वामी, नितीन खामगळ, दीपक भोसले, शिरीष गावडे, नितीन चांदणे, भास्कर भारती, नितेश शेलार, राहुल हंडाळ आदींचा तपास पथकात
सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्तीच्या अर्जांना ३० डिसेंबरपर्यंत मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
व्यावसायिक अभ्यासक्रमातील शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नयेत, यासाठी अर्ज भरण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत वाढवून देण्यात येत असल्याची माहिती, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.
पुणे विभागातील व्यावसायिक अभ्यासक्रमातील शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याबाबतचा प्रश्न आमदार मेधा कुलकर्णी यांनी विचारला होता. या प्रश्नावर तावडे यांनी उत्तर दिले. या प्रश्नाच्या चर्चेत आमदार एकनाथ खडसे आणि राजेश टोपे यांच्यासह अन्य सदस्यांनी भाग घेतला.
तावडे म्हणाले, ‘पुणे विभागातील एकूण १०२ शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे दोन हजार ८२९ विद्यार्थ्यांसाठी सुमारे आठ कोटी ३० लाख रुपये रकमेची मागणी २०१४-१५ या वर्षासाठी होती. त्यापैकी पडताळणीअंती एकूण ४९ संस्थांतील १ हजार ६२६ विद्यार्थ्यांसाठी सुमारे पाच कोटी ४६ लाख रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात आली. उर्वरित ५३ संस्थांमधील एक हजार २०३ विद्यार्थ्यांची रक्कम ३ कोटी १४ लाख रुपये अगोदरच वितरित करण्यात आले आहेत. तसेच २०१५-१६ या वर्षात शिष्यवृत्तीसाठी आतापर्यंत एका लाख ५६ हजार अर्ज दाखल झाले आहेत. विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ घेता यावा यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात येत आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images